Author: naviarthkranti

  • म्युच्युअल फंड्स: नवशिक्यांसाठी मार्गदर्शन | म्युच्युअल फंड्स म्हणजे काय? | म्युच्युअल फंड्सचे प्रकार

    म्युच्युअल फंड्स: नवशिक्यांसाठी मार्गदर्शन | म्युच्युअल फंड्स म्हणजे काय? | म्युच्युअल फंड्सचे प्रकार

    आर्थिक स्थिरतेच्या दिशेने वाटचाल करत असताना, गुंतवणुकीच्या योजनांचे प्रभावी नियोजन अत्यंत आवश्यक आहे. यासाठी एक लोकप्रिय आणि प्रभावी पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड म्हणजेच एक प्रकाराची गुंतवणूक योजना आहे जी विविध प्रकारच्या संपत्तीत गुंतवणूक करून आपल्याला विविध फायदे देऊ शकते.

    अनेक नवशिक्या  तरुणांना म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असते, पण माहितीच्या अभावी ते याकडे दुर्लक्ष करतात. हे लक्षात घेता, नवीन गुंतवणूकदारांसाठी, जे या क्षेत्रात नवे आहेत किंवा योग्य माहितीच्या अभावामुळे गुंतवणूक सुरू करत  नाहीत, त्यांना म्युच्युअल फंड म्हणजे काय, ते कसे काम करते, म्युच्युअल फंडच्या कार्यपद्धती, विविध प्रकार आणि गुंतवणूक करताना लक्षात  ठेवण्याच्या गोष्टी याची सविस्तर माहिती  देणारा आजचा हा लेख आहे. 

    आता, आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय, ते कसे काम करते आणि आपल्या गुंतवणूक धोरणात ते कसे समाविष्ट करावे याबद्दल सखोल चर्चा करूया.

    म्युच्युअल फंड्स म्हणजे काय ?

    परस्पर निधी  म्हणजेचं  म्युच्युअल फंड गुंतवणुकीचं असं साधन आहे, जिथे अनेक लोक आपली थोडीथोडी रक्कम एकत्र करतात. ही एकत्रित रक्कम तज्ञ फंड व्यवस्थापक विविध ठिकाणी, जसं की शेअर्स, बॉण्ड्स किंवा इतर गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवतात. प्रत्येक गुंतवणूकदाराला या फंडाच्या युनिट्स मिळतात, म्हणजे त्या गुंतवणुकीत त्यांचा हिस्सा असतो, म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणं म्हणजे थोड्या पैशात अनेक ठिकाणी गुंतवणूक करता येणे , ज्यामुळे जोखीम कमी होते आणि आपल्याला विविध प्रकारच्या गुंतवणुकीचा फायदा मिळतो.

    उदाहरणार्थ, एक व्यक्ती मोठ्या कंपनीचे शेअर्स थेट खरेदी करू शकत नसेल, तरी म्युच्युअल फंडाद्वारे त्याच कंपनीचे शेअर्स किंवा इतर मालमत्ता अप्रत्यक्षरित्या खरेदी करू शकतो. अशा प्रकारे, म्युच्युअल फंडांमुळे छोट्या गुंतवणूकदारांनाही मोठ्या आणि विविध गुंतवणुकीत सहभाग घेता येतो.

    म्युच्युअल फंड्सचे प्रकार

    म्युच्युअल फंड्सचे अनेक प्रकार आहेत, जे गुंतवणूकदारांच्या गरजा, जोखमीची तयारी, आणि गुंतवणुकीच्या उद्दिष्टांनुसार निवडले जाऊ शकतात.

    १) इक्विटी (समभाग) फंड्स:

     हे फंड्स पूर्णपणे शेअर बाजारात गुंतवणूक केले  जातात. इक्विटी फंड्सचा उद्देश जास्त परतावा मिळवणे असतो, पण त्यासाठी जोखीम देखील अधिक असते. शेअर बाजारातील चढउतारामुळे इक्विटी फंड्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी दीर्घकालीन विचार गरजेचा असतो. जे गुंतवणूकदार जोखीम पत्करू  शकतात, त्यांच्यासाठी इक्विटी फंड्स फायदेशीर ठरतात.

    २) डेट (कर्जरोखे) फंड्स:

     डेट फंड्समध्ये मुख्यत्वे बॉण्ड्स, सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. या फंड्समधून स्थिर आणि कमी जोखीम असलेला परतावा मिळतो. जे गुंतवणूकदार कमी जोखीम आणि स्थिर उत्पन्नाची अपेक्षा करतात, ते डेट फंड्सची निवड करतात.

    ३) हायब्रिड फंड्स:

    हे फंड्स इक्विटी आणि डेट अशा दोन्ही प्रकारांच्या गुंतवणुकीत गुंतवलेले असतात. यामध्ये जोखीम आणि परतावा यांचा संतुलन साधण्याचा प्रयत्न केला जातो. गुंतवणूकदारांना विविधतेचा फायदा आणि स्थिर उत्पन्नाची शक्यता असते.

    ४) इंडेक्स फंड्स:

     इंडेक्स फंड्स हे बाजारातील विशिष्ट निर्देशांकाचे (जसे की निफ्टी ५०, सेंसेक्स) अनुसरण करतात. त्यामुळे, हे फंड्स कमी खर्चात आणि कमी जोखीमेत गुंतवणूक करण्यासाठी योग्य असतात. या फंड्समधील परतावा बाजाराच्या सरासरीच्या जवळपास असतो

    ५) लिक्विड फंड:

    लिक्विड फंड  म्हणजे अत्यंत कमी जोखीम असलेला म्युच्युअल फंड, जो मुख्यतः अल्पकालीन कर्जाच्या साधनांमध्ये गुंतवणूक करतो, जसे की शॉर्ट-टर्म सरकारी सिक्युरिटीज, कॉर्पोरेट पेपर्स इत्यादी. याचा मुख्य लाभ म्हणजे पैशांची जलद उपलब्धता. म्हणजेच, तुम्ही या फंडात गुंतवणूक केल्यावर, तुम्हाला आपले पैसे तात्काळ आणि सहजपणे मिळवता येतात. लिक्विड फंडांचा व्याजदर साधारणतः कमी असतो, परंतु त्यांच्या स्थिरतेमुळे आणि लवचिकतेमुळे हे एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानले जातात.

    म्युच्युअल फंड्स कसे काम करतात?

    म्युच्युअल फंड्सचे व्यवस्थापन तज्ज्ञ फंड व्यवस्थापकांकडून केले जाते. गुंतवणूकदारांची रक्कम विविध प्रकारच्या गुंतवणुकांमध्ये गुंतवली जाते, जसे की शेअर्स, बॉण्ड्स, सरकारी रोख्यांमध्ये. फंड व्यवस्थापक बाजाराचे संशोधन करून योग्य मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतात. म्युच्युअल फंड्सचा मुख्य उद्देश म्हणजे गुंतवणूकदारांना उच्च परतावा मिळवून देणे, जो बाजाराच्या वाढत्या परिस्थितीवर अवलंबून असतो.

    प्रत्येक गुंतवणूकदाराच्या हिशोबाने फंड युनिट्स दिल्या जातात. युनिट्सची किंमत रोजच्या बाजार किमतींवर आधारित बदलत असते, ज्याला NAV ( Net Asset Value) म्हणतात. फंड व्यवस्थापकांनी केलेल्या गुंतवणुकीतून जे उत्पन्न होते, ते सर्व गुंतवणूकदारांमध्ये वाटले जाते.

    म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणुकीसाठी दोन मुख्य पर्याय आहेत: SIP आणि लंप सम

    १) SIP (Systematic Investment Plan): SIP म्हणजे दर महिन्याला किंवा ठराविक काळानुसार एकच रक्कम गुंतवणे. SIP चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बाजाराच्या चढउतारांपासून बचाव होतो. SIP ने दीर्घकाळात चांगले परतावा मिळण्याची शक्यता असते.

    SIP कधी करावी?

    • जेव्हा तुमच्याकडे दर महिन्याला थोडी थोडी रक्कम गुंतवण्यासाठी उपलब्ध असेल.
    • बाजारातील जोखमीचे व्यवस्थापन करत दीर्घकालीन गुंतवणूक करायची असल्यास.
    • बाजारातील तात्पुरत्या चढउतारांमुळे चिंताग्रस्त न होता, दीर्घकाळात जास्त परतावा मिळवण्यासाठी.

    २) लंप सम (Lump Sum Investment):

     म्हणजे एकाच वेळी मोठ्या रकमेची  गुंतवणूक करणे. यामध्ये, गुंतवणूकदार संपूर्ण निधीला एकाच टप्यात गुंतवून टाकतो. यात एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवण्याची सुविधा मिळते, ज्यामुळे त्या निधीवर नंतर मोठा लाभ मिळवता येऊ शकतो.

    लंप सम कधी करावे?

    जेव्हा आपल्याकडे मोठी रक्कम उपलब्ध असते, जसे की आपला वारसाहक्क, एखादा मिळालेला बोनस इ. तेव्हा लंप सम एक योग्य पर्याय असू शकतो. यात बाजारपेठ स्थिर किंवा वरती जात असताना गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी, जसे की निवृत्तीवेतन, उच्च शिक्षण, किंवा मोठ्या कामासाठी एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवणे उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे, लंप सम गुंतवणूक करताना आपली आर्थिक स्थिती, बाजाराची परिस्थिती आणि गुंतवणुकीच्या उद्दिष्टांचा विचार करणे आवश्यक आहे.

    योग्य म्युच्युअल फंड कसा निवडावा?

    म्युच्युअल फंड निवडताना काही महत्त्वाचे घटक लक्षात घेतले पाहिजेत

    गुंतवणुकीचा उद्देश ठरवा:

     तुम्ही गुंतवणूक का करत आहात हे ठरवणे महत्त्वाचे आहे. निवृत्ती योजना, मुलांच्या शिक्षणाचा खर्च किंवा घर खरेदी अशा दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी इक्विटी फंड्स योग्य ठरतात

    जोखीम पचवण्याची तयारी  :

    तुमची जोखीम पचवण्याची कितपत तयारी आहे यावर तुमचा फंड निवडला जाऊ शकतो. जर तुमची जोखीम घ्यायची तय्यारी असेल आणि दीर्घकालीन परताव्याची अपेक्षा असेल, तर इक्विटी फंड्स चांगले ठरू शकतात. परंतु कमी जोखीम सहन करू शकणारे गुंतवणूकदार डेट फंड्स किंवा हायब्रिड फंड्स निवडू शकतात.

    फंडची  मागील कामगिरी पहा: 

    फंड निवडताना त्याची मागील काही वर्षांतील कामगिरी तपासा. फंडने कसा परतावा दिला आहे, बाजाराच्या चढउतारांना कसा प्रतिसाद दिला आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. मात्र, फक्त मागील कामगिरीच नाही, तर त्याचे सध्याचे व्यवस्थापन, त्याचे धोरण, आणि फंड व्यवस्थापकांचा अनुभव देखील विचारात घ्या.

    खर्च अनुपात (Expense Ratio): 

    म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करताना, फंडाच्या खर्च अनुपातावर (Expense Ratio) लक्ष द्या. हा फंड व्यवस्थापनासाठी घेतलेला खर्च असतो. कमी खर्च अनुपात असलेले फंड्स गुंतवणूकदारांसाठी जास्त फायद्याचे ठरतात, कारण कमी खर्चामुळे जास्त परतावा मिळू शकतो.

    थोडक्यात, तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांनुसार अल्पकालीन किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य म्युच्युअल फंड निवडणे महत्त्वाचे आहे. अल्पकालीन ध्येयांसाठी लिक्विड फंड्स किंवा डेट फंड्स उपयुक्त ठरू शकतात, तर दीर्घकालीन ध्येयांसाठी इक्विटी फंड्स उत्तम असतात.

    नवीन गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड्स हा चांगला पर्याय आहेत, कारण हे फंड विविधता आणून जोखीम कमी करतात आणि तज्ज्ञ फंड व्यवस्थापकांच्या अनुभवाचा फायदा मिळवून चांगले परतावे मिळण्याची शक्यता वाढवतात. योग्य फंड निवडल्यास, तुम्ही तुमच्या आर्थिक भवितव्यासाठी स्थिरता आणि भरभराटीचा मार्ग मोकळा करू शकता.

    आणखी वाचा:

  • 5 लाखांचं लोन घेऊन सुरु केला कपड्यांचा व्यवसाय… आज आहे १५० कोटींची उलाढाल…

    5 लाखांचं लोन घेऊन सुरु केला कपड्यांचा व्यवसाय… आज आहे १५० कोटींची उलाढाल…

    असं म्हणतात की; प्रयत्नांना मेहनतीची जोड असली की, तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. मध्य प्रदेशातील दमोह या छोट्या शहरात राहणाऱ्या एका सामान्य व्यक्तीने जगभरातील फॅशन क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करून हे वाक्य सिद्ध केलं आहे. ही कहाणी आहे राज नवानी यांच्या संघर्षाची, जी प्रत्येक नवउद्योजकासाठी प्रेरणादायी ठरेल. राज नवानी यांनी 1995 साली एका छोट्या कपड्यांच्या दुकानातून आपल्या व्यवसायाचा प्रवास सुरू केला आणि आज त्यांचा ब्रँड ‘नोस्ट्रम’ हा 150 कोटींची उलाढाल असलेला प्रतिष्ठित ब्रँड बनला आहे. चला तर जाणून घेऊया त्यांचा प्रेरणादायी प्रवास.

    एका छोट्या दुकानातून प्रवास सुरू

    राज नवानी यांचा प्रवास मध्यप्रदेशातील एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातून सुरू झाला. 1995 साली, त्यांनी केवळ 5 लाख रुपयांचं कर्ज घेऊन दमोह येथे ‘सॉरी मॅडम’ नावाचं  कपड्यांचं दुकान उघडलं. हे दुकान त्याच्या आगळ्यावेगळ्या नावामुळं त्या काळात स्थानिक लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालं, परंतु ते एवढ्यावर समाधानी नव्हते. फॅशन क्षेत्रात काहीतरी मोठं आणि वेगळं करण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती. 

    राज नवानी यांचं कुटुंब आधीपासूनच व्यवसायात असल्यामुळे व्यवसायात त्यांना लहानपणापासूनच  प्रेरणा मिळत होती. त्यांनी बायोलॉजीमध्ये पदवी घेतली, परंतु त्यांना शिक्षणात फारसा रस नव्हता. त्यांचं संपूर्ण लक्ष त्यांच्या वडिलांच्या व्यवसायात लागून होतं. ‘जय जवान, जय किसान’ या त्यांच्या वडिलांच्या कपड्यांच्या दुकानात काम करताना त्यांनी व्यवसायातील बारकावे शिकले आणि  वयाच्या अवघ्या  23व्या वर्षी, नवानी यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं  धाडस केलं. त्यांनी फॅशन उद्योगात नवीन कल्पना आणि नवतंत्रज्ञान वापरण्याची सुरुवात केली, ज्यामुळे लवकरच त्यांची ख्याती दमोहच्या बाहेर पसरू लागली .

    ‘सॉरी मॅडम’ ते ‘नोस्ट्रम’

    1995 मध्ये “सॉरी मॅडम” या नावाने सुरू झालेला त्यांचा प्रवास 2000 च्या दशकात एका प्रतिष्ठित ब्रँडकडे वळला. ‘नोस्ट्रम फॅशन प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने त्यांनी आपल्या ब्रँडचं एकप्रकारे पुनरुत्थान केलं  आणि त्याच्या भविष्यासाठी एक स्पष्ट दिशा ठरवली.

    राज नवानी यांच्या दूरदृष्टीमुळे ‘नोस्ट्रम’ ब्रँड फक्त स्थानिक बाजारपेठेपुरता मर्यादित न राहता, संपूर्ण देशभरात आपली छाप सोडू लागला. उत्कृष्ट डिझाईन, ग्राहकांच्या आवडीनुसार उत्पादनं तयार करणं आणि त्यांच्या गरजांचा सखोल अभ्यास यामुळे ‘नोस्ट्रम’ लवकरच राष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय झाला. आज ‘नोस्ट्रम’ ब्रँड देशभरातील 1500 पेक्षा जास्त मल्टी-ब्रँड आउटलेट्स आणि 100 शॉप-इन-शॉप (SiS) ठिकाणी उपलब्ध आहे.

    कोट्यवधींची उलाढाल

    राज नवानी यांच्या यशाचं मुख्य कारण म्हणजे त्यांची मेहनत, चिकाटी आणि व्यावसायिक कौशल्य. 2023-24 या आर्थिक वर्षात ‘नोस्ट्रम’ कंपनीची उलाढाल 150 कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. त्यांचा ब्रँड आता विविध नामांकित फॅशन शोमध्ये सहभागी होतं आहे आणि अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पेहरावात तो दिसून येतो.

    राज नवानी यांना त्यांच्या कंपनीची उलाढाल पुढच्या दोन वर्षांमध्ये 500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचवायची आहे. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी ते व्यवसायात सतत नवतंत्रज्ञानाचा वापर करत असतात आणि  एवढंच नाही, तर त्यांनी त्यांच्या व्यवसायाद्वारे 250 पेक्षा अधिक लोकांना रोजगार देण्याचंही महान कार्य केलं  आहे.

    नवउद्योजकांसाठी प्रेरणा

    राज नवानी यांचा प्रवास हा प्रत्येक नवउद्योजकासाठी एक प्रेरणा आहे. आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी त्यांनी घेतलेलं कष्ट, केलेली मेहनत आणि त्यांची चिकाटी ही त्यांच्या यशाची गुरुकिल्ली ठरली आहे. आपल्या स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकानं राज नवानी यांच्या प्रवासातून शिकायला हवं. 

    आणखी वाचा

  • पैशांच्या स्मार्ट व्यवस्थापनाच्या या 10 Master Tricks तुम्हाला माहीत आहेत का?

    पैशांच्या स्मार्ट व्यवस्थापनाच्या या 10 Master Tricks तुम्हाला माहीत आहेत का?

    बहुतेक जणांना असे वाटते, की कमाई चांगली असेल तर आर्थिक नियोजनाची काही गरज नाही; पण पैसा कसा हाताळायचा किंवा गुंतवायचा हे कळत नसेल, तर उद्या हजारांत काय लाखांचे पॅकेज जरी मिळाले तरी ते पुरणार नाही हे वास्तव आहे. मित्रांनो, लक्षात घ्या पैशाचे स्मार्ट व्यवस्थापन जर तुम्ही करणार नसाल तर तुम्हाला तुमच्या भविष्यातील आर्थिक ध्येयांना गुंडाळण्याची वेळ येऊ शकते आणि कर्जाचा मोठा डोंगर तुमच्या पुढे उभा राहू शकतो. यासाठी उत्पन्न कितीही असलं तरी त्या पैशांचे योग्य व्यवस्थापन करता येणे गरजेचे ठरते. 

    आज आपण पैशांच्या स्मार्ट व्यवस्थापनाच्या 10 Master Tricks पाहूया: 

    • महिन्याच्या आणि वार्षिक खर्चाचे अंदाजपत्रक बनवा. त्यामध्ये होणाऱ्या खर्चाची विभागणी वेगवेगळी करा. यातून तुम्हाला आवश्यक गोष्टीवर होणारा खर्च, हॉटेलिंगवर होणारा खर्च, मुलांच्या शिक्षणावर होणारा खर्च याचा अंदाज येईल.
    • तुमच्या गरजा आणि इच्छा यामधला फरक समजून घ्या. बहुतेक जण यामध्ये गल्लत करतात. गरजेनुसार खर्च करा, इच्छेनुसार नको.
    • तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करू नका. हा एक महत्वाचा नियम आहे. बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये असणारे बहुतेकजण यामध्ये अडकलेले असतात.
    • महिन्याची बिले, कर्जाचे हप्ते वेळेवर भरा. यामुळे तुमची पत सुधारायला मदत होते. ECS (Electronic Clearing Service) मुळे आज बिल भरणे, कर्जाचे हप्ते भरणे खूप सोपे झाले आहे.
    • क्रेडिट कार्डचा योग्य वापर करा. आज बाजारात क्रेडिट धारकांसाठी खूप योजना येतात आणि त्या सापळ्यात अडकणारेही बरेचजण आहेत. क्रेडिट कार्डचे स्मार्ट उपयोगही आहेत ते समजून घेणे गरजेचे आहे.
    • स्मार्ट कर्जं आणि वाईट कर्जं घ्या. स्मार्ट कर्ज म्हणजे अशी कर्ज ज्यामध्ये आपल्याला कर नियोजनास मदत होते आणि स्वस्त दरात उपलब्ध होतात. जसे की गृहकर्ज आणि शैक्षणिक कर्ज यावर कर सवलती असतात, याविरुद्ध वाईट कर्ज म्हणजे अशी कर्जं जी महाग दराने मिळतात उदा. वाहन कर्ज, क्रेडिट कार्ड.
    • तुमच्या अडचणीच्या काळासाठी ३-६ महिन्याच्या खर्चाची तरतूद करून ठेवा. आपल्याला उद्या कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल सांगता येत नाही. नोकरी-धंद्यामध्ये येणाऱ्या चढउताराला सामोरे जाण्यासाठी ही तरतूद खूप महत्त्वाची आहे.
    • तुमचे महिन्याचे बँक, कर्जाचे स्टेटमेंट चेक करत चला. खूपवेळा आपण याकडे न बघताच रद्दीमध्ये टाकतो. जेव्हा तुम्ही ती काळजीपूर्वक पाहता, तेव्हा तुम्हाला त्यातील बारकावे लक्षात येतात.
    • तुमच्या परिवाराला, घरातील मोठ्या मुलांना पैशाचे महत्व, तुम्ही केलेल्या गुंतवणूका समजून सांगा, जेणेकरून भविष्यात या गुंतवणूका त्यांना समजायला वेळ लागणार नाही.
    • आर्थिक नियोजन, विमा, गुंतवणूक यासाठी त्या त्या क्षेत्रातील व्यावसायिक लोकांचा सल्ला घ्या.

    लक्षात घ्या; एक छोटेसे छिद्रही जहाजाला बुडवू शकते, त्यामुळे आपल्या आर्थिक जीवनाला शिस्त आणण्यासाठी पैशाचे स्मार्ट व्यवस्थापन गरजेचे आहे आणि त्याची सुरुवात कमाई सुरू झाल्यापासून करणे गरजेचे आहे. ज्याला पैसा कमावता येतो, त्याला तो सांभाळताही आला पाहिजे आणि वाढवताही आला पाहिजे.

    आणखी वाचा

  • बिझनेसमध्ये पार्टनर गरजेचा आहे का? | Why is a partner necessary in business?

    बिझनेसमध्ये पार्टनर गरजेचा आहे का? | Why is a partner necessary in business?

    व्यवसाय म्हटलं की अनेक गोष्टी आल्या. प्रत्यक्षात व्यवसाय सुरू करण्याच्या आधीही बरीच पूर्वतयारी गरजेची असते. बिझनेस आयडियापासून ते प्रत्यक्षात व्यवसाय सुरू करेपर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय एक व्यावसायिक म्हणून आपल्याला घ्यावे लागतात.भांडवल, कच्चा माल, यंत्रं, कर्मचारी, ग्राहक, बाजारपेठ, बँका अशा अनेक घटकांचा समावेश करून त्यांच्या साहाय्याने व्यवसाय उभा राहतो. या सर्वांच्या बरोबरीने व्यवसायातील अतिशय महत्त्वाचा असणारा एक घटक म्हणजे आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्याबरोबर व्यवसाय करायला व सर्व आघाड्यावर तोंड द्यायला तयार असणारा आपला व्यावसायिक भागीदार अर्थात आपल्या व्यवसायाचा बिझनेस पार्टनर होय.

    बिझनेस पार्टनर निवडताना काय काळजी घ्यावी? 

    • व्यवसायात भागीदार असावाच का? 
    • असला तर तो का असावा? 
    • नसला तर तो का नसावा? 

    पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणे चांगले नसल्याचा सल्ला अनेक अनुभवी लोकांनी दिला आहे. तरीसुध्दा पार्टनर घ्यावाच का? 

    असे अनेक प्रश्न व्यवसायिकाला पडू शकतात. खरंतर बिझनेसमध्ये पार्टनर असणे गरजेचे आहे का, हे बिझनेसच्या प्रकारावर आणि त्याच्या गरजांवर अवलंबून असते; परंतु या सगळ्यात एक महत्त्वाची बाब  म्हणजे व्यवसायात पार्टनर न घेता फार मोठे संघटन तुम्हाला उभे करता येत नाही. एकटा व्यक्ती फक्त एक प्रोप्रायटर होऊ शकतो. त्याची मजल पुढे जाऊन एकल व्यक्ती कंपनी (One Person Company – OPC) पर्यंतच जाऊ शकते आणि भारतात कायदा असे सांगतो की, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप अथवा पब्लिक लिमिटेड कंपनी स्थापन करण्यासाठी एकापेक्षा जास्त व्यक्तींची गरज आहे.

    प्रोप्रायटर किंवा एकल व्यक्ती कंपनी फार मोठी Growth करू शकत नाही. त्यामुळे मोठा व्यवसाय करायचा असला, तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा एलएलपी सुरू करणे गरजेचे ठरते. त्यानंतरच बँका व इतर कंपन्या आपल्यासोबत (अर्थात कंपनीसोबत) मोठे व्यवहार करायला तयार होतात. म्हणून आपल्याला मोठा व्यवसाय करायचा असेल तर पार्टनर हा घ्यावाच लागेल; कारण ती व्यवसायाची गरज आहे. काहीजण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करताना घरातील व्यक्तींची (विशेष करून बायको अथवा नवरा, भाऊ, आई, वडील, मुलगा) नावे व्यवसायात सहभागी करतात. जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. मात्र अशा कंपनीत केवळ नावालाच असणारे डायरेक्टर (संचालक/पार्टनर) काही काम करू शकत नाहीत किंवा कंपनीच्या वाढीसाठी प्रयत्न करत नाहीत, कारण त्यांना काम कसे करायचे हे माहिती असतेच असे होत नाही. त्यामुळे फायदा जरी घरातच राहिला, तरी कंपनी मोठी होत नाही. त्यामुळे हा फायदा व व्यवसायाचा विस्तार कमी प्रमाणात असतो.

    त्याउलट एखादा अनुभवी काम करणारा संचालक (तो घरातला नसला तरीही) पार्टनर म्हणून घेतला, तर कंपनीची वाढ मोठ्या प्रमाणात होऊ शकते, कारण तो प्रत्यक्ष आपल्या कामांनी कंपनीच्या वाढीसाठी प्रयत्न करतो. त्यामुळे फायद्याचे वाटे झाले, तरीसुध्दा चांगले उत्पन्न मिळते. कंपनी झपाट्याने वाढल्यामुळे अनेक ग्राहक जोडले जातात. गुणवत्तेचा पार्टनर घ्यायचा की, केवळ नावालाच पार्टनर घेऊन स्वतः काम करायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. कारण आपण स्वतः किती काम करू शकतो हे आपल्यालाच चांगले माहिती असते.

    पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करण्याचे काही फायदे:

    1) नवीन कौशल्यं : 

    पार्टनरमुळे तुमच्या जोडीला नवीन कौशल्यं आणि अनुभव मिळतात, ज्यामुळे कामकाज अधिक प्रभावीपणे आणि उत्तम पद्धतीने पार पाडले जाऊ शकते.

    2) भांडवल वाढ : 

    पार्टनरमुळे आर्थिक गुंतवणुकीचा भार एकट्याच्या खांद्यावर न येता, तो दोन किंवा अधिक लोकांमध्ये विभागला जातो.

    3) निर्णय घेण्यात मदत : 

    पार्टनरमुळे निर्णय घेण्यात वेगवेगळी मतं आणि दृष्टीकोन मिळतात, ज्यामुळे योग्य निर्णय घेणे सोपे होते

    4) Networking :

    प्रत्येक पार्टनरकडे त्याच्या स्वतःच्या व्यावसायिक संपर्कांचे जाळे असते, जे बिझनेसला नवीन ग्राहक, सप्लायर्स किंवा इतर व्यवसायिक संधी मिळवून देऊ शकते.

    5) जोखीम वाटप :

    पार्टनरमुळे बिझनेसची जोखीम अनेकांमध्ये वाटली जाते, त्यामुळे जोखीम कमी होते. आर्थिक नुकसान किंवा बिझनेसच्या अडचणींमध्ये सर्व पार्टनर्स एकत्र येऊन त्या समस्येचा, अडथळ्यांचा सामना सोबतीने करू शकतात.

    व्यवसाय मोठा करायचा म्हटलं की, पार्टनर हा घ्यावाच लागतो, कारण कायद्याने ते बंधनकारक आहे. मग तो पार्टनर नावापुरताच असावा की, प्रत्यक्ष काम करणारा असावा याबाबत जरी कायद्याने कोणतेही बंधन घातले नसले, तरी पार्टनरला फायद्यातील वाटा हा ठरल्याप्रमाणे तुम्हाला द्यावाच लागतो. 

    दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की, कंपनीचे मालक म्हणून कंपनीत येणारा सगळा नफा घरी न्यायचा नसतो किंवा कंपनी तोट्यात चालायला लागली म्हणून घरातील सगळ्या गोष्टी दाव्यावर लावून कंपनीबरोबर स्वतःचे वाटोळेदेखील करून घ्यायचे नसते ही पक्की खूणगाठ प्रत्येक व्यावसायिकाने स्वत:च्या मनात बांधून ठेवली पाहिजे. तुम्ही जरी कंपनीचे मालक असलात तरी तुमचा पगार आधी ठरवा. तेवढेच पैसे महिन्याच्या शेवटी सर्व कर्मचाऱ्यांच्या पगाराबरोबर आपल्या घरी न्या. तुमच्या पार्टनरलासुध्दा हेच नियम लागू करा. ही विचारांची स्पष्टता जर तुमच्यात आणि तुमच्या पार्टनरमध्ये असेल तरंच ही व्यवसायातील भागीदारी दीर्घकाळ टिकेल व व्यवसाय मोठा होईल.

    जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आताच Whatsapp वर शेअर करा. 😊

    आणखी वाचा

  • सोशल मीडियामध्ये व्यवसाय संधी | Business Opportunities in Social Media

    सोशल मीडियामध्ये व्यवसाय संधी | Business Opportunities in Social Media

    स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे म्हणजेच स्वयंरोजगाराचे बरेच फायदे आहेत. स्वयंरोजगार ही स्वतःला विकसित करण्याची, नवीन ज्ञान संपादन करण्याची निरंतर प्रक्रिया असते. ही प्रक्रिया तुम्हाला नोकरी करून कधीच आत्मसात होणार नाही. 

    आपण जर सोशल मीडियाचे जाणकार आहात व आपणास काहीतरी नावीन्यपूर्ण असा व्यवसाय करायचा असेल, तर सोशल मीडिया कन्सलटंट हा व्यवसाय एक चांगला पर्याय आहे. 

    सोशल मीडिया कन्सलटंट म्हणजे काय ?

    सोशल मीडिया कन्सलटंट म्हणजे असा एक व्यक्ती जो व्यवसायांना किंवा व्यक्तींना त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर योग्य प्रकारे त्यांचा Presence निर्माण करण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी मार्गदर्शन करतो. 

    यामध्ये – 

    • सोशल मीडिया अकाउंट्स तयार करणे
    • पोस्ट्सचे नियोजन करणे
    • टार्गेट ऑडियन्सशी संवाद साधणे
    • ब्रँड प्रमोशन करणे, ट्रॅफिक वाढवणे 
    • व्यवसायाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी रणनीती तयार करणे यांचा समावेश असतो. 

    सोशल मीडिया कन्सलटंटचे मुख्य काम व्यवसायाचे ब्रँडिंग इमेज सुधारण्याचे असते, तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून विक्री किंवा लोकप्रियता वाढवण्याचे असते.

    आज कोणताही व्यावसायिक किंवा कंपनी, मग ती मोठी असो वा लहान त्यांचे ऑनलाईन अस्तित्व वाढवण्यासाठी व टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. त्यामुळे एक सोशल मीडिया कन्सलटंट म्हणून पार्ट टाईम किंवा फुलटाईममध्ये पैसे कमवण्याची उत्तम संधी आहे, परंतु या व्यवसायात येण्याअगोदर काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.

    सोशल मीडिया कन्सलटंट बनण्यासाठी आवश्यक बाबी : 

    1. सोशल मीडिया कन्सलटंटला प्रत्येक सोशल मीडिया टूलच्या साधक बाधक गोष्टींबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे. हे ज्ञान केवळ फेसबूक किंवा ट्विटरपुरते मर्यादित नसावे. त्यांनी नफा मिळवण्याच्या व व्यवसायाच्या गुंतवणुकीवर परतावा (ROI) देण्याच्या धोरणांमध्येदेखील सर्जनशील असावे. 
    2. एक सोशल मीडिया तज्ज्ञाने योग्य डावपेच आखण्याइतपत विश्लेषणात्मक असावे. तसेच चांगले परिणाम मिळवण्यासाठी त्यामध्ये वेळोवेळी योग्य बदल करण्याचे कौशल्यही आत्मसात करावे.
    3. एक सोशल मीडिया तज्ज्ञाने योग्य डावपेच आखण्याइतपत विश्लेषणात्मक असावे. तसेच चांगले परिणाम मिळवण्यासाठी त्यामध्ये वेळोवेळी योग्य बदल करण्याचे कौशल्यही आत्मसात करावे.
    4. एक सोशल मीडिया सल्लागार म्हणून आपल्या ग्राहकाचा व्यवसाय, त्यांचे संभाव्य ग्राहक, सोशल मीडिया प्रेझेन्स, सध्याची वर्तमान सोशल मीडिया धोरणे व संबंधित इतर माहिती असणे आवश्यक असते. 
    5. ग्राहकाची सोशल मीडिया रणनीती, त्यांच्या कमजोर बाबी व अन्य समस्या निवारणाबद्दल नि:पक्षपाती मत तयार करण्यासाठी सोशल मीडिया सल्लागाराकडे विशेष कौशल्य असावे लागते.
    6.  सोशल मीडियाद्वारे व्यवसायवृध्दीचे धोरण तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केले पाहिजे. 
    7. एक सल्लागार म्हणून सोशल मीडियावरील फॉलोअर्सच्या डेटाचे विश्लेषण करता आले पाहिजे. 
    8. सोशल मीडिया सल्लागार हे आपल्या ग्राहकाच्या सोशल मीडिया उपक्रमांमध्ये विविध डावपेच आखत व सतत नवीन प्रयोग करत असतात. त्यामध्ये सोशल मीडियामधील सध्याचे ट्रेंडस व बदलांचे परीक्षण करणे, प्रभावी ऑनलाईन मार्केटिंगचे धोरण बनवताना सोशल मीडिया माध्यमांचा व आपल्या मार्केटिंग ज्ञानाचा प्रभावी वापर करणे या गोष्टींचा समावेश असतो. 
    9. मार्केटिंग योजनांमध्ये विविध तंत्राचा कसा वापर करावा याचे व्यवस्थापन करणे शिकले पाहिजे. 
    10. ग्राहकाच्या फायद्यासाठी त्यांच्या व्यवसायातील सर्वोत्तम योजनांचे मूल्यांकन व त्यांची अंमलबजावणी करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सोशल मीडिया सल्लागाराचे असते. 
    11. ऑनसाईट कामकाजाच्या माध्यमातून ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा पुरवणे, त्यांच्या गरजा समजून घेणे हे कौशल्य विकसित करावे लागते. 

    एक परिपूर्ण सोशल मीडिया सल्लागार होण्यासाठी वरील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. 

    सध्याच्या काळात आपल्या व्यवसायास ऑनलाईन अस्तित्व प्रदान करण्यासाठी उद्योजक सोशल मीडियाचा चांगल्यापैकी उपयोग करतात. परिणामी आजच्या काळात अनेक उद्योजक कंपन्याचे ऑनलाईन किंवा सोशल मीडिया Presence प्रभावशाली करण्यासाठी त्यांना सोशल मीडिया सल्लागारांची गरज असते. त्यामुळे सोशल मीडिया सल्लागार म्हणून व्यवसाय करण्यासाठी एक उत्तम संधी आहे. संधीचा फायदा अवश्य घ्या आणि करिअरच्या दृष्टीकोनातून याचा नक्की विचार करा. 

    आणखी वाचा :

  • मुंबईची झोपडपट्टी ते दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीय | The richest Indian in Dubai – Rizwan Sajan’s 

    मुंबईची झोपडपट्टी ते दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीय | The richest Indian in Dubai – Rizwan Sajan’s 

    भारतात अनेक उद्योगपती आहेत, ज्यांनी आपल्या मेहनतीने एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. काहींच्या हातात वारसा संपत्ती नसली तरी, त्यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव कमावले आहे. अशाच एका यशस्वी उद्योगपतीची गोष्ट आज आम्ही सांगणार आहोत, जो मुंबईतील घाटकोपरच्या झोपडपट्टीत राहत होता आणि छोट्या-छोट्या नोकऱ्या करीत जीवनाची गाडी पुढे नेत होता. आज तो दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीयांमध्ये गणला जातो आणि त्यांचा व्यवसाय केवळ दुबईतच नाही, तर इतर अनेक देशांमध्येही पसरलेला आहे.

    सुरुवातीचे दिवस आणि संघर्ष

    रिझवान साजन यांचा जन्म मुंबईच्या घाटकोपरमधील एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यांचं कुटुंब झोपडपट्टीत राहायचे. आर्थिक अडचणींमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं फार कठीण होत होतं. त्यामुळे, साजन यांनी लहानपणापासूनच कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार लावण्याचं ठरवलं  होतं. त्यांनी शाळेतील पुस्तकं विकणं, सणासुदीच्या वस्तू विकणं, घरोघरी जाऊन दूध विकणं अशी छोटी छोटी कामं लहानपणीच  करण्यास सुरुवात केली. 

    वयाच्या अवघा १६व्या वर्षीच रिझवान साजन एक मोठा धक्का बसला,त्यांच्या वडिलांचं अचानक निधन झालं. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण आर्थिक जबाबदारी साजन यांच्यावर आली आणि याचा परिणाम  म्हणून त्यांना शिक्षण मधूनच सोडावं  लागलं. काही काळ त्यांनी एक छोटा व्यवसाय सुरू केला, ज्यात ते फाईल बॉक्सेस बनवायचे. सुरुवातीला या व्यवसायात थोडंफार  यश मिळाले, पण पुरेसं नव्हतं. 

    कुवेतमध्ये मिळाली सुवर्णसंधी

    रिझवान साजन यांचे काका तेव्हा कुवैतमध्ये नोकरी करत होते, कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी साजन यांनी आपल्या काकांकडे कुवेतमध्ये नोकरीसाठी विचारणा केली. त्यांच्या काकांनी त्यांना एका बांधकाम साहित्याच्या दुकानात नोकरी मिळवून दिली. ही संधी साजन यांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण वळण ठरली. त्यांनी या नोकरीत एक विक्रेता म्हणून काम सुरू केलं, आणि त्यांच्या मेहनतीने त्यांना त्या ठिकाणी लवकरच व्यवस्थापकाची पदवी मिळाली. 

    १९९० साली  पुन्हा त्यांच्या  जीवनाला एक  जोरदार  धक्का मिळाला . कुवेतमध्ये भीषण आखाती युद्ध सुरू झालं आणि त्यांना  कुवेत सोडावं लागलं आणि पुन्हा भारतात परतावं  लागलं. परत आल्यावर त्यांनी काही नोकऱ्या करून पहिल्या, पण यश मिळवण्यासाठी त्यांच्या मनात काहीतरी मोठं करण्याची इच्छा होती. काही काळ भारतात राहिल्यानंतर त्यांनी दुबईला जाण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांना दुबईत बांधकाम उद्योगात मोठी संधी दिसत होती.

    The richest Indian in Dubai - Rizwan Sajan's 

    दुबईत ‘डॅन्यूब ग्रुप’ची स्थापना 

    १९९३ मध्ये दुबईला गेल्यावर रिझवान साजन यांनी ‘डॅन्यूब’ नावाची ट्रेडिंग फर्म सुरू केली. हि कंपनी कुवेतमधून बांधकाम साहित्य खरेदी करायची  आणि दुबईमध्ये त्याची विक्री करायची. दुबईमध्ये बांधकाम उद्योगाची प्रचंड वाढ होत होती, आणि त्यामुळे त्यांच्या व्यवसायाला जोरदार प्रतिसाद मिळाला. साजन यांच्या सर्जनशील स्वभावामुळे  आणि मेहनतीमुळे ‘डॅन्यूब’ ने अवघ्या काही वर्षांतच मोठं यश मिळवलं.

    १९९९ पर्यंत ‘डॅन्यूब’ चा वार्षिक महसूल १६ कोटी रुपये झाला होता, आणि ते १ कोटी रुपयांचा नफा मिळवत होते. पण साजन इथेच थांबले नाहीत. त्यांनी बांधकाम साहित्याबरोबरच गृहसजावट, सॅनिटरीवेअर, इलेक्ट्रिकल उपकरणे यांसारख्या विविध क्षेत्रांत विस्तार केला.

    रिअल इस्टेटमध्ये पाऊल

    २००८ मध्ये जागतिक आर्थिक संकट आलं , पण साजन यांच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही उलट त्यांनी आपला व्यवसाय वाढवण्याचं ठरवलं आणि २०१४ मध्ये ‘डॅन्यूब प्रॉपर्टीज’ नावाची रिअल इस्टेट कंपनी लाँच केली. त्यांचा उद्देश मध्यमवर्गीयांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचा होता. ‘डॅन्यूब प्रॉपर्टीज’ ने बाजारात एक क्रांतिकारी योजना आणली — “1% मासिक पेमेंट योजना” या योजनेत खरेदीदारांना घर खरेदीसाठी फक्त 1% रक्कम दरमहा भरण्याची मुभा  होती आणि त्यांना घरमालकीचा हक्क मिळत होता.

    या योजनेने घर खरेदीदारांसाठी घरमालकीचा मार्ग सोपा केला आणि अल्पावधीतच ‘डॅन्यूब प्रॉपर्टीजचं नाव बाजारात लोकप्रिय झालं. या योजनेमुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळाले आणि २०१६ पर्यंत ‘डॅन्यूब’चा वार्षिक महसूल ९००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. साजन यांनी रिअल इस्टेटमध्ये आपले स्थान मजबुत  केलं आणि आज ‘डॅन्यूब ग्रुप’ १६,७०९ कोटी रुपयांचा वार्षिक महसूल मिळवणारी कंपनी आहे. रिझवान साजन यांनी आपल्या अपार मेहनत आणि हुशारीच्या जोरावर ‘डॅन्यूब’ला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं आणि त्यांची उपस्थिती जगभरातील ३० पेक्षा जास्त देशांत आहे.

    रिझवान साजन यांची कहाणी ही एका सामान्य माणसाच्या असामान्य संघर्षाची आणि यशाची कहाणी आहे.

    मुंबईच्या झोपडपट्टीतून सुरु झालेला हा प्रवास दुबईतील यशाच्या शिखरापर्यंत पोहोचला. त्यांनी कठीण परिस्थितीतही हार न मानता स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं. त्यांच्या जिद्दीने, मेहनतीने बुद्धिमत्तेमुळे ते आज जागतिक स्तरावर यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातात . 

    आणखी वाचा

  • करिअर निवडताना या 5 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्याच पाहिजेत

    करिअर निवडताना या 5 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्याच पाहिजेत

    1. स्वतःची आवड आणि क्षमता ओळखा : 

    ज्या क्षेत्रात तुम्हाला करिअर करायचे आहे त्यात तुम्हाला आवड आहे का? ती तुमची Strength आहे का? हे आधी तपासा आणि मगच निर्णय घ्या.

    2. मार्केट आणि करिअरच्या संधी : 

    ज्या क्षेत्रात तुम्ही करिअर करू इच्छिता त्या क्षेत्रात सध्या आणि भविष्यात कोणत्या संधी आहेत, याचा अभ्यास करा. त्या क्षेत्राचा विस्तार आणि रोजगाराच्या संधींचा अंदाज घेतल्यास करिअरला चांगली दिशा मिळू शकते.

    3. आर्थिक स्थैर्य : 

    निवडलेल्या करिअरमध्ये मिळणारा आर्थिक फायदा आणि दीर्घकालीन स्थैर्य याचा विचार करा. तुम्ही निवडलेलं करिअर तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकेल का? याची खात्री करा.

    4. कामाचे वातावरण : 

    तुम्हाला ज्या प्रकारचे कामाचे वातावरण हवे आहे, त्यानुसार तुमचं करिअर निवडा. 

    काहींना ऑफिसमध्ये बसून काम करणे आवडते, तर काहींना फील्डवर काम करण्याची आवड असते. कोणत्या कामाच्या पद्धतीत आपण जास्त सूट होवू शकतो हे शोधा.

    5. करिअर आणि वैयक्तिक जीवनाचा समतोल : 

    निवडलेल्या करिअरमुळे तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला तडजोड करावी लागणार नाही याची काळजी घ्या. काम आणि वैयक्तिक जीवन यांचा योग्य समतोल असलेल्या करिअरची निवड करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेता येईल.

    करिअर निवडीबाबतच्या या 5 गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

    आणखी वाचा :

  • ५,००० रुपये उसने घेऊन उभारली १७,००० कोटींची कंपनी: पी. रामचंद्रन यांचा संघर्ष आणि “उजाला” साम्राज्य.

    ५,००० रुपये उसने घेऊन उभारली १७,००० कोटींची कंपनी: पी. रामचंद्रन यांचा संघर्ष आणि “उजाला” साम्राज्य.

    प्रत्येक यशोगाथेमध्ये एक संघर्षाची कथा असते. अनेक वेळा मोठं यश मिळवण्यासाठी आयुष्यात चढ-उतार आणि अडचणी येतात. पण काही लोक असतात, जे या सर्व अडचणींवर मात करून आपला कर्तृत्वाचा ठसा उमटवतात. त्यांचा जीवन प्रवास आपल्याला हे शिकवतो की यश हे फक्त मेहनत, चिकाटी आणि नवकल्पना यावरच आधारित असतं . “उजाला सुप्रीम” या लोकप्रिय ब्रँडचे संस्थापक एम.पी. रामचंद्रन यांची कथा अशीच एक प्रेरणादायक आणि संघर्षपूर्ण गाथा आहे.

    या लेखात आपण त्यांच्या जीवनातील संघर्ष, कठोर परिश्रम, आणि एक मोठं व्यवसाय साम्राज्य उभारण्याचा प्रेरणादायक प्रवास जाणून घेणार आहोत.

    प्रारंभिक जीवन आणि संघर्ष 

    एम.पी. रामचंद्रन यांचा जन्म १९५० साली केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात झाला. त्यांचं बालपण आर्थिक संघर्षात गेलं , त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं . परंतु, त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट शिकली ती म्हणजे आयुष्य आपले  कष्ट आणि इच्छाशक्तीवर अवलंबून असतं .

    शाळेचं शिक्षण पूर्ण केल्यावर रामचंद्रन यांनी एका कंपनीत लेखापाल म्हणून नोकरी केली. मात्र, त्यांना स्वतःचं काहीतरी मोठं साध्य करायचं होतं. हा प्रवास सोपा नव्हता,  त्यांना यश मिळवण्यासाठी काहीतरी वेगळं करायचं होतं. लेखापाल म्हणून काम करत असताना, त्यांच्या मनात एक व्हाईटनर मिश्रण तयार करण्याची कल्पना आली. व्हाईटनर म्हणजे कपड्यांवरील डाग दूर करण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ. त्यांनी त्यांच्या स्वयंपाकघरातच या मिश्रणावर प्रयोग सुरू केले, मात्र त्यात अपेक्षित गुणवत्ता साधता येत नव्हती.

    एके दिवशी, त्यांनी एका रासायनिक उद्योगावरील मासिकात एक लेख वाचला ज्यामध्ये जांभळ्या रंगाच्या वापरामुळे कपडे अधिक स्वच्छ धुतले जाऊ शकतात, असं म्हटलं होतं. हा लेख वाचल्यानंतर त्यांच्या मनात नवीन कल्पना आली. त्यांनी या विचारावर प्रयोग सुरू केले, आणि त्यांना हवे तसे परिणाम मिळाले. स्वयंपाकघरात सुरू झालेला त्यांचा हा प्रयोग आता एका मोठ्या उद्योगात बदलू लागला होता. 

    व्यवसायाची स्थापना 

    १९८३ मध्ये रामचंद्रन यांनी आपल्या पहिल्या मुलीच्या नावावरून “ज्योती लॅबोरेटरीज” हा व्हाईटनर उत्पादन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांना असं वाटलं की एक संस्कृतीप्रधान नाव त्यांच्या व्यवसायाला एक वेगळा आणि भावनिक स्पर्श देईल . त्यामुळे त्यांनी आपल्या नव्या कंपनीचं नाव “ज्योती लॅबोरेटरीज” ठेवलं. आपला व्यवसाय उभा करण्यासाठी त्यांनी आपल्या भावाकडून फक्त ५००० रुपयांचं कर्ज घेतलं आणि त्याच तुटपुंज्या भांडवलावर त्यांनी कारखाना सुरू केला.

    ज्योती लॅबोरेटरीजचं पहिलं उत्पादन “उजाला सुप्रीम” हे लिक्विड फॅब्रिक व्हाईटनर होतं. हे एक साधं पण प्रभावी उत्पादन होतं, जे कपड्यांना अधिक पांढरे, स्वच्छ आणि तेजस्वी बनवण्यासाठी वापरलं जातं. रामचंद्रन यांना समजलं होतं की गृहिणी हा त्यांच्या मुख्य ग्राहकवर्ग असेल. त्यामुळे त्यांनी उत्पादन विक्रीसाठी सहा महिलांना कामावर ठेवलं, ज्या घरोघरी जाऊन “उजाला” विकू लागल्या. त्यांच्या विक्रीसाठीचा संदेश सोपा आणि प्रभावी होता- तो म्हणजे “उजल्याचे फक्त चार थेंब वापरून तुमच्या  कपड्यांना चमकदार बनवा”.

    रामचंद्रन यांची ही युक्ती ग्राहकांच्या मनात घर करू लागली, आणि “उजाला”ला पहिल्या वर्षातच चांगला प्रतिसाद मिळाला. वर्षाच्या अखेरीस, ज्योती लॅबोरेटरीजने १४४० रुपयांचा नफा मिळवला आणि विक्रीचा आकडा ४०,००० रुपयांपर्यंत पोहोचला. रामचंद्रन यांच्या दृढनिश्चयाने आणि कल्पकतेने ज्योती लॅबोरेटरीजला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या साध्या पण परिणामकारक मार्केटिंग पद्धतीमुळे, कंपनीला अल्पावधीतच मोठं यश मिळालं. “उजाला”च्या यशामुळे रामचंद्रन यांनी आपल्या व्यवसायाला पुढे नेण्याची प्रेरणा घेतली, आणि पुढील काळात ज्योती लॅबोरेटरीज अनेक यशस्वी उत्पादनांसह एक यशस्वी ब्रँड म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

    व्यवसायातील स्पर्धेवर मात 

    व्यवसाय करताना रामचंद्रन यांना मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागले. रेकिट बेंकीझर कंपनीच्या ‘रॉबिन ब्लू’ या उत्पादनाने भारतीय बाजारात आपली पायाभरणी केली होती. यशस्वी होण्यासाठी रामचंद्रन यांना काहीतरी वेगळं करण्याची गरज होती. त्यांनी पारंपरिक ‘पावडर ब्लू’ ऐवजी ‘लिक्विड ब्लू’ तयार केलं आणि हे उत्पादन फक्त १ रुपयांपासून ४५ रुपयांपर्यंतच्या किमतीत उपलब्ध करून दिलं.

    त्यानंतर, त्यांनी “चार बूंदों वाला, आया नया उजाला” ही जाहिरात तयार केली, जी खूपच लोकप्रिय झाली. ही जाहिरात घराघरात पोहोचली आणि प्रत्येक गृहिणीची पसंद बनली. अल्पावधीतच ‘उजाला’ हा एक मोठा ब्रँड बनला, आणि १९९७ मध्ये ‘उजाला’ने १०० कोटी रुपयांच्या विक्रीची यशस्वी कामगिरी केली.

    यानंतर १९९६ मध्ये डेंग्यूच्या प्रादुर्भावामुळे रामचंद्रन यांना मच्छरांपासून संरक्षण देणाऱ्या उत्पादनाची आवश्यकता भासली. त्यामुळे त्यांनी ३५ कोटी रुपयांची गुंतवणूक करून ‘मॅक्सो’ हे उत्पादन बाजारात आणले. हे उत्पादन देखील खूप लोकप्रिय ठरलं आणि पुढे ‘मॅक्सो’ हा ३०० कोटी रुपयांचा ब्रँड बनला.

    विस्तार आणि नवा टर्निंग पॉइंट: Henkel AG & Co.ची भागीदारी

    2011 मध्ये ‘ज्योती लॅबोरेटरीज’ने एक मोठं पाऊल उचलत जर्मन FMCG (Fast-moving consumer goods) कंपनी ‘Henkel AG’च्या भारतातील व्यवसायातील ५०.९७% हिस्सेदारी ६१७ कोटी रुपयांना खरेदी केली. ही खरेदी ज्योती लॅबोरेटरीजसाठी एक महत्त्वपूर्ण टर्निंग पॉइंट ठरली, ज्यामुळे कंपनीला भारतीय FMCG उद्योगात आपलं स्थान मजबूत करण्यासाठी भक्कम आधार मिळाला.

    ‘ज्योती लॅबोरेटरीज’ने या संधीचा लाभ घेत आपल्या उत्पादनांना वाढवलं, विक्रीत चांगली वाढ साधली आणि वितरण नेटवर्क अधिक विस्तारित केलं.  या विकासामुळे कंपनीने २०१३ मध्ये १०१७.३८ कोटी रुपयांची विक्री केली आणि ८३.१४ कोटी रुपयांचा नफा कमवला आणि  त्यांची उत्पादने भारतातील 29 लाख दुकांनांमध्ये उपलब्ध झाली.

    आज, ‘ज्योती लॅबोरेटरीज’चा वार्षिक महसूल २७५७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे आणि कंपनी ३६९ कोटी रुपयांचा नफा कमावते आहे. त्यांच्याकडे २३ कारखाने असून २५ हून अधिक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. उजला सुप्रीम, मॅक्सो, एक्सो डिश वॉश, प्रिल डिश वॉश, मिस्टर व्हाईट, आणि मार्गो बॉडी सोप ही त्यांची प्रमुख उत्पादने भारतीय ग्राहकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहेत.

    ‘ज्योती लॅबोरेटरीज’ने आता राष्ट्रीय स्तरावर आपला व्यवसाय स्थिर केला असून . ‘उजला’ आणि ‘मॅक्सो’ यांसारखी उत्पादने संपूर्ण भारतात लोकप्रिय झाली आहेत. मोठ्या FMCG कंपन्यांशी स्पर्धा करताना ‘ज्योती लॅबोरेटरीज’ने भारतातील FMCG क्षेत्रात आपली खास ओळख निर्माण केली आहे, आणि आता P&G व HUL सारख्या दिग्गज कंपन्यांना थेट स्पर्धा देत आहे.

  • काय आहे ‘जागतिक बचत दिन’ आणि भारतात तो एक दिवस आधी का साजरा केला जातो?  

    काय आहे ‘जागतिक बचत दिन’ आणि भारतात तो एक दिवस आधी का साजरा केला जातो?  

    बचत ही सर्वश्रेष्ठ सवय आहे, ज्याला ही सवय लागेल त्याची प्रगती होते. अडचणीच्या काळात आपण केलेल्या बचतीचा आपल्याला खूप फायदा होतो. बचत करणे हे प्रत्येकाच्या नियोजनात असायलाच हवे. वाढती महागाई आणि भविष्यातील अगणित आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बचत ही काळाची गरज बनली आहे. घरखर्चाचे आर्थिक नियोजन असो किंवा एखाद्या देशाची अर्थव्यवस्था प्रत्येक ठिकाणी बचतीची गरज पडतेच. जर बचत केली नाही, तर उत्पन्न ढासळू शकते आणि आर्थिक अडचणी निर्माण होऊन नुकसान होऊ शकते. बचत करण्याची गरज आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ओळखली गेली आणि तिथूनच ‘जागतिक बचत दिवसा’ची सुरुवात  झाली. वर्षभर कसले ना कसले दिवस साजरे करून आपण आपला खर्च वाढवतच असतो. या जागतिक बचत दिवसाला आपण ही काही उपाय करून बचत करण्याचा प्रयत्न करणं जमतंय का ते पाहूयात. 

    World Savings Day

    कधी आणि कुणी केली ‘जागतिक बचत दिवसा’ ची सुरुवात  ?

    या दिवसाची सुरुवात 31 ऑक्टोबर 1942 रोजी झाली. इटली मधील मिलान इथे प्रा. फिलिपो  फिलिपो रविझा यांनी पहिल्या आंतरराष्ट्रीय कॉंग्रेस बचत बँकेच्या परिषदेत या दिवसाची सुरुवात केली. तेव्हापासून हा दिवस जगभर साजरा केला जाऊ लागला. 1925 मध्ये पहिला जागतिक बचत दिवस साजरा केला गेला. त्यानंतर 1929 मध्ये स्पेन आणि अमेरिकेत प्रथम राष्ट्रीय बचत दिन साजरा केला गेला. 

    भारतात जागतिक बचत दिवस एक दिवस आधी साजरा का केला जातो ?

    जागतिक बचत आणि रिटेल बँकिंग संस्था WSBI नुसार, जागतिक बचत दिवस 31 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. 31 ऑक्टोबर 1984 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली. तेव्हापासून भारतात ३० ऑक्टोबर रोजी जागतिक बचत दिवस साजरा केला जातो.

    World Savings Day: A Look at the History, Importance, and Why India Celebrates it a Day Early

    या जागतिक बचत दिवसाला पुढील उपाय वापरून करू शकता स्वत:ची बचत

    प्रत्येक महिन्याला खर्चाचे नियोजन करावे

    दर महिन्याला खर्चाचे नियोजन करून त्यानुसार पैसे खर्च करणे आवश्यक आहे. खर्चाचे नियोजन करून त्यानुसार आपला खर्च नियंत्रित ठेवावा .

    गरज पहावी आवड नाही

    खर्च करताना नेहमी गरजेला प्राधान्य द्यावे. वायफळ खर्च टाळता आला, तरच बचत करणे शक्य होईल. ज्या वस्तू गरजेच्या आहेत त्याच खरेदी कराव्यात.

    पैसा घरी ठेवू नये

    आवश्यक तो पैसा घरी ठेवून बाकीची रक्कम बँकेत ठेवणे कधीही फायदेशीर आहे. आपला पैसा शेअर बाजार, म्युच्युअल फंड, जीवन विमा किंवा आरोग्य विम्यामध्ये गुंतवल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.

    जर तुम्हाला बँकांमध्ये पैसा गुंतवायचा नसेल, त्यांच्या धोरणानुसार खाते उघडणे तुम्हाला शक्य होत नसेल, तर भारतीय पोस्ट खाते आणि सेव्हिंग्स हा तुमच्यासाठी उत्तम आणि  फायदेशीर पर्याय आहे.

    आणखी वाचा

  • भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम : ‘अतीसामान्य ते असामान्य’ प्रवासाचा यात्री यांची जयंती

    भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम : ‘अतीसामान्य ते असामान्य’ प्रवासाचा यात्री यांची जयंती

    पेपर वाटण्यापासून खडतर आयुष्याची सुरवात करणाऱ्या एका व्यक्तिवर जेव्हा जगातील लहानमोठ्या सर्व पेपर्समधे स्तुती करणारे रकानेच्या रकाने लिहुन येतात तेव्हा ‘अतिसामान्य ते असामान्य’ ह्या प्रवासाचे ते एक उदाहरण ठरते. अनेक मार्गदर्शक पुस्तकांतून आशावादी लिखाण करुन जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी व युवकांना सत्य, विकास, नीतिमत्ता व राष्ट्रनिर्माणाचा मार्ग दाखवणाऱ्या ह्या महापुरुषाचा जन्मदिन 15 ऑक्टोबर हा विश्व विद्यार्थी दिवस म्हणुन साजरा केला जातो तो ह्यासाठीच.

    एकदा डॉ.साहेब मिसाईल चाचणीत इतके रममाण झाले की, स्वतःच्या भाचीचेही लग्न विसरून गेले. कधी शाळेत जेवणाच्या पंगतीत आनंदाने लहान मुलांना वाढणे, तर कधी आपली खुर्ची इतरांपेक्षा वेगळी आहे हे आढळल्याने ‘मलाही साधीच खुर्ची द्या’ म्हणत बडेजाव टाळणे, अगदी 2012 ला देशाच्या सर्वोच्च पदाच्या निवडणुकीत ‘राष्ट्रपती पदाबाबत राजकारण होणे योग्य नसून सर्वसंमती असेल, तरच मी उभा राहील’ म्हणत राष्ट्रपतीपदावर सुद्धा पाणी सोडणे, वयाच्या 83 व्या वर्षीही युथ आयकॉन असणे किंवा राष्ट्रप्रमुख असतानाही आपल्यात एक कॉमन मॅन जपणे, असे कितीतरी पैलू आपल्याला डॉ. कलामांनी आधुनिक काळातही एका साधुप्रमाणे निर्मोही आयुष्य व्यतीत केल्याचे दाखले देतात.

    जगातील सर्वश्रेष्ठ संशोधकांपेेकी एक असूनही शिक्षणाचे महत्त्व ओळखून आपली ओळख केवळ एक शिक्षकाची रहावी, कारण ‘शिक्षकांची राष्ट्रनिर्माणातील भूमिका अतुलनीय असते’, असे म्हणत ज्ञानदानाच्या पवित्रकार्याचा केलेला योग्य असा गौरव करणे असो, नातलग दिल्लीला आल्यावर स्वतःच्या खिशातून केलेला त्यांच्यावरचा खर्च असो किंवा कायम गरजू संस्थाना केलेले आपल्या मासिक मानधनाचे वाटप असो, ही उदाहरणे अगदी सहज सांगतात की, ह्या आदर्श व्यक्तिमत्वाची, ट्रक भरून असणारी एकमेव संपत्ती म्हणजे पुस्तके का होती. एकीकडे “स्वप्न म्हणजे ते नाही, जे तुम्हाला झोपेत पडते; स्वप्न म्हणजे ते जे तुम्हाला झोपूच देत नाही” म्हणणारे राष्ट्रसमर्पित व्यक्तिमत्त्व, तर दुसरीकडे, low aim is a crime, स्वप्ने मोठीच बघा आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा’ म्हणणारे मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व.

    लेखक म्हणून डॉ. कलाम यांनी अनेक प्रेरणादायी पुस्तके लिहिली. “विंग्स ऑफ फायर” हे त्यांचं आत्मचरित्र विशेष प्रसिद्ध आहे, ज्यात त्यांच्या जीवनातील संघर्षाची आणि यशाची कहाणी आहे. “इग्नाइटेड माइंड्स”, “इंडिया २०२०” आणि “माय जर्नी” या पुस्तकांतून त्यांनी भारताच्या प्रगतीसाठी आपल्या कल्पना मांडल्या. त्यांचं स्वप्न होतं की भारत २०२० पर्यंत एक महासत्ता बनेल, आणि या उद्दिष्टासाठी त्यांनी आयुष्यभर युवकांना प्रेरणा देण्याचं कार्य अविरत केलं.