Author: naviarthkranti

  • ‘परम’ महासंगणकाचे जनक : डॉ. विजय भटकर 

    ‘परम’ महासंगणकाचे जनक : डॉ. विजय भटकर 

    प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

    डॉ. विजय भटकर यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९४६ रोजी अकोला जिल्ह्यातील मुरांबा या छोट्या गावात झाला. त्यांचं मूळ घर जनावरांचा गोठा आणि पडक्या भिंती असलेल्या जुनाट वाड्यात होतं, त्यांचं  बालपण अत्यंत साधारण परिस्थितीत गेलं, पण त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाच्या आणि शिक्षणाच्या तृष्णेमुळे त्यांनी कष्टाची आणि जिद्दीची वाट धरली. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी अनेक मोठी टप्पे गाठले. त्यांनी 1965 साली नागपूर विद्यापीठातून बी.ई. (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) ही पदवी प्राप्त केली. पुढे त्यांनी बडोद्याच्या एम.एस. विद्यापीठातून एम.ई. (कॉम्प्युटर सायन्स) ही पदवी मिळवली.

    त्यांची शिक्षणाची ऊर्मी यावर थांबली नाही. त्यांनी आय.आय.टी. दिल्लीमधून पीएच.डी. मिळवली. डॉ. भटकर यांच्या शैक्षणिक प्रवासात ते केवळ शिक्षण घेणारे विद्यार्थी नव्हते, तर नवीन विचारांची दृष्टी असलेले संशोधक होते. 

    महासंगणक क्रांती

    १९८० च्या दशकात भारताला अचूक हवामान अंदाज आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी  महासंगणकाची (SUPERCOMPUTER) गरज होती. अमेरिकेने भारताला त्यांचा ‘क्रे’ महासंगणक विकण्यास नकार दिला. अशावेळी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्वदेशी महासंगणक निर्मितीचं स्वप्न पाहिलं. सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. भटकर यांच्यावर या प्रकल्पाची जबाबदारी सोपवण्यात आली. भारताला महासंगणकाच्या तंत्रज्ञानात आत्मनिर्भर बनविणं हे या प्रकल्पाचं ध्येय होतं.

    १९८८ साली पुणे विद्यापीठात ‘सी-डॅक’ (Center for Development of Advanced Computing) या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेमार्फत महासंगणक निर्मितीचं  काम सुरू झालं.या महत्त्वाकांक्षी प्रकल्पसाठी भारत सरकारने ३७.५ कोटी रुपयांची तरतूद केली, पण विशेष म्हणजे, खूप कमी  कालावधीत आणि कमी खर्चात डॉ. भटकर आणि त्यांच्या टीमने ‘परम-८000’ महासंगणकाची निर्मिती केली. १९९१ साली ‘परम-८000 महासंगणक कार्यान्वित झाला. हा महासंगणक दर सेकंदाला 1 अब्ज गणिती क्रिया करण्यास सक्षम होता. भारतासाठी ही एक मोठी तांत्रिक प्रगती होती.

    डॉ. भटकर यांनी विकसित केलेला पहिला महासंगणक ‘परम-८०००’ केवळ सुरुवात होती. त्यानंतर ‘परम-१0000’ महासंगणकाची निर्मिती १९९८ मध्ये करण्यात आली. ‘परम-१0000’ ची क्षमता दर सेकंदाला १ लाख कोटी गणिती क्रिया करण्याची होती. या महासंगणकामुळे भारताने हवामान अंदाज, उपग्रह प्रक्षेपण, संरक्षण, अणु तंत्रज्ञान, औषधनिर्मिती, खनिज संशोधन अशा अनेक क्षेत्रात प्रचंड प्रगती केली. भारत महासंगणकाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रगण्य देशांमध्ये स्थान मिळवू लागला.

    संगणकीय भाषांमधील क्रांती; ‘जिस्ट’ प्रणाली

    संगणकाचा वापर केवळ इंग्रजीत भाषेतच मर्यादित राहावा असे डॉ. भटकर यांना मान्य नव्हतं. त्यांनी विविध भारतीय भाषांचा संगणक क्षेत्रात उपयोग करून घेण्याचं ध्येय ठेवलं होतं. १९८९ साली त्यांनी ‘जिस्ट’ (Graphics and Intelligence based Script Technology) ही संगणकीय प्रणाली विकसित केली. ‘जिस्ट’मुळे भारतीय भाषांमध्ये संगणकावर कार्य करणं सहज शक्य झालं. भारतीय उपखंडात संगणक वापराच्या क्षेत्रात हे एक मोठं पाऊल होतं. यामुळे इंग्रजी भाषेची मक्तेदारी संपुष्टात आली आणि संगणक क्षेत्रात भारतीय भाषांनाही स्थान मिळालं . 

    विविध संस्थांच्या उभारणीत महत्त्वाचं योगदान

    डॉ. भटकर हे एक संस्थापक-विचारवंत म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या संस्थांची स्थापना केली आणि त्या संस्थांच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘इलेक्ट्रॉनिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर’, ‘टेक्नोपार्क (त्रिवेंद्रम)’, ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी’, ‘महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन (MKCL)’, ‘डिशनेट’, ‘डिव्हिनेट अ‍ॅक्सेस टेक्नॉलॉजी’ अशा विविध संस्थांची स्थापना झाली. यापैकी प्रत्येक संस्था तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भरीव योगदान देत आहे. 

    पुरस्कार आणि सन्मान

    डॉ. विजय भटकर यांना त्यांच्या अभूतपूर्व कार्यासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांना ‘पद्मश्री’, ‘महाराष्ट्रभूषण’, ‘एच.के. फिरोदिया पुरस्कार’, आणि ‘डेटाक्वेस्ट जीवनगौरव पुरस्कार’ यांसारखे मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. तसेच, विविध विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे. 

    भारतातील आयटी उद्योगाच्या विकासात डॉ. भटकर यांचं  मोलाचं  योगदान आहे. भारत सरकारच्या अनेक वैज्ञानिक सल्लागार समित्यांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. ते ‘विज्ञानभारती’ संस्थेचे अध्यक्ष म्हणून सहा हजारांहून अधिक संशोधकांसोबत कार्यरत होते. २०१७ साली ते नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्त झाले होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सुद्धा  सन्मानित करण्यात आले  आहे. त्यांना एकूण ४०हून अधिक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालण्याच्या त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव आहे.

    डॉ. भटकर हे एक नामांकित लेखक आणि संशोधक आहेत. त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ रचले आहेत, ज्यामध्ये ‘आजची ज्ञानेश्वरी’, ‘आजची मराठी भगवद्गीता’, ‘इतिहास घडविला त्यांनी’, ‘मधुराद्वैताचार्य श्रीगुलाबराव महाराजांची विज्ञानदृष्टी’, ‘नीळा झालासे पांडुरंग’, ‘तुका सर्वांगे विठ्ठल’, ‘वेध अंतिम सत्याचा’, आणि ‘विज्ञानदृष्टी’ या पुस्तकांचा समावेश आहे.

    त्यांनी आठ पुस्तके संपादित केली असून, त्यांचे ८० पेक्षा अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या शोधनिबंधांमध्ये ‘सुपर कॉम्प्यूटिंग’, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’, ‘डिस्ट्रिब्युटेड कॉम्प्युटर कन्ट्रोल’, आणि ‘व्हेरिएशनल थिअरी’ यांसारख्या संगणक विज्ञानाच्या विषयांचा समावेश आहे. 

  • अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काय मिळालं? मराठीला त्याचा काय फायदा? जाणून घ्या सर्वकाही…

    अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काय मिळालं? मराठीला त्याचा काय फायदा? जाणून घ्या सर्वकाही…

    या लेखात आपण अभिजात भाषा म्हणजे काय, ती कशी निवडली जाते आणि मराठी भाषेला याचा कसा फायदा होईल याची  माहिती जाणून घेऊया…

    अभिजात भाषा म्हणजे काय?

    एखादी भाषा अभिजात म्हणून घोषित केली जाते तेव्हा ती भाषा केवळ प्राचीन आणि समृद्धच नाही, तर त्या भाषेचा साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रभाव देखील खूप मोठा असतो. भारतीय संविधानानुसार  अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्या भाषेला विशेष मान्यता दिली जाते, ज्यामुळे त्या भाषेच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक आणि शैक्षणिक सहाय्य दिलं जातं. 

    अभिजात भाषा हा दर्जा मिळण्यासाठी निकष काय?

    • संबंधित भाषेचं अस्तित्व कमीत कमी दीड ते अडीच हजार वर्षांपूर्वीचं असावं.
    • भाषेत प्राचीन काळापासून समृद्ध साहित्य असावं, ज्यामुळे भाषेची सांस्कृतिक आणि साहित्यिक महानता दिसून येते.
    • भाषेचं स्वत:चं स्वायत्त अस्तित्व असावं, म्हणजेच ती भाषा इतर भाषांच्या प्रभावाखाली येऊन संपुष्टात आलेली नसावी.
    • भाषेच्या प्राचीन आणि आधुनिक रूपामध्ये एक गाभ्याचं एकसारखं स्वरूप टिकून असावं.

    अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी मराठी भाषेच्या प्रवासाचा इतिहास

    मराठी भाषेच्या अभिजात भाषेच्या दर्जासाठी गेल्या काही दशकांपासून जोरदार चळवळ सुरू होती. मराठी साहित्यिक आणि अभ्यासकांनी सतत या मागणीसाठी आवाज उठवला. महाराष्ट्र शासनाने २०१३ साली ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करायला सुरुवात केली आणि त्याच काळात अभिजात दर्जासाठी प्रयत्न अधिक जोर धरू लागले.

    राज्य सरकारने या मागणीच्या पुढील टप्प्यात रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली होती. या समितीने मराठी भाषेच्या समृद्ध साहित्यिक परंपरेचा आणि तिच्या ऐतिहासिक महत्त्वाचा सखोल अभ्यास करून सादर केलेला ५०० पानांचा अहवाल केंद्र सरकारला सुपूर्द केला होता. या अहवालात मराठी भाषेच्या अभिजात भाषेच्या निकषांची पूर्तता होत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. अखेर, केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल करून महाराष्ट्रातील भाषाप्रेमींना आनंदाची मोठी बातमी दिली.

    अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे फायदे:

    १) भाषेच्या संशोधनाला चालना

    मराठी भाषेच्या अभिजात दर्जामुळे भाषातज्ज्ञ आणि साहित्यिकांना अधिक संशोधनासाठी प्रोत्साहन मिळेल. विशेषतः मराठी भाषेतील विविध बोली आणि त्यांच्या विविधतेचा अभ्यास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान मिळेल. प्राचीन मराठी ग्रंथ, साहित्य आणि काव्यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी संशोधन संस्थांना मदत मिळेल.

    २) साहित्य आणि विद्वानांसाठी पुरस्कार

    अभिजात भाषेतील विद्वानांसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. मराठी भाषेला हा दर्जा मिळाल्याने मराठी भाषेतील साहित्यिक, कवी, आणि भाषातज्ज्ञांना या पुरस्कारासाठी पात्रता मिळेल. यामुळे मराठी साहित्यिकांना अधिक प्रेरणा मिळेल आणि त्यांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळेल.

    ३) विद्यापीठांमध्ये विशेष अभ्यास केंद्रे

    अभिजात भाषांना दिलेल्या दर्जामुळे विविध विद्यापीठांमध्ये त्या भाषेच्या अभ्यासासाठी विशेष केंद्र उभारली जातात. आता मराठी भाषेसाठीही देशभरातील विद्यापीठांमध्ये अभ्यास केंद्रे स्थापन केली जातील. या केंद्रांमध्ये मराठी भाषेचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना मराठी साहित्याची माहिती देण्यासाठी  विशेष अभ्यासक्रम तयार केले जातील.

    ४)  ग्रंथालयांचा विकास

    राज्यातील १२ हजारांहून अधिक ग्रंथालयांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वा ठरला आहे. अभिजात भाषेच्या ग्रंथालयांसाठी केंद्र सरकारकडून अनुदान मिळत असतं, त्यामुळे मराठीतील प्राचीन ग्रंथांचे जतन, अनुवाद आणि पुनरुत्थान होणार आहे. मराठी भाषेतील साहित्यावर विशेष ग्रंथालये स्थापन केली जाऊ शकतात.

    ५) अनुवाद आणि जागतिक स्तरावर प्रसिद्धी

    मराठी भाषेतील प्राचीन आणि महत्त्वपूर्ण साहित्य आता अन्य भारतीय तसेच जागतिक भाषांमध्ये अनुवाद करण्याची प्रक्रिया वेगवान होणार आहे. यामुळे मराठी साहित्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रसिद्धी मिळेल आणि त्याचे महत्त्व जागतिक स्तरावर पोहोचेल.

    ६)  केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान

    अभिजात भाषेला मिळणारे अनुदान हे भाषेच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. केंद्र सरकारकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो, जो भाषेच्या संवर्धनासाठी, साहित्य प्रकाशनासाठी आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी वापरला जातो. या निधीतून विविध मराठी साहित्यिक उपक्रम राबवले जाऊ शकतात, ज्यामुळे मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसाराला गती मिळेल.

    ७)  प्राचीन आणि आधुनिक मराठीचा अभ्यास

    मराठी भाषेच्या प्राचीन आणि आधुनिक रूपांचा सखोल अभ्यास करण्यासाठी आता अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. भाषातज्ज्ञांना भाषा विकासाचा आणि बदलाचा अभ्यास करता येईल, ज्यामुळे मराठी भाषेतील विविध पैलूंवर अधिक प्रकाश पडेल.

    मराठीसह भारतात इतर काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. या भाषांमध्ये तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम या भाषांचा समावेश आहे. या भाषांना अभिजात दर्जा मिळाल्यानंतर त्यांचा विकास आणि संरक्षण अधिक गतीने झाला आहे. केंद्र सरकारकडून या भाषांच्या संवर्धनासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो, ज्यामुळे त्या भाषांचे प्राचीन साहित्य जतन होण्यास मदत झाली आहे. त्याचप्रमाणे, मराठी भाषेलाही आता या मार्गावर चालण्याची संधी मिळाली आहे.

    मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने तिच्या भविष्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे. मराठी भाषेच्या साहित्य, कला, आणि संस्कृतीचे संवर्धन होण्यासाठी आता अधिक साधनसंपत्ती उपलब्ध होणार आहे. मराठी भाषा ही फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशाच्या इतर भागांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली ओळख निर्माण करू शकते.

  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेची केली सुरुवात 

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेची केली सुरुवात 

    योजनेच्या अटी

    ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेअंतर्गत १८ वर्षांपर्यंतची सर्व मुले पात्र आहेत. खाते केवळ मुलांच्या नावाने उघडता येईल, परंतु गुंतवणुकीची जबाबदारी पालकांची असेल. यामुळे पालकांना त्यांच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. जवळपास सर्व बँका, पोस्ट ऑफिस आणि पेन्शन फंडांमध्ये पॉइंट ऑफ प्रेझेन्सद्वारे या खात्याचे उघडणे शक्य आहे. ई-एनपीएस प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे, ज्यामुळे प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होईल.

    गुंतवणूक रक्कम

    या खात्याचे उघडणे कमीत कमी १००० रुपयांनी शक्य आहे आणि गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही. त्यामुळे पालकांना त्यांच्या आवडीनुसार आणि आर्थिक क्षमतेनुसार अधिक रक्कम गुंतवण्याची मुभा मिळते. खात्यात जमा केलेल्या पैशावर चक्रवाढ व्याज मिळेल, ज्यामुळे योजनेचा आर्थिक लाभ वाढतो.

    रक्कम काढणे

    या योजनेमध्ये तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीनंतर, २५ टक्के रक्कम विशेष परिस्थितीत, जसे की शिक्षण, आजार किंवा अपंगत्व यासाठी काढता येईल. हे पालक आणि मुलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे, कारण यामुळे आर्थिक संकटांच्या काळात आवश्यक रक्कम उपलब्ध होऊ शकते.

    रक्कम काढण्याची मर्यादा

    मुलाचे वय १८ वर्षांचे होईपर्यंत, जास्तीत जास्त तीन वेळा यातील रक्कम काढता येईल. १८ वर्षांपर्यंत मूल या योजनेतून बाहेर पडता येणार नाही, ज्यामुळे बचतीचा एक स्थिर प्लॅन तयार केला जातो आणि मुलांचे भविष्य सुरक्षित राहते.

    आणखी वाचा

  • यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो: There is no shortcut to success.

    यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो: There is no shortcut to success.

    घरबसल्या लाखो-करोडो कमवा, तुमचे पैसे दुप्पट करा, नेटवर्क मार्केटिंग मधून करोडपती व्हा अशा अनेक फसव्या जाहिराती दररोज वर्तमानपत्रांमध्ये झळकत असतात. अशा झटपट आणि क्षणात श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी तरुण वर्ग फसतो आणि बळी पडतो. शेवटी अपयश आणि निराशा वाट्याला येते. मला कोणीतरी गॉडफादर भेटेल, श्रीमंत बनण्याची एखादी मोठी संधी चालून येईल किंवा देवाचा साक्षात्कार होईल अशी आपण अपेक्षा धरुन बसतो. अचानक राजयोग येऊन माझ्या आयुष्याला एका दिवसात कलाटणी मिळेल, माझं आयुष्य बदलून जाईल असं बहुतेकांना वाटत असतं. प्रयत्न, चिकाटी, परिश्रम, कष्ट, संघर्ष करण्याऐवजी सगळं सहज व्हावं, सहज मिळावं असं वाटत असतं. मात्र यशाला शॉर्टकट नसतो आणि शॉर्टकटने मिळालेलं यश हे शाश्वत देखील नसतं. अचानक एखादी संधी चालून येईल किंवा कोणीतरी आपल्या मदतीला येईल अशी आशा वाटणे हे स्वतःच्याच नाकर्तेपणाचे सर्वात मोठे लक्षण आहे. 

    जेव्हा आपला स्वतःचा स्वतःच्याच सामर्थ्यावर विश्वास नसतो तेव्हा अशा प्रकारच्या निरर्थक अपेक्षा आपण धरून राहतो. मित्रांनो तुम्हाला आयुष्यात जे काही मिळवायचे आहे, जे कोणते ध्येय साध्य करायचे आहे ते मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःला रणांगणात उतरावं लागेल, स्वतः झगडावं लागेल. आपल्या प्रत्येकाच्या अस्तित्वाचं काही ना काही कारण आहे, ते कारण आपल्याला शोधायचंय आणि त्या कारणाच्या पूर्ततेसाठी काम करायचंय. यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो त्यासाठी मेहनतीचा यज्ञ प्रत्येकाला पेटवावाच लागतो. शॉर्टकटने मिळालेल्या यशानं तुम्ही जितके लवकर वर जाता, तितक्याच लवकर तुम्ही खाली देखील येता. थ्री इडीयट्स मध्ये आमिर खानने म्हटल्याप्रमाणे “सक्सेस के पीछे मत भागो, मेहनत इतनी करो की सक्सेस खुद आपके पीछे आयेगी.

    Shortcut आणि Smartwork मध्ये काय फरक आहे?

    1. Shortcut :

    •    हे काम जलद पूर्ण करण्यासाठी वापरलेले छोटे मार्ग किंवा तात्काळ उपाय असतात.
    •    शॉर्टकट कधी कधी गुणवत्ता किंवा दीर्घकालीन परिणामांवर परिणाम करू शकतो.
    •   शॉर्टकटमध्ये फक्त काम पटकन संपवणे हे उद्दिष्ट असते, त्यामागे ठराविक उद्दिष्ट किंवा हेतू नसतो.

       उदाहरण: प्रोजेक्टमध्ये आवश्यक माहिती न वाचता थेट निष्कर्ष लिहिणे.

    2. Smart Work :

    •    हे काम चांगल्या पद्धतीने आणि नियोजनबद्ध मार्गाने कमी वेळात पूर्ण करण्याचे तंत्र आहे.
    •    स्मार्ट वर्कमध्ये तंत्रज्ञान आणि कौशल्य वापरून कामाचे नियोजन केले जाते.
    •    दीर्घकालीन यश आणि गुणवत्तेला प्राधान्य दिले जाते.

    Shortcut वापरल्याने फक्त तात्पुरते फायदे मिळतात, तर Smart Work दीर्घकालीन आणि शाश्वत यशाकडे नेते.

    There is no shortcut to success.

    Smart Work म्हणजे काय?

    Smart Work म्हणजे कमी वेळेत अधिक परिणाम साधणे. मेहनत कमी पण ती मेहनत योग्य दिशेने करणे महत्त्वाचे आहे. शॉर्टकट घेताना विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. 

    Smart Work कसे करावे?

    कामाचे प्राधान्य ठरवा: सर्वात महत्त्वाचे काम आधी पूर्ण करा, त्याला सुरुवातीला प्राधान्य द्या.

    तंत्रज्ञानाचा वापर करा: तंत्रज्ञानाचा वापर करून कामे सोपी करा. उदा. ऑटोमेशन साधने.

    वेळेचे नियोजन: कामाचे छोटे भाग करा आणि त्यासाठी वेळेची मर्यादा ठरवा.

    काम सोपवा: आवश्यकतेनुसार इतरांना काम सोपवा.

    नवीन कौशल्ये शिकत रहा: नवीन तंत्र आणि पद्धती शिकून स्वतःला कायम अपडेट ठेवा

    यामुळे तुम्ही शॉर्टकट घेत असतानाही अधिक परिणामकारकपणे आणि हुशारीने काम करू शकाल.

    यश मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी :

    धैर्य आणि सातत्य: प्रत्येक टप्प्यावर मेहनत आणि सातत्य ठेवणे.

    योग्य नियोजन: कोणतेही काम व्यवस्थित योजना बनवून करणे.

    समर्पण: यशासाठी तुमच्याकडे ठाम ध्येय असणे आणि त्यासाठी निरंतर प्रयत्न करणे.

    शिकण्याची तयारी: चुका झाल्यावर त्यातून शिकणे आणि स्वतःला सुधारण्याची तयारी ठेवणे.

    आणखी वाचा :

  • राष्ट्रीय अभियंता दिवस आणि सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

    राष्ट्रीय अभियंता दिवस आणि सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

    आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे विश्वेश्वरय्या हे केवळ एक अभियंता नव्हते, तर त्यांनी भारताच्या औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात देखील भरीव योगदान दिले. त्यांची दूरदृष्टी आणि उत्तम तांत्रिक कौशल्य आजही अभियंते आणि तंत्रज्ञांसाठी आदर्श आहे.

    विश्वेश्वरय्या यांचा जन्म कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील चिक्कबल्लापूर तालुक्यात १५ सप्टेंबर १८६१ रोजी झाला. त्यांचे पूर्वज आंध्र प्रदेशातील मोक्षगुंडम या गावचे रहिवासी होते, म्हणून त्यांचे आडनाव ‘मोक्षगुंडम’ असे पडले. त्यांचे वडील पंडित श्रीनिवास शास्त्री हे प्रकांड पंडित होते. त्यांना वेद, उपनिषद यांचा गाढा अभ्यास होता. विश्वेश्वरय्या लहानपणापासूनच अतिशय हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते.

    सुरुवातीचे शिक्षण त्यांनी बंगळुरू येथील सेन्ट्रल कॉलेजमध्ये झाले. घरची आर्थिक परिस्थिती अस्थिर होती, त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं. मात्र, त्यांनी त्यांच्या अभ्यासातील सातत्य राखत बी. ए. च्या परीक्षेत संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यांच्या या यशाने प्रभावित  होऊन तत्कालीन म्हैसूर सरकारने त्यांना पुढील अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर केली. त्या शिष्यवृत्तीच्या बळावर विश्वेश्वरय्या यांनी पुण्याच्या सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथे त्यांनी तीन वर्षांचा अभ्यासक्रम अवघ्या अडीच वर्षांत पूर्ण करून, नोव्हेंबर 1883 मध्ये एल. सी. ई. (लायसेन्सिएट सिव्हिल इंजिनिअरिंग)  म्हणजेच आजची बी.ई. सिव्हिल पदवी वयाच्या बाविसाव्या वर्षी प्रथम श्रेणीत आणि प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली. शिक्षण पूर्ण होताच, 1884 मध्ये त्यांची तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या वतीने  मुंबई राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात (पी.डब्ल्यू.डी.) असिस्टंट इंजिनिअर म्हणून पुण्यात सरळ नियुक्ती करण्यात आली. 

    पुढे मुंबई सरकारच्या नोकरीत असताना विश्वेश्वरय्या यांनी अनेक उल्लेखनीय कामगिरी केली. 1893 मध्ये त्यांनी सिंध प्रांतातील सक्कर शहराला भेडसावणारा पाण्याचा प्रश्न सोडवला. त्या काळात सिंधू नदीपासून पाणी पुरवण्याची कोणतीही ठोस व्यवस्था नव्हती, त्यामुळे शहरात पाण्याची टंचाई होती. विश्वेश्वरय्या यांनी एक अभिनव योजना आखली, ज्याद्वारे सिंधू नदीपासून सक्करला पाणी मिळू लागले आणि हा प्रश्न कायमचा सुटला. याशिवाय, त्यांनी ब्रिटिश सैन्याच्या एडनमधील छावणीसाठी मोठं काम केलं. एडन हा येमेन या देशातील एक वाळवंटी प्रदेश होता, जिथे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती. ब्रिटिश सरकारने या समस्येचे निराकरण करण्यासाठी एका कुशल अभियंत्याची मागणी केली होती आणि सरकारने विश्वेश्वरय्या यांची निवड केली. त्यांनी एडनपासून ६० मैलांवर असलेल्या ठिकाणाहून पावसाचे पाणी पुरवण्याची योजना तयार केली. या योजनेमुळे एडनमधील पाण्याची समस्या कायमची सुटली आणि ब्रिटिश सैन्याला दिलासा मिळाला.

    त्यानंतर, त्यांनी शेतीसाठी एक क्रांतिकारक पद्धत विकसित केली. त्याकाळात शेतकरी कालव्याच्या पाण्याचा प्रमाणाच्या बाहेर मनमानी वापर करत होते, त्यावर कोणतेही नियंत्रण नव्हतं. तेव्हा विश्वेश्वरय्या यांनी या प्रश्नावर अभ्यास करून ब्लॉक सिस्टिम नावाची नवी पद्धत शोधली. सुरुवातीला शेतकऱ्यांनी या पद्धतीला विरोध केला, पण जसजशी त्यांना या योजनेची उपयुक्तता समजली, तसतसा विरोध मावळला. ब्लॉक सिस्टिममुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर अधिक नियोजनबद्ध पद्धतीने सुरू केला आणि शेती व्यवसायात त्यांच्यामुळे विश्वास निर्माण झाला.

    विश्वेश्वरय्या यांचे पुण्यात सुमारे चौदा-पंधरा वर्षे वास्तव्य होतं . पुण्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासात त्यांचे योगदान महत्त्वाचे होतं. 1901-03 दरम्यान त्यांनी पुण्याजवळील खडकवासला धरणावर एक ऑटोमॅटिक गेट डिझाइन केलं. हे दरवाजे जलाशयातील पाणी विशिष्ट उंचीवर पोहोचले की, आपोआप उघडत आणि पाणी कमी झाले की बंद होत. त्याकाळात हे अत्याधुनिक तंत्रज्ञान एक आश्चर्य मानलं  जात होतं. तसेच पुणे शहराच्या भूमिगत सांडपाण्याची योजना सुद्धा त्यांनीच तयार केली. या योजनेमुळे शहरात सांडपाण्याचे व्यवस्थापन अधिक सुलभ झाले. त्यांच्या या योजनेला त्याकाळी एक अद्भुत यश मानले गेले.

    पुण्याच्या जवळपास असलेल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचे महत्त्व पटवून देण्याचे कामही विश्वेश्वरय्या यांनी केलं. त्यांनी ब्लॉक सिस्टिमचा प्रचार करून शेतकऱ्यांना या पद्धतीची महत्ता समजावली, ज्यामुळे पाणी वाचले आणि शेतीत अधिक उत्पादकता आली. त्यांनी पुण्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासात मोठे योगदान दिलं, ज्यामुळे शहराच्या विकासाची दिशा ठरवली गेली.

    मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी सरकारी नोकरीत असताना असाधारण कामगिरी केली होती. त्यांच्या कर्तृत्वाचा दर्जा आणि त्यांनी दाखवलेली कार्यक्षमता या गोष्टी सर्वत्र चर्चेचा विषय होत्या. परंतु, त्या काळात भारतीयांना इंग्रज सरकारने ठराविक मोठ्या  पदांवर जाण्याची परवानगी दिली नव्हती. जेव्हा विश्वेश्वरय्या यांनी चीफ इंजिनिअर पदासाठी पात्रता दाखवूनही त्यांना ते पद देण्यात आलं नाही, तेव्हा त्यांना एकप्रकारचा अपमान वाटला. कारण ते एकटे भारतीय होते आणि इंग्रज सरकारने हे पद केवळ गोऱ्या अधिकाऱ्यांसाठी राखून ठेवलेले होतं. त्याचं वेळी विश्वेश्वरय्या यांची पेन्शनसाठी आवश्यक असलेली नोकरीची सेवा मुदत पूर्ण होण्यासाठी काहीच महिने शिल्लक होते. मात्र, त्यांच्या स्वाभिमानी आणि तत्त्वनिष्ठ स्वभावाला हा अन्याय सहन होईना. त्यांना मुदत वाढवून मिळणार नाही याची कल्पना होती आणि पेन्शनसाठी आवश्यक कालावधी कमी राहिला होता, तरीही त्यांनी 1908 मध्ये सुपरिंटेंडेंट इंजिनिअर म्हणून नोकरीचा तातडीने राजीनामा दिला. हा निर्णय त्यांनी आपल्या मूल्यांवर ठाम राहून घेतला होता.

    या निर्णयानंतर सर्वत्र मोठी चर्चा रंगली. त्यांच्या नोकरी सोडण्याच्या निर्णयाने अनेकांना धक्का बसला. ब्रिटिश सरकारलाही विश्वेश्वरय्या यांच्या या निर्णयामुळे स्वतःचीच  लाज वाटली आणि त्यांनी इंग्लंडमधून खास परवानगी मिळवून पेन्शनचा नियम शिथिल केला, जेणेकरून विश्वेश्वरय्या यांना पेन्शन मिळू शकेल. विश्वेश्वरय्या यांचा राजीनामा आणि नोकरी सोडल्याची बातमी देशभरात पसरली होती. त्याचवेळी, हैदराबाद संस्थानकडून एक विशेष निमंत्रक विश्वेश्वरय्या यांना भेटण्यासाठी आला. त्या निमंत्रकाने त्यांना चीफ इंजिनिअर म्हणून त्याच पगारावर नोकरीसाठी नियुक्त करण्याचं पत्र दिलं. हे पत्र मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी, म्हैसूर संस्थानातूनही त्यांना एक पत्र मिळाले.

    या पत्रात विश्वेश्वरय्या यांना चीफ इंजिनिअर म्हणून म्हैसूरमध्ये रुजू होण्याचं आमंत्रण देण्यात आलं होतं. या दोन मोठ्या संस्थानांमधून आलेल्या प्रतिष्ठित प्रस्तावांमुळे विश्वेश्वरय्या मोठ्या पेचात सापडले होते. त्यांना कोणालाही दुखवायचं नव्हतं, परंतु त्यांना त्यांच्या मूळ राज्यात परतण्याची इच्छा होती. त्यांच्या मनात म्हैसूरकडे परतण्याची ओढ होती. मात्र, त्याचवेळी हैदराबादमधील नद्यांच्या पूर समस्या गंभीर होत्या आणि त्या समस्येवर तातडीने उपाययोजना करणं आवश्यक होतं. म्हणूनच, विश्वेश्वरय्या यांनी एक समंजस निर्णय घेतला त्यांनी प्रथम हैदराबादमधील पूर समस्येवर उपाय काढण्याचं ठरवलं आणि त्यानंतर म्हैसूरला जाण्याचा विचार केला.

    त्या काळात हैदराबाद शहरातील मूसी आणि ईसी या नद्यांना दरवर्षी येणाऱ्या महापुरांमुळे मोठी हानी होत होती. पुरामध्ये घरं, जनावरं वाहून जात होती. हा प्रश्न सोडवण्यासाठी एम. विश्वेश्वरय्या यांनी या नद्यांवर धरणे बांधण्याची योजना आखली, ज्यामुळे महापुरांवर नियंत्रण मिळवता आलं. या योजनेची यशस्वी अंमलबजावणी केल्यानंतर, 1909 साली त्यांनी म्हैसूर संस्थानात (आताचे कर्नाटक) मुख्य अभियंता म्हणून पदभार स्वीकारला.

    म्हैसूरच्या महाराजांना विश्वेश्वरय्या यांची शिस्तबद्ध कामाची पद्धत खूप आवडली, म्हणून त्यांनी 1912 साली त्यांनी विश्वेश्वरय्या यांना  म्हैसूर संस्थानाचे दिवाण म्हणून नेमले. आपल्या कार्यकाळात विश्वेश्वरय्यांनी उद्योगधंद्यांमध्ये आधुनिक साधनांचा वापर करून सुधारणा घडवून आणल्या. भद्रावती आयर्न अँड स्टील वर्क्स सारख्या मोठ्या कारखान्याची स्थापना केली, तसेच म्हैसूर राज्याच्या नियंत्रणाखाली रेल्वे व्यवस्थापन आणले. बँक ऑफ म्हैसूर सुरू केली आणि पर्यटन क्षेत्रात उत्तम दर्जाची हॉटेल्स उभारली.

    त्यांनी कृष्णराजसागर धरणाचे बांधकाम पूर्ण केलं, ज्यामुळे म्हैसूर  राज्याला पुरेशी वीज आणि पाणी उपलब्ध झालं. याशिवाय, त्यांनी वृंदावन उद्यानाची निर्मिती करून राज्याला एक आकर्षक पर्यटनस्थळ दिलं. शिक्षणाची महती ओळखून, त्यांनी अनेक शाळा आणि महाविद्यालयांची स्थापना केली. मुलींसाठी स्वतंत्र महाविद्यालये आणि वसतिगृहे उभारली. शेती, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रात महत्त्वपूर्ण शिक्षण संस्था सुरू केल्या आणि म्हैसूरसाठी स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना केली. त्यांच्या दूरदृष्टीने म्हैसूर संस्थानाची सर्वांगीण प्रगती घडून आली. विश्वेश्वरय्या  यांनी  आपल्या कष्ट, बुद्धिमत्ता आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे यशाचा कळस गाठला.

    पंडित जवाहरलाल नेहरू डॉ. विश्वेश्वरय्यांबद्दल म्हणाले होते, “He is an engineer of integrity, character, and broad national outlook.” 1 सप्टेंबर 1961 रोजी त्यांच्या जन्मशताब्दी उत्सवाच्या वेळी, पंडित नेहरूंनी आपल्या अतिशय व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून दिल्लीहून बंगलोरला जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. विशेष म्हणजे, त्यांना आलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्रांवर त्यांच्या स्वतःची पोस्टाची तिकिटे चिकटवण्यात आली होती. 

    मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे भारताचे एक महान अभियंता, द्रष्टे आणि विकासाचे प्रणेते होते. त्यांच्या अतुलनीय कार्यामुळे आणि भारताच्या औद्योगिक क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानामुळे त्यांना भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले. वयाच्या १०१ व्या वर्षी १४ एप्रिल १९६२ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला, परंतु त्यांचं कार्य आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देतं. भारत सरकारने त्यांच्या जयंतीदिनी, म्हणजे १५ सप्टेंबरला अभियंता दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला, ज्याद्वारे प्रत्येक अभियंत्याला त्यांच्या कार्याची ओळख पटते. विश्वेश्वरय्या हे शतायुषी होऊन निरामय जीवन जगले. इंग्रज सरकारने त्यांना सर, कैसर-ए-हिंद, के.सी.आय.ई. इत्यादी बहुमानांनी सन्मानित केलं.

    आणखी वाचा

  • 3 वर्षे शेती करून उभी केली 1200 कोटींची कंपनी जाणून घ्या या “ॲग्री स्टार्टअप” ची कहाणी

    3 वर्षे शेती करून उभी केली 1200 कोटींची कंपनी जाणून घ्या या “ॲग्री स्टार्टअप” ची कहाणी

    अलिकडच्या काळात शेती क्षेत्रात सातत्यानं बदल होत आहेत. अनेक तरुण करिअर म्हणून देखील शेतीकडे पाहू लागले आहेत. बरेचसे शिक्षित तरुण आधुनिक शेतीची माहिती घेऊन शेतीकडे वळत आहेत व पारंपरिक शेतीपेक्षा कित्येक पटींनी अधिक उत्पन्न घेत आहेत. राजस्थानच्या जयपूरमध्ये राहणाऱ्या ऋतुराज शर्मा या 33 वर्षाच्या तरुणाने देखील शेतीत नवनवीन प्रयोग केले आहेत. शेतीच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधत या तरुणाने करोडो रुपयांची Zettafarms नावाची कंपनी स्थापन केली आहे.  

    गुडगावमध्ये ही कंपनी असून कॉर्पोरेट शेतीमध्ये कार्यरत आहे. कंपनी भाडेतत्त्वावर जमीन घेते आणि त्यात धान्य, फळं आणि भाजीपाला पिकवते. या कंपनीचे संस्थापक ऋतुराज शर्मा यांनी B.Tech आणि MBA केल्यानंतर नोकरीऐवजी स्वत:चं Startup सुरू केलं.  कंपनीचा उद्देश शेती अधिक फायदेशीर बनवणे आणि शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे आहे. शेतकऱ्यांच्या तांत्रिक आणि आर्थिक समस्या कमी करून आधुनिक शेती पद्धतीचा वापर करून शेतीचे उत्पादन अधिक वाढवणे हा कंपनीचा मुख्य उद्देश आहे

    Zettafarms चे काम कसे चालते? 

    Zetta Farms शेतीला एका व्यावसायिक कंपनी प्रमाणे चालवते. एका कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे  फायनान्स, ऑपरेशन्स, IT अशी सर्व खाती या कंपनीत देखील आहेत. मोठ्या प्रमाणावर शेतजमीन भाडेतत्वावर घेऊन सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्यावर शेती केली जाते. कुठले पीक किती प्रमाणात घ्यावे. कुठल्या पिकाला अधिक भाव मिळेल या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच पिके घेतली जातात. शेती करण्यासाठी कंपनीने शेतकऱ्यांनाच नोकरीवर ठेवले आहे, ज्याच्या बदल्यात त्यांना प्रत्येक महिन्याला ठराविक पगार मिळतो. कंपनी कायदेशीर असल्यामुळे शेतकऱ्यांचा PF देखील जमा होतो. याशिवाय कंपनी शेतकऱ्यांना मोफत इन्शुरन्स देखील देते. आज रोजी कंपनीमध्ये जवळपास २९०० कर्मचारी काम करतात.

    Zettafarms चा 15 राज्यांमध्ये विस्तार 

    Zettafarms ही कंपनी करारावर किंवा भाडेतत्त्वावर शेती करते. ज्यामध्ये ते किमान 50 एकर जमीन एका व्यक्तीकडून आणि 100 एकर जमीन एका गटाकडून भाडेतत्त्वावर घेतात. त्यानंतर त्या जमिनीवर ते शेती करतात. झेटाफार्म्स सध्या 15 राज्यांमध्ये 20 हजार एकर जमिनीवर शेती करत असून ६० पेक्षा जास्त पिकांचे उत्पादन घेते. पिकांमध्ये ते गहू, हरभरा, धान, कडधान्ये, भाजीपाला, फळे, चहा आणि कॉफीच्या मळ्यासह सर्व प्रकारची शेती केली जाते.

    ऋतुराजने शेती हा यशस्वी व्यवसाय कसा बनवला?

    ऋतुराज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतीमध्ये व्यवसाय, अर्थशास्त्र, गणित आणि विज्ञान यांचा समावेश केला, तर तो कोणत्याही परिस्थितीत फायदेशीर व्यवसाय आहे. या विचाराने ऋतुराजने शेतीमध्ये पाऊल टाकले. सुरुवातीला ऋतुराजने फक्त 2 एकर शेती करायला सुरूवात केली. हळूहळू भाडेतत्त्वावर आणि करारावर जमीन घेऊन व्यवसाय वाढवायला सुरुवात केली. ऋतुराजच्या कंपनीला पहिल्या वर्षी फक्त 1 लाख रुपयांचा नफा झाला, पण नंतर त्यांनी झपाट्याने काम वाढवले. 

    Zettafarms

    Zettafarms चे यशाचे रहस्य काय?

    एका ठिकाणी केवळ एकाच पिकाची शेती हानीकारक असू शकते. या विचारसरणीवर काम करत Zettafarms हे पीक विविधतेवर काम करते. ते वेगवेगळ्या भागात विविध प्रकारची शेती करतात. शेतीसाठी ते नवीन तंत्रज्ञान वापरतात ज्यामध्ये ते माती परीक्षणापासून इतर गोष्टींपर्यंत आवश्यक माहिती गोळा करतात. तंत्रज्ञानामध्ये, ते हवामान apps आणि क्रॉप मॉनिटरिंगसह विविध प्रकारच्या माहितीचे विश्लेषण वापरतात. झेटाफार्म्स गरजेनुसार सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करतात, कुठे ठिबक सिंचनाची गरज भासल्यास तिथेही तेच काम केले जाते. याशिवाय कुठे पाणी कमी असल्यास कमी पाण्यात पिके घेण्याच्या नियोजनावर काम केलं जातं 

    ते संसाधनांचा योग्य वापर करतात. ज्यामुळं उत्पादन वाढते आणि नफाही वाढतो. पीक विविधीकरणाव्यतिरिक्त ते Risk Management वर देखील काम करतात.

    औषधे, खते किंवा किटकनाशके वापरताना ते कीटक व्यवस्थापनाच्या पद्धती देखील अवलंबतात. ज्यामुळं खर्च कमी होतो आणि शेतीमध्ये कमी रसायने वापरली जातात. 

    भविष्यातील वाटचाल : 

    ऋतुराज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतीला ते एक यशस्वी व्यवसाय म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या व्यवसाय मॉडेलद्वारे ते लोकांना सांगू इच्छित आहेत की, शेतीतूनही करोडोंची कमाई केली जाऊ शकते. आयटी, फायनान्स आणि इतर क्षेत्रात काम करणे ज्याप्रमाणे लोक अभिमानाची गोष्ट मानतात, त्याचप्रमाणे लोकांना शेती आणि शेतकऱ्यांबद्दल आदराची भावना निर्माण झाली पाहिजे. 2030 पर्यंत 50 हजार एकरांवर शेती करण्याचे ऋतुराज शर्मा यांचे ध्येय आहे. शेतकरी, जमीनीचे मालक, स्टार्टअप्स, शेती पूरक व्यवसाय आणि शेती उपकरणे पुरवठादार यांना जोडणारे कृषी अर्थव्यवस्थेचे केंद्र बनून झेट्टा फार्म्स कृषी क्षेत्रात स्वतःच्या कार्याने बहुमूल्य योगदान देत आहेत. 

    आणखी वाचा

  • Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra | मुख्यमंत्री वयोश्री योजना 65 वर्षाच्या व्यक्तींना 3000 रुपये मिळणार

    Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra | मुख्यमंत्री वयोश्री योजना 65 वर्षाच्या व्यक्तींना 3000 रुपये मिळणार

    ५ फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वयोश्री योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत ६५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना दरमहा ३००० रुपयांची आर्थिक मदत व आवश्यक उपकरणे दिली जातील. या योजनेसाठी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, आणि अर्ज प्रक्रिया याबाबत संपूर्ण माहिती या लेखात जाणून घ्या.

    राज्यातील वृद्ध नागरिकांना वयोमानानुसार येणाऱ्या शारीरिक व मानसिक समस्या हाताळण्यासाठी “मुख्यमंत्री वयोश्री योजना” (Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra) राबविण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य परिस्थितीत जगण्यास मदत करणे हा आहे. वय वाढल्यानं अनेक ज्येष्ठ नागरिकांना दिसण्यात, ऐकण्यात आणि चालण्यात त्रास होऊ लागतो. परंतु, अशा समस्यांवर मात करण्यासाठी आवश्यक उपकरणं खरेदी करणे अनेकदा त्यांच्या आवाक्याबाहेर असतं.

    या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा, व इतर शारीरिक व मानसिक समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे उपलब्ध करून दिली जातील. या उपकरणांमुळे त्यांना दैनंदिन कार्यक्षमता सुधारता येईल आणि त्यांचे जीवनमान उंचावता येईल.

    शिवाय, योजनेत मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी मनःस्वास्थ्य केंद्रे, योगोपचार केंद्रे, व इतर उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. हे केंद्रं ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मानसिक ताण-तणावावर मात करण्यात आणि जीवनाचा आनंद घेण्यात मदत करतील.

    Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra

    मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत लाभार्थ्यांना दिली जाणारी उपकरणे, पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रे याविषयीची माहिती पुढीलप्रमाणे आहे:

    देण्यात येणारी उपकरणे:

    मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत लाभार्थ्यांना 3,000 रुपये रोख आर्थिक मदत दिली जाते. तसेच, त्यांना काही आवश्यक उपकरणे देखील दिली जातात, ज्यामध्ये खालील उपकरणांचा समावेश आहे:

    चष्मा, ट्रायपॉड, कमरेचा पट्टा, फोल्डिंग वॉकर, ग्रीवा कॉलर, स्टिक, व्हीलचेअर, कमोड खुर्ची, गुडघा ब्रेस, श्रवणयंत्र इत्यादी.

    पात्रता निकष:

    मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

    महाराष्ट्रातील स्थायिक रहिवासी : अर्जदार हा मूळचा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

    वयोमर्यादा: अर्जदाराचे वय 65 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावे.

    आर्थिक स्थिती: अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

    शारीरिक किंवा मानसिक समस्या: उमेदवाराला शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असावा.

    बँक खाते: अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे.

    आवश्यक कागदपत्रे

    मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

    आधार कार्ड, ओळखपत्र, उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, स्वघोषणा प्रमाणपत्र, समस्येचे (अपंगत्वाचे ) प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो. 

    वरील कागदपत्रांसह, अर्जदाराने समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर करावा.

  • ६ हजार कोटी दान  करणारा अवलिया : कोण आहेत आर. त्यागराजन?

    ६ हजार कोटी दान  करणारा अवलिया : कोण आहेत आर. त्यागराजन?

    आम्ही बोलत आहोत श्रीराम फायनान्स ग्रुपचे संस्थापक आर. त्यागराजन यांच्याबद्दल. आपल्या जीवनाबद्दल अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या आर. त्यागराजन यांची ही कथा यासाठी विशेष आहे की, जगातील अनेक मोठे उद्योगपती आपल्या संपत्तीच्या जोरावर अब्जावधींचे  इमले बांधत असताना, त्यागराजन यांनी जवळपास ६ हजार कोटींची संपत्ती आपल्या कर्मचाऱ्यांना दान करून जगाला एक नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या जीवनप्रवासावर एक नजर फिरवूया.

    कोण आहेत आर. त्यागराजन?

    त्यागराजन यांचा जन्म २५ ऑगस्ट १९३७ मध्ये  चेन्नईमधील (तत्कालीन मद्रास) एका समृद्ध शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी कोलकत्ता येथून भारतीय सांख्यिकी संस्थेतून गणितात पदव्युत्तर पदवी आणि गणितीय सांख्यिकीमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. 1961 साली त्यांनी न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड या सामान्य विमा कंपनीत प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. आयुष्याची जवळ जवळ वीस वर्षं त्यांनी वेगवेगळ्या संस्थामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले. 

    1974 मध्ये,वयाच्या ३७ व्या वर्षी त्यांनी आपल्या काही मित्रांसह सुरुवातीला श्रीराम चिट्स या व्यावसायिक वित्तपुरवठा व्यवसायाची स्थापना केली, पण नंतर त्यांनी कर्ज आणि विम्याच्या दिशेने प्रवास सुरु केला. त्यागराजन यांनी कधीच धाडस आणि नवकल्पना यांची साथ सोडली नाही. त्यांच्या नेतृत्वाखालील श्रीराम ग्रुपने आर्थिक सेवा क्षेत्रात नवीन संधी ओळखून गुंतवणुकीचे नवीन मार्ग शोधले. यामुळे कंपनीच्या व्यवसायात सातत्याने वृद्धी होत राहिली. श्रीराम समूहात आजच्या घडीला 30 हून अधिक कंपन्या आहेत. त्यातील काहींनी शेअर बाजारात मोठा पल्ला गाठला. आजमितीला श्रीराम फायनान्स लिमिटेडचे बाजारातील भांडवल 8.5 अब्ज डॉलर आहे.

    खराब क्रेडीट स्कोर असलेल्यांना दिले कर्ज

    मुख्यतः बॅंका अशा लोकांना कर्ज देण्यास मनाई करतात ज्यांचा क्रेडिट इतिहास खराब असतो किंवा नियमित उत्पन्न  नसतं. पण त्यागराजन यांनी कुठलाही CIBIL (Credit Information Bureau India Limited) चेक न करता या विशिष्ट लोकांना कर्ज प्रदान केलं, एका मुलाखतीत जेव्हा  त्यांना त्यांच्या या धोरणावर प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा  त्यांनी एक महत्वपूर्ण दृष्टिकोन व्यक्त केला. त्यांनी स्पष्ट केले की, खराब क्रेडिट इतिहास किंवा नियमित उत्पन्न नसलेल्या व्यक्तींना कर्ज देणे जितके धोक्याचे मानले जाते, तितके ते धोकादायक नाही. या मुद्द्याचा सखोल अभ्यास करून त्यांनी फायनान्स क्षेत्रात प्रवेश केला आणि अशा लोकांना कर्ज देणे सामान्य बाब आहे, असं त्यांनी सिद्ध करून दाखवलं.

    त्यांच्या करिअरची सुरुवात एका सामान्य कर्मचाऱ्याच्या भूमिकेत झाली होती आणि  फायनान्स  क्षेत्रात  त्यांच्या दीर्घकालीन अनुभवाने आणि शिक्षणाने त्यांना कर्ज देण्याच्या धोरणावर एक नवा दृष्टिकोन त्यांनी फायनान्स क्षेत्राला  प्रदान केला, ज्यामुळे नंतर या व्यवसायातील  धोरण अधिक सुसंगत व प्रभावी बनण्यास मदत झाली. त्यांचे नेतृत्व हे कर्मचार्‍यांसाठी प्रेरणादायी होते. त्यांनी आपल्या टीमला सदैव प्रोत्साहन दिले. ‘सामान्य माणूस असामान्य गोष्टी करू शकतो’ हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.

    कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये ६ हजार कोटी रुपये केले दान

    त्यागराजन यांनी आपली संपूर्ण संपत्ती कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये समान प्रमाणात वाटून दिली आहे. ६२१० कोटी रुपयांची एकूण संपत्ती कर्मचाऱ्यांमध्ये वाटून देत, त्यांनी फक्त स्वतःजवळ ५ हजार डॉलर्स, घर आणि कार ठेवली होती. त्यांच्या या निर्णयामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये अत्यंत आनंद आणि प्रेरणा निर्माण झाली.

    आर त्यागराजन यांना २०१३ मध्ये भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मभूषण प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या कामामुळे, भारतातील गरिबांना ट्रॅक्टर आणि इतर वाहने खरेदी करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणारे श्रीराम फायनान्स एक प्रमुख नाव बनले आहे. 

    व्यक्तिगत जीवन

    हजारो कोटींची संपत्ती असलेले आर. त्यागराजन हे अत्यंत साधे जीवन जगतात. ते स्वतःकडे मोबाईल फोन ही  ठेवत नाहीत, कारण त्यांना लोकांशी प्रत्यक्ष कनेक्ट राहायला आवडते. मोबाईल हा अनावश्यक वेळ खातो असं ते म्हणत असतात. “या उद्योजकाचा साधेपणा आणि जमिनीशी असलेली नाळ त्यांच्याशी संवाद साधताच लक्षात येते. त्यांनी आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कंपनीच्या व्यवस्थापन किंवा नेतृत्वाच्या पदावर स्थान दिले नाही. त्यांचा मोठा मुलगा टी. शिवरामन हा एक यशस्वी इंजिनिअर आहे, तर धाकटा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट असून, श्रीराम ग्रुपमध्ये एक सामान्य कर्मचारी म्हणून काम करतो. कुटुंबाचा व्यवसायात हस्तक्षेप नको म्हणून त्यांनी आपली मुल्ये  ठामपणे पाळली आहेत.

    आर. त्यागराजन हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात जी विनम्रता आणि साधेपणा आहे, ती आपल्या सर्वांसाठी एक आदर्श आहे.

    आणखी वाचा :

  • व्यवसायच का? नोकरदार आणि व्यावसायिक यातील फरक

    व्यवसायच का? नोकरदार आणि व्यावसायिक यातील फरक

    आपापल्या परीने प्रत्येक जण आपल्याला जमेल तसं परिस्थितीचा विचार करून, उपलब्ध संधींचा विचार करून, घरातून मिळणाऱ्या आर्थिक पाठबळाचा विचार करून स्वतःसाठी एखादं करिअर निवडतो आणि त्यामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी, घडविण्यासाठी प्रयत्न करत असतो. या सबंध करिअरच्या प्रवासात बऱ्यापैकी पिढी ही शिक्षण चालू असताना मला शिक्षण झाल्यावर व्यवसाय करायचा आहे, असे म्हणत नाही; तर एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी घ्यायची आणि आयुष्यात स्थिर व्हायचं असं बऱ्यापैकी जणांचं  म्हणणं असतं. 

    प्रत्येक व्यक्तीची जडणघडण ही त्या व्यक्तीला लाभणारे सामाजिक वातावरण, सहवासात येणारी माणसे, घेतलेले शिक्षण, वाचलेली पुस्तके, ऐकलेली भाषणे व चर्चा, आयुष्यात आलेले प्रसंग व या सर्व घटनांना त्या व्यक्तीने दिलेला प्रतिसाद यांच्याद्वारे झालेली असते त्यामुळे प्रत्येकाचे वेगळे विचार, वेगळे व्यक्तिमत्व आणि प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा व्यक्तीपरत्वे बदललेला असतो. 

    मग या दृष्टिकोनामध्ये नोकरीच्या ऐवजी सुरुवातीपासूनच आपल्याला व्यवसायाच करायचा आहे आणि तो का करावा? ही मानसिकता मनाशी पक्की होणं गरजेचं असतं, याच विषयावर आज आपण बोलणार आहोत की व्यवसायच का ?..

    आणि नोकरी का नको ?

    खरंतर सर्वात आधी, मला कुठेतरी माझी फाईल हातात घेऊन कंपन्यांची दारं भटकत नोकरी मागायची नाही; तर चार लोकांना माझ्या माध्यमातून नोकरी देऊन त्या देणाऱ्यांच्या रांगेत मला यायचं आहे, ही भावना मनाशी पक्की होणं ही खूप प्राथमिक पायरी आहे. कोणताही व्यावसायिक हा आधी त्याच्या मनात उद्योजक म्हणून तयार झालेला असतो, मगच तो जगाच्या समोर त्याचा उद्योग, व्यवसाय आणू शकतो. 

    व्यवसायच का ? 

    अतीव समाधान:

    खरंतर जेव्हा आपण कोणतातरी व्यवसाय करतो त्यावेळी तो व्यवसाय म्हणजे लोकांच्या कोणत्यातरी समस्येचं समाधान असतं. लोकांच्या एखाद्या प्रश्नावर आपण उत्तर शोधलेलं असतं. त्यामुळे कोणाचं तरी जगणं आपल्या काहीतरी करण्यातून सुखकर होणं हे समाधान कोणा दुसऱ्यासाठी आठ तासाची नोकरी करून आणि नऊ ते पाचच्या साच्यात स्वतःला बांधून ठेवून कधीच मिळणार नाही.

    आर्थिक सुबत्ता:

    असं म्हटलं जातं की पैसा हे सर्वस्व नाही, पण आजच्या काळात पैशाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही हेही तितकंच खरं आहे. पैसा हे नक्कीच अंतिम साध्य नाही; परंतु आपल्या जीवनाचं अंतिम साध्य साधण्यासाठी पैसा हे नक्कीच एक उत्तम आणि आवश्यक साधन आहे. कुठंतरी नोकरी करत असताना एका ठराविक Limit पर्यंत आपण कमावू शकतो, पगार घेऊ शकतो परंतु एक व्यावसायिक असताना आपल्या उत्पन्नाला कोणतीच मर्यादा राहत नाही. आपण जितकं काम करू, जितके कष्ट करू, जितका स्वतःच्या व्यवसायाला वेळ देऊ, तितकं आपलं उत्पन्न वाढणार यात शंका नाही. आपण आपल्या कुटुंबाच्या गरजा, आपली इतर अपूर्ण स्वप्नं या आर्थिक उत्पन्नातून नक्कीच पूर्ण करू शकतो.

    स्वतःसाठी वेळ :

    आपण जर नोकरी करत असू तर आपल्या नोकरीच्या वेळी आपल्याला त्या ठिकाणी पोहोचणं हे बंधनकारक असतं. आपली कामाची वेळ संपल्याच्यानंतरच आपण तिथून बाहेर पडू शकतो; परंतु व्यवसायात तुम्ही स्वतः मालक असता, तुमच्यासाठी लोक काम करत असतात, त्यामुळे व्यावसायिक कामांचं योग्य नियोजन करून आपल्याला स्वतःला व्यवसायात किती वेळ द्यायचा आहे, स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यासाठी कोणता वेळ राखीव ठेवायचा आहे हे आपण स्वतः ठरवू शकतो.

    Risk Management:

    जेव्हा तुम्ही एक व्यवसायिक असता तेव्हा रोज नवनवीन आव्हानांना, अडचणींना तुम्हाला तोंड द्यावं लागतं या सर्व समस्या व्यवसायाचे मालक म्हणून तुम्हाला स्वतः त्यात लक्ष घालून सोडवाव्या लागतात. अशावेळी कधी कोणता निर्णय घ्यायचा? काय करायचं?  हे सगळं आपल्याला ठरवावं लागतं. तणावपूर्ण परिस्थिती आपल्याला आपल्या पद्धतीनेच हाताळावी लागते. अशावेळी वेगवेगळ्या अनुभवातून शिकत या अडचणींचा कसा सामना करायचा, अवघड परिस्थिती कशी हाताळायची यामुळे नकळत आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो आणि अप्रत्यक्षरित्या Risk Management चं महत्त्वाचं तंत्र आपल्याला अवगत होतं. 

    मग आता व्यवसायाच्या बाबतीत एवढ्या सगळ्या सकारात्मक बाबी असतील तर उशीर कशाला ? आजच आपल्या उद्योजकतेच्या प्रवासाला सुरुवात करा. डोक्यात असणाऱ्या कल्पनेला चांगल्या मार्गदर्शकासमोर मांडा, अनुभवी लोकांचे सल्ले घ्या आणि फक्त सुरुवात करा.. समोरची वाट पावलागणिक आपोआप दिसत जाईल.

  • कमी खर्चात सुरू करता येणारे 10 व्यवसाय

    कमी खर्चात सुरू करता येणारे 10 व्यवसाय

    या लेखात आपण असे दहा व्यवसाय पाहणार आहोत, जे कमी गुंतवणुकीत सुरू करता येतात आणि योग्य व्यवस्थापन केल्यास उत्तम नफा मिळवून देऊ शकतात. या व्यवसाय कल्पना तुम्हाला तुमच्या उद्योजकीय प्रवासाला नवी दिशा देण्यास सहाय्यक ठरतील.

    १) फ्रीलान्सिंग

    फ्रीलान्सिंग व्यवसाय म्हणजे आपले कौशल्य आणि सेवांसाठी स्वतंत्रपणे काम करण्याचे तंत्र. यात आपल्याला एका निश्चित नोकरीची गरज नसते; आपण विविध कंपन्यांसाठी, क्लायंट्ससाठी किंवा व्यक्तींसाठी प्रोजेक्ट्स पूर्ण करतो. फ्रीलांसर म्हणून काम करताना, आपल्याला कामाचे वेळापत्रक आणि कामाचे प्रकार स्वतः ठरवता येतात, ज्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य मिळते.

    तंत्रज्ञानाच्या युगात फ्रीलान्सिंग ही एक मोठी संधी आहे. लेखन, ग्राफिक डिझाईन, डिजिटल मार्केटिंग, वेब डेव्हलपमेंट यांसारखी कौशल्ये वापरून आपण फ्रीलान्सिंगद्वारे पैसे कमवू शकतो. यासाठी आपल्याला इंटरनेट कनेक्शन आणि संगणक एवढीच गुंतवणूक लागते.

    २) घरगुती पदार्थ विक्री

    जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल, तर घरगुती पदार्थ विकणे हा उत्तम व्यवसाय ठरू शकतो. घरच्या घरी पदार्थ तयार करून ते ऑनलाइन किंवा ऑफलाइन विकता येतात. यासाठी कमी खर्चात व्यवसाय सुरू करता येतो.

    घरगुती पदार्थ विक्री व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रथम ठरवा की, कोणते पदार्थ विकायचे आहेत; जसे की, चटणी, लोणचं किंवा स्नॅक्स. नंतर FSSAI परवाना मिळवा आणि आवश्यक उपकरणे व कच्चे साहित्य तयार ठेवा. पॅकेजिंग आकर्षक ठेवा आणि उत्पादनांसाठी योग्य किंमत ठरवा. सोशल मीडियावर प्रमोशन करा आणि ऑनलाइन विक्री प्लॅटफॉर्मचा उपयोग करा. सतत गुणवत्ता राखा आणि ग्राहकांच्या फीडबॅकनुसार सुधारणा करा.

    ३) ऑनलाइन ट्यूशन किंवा क्लासेस

    आजकाल ऑनलाइन शिक्षणाची मागणी खूप वाढली आहे. तुमच्या विषयातील कौशल्ये आणि ज्ञानाचा उपयोग करून तुम्ही ऑनलाइन ट्यूशन किंवा कोचिंग क्लासेस घेऊ शकता. यासाठी जास्त खर्च करण्याची गरज नाही.

    या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कोणत्या विषयांसाठी ट्युशन द्यायची आहे हे ठरवावे लागेल. यासाठी Zoom, Google Meet सारख्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून डिजिटल मटेरियल तयार करणे आवश्यक आहे. उच्च गुणवत्ता शिक्षण पुरवण्यासाठी सखोल विषयज्ञान आणि नियमित वेळापत्रक तयार करावे. व्यवसाय वाढवण्यासाठी सोशल मीडियावर प्रमोशन करणे, फी स्ट्रक्चर फ्लेक्सिबल ठेवणे, जेणेकरून विद्यार्थ्यांना सोयीनुसार फी भरता येईल, शैक्षणिक क्षेत्रातील नवीन ट्रेंड्सवर आधारित शिक्षण पद्धतीत सुधारणा करणे आणि निरंतर अद्ययावत राहणे आवश्यक आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याची क्षमता असलेल्या या व्यवसायात मोठ्या संधी आहेत.

    ४) ब्लॉगिंग आणि यूट्यूबिंग

    ब्लॉगिंग किंवा यूट्यूबिंग हे व्यवसाय आजच्या काळात लोकप्रिय झाले आहेत, ज्यामुळे अनेक लोक आपल्या आवडीनुसार आणि कौशल्यानुसार कमाई करू शकतात. ब्लॉगिंगमध्ये आपल्याला लेखन, माहितीपूर्ण पोस्ट्स, आणि SEO चा वापर करून आपल्या ब्लॉगची लोकप्रियता वाढवावी लागते, तर यूट्यूबिंगमध्ये व्हिडिओ निर्मिती, संपादन आणि सोशल मीडिया प्रमोशन हे महत्त्वाचे घटक आहेत. दोन्ही व्यवसायांमध्ये सातत्य, दर्जेदार कंटेंट, आणि प्रेक्षकांसोबत उत्तम संवाद आवश्यक असतो. कमी गुंतवणूक आणि स्वातंत्र्यामुळे हे व्यवसाय अनेकांसाठी आकर्षक ठरले आहेत, पण यामध्ये वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी मेहनत आणि चिकाटी लागते.

    5) हस्तकला उत्पादन विक्री

    हस्तकला उत्पादन विक्री व्यवसाय हा एक कल्पकता, कौशल्य आणि परंपरेचा संगम असलेला व्यवसाय आहे. या व्यवसायात हाताने तयार केलेली विविध प्रकारची कला आणि हस्तकला उत्पादने विकली जातात, ज्यामध्ये काठ्यांवरील नक्षी, धातू, माती, लाकूड आणि वस्त्रांवरील कलाकुसर अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. स्थानिक कारागीरांच्या कौशल्याचा उपयोग करून तयार करण्यात आलेली ही उत्पादने विशिष्ट ग्राहक वर्गाला आकर्षित करतात. हस्तकला उत्पादने विक्री व्यवसायातून न केवळ आर्थिक फायदा होतो, तर स्थानिक हस्तकला आणि संस्कृतीचा वारसा जपण्याचेही काम होते.

    ६) ऑफलाइन किराणा दुकान

    छोट्या स्तरावर घरगुती वस्तूंचे दुकान उघडून व्यवसाय सुरू करता येतो. आवश्यक वस्तूंची मागणी नेहमीच असते, त्यामुळे यामध्ये कमी गुंतवणुकीत चांगले उत्पन्न मिळू शकते.ऑफलाईन किराणा दुकान व्यवसाय हा एक पारंपारिक पण स्थिर व्यवसाय आहे, जो आपल्या स्थानिक समुदायातील आवश्यक वस्तूंचा पुरवठा करतो. ग्राहकांना दररोजच्या जीवनातील वस्तू सहज उपलब्ध होतात, त्यामुळे स्थानिक किराणा दुकानांना एक स्थिर ग्राहकवर्ग मिळतो. या व्यवसायात, विविध प्रकारच्या वस्तू जसे की अन्नपदार्थ, घरेलू आवश्यक वस्तूंचा समावेश असतो. दुकानातील मर्चेंडाईझिंग, ग्राहक सेवा आणि स्थानिक बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन व्यवसायाचा विकास करणे आवश्यक आहे. या व्यवसायातील यशासाठी, उच्च गुणवत्तेच्या उत्पादनांची निवडकता, योग्य स्टॉक व्यवस्थापन, आणि ग्राहकांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

    ७) फोटोग्राफी

    जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड आणि कौशल्ये असतील, तर हाही एक चांगला व्यवसाय आहे. सुरुवातीला एका चांगल्या कॅमेरासोबत ही सेवा देऊ शकता. इव्हेंट फोटोग्राफी, प्रोडक्ट फोटोग्राफी किंवा पोर्ट्रेट फोटोग्राफीद्वारे तुम्ही उत्पन्न मिळवू शकता. फोटोग्राफी व्यवसाय आपल्या क्रिएटिव्ह आणि तांत्रिक कौशल्यांचा उपयोग करून सुंदर आणि संस्मरणीय चित्रे टिपण्यासाठी समर्पित आहे. या व्यवसायात विविध प्रकारच्या फोटोग्राफी सेवांचा समावेश होतो, जसे की; वेडिंग फोटोग्राफी, पोर्ट्रेट फोटोग्राफी, कमर्शियल फोटोग्राफी आणि इव्हेंट फोटोग्राफी. प्रत्येक ग्राहकाच्या आवश्यकता आणि अपेक्षांनुसार, फोटोग्राफर विविध शैली आणि तंत्रांचा वापर करून त्यांच्या दृश्यांना प्रभावशाली आणि अनोख्या स्वरूपात टिपण्याचा प्रयत्न करतो. फोटोग्राफीच्या व्यवसायात क्रिएटिव्हिटी, अचूकता, आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान महत्वाचे असते, जे क्लायंट्सना अत्यंत उत्कृष्ट परिणाम देण्यास मदत करते.

    ८) ड्रॉपशीपिंग

    ई-कॉमर्समध्ये ड्रॉपशीपिंग हा कमी खर्चात केला जाणारा व्यवसाय आहे. यात तुम्ही कोणताही स्टॉक न ठेवता थेट सप्लायरकडून ग्राहकांपर्यंत उत्पादने पोचवता. यासाठी तुम्हाला ऑनलाइन स्टोअर आणि मार्केटिंगवर भर द्यावा लागतो. ड्रॉपशिपिंग व्यवसाय म्हणजे एक प्रकारची रिटेल पद्धत आहे, जिथे विक्रेते उत्पादनांचा स्टॉक ठेवत नाहीत. ग्राहक ऑर्डर दिल्यावर, विक्रेता थेट उत्पादक किंवा होलसेलरकडून उत्पादन खरेदी करतो आणि ते ग्राहकाच्या पत्त्यावर पाठवतो. यामुळे विक्रेत्याला मोठ्या प्रमाणावर स्टॉक खरेदीची आवश्यकता नसते.  .

    ९) फ्लॉवर बुकिंग आणि डेकोरेशन

    फुलांचे बुके तयार करणे, कार्यक्रमांसाठी डेकोरेशन करणे ही कामे कमी गुंतवणुकीत करता येतात. यासाठी सुरुवातीला काही मटेरियल आणि सजावटीच्या वस्तूंची आवश्यकता असते. हा व्यवसाय विशेषतः विवाह, समारंभ, आणि इतर खास प्रसंगांसाठी आकर्षक आणि कलेची भव्यता आणण्यासाठी प्रसिद्ध आहे. या व्यवसायात, विविध प्रकारच्या फुलांचे रंग आणि प्रकार निवडून ग्राहकांच्या अपेक्षांनुसार सुंदर आणि आकर्षक डेकोरेशन तयार केली जाते. या सेवेत फुलांच्या बुकिंगची प्रक्रिया, स्थानिक  फुलांची उपलब्धता, कस्टमायझेशनसाठी विविध पर्याय, तसेच देखावे सजवण्यासाठी आवश्यक सामग्री आणि व्‍यावसायिक अनुभव यांचा समावेश असतो. ग्राहकांच्या खास इच्छांना अनुरूप असलेल्या डेकोरेशनच्या योजना तयार करून, या व्यवसायाने मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे.

    १०) फूड स्टॉल व्यवसाय

    फूड स्टॉल व्यवसाय म्हणजे कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारा एक उपयुक्त आणि फायदेशीर व्यवसाय. यामध्ये, स्ट्रीट फूड, फास्ट फूड आणि स्थानिक चव असलेले पदार्थ विक्रीसाठी ठेवता येतात. व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य ठिकाण, स्वादिष्ट पदार्थ आणि ग्राहकांसोबत उत्तम संवाद या गोष्टींवर भर देणे आवश्यक असते. तसेच, स्वच्छता आणि आकर्षक स्टॉल व्यवस्थापनामुळे ग्राहकांचा विश्वास मिळवता येतो. मार्केटिंगसाठी सोशल मीडियाचा वापर करून व्यवसायाला अधिक प्रसिद्धी देता येते, ज्यामुळे व्यवसायाची वाढ जलद होऊ शकते.

    आणखी वाचा