Author: naviarthkranti

  • सेकंड हँड गाड्यांचं मार्केट बदलणाऱ्या CARS24 च्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी

    सेकंड हँड गाड्यांचं मार्केट बदलणाऱ्या CARS24 च्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी

    आज टेक्नॉलॉजी आणि इंटरनेट मुळे वेगाने बदलणाऱ्या जगात, सगळं काही ऑनलाइन होत चाललं आहे. मग गाड्यांची खरेदी-विक्री कशी मागे राहील? पूर्वी वापरलेली गाडी विकायची म्हणजे डीलरकडे चकरा माराव्या लागायच्या, योग्य किंमत मिळेल की नाही याची चिंता, कागदपत्रांचं ओझं… पण या सगळ्याला पूर्णविराम देणारं एक नाव म्हणजे ‘CARS24’. या कंपनीने वापरलेल्या गाड्यांची खरेदी-विक्री सहज, सोपी आणि विश्वासार्ह करून दिली आहे.

    मात्र या यशामागे आहे एका छोट्या शहरातील तरुणाची मोठी स्वप्नं, अपयशातून शिकण्याची तयारी आणि अपार मेहनत. तो तरुण म्हणजे CARS24 चे संस्थापक आणि CEO विक्रम चोप्रा. छोट्याशा शहरातुन आलेल्या विक्रम यांचं स्वप्न होतं काहीतरी स्वतःचा व्यवसाय उभारायचं. हे स्वप्न पूर्ण करताना त्यांना अनेक अडथळे आले, अपयशं आली, पण त्यांनी हार न मानता पुन्हा नव्याने सुरुवात केली. आजच्या लेखात आपण या जिद्दी तरुणाचा प्रेरणादायक प्रवास पाहणार आहोत.

    सुरुवातीचं आयुष्य 

    उत्तर प्रदेशातील रायबरेली या छोट्या शहरात विक्रम चोप्रा यांचा जन्म झाला. ते एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात मोठे झाले. लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार असलेल्या विक्रम यांनी IIT बॉम्बेमधून बी.टेक आणि एम.टेक पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून MBA केलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी McKinsey आणि Sequoia Capital सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलं आणि तिथे चांगला अनुभव मिळवला.

    पण मोठ्या पगाराच्या नोकरी असूनही त्यांच्या मनात सतत एक विचार चालू होता तो म्हणजे “स्वतःचं काहीतरी वेगळं करायचं आहे.” हीच कल्पना मनात ठेऊन त्यांनी नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. याच निर्णयामुळे त्यांचा उद्योजकतेचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला.

    पहिला प्रयत्न अपयशी

    विक्रम चोप्रा यांनी FabFurnish नावाचं ऑनलाईन फर्निचर विक्रीचं स्टार्टअप सुरू करून व्यवसाय क्षेत्रात पहिले पाऊल टाकलं. तीन वर्षं मेहनत करूनही हा व्यवसाय अपेक्षेप्रमाणे चालला नाही. त्यांच्या वाट्याला अपयश आलं .पण विक्रम खचले नाहीत. त्यांनी या अपयशातून शिकण्याचा मार्ग स्वीकारला आणि नव्याने विचार करायला सुरुवात केली.

    एकदा स्वतःची गाडी विकताना विक्रम चोप्रा यांना जाणवलं की भारतात सेकंड हॅन्ड गाडी विकणं खूपच कठीण आणि गुंतागुंतीचं आहे. एजंट्स, पेपरवर्क, योग्य किंमत मिळवणं आणि वेळेची अडचण. या अनुभवातूनच त्यांच्या मनात एक कल्पना उमटली ती म्हणजे अशी एक सुविधा तयार करावी जी गाडी खरेदी-विक्रीची प्रक्रिया सोपी, पारदर्शक आणि टेकनॉलॉजीवर आधारित करेल. आणि याच विचारातून जन्म झाला CARS24 या डिजिटल प्लॅटफॉर्मचा ,ज्याने भारतात वापरलेल्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीला एक विश्वासार्ह नाव दिलं.

    CARS24 या स्टार्टअपची सुरुवात

    २०१५ साली विक्रम चोप्रा यांनी मेहुल अग्रवाल, गजेंद्र जांगिड आणि रुचित अग्रवाल या आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून Chttps://www.cars24.com/new-cars/ARS24 या स्टार्टअपची स्थापना केली. वापरलेल्या गाड्या विकणं ही भारतात एक कठीण आणि वेळखाऊ प्रक्रिया होती. हे लक्षात घेऊन त्यांनी C2B (Customer to Business) मॉडेलवर आधारित एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार केलं, जिथे सामान्य ग्राहक आपल्या गाड्या थेट कंपनीकडे विकू शकतो आणि कंपनी त्या गाड्या तपासून विश्वासार्ह डीलर्सना पुढे विकते. यामुळे ग्राहकांना योग्य किंमत, आणि डीलर्सना खात्रीशीर गाड्या मिळतात यामुळे दोघांचाही वेळ, पैसा आणि त्रास वाचतो.

    सुरुवातीला लोकांचा विश्वास मिळवणं हे मोठं आव्हान होतं. पण CARS24 ने या आपल्या खरेदी विकीरच्या प्रक्रियेला पारदर्शक आणि सहज करण्यासाठी डिजिटल पेमेंट, मोफत RC ट्रान्सफर, एआय आधारित किंमत मूल्यांकन आणि ऑनलाइन डीलिंगसारख्या सुविधा दिल्या. पहिल्याच भेटीत गाडी विकण्याचं आश्वासन आणि कागदपत्रांचं सुलभ व्यवस्थापन यामुळे ग्राहकांचा हळूहळू विश्वास बसू लागला आणि तिथूनच CARS24 ने यशाच्या दिशेने वाटचाल सुरू केली.

    फंडिंग आणि झपाट्याने झालेली वाढ

    CARS24 ने सुरुवातीपासूनच गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेतलं. २०१५ मध्ये SAIF Partners आणि Accel कडून तब्बल ३२ कोटींचं फंडिंग मिळालं. त्यानंतर २०१८ मध्ये Sequoia Capital ने मोठी उडी घेत ३४० कोटींची गुंतवणूक केली. यामुळे कंपनीचं व्हॅल्यूएशन थेट १७४० कोटींवर पोहोचलं. या फंडिंगमुळे CARS24 ला तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्यास, सेवा सुधारण्यास आणि अधिक शहरांमध्ये विस्तार करण्यास मदत झाली.

    विक्रम चोप्रा आणि त्यांच्या टीमने एक महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे महेंद्रसिंग धोनीला त्यांनी कंपनीचा  ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवलं. त्याच्या विश्वासार्ह प्रतिमेमुळे ब्रँडची ओळख घराघरात पोहोचली. “एक भेटीत गाडी विकण्याची प्रक्रिया” ही CARS24 ची खासियत बनली. त्यामुळे OLX, Droom, Mahindra First Choice यांसारख्या मोठ्या स्पर्धकांमध्येही CARS24 ने स्वतःचं वेगळं आणि विश्वासार्ह स्थान निर्माण केलं.

    युनिकॉर्न स्टार्टअप

    CARS24 ने २०२० मध्ये मोठा टप्पा गाठला. डीएसटी ग्लोबल कडून १५१० कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाल्यानंतर कंपनीचं पोस्ट-मनी व्हॅल्यूएशन १ अब्ज डॉलरवर पोहोचलं आणि CARS24 ही भारतातील युज्ड कार क्षेत्रातील पहिली युनिकॉर्न कंपनी ठरली. सुरुवातीला फक्त ३२ कोटी रुपयांची गुंतवणूक मिळालेल्या या स्टार्टअपने सिकोइया कॅपिटल, एक्झॉर सिड्स, डीएसटी ग्लोबल यांसारख्या मोठ्या गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करत हजारो कोटींची गुंतवणूक मिळवली.

    समोर आलेल्या यशाने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या सेवा फक्त कारपुरती मर्यादित न ठेवता, बाईक्स, कमर्शियल व्हेइकल्स, फायनान्सिंग, विमा यामध्येही विस्तार केला.२०२४ मध्ये कंपनीचं मूल्यांकन वाढून ३.२३ अब्ज डॉलर (सुमारे २५,००० कोटी रुपये) इतकं झालं आणि आज CARS24 हे नाव भारतातील युज्ड गाड्यांच्या क्षेत्रात एक भक्कम ओळख बनून उभं आहे.

    यशाच्या शिखरावर


    CARS24 ही आज भारतातील सर्वात मोठी युज्ड कार खरेदी-विक्रीची ऑनलाईन कंपनी बनली आहे. २०० हून अधिक शहरांमध्ये ही सेवा सुरू असून, दर महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त गाड्यांचे व्यवहार येथे होतात. १.५ कोटींहून अधिक लोकांनी त्यांचं अ‍ॅप डाउनलोड केलं आहे. वापरलेल्या गाड्यांच्या बाजारात ६५% पेक्षा जास्त मार्केट शेअर CARS24 च्या नावावर असून, हा त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेचा आणि यशाचा दाखला आहे.

    या यशामागे आहे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर. कंपनीने AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाद्वारे गाडीच्या किमतीचं अचूक मूल्यांकन शक्य केलं आहे, ज्यामुळे व्यवहार अधिक पारदर्शक झाले. ग्राहकांना केवळ गाडी विकणे किंवा खरेदी करणेच नव्हे, तर फायनान्स आणि विमा या सेवा देखील एका क्लिकवर मिळतात. कारण CARS24 आता स्वतःची NBFC म्हणजेच बँकेशिवाय आर्थिक सेवा देणारी संस्था आहे. ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन, सहज प्रक्रिया आणि विश्वासार्ह सेवा  हाच त्यांच्या यशाचा खरा मंत्र आहे.

    मित्रांनो, विक्रम चोप्रा यांची प्रेरणादायी कहाणी आपल्याला हे शिकवते की अपयश ही यशाकडे नेणारी पहिली पायरी असते. योग्य कल्पना, सातत्याने केलेली मेहनत आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे कोणतीही गोष्ट शक्य होऊ शकते. मोठं स्वप्न आणि ठाम निर्धार असेल, तर CARS24 सारखी युनिकॉर्न कंपनी उभी राहू शकते  आणि त्या वाटचालीत तुमचंही नाव असू शकतं!

  • Aavadel Tethe Pravas Yojana: तिकीट बुकिंगची कटकट नाही! एका पासमध्ये फिरा महाराष्ट्रभर, एसटीची ‘आवडेल तेथे प्रवास’ योजना!

    Aavadel Tethe Pravas Yojana: तिकीट बुकिंगची कटकट नाही! एका पासमध्ये फिरा महाराष्ट्रभर, एसटीची ‘आवडेल तेथे प्रवास’ योजना!

    प्रवास करणं ही आपल्यातील बहुतेक जणांची आवड असते. नवीन ठिकाणं पाहणं, वेगवेगळे अनुभव घेणं आणि त्या प्रत्येक प्रवासातून काहीतरी शिकणं यात एक वेगळीच मजा असते; पण अनेकदा आपली इच्छा असूनही, तिकीट आरक्षण, प्रवासाचा खर्च, वेळेचा अपव्यय आणि बसेसचा अभाव अशा अडचणींमुळे ही आवड पूर्ण होत नाही. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) एक खास योजना सुरू केली आहे ती म्हणजे  “आवडेल तेथे प्रवास योजना.”

    ही योजना म्हणजे प्रवाशांसाठी एक पर्वणीच आहे. जर तुम्हाला कमी खर्चात महाराष्ट्र फिरायचा असेल, तर ही योजना तुमच्यासाठीच आहे. अगदी काही मोजक्या अटींसह, तुम्हाला हवं तिथं, हव्या त्या वेळेस, हव्या त्या मार्गावर प्रवास करता येतो. चला तर मग, आजच्या लेखात या नव्या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

    या योजनेची सुरुवात कशी झाली? (How did the plan start?)

    “आवडेल तेथे प्रवास योजना” ही प्रथम १९८८ साली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे सुरू करण्यात आली होती. त्यावेळी प्रवाशांना १० दिवसांचा पास देण्यात यायचा. मात्र, २००६ मध्ये या योजनेत बदल करण्यात आला आणि त्या ऐवजी ४ व ७ दिवसांचे पास उपलब्ध करून देण्यात आले. या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की, राज्यातील नागरिकांनी कमी खर्चात संपूर्ण महाराष्ट्रात प्रवास करावा आणि त्यासाठी एसटी बस सेवेचा अधिकाधिक वापर व्हावा.

    या योजनेअंतर्गत प्रवाशांना साधी एसटी, जलद सेवा, रात्रीची बस, शिवशाही आणि हिरकणी अशा विविध बस प्रकारांची निवड करता येते. ही योजना वर्षभर लागू असली तरी सण-उत्सव, उन्हाळी सुट्ट्या, हिवाळा आणि लग्नसराईच्या काळात याला अधिक चांगला प्रतिसाद मिळतो. विशेषतः पर्यटन स्थळं आणि धार्मिक ठिकाणांसाठी हे पास मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. ही योजना म्हणजे कमी खर्चात मोकळेपणानं प्रवास करण्याची एक उत्तम संधी आहे.

    योजनेची वैशिष्ट्ये काय?

    ही योजना एसटी महामंडळाची अत्यंत उपयुक्त आणि प्रवाशांसाठी सोयीची योजना आहे. या योजनेअंतर्गत दिले जाणारे पास संपूर्ण महाराष्ट्रात तसेच काही आंतरराज्य मार्गांवरही वापरता येतात. विशेष म्हणजे या पासवर प्रवाशांना आरक्षणाची सुविधा देखील उपलब्ध आहे, त्यामुळे प्रवास अधिक आरामदायक आणि नियोजित करता येतो.

    या योजनेत ७ दिवसांच्या पासाचे दर पाहिल्यास, साध्या बसेससाठी प्रौढ प्रवाशांसाठी २०४० रुपये आणि मुलांसाठी १०२५ रुपये आकारले जातात. शिवशाही बसेससाठी हे दर अनुक्रमे ३०३० रुपये (प्रौढ) आणि १५२० रुपये (मुले) आहेत. ४ दिवसांच्या पासचे दर साध्या बसेससाठी प्रौढ ११७० रुपये आणि मुले ५८५ रुपये, तर शिवशाहीसाठी प्रौढ १५२० रुपये आणि मुले ७६५ रुपये आहेत. हे मुलांचे दर ५ ते १२ वर्षे वयोगटासाठी लागू होतात. कमी खर्चात आणि मोजक्या अटींसह आणि हवी तशी बससेवा निवडण्याच्या पर्यायामुळे ही योजना खरोखरच प्रवाशांसाठी एक उत्तम  संधी आहे.

    योजनेचे फायदे (Benefits of the scheme)

    • खर्चात बचत होते, कारण कमी पैशात राज्यभर सहज प्रवास करता येतो.
    • संपूर्ण महाराष्ट्रात प्रवास करता येत असल्यामुळे पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे आणि नातेवाईकांना भेट देणं शक्य होतं.
    • आरक्षणाची सुविधा उपलब्ध असल्यामुळे प्रवास अधिक सोयीचा आणि निश्चित होतो.
    • पासचा कालावधी रात्री बारा वाजल्यापासून सुरू होतो आणि शेवटच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत वैध असतो.
    • प्रौढ प्रवाशाला ३० किलो आणि मुलांना १५ किलो पर्यंत सामान मोफत वाहून नेण्याची परवानगी मिळते.

    योजनेचे नियम व अटी (Terms and conditions of the scheme)

    • पास फक्त ज्याच्या नावावर असेल, त्याच व्यक्तीने वापरायचा असतो. तो दुसऱ्या कोणालाही वापरायला देता येत नाही.
    • जर पास हरवला, तर त्याची कोणतीही भरपाई किंवा नवीन पास दिला जात नाही.
    • प्रवासादरम्यान काही सामान हरवले किंवा नुकसान झाले, तर त्याची जबाबदारी एसटी महामंडळ घेत नाही.
    • पासचा गैरवापर झाल्यास, तो पास लगेच रद्द करण्यात येतो.
    • शिवशाही बससाठी स्वतंत्र पास घ्यावा लागतो आणि त्याचे दरही वेगळे असतात.

    पास कसा घ्यावा? (How to get a pass?)

    या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या एसटी स्टँडवर जावे लागते. तिथे ठराविक नमुन्यातील अर्ज भरावा लागतो. अर्जासोबत दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, आधार कार्डची प्रत आणि पासची रक्कम द्यावी लागते. हे सर्व तपासून झाल्यावर तुम्हाला पास दिला जातो.

    कधी कधी एसटीचा संप किंवा आंदोलन झाल्यास प्रवासी प्रवास करू शकत नाहीत. अशा वेळी प्रवास न झालेल्या दिवसांचा परतावा मिळतो किंवा पासाच्या कालावधीत वाढ दिली जाते. त्यामुळे प्रवाशांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहत नाही.

    मित्रांनो, स्वस्तात मस्त असलेली ही योजना सामान्य माणसांसाठी खूप उपयोगी आहे. तुम्ही पर्यटनासाठी, नातेवाईकांना भेटण्यासाठी, व्यापारासाठी किंवा फक्त भटकंतीसाठी प्रवास करत असाल तरीही ही योजना तुमच्यासाठी निश्चितपणे फायद्याची ठरते. 

    आणखी वाचा:

  • PORTER: तीन मित्रांनी प्रत्येकी २ लाखांच्या गुंवतणुकीत सुरु केलेला व्यवसाय आज ३००० कोटींवर पोहोचलाय

    PORTER: तीन मित्रांनी प्रत्येकी २ लाखांच्या गुंवतणुकीत सुरु केलेला व्यवसाय आज ३००० कोटींवर पोहोचलाय

    सामान्य वाटणाऱ्या एखाद्या अडचणीतून जर योग्य वेळी कल्पकता आणि धाडस दाखवलं, तर मोठ्यातली मोठी समस्या देखील संधीमध्ये बदलू शकते. Porter या स्टार्टअपच्या यशोगाथेतून हे स्पष्ट होतं. IIT मधून शिक्षण घेतलेला आणि JP Morgan सारख्या नावाजलेल्या कंपनीत काम करणारा एक तरुण, एक छोटी पण सतत जाणवणारी अडचण ओळखतो आणि त्यातून भारतातील एक आघाडीचं इंट्रासिटी लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म उभारतो. तो तरुण म्हणजे Porter या कंपनीचे सहसंस्थापक प्रणव गोयल.

    Porter ची संकल्पना प्रणव यांना एका वैयक्तिक अडचणीतून सुचली. शहरांत छोट्या मालवाहतुकीसाठी विश्वसनीय आणि सुलभ पर्याय नव्हता, ही अडचण अनेकांना भेडसावत होती. तंत्रज्ञानाच्या मदतीने या समस्येवर उपाय शोधता येईल, यावर विश्वास ठेवून त्याने Porter ची स्थापना केली. आज Porter लाखो लोकांना मालवाहतुकीसाठी मदत करत आहे. या लेखात आपण Porter कशी सुरू झाली, कोणते टप्पे पार करत ती यशाच्या शिखरावर पोहोचली, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

    एका लहानशा अडचणीतून सुचलेली कल्पना

    Porter या स्टार्टअपची कल्पना प्रणव गोयल यांना त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून सुचली. ते IIT खरगपूरचे पदवीधर असून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात JP Morgan या नामांकित कंपनीत विश्लेषक (ANALYST) म्हणून केली. कामानिमित्त त्यांना गुरगावहून मुंबईला स्थलांतर करावं लागलं. या वेळी घरातील फर्निचर हलवण्यासाठी मिनी ट्रक बुक करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्यात योग्य ड्रायव्हर मिळत नव्हता, भाडं ठरवणं कठीण जात होतं आणि संपूर्ण सेवा प्रक्रियेत पारदर्शकता नव्हती.

    याच अनुभवातून त्यांना जाणवलं की शहरांमधील वाहतूक व्यवस्था अजूनही पारंपरिक पद्धतीने चालते आणि त्यात ग्राहक, ड्रायव्हर आणि एजंट सगळेच त्रासलेले असतात. ही अडचण म्हणजेच एक मोठी संधी असू शकते, हे त्यांनी ओळखलं. तंत्रज्ञानाच्या मदतीने ही समस्या सोडवता येईल का, असा विचार त्यांच्या मनात आला आणि अशाच विचारातून Porter या नव्या युगाच्या लॉजिस्टिक स्टार्टअपची सुरुवात झाली.

    स्टार्टअपची सुरुवात – Porter चा जन्म


    एप्रिल २०१४ मध्ये प्रणव गोयल यांनी JP Morgan मधील नोकरी सोडली आणि IIT मधील आपले दोन  मित्र उत्तम डिग्गा आणि विकास चौधरी यांच्यासोबत मिळून स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांच्या तयारीनंतर, ऑगस्ट २०१४ मध्ये त्यांनी ‘Porter’ हा मोबाईल अ‍ॅप आधारित लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म सुरू केलं. त्यांच्या या उपक्रमाचा उद्देश शहरांतर्गत मालवाहतूक अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करणे हा होता.

    Porter अ‍ॅपच्या मदतीने ग्राहक मिनी ट्रक, टू-व्हीलर किंवा थ्री-व्हीलर सहजपणे बुक करू शकतात. या प्लॅटफॉर्ममुळे वाहनचालक आणि ग्राहक एकाच ठिकाणी जोडले गेले. पारदर्शक आणि परडवणारे दर, GPS मार्गदर्शन आणि सहज ऑर्डर प्रक्रिया यामुळे सेवा अधिक विश्वासार्ह आणि वापरण्यास सुलभ बनली. पारंपरिक वाहतूक व्यवस्थेला तंत्रज्ञानाची जोड देत त्यांनी एक नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक लॉजिस्टिक सोल्यूशन तयार केलं.

    तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट बिझनेस मॉडेल

    Porterचं बिझनेस मॉडेल साधं पण अत्यंत परिणामकारक होतं. प्रत्येक बुकिंगवर कंपनी १० ते १५ टक्के कमिशन घेत होती. यासोबतच इन्शुरन्स, ड्रायव्हर क्रेडिट, प्रायोरिटी लिस्टिंग यांसारख्या अतिरिक्त सेवा देऊन उत्पन्नाचे नवे मार्ग खुले करण्यात आले. या मॉडेलनं ग्राहकांना त्यांच्या मालवाहतुकीच्या खर्चात जवळपास २०% पर्यंत बचत मिळवून दिली, तर चालकवर्गाला त्यांच्या उत्पन्नात सुमारे ३०% वाढ अनुभवायला मिळाली.

    Porter अ‍ॅप स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध केल्यामुळे चालकांसाठी ते वापरणं सोपं झालं. सहज नोंदणी प्रक्रिया आणि योग्य प्रोत्साहन यामुळे अवघ्या १८ महिन्यांत १ लाख बुकिंग्स पार करण्यात त्यांनी यश मिळवलं. मुंबई, बेंगळुरू, चेन्नईसारख्या मोठ्या शहरांमध्ये विस्तार करताना त्यांना Sequoia Capital आणि Kae Capital या गुंतवणूकदारांकडून ३५ कोटी रुपयांची  फंडिंगही मिळाली. हे यश त्यांच्या कल्पकतेचं आणि धाडसाचं प्रतीक ठरलं.

    पुढील वाटचाल आणि मोठ्या ब्रँडसोबत भागीदारी

    Porter ची सेवा गुणवत्ता, वेळेचं भान आणि पारदर्शक व्यवहार यांच्या जोरावर अल्पावधीतच लोकप्रिय झाली. २०१८ मध्ये त्यांनी महिंद्रा ग्रुपच्या Smartshift या लॉजिस्टिक प्लॅटफॉर्मसोबत विलीन होण्याचा निर्णय घेतला. याच टप्प्यावर त्यांना ५० कोटींची Series C फंडिंग मिळाली. याच वर्षी त्यांनी ‘Porter for Enterprise’ हा नवीन विभाग सुरू केला, ज्यामार्फत BigBasket, Urban Company, Flipkart यांसारख्या मोठ्या कंपन्यांना B2B लॉजिस्टिक सेवा पुरवायला सुरुवात केली.

    २०१९ पर्यंत Porter ने ३० लाख डिलिव्हरी पूर्ण करून जबरदस्त प्रगती केली. कंपनीचं वार्षिक उत्पन्न २२७ कोटींवर पोहोचलं. त्यांनी अशा छोट्या पण महत्त्वाच्या लॉजिस्टिक गरजांवर लक्ष केंद्रित केलं ज्या अनेक मोठ्या कंपन्यांनी दुर्लक्षित केल्या होत्या, जसं की संध्याकाळचं कुरिअर किंवा काही तासांसाठी टेम्पो बुकिंग. अशा गरजांना सेवा पुरवून त्यांनी बाजारात आपलं वेगळेपण सिद्ध केलं.

    युनिकॉर्न बनण्याचा प्रवास

    Porter च्या यशस्वी प्रवासात एप्रिल २०२० एक महत्त्वाचा टप्पा ठरला. Lightstone (आता Lightrock) या गुंतवणूकदार संस्थेने कंपनीमध्ये १४० कोटींची गुंतवणूक केली. त्यानंतर २०२२ मध्ये Tiger Global च्या नेतृत्वाखाली ७५० कोटींचं भांडवल उभं करण्यात आलं. याच काळात कंपनीने १७८९ कोटींचं वार्षिक उत्पन्न मिळवून आपली ताकद सिद्ध केली.

    १६ मे २०२४ रोजी Porter ने आपले काही शेअर्स (ऑप्शन पूल) विकले. त्यामुळे कंपनीचं एकूण मूल्य $१ बिलियनच्या पुढं गेलं आणि Porter ही Krutim आणि Perfios नंतर २०२४ मधली तिसरी युनिकॉर्न कंपनी बनली.

    यशाच्या शिखरावर 

    आज Porter देशातील १६ शहरांमध्ये सेवा देत आहे आणि त्यांचे ५० लाखांपेक्षा जास्त ग्राहक आहेत. रोज २.५ लाखांहून अधिक चालक त्यांच्या प्लॅटफॉर्मवर काम करत आहेत. दर महिन्याला सुमारे ५० लाख डिलिव्हरी पार पडतात. सध्या कंपनीचं उत्पन्न २७३३ कोटींवर पोहोचलं असून, कंपनीचं एकूण व्हॅल्युएशन ८३०० कोटींहून अधिक आहे.

    Porter हे फक्त एक ॲप नाही, तर एक आधुनिक आणि स्मार्ट लॉजिस्टिक सोल्यूशन आहे. यात AI तंत्रज्ञान वापरून ग्राहक आणि चालक यांना एकत्र जोडलं गेलं आहे. GPS ट्रॅकिंग, झटपट बुकिंग, परवडणारे दर आणि वापरण्यास सोपं इंटरफेस यामुळे सर्वांचा अनुभव चांगला होतो. Porter B2B आणि B2C (सर्वसामान्य ग्राहकांसाठी) दोघांसाठी उपयुक्त असून, मोठ्या मालवाहतुकीपासून ते घरगुती वस्तूंच्या डिलिव्हरीपर्यंत या प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो.

    मित्रांनो, प्रणव गोयल यांची कथा आपल्याला शिकवते की, अडचणींवर फक्त तक्रार न करता जर त्यावर उपाय शोधण्यास सुरुवात केली, तर त्यातून एक यशस्वी व्यवसाय उभा राहू शकतो आणि Porter हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.

    आणखी वाचा :

  • Digital Eye Strain : डोळ्यांची काळजी घ्या! ‘डिजिटल आय स्ट्रेन’ पासून बचावाचे १० महत्वाचे उपाय

    Digital Eye Strain : डोळ्यांची काळजी घ्या! ‘डिजिटल आय स्ट्रेन’ पासून बचावाचे १० महत्वाचे उपाय

    तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे आपल्या दैनंदिन जीवनात मोठा बदल झाला आहे. विद्यार्थी, नोकरदार आणि गृहिणी. सर्वांनाच मोबाईल, लॅपटॉप आणि डिजिटल उपकरणे आवश्यक वाटू लागली आहेत. मात्र, सतत स्क्रीनसमोर राहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी, लालसरपणा आणि दृष्टी कमजोर होण्याच्या समस्या वाढल्या आहेत. याच कारणामुळे ‘डिजिटल आय स्ट्रेन’ किंवा ‘कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम’ हा नवा आजार उद्भवला आहे.

    तासनतास स्क्रीनकडे पाहिल्याने डोळे कोरडे पडतात आणि दृष्टी धूसर होते. विशेषतः ऑनलाईन शिक्षण, वर्क फ्रॉम होम आणि सोशल मीडियाच्या वाढत्या सवयीमुळे हा त्रास अधिक जाणवतो. मात्र, काही सोप्या उपायांनी डोळ्यांचे आरोग्य जपता येऊ शकते. या लेखात आपण हा आजार नेमका काय आहे, या आजाराची लक्षणे आणि त्यावरचे उपाय जाणून घेऊया.

    डिजिटल आय स्ट्रेन म्हणजे नेमकं काय? (What exactly is digital eye strain?)

    डिजिटल आय स्ट्रेन म्हणजे डोळ्यांवर पडणारा तो ताण, जो सतत मोबाईल, लॅपटॉप, टॅब्लेट किंवा टीव्हीसारख्या डिजिटल स्क्रीनकडे पाहिल्यामुळे निर्माण होतो. दिवसाचे अनेक तास स्क्रीनसमोर घालवल्याने डोळ्यांवर सतत दबाव येतो आणि त्याचा थेट परिणाम दृष्टीवर होतो. अयोग्य प्रकाश, चुकीची बसण्याची स्थिती, स्क्रीन आणि डोळ्यांतील कमी अंतर तसेच ब्लू लाईटचा प्रभाव यामुळे ही समस्या अधिक वाढते. दीर्घकाळ या त्रासाकडे दुर्लक्ष केल्यास डोळ्यांची शक्ती कमी होऊ शकते आणि चष्म्याचा नंबरही वाढू शकतो. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी काही आवश्यक उपाय करण्याची गरज आहे.

    डिजिटल आय स्ट्रेनची लक्षणे

    जर तुम्हाला सतत खालील लक्षणे जाणवत असतील, तर तुम्ही डिजिटल आय स्ट्रेनचा अनुभव घेत आहात. 

    • डोळ्यांची जळजळ आणि खाज
    • डोळे कोरडे होणे किंवा पाणावणे
    • डोळ्यांमध्ये लालसरपणा
    • डोकेदुखी आणि डोळ्यांवर ताण येणे
    • धूसर किंवा अस्पष्ट दिसणे
    • स्क्रीनकडे पाहताना अस्वस्थ वाटणे
    • झोप न येणे किंवा झोपेच्या वेळेत बदल होणे

    डिजिटल आय स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी महत्त्वाचे उपाय

    • दर २० मिनिटांनी, २० सेकंदांसाठी, २० फूट अंतरावरील वस्तूकडे पाहा.
    • लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर डोळ्यांपासून किमान १८ ते २४ इंच दूर ठेवा आणि स्क्रीन डोळ्यांच्या थोडी खाली असावी.
    • ब्लू लाईट फिल्टर किंवा अँटी-ग्लेअर ग्लास वापरा.
    • सतत स्क्रीन वापरल्याने डोळ्यांचा थकवा वाढतो, त्यामुळे अधूनमधून डोळे मिटून काही सेकंद आराम द्या.
    • डोळे कोरडे पडू नयेत म्हणून वारंवार डोळे मिचकवा आणि हलवा.
    • स्क्रीनचा प्रकाश खूप जास्त किंवा कमी नसावा आणि उजेड थेट स्क्रीनवर पडणार नाही याची काळजी घ्या.
    • व्हिटॅमिन-ए, ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स आणि ल्यूटिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा (उदा. गाजर, पालक, ड्रायफ्रूट्स, ताज्या फळे).
    • दररोज 7-8 तासांची शांत झोप घेणे महत्त्वाचे आहे.
    •  डोळ्यांची जळजळ, धूसर दिसणे, डोकेदुखी यासारखी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
    • योग्य काळजी घेतल्यास डिजिटल आय स्ट्रेन टाळता येतो आणि डोळ्यांचे आरोग्य टिकवता येते.

    मित्रांनो, डोळे आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान देणगी आहेत म्हणून त्यांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. आजच्या डिजिटल युगात संगणक आणि स्मार्टफोन आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग झाले आहेत, त्यामुळे डिजिटल आय स्ट्रेन ही समस्या वाढत आहे. दीर्घकाळ स्क्रीनसमोर राहणे टाळता येत नसले, तरी डोळ्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. संतुलित आहार, पुरेशी झोप आणि डोळ्यांची वेळोवेळी तपासणी करून आपण डोळ्यांचे आरोग्य टिकवू शकतो.

  • New banking rules 2025: सावधान! १ एप्रिलपासून बँकिंगचे नियम बदलले, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे

    New banking rules 2025: सावधान! १ एप्रिलपासून बँकिंगचे नियम बदलले, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे

    १ एप्रिल २०२५ पासून नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात झाली आहे आणि त्यासोबतच बँकिंग क्षेत्रात काही महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. हे बदल एटीएम व्यवहार, बचत खाते, मुदत ठेवी (एफडी), क्रेडिट कार्ड फायदे आणि चेक व्यवहार यासारख्या अनेक गोष्टींवर थेट परिणाम करणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी या नव्या नियमांची पूर्ण माहिती करून घेणे आवश्यक आहे, नाहीतर अनावश्यक शुल्क भरावे लागू शकते किंवा काही फायदे गमवावे लागू शकतात.

    नवे नियम ग्राहकांच्या सोयीसाठी असले तरी त्यामध्ये काही बंधने आणि अटी देखील लागू करण्यात आल्या आहेत. एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा, एफडीवरील व्याजदरातील बदल, क्रेडिट कार्डशी संबंधित शुल्क आणि चेक क्लिअरिंगबाबतच्या नव्या अटींचा सरळ परिणाम सर्वसामान्य बँकिंग व्यवहारांवर होणार आहे. या लेखात आपण कोणते नियम बदलले आहेत या विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

    एटीएममधून पैसे काढण्याचे नियम 

    नव्या आर्थिक वर्षापासून एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. यापूर्वी ग्राहकांना दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून महिन्याला ५ वेळा मोफत पैसे काढण्याची सुविधा होती. मात्र, आता ही मर्यादा ३ व्यवहारांवर आली आहे. त्यानंतर जर तुम्ही दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून ५ पेक्षा जास्त वेळा पैसे काढले, तर प्रत्येक वेळी २० ते २५ रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.

    जर तुम्ही वारंवार दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढत असाल, तर तुम्हाला अतिरिक्त खर्च करावा लागेल. त्यामुळे ग्राहकांनी शक्यतो आपल्या बँकेच्या एटीएमचा वापर करावा किंवा डिजिटल पेमेंटच्या पर्यायांचा अधिक विचार करावा. 

    किमान शिल्लक रकमेच्या नियमांत बदल

    स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि कॅनरा बँक यांनी किमान शिल्लक ठेवण्याच्या अटी बदलल्या आहेत. यापूर्वी ग्राहकांसाठी ठराविक किमान रक्कम ठेवण्याचा नियम होता, मात्र आता हा निकष खात्याचे स्थान शहरी, निमशहरी आणि ग्रामीण शाखांनुसार ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक भागातील ग्राहकांसाठी किमान शिल्लक रकमेची मर्यादा वेगळी असणार आहे.

    या बदलामुळे खात्यात आवश्यक शिल्लक न ठेवल्यास ग्राहकांना दंड भरावा लागू शकतो. ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी किमान शिल्लक तुलनेने कमी असण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळेल. मात्र, शहरी आणि निमशहरी भागातील ग्राहकांनी आपल्या खात्यात पुरेशी शिल्लक असल्याची काळजी घ्यावी, अन्यथा दरमहा काही शुल्क कपात होऊ शकते.

    बचत खाते आणि मुदत ठेवीवरील व्याजदरांत बदल

    बँकांनी बचत खाती (Savings Account) आणि मुदत ठेवी (Fixed Deposit) यांचे व्याजदर नव्या नियमांनुसार ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. आता खात्यातील शिल्लक रकमेच्या आधारे व्याजदर ठरेल. म्हणजेच, ज्या ग्राहकांच्या खात्यात जास्त शिल्लक असेल, त्यांना अधिक व्याज मिळेल, तर कमी शिल्लक असणाऱ्यांना तुलनेने कमी व्याजदर लागू होईल.

    या बदलामुळे मोठ्या ठेवींवरील परतावा वाढण्याची शक्यता आहे, तर कमी शिल्लक असणाऱ्या खातेदारांना पूर्वीपेक्षा कमी व्याज मिळू शकते. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या खात्यात जास्तीत जास्त शिल्लक ठेवावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा बदल लोकांना अधिक बचतीसाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने करण्यात आला आहे.

    चेक व्यवहारांसाठी “पॉझिटिव्ह पे” सिस्टीम लागू

    बँका आता ‘पॉझिटिव्ह पे सिस्टीम’ नावाची नवी सुविधा लागू करत आहेत, ज्यामुळे मोठ्या रकमांच्या चेक व्यवहारांची सुरक्षा वाढणार आहे. या प्रणालीअंतर्गत, जर तुम्ही ५,००० रुपयांपेक्षा अधिक रकमेचा चेक दिला, तर तो वटवण्यापूर्वी तुम्हाला बँकेला चेकचा क्रमांक, तारीख, लाभार्थ्याचे नाव आणि रक्कम याची माहिती द्यावी लागेल.

    या नव्या नियमामुळे फसवणूक आणि चुकीच्या व्यवहारांना आळा बसणार आहे. मोठ्या चेक व्यवहारांवर अधिक नियंत्रण राहील, ज्यामुळे चुकीने चेक वटण्याच्या घटना कमी होतील. मात्र, व्यवसाय आणि मोठ्या व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना बँकेला आधी माहिती द्यावी लागेल, त्यामुळे अतिरिक्त काळजी घेण्याची गरज भासेल.

    क्रेडिट कार्डच्या फायद्यांमध्ये बदल

    स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आयडीएफसी फर्स्ट बँक आणि ॲक्सिस बँक यांनी त्यांच्या क्रेडिट कार्ड योजनांमध्ये काही महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. याआधी या कार्ड्सवर टिकर व्हाऊचर, नूतनीकरण फायदे आणि माइलस्टोन रिवॉर्ड्स मिळत होते. मात्र, १ एप्रिल २०२५ पासून काही फायदे बंद होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खर्चावर होईल.

    विशेषतः प्रवासासाठी हे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना पूर्वीइतके फायदे मिळणार नाहीत, त्यामुळे त्यांनी आपल्या खर्चाची पुनर्रचना करावी लागेल. तसेच, इतर बँकाही भविष्यात आपल्या क्रेडिट कार्ड योजनांमध्ये अशा प्रकारचे बदल करू शकतात, त्यामुळे ग्राहकांनी नवीन योजना निवडताना अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.

    डिजिटल बँकिंग आणखी सुरक्षित आणि सोयीस्कर

    बँका डिजिटल बँकिंग अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. यात एआय (Artificial Intelligence) आधारित चॅटबॉट्स, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन यांसारख्या आधुनिक सुविधा समाविष्ट केल्या जाणार आहेत. या बदलांमुळे ग्राहकांचा अनुभव अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होईल.

    ग्राहकांना २४/७ मदतीसाठी एआय चॅटबॉट्स उपलब्ध असतील, त्यामुळे तक्रारी आणि शंका तत्काळ सोडवता येतील. तसेच, डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित होतील, ज्यामुळे हॅकिंग आणि फसवणुकीचा धोका कमी होईल. या सुधारणांमुळे ऑनलाइन बँकिंग अधिक जलद आणि सोपे होणार आहे.

    नवीन आर्थिक वर्षात लागू होणारे बँकिंग नियम ग्राहकांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर मोठा परिणाम करू शकतात. जर तुम्ही नियमितपणे एटीएम वापरत असाल, क्रेडिट कार्डचे फायदे घेत असाल किंवा मोठ्या रकमेचे चेक व्यवहार करत असाल, तर या बदलांची माहिती ठेवणे गरजेचे आहे. यामुळे अनावश्यक शुल्क किंवा इतर अडचणी टाळता येतील.

    योग्य आर्थिक नियोजनासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा जवळच्या शाखेत जाऊन नवीन नियमांची माहिती घ्या. 

    आणखी वाचा

  • Vandana Luthra: २०,००० रुपयांतून सुरू केलेल्या व्यवसायाचं २५०० कोटी रुपयांचं साम्राज्य

    Vandana Luthra: २०,००० रुपयांतून सुरू केलेल्या व्यवसायाचं २५०० कोटी रुपयांचं साम्राज्य

    स्वप्नांना सत्यात उतरवण्याची मेहनत, चिकाटी आणि जिद्द आवश्यक असते ,असं आपण नेहमीच ऐकत आलो आहोत,आणि वंदना लुथरा यांचा यशस्वी प्रवास हे याच गोष्टींचं उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या प्रवासाने हे सिद्ध करून दाखवलं आहे की, एक स्त्री जी कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही, तिच्या परिश्रमाने VLCC सारख्या मोठ्या कंपनीचं साम्राज्य उभं करू शकते. त्यांच्या संघर्षाची, जिद्दीची आणि चिकाटीची कहाणी आज लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

    आजच्या लेखात आपण वंदना लुथरा यांच्या संघर्ष, जिद्द आणि चिकाटीच्या माध्यमातून उभं केलेल्या यशस्वी व्यवसायाचा प्रवास जाणून घेणार आहोत.

    प्रारंभिक जीवन आणि प्रेरणा

    वंदना लुथरा (Vandana Luthra) यांचा जन्म १२ जुलै १९५९ रोजी दिल्लीमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या आई, डॉ. अरुणा सप्रू, या एक समाजसेविका होत्या आणि गरीब, वंचित लोकांसाठी काम करत होत्या. त्यांनी ‘अमर ज्योती‘ नावाची एक आयुर्वेदिक संस्था स्थापन केली, जी गरजूंसाठी मदतकार्य करत होती . या समाजसेवेचा वंदनांच्या मनावर खोल परिणाम झाला आणि लहानपणापासूनच लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा त्यांना आपल्या आईकडून मिळाली.

    वंदना लुथरा यांना शाळेत असतानाच सौंदर्य, आरोग्य आणि फिटनेस या क्षेत्रांची विशेष आवड होती. या क्षेत्रात काहीतरी मोठं करण्याची त्यांची मनोमन इच्छा होती. मात्र, त्या काळात महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करणं आव्हानात्मक होतं . तरीही, वंदनाने कधीही हार न मानता आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचा निर्धार केला.

    दिल्ली विद्यापीठातून समाजशास्त्रात पदवी घेतल्यानंतर वंदनाने भारतात पोषण आणि कॉस्मेटोलॉजीबाबत असलेल्या उदासीनतेची जाणीव केली. यासाठी त्या पुढील शिक्षणासाठी जर्मनीला गेल्या. तिथे त्यांनी पोषणशास्त्र आणि कॉस्मेटोलॉजीचं सखोल शिक्षण घेतलं. जर्मनीत शिक्षण घेत असताना त्यांनी आरोग्य आणि वेलनेस क्षेत्राचं महत्त्व ओळखलं आणि भारतात या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला.

    व्यवसायाची सुरूवात 

    वंदना लुथरा यांनी १९८९ साली भारतात परतल्यावर  केवळ २०,००० रुपयांच्या भांडवलावर दिल्लीत VLCC (वंदना लुथरा कर्ल्स अँड कर्व्स) ची स्थापना केली. सुरुवातीला वजन कमी करण्याच्या उपचारांवर लक्ष केंद्रित करताना, त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आधुनिक उपकरणांचा वापर करून लोकांच्या आरोग्याला प्राधान्य दिलं .सुरुवातीला दिल्लीच्या सफदरजंग एन्क्लेव्हच्या गजबजलेल्या बाजारात पहिले सेंटर सुरू करताना त्यांनी अनेक आव्हानांचा सामना केला, पण त्यांच्या दृष्टिकोनामुळे लोकांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी ठरल्या.

    VLCC ने वजन कमी करण्याच्या वैज्ञानिक पद्धतींबरोबर सौंदर्य सेवांची भर टाकून ग्राहकांची मने जिंकली. वेलनेस क्षेत्रात ग्लॅमरच्या पलीकडे जाऊन त्यांनी आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन दिलं . कठोर परिश्रम, नावीन्य, आणि उच्च गुणवत्तेमुळे VLCC आज एक मोठे नाव बनलं आहे, ज्याने देशभरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपलं स्थान निर्माण केलं आहे.

    सुरुवातीचे आव्हान आणि संघर्ष

    वंदनाला सुरुवातीला त्यांच्या व्यवसायासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ९० च्या दशकात महिलांसाठी व्यवसायात यश मिळवणं अत्यंत कठीण होतं. समाजाच्या पुरुषप्रधान मानसिकतेमुळे, त्यांची कल्पनाही लोकांना आवडत नव्हती, आणि त्यातच डॉक्टरांनी सुद्धा त्यांच्या पद्धतीला पाठिंबा देण्यास नकार दिला. मात्र वंदनाने हार मानली नाही, कारण त्यांचा विश्वास खूप दृढ होता.त्यांनी त्यांच्या  कामामध्ये सातत्य ठेवलं. त्यांचं ध्येय होतं एक असा व्यवसाय तयार करणं, जो वैद्यकीय दृष्टिकोनातून कार्यरत राहील, पण त्यासाठी वेळ लागणार होता.

    सुरुवातीला ग्राहक मिळवणं देखील त्यांच्यासाठी मोठं आव्हान होतं. पण त्या कधीही मागे ह्टल्या नाहीत . सतत मेहनत करत राहिल्या आणि आपल्या कल्पनांना प्रगल्भतेच्या दिशेने आकार देत राहिल्या . त्यांच्या या परिश्रमांमुळे त्यांनी एक नवा मार्ग तयार केला. याचा परिणाम त्यांच्या व्यवसायातील गुणवत्तेचा आणि कार्यपद्धतीचा विश्वास ग्राहकांमध्ये वाढला, ज्यामुळे त्यांना यश मिळण्यास सुरुवात झाली 

    यशाच्या शिखरावर 

    १९९० च्या दशकात VLCC चं नाव हळूहळू लोकप्रिय होऊ लागलं. २००० च्या दशकात, VLCC चा वार्षिक महसूल ५० कोटींवर पोहोचला. ग्राहक त्यांच्या उच्च दर्जाच्या सेवांसाठी अधिक पैसे देण्यास तयार होऊ लागले. २००५ मध्ये “जस्सी जैसी कोई नहीं” या मालिकेतील नायिका  जस्सीचं मेकओव्हर केल्यानंतर VLCC चं नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचलं आणि ब्रँड अधिक चर्चेत आला.

    २००५ पासून VLCC ने आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार सुरू केला. आज VLCC १२ देशांमध्ये कार्यरत आहे . २००९ मध्ये Shine या प्रसिद्ध  कंपनीने VLCC मध्ये १४.४ कोटींची गुंतवणूक केली, ज्यामुळे कंपनीचा महसूल १२५ कोटींवर पोहोचला. त्यानंतर VLCC ने २०१० मध्ये भारतात आणि भारताबाहेर  १०० सेंटर्स सुरू केले आणि महिलांना ब्युटी उद्योजक होण्यासाठी प्रशिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला.

    सप्टेंबर २०१३ मध्ये VLCC ने सिंगापूरमधील Gvig कंपनीचा ताबा घेतला आणि सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादन क्षेत्रात पाऊल ठेवलं . त्यानंतर त्यांच्या  हरिद्वार आणि सिंगापूर येथील GMP सर्टिफाइड प्लांट्समधून स्किन, केस आणि बॉडी केअर उत्पादने तयार होऊ लागली. 2023 पर्यंत, VLCC ने २१० सेंटर्स, १०० प्रशिक्षण संस्था आणि ११ देशांमध्ये विस्तार केला आहे . 

    पुरस्कार आणि सन्मान

     २०१० मध्ये वंदना यांना ‘एंटरप्राइझ एशिया वुमन आंत्रप्रेन्योर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं,, तसेच २०१३ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाला. २०१६ मध्ये फोर्ब्स आशियाच्या “५० पॉवर बिझनेसवुमन” यादीत त्यांचं स्थान मिळवणं हे त्यांच्या यशाचं प्रतीक आहे.

    वंदना लुथरा यांनी महिलांच्या सशक्तीकरणावर विशेष लक्ष दिलं. आज VLCC मध्ये ७०% कर्मचारी महिला आहेत. त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन आणि आत्मनिर्भर बनवून, त्यांनी महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. या उपक्रमामुळे फक्त महिलांची आर्थिक स्थितीच  सुधारली नाही, तर कंपनीला देखील अधिक यश प्राप्त झालं.

    मित्रांनो ,वंदना लुथरा यांचा संघर्ष आणि यशाचा हा प्रवास आपल्यला शिकवतो  की, मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास असला की कोणतंही स्वप्न शक्य पूर्ण करता येतं . आणि सोबतच त्यांचा हा  प्रवास आपल्याला दाखवतो की, सुरुवात कितीही छोटी असली तरी प्रामाणिक प्रयत्नांनी मोठं यश नक्कीच मिळवता येतं.

    आणखीन वाचा:

  • नवीन स्टार्टअप सुरू करताना ह्या ७ चुका टाळा, नाहीतर…

    नवीन स्टार्टअप सुरू करताना ह्या ७ चुका टाळा, नाहीतर…

    आज अनेक तरुण-तरुणी नवीन कल्पनांवर आधारित स्टार्टअप सुरू करत आहेत. स्वतः काहीतरी वेगळं करण्याची जिद्द, नवे प्रयोग आणि मोठ्या संधी शोधण्याची धडपड यामुळे उद्योजकतेकडे ओढा वाढला आहे. मात्र, केवळ चांगली कल्पना असून चालत नाही, ती योग्य प्रकारे अंमलात आणणंही तितकंच महत्त्वाचं आहे. अनेकदा नवीन उद्योजक काही मूलभूत चुका करतात, ज्या व्यवसायाच्या वाढीला अडथळा ठरू शकतात. योग्य नियोजन आणि योग्य धोरणांशिवाय फक्त उत्साहाच्या जोरावर व्यवसाय यशस्वी होणं कठीण असतं.

    व्यवसाय सुरू करताना आर्थिक व्यवस्थापन, बाजारपेठेचा अभ्यास, ग्राहकांच्या गरजा आणि योग्य मार्गदर्शन यावर भर देणं आवश्यक आहे. सुरुवातीला काही महत्त्वाच्या चुका टाळल्या नाहीत, तर  सुरुवातीचा उत्साह लवकरच निराशेत बदलू शकतो. म्हणूनच, या लेखात आपण अशा ७ चुका पाहणार आहोत, ज्या कळत-नकळत व्यवसायिकांकडून होऊ शकतात. मात्र, नव्याने स्टार्टअप सुरू करताना त्या टाळणं अत्यंत गरजेचं आहे.

    १. कल्पनेची पडताळणी न करणे

    फक्त कल्पना चांगली आहे म्हणून उत्पादन तयार केलं, पण लोकांना त्याची गरजच नसेल, तर तो व्यवसाय अपयशी ठरू शकतो. म्हणूनच कोणतीही कल्पना प्रत्यक्षात आणण्याआधी बाजारपेठेचा नीट अभ्यास करणं गरजेचं आहे. तुमच्या उत्पादनाची किंवा सेवेची लोकांना खरंच गरज आहे का, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

    यासाठी ग्राहकांशी थेट संवाद साधा, त्यांचे मत जाणून घ्या आणि आवश्यकतेनुसार बदल करा. ग्राहक सर्वेक्षण करा, त्यांच्यासोबत चर्चा करा आणि सर्वात कमी खर्चात ‘MVP’ म्हणजेच किमान व्यवहार्य उत्पादन तयार करून त्याची चाचणी करा. यामुळे बाजारातील मागणी आणि उत्पादनाच्या यशाची शक्यता तपासता येईल.

    २. आर्थिक व्यवस्थापनात निष्काळजीपणा

    स्टार्टअप सुरू झाल्यावर पैशांची ये-जा इतकी वेगाने होते की कधी खर्च जास्त झाला आणि भांडवल कमी पडलं, हे लक्षातही येत नाही. त्यामुळे आर्थिक व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचं आहे. खर्चावर काटेकोर नियंत्रण ठेवा आणि प्रत्येक महिन्याला तुम्ही किती खर्च करत आहात, हे तपासा. व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या भांडवलाचा अंदाज घ्या आणि त्याचा योग्य वापर करा.

    यालाच ‘बर्न रेट‘ म्हणतात, म्हणजे तुमचं स्टार्टअप किती वेगाने पैसे खर्च करत आहे. भविष्यात जर जास्त भांडवलाची गरज भासली, तर ते कुठून मिळवायचं, याची आधीच योजना तयार ठेवा. अनावश्यक खर्च टाळा आणि नफ्याच्या दिशेने योग्य आर्थिक नियोजन करा, म्हणजे तुमच्या स्टार्टअपचा प्रवास अधिक स्थिर आणि यशस्वी होईल.

    ३. ग्राहकांचा अभिप्राय दुर्लक्षित करणे

    ग्राहक हे तुमच्या व्यवसायाचा आरसा असतात. त्यांचा अभिप्राय लक्षात घेतला नाही, तर तुमचं उत्पादन किंवा सेवा हळूहळू अप्रासंगिक ठरू शकते. ग्राहकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला उत्पादनातील सुधारणा आणि बाजारातील मागणी समजून घेण्यास मदत करतात. त्यामुळे ग्राहक काय म्हणत आहेत, ते लक्षपूर्वक ऐका आणि त्यांच्या गरजांनुसार बदल करण्याची मानसिकता ठेवा.

    सतत सुधारणा करत राहिल्यास, तुमचं उत्पादन अधिक उपयुक्त आणि ग्राहकांसाठी आकर्षक होत जातं. ग्राहकांच्या फीडबॅकवर त्वरित कृती करा, त्यांच्यासोबत संवाद साधा आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या ब्रँडवर विश्वास निर्माण होईल आणि व्यवसाय अधिक वेगाने वाढेल.

    ४.हायरिंग करताना अति घाई किंवा अति विलंब

    योग्य टीमशिवाय कोणताही व्यवसाय यशस्वी होऊ शकत नाही. काही वेळा स्टार्टअपमध्ये गरज नसताना लवकर भरती केली जाते, ज्यामुळे अनावश्यक खर्च वाढतो. तर काही वेळा आवश्यक वेळेत भरती न केल्यामुळे कामाचा ताण वाढतो आणि व्यवसायाची वाढ मंदावते. त्यामुळे हायरिंग करताना गरज आणि वेळ यांचा समतोल राखणं महत्त्वाचं आहे.

    योग्य कर्मचारी निवडताना केवळ कौशल्य पाहू नका, तर त्यांच्या विचारसरणी, काम करण्याची पद्धत आणि कंपनीच्या मूल्यांशी त्यांची जुळवणूक होते का, हेही तपासा. चांगली टीम म्हणजे फक्त अनुभवी लोकांचा गट नव्हे, तर तुमच्या उद्दिष्टांसोबत जुळणारी लोकं असणंही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे भरती करण्याआधी स्पष्ट योजना तयार करा आणि योग्य वेळी, योग्य लोकांना संधी द्या.

    ५. स्पष्ट व्यवसाय मॉडेल नसणे

    पैसे कुठून येणार? हा प्रश्न तुम्ही सुरुवातीलाच स्वतःला विचारला पाहिजे. अनेक स्टार्टअप केवळ चांगल्या कल्पनेच्या जोरावर पुढे जातात, पण त्यांना उत्पन्नाचा स्पष्ट स्रोत नसतो. त्यामुळे काही काळानंतर पैशांची अडचण येते आणि व्यवसाय टिकून राहणं कठीण होतं.

    यावर उपाय म्हणजे सुरुवातीलाच तुमचं बिझनेस मॉडेल स्पष्ट करणं. तुम्ही कुठल्या सेवांसाठी पैसे घेणार? ग्राहकांना कोणत्या सुविधांसाठी शुल्क द्यावं लागेल? आणि उत्पन्न वाढवण्यासाठी कोणते पर्याय आहेत? हे सर्व ठरवा. वेळोवेळी व्यवसाय मॉडेल सुधारत राहा आणि वेगवेगळ्या मार्गांनी पैसे कमावण्याच्या शक्यता तपासा.

    ६. खराब मार्केटिंग रणनीती

    फक्त चांगलं उत्पादन तयार केलं की ग्राहक आपोआप येतील, असा समज अनेक नव्या उद्योजकांचा असतो. पण वास्तवात, लोकांना तुमच्या ब्रँडबद्दल माहितीच नसेल, तर ते ते विकत घेणार कसं ? त्यामुळे उत्तम उत्पादनासोबत प्रभावी मार्केटिंगही गरजेचं आहे.

    मार्केटिंगसाठी योग्य रणनीती ठरवा. सोशल मीडिया, डिजिटल जाहिराती, प्रभावशाली लोकांचे (influencers) सहकार्य, आणि ग्राहकांशी थेट संवाद यासारख्या पद्धती वापरा. कोणत्या मार्गाने तुमचं उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवायचं, यासाठी ठोस योजना तयार ठेवा आणि सतत नवीन प्रयोग करत राहा.

    ७. बाजारातील बदलांना न जुळवून घेणे

    आजचा बाजार सतत बदलत आहे. तंत्रज्ञान, ट्रेंड्स आणि ग्राहकांच्या गरजा झपाट्यानं बदलतात. अशा वेळी, जुन्या कल्पनांवर अडून न राहता परिस्थितीनुसार लवचिक राहणं महत्त्वाचं आहे. काही वेळा तुमच्या उत्पादनाची दिशा बदलावी लागू शकते, तर कधी नवीन संधी स्वीकाराव्या लागू शकतात.

    बदल ही वाढीची संधी असते. त्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद आणि बाजारातील बदल लक्षात घेऊन आवश्यक त्या सुधारणा करा. वेळेप्रमाणे स्वतःला अपडेट ठेवा आणि नव्या गोष्टी शिकण्यास तयार राहा. यामुळे तुमचं स्टार्टअप टिकून राहण्याची आणि यशस्वी होण्याची शक्यता वाढेल.

    मित्रांनो,स्टार्टअप म्हणजे एक रोमांचक प्रवास असतो, पण तो यशस्वी करायचा असेल तर काही महत्त्वाच्या चुका टाळणं गरजेचं आहे. सुरुवातीपासून योग्य नियोजन करा, स्पष्ट व्यवसाय मॉडेल ठरवा आणि मार्केटिंगकडे दुर्लक्ष करू नका. ग्राहकांचा अभिप्राय ऐकून सुधारणा करण्याची तयारी ठेवा.

    सतत शिकण्याची वृत्ती ठेवल्यास आणि बदल स्वीकारल्यास तुमचं स्टार्टअप यशाच्या दिशेने पुढे जाईल. योग्य टीम, आर्थिक शिस्त आणि बाजारातील ट्रेंड लक्षात घेऊन जर तुम्ही पुढे गेलात, तर तुमचा व्यवसाय निश्चितच उंच भरारी घेईल!

    आणखी वाचा :

  • Repo Rate : रेपो दर म्हणजे काय रे भाऊ? तुमच्या प्रश्नांची उत्तरं इथे आहेत.

    Repo Rate : रेपो दर म्हणजे काय रे भाऊ? तुमच्या प्रश्नांची उत्तरं इथे आहेत.

    आपण नेहमी बातम्यांमध्ये ऐकतो की, ‘RBI ने रेपो दर वाढवला’ किंवा ‘रेपो दर कमी केला.’ पण नक्की हा रेपो दर म्हणजे काय? आणि तो आपल्या आर्थिक जीवनावर कसा परिणाम करतो? सोप्या भाषेत सांगायचं तर, रेपो दर हा तो व्याजदर आहे, ज्यावर भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) देशातील बँकांना अल्पकालीन कर्ज देते. जर हा दर वाढला, तर बँकांना जास्त व्याज भरावं लागतं आणि त्याचा परिणाम थेट कर्जाच्या व्याजदरांवर होतो. याउलट, रेपो दर कमी झाला, तर बँकांना स्वस्तात पैसे मिळतात, त्यामुळे कर्जाचे हप्ते कमी होण्याची शक्यता असते.

    (Repo Rate) रेपो दर म्हणजे काय रे भाऊ? तुमच्या प्रश्नांची उत्तरं इथे आहेत. रेपो दर हा आपल्या घराच्या EMI पासून ते संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या हालचालींवर प्रभाव टाकणारा एक महत्त्वाचा घटक आहे. आजच्या लेखात आपण याबद्दल सविस्तर समजून घेऊया.

    रेपो दर म्हणजे काय?

    (Repo Rate) रेपो दर म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) इतर बँकांना अल्पकालीन कर्ज देण्यासाठी ठरवलेला व्याजदर. जेव्हा बँकांना तात्पुरत्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी पैसे लागतात, तेव्हा त्या RBI कडून ठराविक व्याजाने कर्ज घेतात. हे कर्ज घेण्यासाठी बँका काही सरकारी रोखे (Government Securities) गहाण ठेवतात. या कर्जावर लावण्यात येणाऱ्या व्याजदरालाच रेपो दर म्हणतात.

    रेपो दर वाढला किंवा कमी झाला, तर काय परिणाम होतो?

    जेव्हा RBI रेपो दर वाढवते, तेव्हा बँकांसाठी कर्ज घेणं महाग होतं, त्यामुळे बँका ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या कर्जांचे व्याजदर वाढवतात. याचा थेट परिणाम गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या हप्त्यांवर होतो. म्हणजेच, मासिक हप्ते (EMI) वाढतात, ज्यामुळे नवीन घर, गाडी किंवा इतर मोठ्या खरेदीचा खर्च वाढतो. तसेच, उद्योगांना कर्ज घेणं अवघड होतं, परिणामी नोकऱ्या आणि आर्थिक वाढीचा वेग काहीसा मंदावतो.

    याउलट, RBI ने जर रेपो दर कमी केले, तर बँकांना स्वस्तात पैसे मिळतात, त्यामुळे त्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देतात. याचा फायदा असा होतो की गृहकर्ज, वाहन कर्ज आणि अन्य कर्जांचे EMI कमी होतात आणि लोक कर्ज घेण्यास प्रवृत्त होतात. परिणामी, घरखरेदी, वाहन खरेदी आणि उद्योग-व्यवसायांना चालना मिळते. यामुळे अर्थव्यवस्थेत पैसा खेळता राहतो आणि बाजारपेठेत तेजी निर्माण होते.

    रेपो दर ठरवण्यामागचं कारण काय असतं?

    रेपो दर ठरवण्यामागचं मुख्य कारण म्हणजे महागाईवर नियंत्रण ठेवणं आणि अर्थव्यवस्थेत स्थिरता राखणं. जर देशात महागाई वाढू लागली, तर RBI रेपो दर वाढवते. परिणामी, लोक आणि उद्योग खर्च कमी करतात, बाजारात पैशांचा प्रवाह मर्यादित राहतो आणि वस्तूंच्या किमती वाढण्याचा वेग कमी होतो.

    याउलट, जर अर्थव्यवस्थेत थोडी मंदी आली, तर RBI रेपो दर कमी करते, म्हणजेच बँकांना स्वस्तात कर्ज मिळतं आणि त्या कमी व्याजाने ग्राहकांना कर्ज देतात. त्यामुळे लोक आणि उद्योग जास्त खर्च करतात, मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होऊन नोकऱ्या वाढतात आणि बाजाराला गती मिळते. यामुळे अर्थव्यवस्था स्थिर राहते आणि विकासाला चालना मिळते.

    रेपो दराचे परिणाम कोणावर होतात?

    रेपो दराचा परिणाम वेगवेगळ्या स्तरांवर होतो. सामान्य ग्राहकांसाठी, होम लोन, कार लोन आणि वैयक्तिक कर्जांचे EMI थेट रेपो दरावर अवलंबून असतात, त्यामुळे दर वाढला की हप्ते महाग होतात आणि दर कमी झाला की स्वस्त. बँकांसाठी, रेपो दर वाढला तर त्यांना महाग कर्ज घ्यावं लागतं, ज्यामुळे त्यांच्या नफ्यावर परिणाम होतो आणि त्या ग्राहकांना अधिक व्याजदराने कर्ज देतात. उद्योगांसाठी, मोठ्या कंपन्या बँकांकडून कर्ज घेत असतील, तर त्यांचेही खर्च वाढतात किंवा कमी होतात. महागाईसाठी, रेपो दर हे RBI चे एक महत्त्वाचे साधन असते. दर वाढवला की बाजारातील पैशांचा प्रवाह कमी होतो आणि महागाई आटोक्यात येते, तर दर कमी केला की बाजाराला गती मिळते.

    रेपो दर कोण ठरवतं?

    रेपो दर भारतीय रिझर्व्ह बँकेची ‘मॉनेटरी पॉलिसी कमिटी’ (MPC) ठरवते. ही कमिटी दर दोन महिन्यांनी बैठक घेते आणि देशातील आर्थिक परिस्थितीनुसार रेपो दर वाढवायचा, कमी करायचा किंवा स्थिर ठेवायचा हे ठरवते. हा दर ठरवल्यानंतर बँका आपले कर्जाचे व्याजदर त्यानुसार बदलतात, त्यामुळे हा निर्णय थेट सामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम करणारा असतो. म्हणूनच, नवीन कर्ज घ्यायचं असेल किंवा आधीच घेतलेल्या कर्जाचा EMI समजून घ्यायचा असेल, तर रेपो दरातील बदल लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

    जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आताच WhatsApp वर शेअर करा. 😊

    आणखी वाचा:

  • जाहिरातीसाठी टक्कल! या माणसाच्या आयडियाने सोशल मीडियावर उडवली खळबळ

    जाहिरातीसाठी टक्कल! या माणसाच्या आयडियाने सोशल मीडियावर उडवली खळबळ

    आपल्या समाजात माणसाला पहिल्यांदा त्याच्या रूपावरूनच ओळखलं जातं. कोणी उंच आहे की ठेंगणा, बारीक आहे की जाड, सुंदर आहे की नाही, यावरूनच लोक त्याच्या विषयी मत बनवतात. अगदी डोक्यावर केस आहेत की नाही, यावरूनही माणसाला जज केलं जातं. त्यामुळे अनेक लोक आपल्या लुक्सविषयी अत्यंत संवेदनशील असतात. विशेषतः पुरुषांमध्ये लवकर वयात गळणारे केस ही मोठी चिंतेची बाब असते. गंजेपणा किंवा टक्कल आल्यावर अनेकांना लाज वाटते, आत्मविश्वास कमी होतो आणि काही जण तर डिप्रेशनमध्येही जातात. मात्र, केरळच्या एका तरुणाने या गोष्टीला संधीमध्ये रूपांतरित करून असं काही साध्य केलं आहे की, तो आज संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला आहे. 

    केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यातील करूर गावात राहणारा शफीक हाशिम हा एक ट्रॅव्हल व्लॉगर आहे. वय फक्त ३६ वर्षं. शफीकच्या केसांची गळती कॉलेजमध्ये असतानाच सुरू झाली होती. त्यामुळे त्याला अनेकदा लोकांच्या टिंगलटवाळ्या सहन कराव्या लागल्या. मित्रमंडळी त्याच्या टक्कलवरून मस्करी करत, त्यामुळे तो काहीसा अस्वस्थ होत असायचा. या परिस्थितीत त्याने हेअर ट्रान्सप्लांट करण्याचा विचार केला होता. पण अचानक त्याचा विचार बदलला आणि त्याने ठरवलं कि “मी हे स्वीकारणार आणि त्याचा फायदा करून घेणार!”

    शफीकने एक भन्नाट कल्पना लढवली. त्याने ठरवलं की, डोक्यावर केस नसले तरी हरकत नाही, पण हे टक्कलच जर जाहिरातीसाठी वापरता आलं तर? होय, अगदी खरं! त्याने आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर एक व्हिडिओ शेअर केला आणि कंपन्यांना आवाहन केलं, की माझ्या टक्कल पडलेल्या डोक्यावर जाहिरात करा!  त्याची ही अनोखी कल्पना सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली.

    शफीकची ही कल्पना कोची शहरातील ‘ला डेंसिटे’ नावाच्या हेअर ट्रान्सप्लांट कंपनीच्या लक्षात आली. त्यांनी शफीकसोबत तात्काळ संपर्क साधला आणि तीन महिन्यांचा करार केला. या करारानुसार, शफीक आपल्या डोक्यावर त्यांच्या कंपनीचा तात्पुरता टॅटू करून ठेवणार आणि आपल्या यूट्यूब व्हिडिओजमध्ये तो दाखवणार. या अनोख्या जाहिरात संकल्पनेतून शफीकला तब्बल ५०,००० रुपये मिळणार. 

    मात्र, शफीकचा हा प्रयोग केवळ कमाईसाठी नाही, तर समाजाच्या मानसिकतेत बदल घडवण्याचा एक प्रयत्न आहे. टक्कल असणे म्हणजे कमीपणा नाही, तर त्याला सकारात्मक दृष्टिकोनातून स्वीकारता येतं, हेच तो दाखवून देतो. लोक ज्या गोष्टीला न्यूनगंड मानतात, त्याचा उपयोग संधी म्हणूनही करता येऊ शकतो, हे शफीकच्या प्रयोगातून स्पष्ट होतं.

    शफीकचे यूट्यूबवर २८,००० हून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. तो ट्रॅव्हल व्लॉग्स तयार करतो आणि त्याच्या या युनिक कल्पनेमुळे तो लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. केस गेल्यामुळे आत्मविश्वास गमवण्याऐवजी, त्याचा सकारात्मक उपयोग करून त्याला आपल्या ताकदीत बदलता येतं, हे शफीकने सिद्ध करून दाखवलं आहे.

    आपल्यात एखादी गोष्ट कमी आहे असं वाटलं, तरी स्वतःला कमी न समजता त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहा. आत्मविश्वास, कल्पकता आणि सकारात्मक विचारसरणी असेल, तर कोणतीही अडचण संधीमध्ये बदलता येते. शफीक हाशिमसारखा विचार करा. मग टक्कल असो की अडथळे, प्रत्येक गोष्ट आपल्या फायद्याची ठरू शकते!

    आणखी वाचा:

  • Top indian startup success lessons : नवउद्योजकांनो, यशस्वी व्हा! या ५ गोष्टी शिकून घ्या भारतातील टॉप स्टार्टअप्सकडून

    Top indian startup success lessons : नवउद्योजकांनो, यशस्वी व्हा! या ५ गोष्टी शिकून घ्या भारतातील टॉप स्टार्टअप्सकडून

    आज अनेक जण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतात. तंत्रज्ञानामुळे व्यवसाय सुरू करणं सोपं झालं असलं तरी त्याला यशस्वीपणे पुढे नेणं मोठं आव्हान असतं. दरवर्षी हजारो स्टार्टअप्स सुरू होतात, पण त्यापैकी फारच कमी दीर्घकाळ टिकतात. मात्र, काही स्टार्टअप्स वेगाने वाढतात आणि उद्योगक्षेत्राला नवी दिशा देतात. अशा यशस्वी व्यवसायांकडून अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकता येतात, ज्या नवउद्योजकांसाठी उपयोगी ठरू शकतात.

    जर व्यवसाय वाढवायचा असेल, तर या गोष्टींचा विचार करणं महत्त्वाचं आहे. या लेखात आपण अशाच यशस्वी स्टार्टअप्सकडून शिकता येणाऱ्या पाच महत्वाच्या गोष्टी आणि त्यांची उदाहरणं समजून घेऊया आणि ते व्यवसायासाठी कसे उपयोगी ठरू शकतात, हे पाहूया.

    १) खऱ्या समस्येवर उपाय शोधा – ग्राहकांच्या गरजा ओळखा

    कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे ग्राहकांच्या समस्येचा अभ्यास करणं. प्रत्येक व्यवसाय हा एखाद्या अडचणीवर उपाय शोधण्यासाठी असतो. जर तुम्ही लोकांच्या मोठ्या समस्येवर सोपा, सहज आणि प्रभावी उपाय दिला, तर तुमच्या व्यवसायाला हमखास यश मिळेल.

    उदाहरणार्थ, Meesho या कंपनीने भारतातील लहान व्यावसायिक आणि गृहउद्योग चालवणाऱ्या महिलांसाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली. ऑनलाईन विक्रीसाठी त्यांच्याकडे महागडी वेबसाईट किंवा डिजिटल मार्केटिंगचं ज्ञान नव्हतं. Meesho ने एक सोपा प्लॅटफॉर्म तयार केला, जिथे कोणीही सहजपणे ऑनलाइन विक्रेता बनू शकतो. यामुळे लाखो लघु उद्योजकांना डिजिटल मार्केटमध्ये प्रवेश मिळाला आणि त्यांचा व्यवसाय वाढला.

    जर तुम्ही ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यावर प्रभावी उपाय शोधलात, तर तुमच्या व्यवसायाला निश्चितच चांगला प्रतिसाद मिळेल. बाजाराचा अभ्यास करा, लोकांना कोणत्या अडचणी येतात हे समजून घ्या आणि त्यावर सोपा, किफायतशीर आणि उपयुक्त उपाय द्या.

    २) छोटी सुरुवात करा, मग हळूहळू विस्तार करा

    अनेक नवउद्योजक सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणावर व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करतात, पण यामुळे खर्च वाढतो आणि अपयशाची शक्यता अधिक राहते. त्याऐवजी, लहान सुरुवात करून, अनुभव घेत घेत व्यवसाय वाढवणं अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरतं.

    उदाहरणार्थ, Zerodha या भारतातील आघाडीच्या ब्रोकरेज कंपनीने सुरुवातीला काही मोजक्या ग्राहकांसोबत व्यवसाय सुरू केला. त्यांनी पारंपरिक ब्रोकरेज कंपन्यांच्या तुलनेत कमी शुल्कात सोपं आणि किफायतशीर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म दिलं. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यावर त्यांनी हळूहळू आपला व्यवसाय वाढवला. आज Zerodha ही भारतातील सर्वात मोठी ब्रोकरेज कंपनी बनली आहे.

    ३) मजबूत आणि सक्षम टीम तयार करा

    कोणताही मोठा व्यवसाय एकट्याने उभा करता येत नाही. व्यवसायाची वाढ आणि यश हे चांगल्या टीमवर आणि त्यांच्या कौशल्यांवर अवलंबून असतं. विश्वासू, मेहनती आणि कौशल्यपूर्ण लोक सोबत असतील, तर आव्हानं पार करणं आणि संधीच सोन्यात रूपांतर करणं सोपं जातं. 

    उदाहरणार्थ, CRED हा स्टार्टअप त्यांच्या मजबूत टीममुळे यशस्वी झाला. CRED हे क्रेडिट कार्ड धारकांसाठी एक इनोव्हेटिव्ह प्लॅटफॉर्म आहे, त्यांनी कमी वेळात मोठी लोकप्रियता मिळवली. संस्थापकांनी सुरुवातीपासूनच अनुभवी आणि हुशार लोकांची निवड केली, ज्यांनी उत्कृष्ट ॲप डिझाइन, प्रभावी मार्केटिंग आणि ग्राहकांसाठी उपयुक्त योजना तयार केल्या.

    सुरुवातीला थोड्या, पण हुशार लोकांवर विश्वास ठेवा आणि त्यांच्यासोबत काम करा. तुमच्या उद्दिष्टांशी जुळणारी, नवे प्रयोग करण्यास तयार असलेली आणि आव्हानांना सामोरे जाणारी टीम निवडा. एक चांगली टीमच तुमच्या व्यवसायाला यशाच्या शिखरावर नेऊ शकते.

    ४) ग्राहकांचा अनुभव सर्वोत्तम ठेवा

    ग्राहक समाधानी असतील, तरच व्यवसाय टिकून राहतो. समाधानी ग्राहक पुन्हा तुमच्याकडे येतात आणि इतरांनाही तुमच्या सेवेची शिफारस करतात. त्यामुळे त्यांचा अनुभव सुखद आणि सोयीस्कर ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे.

    उदाहरणार्थ, Zomato ने ग्राहकांचा अनुभव सर्वोत्तम ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांनी सहज वापरता येणारं आणि वेगवान ॲप, जलद ऑर्डर प्रक्रिया आणि तात्काळ ग्राहकसेवा दिली. यामुळे त्यांचा विश्वास वाढला आणि Zomato एक लोकप्रिय ब्रँड बनला.

    ग्राहकांच्या गरजा समजून त्यांना सर्वोत्तम सेवा द्या. त्यांचे प्रश्न पटकन सोडवा आणि त्यांचा अनुभव चांगला राहील याची काळजी घ्या. यामुळे ग्राहक तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि तुमचा व्यवसाय दीर्घकाळ टिकेल.

    ५) डेटा आणि ग्राहकांचा फीडबॅक वापरा

    बाजार सतत बदलत असतो, त्यामुळे व्यवसायात वेळेनुसार सुधारणा करणं गरजेचं आहे. ग्राहकांचा फीडबॅक आणि डेटा विचारात घेतल्यास तुमची सेवा अधिक चांगली होऊ शकते आणि व्यवसाय अधिक यशस्वी ठरतो.

    उदाहरणार्थ, Swiggy सुरुवातीला फक्त अन्न वितरण सेवा पुरवत होते. मात्र, ग्राहकांच्या मागण्या आणि त्यांच्या खरेदीच्या सवयींचा अभ्यास केल्यावर त्यांना समजले की लोक घरपोच किराणासामानही हवे आहे. त्यानंतर त्यांनी Swiggy Instamart सुरू केलं आणि आता किराणा व इतर वस्तूंच्या डिलिव्हरीमध्येही ते यशस्वी झाले आहेत.

    ग्राहकांचा फीडबॅक आणि बाजारातील डेटा सतत तपासा. गरजेनुसार सेवा सुधारत राहिल्यास तुम्ही स्पर्धेत टिकू शकाल आणि तुमचा व्यवसाय वाढेल.

    मित्रांनो,यशस्वी स्टार्टअप्सकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. व्यवसाय सुरू करताना किंवा वाढवत असताना खरी समस्या ओळखणं, छोट्या प्रमाणावर सुरुवात करून हळूहळू विस्तार करणं, सक्षम टीम तयार करणं, ग्राहकांचा अनुभव उत्तम ठेवणं आणि डेटा व फीडबॅकच्या आधारे सुधारणा करणं या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात.

    जर तुम्हीही या गोष्टींचा योग्य प्रकारे अवलंब केला, तर तुमचाही व्यवसाय मोठ्या प्रमाणात यश मिळवू शकतो. योग्य नियोजन, मेहनत आणि विचारपूर्वक घेतलेले निर्णय हेच यशस्वी उद्योजकतेचं खरं रहस्य आहे!

    जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आताच Whatsapp वर शेअर करा. 😊

    आणखी वाचा

  • Qimat Rai Gupta: फक्त १०००० रुपयांपासून व्यवसाय सुरू केला, ९७००० कोटी रुपयांचा ब्रँड बनवला…

    Qimat Rai Gupta: फक्त १०००० रुपयांपासून व्यवसाय सुरू केला, ९७००० कोटी रुपयांचा ब्रँड बनवला… 

    यश मिळवण्यासाठी मोठं शिक्षण, मोठं भांडवल किंवा मोठ्या ओळखीचं नेटवर्क लागतं, असं अनेकजण मानतात. पण काही लोक आपल्या मेहनतीच्या जोरावर हे चुकीचं ठरवतात. त्यापैकीच एक नाव म्हणजे ‘हॅवेल्स’ या जगभर प्रसिद्ध असलेल्या इलेक्ट्रिकल ब्रँडचे शिल्पकार किमत राय गुप्ता. 

    केवळ १०,००० रुपयांपासून सुरू केलेला हा व्यवसाय मेहनत, दूरदृष्टी आणि योग्य निर्णयांच्या जोरावर एका मोठ्या ब्रँडमध्ये रूपांतरित झाला. उत्कृष्ट उत्पादने, ग्राहकांचे समाधान आणि सुयोग्य व्यवस्थापन यामुळे हॅवेल्सने विश्वासार्हता मिळवली आणि आज तो जगभर लोकप्रिय ब्रँड म्हणून ओळखला जातो. मात्र, हे यश सहज मिळालं नाही. त्यामागे संघर्ष, कठोर मेहनत आणि ध्येयासाठी दिलेली अनेक वर्षे आहेत. या लेखात आपण त्यांचा हा शून्यातून शिखरापर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत.

    बालपण आणि सुरुवातीचा प्रवास 

    किमत राय गुप्ता यांचा जन्म १९३७ साली तत्कालीन अविभाजित पंजाबमधील एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. लहानपणापासूनच भारतीय तत्त्वज्ञान, विशेषतः भगवद्गीतेच्या शिकवणींचा त्यांच्या विचारांवर खोल प्रभाव पडला. शिक्षण घेत असतानाच त्यांना जाणवलं की, परिस्थिती बदलायची असेल, तर स्वतःच स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागेल. घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काहीतरी मोठं करण्याची जिद्द त्यांच्या मनात होती. त्यांनी निर्धार केला की केवळ शिक्षणावर अवलंबून न राहता, स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर यश संपादन करायचं.

    १९५८ साली, वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी त्यांनी शिक्षण अर्धवट सोडून दिल्ली गाठली. त्यांच्याकडे १०,००० रुपये होते आणि मनात असंख्य स्वप्नं आणि पुढे जाण्याची अपार जिद्द होती. दिल्लीत पोहोचल्यावर त्यांनी भारतातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिकल मार्केट, भागीरथ पॅलेसमध्ये गुप्ताजी अँड कंपनी नावाने एक छोटंसं दुकान सुरू केलं. सुरुवातीला व्यवसाय छोटा होता, पण मेहनत, जिद्द आणि योग्य दृष्टिकोन यांच्या जोरावर त्यांनी हळूहळू बाजारात आपली ओळख निर्माण केली.

    व्यवसाय उभारणीची खडतर वाटचाल

    सुरुवातीला किमत राय गुप्तांनी छोटे-छोटे इलेक्ट्रिकल पार्ट्स विकण्यास सुरुवात केली. ते स्वतः दुकानात बसून ग्राहकांशी संवाद साधायचे, त्यांची गरज समजून घ्यायचे आणि अनेकदा त्यांच्यासाठी वस्तू दुरुस्तही करायचे. त्यांच्या मेहनतीमुळे ग्राहकांचा विश्वास वाढू लागला. त्यांनी केवळ व्यापार केला नाही, तर नातेसंबंध जपले आणि विश्वासार्हता निर्माण केली. सातत्यपूर्ण मेहनतीमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला, आणि त्यांचा व्यवसायही विस्तारू लागला.

    १९७१ हे वर्ष किमत राय गुप्ता यांच्या आयुष्याला एक महत्त्वपूर्ण वळण देणारं ठरलं. दिल्लीतील व्यापारी हवेली राम गांधी आर्थिक अडचणीत सापडले होते आणि त्यांना आपली ‘हॅवेल्स’ (Havells) कंपनी विकावी लागणार होती. ही संधी ओळखून किमत राय गुप्तांनी मोठ्या जिद्दीने ७ लाख रुपये उभे करून ‘हॅवेल्स’ विकत घेतली. मात्र, कंपनीची स्थिती अत्यंत खराब होती. उत्पादन, व्यवस्थापन आणि बाजारातील ओळख या सर्वच बाबतीत मोठ्या अडचणी होत्या. पण किमत राय गुप्ता हार मानणारे नव्हते. त्यांनी अपार मेहनत, योग्य नियोजन आणि चिकाटीच्या जोरावर ‘हॅवेल्स’ला पुन्हा उभं करण्याचा निर्धार केला.

    हॅवेल्सचं नव्या दमाचं नवं रूप! 

    किमत राय गुप्तांनी ‘हॅवेल्स’ विकत घेतल्यानंतर तिच्या प्रत्येक गोष्टीत सुधारणा करण्यासाठी अपार मेहनत घेतली. त्यांनी केवळ स्विचेसपुरते उत्पादन मर्यादित न ठेवता विविध उत्पादनांची भर घातली. केबल्स, फॅन्स, लाईटिंग, गिझर, किचन अप्लायन्सेस यांसारख्या अनेक इलेक्ट्रिकल वस्तूंचा समावेश करून कंपनीला नव्या उंचीवर नेलं.

    ते केवळ व्यवसाय वाढवत नव्हते, तर एक विश्वासार्ह ब्रँड तयार करत होते, जिथे गुणवत्ता, ग्राहक सेवा आणि इनोव्हेशन यांचा उत्तम समतोल होता. त्यांनी भारतभर उत्पादन केंद्रं स्थापन केली आणि प्रत्येक ठिकाणी जागतिक दर्जाचं उत्पादन हेच उद्दिष्ट ठेवलं. त्यांच्या या दूरदृष्टीमुळे हॅवेल्सने इलेक्ट्रिकल क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. 

    हॅवेल्स भारतातील मार्केट लीडर बनली, पण हे फक्त उत्पादनामुळे झालं नाही. किमत राय गुप्तांनी ब्रँड बिल्डिंग आणि मार्केटिंगलाही तितकंच महत्त्व दिलं. प्रभावी जाहिराती, इनोव्हेटिव्ह कॅम्पेन्स आणि ग्राहकांशी थेट संवाद यामुळे हॅवेल्सची ओळख संपूर्ण देशभर पोहोचली. त्यांच्या योजनाबद्ध धोरणांमुळे हॅवेल्स केवळ एक उत्पादन करणारी कंपनी न राहता घराघरात विश्वासाने वापरण्यात येणारा ब्रँड बनली.

    आजचं हॅवेल्स (Havells)

    आज हॅवेल्स केवळ एक इलेक्ट्रिकल कंपनी नसून भारताच्या औद्यगिक विकासाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. ५०,००० हून अधिक डीलर नेटवर्क, १३ अत्याधुनिक उत्पादन केंद्रं आणि ७० पेक्षा जास्त देशांमध्ये आपली उपस्थिती ठेवत हॅवेल्सने जागतिक स्तरावरही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ग्राहकांचा विश्वास आणि सतत नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब या जोरावर हा ब्रँड प्रत्येक घरात पोहोचला आहे.

    किमत राय गुप्तांनी आपल्या व्यवसायात कुटुंबालाही सहभागी करून घेतलं. १९९२ साली त्यांचा मुलगा अनिल राय गुप्ता कंपनीत सामील झाला. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसायाचे बारकावे शिकत त्याने हॅवेल्ससाठी नव्या युगाची वाट तयार केली. २००७ साली, अनिल राय गुप्तांनी जर्मनीतील प्रसिद्ध ‘सिल्व्हेनिया’ लाइटिंग कंपनीचं अधिग्रहण केलं. हा हॅवेल्सच्या आंतरराष्ट्रीय विस्तारातील सर्वात मोठा टप्पा ठरला. २००८ च्या जागतिक आर्थिक मंदीच्या काळातही त्यांनी हॅवेल्सला स्थिर ठेवत व्यवसाय अधिक मजबूत केला.

    २०१४ साली, वयाच्या ७७व्या वर्षी किमत राय गुप्तांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मात्र, त्यांनी मागे केवळ एक यशस्वी व्यवसाय नाही , तर एक मजबूत मूल्यव्यवस्था आणि लाखो लोकांसाठी प्रेरणादायी वारसा ठेवला. त्यांच्या मृत्युसमयी त्यांची संपत्ती २ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होती. 

    मित्रांनो, हॅवेल्स ही केवळ एक ब्रँडची गोष्ट नाही, तर ती एका सामान्य माणसाच्या स्वप्नाची, त्याच्या परिश्रमांची आणि अपार चिकाटीची कहाणी आहे. किमत राय गुप्ता यांनी एका छोट्याशा दुकानातून सुरू केलेला प्रवास, आज कोट्यवधी ग्राहकांच्या विश्वासाचा आधार बनला आहे. 

    आणखीन वाचा:

  • Master Your Money: स्वतःची आर्थिक शिस्त कशी निर्माण करावी? जाणून घ्या उपयुक्त टिप्स

    Master Your Money: स्वतःची आर्थिक शिस्त कशी निर्माण करावी? जाणून घ्या उपयुक्त टिप्स

    आजच्या धावपळीच्या जगात आर्थिक स्थैर्य मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र, फक्त पैसे कमावणं पुरेसं नाही, त्यासाठी आर्थिक शिस्त असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आर्थिक शिस्त म्हणजे आपल्या उत्पन्नाचं योग्य नियोजन करून खर्च, बचत आणि गुंतवणुकीमध्ये समतोल राखणं. अनेकदा आपण केवळ कमाईवर भर देतो, पण जर योग्य बचत आणि गुंतवणुकीचं नियोजन नसेल, तर आर्थिक स्थैर्य मिळवणं कठीण होऊ शकतं. ही सवय एकदम तयार होत नाही, तर हळूहळू विकसित करावी लागते.

    योग्य नियोजन, खर्चावर नियंत्रण, शिस्तबद्ध बचत आणि सुज्ञ गुंतवणूक हे आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत. या लेखात आपण आर्थिक शिस्तीचं महत्त्व आणि आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी उपयुक्त टिप्स जाणून घेणार आहोत. 

    १. स्वतःच्या खर्चावर लक्ष ठेवा

    महिन्याभरात आपण किती आणि कुठे खर्च करतो, हे जाणून घेणं आर्थिक शिस्तीचा पहिला टप्पा आहे. यासाठी एक छोटी डायरी किंवा मोबाईल अ‍ॅपचा वापर करून दररोजचा खर्च नोंदवा. सुरुवातीला ही सवय लावणं थोडंसं कठीण वाटेल, पण सातत्य ठेवल्यास हळूहळू आपल्या खर्चाच्या सवयी स्पष्ट होऊ लागतील.

    नियमित खर्चाच्या नोंदीमुळे गरज नसलेल्या खर्चांची जाणीव होईल आणि त्यावर नियंत्रण ठेवता येईल.लहानश्या वाटणाऱ्या या बदलांचं केव्हा मोठ्या बचतीत रूपांतरित होईल हे कळणारही नाही. काही काळाने तुम्ही स्वतःच पाहाल की अनावश्यक खर्च टाळून किती मोठी बचत करता येते.  

    २ . बजेट बनवा आणि पाळा

    महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्ही किती आणि कुठे खर्च करायचा आहे, याचा अंदाज घ्या. घरखर्च, वीजबिल, मुलांचं शिक्षण, कर्जाचे हप्ते आणि वैद्यकीय गरजा यासाठी ठराविक रक्कम बाजूला ठेवा. यामुळे पैशांची योग्य वाटणी होईल आणि अनावश्यक खर्च टाळता येईल.

    बजेटमध्ये थोडी बचत आणि स्वतःसाठी थोडा खर्च यासाठीही जागा ठेवा, जेणेकरून बचतीसाठी कठोर नियम पाळतोय असं तुम्हाला वाटणार नाही. ठरवलेल्या बजेटनुसार खर्च केल्यास महिनाअखेर पैशांची कमतरता भासणार नाही आणि आर्थिक शिस्तही जपता येईल.

    ३. अनावश्यक खर्च टाळा

    अनेकदा आपण आकर्षक जाहिराती किंवा सवलतींना भुलून अशा वस्तू खरेदी करतो, ज्या आपल्याला खरंतर गरजेच्या नसतात. या सवयीमुळे अनावश्यक खर्च वाढतो आणि बचतीवर परिणाम होतो.

    यासाठी प्रत्येक खरेदीपूर्वी स्वतःला एक साधा प्रश्न विचारा कि “ही वस्तू खरोखर गरजेची आहे का, की फक्त हौसेसाठी घेतोय?” जर ती फक्त हौसेसाठी असेल आणि तिच्याशिवायही तुमचं सहज चालू शकत असेल, तर तो खर्च टाळणं कधीही चांगलं!

    ४. बचतीची सवय लावा

    ज्या प्रकारे आपण घरखर्चासाठी पैसे बाजूला ठेवतो, तसंच दर महिन्याला ठराविक रक्कम बचतीसाठीही ठेवायला हवी. खर्च केल्यावर उरलेल्या पैशांतून बचत करण्यापेक्षा, आधीच ठराविक रक्कम बाजूला काढून मग उरलेले पैसे खर्च करावेत. यासाठी “पहिल्यांदा बचत, मग खर्च” हे तत्त्व पाळा.

    बचतीसाठी बँकेतील Recurring Deposit (RD) किंवा SIP सारखे पर्याय निवडू शकता. हे पर्याय तुमच्या पैशांची वाढ होण्यास मदत करतील आणि नियमित बचतीची चांगली सवय लागेल. लहान रकमेपासून सुरुवात केली तरी हळूहळू मोठी बचत करता येईल.

    ५. क्रेडिट कार्डचा वापर काळजीपूर्वक करा

    क्रेडिट कार्ड उपयोगी असलं तरी त्याचा अनावश्यक वापर आर्थिक अडचणी निर्माण करू शकतो. सहज उपलब्ध असलेल्या क्रेडिटमुळे अनेकदा आपण गरजेपेक्षा जास्त खर्च करतो आणि नंतर बिल भरताना अडचण येते. त्यामुळे क्रेडिट कार्ड फक्त आवश्यक असताना आणि परतफेड करण्याची क्षमता असल्यासच वापरा.

    क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरणं अत्यंत महत्वाचं आहे. विलंब झाल्यास अतिरिक्त व्याज आणि दंड आकारला जातो, जो तुमच्या एकूण आर्थिक नियोजनावर परिणाम करू शकतो. म्हणूनच, उगाच उधारी वाढवू नका, कारण ती तुमची आर्थिक शिस्त बिघडवू शकते.

    ६. गुंतवणुकीचं महत्त्व समजा आणि सुरुवात करा

    फक्त पैसे बचत करून भागत नाही, तर ती बचत वाढवण्यासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं गरजेचं आहे. गुंतवणुकीमुळे केवळ पैशांची वाढ होत नाही, तर भविष्यातील आर्थिक सुरक्षितताही मिळते. त्यामुळे फिक्स्ड डिपॉझिट (FD), म्युच्युअल फंड्स, शेअर्स, पोस्ट ऑफिस योजना, सोनं अशा विविध पर्यायांचा अभ्यास करा आणि त्यातील फायदे-तोटे समजून घ्या.

    गुंतवणुकीची सुरुवात मोठ्या रकमेने करण्याची गरज नाही. अगदी थोडक्या रकमेपासून सुरू करून, अनुभव घेत हळूहळू गुंतवणूक वाढवता येईल. योग्य नियोजन आणि शहाणपणाने केलेली गुंतवणूक तुमच्या आर्थिक स्थैर्यासाठी मोठी मदत करू शकते.

    ७. फसवणुकीपासून सावध राहा

    डबल पैसे मिळवा किंवा इथे गुंतवणूक करून झटपट श्रीमंत व्हा अशा आकर्षक जाहिराती अनेकदा खोट्या असतात आणि त्या फसवणुकीसाठीच तयार केलेल्या असतात. कमी वेळेत जास्त फायदा मिळवण्याच्या लालसेत लोक अशा योजनांमध्ये पैसे गुंतवतात आणि नंतर त्यांची फसवणूक होते. त्यामुळे कोणतीही योजना, स्कीम किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी तिची पूर्ण माहिती घ्या आणि विश्वासार्हता तपासा.

    शिस्तबद्ध आणि दीर्घकालीन गुंतवणुकीनेच आर्थिक स्थैर्य मिळवता येतं. कमी परतावा असला तरी सुरक्षित आणि नियोजित गुंतवणूक तुम्हाला भविष्यातील आर्थिक चिंता दूर ठेवायला मदत करेल. म्हणूनच, कुठेही पैसे गुंतवण्यापूर्वी योग्य सल्ला घ्या आणि झटपट नफा मिळवण्याच्या भूलथापांना बळी पडू नका.

    ८. आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या

    सर्वांनाच आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकीचे तांत्रिक ज्ञान असतंच असं नाही. जर तुम्हाला कुठे, किती आणि कशा प्रकारे गुंतवणूक करावी हे समजत नसेल, तर कोणत्याही अंदाजावर निर्णय घेण्यापेक्षा एखाद्या विश्वासू आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणं चांगलं . तो तुमच्या उत्पन्न, खर्च आणि भविष्यातील गरजांनुसार योग्य गुंतवणूक योजना सुचवेल.

    एक योग्य आर्थिक सल्लागार तुम्हाला कर वाचवण्याचे उपाय, जोखीम व्यवस्थापन आणि भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रभावी मार्गदर्शन करू शकतो. त्यामुळे गोंधळून चुकीचे निर्णय घेण्यापेक्षा, एखाद्या तज्ज्ञाची मदत घ्या आणि आर्थिक स्थैर्याचा मजबूत पाया रचा.

    मित्रांनो, आर्थिक शिस्त एकाच दिवसात येत नाही,ती हळूहळू सवयीनं आणि सातत्यानं येते.रोज थोडं थोडं करत गेलं, तर काही वर्षांतच तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्थिर आणि आत्मनिर्भर बनाल.

    आणखी वाचा:

  • From Zero to Yoga : शून्यापासून योगापर्यंत भारताने जगाला काय काय दिलं?

    From Zero to Yoga : शून्यापासून योगापर्यंत भारताने जगाला काय काय दिलं?

    आज आपण मोबाईल वापरतो, इंटरनेटवर संवाद साधतो, वेगवान गाड्यांनी प्रवास करतो, बल्बच्या उजेडात राहतो, आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जगभरातील घडामोडींचे साक्षीदार बनतो. हे सर्व पाश्चिमात्य देशांच्या संशोधन व प्रगतीमुळे शक्य झालं, हे सत्य आहे.

    परंतु एक महत्त्वाचा प्रश्न नेहमीच आपल्या मनात येतो तो म्हणजे “जगाने आपल्याला खूप काही दिलं, पण आपण जगाला काय दिलं?”

    या प्रश्नाचं उत्तर अगदी स्पष्ट आहे ते म्हणजे भारताने असे अनमोल शोध लावले आहेत, ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने जागतिक विकासाचा पाया रचला गेला. हे शोध मानवी समाजाच्या प्रगतीचा मजबूत आधार बनले आहेत. इतिहासाच्या पानांमध्ये डोकावल्यास आपल्याला समजते की भारताने विज्ञान, गणित, वैद्यकशास्त्र, अध्यात्म आणि जीवनशैली यांसारख्या अनेक क्षेत्रांत महत्त्वपूर्ण संकल्पना दिल्या आहेत. या शोधांमुळे संपूर्ण जगाचा विकास साधता आला आहे.

    चला, या लेखात आपण अशाच काही महत्त्वाच्या भारतीय शोधांवर एक नजर टाकूया, ज्यांनी संपूर्ण मानवजातीला नवी दिशा दिली आहे.

    १. शून्याचा शोध 

    आज आपण संगणक, मोबाइल, इंजिनियरिंग आणि अंतराळातील गणना यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. या सगळ्याच्या मुळाशी ‘शून्य’ ही संकल्पना आहे. प्राचीन काळी गणिताचा वापर होत असला तरी, संख्यांच्या गणनेत शून्याचा समावेश नव्हता. पाचव्या शतकात महान गणितज्ञ आर्यभट्ट यांनी ‘शून्य’ ही संकल्पना मांडली, ज्यामुळे गणित सोपं आणि अधिक प्रभावी झालं.

    या शोधामुळे गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आले. आज जगभरातील सर्व वैज्ञानिक गणनांमध्ये शून्याचा उपयोग केला जातो, त्यामुळे भारतीय गणिताचा हा शोध संपूर्ण मानवजातीसाठी अमूल्य ठरला आहे.

    २. आयुर्वेद – आरोग्यासाठी प्राचीन शास्त्र

    आज आपण जेव्हा नैसर्गिक उपचार आणि औषधी वनस्पतींबद्दल बोलतो, त्याची मूळं भारतातच आहेत. हजारो वर्षांपूर्वी विकसित झालेली आयुर्वेद प्रणाली केवळ उपचार पद्धती नसून, एक संपूर्ण जीवनशैली होती. शरीर निरोगी राहण्यासाठी काय खावं, कसं राहावं आणि कधी झोपावं यासारख्या गोष्टींवर आयुर्वेदात सविस्तर मार्गदर्शन केलं आहे.

    आयुर्वेदात औषधी वनस्पतींच्या उपयोगावर भर दिला जातो. तुलसी, हळद, आल्यासारख्या वनस्पती आजही अनेक आजारांवर उपयुक्त ठरतात. प्राचीन काळापासून भारतीयांनी या उपचारपद्धतीचा वापर केला आहे आणि आज संपूर्ण जग नैसर्गिक उपचारांसाठी आयुर्वेदाकडे वळत आहे.

    ३. दशमान पद्धती – आकड्यांचे विज्ञान

    प्राचीन काळी जगभर वेगवेगळ्या पद्धतीने संख्यांची मोजणी केली जायची. युरोपात रोमन आकडे वापरले जायचे, पण ते समजण्यास कठीण होते. भारताने विकसित केलेली दशमान पद्धती (0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा वापर) गणना करण्यासाठी सोपी आणि प्रभावी ठरली.

    ही पद्धत भारतातून इतर देशांपर्यंत पोहोचली आणि संपूर्ण जगाने ती स्वीकारली. आजच्या गणितीय संकल्पना, संगणकीय गणना आणि वैज्ञानिक संशोधन यामध्ये दशमान पद्धतीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे आकड्यांच्या विज्ञानात भारताने दिलेलं हे योगदान अत्यंत महत्वाचं मानलं जातं.

    ४. चतुर्भुज समीकरण (Quadratic Equation)

    आज गणित, विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये अनेक समस्या सोडवताना चतुर्भुज समीकरणाचा उपयोग केला जातो. या समीकरणाचा पाया सुद्धा महान गणितज्ञ आर्यभट्ट यांनी घातला होता. त्यांच्या संशोधनामुळे जटिल गणिती गणना करणं सोपं झालं.

    चतुर्भुज समीकरणाचा वापर भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र आणि संगणक विज्ञानात मोठ्या प्रमाणावर केला जातो. आजही जगभरातील गणितज्ञ आणि वैज्ञानिक या संकल्पनेवर आधारित विविध शोध घेत आहेत. त्यामुळे हा भारतीय शोध आधुनिक गणितासाठी एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरला आहे.

    ५. बुद्धिबळ – चतुरंग ते चेस

    बुद्धिबळ हा आज जगभर लोकप्रिय असलेला खेळ आहे, पण त्याचा उगम भारतात ‘चतुरंग’ या नावाने झाला. प्राचीन भारतात खेळल्या जाणाऱ्या चतुरंगमध्ये राजा, हत्ती, अश्व आणि पायदळाचे सैनिक असायचे. पुढे हाच खेळ इतर देशांमध्ये गेला आणि बदलत-बदलत आजच्या बुद्धिबळाच्या स्वरूपात आला.

    बुद्धिबळ हा केवळ मनोरंजनाचा खेळ नाही, तर तो विचारशक्ती आणि नियोजन कौशल्य वाढवतो. धोरणात्मक विचार, पुढील चालांचा अंदाज आणि निर्णयक्षमता वाढवण्यासाठी हा खेळ अत्यंत उपयुक्त ठरतो. भारताच्या या ऐतिहासिक खेळाने आज संपूर्ण जगात बुद्धिमत्तेचे नवे मापदंड निर्माण केले आहेत.

    ६. बीजगणित (Algebra)

    बीजगणित ही गणितातील एक महत्त्वाची शाखा आहे आणि तिची संकल्पना सर्वप्रथम भारतीय गणितज्ञांनी मांडली. प्राचीन भारतात गणिताचा वापर व्यापारी, व्यवहार, बांधकाम आणि खगोलशास्त्रात केला जात होता. पुढे ही संकल्पना अरबी देशांत पोहोचली आणि त्यानंतर युरोपमध्ये प्रसिद्ध झाली.

    आज बीजगणिताशिवाय विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाची कल्पनाही करू शकत नाही. संगणक, मोबाइल, अंतराळ संशोधन आणि आधुनिक गणनेच्या मुळाशी बीजगणित आहे. त्यामुळे भारताने दिलेल्या या अमूल्य योगदानामुळे संपूर्ण जगाचा विकास शक्य झाला आहे.

    ७. सुश्रुत संहिता – सर्जरीचा पाया

    सुश्रुत हे जगातील पहिले शल्यचिकित्सक मानले जातात. त्यांनी लिहिलेल्या ‘सुश्रुत संहिता’ या ग्रंथात १०० हून अधिक प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय उपकरणांचं वर्णन आहे. त्यामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी आणि हाडांच्या शस्त्रक्रियांसारख्या महत्त्वाच्या उपचार पद्धतींचा समावेश आहे.

    आज आपण जी आधुनिक सर्जरी पाहतो, तिचा पाया प्राचीन भारतीय ज्ञानावर आधारित आहे. सुश्रुत यांच्या संशोधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडली आणि पुढील पिढ्यांसाठी शस्त्रक्रियांचा मार्ग सुकर झाला. त्यामुळे भारतीय वैद्यकशास्त्राने संपूर्ण जगाला आरोग्यसेवेसाठी अनमोल योगदान दिलं आहे.

    ८. रमण इफेक्ट – भारताचा नोबेल विजेता शोध

    १९२८ मध्ये सर सी. व्ही. रमण यांनी प्रकाशाच्या विखुरणावर महत्त्वपूर्ण संशोधन केलं. त्यांनी शोध लावला की जेव्हा प्रकाश एखाद्या पारदर्शक पदार्थावर आदळतो, तेव्हा तो आपल्या मूळ रंगाशिवाय इतर रंगांमध्येही बदलू शकतो. हा शोध पुढे ‘रमण इफेक्ट’ म्हणून ओळखला जाऊ लागला.

    या शोधामुळे विज्ञानाच्या क्षेत्रात नवं दार उघडलं आणि १९३० मध्ये सर सी. व्ही. रमण यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचा आणि बुद्धिमत्तेचा जागतिक सन्मान होता. आजही हा शोध भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात महत्त्वाचा मानला जातो.

    ९. मार्स ऑर्बिटर मिशन (मंगळयान) 

    २०१३ मध्ये इस्रोने ‘मार्स ऑर्बिटर मिशन’ (मंगळयान) अंतराळात पाठवलं . भारत हा पहिल्याच प्रयत्नात मंगळावर यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला. हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या इतिहासातील एक अभिमानास्पद क्षण होता.

    या मोहिमेने भारतातील अंतराळ संशोधनाच्या क्षमतेचं संपूर्ण जगाला दर्शन घडवलं . कमी खर्चात आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भारताने अवकाश क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली.

    १०. खगोलशास्त्र आणि ज्योतिष

    भारतात खगोलशास्त्राचा अभ्यास फार प्राचीन काळापासून सुरू आहे. ग्रहण कधी लागेल, कोणता ग्रह कुठे असेल, याचा अंदाज पूर्वी भारतीय शास्त्रज्ञ लावायचे. पंचांगाच्या मदतीने तारखा, सण, तिथी आणि ग्रहांच्या हालचालींची गणना केली जात होती.

    भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग, ग्रह-ताऱ्यांचे स्थान आणि अंतर यासारख्या अनेक गोष्टींचा शोध घेतला. या ज्ञानावरच आजची आधुनिक अंतराळ संशोधन पद्धती उभी आहे.

    याव्यतिरिक्त, 

    1. भारताने जगाला मसाले दिले.
    2. विमानाचा शोध हा शिवकर बापूजी तळपदे यांनी राईट बंधुंच्या आधी 8 वर्ष म्हणजे 1895 मध्ये लावला होता.  
    3. भारताने जगाला योग दिला
    4. भारताने जगाला पाय ची व्हॅल्यू = ३.१४ दिली
    5. भारताने जगाला USB (Universal Serial Bus) पोर्ट दिला ज्याच्याशिवाय आज तुमचे कॉम्पुटर मोबाईल चालणे शक्य नाही. अजय भट्ट यांनी १९९५ यांनी पहिला USB पोर्ट बनवला होता. 

    मित्रांनो, आज आपण मोबाईल, इंटरनेट आणि तंत्रज्ञानाच्या जगात रमलो आहोत. पण आपली संस्कृती, आपले ज्ञान आणि आपला इतिहास जगात कुठेही कमी नाही. दुर्दैवाने, आपण आपला महान वारसा विसरतो आणि फक्त इतरांच्या गोष्टी मोठ्या मानतो.

    भारताने जगाला विचार, तत्त्वज्ञान, गणित, विज्ञान, योग आणि आयुर्वेद दिलं आणि असे अनमोल शोध, ज्यांनी संपूर्ण जगाची दिशा बदलली. म्हणूनच, भारतीय असल्याचा अभिमान बाळगायला हवा, कारण जगाने आपल्याला जे काही दिलं, त्याच्या खूप आधी आपणच जगाला भरभरून दिलं आहे!

    आणखी वाचा:

  • बिझनेससाठी भांडवल कुठून व कसं मिळवायचं? हे आहेत ७ पर्याय

    बिझनेससाठी भांडवल कुठून व कसं मिळवायचं? हे आहेत ७ पर्याय

    आजच्या तरुण पिढीला स्वतःचं काहीतरी वेगळं करायचंय, स्वतःचा व्यवसाय सुरू करून मोठं व्हायचंय. अनेकांकडे नाविन्यपूर्ण कल्पना असतात, समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची तळमळ असते आणि मेहनतीची तयारीही असते, पण प्रत्यक्षात व्यवसाय सुरू करताना अनेक अडथळे समोर येतात त्यात मार्केटमध्ये टिकून राहण्याची धडपड, स्पर्धा, व्यवस्थापन यासोबतच सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे पैशांचा, म्हणजेच फायनान्सिंगचा!

    व्यवसाय सुरू करायचा असेल, वाढवायचा असेल, नवीन कर्मचारी भरती करायची असेल, आधुनिक तंत्रज्ञान विकत घ्यायचं असेल किंवा उत्पादनाची जाहिरात करायची असेल, तर त्यासाठी भांडवल लागणारच. तर मग, या भांडवलाची व्यवस्था कुठून करायची? कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत? या लेखात आपण व्यवसायासाठी भांडवल उभारण्याचे विविध मार्ग समजून घेऊया.

    स्वतःची बचत वापरणं (Bootstrapping)

    व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वतःच्या बचतीचा वापर करणं हा सगळ्यात सोपा आणि सहज उपलब्ध पर्याय आहे. यात तुम्ही तुमच्या जमा केलेल्या पैशांतून व्यवसाय सुरू करता. कधी कधी कुटुंबातील सदस्य, जसे की आई-वडील, भाऊ-बहिण किंवा जवळचे नातेवाईकही सुरुवातीला आर्थिक मदत करू शकतात. या पद्धतीला बूटस्ट्रॅपिंग म्हणतात. यामध्ये बाहेरच्या गुंतवणूकदाराची तितकीशी आवश्यकता भासत नाही, त्यामुळे व्यवसायावर तुमचा संपूर्ण हक्क राहतो आणि कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेपाशिवाय तुम्ही तुमच्या पद्धतीने निर्णय घेऊ शकता.

    या पद्धतीचा एक मोठा फायदा म्हणजे तुम्हाला कोणत्याही कर्जाचा बोजा नसतो आणि नफा कमावला की तो पूर्णतः तुमचाच असतो. मात्र, यामध्ये एक मोठी अडचण म्हणजे पैशांची मर्यादा. तुमच्याकडे भांडवल कमी असल्यामुळे व्यवसायाची वाढ मर्यादित राहू शकते. मोठ्या संधींचा फायदा घेण्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी अतिरिक्त भांडवलाची आवश्यकता भासू शकते.

     एंजल इन्व्हेस्टर्स

    ‘एंजल’ म्हणजे देवदूत, आणि एंजल इन्व्हेस्टर्स हे खरंच तुमच्या व्यवसायासाठी तसंच काम करतात. हे अनुभवी उद्योजक किंवा मोठे गुंतवणूकदार असतात, जे आपल्या वैयक्तिक संपत्तीमधून त्यांना आवडणाऱ्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करतात. तुमच्या कल्पनेवर आणि व्यवसायाच्या भविष्यातील संधींवर विश्वास ठेवून ते तुम्हाला भांडवल देतात. मात्र, त्याबदल्यात ते व्यवसायात काही प्रमाणात भागीदारी (equity) घेतात.

    एंजल इन्व्हेस्टर्स फक्त पैसा देत नाहीत, तर त्यांचा अनुभव, उद्योग क्षेत्रातील ओळखी आणि व्यावसायिक सल्लाही देतात. त्यामुळे तुमच्या स्टार्टअपला योग्य दिशा मिळते आणि व्यवसाय वाढीला गती मिळते. योग्य एंजल इन्व्हेस्टर मिळाल्यास तुमच्या व्यवसायाला केवळ आर्थिक मदतच नाही, तर एक मजबूत आधारसुद्धा मिळतो.

    व्हेंचर कॅपिटल – मोठ्या प्रमाणात गुंतवणूक

    जेव्हा तुमचा व्यवसाय चांगला चालू होतो, ग्राहक वाढतात आणि विक्री होण्यास सुरुवात होते , तेव्हा पुढील विस्तारासाठी जास्त पैशांची गरज लागते. अशावेळी व्हेंचर कॅपिटलिस्ट्स (VC’s) मदतीला येतात. हे मोठ्या कंपन्यांचे फंड असतात, जे भविष्यात भरभराटीला जाणाऱ्या स्टार्टअप्समध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करतात. जर तुमच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची क्षमता असेल, तर हे इन्व्हेस्टर्स तुम्हाला भांडवल देतात.

    व्हेंचर कॅपिटलिस्ट्स फक्त पैसे देत नाहीत, तर व्यवसाय वाढवण्यासाठी महत्त्वाचे सल्लेही देतात. हे सुद्धा तुमच्या कंपनीत भागीदारी घेतात आणि काही निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यामुळे तुमच्या व्यवसायावर काही प्रमाणात त्यांचं नियंत्रण राहतं. तरीही, जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर व्यवसाय वाढवायचा असेल, तर व्हेंचर कॅपिटल हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

    सरकारी योजना आणि अनुदान

    सरकार नव्या स्टार्टअप्सना मदत करण्यासाठी विविध योजना राबवत असतं. यामुळे नवीन उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळतं. Startup India योजनेत सहभागी झाल्यास व्यवसाय नोंदणीवर सवलती, कर सवलत आणि इतर अनेक फायदे मिळतात. Mudra योजना ही लहान व्यवसायांसाठी आहे, जिथे कोणत्याही तारणाशिवाय छोटे कर्ज मिळू शकतं. तसेच, SIDBI (Small Industries Development Bank of India) ही योजना लहान आणि मध्यम उद्योगांसाठी कर्ज आणि आर्थिक सहाय्य देते.

    या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे व्यवस्थित व्यवसाय योजना (Business Plan) आणि अधिकृत नोंदणी असणं गरजेचं आहे. जर सर्व आवश्यक कागदपत्रे आणि अटी पूर्ण केल्या, तर सरकारकडून भांडवल उभारणं तुलनेनं सोपं होतं. योग्य योजनेचा लाभ घेतल्यास तुमचा व्यवसाय वेगाने वाढू शकतो.

    बँकेकडून कर्ज

    व्यवसायासाठी भांडवल उभारण्याचा सर्वात पारंपरिक आणि सहज मार्ग म्हणजे बँकेकडून कर्ज घेणं. जर तुमच्याकडे व्यवस्थित बिझनेस प्लॅन, आधीपासून काही उत्पन्न आणि चांगला क्रेडिट स्कोअर असेल, तर बँका तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि कर्ज देण्यास तयार होतात. हे कर्ज व्यवसाय सुरू करण्यासाठी, विस्तारासाठी किंवा नवीन उपकरणे खरेदीसाठी वापरता येतं.

    लहान आणि मध्यम उद्योगांसाठी MSME (Micro, Small & Medium Enterprises) योजनां अंतर्गत काही विशेष कर्ज सुविधा दिल्या जातात. या योजनांमध्ये तुलनेने कमी व्याजदर आणि सोप्या परतफेडीच्या अटी मिळतात. बँकेकडून कर्ज घेण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे, व्यवसाय नोंदणी आणि आर्थिक स्थिरता दाखवावी लागते. जर तुमचा व्यवसाय सक्षम असेल आणि विश्वासार्हता असेल, तर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

    How to Raise Funding for Business?

    क्राउडफंडिंग 

    आजच्या डिजिटल युगात व्यवसायासाठी भांडवल उभारण्याचा एक नवीन आणि प्रभावी मार्ग म्हणजे क्राउडफंडिंग. यामध्ये तुम्ही तुमची व्यवसाय कल्पना ऑनलाइन शेअर करता आणि लोकांना त्यात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करता. Kickstarter, Wishberry, Ketto यांसारख्या प्लॅटफॉर्मवर तुमची संकल्पना जर लोकांना उपयुक्त, आकर्षक किंवा भावनिकदृष्ट्या जोडणारी वाटली, तर अनेक जण थोडीथोडी रक्कम देऊनही मोठी मदत करू शकतात.

    क्राउडफंडिंगमुळे मोठ्या गुंतवणूकदारांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होते आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी थोड्या-थोड्या मदतीतून मोठी रक्कम उभारता येते. याशिवाय, लोकांशी थेट संपर्क होतो आणि तुमच्या उत्पादन किंवा सेवेबाबत सुरुवातीपासूनच जागरूकता निर्माण होते. जर तुमची कल्पना इनोव्हेटिव्ह आणि लोकांना आवडणारी असेल, तर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

    इन्क्युबेटर आणि अ‍ॅक्सेलेरेटर प्रोग्रॅम्स

    इन्क्युबेटर आणि अ‍ॅक्सेलेरेटर प्रोग्रॅम्स हे नव्या स्टार्टअपसाठी मार्गदर्शन करणारे विशेष उपक्रम असतात. IIT, IIMसारख्या प्रतिष्ठित संस्थांपासून खासगी कंपन्यांपर्यंत अशा अनेक संस्था या प्रोग्रॅम्स चालवतात. यात स्टार्टअपला व्यवसायाची योग्य दिशा, तंत्रज्ञान, नेटवर्किंग, आणि कधी कधी थोडी गुंतवणूक मिळते. नव्याने व्यवसाय सुरू करत असाल, तर हे प्रोग्रॅम्स तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. यातून मार्केटिंग, व्यवस्थापन, संघटन कौशल्ये आणि निधी उभारणीचं ज्ञान मिळतं.

    व्यवसायासाठी योग्य फायनान्सिंग निवडणं महत्वाचं आहे. काहींसाठी स्वतःची बचत पुरेशी असते, तर काहींना गुंतवणूकदारांची मदत घ्यावी लागते. काहींना बँकेचे कर्ज योग्य वाटते, तर काहींसाठी सरकारी योजना फायदेशीर ठरतात. तुम्ही कोणत्या टप्प्यावर आहात आणि तुम्हाला किती भांडवलाची गरज आहे, यानुसार योग्य पर्याय निवडावा. योग्य निर्णय घेतल्यास तुमच्या स्टार्टअपचा यशाचा मार्ग सुकर होईल.

    सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे ठोस, स्पष्ट आणि विश्वासार्ह व्यवसाय योजना असणं गरजेचं आहे. कोणताही गुंतवणूकदार किंवा बँक कर्ज देण्यापूर्वी तुमच्या व्यवसायाची संकल्पना आणि योजना नीट समजून घेतं. तुमची कल्पना किती व्यवहार्य आहे, त्यातून किती नफा होऊ शकतो आणि ती किती काळ टिकू शकते ,हे सगळं त्यांना जाणून घ्यायचं असतं. त्यामुळे व्यववसायाचं उद्दिष्ट, उत्पन्नाचे स्रोत, खर्च, आणि विस्ताराची योजना या सर्व गोष्टी नीट मांडणं गरजेचं आहे. मजबूत व्यवसाय योजना असेल, तर गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकणं सोपं होतं आणि तुमच्या स्टार्टअपला भक्कम आधार मिळतो.

    आणखी वाचा

  • Racheal Kaur : लेकरांसाठी रोज ६०० किमी विमानाने प्रवास करणारी सुपरमॉम!

    Racheal Kaur : लेकरांसाठी रोज ६०० किमी विमानाने प्रवास करणारी सुपरमॉम!

    आई म्हणजे प्रेम, त्याग आणि जबाबदारीचं जिवंत रूप. आपल्या मुलांसाठी ती कोणत्याही अडचणींवर मात करू शकते. याचं जिवंत उदाहरण म्हणजे मलेशियातील रचेल कौर (Racheal Kaur), ज्या आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी दररोज तब्बल ६०० किलोमीटरचा विमान प्रवास करतात! त्यांच्या त्यागाची ही कहाणी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि लाखो लोकांना प्रेरणा देत आहे.

    राचेल कौर या भारतीय वंशाच्या असून आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून त्या मलेशियातील क्वालालंपूर ते सिंगापूर असा रोज विमान प्रवास करतात. चला, जाणून घेऊया त्यांच्या या अनोख्या आणि रंजक प्रवासाबद्दल!

    रोजचा प्रवास कसा असतो?

    राचेल कौर या मलेशियातील पेनांग शहरात राहतात, तर त्यांचं ऑफिस क्वालालंपूरमध्ये आहे. त्या एअर एशिया कंपनीत फायनान्स ऑपरेशन विभागात असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतात. आधी त्या ऑफिसजवळ राहत होत्या, पण तिथलं घरभाडं खूप महाग होतं. आणि त्या फक्त आठवड्यातून एकदाच आपल्या मुलांना भेटू शकत होत्या. आई म्हणून त्यांना हे सहन होईना. म्हणून त्यांनी अनोखा मार्ग निवडला  तो म्हणजे दररोज विमानाने प्रवास करण्याचा!

    राचेल रोज पहाटे ४ वाजता उठतात, तयारी करून ५:५५ च्या फ्लाइटने क्वालालंपूरला जातात आणि ७:४५ ला ऑफिसला पोहोचतात. संध्याकाळी ऑफिस संपल्यावर त्या पुन्हा विमानाने पेनांगला परततात आणि रात्री ८ वाजता आपल्या मुलांसोबत असतात. हा प्रवास ऐकायला अविश्वसनीय वाटतो, पण त्यांच्या मते यामुळे त्या मुलांसोबत अधिक वेळ घालवू शकतात आणि त्यांच्या संगोपनात कुठलीही तडजोड करावी लागत नाही.

    विमान प्रवास महाग नाही का?

    पहिल्यांदा ऐकून वाटतं की रोज विमानाने प्रवास करणं खूप महाग असेल. पण प्रत्यक्षात राचेल कौर यांचा खर्च आधीपेक्षा कमी झाला आहे. आधी त्या ऑफिसजवळ राहायच्या, तेव्हा त्यांना दरमहा २८,००० (३४० डॉलर) घरभाडं द्यावं लागायचं. त्यात मुलांपासून दूर राहण्याचं दुःख वेगळंच होतं.

    आता त्या रोज विमानाने प्रवास करतात, तरी त्यांचा खर्च कमी आहे. विमान तिकिटासाठी त्यांना रु. १८,५०० (२२६ डॉलर) आणि जेवणासाठी रु. ५,५०० (६८ डॉलर) इतकाच खर्च येतो. त्यामुळे त्यांची पैशांची बचतही होते आणि त्यांना कुटुंबासोबत राहण्याचा आनंदही मिळतो.

    आई असणं म्हणजे त्याग आणि कष्ट

    राचेल कौर यांची ही प्रेरणादायी कहाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. पण अशीच कहाणी लाखो भारतीय महिलांचीही आहे. भारतातही अनेक स्त्रिया रोज तासन्‌तास लोकल ट्रेन, बस किंवा ट्रॅफिकमध्ये अडकून ऑफिसला जातात. घरी परतल्यानंतरही त्या कुटुंबाची जबाबदारी  सांभाळतात. आईपण आणि करिअर एकत्र निभावणं सोपं नसतं, पण त्या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात.

    The story of Indian-origin supermom from Malaysia who flies 600 km daily to work and back

    राचेल यांची कहाणी प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, विशेषतः त्या महिलांसाठी ज्या आपल्या कुटुंब आणि करिअरमध्ये सुंदर समतोल साधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहतात. ही कहाणी त्या सर्व आईंना समर्पित आहे, ज्या आपल्या मुलांसाठी आणि कुटुंबासाठी अहोरात्र झटत असतात.

    नवी अर्थक्रांती राचेल आणि अशा सर्व “आयांना” सलाम करते , ज्या आपल्या कुटुंबासाठी आणि करिअरसाठी अखंड झटत असतात!

    आणखी वाचा:

  • The Bhakra-Nangal Train: जाणून घ्या भारतातील एकमेव मोफत रेल्वे सेवा आणि तिच्या ऐतिहासिक प्रवासाविषयीची रंजक माहिती!

    The Bhakra-Nangal Train: जाणून घ्या भारतातील एकमेव मोफत रेल्वे सेवा आणि तिच्या ऐतिहासिक प्रवासाविषयीची रंजक माहिती!

    रेल्वे हा भारतीय जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. देशभरातील लाखो लोक रोज रेल्वेने प्रवास करतात, आणि या सर्व गाड्यांसाठी तिकीट घेणे आवश्यक असते. तिकीटाशिवाय प्रवास केल्यास दंडही भरावा लागतो. पण तुम्हाला माहिती आहे का, भारतात एक अशी ट्रेन आहे जिथे कोणतेही तिकीट लागत नाही?

    होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलंत. भाक्रा-नांगल ट्रेन (The Bhakra-Nangal Train) ही भारताची एकमेव मोफत रेल्वे सेवा आहे, जी तब्बल ७५ वर्षांपासून विनाशुल्क प्रवासी सेवा पुरवत आहे. ही ट्रेन भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळ (BBMB) द्वारे चालवली जाते आणि केवळ वाहतुकीचे साधन नसून, भारताच्या औद्योगिक विकासाचा आणि ऐतिहासिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे.

    या ट्रेनची सुरुवात कशी झाली? ही सेवा मोफत का आहे? आणि प्रवाशांना नेमका कसा अनुभव मिळतो? चला, आजच्या लेखात या ऐतिहासिक ट्रेनचा रंजक प्रवास जाणून घेऊया!

    भाक्रा-नांगल (Bhakra-Nangal Train) ट्रेनची सुरुवात

    भाक्रा-नांगल रेल्वे सेवा १९४८ मध्ये सुरू करण्यात आली. त्या काळात भारतात मोठमोठे विकास प्रकल्प हाती घेतले जात होते, त्यापैकी एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे भाक्रा-नांगल धरण. सतलज नदीवर उभारलेले हे धरण २२६ मीटर उंच आणि ५२० मीटर लांब असून, भारताच्या कृषी आणि जलविद्युत उत्पादनासाठी अत्यंत उपयुक्त ठरले. धरणाच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर कामगार, अभियंते आणि साहित्य यांची वाहतूक करण्यासाठी रेल्वेची गरज भासली.

    याच कारणामुळे भाक्रा आणि नांगल या दोन ठिकाणांदरम्यान रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. सुरुवातीला ही ट्रेन केवळ धरणाच्या बांधकामासाठी वापरण्यात येत होती, मात्र नंतर स्थानिक रहिवासी आणि पर्यटक यांच्यासाठीही ती खुली करण्यात आली. प्रारंभी ही ट्रेन वाफेच्या इंजिनांवर चालवली जात होती, परंतु १९५३ मध्ये अमेरिकेतून डिझेल इंजिन आयात करून तिला अधिक आधुनिक बनवण्यात आले.

    या ट्रेनच्या डब्यांचे देखील विशेष महत्व आहे, कारण ते कराचीमध्ये बनवलेले लाकडी डबे आहेत. आजही हे डबे वसाहतकालीन रेल्वे प्रवासाची आठवण करून देतात. भाक्रा-नांगल रेल्वे केवळ एक वाहतुकीचे साधन नव्हे, तर भारताच्या प्रगतीच्या वाटचालीतील एक ऐतिहासिक घटक म्हणून ओळखली जाते.

    भाक्रा-नांगल ट्रेनचा प्रवास आणि अनुभव

    भाक्रा-नांगल ट्रेन नांगल (पंजाब) ते भाक्रा (हिमाचल प्रदेश) दरम्यान अवघ्या १३ किलोमीटरचा प्रवास करते. शिवालिक पर्वतरांगेतून आणि सतलज नदीच्या काठाने जाणारा हा प्रवास निसर्गरम्य आणि मन मोहवणारा आहे. मार्गात तीन बोगदे आणि सहा लहान स्थानके येतात, ज्यामुळे प्रवाशांना भाक्रा-नांगल धरणाचे भव्य दृश्य, शांत वाहणारी सतलज नदी आणि हिरव्यागार टेकड्यांचे सौंदर्य अनुभवता येते.

    ही ट्रेन दररोज सुमारे ८०० प्रवाशांना मोफत सेवा देते. पर्यटकांसाठी हा प्रवास इतिहास आणि निसर्गसौंदर्याचा अनोखा संगम आहे, तर स्थानिक रहिवाशांसाठी ती दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा भाग आहे. हा लहानसा प्रवास निसर्गप्रेमी आणि इतिहासप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरतो.

    ही ट्रेन मोफत का आहे?

    भाक्रा-नांगल ट्रेन (The Bhakra-Nangal Train) मोफत असण्याचे मुख्य कारण म्हणजे भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळ (BBMB), जे या ट्रेनचा संपूर्ण खर्च स्वतः उचलते. भारतातील इतर कोणतीही ट्रेन मोफत नाही, पण ही ट्रेन विनाशुल्क ठेवण्यात आली आहे, कारण ती भारताच्या औद्योगिक वारशाचा महत्त्वाचा भाग मानली जाते. ही ट्रेन दर तासाला सुमारे १८-२० लिटर डिझेल वापरते, त्यामुळे ती चालवणे स्वस्त नाही. तरीही, BBMB या ऐतिहासिक आणि औद्योगिक वारशाच्या जतनासाठी प्रवाशांकडून भाडे घेत नाही.

    The Bhakra-Nangal Train

    भाक्रा-नांगल ट्रेनचा प्रवास का करावा?

    भाक्रा-नांगल ट्रेनचा प्रवास हा भारताच्या औद्योगिक इतिहासाची झलक पाहण्यासाठी आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. या मोफत प्रवासादरम्यान तुम्हाला भाक्रा-नांगल धरणाचे भव्य दृश्य, शांत वाहणारी सतलज नदी आणि शिवालिक टेकड्यांचे मनमोहक सौंदर्य अनुभवता येते. तसेच, या ट्रेनमध्ये जुन्या रेल्वे डब्यांचा ऐतिहासिक अनुभव घेण्याची संधी मिळते. त्यामुळे अनोख्या आणि संस्मरणीय प्रवासासाठी भाक्रा-नांगल ट्रेन नक्कीच एक उत्तम निवड ठरते. जर तुम्हाला इतिहास, निसर्ग आणि अभियांत्रिकी चमत्काराचा अनोखा संगम अनुभवायचा असेल, तर तुम्ही भाक्रा-नांगल ट्रेनचा प्रवास एकदा तरी नक्कीच केला पाहिजे!

    आणखी वाचा:

  • Who is Ram Sutar? | जगातील सर्वात मोठा पुतळा उभारणारे महाराष्ट्र भूषण राम सुतार नेमके आहेत तरी कोण?

    Who is Ram Sutar? | जगातील सर्वात मोठा पुतळा उभारणारे महाराष्ट्र भूषण राम सुतार नेमके आहेत तरी कोण?

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२५’ Maharashtra Bhushan Puraskar जाहीर केला आहे. यंदाचा हा पुरस्कार जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ मूर्तिकार डॉ. राम वनजी सुतार यांना प्रदान करण्यात येणार आहे. १९९५ पासून दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार आतापर्यंत पु. ल. देशपांडे, लता मंगेशकर, सुनील गावसकर, बाबासाहेब पुरंदरे, रतन टाटा, डॉ. रघुनाथ माशेलकर,  आशा भोसले, अशोक सराफ यांसारख्या २० दिग्गजांना प्रदान करण्यात आला आहे.

    डॉ. सुतार यांचा या यादीत समावेश होणे, ही केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब आहे. या लेखात आपण त्यांच्या जागतिक शिल्पकलेतील महत्त्वपूर्ण योगदानावर सविस्तर नजर टाकूया.

    शिल्पकलेचा जन्मजात वारसा

    डॉ. राम सुतार (Ram Sutar) यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९२५ रोजी महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील गोंदूर या छोट्या गावात एका सर्वसाधारण कुटुंबात झाला. त्यांचे वडील लोहारकाम आणि सुतारकाम करत असत, त्यामुळे लहानपणापासूनच राम सुतार यांना हस्तकलेची गोडी लागली. वडिलांसोबत शेतीची अवजारे तयार करणं, बैलगाड्या बनवणं, भिंतींवर चित्रं काढणं आणि मातीच्या वस्तूंना आकार देणं यामध्ये त्यांची कलात्मकता विकसित होत गेली.

    गावात शिक्षणाची नीट सोय नसल्यामुळे त्यांनी मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण नातेवाईकांकडे राहून पूर्ण केलं. लहानपणापासूनच कलेची आवड असल्याने पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई गाठली. तिथे शिकताना त्यांची शिल्पकलेची प्रतिभा अधिक खुलत गेली. १९५२ साली पदवी संपादन करताना त्यांनी मेयो सुवर्णपदक मिळवलं. याच संस्थेतील शिक्षणाने त्यांचं कौशल्य अधिक विकसित झालं आणि त्यांच्या कारकिर्दीला नवा आयाम मिळाला.

    शिल्पकलेचा वैश्विक प्रवास

    १९५४ मध्ये डॉ. राम सुतार (Ram Sutar) यांनी छत्रपती संभाजीनगर नगर (औरंगाबाद) येथे भारतीय पुरातत्त्व खात्यात नोकरीला सुरुवात केली. त्यांच्याकडे अजिंठा-वेरूळ येथील प्राचीन शिल्पांची देखभाल आणि पुनर्बांधणी करण्याची जबाबदारी होती. या काळात त्यांनी प्राचीन भारतीय शिल्पकलेचा सखोल अभ्यास केला, जो त्यांच्या पुढील कारकीर्दीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला.

    १९६० मध्ये त्यांनी चंबळ नदीवरील गांधीसागर धरणाजवळ चंबळ देवीचे भव्य शिल्प साकारलं. या कलाकृतीमुळे त्यांना संपूर्ण देशभरात ओळख मिळाली आणि एक कुशल मूर्तिकार म्हणून त्यांची प्रतिष्ठा वाढली. यानंतर त्यांच्या कलाकृतींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी वाढू लागली.

    डॉ. सुतार यांनी केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात आपल्या प्रतिभेची छाप सोडली आहे. त्यांनी तयार केलेले पुतळे संसद भवन, राष्ट्रपती भवन, विविध राज्यांच्या विधानसभांमध्ये तसेच अनेक आंतरराष्ट्रीय स्थळी प्रतिष्ठित आहेत. असंख्य मूर्ती आणि पुतळे  घडवून त्यांनी भारतीय शिल्पकलेला जागतिक स्तरावर पोहचवलं आहे.

    स्टॅच्यू ऑफ युनिटी – एक स्वप्नपूर्ती

    डॉ. राम सुतार (Ram Sutar) यांनी साकारलेली स्टॅच्यू ऑफ युनिटी ही त्यांच्या शिल्पकलेतील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध कलाकृती आहे. हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंच पुतळा आहे, जो जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून ओळखला जातो. या भव्य शिल्पामुळे त्यांच्या कलेला जागतिक स्तरावर ओळख मिळाली आणि भारताच्या शिल्पकलेचा गौरव वाढला. हे शिल्प देशाच्या एकतेचं प्रतीक आहे आणि आपल्या ऐतिहासिक वारशाची आठवण करून देतं.

    लहानपणी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची चित्रं पाहून त्यांच्या मनात अशीच भव्य मूर्ती घडवण्याचं स्वप्न निर्माण झालं होतं. स्टॅच्यू ऑफ युनिटी तयार करून त्यांनी हे स्वप्न साकार केलं. या पुतळ्यातील हावभाव आणि बारकावे अत्यंत काळजीपूर्वक घडवले गेले आहेत, ज्यामुळे सरदार पटेल यांचा व्यक्तिमत्त्वाचा भव्यपणा अधिक ठळक झाला. त्यांच्या या अद्वितीय कामगिरीमुळे भारताच्या शिल्पकलेचा नवा अध्याय लिहिला गेला आहे.

    महत्त्वाची शिल्पकृती आणि कारकीर्द

    डॉ. राम सुतार हे प्रसिद्ध शिल्पकार असून, त्यांनी आपल्या कलेत नेहमीच गुणवत्ता आणि नावीन्य जपले आहे. त्यांनी कधीही आपल्या कामाशी तडजोड केली नाही. त्यांचा स्टुडिओ आजही अनेक कलाकार, विद्यार्थी आणि अभ्यासकांसाठी प्रेरणास्थान आहे. त्यांची प्रतिभा इतकी अद्वितीय आहे की, त्यांची तुलना जगप्रसिद्ध शिल्पकार मायकेल एंजेलो आणि रोडिन यांच्यासोबत केली जाते.

    त्यांनी ७५ वर्षांच्या कारकीर्दीत जगभर २०० हून अधिक व वेगवेगळ्या शिल्पकृती तयार केल्या आहेत. भारताच्या संसद भवन परिसरात त्यांनी शिवाजी महाराज, महात्मा गांधी, सरदार पटेल, पं. नेहरू, इंदिरा गांधी, भगतसिंग आणि महात्मा फुले यांचे १६ भव्य पुतळे साकारले आहेत.

    डॉ. सुतार यांनी केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही आपली कला पोहोचवली आहे. त्यांनी टोकियो येथे रवींद्रनाथ टागोर यांचा पुतळा साकारला. तसेच, फ्रान्स, इटली, इंग्लंड, रशिया, अर्जेंटिना आणि अमेरिका यांसारख्या देशांमध्येही त्यांच्या शिल्पकृती पहायला मिळतात. विशेष म्हणजे, त्यांनी महात्मा गांधींच्या ४५० हून अधिक मूर्ती जगभर उभारल्या आहेत.

    पुरस्कार आणि सन्मान

    डॉ. राम सुतार यांच्या अद्वितीय शिल्पकलेसाठी त्यांना १९९९ मध्ये पद्मश्री, २०१६ मध्ये पद्मभूषण आणि २०१८ मध्ये टागोर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्यांच्या कलेची दखल संपूर्ण जगाने घेतली असून, त्यांनी आपल्या शिल्पकृतींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अमिट छाप उमटवली आहे.

    याशिवाय, फ्रान्समधील इकोले सुपीरियर रॉबर्ट डी सोरबोन विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. त्यांच्या अथक परिश्रमाची आणि कलासाधनेची आणखी एक मोठी पावती म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्कार

    व्यक्तिगत आयुष्य 

    राम सुतार यांचे पुत्र अनिल सुतार हे देखील प्रसिद्ध मूर्तिकार आणि वास्तुविशारद आहेत. वडिलांच्या मार्गावर चालत त्यांनीही अनेक आंतरराष्ट्रीय प्रकल्प पूर्ण केले आहेत. राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि. आणि राम सुतार फाइन आर्ट्स प्रा. लि. या त्यांच्या कंपन्या आज जगातील सर्वात मोठ्या शिल्पनिर्मिती फर्म्सपैकी एक मानल्या जातात.

    नोएडा आणि गाझियाबाद येथील त्यांच्या अत्याधुनिक स्टुडिओ आणि फाउंड्रीमध्ये जर्मनीतील यांत्रिक रोबोट्स, सीएनसी मशीन यांसारखी आधुनिक साधने वापरून भव्य शिल्पं घडवली जातात. अनिल सुतार यांनी वडिलांसोबत अनेक महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करून भारतीय शिल्पकलेचा ठसा आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटवला आहे.

    मित्रांनो, डॉ. राम सुतार यांचा जीवनप्रवास हा सातत्य, मेहनत आणि कलेसाठी समर्पणाचा उत्तम आदर्श आहे. वयाच्या शंभराव्या वर्षातही ते आपल्या कार्यात सक्रिय आहेत, हे त्यांच्या जिद्दीचं आणि कलेवरील प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान होणं, ही केवळ महाराष्ट्रासाठी नाही, तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांना खऱ्या अर्थाने “भारताचे सच्चे शिल्पकार” म्हणता येईल.

    आणखी वाचा:

  • जाणून घ्या, व्यवसाय वाढीसाठी परिणामकारक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आणि यशस्वी उदाहरणे

    जाणून घ्या, व्यवसाय वाढीसाठी परिणामकारक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आणि यशस्वी उदाहरणे

    व्यवसाय यशस्वी करण्यासाठी प्रभावी मार्केटिंग स्ट्रॅटेजी महत्त्वाची असते. मात्र, अनेक नव्याने सुरू झालेल्या व्यवसायांना योग्य मार्केटिंग कसं करावं याची स्पष्ट माहिती नसते. त्यामुळे त्यांना ग्राहक मिळण्यात अडचणी येतात आणि हळूहळू व्यवसाय वाढण्याऐवजी तो थांबण्याची शक्यता निर्माण होते. प्रत्येक मार्केटिंग स्ट्रॅटेजीचे उद्दिष्ट आणि कार्यपद्धती वेगळी असते, त्यामुळे आपल्या व्यवसायासाठी योग्य रणनीती निवडणे गरजेचे असते.

    या लेखात आपण विविध प्रकारच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आणि  त्यांची उदाहरणे पाहणार आहोत. यामुळे तुम्हाला मार्केटिंगच्या संकल्पना समजून घेण्यास आणि आपल्या व्यवसायासाठी योग्य धोरण ठरवण्यास मदत होईल.

    1. मार्केट पेनिट्रेशन स्ट्रॅटेजी

    या स्ट्रॅटेजी मध्ये सध्याच्या बाजारपेठेत आपल्या उत्पादनांचा किंवा सेवांचा वाटा वाढवला जातो. यासाठी ग्राहकांना आकर्षित करण्याचे विविध उपाय केले जातात.

    कशा प्रकारे करता येते?

    • सवलती आणि खास ऑफर्स देणे . 
    • प्रभावी जाहिराती करून उत्पादनाची प्रसिद्धी करणे . 
    • अधिक वितरक आणि विक्री केंद्रे उघडणे . 

    उदाहरण: Reliance Jio
    Jio ने बाजारात येताना सुरुवातीला मोफत डेटा आणि कॉलिंग सेवा दिली. यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले आणि Jio चे नेटवर्क झपाट्याने वाढले. या धोरणामुळे Jio ला बाजारात मजबूत स्थान मिळाले आणि इतर टेलिकॉम कंपन्यांना मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागले.

    2. डिफरेंशिएशन मार्केटिंग स्ट्रॅटेजी

    या  स्ट्रॅटेजीमध्ये उत्पादन किंवा सेवा इतरांपेक्षा वेगळी आणि खास बनवली जाते, जेणेकरून ग्राहकांमध्ये  त्याची वेगळी ओळख निर्माण होईल. यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यास आणि ब्रँडला मजबूत करण्यास मदत होते.

    कशा प्रकारे करता येते?

    • प्रीमियम गुणवत्ता आणि खास वैशिष्ट्ये जोडणे.  
    • विविध ग्राहकवर्गासाठी वेगवेगळे डिझाइन किंवा पॅकेजिंग वापरणे. 
    • प्रभावी ब्रँडिंग आणि इमेज बिल्डिंग करणे.  

    उदाहरण: Cadbury 5 Star
    Cadbury 5 Star चॉकलेटने इतर चॉकलेट्सपेक्षा वेगळा फ्लेवर दिला, जो ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर स्वीकारला. तसेच, “Jo Khaye Kho Jaye” ही मजेशीर टॅगलाइन आणि विनोदी जाहिरातींमुळे ब्रँडने वेगळी ओळख निर्माण केली आणि बाजारात आपले खास स्थान मिळवले.

    3. कॉस्ट लीडरशिप मार्केटिंग स्ट्रॅटेजी

    यात उत्पादनाचा खर्च कमी ठेवून ग्राहकांना स्वस्त दरात वस्तू किंवा सेवा दिली जाते. यामुळे मोठ्या प्रमाणावर विक्री होते आणि स्पर्धात्मक किंमत ठेवून बाजारात मजबूत स्थान मिळवता येते.

    कशा प्रकारे करता येते?

    • उत्पादन प्रक्रियेत अनावश्यक खर्च कमी करणे
    • मोठ्या प्रमाणात उत्पादन (Mass Production) करून प्रति युनिट खर्च घटवणे
    • लॉजिस्टिक्स आणि वितरण व्यवस्थापन अधिक प्रभावी बनवणे

    उदाहरण: Parle-G बिस्किट्स
    Parle-G बिस्किटे किफायतशीर किंमतीत आणि सातत्यपूर्ण गुणवत्तेसह बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे ते प्रत्येक घरात सहज पोहोचले. महागाई वाढली तरीही त्याची किंमत तुलनेने कमी ठेवण्यात आली, ज्यामुळे सर्व स्तरातील ग्राहकांनी हे बिस्किट मोठ्या प्रमाणावर स्वीकारले आहेत.

    4. मार्केट डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी

    या स्ट्रॅटेजीत नवीन बाजारपेठांमध्ये उत्पादनाची विक्री वाढवली जाते. यासाठी नवीन ग्राहक शोधणे, भौगोलिक विस्तार करणे आणि उत्पादनाचा वेगळ्या प्रकारे प्रचार करणे महत्त्वाचे ठरते.

    कशा प्रकारे करता येते?

    • नवीन ग्राहक वर्ग आणि भौगोलिक विस्तार करणे
    • नवीन वितरण वाहिन्या तयार करून उत्पादन सहज उपलब्ध करणे
    • उत्पादनाच्या नवीन उपयोगांसाठी जाहिरात आणि प्रचार करणे

    उदाहरण: McDonald’s India
    McDonald’s ने भारतीय ग्राहकांची आवड लक्षात घेऊन खास ‘McAloo Tikki’ आणि Paneer Wrap’ सारखे शाकाहारी पर्याय आणले. यामुळे त्यांनी भारतीय बाजारपेठेत आपली पकड मजबूत केली आणि अधिक ग्राहकांना आकर्षित करून विक्री वाढवली.

    5. प्रॉडक्ट डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी

    या स्ट्रॅटेजीत सध्याच्या ग्राहकांसाठी नवीन उत्पादने किंवा सेवांची निर्मिती केली जाते. जुन्या उत्पादनांना परत अपडेट करून सादर केले जाते. यामुळे ग्राहकांचा ब्रँडवर विश्वास वाढतो आणि बाजारातील स्पर्धेत टिकून राहता येते.

    कशा प्रकारे करता येते?

    • नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सुधारित उत्पादने आणणे
    • ग्राहकांच्या गरजेनुसार नवीन व्हेरिएंट सादर करणे
    • उत्पादनाच्या गुणवत्तेत सातत्य ठेवणे आणि नाविन्यपूर्ण बदल करणे

    उदाहरण: Apple iPhone Series
    Apple दरवर्षी नवीन iPhone मॉडेल्स आणि सुधारित फीचर्स सादर करून ग्राहकांना नवा अनुभव देते. यामुळे ब्रँड लॉयल्टी वाढते आणि ग्राहकांकडून सातत्याने चांगला प्रतिसाद मिळतो, ज्यामुळे कंपनीची बाजारपेठेतील पकड कायम राहते.

    6. रिलेशनशिप मार्केटिंग स्ट्रॅटेजी

    या  स्ट्रॅटेजीमध्ये ग्राहकांसोबत दीर्घकालीन नाते निर्माण करून ब्रँडप्रती विश्वास आणि निष्ठा वाढवली जाते. यामुळे ग्राहक सतत त्या ब्रँडशी जोडलेले राहतात आणि नियमित खरेदी करतात.

    कशा प्रकारे करता येते?

    • उत्कृष्ट ग्राहक सेवा देऊन समाधान वाढवणे
    • वैयक्तिकृत ऑफर्स, कॅशबॅक आणि सवलती देणे
    • लॉयल्टी प्रोग्रॅम आणि सबस्क्रिप्शन मॉडेलद्वारे ग्राहकांना ब्रँडशी जोडून ठेवणे

    उदाहरण: Amazon Prime
    Amazon Prime सदस्यत्व घेतल्यास ग्राहकांना फास्ट डिलिव्हरी, एक्सक्लुसिव्ह डील्स आणि Prime Video सारख्या सेवा मिळतात. यामुळे ग्राहक दीर्घकाळ Amazon सोबत जोडले जातात आणि वारंवार खरेदी करतात.

    7. सोशल मीडिया मार्केटिंग स्ट्रॅटेजी

    या मार्केटिंग स्ट्रॅटेजी मध्ये सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून ग्राहकांपर्यंत पोहोचले जाते आणि त्यांना ब्रँडशी जोडले जाते. यामुळे ब्रँडची लोकप्रियता वाढते आणि ग्राहक ब्रँडसोबत जोडलेले राहतात.

    कशा प्रकारे करता येते?

    • फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर यासारख्या प्लॅटफॉर्म्सवर सक्रिय राहणे
    • प्रभावशाली व्यक्ती (इन्फ्लुएन्सर्स) मार्फत उत्पादनाचा प्रचार करणे
    • व्हायरल कंटेंट तयार करून ब्रँडबद्दल चर्चा निर्माण करणे

    उदाहरण: Zomato & Swiggy
    Zomato आणि Swiggy सोशल मीडियावर मजेशीर आणि क्रिएटिव्ह पोस्ट्स शेअर करून आपली वेगळी ओळख निर्माण करतात. ग्राहकांच्या कमेंट्सला त्वरित प्रतिसाद देऊन आणि फीडबॅक लक्षात घेऊन त्यांनी ग्राहकांसोबत उत्तम नाते निर्माण केले आहे.

    8.  गुरिल्ला मार्केटिंग स्ट्रॅटेजी

    या रणनीतीत कमी बजेटमध्ये क्रिएटिव्ह आणि अनपेक्षित जाहिरातींचा वापर करून ग्राहकांचे लक्ष वेधले जाते. हे मार्केटिंग सामान्य जाहिरातींपेक्षा वेगळे आणि आश्चर्यकारक असते, ज्यामुळे लोकांमध्ये ती लवकर पसरते.

    कशा प्रकारे करता येते?

    • अनपेक्षित ठिकाणी जाहिरात लावून ग्राहकांना आश्चर्यचकित करणे
    • स्ट्रीट कॅम्पेन्स किंवा इव्हेंट्सद्वारे ब्रँडचा प्रचार करणे
    • सोशल मीडियावर अनोख्या आणि मजेशीर मोहिमा चालवणे

    उदाहरण: Coca-Cola Happiness Machine
    Coca-Cola ने काही वेंडिंग मशीनमध्ये आश्चर्यकारक भेटी ठेवून ग्राहकांना आनंदाचा अनुभव दिला. या अनपेक्षित मोहिमेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि ब्रँडची ओळख अधिक वाढली.

    9. इनबाउंड मार्केटिंग स्ट्रॅटेजी

    या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये ग्राहकांना जाहिरातीद्वारे न आकर्षित करता, त्यांना उपयुक्त आणि माहितीपूर्ण कंटेंटद्वारे आपल्याकडे येण्यास प्रवृत्त केले जाते. यामुळे ग्राहकांचा ब्रँडवरील विश्वास वाढतो आणि दीर्घकालीन संबंध तयार होतात.

    कशा प्रकारे करता येते?

    • ब्लॉग्स, व्हिडिओ, आणि पॉडकास्ट्सद्वारे उपयुक्त माहिती देणे
    • SEO आणि ईमेल मार्केटिंगचा वापर करून योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचणे
    • मोफत ई-बुक्स, वेबिनार्स आणि टूल्सद्वारे ग्राहकांना आकर्षित करणे

    उदाहरण: HubSpot
    HubSpot ने व्यवसायांसाठी मोफत साधने, गाईड्स आणि ब्लॉग्स उपलब्ध करून दिले, ज्यामुळे ग्राहकांना विपणन आणि CRM सोल्यूशन्सबद्दल माहिती मिळाली आणि त्यांची उत्पादने विक्रीसाठी आकर्षित झाली.

    10. परफॉर्मन्स मार्केटिंग स्ट्रॅटेजी

    या स्ट्रॅटेजीत फक्त चांगला ठोस निकाल मिळाल्यास जाहिरातींवर खर्च केला जातो. यामध्ये जाहिरातींच्या प्रभावावर आधारित पेमेंट केली जाते, त्यामुळे बजेटचा योग्य वापर होतो आणि परतावा (ROI) वाढतो.

    कशा प्रकारे करता येते?

    • PPC (Pay-Per-Click) जाहिरातींमधून ठराविक क्लिक किंवा विक्रीनुसार पैसे देणे
    • एफिलिएट मार्केटिंगद्वारे इन्फ्ल्यूअन्सर्स किंवा वेबसाइट्सच्या मदतीने उत्पादनांचा प्रचार करणे
    • सोशल मीडिया प्रमोशन्स आणि स्पॉन्सर्ड पोस्ट्सद्वारे लक्ष्यित ग्राहकांपर्यंत पोहोचणे

    उदाहरण: Meesho
    Meesho ने एफिलिएट आणि रेफरल मार्केटिंगचा प्रभावी वापर करून भारतभर लघु उद्योजकांना जोडले. कमी गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणावर व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी सोशल मीडिया आणि प्रभावशाली व्यक्तींना (Influencers) प्रभावीपणे वापरले. 

    मित्रांनो, यशस्वी व्यवसायासाठी योग्य मार्केटिंग स्ट्रॅटेजी निवडणे गरजेचे असते. काही ब्रँड्स मार्केट पेनिट्रेशनवर भर देतात, काहींना डिफरेंशिएशन फायदेशीर ठरते, तर काही सोशल मीडिया किंवा इनबाउंड मार्केटिंगला प्राधान्य देतात. योग्य मार्केटिंग स्ट्रॅटेजी निवडून व्यवसाय वाढीस चालना दिली जाऊ शकते. तुम्ही सुद्धा अशा वेगवेगळ्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरून आपल्या व्यवसायाला एका वेगळ्या उंचीवर नेऊ शकता.

  • Sunita Williams | गगनचुंबी स्वप्नांची यशस्वी भरारी : जाणून घ्या अंतराळ साम्राज्ञी सुनीता विल्यम्स यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास

    Sunita Williams | गगनचुंबी स्वप्नांची यशस्वी भरारी : जाणून घ्या अंतराळ साम्राज्ञी सुनीता विल्यम्स यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास

    १९ मार्च २०२५ हा दिवस संपूर्ण जगासाठी ऐतिहासिक ठरला. नासाचे अनुभवी अंतराळवीर बुच विल्मोर (Butch Wilmore) आणि भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स (Sunita Williams) जवळपास नऊ महिने अंतराळात अडकल्यानंतर सुखरूपपणे पृथ्वीवर परतले. अमेरिकेतील फ्लोरिडा समुद्र किनाऱ्यावर स्पेसएक्सच्या कॅप्सूलच्या यशस्वी लँडिंगनंतर, या दोघांचं जगभरातून जल्लोषात स्वागत झालं. विशेष म्हणजे, ही मोहीम केवळ आठ दिवसांसाठी नियोजित होती, पण तांत्रिक अडचणींमुळे ती ९ महिन्यांची दीर्घ अंतराळयात्रा ठरली.

    या मोहिमेत सुनीता विल्यम्स यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं ठरलं. त्यांनी अंतराळात आपल्या कर्तृत्वाने केवळ नवे विक्रम प्रस्थापित केले नाहीत, तर तरुणांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केलं. एका सामान्य कुटुंबातून येऊन अंतराळवीर बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खरोखर कौतुकास्पद आहे. या लेखात आपण  त्यांच्या यशस्वी कारकिर्दीवर एक नजर टाकूया.

    बालपण आणि शिक्षण

    सुनीता विल्यम्स यांचा जन्म १९ सप्टेंबर १९६५ रोजी अमेरिकेतील ओहायोमधील युक्लिड येथे झाला. त्यांचे वडील डॉ. दीपक पंड्या हे मूळचे गुजरातमधील झुलासन गावचे होते आणि अमेरिकेत न्यूरोअ‍ॅनाटॉमिस्ट म्हणून कार्यरत होते. त्यांच्या आई उर्सुलाइन बोनी पंड्या या स्लोव्हेनियन वंशाच्या अमेरिकन होत्या. सुनीता आपल्या तिघा भावंडांमध्ये सर्वात धाकटी होती आणि त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच  घरातून खूप प्रेम आणि प्रोत्साहन मिळालं .

    लहानपणापासूनच सुनीता यांना विज्ञान आणि प्राण्यांची विशेष आवड होती. त्यामुळे त्या व्हेटरनरी डॉक्टर (प्राणीचिकित्सक) बनण्याचं स्वप्न पाहत होत्या. मात्र, त्यांच्या भावाने त्यांना संयुक्त राज्य नौदल अकादमीत (United States Naval Academy) प्रवेश घेण्याची प्रेरणा दिली आणि यामुळे त्यांच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलली.

    सुनीता यांनी १९८७ मध्ये भौतिकशास्त्रात विज्ञान पदवी (B.Sc.) पूर्ण केली. त्यानंतर, १९९५ मध्ये फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकी व्यवस्थापन (Engineering Management) या विषयात पदव्युत्तर शिक्षण (M.Sc.) मिळवलं. शिक्षण घेत असताना त्यांची अंतराळ आणि ॲस्ट्रोनॉट या विषयात  आवड वाढू लागली. याच शिक्षणामुळे त्यांना अंतराळवीर बनण्याचा मार्ग मिळाला आणि पुढे त्यांची अंतराळ क्षेत्रात वाटचाल सुरू झाली.

    सैन्य सेवा आणि नासामधील प्रवेश

    सुनीता विल्यम्स यांनी १९८७ मध्ये अमेरिकन नौदलात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. प्रारंभी, त्यांनी बेसिक डायव्हिंग ऑफिसर म्हणून काम केलं, त्यानंतर त्या नौदल विमानचालक (Naval Aviator) म्हणून प्रशिक्षित झाल्या. नौदलातील सेवेदरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये सहभाग घेतला. विशेषतः, १९९२ मध्ये आलेल्या अँड्रयू चक्रीवादळाच्या वेळी त्यांनी फ्लोरिडामध्ये बचाव कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

    त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे १९९८ मध्ये नासाने त्यांची अंतराळवीर म्हणून निवड केली. त्यानंतर, जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये (Johnson Space Center) त्यांनी कठोर प्रशिक्षण पूर्ण केलं आणि नासाच्या विविध अवकाश मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. 

    अंतराळातील ऐतिहासिक कामगिरी

    सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांनी ९ डिसेंबर २००६ रोजी आपल्या पहिल्या अंतराळ प्रवासाला सुरुवात केली. त्या स्पेस शटल डिस्कव्हरी (Space Shuttle Discovery) च्या माध्यमातून अंतराळात पोहोचल्या आणि एकूण १९५ दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) राहिल्या. या मोहिमेत त्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग केले आणि अंतराळ स्थानकाच्या देखभालीत महत्त्वाची भूमिका बजावली.

    Sunita Williams

    यानंतर, २०१२ मध्ये सुनीता यांनी पुन्हा एकदा अंतराळ यात्रा केली. Expedition 32 मध्ये फ्लाइट इंजिनिअर आणि Expedition 33 मध्ये कमांडर म्हणून जबाबदारी सांभाळली. या वेळीही त्यांनी ISS वर प्रयोगशाळांमध्ये संशोधन केलं आणि अवकाश स्थानकाच्या कार्यक्षमतेसाठी महत्त्वाची कामं पार पाडली.

    सुनीता यांनी एकूण ९ वेळा स्पेसवॉक  केला, ज्यामध्ये ६२ तास ९ मिनिटे त्या अंतराळात चालल्या. ही कामगिरी महिलांसाठी एक मोठा विक्रम मानला जातो. तसेच, १६ एप्रिल २००७ रोजी ISS वरून “बॉस्टन मॅरेथॉन” पूर्ण करून अंतराळातून मॅरेथॉन धावणाऱ्या पहिल्या व्यक्ती ठरण्याचा अनोखा इतिहासही त्यांनी रचला.

    अंतराळातील नवे प्रयोग आणि अनुभव

    सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांनी मायक्रोग्रॅव्हिटी, जैवशास्त्र, वैद्यकीय प्रयोग, तेजस किरणांचे परिणाम आणि मानव शरीरावर अंतराळ प्रवासाच्या प्रभावांवर महत्त्वपूर्ण संशोधन केलं आहे. त्यांनी आपल्या टीमसोबत १५० हून अधिक वैज्ञानिक प्रयोग यशस्वीपणे पूर्ण केले आणि तब्बल ९०० तास संशोधनासाठी दिले. त्यांच्या या अभ्यासामुळे भविष्यातील अंतराळ मोहिमा अधिक सुरक्षित आणि प्रभावी होण्यास मदत होईल. तसेच, अंतराळात मानवी वास्तव्य शक्य करण्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्वाचं ठरलं आहे.

    आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) हे फुटबॉल मैदानाइतकं मोठं आहे, आणि त्याची देखभाल करणं हे एक मोठं आव्हान असतं. सुनीता यांनी प्राचीन उपकरणांचे आधुनिकीकरण करून, नवीन प्रणाली कार्यान्वित केल्या, ज्यामुळे ISS अधिक कार्यक्षम बनलं. त्यांच्या तांत्रिक कौशल्यामुळे अंतराळ स्थानकाच्या दैनंदिन कार्यप्रणालींमध्ये सुधारणा झाली.

    भारतीय नातं आणि खासगी आयुष्य

    सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांचं भारताशी विशेष जिव्हाळ्याचं नातं आहे. त्यांचे वडील गुजरातमधील झुलासन गावचे असल्यामुळे त्या वेळोवेळी भारताला भेट देतात. २००७ आणि २०१३ मध्ये त्यांनी भारतात येऊन विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यांच्या कर्तृत्वासाठी भारत सरकारने २००८ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान केला. अनेक मुलाखतींमध्ये त्या  भारतीय संस्कृती, कुटुंबातील मूल्ये आणि भारताने दिलेल्या प्रेरणेचा आपल्या यशात मोठा वाटा असल्याचे सांगत असतात.

    त्यांचे पती मायकल जे. विल्यम्स हे Federal Marshal म्हणून कार्यरत आहेत, तसेच त्यांना हेलिकॉप्टर उडवण्याचा अनुभव आहे. आपल्या व्यस्त कारकिर्दींमुळे सुनीता आणि मायकल यांनी बराच काळ एकमेकांपासून दूर घालवला, तरीही त्यांचे परस्परांवरील प्रेम आणि आदर कायम आहे. त्यांच्या नात्याला समजूतदारपणा आणि परस्पर समर्थनाचा मजबूत आधार आहे, ज्यामुळे त्यांनी आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात यशस्वी समतोल राखला आहे.

    २०२५ ची यशस्वी मोहीम आणि जागतिक गौरव

    बोईंग स्टारलायनर यान मोहिमेसाठी उत्कृष्ट असले तरीही, २०२४ मध्ये तांत्रिक अडचणींमुळे यानाच्या परतीच्या प्रवासात विलंब झाला. यामुळे अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) अतिरिक्त नऊ महिने थांबावे लागले. या अनपेक्षित परिस्थितीतही सुनीता विल्यम्स यांनी मोठ्या संयमाने आणि कौशल्याने परिस्थिती हाताळली, ज्यामुळे त्यांची ही मोहीम संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरली.

    सुनीता विल्यम्स (Sunita Williams) या केवळ एक अंतराळवीर नाहीत, तर जिद्द, चिकाटी, शिस्त आणि विज्ञानावर दृढ विश्वास ठेवणाऱ्या एका प्रेरणादायी व्यक्तीमत्त्वाचे प्रतीक आहेत. भारतीय मुळांपासून अमेरिकेच्या आकाशात झेपावणारी ही लेक आजच्या पिढीला आणि भविष्यातील प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणास्थान आहे.

    आणखी वाचा

  • ॲपलची नोकरी सोडली, लोकांनी वेड्यात काढलं… आज उभा केलाय ९१०० कोटींचा व्यवसाय!

    ॲपलची नोकरी सोडली, लोकांनी वेड्यात काढलं… आज उभा केलाय ९१०० कोटींचा व्यवसाय!

    आजच्या काळात अनेक तरुण मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेत आहेत आणि त्यात मोठे यश मिळवत आहेत. नोकरीची सुरक्षितता सोडून व्यवसायात उतरणं म्हणजे मोठा धोका पत्करणं, पण ज्या लोकांकडे नवीन कल्पना आणि प्रबळ इच्छाशक्ती असते, ते या प्रवासात यशस्वी ठरतात. अशाच एका जिद्दी तरुणाची गोष्ट म्हणजे ‘अपना’ ॲप या कंपनीचे संस्थापक निर्मित पारेख यांची.

    व्यवसाय सुरू करणं सोपं नव्हतं, त्यात अनेक अडथळे होते. पण त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला आणि “अपना” ही कंपनी सुरू केली. आज या कंपनीचं बाजारमूल्य ९१०० कोटी रुपयांपर्यंत वाढलं आहे. निर्मित पारेख यांचा हा प्रवास केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर हजारो तरुणांसाठीही प्रेरणादायी आहे. आजच्या लेखात आपण त्यांच्या या प्रवासाविषयी सविस्तर जाणून घेऊया.

    बालपणापासून तंत्रज्ञानाची आवड

    निर्मित पारेख यांचा जन्म मुंबईतील एका सर्वसाधारण व्यावसायिक कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना तंत्रज्ञानाची विशेष आवड होती. वयाच्या केवळ व्या वर्षीच त्यांनी एक डिजिटल घड्याळ तयार केले, तर १३ व्या वर्षी रोबोटिक्स प्रोग्रामिंग शिकण्यास सुरुवात केली. बालपणातच त्यांनी विविध तांत्रिक प्रयोग केले आणि तंत्रज्ञानाच्या गूढ विश्वात स्वतःला झोकून दिले. नवनवीन शोध लावण्याची त्यांची वृत्ती आणि तंत्रज्ञान समजून घेण्याची उत्सुकता यामुळे ते सतत काहीतरी नवीन शिकत राहिले.

    पुढे शिक्षणासाठी त्यांनी गुजरातमधील प्रसिद्ध निरमा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे प्रवेश घेतला आणि बी. टेक. पूर्ण केले. या काळात त्यांनी विविध प्रोजेक्ट्सवर काम केले आणि तंत्रज्ञानाचा अधिक मन लावून अभ्यास केला. शिक्षण संपल्यानंतर त्यांनी आपल्या करिअरची स्पष्ट दिशा ठरवली आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्याचा निर्धार केला. 

    पहिले स्टार्टअप आणि व्यावसायिक सुरुवात

    निर्मित पारेख यांनी कॉलेजमध्ये असतानाच ‘इंकॉन टेक्नॉलॉजीज’ नावाचे स्टार्टअप सुरू केले, जे पूर व्यवस्थापनासाठी उपाययोजना विकसित करत होते. लहान वयातच मोठ्या समस्यांवर उपाय शोधण्याची त्यांची प्रवृत्ती होती. बी. टेक पूर्ण केल्यानंतर त्यांनी’“क्रक्सबॉक्स’ नावाची दुसरी कंपनी सुरू केली, जी डेटा अ‍ॅनालिटिक्स क्षेत्रात काम करत होती.

    त्यांची मेहनत, कल्पकता आणि तांत्रिक कौशल्य पाहून ‘इंटेल’ या आंतरराष्ट्रीय कंपनीने क्रक्सबॉक्स विकत घेतले आणि त्यांना नोकरीची संधी दिली. इंटेलमध्ये त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले आणि डेटा अ‍ॅनालिटिक्स विभागाचे संचालकपद मिळवले. तिथे त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत कंपनीच्या वाढीमध्ये मोठा वाटा उचलला.

    उच्च शिक्षण आणि ॲपलमधील नोकरी

    निर्मित पारेख यांनी पुढे प्रसिद्ध स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीए पूर्ण केले. या शिक्षणामुळे त्यांना जागतिक बाजारपेठ, व्यवसायातील नवे ट्रेंड्स आणि इनोव्हेशन यांचा सखोल अभ्यास करण्याची संधी मिळाली. एमबीएनंतर त्यांनी ॲपल  कंपनीत प्रवेश केला ,तिथे त्यांनी ‘आयफोन प्रॉडक्ट अँड स्ट्रॅटेजी टीम’ मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. 

    मुंबईतील एका साध्या कुटुंबात जन्मलेले निर्मित ॲपल सारख्या मोठ्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत होते. मोठ्या पगाराची नोकरी असूनही त्यांना समाधान नव्हते, कारण त्यांची खरी ओढ स्वतःचा व्यवसाय उभा करण्याकडे होती. 

    ‘अपना’ अ‍ॅपची संकल्पना आणि संघर्ष

    अ‍ॅपलमध्ये काम करत असताना, निर्मित पारेख यांनी असंगठित क्षेत्रातील मोठी अडचण ओळखली. ब्लू-कॉलर नोकऱ्यांसाठी कोणतेही प्रभावी व्यासपीठ नव्हते. त्यामुळे कामगार (employee) आणि नियोक्ते (employer) यांच्यात मोठी दरी निर्माण झाली होती. ही समस्या सोडवण्याचा निर्धार करत त्यांनी २०१९ मध्ये ‘अपना’ अ‍ॅप सुरू करण्यासाठी अ‍ॅपलसारखी मोठी नोकरी सोडली. त्यांच्या या निर्णयावर अनेकांनी टीका केली, काहींनी त्यांना वेड्यात काढले, पण त्यांनी कोणाच्याही मतांची पर्वा न करता स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले.

    व्यवसाय सुरू करताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मोठ्या कंपनीतील सुरक्षित नोकरी सोडून स्वतःचा मार्ग निर्माण करणे सोपे नव्हते. समाजातील अनेकांनी त्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, पण त्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ‘अपना’ ला यश मिळवून दिले. 

    यशाच्या शिखरावर 

    कोरोना काळात ‘अपना’ ॲपने मोठी झेप घेतली. अवघ्या २२ महिन्यांत ते १.१ अब्ज डॉलर (९१०० कोटी रुपये) बाजारमूल्य असलेलं युनिकॉर्न स्टार्टअप बनलं! आज अनअकॅडमी, बिगबास्केट, व्हाईटहॅट ज्युनिअर, फ्लिपकार्ट यांसारख्या १.५ लाखांहून अधिक कंपन्या यावर नोंदणीकृत आहेत. लाखो कामगारांना या प्लॅटफॉर्ममुळे रोजगाराच्या संधी मिळाल्या.

    निर्मित पारेख यांची कहाणी चिकाटी, मेहनत आणि दृढ निश्चयाचा एक उत्तम आदर्श आहे. त्यांच्या जिद्दीमुळे आज ‘अपना’ लाखो लोकांचे करिअर घडवत आहे. जर तुमच्याकडे कल्पना, जिद्द आणि मेहनतीची तयारी असेल, तर तुम्हीही मोठं यश मिळवू शकता! 🚀

    आणखीन वाचा: