कधी कधी आयुष्य इतकी कठीण परीक्षा घेतं की वाटतं, “आपण यातून खरंच बाहेर पडू शकतो का?” पण काही लोक अपयशाने खचत नाहीत; ते त्यातून शिकतात, स्वतःवर विश्वास ठेवतात आणि नव्यानं उभं राहतात. अशा लोकांचं यश केवळ त्यांच्यापुरतं मर्यादित नसतं, तर ते इतरांसाठीही प्रेरणादायी ठरतं.
पवन गुंटुपल्ली हे याचं एक उत्तम उदाहरण आहेत. तेलंगणामधील एका सामान्य कुटुंबातून आलेले पवन यांनी IIT खडगपूरमधून शिक्षण घेतलं. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी स्टार्टअप सुरू करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी ठरला. त्यानंतर ७५ कंपन्यांनी त्यांच्या कल्पनांना नकार दिला. तरीही पवन यांनी नकारांपेक्षा आत्मविश्वासाला अधिक महत्त्व दिलं. आज ते ‘रॅपिडो’ या देशातील आघाडीच्या बाईक-टॅक्सी कंपनीचे सह-संस्थापक आहेत. आजच्या लेखात आपण त्यांच्या या संघर्ष, जिद्द आणि यशाच्या प्रेरणादायी प्रवासावर एक नजर टाकणार आहोत.
सुरुवातीचे आयुष्य
पवन गुंटुपल्ली यांचा जन्म दक्षिण भारतातील तेलंगणामधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणापासूनच ते अभ्यासात अतिशय हुशार होते. मात्र, त्यांचा अभ्यास केवळ पुस्तकापुरता मर्यादित नव्हता, तर त्यांना लहान वयातच ट्रेडिंग आणि संगणक प्रोग्रामिंगमध्ये खूप रस होता. त्यांच्या जिज्ञासेमुळे त्यांनी इतर मुलांपेक्षा वेगळं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला.
त्यांच्या हुशारी आणि अभ्यासू वृत्तीमुळे त्यांना देशातील एक नामांकित संस्थेत, IIT खडगपूरमध्ये थेट प्रवेश मिळाला. IITमध्ये प्रवेश घेणं हे अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. तिथे त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. IITमध्ये मिळालेल्या ज्ञानामुळे आणि वातावरणामुळे त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली.
कंपनीची नोकरी… पण मन अस्वस्थच
पदवी पूर्ण केल्यानंतर पवन यांनी Samsung कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या विभागात काम सुरू केलं. त्यांना चांगली नोकरी मिळाली, चांगला पगार होता आणि परदेशात काम करण्याच्या संधीदेखील होत्या. पण त्यांच्या मनात एक गोष्ट नेहमी चालू होती ती म्हणजे “स्वतःच काहीतरी स्वतःचं असावं!” हा विचार त्यांना कायम प्रेरणा देत होता. त्यामुळे त्यांनी नोकरीच्या सुरक्षिततेच्या बाहेर पडून स्वतःच्या व्यवसायाचा विचार करण्यास सुरुवात केली.
त्यांनी IIT मधील त्यांच्या मित्रासोबत मिळून त्यांनी “IMPS पेमेंट्स” या नव्या तंत्रज्ञानावर आधारित एक स्टार्टअप सुरू केला. त्यांना या स्टार्टअप वर खूप मोठ्या आशा होत्या, पण दुर्दैवाने तो स्टार्टअप फक्त नऊ महिन्यांतच बंद पडला. हा अपयशाचा अनुभव खूप धक्का देणारा होता, पण पवन यांनी हार मानली नाही आणि पुन्हा प्रयत्न करण्याचा निर्धार केला.
दुसरा प्रयत्न, दुसरं अपयश
पहिलं स्टार्टअप अपयशी ठरल्यानंतर पवन यांनी ठरवलं की अजून एकदा प्रयत्न करून पाहायचा. यावेळी त्यांनी ‘TheKarrier’ नावाचं एक मिनी ट्रक लॉजिस्टिक्स स्टार्टअप सुरू केलं. या स्टार्टअपचं उद्दिष्ट छोट्या व्यवसायांना वाहतूक सेवांमध्ये मदत करणं होतं. ही कल्पना खूप उपयोगी होती, आणि सुरुवातीला थोडाफार प्रतिसादही मिळाला.
पण लॉजिस्टिक्स हा व्यवसाय खूप खर्चिक असतो. सुरुवातीलाच वाहनं, कर्मचारी, देखभाल यांसारख्या गोष्टींवर मोठी भांडवली गुंतवणूक करावी लागते. पवन यांच्याकडे त्या वेळी पुरेसं भांडवल नव्हतं, आणि त्यामुळे काही महिन्यांतच हे स्टार्टअपही बंद करावं लागलं. हे दुसऱ्यांदा मिळालेलं अपयश त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का होता, पण तरीही त्यांनी हार मानली नाही. लढत राहण्याचा त्यांनी ठाम निर्धार केला.
बाईकवरून सुचलेली कल्पना
दोन अपयशांनंतर पवन आणि त्यांच्या मित्रांनी विचार केला, “ट्रकसारखं मोठं वाहन चालवणं आणि त्यात व्यवसाय करणं खूप खर्चिक आहे, मग काहीतरी कमी खर्चाचं का करू नये?” याच विचारातून त्यांना एक नवीन कल्पना सुचली ती म्हणजे बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याची. त्यांना वाटलं की जर लोक सामान वाहून नेण्यासाठी ट्रक वापरतात, तर शहरात लवकर पोहोचण्यासाठी बाईकचा वापर का करू नये?
नोव्हेंबर २०१४ मध्ये पवन आणि त्यांच्या आणखी दोन मित्रांनी मिळून “Rapido” या नावाने बाईक टॅक्सी सेवा सुरू केली. ही एक वेगळी आणि नवीन कल्पना होती, जी भारतात फारशी कोणी वापरलेली नव्हती. मात्र या उपक्रमातही सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. नियमावली, परवाने, लोकांचा विश्वास मिळवणं, आणि योग्य चालक शोधणं हे सगळं सोपं नव्हतं. पण त्यांनी हिम्मत न हारता या अडचणींवर मात केली.
अडचणींची रॅपिडो शर्यत
त्या काळात Uber आणि Ola सारख्या मोठ्या कंपन्या आधीच भारतात कॅब सेवा देत होत्या. त्यामुळे स्पर्धा खूपच तीव्र होती. त्यातच बाईक टॅक्सी ही संकल्पना भारतात कायदेशीरदृष्ट्या अजून स्पष्ट नव्हती. त्यामुळे गुंतवणूकदारांना पवन यांची कल्पना फारशी पटत नव्हती. पवन ज्या-ज्या गुंतवणूकदारांकडे गेले, तिथून त्यांना वारंवार नकार मिळत होता. एक-दोन वेळा नव्हे, तब्बल ७५ वेळा!
पण एवढ्या नकारांनंतरही पवन यांनी आशा सोडली नाही. त्यांनी ठरवलं कि, “ज्यांच्याकडे स्वतःची बाईक नाही, त्यांना ही सेवा द्यायची आणि ज्यांच्याकडे बाईक आहे, त्यांना रोजगार द्यायचा.” ही कल्पना केवळ व्यवसायापुरती मर्यादित राहिली नाही, तर समाजासाठीही उपयुक्त ठरली. त्यांनी बाईक चालवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ‘कॅप्टन’ असं संबोधायला सुरुवात केली, जेणेकरून त्यांच्या कामाचा त्यांना अभिमान वाटेल.
यशाच्या शिखरावर
सुरुवातीच्या अनेक अडचणींनंतर अखेर २०१६ साली पवन गुंटुपल्ली यांच्या Rapido ला मोठा टर्निंग पॉईंट मिळाला. Hero MotoCorp चे अध्यक्ष पवन मुंजाल यांनी या स्टार्टअपमध्ये पहिली मोठी गुंतवणूक केली. हाच तो क्षण होता ज्याने Rapido च्या यशाचा पाया मजबूत केला. गुंतवणुकीनंतर कंपनीचा आत्मविश्वास प्रचंड वाढला. ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढू लागली आणि Rapido ने अनेक शहरांमध्ये आपली सेवा सुरू केली.
बंगळुरू, दिल्ली, गुडगाव अशा मोठ्या शहरांमध्ये Rapido च्या बाईक फ्लीट्स धावू लागल्या. २०१९ पर्यंत कंपनी दररोज ७०,००० पेक्षा अधिक ट्रिप्स करत होती. Rapido ला १५० कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आणि त्यांनी १२ शहरांमध्ये आपलं नेटवर्क विस्तारलं. WestBridge Capital, Yamaha आणि Swiggy सारख्या नामांकित कंपन्यांनीही या कल्पनेवर विश्वास ठेवून कोट्यवधींची गुंतवणूक केली.
२०२० मध्ये Rapido ने फक्त बाईकवरच नाही तर ऑटो राईड्स देखील सुरू केल्या. फक्त ५ महिन्यांमध्ये त्यांनी १० लाख ट्रिप्स पूर्ण केल्या आणि तेही Uber आणि Ola पेक्षा जलद! आजच्या घडीला Rapido देशातील १०० हून अधिक शहरांमध्ये कार्यरत आहे. कंपनीकडे ५ कोटींहून अधिक युजर्स, १.५ लाख कॅप्टन्स, आणि जवळपास ६,७०० कोटी रुपयांचं बाजारमूल्य आहे.
मित्रांनो, पवन गुंटुपल्ली यांची कहाणी ही केवळ यशाची नाही, तर आत्मविश्वास, चिकाटी आणि सातत्य यांची शिकवण देणारी आहे. त्यांनी तीन वेळा अपयश अनुभवलं, तब्बल ७५ वेळा नकार ऐकला, पण कधीही हार मानली नाही. त्यांनी हे सिद्ध केलं की यशाची सुरुवात मोठ्या पगाराच्या नोकरीपासून होत नाही, तर ती होते एका छोट्या पण मजबूत कल्पनेवर ठेवलेल्या विश्वासापासून. Rapido हा केवळ बाईक टॅक्सी ब्रँड नाही, तर त्या तरुणाच्या धाडसाचं प्रतीक आहे, ज्याने सगळ्या अडचणींवर मात करून भविष्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं. आजच्या तरुणांनी जर प्रेरणा शोधायची असेल, तर पवन गुंटुपल्ली यांची ही वाटचाल त्यांना नक्कीच एक नवी दिशा दाखवू शकते.

Leave a Reply