नवी अर्थक्रांती

Tag: business

  • Jaideep Barman Success Story: परदेशातील नोकरी सोडून उभारली ₹13,700 कोटींची Rebel Foods कंपनी!

    Jaideep Barman Success Story: परदेशातील नोकरी सोडून उभारली ₹13,700 कोटींची Rebel Foods कंपनी!

    आजच्या काळात अनेक तरुण परदेशात जाऊन उच्च पगाराची नोकरी करण्याचं स्वप्न पाहतात. स्थिर उत्पन्न, सुरक्षित भवितव्य आणि प्रतिष्ठित जीवनशैली हे त्यामागचे मुख्य कारण असतं. मात्र काही मोजके तरुण असे असतात, जे या सुरक्षित वाटेऐवजी वेगळा मार्ग निवडतात. ते जोखीम पत्करून स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करतात आणि स्वतःची ओळख निर्माण करतात.

    अशाच धाडसी विचारसरणीचं उदाहरण म्हणजे Rebel Foods चे संस्थापक जयदीप बर्मन. त्यांनी चांगल्या नोकरीच्या संधी सोडून उद्योजकतेचा मार्ग स्वीकारला आणि आपल्या कल्पकतेच्या जोरावर एक यशस्वी कंपनी उभी केली. त्यांच्या संघर्षातून आणि जिद्दीमधून अनेक तरुणांना आज प्रेरणा मिळते. आजच्या या लेखात आपण जयदीप बर्मन यांचा प्रेरणादायी प्रवास सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

    शिक्षण आणि सुरुवात

    जयदीप बर्मन यांचा जन्म प्राध्यापकांच्या कुटुंबात झाला. लहानपणापासूनच शिक्षणाला महत्त्व असल्यामुळे त्यांनी अभ्यासात चांगली प्रगती केली. त्यांनी IIT कानपूर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि नंतर INSEAD बिझनेस स्कूलमधून MBA केलं . या शिक्षणामुळे त्यांना उत्तम नोकरीच्या संधी मिळाल्या.

    यानंतर त्यांनी McKinsey & Company (UK) मध्ये काम सुरू केलं. नोकरी चांगली होती, पगारही जास्त होता आणि आयुष्य सुरळीत चाललं होतं. तरीही त्यांच्या मनाला समाधान नव्हतं. स्वतःचं काहीतरी करावं, स्वतःचा व्यवसाय उभारावा, ही इच्छा त्यांच्या मनात सतत होती आणि त्याच विचारांनी पुढे त्यांच्या आयुष्याचा नवा प्रवास सुरू झाला.

    समस्येतून शोधली संधी

    जयदीप बर्मन यांनी McKinsey मध्ये जाण्यापूर्वी Brainvisa या ई-लर्निंग स्टार्टअपमध्ये काम केलं होतं. कोलकात्याचे असल्यामुळे त्यांना चांगल्या आणि वेगवेगळ्या चवींच्या जेवणाची विशेष आवड होती. मात्र कामाच्या धावपळीत बाहेर खाल्ल्यावर अनेकदा अन्न स्वच्छ नसायचं, दर्जा अपेक्षेप्रमाणे मिळत नव्हता आणि जेवणाच्या किमतीही जास्त होत्या . रोजच्या आयुष्यात ही अडचण त्यांना वारंवार जाणवत होती.

    हळूहळू त्यांना लक्षात आलं की ही समस्या केवळ त्यांचीच नाही, तर अनेक नोकरदार तरुणांना ती भेडसावत आहे. स्वच्छ, चवदार आणि परवडणारं अन्न सहज उपलब्ध होत नव्हतं. तेव्हा त्यांनी या समस्येकडे केवळ तक्रार म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले. नोकरी करत असतानाच अन्न व्यवसायाबद्दल विचार सुरू केला आणि “लोकांना चांगलं अन्न सहज कसं मिळेल?” हा प्रश्न त्यांच्या उद्योजक प्रवासाची सुरुवात ठरला.

    Faasos ची सुरुवात

    २००४ साली, जयदीप बर्मन यांनी आपल्या INSEAD मधील मित्र कल्लोल बॅनर्जी यांच्या सोबत पुण्यात “Faasos” या नावाचं पहिलं आउटलेट सुरू केलं. त्यांच्या जवळ फार मोठी भांडवलरक्कम नव्हती, फक्त सुमारे ८ लाख रुपयांची बचत होती. तरीही आत्मविश्वास आणि कल्पनेवर विश्वास ठेवून त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला. Faasos हे Quick Service Restaurant (QSR) स्वरूपाचे होते, जिथे रोल्स आणि रॅप्ससारखे सहज खाता येणारे पदार्थ विकले जात होते.

    Faasos मागची त्यांची संकल्पना खूपच सरळ आणि स्पष्ट होती. ग्राहकांना नेहमी एकसारखी आणि चांगली गुणवत्ता मिळावी, अन्नाचे दर सर्वसामान्यांना परवडणारे असावेत आणि सेवा जलद व सोयीस्कर असावी, यावर त्यांनी विशेष भर दिला. याच तीन गोष्टींमुळे Faasos लवकरच तरुणांमध्ये लोकप्रिय झाले आणि त्यांच्या  पुढील व्यवसायिक यशाची पायाभरणी झाली.

    मोठा टर्निंग पॉइंट

    Faasos ने केंद्रीय किचन न ठेवता खूप स्मार्ट योजना वापरली. त्यांनी मोठ्या जागा भाड्याने घेण्याऐवजी रिअल इस्टेट खर्च फक्त १५% ठेवला. फक्त टेक-अवे आणि २५ मिनिटांत जेवण पोहोचवण्यावर लक्ष दिलं. या पद्धतीमुळे कमी खर्चात १८ आउटलेट्स सुरू झाली आणि व्यवसाय झपाट्याने वाढू लागला.

    मुंबईत यश मिळाल्यानंतर २०११ मध्ये Sequoia Capital कडून ३० कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली. २०१३ पर्यंत मुंबई व पुण्यात ५० आउटलेट्स झाली आणि महसूल २७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. ८०% आउटलेट्स तीन महिन्यांत नफ्यात आली. पण एक मोठी गोष्ट समोर आली ती म्हणजे ७४% ग्राहकांनी Faasos चे रेस्टॉरंट कधी पाहिलंच नव्हतं. तेव्हाच जयदीप बर्मन यांना कळलं की भविष्य थेट फूड डिलिव्हरीमध्येच आहे.

    क्लाउड किचनची क्रांती

    २०१५ मध्ये Faasos ने मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आणि पूर्णपणे क्लाउड किचन (डार्क किचन) मॉडेल स्वीकारलं. यामुळे दुकान, बसण्याची व्यवस्था आणि जादा खर्च टाळता आला. त्या काळात ७०% ऑर्डर्स मोबाइल अ‍ॅपवरून येत होत्या, दरमहा सुमारे ५०,००० ऑर्डर्स मिळत होत्या आणि ९० आउटलेट्स कार्यरत होती. या यशस्वी बदलामुळे Lightbox कडून १२० कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली.

    यानंतर Faasos ने मल्टी-ब्रँड रणनीती स्वीकारली. डिसेंबर २०१५ पर्यंत कंपनी १५ शहरांत, १६० वितरण केंद्रांमधून काम करत होती आणि दररोज सुमारे ३.५ लाख ऑर्डर्स पूर्ण करत होती. या झपाट्याने वाढलेल्या व्यवसायामुळे ru-Net कडून २०० कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आणि कंपनीचं व्हॅल्युएशन ८२० कोटी रुपये इतकं झालं.

    Rebel Foods -नवं रूप

    २०१८ मध्ये Faasos चे नाव बदलून “Rebel Foods” ठेवण्यात आलं. या बदलासोबत कंपनीने स्वतःला मल्टी-ब्रँड व्हर्च्युअल रेस्टॉरंट प्लॅटफॉर्म म्हणून उभं केलं. एका किचनमधून अनेक ब्रँड्स चालवण्याची ही कल्पना होती आणि त्या वेळी Rebel Foods कडे ११ वेगवेगळे ब्रँड्स होते.

    २०१९ मध्ये कंपनीची वाढ आणखी वेगाने झाली. Rebel Foods चा महसूल ३१०.३७ कोटी रुपये झाला, कंपनी २० शहरांत कार्यरत होती आणि २३५ क्लाउड किचन्स चालवत होती. दरमहा सुमारे २० लाख ऑर्डर्स मिळत होत्या. Coatue कडून ८६३ कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाल्यानंतर कंपनीचं मूल्य २,६९० कोटी रुपये इतकं झालं.

    युनिकॉर्नचा टप्पा

    ७ ऑक्टोबर २०२१ हा Rebel Foods साठी ऐतिहासिक दिवस ठरला. QIA च्या नेतृत्वाखाली कंपनीत १,४२० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आणि त्यामुळे कंपनीचं मूल्य ९,७५० कोटी रुपये इतकं झालं. याच वर्षी Rebel Foods ही भारतातील ३२ वी युनिकॉर्न कंपनी म्हणून ओळखली जाऊ लागली.

     आज Rebel Foods म्हणजे प्रचंड वेगाने वाढलेली फूड-टेक कंपनी आहे. सध्या कंपनीचा महसूल १,४२० कोटी रुपये आहे. Rebel Foods ची उपस्थिती १० देशांमध्ये आहे, जिथे ४५० किचन्स, ४५ ब्रँड्स आणि सुमारे ४,००० इंटरनेट रेस्टॉरंट्स कार्यरत आहेत.

    मित्रांनो, कोणाला वाटलं असतं की McKinsey UK मध्ये उच्च पगार मिळवणारा एक प्रोफेशनल भारतात परत येऊन १३,७०० कोटी रुपये मूल्याची भारतातील सर्वात मोठी फूड-टेक कंपनी उभारेल? जयदीप बर्मन यांची ही कथा दाखवते की जर समस्या ओळखण्याची दृष्टी, धाडस आणि सतत बदल स्वीकारण्याची तयारी असेल, तर कोणतंही स्वप्न अशक्य नाही. ही कथा प्रत्येक उद्योजक, स्टार्टअप फाउंडर आणि स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खरी प्रेरणा आहे.

  • Cyber Crime: सायबर चोर तुमचा डेटा कसा चोरतात?

    Cyber Crime: सायबर चोर तुमचा डेटा कसा चोरतात?

    आजच्या डिजिटल युगात, इंटरनेटचा वापर हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. बँकिंग, शॉपिंग, सोशल मीडिया, कामकाज आणि मनोरंजनासाठी आपण सर्वत्र इंटरनेटचा वापर करत असतो. मात्र, याच डिजिटल सुविधा आपल्या सुरक्षिततेला मोठा धोका ठरू शकतात. सायबर क्राइम म्हणजेच सायबर गुन्हेगारी वाढत चालली आहे, आणि सायबर चोर, ज्यांना हॅकर्स म्हणतात, आपल्या संवेदनशील माहितीचा गैरवापर करून आपल्याला आर्थिक व मानसिक नुकसान पोहोचवतात.

    हॅकर्सचा मुख्य उद्देश म्हणजे वैयक्तिक माहिती चोरणे आणि तिचा वापर करून गैरफायदा मिळवणे. ही माहिती विविध प्रकारची असते – बँक खाते तपशील, पासवर्ड्स, क्रेडिट कार्ड डिटेल्स, सोशल मीडिया प्रोफाइल्स, आणि इतर गोपनीय डेटा. हे डेटा चोरीसाठी हे लोक अनेक प्रकारच्या युक्त्या आणि तंत्रज्ञानाचा वापर करतात.

    जसे की, आपण बँकेचे व्यवहार ऑनलाइन करताना, सोशल मीडियावर अकाउंट बनवताना, किंवा एखाद्या ई-कॉमर्स साइटवर खरेदी करताना आपल्या गोपनीय माहितीचा योग्य प्रकारे वापर होत आहे का, याची खात्री करणे आवश्यक आहे. अन्यथा, या माहितीचा गैरवापर होऊन आपण आर्थिक फसवणुकीला बळी पडू शकतो.

    या लेखात आपण सायबर गुन्हेगार कशा प्रकारे माहिती चोरतात , त्यांच्या ट्रिक्स काय असतात ,आणि त्यापासून स्वत:ला सुरक्षित कसे ठेवायचे याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 

    सायबर गुन्हेगार कसा मिळवतात डेटा?

     फिशिंग अटॅक (Phishing Attack)

    फिशिंग हा एक अतिशय सामान्य प्रकारचा सायबर हल्ला आहे. फिशिंग मध्ये, हॅकर्स आपल्याला विश्वासार्ह वाटणारी ईमेल्स किंवा संदेश पाठवतात. हे ईमेल्स तुम्हाला बँक, सरकारी संस्थांशी संबंधित, किंवा इतर प्रसिद्ध वेबसाइट्सकडून आलेले असतात. या ईमेल्समध्ये लिंक दिलेली असते जी फसवणूक करण्यासाठी तयार केली गेली असते. हॅकर्स त्या लिंकवर क्लिक करण्यासाठी तुम्हाला लवकर उत्तर देण्यास किंवा कधी कधी पासवर्ड, बँक तपशील वगैरे मागतात. जर तुम्ही त्या लिंकवर क्लिक केले आणि तुमचं गोपनीय डेटा त्यांना दिला, तर हॅकर्स तुमचं सर्व माहिती चोरून तुमच्यावर हल्ला करू शकतात.

    मैलवेयर (Malware)

    मेलवेयर म्हणजे हॅकर्सच्या सॉफ्टवेअरचा एक प्रकार जो आपल्या डिव्हाइसवर इन्स्टॉल होतो आणि तो आपली माहिती चोरी करू शकतो. हा मेलवेयर तुम्ही डाउनलोड केलेल्या ॲप्स, लिंक किंवा फाइल्सद्वारे तुमच्या संगणकावर, स्मार्टफोनवर किंवा टॅबलेटवर येऊ शकतो. एकदा मेलवेयर इन्स्टॉल झाल्यावर, हॅकर्स तुमच्या डिव्हाइसच्या सर्व डेटा हाताळू शकतात. यामुळे तुमचं बॅंक खातं, क्रेडिट कार्ड डिटेल्स आणि इतर गोपनीय माहिती चोरली जाऊ शकते.

    रॅन्समवेयर (Ransomware)

    रॅन्समवेयर हा  मेलवेयरचा  एक विशेष प्रकार आहे. यात हॅकर्स तुमच्या संगणकावर किंवा डिव्हाइसवर असलेल्या फाइल्स लॉक करतात आणि त्या फाइल्सना परत मिळवण्यासाठी तुम्हाला पैसे (रॅन्सम) मागतात. हा हल्ला अधिक धोका देणारा असतो, कारण हॅकर्स तुमच्या महत्त्वाच्या फाइल्सना लॉक करतात आणि त्यावर पैसे न दिल्यास हॅकर्स तुमचे खूप नुकसान करू शकतात. 

    डेटाबेस हॅकिंग (Database Hacking)

    मोठ्या कंपन्यांच्या डेटाबेसवर हल्ला करून सायबर चोर लाखो लोकांची गोपनीय माहिती मिळवू शकतात. हॅकर्स डेटाबेसमध्ये प्रवेश करून त्या कंपन्यांच्या ग्राहकांची माहिती चोरतात. या डेटाबेसमध्ये तुमचे बँक खात्याचे तपशील, पासवर्ड्स, ईमेल पत्ते, फोन नंबर आणि इतर महत्त्वाची माहिती असू शकते. हॅकर्स या माहितीचा वापर करून तुमचं आर्थिक नुकसान करू शकतात.

     पब्लिक Wi-Fi हॅकिंग (Public Wi-Fi Hacking)

    सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क्स, जसे की कॉफी शॉप्स, मॉल्स, किंवा विमानतळांवर असतात, हे सायबर गुन्हेगारांसाठी अतिशय सोपं लक्ष्य असतात. सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क वापरताना, हॅकर्स तुमचा डेटा इंटरसेप्ट करून त्याला हॅक करू शकतात. त्यामुळे तुमची बँकिंग माहिती, पासवर्ड्स, आणि अन्य गोपनीय डेटा चोरी होण्याचा धोका असतो.

    पासवर्ड हॅकिंग (Password Hacking)

    पासवर्ड हॅकिंग म्हणजे सायबर हल्ल्याचा एक प्रकार, ज्यामध्ये हॅकर्स तुमचा पासवर्ड शोधून तुमच्या खात्यांवर ताबा मिळवतात. यातून ते तुमच्या वैयक्तिक माहितीपर्यंत सहज पोहोचू शकतात. जर तुमचा पासवर्ड खूप सोपा असेल किंवा तो तुमच्या जन्मतारीखेसारख्या सहज ओळखता येणाऱ्या गोष्टींवर आधारित असेल, तर तो हॅक होण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच, पासवर्ड सुरक्षित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

    सायबर गुन्हेगारांपासून आपली सुरक्षा कशी वाढवू शकतो?

    1. सुरक्षित पासवर्ड वापरा

    तुमचा पासवर्ड खात्यांची सुरक्षा जपण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक खात्यासाठी वेगळा पासवर्ड ठेवा. मोठी-छोटी अक्षरे, अंक, आणि विशेष चिन्हे (जसे @, #) वापरून पासवर्ड तयार करा. पासवर्ड लांब आणि मजबूत ठेवा, जसे की  MySecure@1234. सगळे पासवर्ड लक्षात ठेवण्यासाठी पासवर्ड मॅनेजर वापरा.

    2. फिशिंग ईमेल्सपासून सावध राहा

    तुम्हाला आलेले अज्ञात ईमेल्स, संदेश, किंवा लिंक तपासून पाहा. तुमच्याशी संबंधित संस्थांकडून किंवा बँकांकडून आलेले संदेश शक्यतो अधिकृत वेबसाईटवरून किंवा त्यांच्या अधिकृत एप्लिकेशनद्वारेच आले पाहिजे. कधीही कोणत्याही  संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.

    3. अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आणि फायरवॉल वापरा

    तुमच्या डिव्हाइसवर अँटीव्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा, जे तुमचा डेटा मेलवेयर आणि इतर हानिकारक सॉफ्टवेअरपासून संरक्षित ठेवू शकतं. तसेच, फायरवॉल वापरून तुमच्या संगणकाचं  नेटवर्क कनेक्शन अधिक सुरक्षित ठेवा.

    4. VPN वापरा

    सार्वजनिक Wi-Fi नेटवर्क वापरताना, तुमचा इंटरनेट कनेक्शन अधिक सुरक्षित करण्यासाठी VPN (Virtual Private Network) वापरा. यामुळे तुमचा डेटा एन्क्रिप्ट होतो आणि हॅकर्सला तुमच्या माहितीचा प्रवेश मिळवता येत नाही.

    5. सुरक्षा अपडेट्स करा

    तुमच्या स्मार्टफोन, संगणक किंवा इतर डिव्हाइसवर नियमितपणे सुरक्षा अपडेट्स करा. या अपडेट्समुळे तुमच्या डिव्हाइसला नवीनतम सुरक्षा चुकवण्यापासून संरक्षित केले जाते.

    6. बॅकअप आणि डेटा पुनर्प्राप्ती

    महत्त्वाच्या फाइल्स आणि डेटाचा कायम बॅकअप ठेवा. यामुळे रॅन्समवेअर किंवा इतर तांत्रिक समस्यांमुळे डेटा हरवल्यास तो पुन्हा मिळवता येईल. डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी नियमित बॅकअप घेणे खूप गरजेचे आहे.

    7.टू-स्टेप व्हेरिफिकेशन

     ही ऑनलाईन खात्यांसाठी अतिरिक्त सुरक्षा प्रणाली आहे. यात पासवर्डसोबतच एक अतिरिक्त पडताळणीचा टप्पा असतो, जसे की ओटीपी, ऑथेंटिकेटर ॲपद्वारे मिळणारा कोड किंवा बायोमेट्रिक तपशील. यामुळे खातं अधिक सुरक्षित राहतं आणि हॅकिंगची जोखीम कमी होते. सेटअप करण्यासाठी, करा.

    मित्रांनो , अलीकडच्या काळात सायबर भामटे आणि डेटा चोरी ही एक गंभीर समस्या बनली आहे, आणि तिचा परिणाम आपल्या व्यक्तिगत, व्यावसायिक, आणि वित्तीय जीवनावर होऊ शकतो. परंतु, काही साधे आणि महत्त्वाचे उपाय करून आपण आपली माहिती सुरक्षित ठेवू शकतो. फिशिंग ईमेलपासून, मेलवेयरपासून, रॅन्समवेयरपासून आणि सार्वजनिक Wi-Fi हॅकिंगपासून बचाव करण्यासाठी आपली सुरक्षा मजबूत करा. इंटरनेटवर सावधगिरी आणि सुरक्षिततेच्या उपायांनी आपण सायबर भामट्यांना हद्दपार करू शकतो.

  • माणूस बोलायला कसा शिकला? भाषेच्या उगमाची रंजक गाथा

    माणूस बोलायला कसा शिकला? भाषेच्या उगमाची रंजक गाथा

    कधी शांतपणे बसून स्वतःलाच विचारलाय का?  या विशाल जगात हजारो भाषा असताना आपण जी भाषा बोलतो, ती नेमकी कशी जन्माला आली असेल? पृथ्वीवर असंख्य प्राणी, पक्षी आणि सजीव आहेत. त्यांनाही आवाज आहे, हाका आहेत, संकेत आहेत. पण मनात उमटणाऱ्या विचारांना अर्थपूर्ण शब्द देण्याचं, भावनांना स्पष्ट आकार देण्याचं सामर्थ्य मात्र माणसालाच का लाभलं? साधारण वाटणारा हा प्रश्न आपल्याला मानवी उत्क्रांतीच्या अतिशय गूढ आणि सुंदर प्रवासाकडे घेऊन जातो.

    मानवाने सुरुवातीला कदाचित हावभाव केले, आवाज काढले, संकेत दिले. हळूहळू त्या संकेतांना अर्थ मिळाला, अर्थांना शब्द मिळाले, आणि शब्दांनी मिळून भाषा घडली. हीच भाषा पुढे संस्कृती बनली, ओळख बनली, नाती जोडणारा सेतू बनली. आज आपण जे बोलतो, लिहितो, व्यक्त करतो , त्यामागे हजारो वर्षांचा अनुभव, शोध आणि संवाद दडलेला आहे. या लेखातून आपण भाषेच्या जन्माची ही  रंजक कहाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

    कंठस्थी – आवाजापासून विचारांपर्यंतचा प्रवास

    आपल्या गळ्यात एक छोटंसं पण अत्यंत महत्त्वाचं हाड असतं ,हयॉइड बोन, ज्याला मराठीत कंठस्थी म्हणतात. हे हाड जीभ आणि स्वरयंत्राला आधार देतं आणि आपण स्पष्ट आवाज काढू शकतो यासाठी मदत करतं. आकाराने लहान असलं तरी बोलण्याच्या प्रक्रियेत याची भूमिका खूप मोठी आहे. प्राण्यांमध्येही हे हाड आढळतं. उदाहरणार्थ, काही माकडांना मोठ्या आवाजात डरकाळी फोडता येते, कारण त्यांच्या कंठस्थीची रचना वेगळी असते.

    पण माणसांमध्ये या हाडाचा आकार, त्याची योग्य जागा आणि त्यासोबत मेंदूची विकसित क्षमता , या सगळ्यांचा एकत्र परिणाम म्हणजे भाषा. आपण फक्त आवाज काढत नाही, तर त्या आवाजांना अर्थ देतो. गुंतागुंतीची वाक्यं बोलतो, भावना व्यक्त करतो, कल्पना मांडतो. म्हणूनच हे लहानसं हाड आपल्या बोलण्यामागचं एक मोठं गूढ ठरतं.

    भाषेची सुरुवात किती जुनी?

    भाषेची सुरुवात नेमकी कधी झाली, याचं अचूक उत्तर अजून सापडलं नाही. मात्र जीवाश्मांच्या अभ्यासातून शास्त्रज्ञ असा अंदाज लावतात की किमान १,३५,००० वर्षांपूर्वी मानवामध्ये बोलण्याची क्षमता विकसित झाली होती. म्हणजेच त्या काळातला माणूस केवळ आवाज काढत नव्हता, तर अर्थपूर्ण संवाद साधत होता.

    डीएनए संशोधनातूनही याबाबत एक महत्त्वाची माहिती मिळते. FOXP2 नावाचं एक जनुक भाषेशी संबंधित मानलं जातं. हे जनुक आधुनिक मानवात आणि त्यांच्या निअँडरथल पूर्वजांमध्येही आढळतं. पण मानवामध्ये या जनुकात झालेला एक खास बदल भाषिक कौशल्याच्या विकासाशी जोडला जातो. मेंदूमधील संवाद नियंत्रित करणाऱ्या भागांवर याचा प्रभाव पडतो, असं संशोधन सांगतं.

    विशेष म्हणजे FOXP2 हे फक्त माणसांतच नाही, तर काही प्राणी, पक्षी आणि माशांमध्येही आढळतं. तरीसुद्धा माणसांमध्ये शरीररचना आणि बुद्धिमत्ता यांचा जो अनोखा संगम झाला, त्यातूनच परिष्कृत आणि गुंतागुंतीची भाषा तयार झाली. म्हणूनच मानवी भाषा इतकी समृद्ध, अर्थपूर्ण आणि इतर सजीवांपेक्षा वेगळी आहे.

    मानवी संवादाची सुरुवात कुठून झाली?

    संवादाचा  उगम कसा झाला, याबद्दल अनेक मतं मांडली गेली आहेत. काही संशोधकांच्या मते सुरुवातीला मानव हातवारे, हावभाव आणि खुणांच्या माध्यमातून संवाद साधत असे. हत्यारं तयार करताना लागणारी विचारशक्ती आणि नियोजनाची सवय यामुळे विचारांना एक ठराविक रचना मिळाली. पुढे हेच विचार शब्दांच्या रूपात व्यक्त होऊ लागले असावेत. म्हणजे खुणांपासून शब्दांपर्यंतचा हा प्रवास हळूहळू घडत गेला.

    दुसरं मत असं सांगतं की भाषा ही समाज टिकवण्यासाठी गरजेची ठरली. मानव मोठ्या समूहात राहू लागला तसं एकमेकांना माहिती देणं, धोका सांगणं, काळजी घेणं आवश्यक झालं. या गरजेतून संवाद वाढला. पुढे त्यातून गप्पा, कथा आणि अनुभव शेअर करण्याची सवय निर्माण झाली. अशा प्रकारे भाषा सामाजिक बंध अधिक मजबूत करण्याचं साधन बनली.

    आणखी एक वेगळा विचार भाषातज्ज्ञ Noam Chomsky यांनी मांडला. त्यांच्या मते, भाषेची क्षमता माणसाच्या मेंदूत जन्मतःच असते. म्हणजे भाषा आपण फक्त शिकत नाही, तर तिचं बीज आपल्यात आधीपासूनच असतं. कदाचित सत्य या सर्व विचारांच्या संगमात दडलं असेल  मेंदू विकसित होत होता, समाज विस्तारत होता, आणि या सगळ्या प्रक्रियेतून भाषा हळूहळू आकार घेत होती.

    जगातील भाषा – वैविध्याची फुलं

    आज जगभरात ७,००० हून अधिक भाषा बोलल्या जातात. मानव पूर्व आफ्रिकेतून वेगवेगळ्या प्रदेशांत पसरला, आणि प्रत्येक ठिकाणी त्याची भाषा वेगळ्या पद्धतीने विकसित होत गेली. त्यामुळेच आज आपल्याला भाषांचं अफाट वैविध्य पाहायला मिळतं. काही भाषा बोलण्यापुरत्याच मर्यादित राहिल्या, तर काहींनी लिखित स्वरूप धारण करून इतिहास जपला. सर्वात प्राचीन लिखित भाषांमध्ये Sumerian, Egyptian आणि Akkadian यांचा समावेश होतो.

    आजही वापरात असलेल्या सर्वात प्राचीन भाषांपैकी एक म्हणजे Tamil. तिची लिखित परंपरा सुमारे २५०० वर्षांपूर्वीपर्यंत मागे जाते, आणि आजही भारतासह श्रीलंका, मलेशिया व सिंगापूरमध्ये ती बोलली जाते. त्याचप्रमाणे Chinese भाषांची मुळेही प्राचीन काळात खोलवर रुजलेली आहेत. Shang dynasty काळातील सुमारे ३००० वर्षांपूर्वीच्या शिलालेखांमध्ये त्याचे पुरावे सापडतात, ज्यातून भाषेचा हा दीर्घ आणि समृद्ध प्रवास दिसून येतो.

    मित्रांनो, भाषा आपल्याला कथा सांगायला शिकवते, स्वप्नांना रंग भरायला मदत करते, भूतकाळात डोकावण्याची आणि भविष्याची कल्पना करण्याची ताकद देते. आपण “काल काय घडलं” आणि “उद्या काय होईल” याबद्दल सहज बोलू शकतो , हीच भाषेची खरी जादू आहे. शब्दांमुळे वेळेच्या मर्यादा ओलांडणं शक्य होतं; अनुभव जपता येतात आणि आशा व्यक्त करता येते.

    आज डिजिटल युगात भाषा अधिक वेगाने बदलते आहे. नवे शब्द, नवे अर्थ, स्लँग, चिन्हं ,प्रत्येक पिढी आपल्या पद्धतीने संवादाची नवी शैली घडवते आहे. तरीही भाषेचा पाया बदललेला नाही. माणसाला समोरच्याशी जोडून घ्यायचं आहे, स्वतःला व्यक्त करायचं आहे आणि एकमेकांना समजून घ्यायचं आहे. कदाचित मानवाने पहिल्यांदा बोलायला सुरुवात केली तेव्हा त्याला कल्पना नसेल की शब्द इतके प्रभावी ठरतील; पण आज आपण बोलतो तेव्हा केवळ आवाज करत नाही, तर इतिहास, विज्ञान, भावना आणि भविष्य यांना एकत्र उच्चारत असतो.

  • अडचणींवर मात करत ₹६७०० कोटींची कंपनी: रॅपिडोचा प्रेरणादायी प्रवास

    अडचणींवर मात करत ₹६७०० कोटींची कंपनी: रॅपिडोचा प्रेरणादायी प्रवास

    कधी कधी आयुष्य इतकी कठीण परीक्षा घेतं की वाटतं, “आपण यातून खरंच बाहेर पडू शकतो का?” पण काही लोक अपयशाने खचत नाहीत; ते त्यातून शिकतात, स्वतःवर विश्वास ठेवतात आणि नव्यानं उभं राहतात. अशा लोकांचं यश केवळ त्यांच्यापुरतं मर्यादित नसतं, तर ते इतरांसाठीही प्रेरणादायी ठरतं.


    पवन गुंटुपल्ली हे याचं एक उत्तम उदाहरण आहेत. तेलंगणामधील एका सामान्य कुटुंबातून आलेले पवन यांनी IIT खडगपूरमधून शिक्षण घेतलं. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी स्टार्टअप सुरू करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी ठरला. त्यानंतर ७५ कंपन्यांनी त्यांच्या कल्पनांना नकार दिला. तरीही पवन यांनी नकारांपेक्षा आत्मविश्वासाला अधिक महत्त्व दिलं. आज ते ‘रॅपिडो’ या देशातील आघाडीच्या बाईक-टॅक्सी कंपनीचे सह-संस्थापक आहेत. आजच्या लेखात आपण त्यांच्या या संघर्ष, जिद्द आणि यशाच्या प्रेरणादायी प्रवासावर एक नजर टाकणार आहोत.


    सुरुवातीचे आयुष्य


    पवन गुंटुपल्ली यांचा जन्म दक्षिण भारतातील तेलंगणामधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणापासूनच ते अभ्यासात अतिशय हुशार होते. मात्र, त्यांचा अभ्यास केवळ पुस्तकापुरता मर्यादित नव्हता, तर त्यांना लहान वयातच ट्रेडिंग आणि संगणक प्रोग्रामिंगमध्ये खूप रस होता. त्यांच्या जिज्ञासेमुळे त्यांनी इतर मुलांपेक्षा वेगळं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला.
    त्यांच्या हुशारी आणि अभ्यासू वृत्तीमुळे त्यांना देशातील एक नामांकित संस्थेत, IIT खडगपूरमध्ये थेट प्रवेश मिळाला. IITमध्ये प्रवेश घेणं हे अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. तिथे त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. IITमध्ये मिळालेल्या ज्ञानामुळे आणि वातावरणामुळे त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली.

    कंपनीची नोकरी… पण मन अस्वस्थच


    पदवी पूर्ण केल्यानंतर पवन यांनी Samsung कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या विभागात काम सुरू केलं. त्यांना चांगली नोकरी मिळाली, चांगला पगार होता आणि परदेशात काम करण्याच्या संधीदेखील होत्या. पण त्यांच्या मनात एक गोष्ट नेहमी चालू होती ती म्हणजे “स्वतःच काहीतरी स्वतःचं असावं!” हा विचार त्यांना कायम प्रेरणा देत होता. त्यामुळे त्यांनी नोकरीच्या सुरक्षिततेच्या बाहेर पडून स्वतःच्या व्यवसायाचा विचार करण्यास सुरुवात केली.
    त्यांनी IIT मधील त्यांच्या मित्रासोबत मिळून त्यांनी “IMPS पेमेंट्स” या नव्या तंत्रज्ञानावर आधारित एक स्टार्टअप सुरू केला. त्यांना या स्टार्टअप वर खूप मोठ्या आशा होत्या, पण दुर्दैवाने तो स्टार्टअप फक्त नऊ महिन्यांतच बंद पडला. हा अपयशाचा अनुभव खूप धक्का देणारा होता, पण पवन यांनी हार मानली नाही आणि पुन्हा प्रयत्न करण्याचा निर्धार केला.

    दुसरा प्रयत्न, दुसरं अपयश

    पहिलं स्टार्टअप अपयशी ठरल्यानंतर पवन यांनी ठरवलं की अजून एकदा प्रयत्न करून पाहायचा. यावेळी त्यांनी ‘TheKarrier’ नावाचं एक मिनी ट्रक लॉजिस्टिक्स स्टार्टअप सुरू केलं. या स्टार्टअपचं उद्दिष्ट छोट्या व्यवसायांना वाहतूक सेवांमध्ये मदत करणं होतं. ही कल्पना खूप उपयोगी होती, आणि सुरुवातीला थोडाफार प्रतिसादही मिळाला.
    पण लॉजिस्टिक्स हा व्यवसाय खूप खर्चिक असतो. सुरुवातीलाच वाहनं, कर्मचारी, देखभाल यांसारख्या गोष्टींवर मोठी भांडवली गुंतवणूक करावी लागते. पवन यांच्याकडे त्या वेळी पुरेसं भांडवल नव्हतं, आणि त्यामुळे काही महिन्यांतच हे स्टार्टअपही बंद करावं लागलं. हे दुसऱ्यांदा मिळालेलं अपयश त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का होता, पण तरीही त्यांनी हार मानली नाही. लढत राहण्याचा त्यांनी ठाम निर्धार केला.
    बाईकवरून सुचलेली कल्पना


    दोन अपयशांनंतर पवन आणि त्यांच्या मित्रांनी विचार केला, “ट्रकसारखं मोठं वाहन चालवणं आणि त्यात व्यवसाय करणं खूप खर्चिक आहे, मग काहीतरी कमी खर्चाचं का करू नये?” याच विचारातून त्यांना एक नवीन कल्पना सुचली ती म्हणजे बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याची. त्यांना वाटलं की जर लोक सामान वाहून नेण्यासाठी ट्रक वापरतात, तर शहरात लवकर पोहोचण्यासाठी बाईकचा वापर का करू नये?
    नोव्हेंबर २०१४ मध्ये पवन आणि त्यांच्या आणखी दोन मित्रांनी मिळून “Rapido” या नावाने बाईक टॅक्सी सेवा सुरू केली. ही एक वेगळी आणि नवीन कल्पना होती, जी भारतात फारशी कोणी वापरलेली नव्हती. मात्र या उपक्रमातही सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. नियमावली, परवाने, लोकांचा विश्वास मिळवणं, आणि योग्य चालक शोधणं हे सगळं सोपं नव्हतं. पण त्यांनी हिम्मत न हारता या अडचणींवर मात केली.

    अडचणींची रॅपिडो शर्यत
    त्या काळात Uber आणि Ola सारख्या मोठ्या कंपन्या आधीच भारतात कॅब सेवा देत होत्या. त्यामुळे स्पर्धा खूपच तीव्र होती. त्यातच बाईक टॅक्सी ही संकल्पना भारतात कायदेशीरदृष्ट्या अजून स्पष्ट नव्हती. त्यामुळे गुंतवणूकदारांना पवन यांची कल्पना फारशी पटत नव्हती. पवन ज्या-ज्या गुंतवणूकदारांकडे गेले, तिथून त्यांना वारंवार नकार मिळत होता. एक-दोन वेळा नव्हे, तब्बल ७५ वेळा!
    पण एवढ्या नकारांनंतरही पवन यांनी आशा सोडली नाही. त्यांनी ठरवलं कि, “ज्यांच्याकडे स्वतःची बाईक नाही, त्यांना ही सेवा द्यायची आणि ज्यांच्याकडे बाईक आहे, त्यांना रोजगार द्यायचा.” ही कल्पना केवळ व्यवसायापुरती मर्यादित राहिली नाही, तर समाजासाठीही उपयुक्त ठरली. त्यांनी बाईक चालवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ‘कॅप्टन’ असं संबोधायला सुरुवात केली, जेणेकरून त्यांच्या कामाचा त्यांना अभिमान वाटेल.
    यशाच्या शिखरावर
    सुरुवातीच्या अनेक अडचणींनंतर अखेर २०१६ साली पवन गुंटुपल्ली यांच्या Rapido ला मोठा टर्निंग पॉईंट मिळाला. Hero MotoCorp चे अध्यक्ष पवन मुंजाल यांनी या स्टार्टअपमध्ये पहिली मोठी गुंतवणूक केली. हाच तो क्षण होता ज्याने Rapido च्या यशाचा पाया मजबूत केला. गुंतवणुकीनंतर कंपनीचा आत्मविश्वास प्रचंड वाढला. ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढू लागली आणि Rapido ने अनेक शहरांमध्ये आपली सेवा सुरू केली.


    बंगळुरू, दिल्ली, गुडगाव अशा मोठ्या शहरांमध्ये Rapido च्या बाईक फ्लीट्स धावू लागल्या. २०१९ पर्यंत कंपनी दररोज ७०,००० पेक्षा अधिक ट्रिप्स करत होती. Rapido ला १५० कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आणि त्यांनी १२ शहरांमध्ये आपलं नेटवर्क विस्तारलं. WestBridge Capital, Yamaha आणि Swiggy सारख्या नामांकित कंपन्यांनीही या कल्पनेवर विश्वास ठेवून कोट्यवधींची गुंतवणूक केली.
    २०२० मध्ये Rapido ने फक्त बाईकवरच नाही तर ऑटो राईड्स देखील सुरू केल्या. फक्त ५ महिन्यांमध्ये त्यांनी १० लाख ट्रिप्स पूर्ण केल्या आणि तेही Uber आणि Ola पेक्षा जलद! आजच्या घडीला Rapido देशातील १०० हून अधिक शहरांमध्ये कार्यरत आहे. कंपनीकडे ५ कोटींहून अधिक युजर्स, १.५ लाख कॅप्टन्स, आणि जवळपास ६,७०० कोटी रुपयांचं बाजारमूल्य आहे.

    मित्रांनो, पवन गुंटुपल्ली यांची कहाणी ही केवळ यशाची नाही, तर आत्मविश्वास, चिकाटी आणि सातत्य यांची शिकवण देणारी आहे. त्यांनी तीन वेळा अपयश अनुभवलं, तब्बल ७५ वेळा नकार ऐकला, पण कधीही हार मानली नाही. त्यांनी हे सिद्ध केलं की यशाची सुरुवात मोठ्या पगाराच्या नोकरीपासून होत नाही, तर ती होते एका छोट्या पण मजबूत कल्पनेवर ठेवलेल्या विश्वासापासून. Rapido हा केवळ बाईक टॅक्सी ब्रँड नाही, तर त्या तरुणाच्या धाडसाचं प्रतीक आहे, ज्याने सगळ्या अडचणींवर मात करून भविष्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं. आजच्या तरुणांनी जर प्रेरणा शोधायची असेल, तर पवन गुंटुपल्ली यांची ही वाटचाल त्यांना नक्कीच एक नवी दिशा दाखवू शकते.

  • कल्पना सरोज: शून्यातून उभारलं 100 मिलियन डॉलर्सचं साम्राज्य!

    कल्पना सरोज: शून्यातून उभारलं 100 मिलियन डॉलर्सचं साम्राज्य!

    परिस्थिती कितीही कठीण असली, तरी तुमच्यातील आत्मविश्वासाची ठिणगी कधीही विझू देऊ नका. कारण तीच ठिणगी एक दिवस यशाचा सूर्य बनून उगवते. हे केवळ शब्द नाहीत, तर हे एका अशा महिलेच्या आयुष्याचे सत्य आहे जिने गरिबी, कौटुंबिक छळ, सामाजिक बहिष्कार आणि आत्महत्येच्या उंबरठ्यावरून परत येत उद्योगविश्वात स्वतःचे एक वेगळे साम्राज्य निर्माण केले. त्या महिला म्हणजे कल्पना सरोज. 

    महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील एका छोट्या गावातून सुरू झालेला कल्पना सरोज यांचा प्रवास आज १०० मिलियन डॉलर्सपेक्षा (अंदाजे ८०० कोटी रुपयांहून अधिक) मोठ्या बिझनेस टर्नओव्हरपर्यंत पोहोचला आहे. ‘कमानी ट्यूब्स’ या डबघाईला आलेल्या कंपनीचे पुनरुज्जीवन करून त्यांनी उद्योग जगतात भारतातील पहिली महिला कॉर्पोरेट रेस्क्यूअर (Corporate Rescuer) म्हणून स्वतःचे नाव सुवर्णअक्षरांनी कोरले.

    बालपण आणि संघर्ष

    कल्पना सरोज यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील ‘रोटखेड’ या छोट्याशा गावात एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील पोलीस दलात हवालदार होते. दलित कुटुंबात जन्म झाल्यामुळे त्यांना बालपणीच जातीभेदाचे चटके सहन करावे लागले होते. शाळेत असताना त्यांना इतर मुलांपासून वेगळे बसवले जायचे. परंतु, हा सामाजिक भेदभाव केवळ एक सुरुवात होती त्यांच्या आयुष्यातील खरा संघर्ष तर पुढे होता. त्या काळातील अनिष्ट रूढी-परंपरांमुळे वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी त्यांचे लग्न लावून देण्यात आले आणि त्यांना मुंबईतील एका झोपडपट्टीत राहावे लागले. तिथे त्यांना सासरच्या लोकांकडून होणारा मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला. एवढंच काय तर, कल्पना सरोज अनेकदा उपाशी पोटी राहून दिवसभर मोलमजुरी करत. पण काही काळानंतर मुलीची दुरवस्था पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना परत गावी आणले. मात्र त्यांच्या संघर्ष इथेच थांबला नाही. घरी परतल्यानंतर त्यांच्या समोर अनेक आव्हाने उभी ठाकली होती. 

    आत्महत्येचा प्रयत्न ते जगण्याची नवी जिद्द

    गावी परतल्यानंतरही कल्पना सरोज यांना गावातील लोकांनी आणि समाजाने बहिष्कृत केले. अनेकांनी तर येता-जात त्यांना टोमणे मारायला सुरुवात केली होती. नवऱ्याने सोडलेली मुलगी म्हणून कल्पना सरोज आणि त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले. कल्पना सरोज यांना हा मानसिक त्रास सहन होत नव्हता म्हणून वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्यांनी उंदराचे औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्यांचे प्राण वाचले आणि हाच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. त्यांनी विचार केला की, जर मरण इतके सोपे आहे, तर जगणे कठीण का असावे? त्यांनी मरणाची भीती सोडून देऊन सन्मानाने जगण्याचा आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याचा पक्का निर्धार केला. आणि तिथूनच कल्पना सरोज यांचा नवीन जन्म झाला. 

    मुंबईत उद्योजकतेची पहिली पायरी

    वयाच्या १६ व्या वर्षी कल्पना सरोज पुन्हा मुंबईत आल्या. त्यांनी एका गारमेंट कंपनीत दरमहा केवळ ४० रुपये पगारावर धागे कापण्याचे काम सुरू केले. त्यांनी शिवणकाम शिकून घेतले आणि हळूहळू स्वतःचा टेलरिंग व्यवसाय सुरू केला. त्या दिवसात त्या तब्बल १६-१६ तास काम करत होत्या. त्यानंतर त्यांनी शासकीय योजनेच्या माध्यमातून ५०,००० रुपयांचे कर्ज घेतले आणि एक छोटे बुटीक तसेच फर्निचरचा व्यवसाय सुरू केला. कष्टाच्या जोरावर हा व्यवसाय चांगला चालू लागला. याच दरम्यान त्यांनी व्यवसायातील बारकावे, बाजारपेठ आणि मानवी स्वभाव समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कल्पना सरोज यांनी मागे वळून पाहिलेच नाही. 

    कमानी ट्यूब्स आणि कॉर्पोरेट रेस्क्यूअरचा उदय

    कल्पना सरोज यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि ऐतिहासिक वळण देणारी घटना म्हणजे ‘कमानी ट्यूब्स’ (Kamani Tubes) या कंपनीचे पुनरुज्जीवन. कमानी ट्यूब्स हि भारतातातील एक नामांकित मेटल आणि कॉपर ट्यूब्स बनवणारी कंपनी होती. परंतु, कामगार संघटनांचे वाद आणि अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे १९८८ च्या सुमारास ही कंपनी पूर्णपणे डबघाईला आली. कंपनीवर कोट्यवधी रुपयांचे कर्ज होते, वीज आणि पाण्याचे कनेक्शन कापले गेले होते आणि शेकडो कामगार बेरोजगार होऊन उपासमारीला तोंड देत होते. मात्र २००० सालाच्या सुमारास, या कंपनीच्या कामगारांनी कल्पना सरोज यांच्याकडे मदत मागितली. त्यांना माहित होते की कल्पना सरोज यांच्याकडे उत्तम व्यावसायिक कौशल्य आहे. हा एक अत्यंत जोखमीचा निर्णय होता. एका बाजूला कोर्टाच्या फेऱ्या, करोडो रुपयांचे कर्ज आणि दुसऱ्या बाजूला बंद पडलेली कंपनी होती. परंतु, कामगारांची गरिबी पाहून कल्पना सरोज यांनी हे आव्हान स्वीकारण्याचे ठरवले आणि पुढे जे घडले त्याची कल्पना क्वचितच कोणी केली असेल.

    पुनर्रचना आणि यशाचे शिखर

    कमानी ट्यूब्स या कंपनीच्या संकटकाळात कल्पना सरोज यांनी सर्वात आधी कोर्टात जाऊन कंपनी स्वतः चालवण्याची परवानगी मिळवली. त्यांनी बँकेचे कोट्यवधी रुपयांचे जुने कर्ज फेडण्यासाठी स्वतःची मालमत्ता पणाला लावली आणि बँकांशी तडजोड (One-Time Settlement) केली. त्यानंतर त्यांनी जुन्या यंत्रसामग्रीची दुरुस्ती केली, नवीन तंत्रज्ञान आणले आणि कामगारांना पुन्हा कामावर घेतले. त्यांच्या या अफाट परिश्रमामुळे बंद पडलेली ‘कमानी ट्यूब्स’ पुन्हा सुरू झाली. काही वर्षांतच कंपनी नफ्यात आली आणि तिची उलाढाल कोट्यवधी रुपयांवर पोहोचली. या अभूतपूर्व कामगिरीमुळेच त्यांना उद्योग जगताने ‘भारतातील पहिली महिला कॉर्पोरेट रेस्क्यूअर’ ही पदवी दिली.

    १०० मिलियन डॉलर्सचे साम्राज्य

    आज कल्पना सरोज या केवळ कमानी ट्यूब्सच्या मालकीण नाहीत, तर त्यांनी रिअल इस्टेट, लॉजिस्टिक्स, शेती आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या क्षेत्रांमध्ये आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. आज त्यांच्या बिझनेस साम्राज्याची एकूण व्हॅल्यू १०० मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल भारत सरकारने २०१३ मध्ये त्यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेला ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. याशिवाय त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

    अकोल्याच्या एका छोट्या गावातून सुरू झालेला कल्पना सरोज यांचा हा प्रवास केवळ एक यशोगाथा नाही तर ती मानवी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाचे जिवंत उदाहरण आहे. शून्यातून जग निर्माण करणाऱ्या आणि शेकडो कुटुंबांना रोजगार देणाऱ्या कल्पना सरोज या खऱ्या अर्थाने आधुनिक भारताच्या ‘आयर्न लेडी’ ठरल्या आहेत. त्यांनी सिद्ध करून दाखवले की, जर तुमच्या पंखात जिद्द असेल, तर तुम्ही नक्कीच उंच गगन भरारी घेऊ शकता.

  • नवीन Business सुरू करताना टाळा ‘या’ ६ मोठ्या चुका!

    नवीन Business सुरू करताना टाळा ‘या’ ६ मोठ्या चुका!

    आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात स्वतःचा व्यवसाय सुरू करणे हे अनेकांचे स्वप्न असते. २०२६ सालापर्यंत भारतामध्ये ‘स्टार्टअप संस्कृती’ केवळ शहरांपुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागातही वेगाने विस्तारली आहे. सरकारचे पोषक धोरण आणि डिजिटल क्रांतीमुळे नवीन उद्योग सुरू करणे सोपे झाले असले, तरी ते यशस्वीपणे चालवणे तितकेच आव्हानात्मक आहे. एका अभ्यासानुसार, जवळपास ९०% नवीन व्यवसाय पहिल्या तीन वर्षांत अपयशी ठरतात. या अपयशामागे कोणतीही दैवी शक्ती नसते, तर उद्योजकांकडून सुरुवातीच्या काळात होणाऱ्या काही मूलभूत चुका कारणीभूत असतात. चला तर मग जाणून घेऊया अशाच ६ गंभीर चुकांबद्दल, ज्या नवीन व्यवसाय करताना टाळणे अत्यंत गरजेचे आहे.

    १. कायदेशीर कागदपत्रांची आणि नियमांची पूर्तता न करणे

    नवीन व्यवसाय सुरू करताना अनेक जण घाईघाईत कामाला सुरुवात करतात आणि कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करतात. ही चूक पुढे जाऊन संपूर्ण व्यवसाय बंद पाडू शकते.

    MSME आणि GST चे नवीन नियम: २०२६ मधील नवीन सरकारी नियमांनुसार, कोणत्याही व्यवसायाची अधिकृत नोंदणी (Udyam Registration) आणि टर्नओव्हरनुसार जीएसटी (GST) नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

    भविष्यातील धोके: ट्रेडमार्क (Trademark) न घेणे, आवश्यक परवाने (Licenses) न काढणे किंवा कर रचनेचा अभ्यास न केल्यास भविष्यात मोठ्या कायदेशीर दंडाला सामोरे जावे लागते. व्यवसाय सुरू करण्यापूर्वीच कायदेशीर सल्लागाराची मदत घेणे केव्हाही फायदेशीर ठरते.

    २. प्रत्येक गोष्ट स्वतःच करण्याचा अतिरेक (Solopreneur Trap)

    “माझा व्यवसाय आहे, तर सर्व काही मीच करणार” हा विचार सुरुवातीला चांगला वाटू शकतो, पण दीर्घकाळासाठी तो घातक ठरतो. याला व्यावसायिक भाषेत ‘सोलोप्रेन्युअर ट्रॅप’ म्हणतात.

    कामांचे योग्य वाटप: एकच व्यक्ती उत्पादन निर्मिती, हिशोब (Accounting), पॅकेजिंग आणि डिलिव्हरी सर्व काही करू शकत नाही. यामुळे कामाचा ताण वाढून मुख्य व्यावसायिक रणनीतीवर (Core Strategy) दुर्लक्ष होते.

    २०२६ चा ट्रेंड: आजच्या काळात हुशार उद्योजक ‘आऊटसोर्सिंग’ (Outsourcing) चा वापर करतात. हिशोबासाठी फ्रीलान्सर किंवा लॉजिस्टिकसाठी थर्ड-पार्टी कंपन्यांची मदत घेऊन स्वतःचा वेळ व्यवसायाच्या वाढीसाठी देतात.

    ३. मार्केटला गरज नसलेल्या प्रॉडक्टमध्ये उतरणे

    व्यवसाय अपयशी ठरण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अपुरे ‘मार्केट रिसर्च’ (Market Research). अनेकदा उद्योजकाला एखादी संकल्पना स्वतःला आवडते म्हणून ते बाजारात उतरतात, पण ग्राहकाला त्याची गरज आहे की नाही, हे पाहत नाहीत.

    प्रॉडक्ट-मार्केट फिट (Product-Market Fit): तुम्ही जी वस्तू किंवा सेवा विकत आहात, ती ग्राहकाची कोणतीतरी समस्या सोडवणारी (Problem Solving) असली पाहिजे.

    ग्राहकाची मानसिकता: जोपर्यंत बाजारात तुमच्या उत्पादनाला मागणी नसेल, तोपर्यंत कितीही दर्जेदार उत्पादन असले तरी व्यवसाय वाढणार नाही. म्हणूनच, मोठ्या गुंतवणुकीपूर्वी ‘मिनिमम व्हायबल प्रॉडक्ट’ (MVP) तयार करून बाजारात चाचणी घेणे आवश्यक आहे.

    ४. सेल्स आणि मार्केटिंगकडे अक्षम्य दुर्लक्ष

    “माझे उत्पादन सर्वोत्तम आहे, ग्राहक स्वतःहून येतील” या भ्रमात राहणे ही २०२६ मधील सर्वात मोठी चूक ठरेल. आजच्या डिजिटल जगात ‘दिसते तेच विकते’ हा नियम लागू होतो.

    कमकुवत रणनीती: अनेक स्टार्टअप्स आपल्या बजेटमधील मोठा हिस्सा उत्पादन बनवण्यात खर्च करतात आणि मार्केटिंगसाठी पैसेच शिल्लक ठेवत नाहीत.

    अत्याधुनिक मार्केटिंगची गरज: आजच्या काळात केवळ पारंपरिक जाहिराती उपयोगाच्या नाहीत. २०२६ मध्ये ‘एआय-पावर्ड डिजिटल मार्केटिंग’ (AI-Powered Marketing), सोशल मीडिया ब्रँडिंग आणि इन्फ्ल्युएन्सर मार्केटिंग या गोष्टी व्यवसायाचा पाया बनल्या आहेत. मार्केटिंग धोरण मजबूत नसेल, तर तुमचे प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचणारच नाही.

    ५. नफा पुन्हा गुंतवण्याऐवजी स्वतःसाठी खर्च करणे (कॅश फ्लो मॅनेजमेंट)

    व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात जर थोडा नफा झाला, तर अनेक नवीन उद्योजक लगेचच महागडी गाडी, नवीन ऑफिस किंवा वैयक्तिक चैनीच्या वस्तूंवर खर्च करू लागतात.

    कॅश फ्लो क्रंच (Cash Flow Crunch): व्यवसायाचा सुरुवातीचा नफा हा वैयक्तिक वापरासाठी नसून व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी (Reinvestment) असतो.

    अचानक येणारी संकटे: जर तुम्ही राखीव निधी (Emergency Fund) ठेवला नाही, तर कच्च्या मालाच्या किमती वाढल्यास किंवा बाजारात मंदी आल्यास कार्यरत भांडवल (Working Capital) संपून जाते आणि चालू व्यवसाय अचानक बंद पडतो.

    ६. बदलत्या ट्रेंड्सकडे दुर्लक्ष आणि जुन्या पद्धतींना चिकटून राहणे

    तंत्रज्ञान दररोज बदलत आहे. २०२६ च्या या काळात जे व्यवसाय डिजिटल तंत्रज्ञान, ऑटोमेशन आणि नवीन पद्धतींचा स्वीकार करत नाहीत, ते बाजारातून झपाट्याने बाहेर फेकले जात आहेत.

    अपडेशनचा अभाव: उदाहरणार्थ, पारंपरिक किरणा दुकानांनी जर ऑनलाइन पेमेंट किंवा होम डिलिव्हरी स्वीकारली नाही, तर ग्राहक त्वरित ई-कॉमर्स ॲप्सकडे वळतात. व्यवसायातील स्पर्धा टिकवून ठेवण्यासाठी स्वतःला आणि कर्मचाऱ्यांना सतत अपडेट ठेवणे, नवीन सॉफ्टवेअर्सचा वापर करणे अत्यंत अनिवार्य आहे.

    नवीन व्यवसाय सुरू करणे हा एक थरारक प्रवास आहे, ज्यामध्ये जोखीम असणारच. मात्र, वरील ६ चुकांचा आधीच अभ्यास करून जर योग्य नियोजनासह पाऊल टाकले, तर यशाची शक्यता कित्येक पटीने वाढते. २०२६ मधील यशस्वी उद्योजक तोच बनू शकतो जो वेळेनुसार स्वतःमध्ये बदल करतो आणि चुकांमधून शिकून पुढे जातो.

    तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुम्ही कोणता नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहात का? तुमच्या शंका आणि विचार खालील कमेंट्समध्ये नक्की शेअर करा! उद्योजकता आणि व्यवसाय व्यवस्थापनाच्या अशाच सखोल आणि माहितीपूर्ण लेखांसाठी आमच्या ब्लॉगला पुन्हा नक्की भेट द्या.

  • सायबर कॅफेतून जगातील सर्वात तरुण CEO बनण्याचा प्रेरणादायी प्रवास

    सायबर कॅफेतून जगातील सर्वात तरुण CEO बनण्याचा प्रेरणादायी प्रवास

    घरात कॉम्प्युटर नव्हता, पण डोक्यात विचार होता!


    सुहास गोपीनाथ यांचा जन्म बेंगळुरूमधील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील शास्त्रज्ञ होते.
    लहानपणापासूनच त्यांना कॉम्प्युटर आणि इंटरनेटची प्रचंड आवड होती.
    पण घरात स्वतःचा कॉम्प्युटर नसल्यामुळे ते रोज सायबर कॅफेमध्ये जाऊन तासंतास बसत असत.

    मोफत कामातून शिकले कोडिंग!


    सायबर कॅफेमध्ये जाण्यासाठी पॉकेटमनी कमी पडायचा, म्हणून त्यांनी एक शक्कल लढवली.
    कॅफे मालकाला सांगितले, “मी दुपारी तुमच्या कॅफेमध्ये काम करतो, त्याबदल्यात मला मोफत इंटरनेट वापरू द्या!”
    याच मोफत मिळालेल्या वेळात त्यांनी पुस्तकं वाचून स्वतःच वेबसाईट बनवायला (कोडिंग) सुरुवात केली.

    वयाच्या १४ व्या वर्षी कंपनीची स्थापना!


    वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी त्यांनी ‘Globals Inc’ या कंपनीची सुरुवात केली.
    पण भारतात तोपर्यंत 18 वर्षांखालील व्यक्तीला कंपनीची अधिकृत नोंदणी (Registration) करण्याची परवानगी नव्हती.
    सुहास यांनी हार न मानता अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आपल्या कंपनीची नोंदणी केली.

    जगातील सर्वात तरुण CEO!


    वयाच्या 17 व्या वर्षी सुहास गोपीनाथ यांना अधिकृतपणे त्यांच्या कंपनीचे CEO घोषित करण्यात आले.
    हे यश मिळवणारे ते जगातील सर्वात तरुण मुख्य कार्यकारी अधिकारी (Youngest CEO) ठरले!
    त्यांच्या या यशाची जगभर चर्चा झाली आणि जगातील अनेक मोठ्या नेत्यांचे लक्ष त्यांच्याकडे गेले.

    जागतिक पातळीवर गौरव


    सुहास यांच्या कंपनीने हळूहळू जगभरात आपले पाय पसरवले. आज त्यांची कंपनी 11 पेक्षा जास्त देशांमध्ये सेवा देते.


    2008 मध्ये ‘World Economic Forum’ ने त्यांना ‘Young Global Leaders’ पुरस्काराने सन्मानित केले.
    जागतिक बँकेनेही (World Bank) त्यांना आपल्या महत्त्वाच्या सल्लागार समित्यांवर काम करण्याची संधी दिली.

    आजच्या तरुणांसाठी मोठी प्रेरणा


    “माझ्याकडे कॉम्प्युटर नाही”, “माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत” अशी कारणे न देता सुहास यांनी उपलब्ध साधनांचा पुरेपूर वापर केला.
    एका छोट्या सायबर कॅफेतून सुरू झालेला हा प्रवास आजच्या प्रत्येक तरुणाला नवीन काहीतरी सुरू करण्याची ताकद देतो.


    संकटांना संधीत बदलणाऱ्या सुहास गोपीनाथ यांचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा!

  • दुष्काळ जाहीर करण्याची Process नेमकी काय आहे?

    दुष्काळ जाहीर करण्याची Process नेमकी काय आहे?

    सोप्या मुद्द्यांत समजून घ्या!


    कमी पाऊस म्हणजे दुष्काळ नाही!

    जमिनीखालील पाणी आणि ओलावा तपासला जातो.

    विहिरी आणि बोरवेलमधील पाणीसाठा मोजला जातो.

    उपग्रहाद्वारे (Satellite) पिकांच्या स्थितीचे सर्वेक्षण केले जाते.


    दुष्काळ ठरतो 3 मोठ्या टप्प्यांत

    1 — पाऊस तपासला जातो
    पावसातील तूट आणि मोठे Dry Spells तपासले जातात.

    2 — जमिनीवर परिणाम पाहिला जातो
    पेरणी, पिकांची स्थिती, मातीतील ओलावा आणि पाण्याचे संकेत तपासले जातात.

    3 — प्रत्यक्ष पाहणी केली जाते
    निवडक गावांमध्ये जाऊन पिकांची परिस्थिती तपासली जाते.


    फक्त पाऊस पाहून निर्णय होत नाही!

    दुष्काळ ठरवताना अनेक संकेत पाहिले जातात—

    पाऊस किती कमी पडला?
    पावसात मोठा खंड पडला का?
    पेरणी किती क्षेत्रावर झाली?
    Satellite मध्ये पिकांची स्थिती कशी दिसते?
    मातीमध्ये पुरेसा ओलावा आहे का?
    भूजल आणि पाण्याची परिस्थिती कशी आहे?


    Satellite सांगतो दुष्काळ आहे की नाही!

    हा फार कमी लोकांना माहिती असलेला Fact आहे!

    Satellite मधून हिरव्या पिकांची स्थिती तपासली जाते.

    NDVI / NDWI सारखे निर्देशांक वापरले जातात.

    पिकांची परिस्थिती काय आहे, याचा अंदाज घेतला जातो.

    प्रत्यक्ष सर्वेक्षणामध्ये GPS आणि पिकांचे Photos वापरले जाऊ शकतात.


    33% नुकसानीचा नियम

    पिकांचे किमान 33% पेक्षा जास्त नुकसान आवश्यक.

    कृषी अधिकारी आणि तलाठी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करतात.

    पिके पूर्ण करपली असल्यास ‘शून्य उत्पादन’ नोंदवले जाते.

    5 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण राज्यातील आढावा पूर्ण केला जातो.


    शेतकऱ्यांसाठी थेट मदत

    मदतीची रक्कम बँक खात्यात ट्रान्सफर होते.

    अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे मध्यम मुदतीत रूपांतर.

    बँक किंवा सोसायट्यांकडून कर्जवसुली थांबते.

    संबंधित वर्षाचा जमीन महसूल पूर्णपणे माफ होतो.


    नागरिक आणि विद्यार्थ्यांना फायदा

    दुष्काळी भागातील शाळा-कॉलेजमधील मुलांची फी माफ.

    तीव्र टंचाई असलेल्या भागात शासनामार्फत पाण्याचे टँकर.

    शेतीपंपांच्या वीजबिलात सवलत मिळते.

    वीजबिल न भरल्यास लाईट कट करण्यास स्थगिती असते.


    जनावरांचे रक्षण

    पशुधनासाठी मोफत छावण्या उभारल्या जातात.

    छावणीत जनावरांना मोफत चारा व पिण्याचे पाणी मिळते.

    जनावरांवर मोफत औषधोपचार व लसीकरण केले जाते.

    चाऱ्याअभावी जनावरे विकण्याची वेळ येऊ नये म्हणून ही सोय केली जाते.


    मदतीचा पैसा कुठून येतो?

    राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तातडीने मदत दिली जाते.

    SDRF मध्ये 75% केंद्र + 25% राज्य सरकारचा वाटा असतो.

    आपत्ती मोठी असल्यास केंद्राकडून वेगळा निधी मिळतो.

    PMFBY च्या नियमानुसार विमा कंपन्यांवर भरपाई देणे बंधनकारक.


    तुमचे काय मत आहे?

    घोषणा कागदावर होते, पण ही मदत वेळेत गावापर्यंत पोहोचते का?

    तुमच्या गावात किंवा तालुक्यात सध्या पाण्याची आणि पिकांची काय परिस्थिती आहे?

    कमेंट करा…

    ही माहिती शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा.

  • 15 सप्टेंबरनंतर UPI बंद होणार? जाणून घ्या नेमकं सत्य

    15 सप्टेंबरनंतर UPI बंद होणार? जाणून घ्या नेमकं सत्य

    काय आहे RBI चा नवीन Re-KYC नियम? 

    आत्ताच जाणून घ्या अन्यथा…. 

    RBI चा नवीन Re-KYC नियम!

    तुम्ही दुकानात किंवा व्यवसायात UPI/QR कोडने पैसे स्वीकारता?

    RBI च्या नियमांनुसार 15 सप्टेंबर 2026  पूर्वी Re-KYC पूर्ण करणे बंधनकारक.

    वेळेत Re-KYC न केल्यास दुकानदारांचा QR कोड ब्लॉक होऊ शकतो.

    हा नियम कोणासाठी आहे?

    व्यापारी,  दुकानदार आणि ऑनलाईन व्यवसाय करणारे. 

    चहा टपरी, किराणा दुकान, भाजी विक्रेते आणि लहान दुकानदार. 

    सामान्य जनतेच्या वैयक्तिक UPI वर कोणताही परिणाम होणार नाही.

    Re-KYC केल्यास काय होईल? 

    वाढती ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी. 

    बनावट QR कोड तयार करून होणारी सायबर फसवणूक रोखणे. 

    QR कोड चालवणाऱ्या व्यक्तीची / व्यवसायाची खरी ओळख पडताळणे. 

    व्यापाऱ्यांची माहिती अधिकृत रजिस्ट्रीमध्ये सुरक्षित ठेवणे.

    15 सप्टेंबरची मुदत चुकली तर काय? 

    दुकानातील QR कोडवरून पेमेंट स्वीकारणे बंद होऊ शकते.

    ग्राहकांकडून येणारे पैसे अडकू शकतात.

    दैनंदिन व्यवसायावर आणि कमाईवर थेट परिणाम होऊ शकतो.

    Re-KYC करण्यासाठी दुकानदारांनी काय करावे?

    1. तुमचा Google Pay, PhonePe, Paytm किंवा बँक ॲप उघडा.

    2.Re-KYC Pending असे Notification आहे का ते तपासा.

    3.विचारलेली कागदपत्रे (आधार, पॅन, पत्ता) ॲपवर अपडेट करा.

    4.अडचण आल्यास तुमच्या पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडरशी संपर्क साधा.

    सायबर फसवणुकीपासून सावधान!

    सायबर चोर तुम्हाला KYC करून देतो म्हणून कॉल करू शकतात. 

    अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास OTP, UPI Pin किंवा पासवर्ड शेअर करू नका. 

    Re-KYC फक्त अधिकृत पेमेंट ॲप किंवा बँकेतूनच करा.

    5 सप्टेंबरपूर्वी आपले Re-KYC पूर्ण करा अन्यथा व्यवहार ठप्प होईल. 

    तुमच्या व्यावसायिक मित्रांना आणि दुकानदारांना ही पोस्ट शेअर करा!

    अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी नवी अर्थक्रांतीला फॉलो करा.

  • छोट्या शहरातून मोठा व्यवसाय | 4 यशस्वी Brands ची Story

    छोट्या शहरातून मोठा व्यवसाय | 4 यशस्वी Brands ची Story

    मोठा व्यवसाय उभा करण्यासाठी सुरुवातीपासूनच मोठं ऑफिस, मोठं शहर किंवा प्रचंड भांडवल असायलाच हवं असं नाही. योग्य समस्या ओळखणे, ग्राहकांची गरज समजून घेणे, उत्पादनाची गुणवत्ता टिकवणे आणि सातत्याने व्यवसाय वाढवत नेणे या गोष्टी अधिक महत्त्वाच्या ठरतात.

    भारतामध्ये अशा अनेक व्यवसायांची उदाहरणं आहेत, ज्यांनी छोट्या सुरुवातीपासून मोठा ब्रँड तयार केला.

    Milky Mist – दूध विकण्यापासून मोठ्या व्यवसायापर्यंत

    Satish Kumar यांनी लहान वयात कुटुंबाच्या दुग्ध व्यवसायात काम सुरू केलं. केवळ दूध विकण्याऐवजी त्यापासून पनीरसारखी अधिक मूल्य असलेली उत्पादने तयार करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं.

    हळूहळू उत्पादनांची संख्या वाढवण्यात आली. उत्पादनाची गुणवत्ता आणि स्वतःची मजबूत उत्पादन व्यवस्था तयार करण्यावर भर देण्यात आला. छोट्या स्तरावर सुरू झालेल्या या प्रवासाचं पुढे मोठ्या दुग्ध व्यवसायात रूपांतर झालं.

    Business Lesson: कच्चा माल तसाच विकण्यापेक्षा त्यापासून High-value Product तयार करण्याची संधी शोधा.

    Zoho – छोट्या शहरातून जागतिक तंत्रज्ञान व्यवसाय

    Sridhar Vembu यांनी 1996 मध्ये AdventNet या कंपनीची सुरुवात केली. पुढे याच कंपनीचा प्रवास Zoho या जागतिक तंत्रज्ञान ब्रँडकडे झाला.

    कंपनीने केवळ मोठ्या शहरांमधील प्रतिभेवर अवलंबून न राहता छोट्या शहरांमधील तरुणांना संधी देण्यावरही भर दिला. तेनकाशीसारख्या भागात तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात आल्या.

    आज Zoho ची विविध Software Products जगभरातील व्यवसाय वापरतात.

    Business Lesson: चांगली प्रतिभा आणि मोठा व्यवसाय केवळ महानगरांपुरता मर्यादित नसतो.

    Amul – शेतकऱ्यांच्या दुधापासून उभा राहिलेला देशव्यापी ब्रँड

    Amul ची सुरुवात गुजरातमधील Anand येथे झाली. दूध उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र आणून सहकारी पद्धतीवर आधारित व्यवसाय व्यवस्था उभी करण्यात आली.

    Dr. Verghese Kurien यांनी या व्यवस्थेला आधुनिक आणि व्यावसायिक स्वरूप देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दूध संकलनापासून प्रक्रिया, वितरण आणि मार्केटिंगपर्यंत मजबूत व्यवस्था विकसित करण्यात आली.

    पुढे Amul भारतातील सर्वाधिक ओळखल्या जाणाऱ्या दुग्ध ब्रँडपैकी एक बनला.

    Business Lesson: अनेक छोट्या उत्पादकांना एका मजबूत व्यवस्थेत जोडल्यास मोठा व्यवसाय उभा राहू शकतो.

    iD Fresh Food – रोजच्या समस्येतून निर्माण झालेली Business Opportunity

    घरामध्ये इडली आणि डोसा बनवण्यासाठी पीठ तयार करणं अनेकांसाठी वेळखाऊ काम होतं. याच समस्येला व्यवसायाच्या संधीमध्ये बदलण्यावर iD Fresh Food ने लक्ष केंद्रित केलं.

    तयार इडली-डोसा बॅटर उपलब्ध करून ग्राहकांचा वेळ आणि मेहनत वाचवण्याचा सोपा पर्याय कंपनीने दिला. ताजेपणा, गुणवत्ता आणि सोय या गोष्टींवर व्यवसायाची मजबूत ओळख तयार करण्यात आली.

    छोट्या सुरुवातीपासून हा व्यवसाय पुढे अनेक शहरांपर्यंत पोहोचला.

    Business Lesson: ग्राहकांच्या रोजच्या छोट्या समस्यांमध्येही मोठी Business Opportunity लपलेली असू शकते.

    छोट्या शहरात Business सुरू करण्याचे फायदे

    छोट्या शहरात किंवा ग्रामीण भागाच्या जवळ व्यवसाय सुरू करण्याचे अनेक फायदे असू शकतात. मोठ्या शहरांच्या तुलनेत जागा आणि व्यवसाय चालवण्याचा खर्च कमी असण्याची शक्यता असते.

    स्थानिक कच्चा माल सहज उपलब्ध होऊ शकतो आणि त्या भागातील ग्राहकांच्या गरजा अधिक जवळून समजून घेता येतात. स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देऊन स्वतःची टीम तयार करण्याची संधीही मिळू शकते.

    आज इंटरनेट, सोशल मीडिया, ई-कॉमर्स आणि डिजिटल मार्केटिंगमुळे व्यवसाय छोट्या शहरात असला तरी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची मर्यादा राहिलेली नाही.

    मोठा व्यवसाय एका दिवसात तयार होत नाही

    मोठ्या व्यवसायाची सुरुवात अनेकदा एका छोट्या समस्येपासून आणि काही ग्राहकांपासून होते.

    तुमच्या शहरातील किंवा परिसरातील एखादी खरी समस्या शोधा. त्या समस्येवर उपयोगी उपाय तयार करा आणि सुरुवातीला काही ग्राहकांसोबत त्याची चाचणी करा. त्यांचा प्रतिसाद समजून घेऊन उत्पादन किंवा सेवा सतत सुधारत राहा.

    गुणवत्ता, ग्राहकांचा विश्वास आणि सातत्य कायम ठेवता आलं तर छोट्या सुरुवातीचं रूपांतर हळूहळू मोठ्या व्यवसायात होऊ शकतं.

    निष्कर्ष

    Milky Mist, Zoho, Amul आणि iD Fresh Food यांच्या प्रवासातून एक गोष्ट स्पष्ट होते—मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमचं ठिकाण मोठं असण्यापेक्षा तुमची कल्पना, अंमलबजावणी आणि सातत्य मजबूत असणं अधिक महत्त्वाचं आहे.

    आज तुमच्या शहरात दिसणारी एखादी छोटी समस्या उद्याच्या मोठ्या Business Opportunity ची सुरुवात ठरू शकते.