आजच्या स्टार्टअप विश्वात “फंडिंग”, “व्हॅल्युएशन” आणि “एक्झिट” हे शब्द वारंवार ऐकू येतात. त्यामुळे यश मोजण्याची संकल्पनाच बदलून गेली आहे. मोठी गुंतवणूक, भरपूर जाहिरात आणि झपाट्याने वाढ,यालाच बहुतेकदा यश मानले जाते. पण या सगळ्या गोंधळात एक भारतीय उद्योजक असा आहे, ज्यांनी एक रुपयाही बाह्य फंडिंग न घेता जागतिक दर्जाची सॉफ्टवेअर कंपनी उभी केली. ही व्यक्ती म्हणजे Zoho Corporation चे संस्थापक श्रीधर वेम्बू. त्यांचा प्रवास इतरांपेक्षा वेगळा असून तो शांतपणे, स्वतःच्या विचारांवर आणि मेहनतीवर उभा राहिलेला आहे.
श्रीधर वेम्बू यांची ही कहाणी बुद्धिमत्ता, संयम आणि दीर्घकालीन विचारांची आहे. गुंतवणूकदारांचा दबाव नाही, मोठ्या प्रमाणात ब्रँडिंग नाही, तरीही Zoho आज जगभर विश्वासार्ह सॉफ्टवेअर सोल्यूशन्स देणारी कंपनी ठरली आहे, हेच या प्रवासाचं खरं वैशिष्ट्य आहे. त्यांचा उद्योजकीय प्रवास आपल्याला शिकवतो की यशासाठी नेहमीच वेग, मोठे भांडवल किंवा गाजावाजा आवश्यक नसतो; कधी कधी योग्य वेळी घेतलेला निर्णय, ठाम मूल्ये आणि स्वतःवरचा विश्वासच सर्वात मोठी ताकद ठरते. या लेखात आपण या असामान्य आणि प्रेरणादायी प्रवासाची ओळख करून घेणार आहोत.
मातीमधून उगवलेली बुद्धिमत्ता
श्रीधर वेम्बू यांचा जन्म १९६८ साली तमिळनाडूतील तंजावूर येथे झाला. शेती, संस्कृती आणि आपल्या मातीशी जोडलेल्या जीवनमानासाठी ओळखल्या जाणाऱ्या या भूमीत त्यांचं बालपण गेलं. लहानपणापासूनच ते अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि शिकण्याची त्यांना विशेष ओढ होती. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी IIT-JEE परीक्षेत २७ वा क्रमांक मिळवला आणि पुढे IIT मद्रास येथे अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं. यानंतरही त्यांचा शैक्षणिक प्रवास थांबला नाही; पुढे त्यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित Princeton University मधून उच्च शिक्षण घेतलं.
१९९४ साली श्रीधर वेम्बू यांनी अमेरिकेतील नामांकित Qualcomm कंपनीत वायरलेस इंजिनिअर म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. चांगला पगार, प्रतिष्ठा आणि सुरक्षित भविष्य या सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात होत्या. तरीही त्यांच्या आयुष्यात एका गोष्टीची कमी होती, ती म्हणजे आत्मिक समाधान. केवळ नोकरीपुरते मर्यादित न राहता, स्वतःच्या विचारांवर आणि मूल्यांवर आधारित काहीतरी वेगळं व अर्थपूर्ण निर्माण करण्याची इच्छा त्यांना सतत खुणावत होती. हीच अस्वस्थता पुढे एका वेगळ्याच उद्योजकीय प्रवासाची सुरुवात ठरली.
नोकरी सोडून स्वप्नांकडे वाटचाल
या काळात श्रीधर वेम्बू यांचे भाऊ चेन्नईमध्ये एक लहानशी सॉफ्टवेअर कंपनी चालवत होते. त्याच वेळी IIT मद्रासमधील त्यांच्या एका मित्राने नेटवर्किंग सॉफ्टवेअरचा प्राथमिक आराखडा (ड्राफ्ट) तयार केला होता. वेगवेगळ्या ठिकाणी असलेली ही प्रतिभा आणि कल्पना एकत्र आणता येतील, असा विचार वेम्बू यांच्या मनात आला. या सॉफ्टवेअरमध्ये जागतिक बाजारपेठेत, विशेषतः अमेरिकेत, मोठी संधी आहे याची त्यांना पूर्ण खात्री होती.
हा विश्वास मनात ठेवून त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. उच्च पगाराची, सुरक्षित आणि प्रतिष्ठेची नोकरी सोडून त्यांनी स्वतःच्या स्वप्नांकडे वाटचाल सुरू केली. १९९६ साली या विचारांना प्रत्यक्ष स्वरूप मिळालं आणि AdventNet या सॉफ्टवेअर कंपनीची स्थापना झाली. हीच कंपनी पुढे Zoho Corporation म्हणून ओळखली जाऊ लागली आणि एका वेगळ्या, मूल्याधिष्ठित उद्योजकीय प्रवासाची पायाभरणी झाली.
पहिलं यश, पहिला आत्मविश्वास
AdventNet ची कल्पना अत्यंत साधी पण प्रभावी होती. टेलिकॉम सेवा पुरवठादारांना उपयुक्त सॉफ्टवेअर सोल्यूशन्स देणे. त्यांचा पहिला प्रॉडक्ट Web NMS होता, ज्यामुळे कंपन्यांना त्यांच्या नेटवर्क आणि डिजिटल ऑपरेशन्स अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करता येत. हे सॉफ्टवेअर तांत्रिकदृष्ट्या मजबूत, वापरण्यास सहज आणि गरजेनुसार बदलता येणारे असल्यामुळे लवकरच ग्राहकांचे लक्ष वेधून घेऊ लागले.
या प्रॉडक्टला एका अमेरिकन टेक फेअरमध्ये मोठी दाद मिळाली. इतकंच नाही तर या प्रदर्शनात HP सारख्या आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपन्यांनाही मागे टाकत Web NMS ठळक ठरलं . १९९८ पर्यंत AdventNet ची विक्री ६ कोटींवर पोहोचली. पुढे २००० साली Cisco हा त्यांचा पहिला मोठा क्लायंट ठरला आणि कंपनीची विक्री थेट ५० कोटींवर पोहोचली. या यशामुळे AdventNet एक विश्वासार्ह जागतिक सॉफ्टवेअर कंपनी म्हणून ओळखली जाऊ लागली.
पैसे नाकारण्याचं धैर्य
AdventNet च्या वाढत्या यशामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष वेम्बू यांच्याकडे वेधलं गेलं. एका गुंतवणूकदाराने तब्बल ७०० कोटींच्या व्हॅल्युएशनवर ५० कोटी गुंतवणुकीचा आकर्षक प्रस्ताव दिला. कोणत्याही नव्या स्टार्टअपसाठी हा प्रस्ताव मोठी संधी मानला गेला असता, पण श्रीधर वेम्बू यांचा विचार वेगळा होता.
त्यांच्यासाठी AdventNet ही केवळ एक स्टार्टअप कंपनी नव्हती, तर ती आयुष्यभर जपून, मूल्यांच्या आधारावर उभारायची संस्था होती. गुंतवणूकदारांच्या दबावाखाली निर्णय घ्यायचा नव्हता किंवा केवळ जलद वाढीसाठी तडजोड करायची नव्हती. म्हणूनच मोठ्या रकमेचा मोह बाजूला ठेवत, त्यांनी हा प्रस्ताव नाकारला. हा निर्णय त्यांच्या दूरदृष्टीचा आणि आत्मविश्वासाचा स्पष्ट पुरावा होता.
धैर्याने केली संकटांवर मात
२००१ साली डॉट-कॉम क्रॅश झाला आणि अनेक टेक कंपन्यांप्रमाणे AdventNet वरही त्याचा मोठा परिणाम झाला. कंपनीचे सुमारे १५० ग्राहक कमी होऊन केवळ ३ उरले. व्यवसाय जवळजवळ ठप्प झाला असतानाच एका गुंतवणूकदाराने कंपनी १५० कोटी रुपयांना विकत घेण्याची ऑफर दिली.अशा कठीण काळात कुणीही हा प्रस्ताव सहज स्वीकारला असता; पण श्रीधर वेम्बू यांनी पुन्हा एकदा नकार देण्याचं धैर्य दाखवलं.
कंपनी वाचवण्यासाठी त्यांनी अत्यंत कठोर निर्णय घेतले. उपलब्ध रोख साठा वापरून कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर दिले आणि स्वतः सलग चार वर्षे पगार न घेता काम केलं. कर्मचाऱ्यांवरील विश्वास आणि कंपनीच्या भविष्यासाठीची जबाबदारी त्यांनी कधीही ढळू दिली नाही. हा काळ त्यांच्या संयमाची, चिकाटीची आणि नेतृत्वगुणांची खरी कसोटी ठरला.
याच संकटातून कंपनीला एक नवी दिशा मिळाली आणि ManageEngine या प्रॉडक्टचा जन्म झाला. मध्यम आकाराच्या कंपन्यांसाठी तयार केलेलं हे IT मॅनेजमेंट टूल हळूहळू प्रचंड लोकप्रिय झालं. पुढे Fortune ५०० मधील सुमारे ६० % कंपन्यांनी ManageEngine वापरायला सुरुवात केली. याच काळात वेम्बू यांनी बंद पडलेल्या एका कंपनीकडून “Zoho” हे डोमेन विकत घेतलं, जे पुढे जागतिक सॉफ्टवेअर ब्रँडचे नाव ठरलं .
Zoho चा जन्म आणि ऐतिहासिक यश
२००५ मध्ये Zoho CRM लाँच करण्यात आले आणि हाच क्षण कंपनीच्या इतिहासातील निर्णायक टप्पा ठरला. हे सॉफ्टवेअर स्वस्त, प्रभावी आणि वापरण्यास अतिशय सोपं होतं,त्यामुळे कमी वेळातच त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. २००८ पर्यंत Zoho CRM चे १० लाख युजर्स झाले, तर २००९ मध्ये AdventNet या कंपनीचे नाव अधिकृतपणे बदलून Zoho Corporation करण्यात आलं. Zoho ने Salesforceसारखेच ताकदवान सॉफ्टवेअर कमी किमतीत उपलब्ध करून दिलं, ज्यामुळे लहान आणि मध्यम व्यवसायांमध्ये ते मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले.
२०१५ पर्यंत Zoho चा विस्तार अभूतपूर्व पातळीवर पोहोचला. कंपनीकडे १.२ कोटी युजर्स, सुमारे १८०० कोटींची वार्षिक विक्री,२५ हून अधिक प्रॉडक्ट्स आणि ५० मोबाईल अॅप्स होते. Zoho च्या वाढत्या प्रभावामुळे Salesforce ने अखेर Zoho विकत घेण्याची ऑफर दिली, मात्र श्रीधर वेम्बू यांनी तीही नाकारली. स्वतंत्र राहून जागतिक स्तरावर भारतीय सॉफ्टवेअर ब्रँड उभा करण्याचा त्यांचा ठाम निर्धार यामधून स्पष्टपणे दिसून येतो.
झिरो फंडिंगमधून अब्जावधींचा महसूल
फ्रीमियम मॉडेल आणि सुमारे ५००० कर्मचाऱ्यांच्या ताकदीवर Zoho ने कोणतीही बाह्य गुंतवणूक न घेता सातत्याने प्रगती केली. २०२१ मध्ये कंपनीचे उत्पन्न ५२३० कोटींवर पोहोचले आणि Zoho अधिकृतपणे बिलियन-डॉलर क्लबमध्ये दाखल झाली. कोविडसारख्या कठीण काळातही कंपनीने ६७११ कोटींचा महसूल आणि १९१८ कोटींचा नफा कमावला. आज Zoho चे वार्षिक उत्पन्न सुमारे ८७०० कोटी असून नफा २८०० कोटींच्या आसपास आहे. यामुळे Zoho ही आज जगातील आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक ठरली आहे.
मित्रांनो, इतकं मोठं यश मिळवूनही Zoho चे संस्थापक श्रीधर वेम्बू साधं आणि मूल्याधिष्ठित जीवन जगतात. आज त्यांची अंदाजे नेटवर्थ २८,००० कोटी असली तरी ते तंजावूरजवळील एका गावात राहतात, सायकल चालवतात आणि भौतिक सुखांपेक्षा मूल्यांना अधिक महत्त्व देतात. कोणत्याही गज्यावाज्याशिवाय, शांतपणे मिळवलेलं हे यश त्यांच्या विचारांची आणि जीवनदृष्टीची खरी ओळख आहे.

Leave a Reply