Author: naviarthkranti

  • फुकट वाटा, पण उधार नको

    फुकट वाटा, पण उधार नको

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे फुकट वाटा, पण उधार नको… करायची सुरवात?

    उधारी आणि व्यवसाय याचं नातं वेगळंच आहे. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय. उधार द्यायचं नाही, तर धंदा होत नाही आणि उधार दिलं तर वसूल होत नाही. उधारी देऊन नुकसान होण्यापेक्षा धंदा न करता गप्प बसलेलं काय वाईट? लोकांना फुकट वाटायला तुम्ही काय कुबेराचे नातेवाईक आहात का? उधारी देण्याच्या बदल्यात तुम्ही चिंता विकत घेता व चिंता ही चिता समान असते, जी माणसाला हळूहळू मारते. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. आपल्या हक्काचे, कामाचे पैसे दुसऱ्याकडे पडून आहेत, त्याचा वापर आपण करू शकत नाही यापेक्षा वाईट गोष्ट कोणती.   

    उधारीवर बाजारात खूप मजेशीर किस्से आहेत. “उधार एक जबरदस्त जादू है। हम उधार देंगे आज, तो कल आप गायब हो जाओगे।”, “उधार ८० साल के उपरवाले को मिलेगा, वो भी उनके माता पिता को पुछकर।”

    उधार दिल्याचे व्यवसायात फायदे आणि तोटे

    १) डोक्यात नकारात्मक विचार बंद होतात.

    २) तुम्ही सकारात्मक योजना व प्लॅनिंग करू शकता.

    ३) उधार देऊन संबध बिघडण्यापेक्षा उधारी नाकारून बिघडलेले बरे.

    ४) माल नाही खपला तर तो दानधर्म करा, पुण्य तरी मिळेल; पण उधार देऊन डोक्याला नसता ताप नको.

    ५) उधारीतून वाद म्हणजे विकतचे भांडण होऊ शकते.

    ६) उधारीमुळे बुद्धिमान, कौशल्यपूर्ण व्यावसायिक आयुष्यातून बरबाद होतो.

    ७) उधारीपुढे नुकसान झाल्यास तुमचा चांगुलपणा तुम्हालाच भोवतो व जग तुम्हालाच खुळे समजते, तुम्ही फेल बिझनेसमन आहेत असा समज होतो.

    ९) माल नाही खपला तर तो दानधर्म करीन, पुण्य तरी मिळेल पण उधार देऊन डोक्याला नसता ताप नको.

    प्रमाणाबाहेर उधारी म्हणजे व्यवसायाचा सर्वात मोठा शत्रू. “एक रूपयाच्या मार्जिनवर धंदा करेन, पण उधारीवर करणार नाही.” अशी खूणगाठ बांधा. उधारीची वही हा प्रकारच दुकानात ठेऊ नका. नंतर देतो, लिहून ठेवा; तसले काही नको. ‘माल ठेवा, पैसे असतील तेव्हा घेऊन जा.’ कोणाशी कितीही दुश्मनी असली तरी मृत्यूनंतर आपण त्यांच्या कार्यास जातो; पण उधार घेणारा कधीच येत नाही. उधारी माणसात इतके वाईट अंतर निर्माण करते.

    तुम्ही व्यवसाय करत असताना उधारीच्या समस्येला कसे हाताळता आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या अनेक गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी चॅनेलला आत्ताच  सब्स्क्राइब करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

  • पैशातून पुन्हा पैसा कसा कमवायचा शिकले पाहिजे

    पैशातून पुन्हा पैसा कसा कमवायचा शिकले पाहिजे

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांपासुन शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे; पैशातून पुन्हा पैसा कसा कमवायचा शिकलं पाहिजे करायची सुरवात?

    एका गावात एक व्यावसायिक कुटुंब होते. तिघे भाऊ, वडील मिळून इंजिनीअरिंग स्पेअर पार्टस, हॉटेल इत्यादी व्यवसाय करत होते. गेल्या ७ ते ८ वर्षात एक्सपोर्टमधून बराच फायदा कमविला. अंदाजे १ ते ३ कोटी रुपये एका रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये गुंतविले. मुंबईजवळ काही अंतरावर रोडलगत २७ एकर शेतजमीन १८ लाख रुपये एकर दराने विकत घेतली. काही महिने प्रोजेक्टचे नियोजन करीत होते. नंतर त्यांनी ती शेतजमीन एनए करून घेतली. त्यावर व जमिनीतील अंतर्गत रस्ते हेक्टरच्या लेवलने केले, वृक्षारोपण इत्यादीसाठी अंदाजे एकरी सहा लाख खर्च आला. तो त्यांनी बँकेतून कर्ज काढून केला. प्रत्येकी २००० वर्गफुटाने प्लॉट प्रत्येकी १६ लाख दराने विक्रीस आणले व ३ बीएचके बंगलो ४० ते ५० लाख ह्या दरम्यान. अशा अनेक प्रकारच्या प्रॉपर्टीची विक्री त्यांनी सुरू केली. सुरुवातीचे काही प्लॉट खपल्यानंतर थोडे महिने विक्री बंद करून आलेले पैसे खर्च करून सर्व प्लॉटना लहान बाउंड्री हॉल, छोटे वूड हाऊस, आकर्षक एन्ट्रन्स लॉन प्रोजेक्टससाठी बनविली. खूप लहान व १५ गुंठे ओपन जागेत लॉन बनविले. प्रोजेक्ट अंतर्गत खूप छान वृक्ष लागवड केली. प्रोजेक्ट्सचे थ्रीडी प्रझेंटेशन तयार केले, पूर्ण प्रोजेक्ट तयार झाल्यानंतर कसा दिसेल याचा आकर्षक व्हिडीओ बनविला व त्यांची पुणे, मुंबई आणि इतर चांगल्या ठिकाणी जाहिरातबाजी केली. पुढे काही महिन्यात प्रॉपर्टीचे दरही वाढले होते. प्लॉट, बंगलो बघायला येणाऱ्यासाठी आकर्षक वेटिंग रूम, छोटेसे छान ऑफिस, साईटवर माहिती देण्यासाठी एमबीए झालेल्या तरुणाची नियुक्ती केली.

    २७ एकर जमिनीपैकी एनए केल्यानंतर सुमारे २२ एकर जमीन विक्रीस उपलब्ध होती व प्रत्येकी २००० वर्गफुटाचे ४४० प्लॉट विक्रीस तयार होते. म्हणजे तो प्रोजेक्ट म्हणजे ४४० गुणिले २० लाख बरोबर आठ कोटी ऐंशी लाख इतक्या किंमतीचा होता. एनए करणे, अंतर्गत रस्ते, सजावट, बाउंड्री वॉल, गार्डनिंग, फलकहाऊस, प्लॅन, मार्केटिंग, ब्रॅंडिंग, एजंटना देऊ केलेले ५% कमिशन, बँकेचे व्याज, कामगारांचा पगार इत्यादीवर १५ ते २०% खर्च त्यांनी केला होता. पाच ते सहा वर्षात हळूहळू करून सर्व प्लॉट विकले गेले. सुरुवातीचे काही प्लॉट १० लाखाने विकले व परत प्रत्येक सहा महिन्यात किंमत वाढत गेली, शेवटचे ३० ते ३५% प्लॉट २७ लाखाच्या दराने विकले गेले. सरासरी दर १८ लाखाचा राहिला. ज्या शेतकर्‍याने १८ लाख एकरी दर म्हणून जमीन विकली त्याला त्याच जमिनीला दोन गुंठ्याला १८ लाख दर केवळ ५-७ वर्षात होईल असा विचार केला नसेल.

    पैशातून पैसा कमविण्याचे हे एक उदाहरण खूप काही सांगत आहे. जमिनी विकून खायच्या की आपण उद्योजक व्हायचं हे ज्याचे त्याने ठरवावे. जसे कस्तुरीमृगाला माहीत नसते की, आपल्याकडे अत्यंत किंमती कस्तुरी आहे, तसे शेतकर्‍यांनाही माहीत नाही आपल्या जमिनीचे भविष्यातले खरे मोल काय आहे. ज्यांनी जमिनी २० लाख प्रति एकराने विकल्या तेथे आज २० लाख गुंठ्याचा दर आहे व दुर्दैव त्या मुळ जमीन मालकाकडे एक गुंठा तेथे घेण्याची ऐपत नाही. कारण बाटली, गाडी, सोन्याची चेन, राजकारण यातच त्याचे सर्व पैसे संपले.

    पैशाने पैसा वाढवायचं तंत्र तुम्ही कधी अंमलात आणलाय का? आणलं असेल तर तुमच्याकडे असणाऱ्या पैशाचे नियोजन तुम्ही कसं केल? आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या अनेक गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी चॅनेल ला आताच सब्स्क्राइब करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

  • काऊंटरवर नेहमी हसतमुखाने बसा 

    काऊंटरवर नेहमी हसतमुखाने बसा 

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांतून शिकतो तो शहाणा माणूस. अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी ‘उद्योजकता विजडम’ या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे, तर आजच्या गोष्टीचा विषय आहे ‘काऊंटरवर नेहमी हसतमुखाने बसा…’ करायची सुरवात?

    रामलाल मिठाईवाले ४० वर्षांपूर्वी अंगावरच्या कपड्यावर मुंबईत आले. दुसर्‍याच्या दुकानात हलवाईचे काम करत करत स्वतःचा धंदा सुरू केला. आज मुंबईत ५ दुकाने, ४ फ्लॅट, गाड्या सर्व काही आहे. दोन मुलं त्यांना व्यवसायात हातभार लावतात. काही दिवसांपूर्वी रामलाल याचं दुःखद निधन झालं. सांत्वन सभा पुढील रविवारी होती, त्यांच्या मोठ्या मुलाने व्हॉटसअपवर तसा निरोप सर्वांना दिला. त्यांचा लहान मुलगा काऊंटर सांभाळत होता, ग्राहकांची गर्दी होती. ख्रिसमसमुळे केक, मिठाईला चांगली मागणी होती. थोडी गर्दी कमी झाल्यावर त्यांच्या परिचयाचे एक गृहस्थ दुकानात गेले आणि म्हणाले, “बिपीनभाई पिताजी गुजर गये समजके बहुत दुःख हुआ.” तो म्हणाला; मेहमान मिलने के लिए घर मे आते रहते है, इसलिए बडा भाई घर पे है। ख्रिसमस का सीझन है, तो मै धंदा संभाल रहा हू। क्या करे शो मस्ट गो ऑन! सर जी, वो कंडोलन्स मीटिंग का मेसेज मिला क्या, हमारे समाजभवन मे है।” ते गृहस्थ म्हणाले, “हा मिल गया, चलता हूँ।”. तीन दिवसापूर्वी वडिलांचं निधन झालं, त्याचा परिणाम काऊंटरला अजिबात न जाणवू देता तो व्यवसाय चालवत होता.

    असे म्हणतात ज्या दिवशी तुम्हाला हसता येत नाही त्या दिवशी दुकान उघडू नका. ज्या दुकानदाराच्या चेहऱ्यावर हसू नसते, त्याच्या दुकानात आले की ग्राहकांना जाऊच नये असे वाटते. काऊंटर सेल्सचीसुद्धा एक विशिष्ट सायकॉलॉजी आहे. माल त्याच किंमतीचा, पण चांगल्या सेल्स मॅनेजमेंटमुळे काही दुकाने जोरदार चालतात.

    यामध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत. मार्केटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा उघडणारे व सगळ्यात शेवटी बंद होणारे दुकान तुमचेच हवे. देवाला सुगंधी अगरबत्ती, दिवा लावूनच काऊंटरची सुरवात करा. मद्यपान, मांसाहार केले असेल तर आंघोळ केल्याशिवाय काऊंटरला येऊ नका. गृहकलह, बायकोबरोबर भांडण, टेन्शन, आजार, तब्येत, कुणाचा मृत्यू किंवा काहीही असेल, तरी कोणत्याही परिस्थितीत त्याचा काऊंटरवर दिखावा व वाच्यता करू नका. खरंच काही अडचण असेल व तुम्हाला त्या दिवशी हसता येत नसेल, तर एकतर दुकान उघडू नका, नाहीतर तुम्ही काऊंटरला बसू नका.

    दुकानाचे सर्व शेल्फ गच्च भरलेले दाखवा व ठेवा. अर्धवट शेल्फ ग्राहकांवर अत्यंत बॅड इंम्प्रेशन टाकतात. नेहमी स्वच्छ कपडे घाला, शक्यतो पांढरे शुभ्र किंवा लाईट कलरचे शर्ट वापरा. काऊंटरवर नेहमी स्वच्छता ठेवा. दुकानातील कामगारसुध्दा नीटनेटके असावेत. गल्ल्यात सुट्टे पैसे नेहमी ठेवा. सुट्टे नसले की उगीच प्रत्येक वेळी इकडे तिकडे पळू नका. ‘छुट्टा लेके आओ’ असे ग्राहकांना म्हणू नका. नाहीतर सुट्टे आणायला जातो आणि मालही तिकडेच खरेदी करतो, तुम्ही वाट पाहत बसणार कधी येतोय म्हणून. अशा लहान लहान गोष्टीचे बारीक लक्ष व नियोजन म्हणजे ‘काऊंटर सेल्स मॅनेजमेंट’ हे लक्षात ठेवा.

    तुमचे काउंटर सांभाळताना तुम्ही या गोष्टी पाळता का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्टीचा विषय आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी
  • ज्याच्या खिशात पैसा, तिथं आणि त्यांच्यासाठीच व्यवसाय करा

    ज्याच्या खिशात पैसा, तिथं आणि त्यांच्यासाठीच व्यवसाय करा

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांपासुन शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे; ज्याच्या खिशात पैसा तिथं आणि त्यांच्यासाठीच व्यवसाय करा… करायची सुरुवात?

    एक अतिउत्तम जॅकेट शिवणारा व्यावसायिक होता, त्याला नेहमी प्रश्न पडायचा कि “माझे जॅकेट जेमतेम १२०० रुपयांना विकले जाते, पण अशाच दर्जाचे जॅकेट शोरूमला लोक ३००० रुपयांना विकत घेतात. असं का होत असेल? मला ती किंमत का मिळत नाही?” त्याची ही समस्या घेऊन तो व्यावसायिक सल्लागार कदमांकडं आला. तेव्हा कदमांनी त्याला मुल्ला नसरुद्दीनची गोष्ट सांगितली.

    एकदा नसरुद्दीन खूप सुंदर पगडी घालून राजवाड्यात गेला. राजाला त्याची पगडी आवडली. राजा म्हणाला, “किती रुपयांत पगडी?” नसरुद्दीन म्हणाला, “१ हजार रुपयांना.”

    हे बोलणे तेथे असलेल्या व्यापाऱ्याने ऐकले व राजाला त्याने पगडी खूप महाग असल्याचे सांगितले.

    राजा म्हणाला, “पगडी खूप महाग आहे.” त्यावर नसरुद्दीन म्हणाला, “ही पगडी बनवायला किती खर्च आला आहे यावरच त्यांची किंमत ठरविली आहे व इतकी चांगली पगडी १ हजार रुपयांना केवळ राजाच घेवू शकतो, गोरगरीबांना ती परवडणारी नाही.”

    ह्या वाक्याने राजा खुश झाला व त्याने ताबडतोब १ हजार रुपये देऊन पगडी घेतली. बाहेर आल्यानंतर नसरुद्दीन त्या व्यापाऱ्याला म्हणाला, “तुला ह्या पगडीची किंमत माहीत असेल, पण राजाची प्रशंसा आणि त्याला खुश करण्याची किंमत काय मिळते, हे मला माहीत आहे.”

    मित्रहो, आपल्या उत्पादनाला जर चांगली किंमत मिळवायची असेल, तर आपले उत्पादन ज्याच्या खिशात पैसा आहे, त्यालाच विकण्याचा प्रयत्न करावा. दळभद्री लोकांच्या नादी लागू नये. तसेच कोणताही माणूस हा प्रशंसा व मानसन्मानाचा भुकेला असतो. त्यामुळे ग्राहकांची प्रशंसा करायला विसरू नये. तुमच्या उत्पादनाची किंमत ते तुम्ही कुणाला व कशा पद्धतीने विकता यावर अवलंबून आहे. जलद विचार करून ते आपले विचार दुसऱ्याच्या गळी उतरवता आले पाहिजे.

    तुम्ही तुमचे उत्पादन कशा प्रकारे विकता? उत्पादन विकताना काही ठराविक मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा उपयोग करता का? करत असाल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी चॅनेलला आताच सब्स्क्राइब करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

  • हिशोब लागण्यासाठी तो ठेवावा लागतो

    हिशोब लागण्यासाठी तो ठेवावा लागतो

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांतून शिकतो तो शहाणा माणूस. अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी ‘उद्योजकता विजडम’ या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे, तर आजच्या गोष्टीचा विषय आहे ‘हिशोब लागण्यासाठी तो ठेवावा लागतो !’ करायची सुरवात?

    एका व्यापाऱ्याने बिझिनेस एक्सपर्ट असणाऱ्या कदमांना एक प्रश्न विचारला. मी संगमनेरवरून आहे. मी डाळिंब ट्रेडिंग व्यवसाय चालू केला. १५ ते १८% मार्जिन आहे. आता वर्ष झाले. धंदा होतोय पण पैसा कुठून आला व कुठे गेला कळतच नाही. बँकेचं कर्जही लाखांचे आहे. काहीच ताळमेळ लागेना, काय करावे?

    यावर कदम त्याला म्हणाले, “खर्च झाल्याचं दु:ख नाही, पण हिशोब लागत नाही याचं वाईट वाटतं.” नवीन व्यवसाय सुरू केल्यावर अनेकांचं असंच होतं. हातात अचानक पैसा खेळायला लागतो. पूर्वी कटिंग चहा पिणारा पण, हॉटेलात बसून सहज ५०० रुपये खर्च करतो. मुलांना १०० ऐवजी ५००चे खेळणे घेतो. इकडे तिकडे वायफळ पैसे खर्च होत राहतात. शेवटी इकडची तिकडची उधारी, बंकेचं कर्ज असं सगळं वाढत जात. बिझनेसमध्ये कॅश फ्लो आहे तोपर्यंत काही वाटत नाही, राहणीमान आपोआप उच्च होत राहतं, खर्च होत राहतो.

    बिझनेसमधले पैसे व वैयक्तिक वापराचे पैसे यातील फरक तोटा झाल्यावर कळतो. दुकानाच्या गल्ल्यातील दहा हजारांपैकी आपले ५००च आहेत हे समजायला नवख्या व्यावसायिकाला वेळ लागतो, तोपर्यंत ५-१० लाख तोटा झालेला असतो. हिशोब म्हणजेच अकाऊंटिंग हा कोणत्याही व्यवसायातील सगळ्यात महत्वाचा भाग आहे, ज्याकडे बरेच व्यावसायिक दुर्लक्ष करतात. व्यवसायाची सुरुवात सकाळी अकाऊंटची वही उघडून व सायंकाळी दुकान बंद करताना दिवसभरचा ताळेबंद मांडूनच व्हायला हवी, नाहीतर वर्षाच्या शेवटी डोळे उघडून काही उपयोग नाही. ह्याचे एवढे येणे बाकी व त्याचे तेवढे देणे बाकी. गल्ल्यात ठणठण गोपाळ आणि वहीत लाखोंचा फायदा अशी गत. हिशोबाची वही काय फक्त पुजण्यासाठी घेतली का? पैशाचा हिशोब रोजच्या रोज हवा व त्याचं रोजचं नियंत्रण हवे, अन्यथा नुकसान होऊन पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय नाही.

    Behind every good Business, there is a great accountant. यशस्वी व कर्त्या पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, जिला आपण संसाराची ‘अर्थमंत्री’ म्हणतो. म्हणजेच ती चांगली accountant असते. महिना तीन किलो तेल, पाच किलो साखर लागते, तर त्यातच बरोबर घर चालविते आणि असेच घर पुढे जाते. त्यामुळे तुम्हीसुद्धा हिशोब ठेवलात तर लागेल, नाहीतर फक्त पश्चाताप करावा लागेल.

    तुम्ही रोजचा हिशोब ठेवताय ना? हिशोब न ठेवण्यामुळे तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या आहेत? आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

  • बिल गेट्स का म्हणतात, शेवटच्या क्षणी काम करण्याची सवय घातक!

    बिल गेट्स का म्हणतात, शेवटच्या क्षणी काम करण्याची सवय घातक!

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांपासुन शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे; बिल गेट्स का म्हणतात, ‘शेवटच्या क्षणी काम करण्याची सवय घातक! करायची का सुरुवात?’

    अमेरिकेतल्या एका भाषणात बिल गेट्स यांनी हा किस्सा सांगितला होता. स्वतःच्याच भयंकर वाईट सवयीचा. ते सांगतात की, मी काम चांगलं करायचो, पण सगळी कामं शेवटच्या मिनिटार्पयत तंगवून ठेवायचो. वेळ संपत आली, की मग धावतपळत काम करायचो. माझं काम चांगलं व्हायचं, पण त्या कामाचा मला आनंद होत नसे. दुसरं म्हणजे कुणीही त्या कामाचं काही कौतुक करीत नसे. मग वाटायचं की, हे काय, आपण इतकं काम करतो, चांगलं करतो तरी कुणाला त्याचं काही विशेष वाटत नाही. हा खेद एकीकडे आणि दुसरीकडे ते काम करताना येणारा ताण, काम चांगलं करण्यापेक्षा ते वेळेत करण्याचंच टेन्शन मग वाढत जायचं. इतकं वाढायचं की, काम पूर्ण झाल्यावर सुटलो एकदाचा असं वाटायचं.

    नंतर नंतर माझ्या लक्षात यायला लागलं, की आपल्याला ही वाईट सवय सोडावी लागेल. आपल्याला काम करायचं असतं, ते आपल्याला आवडतं, जमतंही. मग शेवटच्या क्षणापर्यंत ते काम टोलवत कशाला राहायचं? मग प्रयत्न करून मी ती सवय मोडली.

    हीच गोष्ट आपल्यापैकी अनेकांच्या बाबतीत तंतोतंत खरी असते. आपण कामचुकार नसतो, काम टाळतही नसतो, पण शेवटच्या क्षणापर्यंत ते काम लटकवून ठेवतो आणि मग धावतपळत कसंबसं ते पूर्ण करतो.

    ही सवय तोडण्याचंही अवघड काम जमवलं तर जमू शकतं. ते कसं जमेल याचं उत्तरही, बिल गेट्सच देतात.

    ते म्हणतात, की सकाळी फक्त 15 मिनिटं मी कागद, पेन घेऊन बसायला लागलो. जी कामं त्या दिवशी होणं गरजेचीच आहे, ती आधी करतो. मग बाकीची. ऐनवेळी दुसरं कितीही तातडीचं काम आलं तरी, जे आधी करायचं काम असतं, त्याला वेळ देतोच. हळूहळू हे प्लॅनिंग जमतं.

    जे त्यांना जमलं ते आपल्यालाही जमू शकेल. मुद्दा इतकाच की, आपण ते करणार का? की अगदी आपल्या करिअरच्या, यशाच्या जिवावर बेतेल इतपत उशीर होईर्पयत ही सवय लांबवत नेणार? यावर तुमचं मत काय आम्हाला कॉमेंट नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी
  • १. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा – यवतमाळ

    १. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा – यवतमाळ

    आपण प्रत्येक जिल्ह्याचे उद्योग पाहण्याआधी त्यातील रस्ते, नैसर्गिक साधनसंपत्ती, नद्या, पाणीपुरवठा, वीज निर्मिती, दळणवळणाच्या इतर सोयी सुविधा यांचा बारकाईने अभ्यास करणार आहोत. कारण या प्रत्येक गोष्टींचा व्यवसायात अत्यंत महत्त्वाचा वाटा असतो. त्यानंतर त्या-त्या जिल्ह्यात चालणारे उद्योग व नवीन उद्योग निर्मितीला असणारा scope याविषयी आपण चर्चा करणार आहोत. व शेवटी त्या जिल्ह्यातील आता सध्याच्या घडीला असणारे यशस्वी उद्योजक कोण आहेत. याबद्दल चर्चा करणार आहोत.

    नॉर्थ-साऊथ कॉरिडोर हा राष्ट्रीय महामार्ग (National Highway -07) या जिल्ह्यातून जातो. त्यामुळे भारताच्या उत्तरेकडील राज्यांपासून ते थेट दक्षिणेकडील राज्यांना यवतमाळ जिल्हा जोडला गेला आहे. या मार्गावर पांढरकवडा हे महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टीने इतर जिल्ह्याच्या तुलनेत यवतमाळ मधून रस्ते वाहतूक ही अतिशय सोपी झालेली आहे. पूर्ण भारताला दक्षिणोत्तर जोडणारा नॉर्थ-साऊथ कॉरिडोर महाराष्ट्राच्या नागपूर-वर्धा-यवतमाळ या तीन जिल्ह्यातून जातो. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर-नागपूर (National Highway – NH204) उमरखेड-आर्णी-यवतमाळ-कळंब या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडतो. या मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र-मराठवाडा व विदर्भ एकमेकांशी जोडले गेले आहेत. त्यामुळे जवळजवळ अर्ध्याहून अधिक महाराष्ट्र राज्यात रस्त्याने व्यवसायजोडणी शक्य आहे.

    पैनगंगा नदी ही यवतमाळ जिल्ह्याची जीवनवाहिनी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पैनगंगा नदी यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरुन वाहते. पैनगंगा नदीच्या उपनद्या या जिल्ह्याच्या अंतर्गत भागातून वाहत येऊन पैनगंगा नदीला मिळतात. पैनगंगा व तिच्या उपनद्यातून होणारा पाणीपुरवठा हा या जिल्ह्यातील पाण्याचा स्रोत आहे. पावसाचे प्रमाण हे कमी असून परतीचा मान्सून यवतमाळ जिल्ह्यात जोरदार बरसतो. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. येथील जास्तीत जास्त लोकजीवन हे शेतीवर अवलंबवून आहे. पाणीपुरवठ्याच्या तशा कोणत्याही ठळक योजना या जिल्ह्यासाठी उपलब्ध नाहीत.

    नेर, बाभूळगाव, कळंब, राळेगाव, दिग्रस, दारव्हा, पुसद, महागाव, उमरखेड, घाटंजी, पांढरकवडा, मारेगाव, झरी जामणी हे यवतमाळ जिल्ह्यातील तालुके आहेत. लघुद्योगाच्या मोठ्या प्रमाणावर वाढीसाठी यवतमाळ जिल्ह्यात पोषक वातावरण आहे. या जिल्ह्यात अकुशल कामगार मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र या जिल्ह्यातील लोकांची शिकण्याची वृत्ती ही फार चांगली आहे. शिक्षणासाठी मोठमोठ्या शैक्षणिक संस्था (काही तुरळक संस्था वगळून) या जिल्ह्यात नाहीत. गुणग्रहणाची उत्तम क्षमता या जिल्ह्यातील लोकांजवळ आहे. याशिवाय येथील तरुण शारीरिक क्षमतेने चांगले असल्याने त्यांच्यातील कलागुण ओळखून त्याच्या वाढीसाठी वाव मिळाला तर देशासाठी सर्वोत्कृष्ट खेळाडू या जिल्ह्यातून निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. आजवर क्षमता असून ही त्या गुणांना पैलू न पाडल्यामुळे आपला ठसा उमटवण्यात अपयशी ठरल्याचे पाहून खंत वाटते.

    आर्थिक उत्पन्नाचे स्रोत सुध्दा कमी आहेत. त्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची हुनर इथल्या माणसांमध्ये आहे. आयटी, manufacturing हे उद्योग वाढण्याच्या आधी शेतीपूरक उद्योग वाढीस लावण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील मोठे खाद्यान्नाचे ब्रँड तयार करण्याची क्षमता यवतमाळ जिल्ह्याची आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन करत असल्याने या जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा ही ओळख प्राप्त झाली आहे. मात्र कापसावर प्रक्रिया करणारी मोठी केंद्रे या जिल्ह्यात नाहीत. त्यामुळे जिल्ह्याची आर्थिक बाजू तशी फार भक्कम होताना दिसत नाही. उत्तरेकडे आता कापसावर प्रक्रिया करणारा एक मोठा प्रकल्प अमरावती मध्ये निर्माण होत आहे. त्याचा फायदा यवतमाळला होऊ शकतो. शेती, सेवा, शेतीपूरक उद्योग, हातमाग, यंत्रमाग, आयटी, शिक्षण, बँकिंग व manufacturing उद्योग येणाऱ्या काळात या जिल्ह्यात वाढणार आहेत. तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत स्वतःची ओळख जपत हा जिल्हा लवकरच समृध्दीचे उद्दिष्ट साध्य करेल याची खात्री वाटते. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व मुंबई याठिकाणी व्यवसाय करण्याऐवजी यवतमाळ नवीन व्यवसाय उभारणे ही सोपी प्रक्रिया आहे. निर्माण होणारी उत्पादने नागपूरच्या बाजारपेठेत विकण्यासाठी सोयीस्कर आहे. विज्ञानाच्या प्रगतीने जग जवळ आले आहे. त्यामुळे जगभरात सर्वत्र ही उत्पादने विकली जाऊ शकतात.

    पुढील जिल्हा – वाशिम

  • आपण गधा मजुरी तर करत नाही ना?

    आपण गधा मजुरी तर करत नाही ना?

    जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांतून शिकतो तो शहाणा माणूस. अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी ‘उद्योजकता विजडम’ या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे, तर आजच्या गोष्टीचा विषय आहे ‘आपण गधा मजुरी तर करत नाही ना?’ करायची सुरवात?

    बँकेचे २० लाखांचे कर्ज काढले, महिना ३० हजार हप्ता… दुकान भाड्याने घेतले… ४ कामगार ठेवले, त्यांचा पगार ३० हजार रुपये… सर्व प्रकारचे कर महिना जवळपास १० हजार… वीजबिल, प्रवास इत्यादी किरकोळ खर्च ५ ते १० हजार… ईएमआयवर फ्लॅट व गाडी घेतली आहे, त्याचा हप्ता महिना १५ हजार जातो… शेवटी व्यवसायातून स्वतःसाठी व घरखर्चासाठी राहतात फक्त काही हजार रुपये… अशीच आहे आज असंख्य व्यावसायिकांची स्थिती… यालाच म्हणतात गधा मजुरी! व्यवसाय स्वतःच्या फायद्यासाठी करतो की इतरांना पैसे वाटण्यासाठी हेच कळत नाही. वैयक्तिक जेवढा फायदा कमावता, त्यापेक्षा जास्त बँकेचे व्याज देता, दुकानाचे भाडे त्यापेक्षा जास्त देता, कामगारांना पगार त्यापेक्षा जास्त देता, असे का होते?

    याची काही मुख्य कारणे आहेत. एक म्हणजे मार्केट साईज व ट्रेंडचा विचार न करता भला मोठा व्यवसाय सुरू केलेला असतो, नंतर म्हणावा तेवढा व्यवसाय होत नाही, त्यामुळे आता करायचं काय, बंदही करता येत नाही व जोरातही चालत नाही. स्वतःचं मन स्वत:ला सतत खात असतं. वरुन दिसणारे कित्येक मोठे व्यावसायिक ह्यामुळे आतून दु:खी असतात. दुसरे म्हणजे मार्केटिंग, ब्रॅंडिंग व व्यवस्थापनात कमी पडलेले असतात. दुकान किंवा नवीन व्यवसाय टाकला म्हणजे ग्राहक लगेच उद्यापासून आपल्या दुकानात येऊ लागतील असं होत नसतं राजाहो…! ज्यांच्याकडे शंभर फुटसुध्दा दुकान नाही, ते लाखो करोडोचा व्यवसाय करत आहेत तर ज्यांची करोडोची दुकाने, लाखोंचे फर्निचर केले आहे ते सध्या माशा मारत बसले आहेत. त्यामुळे व्यवसायात उतरताना मागचा पुढचा विचार करूनच उतरा. सुरुवातीलाच लगेच  अनावश्यक खर्च ओढवून घेऊ नका. नाहीतर सगळी कमाई त्यातच जाईल. एवढी मेहनत करूनसुद्धा हातात काहीच राहणार नाही.

    तुम्ही तुमच्या व्यवसायात पैशाचं नियोजन कसं करताय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी
  • लॉजिक की इमोशन्स ? – फ्रँचायझी व्यवसाय सुरू करण्यापूर्वी हे पाहा!

    लॉजिक की इमोशन्स ? – फ्रँचायझी व्यवसाय सुरू करण्यापूर्वी हे पाहा!

    तुम्हाला एका यशस्वी व सुप्रसिध्द ब्रँडच्या फ्रँचायझीचे मालक म्हणून करियर घडवायचे आहे का? स्वत:च्या फ्रँचायझी व्यवसायाचे मालक असण्याचे फायदे आपण समजून घेतले आहेत. परंतु योग्य फ्रँचायझी निवडण्यापूर्वी एखादी फ्रँचायझी संधी आपल्यासाठी परिपूर्ण आहे याबाबत तुमचे हदय व मेंदू पूर्णत: तयार आहे का? अर्थातच हा निर्णय तुमच्या भावनेवर नव्हे तर तर्कवादावर आधारित असावा.

    आपले डोके वापरा, मन आपोआपच साथ देईल.

    आपल्यासाठी कोणती फ्रँचायझी सुयोग्य व परिपूर्ण आहे, हे ठरवण्यापूर्वी आपल्याकडे कोणती कौशल्ये आहेत व आपली उद्दिष्टे काय आहेत याचा विचार करण्यासाठी स्वत:ला थोडा वेळ द्या. त्यासाठी आपली उद्दिष्टे, स्वप्ने व इच्छित जीवनशैली याबाबत स्वत:ला प्रश्न विचारा.

    एका माणसाला क्रिकेटचे फार वेड होते. क्रिकेटविषयी तो फारच भावनिक होता. याचे तीव्र भावनेतून त्याने खेळाच्या साहित्याचे दुकान सुरू केले. परंतु लवकरच त्याची फसगत झाली. क्रिकेटची तीव्र आवड असूनही त्याचे दुकान काही महिन्यांत बंद झाले. कारण त्यांच्याकडे एक दुकानदार म्हणून, एक व्यापारी म्हणून आवश्यक असलेली कौशल्ये व हुशारी नव्हती. फ्रँचायझी क्षेत्राबद्दल पॅशनेट असलेल्यांसाठी हा एक धडा आहे. तुमच्या निर्णय प्रक्रियेत तुमची वैयक्तिक आवड किंवा छंद यांना प्राथमिकता देऊ नका. व्यवसायिक निर्णय घेताना ते भावनात्मक नसावेत, ते तर्कशुध्द असावेत. एका विशिष्ट फ्रँचायझीच्या यशासाठी तुमचे कौशल्य व तुमच्यातील उपजत बुध्दीमत्ता हे दोन घटक महत्वपूर्ण भूमिका बजावतात. या व्यवसायात तीव्र पॅशनसोबतच लीडरशीप कौशल्ये आत्मसात करणे अत्यंत आवश्यक असते. फ्रँचायझी सिस्टीमच्या एकूण उद्दीष्टांबद्दल तुम्ही नेहमीच पॅशनेट व उत्साहित असले पाहिजे.

    परंतु आपण योग्य निर्णय घेत असल्याचे कसे सुनिश्चित करू शकता? तुम्ही योग्य लोकांशी सल्ला मसलत केले पाहिजे त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. एका संशोधनानुसार अनेक व्यवसायिक केवळ प्रॉडक्टची जाहिरात आवडल्याने फ्रँचायझी विकत घेतात व व्यवसाय सुरू करतात. ही भावना नैसर्गिक असली तरी केवळ भावनात्मक निर्णय घेऊन व्यवसाय सुरू करणे हा तर्कसंगत मार्ग नाही. यामुळे आपण अडचणीत येऊ शकता. एखादी फ्रँचायझी संधीसाठी आपल्या भावना तीव्र असतील किंवा एखाद्या फ्रँचायझी संधीने आपणास भावनिक अपील केले असेल तर ते तुमचे अंतिम लक्ष्य साध्य करण्यास तुमची मदत करेल याची खात्री करा किंवा तुम्हाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास योग्य आहे का, हे तपासून पहा. बरेच व्यवसायिक तर्कशुध्द विचार न करता भावनेच्या आहारी जाऊन फ्रँचायझी विकत घेतात व नंतर अपयशी होतात.

    काही व्यवसायिक अजून एक चूक करतात. केवळ एखादे उत्पादन किंवा सेवा उदा. पिझ्झा, केकची आवड आहे म्हणून पिझ्झा स्टोअर किंवा केक शॉपची फ्रँचायझी घेतात. या लॉजिक मध्ये गुणवत्तेला व कौशल्यांचे मूल्य शून्य असते. कारण या फ्रँचायझी निवडीमध्ये केवळ आपली आवड हा एकमेव आधार असतो आणि तो नसावा. तुम्ही या व्यवसायात स्वत:ला कसे गुंतवू इच्छिता. एक फ्रँचायझी ऑपरेटर/मालक म्हणून की एक अबसेन्टी ओनर म्हणून? तसेच फ्रँचायझी सपोर्ट सिस्टीम, कॉर्पोरेट स्टाफ आणि गुंतवणूक याबाबत सखोल माहिती असणे आवश्यक आहे. केवळ भावनिक निर्णय घेऊन बिझनेस सुरू केल्यास एक सक्षम लीडर म्हणून पुढील वाटचालही आव्हानात्मक असते. ही आव्हाने योग्य रीतीने न हाताळता आल्यास अपयश पदरी पडते.

    वरील सर्व गोष्टी पडताळून तसेच तर्क शुध्द विचार करून आपले उद्दिष्टे आणि लक्ष्य साध्य करण्यासाठी परिपूर्ण फ्रँचायझी कोणती आहे याबाबत निर्णय घेतल्या नंतरच तुमच्या संकल्पना वास्तवात उतरतील. एका नामवंत व यशस्वी ब्रँडच्या फ्रँचायझीचे मालक होणे ही स्वप्नवत व रोमांचक गोष्ट आहे. परंतु भावनांवर नियंत्रण ठेवून तर्कशुध्द पध्दतीने विचारपूर्वक व्यवसाय चालवला तर तुम्ही आत्मविश्वासाने यश प्राप्त करू शकता. कारण फक्त तीव्र भावनांनी यश संपादन करता येत नसते, त्यासाठी ज्ञान, कौशल्ये, स्थिर लक्ष्य व तर्कशुध्द विचारशक्ती आवश्यक असते.

  • करिअरबद्दल निर्णय घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? I Career counselling

    करिअरबद्दल निर्णय घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? I Career counselling

    Career counselling – दहावी – बारावीची परीक्षा झाली. निकाल सुद्धा जाहीर झाले. आता विद्यार्थी पुढील वर्गात प्रवेश घेण्यास रिकामे झाले, पण या वयातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे पुढे करायचं काय? कोणत्या क्षेत्रात करिअर घडवायचं? अनेकांचे सल्ले घेऊन आपण त्यांच्या सांगण्याप्रमाणे एखाद्या कोर्ससाठी अॅडमिशन घेतो, पण 3- 4 वर्ष त्या फील्डमध्ये काम केल्यानंतर मग लक्षात येतं की अरे आपण चुकीच्या क्षेत्रात काम करतोय. मग पुन्हा काही जण फील्ड चेंज करण्याचा विचार करतात, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. भविष्यात अशी वेळ तुमच्यावर येऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर करिअर निवडताना सुरुवातीलाच प्रत्येक छोट्यातील छोट्या गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. 

    करिअरचा निर्णय घेताना सामान्यत: दहावी-बारावीचे गुण, आवड, करिअरमधील वाढीच्या संधी, व्यक्तिमत्त्व, वेळ आणि शिक्षणासाठीचा खर्च या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. बऱ्याचदा आपण यशस्वी लोकांकडून प्रेरणा घेऊन त्यांच्याप्रमाणे ते ज्या क्षेत्रात काम करतायेत त्याच क्षेत्रात स्वतः देखील काम करण्याचा निर्णय घेतो, पण असा निर्णय तुम्हाला पुढील आयुष्यात महागात पडू शकतो. कोणीतरी यशस्वी झालं म्हणून तुम्ही देखील त्या क्षेत्रात व्हाल हा विचार डोक्यातून बाहेर काढा आणि तुम्हाला कोणते काम करण्यात आनंद मिळतो, त्यातच करिअर घडवा.

    क्षमता ओळखा:  एखाद्या क्षेत्रात चांगली कामगिरी करण्यासाठी तुमच्याकडे वेगवेगळे स्किल्स असणे गरजेचे आहे. बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला एखादे क्षेत्र आवडते, पण त्यामध्ये करिअर करण्यासाठी लागणारे स्किल्स तुमच्याकडे नसतात. जसे की काही क्षेत्रात तुम्हाला सतत प्रवास करावा लागत असेल. तर काही क्षेत्रात नऊ ते पाच जॉब असेल. तुम्हाला आधीच तुम्ही काय करु शकता याचा अंदाज असणे गरजेचे आहे. तुम्हाला आवडणाऱ्या जॉबसाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक गोष्टी तुमच्याकडे आहेत का? याचा विचार करुन मगच योग्य निर्णय घ्या.

    Career counselling ची मदत: सध्याच्या काळात दररोज नव्या करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे बऱ्याचदा हे करू की ते करू असा गोंधळ निर्माण होऊ शकतो. तुम्ही तुमच्या मतावर ठाम नसता अशा वेळी प्रोफेशनल मदत घेणे योग्य राहते. एक चांगला करिअर काऊन्सिलर तुमच्या आवडी-निवडी, गरजा आणि तुमचे मार्क्स या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून तुमच्यासाठी बेस्ट काय असेल याबद्दल सल्ला देतो. 

    स्वतःला कामात चॅलेंज करत राहा: जर तुम्हाला तुमचे काम कायमस्वरुपी आवडत राहावे असे वाटत असेल, तर तुम्ही सतत स्वतःला चॅलेंज करत राहणे गरजेचे आहे, तुम्ही दररोज एकसारखेच काम करत राहाल, तर नक्कीच एक दिवस तुम्हाला कंटाळा येईल आणि ते काम तुम्हाला नकोसे वाटेल. म्हणून तुम्ही प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे. जर दररोज काही नवे करणे शक्य नसेल, तर स्वतःसाठी काही गोल्स सेट करा, ज्यामुळे कामात तुमचा उत्साह टिकून राहील आणि तुम्ही यशस्वी होण्याकरिता अतिरिक्त मेहनत करत राहाल.

    मित्रांनो दहावी, बारावी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. यानंतर निवडलेली वाटच पुढे आपलं करिअर घडवण्यात मोलाची ठरते. बऱ्याचदा आपण ऐकीव माहितीवरून फील्ड निवडतो. हा निर्णय कधी योग्य ठरतो, तर कधी अयोग्य. त्यामुळे केवळ ऐकीव माहितीवरुन फील्ड निवडण्याऐवजी वरील मुद्यांचा विचार करून योग्य पद्धतीने निर्णय घेणं जास्त महत्त्वाचे ठरते.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

    आणखी वाचा

    Career in Fine Arts I फाइन आर्ट्समध्ये घ्या डिग्री, करिअरच्या आहेत विपुल संधी