Tag: प्रेरणादायी

  • स्वप्नं बघा, ती पूर्ण होतात!

    स्वप्नं बघा, ती पूर्ण होतात!

    स्वप्नं ती नव्हे जी झोपेत पडतात, स्वप्नं ती जी तुम्हाला झोपूच देत नाहीत असे डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम म्हणायचे. स्वप्नं म्हणजे काय? जर तुम्ही शब्दकोशात याचा अर्थ शोधलात, तर तुम्हाला उत्तर मिळेल, ‘एखादी इच्छित गोष्ट मिळविण्याचा ध्यास, ध्येय, महत्वाकांक्षा’. थोडक्यात एखादी अशक्य वाटणारी, तरीही मिळवता येईल अशी मोठी इच्छा.

    स्वप्नं सारेच बघतात. मोठी स्वप्नं न बघणारा माणूस शोधूनही सापडणार नाही, पण सगळ्यांचीच स्वप्नं प्रत्यक्षात येत नाहीत. याचे कारण म्हणजे काहीजण स्वप्न बघतात आणि ते साध्य करण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करतात, तर बाकीचे लोक लगेच आपली स्वप्नं लगेच विसरून जातात. पहिल्या प्रकारच्या लोकांमध्ये मोठी स्वप्नं बघायची, ते साध्य करण्याची हिंमत असते. असे लोक इतरांनाही प्रेरित करत असतात.

    सचिन तेंडुलकर, तुमच्या माझ्यासारखाच मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला मुलगा. पण त्याची स्वप्नं आभाळापेक्षाही मोठी होती. जी साकार करणं अशक्यप्राय गोष्ट होती… पण तो निघाला इतिहास घडवण्यासाठी… लहानपणापासूनच क्रिकेटमध्‍ये असलेल्‍या प्रचंड वेडापायी क्रिकेटलाच आपले करिअर करण्‍याचे ठरविले… एकमेव गोष्ट ज्यामुळे तो नेहमी पुढे जात राहिला, ती म्हणजे; त्याची मोठी स्वप्नं, त्याचा दृष्टीकोन, त्याची चिकाटी आणि खेळाविषयी असलेली प्रचंड तळमळ. यामुळे तो क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट बनला. आपल्या असामान्य बॅटिंगनं त्यानं अवघ्या क्रिकेटजगताला वेड लावलं. पण याहूनही महत्त्वाचं म्हणजे लाखो करोडो लोकांना त्यानं स्वप्न बघायला शिकवलं. या पिढीला त्यानं स्वप्नांचा पाठलाग करायला शिकवलं, ज्यांची अशी स्वप्नं बघायची आधी हिंमत सुद्धा होत नव्हती.

    सर रॉजर बॅनिस्टर, चार मिनिटांपेक्षाही कमी वेळात एक मैल अंतर धावणारी जगातील पहिली व्यक्ती. १९५४मध्ये त्यांनी हा कारनामा केला होता. तोपर्यंत चार मिनिटांत एक मैल धावणे ही लोकांना अशक्य गोष्टच वाटत होती. त्यांना वाटायचे मानवी शरीराच्या मर्यादांमुळे कुठलाही माणूस एवढ्या वेगाने पळू शकत नाही. ही अशक्य अशी गोष्ट आहे. पण बॅनिस्टर यांनी सगळ्यांना खोटे ठरवले. त्यांनी स्वतःवर मेहनत घेतली. कठोर परिश्रम केले आणि महत्त्वाचं म्हणजे आपण हे करू शकतो हा विश्वास कायम ठेवला. महान लोकांची हीच तर खासियत असते. ही माणसं म्हणजे त्या मेणबत्तीसारखी असतात, जी स्वतः जळून इतरांचं जीवन प्रकाशमान करत असते. त्यांच्या जीवनात आशेचा आणि प्रेरणेचा नवीन किरण जागवत असते. मग जर ते करू शकतात, तर तुम्हाला का नाही जमणार? जर तुम्ही स्वयंशिस्त, चिकाटी या गोष्टी आत्मसात केल्या, आयुष्यात नवनवीन आव्हानं स्वीकारत गेलात, चालढकल करणे थांबवले, तर तुमची स्वप्नं साकार करण्यापासून तुम्हाला कुणीही थांबवू शकणार नाही. आणि या प्रवासात तुम्ही अनेक लोकांच्या आयुष्यातील असा प्रकाशाचा किरण बनाल, ज्याच्यामुळे अनेकांना यश मिळवण्याच्या मार्गावर चालना मिळते.

    इथे मला ‘टर्बो’ या सिनेमातील एक सुंदर विचार आठवतोय “कुठलंही स्वप्नं खूप मोठं नसतं आणि स्वप्नं पाहणारा लहान नसतो”. मोठी स्वप्नं फक्त तुमच्याच नाही तर इतर अनेकांच्या सकारात्मक बदल घडवून आणत असतात. त्यांना प्रेरित करत असतात.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • यशाचे रहस्य: प्रयत्न करणे कधीही सोडू नका

    यशाचे रहस्य: प्रयत्न करणे कधीही सोडू नका

    असं म्हणतात की, ‘यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो’ आणि व्यवसायाच्या बाबतीत तर हे ‘सोळा आणे सत्य’ आहे. तर मग असा कुठला एक सद्गुण आहे की ज्यामुळे एखादा उद्योजक यशस्वी होऊ शकतो?

    स्टीव्ह जॉब्सचे एक वाक्य आहे, “यशस्वी उद्योजक आणि अयशस्वी उद्योजकांची तुलना करायची झाल्यास, अयशस्वी उद्योजकांच्या अपयशाचे मुख्य कारण म्हणजे प्रयत्नांचा अभाव!”

    आपल्याला उद्योजक व्हायचंय हा निर्णय घेणं एक कठीण काम आहे, पण पटकन यश मिळत नसताना आणि वारंवार अपयशाची चव चाखावी लागत असतानासुद्धा त्याच निर्णयाला चिकटून राहणं हे महाकठीण काम आहे.

    आपल्या आयुष्यात असं अनेकदा होतं कि; आपण काम करत राहतो, पण आपल्याला त्या कामाचं फळ मिळत नाही अगदी असंच उद्योजक म्हणून काम करताना तुम्हाला मेहनत करावी लागू शकते, पण केलेल्या मेहनतीचा मोबदला मिळेल का नाही याची काही खात्री नसते. त्याचबबरोबर अनेक आव्हानं, समाजाचा दबाव हे सुद्धा आहेच. ही ती आव्हाने असतात जी तुम्हाला नाउमेद करतात आणि प्रयत्न सोडायला भाग पाडतात. या अशा अडचणीच्या परिस्थितीतून तर एकच गोष्ट तुम्हाला टिकवून ठेवू शकते आणि ती म्हणजे प्रयत्न, प्रयत्न आणि प्रयत्न!

    या सर्व संकटांच्या छातीवर पाय ठेऊन तुम्ही तुमचे उद्योजकतेचे स्वप्न जपले पाहिजे, थोड्याश्या अपयशाने खचून न जाता प्रयत्न निरंतर चालू ठेवले पाहिजे. याबाबतीत सर्वात सोपं उदाहरण म्हणजे नदीचं! नदी सर्व खडकांतून मार्ग काढत पुढे जात राहते, ती शक्तीमुळे नाही, तर सतत पुढे जाण्याच्या वृत्तीमुळे! खडकांच्या भीतीने नदीने आपला प्रवाह थांबवला तर त्याच नदीचं डबकं व्हायला फार वेळ लागत नाही. त्यामुळं वाहत रहा आणि प्रयत्न करत रहा, कारण एक दिवस यश तुमच्या हातात असेल. 

    हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि नवी अर्थक्रांतीच्या चॅनेलला आताच subscribe करा. 

    आणखी वाचा

  • संयम…! : यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले अदृश्य कौशल्य

    संयम…! : यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले अदृश्य कौशल्य

    मेहनत, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास या बरोबरच यशस्वी आयुष्यासाठी उपयोगी असलेलं सर्वात महत्वाचं कौशल्य म्हणजे ‘संयम’. बऱ्याच जणांकडे ही आधी नमूद केलेली चार कौशल्य असतात, पण संयम मात्र नसतो. तर आजच्या भागात आपण बोलणार आहोत आपल्या आयुष्यात संयमाचं महत्त्व काय आहे. चला तर मग सुरुवात करूया!

    संयम म्हणजे फक्त वाट बघणं किंवा प्रतीक्षा करणं एवढंच नाही, तर ती प्रतीक्षा करत असताना आशावादी वृत्ती बाळगणं. एक छान मराठी सुभाषित आहे, ‘संयम म्हणजे काय? तर एक युद्ध… स्वतःच्या विरुद्ध...’

    तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी यशाचा आनंद घेतला आहे का? तो क्षण, त्यावेळच्या मनातील भावना खूपच महत्त्वाच्या असतात. नाही का? तसेच तुम्ही अनेकदा पराभवाची चवसुद्धा चाखली असेल. जगात सर्वत्र आणि सगळ्यांच्या बाबतीत हा यश-अपयशाचा खेळ चालूच असतो. जीवनात अपयश हाच खरा सोबती आहे. त्याचं स्वागत केलं पाहिजे. त्याच्यामुळे तर आपल्याला नम्रता, संयम आणि धैर्याचे धडे मिळतात. माणसाने नेहमी कठीण परिस्थितीतून वर येत जगलं की जिंकणं सोप्पं होतं.

    इतिहासाकडून आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे; ज्यांनी इतिहास घडवला, स्वतःचा नाव अजरामर केलं त्यापैकी कुणाचंही आयुष्य सुखासीन नव्हतं. बहुतेक सर्वांनाच काट्यांनी भरलेल्या रस्त्यावरून स्वत:ची वाट शोधावी लागली.

    लष्करी प्रशिक्षण घेताना कॅरोली टकाक्सला भयंकर दुखापत झाली आणि त्याचा उजवा हात निकामी झाला. त्यामुळे तो नेमबाजी करू शकणार नव्हता, पण ही दुखापत त्याला त्याच्या ध्येयापासून विचलित करू शकली नाही. त्याने डाव्या हाताने सराव करायला सुरुवात केली. न थकता, न थांबता त्याचा सराव चालूच होता आणि एक दिवस असा उजाडला कि ऑलिम्पिकच्या इतिहासात कधीही न घडलेली घटना घडली ती आणि ती म्हणजे कॅरोली टकाक्स हा ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीच्या २५ मीटर रॅपिड फायर प्रकारात दोन सुवर्णपदकं मिळवणारा जगातील पहिला नेमबाज बनला.

    बिल गेट्स हे सुद्धा असंच एक नाव आहे, ज्यांना सुरुवातीच्या काळात खडतर परिस्थितीला तोंड द्यावे लागले. तुमचा हे वाचून कदाचित विश्वास बसणार नाही, पण बिल गेट्स हॉवर्ड विद्यापीठातील ड्रॉपआउट आहेत. त्यांच्याकडे कोणतीही शैक्षणिक पदवी नाही, पण या गोष्टी त्यांच्या मार्गात कधीही अडसर बनल्या नाहीत. ते पुढे जात राहिले आणि आज ते जगातील सर्वात यशस्वी व्यक्तींपैकी एक आहेत. अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला देता येतील.

    मित्रांनो, एक लक्षात घ्या आपल्याला एखादी गोष्ट मिळाली नाही, याचा अर्थ सगळं संपलं असा होतो का? निश्‍चितच नाही. उलट आपण स्वतःला सिद्ध करण्यासाठी अजून थोडं झगडलं पाहिजे. स्वतःवर, स्वतःच्या प्रयत्नांवर विश्‍वास ठेवला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं, ‘संयम’ ठेवला पाहिजे. आयुष्यातला बहुतेक प्रश्‍नांचं उत्तर ‘वेळ’ देते. त्यामुळे आपल्याकडं कमालीचा संयम असणं खूप गरजेचं आहे.

    मनुष्य जेव्हा संयम शक्ती वाढवतो, तेव्हा त्याची सगळी कामं सहज पूर्ण होतात. संयमाचं फळ केवळ मधुरच नाही, तर स्वास्थ्यवर्धकही असते. तुमचा संयम वाढला, की तुमची संकल्पशक्ती सुद्धा वाढत जाते. तुम्ही ध्येयाच्या अधिक जवळ जाऊ लागता. संयम नसेल, तर अनेकदा कामं पूर्ण होत नाहीत, अर्धवट राहतात. स्वप्न पूर्ण करण्यासाठी संयम बाळगला आणि योग्य दिशेने वाटचाल केली, तर नशीब तुमच्या मार्गात कधीही येणार नाही. परंतु अट एवढीच आहे की, लक्ष्य साध्य करताना पराजय स्वीकारू नये. म्हणजेच तुमच्या वाटेला कितीही पराजय आले तरी खचून जाऊ नका धैर्याने संयमाने पुढे चालत रहा एक दिवस तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

    जॉईस चॅपमन या लेखिकेचं एक खूप प्रेरणादायी वाक्य आहे “जर तुमचं स्वप्नं खूप मोठं असेल आणि त्यासाठी संपूर्ण आयुष्य झोकून द्यायला तुम्ही तयार असाल, तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व गोष्टी करणे हा एकचं मार्ग आहे.” त्यामुळे कधीही प्रयत्न सोडू नका, नेहमी पुढे जात राहा.

    आणखी वाचा

  • पॉवर ऑफ चॉइस – ‘तुम्ही बगळा की गरुड?’ हे वाक्य तुमच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणू शकते!

    पॉवर ऑफ चॉइस – ‘तुम्ही बगळा की गरुड?’ हे वाक्य तुमच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणू शकते!

    सुप्रसिद्ध साहित्यिक चेतन भगत याने सांगितलेला हा किस्सा आहे.

    मी एअरपोर्टच्या बाहेर टॅक्सीसाठी रांगेत उभा होतो. तेवढ्यात माझ्यासमोर एक टॅक्सी येऊन उभी राहिली. पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली की ती टॅक्सी बाहेरून नुसतीच स्वच्छ नव्हती तर चकचकीत पॉलीश केलेली होती. टॅक्सीचा ड्रायव्हर खाली उतरून व टॅक्सीला वळसा घालून माझ्याकडे येत होता. त्यावेळी माझ्या लक्षात आले की त्याचा ड्रेस एकदम स्मार्ट आहे. त्याने स्वच्छ धुतलेला व इस्री केलेला पांढरा शर्ट घातला होता. तशीच इस्त्री केलेली काळी पँट होती. टाय लावलेला होता व पायात चकचकीत पॉलीश केलेले बुट होते. त्याने आदराने माझ्यासाठी टॅक्सीचे मागील दार उघडले व माझ्या हातात एक लॅमीनेट केलेले कार्ड देत म्हणाला, ‘ सर! माझे नाव वासु! मी तुमचा टॅक्सी ड्रायव्हर. मी तुमचे सामान मागे डिकीमध्ये ठेवेपर्यंत आपण हे माझे मिशन स्टेटमेन्ट कृपया वाचावे.’

    ‘मिशन स्टेटमेन्ट?’ मला गंमत वाटली व मी त्या कार्डावर नजर टाकली. त्यावर सुरेख व ठळक अक्षरात छापले होते. ‘ वासुचे मिशन स्टेटमेन्ट! माझ्या टॅक्सीमधील प्रवाशांना कमीत कमी खर्चात, कमीत कमी वेळात, सुरक्षितपणे त्यांच्या इच्छीत स्थळी पोचवणे व ते सुद्धा मैत्रीपूर्ण वातावरणात!’

    मला गंमत वाटली. मी टॅक्सीत बसलो व मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण टॅक्सी आतुनसुद्धा बाहेरच्यासारखी चकचकीत स्वच्छ होती. वासुने त्याच्या ड्रायव्हरच्या सिटवर बसता बसता विचारले, ‘सर! आपण कॉफी घेणार? माझ्याकडे थर्मासमध्ये रेग्युलर तसेच ‘डिकॅफ’ कॉफी आहे!’ मी सहज गंमत करावी म्हणून म्हणालो, ‘नको! मला कॉफी नको! काहीतरी थंड पेय हवे आहे!’ ‘काही हरकत नाही!’ वासु म्हणाला, ‘माझ्याकडे पुढे कुलर आहे. त्यामध्ये रेग्युलर व डायट कोक, लस्सी, पाणी व ऑरेंज ज्युस आहे.’‘मला लस्सी चालेल!’ मी म्हणालो पण माझ्या चेहेऱ्यावरचे आश्चर्य काही लपत नव्हते. माझ्या हातात लस्सी देताना वासु म्हणाला, ‘आपल्याला जर वाचायला काही हवे असेल तर टॅक्सीमध्ये द हिन्दु, टाईम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाईम्स व इंडिया टुडे आहे.’

    माझ्या हातात अजुन एक लॅमिनेटेड कार्ड देत वासु म्हणाला, ‘ही रेडियो स्टेशन्स व त्यावर असलेल्या कार्यक्रमांची यादी, जर आपल्याला रेडीयो ऐकायचा असेल तर!’मला वासुचे कौतुक वाटु लागले होते. टॅक्सी सुरु करताना वासु म्हणाला, ‘मी एअर कंडीशनींग चालु केले आहे. टेम्परेचर योग्य आहे ना व आपल्याला कंफर्टेबल वाटते ना? का यात ऍजेस्ट करू?’

    वासुने मला त्यावेळी माझ्या इच्छीत स्थळी जाण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता हे सांगितले. तसेच वाटेत कोणकोणती प्रेक्षणीय स्थळे लागतात याची पण माहिती दिली. ‘आपणास हरकत नसेल तर आपण माझ्याशी गप्पा मारू शकता. पण आपल्याला जर एकांत हवा असेल तर मी आपल्याला डिस्टर्ब करणार नाही’ वासु म्हणाला.

    ‘मला एक सांग वासु!’ मला माझे आश्चर्य अजुनही लपवता येत नव्हते, ‘तु तुझ्या ग्राहकांना नेहमी अशीच सेवा देत असतोस?’ वासुच्या चेहेऱ्यावर हास्य पसरले. ‘नाही सर! गेल्या दोन वर्षांपासूनच मी हे सुरु केले. या आधीची पाच वर्षे मी इतर सर्वसामान्य टॅक्सी ड्रायव्हरसारखाच होतो. गबाळा, अनुत्साही, सतत कसल्या ना कसल्या तरी तक्रारी करत बसणारा! पण एक दिवशी मला ‘पॉवर ऑफ चॉइस’ बद्दल कळले!’

    ‘पॉवर ऑफ चॉइस म्हणजे?’ मी उत्सुकतेने विचारले

    पॉवर ऑफ चॉइस म्हणजे तुम्ही बगळा व्हायचे का गरुड व्हायचे याचा चॉइस!’ वासु म्हणाला, ‘तुम्ही सकाळी उठलात व म्हणालात की आजचा दिवस काही चांगला जाणार नाही तर तुमची कधीच निराशा होणार नाही. तक्रारी करण्याचे थांबवा! गरूड व्हा, बगळा होऊ नका! कारण बगळा सतत ‘क्वॅक क्वॅक’ करत असतो म्हणजे तक्रारी करत बसतो. तर गरुड येणाऱ्या सर्व अडचणी, अडथळे, संकटे यावर मात करत आकाशात उंच भरारी घेत असतो, ढगांच्या वर जात असतो. माझ्या डोक्यात हे वाक्य पक्के बसले’ वासु म्हणाला1

    ‘आता मी माझीच गोष्ट सांगतो. मी आधी बगळा होतो. सतत तक्रारी करत बसायचो. पण मग मी माझ्या मनोवृत्तीत बदल करायचे ठरवले. बगळा न होता गरुड व्हायचे ठरवले. मी आजूबाजूला निरीक्षण करायला सुरवात केली. बहुतेक टॅक्सी ड्रायव्हर गबाळे व गलीच्छ असतात, ग्राहकांची काळजी न घेणारे असतात. ग्राहक नेहमी त्यांच्याबद्दल तक्रारी करत असतात. त्यांच्या गाड्या पण खराब व अस्वच्छ असतात. मी माझ्या बाबतीत काही बदल करायचे ठरवले. थोडे थोडे बदल करत गेलो!’ वासु सांगत होता.

    ‘मग याचा तुला चांगला फायदा झाला असेल नाही का?’ मी वासुला विचारले.

    ‘झाला तर!’ वासु उत्साहाने सांगू लागला. ‘मी गरुड व्हायचे ठरवल्यावर पहिल्या वर्षीच माझे उत्पन्न आधीच्या वर्षापेक्षा दुपटीने वाढले. या वर्षी कदाचित माझे उत्पन्न चौपट वाढेल. माझ्या अनेक ग्राहकांनी माझा सेल फोन नंबर घेतला आहे. ते माझीच टॅक्सी हवी म्हणून फोन करत असतात. बहुतेक वेळा माझी टॅक्सी ऍडव्हान्समध्ये बुक होते.’

    वासुने वेगळा चॉइस केला. त्याने किरकिर करणारा बगळा न होता आकाशात उंच भरारी घेणारा गरूड व्हायचे ठरवले. त्याचे फळ त्याला मिळाले.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

    आणखी वाचा