Tag: प्रेरणादायी

  • व्यवसायात यशस्वी होण्यासाठीचे स्टीव्ह जॉब्स यांचे १० नियम

    व्यवसायात यशस्वी होण्यासाठीचे स्टीव्ह जॉब्स यांचे १० नियम

    नियम १ : गुणवत्तेचा मापदंड निर्माण करा. काही लोकांना अशा वातावरणाची सवयच नसते, जिथे सर्वोत्कृष्टतेची अपेक्षा केली जाते. जर तुम्ही अशाच वातावरणात राहिलात तर तुम्हाला उत्कृष्ट काम करायची सवयच राहणार नाही. त्यामुळे तुम्ही ज्या लोकांसोबत काम करता ते लोक खरंच तुम्हाला वर नेतायेत का याचा विचार करा.

    नियम २ : ‘डिजाईन’ हा शब्द म्हटल्यावर डोळ्यासमोर येतो तो एखाद्या गोष्टीचा appearance. पण ‘डिजाईन’ म्हणजे केवळ वस्तू कशी आहे किंवा ती कशी दिसते एवढेच नसून, ती वस्तू कशी काम करते हे सुद्धा आहे.

    नियम ३ : तुम्ही कोणतेही काम करत असा ते काम सर्वोत्कृष्ट व्हावे यासाठी गरजेची असते ती एकाग्रता आणि साधेपणा. साध्या सरळ गोष्टीसुद्धा अवघड असू शकतात. तुमच्या विचारांमध्ये सुस्पष्टता येण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, पण त्याची गरज असते. एकदा का तुम्ही हे साध्य केलं की, तुम्ही मोठे पर्वतसुद्धा हलवू शकता.

    नियम ४ : जीवनात कुठल्याही टप्प्यावर महत्वाचे असते ते म्हणजे एकीचे बळ. जी गोष्ट एकट्याने साध्य होत नाही ती सगळे सोबत असल्यावर चटकन होते. हेच तत्त्व जर आपण व्यवसायात वापरल तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. पण त्यासाठी तुम्हाला फक्त काही चांगल्या सहकाऱ्यांची गरज असते.

    नियम ५ : काहीतरी नवीन शोधताना तुमच्या हातून चुका होऊ शकतात. चुका झाल्यातर होऊ द्या. चुका होतायेत म्हणजे तुम्ही काहीतरी नवीन गोष्ट करण्याचा प्रयत्न करताय. झालेल्या चुकांचा स्वीकार करा त्यात कशी सुधारणा करता येईल याचा विचार करा.

    नियम ६ : तुम्ही जे काम करताय त्यावर तुमचं प्रेम आहे की नाही यावर अवलंबून असत की तुम्हाला त्या कामात यश मिळेल की नाही. आणि जर अजूनही तुम्हाला अशी गोष्ट मिळाली नसेल, तर खोज जारी रखें।

    नियम ७ : जॉब्स म्हणतात मागील ३३ वर्षे रोज सकाळी मी आरशासमोर उभा राहून स्वतःला विचारतो, ‘जर आजचा दिवस माझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल, तर आज मी जे करतो आहे, तेच करायला मला आवडेल का?’ जेव्हा बरेच दिवस या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी मिळतं, मी समजून जातो, काहीतरी बदलायची गरज आहे.

    नियम ८ : तुमच्याकडे वेळ फार कमी आहे, तेव्हा दुसऱ्या कोणाचेतरी आयुष्य जगणे सोडून द्या. तुम्हाला हा नियम छोटा वाटला असेल पण हा नियम परत एकदा ऐका मग तुमच्या लक्षात येईल की याचा अर्थ किती मोठा आहे.

    नियम ९ : लोकांना असं बऱ्याच वेळा वाटत असत की तुमच यश हे तुम्हाला एका रात्रीत मिळालं आहे. पण जर तुम्ही नीट पाहिलंत, तर तुमच्या लक्षात येईल की; एका रात्रीत मिळालेलं यश हे खरतर एका रात्रीत मिळालेलंचं नसतं. त्या यशासाठी अनेक रात्री या जागून काढाव्या लागलेल्या असतात.

    नियम १० : (Steve Jobs) जॉब्स यांचा सर्वात famous quote म्हणजे ‘स्टे हंग्री, स्टे फुलीश’ – भुकेलेले राहा, वेडे रहा!

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • कोणतीही नवीन सवय लावू शकता फक्त 2 मिनिटांत | Sunday Motivation

    कोणतीही नवीन सवय लावू शकता फक्त 2 मिनिटांत | Sunday Motivation

    मोठे बदल घडवण्याच्या छोट्या सवयी!  

    Procrastination टाळण्यासाठी हा २ मिनिटांचा नियम पाळाच!

    पण मग यावर करणार काय? प्रत्येक प्रश्नाला जसं उत्तर असतं तसं याही प्रश्नाला उत्तर असेलच की! चला मग शोधूया या उत्तराला!

    आता समजा Twyla यांना Taxi पकडण्यासाठी ३ किलोमीटर चालत जावं लागलं असतं किंवा आपल्याला आज कोणते कपडे घालायचे आहेत याचा विचार करत बसावा लागला असता तर बहुतेक त्या ती taxi पकडूच शकल्या नसत्या कारण सकाळी उठल्या उठल्या ३ किलोमीटर चालणं अवघड आहे. त्यामुळे कोणतीही सवय लावताना ती सुरु करतानाची process ही खूप simple असली पाहिजे. या गोष्टीला आपल्या रोजच्या जीवनात उतरवण्यासाठी आपण पाहूया २ मिनिटांचा नियम.

    आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की सुरुवात ही नेहमी सोपी झाली पाहिजे. जेव्हा आपण कोणतीही सवय लावायचा किंवा काही बदल करण्याचा विचार करतो तेव्हा आधी आपण खूप excited असतो; कधी एकदा काम करायला घेतो आणि कधी ते संपवतो असं होतं आपल्याला! हे किती दिवस टिकतं तर फक्त १ दिवस. मग दुसरा दिवस उजाडतो आणि परत आपलं रोजचं जगणं सुरु होतं. पण याच गोष्टी टाळण्यासाठी महत्त्वाचा ठरतो तो २ मिनिटांचा नियम हा नियम काय आहे तर “कोणतीही नवी सवय सुरु करण्यासाठी ती सवय २ मिनिटांत पूर्ण करून झाली पाहिजे” नाही समजलं ना ? सांगतो! 

    समजा तुम्हाला रोज रात्री झोपायच्या आधी पुस्तक वाचण्याची सवय लावायची आहे. आता तुम्हाला २ मिनिटांचा नियम माहिती आहे तर तुम्ही काय करणार आधी सवय लावणार फक्त १ पान वाचण्याची. दोन मिनिटांत एक पान वाचून झालं की तुम्ही ते पुस्तक ठेऊन द्यायचं. बघा तुमचं target achieve झालं. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी तुम्ही हीच process follow करणार पाचव्या दिवशी तुम्हाला वाटेल की यार आज १ पान वाचण्यापेक्षा आपण २ पानं वाचूया. मग हळूहळू तुम्ही २ पानावरून ३ पानावर, ३ पानावरून ४ वर, ४ वरून पाच, सहा, दहा, वीस, तीस वर जाल आणि पहा आता तुम्हाला पुस्तक वाचनाची सवय लागलीये.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • निःस्वार्थ मदत हीच जगण्याची कला

    निःस्वार्थ मदत हीच जगण्याची कला

    उर्दूमध्ये एक वाक्य आहे, “खुदा भी अपने रहमतों की उस पर बरसात करता हैं, जो जरूरतमंद की मदत के लिए आगे बढ़ता हैं”

    मित्रांनो आपल्याला हा सुंदर मानव जन्म मिळाला आहे आणि या जन्मात जर आपण दुसऱ्याच्या उपयोगाला नाही आलो, तर मग सगळंच व्यर्थ आहे. आज मी तुम्हाला जो प्रसंग सांगणार आहे तो आहे, १५ एप्रिल १९१२ रोजीचा. उत्तर अटलांटिक महासागरातला. टायटॅनिक जहाजाच्या विनाशकारी सागरी अपघाताचा.

    २,२२४ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांबरोबर निघालेल्या या बलाढ्य जहाजात १४ एप्रिलच्या मध्यरात्री अनेकांचा आक्रोश ऐकू येऊ लागला. हृदय पिळवटून टाकणाऱ्या किंकाळ्यांनी मन सुन्न झालं होतं. मात्र कोणतीच दैवी शक्ती टायटॅनिकला वाचवू शकत नव्हती. ज्यावेळी टायटॅनिक बुडत होतं, तेव्हा तीन जहाजे त्याच्या जवळपास होती. सॅम्पसन, कॅलिफोर्निया, कार्पेथिया.

    सॅम्पसन टायटॅनिकपासून केवळ 7 किलोमीटर अंतरावर होते. त्या जहाजातील लोकांनी धोका दर्शविण्यासाठी टायटॅनिकवरून आकाशात उडवलेल्या दारूगोळ्यांना पाहिले, परंतु ते जहाज बेकायदेशीरपणे सीलची शिकार करत होते. जर टायटॅनिकच्या मदतीला गेलो, तर आपण पकडले जावू या विचाराने ते टायटॅनिकच्या उलट दिशेने निघून गेले. ते टायटॅनिकच्या गरजेला धावले नाहीत, कारण त्यांनी केलेल्या पापाच्या विचारात ते गढून गेले होते.

    दुसरे जहाज कॅलिफोर्निया नावाचे होते. हे जहाज टायटॅनिक पासून केवळ १४ किलोमीटर अंतरावर होते. पण ते चोहोबाजूंनी हिमनगात वेढलेले होते. जहाजाच्या कॅप्टनने सुद्धा धोक्याचा इशारा बघितला, पण परिस्थिती अनुकूल नाही. आपणच हिमनगात अडकलोय. म्हणून त्याने परत जाण्याचा निर्णय घेतला आणि तो झोपी गेला.

    “परिस्थिती योग्य नाही म्हणून मदत करू शकलो नाही” असं सांगण म्हणजे कारणं देणं, जबाबदारी झटकणं. असेल त्या परिस्थितीत स्वतःवरील संकटांशी दोन हात करून आपण इतरांना मदत केली, तरच ती निस्वार्थी भावनेने केलेली मदत म्हणता येईल.

    आपल्याला त्या चिमणीची गोष्ट माहितीच आहे, जिने जंगलात आग लागल्यावर कशाचीही पर्वा न करता, आपल्या छोट्याश्या चोचीतून कित्येक मैल अंतरावरून चोचीत पाणी नेऊन आग विझवण्याचा प्रयत्न करत होती. रस्त्यात तिला हत्ती भेटला. हत्ती तिला म्हणाला, “अगं, चिऊताई तुझ्या चोचीतल्या त्या एवढ्याश्या पाण्याने जंगल विझणार आहे का? कशाला उगाच धावपळ करतेस, सोड ते प्रयत्न.” त्यावर ती चिऊताई म्हणाली, “माझ्या प्रयत्नांनी जंगलातील आग विझेल की नाही माहित नाही, पण जेव्हा-केव्हा या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नसून आग विझवणाऱ्यांमध्ये असेल आणि तेच माझ्यासाठी पुरेसं आहे.”       

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो!

    सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो! 

    जर आपण पाण्यात मीठ टाकले तर ते पाणी खारट बनते, मात्र जर त्याच पाण्यात साखर टाकली तर? तर  मात्र ते पाणी गोड बनते. नमस्कार, मित्रांनो च्या आजच्या भागात आपले स्वागत आहे तर आज बोलूया संगतीविषयी.

    वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. एक दरोडेखोर परमेश्वराच्या नामस्मरणामुळे ऋषी बनला. इतकंच नाही तर त्याने रामायणदेखील लिहीले. त्याचं कारण म्हणजे संगत. माणसाला शिक्षण हे केवळ शाळा-कॉलेजमधून मिळत नाही, तर आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीतून, सहवासातील माणसांच्या अनुकरणातून तो शिकत असतो.

    जेव्हा आकाशातून पावसाचा थेंब जमिनीवर येतो तेव्हा तो स्वच्छ आणि निखळ असतो. तोच थेंब जर घाणीच्या पाण्यात पडला, तर त्याला घाणीचे स्वरूप प्राप्त होते आणि जर समुद्रातील शिंपल्यात पडला, तर मात्र त्यातून मोती तयार होतो. संगतीचा परिणाम किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला दिसून येते. शुद्ध, सात्त्विक वृत्तीच्या माणसांच्या सान्निध्यात राहिल्यावर आपल्यावरही त्या चांगल्या संस्काराचा प्रभाव पडतो, पण सध्याच्या युगात चांगल्या गोष्टी कोणत्या आणि वाईट कोणत्या हेच ठरविणे अवघड झाले आहे. संस्कारांचा अभ्यास देणाऱ्या मठामध्येदेखील नको ते धंदे केले जातात.

    आपला जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातात नसतं, मात्र आपण कोणाच्या संगतीत रहावं हे आपल्या हातात असतं. आपल्या नकळत आपण दुसऱ्यांचे शब्द, त्यांच्या लकबी आत्मसात करत असतो. त्यातल्या त्यात वाईट गोष्टी लगेच आत्मसात होतात.

    आपण 4- 5 वर्षाच्या मुलाचं उदाहरण घेवूया. अपशब्द किंवा शिव्या लहान मुलांना शिकवाव्या लागत नाही. कुठून तरी ऐकून ते लगेच शिकतात, आणि प्रसंगी पद्धतशीरपणे त्याचा प्रयोगही करतात. मात्र तेच चांगले श्लोक, विचार त्यांना शिकवावे लागतात, नव्हे तर घोकून घ्यावे लागतात. मात्र ऐनवेळी त्यांना ते सुचतीलच, आठवतील असे नाही. म्हणून तर शालेय जीवनात आपली अधोगती दिसू लागली, की शिक्षिका आपल्या रोजनिशीत शेरा लिहून देतात, ‘आपल्या पाल्याची संगत बदला.’ हा नियम शाळेपुरताच मर्यादित नाही, तर आयुष्यभरासाठीचा आहे.

    आपल्या महाभारत आणि रामायणातील व्यक्तिरेखाही खूप काही शिकवून जातात. रामायणातील कैकयीच्या व्यक्तिरेखेत अनेक नकारात्मक छटा दिसतात. कैकयीने आपला पुत्र भरतासाठी, रामाला वनवासाला पाठवले, पण तुम्हाला माहिती आहे का? कैकयी आधी अशी नव्हती. ती रामावर अतिशय प्रेम करायची, भरतापेक्षाही जास्त लाड ती रामाचे करायची, मात्र तीच्या मंथरा नावाच्या दासीमूळे कैकयीचे विचार पालटले. मंथरेने तिचे कुत्सित विचार कैकयीच्या डोक्यात भरले आणि कैकयी तिच्यासारखा विचार करू लागली, केवळ मंथरेच्या सांगण्यामुळेच कैकयीने रामाला वनवासाला पाठविले. कैकयीलाही सगळे वाईटच दिसू लागले. अशी मंथरा प्रवृत्ती केवळ कैकयीच्याच नाही, तर आपल्याही अवती भोवती वावरत असते. तिला वेळीच ओळखून पळवून लावले पाहिजे. कलियुगात मंथरेची रूपे अनेक आहेत. त्यामुळे तिला चार हात लांबच ठेवाल तरच उत्तम!

    दुसरे उदाहरण सर्वांच्या लाडक्या कृष्णाचे, महाभारतातील युद्धावेळी दुर्योधन आणि अर्जुन श्रीकृष्णाजवळ युद्धासाठी मदत मागण्यासाठी जातात. त्यावेळी कृष्ण विचारतो, तुम्हाला मी हवा आहे की माझे सैन्य ? दुर्योधन लगेचच सैन्य मागतो आणि अर्जुन खुद्द कृष्णाला मागतो. आणि त्यानंतरचा परिणाम तुम्हाला ज्ञात आहेच. आपण या कालियुगातले अर्जुन आहोत, मात्र अजून आपल्याला श्रीकृष्णाचा शोध घेता आला नाही.  आपल्याबरोबर कृष्णासारखी व्यक्ती असायला हवी. जी आपले विचार बदलून चांगल्या कामासाठी आपल्याला प्रवृत्त करेल. या दलदलीच्या युगात वावरत असताना डोळसपणे पहा की, आपण नेमके कोणाच्या सहवासात आहोत? मंथरेच्या की श्रीकृष्णाच्या ? कारण संगत माणसाला घडवत असते.

    तुम्हाला आजचा चा लेख कसा वाटला हे कंमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि नवी अर्थक्रांतीच्या चॅनेलला आताच subscribe करा. 

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • स्वाभिमानाने जगायचे असेल तर आत्मविश्वास गरजेचा आहे

    स्वाभिमानाने जगायचे असेल तर आत्मविश्वास गरजेचा आहे

    जीवनात सफलता मिळवायची असेल, तर आपल्याकडे आत्मविश्वास असणे खूप महत्त्वाचे आहे. माणसाला जगण्यासाठी जसा ऑक्सीजन लागलो, माशाला जगण्यासाठी जशी पाण्याची गरज लागते. तसेच माणसाला स्वाभिमानाने जगायचे असेल, तर आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. मात्र बऱ्याच जणांकडे हा विश्वास नसतो. तो कसा मिळवायचा ते आजच्या गोष्टीत पाहूयात.

    गोदावरीच्या कुशीत वसलेल्या एका छोट्याश्या, सुख समृद्धीने भरलेल्या गावात सगळेजण अगदी आनंदाने नांदत होते. त्या गावात एक धनाढ्य सावकार होता. धनाजीराव त्याचं नाव. सावकार म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो गावकऱ्यांकडून पैसे बळकवणारा, त्यांना गुलाम म्हणून वागवणारा, त्यांचा छळ करणारा, मात्र धनाजीराव तसा नव्हता. तो गावकऱ्यांवर खूप प्रेम करायचा आणि गावातील लोक देखील त्याला खूप मानायचे. असेच एकदा गावात मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम होता. गाव अगदी गजबजून गेले होते. सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते.

    गोदावरीकाठी गावातील काही लहान मुलं पकडापकडीचा खेळ खेळत होती. त्यात त्या सावकाराचा मुलगा देखील होता. खेळ ऐन रंगात आला असतानाच काठाजवळून धावताना अचानक तो नदीत पडला. सगळीकडे एकच गोंधळ सुरू झाला. हा हा म्हणता अख्खा गाव नदीकाठी जमा झाला. धनाजीराव आणि त्याची बायको देखील तिथे आली. तिचा आक्रोश सुरु झाला. धनाजीरावचा ‘माझ्या मुलाला कोणीतरी वाचवा रे!’ म्हणून आरडाओरडा करत होता. त्याची ती अवस्था सर्वांचं काळीज पिळवटून टाकत होती. मात्र कोणीच त्या लहानग्याला वाचवायला पुढे गेलं नाही. सगळ्यांनी बघ्याची भूमिका घेतली. काहींना तर पोहता येत असून देखील ते नदीत उतरले नाहीत. त्या गर्दीत एक जलतरणपटू देखील होता. त्याच नाव होतं विकास. मात्र सगळे इतके घाबरले होते, की त्यांच्याकडे बघून विकासचे मन नदीत उतरण्यासाठी धजावत नव्हते.

    तितक्यात अचानक कोणीतरी त्याला पाठीमागून नदीत ढकललं. नदीकाठचा गोंधळ अचानक शांत झाला. कोणाला काहीच तर्क लावता येईना. नदीत पडलेला विकास तर पूर्णपणे भांबावून गेला होता, पण काही वेळाने विकास देखील त्या प्रवाहात दिसेनासा झाला. विकास ठीक असेल ना? पाटलाचा पोरगा जिवंत असेल ना? असे असंख्य प्रश्न गावकऱ्यांसमोर होते. आणि काही वेळाने पाण्यात एक हालचाल जाणवली. विकास एका हाताने पाण्याला दूर सारत दुसऱ्या हातात पाटलाच्या मुलाला घेवुन नदीकाठी आला. सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. धनाजीरावाच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. विकासने मुलाला वाचवलं म्हणून संपूर्ण गाव त्याची शाही मिरवणूक काढत होतं. मात्र त्या तरुणाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हच होतं, त्याला कळत नव्हतं की आपल्याला नदीत कोणी ढकललं.

    त्याची नजर शोध घेत होती त्या व्यक्तीचा. मिरवणूक संपली. तो तरुण आपल्या घरी निघाला आणि अचानक रस्त्यात एक 70-80 वर्षाचे आर्मी रिटायर्ड माने आजोबा त्याच्या समोर आले. ते म्हणाले तू सकाळपासून ज्याला शोधतोय तो मीच आहे. त्याला काहीच कळेना. तो माने आजोबांना विचारतो, “तुम्ही मला पाण्यात का ढकललं? त्यावर ते म्हणाले, अरे मला माहीत होतं तुला उत्तम पोहता येतं ते. आणि त्याक्षणी तुझ्या मनात जो गोंधळ चालू होता, तोही मी ओळखला होता. तुझ्यात त्याला वाचवण्याची क्षमता होती मात्र धाडस नव्हतं. मला माहिती होतं जर मी तुला पाण्यात ढकलंल तर 100 टक्के तू स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करणार आणि त्याबरोबरच त्या लेकराला देखील वाचवणार. फक्त गरज होती एका हलक्याश्या धक्क्याची. आणि ते मी केलं. पुढे माने आजोबा विकासला म्हणाले: लेकरा तुला आयुष्यात खूप पुढे जायचं असेल, तर असा स्वतःवरचा विश्वास हरवून बसू नकोस. प्रत्येकवेळी तुला कोणीतरी यशाचा रस्ता दाखवेलच असं नाही. तो तुझा तुलाच शोधावा लागेल.   

    बऱ्याचदा आपल्याला ही गोष्ट येईल का, आपण ते करू शकतो का असे स्वतःच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. कधी कधी आपण स्वतःवरचा विश्वासच गमावून बसतो. मात्र आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात जे पावलोपावली आपल्याला प्रोत्साहित करत असतात, मार्गदर्शन करत असतात. मित्रांनो तुम्ही जर बघ्याची भूमिका घेवून आयुष्य जगलात, तर कधीच तुमचं कौतुक होणार नाही, असं काहीतरी करा की ज्यामुळे यशस्वी लोकांच्या यादीत तुमचं नाव येईल. मात्र तिथपर्यंत पोहोचण्यासाठी विचारवंताच्या सहवासात राहिलं पाहिजे, स्वतःचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. आपलं रूप, आपली बुद्धी, आपला रंग या गोष्टी आपण जन्मत:च घेऊन येतो. परंतु आत्मविश्‍वास हा आपल्याला विकसित करावा लागतो आणि प्रत्येकाने तो केलाच पाहिजे.

    तुम्हाला आजचा Sunday Motivation चा लेख कसा वाटला हे कंमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि Sunday Motivation साठी नवी अर्थक्रांतीच्या चॅनेलला आताच subscribe करा. 

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • ध्येयासाठी झपाटून जा

    ध्येयासाठी झपाटून जा

    शाळेत असताना मराठीच्या पेपरमध्ये 5 मार्कांसाठी व्याकरणाचे काही प्रश्न दिलेले असायचे. वर्तमानकाळाचे भविष्यकाळात रूपांतर करा किंवा भविष्यकाळाचे भूतकाळात, वर्तमानकाळात रूपांतर करा. प्रश्नपत्रिकेतला काळ उत्तरपत्रिकेत बदलता येऊ शकतो, मात्र वास्तविक जीवनातला काळ ना पुढे नेता येतो, ना मागे आणता येतो.

    प्रत्येकालाच आपण का जगतोय आणि कशासाठी जगतोय हे प्रश्न पडलेच पाहिजेत, कारण त्यामुळेच आपल्याला आपल्या जीवनाचे मर्म कळू शकते. आपलं नशीब बदलण्याची धमक प्रत्येकामध्ये असते, मात्र त्यासाठी तुमच्या मनात प्रचंड इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. एका महाकाय पर्वताच्या टोकावर एक 40-50 वर्षाचा सद्गृहस्थ पर्वत सर करण्याच्या उद्देशाने जातो. थंडी, वारा, ऊन, पाऊस कश्या-कश्याचीही पर्वा न करता तो तो पर्वत पार करतो आणि काही दिवसानंतर सुखरूप पायथ्याशी येतो. पायथ्याशी असलेले सर्वजण अचंबित होतात. ते म्हणतात,  “अरे तुला माहीत नाही का या पर्वतावर कोणीच जावू शकत नाही, मग तू कसं काय गेलास.” त्यावर तो गृहस्थ म्हणतो, मला ही गोष्ट माहीतच नव्हती आणि म्हणून मी गेलो. आणि बघा यशस्वी झालो. आयुष्यात यश मिळवत असताना जशी प्रोत्साहन देणारी माणसं असतात, तशीच निरुत्साहित करणारी लोकंदेखील असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर पुढे गेलं पाहिजे. ओम शांती ओम सिनेमात शाहरूख खानचा एक फेमस डायलॉग आहे, ‘अगर आप किसी चीज को पुरी शिद्दत से चाहते हो, तो पूरी कायनात उसे आपसे मिलाने की साजिश मे जुड जाती है.”

    प्रत्येकामध्ये आपले आयुष्य बदलून टाकण्याचे सामर्थ्य असते, फक्त त्याला याची जाणीव नसते. गाडीला ५ गियर असतात, जर योग्यवेळी योग्य गियर टाकला तरच गाडी वेगाने पळू शकते. बाकीचे 4 गियर असूनसुद्धा आपण जर पहिल्याच गियरवर गाडी चालवत असू, तर निश्चितच गाडी पुढे जाऊ शकणार नाही. बऱ्याचदा आपल्या बाबतीतही तसेच होते. घोड्याप्रमाणे झापडं लावून तुम्ही काम केलं, तर नक्कीच तुम्हीसुद्धा तुमचे ध्येय गाठू शकाल, कारण शेवटी यश किंवा अपयश हे केवळ आपल्याच हातात असतं.       

    रेसकोर्सवर घोड्यांच्या तबेल्यात काम करणाऱ्या एका मजुराचा रॉबर्ट नावाचा एक मुलगा असतो. त्याची नववीची परीक्षा चालू असते. एकेदिवशी वर्गशिक्षिका अचानक वर्गात येतात आणि सगळ्या विद्यार्थ्यांना उद्देशून त्या म्हणतात, “मुलांनो “माझे स्वप्न” या विषयावर निबंध लिहा. निबंध मनापासून आणि तुमच्या खऱ्या-खुऱ्या स्वप्नावर लिहा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, याच निबंधावर तुमचा यावर्षीचा निकाल अवलंबून आहे. त्यामुळे निबंध व्यवस्थित आणि विचार करून लिहा. सगळे जण अगदी मन लावून निबंध लिहीत असतात. पेपर जमा करण्याची वेळ येते. घंटा वाजते, पेपर जमा करून सगळे आनंदाने घरी जातात. काही दिवसांनी निकालाचा दिवस येतो. सगळे विद्यार्थी वर्गात उपस्थित असतात. सगळ्यांच्या मनाला धाकधूक लागलेली असते, मला मार्क चांगले पडले असतील ना? मी पास झालो असेल ना? असे अनेक प्रश्न मनात डोकावत असतात. मात्र केवळ रॉबर्टच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकत असतं, कारण आपण निबंध चांगला लिहिलाय त्यामुळे आपण पास होणारच याचा त्याला विश्वास असतो. सगळ्यांचा रिजल्ट जाहीर होतो. वर्गातली सगळी मुलं पास होतात, मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्याला स्वतावर विश्वास असतो, तो रॉबर्ट नापास होतो. ज्या चेहऱ्यावर हास्य खुललेलं होतं, तो चेहरा अचानक चिंताग्रस्त होतो. त्याला काहीच कळत नाही.

    तो तडक शिक्षिकेच्या केबिनमध्ये जातो आणि त्यांना म्हणतो, ‘मॅडम, कदाचित तुम्ही माझा पेपर व्यवस्थित तपासला नसेल, कृपया तुम्ही परत चेक करता का? बहुदा चुकून तुम्ही….”

    शिक्षिका त्याला मध्येच थांबवत म्हणतात. “अरे चुकून नाही मी पेपर बघूनच तुला नापास केलं. अरे वेड्या तू निबंध काय लिहिलास, तुझं तुला तरी माहिती आहे का? मी रेसकोर्सचा मालक बनेल. २००-३०० घोडे माझ्याकडे असतील, अनेक कामगार माझ्या हाताखाली असतील, मी करोडपती बनेल. अरे हे शक्य आहे का? माणसाने झेपतील अशी स्वप्न बघावी. हे बघ अजूनही वेळ गेली नाही. तू तुझा निबंध बदल, दुसरा निबंध लिहून दे. मी रिजल्ट बदलते.”

    त्यावर रॉबर्ट म्हणाला, “नाही मॅडम, तुम्ही तुमच्या खऱ्या स्वप्नावर निबंध लिहायला सांगितला होता, मी तो लिहिलाय आणि मी माझ्या स्वप्नावर ठाम आहे, मी माझे स्वप्न पूर्ण करणारच.”

    त्यावर बाई म्हणाल्या, “ठीके, आता तूच ठरव निबंध बदलून पुढच्या वर्गात जायचं की, इथेच बसायचं ते.”

    त्यावर रॉबर्ट तो रिजल्ट घेतो आणि रागारागाने निघून जातो.

    काही वर्षांनी त्याच शिक्षिका एका मोठ्या रेसकोर्सवर विद्यार्थ्यांची सहल घेऊन जातात. रेसकोर्सचा तरुण मालक अगदी आदराने त्यांचे स्वागत करतो. स्वतः पूर्ण रेसकोर्स त्यांना फिरून दाखवतो आणि त्यांना दुपारच्या जेवणासाठी देखील आग्रह करतो. त्याने केलेला तो कळकळीचा आग्रह त्या शिक्षिका स्वीकारतात आणि विद्यार्थ्यांना घेऊन डायनिंग हॉलमध्ये जातात. त्या हॉलच्या एका भिंतीवर एक फ्रेम अडकवलेली असते. कुतुहलाने त्या शिक्षिका त्या फ्रेमजवळ जातात. त्यात फ्रेमकडे बघतात आणि आश्चर्याने म्हणतात, “अरे या सर्टिफिकेटवर तर माझीच स्वाक्षरी आहे. कोणाचं सर्टिफिकेट आहे हे? रॉबर्ट! अरे हा तर माझाच विद्यार्थी! तुमच्या इथे काम करतो का तो? जरा बोलवा त्याला.”

    त्यावर रेसकोर्सचा तो तरुण, उमदा मालक त्यांच्यासमोर जातो आणि म्हणतो मॅडम मीच तो तुमचा विद्यार्थी, रॉबर्ट. मॅडम शॉक झाल्या. त्यावर रॉबर्ट म्हणाला मॅडम, “त्यावेळी जर मी तुमचं ऐकून स्वप्न बदललं असतं, तर कदाचित शाळेच्या परीक्षेत पास झालो असतो; मात्र जीवनाच्या परीक्षेत नापास झालो असतो.”  

    मित्रांनो, तुम्हाला खरंच एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर स्वस्थ बसू नका. त्यामुळे ध्येयासाठी झपाटून जा. जर तुम्हाला अगदी मनापासून आणि तीव्रतेने वाटत असेल की, ही गोष्ट मला मिळवायचीच आहे आहे, तर नक्कीच ती तुम्ही मिळवाल.”

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • मानसिक शांततेसाठी या सहा गोष्टी करून पाहाच!

    मानसिक शांततेसाठी या सहा गोष्टी करून पाहाच!

    स्वतःची काळजी घ्यायला शिका

    आपण नेहमी स्वतःच्या शरीराची आणि मनाची काळजी घेत आहोत का? याची खात्री करा. कारण इतर कामं करण्याच्या नादात आपण त्या कामांची किंवा इतरांची काळजी घेत असतो, पण स्वत:कडं मात्र दुर्लक्ष करत राहतो. स्वतःला वेळ देणं म्हणजे काय? तर शांत बसणं, आवडीची गाणी ऐकणं किंवा एखादा आवडीचा पदार्थ बनवणं. थोडक्यात काय तर ज्या गोष्टींतून तुम्हाला आनंद मिळतो, त्या गोष्टी करणं म्हणजे स्वतःला वेळ देणं.

    वेळेचे नियोजन

    सतत शिका

    तुम्हाला ज्या क्षेत्रात मोठं व्हायचं आहे आणि ओळख निर्माण करायची आहे ते क्षेत्र निवडा. तुमच्या कौशल्यांवर काम करा आणि ज्ञान वाढवा. पुस्तकं वाचा, ऑनलाइन अभ्यासक्रम घ्या, कार्यशाळेत सहभागी व्हा किंवा वेबिनारमध्ये भाग घ्या. या गोष्टी केल्याने तुमचं मन उत्साही राहील आणि नवीन संधीसुद्धा मिळतील.

    ध्येय निश्चित करा

    स्वतःसाठी काही स्पष्ट आणि साध्य करण्यायोग्य ध्येय सेट करा. त्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये divide करा आणि त्या दिशेने कार्य करण्याची योजना तयार करा. जर तुमच्याकडे निश्चित ध्येय नसेल, तर तुमच्या डोक्यात बिनकामाचे विचार येतील आणि यामुळे तुम्ही पुन्हा मानसिक शांततेपासून चार हात लांब राहाल.

    सजगतेचा सराव करा

    मागच्या लेखात पाहिल्याप्रमाणे तुमची सजगता वाढविण्यासाठी ध्यानाचा सराव करा. ध्यान हे सर्वात शक्तिशाली माध्यम आहे, जे तुम्हाला वर्तमानात जगायला शिकवते. जेव्हा तुम्हाला वाटेल की, आपण अतिविचार करायला लागलो आहोत, तेव्हा आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. 

    चांगली संगत ठेवा

    तुम्हाला सहकार्य आणि प्रोत्साहन देणाऱ्या लोकांसोबत रहा. मित्र असो वा कुटुंब वैयक्तिक वाढीस प्रोत्साहन देणाऱ्या लोकांशी संपर्क ठेवा. नकारात्मक लोकांच्या सान्निध्यात राहून आपणही नकारात्मक विचार करायला लागतो आणि परिणामतः आपण आपली शांतता गमावून बसतो.

    आणखी वाचा

  • सुखी व यशस्वी आयुष्याचे तीन स्तंभ

    सुखी व यशस्वी आयुष्याचे तीन स्तंभ

    जन्म आणि मृत्यू या दोन घटनांमधील प्रवास म्हणजे जीवन. प्रत्येकाचं जीवनात सुखी व यशस्वी होणं हे लक्ष्य असतं व प्रत्येकजण त्यासाठी धडपडत असतो, प्रयत्न करत असतो. जीवनात यशस्वी असणं व सुखी असणं हे दोन वेगवेगळे भाग आहेत.

    सुखी असण्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे अर्थ असू शकतात, मग मनुष्य श्रीमंत असो वा गरीब. उदा. आज पैशाला खूप महत्त्व आले आहे. असे म्हणतात की ज्याच्याजवळ पैसा आहे तोच सुखी, परंतु तुम्ही खेड्यापाड्यात जा, गरीब शेतकरी, किंवा जंगलात राहणारा आदिवासी पहा तो देखील आपल्या आयुष्यात सुखी आहे. त्यामुळे प्रत्येकाची आपापली सुखाची व्याख्या व दृष्टिकोन वेगळे असतात. तर यशाची परिभाषा ही समाजाच्या दृष्टीने वेगळी असते, ज्याने स्वत:च्या आयुष्यातील ध्येय प्राप्त केलं, तोच खरा यशस्वी असतो. ध्येयप्राप्ती म्हणजेच यशाचा मार्ग हा थोडा खडतर असतो, परंतु समाजात असे अनेकजण आहेत की, ज्यांनी जीवनात खूप यश मिळवले. जर ते यशस्वी होऊ शकतात तर आपणही होऊ शकतो, तर जीवनात सुखी व यशस्वी होण्यासाठी जीवनाचे कोणते तीन प्रमुख स्तंभ असतात ते आजच्या video मध्ये आपण पाहूया.

    १) Health (आरोग्य) : “Health is Wealth” हा सुविचार आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे. पण आपण खरंच त्याकडे किती लक्ष दिलंय? आम्हाला सांगू नका, तुमचं तुम्हाला माहिती आहेच! जर तुम्ही शारीरिक, मानसिक व बौध्दिकदृष्ट्या सुदृढ असाल, तर तुम्हाला सर्व काही मिळतं, परंतु जर तुम्ही सतत आजारी पडत असाल, विविध विकारांनी ग्रस्त असाल, डॉक्टर आणि महागड्या उपचार पध्दतींच्या अधीन झालेले असाल तर जीवनातील आनंद हरवून गेलेला असतो, जीवन नीरस झालेले असते. जर उत्तम आरोग्य असेल, तरंच तुम्ही आयुष्यातील इतर गोष्टींचा आस्वाद घेऊ शकता. “You can’t enjoy wealth, if you are not good in health.

    २) Wealth (संपत्ती) : जीवनात सुखी व यशस्वी होण्यासाठी जीवनाचा दुसरा प्रमुख स्तंभ म्हणजे संपत्ती. पैसा, संपत्ती तुम्हाला आदर देते आणि प्रतिकूलतेशी लढण्यास सक्षम बनवते. आर्थिक साक्षरता व आर्थिक स्वातंत्र्य असणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे आज पैसा असेल, तरच आपल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात व आपल्या इच्छेनुरूप जीवन जगता येते. चांगल्या आर्थिक स्थितीसाठी तुम्हाला तुमचे ध्येय निश्चित करावे लागेल. वाईट दिवसांसाठी नेहमी पैसे वाचवा करा. गरिबीत तुमच्यासोबत कोणीही नसेल, तेव्हा हा पैसा तुम्हाला उपयोगी पडेल. म्हणून सुखी व समाधानी जीवनासाठी तुमच्याकडे आरोग्यासोबतच संपत्ती असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे.

    ३) Relationships (संबंध) : तुमच्याकडे उत्तम आरोग्य व खूप संपत्ती आहे, परंतु तुमचे इतरांशी संबंध चांगले नसतील, तर तुम्हाला समाधान, सुख, यश मिळणे कठीण असते. इतरांशी चांगले संबंध आपले जीवन समृध्द करण्यात मोठी मदत करतात. ते आपल्याला आपलं जीवन आनंदी करण्यात मदत करतात; जीवनात कठीण प्रसंग आल्यास मनावरचे ओझे कमी करतात, मन हलके होते आणि आपले जीवन आनंददायी होते. विशेषतः सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या यशस्वी लोकांसोबत चांगले संबंध प्रस्थापित करणे अत्यंत शहाणपणाचे असते, कारण त्यांच्याकडून बरेच काही शिकता येते. त्यांच्या सहवासामुळे सकारात्मक दृष्टिकोन अवलंबता येतो. त्यामुळे पैसा, आरोग्य यासोबतच इतरांशी चांगले संबंध असणे अत्यंत महत्त्वाचे असते. Self centric किंवा egoistic माणसे कधीच आयुष्यात पुढे जात नसतात. याबाबतीत एक मस्त शेर आहे की, “किसीने पूछा हमें उम्र और जिंदगी में क्या फर्क है? तो हमने यूँ जवाब दिया की, जो अपनों के बिना बीती वो “उम्र” और जो अपनों के साथ बीती वो “ज़िन्दगी”

    ४) आपण काय करावे? : आयुष्यात सुखी होण्यासाठी, आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी, यश संपादन करण्यासाठी आयुष्यात उत्तम आरोग्य, संपत्ती कमावण्याचा व आपले नातेवाईक, मित्रपरिवार आणि समाजातील तसेच आपल्या क्षेत्रातील चांगल्या लोकांशी चांगले संबध प्रस्थापित करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. तसेच जीवनात शिस्त आणि चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत. व्यायाम आणि आध्यात्माला महत्व दिले पाहिजे. तरुण वयात कशाला पाहिजे अध्यात्म वगैरे सारखे प्रश्न विचारणाऱ्यांपासून जरा लांबच राहिलं पाहिजे. जर आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडलेले असेल, तर आपल्याकडे आपल्या संपत्तीवर लक्ष केंद्रित करण्याची शारीरिक क्षमता शिल्लक राहत नाही. परिणामी, आपले नातेसंबंध बिघडतात. जर आपण चांगले नातेसंबंध टिकवण्यात अपयशी ठरलात, तर आपली मानसिक स्थिती, आरोग्यावर आणि परिणामी आपल्या श्रीमंतीवर वाईट परिणाम होतो. ज्याच्या आयुष्यात चांगले आरोग्य नाही त्याला शारीरिक आणि मानसिक रोग होतात; ज्याच्या आयुष्यात संपत्ती नाही त्याला दारिद्र्य आणि गरिबीचा रोग होतो आणि ज्याच्या आयुष्यात स्वतःची म्हणावी अशी चांगली माणसे नाहीत, त्याला एकलकोंडेपणाचा रोग होतो आणि त्यातच आयुष्य संपून जाते. त्यामुळं आयुष्यातल्या या तीन महत्त्वाच्या स्तंभांना कसं मजबूत बनवता येईल याचा आत्तापासूनच विचार करायला सुरुवात करा.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • खरी संपत्ती म्हणजे काय ?

    खरी संपत्ती म्हणजे काय ?

    रॉजर एच. यांच्या पुस्तकातील एक गोष्ट आजच्या संडे मोटिव्हेशनमध्ये आपण बघुयात.आजवर शिकलेल्या उद्योजकतेच्या धड्यांपैकी एक खूप चांगला धडा मला योगायोगाने श्रीलंकेतील एक नदीमध्ये प्रवास करताना शिकायला मिळाला.

    मी श्रीलंकेत गेलो असताना नदीच्या पांढऱ्याशुभ्र पाण्यात राफ्टींग करण्याची माझी इच्छा होती. नदीमध्ये राफ्टींग करत असताना आमची राफ्ट एका सुंदर अशा नदीच्या खोऱ्यामध्ये शिरली. आमचा जो गाईड होता, तो आम्हाला बोटाने पर्वताच्या आजूबाजूला चहाची केलेली लागवड, अतिशय सुंदर आणि रम्य घरं, नदीकिनारी निसर्ग सौंदर्याने नटलेलं शहर दाखवत होता.

    “हे सर्व माझ्या वडिलांचं होतं.” तो म्हणाला.

    “यातला नक्की कुठला भाग?” मी प्रश्न केला.

    “सगळंच!” त्याने उत्तर दिलं

    त्याचे वडील श्रीमंत जमीनदार असतील असं मला वाटलं. न राहवून मी त्याला त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी विचारली, मग त्याने एक चकित करून सोडणारी गोष्ट सांगायला सुरुवात केली.

    “माझ्या वडिलांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीस भारत सोडला आणि काहीतरी नवं करता येईल का हे पाहण्यासाठी श्रीलंकेला आले. इथे आल्यावर त्यांना या खोऱ्याचे दर्शन घडले. त्यांना ही जागा इतकी आवडली की त्यांनी इथेच स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे तेव्हा अजिबात पैसे नव्हते. त्यांनी इथली काही जमीन मोकळी केली. चहाची लागवड कशी करायची ते शिकून घेतलं आणि त्या जमिनीवर चहा लागवड सुरु केली.”

    “लोकांना त्यांचा चहा आवडू लागला. त्यामुळे त्यांनी उत्पादन वाढवायला सुरुवात केली. त्यांच्यापेक्षा जास्त माहिती असणाऱ्या अनुभवी लोकांना लागवडीसाठी सोबत घेतलं. आता त्यांच्याजवळ पुरेसे पैसे होते, त्यामुळे ते या लोकांना पगार देऊ शकत होते. पण लांबचा प्रवास करून कामासाठी इथवर येणं लोकांना गैरसोयीचं ठरत होतं. त्यामुळे त्यांनी घरं बांधली आणि त्या लोकांना ती भाडेतत्वावर दिली.”

    मी त्याला मध्येच थांबवत म्हणालो, “म्हणजे तुझ्या वडिलांनी त्या लोकांना पगार दिला आणि तोच पगार त्या लोकांनी भाड्याच्या स्वरुपात त्यांना परत दिला, असंच ना?”

    “हो.” त्याने उत्तर दिलं.

    “आणि त्यांनी या परत मिळालेल्या पैशातून अजून घरे बांधली असतील?” मी विचारलं.

    “नाही. त्यांच्या घरांची सोय झाली होती, पण त्यांना खायला दर्जेदार अन्न मिळत नव्हतं. त्यामुळे त्यांनी हा पैसा रेस्टॉरंट बांधण्यासाठी वापरला.”

    मी परत विचारलं “म्हणजे त्यांनी त्या लोकांना पगार दिला, तोच पगार त्या लोकांनी भाड्याच्या स्वरुपात परत दिला, तो पैसा तुझ्या वडिलांनी रेस्टॉरंट काढण्यात गुंतवला. त्यामुळे आपल्याला चांगलं जेवण मिळावं आणि तो खर्च भागवता यावा यासाठी त्या लोकांनी अजून मेहनत करायला सुरुवात केली असेल?”

    “हो, बरोबर. यातूनच पुढे ही सगळी दुकानं सुरु झाली, इथे रस्ते बांधले गेले, रेल्वे स्थानक बांधलं गेलं, पूल बांधला गेला. खरं सांगायचं तर, २० वर्षांत जवळपास २००० लोक या सुंदर शहरात स्थायिक झाले आहेत. त्यातील बऱ्याचशा लोकांनी चहा लागवडीचं कामसुद्धा केलेलं नाही, कारण इथे त्यांना करता येण्याजोग्या अनेक गोष्टी होत्या.”

    जसजसं आम्ही पुढे जाऊ लागलो, त्याची ही गोष्ट ऐकून ‘पैसा हा फुटबॉलसारखा आहे’, असे विचार माझ्या मनात येऊ लागले. म्हणजे तुम्ही फुटबॉल खेळत असताना त्याचा पाठलाग करत असता, पण त्याचा वेग जास्त असल्याने आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण आपण दोष मात्र इतर खेळाडूंना देतो.

    आपण जर खेळाकडे नीट लक्ष दिले आणि आपल्याकडे बॉल आल्यावर तो पुढच्या खेळाडूकडे ढकलला, तर तोच बॉल मग तुमच्याकडे परत परत येत राहतो. जसं त्या गाईडच्या वडिलांनी केलं. त्यांनी पैशाच्या मागे धावण्यापेक्षा पैसा खेळता कसा राहील याकडे लक्ष दिलं. जसं फुटबॉलमध्ये मैदानातील खेळाडूंकडे बॉल परत परत येत राहतो, तसंच त्यांच्याकडे सुद्धा पैसा परत परत, रोज येत राहिला. मग तो चहाच्या विक्रीतून असो, त्यांनी बांधलेल्या घरांतून असो, रेस्टॉरंटमधून असो किंवा दुकानांतून.

    आणि या प्रत्येक वेळी पैशाची देवाणघेवाण झाली, कारण ते लोकांच्या आयुष्यात काहीतरी चांगला बदल घडवू पाहत होते. संपूर्ण शहराला ते स्वतःचं घर समजत होते. आपलं घर संपन्न आणि समृद्ध व्हावं म्हणून प्रयत्न करत होते. खरे उद्योजक कधीही पैशांच्या मागे लागत नाहीत. ते वाळू व्हॅल्यू अॅडीशन करायचा प्रयत्न करतात. पैसा ही त्यांच्यासाठी दुय्यम गोष्ट असते, जिचा ते पुन्हा वापर करतात आणि अजून मोठे होतात.

    चीनमधील महान तत्त्वज्ञ लाओ त्से यांचा एक प्रसिद्ध सुविचार आहे, ‘पर्वतासारखे निश्चल बना आणि नदीसारखे प्रवाही बना.’

    “तुझे वडील आता कुठे आहेत?” मी विचारलं.

    “ते वीस वर्षांपूर्वीच वारले.”

    “अरेरे, ऐकून दुःख झाले.”

    थोडा वेळ थांबून मी म्हणालो, “मग हे सगळं तुला वारसा हक्काने मिळालं असेल ना?”

    तो हसला. “नाही! नागरी युद्धाच्यावेळी सरकारने माझ्या वडिलांची सगळी जमीन आणि सगळे व्यवसाय ताब्यात घेतले. सर्व मालमत्ता जप्त करून नंतर इतरांना विकून टाकल्या. आमच्याकडे आता नदीकिनारी एक लहान घर तेवढं राहिलेलं आहे, दुसरं काही नाही. माझ्या वडिलांचं त्यावेळी खूप वय झालं होतं, त्यामुळे ते काम करू शकत नव्हते. मरताना त्यांच्याकडे फुटकी कवडीसुद्धा नव्हती.”

    हे ऐकून मला धक्काच बसला. मी म्हणालो, “त्यांना खूपच वाईट वाटलं असेल ना?”

    त्याने स्मित केले आणि नदीकडे पाहत म्हणाला, “नाही. मरताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. त्यांना जिथे जगायचं होतं, तिथे जगता आलं. या परिसरात ते सगळीकडे फिरले, सगळ्यांशी त्यांची मैत्री होती. सगळे त्यांना जेवूखावू घालत असत. त्यामुळे त्यांना पैशांची तशी गरज वाटत नव्हती. खरी संपत्ती काय असते हे माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं. आणि म्हणूनच मी इथे गाईडचं काम करतो.”

    वर पर्वताकडे आणि खाली नदीकडे हात करत तो पुढे म्हणाला, “मोठ्या शहरात जावं. खूप मेहनत करून पैसे कमवावे आणि गरज नसलेल्या गोष्टींवर खर्च करावेत याची मला अजिबात गरज वाटत नाही. हे सगळं जे माझ्याजवळ आहे, ते माझ्यासाठी खूप आहे.”

    प्रवास संपवून तिथून निघताना माझ्याकडे पैसे कमी होते, पण संपत्ती जास्त होती. चिंता कमी होती, आनंद जास्त होता. कमी कमवायचं आणि जास्त द्यायचं ही भावना होती. आणि संपत्तीची एक नवीन व्याख्या मी बनवली: “संपत्ती म्हणजे तुमच्याजवळ किती पैसे आहेत हे नव्हे, तर तुमच्याजवळील सर्व पैसे गमावल्यावर तुमच्याकडे शिल्लक राहील, ती तुमची खरी संपत्ती.”

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • संधी मिळत जाईल, तिचा फायदा घेत जा !

    संधी मिळत जाईल, तिचा फायदा घेत जा !

    मंदिरात पुजारी म्हणून तरी काम मिळेल या आशेने तो तेथे आला होता. त्यादिवशी बरेच इतर पुजारीसुद्धा तिथे जमा झाले होते. सर्वांनाच धर्माचे उत्तम ज्ञान होते. संचालक मंडळाला त्यातून एकाची निवड करणे अवघड वाटत होते. अनेकजण पुजारी म्हणून उत्तम होते. शेवटी संचालक मंडळातील एकाने असे सुचवले की ज्याला सर्वात चांगली घंटा वाजवता येईल त्यालाच मंदिराचा पुजारी म्हणून नियुक्त केले जाईल. त्यानुसार सर्व पुजाऱ्यांची परीक्षा घेण्यात आली. पद्मनाभला नीट घंटा वाजवता न आल्याने त्याची निवड झाली नाही. तो मनात थोडा निराश झाला, त्याचा तिथे अपेक्षाभंग झाला होता. आता काय करावे? तो मंदिराबाहेर बसून विचार करू लागला. तेवढ्यात त्याला एक कल्पना सुचली. मंदिरासमोर खूप मोकळी जागा होती.

    त्याने संचालक मंडळाची परवानगी घेऊन समोर एक चहाची टपरी सुरू केली. मंदिरात भेट द्यायला येणारे भक्तगण ग्रामस्थ तिथे जाऊन चहा प्यायचे. हळूहळू ते मंदिर प्रसिध्द होऊ लागले तशी मंदिरास भेट देणाऱ्या भक्तांची संख्या वाढू लागली. खूप दूरगावातून लोक यायला लागले. तसा पद्मनाभचा चहाचा व्यवसायही वाढला. तेव्हा लोकांनी त्याला सुचवले की, तुझा चहा तर उत्तम आहे. पण तुझ्या टपरीवर जर तू अल्पोपहाराचे पदार्थ ठेवलेस तर बरे होईल. पद्मनाभला ते पटले. कारण आसपास त्या ठिकाणी अल्पोपहाराची सोय कुठेच नव्हती. पद्मनाभने लवकरच अल्पोपहाराचे उपवासाचे पदार्थ विकायला सुरुवात केली. आता त्यांचा व्यवसाय चांगला चालू लागला. त्याच्या टपरीजवळ एक शेड बांधून टेबल खुर्च्या लावून सर्वांसाठी बसण्याचीही सोय केली. पुढे भक्तांची, पर्यटकांची संख्या अजून वाढत गेली. पुढे भक्तांच्या आग्रहावरून त्याने जेवणाची थाळी विकायला सुरुवात केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्याची आर्थिक स्थिती सुधारू लागली. त्याला गावातही मान मिळू लागला. आता त्याचे रेस्टॉरंट झाले.

    पद्मनाभ एक व्यावसायिक बनला होता. एका भक्ताने त्याला सांगितले की इथे बाहेरून येणाऱ्या भक्तांची राहण्याची सोय नाही. पद्मनाभने त्याच्या रेस्टॉरंटचे एका लॉजमध्ये रूपांतर करून भक्त व पर्यटकांच्या राहण्याची सोय केली. त्याचा धंदा जोरात चालू आहे, तो सर्वांना उत्तम सेवा पुरवतो. मंदिराच्या वार्षिक जत्रेस दरवर्षी देणगी देतो. जसजशी मंदिरात येणाऱ्या भक्तांची, पर्यटकांची संख्या वाढते तसतसा त्याचा व्यवसाय वृद्धिंगत होतोय.  एकेकाळचा बेरोजगार पद्मनाभ आज तिथला सर्वात यशस्वी श्रीमंत हॉटेल व्यावसायिक झालाय. पद्मनाभने गावातील इतर बेरोजगार तरुणांना त्याच्याच हॉटेलमध्ये काम दिले आहे. त्यामुळे त्याची समाजात प्रतिष्ठा देखील वाढली. गावातील, तालुक्यातील अनेक नामवंत व्यक्तींची त्याच्या घरी ऊठबस चालू असते. त्याला खूप मान मिळतोय.

    एका व्यक्तीने त्याला त्यांच्या यशाचे गुपित विचारले. पद्मनाभ म्हणाला, “माझ्या यशाचे गुपित मंदिराच्या घंटेत आहे. मला घंटा वाजवता येत नाही म्हणून मी आज श्रीमंत झालोय. जर मला ती घंटा वाजवता आली असती तर मी मंदिरात पुजारी म्हणूनच राहिलो असतो.”

    मित्रांनो, कधीकधी संधी थोडक्यात हुकतात, म्हणून डोक्याला हात लावून बसू नये. डोळे उघडा, आजूबाजूला पहा. बरेच पर्याय, संधी उपलब्ध असतात. पण नोकरीच्या नादात त्या दिसत नाहीत. वेळ निघून गेल्यावर ते लक्षात येते. तेव्हा आपल्याकडे पश्चाताप केल्याशिवाय पर्याय नसतो. पद्मनाभने संधी निर्माण केली व व्यवसाय करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याच्याजवळ काही नव्हते, तरी त्याने छोटासा का होईना, व्यवसाय सुरू केला. पुढे त्याला अनुभव येत गेला, संधी आपोआप दिसू लागल्या. प्रत्येक वेळी त्याने संधीचा फायदा उठवला आणि आज तो त्याच्या व्यावसायिक व वैयक्तिक जीवनात यशस्वी श्रीमंत आणि सुखी आहे. म्हणून संधी हुकल्यावर निराश होऊ नका, नैराश्यावर पाय ठेवून पुढे चालत रहा. संधी मिळत जाईल तिचा फायदा घेत जा.

    तुम्हाला आजचा लेख कसा वाटला हे कंमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि Motivation साठी नवी अर्थक्रांतीच्या चॅनेलला आताच subscribe करा. 

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा