नवी अर्थक्रांती

एअर इंडिया ते मेटा: मोठ्या कंपन्या Rebranding ची रिस्क का घेतात?

परिस्थिती कितीही कठीण असली, तरी तुमच्यातील आत्मविश्वासाची ठिणगी कधीही विझू देऊ नका. कारण तीच ठिणगी एक दिवस यशाचा सूर्य बनून उगवते. हे केवळ शब्द नाहीत, तर हे एका अशा महिलेच्या आयुष्याचे सत्य आहे जिने गरिबी, कौटुंबिक छळ, सामाजिक बहिष्कार आणि आत्महत्येच्या उंबरठ्यावरून परत येत उद्योगविश्वात स्वतःचे एक वेगळे साम्राज्य निर्माण केले. त्या महिला म्हणजे कल्पना सरोज. 

महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील एका छोट्या गावातून सुरू झालेला कल्पना सरोज यांचा प्रवास आज १०० मिलियन डॉलर्सपेक्षा (अंदाजे ८०० कोटी रुपयांहून अधिक) मोठ्या बिझनेस टर्नओव्हरपर्यंत पोहोचला आहे. ‘कमानी ट्यूब्स’ या डबघाईला आलेल्या कंपनीचे पुनरुज्जीवन करून त्यांनी उद्योग जगतात भारतातील पहिली महिला कॉर्पोरेट रेस्क्यूअर (Corporate Rescuer) म्हणून स्वतःचे नाव सुवर्णअक्षरांनी कोरले.

बालपण आणि संघर्ष

कल्पना सरोज यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील ‘रोटखेड’ या छोट्याशा गावात एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील पोलीस दलात हवालदार होते. दलित कुटुंबात जन्म झाल्यामुळे त्यांना बालपणीच जातीभेदाचे चटके सहन करावे लागले होते. शाळेत असताना त्यांना इतर मुलांपासून वेगळे बसवले जायचे. परंतु, हा सामाजिक भेदभाव केवळ एक सुरुवात होती त्यांच्या आयुष्यातील खरा संघर्ष तर पुढे होता. त्या काळातील अनिष्ट रूढी-परंपरांमुळे वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी त्यांचे लग्न लावून देण्यात आले आणि त्यांना मुंबईतील एका झोपडपट्टीत राहावे लागले. तिथे त्यांना सासरच्या लोकांकडून होणारा मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला. एवढंच काय तर, कल्पना सरोज अनेकदा उपाशी पोटी राहून दिवसभर मोलमजुरी करत. पण काही काळानंतर मुलीची दुरवस्था पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना परत गावी आणले. मात्र त्यांच्या संघर्ष इथेच थांबला नाही. घरी परतल्यानंतर त्यांच्या समोर अनेक आव्हाने उभी ठाकली होती. 

आत्महत्येचा प्रयत्न ते जगण्याची नवी जिद्द

गावी परतल्यानंतरही कल्पना सरोज यांना गावातील लोकांनी आणि समाजाने बहिष्कृत केले. अनेकांनी तर येता-जात त्यांना टोमणे मारायला सुरुवात केली होती. नवऱ्याने सोडलेली मुलगी म्हणून कल्पना सरोज आणि त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले. कल्पना सरोज यांना हा मानसिक त्रास सहन होत नव्हता म्हणून वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्यांनी उंदराचे औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्यांचे प्राण वाचले आणि हाच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. त्यांनी विचार केला की, जर मरण इतके सोपे आहे, तर जगणे कठीण का असावे? त्यांनी मरणाची भीती सोडून देऊन सन्मानाने जगण्याचा आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याचा पक्का निर्धार केला. आणि तिथूनच कल्पना सरोज यांचा नवीन जन्म झाला. 

मुंबईत उद्योजकतेची पहिली पायरी

वयाच्या १६ व्या वर्षी कल्पना सरोज पुन्हा मुंबईत आल्या. त्यांनी एका गारमेंट कंपनीत दरमहा केवळ ४० रुपये पगारावर धागे कापण्याचे काम सुरू केले. त्यांनी शिवणकाम शिकून घेतले आणि हळूहळू स्वतःचा टेलरिंग व्यवसाय सुरू केला. त्या दिवसात त्या तब्बल १६-१६ तास काम करत होत्या. त्यानंतर त्यांनी शासकीय योजनेच्या माध्यमातून ५०,००० रुपयांचे कर्ज घेतले आणि एक छोटे बुटीक तसेच फर्निचरचा व्यवसाय सुरू केला. कष्टाच्या जोरावर हा व्यवसाय चांगला चालू लागला. याच दरम्यान त्यांनी व्यवसायातील बारकावे, बाजारपेठ आणि मानवी स्वभाव समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कल्पना सरोज यांनी मागे वळून पाहिलेच नाही. 

कमानी ट्यूब्स आणि कॉर्पोरेट रेस्क्यूअरचा उदय

कल्पना सरोज यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि ऐतिहासिक वळण देणारी घटना म्हणजे ‘कमानी ट्यूब्स’ (Kamani Tubes) या कंपनीचे पुनरुज्जीवन. कमानी ट्यूब्स हि भारतातातील एक नामांकित मेटल आणि कॉपर ट्यूब्स बनवणारी कंपनी होती. परंतु, कामगार संघटनांचे वाद आणि अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे १९८८ च्या सुमारास ही कंपनी पूर्णपणे डबघाईला आली. कंपनीवर कोट्यवधी रुपयांचे कर्ज होते, वीज आणि पाण्याचे कनेक्शन कापले गेले होते आणि शेकडो कामगार बेरोजगार होऊन उपासमारीला तोंड देत होते. मात्र २००० सालाच्या सुमारास, या कंपनीच्या कामगारांनी कल्पना सरोज यांच्याकडे मदत मागितली. त्यांना माहित होते की कल्पना सरोज यांच्याकडे उत्तम व्यावसायिक कौशल्य आहे. हा एक अत्यंत जोखमीचा निर्णय होता. एका बाजूला कोर्टाच्या फेऱ्या, करोडो रुपयांचे कर्ज आणि दुसऱ्या बाजूला बंद पडलेली कंपनी होती. परंतु, कामगारांची गरिबी पाहून कल्पना सरोज यांनी हे आव्हान स्वीकारण्याचे ठरवले आणि पुढे जे घडले त्याची कल्पना क्वचितच कोणी केली असेल.

पुनर्रचना आणि यशाचे शिखर

कमानी ट्यूब्स या कंपनीच्या संकटकाळात कल्पना सरोज यांनी सर्वात आधी कोर्टात जाऊन कंपनी स्वतः चालवण्याची परवानगी मिळवली. त्यांनी बँकेचे कोट्यवधी रुपयांचे जुने कर्ज फेडण्यासाठी स्वतःची मालमत्ता पणाला लावली आणि बँकांशी तडजोड (One-Time Settlement) केली. त्यानंतर त्यांनी जुन्या यंत्रसामग्रीची दुरुस्ती केली, नवीन तंत्रज्ञान आणले आणि कामगारांना पुन्हा कामावर घेतले. त्यांच्या या अफाट परिश्रमामुळे बंद पडलेली ‘कमानी ट्यूब्स’ पुन्हा सुरू झाली. काही वर्षांतच कंपनी नफ्यात आली आणि तिची उलाढाल कोट्यवधी रुपयांवर पोहोचली. या अभूतपूर्व कामगिरीमुळेच त्यांना उद्योग जगताने ‘भारतातील पहिली महिला कॉर्पोरेट रेस्क्यूअर’ ही पदवी दिली.

१०० मिलियन डॉलर्सचे साम्राज्य

आज कल्पना सरोज या केवळ कमानी ट्यूब्सच्या मालकीण नाहीत, तर त्यांनी रिअल इस्टेट, लॉजिस्टिक्स, शेती आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या क्षेत्रांमध्ये आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. आज त्यांच्या बिझनेस साम्राज्याची एकूण व्हॅल्यू १०० मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल भारत सरकारने २०१३ मध्ये त्यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेला ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. याशिवाय त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

अकोल्याच्या एका छोट्या गावातून सुरू झालेला कल्पना सरोज यांचा हा प्रवास केवळ एक यशोगाथा नाही तर ती मानवी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाचे जिवंत उदाहरण आहे. शून्यातून जग निर्माण करणाऱ्या आणि शेकडो कुटुंबांना रोजगार देणाऱ्या कल्पना सरोज या खऱ्या अर्थाने आधुनिक भारताच्या ‘आयर्न लेडी’ ठरल्या आहेत. त्यांनी सिद्ध करून दाखवले की, जर तुमच्या पंखात जिद्द असेल, तर तुम्ही नक्कीच उंच गगन भरारी घेऊ शकता.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *