नवी अर्थक्रांती

Blog

  • नोकरदार ते उद्योजक बनणं हा प्रवास तितका सोपा नाही.

    नोकरदार ते उद्योजक बनणं हा प्रवास तितका सोपा नाही.

    जर

    • तुम्ही तुमच्या नोकरीत समाधानी नसाल किंवा तुम्हाला पगार मनासारखा मिळत नसेल किंवा
    • तुम्ही तुमच्या नोकरीत समाधानी नसाल किंवा
    • करिअरमध्ये हवी तशी प्रगती होत नसेल किंवा
    • नाईलाज म्हणून न आवडणारी नोकरी करावी लागत असेल किंवा
    • तुम्ही अशी नोकरी करत असाल, जी आयुष्यभर करत राहण्याची
    • तुमची अजिबात ईच्छा नाही किंवा
    • बॉसचा वैताग आला असेल किंवा
    • तुम्हाला जाणवत असेल; आपण इतर सहकाऱ्यांपेक्षा चांगलं काम करू शकतो, पण संधी मिळत नाही किंवा
    • बऱ्याच दिवसांपासून एखादी बिझनेस आयडिया डोक्यात घोळत असेल किंवा
    • स्वतःचं उद्योग साम्राज्य उभं करायचं असं स्वप्न असेल किंवा
    • आयुष्यात काहीतरी अर्थपूर्ण करण्याची ईच्छा आणि मनासारखं जगण्याचं स्वातंत्र्य हवं असेल किंवा

    बिझनेस करून भरपूर पैसे कमवावेत असं वाटत असेल, तर योग्य वेळी हे पुस्तक तुमच्या हाती पडलं आहे याची खात्री बाळगा मी जेव्हा असे नोकरदार बघतो, जे त्यांच्या नोकरीत, त्यांच्या आयुष्यात अजिबात सुखी नाहीत, तेव्हा मला प्रचंड दुःख होतं, वाईट वाटतं. शिक्षण संपलं की कुठेतरी नोकरी बघायची, नोकरी मिळाली की लग्न व्हावं म्हणून कर्ज काढून घर घ्यायचं. घर घेतलं की लग्न करून संसाराच्या रहाटगाडग्यात गुंतून राहायचं हेच त्यांचं आयुष्य बनून जातं. अनेकांच्या बाबतीत घरची आर्थिक परिस्थिती बिकट असते, कुटुंबाची जबाबदारी उचलता यावी म्हणून त्यांना नोकरी करावी लागते. काहीजण असेही असतात की, त्यांना वेगळं काहीतरी करायची इच्छा असते, परंतु ‘काही तरी कामधाम कर’ हा घरातल्यांचा पिच्छा सुटावा म्हणून नाईलाजास्तव नोकरी करतात. नंतर ही सगळी मंडळी आयुष्यातील अनेक वर्ष बँकेचे हप्तेच फेडत असतात. ५० हजार पगार असला, तरी त्यातील २५-३० हजार हप्त्यांवरच खर्च होत असतात.

    कभी किसी को मुकम्मल जहां नही मिलता,
    कहीं जमी तो कहीं आसमान नही मिलता…

    या काव्यपंक्तीप्रमाणे आयुष्यात आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतातच असं नाही. अनेकदा तडजोड स्वीकारावी लागते. नाईलाज म्हणून स्वीकारलेले काम नीरस वाटू लागते. कधीकधी काम वेळेवर पूर्ण होत नाही, त्यामुळे वरिष्ठांची बोलणी खावी लागतात. बॉससोबत नेहमीच ‘पंगा’ होत राहतो. त्यामुळे कामाची लय बिघडते. कधी सहकाऱ्यांसोबत वाद होतात. रोजचे काम करताना ना आनंद वाटत असतो, ना काही वेगळे शिकायला मिळाल्याचे समाधान. प्रत्येक महिन्याच्या शेवटी हातात येणारा पगाराचा चेक आणि आठवड्याच्या शेवटी एक किंवा दोन दिवसांची सुट्टी यासाठी ही मंडळी आठवड्याचे ५ दिवस खाली मान घालून निमूटपणे काम करत असतात. जिथं काम करायला आवडत नाही, तिथं जावं लागतं; ज्यांच्यासोबत पटत नाही, अशा लोकांसोबत काम करावं लागतं.

    खरंतर ही सगळी मंडळी खूप मेहनत करत असतात. आपल्या आस्थापनेसाठी आयुष्यातील बहुतांश वेळ देत असतात. घाण्याला लावलेल्या बैलासारखे राब राब राबत असतात, पोटाला चिमटा काढत असतात, ऑफिसमध्ये १० ते १२ तास धडपडत असतात, पण दिवसाच्या शेवटी पुरते थकलेले असतात. आयुष्यातील इच्छा, आकांक्षा आणि उद्देशच ते हरवून बसलेले असतात. पैशांच्या मागे लागतात आणि जगणं विसरतात. चाकोरीबद्ध आयुष्य त्यांना जग वाटायला लागतं आणि ते तिथेच थांबतात.

    गेली बरीच वर्षं मी या सर्वांसाठी काहीतरी ठोस उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. या अनेक वर्षांच्या अभ्यासातून आणि अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट झाली की; ही सर्व लोकं जी या दुष्टचक्रात अडकली आहेत आणि ज्यांना यातून बाहेर पडायचं आहे, त्यांनी ‘नोकरीतून उद्योजकतेकडे’ जायची गरज आहे. उद्योजक होणं हा एक चांगला आणि शाश्वत मार्ग असू शकतो. यामुळे स्वातंत्र्य, अर्थपूर्ण आयुष्य आणि बऱ्यापैकी चांगलं आर्थिक उत्पन्न मिळू शकते.

    हे जरी खरं असलं तरीसुद्धा, नोकरदार ते उद्योजक बनणं हा प्रवास तितकासा सोपादेखील नाही. सुरुवातीच्या काळात या नवउद्योजकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यातील बऱ्याच अडचणींतून मी सुद्धा गेलेलो आहे.

    त्यामुळेच या उद्योजकांची मदत व्हावी म्हणून मी नोकरीतून उद्योजकतेकडे जाण्यासाठी चार सोप्या पायऱ्या विकसित केल्या आहेत. या पायऱ्या इतक्या सोप्या आहेत की कोणीही यांचा सहजपणे वापर करू शकतं.

    त्यासाठी तुमच्याकडे उद्योजकतेचं ज्ञान असलंच पाहिजे असं काही नाही. या पायऱ्या वापरून तुम्ही तुमच्या नोकरीला आणि बॉसला ‘टाटा-गुडबाय’ म्हणू शकता आणि आपलं स्वप्नातीत आयुष्य जगू शकता. ते कसं करायचं हे या लेखांमध्ये आपण समजून घेणार आहोत.

    करूया सुरुवात…!

  • जो जमेल, जो मिळेल; तो धंदा, न लाजता करा

    जो जमेल, जो मिळेल; तो धंदा, न लाजता करा

    गेली अनेक वर्षे मुंबईत व्यवसाय करीत असताना अनेक व्यापारी समाजांशी संबंध आला. व्यावसायिक क्षेत्रांमध्ये आपल्या माणसांना व समाजाला वरती आणण्यासाठी ५% चा सामाजिक नियम अनुभवला. या समाजात ज्याला व्यवसायात भरभरून यश मिळाले, पैसा मिळाला, नाव मिळाले ते आपल्या फायद्याच्या ५% इतकी रक्कम किंवा वेळ आपल्या समाज बांधवांच्या उद्धारासाठी देऊ करतात. हाच विचार पुढे घेऊन जाताना २०१४ पासून आपल्या माणसांसाठी त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी माझ्या फायद्यातील ५% व उपलब्ध वेळेतील ५% वेळ देऊन मराठी उद्योजकता चळवळ सुरु केली. त्यामध्ये प्रत्येक मराठी माणसाला करता येतील, अशा हजारो बिझनेस आयडिया तसेच प्रेरणा देणारे शेकडो संशोधनपर लेख लिहिले. वेळ मिळेल तसा महाराष्ट्रभर अनेक व्यापारी संस्था, विद्यालये व संस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात व्याख्याने दिली. या लेखांचे आज २५ लाख वाचक असून त्यातून प्रेरणा घेऊन सुमारे १८ हजार तरुणांनी आपला व्यवसाय सुरु केला.

    माकडासमोर केळी आणि दोन हजारांची नोट ठेवली, तर माकड केळी उचलतं. माकडाला हे माहित नसतं की, दोन हजारांत अनेक केळी विकत घेता येतात. केळी घेऊन तात्पुरती भूक भागवणे हा एकच मार्ग त्याला माहित असतो. मराठी माणसाचेही तसेच आहे. मराठी माणूस उद्योग करून लाखो रुपये कमावण्याऐवजी, काही हजारांची नोकरी मिळवण्यास प्राधान्य देतो. आपल्या ज्ञानाचा उपयोग करून उद्योग करावा, लाखो करोडो रुपये कमवावेत व इतरांना आपल्याकडे नोकरीसाठी ठेवावे असे कोणालाच वाटत नाही. आज महाराष्ट्राचा भूमिपुत्र गरिबी व कर्जबाजारीपणामुळे त्रस्त झालाय. कमी शिकलेले लोक उद्योग करतात व उच्च शैक्षणिक पात्रता आणि प्रतिभा असणारे त्यांच्या हाताखाली नोकरी करतात. त्यामुळे आपण आपल्या विचारसरणीत क्रांतीमय बदल घडवून आणला पाहिजे.

    सध्या अनेक तरुण बेरोजगार आहेत, त्यामुळे लग्नं जुळत नाहीत, त्यामुळे त्यांच्यात मानसिक तणाव दिसून येतो. काहीजण या तणावावर मात करुन पुढे जातात, तर काहीजण व्यसनाचा आधार घेतात. उमेदीचा काळ अशा गोष्टींमुळे वाया गेल्याने नंतर त्यांच्या आयुष्यात संघर्ष सुरु होतो. त्यामुळे मुलांना बिनकामाचे शिक्षण देण्यापेक्षा व्यवसायाभिमुख व कौशल्य प्रदान करणारे शिक्षण दिले पाहिजे. हल्लीच्या मुलांमध्ये नवीन शिकण्याची वृत्ती, धाडस व उच्च क्षेत्रात झेपावण्याचे बळ आहे, त्याची जाणीव त्यांना होणे गरजेचे आहे.

    आजकाल अनेक चांगली शिकलेली मुलं, गृहिणी, व्हीआरएस घेतलेले लोक भेटतात. प्रत्येकाकडे काहीतरी अनुभव, ज्ञान, वेळ व मेहनत करण्याची तयारीही असते पण; नेमकं काय करायचं, कोणता व्यवसाय निवडायचा, तो कसा एकत्र करायचा, ग्राहक कुठून मिळतील, नेमकी प्रक्रिया कशी असेल, व्यवसाय करण्यासाठी कोणत्या मूलभूत गोष्टींचे ज्ञान आवश्यक आहे हे सर्व प्रश्न त्यांच्या डोक्यात असतात. या जगात अगणित संधी आहेत, पण बऱ्याच जणांना याची माहिती नसते. या सर्वांसाठी ही लेखमाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल. या लेखमालेतील बिझनेसच्या १०१ भन्नाट आयडिया वाचून अनेकांचा निश्चितच फायदा होईल. या सर्व लेखांचे संकलन असलेले पुस्तक नवी अर्थक्रांती प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. https://shop.naviarthkranti.com इथून आपल्याला ते विकत घेता येईल.

    कोणताही व्यवसाय एकदम करोडोंचा होत नसतो. गाड्या, फॅक्टरी, कार्यालये ही काही अल्पावधीत होणारी गोष्ट नसते. प्रत्येकाला आपली आपली एखादी ‘भन्नाट बिझनेस आयडिया’ शोधावी किंवा निवडावी लागेल व त्या दृष्टीने व्यवसायाचे मार्गक्रमण करावे लागेल. तुम्हीही तुमच्या परीने ५% चा नियम आपल्या समाजाच्या उद्धारासाठी स्वतःला लागू करा. “घेणाऱ्याने घेत जावे व घेता घेता घेणाऱ्याचे हात घ्यावे.” माझ्या असंख्य वाचक बांधवाना त्यांच्या व्यावसायिक यशासाठी हार्दिक शुभेच्छा…! लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरो…! हीच माझी प्रार्थना…! शक्य असल्यास आपला अनुभव मला जरूर कळवावा. आपल्याला हे पुस्तक आवडलं, तर आपण हे पुस्तक आपल्या मित्रमंडळीना, नातेवाईकांना अवश्य वाचायला द्यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.

    शेवटी एवढंच सांगतो, वडापावची गाडी टाका, रेस्टॉरंट टाका, फर्निचर बनवा, गवंडीकाम करा, वायरमन व्हा, ड्रायव्हर व्हा, भाजी विका, इडली सांबार विका, दूध घाला, पेपर टाका; जो जमेल, जो मिळेल तो धंदा न लाजता करा. धन्यवाद.

    टीप : या लेखांत दिलेले आकडे हे केवळ संदर्भासाठी आहेत. आपली कल्पना, नियोजन, व्यवस्थापन, जोखीम घेण्याची, गुंतवणूक करण्याची क्षमता यावर व्यवसायाची वाढ अवलंबून असते.

  • बचत व गुंतवणुकीची ठळक वैशिष्ट्ये

    बचत व गुंतवणुकीची ठळक वैशिष्ट्ये

    • बहुतेक लोक FD आणि Insurance (Money back) यांना गुंतवणूक समजतात.
    • सोन्याचे दागिने व राहते घर यांचे सध्याचे बाजारमूल्य कितीही जास्त असले तरी ते आभासी आहे. त्याचा फारसा काही उपयोग नसून त्याने फक्त मानसिक समाधानच लाभू शकते.
    • महागाईवर मात करणारा परतावा मिळाला पाहिजे हे अनेकांना माहित नाही.
    • म्युच्युअल फंड हा विमा प्रकार असून SIP ही पॉलिसी आहे असे अनेकांना वाटते.
    • आपल्याकडे किती रकमेची, कोणत्या कंपनीची आणि किती वर्षाची विमा पॉलिसी आहे, तसेच कोणत्या म्युच्युअल फंडामध्ये आपली किती रक्कम आहे हे अनेकांना अंदाजेही सांगता येत नाही. आपल्या विमा रकमेवर मिळत असणारा परतावा ६% पेक्षाही कमी आहे हे अनेकांना माहित नाही.
    • फारच थोड्या लोकांनी योग्य रकमेचा, योग्य मुदतीचा आणि योग्य वर्षांचा मुदत विमा (Term Insurance) व आरोग्यविमा (Mediclaim) घेतला आहे. यामध्ये भरत असलेल्या हप्त्यांचा उपयोग न होण्यातच आपला खराखुरा फायदा आहे, हे त्यांच्या लक्षातच येत नाही.
    • अनेक लोक भविष्यकाळातील तरतुदीबद्दल जागरूक नाहीत, तर अनेकजण मुलांवर अवलंबून आहेत.
    • गुंतवणूक साधनांची वेगवेगळ्या प्रकारांत विभागणी करायची असते हे कित्येकांना माहित नाही.
    • येथील बहुतेक लोकांना व्याज करपात्र, तर लाभांश आणि मुळातून STT कापला असेल, तर दीर्घमुदतीचा भांडवली नफा करमुक्त असतो याची माहिती नाही.
    • सोन्याचे दागिने घेण्याऐवजी शुध्द स्वरूपातील सोने, गोल्ड ETF अथवा गोल्ड Bonds मध्ये गुंतवणूक करणे अधिक फायद्याचे याची लोकांना जाणीव नाही.
    • Taxfree bonds हे ८०/सी ची सवलत देतात असे बरेचजण मानतात, तर ५४/ईसी बॉण्ड्स, Infrabonds, PMS, Corporate FD’s यांविषयी फारच थोड्या लोकांना माहिती आहे.
    •  पूर्णपणे आर्थिक नियोजन करणारे लोक नगण्य आहेत.

    या सर्व गोष्टी विचारात घेऊन एकच निष्कर्ष काढता येईल की, आपल्याकडे गुंतवणूक संस्कृती रुजलेली नाही. असे होण्याचे महत्वाचे कारण असे की, आपण आपले जे पैसे बचत खाते, मुदत ठेवी, पोस्टाच्या योजना, पीपीएफ आणि मनी बॅक पॉलिसीमध्ये टाकले आहेत, सोन्याचे दागिने केले आहेत त्यालाच गुंतवणूक असे समजत आहोत, परंतु ही गुंतवणूक नसून बचत आहे. बचत आणि गुंतवणूक यांचा एकमेकांशी सबंध असला तरी या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. ढोबळमानाने असे म्हणता येईल की, उत्पन्नातील असा भाग जो गरजांसाठी खर्च न करता साठवून ठेवला आहे किंवा वेगवेगळे खर्च केल्यावर जी रक्कम शिल्लक राहते ती म्हणजे बचत; तर गुंतवणूक म्हणजे अशी ठरवून केलेली प्रक्रिया ज्यामध्ये आपण आधिक फायदा मिळवण्यासाठी पैसे गुंतवले आहेत. हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण बचत व गुंतवणुकीची ठळक वैशिष्ट्ये पाहूया :-

    • बचतीमध्ये आपण पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवतो, त्यामुळे नजीकच्या काळात वापरू शकतो. उदा. बचत खाते, मुदत ठेव, परावर्तित ठेव, आवर्ती ठेव; तर गुंतवणूकीत आपण पैसे अशा साधनांमध्ये ठेवतो की, ज्यापासून भविष्यात आर्थिक लाभ होऊ शकेल. उदा. समभाग, यूनिट, फ्यूचर, सोने, चांदी, वस्तू, बाजारपेठ, स्थावर मालमत्ता इत्यादी.
    • बचत ही अल्पकालीन क्रिया असून तिची सुरुवात कधीही करता येते, तर गुंतवणूक ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे, त्यामुळे तिची सुरुवात जितक्या लवकरात लवकर करू तेवढे चांगले.
    • बचतीचे पैसे नजीकच्या काळात वापरू शकतो, तर गुंतवणुकीचा भविष्यकाळात उपयोग होतो.                     
    • बचत ही सवय, तर गुंतवणूक ही प्रक्रिया आहे.
    • बचत ही सुरक्षित असून त्यावर मिळणारा लाभ अल्प आहे, तर गुंतवणुकीत जोखीम जास्त असून, जेवढी जोखीम जास्त, तेवढा मोठा फायदा किंवा तोटा होण्याची शक्यता असून क्वचित प्रसंगी मुद्दल गमावण्याचा धोकाही आहे.
    • बचतीत सुरक्षितता असल्याने त्याचा आढावा घ्यावा लागत नाही, तर गुंतवणुकीचा वेळोवेळी आढावा घेऊन त्यातील बदलांबद्दलचा निर्णय त्वरित घ्यावा लागतो.
    • बचतीची साधने आपणास निष्क्रिय बनवतात, तर गुंतवणुकीची साधने स्वातंत्र्याचा अनुभव देतात.
    • बचतीचे पैसे अडीअडचणीच्या काळात उपयोगी पडतात, तर गुंतवणुकीच्या  साधनांतून दीर्घ काळासाठी संपत्ती निर्माण करण्यासाठी नियमित प्रयत्न करावे लागतात.
    • बचत ही भीतीपोटी केली जाते, तर गुंतवणूक आत्मविश्वासपूर्वक करावी लागते.
    • बचतीचे पैसे त्वरित उपलब्ध होतात, तर गुंतवणुकीतील पैसे मिळवण्यासाठी काही कालावधी द्यावा लागतो.
    • बचतीसाठी फारशा ज्ञानाची गरज नसते, तर गुंतवणुकीसाठी सखोल ज्ञान व नियोजनाची गरज असते, तज्ञांची मदत घ्यावी लागते अथवा स्वतः तज्ज्ञ व्हावे लागते.
    • बचतीमुळे पैशाचे रक्षण होते, तर गुंतवणुकीमुळे योग्य उत्पन्न व चांगला परतावा मिळण्याची शक्यता असल्याने चलनवाढीवर मात करता येते.

    वरील सर्व विवेचनावरून अशी समजूत होऊ शकते, गुंतवणूक चांगली व बचत वाईट किंवा बचत चांगली आणि गुंतवणूक वाईट; परंतु यामधील कोणतीही एक गोष्ट पूर्ण बरोबर व दुसरी गोष्ट पूर्ण चूक असे नसून आपली अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीची ध्येयं पूर्ण करण्यासाठी बचत आणि गुंतवणूक या दोघांची आपल्या आयुष्यात फार महत्वाची भूमिका आहे. जर बचत आणि गुंतवणूक यांचा समतोल आपण साधू शकलो, तर आणि तरच भविष्यातील वाढत्या गरजा व चलनवाढ यांच्याशी सामना करू शकू. दुर्दैवाने आपल्या शालेय शिक्षणात बचत आणि गुंतवणूक यांतील फारच थोड्या गोष्टींचा स्पर्श होतो, तरीही इतर अनेक गोष्टी आपण जीवनात करून पाहतो, चूकतो, धडपडतो, पडतो, पुन्हा उठून उभे राहतो. आपले ज्ञान आणि अनुभव यांची सांगड घालून पैशांच्या सर्व बाजूंचा विचार करून, व्यावहारिक व व्यावसायिक दृष्टिकोन बाळगू शकलो, तर आपल्या स्वकष्टार्जित व वडिलोपार्जित संपत्तीचा सांभाळ करू शकू. तेव्हा पैशाच्या सर्व पैलूंचा विचार करूया, माहिती घेऊया, जागरूक राहूया, नियोजन करूया आणि स्वतःबरोबरच इतरांनाही अर्थसाक्षर करूया.

  • नोकरीतून उद्योजकतेकडे : मनोगत

    नोकरीतून उद्योजकतेकडे : मनोगत

    आज जगातील एक तृतीयांश लोकसंख्येच्या मूलभूत गरजासुद्धा पूर्ण होत नाहीत, तर ग्रामीण भारतातील कोट्यावधी लोकांचे मासिक उत्त्पन्न ५००० रुपयांपेक्षा कमी आहे. अशा परिस्थितीत, मानवी संस्कृतीशी निगडित विविध समस्यांवरील उपाय शोधण्यासाठी उद्योजक महत्वपूर्ण भूमिका निभावू शकतात.

    ३२.२४ लाख कोटी रुपये (४५० अब्ज डॉलर्स) सकल राज्य उत्पादन (जीएसडीपी) असेलली महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. देशाच्या एकूण जीडीपीतील १५ टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. देशातील उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. भारतातील एकूण विदेशी गुंतवणुकीपैकी (एफडीआय) ३० टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात येते. देशातील सर्वाधिक कोट्याधीश आणि अब्जाधीशसुद्धा महाराष्ट्रातच राहतात. एवढं सगळं असूनही या उद्योग क्षेत्रात सदैव आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात मराठी उद्योजक मात्र जितका दिसायला हवा तितका दिसत नाही. आपल्याकडे अशी म्हण आहे की, अंथरूण पाहून पाय पसरावे; पण अंथरुणच मोठं घ्या असं कुणीही सांगत नाही. अगदी प्राचीन काळापासून देशांतर्गत आणि देशाबाहेर व्यापार केला जातो आहे, पण ‘मोठा झाल्यावर तू व्यवसाय कर’ किंवा ‘मोठा बिझनेसमन हो’ असं आपल्यापैकी किती जणांना त्यांच्या पालकांनी सांगितले? बोटावर मोजण्याइतके असतील. परंतु आजकालच्या नोकरदारांमध्ये, तरुण पिढीमध्ये उद्योजकता हे करिअरचे क्षेत्र म्हणून निवडण्याचे प्रमाण वाढते आहे. आयुष्यभर दुसऱ्याच्या हाताखाली ‘नोकरी’ करत राहण्याची मध्यमवर्गीय मानसिकता आता बदलत आहे.

    जगातील लाखो लोक नोकरीला लाथ मारून स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची, प्रचंड पैसा कमवायची स्वप्नं रोज बघत असतात. आपल्याला कोणीही बॉस नसेल, स्वतःचे निर्णय स्वतः घेता येतील, काम करण्याचं कोणतंही बंधन नसेल यामुळे नोकरी सोडायचा विचार जरी आकर्षक वाटत असला, तरी वास्तव स्वप्नापेक्षा पूर्णपणे वेगळं असू शकतं. पूर्ण विचार न करता नोकरी सोडण्यामुळे वेळ आणि पैसा वाया जाऊ शकतो, मानसिक त्रास होईल तो वेगळाच.

    डोक्यात आयडिया आली किंवा एखाद्या मित्राने सांगितलं किंवा कुठेतरी अमुक अमुक धंदा जोमात आहे, अशी बातमी वाचली/बघितली आणि बिझनेस करायचा म्हणून कसलाही विचार न करता सरळ नोकरी सोडली, याला निव्वळ मूर्खपणा म्हणतात. व्यवसाय सुरु करणं एकवेळ सोपं आहे, पण तो यशस्वीपणे चालवणं तितकंच अवघड. त्यामुळे पूर्वतयारी केल्याशिवाय व्यवसायात उतरणे धोक्याचे ठरू शकते. ही पूर्वतयारी कशी करायची हे चार सोप्या पायऱ्यांमध्ये या पुस्तकात सांगितले आहे. त्याचसोबत गुंतवणूकदार कसे शोधायचे, कमी खर्चातील मार्केटिंगच्या पद्धती, व्यवसाय नोंदणीचे प्रकार आणि कंपनीचं नाव, लोगो, टॅगलाईन बनवताना काय काळजी घ्यावी याचीही माहिती दिली आहे.

    प्रत्येकाला पैसा कमवायचा असतो, श्रीमंत व यशस्वी व्हायचं असतं, त्यासाठी नोकरी करून काही होणार नाही, हेही कळतं, पण व्यवसायात उतरताना भीती व संकोच असतो. जवळ बुद्धी व कौशल्य असते, पण योग्य मार्गदर्शनाअभावी धाडस होत नाही. हे पुस्तक अशा लोकांसाठी आहे, जे सध्या नोकरी करत आहेत, पण त्यांच्या मनात स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा आहे. हे पुस्तक अशा उद्योजकांनासुद्धा उपयुक्त ठरेल, जे सध्या त्यांच्या व्यवसायात अनेक आव्हानांचा आणि अडचणींचा सामना करत आहेत. यातील संकल्पना समजून घेऊन, त्यावर आवश्यक कृती करून, सर्व प्रकारच्या भीतीवर मात करून, सावधपणे एकेक पाऊल पुढे जात राहिले पाहिजे. अनेक वर्ष नोकरीत अडकून पडलेल्या नोकरदारांमध्ये दडलेला उद्योजक जागरूक व्हावा यासाठी त्यांना नोकरीतून उद्योजकतेकडे नेणाऱ्या एका सेतूची गरज आहे असा सेतू बनवण्याचा हा प्रयत्न आहे. रामायणात वानरांनी समुद्रात एक एक दगड टाकून रामसेतू बनवला आणि प्रभू रामचंद्रांनी लंकेमध्ये प्रवेश करुन रावणावर विजय मिळवला. त्याप्रमाणे ह्या सेतूवरुन असंख्य श्रीराम प्रवास करोत आणि आपल्या आयुष्यात यशस्वी होवोत याच सदिच्छा…

  • १. नोकरी करावी की व्यवसाय?

    १. नोकरी करावी की व्यवसाय?

    वयाची १८-२२ वर्षे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करावी का व्यवसाय करावा हा कोड्यात टाकणारा प्रश्न सर्व तरुणांना पडत असतो, कारण आईवडिलांवर अवलंबून राहण्याचे सोडून स्वतःच्या कर्तृत्वाने जगात आपला ठसा उमटवण्याचे हे वय असते. उमेद असते, आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी हवे ते करण्याची तयारी असते; पण आपल्याला काय हवे हे मात्र समजत नाही.

    महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरुन एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर पुढे काय करणार? नोकरी की व्यवसाय? ह्या प्रश्नाला मिळालेली काही उत्तरे.

    • १. नोकरी करणार कारण घरची परिस्थिती व वातावरण व्यवसायाला अनुकूल नाही, शिवाय भांडवलसुध्दा नाही.
    • २. काही काळ नोकरी करणार, मग स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरु करणार आहे. काही दिवस नोकरी केली तर, भांडवल उभारणी करता येईल.
    • ३. व्यवसायच करणार आहे काहीतरी. काहीही झाले तरी व्यवसायच करायचा.

    आता वरील तीनही प्रकारच्या तरुणांच्या मताचे विश्लेषण करुया. पहिल्या प्रकारात एकतर त्या तरुणाला नोकरीच करायची असते, मात्र व्यवसाय न करण्याची काही कारणे तो पुढे करत असतो. नोकरीची सुरूवात सुध्दा अगदी तुटपुंज्या उत्त्पन्नावर होते, मग पुढे त्या उत्त्पन्नात फार वेगाने वाढ होते असेही काही नाही. असे तरुण जीवनभर rat race मध्ये अडकून पडतात. नोकरी, पगार, घर, घराचे हप्ते, मुलांचे शिक्षण, आरोग्य असे नेहमीचे प्रश्न सोडवतंच आयुष्य पुढे सरकत असते, त्यात फार उल्लेखनीय असे काही घडत नाही, पण ह्या चक्रात अडकलेला माणूस सहजासहजी बाहेर पडत नाही. हा निर्णय घेण्याची काही कारणे आहेत, त्यामध्ये जोखीम घेण्याचे धाडस नसणे, इच्छाशक्तीचा अभाव व न्यूनगंड ही काही महत्वाची कारणे आहेत, यावर थोड्याफार प्रयत्नांनी मात करता येते.

    दुसऱ्या प्रकारच्या व्यक्तींना काही काळ नोकरी करुन भांडवल उभे करायचे असते. काही प्रमाणात उपजीविकेचा प्रश्न मार्गी लावायचा असतो. ह्या व्यक्तींना कमी प्रमाणात जोखीम घ्यायची असते. हेही थोड्याफार फरकाने पहिल्या प्रकारच्या व्यक्तीसारखी सुरवात करतात. मग पगार, संसाराचे प्रश्न व कौटुंबिक जबाबदाऱ्यामुळे rat race मध्ये अडकतात व बाहेर पडायची इच्छा असून बाहेर पडत नाहीत व पहिल्या प्रकारच्या व्यक्तीप्रमाणे यांचेपण आयुष्य फिरत राहते. स्वतः पैसे कमावणे हा भांडवल उभे करण्याचा केवळ एकमेव मार्ग नाही. इतर अनेक मार्गांनी भांडवल उभे करता येते. भांडवल निर्मितीचे इतर मार्ग पुढे आपण पाहणार आहोत. भांडवलाच्या इतर पर्यायांनी जीवनात वेगाने पुढे जाण्याचा मार्ग सापडेल.

    तिसऱ्या प्रकारचे तरुण हे काहीसे ठाम, पण द्विधा मनस्थितीत असतात. या तरुणांना अधिक खोलात जाऊन प्रश्न विचारले तेव्हा समजले की, काहीतरी व्यवसाय करायचा म्हणजे कोणता व्यवसाय करावा याचा पुसटसा अंदाजही यांनी बांधलेला नसतो. इच्छाशक्ती असते मात्र दिशा घ्यायला वेळ लागतो. सांगणारेही कुणी नसतात. मग स्वतःच्या अंदाजावर पुढे जाण्याचा प्रयत्न चालू होतो. हे तरुण खूप काही करण्याची उमेद ठेवतात. पुढे जाऊन त्यांना हवे करुनही दाखवतात.

    मी काही जणांना पाहिजे तेवढे भांडवल देतो, तुम्ही कोणता व्यवसाय करणार आहात, असा प्रश्न विचारला की मग त्यांच्याकडे काही उत्तर नसते. भांडवल, मनुष्यबळ, प्रशिक्षण याचा पुरवठा बाहेरुन करता येतो. त्याचे असंख्य मार्गसुध्दा आहेत. व्यवसाय करण्यासाठी लागणारी वृत्ती स्वतःतच असायला हवी किंवा तिची जोपासना स्वतःहून करायला हवी, मग व्यवसाय यशाच्या शिखरावर नेता येईल.

    नोकरी करताना उत्पन्नाच्या, खर्चाच्या मर्यादा पडतात. त्याउलट व्यवसायामध्ये २४ तास झोकून देऊन काम करता येते. शेकडो माणसांना काम देता येते. ती माणसे तुमच्यासाठी काम करत असतात. सुरूवातीची काही वर्षे संघर्ष केला की, मनाप्रमाणे उत्पन्न व पाहिजे तेवढा वेळ व्यवसायातून प्राप्त करता येतो. उत्पन्नात होणारी वाढ ही बांबूच्या रोपट्याप्रमाणे वेगाने होत असते. मनसोक्त जगण्याचा, स्वतःच्या स्वप्नांसाठी काम करण्याचा आनंद घेत व्यवसाय करणे हे नोकरीपेक्षा सरसच.

    भारत हा तरुणांचा देश आहे. जगातील सर्वात जास्त तरुणांचा हा देश म्हणजे प्रत्येकाचे लक्ष आकर्षित करुन घेत असतो, पण इथल्या तरुणाईला या गोष्टीची कितपत जाणीव आहे हे जाणून घ्यावे लागेल. या तरुणाईची अवस्था कस्तुरीमृगासारखी आहे. कस्तुरी ही मृगाच्या नाभीत असते. मृग कस्तुरी शोधण्यासाठी सर्व जंगलभर सैरावैरा धावत असतो, पण त्याला स्वतःच्या नाभीत असलेल्या कस्तुरीची जाणीव कधीच होत नाही. आपल्यातल्या अपार शक्तीची जाणीव फार कमी तरुणांना आहे.

  • कसा झाला जगातील पहिल्या रेसिंग कारचा जन्म? पोर्श कारची गोष्ट

    कसा झाला जगातील पहिल्या रेसिंग कारचा जन्म? पोर्श कारची गोष्ट

    Ferdinand Porsche Founder of Porsche Car


    आपल्या कंपनीत ते नेहमीच उत्कृष्ट काम करत राहिले. एकदा Austrian carriage company चे head Ludwig Lohner या कंपनीला भेट देण्यसाठी आले होते तेव्हा त्यांचे लक्ष Ferdinand यांच्या कामाकडे गेले आणि त्यांचं काम पाहून Ludwig खूप impressed झाले. काही काळ गेला; Ludwig यांनी असा अंदाज बांधला की बऱ्याच वर्षापासून चालत आलेले घोड्याचे carriages म्हणजे ज्यांना आपण बग्गी म्हणतो ते आता बंद होतील आणि त्या ऐवजी मोटरवर चालणारे carriages जास्त वापरले जातील. वेळ वाया न घालवता लगेचच त्यांनी eager company शी tie up केला आणि तिथे काम करणाऱ्या Porsche यांना त्या carriages चं design बनवायला लावले. बऱ्याच दिवसांच्या कामानंतर अखेर 26 June 1898 ला ही carriage जिला त्यांनी Porsche  P1 असं नाव दिलं होतं Vienna च्या रस्त्यांवर वर चालू लागली. या Carriage मध्ये 2.2kw ची hub motor होती तर तब्बल 12-speed gears होते. यापैकी 6 forward gears होते, 2 reverse आणि 4 braking gears होते. यात असलेल्या battery चं वजन 1350 kg होतं जी एका वेळी 79 Km पर्यंत चालू शकत होती.


    1899 मध्ये Porsche आपण बनवलेल्या carriage ला घेऊन Berlin Road Race मध्ये सहभागी झाले आणि तिथं ते इतर स्पर्धकांच्या तुलनेत १८ मिनिटांनी लवकर अंतर पार करून अव्वल स्थानावर आले. अशाच दुसऱ्या एका स्पर्धेत त्यांची ही carriage, efficiency test जिंकली आणि याच carriage ला ‘most efficient vehicle in urban traffic’ अशी सर्वमान्यता मिळाली. Electric Carriage च्या grand success नंतर 1901 मध्ये त्यांनी जगातील पहिली petrol-electric कार बनवली. या कारचा 56 km/hr एवढा स्पीड होता, जो की कोणत्याही कारसाठी त्या काळातला highest speed मानला गेला. काही काळानंतर या कारमध्ये आणखी powerful engine बसवले गेले, ज्यामुळे या कारचा speed आणखी वाढला. इकडे Automobile क्षेत्रात त्यांच्या नावाचा दबदबा वाढत असताना 1902 मध्ये त्यांची लष्करी सेवेत नियुक्ती करण्यात आली. त्यांनी ऑस्ट्रियाचे क्राऊन प्रिन्स फ्रांझ फर्डिनांड यांच्या गाडीवर चालक म्हणून काम केले. पुढे 1914 मध्ये याच Prince ची गोळी मारून हत्या करण्यात आली आणि इथूनच पहिल्या महायुद्धाची ठिणगी पेटली.

    वडील तुरुंगात आहेत याचे दुःख कुरवाळत न बसता त्यांचा मुलगा Ferry Porsche ने आपल्या व्यवसायात लक्ष द्यायला सुरुवात केली. काही काळ शिक्षा भोगल्यानंतर Porsche यांची सुटका करण्यात आली आणि 1949 मध्ये संपूर्ण Porsche कुटुंबाने आपल्या व्यवसायाला नव्याने सुरुवात केली. November 1950 मध्ये Volkswagen आणि Porsche यांच्यात consulting work साठी contract झालं, ज्यामुळे Volkswagen च्या प्रत्येक beetle मागे Porsche यांना Royalty मिळू लागली. हे सगळं सुरु असतानाचं Tank बनविण्यात अपयशी ठरलेल्या Porsche यांनी आपला मोर्चा परत Tank Manufacturing कडे वळवला.

    आपल्या अथक प्रयत्नांनी अखेर त्यांनी Tank चे design complete केले ज्याचं नाव होतं ‘The Leopard’. हा tank main battle field वर सर्वात जास्त वापरला जाणारा tank ठरला. आत्तापर्यंत Porsche यांनी दैदिप्यमान कारकीर्द अनुभवली होती, पण आपण बनवलेल्या tank चे यश त्यांना पाहता आले नाही. 30 जानेवारी 1951 या दिवशी त्यांना हृद्यविकाराचा झटका आला आणि आयुष्यातले प्रत्येक speed breaker ओलांडून वेगाने धावलेल्या या अवलियाच्या गाडीला ब्रेक लागला तो कायमचाच!

    1996 मध्ये, Porsche यांना ‘इंटरनॅशनल मोटरस्पोर्ट्स हॉल ऑफ फेम’ मध्ये समाविष्ट करण्यात आले आणि 1999 मध्ये त्यांच्या मरणोत्तर ‘Car Engineer of the Century’ चा पुरस्कार त्यांना देण्यात आला. Ferdinand Porsche यांनी आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या आणि कौशल्याच्या जोरावर Automobile industry मध्ये एक क्रांती घडवली जी आजतागायत आपण सर्वजण अनुभवतोय .
         

    हा लेख विडीयो मध्ये पहा
  • उद्योग आणि मराठी माणूस : मनोगत

    उद्योग आणि मराठी माणूस : मनोगत

    एक ऐतिहासिक घटना आहे. नासाच्या नियोजित कार्यक्रमानुसार चंद्रावर उतरणारा पहिला माणूस कोण हे अनेकांना माहीत नसेल. ती व्यक्ती होती, एडविन आल्ड्रिन, अपोलो मिशनचा पायलट, अमेरिकन एअर फोर्सचा, स्पेस वॉकिंगचा अनुभवी माणूस. नील आर्मस्ट्राँग हा तर अमेरिकन नेव्हीमध्ये कार्यरत असलेला कर्मचारी. तो एडविनचा मदतनीस व को पायलट म्हणून गेला होता. अपोलो यान चंद्रावर उतरले व नासाच्या बेस स्टेशनमधून आदेश मिळाला, ‘पायलट फर्स्ट.’ एडविन काही सेकंद घाबरला, त्याला संकोच व भीती वाटली. आपण चंद्रावर उतरलो, तर आपण जळून जाऊ, गडप होऊ वगैरे. काही सेकंदानंतर दुसरा संदेश आला, ‘को पायलट नेक्स्ट’ व नील आर्मस्ट्राँग काहीही विचार न करता, कोणतीही भीती न बाळगता चंद्रावर उतरला व इतिहास घडला कारण, तो होता चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव.

    जग फक्त त्यालाच ओळखते ज्याने प्रथम धाडस केलं. तुम्ही किती शिकलात, तुम्हाला किती अनुभव आहे, तुमचे खानदान किती मोठे व कोणत्या राजामहाराजांचे आहे, त्याला काही अर्थ नाही. चीनमध्ये १०-१२ वी शिकलेली मुलं मोबाईल, मशीन्स, इलेक्ट्रिकल उपकरणांचे उत्पादन करू लागली आहेत. आज महाराष्ट्रातसुध्दा व्यापारी समाजातली मुलं वयाच्या १६ ते १८ दरम्यानच उद्योगात उतरतात. मराठी मुलं उगाच एमए, बीए, बीएड, बीई इत्यादी पदव्यांचे ढीग गोळा करत बसतात. जीवनात यश मिळवण्यासाठी लागते, ते धाडस आणि धैर्य. एम. कॉम. करताना फायनान्सची भली मोठी पुस्तकं वाचून काय फायदा, जर स्वत:च्या हिंमतीवर महिना ४०-५० हजार कमवून देणारा व्यवसाय करता येणार नसेल. मराठी माणूस भीती, संकोच यामुळे आयुष्यातील अनमोल संधी गमावतो व मागास राहतो.

    सर्वसाधारणपणे मराठी माणूस म्हटलं की, मिळेल त्या वेतनात समाधान मानणारा, चाकोरीबद्ध आयुष्य जगणारा असा एक समज आहे. मराठी उद्योजकाला उद्योग/व्यवसाय हा शब्द ऐकल्यावरच एक प्रकारची भीती मनात वाटते. मराठी युवा उद्योजकांपैकी बहुतांशी जण पहिल्या पिढीचे उद्योजक आहेत. त्यांना ना आर्थिक पाठबळ, ना कौटुंबिक पाठिंबा, ना व्यावसायिक ज्ञान, ना तंत्रज्ञानाची ओळख. एखादी मराठी व्यक्ती व्यवसायात उतरते, तेव्हा तिला सर्वत्र विरोध, समस्या आणि अडचणी यांना तोंड द्यावे लागते. त्यानंतर व्यवसाय सुरु झाला की, तो कसा करावा? उद्योग करताना सल्ला कोणाचा घ्यावा? जर अपयश आले तर, ते पचवून पुढे कसे जायचे? भांडवल कसे उभे करावे? आपण उद्योगामध्ये कुठे कमी पडतो? असे अनेक प्रश्न आ वासून उभे राहतात.  या आणि अशाच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या पुस्तकातून आपल्याला मिळणार आहेत. या सर्व नवउद्योजकांनी या पुस्तकातून प्रेरणा घेऊन स्वतःचे उद्योग मोठे करावेत आणि मराठी व्यावसायिक समाजाची निर्मिती करावी हीच अपेक्षा.

  • बेअरफुट कॉलेज

    बेअरफुट कॉलेज

    barefoot-college-famous-for-women-empowerment-self-reliance

    दिल्लीत शिक्षण पूर्ण करून बंकर रॉय यांनी भारत भ्रमण करायचे ठरवले. ते राजस्थान मधल्या या गावात आले. ‘आपण खूप शिकलोय तेव्हा इथल्या अशिक्षित लोकांना आपण शिकवू’ असं त्यांच्या अहंकाराला वाटलं. जसजसा त्यांचा या लोकांशी संबंध वाढला, तसतसं बंकर यांच्या लक्षात येऊ लागलं की वरकरणी अडाणी दिसणाऱ्या मंडळींकडे अनेक ज्ञान-कौशल्ये आहेत. तेव्हा याच लोकांकडूनच आपण काहीतरी शिकलं पाहिजे. यातूनच जन्म झाला – बेअरफुट कॉलेजचा.

    barefoot-college-famous-for-women-empowerment-self-reliance

    १९७५-८० च्या काळात निर्मिती झालेली ही वास्तू पाहण्यास आता जगभरातून लोक येतात. या प्रयोगास अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. संपूर्ण वास्तू शून्य विजेवर आणि शंभर टक्के सौर उर्जेवर चालते. या वास्तूमधील जेवणासकट सर्व सेवा सुविधा कमालीच्या साध्या. वायफळ खर्च नाही. माणसं अतिशय लाघवी व नम्र. अतिशय साधे सुती कपडे घातलेली ही माणसे बोलू लागली की नुसतं ऐकत बसावसं वाटतं. मध्यंतरी एका नेत्याच्या मुलाखतीनंतर ‘Women Empowerment’ हा शब्द विनोदाचा विषय झाल्याचे अनेकांना आठवत असेल. ‘Women Empowerment’ म्हणजे काय हे अनुभवायचे असेल तर ‘बेअरफुट कॉलेज’ ला भेट द्यावी लागेल.दर वर्षी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ग्रामीण भागातील अशा सुमारे शंभर स्त्रियांना ‘सौरउर्जा उपकरणे’ बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. हे शिक्षण देणाऱ्या सर्व महिला या त्याच गावातील ‘सहावी सातवी’ च्या पुढे न शिकलेल्या महिला आहेत. राजस्थानी पारंपारिक वेशातील त्या महिला शिक्षिका आफ्रिकन देशातील महिलांना शिकवताना पाहून आपण अक्षरशः अवाक होतो. 

    barefoot-college-famous-for-women-empowerment-self-reliance

    येस, नो, ओके या शब्दांच्या व्यतिरिक्त एकही ‘कॉमन’ शब्द माहित नसताना, केवळ खुणांच्या माध्यमातून आणि काही विशिष्ट संकेतांच्या माध्यमातून सुमारे सहा महिने हे शिक्षण चालू असतं. सोलर कुकर, सोलर हीटर, सोलर दिवे वगैरे उपकरणे महिलाच बनवतात आणि बाजारात यशस्वीपणे विकून दाखवतात. याच गावातील काही ‘कमी शिकलेल्या’ (?) महिला दंतवैद्यकशास्त्र शिकून ‘रूट कॅनल’ वगैरे करतात हे पाहून आपल्याला चक्कर यायची बाकी असते. या कॉलेजचं स्वतःचं एफएम रेडियो स्टेशन आहे. सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास असे रोज कार्यक्रम असतात. ज्या लोकांकडे बघून ती धड बोलतील की नाही अशी शंका यावी अशी माणसे ते रेडियो स्टेशन अतिशय शिताफीने चालवतात.

    एक एक धक्के पचवत बेअरफुट कॉलेजची सैर चालली होती. शेवटचा षटकार अजून बाकी आहे, याची कल्पना नव्हती. एका संगणकासमोर काही उपकरणे घेऊन एक स्त्री बसली होती. वय अंदाजे पन्नास. डोक्यावर घुंघट. त्यातून डोकवणारे सगळे केस पिकलेले. मी विचारलं, ‘आप क्या कर रही हो?’ अतिशय आत्मविश्वासाने समोरून उत्तर आलं – ‘मै रेडियो एडिटिंग कर रही हुं’…मी विचारलं, ‘आपके सामने जो मशीन्स है, उसके बारे मे आपको सब मालूम है?’ त्या स्त्रीने जे उत्तर दिलं, ते केवळ बेअरफुट कॉलेजच्या तत्वज्ञानाचं एका वाक्यात सार नव्हतं, तर आपल्या सर्वांच्या ‘शैक्षणिक अहंकाराला’ मारलेली चपराक होती. ती स्त्री म्हणाली, ‘ये बटन पे क्या लिखा है वो मै पढ नही सकती | पर ये बटन दबाने के बाद क्या होता है, वो मुझे मालूम है !’

    barefoot-college-famous-for-women-empowerment-self-reliance


    आपण थोडंफार शिकलो, आता आपली पुढची पिढी शिकतेय. त्या स्त्रीने जे सांगितलं, नेमकं तेच आपल्या शिक्षणातून हरवून गेलंय. मार्क, टक्के, मेरीटलिस्ट, अॅडमिशन वगैरे बाजारू कल्लोळात ‘खरं शिक्षण’ बाजूलाच पडलंय. मार्क, टक्के वगैरे गोष्टींना कमी लेखायचा उद्देश नाही. पण त्यातच फार अडकून गेलोय आपण. इंग्रजी आलं पाहिजे ते शेक्सपिअर वाचायला नव्हे, तर नोकरीच्या इंटरव्ह्यूमध्ये उत्तरं द्यायला. विज्ञान आलं पाहिजे ते या विश्वातलं कुतूहल शमवायला नव्हे, तर माझं ‘अॅग्रीगेट’ वाढवायला. संस्कृत आलं पाहिजे ते माझ्या परंपरेच्या पाउलखुणा शोधायला नव्हे, तर ते स्कोरिंग आहे म्हणून. शिकायचं असतं ते जगण्यातलं ‘शहाणपण’ (wisdom) मिळवायला. हे सगळं विसरून आपण इतके हीन आणि दीन कधी झालो? शिकण्याला आत्मविश्वासाचे व रोकड्या व्यवहाराचे पंख फुटले की काय चमत्कार घडू शकतो हे सांगणारं बेअरफुट कॉलेजचं उदाहरण पुरेसं बोलकं आहे.

    ‘बेअरफुट कॉलेज’ला जाण्यापूर्वी त्याविषयी अधिक जाणून घ्यायला मी ‘राजस्थान पर्यटन’ कचेरीत गेलो होतो. तिथल्या अधिकाऱ्यांकडे या जागेविषयी चौकशी केली. त्यांना कुणालाच ‘बेअरफुट कॉलेज’ माहित नव्हतं. त्यांनी माझ्यासमोर जयपूर येथील आपल्या स्वतःच्या मुख्यालयाला फोन लावला. त्यांनाही कुणाला स्वतःच्याच राज्यातील ‘तिलोनिया’ किंवा बेअरफुट कॉलेजविषयी काहीही माहिती नव्हती. या देशात काही भलं काम करायचं असेल तर कुठून सुरुवात करावी लागणार आहे, याची ही एक झलक होती. ‘बेअरफुट कॉलेज’च्या गेटमधून बाहेर पडलो तेव्हाच मनाशी पक्क ठरवलं – यापुढे या वास्तूचा प्रसार आणि प्रचार जमेल तसा आणि जमेल तिथे, आपण स्वतः करायचा. गेलं वर्षभर मी ते करतोय.

    – नविन काळे

    ( Courtesy Consu Preetam, Madhuri Purandare )

    आणखी वाचा

  • उद्योजक व्हायचे असेल तर…

    उद्योजक व्हायचे असेल तर…

    आपण जेव्हा एखादे काम स्वीकारतो किंवा एखादी नोकरी स्वीकारतो तेव्हा आपणास त्या कामाचे जे पैसे मिळतात ते हवे असतात म्हणून आपण ते काम किंवा नोकरी स्वीकारतो. पण त्यामुळे आनंदी होतोच असे नाही. केवळ जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पैशासाठी आपण ती नोकरी स्वीकारतो. आणि आपले त्या कामात लक्ष लागत नसल्यामुळे दु:खी कष्टी होतो. तसेच एखादा व्यवसाय किंवा उद्योग करावयाचा असेल तर आपल्याला तो व्यवसाय/उद्योग आवडतो का? ह्या प्रश्नाचा विचार सुरुवातीला करणे आवश्यक आहे. “I am the Boss of Myself” असे ज्याला वाटते तोच उद्योजक होऊ शकतो. ९ ते ५ काम करणारी मंडळी, त्यांची मानसिकता अगदी वेगळी असते. ते धाडसी निर्णय घेऊ शकत नाहीत. ते उद्योगात यशस्वी होऊ शकत नाहीत.

    How to Be a Successful Entrepreneur

    व्यवसाय करण्यासाठी सिद्ध असलेल्या व्यावसायिकाने हे लक्षात घ्यावयास हवे की त्याला मार्केटिंग येणे आवश्यक आहे. मार्केटिंग हे शास्त्र नव्हे. त्यासाठी उपजत शहाणपण आणि अनुभव गाठीशी असावा लागतो. आपल्याबाबत लोकांना माहिती हवी. आपण विकणाऱ्या वस्तूची चांगली माहिती हवी. तुम्ही स्वतःचे व्यक्तिमत्त्व विकले पाहिजे. तुम्हाला लोकांनी सहज ओळखले पाहिजे. इतरांच्या तुलनेत तुम्ही तुमची चमक दाखवली पाहिजे. अगदी तुम्हाला एस्कीमोलाही फ्रीज विकता आले पाहिजे किंवा केस नसणाऱ्याला कंगवा विकता आला पाहिजे. आपण जी वस्तू विकणार आहोत त्यात नाविन्य हवे. शक्यतो त्यासारखी दुसरी वस्तू बाजारात नसावी. नाविन्य आणि वेगळेपणा फार महत्वाचा आहे. तोच खरा व्यावसायिक/उद्योजक जो नाविन्यपूर्ण वस्तूंची निर्मिती करून त्यासाठी बाजार निर्माण करतो. उदा. स्टीव्ह जॉब्स. I-POD बाजारात आणला. लोकांना त्याची आवश्यकता होती का? तर नाही. तरीही लोकांना ती वस्तू हवी हवीशी वाटते आणि त्यातून पैसा कमविता येतो. नवीन ग्राहक निर्माण करणे व त्यासाठी बाजारपेठ निर्माण करणे हे फार महत्वाचे असते.

    स्टीव्ह जॉब्स यशस्वी झाले त्याचे कारण त्यांनी नव्या वस्तू बाजारात आणल्या. लोकांना त्या हव्या हव्याशा वाटल्या. तुमची सेवा, ह्याबद्दल लोकांना विश्वास वाटायला हवा. जो हे करतो तो खरा व्यावसायिक/ निर्माता. त्या वस्तूची नुसती विक्रीच झाली पाहिजे असे नाही तर त्यामुळे समाज जीवनावर त्याचा प्रभाव पडला पाहिजे. त्यामुळे सामान्य माणसाचे आयुष्य बदलले पाहिजे.
    तुम्ही तुमची बाजारपेठ तयार केली पाहिजे. टिकवून ठेवली पाहिजे. तुमच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा तुम्ही उठून दिसणे आवश्यक आहे बिल गेट्स हे उत्तम विक्रेते आहेत. स्पर्धा ही महत्वाची असतेच. पण स्पर्धेत तुमचे लक्षणीय असणे महत्वाचे असते. स्पर्धा ही असणारच. स्पर्धेला टक्कर देत पुढे गेले पाहिजे. जे खूप लढाऊ असतात त्यांच्या मागेच यश धावत येते.

    How to Be a Successful Entrepreneur

    कोणतीही पार्श्वभूमी नसणाऱ्या नव्या पिढीच्या व्यावसायिकाकडे पाहिले असता हे सहज लक्षात येते की त्यांच्याकडे योग्य ते भांडवल नसते. त्यांच्याकडे नव्या नव्या कल्पना असतात, इच्छाशक्ती असते ,उत्साह असतो. ह्या नव्या कल्पनाशक्तीमुळेच ते वेगळे दिसून येतात. आपल्या डोक्यात एकाच वेळी अनेक कल्पना असतात. अनेक कल्पनांची गिरणी चालू असते. जेव्हा वेळ योग्य असते, जमीन सुपीक असते तेव्हा कल्पनेला उगवण्याची म्हणजे फुलण्याची संधी मिळते. आपले मन स्वप्नाळू हवे. विचारक्षमता तीव्र हवी आणि कामाचे योग्य नियोजन हवे. तरच कल्पना प्रत्यक्षात उतरू शकते. आर गोपीनाथ ह्यांनी सर्वात स्वस्त हवाई प्रवास ही कल्पना पुढे आणली व एक नवा प्रयोग यशस्वी करून दाखविला. आज सामान्य माणसांना हवाई प्रवास शक्य झाला आहे .

    बहुतेक व्यवसाय अयशस्वी होतात त्याचे प्रमुख कारण म्हणजे व्यावसायिकांचा अहंगंड. दोन सहकारी व्यावसायिकांचा अहंगंड त्यांना अयशस्वी करतो. आयुष्यातील जगण्याचा अनुभव महत्वाचा असतो.

    सर्वच माणसं स्वप्नं बघतात. सगळ्यांची स्वप्नं सारखी नसतात. काही व्यक्ती फक्त रात्री झोपेत असतानाच स्वप्नं बघतात व सकाळी त्या स्वप्नांना आठवून त्यांचा विचार करतात किंवा विसरून जातात. पण ज्या व्यक्ती फक्त दिवसाच स्वप्नं बघतात त्या खूप वेगळ्या असतात. त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीचा पाठलाग करावयाचा असतो. ते त्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करतात. मेहनत घेतात. ही ध्यास असलेली माणसेच खऱ्या अर्थाने यशस्वी होताना दिसतात. अशी स्वप्नं बघणे आणि प्रयत्नशील राहणे हे खऱ्या व्यावसायिकालाच जमते. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या माणसाचे काम करणारा धीरुभाई अंबानीसारखा साधा माणूस पुढे जगातील एका मोठ्या पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीचा मालक कसा झाला हे समजून घेतले पाहिजे. महाविद्यालयीन शिक्षण सोडून स्वतःचे छोटे उद्योग उभे करणारे बिल गेट्स किंवा स्टीव्ह जॉब्स स्वतःचे औद्योगिक साम्राज्य कसे उभे करू शकले हे शिकले पाहिजे, समजून घेतले पाहिजे. THINK BIG AND START SMALL, हे सूत्र महत्वाचे.

    How to Be a Successful Entrepreneur

    तुम्ही तुमच्यापेक्षा हुशार व्यक्तींना तुमच्या व्यवसायात सहकारी म्हणून घेतले पाहिजे. तुमच्यापेक्षा कमी हुशार व्यक्तींना घ्याल, तर तुम्ही ज्यांचे नेतृत्व करणार आहात ते खुजे असल्यामुळे तुमचे नेतृत्व खुजेच असेल. तुमच्या कंपनीत जर जास्त कर्तृत्ववान माणसे असतील तर तुमची कंपनी उंचावर जाईल. नारायण मूर्तींना हे सहज जमले म्हणून त्यांचे नेतृत्व वादातीत आहे. तुमचे नेतृत्व निगर्वी हवे. त्यामुळेच रतन टाटा यशस्वी झाले. त्यांनी Nano कारचे स्वप्न पाहिले. ते प्रत्यक्षात उतरवून दाखविले. त्यामुळे सगळ्या कंपन्यांनी छोट्या कार बाजारात आणल्या. हा बदल घडून आणला तो Nano कारने. वेगळी अशी नवी वस्तू बाजारात आणणे हे महत्वाचे असते. नवी वस्तू पण सर्वात स्वस्त असा विचार त्यांनी दिला आणि सारे कार उद्योजक त्याच्या मागे धावत गेले कारण त्यांना नव्या बाजाराची जाणीव झाली.

    तुमची इच्छाशक्ती, तुमची आत्यंतिक आवड, तुमची निर्मिती क्षमता, तुमची ध्येयपूर्ती किंवा स्वप्नपूर्ती यासाठी चाललेली धडपड, त्यासाठी तुमचे झोकून देणे, हेच तुमच्या यशस्वी होण्याचे खरे भांडवल आहे. तुमची विचार क्षमता व कल्पनाशक्ती हे महत्वाचे भांडवल आहे. निवडलेला व्यवसाय हे माध्यम आणि तुमचे कर्म हाच खरा मार्ग आहे. ज्या व्यक्ती ह्याचा सतत पाठलाग करतात त्यांच्यासाठी परमेश्वरही त्यांच्या पाठीशी उभा राहतो. जे नैसर्गिकदृष्ट्या अनुचित व पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे ते आर्थिक दृष्ट्या फार नुकसानीचे असते हे ही त्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

    तुम्ही उडप्याचे हॉटेल पाहिले आहे काय? ते चालविणे महाकठीण काम आहे, हे माहित आहे का? ते हॉटेल चालविणे म्हणजे रोज तुमच्या मुलीचा लग्न समारंभ घडवून आणण्याइतके कठीण आहे. उद्योजक होणे असेच कठीण आहे असे गोपीनाथ ह्यांचे मत पटण्यासारखे आहे.

    नुसते ध्येय समोर ठेऊन जगणे किंवा मार्ग क्रमणे महत्वाचे नाही. त्यासाठी आपणास दूरदृष्टी असावयास हवी. खरी दूरदृष्टी असते तीच माणसे व्यवसायात यशस्वी होतात. हेन्री फोर्ड , वॉल्ट डिस्ने, स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स यांनी उद्योगाला सुरुवात केली पण अनेकदा ते अयशस्वी झाले, पण त्यांना दूरदृष्टी होती. काय करावयाचे की ज्यामुळे बदल घडून येतील ह्याची त्यांना स्पष्ट जाणीव होती. अशीच मंडळी काहीतरी भव्य दिव्य करून दाखवितात. उद्योजकाला उद्योग उभारण्यासाठी दूरदृष्टी असावी लागते, नजीकच्या काळापेक्षा भावी काळात उद्योग कसा वाढेल ह्याचा विचार महत्वाचा असतो. नजीकच्या काळातील समस्या सोडवताना दूरच्या काळातील विचार तेवढाच महत्वाचा असतो.हे ज्यांना जमते तेच यशस्वी होतात.

    व्यावसायिक म्हणजे तो माणूस, जो संपत्तीची निर्मिती करतो. नवी वस्तू, नवा गिऱ्हाईक, नवी सेवा, नवा ग्राहक. नवे असणे, उपयुक्त असणे व ग्राहकाला हवेहवेसे वाटणे, हे ज्याला सहज जमते तो खरा व्यावसायिक. नवी कल्पना, नवी वस्तू पण कमी पैशात निर्मिती, नवी सहज उपलब्ध होणारी सेवा ह्या त्रि-सूत्रीवर व्यवसाय अवलंबून असतो. स्टीव्ह जॉब्सने I-POD ची निर्मिती करून क्रांतीकारक बदल घडवून आणला. बिल गेट्सनी नवी क्रांती घडवून आणली अर्थात त्यासाठीचे आवश्यक असलेले मनुष्यबळ त्यांनी उभे केले.

    How to Be a Successful Entrepreneur

    थॉमस एडिसनने विद्युत दिव्याचा नुसता शोधच लावला नाही, तर निर्मिती करून जगाला विद्युतमय केले. सॅम वॉल्टनचे उदाहरण घ्या. “प्रत्येक दिवशी कमी किमतीत” ह्या संकल्पनेवर त्यांनी नवी बाजारपेठ उभी केली आणि खूप संपत्ती उभी केली. अंबानींनी “सारी दुनिया मुठ्ठीमे” अशी घोषणा देऊन सामान्य माणसाना मोबाईल विकला. ही सर्व उदाहरणे हे दर्शवितात की उद्योजक हा महाविद्यालयात व्यवस्थापकीय शिक्षण घेऊन तयार होत नाही. त्यासाठी त्याला तशी आतून उर्मी असावी लागते. त्यासाठी आपण खूप बुद्धिमान असले पाहिजे असे नाही, परंतु आजूबाजूचे सर्व जाणून घेण्यासाठी उत्सुक असले पाहिजे. तेच महत्वाचे ज्ञान आत्मसात करता आले पाहिजे .

    बहुतेक धंदे किंवा व्यवसाय अगदी सुरुवातीच्या काळातच बंद पडतात. जेव्हा सहकारी एकमेकाला पूरक नसतात किंवा त्यांची विचार करण्याची पद्धती सारखी नसते व काम करण्याचे मार्ग भिन्न असतात तेव्हा व्यवसाय बंद पडतात. पूरक सहकारी निवडणे फार महत्वाचे असते . तरच तणाव मुक्त व्यवसाय करता येतो. दोन किंवा दोन पेक्षा अधिक पार्टनर असतील तर कोणातरी एकाचे नेतृत्व मान्य करून व्यवसाय करता आला पाहिजे. दोन दोन नेतृत्व असतील तर व्यवसाय चालू शकत नाही. एका जहाजाला दोन कप्तान असू शकत नाहीत.

    बरेच जण व्यवसाय/उद्योग सुरु करतांना म्हणतात, “मला नवा व्यवसाय सुरु करावयाचा आहे. माझ्या वरिष्ठांना त्याची काहीच कल्पना नाही. जर व्यवसाय यशस्वी होण्याची चिन्हे दिसली तरच मी नोकरीचा राजीनामा देईल.” असा विचार करणारे लोक उद्योजक होऊ शकत नाहीत. तुम्हाला जर खरे उद्योजक व्हायचे असेल, तर हे लक्षात ठेवा की तुम्हाला स्वतःला झोकून देता आले पाहिजे. अर्थात त्यासाठी हालअपेष्टा सहन करण्याची तयारी हवी.

    तुम्ही तुमच्या जागेचे भाडे वेळेवर देऊ शकणार नाहीत. कर्मचार्यांना पगार देताना तुमची तारांबळ होईल. बायकोला साडी घेण्यासाठी तुमच्याजवळ पैसे नसतील. मुलांची महागडी शिक्षण फी भरण्यासाठी त्रास होईल. अशा असंख्य अडचणीना तोंड द्यावे लागेल. ह्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी नवे मार्ग शोधावे लागतील. ते सहज जमते, प्रयत्न करावे लागतात . पण त्यासाठी तुमची झोप उडालेली असेल, असे जेव्हा घडेल तेव्हाच तुम्ही तावूनसुलाखून निघाल. निसर्ग जसा अडचणी निर्माण करतो तसाच अडचणीवर मात करण्यासाठी मेंदूला चालनाशक्ती देतो. त्या शक्तीचा उपयोग करता आला पाहिजे.

    नवा उद्योग किंवा व्यवसाय उभा करतांना अडचणीचा डोंगर उभा राहणारच. त्या अडचणीवर मात करतानाच तुम्ही घडत जाल. नदीचा गुणधर्म वाहणे आणि समुद्राकडे धावणे. तुम्ही नदीसारखे असाल तर दगड धोंड्यावर मात करून वाहत राहणार व शेवटी समुद्राला मिळणार म्हणजेच यशस्वी होणार. यशाचा समुद्र तुमची वाट पाहत असेल हे लक्षात ठेवा. तुमच्यामध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती हवी. प्रचंड उत्साह हवा. मग यशाची शिखरे तुमचीच.

    How to Be a Successful Entrepreneur

    सगळ्या लढाया ह्या प्रथम मनाच्या अवकाशात लढल्या जातात. हे लक्षात असू देणे महत्वाचे आहे. आपल्याला आजूबाजूच्या सिमीत अवकाशाची कल्पना असलेली बरी. जेव्हा आपण निर्णय घेत नाही, तेव्हाच आपण अपयशाच्या दिशेने वाटचाल करतो. हे ही लक्षात असू द्यावे.

    धंदा करावयाचा असतो तो “नफा ” मिळवण्यासाठी. “नफा” हा धंदा करणाऱ्यासाठी पवित्र मंत्र आहे. ते मान्य नसेल तर ह्यात पडू नका. नफा असेल तरच धंदा जगेल. तोटा कमी करणे ही धंद्याची पहिली पायरी. सतत तोटाच होत असेल, तर धंदा बंद करणे ही महत्वाची दुसरी पायरी. आपल्याला यश मिळू लागले की लोक आपल्याला जेवायला या असे आमंत्रण देतात. तेव्हा हे लक्षात असू द्यावे की कोणीही, कधीही फुकट जेवायला बोलवीत नसते. लोकांना ओळखता आले पाहिजे.

    कोणतीही गोष्ट पूर्ण करावयाची असेल, तर सर्वात प्रथम त्यासाठी कोणत्या दिवसापर्यंत पूर्ण करावयाची हे निश्चित करा. मनामध्ये तो दिवस पक्का करा. हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे. डेडलाईन महत्वाची असते . तरच गोष्टी साध्य होतील. व्यवस्थापकीय शिक्षण ठीक. पण जे शिकवले जाते ते सारेच उपयोगी पडते असे नाही. प्रत्यक्ष व्यावसायिक जीवनात वेगळेच मार्ग निवडावे लागतो. नुसत्या पुस्तकी शिक्षणाचा फारसा उपयोग होत नाही.

    becoming-an-entrepreneur-the-essential-skills-you-need-to-succeed

    अंटार्टिका मोहिमेसाठी एक जाहिरात देण्यात आली होती. ती अशी ….
    “अतिशय धोकादायक मोहिमेसाठी माणसे हवीत. अर्ज करा. खूप कमी पगार, मरणाची थंडी असलेला प्रदेश, सहा सहा महिने रात्रीचे काम, सतत अडचणीशी सामना, निसर्गाशी युद्ध, जिवंत परत येण्याची कमी शक्यता परंतु यशस्वी झालात तर जागतिक सन्मान नक्कीच .”
    HAZARDOUS JOURNEY : ANTARCTICA

  • शेअर बाजारातील करिअर आणि व्यवसाय संधी

    शेअर बाजारातील करिअर आणि व्यवसाय संधी

    भारत सरकारने १९८९ मध्ये सेबीची स्थापना केली. शेअर बाजाराच्या कार्यपद्धतीवर अंकुश ठेवण्यासाठी १९९२च्या कायद्यान्वये सेबीला अधिकार प्राप्त झाले. भांडवल बाजारात हर्षद मेहतासारखे जे घोटाळे होत होते ते होऊ नयेत म्हणून केंद्रीय अर्थ मंत्रालयाने १९९४ मध्ये राष्ट्रीय शेअर बाजाराच्या कामकाजास प्रारंभ केला. यामुळे मुंबई शेअर बाजाराची मक्तेदारी संपुष्टात आली.

    how-to-start-a-career-in-the-share-market

    १९९५ पासून संगणक या माध्यमातून बोल्ट (बी. एस. ई. ऑन लाईन ट्रेडिंग) या पद्धतीद्वारे सौदे होण्यास सुरुवात झाली. राष्ट्रीय शेअर बाजारातील सौदे नीट (एन. ई. ए. टी.) या पद्धतीद्वारे करण्यास सुरुवात झाली. ४ जानेवारी १९९९ पासून एन. एस. डी. एल. व १५ जुलै १९९९ पासून सी. डी. एस. एल.मध्ये सर्टिफिकेटच्या स्वरूपातील शेअर्सचे डीमॅटमध्ये रूपांतर होण्यास सुरुवात झाली. पूर्वी समभागांची खरेदी-विक्री झाल्यानंतर सर्टिफिकेट रूपात ताबा मिळायला सुमारे तीन महिने लागत असत. याउलट आजच्या संगणक युगात व्यवहार झाल्यावर तिसऱ्या दिवशी समभागांचा ताबा मिळतो. यामुळे घोटाळे होण्यास पायबंद बसलेला आहे. शेअर बाजाराच्या पारंपरिक कार्यपद्धतीला छेद देऊन आजची नवीन कार्यपद्धती अस्तित्वात आलेली आहे. यामध्ये संगणकाचे स्थान लक्षवेधी आहे. कार्यालयात बसून सौदे होऊ लागले. आता तर जणू काही गुंतवणूकदाराने शेअर बाजाराला घरातील पडद्यावर आणले आहे. तंत्रज्ञानातील या क्रांतीमुळे शेअर बाजारातील उलाढालींचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले.

    पूर्वी शेअर्स सर्टिफिकेट रूपात असत; परंतु आता इलेक्ट्रॉनिक रूपात केवळ नोंद केली जाते. त्यामुळे याला आता पेपरलेस ट्रेडिंग म्हटले जाते. या पद्धतीला डीमॅट पद्धती असे म्हणतात. नव्या उद्योगाची उभारणी करताना किंवा जुन्या उद्योगाचा विस्तार करताना मोठय़ा भांडवलाची आवश्यकता असते. हे भांडवल प्रायमरी मार्केटद्वारे उभारले जाते. शेअर बाजार म्हणजे सेकंडरी मार्केट. सेकंडरी मार्केट प्रायमरी मार्केटवर अलंबून असते.

    शेअर बाजाराचे कामकाज सकाळी ९.५५ ते दुपारी ३.४५ पर्यंत चालू असते. कार्यालयीन कामकाजाची पूर्वतयारी सामान्यत: सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू होते. सर्वप्रथम बोल्टला पासवर्डच्या सहाय्याने शेअर बाजाराच्या केंद्रस्थानाला जोडून घेतले जाते. शासनाच्या उद्योगधंदेविषयक बदलणाऱ्या धोरणांचा शेअर बाजाराच्या वधघटीवर परिणाम होतो. याशिवाय विशिष्ट कंपनीच्या व्यवस्थापनातील बदल, त्यांचे कंपनीसंबंधीचे विविध निर्णय शेअरच्या भावांवर परिणाम करतात. शेअर बाजाराची दृष्टी नेहमी पुढे गेलेली असते. सतत भविष्याचा वेध घेताना मागे वळून पाहायला कुणालाही फुरसत नसते. समभागांचा हा बाजार अत्यंत संवेदनाक्षम असतो. येथील व्यावसायिकाला चोवीस तास जागे राहावे लागते. नजर चौफेर ठेवावी लागते. राजकारण, उद्योगधंदे यावर त्याचे बारीक लक्ष असते.

    how-to-start-a-career-in-the-share-market


    निर्देशांक हा शब्द आपण नेहमीच ऐकतो. शेअर बाजारात जास्तीत जास्त उलाढाल करणाऱ्या प्रमुख कंपन्यांवर शेअर बाजाराचा निर्देशांक आधारित असतो. निर्देशांक हे राष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीचे मोजमाप आहे. प्रसारमाध्यमांद्वारे नेहमी शेअर बाजाराचे माहितीपूर्ण चित्र रंगविलेले असते. अशा वेळी व्यक्ती व संस्थांना तज्ज्ञांची मदत घेणे उचित ठरते. या परिस्थितीने शेअर बाजारातील अनेक करिअरना जन्म दिलेला आहे.

    अविकसित भारत आता विकसनशील देश आहे. त्यामुळे अनेक विदेशी गुंतवणूकदार विविध भारतीय उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक करण्यात रस घेत आहेत. हे प्रमाण सतत वाढते आहे. आता त्यांना आठ टक्क्यांपासून साठ टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करण्यास मुभा मिळालेली आहे. या अत्याधुनिक उद्योग जगतात उगवती पिढी काम करण्यास अधिक योग्य ठरते. उगवत्या पिढीला ही उत्तम संधी आहे. शेअर बाजाराच्या उद्योगांना उज्ज्वल भवितव्याची खात्री आहे.

    आता आपण शेअर बाजारामध्ये येणाऱ्या घटकांची थोडक्यात ओळख करून घेऊया.

    १) दलाल : शेअर बाजारात दलाल म्हणून काम करणे हा एक स्वतंत्र व्यवसाय आहे. मुंबई शेअर बाजार लिमिटेडमध्ये दलाल होण्यासाठी किमान बारावी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आहे. त्यासाठी वय एकवीस वर्षे पूर्ण असणे जरुरीचे आहे. राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये दलाल होण्यासाठी किमान पदवीधर असणे ही शैक्षणिक पात्रता आहे.

    २) उपदलाल : कोणतीही गुंतवणूक न करता उपदलाल हा व्यवसाय सुरू करता येतो. यासाठी बारावीची परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. यासाठी किमान वय २१ असावे लागते. मुंबई शेअर बाजारात सबब्रोकरशिप न स्वीकारता रेमिशनरी म्हणूनदेखील काम करता येते. त्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता बारावी असून स्वतंत्र व्यावसायिक असण्यास उपदलाल व रेमिशनरी यांना मनाई आहे.

    ३) पोर्टफोलिओ मॅनेजर : Port- Folio चा अर्थ खाते विभाग आहे. गुंतवणुकीत खूप विभाग असून प्रत्येक विभागाचे उपविभाग आहेत. गुंतवणूक कुठे, कशी, कितपत व केव्हा करावी, असे बरेच प्रश्न गुंतवणूकदारांना भेडसावत असतात. प्रत्येक गुंतवणूकदार हा गुंतवणूक बाजाराचा एक्सपर्ट असतो, असे नाही. त्यामुळे त्याला एक्सपर्टीजची जरुरी असते. पोर्टफोलिओ मॅनेजर होण्यासाठी सेबीकडे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असते. हा स्वतंत्र व्यवसाय असून काही आर्थिक संस्थांमध्ये नोकरीचे पददेखील आहे. यातून मिळणारे कमिशन हे आकर्षक असते. वार्षिक वेतन किमान आठ लाख रुपये असते.

    ४) गुंतवणूक सल्लागार : इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट होण्यासाठी रजिस्ट्रेशनची आवश्यकता नसते. इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटला करविषयक ज्ञान असल्यास त्याचे काम दर्जेदार होते. थोडक्यात, इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट गुंतवणूकदाराला माहिती पुरविण्याचे काम करतो.

    ५) अकाऊंटंट : अकाऊंटंटला अकाऊंट्स रिलेटेड सॉफ्टवेअरचे ज्ञान असणे अगत्याचे असते. कॉमर्समधील पदवीधर व सी.ए.ना इथे प्राधान्य असते. अकाऊंटंटला एक लाख ते पाच लाख रुपयांपर्यंत वार्षिक वेतन मिळते.

    ६) मुख्य कारकून : मुख्य कारकुनाला बाजाराची परिभाषा, बाजाराविषयी ज्ञान, किमान एक वर्षांचा अनुभव असल्यास सोयीचे होते. याला परीक्षा किंवा वयाचे बंधन नसते. अनुभव व बाजाराचे ज्ञान हे महत्त्वाचे आहे. दलालाच्या कामाच्या पसाऱ्याप्रमाणे त्याचे वार्षिक वेतन शहाण्णव हजार ते चार लाख रुपयांपर्यंत असते.

    ७) फंडामेंटल अ‍ॅनालिस्ट : रिसर्च कंपनीत म्युच्युअल फंड कंपनीज, प्रायव्हेट बँकिंग फंड मॅनेजमेंट कंपनीज या सर्व ठिकाणी सिक्युरिटी अ‍ॅनालिस्टला काम करण्याची संधी असते. एम.बी.ए. (फायनान्स), एम.बी.ए. (अकाऊंटसी) सी.ए. यांना प्राधान्य असते. शिवाय बी.टी.आय.चा फंडामेंटल अ‍ॅनालिसिसचा कोर्स करणे उपयुक्त ठरते.

    ८) टेक्निकल अ‍ॅनालिस्ट : दलाल डे ट्रेडर्स, ऑपरेटर्स, हाय नेटवर्दी इंडिव्हिजवल्स टेक्निकल अ‍ॅनालिसिसचा उपयोग करतात. यासाठी पदवीधर असणे पुरेसे आहे. शिवाय बी.टी.आय.चा टेक्निकल अ‍ॅनालिस्टचा स्पेशल कोर्स आहे.
    ९) फंड मॅनेजर : सुरुवातीला तीन वर्षे अनुभव घेण्यासाठी फंड मॅनेजरचा सहाय्यक म्हणून काम करावे लागते. त्यानंतर फंड मॅनेजर म्हणून काम मिळते. एम.बी.ए. (फायनान्स), सी.ए. अर्थतज्ज्ञ यांना प्राधान्य दिले आहे. फंड मॅनेजरला किमान वार्षिक वेतन दहा लाख रुपये असते.

    १०) अ‍ॅसेट मॅनेजर : एम.बी.ए. (फायनान्स), अर्थतज्ज्ञ, सी.ए., शेअर बाजारातील अनुभवसंपन्न व्यक्ती, शेअर तज्ज्ञ यांची अ‍ॅसेट मॅनेजरच्या पदासाठी निवड केली जाते. शिवाय या कामासाठी बी.टी.आय.मधील विविध कोर्स उपयुक्त ठरतात.

    ११) आर्थिक गुन्हे अन्वेषक : या करिअरसाठी प्राधान्याने सी.ए., आय.एस.ए. यांना संधी असते. आयकर हिशेबाची साधने व तंत्रे माहीत असणाऱ्यास संगणकाच्या जाळ्याविषयी ज्ञान असणाऱ्यांना देखील संधी असते. कायद्याच्या चौकटीच्या आधारे योग्य मार्ग सुचविण्याएवढी क्षमता असणे आवश्यक आहे. नोकरीच्या पदांना वार्षिक वेतन किमान बारा लाख रुपये असते.

    शेअर बाजाराच्या प्रशिक्षण देणाऱ्या संस्था :


    अ) बी.एस.ई. ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज लि. मुंबई, १८ व १९ वा मजला, पी. जे. टॉवर्स, दलाल पथ, फोर्ट, मुंबई- ४००००१, दूरध्वनी- २२७२१२३३/३४, २२७२११२६/२७. web site:http://www.bseindia.com

    ब) नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लि. बांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स बांद्रे (पूर्व), मुंबई- ४०००५१. दूरध्वनी- २६५९८१००, २६५९८२५२/१६ web site:www.nseindia.com

    क) इंडियन इन्स्टिय़ूट ऑफ कॅपिटल मार्केट, प्लॉट क्र. ८२, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई- ४००७०५ इंडिया,web site:www.utiicm.com
    दूरध्वनी- ९१-२२-२७८९२८१५/१६.

    ड) सेंटर फॉर फायनान्शियस मॅनेजमेंट बंगलोर, १ ला ए क्रॉस, १७ वा ए मेन, जे. पी. नगर, फेज क्र. २, बंगलोर- ५६००७८.

    इ) दी इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड फायनान्शियल अ‍ॅनालिस्ट ऑफ इंडिया, खोली क्र. ३, बंजारा हिल, हैदराबाद- ५०००३४.

    ई) इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फायनान्स, अशोक विहार, २, दिल्ली- ११००५२, इंडिया.

    • पुष्कर मुंडले

    आणखी वाचा