नवी अर्थक्रांती

Blog

  • कृत्रिम बुद्धिमत्ता: एका चमत्कारिक तंत्रज्ञानाची वाटचाल!

    कृत्रिम बुद्धिमत्ता: एका चमत्कारिक तंत्रज्ञानाची वाटचाल!

    आपल्या सगळ्यांच्याच घरात रिमोटवर चालणारे टीव्ही, आपल्या हातात असलेला स्मार्टफोन, किंवा कार चालवताना मिळणारे मार्गदर्शन, या सगळ्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) हात आहे हे तुम्हाला माहीत आहे का? आत्ताच्या युगात आपल्या दैनंदिन जीवनात इतक्या सहजपणे रुतले गेलेलं हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे. सर्वप्रथम, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय ते समजून घेऊ. सोप्या शब्दांत सांगायचं तर, संगणकांना मानवी बुद्धिमत्तेसारखी शिकण्याची, समजण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता देणे हेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे ध्येय आहे. हे ध्येय गाठण्यासाठी विविध तंत्रज्ञानं वापरली जातात, जसे की मशीन लर्निंग, डीप लर्निंग, नेटवर्क थिअरी इत्यादी.

    कृत्रिम बुद्धिमत्तेचा इतिहास खूप जुना नाही. १९५० च्या दशकात या संकल्पनेवर पहिली चर्चा झाली. पण त्यावेळी संगणक तंत्रज्ञान इतके विकसित नव्हते, त्यामुळे ही संकल्पना तशीच राहिली. संगणक तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर 1990 च्या दशकात त्यावर पुन्हा संशोधन सुरु झालं. आता या क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत आहे. आज robots पासून ते स्वयंचलित गाड्यांपर्यंत, AI सर्वत्र आपले अस्तित्व दाखवत आहे. आत्ता आपण वापरत असलेले Google Assistant किंवा Siri सारखे व्हॉइस असिस्टंट्स, सोशल मीडियावरील व्यक्तिगत पसंतीनुसार दिसणाऱ्या जाहीरती, तुमच्या आवडीनुसार शिफारसी देणारे ऑनलाइन स्टोअर्स हे सगळं AI चीच उदाहरण आहेत.

    आज आपण अनेक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर पाहतो आहोत, जसे की-

    • वैद्यकीय क्षेत्रात: आजारांचं निदान, औषधांचा शोध, शस्त्रक्रिया इत्यादी गोष्टींमध्ये
    • वित्तीय क्षेत्रात: धोका ओळखणं, गुंतवणूक सल्लागार, फसवणूक रोखणे इत्यादी गोष्टींसाठी
    • वाहतूक क्षेत्रात: स्वयंचलित वाहनं, वाहतूक नियंत्रण, अपघात टाळणे इत्यादी गोष्टींसाठी
    • ग्राहक सेवा: चॅटबॉट्स, कस्टमर केअर, वैयक्तिकृत जाहिराती (personalized ads) इत्यादी गोष्टींसाठी

    भविष्य काय:

    AI ची वाटचाल खऱ्या अर्थाने आत्ता कुठे सुरु झाली आहे. भविष्यात AI आपल्या आयुष्याचा अधिकाधिक भाग होणार आहे. स्वयंचलित वाहनं सर्वत्र दिसतील, तुमच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार शिक्षण आणि वैद्यकीय सेवा सर्वसामान्य होईल आणि रोबोट्स आपल्यासोबत सहकारी म्हणून काम करतील. यामुळे आपला वेळ आणि श्रम बचत होईल, नवीन संधी उपलब्ध होतील आणि आपले जीवन सुखदायी बनण्यास मदत होईल.

    तसेच, AI चा वापर योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. या तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर झाला तर मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ शकते, काही प्रमाणात बेकारी वाढू शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नवीन नोकरीच्या संधी निर्माण होत आहेत. जसे की AI तज्ज्ञ, डेटा सायंटिस्ट, रोबोटिक्स इंजिनिअर इत्यादी. पण दुसरीकडे काही नोकऱ्या संपुष्टातही येऊ शकतात. जसे की कॉल सेंटरमधील ऑपरेटर्स, डेटा एंट्री ऑपरेटर्स इत्यादी. त्यामुळे या नवीन तंत्रज्ञानासोबत जुळवून घेणे आणि नवीन कौशल्य शिकणे गरजेचे आहे.

    भविष्यात काय करायचं?:

    कृत्रिम बुद्धिमत्तेच्या फायद्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेऊन ते आपल्या कल्याणासाठी वापरली पाहिजेत. यासाठी खालील गोष्टी महत्वाच्या आहेत:

    शिक्षण आणि प्रशिक्षण: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात आणखी संशोधन आणि विकास करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर समाजाला या तंत्रज्ञानाची माहिती देणे आणि त्याचा योग्य वापर कसा करायचा ते शिकवणेही गरजेचे आहे.
    नियमन: AIचा अयोग्य वापर टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कायदे आणि नियमावली तयार करणे गरजेचे आहे.
    नैतिकता: AI तयार करताना आणि वापरताना नैतिकतेला प्राधान्य दिले पाहिजे.

    आपण जर जबाबदारीने आणि सुबुद्धीनं कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला तर ते मानवाच्या प्रगतीचं आणि कल्याणाचं एक शक्तिशाली साधन ठरू शकते. ते मानवापेक्षा हुशार होईल का? ही चर्चा अजूनही सुरू आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की, AI आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनणार आहे. हे तंत्रज्ञान आपल्या नशिबाचा खेळ खेळवणार की आपल्या मदतगार ठरणार हे आपल्या हातातच आहे. म्हणून आपण या क्षेत्रात झपाट्याने होणारी प्रगती लक्षात घेऊन त्याचा सावधपणे आणि जबाबदारीने वापर केला पाहिजे.

  • सोशल मिडिया फॉर बिझनेस ग्रोथ

    सोशल मिडिया फॉर बिझनेस ग्रोथ

    डिजीटल उपकरणांमुळे जग एकदम जवळ आले. त्यात प्रचंड बदल झाले. या आभासी जगाशी आपल्याला जुळवून घेण्यासाठी तयार राहणे गरजेचे आहे. या नव्या डिजीटल जगात हौस – नवसे – गवसे यांची संख्या सुध्दा प्रचंड प्रमाणात वाढली आहे. म्हणून आपला व्यवसाय डिजीटल करण्याआधी आपल्याला डिजीटल मार्केटिंगची पायाभूत माहिती असणे गरजेचे आहे. आपण जर या क्षेत्राशी संपूर्णपणे अनभिज्ञ असू तर भरल्या बाजारात आपल्याला ठगवणाऱ्यांची संख्या कमी नाही. तेव्हा जाणकार बनण्यासाठी आपल्याला डिजीटल मार्केटिंग कळणे, त्याच्या सेवा कुणाकडून घ्यायच्या कोणावर विश्वास ठेवायचा हे शिकणे सुध्दा गरजेचे आहे.

    गेल्या पाच वर्षात जेवढे बदल आपण पाहिलेले आहेत. तेवढे बदल संपूर्ण मानवजातीच्या इतिहासात घडून आलेले नाहीत. गेल्या काही वर्षात आपल्याला वस्तू खरेदी करण्यासाठी किराणा दुकान, सुपर मार्केट व मॉलमध्ये जाणे भाग होते. आता मात्र घरबसल्या फ्लिककार्ट, स्नॅपडील सारख्या कंपन्यांना हव्या त्या वस्तूची ऑर्डर द्या. दुसऱ्या दिवशी ती वस्तू आपल्या दारात येऊन उभी असते. त्याचे पैसेसुध्दा वस्तू हातात मिळाल्यावरच द्यायचे आहेत. पैशासाठी नोटा किंवा रोख रक्कमेचे निम्याहून अधिक व्यवहार इतिहासजमा झाले आहेत.

    मोबाईलचा रिचार्ज करणारी दुकाने बंद व्हायला लागली आहेत. कारण प्रत्येकजण आपल्या मोबाईल मधून रिचार्ज करु लागला आहे. सायबर कॅफेत बसण्यासाठी तरुणाई रांग लागलेली असायची त्या ठिकाणी आता सायबर कॅफे औषधाला सुध्दा सापडणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. डाटा सेवेवर पैसे कमावणाऱ्या टेलिकॉम कंपन्यामध्ये जास्तीत जास्त डाटा व इंटरनेट स्पीड देण्याची जणू काही स्पर्धाच चालू झालेली आहे. प्रत्येकाच्या हातात डिजीटल उपकरणे आलेली आहेत. ती कमालीची स्वस्त व खिशाला परवडणाऱ्या दरात तसेच मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. बातम्या वाचण्यासाठी वर्तमान पत्र किंवा टीव्ही वर अवलंबवून राहावे लागत नाही.

    आणखी वाचा

  • अविरत उद्योग वाढीसाठी समाज माध्यमांचा उपयोग सोशल मिडिया फॉर बिझनेस ग्रोथ

    अविरत उद्योग वाढीसाठी समाज माध्यमांचा उपयोग सोशल मिडिया फॉर बिझनेस ग्रोथ

    अश्मयुगीन मानवाला आगीचा शोध लागला आणि त्यांच्या जीवनात परिवर्तन आले. चाकाचा शोध लागल्यानंतर जीवन अधिक गतिमान झाले. त्यानंतर जवळजवळ हजार वर्षांनतर मुद्रणकलेचा शोध लागला व ज्ञानाचे, माहितीचे संकलन मोठ्या प्रमाणावर केले गेले आणि जगभर ज्ञानाचा प्रसार झाला. ज्ञानाची देवाणघेवाण सहज व सुलभ झाली.

    युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीनंतर यंत्रांची निर्मिती व वापर सर्वत्र सुरु झाला. त्यांनतर अलिकडच्या काळात आईनस्टाईनने सापेक्षतावादाचा सिद्धांत शोधून काढला तेव्हा विज्ञान आणि तंत्रज्ञानात क्रांती झाली. संगणकाचा शोध हा माहिती तंत्रज्ञानाची पायाभरणी होती. आज माहिती तंत्रज्ञानाने संपूर्ण जगावर मोहिनी घातली आहे. कोणतेही क्षेत्र घ्या. माहिती तंत्रज्ञान वगळल्यास त्यातील जीवनदायी तत्त्वच नष्ट होऊन जाईल. आर्थिक, उद्योग, कृषी, शिक्षण, राजकारण, व्यापार, उद्योग अशा प्रत्येक क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान हा आत्माच मानला जातो.

    social-media-marketing-for-business-growth

    निवडणुका जिंकण्यासाठी, राजकीय कारभार सुरळीत चालवण्यासाठी, बँकिंग व्यवहारासाठी, प्रवासासाठी रस्ते शोधताना, घरपोच वस्तू व सेवा प्राप्त करण्यासाठी व अगदी काहीही करण्यासाठी आयटी क्षेत्राला महत्त्व प्राप्त झाले आहे.

    जगभरातील करोडो तरुण Social Media वर उपलब्ध आहेत. त्यांच्यापर्यंत आपला उद्योग पोहोचवणे सर्वात कमी किमतीत व कमी वेळेत सहजसाध्य झाले आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, गुगल प्लस, हाईक, टेलिग्राम असे अगणित मोबाईल ॲप्स सर्वांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेली पाहायला मिळतात. तुमच्या आमच्या सर्वाच्या मोबाईलमध्ये या social media उपकरणांचा समावेश हमखास असतो. जो कोणी समाज माध्यमाचा वापर करत नाही त्याला खचितच काही कळत नाही असा समज इतर लोकांचा होऊ शकतो.

    social-media-marketing-for-business-growth

    दिवसेंदिवस स्वस्त होणारे नेटपॅक खिशाला परवडत असल्याने तरुणाई मोबाईलची बॅटरी संपेपर्यंत मोबाईल हातातून सोडत नाही. अवघे जग आभासी जगाला (Virtual World) वास्तव मानू लागले आहे. दिवसभरातला अधिकाधिक वेळ मोबाईलवर व्यस्त असलेल्या व्यक्ती सर्व काही गुगलला विचारतात. आजकाल रस्ता विचारावा लागत नाही. वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात जावे लागत नाही. पैशाचे व्यवहार करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. मोबाईल व टीव्हीचे रिचार्ज घरबसल्या होऊ लागले. कुठेही जाताना खिशात रोख मोठ्या प्रमाणावर ठेवण्याची पध्दत आता इतिहासजमा झाली आहे. प्रियजनांना वाढदिवस व इतर प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी आठवण करुन देणारे सहाय्यक (Reminder) तर साध्या मोबाईलमध्ये सुध्दा उपलब्ध आहेत. नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करता येतात. Video conferencing च्या माध्यमातून घरबसल्या मुलाखती देता येऊ लागल्या आहेत. परिक्षा व कितीतरी प्रशिक्षण क्रम घरबसल्या व्यक्ती शिकू लागला आहे. कर्जापासून अगदी आरोग्याचा सल्ला गुगल देऊ लागले आहे. स्वयंपाकघरातून बेडरुममध्ये व्हॉट्सॲपद्वारे संभाषण केले जाऊ लागले आहे. विनाचालक कार लवकरच बाजारात येतील. तुमचा पगार व इतर देणी-घेणी थेट तुमच्या खात्यात जमा होत आहेत. अशी न संपणारी उदाहरणांची यादी आहे. या सगळ्या गोष्टी आपले जीवन सुलभ व सोपे करण्यासाठी खूप सोयीस्कर झाल्या आहेत. ग्राहक म्हणून विचार केल्यास फायदेशीर ठरतातच.

    social-media-marketing-for-business-growth

    जेव्हा आपण व्यावसायिक म्हणून किंवा उद्योजक म्हणून विचार करतो तेव्हा आपल्या दृष्टीने सोयीस्कर झालेल्या काही गोष्टींची यादी पाहू या. ज्याप्रमाणे ग्राहक घरबसल्या ऑर्डर देऊ लागला आहे, त्याप्रमाणे आपल्याला ग्राहकांकडून त्या ऑर्डरचे पैसे थेट खात्यात जमा होण्याची प्रक्रिया निर्माण झाली आहे. दुकानात येऊन ग्राहक वस्तूंची निवड करताना दाखवावे लागणाऱ्या varieties नुसार होणारा पसारा होत नाही. त्याशिवाय वेळ वाचतो तसेच ग्राहकाची मानसिकता जाणून घेण्याची गरज उरत नाही. ग्राहक स्वतःच्या आवडी निवडी, पाहिजे तेवढ्या varieties, त्याच्या गरजेनुसार व आर्थिक क्षमतेनुसार ऑर्डर करतो त्यामुळे ग्राहकाला झेलायची वेळ विक्रेत्यावर येत नाही. दरामध्ये घासाघीस करावी लागत नाही. आपल्याला परवडणारी सूट (Discount) देऊन ग्राहकाला आकर्षित करता येते. जगभरातल्या कोणत्याही ठिकाणाहून आपल्याला ग्राहक मिळू शकतात. वेगवेगळ्या परवानग्या काढण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत नाहीत. कंपनी नोंदणी (Company Registration) पासून कर भरणा (Tax Filing) करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी स्वतःहून बसल्या ठिकाणी करु शकतो. व्हर्च्युअल ऑफिसच्या माध्यमातून व्यवसायाच्या कक्षा रुंदावतात. २४ * ७ म्हणजे आठवड्याचे सातही दिवस दररोज २४ तास आपला व्यवसाय आपल्या प्रत्यक्ष सहभागाविना चालू राहतो. तुम्ही झोपलेले असताना, जेवताना, चहा पिताना, गप्पा मारताना, व्यायाम करताना तसेच अगदी सहलीला गेल्यावर सुध्दा व्यवसाय चालूच राहतो. असे कितीतरी चमत्कार होत असतात.

    social-media-marketing-for-business-growth

    मात्र हे सगळं एवढं सोपं असूनही आपल्याला हे सर्व कसं साध्य करुन घेता येईल. आपल्या व्यवसायाची वेबसाईट असावी. त्या वेबसाईटला ऑनलाईन पध्दतीने ग्राहकांकडून पैसे येण्यासाठी पेमेंट गेटवे जोडलेला असावा. ग्राहकाला ऑर्डर करण्याची व्यवस्था असावी. व्यवसायाचे फेसबुक पेज असावे. सर्च इंजिन ऑप्टीमायझेशनच्या माध्यमातून आपली वेबसाईट गुगल शोधात पहिल्या क्रमांकावर कशी आणायची? बल्क मेसेज व बल्क Email काय आहे? त्याचा उपयोग करायचा कसा? फेसबुक पेज कसे तयार करावे? त्याचा प्रसार, प्रचार व प्रसिध्दी कशी करावी? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे साध्या भाषेत जाणून घेण्यासाठी एक महिनाभर आपण दररोज सकाळी दहा वाजता एक विषय घेऊन भेटू या.

  • हट्टापायी शिक्षण सोडले अन् उभारली हजारो कोटींची कंपनी, मायकल डेल यांचा प्रेरणादायी प्रवास

    हट्टापायी शिक्षण सोडले अन् उभारली हजारो कोटींची कंपनी, मायकल डेल यांचा प्रेरणादायी प्रवास

    जन्म आणि कुटुंब

    मायकल डेल (Michael Dell) यांचा जन्म २३ फेब्रुवारी, १९६५ रोजी अमेरिकेच्या ह्यूस्टन शहरात झाला आहे. त्यांचे वडील अलेक्झांडर डेल, दातांचे डॉक्टर होते. तसेच, आई लंगफान या एक स्टॉक ब्रोकर होत्या. मायकल यांच्या घरची परिस्थिती चांगली होती. आई-वडील दोघेही कमावते होते. त्यामुळे घरात पैशांची कसलीच कमतरता नव्हती. दुसरीकडे, मायकल हे बालपणापासूनच अभ्यासात हुशार होते. ते बालपणी इतर मुलांसारखे अजिबातच नव्हते. ते त्यांच्या जास्तीत जास्त वेळ काही ना काही शिकण्यात घालवत होते. मायकल यांचे प्राथमिक शिक्षण ह्यूस्टन शहरातील ‘हीरोड एलिमेंटरी स्कूल’मध्ये झाले होते. शिकत असतानाच मायकल यांनी आई-वडिलांकडून गुंतवणूक आणि व्यापाराचे सर्व गुण शिकून घेतले होते. बालपणापासूनच हे सर्व गुण शिकल्यानंतर मायकल यांचा व्यवसायाबद्दलचा रस आणखीच वाढला होता. त्यांनी मोठी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. विशेष म्हणजे, जेव्हा ते १० वर्षांचे होते, तेव्हा त्यांना त्यांच्या आई-वडिलांकडून पॉकेट मनी मिळायची. हेच पैसे ते साठवू लागले होते.

    how-michael-dell-built-billion-dollar-empire-college-dropout

    बालपणीपासून मायकल यांच्यात पैसे साठवण्याची धडपड असायची. त्यामुळेच त्यांनी पैसे जमा करण्यासाठी शहरात टपाल तिकिटांची विक्री सुरू केली होती. हे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल की, पैसे साठवण्याच्या चांगल्या सवयीमुळे त्यांनी अवघ्या १२ वर्षांच्या वयात २०००हून अधिक डॉलर्स साठवले होते.

    यशाचे पहिले पाऊल

    बालपणीपासून एक चांगला धडा घेतल्यामुळे मायकल डेल यांनी त्यांच्याजवळची संपूर्ण रक्कम मेटल्समध्ये गुंतवली. आयुष्यातील आपल्या पहिल्याच गुंतवणूकीतून मायकल यांना १८००० डॉलरचा फायदा झाला. तसेच, त्यांचे मनोबलही खूप वाढले. मायकल यांना इतक्या कमी वयात झालेला फायदा हा त्यांच्या वडिलांच्या वर्षभराच्या कमाईपेक्षाही कित्येक पटींनी जास्त होता. मायकल लहान वयातच यशाच्या त्या टप्प्यावर होते, जिथे अनेक व्यावसायिकही पोहोचू शकत नाहीत. मायकलचा काम करण्याबद्दलचा रस पाहून त्याच्या वडिलांनी त्याचे स्वप्न साकार करण्याचा विडा उचलला.

    बालपणीपासूनच तांत्रिक क्षेत्रात रस

    प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रस असतो. तसंच काहीसं मायकल यांच्याविषयीही होतं. मायकल यांना बालपणीपासूनच तांत्रिक क्षेत्रात खूपच रस होता. यामुळेच त्यांच्या वडिलांनी त्यांना वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी एक कम्प्यूटर खरेदी करून दिला. मात्र, मायकल यांनी कम्प्यूटर बाहेरून शिकण्याऐवजी त्याच्या आतमधील भागांविषयी शिकण्यास सुरुवात केली. त्यांनी त्या कम्प्यूटरचा एक-एक भाग वेगळा केला आणि आता त्यांना कम्प्यूटरचा प्रत्येक भाग व्यवस्थित दिसत होता.

    याच घटनेनंतर मायकल यांचे कम्प्यूटरविषयीचा रस आणखी वाढला आणि त्यांनी आपला अधिकतर वेळ कम्प्यूटरवर घालवण्यास सुरुवात केली. नेहमीप्रमाणे कम्प्यूटरचा प्रत्येक भाग चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी त्यांनी दुसऱ्या एका कंपनीचा कम्प्यूटर खरेदी केला. इथंही मायकल यांनी दुसऱ्या कम्प्यूटरसोबत तेच केले, जे आधीच्या कम्प्यूटरसोबत केले होते. नंतर त्यांनी त्या कम्प्यूटरचे सर्व भाग योग्यरीत्या कम्प्यूटरमध्ये लावले आणि पुन्हा त्या कम्प्यूटरला पहिल्यासारखे बनवले, जे खूपच चकित करणारे होते.

    how-michael-dell-built-billion-dollar-empire-college-dropout

    कॉलेजमध्ये जुन्या पार्ट्सपासून बनवला कम्प्यूटर

    मायकल डेल जेव्हा कॉलेजमध्ये होते, तेव्हा त्यांनी एकदा कम्प्यूटरशी संबंधित हार्डवेअर आणि त्याचे पार्ट्स एकत्र करून आपला स्वत:चा एक कम्प्यूटर बनवला. त्यांनी तयार केलेला कम्प्यूटर आपल्याच कॉलेजमधील मित्राला विकला आणि त्यातून त्यांना काही पैसे मिळाले. आता पैशांचे आकर्षण मायकल डेल यांना बालपणीपासूनच होते. आता मायकल आणि कम्प्यूटर हे एक समीकरण बनले होते. ते आणखी कम्प्यूटर बनवू लागले. ते जे कोणते कम्प्यूटर बनवायचे, ते लोकांची सुविधा लक्षात ठेवून बनवत होते. यामुळे लोकांना त्यांनी बनवलेले कम्प्यूटर खूपच आवडू लागले होते.

    कॉलेजला रामराम अन् स्वत:ची कंपनी

    एका अहवालानुसार, १९८४मध्ये मायकल डेल यांनी १ हजार डॉलरमधून कम्प्यूटरचा व्यवसाय सुरू केला होता. हा व्यवसाय करण्यासाठी त्यांनी आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला. त्यांनी व्यवसायात प्रवेश करण्यासाठी मेडिकल कॉलेजला रामराम ठोकला. त्यांनी आपल्या कंपनीला पीसीज लिमिटेड (PC’s Limited) या नावाने रजिस्टर केले. सुरुवातीला त्यांनी हॉस्टेलच्या एका रूममध्ये कम्प्यूटर असेम्बल करण्यास सुरुवात केली आणि त्यांना यातून यशही मिळाले. १९८५मध्ये त्यांनी आपल्या कंपनीचा पहिला टर्बो पीसी बनवला, ज्याचे डिझाईन मायकल यांनीच केले होते. हे कम्प्यूटर विकण्यासाठी त्यांनी जाहिराती आणि मेल-ऑर्डर कॅटलॉग या माध्यमाची निवड केली. मायकल यांच्या सर्व पॉलिसी मार्केट आणि ग्राहक, या दोघांसाठी योग्य होती, ज्यामुळे कंपनी दिवसेंदिवस प्रगती करू लागली. यानंतर १९८८ मध्ये कंपनीचे नाव पीसीज लिमिटेड बदलून डेल कम्प्यूटर कॉर्पोरेशन (Dell Computer Corporation) असे ठेवले.

    how-michael-dell-built-billion-dollar-empire-college-dropout

    विशेष म्हणजे, पुढच्याच वर्षी म्हणजे १९८९मध्ये मायकल यांनी संसार थाटला. त्यांनी सुझेन डेल यांच्यासोबत लग्न केले. या दोघांनी ३ मुली आणि १ मुलगा अशी ४ अपत्य आहेत. मुलींची नावे, अलेक्सा, ज्युलिएट आणि किरा आहे. तसेच, मुलाचे नाव झॅकरी डेल असे आहे.

    हळूहळू मायकल यांनी बनवलेल्या कंपनीचे नाव प्रत्येक व्यक्तीच्या तोंडावर येऊ लागले, जे मायकल यांच्यासाठी मोठ्या यशाचे संकेत होते. मायकल यांची डेल कंपनी त्यावेळी सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि कमी किंमतीत लोकांना कम्प्यूटर उपलब्ध करून देऊ लागली. एवढंच नाही, तर मायकल यांची कंपनी जगभरात यशस्वी झाली. विशेष म्हणजे, अवघ्या २७व्या वर्षी मायकल हे सर्वात कमी वयातील CEO बनले. त्यांची कंपनी जगातील प्रसिद्ध 500 कंपन्यांमध्येही सामील झाली. मायकल यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे त्यांची कंपनी आज जगातील सर्वात मोठी टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांपैकी एक आहे.

    आज घडीला मायकल डेल हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १७व्या स्थानी आहेत. रिपोर्टनुसार, डिसेंबर २०२३मध्ये त्यांची एकूण संपत्ती ही ७२.८ बिलियन डॉलर्स इतकी होती. यावरून एक गोष्ट सिद्ध होते मित्रांनो, जर तुम्ही तुमचं पॅशन फॉलो करत आयुष्यात पुढे जात राहिलात, तर एक दिवस तुम्हाला यश नक्कीच मिळेल.

    आणखी वाचा

  • अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता याबद्दल जागरूकता निर्माण करणारे संत गाडगे महाराज यांची आज जयंती. विनम्र अभिवादन!

    अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता याबद्दल जागरूकता निर्माण करणारे संत गाडगे महाराज यांची आज जयंती. विनम्र अभिवादन!

    त्यांचे खरे सामर्थ्य कीर्तनात होते. वास्तविक संत गाडगेबाबा अडाणी होते, शिकलेले नव्हते. त्यांना आपली स्वाक्षरीसुद्धा करता येत नव्हती. पण त्यांच्या जिभेवर मात्र तुकोबांचे अभंग नाचत असत. त्यांचा वेशही साधाच होता. अंगावर फाटक्या चिंध्या, एका हातात खराटा आणि दुसर्‍या हातात मडक्याचे फुटके खापर घेऊन संत गाडगेबाबा गावोगावी कीर्तन करत फिरत असत.

    ते ज्या गावात जात त्या गावातले रस्ते पहिल्यांदा खराट्याने साफ करत आणि रात्रीच्या वेळेला कीर्तनातून लोकांच्या डोक्यातील घाण साफ करत. एरवी कोणाशी न बोलणारे बाबा कीर्तनासाठी उभे राहिले की; शब्दांचा, साहित्याचा सद्विचारांचा असा काही मारा करत की; ऐकणारा मंत्रमुग्ध होत असे. मुखाने देवाचे नाव घेत गावोगाव बाबा फिरत, दिसेल त्या गावातील रस्ते, गटारे, देवालये, नद्यांचे घाट कोणाशीही न बोलताच ते स्वच्छ करू लागत. तसे करताना त्यांना पाहिल की , गावातील इतर माणसे आपापली कुदळ, फावडी, टोपल्या, खराटे घेऊन बाबांच्या मदतीला येत असत.

    संत गाडगेबाबांनी जाणले होते की, समाजातील लोक अज्ञानी, अंधश्रद्धाळू आहेत. त्यांना दगडात परमेश्वर दिसतो, परंतु माणसातला देव दिसत नाही. भूत, भानामती, करणी, जादूटोणा यावर लोकांचा दाट विश्वास आहे. समाजात अनेक अंधश्रद्धा आहेत. भयाण दारिद्र्याची कारणे केवळ व्यसन व रोगराई नसून निरक्षरता, अंधश्रद्धा हीच आहेत. म्हणून रोग, गरिबी, अंधश्रद्धा यांच्याविरुद्ध गाडगेबाबा जन्मभर लढले. व्यसन संपले की गरिबी संपणार, व्यसन संपले की रोगराई संपणार म्हणून प्राण्यांची हत्या करू नका, कर्ज काढू नका, भोंदू गुरूकडून मंत्र घेऊ नका, हाच मंत्र गाडगेबाबांनी दिला.

    संत गाडगेबाबांनी आपले सारे आयुष्य समाजासाठी खर्ची घातले. त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धर्मशाळा, गोरक्षण संस्था व शाळा- कॉलेजेस काधली. त्यांच्याजवळ पोथी नव्ह्ती. पूजा-अर्चा करा, असा उपदेश नव्हता. त्यांचे कीर्तन दु:खितांसाठी व अज्ञानासाठी होते. परखड कीर्तनातून सार्‍या महाराष्ट्राला उपदेश केला. अनेक धर्मशाळा बांधून यात्रेकरूंसाठी सोय त्यांनी केली. दु:ख , दारिद्र्य व अज्ञान दिसताच तिथे ते धावून जात. त्यांनी देशाला व समाजाला स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. ‘ गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाने ते लोकांना मंत्रमुग्ध करत.

    संत गाडगेबाबा म्हणजे एक क्रांतिसूर्य होय. माणसाने माणसाला कमी लेखावे यासारखा अधर्म नाही. ब्राम्हणापासून महारापर्यंत सगळी माणसे एकच आहेत. ‘ कोंबडे- बकर्‍या खाणारा देव नसून सैतानच आहे’ हे बाबांचे मत. गाडगेबाबा म्हणजे मानवतावादी स्वाभिमान शिकवणारे अदभूत संत! भोळ्याभाबड्या लोकांच्या मनातून अंधश्रद्धा दूर करण्याचे महत्त्वाचे कार्यही त्यांनी केले ते म्हणतात,’ देव देवळात नाही, दगडात नाही. माणसात आहे.’ पन्नास वर्षे गाडगेबाबांनी लोकांना आवर्जून सांगितले की, बाबांनो, दगडधोंड्यांची पूजा करून काहीही मिळणार नाही. माणसांची पूजा करा. मानवतेची पूजा करा.

    बाबांचे कीर्तन अशिक्षितांसाठी होते. तसेच तथाकथित सुशिक्षितांसाठीही होते, दु:खितांसाठी होते. त्यात योग नव्हता, अध्यात्मवाद नव्हता, पोथी नव्हती, पुराण नव्हते, देवांची वर्णने नव्हती, त्यात पूजा-अर्चा यांचा उपदेश नव्हता. त्यात शुद्ध जीवन होते. हजारो वर्षे समाजाच्या आर्थिक सत्तेखाली आणि धार्मिक रुढीखाली भरडून निघालेल्या दूधखुळ्या, भोळ्या आणि हीन-दीन समाजांच्या उद्धाराचा धगधगीत प्रकाशझोत म्हणजेच गाडगेबाबांचे कीर्तन.

    माणसामधल्या परमेश्वराची पूजा करणार्‍या या संताने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात एक प्रचंड सामर्थ्य निर्माण केले. अविश्रांत कीर्तने , धावपळ यामुळे त्यांच्या मजबूत देहावर दगदगीचा परिणाम होऊ लागला. काही अनुयायांच्या काही विचित्र वर्तनांची त्यांच्या मनावर तीव्र परिणाम झाला. मधुमेहाच्या आजारानेही त्यांना जर्जर केले. बाबांनी शेवटी शेवटी अन्नही वर्ज्य करून आमटीचे पाणी व भाजी यावरच आपला निर्वाह चालवू लागले.

    बाबा म्हणजे माणसात देव पाहणारा मानवतापूजक संतश्रेष्ठ. अमरावती येथे गाडगेबाबांच्या जन्मशताब्दी समारोहात मदर तेरेसा म्हणाल्या, ‘ परमेश्वराने संत गाडगेबाबांसारख्या व्यक्ती निर्माण करून मानवतेवर अनंत उपकार केले आहेत.’ मात्र मानवतावादी गाडगेबाबांकडे आणि त्यांच्या परखड तत्त्वज्ञानाकडे म्हणावे तसे देशाने, त्यांच्या अनुयायांनी , लोकांनी आणि इतिहासानेही लक्ष दिल्याचे दिसत नाही. अशा या मानवतावादी युगप्रवर्तक संताबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,’ ते खरे संत आहेत. इतर बुवांपेक्षा गाडगेबाबांसारखे संत आपल्या देशात अधिक झाले पाहिजेत. त्यांना तुमच्या धनाची, मानाची पर्वा नाही. त्यांना समाजपरिवर्तनाचा विचार श्रेष्ठ वाटतो, तेच खरे मानवतादी संत आहेत.’

    रंजल्या-गांजल्यांना ‘आपुले’ म्हणणारा आणि अनाथ -अपंगांना हृदयाशी धरणारा तो खरा साधू ही तुकोबांची व्याख्या गाडगेबाबांना तंतोतंत लागू पडते. बाबांनी आपल्या उपदेशात म्हटले की, ‘ बाबांनो, दया हा जगातल सर्वात मोठा धर्म आहे.’

    कबीर कहे कमालकू सबसे बडी दया |

    तीर्थ जावो, काशी जावो, चाहे जावो गया ||

    अशा या महामानव युगप्रवर्तकाची प्राणज्योत २० डिसेंबर १९५६ रोजीच्या रात्री मावळली.

    — मच्छिंद्र ऐनापुरे

    आणखी वाचा

  • सोशल मीडिया फॉर बिझनेस ग्रोथ

    सोशल मीडिया फॉर बिझनेस ग्रोथ

    डिजिटल मार्केटिंगच्या विश्वात

    सोशल मीडिया, वेबसाईट, डिजिटल प्रोग्रॅमिंग हे रोजच्या जीवनाचे भाग बनले आहेत. अशा काळात प्रत्येक उद्योजकाच्या पोटात भीतीचा गोळा आणणारी गोष्ट म्हणजे ज्याला डिजीटल जगाशी जोडता येणार नाही त्या उद्योजकाचा व्यवसाय कालबाह्य ठरणार आहे. पानपट्टी, टॅक्सी, रिक्षा, किराणा दुकाने सुध्दा ऑनलाईन व्हायला लागली आहेत.

    डिजीटल उपकरणांमुळे जग एकदम जवळ आले. त्यात प्रचंड बदल झाले. या आभासी जगाशी आपल्याला जुळवून घेण्यासाठी तयार राहणे गरजेचे आहे. या नव्या डिजीटल जगात हौस – नवसे – गवसे यांची संख्या सुध्दा प्रचंड प्रमाणात वाढली आहे. म्हणून आपला व्यवसाय डिजीटल करण्याआधी आपल्याला डिजीटल मार्केटिंगची पायाभूत माहिती असणे गरजेचे आहे. आपण जर या क्षेत्राशी संपूर्णपणे अनभिज्ञ असू तर भरल्या बाजारात आपल्याला ठगवणाऱ्यांची संख्या कमी नाही. तेव्हा जाणकार बनण्यासाठी आपल्याला डिजीटल मार्केटिंग कळणे, त्याच्या सेवा कुणाकडून घ्यायच्या कोणावर विश्वास ठेवायचा हे शिकणे सुध्दा गरजेचे आहे.

    गेल्या पाच वर्षात जेवढे बदल आपण पाहिलेले आहेत. तेवढे बदल संपूर्ण मानवजातीच्या इतिहासात घडून आलेले नाहीत. गेल्या काही वर्षात आपल्याला वस्तू खरेदी करण्यासाठी किराणा दुकान, सुपर मार्केट व मॉलमध्ये जाणे भाग होते. आता मात्र घरबसल्या फ्लिककार्ट, स्नॅपडील सारख्या कंपन्यांना हव्या त्या वस्तूची ऑर्डर द्या. दुसऱ्या दिवशी ती वस्तू आपल्या दारात येऊन उभी असते. त्याचे पैसेसुध्दा वस्तू हातात मिळाल्यावरच द्यायचे आहेत. पैशासाठी नोटा किंवा रोख रक्कमेचे निम्याहून अधिक व्यवहार इतिहासजमा झाले आहेत. मोबाईलचा रिचार्ज करणारी दुकाने बंद व्हायला लागली आहेत. कारण प्रत्येकजण आपल्या मोबाईल मधून रिचार्ज करु लागला आहे.

    सायबर कॅफेत बसण्यासाठी तरुणाई रांग लागलेली असायची त्या ठिकाणी आता सायबर कॅफे औषधाला सुध्दा सापडणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. डाटा सेवेवर पैसे कमावणाऱ्या टेलिकॉम कंपन्यामध्ये जास्तीत जास्त डाटा व इंटरनेट स्पीड देण्याची जणू काही स्पर्धाच चालू झालेली आहे. प्रत्येकाच्या हातात डिजीटल उपकरणे आलेली आहेत. ती कमालीची स्वस्त व खिशाला परवडणाऱ्या दरात तसेच मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. बातम्या वाचण्यासाठी वर्तमान पत्र किंवा टीव्ही वर अवलंबवून राहावे लागत नाही.

    अशा परिस्थितीत जगाची विभागणी एका न दिसणाऱ्या रेषेने दोन भागात झाली आहे. त्यातील पहिल्या भागाला वास्तव जग (Real World) म्हणतात. तर दुसऱ्या भागाला आभासी जग (Virtual World) म्हणतात. खऱ्याखुऱ्या जगात जगण्यासाठी या आभासी जगाचा आधार घेणे अपरिहार्य आहे. म्हणून या नव्या जगाशी जोडून राहण्यासाठी डिजीटल मार्केटिंगची माहिती व त्याचा वापर करुन आपला व्यवसाय वाढवणे ही प्रत्येक लहान मोठ्या उद्योजकाची गरज बनली आहे. तेव्हा आपण या डिजीटल दुनियेत प्रवेश करण्यासाठी तयार होऊया.

  • स्टीव्ह जॉब्सचे प्रचंड गाजलेले प्रेरणादायी भाषण मराठीत…!!

    स्टीव्ह जॉब्सचे प्रचंड गाजलेले प्रेरणादायी भाषण मराठीत…!!

    जगातल्या सर्वोत्तम गणल्या जाणाऱ्या महाविद्यालयांपैकी एक अशा महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात तुमच्यासोबत बोलायची संधी मला मिळते आहे, हा मी माझा बहुमान समजतो. मी महाविद्यालयीन शिक्षण कधीच पूर्ण करू शकलो नाही. आता सत्य सांगायला हरकत नाही, पण महाविद्यालयीन दीक्षांत समारंभ इतक्या जवळून मी पहिल्यांदा पाहतो आहे.

    steve-jobs-inspirational-speech-marathi-2

    आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील तीन गोष्टी सांगणार आहे, बस्स. काही प्रचंड कहाणी नाही. फक्त तीन छोट्या गोष्टी…

    पहिली गोष्ट आहे ठिपके जुळवण्याच्या संदर्भातली… मी रीड कॉलेजमधून सहा महिन्यांतच बाहेर पडलो होतो, पण त्या आधी मी जवळपास १८ महिने कॉलेजमध्येच ड्रॉप इन म्हणून घुटमळत होतो. मग मी बाहेर पडलो तरी का? 

    याची सुरुवात खरं तर माझ्या जन्माच्या आधीपासूनची आहे. माझी आई ही एक तरुण, अविवाहित महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती. आणि तिने मला दत्तक द्यायचे ठरवले. तिची फार इच्छा की, मी पदवीधर पालकांकडे दत्तक म्हणून जावे, त्यामुळे अखेर एका वकील दाम्पत्याची त्याकरिता निवड झाली. सारे कसे सुरळीत चालू होते आणि अचानक माझ्या जन्माच्या वेळी त्या दोघांनी ठरवले की त्यांना मुलगी हवी आहे. त्यामुळे वेटिंग लिस्टवर असलेल्या माझ्या आई-बाबांना रात्री अचानक फोन गेला की, ‘‘मुलगा झालाय. तुमची अजूनही त्याला स्वीकारण्याची तयारी आहे का?’’ ते म्हणाले, ‘‘अर्थातच.’’ अर्थात, नंतर माझ्या आईला कळले की माझ्या दत्तक आईने पदवी पूर्ण केली नव्हती आणि वडिलांनी तर शाळेच्या पुढेही मजल मारली नव्हती. तिने मग दत्तक कागदपत्रे साईन करायला नकार दिला. मग मला ‘महाविद्यालयीन शिक्षणापासून दूर ठेवले जाणार नाही’ या आश्वासनावरच तिने कागदांवर सह्या केल्या.

    १७ वर्षांनंतर मी खरंच कॉलेजला गेलो. मूर्खासारखे मी स्टॅन्फोर्डसारखे महागडे कॉलेज निवडले आणि माझ्या दत्तक पालकांची मध्यमवर्गीय कमाई माझ्या शिक्षणावरच खर्च होऊ लागली. सहा महिन्यांतच त्याची किंमत मला उमगेनाशी झाली. माझ्या आयुष्यात मला काय करायचे आहे याची सुतराम कल्पना नव्हती आणि कॉलेजचे शिक्षण मला याचे उत्तर शोधण्यात मदत करत नव्हते आणि मी इथे आईबाबांची आयुष्यभराची कमाई उडवण्यात गुंतलो होतो. म्हणून मी कॉलेजमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि सुस्कारा सोडला. अर्थात, त्या वेळी हा छातीत धडकी भरवणारा निर्णय होता. पण आता वाटते की कदाचित हा माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला निर्णय असेल. हा निर्णय पक्का झाल्याक्षणीच मी ज्या वर्गाबाबतीत उत्साही नव्हतो, तिथे जाणे बंद करून टाकले आणि ज्या वर्गामध्ये मला जाण्यात रस होता त्या वर्गाना नियमितपणे जाऊ लागलो.

    Young-steve-jobs

    हे सगळेच काही स्वप्नवत नव्हते. डोर्म मिळायची नाही, म्हणून मित्रांच्या रूम्सवर जमिनीवर झोपावे लागे. कोकच्या रिकाम्या बाटल्या देऊन मी ५ सेंट्स जमा करत असे आणि त्यातून जेवणाची तजवीज करत असे. दर रविवारी ७ मैल चालत जात असे, ‘हरे राम हरे कृष्ण’चे व्यवस्थित जेवण खायला मिळावे म्हणून. पण मला ते आवडत होते. माझी अंत:प्रेरणा आणि माझे कुतूहल यांनी मला जे काही सापडले, ते पुढे आयुष्यात अनमोल ठरले. आता हेच पाहा ना, रीड कॉलेजमध्ये त्यावेळेला बहुधा सर्वोत्तम असे कॅलिग्राफीचे (सुलेखन) वर्ग चालत. संपूर्ण परिसरात प्रत्येक भित्तीपत्रकावर, इतकेच काय अगदी खणांवरदेखील सुंदर कॅलिग्राफी केलेली आढळे. मी तसाही ड्रॉप आऊट होतो आणि मला हे कसे करतात हे जाणून घ्यायचे होते, त्यातच मला माझे नियमित वर्ग करणे जरूरीचे राहिले नव्हते. कॅलिग्राफीच्या वर्गात मी सेरिफ आणि सान्स सेरिफ फॉण्ट्सविषयी शिकलो. त्याच्याच बरोबर दोन अक्षरांमध्ये कीती जागा असावी, अक्षरे सुशोभित कशी करावी याचेही ज्ञान मिळत होते. ते सारेच फार सुंदर, ऐतिहासिक आणि कलात्मकरीत्या हळुवार होते. कदाचित शास्त्राच्या चिमटीत पकडण्यापलीकडले… मी त्याने भारावून गेलो…

    या सगळ्याचा माझ्या आयुष्यात दुरान्वयानेही काही प्रत्यक्ष लाभ होईल असं मला स्वप्नातही वाटलं नसतं. पण दहा वर्षांनंतर जेव्हा आम्ही पहिला मॅकीन्टोश कम्प्युटर बनवत होतो, हा सगळा काळ माझ्या मदतीला आला. आम्ही त्या सगळ्याचा वापर मॅकीन्टोशमध्ये केला. सुंदर टायपोग्राफी असलेला तो पहिला कम्प्युटर होता. जर मी महाविद्यालयातून त्या विषयांच्या जंजाळातून बाहेर पडलो नसतो, तर मॅकीन्टोशमध्ये विविध टाईप फेसेस आणि प्रमाणबद्ध फॉन्ट्स दिसले नसते आणि विंडोजवाल्यांनी जर मॅकीन्टोश जसाच्या तसा कॉपी केला नसता, तर आज जगातल्या कुठल्याच पीसीवर ते दिसले नसते. मी महाविद्यालयातून बाहेर पडलो नसतो, तर या कॅलिग्राफीच्या वर्गात कसा पोहोचलो असतो; आणि अर्थात, आज पीसीवर जे सुंदर टाइप फॉन्ट्स दिसतात ते कसे दिसले असते… ‘कनेक्ट द डॉट्स’ अर्थात हे ठिपके जोडणे… आज १० वर्षांनंतर मागे वळून बघताना सोप्पे जाते. तेव्हा हे कळत नव्हते.

    पुन्हा. हे ठिपके तुम्ही भविष्यात बघून नाही जोडू शकत. ते फक्त मागे वळून बघताना जोडलेले दिसतात. म्हणूनच ते पुढे जाऊन जोडले जातील, यावर विश्वास ठेवावा लागतो. तुम्हाला कशावर तरी विश्वास ठेवावाच लागतो. तुमचे मन, आतला आवाज, भाग्य, नशीब, कर्म. काहीतरी. या विचार पद्धतीने मला कधीच दगा दिलेला नाही आणि त्यामुळेच माझ्या आयुष्यात बराच बदल घडलेला आहे. 

    माझी दुसरी गोष्ट आहे प्रेम आणि तोट्याविषयी.

    मी फार नशीबवान आहे. मला काय करायला आवडते हे मला फार आधीच उमगले होते. मी २० वर्षांचा असतानाच मी आणि वोझने (स्टीव्ह वॉझनियाक) मिळून घरच्या गॅरेजमध्ये ॲपल कम्प्युटर्सची सुरुवात केली. आम्ही खूप मेहनत केली. दहा वर्षांत गॅरेजमधल्या आम्हा दोघांपासून सुरू झालेली ॲपल २ बिलियन डॉलर्स आणि ४००० कामगारांची कंपनी झाली होती. आम्ही वर्षभरापूर्वीच आमचे सर्वोत्तम काम बाजारात आणले होते. मॅकीन्टोश कम्प्युटर! मी तेव्हा फक्त ३० वर्षांचा होतो. आणि अचानक मी माझ्या कंपनीतून हाकलला गेलो. तुम्ही स्वत: स्थापन केलेल्या कंपनीतून तुम्ही स्वत: हाकलले कसे जाऊ शकता? खरं सांगायचं झालं तर जसं ॲपल वाढत होतं, त्याच्याबरोबर मला गुणी वाटणाऱ्या काही मंडळींना मी नोकरीवर ठेवले. काही वर्षे ठीक गेली, पण नंतर आमच्या दृष्टिकोनात फरक पडू लागले. अखेर भांडणे झालीच… बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी पण त्यांचीच पाठराखण केली. साहिजकच वयाच्या तिसाव्या वर्षी मी अक्षरश: हाकलला गेलो… आणि तेही अतिशय सार्वजनिक पद्धतीने… माझ्या आयुष्याचा जो केंद्रबिंदू होता, तोच गायब झाला. मी उद्ध्वस्त झालो.

    काही महिने नक्की काय करावे हेच सुचेना. मला जणू माझ्या आधीच्या कार्यकुशल उद्योजकांचा विश्वासघात केल्यासारखे वाटत राही. जणू आधी धावणाऱ्याने माझ्या हातात दिलेले निशाण मी पाडून बसलो होतो. मी डेव्हिड पेकार्ड, बोब नोईस यांना भेटलो. आणि अशा पद्धतीने घोळ घातल्याबद्दल त्यांची माफी मागितली. मी एक मोठे सार्वजनिक अपयश बनलो होतो आणि सिलिकॉन व्हॅलीतून पळून जाण्याचे विचार मनात घोळू लागले होते, पण हळूहळू एक गोष्ट जाणवायला लागली. माझे अजूनही माझ्या कामावर प्रेम होते… ॲपलमधल्या घटनांनी त्यात तीळभरही फरक पडला नव्हता. मला नाकारण्यात आले होते… पण माझे प्रेम संपले नव्हते.. म्हणूनच, मी पुन्हा सुरुवात करण्याचा निश्चय केला.

    तेव्हा तसे वाटले नसेल कदाचित, पण ॲपलमधून हाकलले जाणे ही माझ्या आयुष्यातली सर्वाधिक चांगली घटना ठरली. यशस्वी असण्याचे सगळे दडपण गळून पडले. त्याची जागा एखाद्या नवोदिताच्या खांद्यावर असलेल्या हलकेपणाने घेतली. कशाचीही खात्री नव्हती. याच स्थितीमुळे मी माझ्या आयुष्यातल्या सर्वाधिक सृजनात्मक कालखंडात प्रवेश केला.

    त्यानंतरच्या ५ वर्षांत मी ‘नेक्स्ट’ नावाची कंपनी स्थापन केली, ‘पिक्सार’ नावाची दुसरी कंपनीही उभारली आणि एका अशा भन्नाट स्त्रीच्या मी प्रेमात पडलो जिच्याशी मी लग्न केले. ‘पिक्सार’ने जगातली पहिली ॲनिमेटेड फिल्म ‘टॉय स्टोरी’ बनवली आणि आज ती जगातली पहिल्या क्रमांकाची ॲनिमेशन कंपनी आहे. गंमत म्हणजे, पुढे ‘नेक्स्ट’पण ‘ॲपल’ने विकत घेतली. आणि आम्ही ‘नेक्स्ट’मध्ये बनवलेले तंत्रज्ञान आज ‘ॲपल’च्या कामाला येते आहे. आणि ‘ॲपल’च्या यशाला ते कारणीभूत ठरते आहे.

    मला खात्री आहे की मी जर ‘ॲपल’मधून हाकलला गेलो नसतो, तर हे कधीच घडले नसते. औषधाची चव घेणे कठीण असते, पण रुग्णाला त्याचीच गरज असते. कधी आयुष्याने डोक्यात दगड घातलाच, तर निराश होऊ नका. मला खात्री आहे की जर माझे माझ्या कामावर प्रेम नसते, तर मी अशा पद्धतीने काम करत राहू शकलो नसतो. आपले प्रेम कशावर आहे याचा शोध घेत राहा. हे केवळ तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात जितके महत्त्वाचे आहे तितकेच ते तुमच्या कार्यक्षेत्रातही. तुमच्या आयुष्यातला एक मोठा भाग तुम्ही काम करण्यात व्यतीत करणार आहात, आणि उत्तम काम करण्याकरिता तुम्ही जे करताय त्यावर तुमचे प्रेम असणे आवश्यक आहे. जर ते तुम्हाला अजून सापडले नसेल, तर मग शोधात राहा. स्वत:ची समजूत घालून नका घेऊ. हृदयाच्या इतर गोष्टीप्रमाणेच जेव्हा तुम्हाला ते सापडेल, तेव्हा ते तुम्हाला आपोआप जाणवेल आणि एखाद्या सुंदर नात्याप्रमाणे वर्षे जशी सरकत जातील, तसतसा तुमचा त्यातला रस वाढतच राहील. म्हणून म्हणतो. शोधत राहा. स्वत:ची समजूत घालून नका घेऊ.

    माझी तिसरी गोष्ट मृत्यूविषयी आहे.

    मी १७ वर्षांचा होतो तेव्हा एक वाक्य वाचले होते. ‘जर तुम्ही रोज आपले आयुष्य आजचा दिवस शेवटचा असं समजून घालवलात, तर कमीत कमी एक दिवस तुमची समजूत खरी ठरेल.’ या वाक्याने माझ्यावर खूप परिणाम केला होता. तेव्हापासून जवळपास ३३ वर्षे मी रोज सकाळी उठतो आणि आरशात पाहून स्वत:ला विचारतो- ‘‘जर आज मला मरण यायचे असेल, तर आज जे मी करतो आहे तेच मला करायला आवडेल का?’ जर माझे उत्तर बरेच दिवस ‘नाही’ असेल, तर मला कळते की काहीतरी बदल करायची गरज आहे.

    मला लवकरात लवकर कधीही मृत्यू येऊ शकतो ही कल्पना मला माझ्या आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेताना खूप कामाला येते. कारण आपल्या बाह्य अपेक्षा, सारा अहंकार, लाज किंवा अपयशाची भीती हे सारं सारं मरणाच्या भीतीमध्ये नष्ट होतं. आणि जे महत्त्वाचं आहे, तेवढंच उरतं. तुम्ही मरणार आहात हे लक्षात ठेवणे म्हणजे तुम्ही काहीतरी गमावू शकता या भीतीपासून मुक्ती असं मी समजतो. तुम्ही आधीच इतके नागवे झालेले असता, की हृदयाचं सोडून दुसऱ्या कुणाचं ऐकण्याचं तुम्हाला कारणच राहत नाही.

    Steve Jobs' Cancer Treatment

    साधारण वर्षांपूर्वी मला कॅन्सर असल्याचे निदान झाले. सकाळी ७.३० वाजता माझा स्कॅन झाला आणि स्वादुपिंडापाशी मला भला मोठा ट्युमर असल्याचे स्पष्ट झाले. मला स्वादुपिंड शरीरात कुठे असते हेही ठाऊक नव्हते. डॉक्टर म्हणाले हा जवळपास असाध्य अशा स्वरूपाचा कॅन्सर आहे आणि मी काही सहा महिन्यांपेक्षा जास्त जगणार नाही. डॉक्टरने मला घरी जाऊन साऱ्या गोष्टींची आवराआवर करायला सांगितले, म्हणजे दुसऱ्या शब्दात तो मला मृत्यूसाठी तयार राहायला फर्मावत होता. याचाच दुसरा अर्थ म्हणजे पुढच्या दहा वर्षांत तुम्ही आपल्या मुलांना ज्या चार युक्तीच्या गोष्टी सांगणार होता, त्या सांगायला आता तुमच्याकडे फक्त सहा महिने आहेत. याचाच दुसरा अर्थ म्हणजे सगळी बटणं लावून तयार राहा. निरोप घ्यायची वेळ आलेली आहे. त्या निदानासोबत मी एक दिवस घालवला. त्या दिवशी संध्याकाळी माझी बायोप्सी झाली. त्यांनी माझ्या घशावाटे आणि पोटातून आतड्यात एन्डोस्कोप घुसवला, माझ्या स्वादुपिंडात सुई खुपसून त्यांनी तिथल्या पेशी काढल्या. मला अर्थात भूल दिली होती, पण माझी पत्नी म्हणाली की, जेव्हा डॉक्टर्सनी त्या पेशी सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्या, तेव्हा ते आनंदाने रडू लागले. माझा कॅन्सर अतिशय दुर्मिळ असला, तरी शस्त्रक्रियेने तो बरा करता येण्यासारखा होता. माझ्यावर शस्त्रक्रिया झाली आणि मी आता ठणठणीत बरा आहे.

    ही माझी मृत्यूशी झालेली सर्वात जवळची आणि बहुधा अजून दोन दशक तरी टिकेल अशी ओळख. आत्ता मी याविषयी एवढ्या अधिकारवाणीने बोलतो आहे, त्याचं कारण या एका उपयुक्त कल्पनेचं या अशा ओळखीत झालेलं रूपांतर.

    मरण कुणालाच नको असतं. अगदी ज्यांना स्वर्ग हवा असतो त्यांचीही त्याकरिता मरण्याची तयारी नसते. तरीही मरण हे आपल्या सगळ्यांना एकत्र करणारच आहे. कोणालाही ते चुकलेले नाही. आणि हे खरंच अगदी बरोबर आहे, कारण मरण हा जीवनाचा सर्वात छान शोध आहे. तो जीवनातल्या बदलाचा शिल्पकार आहे. तोच जुन्याला दूर करून नव्याची वाट मोकळी करतो. आज, कदाचित तुम्ही चर्चेत आहात, पण उद्या तुम्ही हळूहळू म्हातारे व्हाल आणि दूर सारले जाल. नाट्यमय वाटले, तरी हेच सत्य आहे.

    तुमच्याकडे अगदी मर्यादित वेळ आहे, म्हणूनच दुसऱ्या कोणाचं आयुष्य जगत तो फुकट घालवू नका. दुसऱ्यांच्या विचारावर आधारलेल्या निष्कर्षांचं जोखड आपल्या आयुष्यावर मिरवू नका. दुसऱ्यांच्या मतांच्या गलबल्यात आपला आतला आवाज दबून जाऊ नये याची काळजी घ्या. आणि सर्वात महत्त्वाचे, आपले हृदय आणि अंत:प्रेरणा यांचं ऐकायचं धाडस सदैव दाखवा. त्यांना जवळपास नेहमीच तुम्हाला काय बनायचे आहे, याची कल्पना असते. बाकी सगळे दुय्यम आहे.

    जेव्हा मी तरुण होतो त्या वेळी होल अर्थ कॅटलॉग नावाचे मासिक प्रसिद्ध होत असे- जणू आमच्या पिढीचे बायबलच. इथून जवळच मेन्लो पार्क इथे राहणारा स्टेवर्ट ब्रांड नावाचा इसम ते काढत असे आणि त्याने आपल्या कवीप्रवृत्तीने ते मासिक सजवले होते. ही गोष्ट १९६० ची, पर्सनल कम्प्युटर किंवा डेस्कटॉप पब्लिशिंगच्या खूप आधीची. साहजिकच, हे मासिक पूर्णपणे टाईपरायटर, कात्री आणि पॉलोराईड कॅमऱ्याने बनवले जाई. जणू पेपरबॅक फॉर्ममधले गुगल. आणि तेही गुगल येण्याच्या ३५ वर्षे आधी. खूप आदर्शवादी, नेटके आणि नव्या कल्पनांनी भारलेले.

    स्टेवर्ट आणि त्याचे सहकारी भरपूर वर्षे त्या मासिकाचे अंक काढत राहिले आणि जेव्हा त्याचा प्रवास संपला तेव्हा त्यांनी त्याचा शेवटचा अंक काढला. सत्तरीची मध्यान्ह चालू होती आणि मी तुमच्याच वयाचा होतो. त्या शेवटच्या अंकात शेवटच्या पृष्ठावर एक गर्द रानातल्या रस्त्याचे चित्र होते. त्याच्या खाली लिहिले होते. 

    भुकेलेले राहा… वेडे राहा… STAY HUNGRY, STAY FOOLISH

    (मूळ भाषणाची तारीख- १२ जून २००५)
    (शब्दांकन – अमोल कडू)
    १६ एप्रिल २०१० – लोकप्रभा

     

  • शिक्षण अर्धवट राहिलं, पण स्वप्नं पूर्ण केली! देशातील पहिला केबल टीव्ही चॅनेल सुरु करणाऱ्या सुभाष चंद्रांची कहाणी

    शिक्षण अर्धवट राहिलं, पण स्वप्नं पूर्ण केली! देशातील पहिला केबल टीव्ही चॅनेल सुरु करणाऱ्या सुभाष चंद्रांची कहाणी

    The Dropout Who Became a Billionaire: Subhash Chandra's Journey to Success

    हरियानाच्या आदमपूर शहरात, १९५० साली एक सर्वसाधारण व्यापारी कुटुंबात जन्म झाला सुभाष चंद्रा गोयल यांचा. लहानपणापासूनच कौटुंबिक दुकानात हातभार लावत कष्टाचे संस्कार व कौटुंबिक व्यावसायिकतेचे धडे घेतले. सुभाष चंद्रा अर्धवट शिक्षण घेऊन घराबाहेर पडले, तेच मुळी उराशी आणखी एक स्वप्न घेऊन. नोकरी करायची नाही तर काहीतरी उद्योग धंदाच करायचा. त्या दिशेने त्याने पावले टाकायला सुरुवात केली. ऐन तिशीत असताना ते एका पॅकेजिंगच्या औद्योगिक प्रदर्शनाला गेले. तेव्हाच त्यांच्या मनात आपणही पॅकेजिंग कंपनी सुरु करायची असा विचार आला. देशात त्याकाळी ॲल्युमिनिअम ट्यूबची चलती होती. पण भविष्यात ॲल्युमिनिअम नव्हे, तर लॅमीनेटेड ट्यूबची चलती असेल हे हेरून त्यांनी एस्सेल प्रोपॅक नावाने कंपनी सुरु केली. टूथपेस्ट, औषधे, सौंदर्य प्रसाधने, अन्न पदार्थ आणि दैनंदिन वापराच्या वस्तूसाठी आवश्यक अशा पॅकिंगची निर्मिती त्यांनी सुरु केली. आशियातील ती सर्वाधिक मोठी कंपनी तर आहेच, पण जगातली ती दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. 2019 मध्ये द ब्लॅकस्टोन ग्रुपने कर्जबाजारी एस्सेल ग्रुपच्या मालमत्ता विक्रीदरम्यान कंपनीचे अधिग्रहण केले होते आणि ऑक्टोबर २०२० मध्ये कंपनीचे नाव बदलून ईपीएल लिमिटेड असे करण्यात आले.

    The Dropout Who Became a Billionaire: Subhash Chandra's Journey to Success

    परदेशी पर्यटन करताना एका ॲम्युझमेंट पार्कमध्ये फिरताना त्यांना भारतात आशिया खंडातली सर्वात मोठी मनोरंजन नगरी उभारायची कल्पना सुचली आणि मुंबईजवळ त्यांनी ६४ एकर जागेवर १९८८ मध्ये एस्सेल वर्ल्ड उभे केले. नंतर जवळच वॉटर किंग्डमही उभारले. देशातील लाखो लोक त्यांच्या मनोरंजन नगरीला भेट देतात.

    एकदा ते मुंबईच्या दूरदर्शन केंद्रावर आपल्या मित्राला भेटायला गेला. त्या काळात दूरदर्शनवर केवळ संध्याकाळी काही रटाळ कार्यक्रम असायचे. तेव्हाच त्यांना २४ तास चालणारी वाहिनी काढायची कल्पना सुचली. तेव्हा सर्वच अनुभवी लोकांनी त्यांना वेड्यात काढले. कमावलेले सारे काही ते एका फटक्यात गमावणार असाच त्या क्षेत्रातील अनुभवी लोकांचा अंदाज होता, पण सुभाष चंद्रांना स्वतःवर विश्वास होता. त्या क्षेत्रातील कोणताही अनुभव गाठीशी नसताना त्यांनी २ ऑक्टोबर १९९२ रोजी झी टीव्ही हे देशातील पहिलं २४ तास चालणारं टीव्ही चॅनेल सुरु केलं. सुरुवातीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, तरीही सुभाष यांनी जिद्द आणि नावीन्यतेने झी टीव्हीला यशस्वी केले. मनोरंजनापासून बातम्यांपर्यंत विविध प्रकारचे कार्यक्रम, प्रादेशिक भाषांमधील वाहिन्या, तसेच आंतरराष्ट्रीय विस्तार यामुळे ‘झी’ लवकरच घराघरात पोहोचली. नंतर त्यांनी २४ तास बातम्या देणारी झी न्यूझ वाहिनी सुरु केली. आणि मग एकामागून एक प्रमुख भाषेतील वाहिन्या काढायचा सपाटाच लावला. सुभाष चंद्राना प्रचंड यश मिळालं. त्यांच्या त्या एका कल्पनेमुळे देशातील लाखो लोकांना रोजगार मिळाला.

    त्यानंतर सुभाष चंद्रांनी ‘प्ले विन’ लॉटरी नावाने ऑनलाइन लॉटरी सुरु केली. तिलाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. नंतर डिश टीवी, सिटी केबल, फन सिनेमा नावाने चित्रपटगृहंही सुरु केली. गोल्ड रिफायानिंग कंपनीही काढली. डीएनए नावाने इंग्रजी वृत्तपत्र सुरु केले. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातही मुसंडी मारली. हे सर्व व्यवसाय एस्सेल ग्रुपच्या नावाखाली एकत्र आणले. त्यांच्या नेतृत्वाखाली हा समूह भारतातील एक प्रमुख मीडिया घराणे बनले.

    The Dropout Who Became a Billionaire: Subhash Chandra's Journey to Success

    ज्या क्षेत्रात पहिले कोणीही नव्हते त्या क्षेत्रात नव्यानेउद्योग उभारून सुभाष चंद्रांनी जगासमोर एक अचंबित करणार आदर्श उभा केला. देशातील २१ राज्यातील ११ लाख गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी एकल विद्यालय फाउंडेशन स्थापना केलीय. दूरचित्रवाणी क्षेत्रात केलेल्या योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच इतर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांचे कार्य गौरवले गेले.

    2019 मध्ये कर्जफेडीच्या समस्येत अडकलेल्या झी एंटरटेनमेंटच्या दोन स्वतंत्र संचालकांनी एस्सेल ग्रुपच्या इतर कंपन्यांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने झी एंटरटेनमेंटच्या मुदत ठेवीचा वापर केल्याच्या आरोपाखाली सेबीने त्यांच्यावर कारवाई केली होती. आणि त्यांना संचालक मंडळातून बाहेर पडावे लागले.

    आणखी वाचा

  • औंढा नागनाथजवळ उभी राहतेय भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय वेधशाळा

    औंढा नागनाथजवळ उभी राहतेय भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय वेधशाळा

    या प्रकल्पाला १७ फेब्रुवारी २०१६ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने लायगो इंडिया प्रकल्पास तत्त्वत मंजुरी दिली होती. महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथजवळील दुघाळा परिसरातील जागा अधोरेखित करण्यात आली, तेथे फारशी झाडे नाहीत. सुमारे १७४ एकर जागा महाप्रकल्पासाठी अधिग्रहित करून प्रशासकीय इमारतही उभी राहिली. मात्र, सन २०२० मध्ये आलेल्या करोनामुळे प्रकल्पाची अंतिम मंजुरी लांबत गेली. अमेरिकेमध्ये दोन लायगो वेधशाळा यापुर्वीपासून गुरुत्वीय लहरींचा वेध घेत आहेत. त्यामुळे भारतात होणारी ही अमेरिकेबाहेरील पहिली व जगातील तिसरी वेधशाळा ठरणार आहे. सध्या केवळ अमेरिकेतील वॉशिंग्टन व लुईझियानामध्ये या प्रयोगशाळा आहेत.

    India's First International Observatory Stands Tall Near Aundha Nagnath

    लायगो वेधशाळेने २०१६ साली दोन मोठ्या कृष्णविवरांच्या टकरीतून निर्माण झालेल्या गुरूत्वीय लहरींचा पहिल्यांदाच शोध लावला होता. या संशोधनाला २०१७ सालचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले होते. जेव्हा ही वेधशाळा २०२५ मध्ये कार्यान्वित होईल. त्याचे व्यवस्थापन ‘आयुका’कडे असेल, असे पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्टॉनॉमी अ‍ॅन्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (आयुका)चे संचालक सोमक रायचौधरी यांनी सांगितले. भविष्यात वेध घेतल्या जाणाऱ्या गुरूत्वीय लहरींचे मुळ शोधण्यासाठी या नवीन अत्याधुनिक वेधशाळेची मदत होणार आहे. लहरींच्या संशोधनासाठी उच्च कौशल्याची गरज असते. त्यासाठी या क्षेत्रातील संशोधकांना उच्च स्तरीय प्रशिक्षण देता येणार आहे.

    दुघाळा परिसरामध्ये उभारली जाणारी ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रयोगशाळा सुमारे १७१ हेक्टर क्षेत्रावर उभारली जाणार आहे. यामध्ये १२१ हेक्टर जमीन वन विभागाची आहे. गुरुत्वीय लहरींचा अभ्यास या प्रयोगशाळेच्या माध्यमातून केला जाणार असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञ या ठिकाणी थांबणार आहेत. या प्रयोगात गांधीनगरची प्लाझ्मा संशोधन संस्था, पुण्यातील आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र व खगोलभौतिक केंद्र (आयुका), इंदोरचे राजा रामण्णा प्रगत तंत्रज्ञान केंद्र या संस्थांची भूमिका लायगो इंडिया प्रकल्पात महत्त्वाची ठरणार आहे. लायगो

    ११ फेब्रुवारी २०१६ रोजी भारतीय वेळेनुसार रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी लायगो (Laser Interfrometer Gravitaional Wave Observatroy)चे कार्यकारी संचालक प्रो. डेविड रिट्झ यांनी गुरुत्त्वीय लहरी सापडल्याची घोषणा केली आणि आइन्स्टाइन यांच्या व्यापक सापेक्षतावादाच्या सिद्धांताला अजून एकदा प्रबळ पुष्टी मिळाली. १९१६ साली आइन्स्टाइन यांनी या लहरी अस्तित्त्वात असाव्यात असे भाकीत त्यांच्या व्यापक सापेक्षतावादाच्या (General Relativiry) सिद्धांताच्या आधारे केले होते. त्याचा भक्कम पुरावा लायगो प्रकल्पामुळे मिळाला आहे. या गुरुत्त्वीय लहरी अतिसूक्ष्म व अतिक्षीण असल्याकारणाने त्यांचा शोध हा अतिशय अवघड, किचकट पण महत्त्वपूर्ण मुद्दा असतो. पण या क्षेत्रात गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ काम करणाऱ्या एलएससीच्या (LIGO scientific collaboration) एक हजारांहून अधिक सदस्यांनी एकत्र येऊन हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले. अभिमानास्पद बाब म्हणजे यामध्ये ६० हून अधिक भारतीयांचा सहभाग होता. गुरुत्वतरंग शोधण्याच्या प्रयत्नांना नव्वदच्या दशकात जेव्हा सुरुवात झाली तेव्हा त्यात अमेरिकेबरोबर इटली, ऑस्ट्रेलिया व अन्य काही देशांचाही सहभाग होता. संयुक्तरीत्या लायगो प्रकल्प राबविण्यात येणार होता. मात्र ऑस्ट्रेलियाने त्यातून माघार घेतली आणि भारताला आयती संधी मिळाली. भारतीय वैज्ञानिकांनीही त्या संधीचे सोनेच केले. या यशात पुण्यातील ‘आयुका’सह अनेक वैज्ञानिक संस्थांमधील वैज्ञानिकांचा मोठा वाटा आहे. आता भारतामध्येही लायगो उपकरण बसविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तेव्हा भारतीय वैज्ञानिकांना आधीच मिळालेल्या या अनुभवाचा फायदा त्यात नक्कीच होईल असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.

    India's First International Observatory Stands Tall Near Aundha Nagnath

    वॉशिंग्टन व लुईझियाना येथे असलेल्या लायगो प्रयोगशाळांमधून २०१५ मध्ये सप्टेंबर महिन्यात प्रथमच गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वाचा पुरावा शोधला गेला. त्यावेळी लायगोने पकडलेल्या गुरुत्वीय लहरी १.३ अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या दोन प्रचंड वस्तुमानाच्या कृष्णविवरांच्या विलयातून तयार झाल्या होत्या. त्यानंतर त्याच वर्षी तीन महिन्यांनी म्हणजे २६ डिसेंबरला गुरुत्वीय लहरींचा आणखी एक संदेश टिपण्यात लायगो प्रयोगशाळांना यश आले होते. दोन कृष्णविवरांच्या मिलनातून तयार झालेल्या या गुरुत्वीय लहरी होत्या. विशेष म्हणजे ही घटना १.४ अब्ज प्रकाशवर्षे दूरवर घडली होती. वॉशिंग्टन व लुईझियाना येथील प्रयोगशाळांचे एकमेकांपासूनचे अंतर ३००० कि.मी आहे. ही उपकरणे ६६० दशलक्ष प्रकाशवर्षे दूर असलेल्या कृष्णविवरांच्या मिलनातून तयार झालेल्या गुरुत्वीय लहरी शोधू शकतात.

  • भारतीय नारी, भल्याभल्यांवर भारी! भारताची ही ‘ट्रॅक्टर क्वीन’ आहे 23 हजार कोटींची मालकीण – मल्लिका श्रीनिवासन

    भारतीय नारी, भल्याभल्यांवर भारी! भारताची ही ‘ट्रॅक्टर क्वीन’ आहे 23 हजार कोटींची मालकीण – मल्लिका श्रीनिवासन

    भल्याभल्यांना लाजवेल अशी कामगिरी करून दाखवणाऱ्या मल्लिका श्रीनिवासन (Mallika Srinivasan) या भारताचे अब्जपती आणि TVS मोटर्सचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांच्या पत्नी आहेत. त्यांनी आपल्या प्रचंड मेहनतीच्या जोरावर ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट म्हणझेच टॅफे (TAFE) कंपनीला यशाच्या शिखरावर पोहोचवले आहे. इतकेच नाही, तर त्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे की, महिलादेखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यश मिळवू शकतात.

    Success Story of Mallika Srinivasan Every Indian Should Read

    मल्लिका श्रीनिवासन या देशातील त्या निवडक महिला उद्योजकांपैकी एक आहेत, ज्यांनी आपली वेगळी छाप सोडली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळेच त्यांना ‘ट्रॅक्टर क्वीन’ म्हणूनही ओळखले जाते. त्या देशातील दुसऱ्या आणि जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या ट्रॅक्टर उत्पादक ब्रँड टॅफेच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेअरमन आहेत. टॅफे हा ब्रँड मोठा होण्यात मल्लिका यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यांनी या कंपनीला तंत्राची जोड दिली आणि कंपनीला यशाच्या पायऱ्या चढण्यात मदत केली. आजघडीला कंपनीची वार्षिक उलाढाल ही १० हजार कोटींपेक्षाही जास्त आहे.

    कौटुंबिक व्यवसायात कधी घेतली उडी?

    सन १९५९मध्ये चेन्नई येथे जन्मलेल्या मल्लिका श्रीनिवासन या शालेय जीवनापासूनच अभ्यासात हुशार होत्या. त्यांनी मद्रास विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले होते. तसेच, यूएसए येथील पेन्सिल्वानिया विद्यापीठाच्या वॉर्टन स्कूलमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले होते. परदेशातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर मल्लिका पुन्हा भारतात आल्या. त्यांनी आपल्या वडिलांच्या देखरेखीखाली १९८६मध्ये कौटुंबिक व्यवसायात उडी घेतली. या कंपनीची सुरुवात मल्लिका यांचे आजोबा एस अनंतरामाकृष्णन यांनी केली होती. त्या टॅफेच्या जनरल मॅनेजर म्हणून कंपनीशी जोडल्या गेल्या होत्या. जेव्हा त्यांनी कंपनीत प्रवेश केला, तेव्हापासूनच महत्त्वाचे बदल होण्यास सुरुवात झाली.

    Success Story of Mallika Srinivasan Every Indian Should Read

    टॅफेचा प्रवास

    ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट (Tractors and Farm Equipment) म्हणझेच टॅफेची (TAFE) सुरुवात १९६०मध्ये चेन्नई येथे झाली होती. कंपनीची स्थापना जरी १९६०मध्ये झाली असली, तरीही यामध्ये महत्त्वाचे आणि मोठे बदल घडवून आणण्याचा विडा मल्लिका श्रीनिवासन यांनीच उचलला. त्यांनी कंपनीला तंत्राची जोड देऊन तिचा विस्तार केला. त्यामुळेच टॅफेचे प्रोडक्ट भारतीय शेतकऱ्यांची पहिली पसंत बनले आहेत. टॅफे ही ट्रॅक्टर बनवणारी जगातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीकडे जवळपास १६०० डीलर्सचं नेटवर्क आहे. तसेच, कंपनी जगातील जवळपास १०० देशांमध्ये व्यापार करत आहे. एवढंच नाही, तर टॅफे फक्त ट्रॅक्टर बनवण्यापर्यंत मर्यादित राहिली नाहीये. ही कंपनी बॅटरी, डिझेल इंजिन, जेनेसेट, गियर पार्ट्स, पॅसेंजर व्हेइकल, हायड्रॉलिक पंप्स आणि फार्म मशिनरीही तयार करते.

    Success Story of Mallika Srinivasan Every Indian Should Read

    कौटुंबिक व्यवसायाला मिळवून दिला फायदा

    टॅफेला यशाच्या पायऱ्या चढण्यासाठी भाग पाडण्यात मल्लिका श्रीनिवासन यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्याच नेतृत्वाखाली टॅफेने फ्रेंच कंपनी फॉरेसियाला विकत घेण्यासाठी ४०० कोटींचा करार केला. त्यांनी कंपनीची क्षमता वाढवण्यासाठी अमेरिकन ऍग्रो कंपनी AGCO शी मिळून काम करण्यास सुरुवात केली. कंपनीने AGCOसोबत मिळून तुर्की येथेही आपला प्लान्ट सुरू करत जगातील अनेक भागात ट्रॅक्टर पोहोचवणे सुरू केले. कालांतराने व्यवसायाची व्याप्ती वाढवण्यासाठी टॅफेने अनेक कंपन्या आपल्यात जोडल्या. टॅफे कंपनीने आयशर लिमिटेडचे ट्रॅक्टर, इंजिन आणि गियर्स विभाग विकत घेतले. त्यामुळेच भारतात कृषी यंत्र व्यवसायात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.

    पद्मश्री पुरस्काराने सन्मान

    टॅफेच्या यशाचा डंका जगभरात गाजवल्यानंतर ६४ वर्षीय मल्लिका श्रीनिवासन यांना ‘ट्रॅक्टर क्वीन’ या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांना ट्रेड आणि इंडस्ट्रीतील यशामुळे जानेवारी २०१४मध्ये पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. त्या अशा निवडक महिलांपैकी एक आहेत, ज्यांचे नाव दिग्गज उद्योगपतींमध्ये घेतले जाते.

    Success Story of Mallika Srinivasan Every Indian Should Read

    भारतातील ८३ व्या श्रीमंत व्यक्ती

    प्रसिद्ध उद्योगपती असण्याव्यतिरिक्त मल्लिका श्रीनिवासन या एनजीसीओ, टाटा स्टील आणि टाटा ग्लोबल बेवरेजेस बोर्डाच्या सदस्या आहेत. तसेच, चेन्नईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) आणि हैदराबादच्या इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या (ISB) कार्यकारी बोर्डाच्याही सदस्या आहेत. त्यांनी अलीकडेच, स्विगी बोर्डातील स्वतंत्र संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. स्विगीची व्हॅल्यू ही जवळपास ६८९१८ कोटी रुपये इतकी प्रचंड आहे. तसेच, मल्लिका श्रीनिवासन यांच्या संपत्तीविषयी बोलायचं झालं, तर त्यांची एकूण संपत्ती २.८४ बिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास २३,६२५ कोटी रुपये आहे. अशाप्रकारे, फोर्ब्सनुसार त्या भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ८३व्या क्रमांकावर आहेत.

    Success Story of Mallika Srinivasan Every Indian Should Read

    आणखी वाचा