नवी अर्थक्रांती

Blog

  • ATM कार्डशिवाय ATM मधून पैसे कसे काढायचे? जाणून घ्या!

    ATM कार्डशिवाय ATM मधून पैसे कसे काढायचे? जाणून घ्या!

    आजच्या डिजिटल युगात प्रत्येक क्षेत्रात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. बँकिंग प्रणालीही याला अपवाद नाही. बँकेत जाण्याची गरज न पडता, मोबाईलद्वारे अगदी सहज बँकिंग करता येते. इंटरनेटच्या मदतीने आपण बिले भरू शकतो, ऑनलाइन शॉपिंग करू शकतो आणि एका क्लिकवर पैसे ट्रान्सफरही करू शकतो. पण, तुम्ही बाहेर असाल आणि अचानक रोख रकमेची गरज भासली, पण तुमच्याकडे ATM कार्ड नसेल, तर काय कराल?

    काळजी करू नका! आता नवीन तंत्रज्ञानामुळे UPI-आधारित कार्डलेस कॅश विथड्रॉल ही सुविधा काही प्रमुख बँकांच्या ATM मध्ये सुरू करण्यात आली आहे. SBI, HDFC, आणि PNB यांसारख्या प्रमुख बँका ही सेवा पुरवत आहेत. या सुविधेच्या मदतीने तुम्ही BHIM, Google Pay, PhonePe, Amazon Pay, Paytm यांसारख्या UPI ॲप्सचा वापर करून सहज पैसे काढू शकता.

    आजच्या लेखात आपण या सुविधेचा वापर कसा करायचा ते सविस्तर समजून घेऊया!

    UPI द्वारे ATM मधून पैसे कसे काढायचे?

    जर तुमच्याकडे ATM कार्ड नसेल आणि तुम्हाला अर्जंट पैसे काढायचे असतील, तर घाबरू नका! UPI-सक्षम ATM चा वापर करून तुम्ही सहज पैसे काढू शकता. फक्त खालील स्टेप्स फॉलो करा. 

    UPI वापरून ATM मधून पैसे काढण्याची प्रक्रिया

    १. जवळच्या UPI सुविधा असलेल्या ATM मध्ये जा.
    २. ATM स्क्रीनवर “UPI Cash Withdrawal” हा पर्याय निवडा.
    ३. काढायची रक्कम टाका (कमाल ₹ ५००० पर्यंत).
    ४. स्क्रीनवर QR कोड दिसेल.
    ५. तुमच्या मोबाईलमधील UPI ॲप उघडा आणि QR कोड स्कॅन करा.
    ६. UPI पिन टाका आणि “Proceed” वर टॅप करा.
    ७. ATM मधून पैसे मिळतील!

    ही प्रक्रिया पूर्णतः सुरक्षित आहे कारण यामध्ये कार्डशिवाय व्यवहार केला जातो, म्हणजेच कोणतेही ATM कार्ड वापरण्याची गरज नाही. तसेच, OTP शिवाय ट्रान्झॅक्शन होत असल्याने फसवणुकीचा धोका कमी होतो. ही पद्धत वेगवान आणि सोपी असल्यामुळे काही सेकंदांतच तुम्हाला हवी ती रक्कम मिळते. त्यामुळे ATM कार्ड हरवले तरी चिंता नाही, UPI ATM द्वारे पैसे काढणे सोपे, सुरक्षित आणि जलद झाले आहे. 

    UPI म्हणजे काय?

    UPI (Unified Payments Interface) म्हणजे डिजिटल पेमेंट करण्याची एक सोपी आणि वेगवान प्रणाली आहे. याच्या मदतीने तुम्ही एका बँक खात्यातून दुसऱ्या बँकेत क्षणात पैसे ट्रान्सफर करू शकता. खास गोष्ट म्हणजे, UPI वापरून तुम्ही QR कोड, मोबाईल नंबर किंवा UPI ID द्वारे सहज व्यवहार करू शकता.

    UPI मुळे पैसे पाठवणे, ऑनलाइन खरेदी करणे आणि कार्डशिवाय ATM मधून पैसे काढणे अगदी सोपे झाले आहे. तुम्ही कुठूनही आणि केव्हाही पेमेंट करू शकता, त्यामुळे रोख पैशांची गरज कमी होते आणि व्यवहार अधिक सुरक्षित आणि सोपे होतात.

    UPI-आधारित कार्डलेस व्यवहाराचे फायदे

    UPI-आधारित कार्डलेस कॅश विथड्रॉल ही डिजिटल बँकिंगमधील मोठी क्रांती आहे. ही सेवा सुरक्षित, सुलभ आणि वेगवान आहे. कार्ड चोरी किंवा फ्रॉडचा कोणताही धोका नाही, कारण यात कोणतेही ATM कार्ड वापरण्याची आवश्यकता नसते. तसेच, OTP शिवाय ट्रान्झॅक्शन पूर्ण करता येत असल्यामुळे प्रक्रिया अधिक सुरक्षित होते. काही सेकंदांत पैसे काढण्याची सुविधा मिळते आणि २४ तास केव्हाही व्यवहार करता येतो, त्यामुळे रोख पैशांची गरज भासली, तरी कोणतीही अडचण येत नाही.

    ही सुविधा वापरून तुम्ही स्मार्ट आणि सुरक्षित बँकिंगचा अनुभव घेऊ शकता. त्यामुळे पुढच्या वेळी ATM कार्ड विसरले तरी काळजी करू नका, तुमच्या मोबाईलमधील UPI ॲप तुमच्या मदतीला येईल!

    आणखी वाचा:

  • स्मार्ट बचतीसाठी 6 महत्त्वाचे नियम

    स्मार्ट बचतीसाठी 6 महत्त्वाचे नियम

    स्मार्ट बचत म्हणजे फक्त पैसे बाजूला ठेवणं नव्हे, तर त्याचा विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध वापर करणं. बचतीच्या चांगल्या सवयी लावून घेतल्या, तर भविष्यातील आर्थिक संकटांपासून बचाव करता येतो. यासाठी काही सोपे आणि परिणामकारक नियम आहेत. या लेखात आपण असेच सहा महत्त्वाचे नियम जाणून घेऊ, जे तुम्हाला आर्थिक स्थिरता आणि सुरक्षित भविष्य घडवण्यासाठी मदत करतील.

    १. ५०/३०/२० बजेट नियम

    ५०/३०/२० बजेट नियम म्हणजे मिळणाऱ्या पैशांचं योग्य नियोजन करण्याचा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. या नियमानुसार, तुमच्या उत्पन्नाचा ५०% भाग गरजेच्या गोष्टींसाठी वापरावा. यामध्ये घरभाडं, वीजबिल, किराणा सामान आणि दैनंदिन आवश्यक खर्च येतात. यामुळे तुमच्या महत्त्वाच्या गरजा व्यवस्थित पूर्ण होतील आणि आर्थिक तणाव टाळता येईल.

    यानंतर, ३०% पैसा तुमच्या आवडीनुसार खर्च करण्यासाठी ठेवा. जसं की हॉटेलिंग, शॉपिंग किंवा मनोरंजन. उरलेला २०% भाग बचतीसाठी ठेवल्यास तुमचं भविष्य सुरक्षित होईल. यामध्ये आपत्कालीन फंड, कर्जफेड आणि गुंतवणुकीचा समावेश असतो. हा नियम पाळल्यास खर्च आणि बचतीचं योग्य संतुलन राखता येईल आणि आर्थिक स्थिरता मिळवणं सोपं होईल.

    २. 1% नियम – मोठी खरेदी करण्यापूर्वी विचार करा!

    कधी कधी महागडी खरेदी करताना घाई करू नये, कारण अशा खरेदीचा विचार न करता घेतलेला निर्णय नंतर पश्चातापाचे कारण ठरू शकतो. 1% नियम यासाठी मदत करतो. या नियमानुसार, जर एखाद्या वस्तूची किंमत तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 1% पेक्षा जास्त असेल, तर ती त्वरित खरेदी न करता किमान 3 दिवस वाट पाहा.

    हे 3 दिवस तुम्हाला शांतपणे विचार करण्यासाठी वेळ देतील. जर तीन दिवसांनीही ती वस्तू गरजेची वाटत असेल, तरच ती घ्या. यामुळे अनावश्यक खर्च टाळता येईल आणि पैसे फक्त आवश्यक गोष्टींसाठीच वापरता येतील. हा नियम पैसे वाचवण्यासाठी आणि आर्थिक शिस्त ठेवण्यासाठी खूप उपयोगी आहे.

    ३. ७२ चा नियम – पैशांची वाढ समजून घ्या!

    तुमची गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील, हे समजण्यासाठी ७२ चा नियम खूप उपयुक्त आहे. यासाठी फक्त ७२ ला तुमच्या गुंतवणुकीवरील वार्षिक व्याजदराने भाग द्या. उदाहरणार्थ, जर तुम्हाला ८ टक्के व्याज मिळत असेल, तर तुमचे पैसे ९ वर्षांत दुप्पट होतील (७२ ÷ ८ = ९).

    हा नियम गुंतवणुकीतील चक्रवाढ व्याजाचे महत्त्व समजायला मदत करतो. योग्य ठिकाणी आणि योग्य व्याजदराने दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास पैसे वेगाने वाढू शकतात. त्यामुळे, भविष्यात चांगला नफा मिळवण्यासाठी आणि स्मार्ट गुंतवणुकीसाठी हा नियम लक्षात ठेवा. 

    ४. ३ पट आपत्कालीन फंड नियम 

    आयुष्यात कधीही अनपेक्षित खर्च येऊ शकतात. अशा वेळी अडचणीत येऊ नये म्हणून किमान ३ ते ६ महिन्यांचे उत्पन्न बाजूला ठेवणं गरजेचं आहे. हा फंड नोकरी जाणं, मोठा आजार उद्भवणं किंवा तातडीच्या स्थितीच्या परिस्थितीत उपयोगी पडतो.

    जर तुमच्याकडे हा फंड असेल, तर अचानक आलेल्या खर्चामुळे तुमचे दैनंदिन जीवन अडथळ्याशिवाय सुरू राहू शकते. म्हणूनच, दरमहा थोडेसे पैसे वाचवून हा फंड तयार करा, जेणेकरून भविष्यात कोणत्याही आर्थिक संकटाला निर्धास्तपणे तोंड देता येईल.

    ५. स्वयंचलित बचत नियम

    बचत करायची आहे, पण प्रत्येक वेळी लक्षात राहत नाही? यावर स्वयंचलित बचत हा उत्तम उपाय आहे. बँकेत ऑटोमॅटिक ट्रान्सफर सेट करा, म्हणजे ठराविक रक्कम दर महिन्याला तुमच्या बचत खात्यात जमा होईल. यामुळे तुम्हाला वेगळे प्रयत्न न करता बचत करता येईल.

    “पैसे खर्च करण्याआधी बचत करा” हा नियम पाळल्यास तुम्ही हळूहळू चांगली आर्थिक सवय लावू शकता. यामुळे तुमच्या भविष्यासाठी पैसे साठतील आणि आर्थिक स्थिरता मिळवणं सोपं होईल.

    ६. ‘नवीन वस्तू, जुनी बाहेर’ नियम

    जेव्हा तुम्ही काही नवीन वस्तू खरेदी करता, तेव्हा काहीतरी जुने दान करा, विकून टाका किंवा त्याचा  पूर्ण वापर करा. यामुळे घरात नको असलेल्या वस्तूंचा ढीग जमा होत नाही आणि तुम्ही फक्त आवश्यक गोष्टींवरच खर्च करता.

    हा नियम पाळल्याने घर स्वच्छ आणि व्यवस्थित राहील. अनावश्यक वस्तू काढून टाकल्याने अधिक जागा मिळते आणि खर्चही कमी होतो. त्यामुळे गरजेच्या गोष्टींवरच लक्ष केंद्रित करता येतं. 

    या सहा नियमांचे पालन करून तुम्ही आर्थिक स्थिरता मिळवू शकता. बजेट तयार करणं, शिस्तबद्ध बचत, योग्य गुंतवणूक आणि खर्चावर नियंत्रण ठेवणं या सवयी आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने महत्त्वाच्या ठरतात. विचारपूर्वक निर्णय घेऊन आणि योग्य नियोजनाच्या मदतीने तुम्ही भविष्यासाठी सुरक्षित पायाभूत व्यवस्था उभारू शकता.

    आणखी वाचा:

  • Pulse Candy: कोणतीही जाहिरात न करता ३५० कोटींचा टप्पा गाठलेला यशस्वी ब्रँड!

    Pulse Candy: कोणतीही जाहिरात न करता ३५० कोटींचा टप्पा गाठलेला यशस्वी ब्रँड!

    आजच्या काळात कोणताही नवीन ब्रँड मोठा करण्यासाठी जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च होतात. मोठमोठे सेलिब्रिटी, आकर्षक टीव्ही ऍड्स आणि सोशल मीडियावर महागड्या मार्केटिंग मोहिमांचा वापर केला जातो. मात्र, Pulse कँडीने हे सर्व नियम मोडून एक नवा इतिहास रचला. कोणतीही जाहिरात न करता, केवळ आपल्या अनोख्या चवीच्या जोरावर या ब्रँडने ३५० कोटींचा टप्पा ओलांडला.

    ही कँडी २०१५ मध्ये बाजारात आली आणि काही महिन्यांतच ती सर्वाधिक विक्री होणाऱ्या कँडींपैकी एक बनली. तिच्या यशामागे प्रचंड मेहनत, एक अनोखी रणनीती होती, ज्यामुळे या साध्या वाटणाऱ्या कँडीला FMCG (Fast-moving consumer goods) क्षेत्रात सर्वात मोठा ब्रँड बनवलं. चला तर मग, या लेखात आपण Pulse च्या या अद्भुत यशामागची कारणे जाणून घेऊया!

    बाजारातील संधी ओळखून नवा प्रयोग

    २०१५ मध्ये भारताच्या ₹ ८,००० कोटींच्या कँडी मार्केटमध्ये प्रामुख्याने गोडसर कँडीजचा दबदबा होता. मात्र, भारतीय चविष्ट खाद्यसंस्कृती पाहता, आंबट-तिखट चव असलेल्या कँडीची मागणी असू शकते, हे DS ग्रुपने (Rajnigandha आणि Pass Pass फेम) अचूक ओळखलं. लोकांना लहानपणीची आठवण करून देणारी, कैरीवर मीठ-मिरची लावून खाल्ल्याचा स्वाद देणारी कँडी बाजारात नव्हती. याच संधीचा फायदा घेत त्यांनी Pulse कँडी तयार केली. ही कॅंडी चॉकलेट किंवा गोडसर मिठाईसारखी नव्हती, तर भारतीय चवीशी एकरूप झालेली होती. Pulse लाँच होताच ग्राहकांनी ती उचलून धरली. चटकदार चव आणि योग्य किंमत यामुळे लोक स्वतःच या कँडीची जाहिरात करू लागले.

    शून्य जाहिरात खर्च, तरीही अफाट लोकप्रियता!

    Pulse च्या चटपटीत आणि वेगळ्या चवीनं लोकांना लगेचच आकर्षित केलं. एकाने खाल्ल्यानंतर दुसऱ्यालाही खायला दिली, मित्रांनी एकमेकांना सांगितलं, कुटुंबात आणि नातेवाईकांमध्येही चर्चा सुरू झाली. हळूहळू “वर्ड ऑफ माऊथ” हेच Pulse चं सर्वात प्रभावी मार्केटिंग ठरलं. केवळ चवीच्या जोरावर ही कँडी घराघरात पोहोचली आणि भारतीय कँडी मार्केटमध्ये नवा ट्रेंड निर्माण केला.

    टीव्ही ऍड्स, सोशल मीडिया मार्केटिंग, सेलिब्रिटी प्रमोशन यांसारख्या विविध मार्गांचा वापर करून कंपन्या आपली उत्पादने लोकप्रिय करतात. मात्र, Pulse कँडीसाठी कंपनीने जाहिरातीवर एकही रुपया खर्च केला नाही. ना कोणतीही जाहिरात मोहीम राबवली, ना मोठ्या ब्रँड्सप्रमाणे सेलिब्रिटींच्या मदतीनं प्रमोशन केलं. तरीही ही कँडी तुफान गाजली आणि संपूर्ण भारतभर पोहोचली.

    DS ग्रुपची अनोखी मार्केटिंग युक्ती

    DS ग्रुपला मार्केटिंगचं तंत्र चांगलंच ठाऊक होतं. रजनीगंधा आणि पास पाससारख्या यशस्वी उत्पादनांचा अनुभव त्यांच्याकडे होता. त्यांनी ओळखलं की लोकांना Pulse कँडीची चव आवडतेय आणि तिची मागणी वाढतेय. ही उत्सुकता टिकून राहावी आणि कँडीला अधिक महत्त्व मिळावं, म्हणून त्यांनी सुरुवातीला Pulse मर्यादित प्रमाणातच बाजारात आणली.

    Pulse प्रथम केवळ गुजरात आणि राजस्थानमध्ये लाँच करण्यात आली. लोकांनी ही कँडी शोधायला सुरुवात केली. विक्रेत्यांनी स्टॉक मर्यादित ठेवल्यामुळे ती मिळवण्यासाठी स्पर्धा वाढली. त्यामुळे Pulse ही सामान्य कँडी न राहता, एक एक्सक्लुझिव्ह प्रॉडक्ट वाटू लागली. या रणनीतीमुळे कँडीची लोकप्रियता झपाट्याने वाढली आणि Pulse एक मोठा ब्रँड बनला.

    ८ महिन्यांत १०० कोटींची विक्रमी विक्री

    Pulse हा केवळ ८ महिन्यांत १०० कोटींची विक्री करणारा भारतातील सर्वात वेगाने वाढणारा FMCG ब्रँड ठरला. यामागे काही महत्त्वाची कारणे होती. कँडीची किंमत फक्त १ रु. असल्यामुळे कोणालाही सहज खरेदी करता येत होती. हिरवट-पिवळ्या आकर्षक पॅकेजिंगमुळे ती लगेचच लक्ष वेधून घेत होती. 

    Pulse ची मागणी इतकी वाढली की दुकानांमध्ये ती मिळवण्यासाठी रांगा लागत होत्या. काही किरकोळ विक्रेत्यांनी तर Pulse मिळवण्यासाठी वेटलिस्ट तयार केली होती, तर काहींनी जास्त किमतीला विकायला सुरुवात केली. लोकांमध्ये निर्माण झालेल्या या क्रेझमुळे Pulse कँडीच्या लोकप्रियतेला अधिकच गती मिळाली आणि ती भारतभर गाजली.

    भारतातून परदेशापर्यंत पोहोचलेली Pulse!

    २०१८ पर्यंत Pulse भारतातील २० लाखांहून अधिक दुकानांमध्ये उपलब्ध झाली. प्रवासी भारतीय ही कँडी परदेशात घेऊन जाऊ लागले आणि हळूहळू ती अमेरिका आणि दुबईतही प्रसिद्ध झाली. या लोकप्रियतेला आणखी चालना देण्यासाठी DS ग्रुपने संत्री, अननस आणि पेरू असे नवीन फ्लेवर्स सादर केले. मात्र, कच्चा आंबा हा मूळ फ्लेवर सर्वाधिक विकला गेला.

    २०१९ मध्ये कंपनीने  बाजारात फॅमिली पॅक्स आणि गिफ्ट पॅक्स आणले, ज्यामुळे विक्रीत मोठी वाढ झाली आणि Pulse ने तब्बल ३५० कोटींचा टप्पा पार केला. इतकंच नाही तर, कँडी मार्केटमध्ये ४८% मार्केट शेअर मिळवत Pulse ने नवा विक्रम प्रस्थापित केला. हे यश केवळ उत्कृष्ट चवीमुळे नव्हतं, तर त्यामागे बाजारपेठेचा सखोल अभ्यास आणि योग्य व्यूहरचना होती. ग्राहकांच्या आवडी समजून DS ग्रुपने नेमकी त्याच चवीची कँडी बाजारात आणली आणि इतिहास घडवला. 

    मित्रांनो, Pulse कँडीचे यश हे उत्तम मार्केटिंग आणि ब्रँडिंगचं उदाहरण आहे. योग्य नियोजन, उत्कृष्ट चव आणि प्रभावी वितरण यांच्या जोरावर जाहिरात न करता देखील एखादं उत्पादन मोठं होऊ शकतं, हे Pulse ने सिद्ध केलं आहे. आजही ती बाजारात तितकीच लोकप्रिय असून, नव्या ब्रँड्सच्या स्पर्धेत टिकून आहे.

  • Referrush Success Story: लकवा झाला… पण आज कमवतो रोज दीड लाख रुपये!

    Referrush Success Story: लकवा झाला… पण आज कमवतो रोज दीड लाख रुपये!

    यशाचा मार्ग कधीच सोपा नसतो. त्यात मेहनत, संघर्ष आणि जिद्द असते. प्रत्येकजण या मार्गावर यशस्वी होतोच असं नाही, पण काही जण अपयशाला न जुमानता पुढे जातात आणि स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करतात. विक्रम पै हे या गोष्टीचं उत्तम उदाहरण आहे.

    बंगळुरूमधील हा तरुण उद्योजक आज ReferRush या प्रसिद्ध ई-कॉमर्स रेफरल सेल्स प्लॅटफॉर्मचा संस्थापक आणि सीईओ आहे. पण त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. गेल्या सहा वर्षांत त्याने पाच व्यवसाय सुरू केले, पण त्यातला एकही यशस्वी झाला नाही. त्यामुळे त्याला तब्बल दोन कोटी रुपयांचे नुकसान सहन करावं लागलं. तरीही त्याने हार मानली नाही. प्रत्येक अपयशातून शिकत, जिद्दीने पुढे जात अखेर ReferRush हा यशस्वी व्यवसाय उभारला. आज तो केवळ एक यशस्वी उद्योजक नाही, तर चिकाटी आणि मेहनतीचं उत्तम उदाहरण आहे. या लेखात आपण त्याच्या संघर्षमय प्रवासावर एक नजर टाकूया.  

    सुरुवातीचा संघर्ष आणि सलग अपयश

    बंगळुरूमध्ये जन्मलेल्या विक्रमने शिक्षण पूर्ण केल्यानंतर मोठ्या आत्मविश्वासाने आणि उत्साहाने उद्योजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्याची स्वप्नं मोठी होती, यशस्वी होण्याची जिद्दही होती. मात्र, व्यवसायाच्या वाटचालीत अनेक अडथळे आले. अनुभव आणि योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे त्याने सुरू केलेले एक-दोन नव्हे, तर तब्बल पाच व्यवसाय अपयशी ठरले. सततच्या अपयशामुळे मोठं आर्थिक संकट कोसळलं. त्याला जवळपास दोन कोटी रुपयांचं नुकसान झालं. परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत गेली. मित्रांनी दुरावा निर्माण केला, नातेवाईक टीका करू लागले आणि आईचाही त्याच्यावरचा विश्वास कमी झाला. एका क्षणाला परिस्थिती अशी आली की, खिशात फक्त ४,००० रुपये उरले. कर्मचाऱ्यांना पगार देणेही शक्य नव्हते. काही जणांनी त्याची थट्टा केली. “एलन मस्क बनायचा प्रयत्न करतोय का?” असे टोमणे मारले.

    सततच्या तणावाचा परिणाम त्याच्या प्रकृतीवर झाला. मानसिक तणावामुळे शरीर साथ सोडू लागलं. अखेर त्याला लकवा झाला आणि त्याचे चालणे, बोलणेही कठीण झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्यासारखी वाटू लागली. तो खचला, रडला, पण हार मानली नाही. डोळ्यांतले स्वप्न जिवंत ठेवत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. या कठीण काळात स्वतःशीच लढण्याचा निर्धार केला आणि नव्या उर्जेने पुन्हा उभं राहण्याचा निश्चय केला.

    ReferRush ची स्थापना आणि पहिलं यश

    अनेक अपयशांनंतरही विक्रमने हार मानली नाही. नव्या उमेदीनं त्याने ReferRush या रेफरल मार्केटिंग प्लॅटफॉर्मची सुरुवात केली. सुरुवातीला हा व्यवसायही अपयशी ठरेल, असं अनेकांना वाटत होतं. पण यावेळी विक्रम मागे हटणार नव्हता. ReferRush व्यवसायांना त्यांच्या ग्राहकांच्या माध्यमातून नवीन ग्राहक मिळवण्यासाठी मदत करतं. ग्राहक कंपनीच्या उत्पादनांची माहिती इतरांना सांगतात आणि त्याबदल्यात त्यांना कमिशन मिळतं. त्यामुळे कंपन्यांना विश्वासार्ह ग्राहक मिळतात, तर ग्राहकांनाही घरबसल्या कमाईचा पर्याय उपलब्ध होतो. हळूहळू हा व्यवसाय स्थिरावत गेला आणि ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला.

    सुरुवातीला पहिल्या एक लाख रुपयांसाठी तब्बल चार महिने लागले. पण विक्रमने मेहनत आणि जिद्द कायम ठेवली. त्याच्या प्रयत्नांचा परिणाम दिसू लागला आणि आज ReferRush दररोज १.५ लाख रुपये कमवतो. अपयशाच्या काळात खचून न जाता ज्या चिकाटीने विक्रमने प्रयत्न सुरू ठेवले, त्याच जिद्दीमुळे त्याला यशाचा हा टप्पा गाठता आला.

    निखील कामतकडून ReferRush ला फंडिंग – यशाच्या नव्या पर्वाची सुरुवात

    विक्रमच्या अथक मेहनतीला अखेर मोठं यश मिळालं. त्याच्या ReferRush या रेफरल मार्केटिंग स्टार्टअपने उद्योगविश्वात ठसा उमटवायला सुरुवात केली होती. याच प्रवासात, भारतातील नामवंत उद्योजक निखील कामत यांच्या कंपनीने ReferRush ला इनिशिएटिव्ह फंडिंगसाठी निवडलं. तब्बल २,४०० कंपन्यांमधून ReferRush ची निवड होणं हे विक्रमसाठी एका मोठ्या यशाचं प्रतीक होतं. यामुळे केवळ आर्थिक पाठबळच नाही, तर या प्लॅटफॉर्मच्या भविष्यासाठीही एक मजबूत दिशा मिळाली. आता त्याला ठाम विश्वास आहे की, लवकरच प्रत्येक ई-कॉमर्स ब्रँड आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी ReferRush चा वापर करेल.

    विक्रमच्या मते, त्याचा संपूर्ण प्रवास हा शिकण्याचा होता. सुरुवातीची पाच वर्षं त्याने प्रयोग आणि चुका यातून शिकण्यात घालवली. अपयश आलं तरीही आत्मविश्वास कधीही गमावला नाही. व्यवसायात संकटं आली, आर्थिक तोटा सहन करावा लागला, शारीरिक आणि मानसिक त्रासही सोसावा लागला. पण तरीही तो जिद्दीने लढत राहिला. त्याच्या मते, “जर तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण होत असतील, तर तुम्ही तुमचं स्वप्न नक्कीच साकार करू शकता.”

    आज विक्रमच्या संघर्षाची कहाणी हजारो तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अपयशाला घाबरून थांबण्यापेक्षा त्यातून शिकून पुढे जाणं हेच यशाचं खरं रहस्य आहे. विक्रमने ते करून दाखवलं. 

    आणखी वाचा:

  • या चुकांमुळे खराब होतो तुमचा CIBIL स्कोअर! सुधारण्यासाठी कोणते उपाय करावे, जाणून घ्या

    या चुकांमुळे खराब होतो तुमचा CIBIL स्कोअर! सुधारण्यासाठी कोणते उपाय करावे, जाणून घ्या

    या चुकांमुळे खराब होतो तुमचा CIBIL स्कोअर! सुधारण्यासाठी कोणते उपाय करावे, जाणून घ्या कसे ते जाणून घ्या.

    नुकतीच मूर्तिजापूरमध्ये एक अनोखी घटना घडली. लग्नाच्या सर्व तयारीनंतर शेवटच्या टप्प्यावर असताना, फक्त नवरदेवाचा सिबिल स्कोअर कमी असल्यामुळे वधूच्या नातेवाईकांनी हे लग्न मोडले. ही घटना ऐकायला हास्यस्पद वाटू शकते, पण यावरून सिबिल स्कोअरचे महत्त्व अधोरेखित होते.

    सिबिल स्कोअर म्हणजे तुमचा आर्थिक शिस्तबद्धतेचा एकप्रकारे आरसाच असतो. हा स्कोअर तुमच्या क्रेडिट इतिहासावर आणि कर्ज परतफेडीच्या क्षमतेवर आधारित असतो. बँका किंवा इतर वित्तीय संस्था जेव्हा कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मंजूर करतात, तेव्हा सर्वप्रथम तुमचा सिबिल स्कोअर तपासतात. कमी सिबिल स्कोअर म्हणजे खराब क्रेडिट व्यवस्थापन, थकीत हप्ते किंवा वित्तीय अस्थिरतेचे लक्षण असते .

    अनेकदा काही नकळत झालेल्या चुका आपल्या सिबिल स्कोअरवर विपरीत परिणाम करतात. या लेखात अशा कुठल्या चुका सिबिल स्कोअर खराब करू शकतात आणि त्यांच्यावर काय उपाय करावे  यावर एक नजर टाकूया.

     क्रेडिट कार्डसाठी वारंवार अर्ज करणे किंवा बंद करणे

    वारंवार क्रेडिट कार्डसाठी अर्ज करणे आणि ती बंद करणे यामुळे तुमच्या CIBIL स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही नवीन क्रेडिट कार्डसाठी अर्ज करता, तेव्हा बँक किंवा वित्तीय संस्था तुमच्या क्रेडिट स्कोअरची तपासणी करतात,ज्याला “हार्ड इन्क्वायरी” म्हणतात. या चौकश्या वारंवार झाल्यास तुमचा स्कोअर कमी होऊ शकतो आणि भविष्यात कर्ज किंवा इतर क्रेडिट सुविधा मिळवणे कठीण होऊ शकते. त्यामुळे, फक्त गरज असेल तेव्हाच नवीन क्रेडिट कार्डसाठी अर्ज करावा.

    क्रेडिट कार्ड बंद करताना देखील काळजी घेणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही एखादे कार्ड बंद करता, तेव्हा तुमच्या एकूण उपलब्ध क्रेडिट मर्यादेत घट होते, ज्यामुळे क्रेडिट युटिलायझेशन रेशो (उपयोग केलेली क्रेडिट रक्कम आणि एकूण उपलब्ध क्रेडिट यामधील प्रमाण) वाढतो. हा रेशो जास्त असल्यास CIBIL स्कोअर कमी होतो. त्यामुळे, जर तुम्हाला एखादे कार्ड बंद करायचे असेल, तर आधी दुसऱ्या कार्डाचा योग्य वापर सुरू करावा आणि उपलब्ध क्रेडिट मर्यादेचे संतुलन राखावे, जेणेकरून तुमचा क्रेडिट स्कोअर प्रभावित होणार नाही.

    क्रेडिट कार्डचा अयोग्य वापर

    क्रेडिट कार्ड उपयोगी असले तरी त्याचा जास्त वापर आर्थिक अडचणीत टाकू शकतो. अनेक जण मर्यादेपेक्षा जास्त खर्च करतात, त्यामुळे त्यांचे CIBIL स्कोअर कमी होते, आणि भविष्यात कर्ज मिळवणे कठीण होते. क्रेडिट युटिलायझेशन रेशो 30% च्या आत ठेवणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच, तुमच्या कार्डची मर्यादा ₹1,00,000 असेल, तर दरमहा ₹30,000 पेक्षा जास्त खर्च टाळा, नाहीतर उच्च व्याजदराचा फटका बसू शकतो.

    तुमच्या क्रेडिट कार्डचा शिस्तबद्ध आणि मर्यादित वापर करा. शक्यतो मर्यादेपेक्षा कमी खर्च करा आणि बिल वेळेआधी भरण्याची सवय ठेवा, यामुळे अतिरिक्त व्याज आणि विलंब शुल्क टाळता येते. क्रेडिट कार्ड फक्त तात्पुरत्या गरजांसाठी वापरा आणि गरजेपेक्षा जास्त कर्ज घेण्याची सवय टाळा. योग्य नियोजन आणि जबाबदारीने वापर केल्यास क्रेडिट कार्ड तुमच्या आर्थिक व्यवस्थापनाला मदत करू शकते. 

    बिल आणि कर्जाचा हप्ता वेळेवर न भरणे


    कर्जाचा हप्ता किंवा क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर न भरल्यास CIBIL स्कोअर कमी होतो, ज्यामुळे भविष्यात कर्ज मिळवणे कठीण होते. तसेच, उशीर झाल्यास दंड भरावा लागतो आणि क्रेडिट हिस्ट्री देखील खराब होते, ज्यामुळे आर्थिक ताण वाढतो आणि विश्वासार्हतेवर परिणाम होतो.

    म्हणून सर्व EMI आणि क्रेडिट कार्ड बिलं वेळेवर भरण्याची सवय लावा. विसरण्याची शक्यता टाळण्यासाठी ऑटो-डेबिट सुविधा सुरू करा. शक्य असल्यास, बिल वेळेआधी भरा, यामुळे CIBIL स्कोअर सुधारतो आणि भविष्यातील अडचणी टाळता येतात. योग्य नियोजन केल्यास कर्ज आणि क्रेडिट कार्ड हाताळणे सोपे होण्यास मदत होते.  

    फक्त क्रेडिट कार्ड किंवा एकाच प्रकारचे क्रेडिट वापरणे

    जर तुमच्याकडे फक्त क्रेडिट कार्ड असेल आणि कोणतेही कर्ज घेतले नसेल, तर तुमच्या क्रेडिट प्रोफाईलमध्ये विविधता नसल्यामुळे CIBIL स्कोअर वाढण्यास वेळ लागतो. जर तुमच्या क्रेडिट मिक्समध्ये फक्त क्रेडिट कार्डच असेल, तर भविष्यात गृहकर्ज, कार लोन किंवा कोणतेही मोठे कर्ज घेणे कठीण होऊ शकते, कारण बँकांना विविध प्रकारच्या कर्जाची परतफेड करण्याचा तुमचा ट्रॅक रेकॉर्ड दिसत नाही.

    त्यामुळे, केवळ क्रेडिट कार्डवर अवलंबून न राहता, गरजेनुसार लहान कर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा वाहन कर्ज घेणे फायदेशीर ठरते. मात्र, कोणतेही कर्ज घेतल्यानंतर ते वेळेवर फेडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नियमित आणि शिस्तबद्ध परतफेड केल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर वाढतो आणि भविष्यात मोठे कर्ज सहज मिळू शकते. तसेच, विविध प्रकारच्या कर्जाची परतफेड केल्याने तुमच्या क्रेडिट मिक्समध्ये सुधारणा होते, ज्यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या अधिक विश्वासार्ह ठरता.

    गॅरेंटर किंवा सह-अप्लिकंट म्हणून जबाबदारी न समजणे

    जर तुम्ही कोणाच्या कर्जासाठी गॅरेंटर किंवा सह-अप्लिकंट असाल आणि त्या व्यक्तीने हप्ता वेळेवर भरला नाही, तर त्याचा थेट परिणाम तुमच्या CIBIL स्कोअरवर होतो. अनेकांना हे माहिती नसते, त्यामुळे नातलग किंवा मित्रांसाठी गॅरेंटर होण्याचा निर्णय घेताना काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे.

    गॅरेंटर होण्यापूर्वी त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती आणि कर्ज फेडण्याची क्षमता नीट तपासा. गरज नसताना कोणासाठीही गॅरेंटर होऊ नका, कारण जर त्यांनी हप्ता न भरल्यास तुमचा CIBIL स्कोअरही खराब होऊ शकतो आणि भविष्यात कर्ज घेणे कठीण जाऊ शकते.

    मित्रांनो आजच्या काळात चांगला CIBIL स्कोअर असणे अत्यंत गरजेचे आहे. कर्ज घेणे, क्रेडिट कार्ड वापरणे किंवा मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी बँक आणि वित्तीय संस्था तुमचा CIBIL स्कोअर तपासतात. जर हा स्कोअर कमी असेल, तर तुम्हाला कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात किंवा जास्त व्याजदर द्यावा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही कोणत्या चुका टाळायला पाहिजेत, याची माहिती असणे महत्त्वाचे आहे
    .

    आणखी वाचा:

  • Railways Book Now Pay Later Scheme | अचानक रेल्वेने प्रवास करायचा आहे, पण तिकीटासाठी पैसे नाहीत? भारतीय रेल्वेची ‘बुक नाऊ, पे लेटर’ योजना मदतीसाठी तयार!

    Railways Book Now Pay Later Scheme | अचानक रेल्वेने प्रवास करायचा आहे, पण तिकीटासाठी पैसे नाहीत? भारतीय रेल्वेची ‘बुक नाऊ, पे लेटर’ योजना मदतीसाठी तयार!

    भारतीय रेल्वे कोट्यवधी प्रवाशांसाठी स्वस्त, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा उत्तम पर्याय आहे. आपण घरापासून लांब राहत असू किंवा अचानक कुठे प्रवास करण्याची गरज भासली, तर रेल्वेचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मात्र, काही वेळा तिकीट बुक करताना आपल्याकडे पुरेसे पैसे नसतात आणि त्यामुळे अडचण निर्माण होते.

    पण आता काळजी करण्याची गरज नाही! भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी ‘बुक नाऊ, पे लेटर’ ही नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे आपण तिकीट त्वरित बुक करू शकतो आणि त्यासाठीचे पेमेंट प्रवासानंतर १४ दिवसांच्या आत करू शकतो. म्हणजेच, अचानक प्रवास करावा लागला आणि तिकीटासाठी पुरेसे पैसे हाताशी नसले, तरीही ही योजना मदतीला येते.

    या लेखात जाणून घेऊया की ही योजना नेमकी कशी कार्य करते, कोणाला याचा लाभ मिळू शकतो आणि त्याचे फायदे काय आहेत.

    ‘बुक नाऊ, पे लेटर’ योजनेचा लाभ कसा घ्यावा?

    भारतीय रेल्वेने ही योजना फक्त ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी लागू केली आहे. याचा फायदा घेण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा 

    1. रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी सर्वप्रथम IRCTC वेबसाइट किंवा मोबाईल अ‍ॅपवर लॉगिन करा.

    2. आपल्या प्रवासासाठी योग्य ट्रेन, प्रवाशांची संख्या आणि प्रवासाची तारीख निवडा. त्यानंतर उपलब्ध तिकिटे तपासा आणि तुमच्या सोयीच्या गाडीसाठी तिकीट निवडा.

    3. तिकीट बुक करताना पेमेंट करण्यासाठी वेगवेगळे पर्याय दिसतील. त्यापैकी ‘पे लेटर’ हा पर्याय निवडा, ज्यामुळे तुम्हाला तिकीट शुल्क त्वरित न भरता प्रवासानंतर १४ दिवसांच्या आत पैसे भरण्याची सुविधा मिळते.

    4. जर तुम्ही पहिल्यांदाच या सुविधेचा वापर करत असाल, तर EpayLater या प्लॅटफॉर्मवर जाऊन तुमची नोंदणी करा. यासाठी तुमचा मोबाईल नंबर, ई-मेल आणि KYC संबंधित आवश्यक माहिती द्यावी लागेल.

    5. EpayLater वर नोंदणी झाल्यानंतर, तुमच्या IRCTC खात्यातून तिकीट बुकिंग प्रक्रिया पूर्ण करा. तिकीट यशस्वीपणे बुक झाल्यावर तुम्हाला ई-मेल आणि SMS द्वारे त्याचा तपशील मिळेल.

    6. तिकीट बुक केल्यानंतर तुमच्या प्रवासानंतर १४ दिवसांच्या आत EpayLater च्या माध्यमातून पेमेंट करणे आवश्यक आहे. जर दिलेल्या वेळेत पैसे भरले, तर कोणतेही अतिरिक्त शुल्क लागणार नाही. मात्र, उशीर झाल्यास व्याज किंवा दंड आकारला  जातो.

    ‘बुक नाऊ, पे लेटर’ योजना का उपयुक्त आहे?

    रेल्वे प्रवास करताना अनेकदा अचानक प्रवास करण्याची गरज भासते, पण तिकीट बुक करताना तत्काळ पैसे उपलब्ध नसतात. अशा वेळी ‘बुक नाऊ, पे लेटर’ ही योजना अत्यंत फायदेशीर ठरते. या सुविधेमुळे तिकीट त्वरित बुक करता येते, पण त्याचे पैसे नंतर भरता येतात. त्यामुळे अचानक प्रवासाची वेळ आली तरीही कोणतीही अडचण न येता तुम्ही सहज प्रवास करू शकता.

    प्रवाशांना पैशांची व्यवस्था करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. शिवाय, ही प्रक्रिया अगदी सोपी असून जास्त कागदपत्र लागत नाहीत. फक्त IRCTC च्या EpayLater च्या मदतीने काही मिनिटांत तिकीट बुक करता येते.

    ही योजना वारंवार रेल्वे प्रवास करणारे प्रवासी, विद्यार्थी, नोकरीसाठी प्रवास करणारे नोकरदार आणि व्यावसायिक यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तिकीट बुकिंगच्या वेळी पैशांची कमतरता जाणवत असेल, तर ही सुविधा नक्कीच दिलासा देणारी ठरेल.

    योजनेचे फायदे 

    • तिकीट बुक करताना लगेच पैसे द्यावे लागत नाहीत, त्यामुळे अचानक प्रवास करायचा असल्यास आर्थिक ताण येत नाही.
    • ही सुविधा फक्त ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी उपलब्ध असल्याने तिकीट सहज आणि झटपट मिळते.
    • ठरवलेल्या मुदतीत पैसे भरल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क लागत नाही.
    • मुदतीनंतर पैसे भरल्यास फक्त ३.५% सेवा शुल्क आकारले जाते, त्यामुळे मोठा आर्थिक बोजा पडत नाही.

  • कधी टॉयलेट साफ केला, कधी वडापाव विकला: जाणून घ्या ‘छावा’ दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा संघर्षमय प्रवास

    कधी टॉयलेट साफ केला, कधी वडापाव विकला: जाणून घ्या ‘छावा’ दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा संघर्षमय प्रवास

    सध्या देशभरात “छावा” (Chhaava) या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या संघर्षमयी जीवन प्रवासावर आधारित आहे, ज्यात महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशल (vicky kaushal) यांनी साकारली आहे, तर महाराणी येसूबाईंची भूमिका अभिनेत्री रश्मीका मंदाना हिने साकारली आहे, तसेच अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता आणि संतोष जुवेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी सुद्धा आपली भूमिका चोख निभावली आहे. या सर्व कलाकारांच्या अभिनयाचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.

    मात्र, या चित्रपटाच्या यशामध्ये सर्वाधिक कौतुक कोणाचं होत असेल, तर ते म्हणजे चित्रपटाचे मराठमोळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांचं. कारण पहिल्यांदाच संभाजी महाराजांचा इतिहास मोठ्या पडद्यावर इतक्या ताकदीने साकारण्यात आला आहे. उतेकर यांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण दिग्दर्शन शैलीत हा चित्रपट वास्तवाशी जुळवून प्रभावीपणे सादर केला आहे, ज्यामुळे या चित्रपटाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

    लक्ष्मण उतेकर हे आज हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक आहेत, पण त्यांचा प्रवास अत्यंत कठीण आणि संघर्षमय होता. एक काळ असा होता की, त्यांना दोन वेळच्या जेवणासाठीही संघर्ष करावा लागला. उदरनिर्वाहासाठी त्यांनी टॉयलेट साफ करण्यापासून ते वडापाव विकण्यापर्यंत अनेक कामे केली. पण त्यांनी कधीही हार मानली नाही. कठोर मेहनत, चिकाटी आणि आपल्या कलेवरील निष्ठेमुळे ते आज यशस्वी दिग्दर्शक बनले आहेत. आजच्या लेखात आपण त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाची सविस्तर माहिती घेऊया.

    प्रारंभिक जीवन आणि संघर्ष

    लक्ष्मण उतेकर यांचा जन्म एका साधारण कुटुंबात झाला. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शिक्षणासाठी आवश्यक सुविधा मिळाल्या नाहीत, पण त्यांच्या मनात मोठी स्वप्नं होती. काहीतरी वेगळं करण्याची जिद्द घेऊन त्यांनी लहान वयातच मुंबई गाठली. तिथे ना कुणी ओळखीचं होतं, ना कुठे राहायची सोय. हातात काहीच नव्हतं, पण मेहनतीवर आणि जिद्दीवर त्यांचा पूर्ण विश्वास होता.

    पोट भरण्यासाठी त्यांनी एका वडापाव विक्रेत्याकडे लहानसं काम मिळवलं. दिवस-रात्र मेहनत करत असताना त्यांची नजर सतत मोठ्या संधीच्या शोधात होती. त्यांना सिनेसृष्टीत काम करायचं होतं, पण त्यासाठी कुठून सुरुवात करावी, हे माहीत नव्हतं. त्यांनी हार मानली नाही. ते मुंबईत स्टुडिओच्या बाहेर तासन्‌तास उभे राहत, लोकांशी ओळख वाढवायचा प्रयत्न करत आणि योग्य संधी मिळण्याची वाट पाहत होते.

    एके दिवशी अचानक महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांची वडापावची हातगाडी जप्त केली आणि त्यांचं उपजीविकेचे एकमेव साधन हिरावलं गेलं. हा त्यांच्या आयुष्यातला मोठा टर्निंग पॉइंट ठरला. त्या क्षणी त्यांनी ठरवलं की आता मागे फिरायचं नाही. परिस्थिती कितीही कठीण आली तरी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करायचं आणि आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवायचं. उपजीविकेसाठी त्यांनी वेळप्रसंगी सफाईचं काम केलं, पण हार मानली नाही. 

    सिनेमॅटोग्राफीची पहिली पायरी

    या कठीण परिस्थितीतून मार्ग काढत असताना, त्यांना एक दिवस एका वृत्तपत्रात पियूनच्या नोकरीची जाहिरात दिसली. स्टुडिओत काम करण्याची संधी पाहून त्यांनी अर्ज केला आणि त्यांना तिथे नोकरी मिळाली. हीच त्यांची सिनेसृष्टीत पहिली पायरी होती.

    स्टुडिओत काम करत असताना त्यांना चित्रपट निर्मितीविषयी अधिक जाणून घेण्याची संधी मिळाली. तिथेच क्रूची गरज असल्याने त्यांना कॅमेरा अटेंडंट म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी हळूहळू सिनेमॅटोग्राफी शिकण्यास सुरुवात केली. छोट्या जबाबदाऱ्या स्वीकारत, सातत्याने मेहनत घेत आणि शिकत ते पुढे जात राहिले.

    काळाच्या ओघात त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफी केली. इंग्लिश विंग्लिश, हिंदी मीडियम, डीअर जिंदगी आणि 102 नॉट आऊट यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांच्या उत्कृष्ट कार्याची झलक दिसली. त्यांच्या मेहनतीमुळे आणि कुशलतेमुळे त्यांना बॉलिवूडमध्ये ओळख मिळू लागली आणि सिनेमॅटोग्राफीच्या क्षेत्रात त्यांचं नाव लौकिकास आलं .

    दिग्दर्शनाची सुरुवात आणि ब्रेकथ्रू

    लक्ष्मण उतेकर यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून चांगलं नाव कमावलं होतं, पण त्यांना दिग्दर्शक होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. त्यांनी मराठीत पहिला चित्रपट दिग्दर्शित केला तो म्हणजे “टपाल”. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगला आवडला आणि त्यांना दिग्दर्शक म्हणून ओळख मिळाली.

    यानंतर त्यांनी “लालबागची राणी” हा दुसरा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटामुळे त्यांच्या दिग्दर्शन कौशल्यावर शिक्कामोर्तब झालं. त्यांच्या कथा सांगण्याच्या अनोख्या शैलीला आणि भावनिक दृश्यांवरील पकडीला प्रेक्षकांची दाद मिळाली.

    बॉलिवूडमध्ये संधी मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील होते आणि अखेर २०१९ मध्ये त्यांना मोठा ब्रेक मिळाला. त्यांनी “लुका छुपी” हा चित्रपट दिग्दर्शित केला. हा चित्रपट लिव्ह-इन रिलेशनशिप या विषयावर हलकाफुलका विनोदी सिनेमा होता. प्रेक्षकांनी तो उचलून धरला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर १२८ कोटींची कमाई केली.

    यानंतर, आता लक्ष्मण उतेकर यांनी “छावा” हा छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडणारा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. भव्य निर्मितीमूल्य, दमदार अभिनय, आणि सुंदर दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय ठरतो आहे.मित्रांनो, लक्ष्मण उतेकर यांचा जीवनप्रवास आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक अडचण, संघर्ष, आणि अपयशाला संधी म्हणून स्वीकारलं आणि त्या सर्वांचा योग्य उपयोग करत, आपली स्वप्नं सत्यात उतरवली. त्यांची मेहनत, चिकाटी आणि अथक परिश्रम यामुळेच ते आज एक प्रतिष्ठित दिग्दर्शक बनले आहेत. त्यांची ही यशोगाथा आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी, आपल्याला दिलेल्या संधीचा योग्य उपयोग आणि प्रयत्नांमुळे सर्व गोष्टी शक्य होतात.

    आणखी वाचा :

  • जाणून घ्या विमा क्षेत्रातील डिजिटल क्रांतीचे शिल्पकार वरुण दुआ यांचा प्रवास | Acko General Insurance

    जाणून घ्या विमा क्षेत्रातील डिजिटल क्रांतीचे शिल्पकार वरुण दुआ यांचा प्रवास | Acko General Insurance

    यश मिळवायचं असेल; तर जिद्द, मेहनत आणि योग्य दिशा असणं गरजेचं असतं. जिद्द मेहनतीला साथ देते, तेव्हा कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येतं. भारतीय विमा क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवणारे अग्रगण्य युवा उद्योजक वरुण दुआ हे या गोष्ट्टीचं उत्तम उदाहरण आहेत. पारंपरिक विमा क्षेत्रातील जटिल प्रक्रिया सोप्या आणि सुलभ करण्याचं त्यांनी स्वप्न पाहिलं. त्यांच्या दूरदृष्टीमुळे विमा घेण्याची संकल्पना आणि प्रक्रिया संपूर्ण बदलली.

    ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी Acko General Insurance या पूर्णतः डिजिटल विमा कंपनीची स्थापना केली. पारंपरिक विमा कंपन्यांमध्ये अनेक टप्पे, कागदपत्रांची आवश्यकता आणि वेळखाऊ प्रक्रिया असते. याउलट, Acko ने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विमा प्रक्रिया सुलभ केली. ग्राहकांना जलद आणि पारदर्शक सेवा मिळावी यासाठी कंपनीने डिजिटल माध्यमातून थेट विमा पॉलिसी देण्याचा निर्णय घेतला. 

    वरुण दुआ यांचा प्रवास संघर्ष, नाविन्य आणि चिकाटीने भरलेला आहे. त्यांनी कठोर परिश्रम, नवकल्पना आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विमा क्षेत्रात नवी क्रांती घडवली. चला, त्यांच्या जीवनप्रवासाचा आणि उद्योजकीय यशाचा आढावा या लेखातून घेऊया.

    प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

    वरुण दुआ यांचा जन्म १९८१ मध्ये दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील चंदर मोहन दुआ हे सरकारी कंपनीत अधिकारी होते, तर आई रश्मी दुआ या सरकारी शाळेच्या प्राचार्या होत्या. शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या या कुटुंबात वरुण यांना लहानपणापासूनच नवीन गोष्टी शिकण्याची आवड होती, ज्यामुळे त्यांचा अभ्यासात चांगला सहभाग असायचा.

    त्यांचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील वांद्रे-जुहू परिसरातील शाळेत झालं. पुढे त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली आणि त्यानंतर MICA (Mudra Institute of Communications, Ahmedabad) मधून मार्केटिंग आणि कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. या शिक्षणामुळे त्यांना मार्केटिंग आणि ब्रँडिंग यांचं सखोल ज्ञान मिळालं, जे त्यांना पुढे विमा क्षेत्रात नवे प्रयोग करण्यासाठी उपयोगी ठरलं.

    करिअरची सुरुवात

    MICA मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर वरुण दुआ यांनी आपल्या करिअरची सुरुवात Leo Burnett या जगप्रसिद्ध जाहिरात कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून केली. त्यांच्या कुटुंबाला नेहमीच त्यांच्यासाठी स्थिर आणि सुरक्षित नोकरी हवी होती, म्हणूनच त्यांनी सुरुवातीला नोकरी करण्याचा निर्णय घेतला. मार्केटिंग आणि ब्रँडिंग क्षेत्रातील आपल्या ज्ञानाचा उपयोग करत त्यांनी पुढे टाटा AIG लाइफ इन्शुरन्स आणि फ्रँकलिन टेम्पलटन इन्व्हेस्टमेंट्स यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम केलं. या कंपन्यांमध्ये काम करत असताना त्यांना विमा उद्योगातील कार्यपद्धती, ग्राहकांच्या गरजा आणि उद्योगाच्या मर्यादा यांची सखोल माहिती आणि समज मिळाली.

    या अनुभवातून त्यांना लक्षात आलं की विमा खरेदी प्रक्रिया अत्यंत जटिल, वेळखाऊ आणि पारदर्शकतेच्या अभावामुळे ग्राहकांसाठी त्रासदायक आहे. अनेक ग्राहकांना विमा पॉलिसी समजण्यात अडचण येत होती, तर काहींना क्लेम प्रक्रिया खूप वेळ घेणारी आणि कठीण वाटत होती. ही समस्या सोडवण्यासाठी काहीतरी नवीन आणि ग्राहकांसाठी सुरळीत प्रक्रिया निर्माण करणं गरजेचं होतं. म्हणून त्यांनी परंपरागत विमा उद्योगाला डिजिटल युगाशी जोडण्याचा संकल्प केला आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा दृढ निश्चय केला.

    व्यवसायाची सुरुवात आणि सुरुवातीचा संघर्ष 

    २०१६ मध्ये वरुण दुआ यांनी ACKO General Insurance ची स्थापना केली. ही भारतातील पहिली पूर्णतः डिजिटल विमा कंपनी आहे. “शून्य कमिशन, शून्य कागदपत्रे” या संकल्पनेने सुरू झालेल्या ACKO ने “फुल पैसा वसूल” या मोहिमेच्या माध्यमातून लोकांचं लक्ष वेधून घेतलं.

    ACKO ने विमा क्षेत्रात एक नवा बदल घडवला. पारंपरिक विमा कंपन्यांच्या जटिल आणि वेळखाऊ प्रक्रियांमुळे ग्राहकांना अडचणी येत होत्या. मात्र, ACKO ने डिजिटल आणि सोपी विमा सेवा उपलब्ध करून हे आव्हान सोडवलं. मोठ्या खर्चाशिवाय, त्यांनी परवडणाऱ्या आणि सहज समजणाऱ्या विमा पॉलिसी ग्राहकांसाठी तयार केल्या. AI आणि डेटा-ड्रिव्हन तंत्रज्ञानाचा वापर करून, त्यांनी विमा मंजुरी आणि क्लेम प्रक्रिया जलद आणि पारदर्शक केली.

    ACKO ने ओला, अमेझॉन, रेडबस, बायजूस यांसारख्या मोठ्या ब्रँडसोबत भागीदारी करून विमा सेवा अधिक सोपी केली. त्यांच्या उत्तम ग्राहक सेवेमुळे, ACKO भारतातील युनिकॉर्न कंपन्यांपैकी एक बनली आहे. आज ACKO फक्त वाहन आणि आरोग्य विमाच नाही, तर जीवन विमाही प्रदान करते, त्यामुळे ग्राहकांचा विश्वास आणि कंपनीचा विस्तार सातत्याने वाढत आहे.

    ACKO चा यशस्वी प्रवास

    ACKO ने आपल्या अभिनव दृष्टिकोनामुळे कमी वेळात मोठं यश मिळवलं. २०१८ मध्ये IRDAI कडून अधिकृत परवानगी मिळवल्यानंतर, कंपनीने वेगाने विस्तार केला. २०२१ मध्ये $२५५ मिलियन गुंतवणूक फंड उभारून, त्यांनी डिजिटल विमा क्षेत्रात आपलं स्थान अधिक मजबूत केलं. या यशामुळे २०२४ मध्ये ACKOचे मूल्यांकन $१.१ अब्ज डॉलर्स (सुमारे ९,००० कोटी रुपये) ओलांडले आणि कंपनीने भारतातील टॉप युनिकॉर्न स्टार्टअप्समध्ये स्थान मिळवलं.

    ACKO चे संस्थापक वरुण दुआ यांनी २०२३ मध्ये शार्क टँक इंडिया या प्रसिद्ध रियॅलिटी शोच्या सीझन ३ मध्ये परीक्षक म्हणून सहभाग घेतला. अनेक तरुण उद्योजकांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांना आर्थिक मदतही दिली. त्यांची व्यवसायवाढीतील दूरदृष्टी आणि ग्राहक-केंद्रितता ACKO च्या यशाचा मुख्य आधार आहे.

    आणखीन वाचा:

  • Gmail पैसे कसे कमावते? जाणून घ्या A to Z माहिती.

    Gmail पैसे कसे कमावते? जाणून घ्या A to Z माहिती.

    जीमेल (Gmail) ही गूगलची (Google) अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावी ई-मेल सेवा आहे. आज जगभरातील कोट्यवधी लोक जीमेलचा वापर करतात. जीमेलचा वापर आपण प्रत्येक दिवशी, कामाच्या गोष्टी, शालेय प्रोजेक्ट्स किंवा इतर बऱ्याच कारणासाठी करत असतो. आजकालचे मोठ्या प्रमाणात पत्रव्यवहार सुद्धा जीमेलच्या माध्यमातून होत असतात. गूगलचं व्यवसाय मॉडेल एवढं यशस्वी आहे की, फक्त जीमेलच्या माध्यमातून गूगलला अब्जावधी डॉलर्सचा महसूल मिळतो. मात्र, जीमेल पूर्णतः मोफत असल्यामुळे अनेक लोकांना प्रश्न पडतो की, गूगल जीमेलवरून पैसे कसे कमावते? जर तुम्हाला सुद्धा कधी ही शंका आली असेल आणि याचं उत्तर जाणून घ्यायचं असेल, तर हा लेख वाचा. 

    वापरकर्त्यांची माहिती आणि डेटा अ‍ॅनालिटिक्स

    गूगलचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणजे त्याचा डेटा-आधारित जाहिरात व्यवसाय. जेव्हा वापरकर्ते जीमेल वापरतात, तेव्हा गूगलला त्यांच्या ईमेलमधून काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती मिळते. उदाहरणार्थ, ईमेलचे विषय, ट्रेंडिंग कीवर्ड्स, खरेदी संदर्भ (shopping receipts) आणि उत्पादने किंवा सेवांबद्दल असलेले संवाद याबद्दल माहिती मिळते. ही माहिती गूगलच्या अल्गोरिदमद्वारे संकलित केली जाते आणि त्याचा वापर जाहिरातींचे टार्गेटिंग करण्यासाठी केला जातो.

    उदाहरणार्थ, जर एखादा युजर जीमेलवर फिटनेसबद्दल ईमेल्स मिळवत असेल, तर गूगल त्या युजरला फिटनेस उपकरणे किंवा आहारयुक्त जाहिराती दाखवते. यामुळे जाहिरातदारांना त्यांचे उत्पादन किंवा सेवा योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यास मदत होते आणि गूगलला या जाहिरातींच्या माध्यमातून मोठा महसूल मिळतो.

    जाहिरात उत्पन्न (Google Ads/AdSense) अ‍ॅड्स हे गूगलच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे आणि जीमेल त्यात महत्त्वाचा भाग आहे. जीमेलमध्ये वापरकर्त्यांच्या इनबॉक्समध्ये थेट जाहिराती दाखविल्या जातात. जीमेलमध्ये तीन विभाग असतात. ते म्हणजे  ‘इनबॉक्स, सोशल आणि प्रोमोशनल’. प्रोमोशनल टॅबमध्ये गूगल जाहिराती दाखवते. यामुळे, जीमेल वापरकर्त्यांना त्यांच्या इनबॉक्समध्ये आवश्यक असलेली माहिती मिळवता येते, त्याच वेळी गूगलच्या जाहिराती देखील दाखवल्या जातात. काही वेळा, इनबॉक्समध्ये देखील स्पॉन्सर्ड ईमेल्स येतात, जे विशिष्ट ब्रँडद्वारे पाठवले जातात. गूगल वापरकर्त्यांच्या ईमेलमधील शब्दांवर आधारित संबंधित कंटेक्स्चुअल अ‍ॅड्स (Contextual Ads) दाखवतो. गूगलला या जाहिरातींमधून उत्पन्न मिळते. जाहिरातदार गूगलला त्यांच्या जाहिरातींसाठी पैसे देतात आणि जर एखाद्या युजरने त्या जाहिरातीला क्लिक केले किंवा पाहिले, तर त्याचा महसूल थेट गूगलला मिळतो. यामुळे गूगलची जाहिरात प्रणाली अत्यंत यशस्वी ठरते, कारण ती वापरकर्त्यांच्या ईमेल अनुभवाशी संबंधित असते. जेव्हा जाहिराती वापरकर्त्यांच्या गरजांनुसार आणि आवडीनुसार असतात, तेव्हा त्या अधिक प्रभावी ठरतात आणि गूगलला त्याचबरोबर मोठा लाभ मिळवून देतात.

    गूगल वर्कस्पेस (Google Workspace)

    गूगल वर्कस्पेस हे गूगलचे प्रीमियम सबस्क्रिप्शन मॉडेल आहे, जे व्यवसायांसाठी खास डिझाइन केले आहे. या सेवेमध्ये व्यवसायांना कस्टम डोमेनसह ईमेल वापरण्याची परवानगी दिली जाते. यामध्ये 30 GB किंवा त्यापेक्षा अधिक स्टोरेज, प्रगत सुरक्षा उपाय, आणि गूगल ड्राईव्ह, कॅलेंडर, मीट सारख्या गूगलच्या सेवांचा समावेश आहे. गूगल वर्कस्पेससाठी दर महिन्याला प्रति वापरकर्त्यापासून ६ ते १८ अमेरिकन डॉलर घेतले जातात. हजारो व्यवसाय गूगल वर्कस्पेस वापरतात, ज्यामुळे गूगलला प्रचंड उत्पन्न मिळते.

    स्टोरेज योजना (Google Drive Storage Plans)

    जीमेलसह गूगल वापरकर्त्यांना 15 GB मोफत स्टोरेज पुरवतो, ज्यामध्ये ईमेल, गूगल ड्राईव्ह आणि गूगल फोटोज यांचा समावेश असतो. ज्या वापरकर्त्यांना अधिक स्टोरेज आवश्यक असते, ते गुगलचा पेड स्टोरेज प्लॅन्स खरेदी करतात. गूगलचे स्टोरेज प्लॅन्स 100 GB साठी 130 रुपये प्रति महिना, 200 GB साठी २१० रुपये प्रति महिना आणि 2 TB साठी ६५० रुपये प्रति महिना असे आहेत . यातुन गूगलला दर महिन्याला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो, कारण लाखो वापरकर्ते हे प्लॅन्स वापरत असतात.

     AI आणि मशीन लर्निंगवर आधारित सेवा

    जीमेलमध्ये विविध एआय-आधारित फिचर्स आहेत, जे वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्यात मदत करतात. ‘स्मार्ट रिप्लाय’ फिचर ईमेलच्या संदर्भानुसार त्वरित उत्तरांचे सुचवलेले पर्याय देते, ज्यामुळे वेळ वाचतो. ‘ईमेल फिल्टरिंग’ फिचर वापरकर्त्यांना महत्त्वपूर्ण ईमेल्स ओळखण्यास मदत करते, ज्यामुळे इनबॉक्स व्यवस्थापन अधिक सुलभ होते. हे सर्व फिचर्स वापरकर्त्यांचा वेळ वाचवतात आणि कार्यक्षमता वाढवतात, तसेच गूगलला प्रीमियम फिचर्ससाठी ग्राहक आकर्षित करण्यास मदत करतात, ज्यामुळे  त्यांच्या उत्पन्नात सतत वाढ होत असते.

    गूगलने जीमेलच्या माध्यमातून एक यशस्वी व्यावसायिक मॉडेल निर्माण केले आहे. वापरकर्त्यांना मोफत सेवा देऊन आणि त्यावर जाहिराती, डेटा अ‍ॅनालिटिक्स, प्रीमियम सबस्क्रिप्शन आणि स्टोरेज योजनांच्या माध्यमातून महसूल मिळवून गूगलने आपली जागतिक प्रतिष्ठा कायम ठेवली आहे. यामुळे गूगल जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांमध्ये आपले स्थान मजबूत करु शकले आहे. डेटा आधारित व्यवसाय मॉडेलने गूगलला वित्तीय आणि व्यवसायिक यश प्राप्त करण्यास मदत केली आहे, यामुळे गूगल जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांमध्ये आपले स्थान टिकवून आहे.

    आणखी वाचा :

  • Shiv Nadar Success Story | केवळ लाखभर रुपये गुंतवून सुरु केलेला व्यवसाय आज पोहोचलाय सात समुद्रापार

    Shiv Nadar Success Story | केवळ लाखभर रुपये गुंतवून सुरु केलेला व्यवसाय आज पोहोचलाय सात समुद्रापार

    या जगात वावरणाऱ्या कुणालाही मेहनतीशिवाय फळ मिळालेलं नाही, त्यामुळे जर का कुणाच्या यशाकडे पाहत अचंबित होत असाल, तर त्यामागे असणाऱ्या खडतर वाटचालीकडे सुद्धा नक्कीच लक्ष द्या. आज आम्ही देखील अशाच एका खेडेगावातून आलेल्या बिझनेस महारथीची गोष्ट तुमच्यासमोर उलगडून दाखवणार आहोत… 

    शिव नादर : जन्म आणि शिक्षण

    तुम्ही HCL Technologies या कंपनीबद्दल ऐकून आहात का? याच कंपनीचे मालक म्हणजे शिव नादर, ज्यांचा जन्म १४ जुलै १९४५ रोजी तामिळनाडू मधल्या तुतीकुडी जिल्ह्यातील मूलयपोजी नावाच्या एका छोट्या गावात झाला. दक्षिण भारतातील एका लहानशा गावात मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले शिव नादर हे आत्ताच्या घडीला भारतीय  IT क्षेत्रातील दिग्गजांपैकी एक बनले आहेत. बालपणापासूनच शिक्षणाची आवड असलेल्या शिव नाडार यांनी शिक्षणात बाजी मारत इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची (Electrical and Electronics Engineering) पदवी मिळवली. पदवी मिळवल्यानंतर आपण जसं नोकरी करण्याचा निर्णय घेतो, त्याप्रमाणेच  शिव नाडार यांनी देखील नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि वयाच्या २२व्या वर्षी पुण्यातील वालचंद ग्रुप ऑफ इंजिनियरिंगमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. 

    नोकरी ते व्यवसायाचा प्रवास:

    अनेकवेळा आपण एखादं काम करत असतो, मात्र त्यात खुश असत नाही किंवा आपल्या इच्छा-आकांशा पूर्ण न झाल्याने केलेल्या कामातून म्हणावा तसा आनंद मिळत नाही. शिव नाडार यांच्या बाबतीतही काही अंशी असंच घडलं. त्यांना नेहमीच स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची तीव्र इच्छा होती. जेव्हा आपण मनात तीव्र इच्छा बाळगतो तेव्हा कितीही खडतर प्रवास करण्याची, मेहनत घेण्याची आपली तयारी असते. शिव नाडार याच विचारसरणीचे असल्याने कामाच्या अनुभवाची पुंजी सोबत घेऊन त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय पक्का केला. या प्रवासात त्यांना काही मित्रांची सोबत लाभली जे देखील चौकटीच्या बाहेर जात  काहीतरी वेगळं करण्याच्या विचारात होते. समविचारी माणसांनी एकत्र येणं हा त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला आणि वर्ष १९७६ मध्ये पाच मित्रांनी सोबत येऊन मायक्रोकॉम्प नावाची कंपनी उभारली, ही कंपनी त्या काळात कॅल्क्युलेटर विकण्याचे काम करायची. 

    काही वर्षांच्या मेहनतीनंतर याच कंपनीचं  रूपांतर हिंदुस्थान कम्प्युटर्स लिमिटेडमध्ये (Hindustan Computers Limited) करण्यात आलं, ज्याला आपण HCL Technologies म्हणून ओळखतो. काही कारणास्तव त्यावेळी IMB सारख्या दिग्गज कंपनीला भारतातून काढता पाय घ्यावा लागला होता आणि हीच संधी नादरआणि समूहासाठी महत्वाची ठरली. व्यावसायिकाचे सर्व गुण घेऊन जन्मलेल्या नादर यांनी मिळालेल्या संधीचं सोन्यात रूपांतर केलं आणि IMB च्या अनुपस्थितीमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढली. केवळ १,८७,ooo रुपयांच्या गुंतवणुकीमधून सुरु झालेल्या HCL ला पुढे राज्य सरकारकडून २० लाख रुपयांची आर्थिक मदत पुरवण्यात आली आणि बदल्यात सरकारने कंपनीचा २६ टक्के वाटा मिळवला. 

    वर्ष १९७८ मध्ये HCL कडून पहिला वाहिला पर्सनल कंप्युटर (Personal Computer/ PC) बाजारात आणण्यात आला आणि हा अनोखा बदल संपूर्ण बाजारपेठेसाठी महत्वाचा ठरला. HCL Technologies यशाची शिखरं काबीज करत असतानाच शिव नादर यांनी फार इस्ट कम्प्युटर्स (Far East Computers) नावाची आणखीन एक कंपनी सुरु करत आंतराष्ट्रीय व्यवसायाचा श्रीगणेशा केला. १९८० मध्ये याच कंपनीच्या माध्यमातून नाडार सिंगापूरमध्ये IT Hardware विकायचे. तुम्हाला माहिती आहे का त्यावेळी फक्त एक वर्षाच्या व्यवसायातून शिव नादर यांच्या कंपनीचे मूल्य ३ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचले होते. देशात आणि परदेशात नाव कमावत असलेल्या नादर यांनी इथून मात्र कधीच मागे वळून पाहिलं नाही. वर्षांची  मेहनत आणि कष्टांच्या जोरावर त्यांनी  जागतिक पातळीवरील ‘फोर्ब्स’ (Forbes) च्या यादीत अनेकवेळा नाव पटकावलं. शिव नादर यांची मेहनत आणि सोबत असेल्या मंडळींची साथ यामुळे आज HCL ला केवळ एक कंपनी म्हणून नाही, तर ब्रँड म्हणून ओळखलं जातं.

    फोर्ब्सच्या यादीनुसार शिव नादर हे भारतातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांची एकूण संपत्ती ३३.६ बिलियन डॉलर्सच्या घरात पोहोचली आहे. आशिया खंडात श्रीमंत व्यक्तींमध्ये नादर यांचा ९ वा, तर जागतिक स्तरावर ४५ वा क्रमांक लागतो म्हणूनच शिव नादर हे नाव आज केवळ भारताच्या व्यावसायिक क्षेत्रातच नाही, तर जगभरात पसरलं आहे. तसेच त्यांच्या नेतृवाखाली HCL ने जगभरातील ४४ विविध देशांमध्ये विस्तार केला आहे. कैक वर्ष मेहनत केल्यानंतर काही काळापूर्वीच त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र ते नेहमी म्हणतात की, “प्रत्येक माणसाने लक्ष ठरवण्यासाठी स्वप्न पाहिलं पाहिजे, कारण स्वप्न  पाहिल्याशिवाय लक्ष ठरवता येत नाही आणि ज्याने लक्षच ठरवलेलं नाही, तो यश संपादन करू शकत नाही.” नादर हे अध्यक्षपदावरून बाजूला झाल्यानंतर आता त्यांची मुलगी रोशनी नादर-मल्होत्रा कंपनीच्या अध्यक्षपदाची जवाबदारी सांभाळते, तसेच शिव नादर हे आजही व्यवस्थापकीय संचालक म्हणून कायम कार्यरत आहेत. 

    शिव नादर यांनी लहानपणी हलाखीचे दिवस सोसले होते, घरची आर्थिक परिस्थिती काही खास चांगली नव्हती.  मात्र कधीही त्यांनी स्वतःच्या परिस्थितीला दोष दिला नाही, याउलट सतत मेहनत करत परिस्थितीवर मात करण्याची जिद्ध उराशी बाळगली. शिक्षण घेत असताना त्यांना अनेक  हालअपेष्टा सोसाव्या लागल्या तरीही खचून न जाता एका शाळेतून दुसऱ्या शाळेत बदली करत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण संपलं तरीही समोर उभी ठाकलेली आव्हानं काही संपण्याचं नाव घेत नव्हती. हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करत इथवर आल्यांनतर, नोकरीमधून काहीशी रक्कम मिळायची. मात्र मिळणाऱ्या पैशांकडे दुर्लक्ष करत स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेणं देखील सोपं नव्हतं. सर्वात महत्वाचं म्हणजे त्याकाळात भारतात कम्प्युटर्स बद्दल अधिक माहिती उपलब्ध नव्हती,लोकांना माहिती नसलेल्या वस्तूची विक्री करणं आणि स्पर्धात्मक वातावरणात नवख्या माणसाने व्यवसाय सुरु करणं  ही वाटते तेवढी साधी आणि सोपी गोष्ट नाही. 

    शिशिव नादर यांचे सामाजिक कार्य:

    अझीझ प्रेमजी, कुमार मंगलम बिर्ला, मुकेश अंबानी यांच्यासोबत शिव नादर यांना आधुनिक भारतातील एक दानशूर व्यक्ती म्हणून ओळखलं जातं, कारण या दिग्गज उद्योगपतीने नेहमीच स्वतःजवळ असलेली धनाची पुंजी गरजू माणसांसाठी खुली केली आहे. विद्याज्ञान, शिव नादर युनिव्हर्सिटी, शिव नादरस्कुल, किरण नादर म्युझियम ऑफ आर्टस् अशा एक ना अनेक माध्यमांमधून त्यांनी समाजापर्यंत वेळोवेळी मदत पोहोचवली आणि म्हणूनच हुरून इंडिया फिलोनत्रोफीच्या (Hurun India Philanthropy List) यादीत शिव नाडर यांचं नाव पाहायला मिळतं. एवढंच नाही तर आत्तापर्यंत त्यांनी शिव नादर फाउंडेशनतर्फे शिक्षण तसेच आरोग्य क्षेत्रांना आर्थिक मदत पोहोचवून महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. 

    आणखीन वाचा: