Category: आर्थिक

  • SIP 8-4-3 Formula Marathi: चक्रवाढ व्याजाने १५ वर्षांत १ कोटींची संपत्ती कशी तयार कराल?

    SIP 8-4-3 Formula Marathi: चक्रवाढ व्याजाने १५ वर्षांत १ कोटींची संपत्ती कशी तयार कराल?

    SIP 8-4-3 Formula Marathi: पहिला १ रुपया कमवायला जितका वेळ लागतो, तितकाच वेळ पुढचे १० रुपये कमवायला लागत नाही! हाच आहे चक्रवाढ व्याजाचा जादूई ‘८-४-३’ फॉर्म्युला…

    म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू केल्यानंतर मार्केटच्या चढ-उतारांमुळे मनात धाकधूक होणे स्वाभाविक आहे. जेव्हा शेअर बाजार खाली येतो, तेव्हा अनेक जण घाबरून आपली गुंतवणूक थांबवण्याचा विचार करतात. मात्र, गुंतवणुकीत सातत्य नसेल तर संपत्ती निर्मितीचा मूळ उद्देशच हरवून जातो. त्यामुळे बाजारातील अस्थिरतेकडे लक्ष देण्यापेक्षा, आपली गुंतवणूक किती काळ टिकवून ठेवायची आणि ती कशी वाढवायची हे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.

    दीर्घकाळात करोडोंचा निधी उभा करण्यासाठी तज्ज्ञ सध्या ‘८-४-३ चा फॉर्म्युला’ (8-4-3 Rule) वापरण्याचा सल्ला देतात. हा केवळ एक आकडा नसून चक्रवाढ व्याजाची ताकद दाखवणारा एक प्रभावी मंत्र आहे. गेल्या काही वर्षांत अनेक यशस्वी गुंतवणूकदारांनी याच सूत्राचा वापर करून मोठी संपत्ती निर्माण केली आहे. आजच्या लेखात आपण हाच फॉर्म्युला सविस्तरपणे समजून घेणार आहोत.

     SIP म्हणजे नक्की काय? (What is SIP?)

    म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग म्हणजे SIP (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन). याचा अर्थ असा की, तुम्हाला एकदम मोठी रक्कम गुंतवण्याची गरज नाही; तुम्ही दर महिन्याला तुमच्या बजेटनुसार एक ठराविक रक्कम (उदा. ५०० किंवा १००० रुपये) नियमितपणे गुंतवू शकता. ही शिस्तबद्ध पद्धत मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांसाठी संपत्ती निर्माण करण्याचे एक उत्तम साधन ठरते.

    SIP चा सर्वात मोठा फायदा म्हणजे ‘रुपी कॉस्ट एव्हरेजिंग’. जेव्हा शेअर बाजार तेजीत असतो, तेव्हा तुम्हाला तुमच्या पैशात कमी ‘युनिट्स’ मिळतात, पण जेव्हा बाजार घसरतो, तेव्हा त्याच रकमेत जास्त ‘युनिट्स’ खरेदी केले जातात. उदाहरण घ्यायचे झाले तर, तुमची ५०० रुपयांची SIP असेल आणि युनिटचा भाव २५० रुपये असेल, तर तुम्हाला २ युनिट्स मिळतील. पण जर बाजार पडला आणि भाव १०० रुपये झाला, तर तुम्हाला ५ युनिट्स मिळतील. यामुळे बाजारातील चढ-उताराचा धोका कमी होतो आणि दीर्घकाळात तुमच्या गुंतवणुकीची सरासरी किंमत संतुलित राहते.

    काय आहे हा ‘८-४-३’ फॉर्म्युला? (8-4-3 Formula Explained)

    शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते, संपत्ती निर्मितीसाठी ‘८-४-३ चा फॉर्म्युला’ हा एक अत्यंत यशस्वी आणि ऐतिहासिक मंत्र मानला जातो. यातील पहिले ८ वर्षे हे ‘संयमाचा काळ’ असतात. सुरुवातीला तुमच्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा हा संथ किंवा अगदी सामान्य वाटू शकतो. खरं तर हा टप्पा तुमच्या संयमाची परीक्षा घेणारा असतो, कारण याच काळात अनेक गुंतवणूकदार कंटाळून किंवा घाबरून आपली SIP बंद करतात; मात्र खरी जादू पाहण्यासाठी हा पाया मजबूत करणे आवश्यक असते.

    एकदा का तुम्ही पहिली ८ वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केली की, चक्रवाढ व्याजाचा (Compounding) वेग वाढायला लागतो. पुढच्या अवघ्या ४ वर्षांत तुमची एकूण जमा झालेली रक्कम जवळपास दुप्पट होते. आणि त्यापुढील ३ वर्षांत तर गुंतवणुकीची अशी काही ‘विस्फोटक वाढ’ होते की, तुमचा एकूण फंड वेगाने कोटींच्या घरात पोहोचू शकतो. म्हणजेच, १५ वर्षांच्या या प्रवासात शेवटची ३ वर्षे तुमच्या संपत्तीमध्ये सर्वात मोठी भर घालतात.

     उदाहरणातून समजून घेऊया 

    समजा तुम्ही दरमहा २५,००० रुपयांची SIP सुरू केली आणि तुम्हाला त्यावर वार्षिक सरासरी १२% परतावा मिळाला, तर या फॉर्म्युल्यानुसार तुमची संपत्ती कशी वाढते ते पाहूया. सुरुवातीच्या ८ वर्षांत तुमची अंदाजित रक्कम ३९.२५ लाख रुपयांपर्यंत पोहोचते. हा काळ गुंतवणुकीचा पाया रचण्याचा असतो, जिथे वाढ संथ वाटली तरी शिस्त महत्त्वाची ठरते.

    खरा चमत्कार यानंतरच्या टप्प्यात पाहायला मिळतो. पुढच्या केवळ ४ वर्षांत (म्हणजेच १२ व्या वर्षी) ही रक्कम जवळपास दुप्पट होऊन ७७.०२ लाख रुपये होते. आणि त्यानंतरच्या अवघ्या ३ वर्षांत (१५ व्या वर्षी) हीच रक्कम तब्बल १ कोटी १८ लाख रुपयांचा टप्पा ओलांडते. विशेष म्हणजे, जे पहिले ३९ लाख जमवण्यासाठी तुम्हाला ८ वर्षे लागली, तेवढीच संपत्ती पुढच्या फक्त ३-४ वर्षांत चक्रवाढ व्याजामुळे (Compounding) आपोआप तयार होते.

    काय सांगतो ऐतिहासिक डेटा?

    भारतीय शेअर बाजाराचा इतिहास एक अतिशय महत्त्वाची गोष्ट अधोरेखित करतो, ती म्हणजे गुंतवणुकीतील सुरक्षितता. आकडेवारीनुसार, ज्या गुंतवणूकदारांनी आपली SIP किमान ८ वर्षांपेक्षा जास्त काळ सातत्याने सुरू ठेवली आहे, त्यांना कधीही ‘नकारात्मक परतावा’ (Negative Returns) मिळालेला नाही. याचाच अर्थ असा की, दीर्घकाळ मार्केटमध्ये टिकून राहिल्यामुळे मुद्दल गमावण्याची भीती उरत नाही आणि गुंतवणुकीवर चांगला नफा मिळण्याची शक्यता वाढते.

    SIP 8-4-3 Formula Marathi: शेअर बाजारात रोजच्या स्तरावर कितीही चढ-उतार आले, तरी दीर्घकालीन गुंतवणूक तुम्हाला केवळ आर्थिक सुरक्षितता देत नाही, तर संपत्ती निर्मितीची खात्रीशीर संधीही उपलब्ध करून देते. त्यामुळे बाजाराच्या तात्पुरत्या घसरणीला न घाबरता, संयम ठेवून आपली SIP चालू ठेवणे हाच खऱ्या अर्थाने श्रीमंत होण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.

    मित्रांनो, म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही बाजार जोखमीवर आधारित असते. ऐतिहासिक आकडेवारीनुसार दीर्घकाळात फायदा होत असला, तरी प्रत्यक्षात गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवर्जून घ्यावा.

    आणखी वाचा:

  • पेट्रोल विक्रीतून जास्त नफा कोणाला? तेल कंपन्या की सरकार; पहा करांचा हिशोब

    पेट्रोल विक्रीतून जास्त नफा कोणाला? तेल कंपन्या की सरकार; पहा करांचा हिशोब

    इस्रायल आणि इराण युद्धाचा भारतावर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. LPG गॅससह कच्च्या तेलाच्या किंमतीतही वाढ करण्यात आली. दरम्यान, भारतात दररोज लाखो-करोडो नागरिक पेट्रोल आणि डिझेल विकत घेत असतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, प्रति लिटर पेट्रोलमागे सरकार आणि तेल कंपन्यांना किती नफा होत असेल? तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल प्रत्येकी एका लिटर मागे एका दिवसात तब्बल 380 कोटी रुपये कर स्वरुपात सरकारच्या तिजोरीत जमा होत असतात.

    आंतरराष्ट्रीय बाजारातून कच्च्या तेलाची आयात करणे, त्यावर रिफायनरीमध्ये प्रक्रिया करणे आणि पंपांपर्यंत वाहतूक करणे, या सगळ्याचा एकूण खर्च मिळून १ लिटर पेट्रोलची मूळ किंमत साधारणपणे ₹४५ ते ₹५० च्या आसपास पडते. ही मूळ किंमत घेऊन जेव्हा तेल कंपन्या जसे की IOCL, BPCL बाजारात येतात, तेव्हा त्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून प्रचंड प्रमाणात कर (Taxes) लादला जातो. जेव्हा आपण पेट्रोल पंपावर जाऊन १ लिटर पेट्रोलसाठी सुमारे ₹१०० ते ₹११० मोजतो, तेव्हा त्यातील जवळपास निम्मे पैसे हे थेट सरकारच्या तिजोरीत टॅक्सच्या रूपाने जमा होत असतात.

    या किमतीवर केंद्र सरकार साधारण ₹२० ते ₹२५ प्रति लिटर एक्साईज ड्युटी (Excise Duty) वसूल करते, तर विविध राज्य सरकारे त्यावर ₹१५ ते ₹३० पर्यंत व्हॅट (VAT) किंवा सेस लावतात. याशिवाय पेट्रोल पंप चालवणाऱ्या डीलरला प्रति लिटर सुमारे ₹३.८० कमिशन मिळते. म्हणजेच, तुम्ही खरेदी करत असलेल्या पेट्रोलच्या एकूण किमतीमध्ये तब्बल ४०% ते ५०% पेक्षा जास्त वाटा हा केवळ केंद्र आणि राज्य सरकारच्या करांचा असतो. तर दुसरीकडे, तेल कंपन्यांचा निव्वळ नफा (Net Margin) प्रति लिटर ₹३ ते ₹४ च्या दरम्यान असतो, जो आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या चढ-उतारानुसार बदलत राहतो. थोडक्यात सांगायचे तर, १ लिटर पेट्रोलमागे कंपन्यांपेक्षा सरकारलाच कराच्या माध्यमातून सर्वात मोठा आणि फायद्याचा नफा मिळतो, ज्याचा थेट भार सर्वसामान्यांच्या खिशावर पडतो.

  • Hybrid Fund: गुंतवणुकीचा स्मार्ट फॉर्म्युला!

    Hybrid Fund: गुंतवणुकीचा स्मार्ट फॉर्म्युला!

    Hybrid Fund: तुम्हालाही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून भरघोस नफा कमवायचा आहे, पण “मार्केट पडलं तर पैसे बुडतील” ही भीती वाटतेय? मग टेंशन सोडा; कारण कमी रिस्क आणि बँकेपेक्षा जास्त परतावा मिळवून देणारा Hybrid Fund (हायब्रीड फंड) आहे तुमच्या पैशांचे खरे सुरक्षा कवच!

    पण हे हायब्रीड फंड नक्की काय आहे आणि ते कसे काम करते? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, हायब्रीड फंड म्हणजे तुमच्या गुंतवणुकीची एक ‘मल्टी-कुझिन थाळी’ आहे. ज्याप्रमाणे एका थाळीत गोड, तिखट, आणि लोणचं असं सगळं असतं, तसंच हायब्रीड फंड तुमचे पैसे एकाच वेळी Equity (शेअर्स) आणि Debt (सुरक्षित सरकारी रोखे) अशा दोन्ही ठिकाणी गुंतवतो.

    मार्केटमधील ऑलराउंडर खेळाडू!

    जेव्हा शेअर मार्केट वर जातं, तेव्हा यातील Equity Component तुम्हाला चांगला नफा मिळवून देतो. परंतु, जेव्हा मार्केटमध्ये चढ-उतार होतात किंवा मार्केट खाली येतं, तेव्हा Debt Component तुमच्या गुंतवणुकीला एक सुरक्षित कवच देतो.

    थोडक्यात काय तर, हा फंड म्हणजे क्रिकेटमधला तो All-rounder खेळाडू आहे, जो बॅटिंग आणि बॉलिंग अशा दोन्ही आघाड्यांवर तुमची टीम म्हणजेच तुमचे पैसे सुरक्षित ठेवतो.

    हायब्रीड फंडाची ३ खास वैशिष्ट्ये (Key Features)

    • रिस्क आणि रिटर्न्सचा अचूक समतोल (Risk-Return Balance): यामध्ये एकाच वेळी दोन वेगवेगळ्या क्षेत्रांत गुंतवणूक होत असल्याने जोखीम आपोआप कमी होते आणि परतावा उत्तम मिळतो.
    • प्रोफेशनल मॅनेजमेंट (Professional Management): मार्केटच्या हालचालीनुसार तुमचे Fund Manager आपोआप गुंतवणुकीचे प्रमाण (Asset Allocation) बदलतात. त्यामुळे तुम्हाला स्वतःला सतत मार्केटचे ग्राफ्स पाहण्याची गरज नसते.
    • नवशिक्यांसाठी सर्वोत्तम (Best for Beginners): जर तुम्ही पहिल्यांदाच Share Market किंवा म्युच्युअल फंडामध्ये येत असाल, तर हायब्रीड फंड हा तुमच्यासाठी सर्वात सुरक्षित आणि सोपा पर्याय ठरू शकतो.

    आणखी वाचा

  • लोन आणि EMI चे टेन्शन संपवा! कर्जातून बाहेर पडण्याचे २ भन्नाट मार्ग..

    लोन आणि EMI चे टेन्शन संपवा! कर्जातून बाहेर पडण्याचे २ भन्नाट मार्ग..

    EMI: १ तारखेला पगार होतो आणि ५ तारीख येईपर्यंत बँक अकाउंट रिकामं होत. EMI, क्रेडिट कार्ड बिल आणि लोनच्या हप्त्यांमध्ये तुमचाही पगार गायब होतोय? तर मित्रांनो, कर्ज घेणं चुकीचं नाही, पण कर्जाच्या डेथ ट्रॅपमध्ये अडकणं भयंकर आहे. आज मी तुम्हाला या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचे जगप्रसिद्ध २ भन्नाट उपाय सांगणार आहे, जे तुमचे बँक अकाउंट पुन्हा जिवंत करतील.

    पहिली पद्धत आहे डेट स्नोबॉल (Debt Snowball Method).


    यामध्ये व्याजाचा विचार बाजूला ठेवा. तुमच्या सर्व कर्जांची एक लिस्ट बनवा त्यामध्ये सर्वात आधी सर्वात लहान कर्ज पूर्ण ताकदीने फेडून टाका. जेव्हा पहिलं छोटं कर्ज संपतं ना, तेव्हा मिळणारा मानसिक आनंद आणि आत्मविश्वास पुढची मोठी कर्जं संपवायला ऊर्जा देतो. जसा बर्फाचा गोळा डोंगरावरून खाली येताना मोठा होतो, तसाच तुमचा कर्ज फेडण्याचा आत्मविश्वास वाढतो.

    दुसरी पद्धत आहे डेट एव्हलांच (Debt Avalanche Method).


    जर तुम्हाला गणिताची भाषा समजते आणि हुशारीने पैसे वाचवायचे असतील, तर ही पद्धत तुमच्यासाठी बेस्ट आहे. यामध्ये सर्वात आधी ज्या कर्जावर सर्वात जास्त व्याज आहे, उदा. क्रेडिट कार्ड लोन ज्यावर वार्षिक ३६% ते ४२% व्याज असतं, ते आधी संपवा. यामुळे तुमचं व्याजात जाणारं हजारो रुपयांचं नुकसान तात्काळ थांबतं. हे संपलं की, त्यापेक्षा कमी व्याज असलेलं कर्ज टार्गेट करा आणि ते संपवा.

    EMI: थोडक्यात सांगायचं तर पहिली पद्धत तुम्हाला मानसिक समाधान देते, तर दुसरी पद्धत तुमचे खरे पैसे वाचवते. फायनान्शियल एक्सपर्ट्सच्या मते, ८०% लोक स्नोबॉल पद्धतीमुळे कर्जातून लवकर बाहेर पडतात कारण माणसाला रिझल्ट्स लवकर हवे असतात. तुम्हाला या दोन्हींपैकी कोणती पद्धत जास्त प्रॅक्टिकल वाटते? स्नोबॉल की एव्हलांच? कमेंट करून नक्की सांगा.

    आणखी वाचा :

  • CIBIL Score कमी आहे? या ५ सोप्या टिप्सने वाढवा तुमचा क्रेडिट स्कोर

    CIBIL Score कमी आहे? या ५ सोप्या टिप्सने वाढवा तुमचा क्रेडिट स्कोर

    CIBIL Score: तुम्हालाही तुमच्या स्वप्नातलं घर किंवा गाडी घ्यायची आहे पण कमी क्रेडिट स्कोरमुळे तुमची फाईल रिजेक्ट होतेय? तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे. आज मी तुम्हाला क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी भन्नाट टिप्स सांगणार आहे त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.

    घर, गाडी किंवा साधा मोबाईल खरेदी करताना सिबिल स्कोर विचारला जातो. तुझा सिबील स्कोर (CIBIL Score) किती आहे? चांगलं आहे कि खराब झालंय असे संवाद आपण अनेकदा ऐकतो पण तुम्हाला माहिते का हा सिबिल स्कोर नक्की वाढवायचा कसा? चला सांगते…

    १. पेमेंटमध्ये कधीही उशीर करू नका


    क्रेडिट स्कोर (CIBIL Score) वाढवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या कर्जाचे हप्ते (EMI) आणि क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरा. अगदी एका दिवसाचा उशीर सुद्धा तुमचा स्कोर खाली आणू शकतो.

    २. क्रेडिट युटिलायझेशन रेशो तपासा (Credit Utilization Ratio)


    तुमच्या क्रेडिट कार्डची जेवढी मर्यादा आहे, त्यापैकी फक्त ३०% पर्यंतच वापर करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही सतत पूर्ण लिमिट वापरत असाल, तर बँकांना तुम्ही ‘क्रेडिट हंग्री’ आहात असे वाटते.

    ३. एकाच वेळी अनेक कर्जांसाठी अर्ज करू नका


    जेव्हा तुम्ही वारंवार कर्जासाठी चौकशी करता, तेव्हा बँका तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासतात, ज्याला Hard Inquiry म्हणतात. यामुळे तुमचा स्कोर काही पॉइंट्सने कमी होऊ शकतो.

    ४. जुन्या क्रेडिट अकाउंटचे महत्त्व


    तुमचे जुने क्रेडिट कार्ड किंवा जुनी कर्जे बंद करण्यापूर्वी विचार करा. कारण तुमच्या क्रेडिट इतिहासाचा कालावधी जेवढा जास्त, तेवढा तुमचा स्कोर चांगला राहण्यास मदत होते.

    CIBIL Score कमी आहे? या ५ सोप्या टिप्सने वाढवा तुमचा क्रेडिट स्कोर

    ५. क्रेडिट रिपोर्टमधील चुका सुधारा


    वर्षातून किमान एकदा तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासा. कधीकधी बँकांच्या चुकीमुळे तुमच्या नावावर चुकीची माहिती दिसते. अशा चुका दुरुस्त करून घेतल्यास क्रेडिट स्कोर लगेच सुधारतो.

    तुम्हीही या टिप्स फॉलो केल्या तर तुमच्या खराब झालेला सिबिल स्कोर नक्कीच वाढेल. लक्षात ठेवा सिबिल स्कोर (CIBIL Score) वाढवण्याची प्रक्रिया एका दिवसात पूर्ण होत नाही त्यासाठी तुमची आर्थिक शिस्त महत्वाची आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.

    आणखी वाचा:

  • Demat Account Transfer Guide 2026: शुल्क, प्रक्रिया आणि नियम

    Demat Account Transfer Guide 2026: शुल्क, प्रक्रिया आणि नियम

    Demat Account Transfer Guide 2026: शेअर बाजारात गुंतवणूक करताना अनेकदा आपण एका ब्रोकरकडून दुसऱ्या ब्रोकरकडे जाण्याचा विचार करतो. याचे कारण ब्रोकरेज चार्जेस कमी करणे असो किंवा नवीन ब्रोकरच्या प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ घेणे असो; डीमॅट खात्यातील शेअर्स ट्रान्सफर करणे आता पूर्वीपेक्षा कितीतरी पतीने सोपे आणि सुरक्षित झाले आहे. १ एप्रिल २०२६ पासून लागू झालेल्या सेबीच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ही प्रक्रिया आता अधिक पारदर्शक झाली आहे.

    डीमॅट खाते ट्रान्सफर का करावे? ( How to transfer a Demat account?)

    गुंतवणूकदार आपले शेअर्स एका खात्यातून दुसऱ्या खात्यात हलवण्याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:

    • कमी ब्रोकरेज: नवीन डिस्काउंट ब्रोकर्स अत्यंत कमी शुल्कात सेवा देत आहेत.
    • प्रगत टूल्स: २०२६ मध्ये अनेक ब्रोकर्स एआय-आधारित (AI) पोर्टफोलिओ ॲनालिसिस टूल्स पुरवत आहेत.
    • एकत्रीकरण: एकापेक्षा जास्त डीमॅट खाती असल्यास, व्यवस्थापनाच्या सोयीसाठी ती एकाच खात्यात विलीन करणे फायदेशीर ठरते.
    • वारसाहक्क: कुटुंबातील सदस्याच्या नावे शेअर्स ट्रान्सफर करण्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक असते.

    ऑनलाईन ट्रान्सफर प्रक्रिया (Easy & Fastest)

    जर तुमचे जुने आणि नवीन खाते एकाच डिपॉझिटरीमध्ये (उदा. दोन्ही CDSL किंवा दोन्ही NSDL) असेल, तर ही प्रक्रिया अवघ्या काही तासांत पूर्ण होते.

    A) CDSL ‘Easiest’ पोर्टलद्वारे:

    १. नोंदणी: CDSL च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘Easiest’ सुविधेसाठी नोंदणी करा.

    २. ट्रस्टेड अकाऊंट जोडा: ज्या नवीन डीमॅट खात्यात (BOID) शेअर्स पाठवायचे आहेत, ते ‘Trusted Account’ म्हणून जोडा.

    ३. शेअर्सची निवड: तुमच्या पोर्टफोलिओमधील जे शेअर्स ट्रान्सफर करायचे आहेत, त्यांचे ISIN नंबर निवडा.

    ४. डिजिटल स्वाक्षरी: २०२६ च्या नवीन नियमांनुसार, आता ‘आधार ई-केवायसी’ (Aadhaar e-KYC) द्वारे तात्काळ पडताळणी केली जाते.

    ५. पुष्टीकरण: विनंती सबमिट केल्यावर २४ तासांच्या आत शेअर्स नवीन खात्यात जमा होतात.

    B) NSDL ‘Speed-e’ पोर्टलद्वारे:

    १. NSDL च्या ‘Speed-e’ प्लॅटफॉर्मवर लॉगिन करा.

    २. ‘Delivery Instruction’ पर्याय निवडून नवीन खात्याचा तपशील भरा.

    ३. ई-टोकन किंवा डिजिटल स्वाक्षरी वापरून व्यवहाराची पुष्टी करा.

    ऑफलाईन ट्रान्सफर प्रक्रिया (पारंपारिक मार्ग)

    जर तुम्हाला ऑनलाईन प्रक्रिया कठीण वाटत असेल, तर तुम्ही ऑफलाईन मार्ग निवडू शकता:

    DIS स्लिप: तुमच्या जुन्या ब्रोकरकडून ‘डिलिव्हरी इन्स्ट्रक्शन स्लिप’ (DIS) मागवून घ्या.

    तपशील भरा: यामध्ये ISIN नंबर, शेअर्सची संख्या आणि नवीन ब्रोकरचा ID अचूक भरा.

    सबमिशन: ही स्लिप स्वाक्षरी करून ब्रोकरच्या ऑफिसमध्ये जमा करा. साधारण ३-५ कामकाजाच्या दिवसांत प्रक्रिया पूर्ण होते.

    २०२६ मधील महत्त्वाचे बदल आणि अपडेट्स (Fact Check)

    T+0 सेटलमेंट: एप्रिल २०२६ पासून सेबीने निवडक शेअर्ससाठी ‘T+0’ सेटलमेंट सुरू केली आहे, ज्यामुळे अंतर्गत ट्रान्सफर (Intra-depository) आता त्याच दिवशी पूर्ण होऊ शकते.

    नॉमिनेशन अनिवार्य: जर तुमच्या जुन्या खात्यात नॉमिनेशन अपडेट नसेल, तर ट्रान्सफर प्रक्रिया नाकारली जाऊ शकते.

    शुल्क (Charges): जर तुम्ही जुने खाते बंद करत असाल (Account Closure), तर शेअर्स ट्रान्सफर करण्यासाठी ब्रोकर कोणतेही शुल्क आकारू शकत नाही (सेबी नियम). मात्र, खाते चालू ठेवून ट्रान्सफर केल्यास प्रति कंपनी साधारण ₹१५ ते ₹२५ + GST शुल्क लागू शकते.

    टॅक्स (Taxation): लक्षात ठेवा, स्वतःच्याच एका खात्यातून दुसऱ्या खात्यात शेअर्स ट्रान्सफर करणे हे ‘विक्री’ (Sale) मानले जात नाही, त्यामुळे यावर कॅपिटल गेन टॅक्स लागू होत नाही. मात्र, दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर करताना ‘गिफ्ट डीड’ आवश्यक आहे.

    सावधानता आणि टिप्स

    ISIN नीट तपासा: प्रत्येक शेअरचा १२ अंकी ISIN कोड वेगळा असतो, तो भरताना चूक करू नका.

    UIN आवश्यकता: मोठ्या मूल्याच्या (₹५ लाखांहून अधिक) व्यवहारांसाठी आता वर्धित ऑथेंटिकेशन (Enhanced Authentication) अनिवार्य करण्यात आले आहे.

    ब्रोकर कन्फर्मेशन: प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दोन्ही ब्रोकर्सकडून ‘कन्फर्मेशन मेसेज’ आल्याची खात्री करा.

    डीमॅट खाते ट्रान्सफर करणे ही आता क्लिष्ट प्रक्रिया राहिलेली नाही. २०२६ मधील डिजिटल क्रांतीमुळे तुम्ही घरबसल्या तुमचे आर्थिक नियोजन अधिक सक्षम करू शकता. योग्य ब्रोकर निवडा आणि तुमच्या गुंतवणुकीचा प्रवास सुखकर करा.

    तुम्हाला तुमचे डीमॅट खाते ट्रान्सफर करताना काही तांत्रिक अडचण येत आहे का? किंवा नवीन ‘T+0’ नियमांबद्दल अधिक माहिती हवी आहे? कमेंट्समध्ये नक्की विचारा! अशाच आर्थिक आणि शेअर बाजारविषयक ताज्या अपडेट्ससाठी आमच्या ब्लॉगला पुन्हा भेट द्या!

  • June 1 Rule Change: जाणून घ्या 6 मोठे बदल

    June 1 Rule Change: जाणून घ्या 6 मोठे बदल

    June 1 Rule Change: मे महिन्यातील कडक उष्णतेच्या लाटेनंतर आणि महागाईच्या भडक्यानंतर आता जून महिना सुरू झाला आहे. १ जूनच्या पहिल्याच तारखेला नियमांत झालेल्या बदलामुळे सर्वसामान्यांच्या खिशाची धग नक्कीच वाढवली आहे. दर महिन्याच्या १ तारखेला सरकारी तेल कंपन्यांपासून ते बँकांपर्यंत अनेक संस्था आपल्या नियमांमध्ये सुधारणा करतात.

    यावेळेससुद्धा १ जून २०२६ पासून गॅस सिलेंडरपासून ते ड्रायव्हिंग लायसन्स, बँकिंग आणि थेट तुमच्या खिशावर परिणाम करणारे अनेक मोठे बदल लागू झाले आहेत. नवीन महिन्याची सुरुवात होताच आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक महत्त्वाचे नियम बदलले आहेत. या बदलांमुळे तुमचे घरगुती बजेट विस्कटणार की तुम्हाला दिलासा मिळणार? चला, अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया…

    १.कमर्शियल LPG सिलेंडर महागला

    तेल कंपन्यांनी १९ किलोच्या कमर्शियल LPG सिलेंडरच्या किमतीत वाढ केली आहे. यासोबतच ५ किलोच्या LPG सिलेंडरचे दरही वाढवण्यात आले आहेत. मात्र, घरगुती वापराच्या १४.२ किलोच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. व्यावसायिक LPG सिलिंडरचा दर 42 रुपयांनी वाढला असून 5 किलोच्या मिनी सिलिंडरचा दरही 11 रुपयांनी महाग झाला आहे. अशाप्रक्रारे मुंबईत आता 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. तर 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत 912.50 रुपयांवर स्थिर राहिली असून पाच किलोचा LPG मिनी सिलिंडर 339 रुपयांना मिळत आहे. या वाढीचा थेट फटका हॉटेल, रेस्टॉरंट आणि लहान व्यावसायिकांना बसू शकतो.  

    २.बँकिंग क्षेत्रातील बदल-क्रेडिट कार्ड आणि चार्जेस (Banking & Credit Card Changes)

    जर तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा डिजिटल पेमेंटचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण काही बँकांनी त्यांच्या क्रेडिट कार्डच्या रिवॉर्ड पॉईंट्स (Reward Points) आणि फी स्ट्रक्चरमध्ये बदल केले आहेत.विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त युटिलिटी बिल उदा. वीज बिल, पाणी बिल भरल्यास आता अतिरिक्त शुल्क मोजावे लागू शकते. काही बँकांनी फ्री डोमेस्टिक एअरपोर्ट लाउंज ॲक्सेसच्या नियमांमध्येही कडक बदल केले आहेत. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना आता अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.

    ३.टॅक्स आणि आधार अपडेट संदर्भातील डेडलाईन (Aadhaar & Tax Updates)

    जून महिना हा आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात अनेक करविषयक (Tax) कामे पूर्ण करण्याची अंतिम मुदत असते. तसेच, मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधाही या महिन्यात संपत आहे. जर तुम्ही तुमचे आधार कार्ड गेल्या १० वर्षांत अपडेट केले नसेल, तर ते त्वरित अपडेट करून घेणे गरजेचे आहे, अन्यथा त्यानंतर तुम्हाला शुल्क द्यावे लागेल.

    ४.ड्रायव्हिंग लायसन्सचे नियम कडक (New Driving License Rules)

    RTO कडून आता ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याच्या नियमात मोठे बदल करण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार, आता वाहन चालवण्याची चाचणी (Driving Test) देण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. सरकारमान्य खासगी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये चाचणी देऊनही आता लायसन्स मिळवता येणार आहे. परंतु, अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्यास आता पालकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी दिल्यास तब्बल २५,००० रुपयांचा दंड आणि पालकांना तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे.

    ५. रेल्वे तिकिटांचे नियम आणि नवीन वेळापत्रक (Indian Railways New Rules)

    भारतीय रेल्वे जून 2026 मध्ये मोठा रेल्वे ब्लॉक लागू करणार आहे ज्यामुळे अंदाजे 77 गाड्या रद्द होतील आणि इतर अनेक गाड्यांच्या मार्गात बदल होईल. भारतीय रेल्वेच्या या बदलांचा परिणाम पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशा यासह अनेक राज्यांवर होईल. अनेक सुपरफास्ट गाड्यांच्या वेळा आणि मार्गांमध्येही बदल केले आहेत. तसेच, तिकीट बुकिंग आणि रिफंडच्या नियमांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी नवीन डिजिटल प्रणाली अधिक सक्रिय करण्यात आली आहे. प्रवासाला निघण्यापूर्वी प्रवाशांनी आपल्या ट्रेनची वेळ तपासून घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

    ६. ट्रॅफिक फाईन आणि सुरक्षिततेचे नियम

    केवळ लायसन्सच नाही, तर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, हेल्मेट न घालणे, सीट बेल्ट न लावणे आणि सिग्नल तोडणे यासारख्या गुन्ह्यांसाठी आता तंत्रज्ञानाचा (AI कॅमेरे) वापर करून थेट ई-चलान फाडले जाणार आहे. वाहतूक शिस्त लागावी आणि अपघात कमी व्हावेत हा यामागील मुख्य उद्देश आहे.

    सर्वसामान्यांनी आता काय करावे?

    १ जूनपासून लागू झालेले हे बदल एका बाजूला डिजिटल पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढवणारे आहेत, तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागू शकते. बदलत्या नियमांची वेळीच माहिती असणे हाच आर्थिक नुकसान टाळण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. म्हणून आता प्रत्येकाने गॅस आणि इतर सेवांच्या किमती बदलल्यामुळे महिन्याच्या सुरुवातीलाच घरगुती बजेटचे नियोजन करणे गरजेचे आहे. तुमच्या बँकेकडून आलेल्या ईमेल किंवा मेसेजकडे दुर्लक्ष करू नका. क्रेडिट कार्डचे नवीन नियम वाचून घ्या.

    घरात अल्पवयीन मुले असतील, तर त्यांच्या हातात चुकूनही वाहनांची चावी देऊ नका. आरटीओचे नियम आता पूर्वीपेक्षा खूप कडक झाले आहेत. त्यामुळे जागरूक राहा, नियमांचे पालन करा आणि आपले आर्थिक बजेट सुरक्षित ठेवा! या बदलेल्या नियमांवर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा!

    आणखी वाचा :

  • महिलांनी आर्थिक नियोजन करताना नक्की लक्षात ठेवाव्यात या महत्त्वाच्या गोष्टी

    महिलांनी आर्थिक नियोजन करताना नक्की लक्षात ठेवाव्यात या महत्त्वाच्या गोष्टी

    घराचा ‘पाया’ तुम्ही आहात, मग घराचं ‘आर्थिक बजेट’ फक्त डायरीत का?  आजच्या काळात स्त्री फक्त ‘गृहलक्ष्मी’ नाही, तर ती ‘गुंतवणूक लक्ष्मी’ सुद्धा व्हायला हवी. आजच्या बदलत्या काळात महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं अत्यंत गरजेचं झालं आहे. घरखर्चाचे नियोजन, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी किंवा स्वतःच्या करिअरची प्रगती, या सगळ्या गोष्टींसाठी योग्य आर्थिक व्यवस्थापन आवश्यक आहे. फ्युचर सेफ करण्यासाठी या ४ गोष्टी आजच करा:

    आपत्कालीन (Emergency) फंड तयार करा

    आयुष्यातले संकट कधीही दार ठोठावून येत नाही. अचानक आजारपण, नोकरी जाणं किंवा अनपेक्षित मोठा खर्च. अशा वेळी आर्थिक तग धरण्यासाठी हातात ३ ते ६ महिन्यांच्या उत्पन्नाएवढा Emergency फंड असणं खूप गरजेचं  आहे. हा फंड तुम्हाला तातडीच्या परिस्थितीत लगेचच आधार देतो आणि मानसिक ताण कमी करतो.

    हा आपत्कालीन निधी शक्यतो सेव्हिंग अकाउंट किंवा लिक्विड फंड सारख्या सहज उपलब्ध होणाऱ्या ठिकाणी ठेवावा. यामुळे गरज भासल्यास पैसा लगेच मिळतो आणि कुटुंबाचे आर्थिक आरोग्य सुरक्षित राहते. योग्य Emergency फंड म्हणजे अनिश्चित काळातही तुमच्यासोबत उभा राहणारी सुरक्षितता.

    आरोग्य व जीवनविमा (Insurance) आवश्यक

    महिलांकडून अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुय्यमपणे पाहिले जाते. घर आणि कुटुंब सांभाळताना स्वतःच्या वैद्यकीय गरजांकडे दुर्लक्ष होते, पण वाढत्या उपचारखर्चामुळे हे दुर्लक्ष भविष्यात मोठा आर्थिक बोजा बनू शकते. म्हणूनच स्वतःसाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी हेल्थ इन्शुरन्स घेणं अत्यंत आवश्यक आहे. अचानक आजारपण किंवा अपघात झाल्यास हा विमा मोठ्या खर्चापासून बचाव करतो आणि योग्य वेळी दर्जेदार उपचार मिळण्यास मदत करतो.

    यासोबतच कुटुंबाची आर्थिक सुरक्षा कायम मजबूत राहावी म्हणून टर्म इन्शुरन्स घेणंही तितकंच महत्त्वाचं  आहे. कमावत्या व्यक्तीवर काही अनपेक्षित प्रसंग आला तरी कुटुंबावर त्वरित आर्थिक संकट येऊ नये, याची खात्री टर्म इन्शुरन्स देतो. लक्षात ठेवा, विमा हा खर्च नसून भविष्यातील जोखीम कमी करणारे एक सुरक्षित कवच आहे. जो तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवनात स्थैर्य आणि निश्चिंतता निर्माण करतो.

    ध्येय-आधारित गुंतवणूक करा

    फक्त गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूक करणे योग्य नाही. तुम्ही करत असलेली प्रत्येक गुंतवणूक तुमच्या एखाद्या ठोस उद्दिष्टासाठी असणे अधिक महत्त्वाचे आहे. जसं की, मुलांचे शिक्षण, स्वतःचं घर, निवृत्तीचं नियोजन, किंवा स्वतःचा छोटा–मोठा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न. उद्दिष्टं ठरली की गुंतवणुकीचा मार्ग स्पष्ट होतो आणि योग्य पर्याय निवडणंही सोपं होतं.

    लवकर गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचा Risk-Return Profile संतुलित राहतो. जास्त कालावधीमुळे तुमच्या गुंतवणुकीला वाढण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि तुम्ही कमी ताणात तुमची मोठी आर्थिक उद्दिष्टं सहज गाठू शकता. नियमित, शिस्तबद्ध गुंतवणुकीमुळे आर्थिक स्थिरता वाढते आणि भविष्यातील स्वप्नं पूर्ण करण्याची क्षमता मजबूत होते.

    गुंतवणुकीचे विविधीकरण (Diversification)

    गुंतवणुकीबाबत आता एकच पर्याय निवडणं पुरेसं राहिलेलं नाही. फक्त FD किंवा सोन्यात पैसे गुंतवणं सुरक्षित वाटतं, पण वाढत्या आर्थिक गरजांसाठी हे मर्यादित ठरू शकतं. त्यामुळे महिलांनी स्वतःचा गुंतवणूक पोर्टफोलिओ विविध ठेवणं खूप आवश्यक आहे. यात Mutual Funds, Equity SIP, Bonds, Gold ETF, तसेच PPF किंवा NPS सारखे दीर्घकालीन पर्याय समाविष्ट केल्यास आर्थिक पाया अधिक मजबूत बनतो.

    वैविध्यपूर्ण गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जोखीम कमी होते आणि परताव्याच्या संधी वाढतात. एका गुंतवणुकीत घसरण झाली तरी इतर पर्याय तुमचं नुकसान भरून काढतात. त्यामुळे दीर्घकाळात तुमची गुंतवणूक स्थिर आणि वाढती राहते. भविष्यातील उद्दिष्टं घर, शिक्षण, निवृत्ती गाठण्यासाठी हा संतुलित दृष्टिकोन खूप महत्वाचा ठरतो.

    महिलांची आर्थिक प्रगती झाली की संपूर्ण कुटुंब आणि समाजाचा विकास आपोआप वेग घेतो. स्मार्ट आर्थिक नियोजन, योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक आणि वेळोवेळी घेतलेला आर्थिक आढावा यामुळे महिलांना स्थैर्य, आत्मविश्वास आणि स्वावलंबन मिळतं. त्यामुळे भविष्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज राहत नाही. आजच थोडी सुरुवात करा-कारण तुमचं भविष्य तुमच्याच निर्णयांवर घडतं.

  • Work Life Balance: आपण जगण्यासाठी काम करतोय की कामासाठी जगतोय?

    Work Life Balance: आपण जगण्यासाठी काम करतोय की कामासाठी जगतोय?

    सध्या एल अँड टी कंपनीचे अध्यक्ष एस. एन. सुब्रमण्यन यांच्या कामाच्या तासांबाबत केलेल्या विधानाने सध्या खूप चर्चा रंगली आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून ९० तास काम करावं,असं म्हटलं आहे. तसेच, “रविवारीही कामावर या. तुम्ही घरी बसून काय करता? तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहू शकता? तुमची पत्नी तुमच्याकडे किती वेळ पाहू शकते? ऑफिसला जा आणि कामाला लागा,” असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं . या वक्तव्यानंतर विविध क्षेत्रांतून, बॉलिवूडपासून राजकारण आणि खेळ जगतातील दिग्गजांनी, तसेच सोशल मीडियावर लोकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

    याआधी इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनीही तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम केलं पाहिजे, असं विधान केलं होतं. आता सुब्रमण्यन यांच्या विधानाने पुन्हा एकदा कामाच्या तासांवर चर्चा सुरु झाली आहे.

    या पार्श्वभूमीवर, आजच्या लेखात आपण प्रगत देशांतील वर्क कल्चरचा आढावा घेणार आहोत. जगभरात विविध देशांमध्ये कामाचे किती तास बंधनकारक असतात, वर्क-लाईफ बॅलन्स कसा सांभाळला जातो, किती तास अराम दिला जातो आणि तेथील कामगारांच्या हक्कांना कशी वागणूक दिली जाते, याचा सविस्तर आढावा घेणार आहोत. 

    वर्क-लाइफ बॅलन्स आणि जागतिक वर्क कल्चर

    अर्जेंटिना

    अर्जेंटिनामध्ये कामाचे तास कायदेशीररित्या ठरवले गेले आहेत. आठवड्याला कमीतकमी ४८ तास काम करण्याची परवानगी आहे. ओव्हरटाईम दररोज जास्तीत जास्त तीन तास आणि आठवड्यात ठराविक मर्यादेपर्यंत करता येतो. ओव्हरटाईमसाठी नियमित वेतनाच्या ५० % जास्त वेतन दिले जाते, तर सुट्टीच्या दिवशी काम करणाऱ्यांना १०० % अतिरिक्त वेतन मिळते.

    दक्षिण कोरिया

    दक्षिण कोरिया हा देश वर्क-लाइफ बॅलन्सकडे खूप लक्ष देतो. इथे सरकारने ठरवले आहे की एक व्यक्ती आठवड्यात फक्त ४० तास काम करेल. त्याचबरोबर ओव्हरटाईम काम करण्याचे काही नियम आहेत. ओव्हरटाईम कामाचे तास आठवड्यात जास्तीत जास्त ५२ तास असू शकतात. जर एखादी कंपनी कर्मचाऱ्याला यापेक्षा जास्त काम करायला सांगत असेल, तर त्या कंपनीवर कायदेशीर कारवाई केली जाते. ओव्हरटाईमसाठी कर्मचाऱ्यांना २००% अधिक वेतन दिले जाते. यामुळे कर्मचाऱ्यांना आपले वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य उत्तम प्रकारे समतोल राखता येते.

    मेक्सिको

    मेक्सिको या देशात सुद्धा  कामाचे कायदेशीर तास निश्चित केले आहेत. प्रत्येक आठवड्यात एक व्यक्ती जास्तीत जास्त ४८ तास काम करू शकतो. या 48 तासांमध्ये आठवड्यातील कामाचे वेळेचे विभाजन केले जाते, म्हणजे दररोज किती तास काम करावे हे ठरवले जाते.

    जर एक कर्मचारी त्याच्या नियमित कामाच्या वेळेपेक्षा अधिक वेळ काम करत असेल, तर त्याला ओव्हरटाईम मिळतो . मेक्सिकोमध्ये ओव्हरटाईमची मर्यादा आठवड्यात जास्तीत जास्त नऊ तास आहे. म्हणजे, नियमित 48 तासांनंतर एक कर्मचारी 9 तास अधिक काम करू शकतो.

    आणि या ओव्हरटाईमसाठी त्याला त्याच्या नियमित वेतनाच्या तीन पट वेतन दिले जाते. उदा , कार्मचाऱ्याला प्रत्येक तासाला 100 रुपये मिळत असतील, तर ओव्हरटाईमच्या तासांसाठी त्याला 300 रुपये प्रति तास मिळतील.

    जपान

    जपान हा देश त्याच्या जलद प्रगतीसाठी प्रसिद्ध असला तरी, इथे कामगारांच्या हक्कांना विशेष प्राधान्य दिलं जातं. जपानमध्ये कामाचे तास वाढवण्याऐवजी कामाचा दर्जा सुधारण्यावर अधिक लक्ष केंद्रित केलं जातं. कामाच्या वेळा कर्मचाऱ्यांच्या सोयीनुसार असतात, आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याला देखील तितकंच महत्त्व दिलं जातं. हे देश कामाच्या बाबतीत अत्यंत लवचिक असतो आणि कामकाजाची वेळ यथासंभव कर्मचाऱ्यांच्या गरजेनुसार निश्चित केली जाते.

    जपानमध्ये आठवड्यात ४० तास काम करण्याची मर्यादा आहे, ज्यामुळे कामाचा ताण आणि कामाच्या वेळेतील असमानता कमी केली जाते. ओव्हरटाईम कामासाठी काही अतिरिक्त फायदे देखील दिले जातात. सोमवारी ते शुक्रवार दरम्यान ओव्हरटाईम काम केल्यास २५ % अधिक वेतन मिळते. शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी ओव्हरटाईम काम केल्यास ३५ % अधिक वेतन दिलं जातं. यामुळे कर्मचारी नेहमी उत्साही आणि समाधानी असतात.  

    स्पेन

    स्पेनमध्ये कामाचे नियम खूप स्पष्ट आणि ठरलेले आहेत. येथे एका आठवड्यात ४८ तासांपर्यंत काम करण्याची परवानगी आहे, ज्याचा अर्थ एक व्यक्ती आठवड्यात जास्तीत जास्त ६ दिवस काम करू शकते, प्रत्येक दिवशी ८ तास. परंतु, एका दिवसात जास्तीत जास्त ९ तास काम करण्याची मर्यादा आहे. यामुळे कामाच्या वेळांची योग्य अशी आखणी केली जाते, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे आणि कल्याणाचे संरक्षण होते.

    अमेरिका आणि इंग्लंड

    अमेरिका आणि इंग्लंड हे दोन्ही अत्यंत प्रगत देश आहेत, जिथे काम आणि जीवन यामध्ये समतोल साधण्याला खूप महत्त्व दिलं जातं. या देशांमध्ये वर्क-लाइफ बॅलन्ससाठी अनेक नियम आणि धोरणे तयार केलेली आहेत. एक अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे, एका आठवड्यात ४० तासांपेक्षा जास्त काम करण्याची मर्यादा नाही. यामुळे, कर्मचारी आपल्या कामाशी संबंधित वेळेचा योग्य वापर करु शकतात, तसेच त्यांना वैयक्तिक जीवनासाठी पुरेसा वेळ मिळतो.

    याशिवाय, ओव्हरटाईमसाठी विशेष धोरण आहे. जर कोणत्याही कर्मचार्याला त्यांच्या नियमित कामाच्या वेळापेक्षा अधिक काम करावं लागलं, तर त्यांना त्याच्या नियमित वेतनाच्या १.५ पट वेतन दिलं जातं. यामुळे कामाचा ताण कमी होतो आणि कर्मचारी अधिक उत्पन्न मिळवू शकतात. याचे मुख्य कारण म्हणजे कर्मचाऱ्यांच्या जीवनाच्या गुणवत्तेला प्राथमिकता देणे आणि त्यांच्या कष्टाची योग्य फेड करणे.

    ब्राझील

    ब्राझीलमध्ये कामाचे तास कायदेशीरदृष्ट्या ठरवले गेले आहेत. प्रत्येक कामगारासाठी आठवड्यातील कामाची जास्तीत जास्त मर्यादा ४४ तास असते. याचा अर्थ असा की, आठवड्यात कामाच्या ६ दिवसांत, दिवसाला अधिकतम ८ तास काम करता येईल.

    त्याचबरोबर, जर कामगाराला ओव्हरटाईम (अतिरिक्त तास) काम करावयाचे असतील, तर त्याची मर्यादा प्रतिदिन दोन तास असते. यामध्ये, जर एखाद्या व्यक्तीने नियमित वेळेपेक्षा जास्त तास काम केले, तर त्यासाठी त्याला अतिरिक्त पैसे दिले जातात.

    भारत

    भारतामध्ये वर्क-लाइफ बॅलन्स प्रगत देशांच्या तुलनेत अजूनही मागे आहे.सामान्यपणे, कामाची वेळ सकाळी ९ वाजता सुरू होऊन संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालते, ज्यामुळे आठवड्यात साधारणपणे अंदाजे  ४६.७ तास काम होते . काही नोकऱ्यांमध्ये या तासांची मर्यादा अधिक असू शकते, विशेषत: ज्या नोकऱ्यांमध्ये उच्च कार्यदबाव आहे.

    सुटीची संख्या देखील कमी आहे. भारतातील बहुतेक कंपन्यांमध्ये शनिवार आणि रविवार सुटी असते , पण काही ठिकाणी कामाच्या आवश्यकतेनुसार सुट्टीत  बदल  होत असतात. साधारणपणे, भारतीय कर्मचार्यांना १२ ते १६ सार्वजनिक सुट्ट्या मिळतात, आणि ही संख्या राज्यानुसार बदलते. काही राज्यांमध्ये सुट्ट्यांची संख्या अधिक किंवा कमी असू शकते.

    थोडक्यात सांगायचं तर, कामाचे जास्त तास  म्हणजे यश मिळवण्याचे कारण नाही, तर कामाची गुणवत्ता महत्त्वाची आहे. कर्मचारी तणावमुक्त आणि समाधानी असतील, तरच उत्पादकता वाढते.

  • बजेट तयार करण्याचा सोपा कानमंत्र; महिन्याच्या २० तारखेला पाकीट रिकामं होणार नाही!

    बजेट तयार करण्याचा सोपा कानमंत्र; महिन्याच्या २० तारखेला पाकीट रिकामं होणार नाही! 

    महिन्याची २० तारीख आली की पाकीट रिकामं होतंय….पगार कधी येतो आणि कधी संपतो, काही कळतच नाही….. महागाई इतकी वाढलीये की बचत करणं आता अशक्यच झालंय…. असे संभाषण आता प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळत आहेत. वाढत्या महागाईमुळे आपल्यापैकी प्रत्येकाच्याच घरात, लोकल प्रवासात किंवा चहाच्या टपरीवर याच विषयावर चर्चा होतांना दिसत आहे. 

    दरमहा वस्तूंचे वाढणारे भाव आणि त्या तुलनेत स्थिर असणारे उत्पन्न यांमुळे आजचा सर्वसामान्य माणूस महागाईच्या चक्रव्यूहात अडकला आहे. पण या महागाईवर रडत बसण्यापेक्षा, तिच्याशी दोन हात करण्याचा एक अचूक मंत्र आपल्याच हातात आहे, तो म्हणजे ‘आर्थिक बजेट’ (Financial Budget). जर तुम्ही अजूनही स्वतःचे बजेट बनवले नसेल, तर तुमच्या मानसिक आणि आर्थिक तणावाचे मुख्य कारण हेच आहे. बजेट म्हणजे पैशांवर बंधनं घालणं किंवा स्वतःचे छंद मारणं नव्हे, तर आपल्या कष्टाच्या पैशांना योग्य दिशा दाखवणं आहे. अजूनही तुम्ही स्वतःचे बजेट प्लॅन केले नसेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की वाचा!

    बजेट म्हणजे नक्की काय? 

    सोप्या भाषेत सांगायचं तर बजेट म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य. बजेट तुम्हाला हे सांगत नाही की तुम्ही खर्च करू नका उलट ते तुम्हाला हे सांगते की तुम्ही तुमचा पैसा कुठे आणि कसा खर्च केला पाहिजे, जेणेकरून नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही. तुमच्याकडे येणारा पैसा (Income) आणि जाणारा पैसा (Expenses) यांचा अचूक ताळेबंद म्हणजे बजेट. महागाईच्या काळातही तुमच्या गरजा आणि स्वप्नं पूर्ण करण्याचा हा सर्वात सोपा आणि शास्त्रीय मार्ग आहे.

    आजच्या काळात बजेट असणे का गरजेचे आहे?

    वाढती महागाई तुमच्या हातात नाही मात्र खिशातून जाणाऱ्या पैशांना नियंत्रित करणे तुमच्याच हातात आहे. त्यासाठी स्वतःचे बजेट आखणे गरजेचे आहे. आर्थिक बजेटमुळे तुमच्या आयुष्यात अनेक मोठे बदल होऊ शकतात. जसे की, दरमहा आपण नकळतपणे अशा अनेक गोष्टींवर खर्च करतो, ज्यांची खरोखर गरज नसते. वीकेंडला होणारे ऑनलाईन शॉपिंग, वारंवार हॉटेलिंग किंवा न वापरलेले सबस्क्रिप्शन्स यांमुळे पैसा कुठे जातो, हे समजत नाही. बजेटमुळे हा विनाकारण होणारा खर्च समोर येतो आणि पैशांची गळती थांबते. 

    दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा पेट्रोल, डिझेल किंवा भाजीपाल्याचे भाव वाढतात, तेव्हा बजेट आपल्याला काटकसर करायला शिकवते. अनावश्यक खर्च कमी करून, तो पैसा वाढलेल्या महागाईचा भार सोसण्यासाठी कसा वापरायचा, याचे नियोजन बजेटमुळे शक्य होते. कारण आयुष्यात संकट कधी सांगून येत नाही. अचानक आलेला वैद्यकीय खर्च किंवा नोकरीवरील संकट यामुळे अनेकांवर कर्ज घेण्याची वेळ येते. बजेटच्या सवयीमुळे दरमहा एक ठराविक रक्कम Emergency Fund म्हणून बाजूला राहते, जी संकटकाळात तुमची सर्वात मोठी सुरक्षा ढाल बनते. एवढेच काय तर मुलांचे उच्च शिक्षण, स्वतःचे हक्काचे घर किंवा सन्मानाने जगण्यासाठी लागणारे निवृत्तीवेतन (Retirement Planning) यांसारख्या मोठ्या उद्दिष्टांचा पाया म्हणजे आजचे बजेट. आज केलेली छोटी बचत उद्याचे मोठे भविष्य सुरक्षित करते.

    स्वतःचे बजेट तयार करण्याची सोपी पद्धत

    बजेट बनवणं खूप कठीण किंवा गणिताचे काम आहे असं वाटत असेल, तर जगातील सर्वात सोपा ५०:३०:२० चा नियम वापरून बजेट तयार करा. तुमच्या एकूण उत्पन्नाची विभागणी खाली दिल्याप्रमाणे तीन भागात करा:

    ५०% भाग: तुमच्या गरजा (Needs)

    तुमच्या पगारातील अर्धा भाग हा ज्या गोष्टींशिवाय तुम्ही जगू शकत नाही, त्यावर खर्च झाला पाहिजे. यामध्ये घरभाडे, होम लोनचा EMI, किराणा माल, वीज-पाणी बिल, मुलांची शाळा-कॉलेज फी आणि औषधोपचार यांचा समावेश होतो.

    ३०% भाग: तुमच्या इच्छा (Wants)

    तुमच्या एकूण उत्पन्नातील ३० टक्के भाग तुमच्या इच्छा आणि आनंदासाठी आहे. माणसाने फक्त गरजा पूर्ण करण्यासाठी जगू नये, तर आयुष्य जगण्याचा आनंदही घेतला पाहिजे. हॉटेलिंग, फिरायला जाणे, नवीन कपडे खरेदी करणे किंवा तुमचे छंद यांवर तुम्ही हा पैसा खर्च करू शकता. पण लक्षात ठेवा, हा खर्च ३० टक्क्यांच्या वर जाता कामा नये.

    २०% भाग: बचत आणि गुंतवणूक (Savings & Investment)

    प्रत्येक महिन्याचा पगार खात्यात जमा झाल्यावर सर्वात आधी २० टक्के भाग बाजूला काढा. कारण तुमच्या बजेटमधील २० टक्के हा भाग सर्वात महत्वाचा आहे. हा पैसा नुसता बँक खात्यात न ठेवता म्युच्युअल फंड (SIP), पीपीएफ (PPF), शेअर्स किंवा मुदत ठेव (FD) यांसारख्या चांगल्या ठिकाणी गुंतवा, जेणेकरून महागाईपेक्षा जास्त परतावा तुम्हाला मिळेल.

    बजेट कसे सुरू करावे?

    सुरुवातीला फक्त एक महिना तुमचा प्रत्येक रुपया कुठे खर्च होतोय, याची डायरीमध्ये किंवा मोबाईलमध्ये नोंद ठेवा. त्यानंतर खर्च करताना हा खर्च माझी गरज आहे की इच्छा? हा एकच प्रश्न स्वतःला विचारा आणि त्यानुसार बजेट प्लॅन करा. सुरुवातीला बजेट शंभर टक्के पाळता आले नाही तरी चालेल, पण सुरुवात करणे महत्त्वाचे आहे. एक गोष्ट मनाशी पक्की करून घ्या महागाई कधीच कमी होणार नाही, काळासोबत वाढतच राहणार आहे.

    अशा वेळी केवळ कमावणे आणि खर्च करणे या चक्रात अडकून पडलो, तर आर्थिक विवंचना कधीच संपणार नाही. या चक्रातून बाहेर पडून कमावणे म्हणजे आधी बचत करणे आणि मग उरलेले खर्च करणे हाच आर्थिक सुखाचा एकमेव कानमंत्र आहे. त्यामुळे आजच डायरी आणि पेन घ्या किंवा मोबाईल उघडा आणि तुमचे बजेट तयार करा. लक्षात ठेवा, स्वतःचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी बजेट बनवण्याची सर्वोत्तम वेळ आज आणि आत्ताच आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा!