व्यवसायाचा आत्मा असणारा बिझनेस प्लॅन आता अंतिम टप्प्यात आला आहे. यानंतर भांडवलदारांची/गुंतवणूकदारांची यादी तयार करुन लगेच त्यांना आपला बिझनेस प्लॅन व संपूर्ण प्रकल्प अहवाल (डीपीआर) या दोन प्रभावी ब्रम्हास्त्रांनी भांडवल निर्मितीसाठी वेगवान पावले उचलता येतात. काल चार टप्प्यांचा आपण अभ्यास केल्यानंतर आज उरलेल्या सर्व टप्प्यांची प्रक्रिया पाहू या.
५. स्पर्धक – आपण करत असलेल्या उत्पादनांची निर्मिती करणारे कितीतरी उद्योजक आपल्या कार्यक्षेत्रात असतात. त्यापैकी आपल्या उत्पादनांच्या किंमतीत व आपल्या ग्राहक वर्गाला आकर्षित करणारे कोण आहेत. त्या तीन–पाच स्पर्धकांची नावे यात समाविष्ट करायची आहेत. कारण आपल्याला आपल्या उत्पादनांची गुणवत्ता कायम राखण्यासाठी हे माहिती असणे गरजेचे असते. याशिवाय गुंतवणूकदाराला हे समजते की आपला बाजाराविषयी (मार्केटचा) अभ्यास खूप चांगला आहे.
६. स्पर्धकाच्या तुलनेत असणारी तुमची वैशिष्टे – आपण ज्या प्रकारचा व्यवसाय करतो आहे, त्या प्रकारची उत्पादने निर्माण करणारे उद्योजक जर आधीच असतील तर आपण नवीन उद्योग सुरु का करतोय? किंवा आपल्या व्यवसायाची ग्राहकांना गरज काय? आपला व्यवसाय चालण्याची शक्यता काय? या प्रश्नांची उत्तरे देणारा हा टप्पा आहे. तर या प्रश्नांची उत्तरे अशी असतात; आधीचे उद्योजक ज्या सेवा देण्यात कमी पडतात, त्या सेवांची उपलब्धता करुन देण्याची क्षमता असणारी उत्पादने आपण तयार करत आहोत, त्याच किंमतीत चांगली गुणवत्तापूर्ण उत्पादने पुरवत आहोत.
७. लागणारे भांडवल व त्याचा उपयोग – आपण सुरु करत असणाऱ्या व्यवसायासाठी लागणारे अंदाजे भांडवल आणि त्याचा उपयोग आपण कोणत्या गोष्टींसाठी आणि कशा प्रकारे करणार आहोत याची माहिती गुंतवणूकदारांना द्यावी लागते.
८. विक्री व जाहिरात माध्यमे – या टप्प्यात आपण आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी आपण कोणते प्रयत्न करणार आहोत याची माहिती थोडक्यात द्यावी लागते. विक्री वाढवण्यासाठी कोणती पावले उचलणार आहोत तसेच आपले उत्पादन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचं मार्केटिंग कसे करणार आहोत यासंदर्भात माहिती द्यावी.
९. उलाढाल, खर्च व नफा यांचा आलेख – उद्योगाला सुरुवात केल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा अंदाज गुंतवणूकदारांना द्यावा लागतो. यात आपल्याला साधारणपणे पुढील तीन सहामाही (दीड वर्ष) किंवा तीन वर्षात उद्योगाचा होणारा विस्तार दाखवून द्यायचा असतो. यात आपल्या उद्योगाची होणारी एकूण उलाढाल, विक्री व जाहिरात माध्यमांवर होणारा तसेच इतर खर्च वजा करून निव्वळ नफा दाखवून द्यावा लागतो. ही सर्व माहिती एखाद्या तक्त्याच्या किंवा आलेखाच्या स्वरूपात दाखविल्यास त्याचे आकलन करणे सोपे जाते.
१०. व्यवसायातील महत्त्वाचे टप्पे व त्याची कालमर्यादा – यामध्ये व्यवसायातील महत्त्वाचे टप्पे कोणते असतील आणि ते कधीपर्यंत पूर्ण होतील याची निश्चित कालमर्यादा सांगावी लागते. उदाहरणार्थ, सहा महिन्यात दोन नवीन शाखा काढणार (ठिकाणांसहित), स्वतःची वेबसाईट सुरु करणार, उद्योगातील एखादा विशिष्ट दर्जा/मानांकन प्राप्त करणार इत्यादी.
११. सोबत काम करणारे छोटेमोठे ब्रँड – आपल्या बरोबरीने काही छोटे मोठे ब्रँड काम करीत असतील किंवा काही सेवांसाठी आपण एखाद्या उद्योगाशी, संस्थेशी, व्यक्तीशी टायअप केलेले असेल, तर त्यांचासुद्धा उल्लेख आवर्जून करावा. याचा गुंतवणूकदारांवर सकारात्मक प्रभाव निर्माण होतो.
१२. काम करणारी टीम फोटो व पदासहित – आपल्या व्यवसायामध्ये आपल्याबरोबर काम करणाऱ्या व्यक्तींविषयी आणि त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली आहे याची माहिती करून द्यावी. तसेच त्या व्यक्तींची शैक्षणिक अर्हता, कामाचा अनुभव किंवा एखाद्या विषयात विशेष प्राविण्य मिळवले असेल तर त्याचासुद्धा उल्लेख करावा.
१३. व्यवसायाचा पत्ता, संपर्क, ईमेल व असल्यास वेबसाईट – यामध्ये आपल्या व्यवसायाचा पत्ता, संपर्क क्रमांक, व्यावसायिक ईमेल आयडी आणि वेबसाईट असल्यास तिचा उल्लेख करावा. तसेच सोशल मिडियावर तुमचे व्यावसायिक पेज किंवा अकाऊंट असल्यास त्याची माहिती द्यावी. तुम्हाला संपर्क करण्यासाठीची सर्व माहिती एकत्रित एकाच ठिकाणी देणे फायद्याचे ठरते.
अशा पद्धतीने बिझनेस प्लॅन बनवला की व तो जास्तीत जास्त गुंतवणूकदारांना पाठवला तर आपल्या व्यवसायासाठी हवे तेवढे भांडवल आपण उभे करू शकतो. बिझनेस प्लॅन हा सुरुवातीला दाखवला जातो. ज्यावेळी गुंतवणूकदार बोलणी करायला तयार होतात तेव्हा डीपीआर सादर करायला पाहिजे. बिझनेस प्लॅन मधील प्रत्येक गोष्टीची सविस्तर व तपशीलवार योजना म्हणजे डीपीआर होय. धन्यवाद…
जगभरातील प्रत्येक माणसाचे आकर्षण व कुणालाही (अगदी तुरळक लोक वगळून) न समजणारे क्षेत्र म्हणजे शेअर बाजार. गुंतवणूकीतून भरपूर पैसा कमावता येतो. खरेदी विक्रीतून सुध्दा प्रचंड कमाई होते, मात्र या आर्थिक साधनाकडे बघण्याचे दृष्टीकोन प्रत्येक व्यक्तीनुरुप बदलतात. काहीजणांचे समज, काहीजणांचे गैरसमज, काहीजणांची भीती, काहीजणांची हाव, काहीजणांचा अतिउतावळेपणा इत्यादी घटकांवर हे शेअर मार्केट हलत असते.
जगभरातील आर्थिक गणिते कोणत्याही क्षणाला बदलायची ताकद ठेऊन असणारे हे क्षेत्र आहे. हे प्रत्येकाला जाणून घेण्याची इच्छा आहेच, त्यातून पैसे सुध्दा मोठ्या प्रमाणात कमावयचे आहेत; काहीजण कमावत सुध्दा आहेत, मात्र हे शिकावे कुठे? शिकवणारे भेटत नाहीत. यावरचा कोणताही कोर्स (प्रशिक्षण अभ्यासक्रम) नाही. स्वतः शिकायचे तर कोणती पुस्तके वाचायची? डिमॅट अकाउंट काय असते? त्याची गरज काय? ते कसे प्राप्त करावे?
कोणत्या दिवशी शेअरबाजार उसळी मारणार? कोणत्या दिवशी शेअर बाजार ढासळणार? उसळीतच पैसे कमावता येतात की ढासळीत सुध्दा पैसे कमावता येताता? रुपया-डॉलर यांच्या पडझडीवर वरती शेअर बाजार कितपत अवलंबून आहे? सोने-चांदीच्या तेजी-मंदीचा शेअर बाजारावर काही परिणाम होतो का? जागतिक मंदी कशाने उद्भवते? म्युचुअल फंड म्हणजे काय? SIP (एसआयपी) म्हणजे काय? त्यात गुंतवणूक कशी करायची? कोणत्या कंपन्यांचे शेअर घ्यायचे? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे शोधायची कुठे? हा प्रश्न सुध्दा अनुत्तरीत राहतो व सगळेच प्रश्न जागच्या जागी तसेच सगळीच माणसे जागच्या जागी राहतात. सुरुवातीलाच बऱ्याच जणांना आलेल्या अपयशयाच्या अनुभवामुळे बाकीचे लोक सुध्दा या क्षेत्राची धास्ती बाळगून असतात. ‘दुधाने तोंड पोळलं की ताक सुध्दा फुंकून पिण्याची सवय’ या माणसाच्या नैसर्गिक स्वभावातून न्यूनगंड व भीती निर्माण होत असतात, त्यामुळे परत त्या गोष्टीच्या वाटेलाच माणूस जात नाही.
शेअर बाजारात गुंतवणूकीला सुरुवात करण्याआधी एक समान गोष्ट सगळ्यांना माहिती असावी आणि शेअर बाजार शिकवणारे बरेच प्रशिक्षक ही गोष्ट प्रत्येकाला सुरवातीला सांगतात. एका गावात दोन माणसे येतात. एक गुरु व दुसरा त्याचा शिष्य. गुरु त्या गावकऱ्यांना सांगतो की, या गावात जेवढी माकडे आहेत, ती माकडे पकडून मला आणून दिली की मी प्रत्येक माकड १०० रुपयांना खरेदी करणार आहे. गावातील लोकांना वाटते चला गावात भरपूर माकडे आहेत. पकडायची आणि गुरुला नेऊन द्यायची. गावातील सगळे लोक माकडे पकडतात व गुरुकडून १०० रुपये प्रतिमाकड अशी रक्कम घेऊन जातात. गुरु ती सगळी माकडे एका मोठ्या पिंजऱ्यात ठेवत असतो. त्यांना खायला घालत असतो. गावातील माकडांची संख्या कमी झाल्यामुळे कमी लोक माकडे पकडतात, मग गुरु माकडांची किंमत वाढवून २०० रुपये प्रतिमाकड अशी करतो. गावातील लोकांचा उत्साह परत वाढीस लागतो. उरलेली जवळजवळ सगळी माकडे पकडली जातात. मग गुरु एके दिवशी दुसऱ्या गावाला निघून जातो. तेव्हा शिष्य गावकऱ्यांना बोलावतो व सांगतो की माकडांची किंमत अजून वाढणार आहे. तेव्हा मी तुम्हाला या पिंजऱ्यातली माकडे ५०० रुपयांना एक याप्रमाणे देतो आणि गुरु गावावरुन परत आल्यावर त्यांना ही माकडे १००० रुपयांना एक याप्रमाणे खरेदी करतील; म्हणजे तुमचा फायदाच फायदा होईल. शिष्य सगळ्या गावकऱ्यांकडून ५०० रुपये प्रतिमाकड अशी रक्कम वसूल करतो व एके रात्री गावातून निघून जातो. गावकरी गावात वाट बघत राहतात. गुरु व शिष्य दोघे परत कधीही दिसले नाहीत. आता माकडे परत गावात मोकळेपणाने फिरतात. गावकरी गावातच आहेत. पैसा गुरु व शिष्य यांना मिळाला आहे व दोघेही गाव सोडून गेले आहेत.
या गोष्टीत शेअर बाजारात प्रवेश हा १०० रुपयांनी होऊ शकतो. त्याचे २०० रुपये, ५०० रुपये सुध्दा होऊ शकतात आणि १००० रुपयांच्या नादात बरेच नुकसान सुध्दा होऊ शकते. म्हणजेच कोणता शेअर कधी खरेदी करावा? तो कधी विकावा? त्यातून बाहेर कधी पडावे? याचा अंदाज आला की माणूस शेअर बाजारात चांगला खेळू शकतो. पैसे कमावू शकतो. हा खेळ चांगल्या रितीने खेळण्यासाठी या खेळाचे नियम चांगल्या पध्दतीने माहिती असल्यास तो जिंकण्याची जास्त शक्यता निर्माण होते. हा खेळ योग्य रितीने खेळण्याचे कानमंत्र या पुस्तकात आहेत.
कारले ही एक बहुवर्षायू वेलयुक्त वनस्पती आहे. हे भारत, पाकिस्तान, बांगलादेश, चीन, आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि मध्य पूर्वेतील उष्ण आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशात उगवले जाते. कारल्याच्या चवीमुळे बऱ्याच लोकांना ते आवडत नसले तरीही त्यात पोषण असल्याने लोकं ही भाजी खातात.
त्यात जीवनसत्त्वे A, C आणि K, तसेच फायबर आणि पोटॅशियम असते. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. तसेच मधुमेह आणि हृदयरोग यांसारख्या रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करते. हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे. कारले एक बहुगुणी भाजी आहे. ही एक औषधी वनस्पती असल्याने याला भरपूर मागणी आहे
हवामान
कारले लागवडीसाठी उष्ण आणि दमट हवामान आवश्यक आहे. तापमान 20 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. जास्त आर्द्रता आणि पाऊस कारले लागवडीसाठी फायदेशीर असतो. .
जमीन
कारले लागवडीसाठी चांगली निचरा होणारी, मध्यम खोलीची आणि सुपीक जमीन आवश्यक आहे. पीएच 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असलेल्या जमिनीत कारले चांगले वाढते.
लागवड
कारल्याच्या लागवडीसाठी चांगल्या जातीची निवड करावी जसे की, पुसा दौ मोसमी, अर्का हरित आणि कोईमतुर लांब. कारल्याची लागवड बियाणे किंवा रोपे लावून केली जाते. बियाणे लावण्यासाठी, 60×60 सें. मी. आकाराचे खड्डे तयार करावेत आणि त्यात 10 ते 15 ग्रॅम बियाणे टाकावेत. रोपे लावण्यासाठी, 60 सें. मी. अंतरावर रोपे लावावीत.
जोपासणी
कारले लागवडीसाठी आवश्यक ती जोपासणी खालीलप्रमाणे आहे:
पाणी: कारले लागवडीसाठी नियमित पाणी देणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात दररोज पाणी द्यावे आणि पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्याकडे लक्ष द्यावे.
खत: कारले लागवडीसाठी शेणखत, कंपोस्ट किंवा युरिया यासारखे खत देणे आवश्यक आहे.
तण नियंत्रण: कारले लागवडीत तण नियंत्रण करणे आवश्यक आहे. तण काढून टाकल्यास कारल्याची वाढ चांगली होते.
रोग आणि कीटक नियंत्रण: कारल्याला अनेक रोग आणि कीटकांचा प्रादुर्भाव होतो. रोग आणि कीटक नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे.
उत्पन्न
योग्य निगा राखल्यास कारल्याचे एकरी 20 ते 25 टन उत्पादन मिळते.
जोपासणीतील काही टिप्स
कारल्याची लागवड करताना, एका ठिकाणी सलग दोन वर्षे लागवड करू नये.
कारल्यांची गळती होऊ नये यासाठी तोडताना काळजी घ्यावी.
कारले तोडताना, लांब काठीचा वापर करून तोडावीत, जेणेकरून वेलीला इजा होणार नाही.
अशा या कारले शेतीचीमाहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. हा लेख जास्तीतजास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि नवी अर्थक्रांतीच्या यू ट्यूब चॅनलला आत्ताच subscribe करा.
बिझनेस प्लॅन हा प्रत्येक व्यवसायाचा आत्मा आहे आणि Finance is the blood of organization म्हणजेच पैसा/भांडवल हे संस्थेचे रक्त आहे असे म्हणतात. जसे शरीरात रक्त नसले किंवा त्याचे प्रमाण कमी झाले तर शरीर काम करण्यास असमर्थ ठरते. त्याचप्रमाणे भांडवल/पैसा नसणाऱ्या संस्था सुध्दा कार्य करण्यास असमर्थ ठरतात. म्हणून या पैसारुपी रक्ताचा मुबलक प्रमाणात पुरवठा करण्यासाठी बिझनेस प्लॅन हे सर्वात महत्त्वाचे साधन आहे.
बिझनेस प्लॅन हे दोन असतात. एक म्हणजे डीपीआर आणि दुसरा म्हणजे बी.पी. यापैकी जो स्वतःला मार्गदर्शन करणारा भाग असतो, त्याला संपूर्ण प्रकल्प अहवाल म्हणजेच DPR (Detailed Project Report) म्हणतात. जो इतर कोणालाही सांगायचा नसतो. ते आपल्या व्यवसायाचे रहस्य असते. त्यातून आपला व्यवसाय चालवण्याची पूर्ण व इत्थंभूत माहिती आपल्याला मिळत असते. हे एक प्रकारचे व्यवसाय मार्गदर्शक असते. त्यानुसार आपल्या व्यवसायातील प्रत्येक पाऊल ठरत असते.
बिझनेस प्लॅन हा स्वतःच बनवला पाहिजे, कारण आपल्या स्वतःइतका तो व्यवसाय कोणीही जाणत नसतो. या बनवलेल्या बिझनेस प्लॅनमध्ये मग सीए, व्यवसाय व्यवस्थापक, आर्थिक सल्लागार यांच्याकडून सुधारणा करुन योग्य ते बदल करावेत. बिझनेस प्लॅन हा व्यवसायाच्या सुरुवातीला बनवला जातो व त्यात वारंवार बदल केले जातात. उदाहरणाद्वारे समजून घ्यायचे असल्यास व्यवसाय हा एक क्रिकेटचा सामना आहे. त्याची वेळ ठरलेली आहे. मात्र सामना चालू झाला की आपण त्याचे धावते समालोचन (Live Commentary) करत/बघत असतो. धावफलक (Score Board) सतत बदलत असतो. हे सर्व बदल सामना चालू असताना त्या त्या वेळीच करायचे असतात. त्याचा आधी फक्त अंदाज लावला जातो व सामना पूर्ण झाल्यावर विश्लेषण (Analysis) केले जाऊ शकते. चालू सामन्यात त्या बदलाची दखल घेणे गरजेचे ठरते. व्यवसायाच्या सुरुवातीला ज्या उद्योजकांनी हा बिझनेस प्लॅन बनवलेला नसतो, त्यांनी आत्ता याक्षणी तो बनवला पाहिजे.
यातील दुसरा भाग म्हणजेच बी.पी. अर्थात आपला बिझनेस प्लॅन, जो आपण आपल्या गुंतवणूकदारांना, भांडवल पुरवठादार व बँकांना सुरवातीच्या टप्प्यात देत असतो व भांडवल मिळण्याची खात्री देण्यासाठी पहिल्या भागातून म्हणजेच संपूर्ण प्रकल्प अहवालामधून सविस्तर महत्त्व पटवून देत असतो. बिझनेस प्लॅनमधून व्यवसायाची गरज, अपेक्षित ग्राहक, व्यवसायात मिळणारा नफा, होणारा खर्च, विक्री व विपणन (Sales & Marketing), काम करणारी यंत्रणा व मनुष्यबळ, या व्यवसायाशी संबंधित सर्वच बाबींचे चित्र स्पष्ट होत असते. आता प्रत्यक्ष बिझनेस प्लॅन बनवण्याची प्रक्रिया पाहू या.
बिझनेस प्लॅनमधील पहिला व दुसरा भाग यापैकी आपल्या सोयीनुसार कोणताही भाग आधी बनवायचा. पण शक्यतो दुसरा भाग आधी बनवल्यास पहिला भाग म्हणजे दुसऱ्या भागातील प्रत्येक मुद्द्याचे सविस्तर वर्णन व अंमलबजावणीचे उपाय लिहले जातात किंवा पहिला भाग आधी बनवला तर दुसरा भाग म्हणजे पहिल्या भागाचा सारांश होय. बिझनेस प्लॅनचे टप्पे –
१. व्यवसायाचे नाव, घोषवाक्य (tagline), संकेतचिन्ह (logo) याचा समावेश व व्यवसायाला साजेशे असे एक चित्र असावे. यामुळे आपल्या व्यवसायाची एक Image/प्रतिमा बिझनेस प्लॅन वाचणाऱ्याच्या डोळ्यासमोर उभी राहते. त्यामुळे हे बिझनेस प्लॅनचे जसे आपण फर्स्ट इम्प्रेशन म्हणतो तसेच हे सुरुवातीचे दर्शन आहे. यापुढील प्रत्येक टप्प्यात कमीत कमी २ मुद्दे व जास्तीत जास्त ४ मुद्दे लिहावेत.
२. समस्या – कोणताही व्यवसाय म्हणजे वेळ, श्रम आणि पैसा या तीन गोष्टींची बचत आणि एखाद्या समस्येचे उत्तर यातूनच जन्माला येतो. जर समस्या नसतील तर व्यवसाय निर्माण होत नाही. उदा. चेहरा कोरडा/काळा असणे ही समस्या, तर त्यावर लावण्याचे मलम (cream) हा त्यावरचा उपाय झाला. म्हणजे एखाद्या समस्येचे उत्तर देणाऱ्या प्रक्रियेला व्यवसाय म्हणतात.
३. उपाय – समस्या ही जोपर्यंत समस्या आहे, तोपर्यंत तिचे व्यवसायात रुपांतर होत नाही. याउलट समस्येवरचा उपाय शोधून काढणे म्हणजे व्यवसाय होय. त्या समस्येचे कोणते उपाय आपल्या व्यवसायामुळे शोधले जातात. यावर दोन–चार मुद्दे यात समाविष्ट करावेत.
४. अपेक्षित ग्राहकवर्ग – प्रत्येक व्यवसायात (B2B किंवा B2C) ग्राहक असला तरच तो व्यवसाय चालतो. म्हणून आपल्याला आपला ग्राहक ओळखता आला पाहिजे. आपल्या कार्यक्षेत्रानुसार, ग्राहकाच्या खरेदीक्षमतेनुसार व आपल्या विक्री किंमतीनुसार आपला ग्राहक व त्यातून होणारी वर्षभराची अपेक्षित उलाढाल याचे गणित या टप्प्यावर केले जाते. महिलांसाठी सौंदर्यप्रसाधने बनवणाऱ्या उद्योगाचा अपेक्षित ग्राहक वर्ग हा ११-४५ वयाच्या महिला हा असतो.
यात परत दोन उपप्रकार पडतात. आपण ज्या प्रकारची उत्पादने उत्पादित करत असतो, त्या सर्व उत्पादनासाठी उपलब्ध असलेल्या बाजारपेठेतील ग्राहकवर्ग हा पहिला अपेक्षित ग्राहकवर्ग आहे. मात्र हा एकूण मार्केटचा ग्राहकवर्ग असतो. त्या संपूर्ण मार्केटमधील आपल्या स्वतःच्या उत्पादनाचा ग्राहक वर्ग किती? त्यातून मिळणारा आपला मार्केटशेअर (बाजारातील वाटा) किती? व आपला नफा किती? आपली उलाढाल किती? हे यात दर्शविता आले पाहिजे. हे वेगवेगळ्या आलेखाच्या साहाय्याने दाखवता येते.
उरलेल्या मुद्द्याविषयी उद्याच्या लेखात पाहू. काही बिझनेस प्लॅनचे नमुने सुध्दा उदाहरणादाखल देण्यात येतील. तो पर्यंत या मुद्द्यांचा अभ्यास करुन अंमलबजावणी सुरु करता येईल.
तुमचा जर तुमच्या नशिबावर विश्वास असेल, तर तेच घडेल जे तुमच्या नशिबात असेल; पण जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल, तर नशीब तसं घडेल जसं तुम्हाला हवं असेल. आजचा लेख अशाच एका महारथीबद्दल आहे ज्याने आपल्या अतूट विश्वासाच्या जोरावर गरीब परिस्थितीतून अरबो रुपयांचे साम्राज्य उभे केले. मी बोलतेय जपानमधील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी पॅनासॉनिकची स्थापना करणाऱ्या कोनोसुके मात्सुशिता यांच्याबद्दल…
128 वर्षांपूर्वी म्हणजेच 27 नोव्हें. 1894 मध्ये जपानच्या Wakayama प्रांतातील वासा गावात एका सधन शेतकऱ्याच्या पोटी कोनोसुकेचा जन्म झाला. मात्र कोनोसुकेचा जन्म झाला आणि घरची परिस्थितीच पालटली. आर्थिक अडचणींमुळे कोनोसुकेच्या वडिलांकडे जी काही धनदौलत होती ती विकावी लागली. ज्या घराला ऐशो-आरामाची सवय होती त्या घरातील सगळेचजण पोटाची खळगी भागवण्यासाठी काम करू लागले. लहानगा कोनोसुके देखील शाळा सोडून वयाच्या 9 व्या वर्षापासूनच काम करू लागला. ज्या वयात इतर मुले खेळायची, अभ्यास करायची, आपल्या आई-वडिलांकडे खाऊचा हट्ट करायची, त्या वयात हा लहानगा कोनोसुके एका दुकानात काम करून घरच्या आर्थिक परिस्थितीस हातभार लावू लागला.
सकाळी लवकर उठून दुकानाच्या साफसफाई करून मालकाच्या मुलांना देखील तो सांभाळायचा. इतकं करूनही तो तापट दुकानदार त्याच्याकडून जनावरासारखं काम करून घ्यायचा. आर्थिक परिस्थितीमुळे त्याला ते काम करणं भाग होतं. पण काही दिवसांनी त्या दुकानावर कर्ज झालं आणि त्या मालकाने दुकान बंद केलं. कोनोसुकेचं काम गेलं. जे काही थोडेफार पैसे यायचे तेही आता बंद झाले. काही दिवसांनी त्याला एका सायकल कंपनीत काम मिळालं. त्याकाळात सायकल म्हणजे एक लक्झरी वाहन मानलं जायचं. त्या सायकल इंग्लंडमधून इम्पोर्ट व्हायच्या. कंपनीत सायकल विकण्यासोबत काही मेटल वर्कचं कामही होतं. कोनोसुके तिथे पाच वर्ष काम करून जितक्या टेक्निकल गोष्टी शिकता येतील तितक्या तो शिकला.
वयाच्या पंधराव्या वर्षी त्याला osaka electric light company ची जाहिरात दिसली. तिथे काही कर्मचाऱ्यांची गरज होती. कोनोसुकेने नोकरीसाठी अर्ज केला. आपल्याला नोकरी मिळेल की नाही या विचारात असतानाच त्याला joining letter आलं, तो आनंदाने भारावून गेला. दुसऱ्याच दिवशी तो कंपनीत दाखल झाला.
osaka electric light companyत विजेसंबंधित गोष्टींचं शिक्षण त्याला मिळत होतं. तो केवळ काम करुन शांत बसत नव्हता. फावल्या वेळेत electricity ची पुस्तकं देखील वाचू लागला. जितक्या गोष्टी शिकता येत होत्या, त्या सगळ्या तो शिकला. कंपनीत अनेक नवीन नवीन experiment त्याने केले. आपल्या कर्तबगारीच्या जोरावर एक साधा कर्मचारी म्हणून रुजू झालेला कोनोसुके काही वर्षातच टेक्नीकल इंस्पेक्टर पदापर्यंत पोहोचला. त्याच काळात कोनोसुकेने एक improved electric socket बनवलं.ते बॉसला दाखवलं, मात्र ते काही त्याच्या बॉसला पसंद पडलं नाही. हे socket मार्केटमध्ये चालणार नाही असं म्हणून बॉसने ते socket रिजेक्ट केलं. मात्र कोनोसुकेला त्या socket वर पूर्ण विश्वास होता. त्याच विश्वासाच्या जोरावर त्याने osaka कंपनीतील नोकरी सोडली, आणि स्वतःचा व्यवसाय चालू करण्याचा निर्णय घेतला. मात्र 22 वर्षीय कोनोसुकेचा तो निर्णय कोणालाच मान्य नव्हता. नोकरी करून जितके पैसे हातात येतात, तितके तरी स्वतःच्या व्यवसायातून येणार आहेत का? त्यात तुझं पुरेसं शिक्षणही झालेलं नाही, व्यवसायाचा अनुभवही नाही असे म्हणून सगळ्यांनीच त्याला व्यवसाय न करण्याचा सल्ला दिला.
“ऐकावे जनाचे, करावे मनाचे” या उक्तीप्रमाणे शेवटी कोनोसुकेने त्याला हवं तेच केलं. इतकी वर्ष नोकरी करून जी काही जमापुंजी होती, ती घेऊन त्याने काही बेसिक टूल्स खरेदी केले. विश्वासातले 2 कर्मचारी, पत्नी आणि मेव्हण्याला घेऊन त्याने socket बनवण्याचे काम सुरु केलं. Socket पूर्ण झाल्यावर ते घेऊन तो गावोगावी विकू लागला, मात्र कोणीही त्याचं ते Light Socket विकत घ्यायला तयार नव्हतं. त्याच्या व्यवसायाचं 1 वर्ष तोट्यातच निघून गेलं. काही छोट्या-मोठ्या ऑर्डर मिळाल्या मात्र त्यातून खर्च भागवणं कठीण होऊ लागलं.
Exciting part of the story
कंपनीच्या अपयशामुळे त्या 2 कर्मचाऱ्यांनी देखील तिथली नोकरी सोडली. आता कोनोसुके, त्याची पत्नी आणि मेहुणा असे तिघं मिळून नवनवीन experiment करू लागले. मात्र यात त्याचे खूप पैसे खर्च झाले. इकडे डोक्यावर कर्जाचा भार दिवसेंदिवस वाढतच होता, तर दुसरीकडे प्रत्येक ठिकाणाहून आलेल्या रिजेजेक्शनमुळे तो हतबल झाला होता. पण त्याने हार मानली नाही आणि एक दिवस अचानक त्याला 1000 light socketची पहिली ऑर्डर मिळाली आणि हाच ठरला कोनोसुकेच्या कंपनीचा turning पॉइंट. त्या ऑर्डरनंतर कोनोसुकेचा व्यवसाय वाढत गेला. त्यानंतर त्याने attachment plug आणि two way socket चे invention केलं. यामुळे तर ही कंपनी खूपच फेमस झाली. त्याने कंपनीचं नाव मात्सूशिता इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग वर्क्स ठेवलं. तर कंपनीचे प्रोडक्टस ‘नॅशनल’ या ब्रँड नेमखाली विकले जाऊ लागले. पुढे यात पॅनासॉनिक, कासार, टेक्निक्स ही नावं सुद्धा ऍड झाली.
कोनोसुकेला नवीन शोध लावून लोकांचे प्रॉब्लेम दूर करण्यात खूप मजा यायची. एकदा त्याच्या लक्षात आले की, सायकलला समोर लावले जाणारे बल्ब 3 तासापेक्षा जास्त काळ चालत नाहीत, कारण त्यात मेणबत्ती किंवा तेल वापरलं जायचं. आणि लोकांचा हाच प्रॉब्लेम दूर करण्यासाठी त्याने ठरवलं की जास्त वेळ चालणारा बल्ब बनवायचा. बराच अभ्यास करून त्याने बल्ब बनवायला सुरुवात केली. बऱ्याच अडचणींनंतर अखेर नवीन बल्ब तयार झाला, जो तब्बल 40 तासांपेक्षा देखील जास्त वेळ चालू लागला. कोनोसुकेच्या प्रयत्नांना यश आले, मात्र आता पुढचं आव्हान होतं हे बल्ब मार्केटमध्ये विकण्याचं. कोनोसुकेने ते बल्ब अगदी कमी दरात बाजारात विकायला सुरुवात केली. किंमत खूपच कमी आहे म्हणून बहुदा हे प्रॉडक्ट दर्जेदार नाही या विचाराने बऱ्याच दुकानदारांनी त्याचा बल्ब घेण्यास नकार दिला. आता काय करणार? शेवटी त्याने तो बल्ब लोकांना फुकट वाटायला सुरुवात केली. वापर केल्यानंतर लोकांना तो बल्ब खूप आवडला. मात्सूशिता कंपनी पुन्हा प्रकाशझोतात आली. त्या बल्बला नंतर इतकी मागणी वाढली, की नंतर तो बल्ब दुप्पट किंमतीला विकला जाऊ लागला.
1929 पर्यंत मात्सुशिता विविध उत्पादने घेऊ लागली होती. कंपनीत 300 कामगार काम करु लागले होते. कंपनीत आता light socket शिवाय कॅमेरा, phone, फॅक्स, इलेक्ट्रिक white board, टीव्ही, टेप रेकॉर्डर अशा अनेक प्रगत इलेक्ट्रिक वस्तू बनवल्या जात होत्या. कंपनीचा कारभार सुरळीत सांभाळता यावा म्हणून कंपनीचे चार विभाग केले. आता कोनोसुके केवळ एक सर्वसामान्य व्यक्ती राहिला नव्हता, तर ते जपानमधील सर्वात यशस्वी उद्योजक बनले होते.
1933 पर्यंत कंपनीत 200 पेक्षाही अधिक उत्पादने तयार होऊ लागली. नाविन्यपूर्ण उत्पादनं, कंपनीतील वाढते कर्मचारी, बाजारातील मागणी यामुळे सगळं काही सुरळीत चालू होतं आणि अशातच १९३९साली दुसरं महायुद्ध सुरु झालं. बाजारात मंदी आली आणि त्यामुळे कंपनीची उत्पादनं घेण्यास कोणी तयार होईना. कंपनीचं आर्थिक गणित कोलमडलं. कोनोसुके यांनी लगेच युद्धासाठी लागणारी सामग्री बनविण्याचा निर्णय घेतला. 56 लाकडी जहाजं आणि तीन लाकडी विमाने कोनासुकेंच्या मार्गदर्शनातून बनवण्यात आली. युद्धाच्या कठीण काळातही कंपनीच्या उत्पादनाची गुणवत्ता ढासळली नाही. मात्र या काळात कंपनीचा प्रचंड तोटा झाला. एकेकाळी २६००० कर्मचारी असणाऱ्या या कंपनीत १९४५ मध्ये केवळ १५००० कर्मचारीच शिल्लक राहिले. युद्धानंतर हळूहळू जपानसह कंपनीची देखील आर्थिक घडी स्थिरावू लागली.
याच काळात पॅनासॉनिकच्या ट्रान्झिस्टर रेडिओने जगभरात कमाल केली. श्रीमंतापासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत सगळ्यांच्या घरातून पॅनासॉनिकच्या रेडिओवरची गाणी वाजू लागली. हा रेडिओ जगप्रसिद्ध झाला. कंपनी जगाच्या उद्योगपटलावर स्थिरस्थावर झाली होती. १९५० ते १९७३च्या काळात जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक उत्पादनं बनवणारी कंपनी बनली. जानेवारी १९६१ मध्ये कोनोसुके मात्सुशिता यांनी पॅनासॉनिकच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आणि अध्यक्षपद जावई मासाहारू मात्सुशिता यांच्या हाती सोपवून सल्लागार म्हणून ते कामकाज पाहू लागले. मासाहारू यांनी देखील अगदी मनापासून पॅनासॉनिकला मोठं करण्यासाठी प्रयत्न केले. २००८ साली कंपनीची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढवण्यासाठी मात्सूशिताचे नाव बदलून “पॅनासॉनिक कॉर्पोरेशन” करण्यात आले. सध्या कंपनीत २ लाख ८० हजारांपेक्षा देखील अधिक कर्मचारी काम करतात, तर कंपनीची उलाढाल ९ ट्रिलियन येन पेक्षाही जास्त आहे.
मात्सुशीतांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर ४४ पुस्तकं लिहिली. भविष्यातील राजकारणी आणि उद्योजक घडवण्यासाठी त्यांनी १९७९ साली मात्सुशिता स्कुलची सुद्धा स्थापना केली. त्यांच्या उदात्त कार्यकर्तृत्वाचा सन्मान म्हणून जपानच्या सर्वोच्च पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यात order of the sacred treasure, Order of the Rising Sun, medal with blue ribbon अशा अनेक पुरस्कारांसोबत बेल्जियम, मलेशिया आणि चीनच्या पुरस्कारांचा देखील समावेश आहे.
GOD OF MANAGEMENT म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोनोसुके मत्सुशिता यांनी वयाच्या 94 व्या वर्षी २७ एप्रिल 1989 रोजी जगाला अलविदा केले आणि जगाच्या रंगमंच्यावरील एक प्रकाशमान पात्र इतरांना प्रकाशित करून कायमचे अलिप्त झाले.
जगातील सर्व देशांचा अभ्यास केल्यावर असे लक्षात आले की, काही देश प्रगत, काही देश विकसनशील तर काही देश मागास आहेत. त्यांच्या एकूण परिस्थितीचा आढावा घेतला असता काही अनुमान काढण्यात आले ते असे होते. प्रगत देशामध्ये वयाची ४० वर्षे ओलांडलेले नागरिक हे देशातील नवयुवकांना व्यवसायासाठी मदत करतात, तर विकसनशील देशात चाळिशी ओलांडलेले लोक काहीही न करता नवयुवकांना नुसतेच फुकटचे सल्ले देत असतात.
विकसनशील देशातील युवक हे व्यवसायासाठी मदत शोधण्यात आपली युवावस्था संपवून टाकतात, पण त्यांना अशा प्रकारची मदत मिळत नाही. मागास देशात युवकांकडे किंवा ४० वर्षे ओलांडलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या माणसांकडे पैसे व व्यवसाय करण्याची इच्छा नसते.
तारुण्याच्या उंबरठ्यावर माणसाचे रक्त गरम असते. काहीतरी करुन दाखवण्याची इच्छा त्याला गप्प बसू देत नसते. त्याच्या डोक्यात सतत नवनवीन संकल्पनाचा जन्म होत असतो. त्या कल्पना साकारण्याची त्याची तयारी असते. त्यासाठी लागेल ती जोखीम पत्करण्यासाठी तो तयार असतो. या तारुण्यातील उर्जेला आपण ‘पतंगा’ची ऊर्जा म्हणू या. कारण दिव्याभोवती रात्रीच्या अंधारात पतंग फिरत असतात. त्या पतंगांना दिव्याच्या ज्योतीकडे झेप घेण्याची इच्छा अनावर होत असते. ते स्वतःला रोखू शकत नाहीत किंवा रोधू शकत नाहीत. त्यांना माहित असते की आपण दिव्याच्या ज्योतीवर झेप घेतल्यास आपले पंख जळून आपण मरणार आहोत.
प्रसंगी हे पतंग त्या ज्योतीकडे झेपावतात व आपले पंख जाळून मरुन जातात. मृत्यूची भीती त्यांना शिवत नाही. त्याचप्रमाणे नव्या उमेदीचा तरुण ह्या पतंगासारखा संकटावर झेपावण्यासाठी आतुर झालेला असतो, आसुसलेला असतो. अशावेळी त्याच्या कल्पनेला साकार करण्यासाठी लागणारे भांडवल व बाकी गोष्टी मिळाल्या तर तो यशाच्या शिखरावर फार वेगाने आरुढ होतो.
वयाची ४०-४५-५० वर्षे पार केलेली माणसे गाठीशी चांगला पैसा बांधून असतात. त्यांची उमेद कमी झालेली असते, जोखीम पत्करण्याची वृत्ती संपत आलेली असते. त्यांनी हे पैसे जर तरुण वर्गाला भांडवल म्हणून दिले, तर त्यांनाही त्याचा भरघोस फायदा होतो व नवे व्यवसाय वेगाने वाढतात. ज्यांच्याकडे (टाटा, अंबानी सारखे मोठे उद्योजक, सचिन सारखे खेळाडू व अमिताभ सारखे कलाकार) भरपूर पैसे असतात अशा लोकांना चांगल्या तरुणांची गरज असते. ते आपले पैसे नवीन व्यवसायात गुंतवण्यास उत्सुक असतात. मात्र त्यांच्याकडे फार कमी वेळ असतो. अशा लोकांना अगदी ५-७ मिनिटांत संपूर्ण व्यवसाय (गुंतवणूक, ग्राहक, नफा इ.) प्रभावीपणे समजावून सांगणारा तरुण बाजी मारुन जातो. त्याला भरपूर पैसे मिळतात. असे पैसे प्राप्त करण्यासाठी प्रभावी बिझनेस प्लॅन बनवणे अत्यंत महत्त्वाचे असते.
प्रगत देशात (अमेरिका, इंग्लड, जर्मनी, फ्रान्स व जपान) युवक आपल्याकडे असलेल्या कल्पनेत उतरवण्यासाठी भांडवलाच्या शोधात असताना ते वर्तमानपत्रात त्यांच्या डोक्यात असलेल्या संकल्पनेबाबत जाहिरात देतात व ज्यांच्याकडे पैसा आहे अशा व्यक्तींनी ती संकल्पना विकत घ्यावी म्हणून लिलाव करतात किंवा त्या संकल्पनेला सत्यात उतरवण्यासाठी लागणारे भांडवल मागण्यासाठी प्रस्ताव ठेवतात. त्यातून नवी भागीदारी व गुंतवणूक करवून घेतात.
प्रभावी बिझनेस प्लॅन बनवण्यासाठी लागणारे काही नियम पाहू या. बिझनेस प्लॅन हा उद्योजकांनी स्वतः बनवावा, कारण त्या उद्योजकाइतका चांगला त्याचा व्यवसाय इतर कोणालाही माहित नसतो. बनवलेला बिझनेस प्लॅन मग मुख्य आर्थिक सल्लागाराकडून पडताळून त्यात करावे लागणारे बदलही स्वतःच करावेत. बिझनेस प्लॅन हा मुद्देसुद व दिसायला आकर्षक असावा. बिझनेस प्लॅन मधील मुख्य घटकांची यादी येथे देत आहोत. प्रत्येक घटकांचे दोन-तीन मुद्द्यात वर्णन करावे.
१. व्यवसायाचे नाव, घोषवाक्य (tagline), संकेतचिन्ह (logo) याचा समावेश व व्यवसायाला साजेसे असे एक चित्र असावे. २. समस्या ३. उपाय ४. अपेक्षित ग्राहकवर्ग ५. स्पर्धक ६. स्पर्धकाच्या तुलनेत असणारी तुमची वैशिष्टे (USP) ७. लागणारे भांडवल व त्याचा उपयोग ८. विक्री व जाहिरात माध्यमे ९. उलाढाल, खर्च व नफा यांचा आलेख १०. व्यवसायातील महत्त्वाचे टप्पे व त्याची कालमर्यादा ११. सोबत काम करणारे छोटेमोठे ब्रँड १२. काम करणारी टीम फोटो व पदासहित १३. व्यवसायाचा पत्ता, संपर्क, ईमेल व असल्यास वेबसाईट
व्यवसायात बिझनेस प्लॅन हा व्यवसायाचा आत्माच आहे. कारण तुम्ही जो व्यवसाय करता त्याची संपूर्ण माहिती एकत्र ठेवण्याचे साधन म्हणजे बिझनेस प्लॅन होय. बिझनेस प्लॅन हा वेळोवेळी अद्ययावत (update) करणे आवश्यक असते. बिझनेस प्लॅनची तपशीलवार माहिती उद्याच्या लेखात…
पण थांबा, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मला तुमच्यासोबत एका वेगळ्या दृष्टीकोनावर चर्चा करायची आहे. आता आपण असं समजू की, तुमचं वय ३२ वर्षे आहे. तुमच्या नकळतपणे का होईना, पण तुम्हाला आपलं वय झालंय असं वाटू लागलं असेल.
पण खरंच तुमचं वय झालं आहे का? तुमच्या शरीराकडे बघा. या शरीराचं वय ३२ वर्ष नाही. तुमच्या डोक्यावरील केस, त्यांचं वय ३२ वर्ष नाही. तुमचा मेंदू, तुमचं हृदय, तुमचे हात, तुमचे पाय यातील कशाचंच वय झालेलं नाही. ते सगळं ठीक आहे, पण मग ३२ वर्ष वय नक्की कशाचं आहे?सांगतो, पण यापुढे कधीही आपलं वय झालं, आपण म्हातारे झालो असं समजायचं नाही.
आपल्या शरीरात रोज काहीतरी बदल घडून येत असतात. शरीरातील पेशींची संख्या रोज बदलत असते. आपल्या मेंदूतील विचार रोज बदलत असतात. या बदलांमुळे आयुष्यात खूप मोठा फरक पडतो. तुमच्या मनातील भावभावनासुद्धा कालच्यापेक्षा आज थोड्याफार वेगळ्या असतात.
तुम्ही रोज किमान एक नवी गोष्ट शिकत असता. भले मग ती बौद्धिक, तांत्रिक किंवा आध्यात्मिक असेल, पण तुम्ही काल जसे होता, तसेच आज नसता. काहीतरी बदल हा झालेलाच असतो.
याचा अर्थ असाही काढता येईल, की तुमचं वय एक दिवस इतकंही नाही. आयुष्याकडे बघण्याचा हा एक वेगळा दृष्टीकोन मला तुम्हाला द्यायचा आहे.
आता मी काही प्रश्न विचारतो बघू तुमच्यापैकी किती जणांकडे या प्रश्नांची उत्तरे आहेत. जर आपण आजचा दिवस आयुष्यातील आपला पहिला दिवस असल्याप्रमाणे जगू लागलात, तर काय होईल?
आज तुम्ही कोणते नवे निर्णय घ्याल?
आज कोणती नवीन स्वप्नं पाहण्याचं धाडस तुम्ही कराल?
आजपासून तुम्ही कोणत्या नवीन गोष्टी करायला सुरुवात कराल?
आजपासून आपलं आयुष्य कसं वेगळ्या पद्धतीने जगायला सुरुवात कराल?
आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी खालील १० सूचना तुम्हाला उपयोगी पडतील.
आपलं वय हा फक्त एक आकडा आहे. त्याबद्दल फार चिंता करू नका.
आपण सगळेच एक दिवस मरणार आहोत, नंतर आपल्याला पृथ्वीची आठवण येईल, त्यामुळे आजपासूनच जगणे प्रारंभ करा.
आपले ध्येय ठरवा, आपल्या स्वप्नांची निवड करा आणि आजपासूनच त्यांचा पाठलाग सुरु करा.
नवनवीन आणि वेगवेगळ्या प्रकारचे, चांगले कपडे वापरायला सुरुवात करा.
निराशावादी आणि आळशी लोकांपासून दूर राहा. जास्त कार्यक्षम आणि उत्साही व्हा.
आपल्या आरोग्याची काळजी घ्या. काय खायला पाहिजे आणि काय नाही याकडे व्यवस्थित लक्ष द्या.
आजपासून चांगले आर्थिक निर्णय घेण्यास प्रारंभ करा.
आपल्याला किती पैसा आणि कधीपर्यंत कमवायचा आहे, याचं नियोजन करा. एक उद्दिष्ट ठरवा आणि आजपासूनच त्यावर काम करायला सुरुवात करा.
मनात स्वतःची एक वेगळी प्रतिमा बनवून ठेवा.
आशावादी बना. आनंदी बना. उत्साही बना. आजपासूनच…
आता मला सांगा : तुमचं वय काय आहे?
हेन्री फोर्ड यांनी प्रसिद्ध ‘मॉडेल टी कार’ बनवली, तेव्हा त्यांचं वय होतं ४५ वर्ष.
चार्ल्स डार्विनने ‘मानवी उत्क्रांती’चा सिद्धांत मांडला, तेव्हा त्याचं वय होतं ५० वर्ष.
जॉन पेंबरटन यांनी कोका-कोलाचा शोध वयाच्या ५५व्या वर्षी लावला.
रे क्रॉकनी मॅकडोनाल्ड विकत घेतली, तेव्हा त्यांचं वय होतं ५९ वर्ष.
कर्नल सँडर्स यांनी केफसीची सुरुवात वयाच्या ६२व्या वर्षी केली होती.
यशस्वी होण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो, त्यामुळे कधीही प्रयत्न सोडू नका
व्यवसाय करत असताना आपली उत्पादने (वस्तू/सेवा) आपण मार्केटमध्ये कोणकोणत्या ठिकाणी पोहोचवू शकतो? किती वेळेत व किती लवकर पोहोचवू शकतो? ग्राहकांच्या गरजा पूर्ण होण्यासाठी ती उत्पादने वेळेत त्यांच्या हातात मिळतील का? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला आपल्या व्यवसायाचे कार्यक्षेत्र ठरविण्यासाठी मदत करतात. आपले कार्यक्षेत्र ठरवल्यामुळे आपले ग्राहक व आपण यामध्ये एक नातेसंबंध तयार होत असतो. ग्राहकाच्या अधिक समाधानासाठी व आपल्या व्यवसायाच्या योग्य दिशेने होणाऱ्या वाढीसाठी हे अत्यंत किफायतशीर ठरत असते.
आपला व्यवसाय वस्तूवर आधारित असल्यास कार्यक्षेत्र ठरविण्याची पध्दत आपण पाहूया. उत्पादित केलेल्या वस्तूची टिकवणक्षमता म्हणजेच तिचा कार्यकाल पूर्ण होण्याच्या आत अंतिम ग्राहकाला त्या वस्तूचा वापर करण्यासाठी वेळ मिळावा याची दक्षता घेणे अत्यंत जरुरीचे असते किंवा त्या वस्तूंची टिकवणक्षमता वाढवण्याचे उपाय शोधून काढल्यास कराव्या लागणाऱ्या प्रक्रिया करणे गरजेचे ठरते. उदाहरण द्यायचे झाल्यास कच्चे दूध हे जास्तीत जास्त २४ तासाच्या आत ग्राहकापर्यंत पोहोचणे गरजेचे असते तरच ते वापरात आणता येते. याउलट या दूधाचे पाश्चरित दूधात रूपांतर केल्यास हा कालावधी १८० दिवसांपर्यत वाढवता येतो. या वाढलेल्या टिकवण क्षमतेमुळे ते अधिकाधिक दूरवरच्या ठिकाणांपर्यंत पोहोचवणे शक्य होते.
काही वस्तूंची मूळ टिकवणक्षमता ही दीर्घकाल असते. उदा. कागद, लाकडी वस्तू, टिकाऊ धातू उत्पादने व इतर. तर काही वस्तूंची टिकवणक्षमता ही अल्पकालीन असते, उदा. शेतीमालावर आधारित उत्पादने, शिजवलेले अन्नपदार्थ व इतर. आता ज्या वस्तूंची दीर्घकाल टिकवणक्षमता आहे अशा वस्तू जास्तीत जास्त दूरवरचे मार्केट काबीज करतात. कमी टिकवणक्षमता असणाऱ्या वस्तूंची टिकवणक्षमता वाढवून त्याही जास्तीत जास्त मार्केट काबीज करु शकतात. (उदा. टोमॅटो पासून जाम बनवणे किंवा द्राक्षांपासून मनुके बनवणे.)
वाहतूक व्यवस्थेच्या उपलब्धतेवरही वस्तूचे कार्यक्षेत्र ठरवले जाते. दूरवर ग्रामीण भागात वाहतूक व्यवस्था म्हणावी तेवढी सुलभ नसते किंवा परदेशात वस्तू पाठवण्यासाठी वाहतुकीवर होणारा खर्च हा प्रचंड असतो. अशावेळी आपल्या वस्तूंची वाहतुकीवर आधारित कार्यक्षेत्रे निवडणे आवश्यक आहे. वाहतुकीत उत्पादने खराब होण्याच्या प्रमाणावरुनही याचा अभ्यास केला जाऊ शकतो. वेगवेगळ्या प्रदेशातील ग्राहकांच्या अभिरुचीवरुनही कार्यक्षेत्रात बदल करणे आवश्यक असते. उदा. तलम कपडे तयार करणाऱ्या व्यवसायाची गरज उष्ण कटिबंधीय प्रदेशात, तर उबदार कपडे हे थंड प्रदेशात विकले जाऊ शकतात. कार्यक्षेत्र हे ऋतुमानानुसारही बदलते. सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्याकडे उपलब्ध असणारे मनुष्यबळ (Working force) हेही कार्यक्षेत्र ठरवताना लक्षात घेणे गरजेचे आहे.
सेवा (services) साठी कार्यक्षेत्र हे फार व्यापक असू शकते. आयटी उद्योगातील सेवा जगातील सर्वठिकाणी घरबसल्या पोहोचवता येतात व त्याचे मूल्यही घरबसल्या मिळवता येते. तर कुरिअर सेवेसाठी वाहतूक व्यवस्थेशी असणारी आपली समरसता ही महत्त्वाची ठरते. हॉटेल उद्योगासारख्या सेवांसाठी जागेची गरज लागते म्हणून या सेवांचे कार्यक्षेत्र मर्यादित असते. यावर मात करण्यासाठी त्याच्या अनेकानेक शाखा उघडणे हे फायदेशीर ठरते. टेलिमार्केटिंग सारख्या सेवांवर अंतराचा काही परिणाम होत नाही.
आपल्या उत्पादनानुसार (वस्तू/सेवा) टिकवणक्षमता, प्रक्रिया, वाहतूक, वाहतुकीदरम्यान होणरी नासाडी, ग्राहकांची अभिरुची, ऋतुमान, आपल्याकडे असणारे मनुष्यबळ व आपली उत्पादनक्षमता या गोष्टींचा सारासार विचार करुन गल्ली, प्रभाग, गाव-खेडे, शहर, तालुका, जिल्हा, विभाग, राज्य, देश, खंड किंवा अगदी जगभरात सर्वत्र असे कार्यक्षेत्र ठरवणे आवश्यक असते. प्रत्येक उद्योजक हे कार्यक्षेत्र ठरवतो. माल उत्पादित करतो, ग्राहकांपर्यंत वेळेत पोहोचवतो व नफा मिळवतो. सुरुवातीच्या टप्प्यावर जे आपले कार्यक्षेत्र असते त्यापेक्षा ते वाढवत नेणे हे त्या उद्योगाच्या वाढीसाठी लागणारे इंधन आहे.
आपण आता व्यवसायाच्या वाटेवर चालताना : मानसिकता व पूर्वतयारी या भागाच्या अंतिम टप्प्यावर आहोत. बिझनेस प्लॅनची गरज व बिझनेस प्लॅन बनवण्याची प्रक्रिया पुढील लेखात वाचायला मिळेल. तर उद्योजक मित्रांनो आता प्रत्यक्ष कार्यवाही सुरु करण्याच्या म्हणजेच व्यवसायात प्रवेश करण्याच्या अगदी जवळ आहोत. व्यवसायाच्या या अतिशय रम्य अशा दुनियेत आपले स्वागत आहे. पुढे चालण्यासाठी खूप खूप शुभेच्छा!!!
एखाद्या गोष्टीचा तपशीलवार अभ्यास कसा करायचा हे व्यवसायाचे नियम आपल्याला शिकवतात, तर त्यातून होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांची माहिती आपल्याला व्यवसाय धोरणामुळे मिळते. हेच वेगळ्या शब्दांत सांगायचं म्हणजे व्यवसायाचं धोरण तुमच्या कंपनीने कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याची माहिती देते, तर हेच धोरण प्रत्यक्षात कसं उतरवायचं हे नियम सांगतात.
प्रत्येक कंपनीचे/संस्थेचे स्वत:चे असे काही नियम असतात. भले त्यांनी ते कधी लिहून काढलेले नसतील, त्याबद्दल चर्चा केली नसेल किंवा आपले असे काही नियम आहेत, हे त्यांना जाणवलंसुद्धा नसेल. तरीसुद्धा काही ठराविक नियमांच्या आधारे प्रत्येक व्यवसायाची वाटचाल सुरु असते. असे नियम बनवणं ही कुठल्याही संस्थेसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. स्टार्टअप्ससाठी १२ नियम खालीलप्रमाणे आहेत. यांचा वापर केल्यास आपल्याला निश्चितच फायदा होईल.
नियम १ : तुम्ही जे काम करणार आहात, त्यावर तुमचे प्रेम असेल आणि ते यशस्वी करण्यासाठी कुठल्याही संकटाला तोंड द्यायची तुमची असेल, तरंच स्वतःची कंपनी सुरु करा.
नियम २ : आपण अपयशी होणारच नाही, सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडतील या भ्रमात राहू नका. अपयशाचा स्वीकार करून पुढे जात राहणं, यातूनच व्यवसाय मोठा होतो.
नियम ३ : तुमचे उत्पादन विकणे आणि व्यवसाय वाढवणे, ही ‘मालक’ म्हणून तुमची प्रमुख जबाबदारी आहे. ती दुसरं कुणीतरी येऊन सांभाळेल अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे.
नियम ४ : पैसा येणं हा कुठल्याही व्यवसायाचा ऑक्सिजन असतो. त्याच्याशिवाय व्यवसाय फार काळ तग धरु शकणार नाही. त्यामुळे यशस्वी व्हायचं असेल, तर या पैशांचं नीट व्यवस्थापन करता आलं पाहिजे.
नियम ५ : तुमची स्पर्धा कुणाशी आहे हे जाणून घ्या आणि त्यांच्यापेक्षा जास्त चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करा.
नियम ६ : तुमच्या ग्राहकांना तुमच्याशी आणि तुमच्या उत्पादनाशी काहीही घेणंदेणं नसतं. त्यांना फक्त त्यांची समस्या सुटणे महत्त्वाचे असते. त्यामुळे उगाच भावनिक होऊन सहानुभूतीची अपेक्षा ठेवू नका.
नियम ७ : असे लोक सोबत घ्या, ज्यांना तुमच्यासोबत काम करण्यात आनंद मिळेल. असे नाही, ज्यांच्या सोबत तुम्हाला आनंद मिळतो. ही चुकीची पद्धत आहे.
नियम ८ : कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा आनंद मिळेल याची काळजी घ्या. जेणेकरून त्यांच्यातला उत्साह कायम राहील.
नियम ९ : जर तुमच्या कर्मचाऱ्यांना त्यांची प्रगती होत नाही असे वाटू लागले, तर ते तुम्हाला सोडून जातील; ही गोष्ट लक्षात असू द्या.
नियम १० : जी संस्था काळानुसार बदलू शकते आणि होणाऱ्या बदलांचा लवकर स्वीकार करू शकते, तीच संस्था जास्त काळ अस्तित्वात राहू शकते. सतत आपल्या कामात सुधारणा करणं, हेच दीर्घकालीन यशाचं रहस्य आहे.
नियम ११ : आपल्या ग्राहकांकडे नेहमी संदर्भ मागा. स्वतःचा व्यवसाय वाढवण्याचा हा सगळ्यात सोपा आणि जलद मार्ग आहे. आणि हो, यासाठी तुम्हाला अधिकचे पैसेसुद्धा खर्च करावे लागत नाहीत.
नियम १२ : व्यवसाय प्रमुखाची गती, हीच व्यवसायाची गती. तुम्ही तुमच्या व्यवसायाचे प्रमुख आहात हे लक्षात असू द्या. कामात कधीही ढिले पडू नका…
हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा.
उद्योजक म्हणून यशस्वी होण्यासाठी खालील १० गोष्टी लक्षात ठेवा.
१. आर्थिक सुरक्षिततेची योजना तयार करा.
२. पुढे कोणती पावले उचलायची आहेत याची माहिती मिळवा.
३. अशी बिझनेस आयडिया शोधून काढा जी यशस्वी होईल.
४. चांगल्या मार्गदर्शक किंवा सल्लागाराची मदत घ्या
५. यशस्वी होण्यासाठी ध्येयधोरणे आखा.
६. आत्मविश्वास वाढवा.
७. चांगले सहकारी तयार करा.
८. भविष्यातील ध्येय स्पष्ट असू द्या.
९. मोठी स्वप्नं बघा.
१०. संपूर्ण प्रवासाची ब्लूप्रिंट (आराखडा) बनवा.
या सर्व गोष्टींची गरज तुम्हाला सुरुवातीलाच पडणार नाही, पण उद्योजकतेचा प्रवास जसजसा पुढे सरकेल, यातील प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणे तुम्हाला गरजेचे आहे.
तथापि हा प्रवास तितकासा सोपा असणार नाही. तुम्हाला एकटं वाटू शकतं. तुम्ही रात्रंदिवस मेहनत करून छोट्या छोट्या गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करत असता, पण वारंवार येणाऱ्या अपयशामुळे मध्येच सोडून देण्याचा विचार तुमच्या मनात येऊ शकतो.
बरेच उद्योजक व्यवसायाच्या सुरुवातीलाच जोखीम घेतात. थोडेफार यशस्वी होतात, परंतु त्यानंतर व्यवसाय विकासासाठी जोखीम घेणं थांबवतात. नवीन संधींचा शोध घेत नाहीत. फक्त आहे तो व्यवसाय टिकवण्यावर भर देतात. कल्पना करा तुम्ही एखाद्या डोंगरावर गिर्यारोहणासाठी जात आहात. सुरुवातीला तुम्ही खूप आनंदात असता. आपण काहीतरी नवीन करतोय याची वेगळीच मजा आणि उत्सुकता तुमच्या मनात असते, पण चढण जशी अधिक कठीण होत जाते, तुम्ही चालताना मध्येच अडखळू लागता (बहुतांशी लोकांच्या बाबतीत हेच होतं). तुम्हाला पुढे जायचं असतं, पण जाता येत नाही आणि एवढ्या लांब जाऊन रिकाम्या हाताने परत आला म्हणून लोकं नावं ठेवतील या भीतीने माघारी जाऊ शकत नाही, अशा द्विधा मनस्थितीत तुम्ही अडकलेले असता.
या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि तुमच्या मदतीसाठी आणि तुम्हाला नवीन संधीचं दार उघडून देण्यासाठी एखादा चांगला मार्गदर्शक/प्रशिक्षक उपयुक्त ठरू शकतो.
हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि अशाच प्रकारच्या गोष्टी ऐकून आयुष्याचे धडे गिरवण्यासाठी चॅनेल आताच सबस्क्राईब करा.