Tag: लेखमालिका

  • Magicpin Success Story: लाखोंची नोकरी सोडून उभारली भारतातील तिसऱ्या क्रमांकाची फूड डिलिव्हरी कंपनी

    Magicpin Success Story: लाखोंची नोकरी सोडून उभारली भारतातील तिसऱ्या क्रमांकाची फूड डिलिव्हरी कंपनी

    झोमॅटो आणि स्विग्गी या दोन प्रमुख फूड डिलिव्हरी अ‍ॅप्सनंतर, भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे फूड डिलिव्हरी अ‍ॅप म्हणजे मॅजिकपिन. प्रचंड स्पर्धा असलेल्या या क्षेत्रात मॅजिकपिनने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, तुम्हाला मॅजिकपिनच्या यशामागे असलेल्या व्यक्तीविषयी माहिती आहे का? ती व्यक्ती म्हणजे अंशू शर्मा. त्यांची दूरदृष्टी, धडाडी, आणि कठोर परिश्रम यांनी मॅजिकपिनला यशाच्या शिखरावर पोहोचवले आहे.

    अतिशय साध्या सुरुवातीपासून त्यांनी आपल्या यशाचा मार्ग स्वतः घडवला. त्यांना माहित होते की चिकाटी, मेहनत आणि जिद्दीशिवाय यश मिळत नाही. त्यांच्या धाडसाने आणि अथक मेहनतीने मॅजिकपिनला आज या प्रतिष्ठित स्थानी पोहोचवले आहे.

    या लेखात आपण अंशू शर्मा यांचा जीवनप्रवास, त्यांचे संघर्ष, आणि मॅजिकपिनची स्थापना कशी झाली याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

    प्रारंभिक जीवन 

    अंशू शर्मा यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांची विशेष खासियत म्हणजे नव्या गोष्टी शोधण्याचा ध्यास आणि त्यातून मोठा परिणाम साधण्याची जिद्द. आयआयटी दिल्लीमधून संगणक विज्ञानाची पदवी, आयआयएम अहमदाबादमधून एमबीए, आणि Bain & Company सारख्या जगप्रसिद्ध कन्सल्टिंग फर्ममध्ये नोकरी मिळवणे ही अनेकांसाठी यशस्वी कारकीर्दीची परिसीमा असते. मात्र, अंशू यांची महत्त्वाकांक्षा यापेक्षा वेगळी होती. त्यांना स्वतःचे अस्तित्व निर्माण करून नवनवीन समस्यांचे समाधान शोधायचे होते आणि स्टार्टअप्सच्या माध्यमातून मोठा प्रभाव पाडायचा होता.

    २००९  साली त्यांनी Lightspeed Venture Partners या प्रसिद्ध व्हेंचर कॅपिटल फर्ममध्ये काम करण्याची संधी मिळवली, जिथे ते भारतातील दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या रूपात सहभागी झाले. येथे त्यांनी नऊ वेगवेगळ्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणुकीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि त्यांचा स्टार्टअप्सशी निगडित यशस्वी प्रवास सुरू झाला.

    याच काळात त्यांना भारतीय रिटेल क्षेत्रातील स्थानिक व्यापाऱ्यांसमोरील एका मोठ्या समस्येची जाणीव झाली.  ग्राहकांना आकर्षित करून त्यांना दीर्घकाळ टिकवून ठेवणे ही व्यापाऱ्यांसाठी अत्यंत आव्हानात्मक बाब होती.या समस्येवर उपाय शोधण्याचा दृढ निश्चय अंशू यांनी केला. त्यांनी आपल्या अनुभवाचा, कौशल्याचा आणि दूरदृष्टीचा उपयग करून रिटेल क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपाययोजना राबवण्यासाठी पावले उचलली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे भारतीय स्टार्टअप्सच्या क्षेत्राला नवी दिशा मिळाली, आणि स्थानिक व्यवसायांसाठी प्रगतीचा मार्ग खुला झाला.

    मॅजिकपिनची स्थापना 

    सर्व काही सुरळीत चालले असतानाही अंशू यांच्या मनात एक मोठं स्वप्न होतं. सामान्यतः जेव्हा लोक सुरक्षित नोकरीचा विचार करतात, तेव्हा अंशू यांनी २०१५ मध्ये नोकरीचा  त्याग करून आपल्या कल्पनांना आकार देण्यासाठी मॅजिकपिन या फूड आणि फॅशन डिलिव्हरी कंपनीची स्थापना केली. अंशू यांना दृढ विश्वास होता की ग्राहकांच्या अनुभवावर आधारित स्मार्ट तंत्रज्ञानाच्या मदतीने फूड डिलिव्हरीच्या संकल्पनेस एक नवीन पातळीवर घेऊन जाता येऊ शकतं . मॅजिकपिन लवकरच एक अत्याधुनिक आणि लोकप्रिय फूड डिलिव्हरी अ‍ॅप बनलं.

    अंशू यांच्या नेतृत्वाखाली मॅजिकपिनने एक वेगळं व्यवसाय मॉडेल विकसित केलं, ज्यात ग्राहकांना त्यांच्या खरेदी बिलांचे फोटो अपलोड करून पॉइंट्स कमावण्याची संधी मिळते. या पॉइंट्सला नंतर विविध ऑफर्स आणि आकर्षक डिस्काउंट्समध्ये बदलता येतं. हे त्याचं खास वैशिष्ट्य होतं, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या खरेदी अनुभव अधिक फायदेशीर आणि मजेशीर बनवता आले.

    मॅजिकपिनने फूड डिलिव्हरीच्या पारंपरिक मॉडेलला एक वेगळा आणि नवीन आकार दिला. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ग्राहकांना स्थानिक रेस्टॉरंट्स, स्टोअर्स आणि फॅशन आउटलेट्सवर आकर्षक डील्स मिळतात . यामुळे ग्राहकांना त्यांच्या आवडत्या रेस्टॉरंट्स किंवा ब्रँड्स अधिक सोयीस्कर, किफायतशीर आणि फायदेशीर पद्धतीने शोधता येतात. मॅजिकपिन हे असे एक ठिकाण बनलं आहे,जिथं ग्राहकांना त्यांच्या खरेदीसाठी सर्वोत्तम ऑफर्स आणि डील्स उपलब्ध होतात, ज्यामुळे त्यांचा अनुभव अधिक समाधानकारक होतो.

    याशिवाय, अ‍ॅपवर सहज नेव्हिगेशन आणि  आंतरिक डिझाइनमुळे ग्राहकांना कोणत्याही अडचणीशिवाय ऑर्डर प्लेस करणं शक्य होतं. मॅजिकपिनचे वापरकर्ते ते सहज वापरू शकतात आणि त्यांना उपलब्ध असलेल्या अनेक प्रकारच्या ऑफर्स आणि डिस्काउंट्सचा लाभ घेता येतो. 

    संघर्ष ते विस्तार

    सुरुवातीला मॅजिकपिनला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. तांत्रिक समस्यांपासून ते खोट्या बिलांच्या समस्यांपर्यंत, तसेच व्यापाऱ्यांना  पैसे देण्यास तयार करणे यासारख्या अनेक अडचणी होत्या. या सर्व समस्यांचा सामना करत मॅजिकपिनने मेहनतीने उपाय शोधले आणि ग्राहकांच्या खरेदीची माहिती व्यापाऱ्यांना दिली, ज्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये विश्वास निर्माण झाला. यामुळे, मॅजिकपिनने आपला व्यवसाय मजबूत केला आणि एक सामाजिक मीडिया प्लॅटफॉर्म तयार केला, ज्यावर स्थानिक इव्हेंट्स, ब्रँड्स, आणि ऑफर्स शोधता येऊ लागल्या. यामुळे कंपनीला एका वर्षातच ७  पट वाढ साधता आली. २०१६ पर्यंत मॅजिकपिनकडे ३०,००० व्यापारी, १ दशलक्ष ग्राहक, आणि २५६  कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते.

    मॅजिकपिनने दिग्गज गुंतवणूकदारांकडून जसे की Lightspeed आणि Vy Capital यांच्याकडून निधी उभारला आणि आपली सेवा विविध क्षेत्रांमध्ये वाढवली. सलून्स, रेस्टॉरंट्स, आणि स्पा यांसारख्या व्यवसायांसोबत, त्यांनी McDonald’s आणि Taco Bell यांसारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सशी भागीदारी केली, ज्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांचा चांगलाच जम बसला . कोविड-१९ च्या काळातही, मॅजिकपिनने आपला धोरणात्मक दृष्टिकोन कायम ठेवला आणि व्यवसाय वाढवला. त्यांनी ५० शहरांमध्ये ४५ मिनिटांत फार्मसी डिलिव्हरी सेवा सुरू केली आणि दररोज ३ लाखांहून अधिक व्यवहार पूर्ण केले, ज्यामुळे त्यांचा बाजारात अधिक प्रभाव वाढला.

    यशाच्या शिखरावर 

    नोव्हेंबर २०२१ मध्ये झोमॅटोने मॅजिकपिनमध्ये ४४६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली, ज्यामुळे कंपनीचे मूल्य २४२३ कोटी रुपयांवर पोहोचले. हे कंपनीसाठी एक  मोठे टर्निंग पॉइंट ठरले आणि मॅजिकपिनचा प्रवास पुढे वेगाने सुरू झाला. आज, मॅजिकपिन ८००० कोटी रुपयांहून अधिक व्यवहार हाताळत आहे, आणि त्यांच्या प्रभावी कार्यप्रणालीमुळे ते भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे फूड डिलिव्हरी अ‍ॅप बनले आहे.

    अंशू शर्मा यांची कहाणी म्हणजे केवळ एक व्यवसायिक यशोगाथा  नाही, तर एक प्रेरणादायी प्रवास आहे. त्यांनी लाखोंची नोकरी सोडून भारतीय रिटेल क्षेत्राला नवी दिशा दिली. त्यांच्या दूरदृष्टी आणि कष्टामुळे मॅजिकपिन हे भारतीय स्टार्टअप्समधील एक यशस्वी आणि प्रभावशाली नाव बनले आहे. २५०० कोटी रुपयांची कंपनी उभारणे हि छोटी गोष्ट नाही, आणि त्यासाठी अंशु शर्मा यांचा  दृढ निश्चय, कष्ट आणि मानसिकता महत्त्वाची ठरली.

    मित्रांनो अंशू शर्मांच्या या प्रवासावरून  हे सिद्ध होतं की, दूरदृष्टी, मेहनत आणि नाविन्यामुळे कोणत्याही अडचणीवर मात करून काहीही साधता येऊ शकते. अंशू शर्मा यांचे नेतृत्व, धाडस आणि परिश्रम हेच मॅजिकपिनच्या यशाचे मुख्य कारण ठरले. खरंच, अंशू यांच्या “मॅजिक-पिन”ने इतिहास घडवला आहे!

    आणखीन वाचा:

  • बजेट तयार करण्याचा सोपा कानमंत्र; महिन्याच्या २० तारखेला पाकीट रिकामं होणार नाही!

    बजेट तयार करण्याचा सोपा कानमंत्र; महिन्याच्या २० तारखेला पाकीट रिकामं होणार नाही! 

    महिन्याची २० तारीख आली की पाकीट रिकामं होतंय….पगार कधी येतो आणि कधी संपतो, काही कळतच नाही….. महागाई इतकी वाढलीये की बचत करणं आता अशक्यच झालंय…. असे संभाषण आता प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळत आहेत. वाढत्या महागाईमुळे आपल्यापैकी प्रत्येकाच्याच घरात, लोकल प्रवासात किंवा चहाच्या टपरीवर याच विषयावर चर्चा होतांना दिसत आहे. 

    दरमहा वस्तूंचे वाढणारे भाव आणि त्या तुलनेत स्थिर असणारे उत्पन्न यांमुळे आजचा सर्वसामान्य माणूस महागाईच्या चक्रव्यूहात अडकला आहे. पण या महागाईवर रडत बसण्यापेक्षा, तिच्याशी दोन हात करण्याचा एक अचूक मंत्र आपल्याच हातात आहे, तो म्हणजे ‘आर्थिक बजेट’ (Financial Budget). जर तुम्ही अजूनही स्वतःचे बजेट बनवले नसेल, तर तुमच्या मानसिक आणि आर्थिक तणावाचे मुख्य कारण हेच आहे. बजेट म्हणजे पैशांवर बंधनं घालणं किंवा स्वतःचे छंद मारणं नव्हे, तर आपल्या कष्टाच्या पैशांना योग्य दिशा दाखवणं आहे. अजूनही तुम्ही स्वतःचे बजेट प्लॅन केले नसेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की वाचा!

    बजेट म्हणजे नक्की काय? 

    सोप्या भाषेत सांगायचं तर बजेट म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य. बजेट तुम्हाला हे सांगत नाही की तुम्ही खर्च करू नका उलट ते तुम्हाला हे सांगते की तुम्ही तुमचा पैसा कुठे आणि कसा खर्च केला पाहिजे, जेणेकरून नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही. तुमच्याकडे येणारा पैसा (Income) आणि जाणारा पैसा (Expenses) यांचा अचूक ताळेबंद म्हणजे बजेट. महागाईच्या काळातही तुमच्या गरजा आणि स्वप्नं पूर्ण करण्याचा हा सर्वात सोपा आणि शास्त्रीय मार्ग आहे.

    आजच्या काळात बजेट असणे का गरजेचे आहे?

    वाढती महागाई तुमच्या हातात नाही मात्र खिशातून जाणाऱ्या पैशांना नियंत्रित करणे तुमच्याच हातात आहे. त्यासाठी स्वतःचे बजेट आखणे गरजेचे आहे. आर्थिक बजेटमुळे तुमच्या आयुष्यात अनेक मोठे बदल होऊ शकतात. जसे की, दरमहा आपण नकळतपणे अशा अनेक गोष्टींवर खर्च करतो, ज्यांची खरोखर गरज नसते. वीकेंडला होणारे ऑनलाईन शॉपिंग, वारंवार हॉटेलिंग किंवा न वापरलेले सबस्क्रिप्शन्स यांमुळे पैसा कुठे जातो, हे समजत नाही. बजेटमुळे हा विनाकारण होणारा खर्च समोर येतो आणि पैशांची गळती थांबते. 

    दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा पेट्रोल, डिझेल किंवा भाजीपाल्याचे भाव वाढतात, तेव्हा बजेट आपल्याला काटकसर करायला शिकवते. अनावश्यक खर्च कमी करून, तो पैसा वाढलेल्या महागाईचा भार सोसण्यासाठी कसा वापरायचा, याचे नियोजन बजेटमुळे शक्य होते. कारण आयुष्यात संकट कधी सांगून येत नाही. अचानक आलेला वैद्यकीय खर्च किंवा नोकरीवरील संकट यामुळे अनेकांवर कर्ज घेण्याची वेळ येते. बजेटच्या सवयीमुळे दरमहा एक ठराविक रक्कम Emergency Fund म्हणून बाजूला राहते, जी संकटकाळात तुमची सर्वात मोठी सुरक्षा ढाल बनते. एवढेच काय तर मुलांचे उच्च शिक्षण, स्वतःचे हक्काचे घर किंवा सन्मानाने जगण्यासाठी लागणारे निवृत्तीवेतन (Retirement Planning) यांसारख्या मोठ्या उद्दिष्टांचा पाया म्हणजे आजचे बजेट. आज केलेली छोटी बचत उद्याचे मोठे भविष्य सुरक्षित करते.

    स्वतःचे बजेट तयार करण्याची सोपी पद्धत

    बजेट बनवणं खूप कठीण किंवा गणिताचे काम आहे असं वाटत असेल, तर जगातील सर्वात सोपा ५०:३०:२० चा नियम वापरून बजेट तयार करा. तुमच्या एकूण उत्पन्नाची विभागणी खाली दिल्याप्रमाणे तीन भागात करा:

    ५०% भाग: तुमच्या गरजा (Needs)

    तुमच्या पगारातील अर्धा भाग हा ज्या गोष्टींशिवाय तुम्ही जगू शकत नाही, त्यावर खर्च झाला पाहिजे. यामध्ये घरभाडे, होम लोनचा EMI, किराणा माल, वीज-पाणी बिल, मुलांची शाळा-कॉलेज फी आणि औषधोपचार यांचा समावेश होतो.

    ३०% भाग: तुमच्या इच्छा (Wants)

    तुमच्या एकूण उत्पन्नातील ३० टक्के भाग तुमच्या इच्छा आणि आनंदासाठी आहे. माणसाने फक्त गरजा पूर्ण करण्यासाठी जगू नये, तर आयुष्य जगण्याचा आनंदही घेतला पाहिजे. हॉटेलिंग, फिरायला जाणे, नवीन कपडे खरेदी करणे किंवा तुमचे छंद यांवर तुम्ही हा पैसा खर्च करू शकता. पण लक्षात ठेवा, हा खर्च ३० टक्क्यांच्या वर जाता कामा नये.

    २०% भाग: बचत आणि गुंतवणूक (Savings & Investment)

    प्रत्येक महिन्याचा पगार खात्यात जमा झाल्यावर सर्वात आधी २० टक्के भाग बाजूला काढा. कारण तुमच्या बजेटमधील २० टक्के हा भाग सर्वात महत्वाचा आहे. हा पैसा नुसता बँक खात्यात न ठेवता म्युच्युअल फंड (SIP), पीपीएफ (PPF), शेअर्स किंवा मुदत ठेव (FD) यांसारख्या चांगल्या ठिकाणी गुंतवा, जेणेकरून महागाईपेक्षा जास्त परतावा तुम्हाला मिळेल.

    बजेट कसे सुरू करावे?

    सुरुवातीला फक्त एक महिना तुमचा प्रत्येक रुपया कुठे खर्च होतोय, याची डायरीमध्ये किंवा मोबाईलमध्ये नोंद ठेवा. त्यानंतर खर्च करताना हा खर्च माझी गरज आहे की इच्छा? हा एकच प्रश्न स्वतःला विचारा आणि त्यानुसार बजेट प्लॅन करा. सुरुवातीला बजेट शंभर टक्के पाळता आले नाही तरी चालेल, पण सुरुवात करणे महत्त्वाचे आहे. एक गोष्ट मनाशी पक्की करून घ्या महागाई कधीच कमी होणार नाही, काळासोबत वाढतच राहणार आहे.

    अशा वेळी केवळ कमावणे आणि खर्च करणे या चक्रात अडकून पडलो, तर आर्थिक विवंचना कधीच संपणार नाही. या चक्रातून बाहेर पडून कमावणे म्हणजे आधी बचत करणे आणि मग उरलेले खर्च करणे हाच आर्थिक सुखाचा एकमेव कानमंत्र आहे. त्यामुळे आजच डायरी आणि पेन घ्या किंवा मोबाईल उघडा आणि तुमचे बजेट तयार करा. लक्षात ठेवा, स्वतःचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी बजेट बनवण्याची सर्वोत्तम वेळ आज आणि आत्ताच आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा!

  • अनुक्रमणिका

    अनुक्रमणिका

    स्वतःच्या क्षमतावर असणारा विश्वास अधिक दृढ करायचा आहे, न्यूनगंडावर मात करायची आहे, त्याचप्रमाणे स्मरणशक्ती वाढवायची आहे, विसरभोळेपणा विसरायचा आहे, रागावर नियंत्रण मिळवायचे आहे, जीवनात संयम आणायचा आहे, जोखीम घ्यायची क्षमता वाढवायची आहे व व्यक्तीमत्त्व प्रभावशाली बनवायचे आहे. अशा प्रत्येक व्यक्तीसाठी ही लेखमालिका महत्त्वाची आहे.

    इंटरनॅशनल शाळा, सीबीएसई, तसेच पब्लिक स्कूल (अर्थात भरपूर पैसे भरुन जिथे शिक्षण विकत घेतले जाते व दर्जेदार शिक्षणाचा फुगा फुगवला जातो अशा खाजगी शाळा) मधून (या प्रकारच्या संस्थाना आपण अ गट म्हणू या.) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा जिल्हा परिषद शाळा, मुन्सिपालिटीच्या शाळा, सरकारी विद्यालये, बोर्डिंग स्कूल, विनानुदानित शाळांमध्ये (या प्रकारच्या संस्थाना आपण ब गट म्हणू या.) शिक्षण घेणारे विद्यार्थी कुठेच कमी नाहीत याची जाणीव दोन्ही वर्गाला होईल. त्यातून विकासाचा मार्ग पुढे जात राहील. अ गटात ब गटापेक्षा असणारी साधने नक्कीच प्रभावशाली आहेत. मात्र त्या साधनांना वापरण्यासाठी त्याचा योग्य परिणाम साधण्यासाठी करावी लागणारी साधना करण्याची क्षमता दोन्ही गटाकडे सारखीच आहे. या साधनेचा मार्ग पुढीलप्रमाणे आहे. 

    भाग १ – शिकण्याचे मुलभूत घटक 

    १. शिक्षणाचे महत्त्व 

    २. कल ओळखण्याची कला 

    ३. शिकण्याच्या पध्दती 

    ४. ऐकून शिकण्याचे महत्त्व

    ५. बघून शिकण्याचे महत्त्व 

    ६. अनुभवातून शिकण्याचे महत्त्व 

    भाग २ – शिक्षणाच्या पुढील टप्प्यावर 

    ७. आकलन – वाचनाची गरज 

    १०. लेखन एक देणगी 

    ११. पाठांतराला फाटा देऊन लक्षात ठेवण्याची कला 

    १२. योग्य वेळी योग्य गोष्टी आठवण्याची पध्दती 

    १३. जगताना चालता फिरता शिकण्याचे तंत्र 

    १४. मुल्ये जोपासताना – मुल्यांचे मूल्य 

    १५. शिक्षणातून करिअरकडे जाताना 

    भाग ३ – व्यावहारिक जगात शिक्षणाची सांगड 

    १४. कविता जीवन मधूर करतात 

    १५. गणिताने व्यवहार सुलभ होतात 

    १६. गणिताची भीती घालवण्याची सोपी पध्दत 

    १७. अवघड सुत्रांना मित्र बनवू या 

    १८. इतिहासातील सनावळ्या झाल्या 

    १९. चित्रकलेने आयुष्यात भरले रंग 

    २०. खेळामुळे जीवन बनते आनंदी 

    २१. भूगोल म्हणजे सहलीची मजा 

    २२. मराठी-हिंदी-इंग्रजी भाषा म्हणजे ताई-माई-अक्का 

    २३. नागरिकशास्त्र – राज्यशास्त्र म्हणजे मैत्रीचे धडे 

    २४. शब्दकोडी म्हणजे जीवनातला विरंगुळा 

    २५. चर्चेतून शिकू या सारे काही 

    २६. बाजारातील घटकांचे गणित 

    २७. उद्योगशिक्षणासाठी कार्यानुभव 

    २८. शिक्षणातील गमती (मजेशीर अनुभव) 

    २९. अनेक विषय म्हणजे ताण नाही तर मजा 

    भाग ४ – परिक्षा म्हणजे महोत्सव 

    ३०. चुटकीसरशी घालवू परिक्षेची भीती 

    ३१. परिक्षेची वाट पाहताना

    ३२. रोजच पाहिजे शाळा – शिक्षणाची गोडी 

    ३३. विषयाची भीती नको – गंमत जाणून घेऊ 

    ३४. मुलाखती म्हणजे गप्पांचा अड्डा 

    ३५. भाषण माझ्या आवडीचे 

    ३६. स्टेज गाजवायचा – रंगमंचावर रंग भरताना 

    ३७. चला शिक्षकमित्र बनू या

    भाग ५ – व्यक्तिमत्व विकास : सारे काही शिकताना 

    ३८. आत्मविश्वासाला बाहेर काढू, संकटांना भिडू 

    ३९. चार भिंतीतल्या शिक्षणाच्या मर्यादा जुगारताना 

    ४०. नवीन भाषा – संकट नव्हे संधी 

    ४१. आनंदाने समाजात वावरताना 

    ४२. भूतकाळ भूतकाळात जमा 

    ४३. वर्तमानातून भविष्याकडे 

    ४४. न्यूनगंड, भीती, नकारात्मकता हद्दपार 

    ४५. जोखीम नव्हे पराक्रमाचे मैदान 

    ४६. पैसे मिळवण्याची कला 

    ४७. दानातून मिळणारा आनंद 

    ४८. रागावर मात – जीवन आनंदात 

    ४९. जीवनसंगीताचे सूर जुळवताना 

    ५०. नात्यांचे बंध जोडताना 

    उद्यापासून रोज सकाळी दहा वाजता एक लेख प्रकाशित होईल. शिक्षणाच्या निरंतर प्रवासासाठी शुभ यात्रा. 

  • शिकण्यासाठी सारे काही

    शिकण्यासाठी सारे काही

    त्यासाठी प्रत्येक वेळी शाळेत किंवा महाविद्यालयात गेलेच पाहिजे असे काही नाही. माणूस अनुभवातून शिकत जातो. चांगल्या लोकांच्या सहवासात राहून माणूस चांगूल पणा शिकतो. तर यशस्वी लोकांच्या सानिध्यात राहून माणूस यशस्वी बनायला शिकतो. पैसेवाल्या लोकांच्या संगतीत राहून त्याला आर्थिक मार्गांचे दर्शन होते. जिथे जाईल तिथे माणूस कळत नकळत बरेच काही शिकत असतो. अध्यात्मिक लोकांच्या उपस्थितीत त्याला शांततेचे दर्शन प्राप्त होते. निसर्गाच्या वास्तव्यात त्याला विश्वाची रहस्ये समजू शकतात.

    The Ultimate Guide to Learning

    शिकण्याची ही प्रक्रिया आईच्या पोटात गर्भावस्थेत असल्यापासून सुरु होत असल्याचे विज्ञानाने मान्य केलेले आहे. महाभारतात सुध्दा अभिमन्यू आई द्रौपदीच्या पोटात असताना चक्रव्यूहात कसे जायचे? ही कला शिकला होता अशी कथा आहे. जन्माच्या आधीपासून सुरु झालेली ही शिकण्याची निरंतर प्रक्रिया माणसाचे अस्तित्व आहे तोपर्यंत चालूच राहते. आईच्या पोटात असताना किंवा लहान असताना तो जे काही शिकतो ती एक नैसर्गिक प्रक्रिया असते. आपोआप काही गोष्टी तो शिकत जातो. उदा. चालणे, बोलणे, खाणे अशा काही गोष्टी तो स्वतःहून ग्रहण करतो.

    मात्र अक्षरओळख होणे, गणिते, आर्थिक व्यवहार करणे यासारख्या मानवनिर्मित गोष्टी त्याला नैसर्गिक पध्दतीने शिकता येत नाहीत. त्यासाठी त्याला बाहेरुन प्रयत्न करावे लागतात. या गोष्टी आपोआप होत नाहीत. प्रत्येकजण आपापल्या प्रयत्नाने साध्य होईल तेवढे यश संपादन करतो. नैसर्गिक गोष्टीत प्रत्येकजण १०० टक्के यश प्राप्त करतो कारण या गोष्टी आपोआप होत असतात. प्रत्येकजण चालायला शिकतो म्हणजे १०० टक्केच चालायला शिकतो. त्यात निसर्ग भेदभाव करत नाही. प्रत्येकाला तो संपूर्ण क्षमता बहाल करतो. मात्र माणसाला वैयक्तिक विकास साध्य करताना त्याच्या प्रयत्नाइतके यश मिळते. 

    The Ultimate Guide to Learning

    एकंदरीतच शिकण्याच्या व ज्ञान आत्मसात करण्याच्या गोष्टींवर आपल्या विकासाचा व प्रगतीचा दर अवलंबून असतो. म्हणून शिकण्यासाठी सोप्या प्रक्रिया कोणत्या? त्या अधिक प्रभावी कशा करता येतील? त्या सर्वसमावेशक कशा असतील? यावर सविस्तर अभ्यास आपण येणाऱ्या नव्या लेखमालिकेत करणार आहोत. प्रत्येकाला स्वतःच्या कलानुसार शिकण्यास मिळाले तर किती चांगले होईल. सचिनला क्रिकेट, लता संगीत, अमिताभला अभिनय, सायनाला बॅडमिंटन शिकताना जेवढे आवड होती तेवढी कदाचित दुसरे विषय शिकताना नसावी. त्यांना त्यांचे कल व कला समजल्या त्यानंतर त्यांची शिकण्याची व त्यातील सर्वोच्चता साध्य करण्याची वाट मिळाली. विद्यार्थ्यापासून नोकरदारांपर्यंत, गृहिणीपासून उद्योजकापर्यंत प्रत्येकाला शिकण्याचे काय फायदे होतात? याविषयीचे कानमंत्र या नव्या लेखमालिकेत दिले आहेत. 

  • भांडवल कसे उभे करावे ?

    भांडवल कसे उभे करावे ?

    भांडवल नसणे (३६६ मते)
    मार्गदर्शन नसणे (२१३ मते)
    कुटुंबातील व्यक्तीचा पाठिंबा नसणे (१२७ मते)
    मार्केटिंग न करता येणे (९३ मते)
    मानसिकता व यशाबाबत साशंकता (५५ मते)
    सरकारी अडथळे (४१ मते)
    चुकीचे निर्णय (२८ मते)

    म्हणजेच भांडवल नसणे ही समस्या सर्वाधिक उद्योजकांना जाणवत असल्याचे निदर्शनास आले आहे. तुम्हाला हवे तेवढे भांडवल मिळाले तर काय करणार? असा प्रश्न स्वतःला विचारा. तुमच्याकडे तुम्ही जो बिझनेस करणार आहात त्याचा बिझनेस प्लॅन बनविलेला आहे का? त्या व्यवसायासाठी कराव्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी करायला तुम्ही तयार आहात का? त्याची तुम्हाला पूर्ण माहिती आहे का? तुमच्याकडे या प्रश्नांची उत्तरे असली, तर लगेच तुम्हाला भांडवलदार उपलब्ध आहेत. नसतील तर आपण त्याची तयारी करुन घेऊ.

    भांडवल उभारणीचे काही पर्याय :

    📌 बँका – बँकेसाठी सर्वात महत्त्वाची माणसे असतात ती म्हणजे कर्जदार. ठेवीदारापेक्षा बँकांना कर्जदाराची गरज जास्त असते; कारण बँका चालवण्यासाठी लागणारा पैसा हा कर्जदाराकडून मिळालेल्या व्याजातूनच मिळत असतो. त्यामुळे बँका कर्ज देण्यासाठी उद्योजकांचा शोध घेत असतात. मात्र त्यांना कर्जाची रक्कम व व्याज योग्य वेळी आपण परत करु शकतो, या गोष्टीची खात्री पटवून देणे गरजेचे असते. एकदा आपण बँकेला कर्ज फेडण्याची खात्री पटवून देऊ शकलो की,० बँक आपल्याला लागेल एवढे कर्ज उपलब्ध करुन देते. आपणही आपला व्यवसाय अधिक जोमाने वाढवण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन ती पार पाडून व्यवसायाच्या वेगवान वृध्दीची गुरुकिल्ली प्राप्त करु शकतो.

    📌 HNI, NRI – एचएनआय म्हणजे High Networth Individual. काही भरपूर संपत्ती कमावलेली माणसे आपल्या समाजात असतात. त्यांना आपले पैसे काही नवीन व्यवसाय करणाऱ्या होतकरु तरुणांना मदत म्हणून द्यायचे असतात. यापैकी काही एचएनआय हे भागीदारी (Partnership) मागतात, तर काही लोकांना खात्रीशीर (fixed return) पैसे परत हवे असतात. ह्या लोकांपर्यंत आपली व्यवसायाची संकल्पना पोहोचवणे गरजेचे असते. अशा लोकांचे संपर्क क्रमांक, ईमेल असल्यास त्यांना आपला बिझनेस प्लॅन पाठवावा व नंतर त्यांना आपण बिझनेस प्लॅन पाठवल्याची व त्यांना तो पोहोचला असल्याची खात्री करुन घ्यावी.

    भारताबाहेर राहणारे अनिवासी भारतीय म्हणजेच NRI (Non Resident Indian) या लोकांकडे बऱ्यापैकी पैसे असतात. त्यांना भारताविषयी आस्था असते. ती व्यक्त करण्यासाठी व त्यातून ते गुंतवणूक करण्यास तयार असतात. त्यातून येणारी मिळकत ही रिटायरमेन्ट साठी वापरता यावी म्हणून जमा करुन ठेवतात; म्हणून हे पैसे दीर्घ कालावधीसाठी वापरता येतात. फक्त प्रत्येक प्रकारच्या गुंतवणूकदाराचे पैसे इमानेइतबारे परत करावेत. कारण आपल्याला वेळोवेळी व्यवसायवाढीसाठी लागणारे पैसे ते देऊ करतात, त्यामुळे वेळच्यावेळी परत पैसे दिल्यामुळे त्यांचा आपल्यावर विश्वास बसतो.

    📌 अँजेल इन्व्हेस्टर्स : अँजेल इन्व्हेस्टर्स म्हणजे अशी लोकं ज्यांच्याकडे भरपूर पैसे असतात आणि ते सुरुवातीच्या काळात नवउद्योजकांना पतपुरवठा करत असतात. त्याबदल्यात त्यांना कंपनीत भागीदारी द्यावी लागते. केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते. यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या लोकांचं नेटवर्क खूप मोठं असतं. त्याचा फायदा करून घेता येतो. दुसरा फायदा म्हणजे, जसे कर्ज घेतले की दुसऱ्या महिन्यापासून हप्ते सुरु होतात, तसं इथे होत नाही. इन्वेस्टर्सनी दिलेले पैसे परत करण्याची गरज नसते, कारण त्या बदल्यात तुम्ही कंपनीचे शेअर्स त्यांना विकलेले असतात. त्यामुळे व्यवसाय वाढला तर त्यांचा फायदा होतो आणि बुडाला तर त्यांचे पैसेही बुडतात.

    📌 *क्राउड फंडिंग – *आजूबाजूच्या सामान्य माणसांकडून कमी प्रमाणात व जास्तीत जास्त लोकांकडून पैसा उभा करुन मोठे भांडवल उभे करता येते. ५०० लोकांकडून १००० रुपये प्रत्येकी एक वर्षासाठी कर्जाऊ घेतल्यास ५ लाख रुपये सहज उभे करता येतात. आपला प्रस्ताव हा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येतो. बल्क एसएमएस, सोशल मिडीया व बल्क ईमेल या माध्यमातून आपण हे जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचवू शकतो. उत्पादने बाजारात आणण्यापूर्वी आगाऊ नोंदणी करणे हाही एक भांडवलनिर्मितीचा मार्ग आहे. काही वर्षापूर्वी रिलायन्स कंपनीने ५०० रुपयात मोबाईल देण्याची घोषणा करुन आगाऊ नोंदणी (Advance Booking) करुन लाखो रुपयांचे भांडवल उभे केले होते व नंतर काही महिन्यांनी ग्राहकांना मोबाईल दिले. टेस्ला इलेक्ट्रिक कारसाठी सुद्धा हाच मार्ग वापरला गेला आहे.

    मुक्त अर्थव्यवस्थेमुळे थेट परकीय गुंतवणूक हाही भांडवलनिर्मितीचा पर्याय उपलब्ध आहे. आपण जेवढी अधिक कल्पकता वापरु तेवढे अधिक पर्याय आपण स्वतःच निर्माण करु शकतो व त्यातून हवे तेवढे भांडवल उभे करता येते. त्यासाठी अतिशय उत्तम असा बिझनेस प्लॅन आपल्याकडे तयार असायला हवा.

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती
  • व्यवसायासाठी किती भांडवल लागेल?

    व्यवसायासाठी किती भांडवल लागेल?

    हुशार व कल्पक उद्योजक अगदी कमी भांडवलात उत्तम प्रतीच्या सेवा व उत्तम प्रकारची गुणवत्ता असणारी उत्पादने बाजारात आणत असतो किंवा काही उद्योजक अगदी मुबलक प्रमाणात भांडवल उद्योगात गुंतवतात. ग्राहकांकडून ते हक्काने मागून घेतात व ग्राहकही स्वखुशीने त्या उत्पादनांची किंमत त्या उद्योजकाला देत असतात. उदाहरण द्यायचे झाल्यास मॅकडोनाल्ड ही कंपनी १०-१२ रुपयाला मिळणारा वडापाव (बर्गर) २७ रुपायांना विकते. त्याची उत्पादन किंमत अगदी २-३ रुपये इतकी कमी आहे, तरीही ग्राहक ती किंमत स्वखुशीने देतात.

    आपल्या व्यवसायाचे एक कार्यालय मुख्य शहरात असावे. एकापेक्षा अधिक शहरात व्यवसाय करु इच्छिणाऱ्या उद्योजकांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या शहरात एक एक कार्यालय चालू करावे. म्हणजे ६ उद्योजक एकत्र आले व त्या सहाही उद्योगांना नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, पुणे व मुंबई या ६ ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी प्रत्येकी ६-६ कार्यालये चालू करणे आवश्यक आहे. येथे ३६ कार्यालये सुरु करण्याऐवजी फक्त सहाच कार्यालये सुरु करावीत. प्रत्येकाने एक-एक कार्यालय सांभाळावे, म्हणजे प्रत्येकाच्या सहा शाखा होतील; मात्र खर्च एकाच कार्यालयाच्या खर्चाएवढा असेल.

    को-वर्किंग स्पेस हा एक खूप चांगला प्रकार आहे. Innov8, WeWork, 91Springboard, Awfis, Smartworks, Kafnu, myHQ अशा अनेक कंपन्या ही सुविधा पुरवतात. यामध्ये एका मोठ्या जागेत अनेक छोटे छोटे डेस्क बनवलेले असतात. इथे चहा-कॉफी, वायफाय, ऑफिस चेअर, डेस्क अशा सर्व सुविधा मिळतात. नाममात्र शुल्क देऊन यापैकी एक डेस्क तुम्ही घेऊ शकता आणि तिथून काम सुरु करू शकता. एखादी मिटिंग करायची असेल तर त्यासाठी वेगळी मिटिंग रूम असते. अनेक नवउद्योजक एकाच ठिकाणी त्यांच्या आयडियाजवर काम करत असतात त्याचा सुद्धा नेटवर्किंगसाठी फायदा होतो.

    Virtual Office (व्हर्च्युअल ऑफिस) ही संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. हे एक अशा प्रकारचे ऑफिस असते ज्यामध्ये जगभरातल्या सर्व मुख्य शहरात तुम्ही तुमचे कार्यालय अगदी कमी खर्चात सुरु करु शकता. उदा. मुंबईत नरीमन पॉईंट किंवा बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स सारख्या महागड्या ठिकाणी एक ऑफिस भाड्याने घ्यायचे झाल्यास दरमहा ६० हजार रुपये ते २ लाख रुपये भाडे लागते. त्याऐवजी virtual office चे भाडे हे केवळ ६-१० हजार एवढेच असते. Virtual office मध्ये असिस्टंटचा पगार देण्याची गरज नाही, फोनबिल व वीजबिल भरण्याची गरज नाही; तरीही या पत्यावर आलेली पत्रे व डॉक्युमेंट तुम्हाला मिळतात. तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर मिळतो. तो उचलण्यासाठी व फोन वर झालेल्या चर्चेच्या नोंदी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक यंत्रणा काम करत असते. ६-१० हजारात हे सर्व मिळत असते. इतर कोणतीही छुपी किंमत द्यावी लागत नाही. याचा फायदा नवीन ऑर्डर मिळवण्यासाठी होतो, समोरच्या व्यक्तीवर तुमचा चांगला प्रभाव पडतो.

    अशा कितीतरी गोष्टी आपल्याला ‘जुगाड’ या तत्त्वाचा वापर करुन कमी भांडवलात निर्माण करता येतात. आपली विचार करण्याची पध्दत थोडीशी बदलून फार काही साधता येते. अर्थात हे सर्व सुरुवातीच्या टप्प्यात करायचे आहे, त्यानंतर जसजसा व्यवसाय वाढत जाईल, तसतशा ह्या जुगाड केलेल्या गोष्टी बदलून गुणवत्ता असलेल्या (Standard) स्वरुपात स्थापित करणे चांगले. यामध्ये कुणालाही फसवण्याचा उद्देश नसावा. समोरुन जर विचारणा करण्यात आली, तर स्पष्ट शब्दात आपण केलेली तजवीज त्यांना सांगणे हितावह असते. विश्वास टिकवण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जर विचारले नाही तर आपणहून सांगणे गरजेचे नाही.

    जयहिंद!!!

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती

    आणखी वाचा

  • व्यवसायाच्या वाटेवर चालताना – कशी करावी सुरुवात?

    व्यवसायाच्या वाटेवर चालताना – कशी करावी सुरुवात?

    आता ही सर्व उत्तरे सोडून व्यवसायाची सुरुवात कशी करता येईल याचे योग्य व सोपे असे उत्तर शोधून काढूया. नोकरी सोडून व्यवसाय करायचे ठरले. दुसऱ्या लेखाकांत व्यवसाय करण्याचे फायदे पाहिले. सुरुवात करण्याआधी काय करावे व मानसिकता कशी असावी याबाबत जाणून घेतले. कोणता व्यवसाय करावा व त्या व्यवसायाचे कार्यक्षेत्र कसे निवडावे हेही आपण ठरवले. बिझनेस प्लॅनची गरज जाणून घेतली. त्यातील महत्त्वाचे मुद्दे पाहिले. घरातील व्यक्ती पाठिंबा मिळवण्याची प्रक्रिया जाणून घेतली. अनुभवाबद्दल जाणून घेतले. हे सगळे केलेल्या व्यक्तीला व्यवसायाच्या सुरुवातीला करायच्या गोष्टींचा अंदाज आलेला असतो.

    व्यवसाय करण्यासाठी लागणारे भांडवल किती व ते कसे मिळवावे? भांडवल उभारणी करत असताना तारण नसल्यास काय करावे? भांडवल उभारणीचे पैसे परत कसे करावे? सरकारी परवानग्या कोणत्या व त्या कशा मिळवाव्यात? या परवानग्यांचा होणारा फायदा कोणता? या प्रश्नांची उत्तरे शोधणे बाकी असते. त्याआधी आपली उत्पादने (वस्तू/सेवा) निर्मितीसाठी लागणारी यंत्रे, अवजारे, मनुष्यबळ व जागा या सारख्या गोष्टी कुठे मिळतील याचा शोध घेणे अत्यंत गरजेचे असते. म्हणजे भांडवल उभारणीनंतर आपला उद्योगाचा मार्ग सुकर होतो. व्यवसायाची वाढ अतिशय वेगाने होते

    तुम्ही भांडवल उभारणी करण्यासाठी लागणारे पैसे मिळवण्यासाठी पाठवलेला प्रत्येक ईमेल हा लेटरहेड वरच असावा. लेटरहेडचे एक module तुमच्या लॅपटॉपमध्ये जतन करुन ठेवलेले असावे. त्यामुळे आपण पाठवलेला प्रत्येक व्यवसाय प्रस्ताव गांभीर्याने वाचला जाण्याची शक्यता वाढते. तुम्ही कार्यालय/ऑफिस घेऊ शकत नसाल, तर घरचा पत्ता हा कार्यालयाचा पत्ता म्हणून प्रत्येक ठिकाणी वापरा. व्यवसायाचे फेसबुक पेज तयार करावे, त्यासाठी एकही रुपयाचा खर्च नाही, मात्र हजारो लोकांपर्यत व्यवसाय पोहोचवण्यास त्याची मदत होते.

    आपल्या व्यवसायात भागीदार घेणार की नाही? हा प्रश्न सोडवणे गरजेचे ठरते. भागीदार घेणार असल्यास त्याचे व तुमचे काम काय असेल? याची विभागणी करणे किफायतशीर ठरेल. एकाच व्यक्तीने सर्व काम करणे म्हणजे व्यवसायाला मिळालेली गती कमी करण्यासारखे ठरते. त्यामुळे व्यवसायाच्या प्रमुखाने स्वतःचा काही काळ रिकामा ठेवला पाहिजे, जेणेकरुन व्यवसाय वृध्दीसाठी इतर प्रयत्न करता येतील.

    लागणारी यंत्रे घेतलीच पाहिजेत किंवा नाही याचा विचार तुमच्या मूळ भांडवलाचा अंदाज घेऊन केला पाहिजे. फार कमी भांडवल असल्यास काही कामे outsourcing करणे हितावह ठरते. त्यामुळे जागा व पैशाची बचत, तर होतेच शिवाय आपल्याला थोडासा वेळही मिळतो.

    व्यवसाय करु इच्छिणारी काही हुशार माणसे आपल्या सोबत असल्यास त्यांच्याकडून आपण बनवलेली प्रत्येक गोष्ट तपासून घेतली पाहिजे व त्यात अपेक्षित असणारे बदल केले पाहिजेत. ही हुशार माणसे तुम्हाला कायमस्वरुपी मार्गदर्शकाच्या भूमिकेत भेटत असतात. त्यांचा आदर करणे व त्यांची मर्जी राखणे ही आपली प्राथमिकता असावी. मग काही कायदेविषयक, तर काही अर्थविषयक, काही लोकसंपर्क दांडगा असलेली अशी प्रत्येक प्रकारची माणसे तुमच्याकडे असली पाहिजेत. त्यांना पगार देऊन कामाला ठेवणे आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यात परवडण्यासारखे नसले, तरी अशा माणसांचे संपर्क आपल्या मोबाईलमध्ये कायम जतन करुन ठेवलेले असल्यास आपल्याला हवे तेवढे काम तेवढाच मोबदला देऊन करुन घेणे उत्तम ठरते.

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती

    आणखी वाचा

  • व्यवसायच का ? – नोकरदार आणि व्यावसायिक यातील फरक

    व्यवसायच का ? – नोकरदार आणि व्यावसायिक यातील फरक

    एके दिवशी कंपनीच्या मॅनेजरला (व्यवस्थापकाला) समोसावाल्याची खिल्ली उडवण्याची लहर आली. मॅनेजरने विचारले, “मित्रा तू तुझे हे समोश्याचे दुकान खूप चांगल्या प्रकारे चालवत आहेस. पण तू तुझा अमूल्य वेळ व हुशारी समोसे तळण्यात वाया घालवत आहेस, असे तुला कधीच वाटत नाही का? जरा विचार करुन बघ, जर तू सुध्दा माझ्यासारखा एखाद्या कंपनीत काम करत असता, तर कुठपर्यंत प्रगती करु शकला असता? कदाचित तू देखील माझ्यासारखाच मॅनेजर झाला असता.”

    या प्रश्नावर थोडासा विचार करुन शांतपणे हसत समोसावाल्याने उत्तर दिले, “साहेब माझे हे काम तुमच्यापेक्षा कैकपटीने चांगले आहे. १० वर्षांपूर्वी मी डोक्यावर टोपली घेऊन दारोदार फिरुन समोसे विकायचो. तेव्हा तुम्ही प्रथम नोकरीला लागला असाल. १० वर्षापूर्वी मला समोसे विकून दर महिन्याला एक हजार रुपये मिळायचे, तेव्हा तुमचा पगार १० हजार रुपये होता. १० वर्षात दोघांनी खूप कष्ट केले, मेहनत घेतली. तुम्ही सुपरवायझर पासून मॅनेजर पदापर्यंत मजल मारली व मी टोपली घेऊन फिरणारा समोसावाला ते एक स्थिरस्थावर दुकानदार असा प्रवास केला. आज तुमचा पगार ५० हजार रुपये आहे, तर मी महिन्याला दोन लाख रुपये कमावतो.”

    मॅनेजर साहेब ऐकत होते, “याउलट तुमचा मुलगा Direct (थेट) तुमच्या पदावर जाऊ शकत नाही. त्याला परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. त्याच्या मेहनतीचा फायदा या कंपनीच्या मालकाच्या मुलांना होईल. तो आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर तुमच्या एवढाच किंवा फार तर दोन पावले पुढे जाईल, तर माझा मुलगा माझ्या फार पुढे निघून जाईल. तर साहेब आता सांगा, कुणाचा वेळ व हुशारी वाया जात आहे?” मॅनेजर साहेबांनी २ समोश्याचे २० रु. दिले व निरुत्तर होऊन निघून गेले.

    हा प्रसंग व्यवसाय का केला पाहिजे हे शिकवून जातो. तुमच्यानंतरही तुमचा वारसा केवळ मुलांनाच नाही, तर समाजाला, काम करणाऱ्या लोकांना व कितीतरी घटकांना मिळत असतो. जमशेदजी टाटांनी १८६८ मध्ये मुहूर्तमेढ रोवलेला टाटा समूह आज १५० वर्षांनीही यशस्वी घौडदौड करतो आहे. एडिसनने १८९२ मध्ये सुरू केलेली जनरल इलेक्ट्रिक कंपनी आज एडिसन नंतरही काम करत आहे. कोणतीही संकल्पना, विचार किंवा संस्था (मग तो व्यवसाय असो, सामाजिक संस्था असो की देश) ही तिला जन्म देणाऱ्या व्यक्तीहून फार मोठी असते. तिला जन्म देणाऱ्या मेंदूचा नाश झाला तरी ती वाढतच राहते. चिरकाल टिकते. फक्त सुरुवातीच्या टप्प्यात आपण तिची काळजी घ्यायची असते. एकदा ती स्वतःच्या ताकदीवर उभी राहिली, की आपले काम पूर्ण होते. व्यवसायामध्ये हा कालावधी सरासरी तीन वर्षाचा आहे. काही ठिकाणी तो कमीअधिक होऊ शकतो. नाउमेद होता हा व्यवसाय स्वतःच्या ताकदीवर उभा राहिपर्यंत कसा पुढे नेता येईल? यासाठी कोणती मानसिकता लागेल? या वर पुढील लेखात जाणून घेऊ.

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती

    आणखी वाचा

  • व्यवसायाच्या वाटेवर चालताना – अनुभवाची गरज आहे का?

    व्यवसायाच्या वाटेवर चालताना – अनुभवाची गरज आहे का?

    जगातले सर्वात मोठे Amusement Park वॉल्टला बनवायचे होते. त्यासाठी लागणारी अब्जावधीची संपत्ती वॉल्टने उभी केली व जगात त्याआधी कधीच झाले नाही ते घडवण्याचा प्रकल्प सुरु केला. त्याचा भाऊ रे डिस्ने त्याच्यासोबत होता. या प्रकल्पाचे काम चालू असतानाच वॉल्ट डिस्नेला या जगाचा निरोप घ्यावा लागला.

    रे डिस्नेने या प्रकल्पाचे काम पुढे चालू ठेवले. जगप्रसिध्द Disneyland तयार केले. तेव्हा पत्रकारांनी रे डिस्नेला एक प्रश्न विचारला तो म्हणजे, “हा प्रकल्प पूर्ण झालेला पाहायला वॉल्ट असायला हवा होता असे तुम्हाला वाटत नाही का?” त्यावेळी रे डिस्नेने पत्रकाराला दिलेले उत्तर हे आजच्या लेखाचे उत्तर आहे. रे या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाला, “मित्रहो, वॉल्टने हा प्रकल्प पूर्ण झालेला कित्येक वेळा पाहिला आहे. आज आपण जे पहात आहोत; ते वॉल्टने कित्येक वेळा पाहिले म्हणून हे साकारले.”

    खरोखरच डिस्नेलँडने पर्यटन व्यवसायातले सगळे विक्रम मोडून काढले. व्यवसाय करताना उद्योजक जे स्वप्न पाहतो, ते साकारण्यासाठी प्रयत्न करतो, तोच खरा अनुभव असतो. अनुभव हा विकत मिळत नाही किंवा तो इतरांकडून उसणवारही घेता येत नाही. तो मिळवावा लागतो. तो प्रत्यक्ष काम केल्यानेच मिळतो. अबांनींसारखे उद्योजकही त्यांच्या मुलांना त्यांचा अनुभव देऊ शकत नाहीत. ते फक्त मार्गदर्शन करु शकतात. त्यांच्या मुलांनाही अनुभव घ्यावाच लागतो.

    ठराविक कामाचा अनुभव घ्यायचा झाल्यास काही मार्ग अजून आहेत. त्यामध्ये वाण्याचा मुलगा दुकानात बसून आर्थिक व्यवहार त्याच्या सवयीचे करुन घेतो. वाण्याची गिऱ्हाईकांशी बोलण्याची कला आत्मसात करुन घेतो. मारवाडी, गुजराती माणसाला या गोष्टींचे निरीक्षण करण्याची व त्याचे आकलन करण्याची संधी घरातच मिळत असते. हा अनुभवाचाच भाग असतो, संपूर्ण अनुभव नव्हे. आता ज्याला हे वातावरण मिळत नाही. अशा आपल्यासारख्या मराठी माणसाला हा अंशत: अनुभव मिळवण्याचे काही मार्ग आहेत त्यावर एक नजर टाकूयात. या मार्गाचा अवलंब केल्यास आपण वर वर्णन केलेल्या मुलांपेक्षा काहीशा जास्त वेगाने तेवढाच अनुभव कमी वेळात प्राप्त करुन घेऊ शकतो.

    Youtube वर अशा अनेक उद्योजकांनी केलेली भाषण उपलब्ध आहेत, ती लक्षपूर्वक ऐकणे व त्यातील महत्वाच्या नोंदी करुन ठेवणे. काही भाषणं डाऊनलोड करून मोबाईलमध्ये घेऊन येताजाता प्रवास करताना ऐकल्यासही नवे अनुभव सहज घेता येतात. प्रत्येक उद्योजकांनी हे अनुभव मिळवण्यासाठी वाचावे असे एक पुस्तक म्हणजे – How I raised Myself from Failure to Success in Selling. हे पुस्तक फ्रँक बैटगर यांनी लिहलेले असून याची मराठी आवृत्ती (मी अपयशाच्या खाईतून यशोशिखरावर कसे पोहोचलो?) गोयल प्रकाशनाने प्रकाशित केली आहे. याच बरोबर भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC of India) मध्ये एकदोन वर्षे काम करणेसुध्दा फायदेशीर ठरेल. कारण इथे कामाच्या वेळेची मर्यादा नसते व उत्तम उत्पन्न (चांगले पैसे) मिळते. आपल्याला व्यवसाय शिकण्यासाठी वेळ मिळतो.

    अनुभव घेण्याचा अजून एक मार्ग म्हणजे तुम्ही जो व्यवसाय करणार आहात त्या व्यवसायातील यशस्वी माणसाचा सहाय्यक (Assistant/Helper/Driver) म्हणून वर्षभर काम करणे हा होय. या माणसांचा सहवास लाभेल असे कोणतेही काम तुम्ही स्वीकारा. एका वर्षाने तुम्हाला जी अनुभवाची शिदोरी मिळेल ती एमबीए केलेल्या तरुणाहून सरसच असेल. या सर्व पध्दतीतून अनुभवसंपन्न झाल्यावर आपण प्रत्यक्ष व्यवसाय सुरु करण्याची प्रक्रिया सुरु करत आहोत.

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती
  • कुटुंबीयांचा पाठिंबा की विरोध ? व उपाय

    कुटुंबीयांचा पाठिंबा की विरोध ? व उपाय

    उद्योगपती वालचंद हिराचंद, लोखंडी नांगरांना जन्म देणारे किर्लोस्कर बंधू, आबासाहेब गरवारे, भारत फोर्जचे बाबा कल्याणी, विकोचे पेंढारकर घराणे, कॅमलिनचे दांडेकर, आयफ्लेक्सचे दीपक घैसास, दास ऑफशोअरचे अशोक खाडे, घोडावत ग्रुपचे संजय घोडावत, व्हीआयपी कपड्यांचे सर्वेसर्वा पाठारे बंधू, सारस्वत बँकेचे एकनाथ ठाकूर, मराठी नाटक व्यवसायाला वेगळा आयाम देणारे विष्णुदास भावे, दाते पंचांग विकणारे दाते, पितांबरीचे प्रभुदेसाई, बीव्हीजीचे हणमंतराव गायकवाड, माने ग्रुपचे रामदास माने, हावरे ग्रुप अशी न संपणारी मराठी व्यावसायिकांची यादी आहे.

    मात्र या सर्व उद्योजकांचा विचार केला तर असे आढळून आले आहे, ते म्हणजे यातील बहुतांश उद्योजक हे पहिल्या पिढीचे उद्योजक आहेत. त्यांना आपला उद्योग वारसा पुढच्या पिढीकडे म्हणाव्या तशा प्रभावी पध्दतीने हस्तांतरीत करता आला नाही व या सर्व उद्योजकांच्या आधीच्या पिढीनेही कधी व्यवसाय केलेला नव्हता. त्यामुळे ओघानेच हे आले की, कोणालाही कुटुंबातून फारसा पाठिंबा मिळाला नव्हता. तरीही या उद्योजकांनी आपला उद्योग मोठा करण्याची स्वप्ने पाहिली. त्यासाठी लागेल ते कष्ट उपसले, आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा केला व अपेक्षित असणारे यश त्यांना मिळाले. त्यामुळे आपण खचून न जाता या उद्योजकांनी निर्माण केलेल्या वाटांवरून पुढे चालायचे आहे.

    घरातील व्यक्तींचा विरोध कमी करुन त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करण्याचे काही उपाय आपण पाहू या. घरातील व्यक्तींचा विरोध असणाची काही कारणे म्हणजे उत्पन्नाची अनिश्चितता, भांडवल लावण्यासाठी कमी पडणारी क्षमता, अनुभवाचा अभाव ही होत. एकतर तुम्ही भरपूर पैसा कमावून घरी द्यायला लागला की, घरच्यांचा व्यवसायाला असलेला विरोध सहज मावळून जातो. तुम्ही पैसे कमावावेत ही त्यांची माफक अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. आता घरातील सर्वात जिव्हाळ्याच्या व्यक्तीला विश्वासात घेऊन व्यवसाय पूर्ण समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. तुम्ही घरातील या व्यक्तीला तुम्ही व्यवसाय करु शकता ही खात्री पटवून देऊ शकलात, तर व्यवसायासाठी लागणारी मदतसुध्दा घरातल्या व्यक्तींकडून मिळते. जेव्हा तुम्ही घरातील या व्यक्तीचा विश्वास संपादन करता तेव्हा तुम्हाला कोणालाही व्यवसाय पटवून देण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो. मग ती व्यक्ती हळूहळू घरातील इतर व्यक्तींना तुमच्या बाजूने करते.

    गुजराती, मारवाडी, पंजाबी व सिंधी कुटुंबामध्ये घरातील वातावरणच व्यवसायासाठी अनुकूल असते. त्यामुळे त्यांना जास्त संघर्ष करावा लागत नाही. म्हणून शक्यतो काहीजणांनी मिळून व्यवसाय चालू केला, तर प्रत्येकाने दुसऱ्याच्या घरात समजावून सांगावे म्हणजे ते पटकन समजून जातात व त्यांना विश्वास बसतो की हा शेजारचा/किंवा कॉलेजमधला मित्र व्यवसाय करतोय म्हणजे तुमच्याबरोबर कोणीतरी आहे व तुम्ही काहीतरी करु शकता.

    आणखी एक महत्त्वाची गोष्ट; कुटुंबातील व्यक्तीचा पाठिंबा असो किंवा विरोध असो आपले पूर्ण लक्ष व्यवसाय मोठा करणे, त्यासाठी लागेल त्या गोष्टी करणे यावरच असले पाहिजे. घरातील लोक तुम्हाला सुरवातीला पाठिंबा देत नसतील, तर कालांतराने का होईना ते तुमच्या बाजूने होतातच. हे सगळीकडे झाले आहे हा इतिहास आहे. परत या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा.

    अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती