प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाची भूमिका ही अनन्यसाधारण महत्त्वाची असते. एखादी व्यक्ती जेव्हा यशस्वी होते, तेव्हा तिच्या मागे नेहमी कोणत्या-न-कोणत्या मार्गदर्शकाचा हात असतो, भूमिका असते. हा मार्गदर्शक म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्याला वळण देणारा, चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखायला शिकवणारा शिक्षक.
भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. हा स्मरणोत्सव आपल्या देशाचे पहिले उपराष्ट्रपती (दुसरे राष्ट्रपती), भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी झाला. शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावा यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले. देशाच्या शिक्षणाला आकार देण्यात त्यांनी कायम मोलाचा वाटा उचलला. त्यांच्या योगदानामुळे अनेकांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली आणि म्हणूनच ५ सप्टेंबर रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन सबंध देशभरात उत्साहाने साजरा केला जातो.
खरंतर चांगल्या शिक्षकाचा सन्मान हा त्या संस्कृतीचा आणि त्यांच्याकडे असलेल्या अगाध ज्ञानाचा सन्मान असतो. कोणत्याही समाजाचा विकास होण्यासाठी शिक्षकाची भूमिका देवदूतासारखी असते. एक चांगला शिक्षक हजारो चांगले विद्यार्थी घडवू शकतो. हेच चांगले विद्यार्थी पुढे देशाचे सुजान नागरिक बनतात आणि प्रतिनिधित्व करतात. एक चांगला माणूस घडण्यासाठी त्यामागे एक चांगला शिक्षक कायम उभा असतो.
शिक्षकांचा सन्मान करण्याची शिक्षक दिनाची ही परंपरा तशी जुनीच.
शिक्षक म्हणजे काय?
शि म्हणजे शील क्ष म्हणजे क्षमा क म्हणजे कला
ज्याच्याकडे शील, क्षमा आणि कला यांचा त्रिवेणी संगम आहे तो म्हणजे शिक्षक. शिक्षक हे एका अर्थाने भावी पिढीला घडविणारे शिल्पकारच आहेत. आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने जीवनातील अंधार दूर करणारे मार्गदर्शकच. चुकल्यावर रागावणारेही शिक्षकच आणि पाठीवर कौतुकाची थाप मारणारेदेखील तेच. आपल्यापेक्षाही जास्त आपल्याला ओळखणारे आपले शिक्षक. आपल्यातील चांगल्या गुणांची पारख करून आपल्याला योग्य दिशा दाखविणारे आणि आपल्या जीवनाला ज्ञानाच्या प्रकाशाने तेजोमय करणारे हे आपले शिक्षक.
जशी ज्योत पेटविण्यासाठी समईत वात हवी असते, आकाशात तारे पाहण्यासाठी अंधारमय रात्र हवी असते. अगदी तशीच आयुष्याच्या रंगमंचावर आपलं जीवन अनेक अर्थाने सर्वांगसुंदर बनविण्यासाठी शिक्षकरूपी ईश्वर देवाच्या जागेवर असतो. देशभरातील सर्व शिक्षकांना शिक्षदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
तुम्हाला अजून कोणत्या विषयाची माहिती वाचायला आवडेल कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
खेळण्याच्या वयात कोकच्या ६ बाटल्यांचा संच विकून ५ सेंट्सचा स्वकष्टाने नफा मिळवणाऱ्या वॉरन बफे यांनी पुढे गुंतवणूक क्षेत्राद्वारे अफाट संपत्ती कमावली. तुम्ही म्हणाल, प्रचंड संपत्ती तर जगातील अनेक लोकांनी कमावली आहे. मग बफेंनी यात जगावेगळं असं केलं तरी काय?
कुठलाही कायदा न मोडता, करचुकवेगिरी न करता, नैतिकतेच्या मार्गाने यशाचं शिखर सर करणाऱ्या फार कमी व्यक्ती असतात. त्यांपैकी एक व्यक्ती असणं आणि त्याच्याही पुढे जाऊन, मिळवलेल्या संपत्तीपैकी ९० टक्के संपत्ती फारसा गाजावाजा न करता समाजाला परत देणं, हेच बफेंच्या यशाचं वेगळेपण आहे.
‘समभागधारक हेच कंपनीचे मालक’ अशी सर्वस्वी वेगळी समीकरणं प्रमाण मानून, यशाच्या वाटेवरून एकटं चालत न जाता आपल्या सहकारी आणि कर्मचाऱ्यांनाही यशाचं क्षितिज दाखवणाऱ्या बफेंकडून आपल्याला शिकण्यासारख्या असंख्य बाबी आहेत.
जगभरात गुंतवणूक गुरू म्हणून प्रसिद्ध असलेले वॉरन बफे यांचा आज जन्मदिवस. जगातील कोट्यवधी लोक शेअर बाजारातून पैसे कमविण्यासाठी त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा अवलंब करतात. गुंतवणुकीबाबत त्यांनी केलेले मार्गदर्शन आजही अतिशय प्रभावी ठरते. वॉरन बफे हे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांपैकी एक मोठे नाव आहे. त्यांच्या गुंतवणुकीचा जगभरातील शेअर बाजारावर परिणाम होतो. जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत ते आजही सातव्या स्थानावर आहेत.
बफे यांना आपल्या युवा अवस्थेतच Business आणि Investing विषयी आवड निर्माण झाली आणि त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षापासूनच गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. कोलंबिया बिजनेस स्कूलमधून ते पदवीधर झाले जिथे ते बेंझामिन ग्रॅहम यांच्याकडून गुंतवणुकीचे तत्त्वज्ञान आणि व्हॅल्यू इन्वेस्टिंगच्या कन्सेप्टविषयी बरेच काही शिकले. ओरॅकल ऑफ ओमाहा म्हणून ओळखले जाणारे वॉरन बफे आत्तापर्यंतच्या सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक समजले जातात.
वॉरन बफे यांचे 5 गुंतवणूक मंत्र :
1. गुंतवणुकीकडे दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा :
शेअर्स विकत घेतल्यानंतर एका दिवसात किंवा फार कमी वेळात विकण्यापेक्षा चांगल्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करून त्यामध्ये तुमची गुंतवणूक दीर्घकाळ टिकवून ठेवणे चांगले. शेअर मार्केटमधील दीर्घकालीन गुंतवणूक शेवटी जास्त परतावा देते, परंतु त्यासाठी तुम्ही योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
2. रातोरात श्रीमंत होण्याचा विचार करू नका :
बाजारात लवकरात लवकर श्रीमंत होण्याची हाव तुम्हाला चुकीच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. चांगला Portfolio तयार करणे ही एक मोठी प्रक्रिया आहे. यासाठी खूप संयम लागतो. बाजारातून चांगल्या परताव्यासाठी तुम्ही अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी ज्यांचे Business Model तसेच त्यांचे व्यवस्थापन चांगले आहे.
3. ध्येय ठेवून गुंतवणूक करा :
ध्येयाशिवाय केलेली गुंतवणूक अनेकदा फायदेशीर नसते. तुम्ही तुमच्या कष्टाने कमावलेला पैसा हुशारीने गुंतवा. त्या गुंतवणुकीत पैसा कसा वाढणार आहे हे समजत नसेल, तर त्यापासून दूर राहणेच बरे.
4. वैविध्य समजून घ्या :
‘जवळची सर्व अंडी एका टोपलीत ठेवू नये’ हे सूत्र गुंतवणुकीलाही लागू केले पाहिजे. तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी असलेली रक्कम वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वितरित करावी. संपूर्ण पैसा एकाच ठिकाणी गुंतवू नका, सर्वांमध्ये समतोल ठेवा.
5. रास्त भावाने करा शेअर्सची खरेदी :
एखादी कंपनी उत्तम दर्जाची उत्पादने बनवत आहे किंवा ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देत आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही त्यात गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. वॉरन बफे असे सांगतात, एखाद्या मोठ्या कंपनीचे शेअर्स मोठ्या किंमतीला खरेदी करण्यापेक्षा चांगल्या कंपनीचे शेअर्स वाजवी किंमतीला विकत घेणे कधीही चांगले.
वॉरन बफे यांचा हा प्रसिद्ध विचार प्रत्येक गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीने कायम लक्षात ठेवला पाहिजे.
“खर्च केल्यानंतर जे वाचते, त्याची बचत करु नये,
तर बचत केल्यानंतर जे राहते, त्यातून खर्च केला पाहिजे.”
आपल्या भारत देशाला क्रीडा क्षेत्राचा मोठा वारसा लाभलाय. भारतीय क्रीडा विश्वातील एक प्रेरणादायी आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचं नाव आजही तितक्याच आदराने घेतलं जातं.
देशातीलच नव्हे तर जगातील महान हॉकीपटूंच्या यादीत अव्वल स्थानी असलेल्या मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 मध्ये उत्तर प्रदेशमधील प्रयागराज म्हणजे आधीच्या इलाहाबाद येथे झाला. मेजर ध्यानचंद यांचे खरे नाव ध्यानसिंग असे होते. मात्र, ते नेहमी रात्री चंद्र प्रकाशात सराव करत असत. त्यामुळे कालांतराने त्यांच्या जवळच्या मित्रांनी ध्यानसिंग यांच्या नावापुढे ‘चंद’ हा शब्द जोडला. तेव्हापासून ध्यानचंद या नावाने ते ओळखले गेले.
आज 29 ऑगस्ट म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिन. हॉकीचे सार्वकालीन महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा गौरव म्हणून त्यांचा जन्मदिवस दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून संबंध देशभर आजही साजरा केला जातो. या क्रीडा दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपतींच्या हस्ते या दिवशी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्काराचे वितरण करण्यात येते. याशिवाय खेळातील आजीवन कामगिरीसाठी ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार 2002 पासून देण्यात येतो.
हॉकीच्या मैदानात ध्यानचंद यांनी अविश्वसनीय कामगिरीची नोंद केली आहे. मेजर ध्यानचंद यांचा हॉकी खेळ म्हणजे चेंडू आणि स्टीक यांचा सुंदर मिलाप होता. त्यांच्या कारकीर्दीत भारताने ऑलम्पिक स्पर्धेत सलग तीन वेळा सुवर्ण कामगिरी अनुक्रमे 1928, 1932 आणि 1936 झाली नोंदविली आहे. 1956 साली सरकारने ध्यानचंद यांना देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवित केले.
ध्यानचंद यांनी 1926 ते 1948 दरम्यान 400 हून अधिक सामने खेळले आहेत. यात त्यांनी जवळपास 1000 गोल करण्याचा पराक्रम केला आहे. त्यांनी आपला शेवटचा आंतराष्ट्रीय सामना 1948 साली खेळला. हॉकीच्या मैदानात त्यांनी केलेल्या अभूतपूर्व कामगिरीसाठी त्यांना सन्मानित करण्यासाठी 2012 पासून भारत सरकारने त्यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला.
भारतीय क्रीडा विश्वाच्या या महान जादूगाराला त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
तुम्ही प्रवासासाठी गाडी शोधत असता, पण गाड्यांची उपलब्धता कमी असते आणि तुम्हाला घाई सुद्धा असते,अशा वेळेला तुम्ही काय करता? तर तेव्हा तुम्ही मोबाईलवर ओला किंवा उबर सारख्या ट्रान्सपोर्ट कंपन्यांच्या ऍप्सचा उपयोग करून सहज गाडी बुक करता. पण तुम्ही कधी विचार केलाय का की हे एवढं आरामदायी समाधान कुणाच्या कल्पकतेमुळे शक्य झालं? आज आपण त्याच व्यक्तीचा प्रवास पाहणार आहोत, ज्यांनी ओला या कंपनीची स्थापना करून भारतीय कॅब ट्रान्सपोर्ट क्षेत्रात क्रांती घडवली आणि ज्यांना भारताचा इलोन मस्क म्हटलं गेलं. त्या व्यक्तीचे नाव म्हणजे ओला कंपनीचे संस्थापक ‘भाविश अग्रवाल’. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, त्यांनी अनेक अडचणींवर मात करून, सातत्य, कल्पकता आणि मेहनतीच्या जोरावर मिळवलेल्या यशावर एक नजर टाकूया.
प्रारंभिक जीवन, शिक्षण आणि नोकरी
भाविश अग्रवाल यांचा जन्म 28 ऑगस्ट 1985 रोजी पंजाबमधील लुधियाना येथे झाला. बालपणापासूनच ते अतिशय बुद्धिमान आणि मेहनती होते. त्यांचे आई वडील हे दोघेही पेशाने डॉक्टर आहेत. वडील हे ऑर्थोपेडिक सर्जन तर आई ह्या पॅथोलॉजिस्ट आहेत. आयआयटी मुंबई येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी. टेक. पूर्ण केल्यानंतर भाविश यांनी 2007 मध्ये मायक्रोसॉफ्ट रिसर्च इंडिया येथे रिसर्च इंटर्न म्हणून आपल्या कॉर्पोरेट प्रवासाची सुरुवात केली. येथे त्यांनी टेक्नॉलॉजीवर आधारित विविध प्रकल्पांमध्ये काम केले.
मायक्रोसॉफ्ट रिसर्चमध्ये ते विविध टेक्नॉलॉजीवर संशोधन करत होते आणि या शोधाच्या प्रक्रियेतच त्यांना दोन पेटंट्स मिळाले, परंतु 9 ते 5 च्या सुरक्षित नोकरीत त्यांना समाधान मिळत नव्हतं. त्यांच्या मनात स्वतःच्या व्यवसायाची तळमळ निर्माण झाली होती. उद्योजक होण्याची त्यांची तीव्र इच्छा होती, पण सुरक्षित नोकरीमुळे ते अडकले होते.
त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे 2008 मध्ये मायक्रोसॉफ्टने त्यांना सहाय्यक संशोधक म्हणून नियुक्त केले. दोन वर्षांहून अधिक काळ मायक्रोसॉफ्टमध्ये काम करताना भाविशला एक उद्योजक म्हणून काहीतरी नवीन करण्याची ओढ लागली होती.
मनात कसा आला ‘ओला’ सुरु करण्याचा विचार?
भाविश अग्रवाल सांगतात की ओला (Ola) ची सुरुवात त्यांच्या एका प्रवासाच्या वैयक्तिक वाईट अनुभवातून झाली. एकदा त्यांनी बेंगळुरूहून बंदीपूरला जाण्यासाठी एक कार बुक केली होती. मात्र, त्या प्रवासाचा अनुभव खूपच निराशाजनक होता. प्रवासाच्या दरम्यान अर्ध्या रस्त्यातच ड्रायव्हरने अतिरिक्त पैसे मागायला सुरुवात केली, शिवाय त्याचं वागणं आणि बोलणं अत्यंत उद्धट होतं. या गैरवर्तणुकीमुळे त्रासून भाविश यांना रस्त्यातच गाडी सोडावी लागली आणि उर्वरित प्रवास बसने करावा लागला.
बसमधून प्रवास करताना भाविश यांच्या मनात वारंवार विचार येत होता की, अशा वाईट सेवेमुळे प्रवाशांचे किती हाल होत असतील. त्यांना जाणवलं की त्यांच्या सारखे अनेक लोक असतील, ज्यांना दर्जेदार कॅब सेवा मिळत नाहीये. आणि त्याच वेळी त्यांच्या मनात एक कल्पना आली की, एक आपण अशी सेवा सुरू करावी जी लोकांना गुणवत्तापूर्ण, विश्वासार्ह आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा देईल.
ओलाची सुरुवात आणि सुरुवातीचा संघर्ष
कल्पकता आणि कौशल्य यांचा व्यवस्थित समन्वय साधला, तर नवनिर्मितीचा चमत्कार घडतोच! भाविश अग्रवाल यांनी हेच सिद्ध करून दाखवलं आहे. त्यांनी आपल्या दूरदृष्टी आणि धडपडीच्या जोरावर ओला कॅब्सची कल्पना प्रत्यक्षात आणली. व्यवसायात येणाऱ्या अडथळ्यांना त्यांनी संधीमध्ये बदललं आणि आपल्या जिद्दीने एक नवीन यशस्वी प्रवासाला सुरुवात केली.
कॅब सेवा क्षेत्रातील सर्व कमतरता समजून घेतल्यानंतर, भाविश यांनी उत्तम ग्राहकांना उत्तम अनुभव आणि परवडणाऱ्या किमतींसह एक कॅब एग्रीगेटर कंपनी सुरू करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी जोधपूरमधील आणखी एक आयआयटीयन मित्र अंकित भाटी यांना सोबत घेतले. 3 डिसेंबर 2010 रोजी मुंबईत त्यांनी एकत्रितपणे ‘ओलाट्रिप्स डॉट कॉम’ वेबसाइट लॉन्च केली, ज्यामध्ये ग्राहक बाह्य प्रवासासाठी कार बुक करू शकत होते.
सुरुवातीला, भाविश आणि अंकित यांच्याकडे या कल्पनेत गुंतवणूक करण्यासाठी फारशी आर्थिक क्षमता नव्हती आणि कोणत्याही गुंतवणूकदाराकडून आधारही मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी आपल्या बचतीमधूनच ऑनलाइन ऍप्लिकेशन विकसित करण्यास सुरुवात केली. जून 2012 मध्ये, Olacabs ने एक मोबाईल ॲप लाँच केले. ओला ऍप लाँच झाल्यानंतर त्यांना ‘टायगर ग्लोबल मॅनेजमेंट’ कडून 5 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक मिळाली, तसेच अनुपम मित्तल आणि स्नॅपडीलचे कुणाल बहल यांच्याकडूनही निधी उभारला. सुरुवातीच्या वर्षांत, कॅब बुकिंग फर्मचे वापरकर्ते फोन कॉलद्वारे कॅब बुक करत होते. नंतर ॲप आल्यानंतर त्याचा वापर वाढण्यास सुरुवात झाली.
पण प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता, भाविश अग्रवाल यांना भारतीय बाजारपेठेत ओला सादर करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एकदा नाही, तर प्रत्येक वेळी जेव्हा त्यांनी काहीतरी नवीन आणले किंवा नवीन बाजारपेठेकडे पाऊल टाकले, तेव्हा त्यांना संघर्ष करावा लागला.
प्रारंभीच्या काळात, रेडिओ ट्रॅफिक सर्व्हिसेस आणि फास्टट्रॅकसारख्या स्थानिक मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करणे ओलासाठी अवघड होते, परंतु यामुळे भाविश थांबले नाहीत. या अडचणींनी त्यांना वेगळ्या पद्धतीने विचार करण्यास आणि अनोख्या, पण समस्येचे निराकरण करणाऱ्या उपायांकडे पाहण्यास प्रवृत्त केले. याच वेळी ओलाने ऑल इंडिया परमिट असलेल्या ड्रायव्हर्सना कामावर घेण्यास सुरुवात केली आणि इंटरसिटी प्रवास सुविधा सुरू केली.
ओलाचा यशस्वी प्रवास
भाविश अग्रवाल यांच्या नेतृत्वात ओला आज भारतातील एक अग्रगण्य स्टार्टअप म्हणून उभी राहिली आहे. त्यांनी स्वतः नवीन कार विकत न घेता ड्रायव्हर्सना जोडण्यावर भर दिला, ज्यामुळे अनेक ड्रायव्हर्सना रोजगार मिळाला. त्यांनी ओला सेवेला एका अॅपद्वारे इंटरनेटशी जोडले, ज्यामुळे लोकांना राईड बुकिंगची सुविधा मिळाली. भाविश यांनी काही प्रसंगी स्वतः ओला ड्रायव्हर बनूनही सेवा दिली आहे.
ओला कॅब सर्व्हिसची खासियत म्हणजे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर. हे अॅप लोकांना त्यांच्या राईडसाठी सर्व आवश्यक माहिती देते, ज्यात रेटिंग्स, रिव्ह्यूज आणि क्वालिटी चेकिंगसाठी सुविधा आहेत. यामुळे ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवरूनच सर्व काही नियंत्रित करता येते.
भाविश यांची दूरदृष्टी आणि सेवा गुणवत्ता यामुळे ओलाचा व्यवसाय झपाट्याने वाढला. त्यांनी कमी दरात उत्कृष्ट सेवा देण्याचा विचार केला आणि 2013-14 मध्ये ओलाचा टर्नओव्हर सुमारे 418.25 कोटी रुपयांचा होता. आज, 75 हून अधिक शहरांमध्ये 1.75 लाखांपेक्षा अधिक लोक रोज ओला वापरतात. भाविश यांच्याकडे ओलामध्ये 6.7% हिस्सेदारी आहे, ज्यामुळे त्यांची नेट वर्थ महत्त्वाची ठरते. ओलाचे सध्याचे मूल्यांकन $4.8 बिलियन डॉलर्सपेक्षा (40000 कोटी रुपये) जास्त आहे, जे तिच्या यशाची साक्ष देते.
2017 मध्ये, भाविश यांनी ओला इलेक्ट्रिकची स्थापना केली, जी इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि बाईक्स तयार करते. या व्यवसायाची वाढही लक्षणीय आहे.
ऑक्टोबर 2023 मध्ये, ओला इलेक्ट्रिकने टेमासेक आणि भारतीय स्टेट बँकेकडून 3,200 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवली. यामुळे त्यांच्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील विस्ताराला गती मिळाली. भाविश अग्रवाल यांनी दोन कंपन्या उभारल्या, ज्यांचे मूल्यांकन 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे आणि यामुळे त्यांच्या दूरदृष्टीची आणि नेतृत्वाच्या कौशल्याची झलक दिसते.
भारतातील पहिले स्वदेशी AI-प्लॅटफॉर्म ‘कृत्रिम’ केलं लॉन्च
भाविश अग्रवाल यांनी 15 डिसेंबर 2023 रोजी भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) प्लॅटफॉर्म ‘कृत्रिम’ लाँच केले. हे प्लॅटफॉर्म सुमारे 22 भारतीय भाषा समजू शकते आणि सध्या ओपन एआयच्या चॅट जीपीटी तसेच गुगलच्या जेमिनीशी स्पर्धा करत आहे .
लाँचिंग कार्यक्रमादरम्यान, अग्रवाल यांनी AI चॅटबॉटचे प्रात्यक्षिक दाखवले, जो चॅट जीपीटी आणि जेमिनीसारखचं प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम आहे. हा चॅटबॉट कवितांपासून कथांपर्यंत विविध प्रकारची सामग्री तयार करू शकतो. ‘कृत्रिम’ हे प्लॅटफॉर्म 22 भारतीय भाषा समजू शकते आणि 10 भाषांमध्ये मजकूर तयार करण्याची क्षमता ठेवते. कंपनीच्या मते, हे भारताचे पहिले पूर्ण-स्टॅक AI आहे, जे स्थानिक भारतीय ज्ञान, भाषा आणि डेटावर आधारित आहे. अग्रवाल यांनी हे साधन सर्वांसाठी उपयुक्त असल्याचे म्हटले आहे.
मानसन्मान आणि पुरस्कार
भाविश हे भारतातील सर्वात तरुण आणि श्रीमंत उद्योजकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. कठोर कॉर्पोरेट जीवनशैलीच्या पलीकडे, त्यांना सायकलिंग, स्क्वॅश खेळणे, आणि फोटोग्राफीची आवड आहे. ते एक लोकप्रिय फोटोब्लॉग देखील चालवतात, जिथे ते त्यांच्या छायाचित्रांद्वारे स्वतःचे विचार मांडतात.
2013 मध्ये भाविश आणि Ola ला दक्षिण आशियाच्या mBillionth पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, हा पुरुस्कार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उत्कृष्टता दर्शवणाऱ्या स्टार्टअप्सना दिला जातो, त्याच वर्षी, Internet and Mobile Association of India (IAMAI) द्वारे Ola ला वर्षातील सर्वोत्कृष्ट स्टार्टअप म्हणून गौरवण्यात आले. 2017 मध्ये, द इकॉनॉमिक टाइम्सने भाविश अग्रवाल यांना त्यांच्या नेतृत्वाच्या कौशल्यासाठी ET सर्वोत्कृष्ट आणि तेजस्वी पुरस्काराने सन्मानित केले.
या व्यतिरिक्त भाविश उत्तम गुंतवणूकदार, व्याख्याते आणि उत्तम छायाचित्रकार सुद्धा आहेत. ते नवीन उद्योजकांना नेहमीच प्रोत्साहन देत असतात. त्यांनी बऱ्याच नवीन स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. ज्यात ओव्हा, कार्किनोस ऑफ बिझनेस, सुपरसूट, टॉर्क मोटर्स, हॅशलर्न अशी काही उदाहरणं देता येतील. उद्योगात आणि समाजसेवेतील त्यांच्या यशाव्यतिरिक्त, भाविश एक वक्ते आणि लेखक म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी अनेक मंचांवर आपल्या विचारांचे आदानप्रदान केले आहे आणि उद्योजकतेबद्दल अगणित लेख लिहिले आहेत.
आज, भाविश आपल्या नवीन उपक्रमाच्या दिशेने लक्ष केंद्रित करत आहेत. आपल्या साहसी मनासह, त्यांनी अक्षय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. हवामान बदल आणि वाढत्या ऊर्जेच्या गरजा या जगासमोरील सर्वांत महत्त्वाच्या आव्हानांपैकी आहेत आणि भाविश या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय विकसित करण्याबद्दल वचनबद्ध आहेत. भाविश म्हणतात, “मला विश्वास आहे की अक्षयऊर्जा ही भविष्याची गरज आहे आणि या क्षेत्रात भरीव योगदान देणे हे माझे ध्येय आहे.
तसेच ते तरुणांना यशाचा मूलमंत्र देताना म्हणतात की, ”वेगवेगळ्या प्रकारच्या घटना सगळ्यांच्या आयुष्यात घडत असतात. पण त्या घटनांमधून काहीतरी शिकून, त्यांना आपल्या प्रयत्नांच्या रूपात बदलायचे असेल, तर तुमची पूर्ण मेहनत आणि समर्पण लागेल. एक दिवस, यश नक्कीच तुमच्या पायाशी असेल.” भाविश अग्रवाल यांचा हा प्रवास कठोर मेहनत, समर्पण आणि नवनिर्मितीच्या शक्तीचा पुरावा आहे.
स्वतःचं वेगळं अस्तित्व कोणाला नको असतं. कोणाला वाटत नाही, समाजात आपली वेगळी ओळख असावी. आपण नोकरी मागणारे नाही, तर चार लोकांना नोकरी देणार्यांच्या रांगेत यावे. आपल्या माध्यमातून लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या, त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा. समाजातील एखाद्या प्रश्नावर आपल्या माध्यमातून उत्तर शोधलं जावं. समाजाला भेडसावणारी एखादी समस्या आपण शोधलेल्या उत्तरानं दूर व्हावी, आपलं जगणं हे अनेकांच्या जगण्याचं कारण बनावं, आपलं अस्तित्व हे अनेकांच्या अस्तित्वाचं कारण बनावं, आपल्या नावाचा एक Brand तयार व्हावा, तो Brand सर्वत्र ओळखला जावा, आपला अनुभव हा अनेकांसाठी मार्गदर्शक ठरावा, आपला प्रवास हा इतरांसाठी आदर्श बनावा…
मग या सगळ्यासाठी काय करता येईल, कसं उत्तर शोधता येईल. तर मित्रांनो उद्योजक होता येईल, व्यवसायाच्या वाटेवर स्वतःचा एक वेगळा प्रवास सुरू करता येईल. परंतु उद्योजकता ही केवळ ठरवून करायची गोष्ट मुळीच नाही. आज जागतिक उद्योजक दिनाचे औचित्य साधून आपण या दिवसाच्या महत्त्वावर प्रकाश टाकणार आहोत.
खरंतर आजही अनेक ठिकाणी लोकांची अशीच मानसिकता आहे की, चांगलं शिक्षण घ्यायचं, चांगली नोकरी मिळवायची आणि आयुष्यात स्थिर व्हायचं. सहसा मला फक्त व्यवसाय करायचा आहे, मला उद्योजक व्हायचं आहे असे बोलणारे खूप अपवाद आहेत. गर्दीचा बऱ्यापैकी ओढा हा फक्त नोकरीच्या मागेच आहे, अनेक जण अपघाताने, अनावधानाने व्यवसायात पडतात आणि मग शिकत शिकत, अनुभव घेत, त्यांना त्यात यश मिळतं; पण फक्त मला व्यवसायच करायचा आहे, हा दृष्टिकोन मनात घेऊन व्यावसायिक होणारे उद्योजक हे फार तुरळक. खरंतर या मागची कारणं देखील अनेक आहेत. त्यात प्रामुख्याने सांगायचं झालं तर,
1. व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ नसणं.
2. कुटुंबाचा पाठिंबा नसणं.
3. नक्की कोणता व्यवसाय करायचा आहे याची स्पष्टता नसणं.
4. Risk घेण्याचं धाडस नसणं.
5. अनिश्चितता आणि अनुभवाचा अभाव
6. सामाजिक दबाव
या सगळ्या गोष्टींना समस्या समजून धाडस न करणारी संख्या मोठीच आहे ; परंतु याच्या विरुद्ध याच मुद्द्यांवर उत्तर शोधून व्यवसायाच्या वाटेवर चालणारे अपवाद हे कायम विलक्षणच ठरतात. जगातील यशस्वी संस्थापकांनी, लहान-मोठ्या उद्योजकांनी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी, स्वत:ची प्रतिभा जगापुढे आणताना काय बरं विचार केला असेल? मुळातच एक गोष्ट स्पष्ट आहे की, आव्हाने स्वीकारण्याची स्वेच्छा असणे आणि उद्योजक होणे या दोन गोष्टींतील सीमारेषा ही अत्यंत पुसट आणि कमी आहे. ही स्वेच्छाच तुमच्या मनातील सर्व भय नष्ट करते आणि त्याच वेळी आपण आकस्मिक संकटांना, अचानक येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी पूर्वतयारी करू शकतो, त्यांना भिडू शकतो.
असं म्हणतात की नोकरी हा आठ तासांचा व्यवसाय आहे आणि व्यवसाय ही २४ तासाची नोकरी आहे आणि हे खरंच आहे. परंतु नोकरी आणि व्यवसाय या दोन्हीमधून मिळून सरतेशेवटी मिळणारं समाधान यात कमालीचा फरक आहे हे मात्र विसरता कामा नये. नोकरी करून आपण आपल्या कंपनीच्या मालकाला मोठं करतो, तर तेच स्वतःचा व्यवसाय करून आपण स्वतःला, आपल्या कुटुंबाला आणि आपल्या पुढच्या पिढीला अप्रत्यक्षरित्या मोठं करत असतो. फरक जरी एका वाक्यात असला तरी त्यातील गांभीर्य हे फार मोठं आहे. आज भविष्याचा विचार केला तर ८०% परंपरागत नोकरीच्या संधी ह्या एआय (artificial intelligence) व रोबोटमुळे संपणार आहेत. डॉक्टरच्या ऐवजी रोबोट सर्जरी करतील, तर मग कामगार वर्गाचे काय होईल ह्याचा विचार आपण न केलेलाच बरा.
बऱ्याच जणांचं असंही म्हणणं असतं की माझं वय कमी आहे किंवा आता वय निघून गेलं. अशा तक्रारी करणाऱ्यांना एकच सांगायचं आहे की, शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. ज्ञानेश्वरांनी वयाच्या १६व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. संभाजी राजांनी वयाच्या 20व्या वर्षी औरंगजेबाला पाणी पाजलं होतं. बिल गेट्स वयाच्या ३०व्या वर्षी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. तर दुसरीकडे, आर. के. दमाणींनी ४८व्या वर्षी D-Martची, जॉन पेंबरटन यांनी ५५व्या वर्षी कोका-कोलाची सुरुवात केली, तर कर्नल सँडर्स यांनी ६२व्या वर्षी KFCची सुरुवात केली. अशी कितीतरी उदाहरणं आपल्या समोर आहेत. उद्योजक बनण्याच्या या प्रवासात वय हा मुद्दा खूप दुय्यम आहे. करण्याची इच्छा असेल, मानसिक तयारी असेल, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जायची तयारी असेल. Roadmap तयार असेल, तर इतर समस्यांना आपण नक्कीच तोंड देऊ शकतो.
उद्योगाच्या अवकाशात गरुड भरारी घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक उद्योजकाला नवी अर्थक्रांतीचं हेच सांगणं आहे की, तुम्ही सुरुवात करा, रस्ता आपोआप दिसत जाईल; पण जर सुरुवातच केली नाही, तर तुम्हाला पुढील मार्गच दिसणार नाही आणि आहे त्या रटाळवाण्या जीवनात तुम्ही अडकून राहाल. मळलेल्या वाटेने जाणारे सगळेच असतात; पण स्वतःची वाट तयार करणारा एखादा असतो. हा एखादा आपल्याला बनायचे हे लक्षात ठेवा.
मानवी जीवनात प्रत्येक नात्याचं वेगळं आणि काहीतरी विशेष महत्त्व आहे. कोणतंच नातं छोटं किंवा मोठं असं त्याचं वर्गीकरण करता येणार नाही. ते करुही नये. त्या नात्यातील भावना आणि प्रेम किती खरं आहे यावर त्याचं पावित्र्य अवलंबून असतं. अशाच एका सुंदर नात्यावर आज आपण बोलणार आहोत. ते सुंदर आणि पवित्र नातं म्हणजे बहीण-भावाचं नातं. निखळ प्रेमाचं, मैत्रीचं, आपुलकीचं हे नातं. हे एक असं नातं आहे जे कधीच व्यक्त करता येत नाही. त्या नात्यातील भावना शब्दबद्ध करता येत नाहीत. या नात्यात कुठलीही अट, बंधन, भेदभाव हा कधीच नसतो. पण नात्यात एक खात्री असते. सोबतीची, सहकार्याची, खंबीर साथीची. याच बहीण भावाच्या नात्याला एका विशेष क्षणी व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रक्षाबंधन.
रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे. रक्षाबंधनाची सुरुवात केव्हा झाली, याबद्दल निश्चित पुरावा नाही; पण त्याविषयी एक आख्यायिका आहे. पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शची हिने विष्णुकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल, अशी तिची श्रद्धा होती. इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली, असे सांगितले जाते. तसेच हिंदू पौराणिक कथेनुसार, महाभारतात, जे एक महान भारतीय महाकाव्य आहे, पांडवांची पत्नी द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाच्या मनगटामधून वाहणारे रक्त थांबवण्यासाठी तिच्या साडीचा कोपरा फाडून त्याच्या मनगटावर बांधला कारण भगवान कृष्णाने अनवधानाने स्वतःला जखमी केले होते. अशा प्रकारे, भाऊ आणि बहीण आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यात एक बंध निर्माण झाला आणि द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन दिले.
रक्षाबंधनचा सण प्रत्येक वर्षी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाला रक्षासुत्र, म्हणजेच राखी बांधते आणि भावाची प्रगती व सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करते. भावाकडून पण बहिणीला संरक्षणाचे वचन व सोबत काही भेटवस्तू दिल्या जातात. काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना आणि पत्नी नवऱ्याला राखी बांधते. आपल्यापेक्षा बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे हीच यामागची भावना आहे. भारतीय समाजात ऐक्य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण राजपूत लोकांत रूढ झाला. राखीच्या या सणाला संपूर्ण भारतात साजरा करतात. भारतासह नेपाळ व अन्य ज्या ज्या ठिकाणी हिंदू धर्माला मानणारे लोक राहतात तेथे रक्षाबंधन साजरा केला जातो.
रक्षाबंधन या सणाला प्राचीन काळापासून साजरे केले जात आहे. हा बहीण-भावाचे प्रेम टिकवून ठेवण्याचा सण आहे. हिंदू धर्मात असे अनेक सण परंपरा फार पूर्वी पासून सुरु आहेत. ह्या परंपरा आपल्या संस्कृतीचा भाग आहेत आणि ही आपली वैभवशाली संस्कृती जपून ठेवणे ही एक नागरिक म्हणून आपली आपल्या देशाच्या प्रती अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे.
क्षणात हसणारं आणि क्षणात रडणारं देखील, निखळ प्रेमाचं हे भावा-बहिणीचं पवित्र नातं. दिवस जातील तसं अजूनच बहरणारं कोणतीही मर्यादा नसणारं. दिवसागणिक अधिकाधिक वृद्धिंगत होत जाणारं हे दिलखुलास नातं.
रक्षाबंधनच्या या पवित्र दिनी या सुंदर नात्याला नवी अर्थक्रांतीचा मानाचा सलाम..
“भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत” ही ओळ आपण प्रत्येकानेच शाळेत असताना अगदी जोरात म्हटलीच असेल, मात्र यापलीकडचा भारत आपल्यापैकी किती जणांनी उलघडून पहिला? इतिहासाचा तास तर जांभया देत आणि हा विषय किती रटाळ आहे हेच सांगण्यात गेला आणि वाचनाची आवड नसल्याने इतिहासाची पानं चाळली गेली नाहीत. केवळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला रांगेत उभं राहून “भारत माता की जय” म्हटलं आणि चॉकलेट खाल्ली म्हणजे देशाविषयी आदर व्यक्त केला असं होतं का? भारतीय क्रिकेट संघ बाजी मारत असेल तर “मेरा भारत महान” आणि इतर विविध पैलूंकडे दुर्लक्ष करण्यात भारत स्वतंत्र होऊन 77 वर्ष होऊन गेली. आपल्या आजच्या विषयाकडे वळण्याआधी सर्व वाचकांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
देश परकीय राजवटीतून मुक्त होऊन आज 77 वर्ष पूर्ण झाली, त्यामुळे भारतमातेच्या जयघोषात आजचा संपूर्ण दिवस भरून जाईल यात शंका नाही. मात्र उद्याचं काय? आजच्या रॅलीमध्ये हातात झेंडा घेऊन गेल्यानंतर उद्या तोच झेंडा रस्त्यावर पडलेला तर दिसणार नाही ना? दरवर्षीप्रमाणे आजही भाषण ऐकताना “अनेकांनी प्राणांची आहुती दिली आणि म्हणून आपल्याला आजचा सूर्य स्वतंत्रतेत अनुभवायला मिळतोय” हे वाक्य आपल्याला रटाळ वाटेल, कारण “स्वातंत्र्य” या शब्दाची खरी ओळख गेल्या 77 वर्षात आपल्याला पटलेलीच नाही. आपण केवळ परकीयांच्या गुलामगिरीतूनच मोकळे झालेलो नाही, तर लोकशाहीमध्ये वावरणारे सर्वात भाग्यवान देशवासी आहोत. आपल्यावर कोणीही कसल्याही प्रकारची सक्ती करू शकत नाही याचे महत्त्व काय हे जो पिंजऱ्यात जखडलेला आहे त्यालाच कळेल. मात्र मिळालेलं स्वातंत्र्य उपभोगताना आपण मानसिकदृष्टया अजूनही मागासलेले आहोत याची जाणीव काही केल्या होत नाहीये.
गेल्या 77 वर्षांत नक्कीच आपण अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. भारताचा इतिहास हा एकेकाळी वैभवशाली होता. असं म्हणतात, इथून सोन्याचा धूर निघायचा मात्र केवळ इंग्रजच नाही, तर अनेक परकीय आक्रमकांनी अनेकवेळा भारताला लुबाडलं, लुटून नेलं आणि तरीही आज भारत स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा आहे. आज आपल्या देशातून सोन्याचा धूर निघत नसला तरीही भारताच्या अंतराळवीरांनी चंद्राला गवसणी घातली आहे, इथे अनेक राज्यांमध्ये आज मेट्रोच्या वेगवान गतीने प्रवास केला जातो, भारताच्या सीमेवर उभ्या असलेल्या सेनेच्या वाकड्यात जाण्याची हिंमत जगभरातील कोणतीही ताकद करत नाही किंवा करणार नाही, आपली अर्थव्यवस्था दरदिवशी सकारात्मक प्रगती करतेय, दूरसंचार क्रांती विविध क्षेत्रांना एका धाग्यात जोडून ठेवण्यात यशस्वी झाली आहे. हे आणि असे अनेक बदल पाहिले की सोन्याचा धूर पुन्हा निघायला जास्ती वेळ जाणार नाही यावर विश्वास बसतो.
मात्र चौफेर नजर फिरवल्यास प्रश्न पडतो की भारतात वावरणारा प्रत्येक माणूस सामान स्वातंत्र्य अनुभवत आहे का? पूरग्रस्त भागांमध्ये लोकं तेवढ्याच आनंदाने आजचा दिवस साजरा करत असतील का? सोशल मीडियाने जरी संपूर्ण देशाला एकत्र जोडलेलं असलं तरीही तुटलेल्या तारा आणि भंग झालेल्या कनेक्शनमुळे किती लोकं कोपऱ्यांमध्ये अडकून पडलेली असतील? धरतीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरच्या भागात आजही कोणीतरी जीव मुठीत धरून तर बसलेलं नसेल ना? लोकशाहीच्या राज्यात कुणावर धर्म बदलण्याची सक्ती केली जात नसेल ना? सरकारने अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्या तरीही भारतात आजही अनेक गावांमध्ये शिक्षणाचा अभाव आणि वैद्यकीय सुविधांची कमतरता यांमुळे स्वतःच्या घरात प्रसूतीची पीडा सोसणारी बाई आढळतेच. भारताच्या कितीतरी गावांची नावं देखील आपल्याला माहिती नाही, त्यांचा उल्लेख नकाशात नाही स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर देखील जिथे बालविवाह, स्त्रीभ्रूणहत्या, बलात्कार, बालमजुरी असे कितीतरी माणुसकीला काळिमा फासणारे प्रकार घडतात. शिक्षणाची इच्छा मनात बाळगून स्वतःच्या आई-वडिलांची नजर चोरून पावसाचं पाणी अंगावर सोसत जाणाऱ्या लहानग्यांच्या आणि अनेक पीडितांच्या डोक्यावर खरंच स्वातंत्र्याचा सूर्य उगवला आहे का असा प्रश्न पडतो.
म्हटलं तर भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. येणाऱ्या काळात भारतातील तरुणांच्या मेहनतीवर इतर जगभरातील देश चालणार आहेत मग याच हुशारीचा उपयोग भारतालाच करवून दिला तर? तरुणपिढी देशाच्या भक्कम पाया आहे, मात्र हीच वयातील मुलं सोशल मीडियाचा गैरवारपर करताना किंवा संध्याकाळच्यावेळी मित्रांसोबत गप्पाष्टके करताना आढळतात.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इथे कामाच्या संधी नाही म्हणत परदेशात जाणारे अनेक असतील पण मी माझ्या देशात राहून स्वतःसाठी तसेच इतरांसाठी देखील नोकरीच्या संधी तयार करेन असं देशाचा तरुण का म्हणत नाही? गावातील लोकं अशिक्षित आहेत, त्यांना स्वच्छतेचं महत्त्व माहिती नाही, कामाच्या शोधात शहरात येऊन ते शहराला मळवून टाकतायत असं म्हणत आपणच सुशिक्षित लोकं भारत सोडून परदेशी जातो. अशावेळी प्रश्न उभा राहतो की ज्या देशाला नावं ठेऊन, अशिक्षित म्हणत आपण अर्ध्यावर सोडून आलो त्याच भारताच्या स्वातंत्र्यदिनादिवशी “भारत माता की जय” म्हणावं तरी का? परदेशात ट्रॅफिकचे नियम किती कडक आहे हे सांगताना आपण थकत नाही, मात्र उठायला उशीर झाल्याने वाया गेलेला वेळ भरून काढताना ट्रॅफिक नियम मोडणारे देखील आपणच असतो. गावाकडून आलेली लोकं बेशिस्त आहेत, त्यांना स्वच्छतेचं महत्त्व माहिती नाही असं म्हणत स्वतःचं घर नीटनेटकं ठेऊन तोच कचरा बाहेर नेऊन टाकणारे देखील आपणच असतो. रस्त्याने चालताना खाल्लं जाणाऱ्या केळ्याची साल कचरापेटीत टाकणं आपल्याला शक्य होत नाही आणि दिवसभर उन्हात भूक आणि तहान विसरून केवळ दोन वेळचं जेवण मिळावं म्हणून तडफडणारा कचरा कर्मचारी आपल्याला मळकट वाटतो.
आज जिथे पुरात अनेक संसार वाहून निघालेत तिथे जाऊन पाण्यासोबत सेल्फी काढणारे आपण भारतीय जास्तीत जास्त “Save Wayanad” अशी इंस्टाग्रामवर स्टोरीच ठेऊ शकतो. स्वतंत्रता आणि स्वैराचार यांमध्ये असलेला फरकच ओळखण्याची मानसिक तयारी नसेल, तर असा सुशिक्षित भारत किती काळासाठी प्रगतिशील राहील याची शाश्वती देत येत नाही. शासन आणि प्रशासन कसे असावे, ट्रॅफिक पोलीसवाल्याने कसे वागावे, स्वछता कर्मचाऱ्यांची जबाबदारी काय आहे यावर मतं मांडण्यापेक्षा 77 वर्षानंतर का होईना ‘मी काय केलं पाहिजे’ याचा विचार करून बघूया.
कुठलाही देश हा तिथल्या देशवासियांमुळे ओळखला जातो, त्यामुळे आपल्याला लाभलेल्या गौरवशाली इतिहासाकडून शिकत पुढे जाऊया. कदाचित आत्ताच्या घडीला आपल्या देशाला मानसिक क्रांतीची गरज असावी, आजपासून स्वतःमध्ये बदल घडवून हक्काने “मेरा भारत महान” म्हणून तर बघूया, कदाचित देशाप्रती अभिमान म्हणजे काय याची खरी प्रचिती तेव्हा येईल…
आज आपण अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यांच्यावर “रंकाचा राजा” ही म्हण तंतोतंत लागू होते. या व्यक्तीने आपल्या जीवनातील अनेक आव्हानांवर मात करून यश मिळवले आहे. ती व्यक्ती म्हणजे अमेरिकेचे प्रख्यात उद्योजक आणि ओरॅकल कॉर्पोरेशनचे संस्थापक, “लॅरी एलिसन”.
लॅरी एलीसन आणि देव यांच्यात काय फरक आहे, यावर एक विनोदी प्रश्न विचारला जातो. उत्तर असं दिलं जातं की, “देवाला आपण लॅरी एलीसन आहोत असं वाटत नाही.” यावरूनच लॅरी एलीसन किती महत्वाकांक्षी व्यक्ती आहेत, याची कल्पना येते.लॅरी एलीसन हे तंत्रज्ञान क्षेत्रातील एक क्रांतिकारी नाव आहे. त्यांनी माहिती साठवणाऱ्या म्हणजेच डेटाबेस क्षेत्रात असा काही क्रांतिकारक बदल घडवला की, मायक्रोसॉफ्ट, आयबीएमसारख्या बलाढ्य कंपन्यांनाही त्यांची धडकी भरली होती. त्यांच्या नेतृत्वात, Oracle ने डेटाबेस व्यवस्थापनाच्या तंत्रज्ञानात अभूतपूर्व प्रगती केली. हे तंत्रज्ञान व्यवसायांच्या आणि उद्योगांच्या केंद्रस्थानी आलं, ज्यामुळे जगभरातील डेटा व्यवस्थापनाचा चेहरामोहरा बदलला.
आज त्यांचा जन्मदिन… चला तर, त्यांचा आजवरचा जीवनप्रवास पाहूया.
बालपण आणि प्रारंभिक जीवन
लॅरी एलिसन यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४४ रोजी झाला. त्यांचे बालपण आणि प्रारंभिक जीवन संघर्षमयी होते. फ्लॉरेन्स स्पेलमन ही त्यांची १९ वर्षे वयाची आई अविवाहित होती. त्यांच्या जन्मानंतर काही दिवसातच त्यांच्या वडिलांनी त्यांच्या कुटुंबाला सोडून दिले. लॅरी नऊ महिन्यांचे असताना त्यांना न्यूमोनिया झाला असताना आपल्याला आपल्या मुलाचा नीट सांभाळ करायला जमणार नाही असं वाटल्यामुळे त्यांच्या आईनं एलिसनला शिकागोमधल्या आपल्या लिलियन नावाच्या आत्याकडे सांभाळायला द्यायचं ठरवलं. लिलियन आणि लुईस एलिसन या नवरा-बायकोनं मग एलिसन नऊ महिन्यांचा असताना त्याला दत्तक घेतलं. त्याच्या नव्या आईने त्यांचं चांगल्या प्रकारे पालनपोषण केले. त्यांनंतर त्यांची खरी आई त्यांना कधीच भेटली नाही. ती त्यांना जेव्हा ते ४८ वर्षाचे झाले आणि जगात त्यांचे बर्यापैकी नाव झाले होते तेव्हाच भेटली. अगदी हिंदी सिनेमांत दाखवतात तशी स्टोरी आहे ही…
लॅरींनी 1962 मध्ये अर्बाना-चॅम्पेन येथील इलिनॉय विद्यापीठात शिक्षणाला सुरुवात केली. मात्र, 1964 मध्ये त्यांच्या सावत्र आई म्हणजेच लिलियन याचं निधन झालं, आईच्या निधनानंतर लॅरी खूपच दुःखी झाले आणि त्यांनी शिक्षण अर्धवट सोडले. लिलियनशी त्याचं नातं खूप जिव्हाळ्याचं झालं होतं, परंतु लुई म्हणजेच त्यांचे सावत्र वडील यांच्यासोबत त्यांचे संबंध तणावपूर्ण होते. लुई त्यांना वारंवार म्हणत की, तू आयुष्यात कधीच काही साध्य करू शकणार नाही. त्यांच्या सावत्र वडिलांच्या अशा वागणुकीमुळे लॅरींचा स्वभाव हा लहानपनासुनच जिद्दी बनला आणि आता वडिलांना खोटं ठरवून काहीतरी करून दाखवायचा चंग त्यांनी लहापणापासूनच बांधला.
कठीण परिस्थितीतही लॅरीने धैर्य आणि जिद्द दाखवून पुढे प्रचंड यश मिळवले, ते म्हणतात ना परिस्थिती कितीही कठीण असली, तरीही स्वप्नांवर विश्वास ठेवणं महत्वाचं असतं. लॅरीनेही हार मानली नाही. 1966 मध्ये शिकागो विद्यापीठात थोडा काळ शिकून त्यांनी आपल्या इच्छाशक्तीने पुढे पाऊल टाकलं.
सुरुवातीचा संघर्ष
1960 च्या दशकात संगणकाच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत होती. संगणकाविषयी सर्वत्र चर्चा सुरू झाली होती, आणि अनेक कंपन्यांना त्यांच्या कामांना सुलभ बनवण्यासाठी कुशल प्रोग्रामर्सची आवश्यकता होती. लॅरी यांनी शाळेत प्रोग्रामिंगचे धडे घेतले होते आणि त्यांच्या या आवडीमुळे त्यांनी त्या काळात १९६६ मध्ये, वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी पहिला संगणक डिझाईन केला. त्या काळात संगणक आणि तंत्रज्ञान हे नवीन क्षेत्र होते, पण लॅरींनी याच क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्याचे ठरवले. कॅलिफोर्नियामध्ये येऊन त्यांनी संगणक डिझाईनशी संबंधित छोटे-मोठे काम करून आपले पोट भरायला सुरुवात केली.
1973 मध्ये ॲम्पेक्स या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत काम करायला सुरुवात केली, त्या ठिकाणी काम करत असताना त्यांना तेथे नवीन सहकारी एड ओट्स आणि बॉब मायनर भेटले, त्यांच्या सोबतचा त्यांचा अनुभव कमालीचा राहिला, नवी शिकवण घेतली आणि अनुभव मिळवला. मात्र, त्यांच्या यशाची भूक थांबली नाही. 1976 मध्ये त्यांनी ॲम्पेक्स सोडून प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट्समध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आणि उपाध्यक्ष पदावर कार्यरत होत, कंपनीच्या संशोधन आणि विकास विभागाचे नेतृत्व केले.
व्यवसायाची सुरुवात (Oracle ची मुहूर्तमेढ)
1977 मध्ये, एलिसन यांनी आपले सहकारी मायनर आणि ओट्ससोबत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज (SDL) ची स्थापना केली, जी सुरुवातीला इतर कंपन्यांसाठी कॉन्ट्रॅक्ट प्रोग्रामिंग करण्यासाठी तयार करण्यात आली होती. मात्र, एलिसन यांना SDL द्वारे काहीतरी मोठं आणि क्रांतिकारक करायचं होतं. त्यांना ब्रिटिश संगणक शास्त्रज्ञ एडगर एफ. कॉड यांनी मांडलेल्या रिलेशनल डेटाबेस मॉडेलने खूप प्रेरणा दिली. या मॉडेलने मोठ्या प्रमाणात डेटाचे कार्यक्षम व्यवस्थापन आणि जलद रिकव्हरी करण्याचे मार्ग दाखवले. एलिसन, मायनर आणि ओट्स यांनी या क्षेत्रात मोठ्या व्यावसायिक संधी ओळखल्या आणि त्यांनी डेटाबेस विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले
त्यांच्या या प्रयत्नांना अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएकडून (Central Intelligence Agency) करार मिळाला आणि त्यांनी व्यावसायिक रिलेशनल डेटाबेस प्रोग्राम विकसित करण्यास सुरुवात केली. अखेर 1979 मध्ये, रिलेशनल सॉफ्टवेअर इंक. (आता Oracle) ने स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज (SQL) वापरणारा पहिला व्यावसायिक रिलेशनल डेटाबेस प्रोग्राम लॉन्च केला. या अभिनव डेटाबेस प्रोग्रामने त्याकाळात लोकप्रियता मिळवली आणि उद्योगाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला.
संकटांवर मात
1982 मध्ये नाव बदलून ओरॅकल सिस्टिम कॉर्पोरेशन (नंतर ओरॅकल कॉर्पोरेशन) ठेवलेली कंपनी आपल्या नाविन्यपूर्ण आणि आक्रमक मार्केटिंगसाठी ओळखली गेली. 1980 च्या दशकात कंपनीची झपाट्याने वाढ झाली, आणि 1986 मध्ये कंपनीने सार्वजनिक होऊन यश मिळवलं. 1987 पर्यंत, ओरॅकल जगातील सर्वात मोठी डेटाबेस-व्यवस्थापन कंपनी म्हणून समोर आली. मात्र, 1990 मध्ये भागधारकाच्या खटल्यामुळे झालेल्या अंतर्गत ऑडिटमध्ये असं लक्षात आलं की कंपनीने आपल्या कमाईचा चुकीचा अंदाज वर्तवला होता, ज्यामुळे स्टॉक बाजारात (share market) मोठी घसरण झाली. ओरॅकलच्या शेअरचा भाव जवळपास ८० टक्क्याहून पडला.
संकटातून मार्ग काढण्यासाठी, लॅरी एलिसनने कंपनीच्या व्यवस्थापनाची पुनर्रचना केली आणि 1992 च्या अखेरीस ओरॅकल पुन्हा आर्थिक स्थिरतेत आली. 1990 च्या दशकाच्या मध्यात, एलिसनला नेटवर्क कॉम्प्युटर (NC) नावाचा डेस्कटॉप पीसीचा स्वस्त पर्याय विकसित करून मायक्रोसॉफ्टशी स्पर्धा करण्याची संधी मिळाली. NC ही कल्पना पुढे क्लाउड कॉम्प्युटिंगच्या सुरुवातीची चाचणी होती. परंतु, PC च्या सतत कमी होणाऱ्या किमती आणि NC च्या विकासातील विलंब यामुळे मायक्रोसॉफ्टने बाजारात वर्चस्व गाजवलं.
त्यांची ही गोष्ट दाखवते की अपयश ही यशाच्या प्रवासात एक पायरी असते. प्रत्येक आव्हानातून शिकून, नव्या उमेदीने पुढे जाणं हेच खऱ्या उद्योजकाचं वैशिष्ट्य असतं. एलिसनची दूरदृष्टी, त्यांची चिकाटी आणि त्यांच्या चुका स्वीकारण्याची तयारी हेच त्यांच्या यशाचं गमक ठरलं.
यशाच्या शिखरावर
लॅरी एलिसनने इंटरनेटच्या प्रारंभिक काळात ओरॅकलला यशाच्या शिखरावर नेले. वर्ल्ड वाइड वेब (www) तंत्रज्ञानाशी सुसंगत उत्पादने विकसित करण्यावर भर देऊन, त्यांनी कंपनीची वाढ सुनिश्चित केली. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला, एलिसनने प्रतिस्पर्धी सॉफ्टवेअर कंपन्या खरेदी करण्याचे आक्रमक धोरण अवलंबले, ज्यामुळे ओरॅकलची ताकद अधिकच वाढली.
पीपलसॉफ्ट (2005), सिबेल (2006), BEA (2008), आणि सन मायक्रोसिस्टम्स (2010) या मोठ्या कंपन्यासह अनेक कंपन्या ओरॅकलमध्ये विलीन झाल्या आणि आज त्यांच्या दूरदृष्टी आणि धाडसी निर्णयांमुळे ओरॅकल जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात एक अग्रगण्य कंपनी बनली आहे.
एलिसन हे सिलिकॉन व्हॅलीतील सर्वात विशेष आणि वेगळ्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते, त्यांचे उत्तुंग यश जगभरात कौतुकास पात्र ठरले. त्यांच्या व्यवसायातील धाडसी निर्णयांमुळे आणि प्रगतीशील दृष्टिकोनामुळे त्यांचे नाव आज अग्रगण्य उद्योजकांमध्ये गणले जाते. 2010 मध्ये प्रतिष्ठित अमेरिका चषक जिंकणारा संघ उभारून त्यांनी आपले नेतृत्व कौशल्य दाखवले. 2012 मध्ये, त्यांनी हवाईयन बेट लनाईचे 98 टक्के भाग विकत घेऊन, आपले भव्य स्वप्न साकार केले. त्या काळात त्यांची वैयक्तिक संपत्ती सुमारे $40 अब्ज होती, ज्यामुळे ते जगातील सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले. सप्टेंबर 2014 मध्ये, एलिसनने Oracle चे CEO पद सोडले, परंतु कंपनीच्या प्रगतीसाठी कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) म्हणून योगदान देत राहिले .
मित्रांनो, लॅरी एलिसन यांची जीवनकथा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अत्यंत गरिबीतून संघर्ष करत त्यांनी जगातील एक मोठं असणारं साम्राज्य उभं केलं. ‘अम्पॅक्स कॉर्पोरेशन’मध्ये काम करत असताना त्यांना ‘ओरॅकल’ची फक्त कल्पना सुचली होती आणि याच कल्पनेवर त्यांनी मेहनतीने कार्य केलं. आज ‘ओरॅकल’मध्ये १,२२,००० हून अधिक कर्मचारी काम करत असून कंपनीची एकूण संपत्ती ९१ बिलियन डॉलर्स आहे.
लॅरी एलिसन यांची संपत्ती सुमारे ५६ बिलियन डॉलर्स एवढी असून त्यांनी आपला प्रवास खडतर परिस्थितीतून सुरू केला होता. त्यांच्या या यशस्वी प्रवासामध्ये त्यांनी अनेक आव्हानं पार केली.
जगातील सर्वाधिक डेटा साठवणारी कंपनी उभारणारे आणि प्रचंड संपत्तीचे मालक लॅरी एलिसन हे जगातील पाचव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असून अमेरिकेत तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. परंतु, एवढी मोठी कंपनी उभी करणारे आणि अफाट संपत्ती कमावणारे लॅरी एलिसन यांचा जीवनप्रवास अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. लहानपणी सोडून दिल्या गेलेल्या या मुलाने स्टीव्ह जॉब्स आणि बिल गेट्स यांच्या बरोबरीने यश मिळवले. त्यांचा प्रवास हा आपल्यासारख्या लाखो तरुणांना स्वप्न पाहण्याची आणि ते प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा देतो.
आपण कोणत्या परिस्थितीतून जात आहोत यापेक्षा आपला दृष्टिकोन आणि मेहनत कशी आहे, हेच आपल्या यशाचं खरं कारण असतं, हे लॅरी एलिसन यांच्या जीवनातून शिकायला मिळतं. जर तुम्हाला काहीतरी नवीन वेगळे अविश्वसनीय करायचे असेल, तर त्याची तयारी आता आणि लगेच करा असं लॅरी नेहमी सांगत असतात, त्यांच्या या प्रवासातून प्रेरणा घेऊन आपणही आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करावा, कारण शेवटी यश मिळवण्यासाठी चिकाटी आणि प्रयत्न यांचीच गरज असते.
आधुनिक जगात चमत्काराचे दुसरे नाव आहे विज्ञान, कारण केवळ विज्ञानाच्या जोरावर पृथ्वीवर वावरणारा माणूस थेट चंद्रावर जाऊन पोहोचला आहे. विज्ञानाच्या मदतीने अशक्य गोष्ट देखील शक्य करणं सहज शक्य आहे असं म्हटलं तरीही ते वावगं ठरणार नाही. भारतीय विज्ञान शास्त्राचा इतिहास बराच जुना आणि गाढा आहे, मात्र कालांतराने आपण हा धनाचा पेटारा कधी उघडून बघितलाच नाही आणि आताच्या घडीला सर्व संशोधनांचं श्रेय मात्र कुणा वेगळ्याच माणसाला दिलं जातंय.
आनंदाची बाब म्हणजे भारताने पुन्हा एकदा प्रगतीचा मार्ग पकडला आहे. वर्ष १९६३ मध्ये भारताकडून पाहिलं रॉकेट लॉंच करण्यात आलं होतं. तेव्हापासून ते आत्तापर्यंतच्या प्रवासात अनेक चढ-उतार सर करत आपण चांद्रयान-२ ची मोहीम यशस्वी करून दाखवली. प्रत्येक भारतीयासाठी चांद्रयानाची मोहीम श्वास रोखून धरणारीच होती. भारताच्या अंतराळ प्रवासात अनेक बुद्धिवंतांनी योगदान दिलं आणि यातीलच म्हत्त्वाचे नाव म्हणजे विक्रम साराभाई. एवढं महत्त्वाचं का? जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
विक्रम साराभाई कोण आहेत?
विक्रम साराभाई यांना भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे (Indian Space Research Programme) जनक म्हणून ओळखलं जातं आणि आज विक्रम साराभाई यांची १०५वी जयंती आहे. वर्ष १९१९ मध्ये विक्रम साराभाई यांचा जन्म गुजरातमधील एका श्रीमंत कुटुंबात झाला. त्यांचे वडील अंबालाल साराभाई हे एक प्रसिद्ध उद्योगपती होते, तर आई सरला देवी मॉंटेसरी शिक्षण पद्धतीवर आधारित द रिट्रीट नावाची शाळा चालवायच्या.
विक्रम साराभाई यांच्या जन्माचा काळ पारतंत्र्याचा असल्याने त्यांच्या घरी सतत स्वातंत्र्यसैनिकांची ये-जा असायची, परिणामी महात्मा गांधी, रवीन्द्रनाथ टागोर, सरोजिनी नायडू, मौलाना आझाद यांच्याशी साराभाईंनी बालपणीच संवाद साधला होता. विक्रम साराभाई यांचं प्राथमिक शिक्षण घरीच झालं, सोबत अशा दिग्गजांचा सहवास लाभला म्हणूनच लहानग्या विक्रम यांच्यात देशभक्तीचं बाळकडू तेव्हाच रुजलं होतं.
कळत्या वयात अहमदाबादच्या गुजरात कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्चशिक्षणासाठी त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश मिळवला आणि १९३९ साली रसायन आणि भौतिकशास्त्रात पदवी मिळवल्यानंतर बी.ए. आणि एम.ए.च्या पदव्या देखील पदरात पडून घेतल्या. विक्रम साराभाई यांचा शैक्षणिक प्रवास मात्र इथेच थांबत नाही, दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी भारतात परतलेल्या विक्रम साराभाई यांनी वर्ष १९४० मध्ये पीएच. डी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून डॉक्टरेट मिळवली आणि महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी ही पदवी डॉ. सी. व्ही. रमन यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली होती.
विक्रम साराभाई यांचा वैज्ञानिक प्रवास:
वर्ष १९४७ रोजी भारत देश इंग्रजांच्या जुलुमी राजवटीतून मुक्त झाला आणि त्यानंतर विक्रम साराभाई यांच्या वैज्ञानिक प्रवासाची खरी सुरुवात देखील झाली. स्वतःच्या राहत्या घरातील एका खोलीमधून विक्रम साराभाई यांनी भौतिक संशोधन प्रयोगशाळेचा श्रीगणेशा केला होता. या जागेचे ऐतिहासिक महत्त्व देखील अपार आहे, कारण इथूनच अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे काम सुरु झाले होते. विक्रम साराभाई भौतिक प्रयोगशाळेची गरज जाणून होते, म्हणूनच मित्रांच्या आणि पालकांच्या साहाय्याने त्यांनी अहमदाबाद एज्युकेशन सोसायटीच्या एम्. जी. सायन्स इन्स्टिट्यूटमधे भौतिकशास्त्राची प्रयोगशाळा उभारली, हीच अहमदाबादची फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी होय. विक्रम साराभाई काही काळ इथे प्राध्यापक म्हणून जबाबदारी सांभाळत होते आणि त्यानंतर संचालक म्हणून देखील कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रयोगशाळेमध्ये किरणविज्ञान, अवकाशविज्ञान आदींवर संशोधन केलं जायचं.
इस्रोची सुरुवात:
कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण आज जगभरात नाव गाजवणाऱ्या ISRO ची सुरुवात विक्रम साराभाई यांनी वयाच्या २८व्या वर्षी केली होती. आपल्याला ज्या वयात नेमकं काय करिअर निवडावं याची खात्री नसते किंवा आपण तारुण्याच्या ओघात वहावत जात असतो. त्याच वयात साराभाईंनी ISROची निर्मिती केली होती. सरकार दरबारी पायऱ्या झिजवून, सरकारला भौतिकशास्त्राचे महत्त्व पटवून देत साराभाई यांनी भारतीय अंतराळ संशोधन समितीची (INCOSPA) निर्मिती केली, ज्याचे नाव पुढे बदलून भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO असे करण्यात आले.
भारताकडून आर्यभट्ट नावाचा पहिला अंतरिक्ष उपग्रह अवकाशात सोडण्यात आला होता, ज्याची रचना अहमदाबाद रिसर्च सेंटरमध्ये करण्यात आली होती. आर्यभट्टच्या यशस्वी उड्डाणानंतर अनेक उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आणि या सर्वांमध्ये विक्रम साराभाई यांचा वाटा महत्वाचा होता.
पहिले रॉकेट लॉंच:
वर्ष १९६३ मध्ये केरळमधील थुंबा नावाच्या गावातून चर्चची जमीन विकत घेण्यात आली, जिथे नंतर थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशनची (TERLS) स्थापना करण्यात आली. याच ठिकाणी भारताचं पहिलं रॉकेट लाँच करण्यात आलं होतं. आज याच लॉंचिंग स्टेशनला विक्रम साराभाई अंतराळ केंद्र म्हणून ओळखलं जातं. डॉ. अब्दुल कलाम देखील त्यांच्या यशाचे श्रेय डॉ. विक्रम साराभाई यांनाच देतात, डॉ. अब्दुल कलाम म्हणतात की, “मी शिक्षणात कधीच गुणवान नव्हतो. केवळ माझी मेहनत बघून डॉ. साराभाई यांनी मला पुढे जाण्याची प्रेरणा दिली.”
विविध संस्थांची स्थापना:
डॉ. विक्रम साराभाई यांनी विविध संस्थांच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट असो किंवा टेक्स्टाइल रिसर्च असोसिएशन साराभाई यांनी नेहमीच देशाला नवीन दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) व्यतिरिक्त ऑपरेशन रिसर्च ग्रुप, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन आणि पत्नी मृणालिनी साराभाई यांच्या सहकार्याने त्यांनी दर्पण ॲकॅडमी फॉर परफॉर्मिंग आर्ट्सची स्थापना केली.
स्पेस ॲप्लिकेशन्स सेंटर, इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (हैदराबाद), युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (जादुगुडा, बिहार), आणि कम्युनिटी सायन्स सेंटर (अहमदाबाद) यांसारख्या संस्थांमध्येही डॉ. विक्रम साराभाई यांचा मोठा वाटा उचलला आणि यांच्या नेतृत्वाखाली या सर्व संस्थांनी विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, आणि सांस्कृतिक क्षेत्रांत भारताने एक नवी उंची गाठली आहे. एवढंच नाही तर डॉ. होमी भाभा यांच्या निधनानंतर डॉ. साराभाई यांनी भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे सचिव म्हणून जबाबदारी उत्तमरित्या पार पडली होती. आज या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला १०५ व्या जयंतीनिमित्त सादर अभिवादन…
जर का तुम्हाला विचारलं की भारताचे नागरिक म्हणून तुमचं पाहिलं प्रेम कोणावर आहे, तर तुम्ही काय उत्तर द्याल? नक्कीच आपल्या मनात पाहिलं नाव येईल ते म्हणजे आपल्या देशाचं, भारताचं. जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन पाहिलंत तरीही भारतीय आणि भारत यांच्याप्रमाणे नातं कुठेही पाहायला मिळणार नाही. संपूर्ण वर्षभरात भारतीय म्हणून जर का कुठला महिना आपल्यासाठी महत्वाचा ठरत असेल तर तो आहे ऑगस्ट, कारण अनेक वर्षांपूर्वी याच महिन्यात आपण परकीय जुलमी राजवट कायमची हटवून स्वतःचे राज्य प्रस्थापित केले होते.
भारत आणि भारताचा स्वतंत्रता संग्राम येणाऱ्या अनेक वर्षांसाठी प्रत्येकाच्या मनात घर करून राहील असा दैदिप्यमान आहे. भारताला परकीयांच्या जाळातून मोकळं करण्यासाठी कित्येक आहुती स्वातंत्र्य देवतेच्या यज्ञ कुंडात अर्पण झाल्या आणि त्यानंतर मिळालं ते आज आपण उपभोग घेत असलेलं स्वातंत्र्य. भारताच्या इतिहासातील या पर्वाचे अनेक टप्पे आणि कोपरेआहेत आणि आज आपण यातीलच क्रांती दिवसाचं पान उलघडणार आहोत…
आपण क्रांती दिवस का साजरा करतो?
भारताच्या स्वातंत्र्य इतिहासात डोकावण्याआधी आपण इतिहास म्हणजे काय हे जाणून घेऊया. इतिहास या शब्दाची संस्कृत भाषेत अतिशय उत्तम फोड करण्यात आली आहे, इति-ह-आस इति इतिहास शब्दः म्हणजेच काय तर जे घडलं, जसं घडलं त्याची मांडणी म्हणजे इतिहास होय. भारताचा इतिहास खूपच जुना आहे, प्रत्येक टप्प्यावर हा इतिहास बदलत जातो आणि प्रत्येकाचं स्वतःचं असं एक महत्व आहे. पैकी एक म्हणजे भारताचा स्वातंत्र्यसंग्राम. परकीयांच्या आक्रमणानंतर स्वतःच्याच भूमीत माणसं दबली जात होती आणि हीच राजवट दूर करण्यासाठी भारतीयांनी स्वतंत्रता मोहीम सुरु केली, यात अनेक ज्ञात-अज्ञात कुटुंब पणाला लागली, कितीतरी चुली कायमच्या विझल्या गेल्या.
भारत स्वतंत्रता संग्रामाचे दोन विभाग पडतात, एक म्हणजे अहिंसावादी आणि दुसरा हिंसावादी. वेगळ्या शब्दांत मांडायचं तर सशस्त्र क्रांती आणि विनाशस्त्र क्रांती. दोन वेगळ्या विचारांची ही माणसं जरी त्या-त्या विचारसरणीला धरून लढत असली तरीही त्यांचा उद्देश मात्र एकच होता. अहिंसावादी गटाचे नेतृत्व महात्मा गांधी करायचे. गांधीजींच्या मते हातात शस्त्र घेऊन केलेल्या युद्धात अनेक निष्पाप बळी जात असत. ते नेहमी म्हणायचे की अस्त्र-शस्त्राविना देखील क्रांती घडवता येते आणि म्हणून त्यांनी मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन असे कैक मार्ग देखील स्वीकारले होते. यापैकी भारत छोडो आंदोलन हे महात्मा गांधींकडून उचलण्यात आलेलं सगळ्यात शेवटचं पाऊल होतं.
आजच्या दिवशीच म्हणजे 8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी काँग्रेसच्या मुंबई अधिवेशनात सदर आंदोलनाची घोषणा केली होती. गांधीजींकडून इंग्रजांना हद्दपार करण्यासाठी केलेला हा सर्वात मोठा प्रयत्न म्हटला जातो, कारण यावेळी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकासाठी हा क्षण ‘करो या मरो’ असाच होता. देशभरातून महात्मा गांधींना प्रचंड प्रतिसाद मिळाला. भारतीय लोकं त्याकाळी महात्मा गांधींना एका नेत्याच्या रूपात पाहायचे, गांधीजी एखादी गोष्ट सांगतायत म्हणजे ती बरोबरच असेल याची त्यांना खात्री वाटायची. एकार्थी काय तर गांधीजी भारतीयांसाठी अंधारात दिसणाऱ्या दिव्याप्रमाणे होते आणि म्हणून लोकांनी दरवेळीप्रमाणे या वेळी देखील गांधीजींना सोबत केली.
भारत छोडो आंदोलनात अरुणा असफ अली यांची भूमिका फारच महत्वाची ठरते. त्याकाळी अरुणाबाई भूमिगत होऊन वावरत होत्या आणि सदर आंदोलनात त्यांनी देशातील तरुणांना एकत्र करत आंदोलनाचा भाग बनवलं होतं. एवढंच नाही तर अरुणाबाईंनी या आंदोलनात गोवालिया टँक मैदानावर भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्याचे धाडस केलं होतं. अरुणा असफ अली यांच्या धाडसी स्वभावामुळे आजही ग्रँड ओल्ड लेडी म्हणत त्याच्या कार्याचा गौरव केला जातो.
भारतमातेला परकीयांच्या जुलुमापासून मुक्त करण्यासाठी उठलेल्या लाटेला रोखणं इंग्रजांसाठी कठीण झालं होतं आणि म्हणूनच चळवळीस सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींसह काँग्रेसच्या इतर मोठ्या नेत्यांना अटक करुन चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला. हा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवण्यासाठी ‘9 ऑगस्ट’ हा ‘ क्रांती दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
याच भारत छोडो आंदोलनाची सुरुवात गोवालिया टॅंक येथे भाषण देऊन करण्यात आली असल्याने आजतागायत या मैदानाचे महत्व कायम आहे. स्वातंत्र्य लढ्यासाठी देशाला आवाहन करणारे महात्मा गांधी आणि इतर नेते 8 आणि 9 आॉगस्ट 1942 रोजी गोवालिया मैदानात एकत्र जमले होते. आज या ऐतिहासिक क्षणांची आठवण करुन देणाऱ्या मैदानावर स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे.