ज्या क्षेत्रात तुम्हाला करिअर करायचे आहे त्यात तुम्हाला आवड आहे का? ती तुमची Strength आहे का? हे आधी तपासा आणि मगच निर्णय घ्या.
2. मार्केट आणि करिअरच्या संधी :
ज्या क्षेत्रात तुम्ही करिअर करू इच्छिता त्या क्षेत्रात सध्या आणि भविष्यात कोणत्या संधी आहेत, याचा अभ्यास करा. त्या क्षेत्राचा विस्तार आणि रोजगाराच्या संधींचा अंदाज घेतल्यास करिअरला चांगली दिशा मिळू शकते.
3. आर्थिक स्थैर्य :
निवडलेल्या करिअरमध्ये मिळणारा आर्थिक फायदा आणि दीर्घकालीन स्थैर्य याचा विचार करा. तुम्ही निवडलेलं करिअर तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकेल का? याची खात्री करा.
4. कामाचे वातावरण :
तुम्हाला ज्या प्रकारचे कामाचे वातावरण हवे आहे, त्यानुसार तुमचं करिअर निवडा.
काहींना ऑफिसमध्ये बसून काम करणे आवडते, तर काहींना फील्डवर काम करण्याची आवड असते. कोणत्या कामाच्या पद्धतीत आपण जास्त सूट होवू शकतो हे शोधा.
5. करिअर आणि वैयक्तिक जीवनाचा समतोल :
निवडलेल्या करिअरमुळे तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला तडजोड करावी लागणार नाही याची काळजी घ्या. काम आणि वैयक्तिक जीवन यांचा योग्य समतोल असलेल्या करिअरची निवड करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेता येईल.
करिअर निवडीबाबतच्या या 5 गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
प्रत्येक यशोगाथेमध्ये एक संघर्षाची कथा असते. अनेक वेळा मोठं यश मिळवण्यासाठी आयुष्यात चढ-उतार आणि अडचणी येतात. पण काही लोक असतात, जे या सर्व अडचणींवर मात करून आपला कर्तृत्वाचा ठसा उमटवतात. त्यांचा जीवन प्रवास आपल्याला हे शिकवतो की यश हे फक्त मेहनत, चिकाटी आणि नवकल्पना यावरच आधारित असतं . “उजाला सुप्रीम” या लोकप्रिय ब्रँडचे संस्थापक एम.पी. रामचंद्रन यांची कथा अशीच एक प्रेरणादायक आणि संघर्षपूर्ण गाथा आहे.
या लेखात आपण त्यांच्या जीवनातील संघर्ष, कठोर परिश्रम, आणि एक मोठं व्यवसाय साम्राज्य उभारण्याचा प्रेरणादायक प्रवास जाणून घेणार आहोत.
प्रारंभिक जीवन आणि संघर्ष
एम.पी. रामचंद्रन यांचा जन्म १९५० साली केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात झाला. त्यांचं बालपण आर्थिक संघर्षात गेलं , त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं . परंतु, त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट शिकली ती म्हणजे आयुष्य आपले कष्ट आणि इच्छाशक्तीवर अवलंबून असतं .
शाळेचं शिक्षण पूर्ण केल्यावर रामचंद्रन यांनी एका कंपनीत लेखापाल म्हणून नोकरी केली. मात्र, त्यांना स्वतःचं काहीतरी मोठं साध्य करायचं होतं. हा प्रवास सोपा नव्हता, त्यांना यश मिळवण्यासाठी काहीतरी वेगळं करायचं होतं. लेखापाल म्हणून काम करत असताना, त्यांच्या मनात एक व्हाईटनर मिश्रण तयार करण्याची कल्पना आली. व्हाईटनर म्हणजे कपड्यांवरील डाग दूर करण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ. त्यांनी त्यांच्या स्वयंपाकघरातच या मिश्रणावर प्रयोग सुरू केले, मात्र त्यात अपेक्षित गुणवत्ता साधता येत नव्हती.
एके दिवशी, त्यांनी एका रासायनिक उद्योगावरील मासिकात एक लेख वाचला ज्यामध्ये जांभळ्या रंगाच्या वापरामुळे कपडे अधिक स्वच्छ धुतले जाऊ शकतात, असं म्हटलं होतं. हा लेख वाचल्यानंतर त्यांच्या मनात नवीन कल्पना आली. त्यांनी या विचारावर प्रयोग सुरू केले, आणि त्यांना हवे तसे परिणाम मिळाले. स्वयंपाकघरात सुरू झालेला त्यांचा हा प्रयोग आता एका मोठ्या उद्योगात बदलू लागला होता.
व्यवसायाची स्थापना
१९८३ मध्ये रामचंद्रन यांनी आपल्या पहिल्या मुलीच्या नावावरून “ज्योती लॅबोरेटरीज” हा व्हाईटनर उत्पादन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांना असं वाटलं की एक संस्कृतीप्रधान नाव त्यांच्या व्यवसायाला एक वेगळा आणि भावनिक स्पर्श देईल . त्यामुळे त्यांनी आपल्या नव्या कंपनीचं नाव “ज्योती लॅबोरेटरीज” ठेवलं. आपला व्यवसाय उभा करण्यासाठी त्यांनी आपल्या भावाकडून फक्त ५००० रुपयांचं कर्ज घेतलं आणि त्याच तुटपुंज्या भांडवलावर त्यांनी कारखाना सुरू केला.
ज्योती लॅबोरेटरीजचं पहिलं उत्पादन “उजाला सुप्रीम” हे लिक्विड फॅब्रिक व्हाईटनर होतं. हे एक साधं पण प्रभावी उत्पादन होतं, जे कपड्यांना अधिक पांढरे, स्वच्छ आणि तेजस्वी बनवण्यासाठी वापरलं जातं. रामचंद्रन यांना समजलं होतं की गृहिणी हा त्यांच्या मुख्य ग्राहकवर्ग असेल. त्यामुळे त्यांनी उत्पादन विक्रीसाठी सहा महिलांना कामावर ठेवलं, ज्या घरोघरी जाऊन “उजाला” विकू लागल्या. त्यांच्या विक्रीसाठीचा संदेश सोपा आणि प्रभावी होता- तो म्हणजे “उजल्याचे फक्त चार थेंब वापरून तुमच्या कपड्यांना चमकदार बनवा”.
रामचंद्रन यांची ही युक्ती ग्राहकांच्या मनात घर करू लागली, आणि “उजाला”ला पहिल्या वर्षातच चांगला प्रतिसाद मिळाला. वर्षाच्या अखेरीस, ज्योती लॅबोरेटरीजने १४४० रुपयांचा नफा मिळवला आणि विक्रीचा आकडा ४०,००० रुपयांपर्यंत पोहोचला. रामचंद्रन यांच्या दृढनिश्चयाने आणि कल्पकतेने ज्योती लॅबोरेटरीजला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या साध्या पण परिणामकारक मार्केटिंग पद्धतीमुळे, कंपनीला अल्पावधीतच मोठं यश मिळालं. “उजाला”च्या यशामुळे रामचंद्रन यांनी आपल्या व्यवसायाला पुढे नेण्याची प्रेरणा घेतली, आणि पुढील काळात ज्योती लॅबोरेटरीज अनेक यशस्वी उत्पादनांसह एक यशस्वी ब्रँड म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
व्यवसायातील स्पर्धेवर मात
व्यवसाय करताना रामचंद्रन यांना मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागले. रेकिट बेंकीझर कंपनीच्या ‘रॉबिन ब्लू’ या उत्पादनाने भारतीय बाजारात आपली पायाभरणी केली होती. यशस्वी होण्यासाठी रामचंद्रन यांना काहीतरी वेगळं करण्याची गरज होती. त्यांनी पारंपरिक ‘पावडर ब्लू’ ऐवजी ‘लिक्विड ब्लू’ तयार केलं आणि हे उत्पादन फक्त १ रुपयांपासून ४५ रुपयांपर्यंतच्या किमतीत उपलब्ध करून दिलं.
त्यानंतर, त्यांनी “चार बूंदों वाला, आया नया उजाला” ही जाहिरात तयार केली, जी खूपच लोकप्रिय झाली. ही जाहिरात घराघरात पोहोचली आणि प्रत्येक गृहिणीची पसंद बनली. अल्पावधीतच ‘उजाला’ हा एक मोठा ब्रँड बनला, आणि १९९७ मध्ये ‘उजाला’ने १०० कोटी रुपयांच्या विक्रीची यशस्वी कामगिरी केली.
यानंतर १९९६ मध्ये डेंग्यूच्या प्रादुर्भावामुळे रामचंद्रन यांना मच्छरांपासून संरक्षण देणाऱ्या उत्पादनाची आवश्यकता भासली. त्यामुळे त्यांनी ३५ कोटी रुपयांची गुंतवणूक करून ‘मॅक्सो’ हे उत्पादन बाजारात आणले. हे उत्पादन देखील खूप लोकप्रिय ठरलं आणि पुढे ‘मॅक्सो’ हा ३०० कोटी रुपयांचा ब्रँड बनला.
विस्तार आणि नवा टर्निंग पॉइंट: Henkel AG & Co.ची भागीदारी
2011 मध्ये ‘ज्योती लॅबोरेटरीज’ने एक मोठं पाऊल उचलत जर्मन FMCG (Fast-moving consumer goods) कंपनी ‘Henkel AG’च्या भारतातील व्यवसायातील ५०.९७% हिस्सेदारी ६१७ कोटी रुपयांना खरेदी केली. ही खरेदी ज्योती लॅबोरेटरीजसाठी एक महत्त्वपूर्ण टर्निंग पॉइंट ठरली, ज्यामुळे कंपनीला भारतीय FMCG उद्योगात आपलं स्थान मजबूत करण्यासाठी भक्कम आधार मिळाला.
‘ज्योती लॅबोरेटरीज’ने या संधीचा लाभ घेत आपल्या उत्पादनांना वाढवलं, विक्रीत चांगली वाढ साधली आणि वितरण नेटवर्क अधिक विस्तारित केलं. या विकासामुळे कंपनीने २०१३ मध्ये १०१७.३८ कोटी रुपयांची विक्री केली आणि ८३.१४ कोटी रुपयांचा नफा कमवला आणि त्यांची उत्पादने भारतातील 29 लाख दुकांनांमध्ये उपलब्ध झाली.
आज, ‘ज्योती लॅबोरेटरीज’चा वार्षिक महसूल २७५७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे आणि कंपनी ३६९ कोटी रुपयांचा नफा कमावते आहे. त्यांच्याकडे २३ कारखाने असून २५ हून अधिक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. उजला सुप्रीम, मॅक्सो, एक्सो डिश वॉश, प्रिल डिश वॉश, मिस्टर व्हाईट, आणि मार्गो बॉडी सोप ही त्यांची प्रमुख उत्पादने भारतीय ग्राहकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहेत.
‘ज्योती लॅबोरेटरीज’ने आता राष्ट्रीय स्तरावर आपला व्यवसाय स्थिर केला असून . ‘उजला’ आणि ‘मॅक्सो’ यांसारखी उत्पादने संपूर्ण भारतात लोकप्रिय झाली आहेत. मोठ्या FMCG कंपन्यांशी स्पर्धा करताना ‘ज्योती लॅबोरेटरीज’ने भारतातील FMCG क्षेत्रात आपली खास ओळख निर्माण केली आहे, आणि आता P&G व HUL सारख्या दिग्गज कंपन्यांना थेट स्पर्धा देत आहे.
‘वॉरेन बफे’ म्हणतात की, ‘खर्च करून उरलेल्या रकमेत बचत करण्यापेक्षा, बचत करून उरलेल्या रकमेत खर्च करा.’ अमेरिकन बँकेचे डीन जे. पी. मोर्गन एका दलालास सल्ला देताना म्हणाले, “तुमचा रोजचा वायफळ खर्च बचतीच्या रुपात साठवला, तर आयुष्यात पुढे होणारी धावपळ टाळली जाऊ शकते.” विल रॉजर म्हणतात, “कर्ज काढून उद्याच्या पगारावर जगणाऱ्या अभिनेत्याच्या संगती पेक्षा, कालच्या बचतीवर भागवणाऱ्या द्वारपालची संगत मी पसंत करेन.”
बचत ही सर्वश्रेष्ठ सवय आहे, ज्याला ही सवय लागेल त्याची प्रगती होते. अडचणीच्या काळात आपण केलेल्या बचतीचा आपल्याला खूप फायदा होतो. बचत करणे हे प्रत्येकाच्या नियोजनात असायलाच हवे. वाढती महागाई आणि भविष्यातील अगणित आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बचत ही काळाची गरज बनली आहे. घरखर्चाचे आर्थिक नियोजन असो किंवा एखाद्या देशाची अर्थव्यवस्था प्रत्येक ठिकाणी बचतीची गरज पडतेच. जर बचत केली नाही, तर उत्पन्न ढासळू शकते आणि आर्थिक अडचणी निर्माण होऊन नुकसान होऊ शकते. बचत करण्याची गरज आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ओळखली गेली आणि तिथूनच ‘जागतिक बचत दिवसा’ची सुरुवात झाली. वर्षभर कसले ना कसले दिवस साजरे करून आपण आपला खर्च वाढवतच असतो. या जागतिक बचत दिवसाला आपण ही काही उपाय करून बचत करण्याचा प्रयत्न करणं जमतंय का ते पाहूयात.
कधी आणि कुणी केली ‘जागतिक बचत दिवसा’ ची सुरुवात ?
या दिवसाची सुरुवात 31 ऑक्टोबर 1942 रोजी झाली. इटली मधील मिलान इथे प्रा. फिलिपो फिलिपो रविझा यांनी पहिल्या आंतरराष्ट्रीय कॉंग्रेस बचत बँकेच्या परिषदेत या दिवसाची सुरुवात केली. तेव्हापासून हा दिवस जगभर साजरा केला जाऊ लागला. 1925 मध्ये पहिला जागतिक बचत दिवस साजरा केला गेला. त्यानंतर 1929 मध्ये स्पेन आणि अमेरिकेत प्रथम राष्ट्रीय बचत दिन साजरा केला गेला.
भारतात जागतिक बचत दिवस एक दिवस आधी साजरा का केला जातो ?
जागतिक बचत आणि रिटेल बँकिंग संस्था WSBI नुसार, जागतिक बचत दिवस 31 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. 31 ऑक्टोबर 1984 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली. तेव्हापासून भारतात ३० ऑक्टोबर रोजी जागतिक बचत दिवस साजरा केला जातो.
या जागतिक बचत दिवसाला पुढील उपाय वापरून करू शकता स्वत:ची बचत
प्रत्येक महिन्याला खर्चाचे नियोजन करावे
दर महिन्याला खर्चाचे नियोजन करून त्यानुसार पैसे खर्च करणे आवश्यक आहे. खर्चाचे नियोजन करून त्यानुसार आपला खर्च नियंत्रित ठेवावा .
गरज पहावी आवड नाही
खर्च करताना नेहमी गरजेला प्राधान्य द्यावे. वायफळ खर्च टाळता आला, तरच बचत करणे शक्य होईल. ज्या वस्तू गरजेच्या आहेत त्याच खरेदी कराव्यात.
पैसा घरी ठेवू नये
आवश्यक तो पैसा घरी ठेवून बाकीची रक्कम बँकेत ठेवणे कधीही फायदेशीर आहे. आपला पैसा शेअर बाजार, म्युच्युअल फंड, जीवन विमा किंवा आरोग्य विम्यामध्ये गुंतवल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.
जर तुम्हाला बँकांमध्ये पैसा गुंतवायचा नसेल, त्यांच्या धोरणानुसार खाते उघडणे तुम्हाला शक्य होत नसेल, तर भारतीय पोस्ट खाते आणि सेव्हिंग्स हा तुमच्यासाठी उत्तम आणि फायदेशीर पर्याय आहे.
तुम्हाला आजचा लेख कसा वाटला हे कंमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा
एका बाजूला शांततेसाठी तरीही शत्रुच्या मनात धडकी भरवणारी पोखरण अणुचाचणी होती तर दूसरीकडे “when there is order in the nation then, there is peace in the world”, म्हणत यूरोपियन देशांच्या संसदेत केलेल्या सर्वकालीन सर्वश्रेष्ठ भाषणांपैकी एक असे जागतिक शांततेचे आवाहन करणारे भाषण होते. E.U.ची संपूर्ण संसद जेंव्हा आनंदाने भारावलेल्या अवस्थेत, बराच वेळ टाळ्या पिटत असतानाच उभी राहुन मानवंदना देते होती तेव्हा,
“भारताकडून शांततेचा जगाला दिला जाणारा संदेश व न्युक्लीअर टेस्ट ह्या दोन्ही परस्पर विरोधाभास असणाऱ्या गोष्टी आहेत”, असे ओरडणाऱ्या पाकिस्तानला आपोआप उत्तर मिळाले. ह्या प्रसंगातून एका शांततावाद्याची विविध देशांच्या मनावर, जादू करणाऱ्या वक्तृत्त्वाची झलकही दिसली व strength respects strength only, ह्या वाक्याचा अर्थही कळाला.
पेपर वाटण्यापासून खडतर आयुष्याची सुरवात करणाऱ्या एका व्यक्तिवर जेव्हा जगातील लहानमोठ्या सर्व पेपर्समधे स्तुती करणारे रकानेच्या रकाने लिहुन येतात तेव्हा ‘अतिसामान्य ते असामान्य’ ह्या प्रवासाचे ते एक उदाहरण ठरते. अनेक मार्गदर्शक पुस्तकांतून आशावादी लिखाण करुन जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी व युवकांना सत्य, विकास, नीतिमत्ता व राष्ट्रनिर्माणाचा मार्ग दाखवणाऱ्या ह्या महापुरुषाचा जन्मदिन 15 ऑक्टोबर हा विश्व विद्यार्थी दिवस म्हणुन साजरा केला जातो तो ह्यासाठीच.
एकदा डॉ.साहेब मिसाईल चाचणीत इतके रममाण झाले की, स्वतःच्या भाचीचेही लग्न विसरून गेले. कधी शाळेत जेवणाच्या पंगतीत आनंदाने लहान मुलांना वाढणे, तर कधी आपली खुर्ची इतरांपेक्षा वेगळी आहे हे आढळल्याने ‘मलाही साधीच खुर्ची द्या’ म्हणत बडेजाव टाळणे, अगदी 2012 ला देशाच्या सर्वोच्च पदाच्या निवडणुकीत ‘राष्ट्रपती पदाबाबत राजकारण होणे योग्य नसून सर्वसंमती असेल, तरच मी उभा राहील’ म्हणत राष्ट्रपतीपदावर सुद्धा पाणी सोडणे, वयाच्या 83 व्या वर्षीही युथ आयकॉन असणे किंवा राष्ट्रप्रमुख असतानाही आपल्यात एक कॉमन मॅन जपणे, असे कितीतरी पैलू आपल्याला डॉ. कलामांनी आधुनिक काळातही एका साधुप्रमाणे निर्मोही आयुष्य व्यतीत केल्याचे दाखले देतात.
जगातील सर्वश्रेष्ठ संशोधकांपेेकी एक असूनही शिक्षणाचे महत्त्व ओळखून आपली ओळख केवळ एक शिक्षकाची रहावी, कारण ‘शिक्षकांची राष्ट्रनिर्माणातील भूमिका अतुलनीय असते’, असे म्हणत ज्ञानदानाच्या पवित्रकार्याचा केलेला योग्य असा गौरव करणे असो, नातलग दिल्लीला आल्यावर स्वतःच्या खिशातून केलेला त्यांच्यावरचा खर्च असो किंवा कायम गरजू संस्थाना केलेले आपल्या मासिक मानधनाचे वाटप असो, ही उदाहरणे अगदी सहज सांगतात की, ह्या आदर्श व्यक्तिमत्वाची, ट्रक भरून असणारी एकमेव संपत्ती म्हणजे पुस्तके का होती. एकीकडे “स्वप्न म्हणजे ते नाही, जे तुम्हाला झोपेत पडते; स्वप्न म्हणजे ते जे तुम्हाला झोपूच देत नाही” म्हणणारे राष्ट्रसमर्पित व्यक्तिमत्त्व, तर दुसरीकडे, low aim is a crime, स्वप्ने मोठीच बघा आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा’ म्हणणारे मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व.
लेखक म्हणून डॉ. कलाम यांनी अनेक प्रेरणादायी पुस्तके लिहिली. “विंग्स ऑफ फायर” हे त्यांचं आत्मचरित्र विशेष प्रसिद्ध आहे, ज्यात त्यांच्या जीवनातील संघर्षाची आणि यशाची कहाणी आहे. “इग्नाइटेड माइंड्स”, “इंडिया २०२०” आणि “माय जर्नी” या पुस्तकांतून त्यांनी भारताच्या प्रगतीसाठी आपल्या कल्पना मांडल्या. त्यांचं स्वप्न होतं की भारत २०२० पर्यंत एक महासत्ता बनेल, आणि या उद्दिष्टासाठी त्यांनी आयुष्यभर युवकांना प्रेरणा देण्याचं कार्य अविरत केलं.
‘देशाने सर्वाधिक प्रेम केलेला राष्ट्रपती’ अशी ओळख असणाऱ्या ह्या मिसाईल मॅनच्या आठवणी जनतेच्या मनात कायमच राहतील ह्यावर कोणाचेही दुमत असू शकत नाही. ‘मी मरेन त्या दिवसाला सुट्टी जाहिर करु नका, तर एक दिवस जास्त काम करा’ म्हणत always nation first हा त्यांचाच संदेश अंगीकारून आधुनिक स्वप्नातील भारताचे निर्माण करु शकतो.
डॉ. विजय पांडुरंग भटकर हे भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख नाव आहे. त्यांनी भारताचा पहिला महासंगणक ‘परम’ विकसित करून देशाला या क्षेत्रात स्वयंपूर्ण केलं. त्यांच्या कठोर परिश्रम आणि दूरदृष्टीमुळे माहिती तंत्रज्ञानात भारताची ओळख जागतिक स्तरावर निर्माण झाली. डॉ. भटकर यांनी केवळ तंत्रज्ञानच नाही, तर शिक्षण, अध्यात्म, साहित्य, आणि ई-गवर्नन्स सारख्या विविध क्षेत्रातही मोलाचं योगदान दिलं आहे. त्यांच्या जीवनप्रवासाने अनेक तरुणांना प्रेरणा दिली आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, त्यांनी मिळवलेल्या यशावर आणि दिलेल्या योगदानावर एक नजर टाकूया.
प्रारंभिक जीवन आणि शिक्षण
डॉ. विजय भटकर यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९४६ रोजी अकोला जिल्ह्यातील मुरांबा या छोट्या गावात झाला. त्यांचं मूळ घर जनावरांचा गोठा आणि पडक्या भिंती असलेल्या जुनाट वाड्यात होतं, त्यांचं बालपण अत्यंत साधारण परिस्थितीत गेलं, पण त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाच्या आणि शिक्षणाच्या तृष्णेमुळे त्यांनी कष्टाची आणि जिद्दीची वाट धरली. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी अनेक मोठी टप्पे गाठले. त्यांनी 1965 साली नागपूर विद्यापीठातून बी.ई. (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) ही पदवी प्राप्त केली. पुढे त्यांनी बडोद्याच्या एम.एस. विद्यापीठातून एम.ई. (कॉम्प्युटर सायन्स) ही पदवी मिळवली.
त्यांची शिक्षणाची ऊर्मी यावर थांबली नाही. त्यांनी आय.आय.टी. दिल्लीमधून पीएच.डी. मिळवली. डॉ. भटकर यांच्या शैक्षणिक प्रवासात ते केवळ शिक्षण घेणारे विद्यार्थी नव्हते, तर नवीन विचारांची दृष्टी असलेले संशोधक होते.
महासंगणक क्रांती
१९८० च्या दशकात भारताला अचूक हवामान अंदाज आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी महासंगणकाची (SUPERCOMPUTER) गरज होती. अमेरिकेने भारताला त्यांचा ‘क्रे’ महासंगणक विकण्यास नकार दिला. अशावेळी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्वदेशी महासंगणक निर्मितीचं स्वप्न पाहिलं. सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. भटकर यांच्यावर या प्रकल्पाची जबाबदारी सोपवण्यात आली. भारताला महासंगणकाच्या तंत्रज्ञानात आत्मनिर्भर बनविणं हे या प्रकल्पाचं ध्येय होतं.
१९८८ साली पुणे विद्यापीठात ‘सी-डॅक’ (Center for Development of Advanced Computing) या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेमार्फत महासंगणक निर्मितीचं काम सुरू झालं.या महत्त्वाकांक्षी प्रकल्पसाठी भारत सरकारने ३७.५ कोटी रुपयांची तरतूद केली, पण विशेष म्हणजे, खूप कमी कालावधीत आणि कमी खर्चात डॉ. भटकर आणि त्यांच्या टीमने ‘परम-८000’ महासंगणकाची निर्मिती केली. १९९१ साली ‘परम-८000 महासंगणक कार्यान्वित झाला. हा महासंगणक दर सेकंदाला 1 अब्ज गणिती क्रिया करण्यास सक्षम होता. भारतासाठी ही एक मोठी तांत्रिक प्रगती होती.
डॉ. भटकर यांनी विकसित केलेला पहिला महासंगणक ‘परम-८०००’ केवळ सुरुवात होती. त्यानंतर ‘परम-१0000’ महासंगणकाची निर्मिती १९९८ मध्ये करण्यात आली. ‘परम-१0000’ ची क्षमता दर सेकंदाला १ लाख कोटी गणिती क्रिया करण्याची होती. या महासंगणकामुळे भारताने हवामान अंदाज, उपग्रह प्रक्षेपण, संरक्षण, अणु तंत्रज्ञान, औषधनिर्मिती, खनिज संशोधन अशा अनेक क्षेत्रात प्रचंड प्रगती केली. भारत महासंगणकाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रगण्य देशांमध्ये स्थान मिळवू लागला.
संगणकीय भाषांमधील क्रांती; ‘जिस्ट’ प्रणाली
संगणकाचा वापर केवळ इंग्रजीत भाषेतच मर्यादित राहावा असे डॉ. भटकर यांना मान्य नव्हतं. त्यांनी विविध भारतीय भाषांचा संगणक क्षेत्रात उपयोग करून घेण्याचं ध्येय ठेवलं होतं. १९८९ साली त्यांनी ‘जिस्ट’ (Graphics and Intelligence based Script Technology) ही संगणकीय प्रणाली विकसित केली. ‘जिस्ट’मुळे भारतीय भाषांमध्ये संगणकावर कार्य करणं सहज शक्य झालं. भारतीय उपखंडात संगणक वापराच्या क्षेत्रात हे एक मोठं पाऊल होतं. यामुळे इंग्रजी भाषेची मक्तेदारी संपुष्टात आली आणि संगणक क्षेत्रात भारतीय भाषांनाही स्थान मिळालं .
विविध संस्थांच्या उभारणीत महत्त्वाचं योगदान
डॉ. भटकर हे एक संस्थापक-विचारवंत म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या संस्थांची स्थापना केली आणि त्या संस्थांच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘इलेक्ट्रॉनिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर’, ‘टेक्नोपार्क (त्रिवेंद्रम)’, ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी’, ‘महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन (MKCL)’, ‘डिशनेट’, ‘डिव्हिनेट अॅक्सेस टेक्नॉलॉजी’ अशा विविध संस्थांची स्थापना झाली. यापैकी प्रत्येक संस्था तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भरीव योगदान देत आहे.
पुरस्कार आणि सन्मान
डॉ. विजय भटकर यांना त्यांच्या अभूतपूर्व कार्यासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांना ‘पद्मश्री’, ‘महाराष्ट्रभूषण’, ‘एच.के. फिरोदिया पुरस्कार’, आणि ‘डेटाक्वेस्ट जीवनगौरव पुरस्कार’ यांसारखे मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. तसेच, विविध विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे.
भारतातील आयटी उद्योगाच्या विकासात डॉ. भटकर यांचं मोलाचं योगदान आहे. भारत सरकारच्या अनेक वैज्ञानिक सल्लागार समित्यांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. ते ‘विज्ञानभारती’ संस्थेचे अध्यक्ष म्हणून सहा हजारांहून अधिक संशोधकांसोबत कार्यरत होते. २०१७ साली ते नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्त झाले होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना एकूण ४०हून अधिक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालण्याच्या त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव आहे.
डॉ. भटकर हे एक नामांकित लेखक आणि संशोधक आहेत. त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ रचले आहेत, ज्यामध्ये ‘आजची ज्ञानेश्वरी’, ‘आजची मराठी भगवद्गीता’, ‘इतिहास घडविला त्यांनी’, ‘मधुराद्वैताचार्य श्रीगुलाबराव महाराजांची विज्ञानदृष्टी’, ‘नीळा झालासे पांडुरंग’, ‘तुका सर्वांगे विठ्ठल’, ‘वेध अंतिम सत्याचा’, आणि ‘विज्ञानदृष्टी’ या पुस्तकांचा समावेश आहे.
त्यांनी आठ पुस्तके संपादित केली असून, त्यांचे ८० पेक्षा अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या शोधनिबंधांमध्ये ‘सुपर कॉम्प्यूटिंग’, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’, ‘डिस्ट्रिब्युटेड कॉम्प्युटर कन्ट्रोल’, आणि ‘व्हेरिएशनल थिअरी’ यांसारख्या संगणक विज्ञानाच्या विषयांचा समावेश आहे.
विजय भटकर यांचं जीवन हे एका व्यक्ती आपल्या जिद्दीने, मेहनतीने आणि कल्पकतेने तंत्रज्ञानाच्या जगात कसा मोठा बदल घडवू शकतो, याचं प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी भारताला महासंगणक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर मानाचं स्थान मिळवून दिलं आहे. त्यांची जीवनकथा विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाजाच्या उत्कर्षासाठी एक आदर्श ठरते.
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आनंदाचे वातावरण आहे. मराठी भाषेला हा दर्जा मिळवण्यासाठी अनेक वर्षांपासून साहित्यिक, भाषाप्रेमी आणि अभ्यासकांनी खूप प्रयत्न केले होते. अखेर त्यांच्या या मेहनतीला यश मिळाले आहे. मराठी भाषेचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता हा निर्णय खूप महत्त्वाचा ठरतो. या निर्णयामुळे मराठी भाषेचा विकास, प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नवीन संधी निर्माण होतील.
या लेखात आपण अभिजात भाषा म्हणजे काय, ती कशी निवडली जाते आणि मराठी भाषेला याचा कसा फायदा होईल याची माहिती जाणून घेऊया…
अभिजात भाषा म्हणजे काय?
एखादी भाषा अभिजात म्हणून घोषित केली जाते तेव्हा ती भाषा केवळ प्राचीन आणि समृद्धच नाही, तर त्या भाषेचा साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रभाव देखील खूप मोठा असतो. भारतीय संविधानानुसार अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्या भाषेला विशेष मान्यता दिली जाते, ज्यामुळे त्या भाषेच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक आणि शैक्षणिक सहाय्य दिलं जातं.
अभिजात भाषा हा दर्जा मिळण्यासाठी निकष काय?
संबंधित भाषेचं अस्तित्व कमीत कमी दीड ते अडीच हजार वर्षांपूर्वीचं असावं.
भाषेत प्राचीन काळापासून समृद्ध साहित्य असावं, ज्यामुळे भाषेची सांस्कृतिक आणि साहित्यिक महानता दिसून येते.
भाषेचं स्वत:चं स्वायत्त अस्तित्व असावं, म्हणजेच ती भाषा इतर भाषांच्या प्रभावाखाली येऊन संपुष्टात आलेली नसावी.
भाषेच्या प्राचीन आणि आधुनिक रूपामध्ये एक गाभ्याचं एकसारखं स्वरूप टिकून असावं.
अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी मराठी भाषेच्या प्रवासाचा इतिहास
मराठी भाषेच्या अभिजात भाषेच्या दर्जासाठी गेल्या काही दशकांपासून जोरदार चळवळ सुरू होती. मराठी साहित्यिक आणि अभ्यासकांनी सतत या मागणीसाठी आवाज उठवला. महाराष्ट्र शासनाने २०१३ साली ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करायला सुरुवात केली आणि त्याच काळात अभिजात दर्जासाठी प्रयत्न अधिक जोर धरू लागले.
राज्य सरकारने या मागणीच्या पुढील टप्प्यात रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली होती. या समितीने मराठी भाषेच्या समृद्ध साहित्यिक परंपरेचा आणि तिच्या ऐतिहासिक महत्त्वाचा सखोल अभ्यास करून सादर केलेला ५०० पानांचा अहवाल केंद्र सरकारला सुपूर्द केला होता. या अहवालात मराठी भाषेच्या अभिजात भाषेच्या निकषांची पूर्तता होत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. अखेर, केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल करून महाराष्ट्रातील भाषाप्रेमींना आनंदाची मोठी बातमी दिली.
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे फायदे:
१) भाषेच्या संशोधनाला चालना
मराठी भाषेच्या अभिजात दर्जामुळे भाषातज्ज्ञ आणि साहित्यिकांना अधिक संशोधनासाठी प्रोत्साहन मिळेल. विशेषतः मराठी भाषेतील विविध बोली आणि त्यांच्या विविधतेचा अभ्यास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान मिळेल. प्राचीन मराठी ग्रंथ, साहित्य आणि काव्यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी संशोधन संस्थांना मदत मिळेल.
२) साहित्य आणि विद्वानांसाठी पुरस्कार
अभिजात भाषेतील विद्वानांसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. मराठी भाषेला हा दर्जा मिळाल्याने मराठी भाषेतील साहित्यिक, कवी, आणि भाषातज्ज्ञांना या पुरस्कारासाठी पात्रता मिळेल. यामुळे मराठी साहित्यिकांना अधिक प्रेरणा मिळेल आणि त्यांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळेल.
३) विद्यापीठांमध्ये विशेष अभ्यास केंद्रे
अभिजात भाषांना दिलेल्या दर्जामुळे विविध विद्यापीठांमध्ये त्या भाषेच्या अभ्यासासाठी विशेष केंद्र उभारली जातात. आता मराठी भाषेसाठीही देशभरातील विद्यापीठांमध्ये अभ्यास केंद्रे स्थापन केली जातील. या केंद्रांमध्ये मराठी भाषेचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना मराठी साहित्याची माहिती देण्यासाठी विशेष अभ्यासक्रम तयार केले जातील.
४) ग्रंथालयांचा विकास
राज्यातील १२ हजारांहून अधिक ग्रंथालयांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वा ठरला आहे. अभिजात भाषेच्या ग्रंथालयांसाठी केंद्र सरकारकडून अनुदान मिळत असतं, त्यामुळे मराठीतील प्राचीन ग्रंथांचे जतन, अनुवाद आणि पुनरुत्थान होणार आहे. मराठी भाषेतील साहित्यावर विशेष ग्रंथालये स्थापन केली जाऊ शकतात.
५) अनुवाद आणि जागतिक स्तरावर प्रसिद्धी
मराठी भाषेतील प्राचीन आणि महत्त्वपूर्ण साहित्य आता अन्य भारतीय तसेच जागतिक भाषांमध्ये अनुवाद करण्याची प्रक्रिया वेगवान होणार आहे. यामुळे मराठी साहित्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रसिद्धी मिळेल आणि त्याचे महत्त्व जागतिक स्तरावर पोहोचेल.
६) केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान
अभिजात भाषेला मिळणारे अनुदान हे भाषेच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. केंद्र सरकारकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो, जो भाषेच्या संवर्धनासाठी, साहित्य प्रकाशनासाठी आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी वापरला जातो. या निधीतून विविध मराठी साहित्यिक उपक्रम राबवले जाऊ शकतात, ज्यामुळे मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसाराला गती मिळेल.
७) प्राचीन आणि आधुनिक मराठीचा अभ्यास
मराठी भाषेच्या प्राचीन आणि आधुनिक रूपांचा सखोल अभ्यास करण्यासाठी आता अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. भाषातज्ज्ञांना भाषा विकासाचा आणि बदलाचा अभ्यास करता येईल, ज्यामुळे मराठी भाषेतील विविध पैलूंवर अधिक प्रकाश पडेल.
मराठीसह भारतात इतर काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. या भाषांमध्ये तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम या भाषांचा समावेश आहे. या भाषांना अभिजात दर्जा मिळाल्यानंतर त्यांचा विकास आणि संरक्षण अधिक गतीने झाला आहे. केंद्र सरकारकडून या भाषांच्या संवर्धनासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो, ज्यामुळे त्या भाषांचे प्राचीन साहित्य जतन होण्यास मदत झाली आहे. त्याचप्रमाणे, मराठी भाषेलाही आता या मार्गावर चालण्याची संधी मिळाली आहे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने तिच्या भविष्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे. मराठी भाषेच्या साहित्य, कला, आणि संस्कृतीचे संवर्धन होण्यासाठी आता अधिक साधनसंपत्ती उपलब्ध होणार आहे. मराठी भाषा ही फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशाच्या इतर भागांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली ओळख निर्माण करू शकते.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हि जगभरातील संपूर्ण मराठी भाषिकांसाठी अभिमानाची बाब आहे. या निर्णयामुळे मराठी भाषेचा सन्मान आणि तिच्या संवर्धनासाठी असलेली कटिबद्धता अधिक दृढ होणार आहे. शैक्षणिक, साहित्यिक, आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून मराठी भाषेच्या विकासाला आता मोठ्या प्रमाणात चालना मिळेल यात शंका नाही .
हा निर्णय मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतंच ‘एनपीएस वात्सल्य’ या नवीन योजनेचे उद्घाटन केले. २०२४ च्या अर्थसंकल्पात सरकारने या योजनेची घोषणा केली होती, ज्यामुळे पालकांना आपल्या मुलांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. या योजनेच्या अंतर्गत वयाच्या १८ वर्षांपर्यंत मुलांची खाती उघडली जाऊ शकतात आणि पुढील काळात या खात्याचे रूपांतर नियमित पेन्शन योजनेत होईल. ही योजना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) द्वारे राबवली जाणार आहे.
योजनेच्या अटी
‘एनपीएस वात्सल्य’ योजनेअंतर्गत १८ वर्षांपर्यंतची सर्व मुले पात्र आहेत. खाते केवळ मुलांच्या नावाने उघडता येईल, परंतु गुंतवणुकीची जबाबदारी पालकांची असेल. यामुळे पालकांना त्यांच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. जवळपास सर्व बँका, पोस्ट ऑफिस आणि पेन्शन फंडांमध्ये पॉइंट ऑफ प्रेझेन्सद्वारे या खात्याचे उघडणे शक्य आहे. ई-एनपीएस प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे, ज्यामुळे प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होईल.
गुंतवणूक रक्कम
या खात्याचे उघडणे कमीत कमी १००० रुपयांनी शक्य आहे आणि गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही. त्यामुळे पालकांना त्यांच्या आवडीनुसार आणि आर्थिक क्षमतेनुसार अधिक रक्कम गुंतवण्याची मुभा मिळते. खात्यात जमा केलेल्या पैशावर चक्रवाढ व्याज मिळेल, ज्यामुळे योजनेचा आर्थिक लाभ वाढतो.
रक्कम काढणे
या योजनेमध्ये तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीनंतर, २५ टक्के रक्कम विशेष परिस्थितीत, जसे की शिक्षण, आजार किंवा अपंगत्व यासाठी काढता येईल. हे पालक आणि मुलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे, कारण यामुळे आर्थिक संकटांच्या काळात आवश्यक रक्कम उपलब्ध होऊ शकते.
रक्कम काढण्याची मर्यादा
मुलाचे वय १८ वर्षांचे होईपर्यंत, जास्तीत जास्त तीन वेळा यातील रक्कम काढता येईल. १८ वर्षांपर्यंत मूल या योजनेतून बाहेर पडता येणार नाही, ज्यामुळे बचतीचा एक स्थिर प्लॅन तयार केला जातो आणि मुलांचे भविष्य सुरक्षित राहते.
या योजनेच्या माध्यमातून, सरकारने पालकांच्या आर्थिक सुरक्षेसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेच्या अंमलबजावणीने भारतीय समाजात आर्थिक जागरूकता वाढेल आणि मुलांच्या भविष्याची दिशा निश्चित करण्यात मदत होईल. ही योजना निश्चितच पालकांना आर्थिक सुरक्षा आणि यशस्वी भविष्याचे आश्वासन देईल.
आयुष्य हे एक न संपणारं युद्ध आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आज कोणत्याही क्षेत्रात जा तिथे स्पर्धा आहे, कष्ट आहे, मेहनत आहे. संघर्षाविना सहज मिळतील अशा खूप कमी गोष्टी राहिल्यात. आज कष्टाशिवाय पर्याय नाही. चिकाटी आणि संयम आत्ताच्या तरुण पिढीमध्ये कमी असल्याकारणाने उतावळेपणात झटपट श्रीमंत व्हावे असे त्यांना वाटत असते. लॉटरी, मटका, जुगार अशा सवयींमुळे अनेक तरुणांचं अक्षरशः संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं.
घरबसल्या लाखो-करोडो कमवा, तुमचे पैसे दुप्पट करा, नेटवर्क मार्केटिंग मधून करोडपती व्हा अशा अनेक फसव्या जाहिराती दररोज वर्तमानपत्रांमध्ये झळकत असतात. अशा झटपट आणि क्षणात श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी तरुण वर्ग फसतो आणि बळी पडतो. शेवटी अपयश आणि निराशा वाट्याला येते. मला कोणीतरी गॉडफादर भेटेल, श्रीमंत बनण्याची एखादी मोठी संधी चालून येईल किंवा देवाचा साक्षात्कार होईल अशी आपण अपेक्षा धरुन बसतो. अचानक राजयोग येऊन माझ्या आयुष्याला एका दिवसात कलाटणी मिळेल, माझं आयुष्य बदलून जाईल असं बहुतेकांना वाटत असतं. प्रयत्न, चिकाटी, परिश्रम, कष्ट, संघर्ष करण्याऐवजी सगळं सहज व्हावं, सहज मिळावं असं वाटत असतं. मात्र यशाला शॉर्टकट नसतो आणि शॉर्टकटने मिळालेलं यश हे शाश्वत देखील नसतं. अचानक एखादी संधी चालून येईल किंवा कोणीतरी आपल्या मदतीला येईल अशी आशा वाटणे हे स्वतःच्याच नाकर्तेपणाचे सर्वात मोठे लक्षण आहे.
जेव्हा आपला स्वतःचा स्वतःच्याच सामर्थ्यावर विश्वास नसतो तेव्हा अशा प्रकारच्या निरर्थक अपेक्षा आपण धरून राहतो. मित्रांनो तुम्हाला आयुष्यात जे काही मिळवायचे आहे, जे कोणते ध्येय साध्य करायचे आहे ते मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःला रणांगणात उतरावं लागेल, स्वतः झगडावं लागेल. आपल्या प्रत्येकाच्या अस्तित्वाचं काही ना काही कारण आहे, ते कारण आपल्याला शोधायचंय आणि त्या कारणाच्या पूर्ततेसाठी काम करायचंय. यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो त्यासाठी मेहनतीचा यज्ञ प्रत्येकाला पेटवावाच लागतो. शॉर्टकटने मिळालेल्या यशानं तुम्ही जितके लवकर वर जाता, तितक्याच लवकर तुम्ही खाली देखील येता. थ्री इडीयट्स मध्ये आमिर खानने म्हटल्याप्रमाणे “सक्सेस के पीछे मत भागो, मेहनत इतनी करो की सक्सेस खुद आपके पीछे आयेगी.
Shortcut आणि Smartwork मध्ये काय फरक आहे?
1. Shortcut :
हे काम जलद पूर्ण करण्यासाठी वापरलेले छोटे मार्ग किंवा तात्काळ उपाय असतात.
शॉर्टकट कधी कधी गुणवत्ता किंवा दीर्घकालीन परिणामांवर परिणाम करू शकतो.
शॉर्टकटमध्ये फक्त काम पटकन संपवणे हे उद्दिष्ट असते, त्यामागे ठराविक उद्दिष्ट किंवा हेतू नसतो.
उदाहरण: प्रोजेक्टमध्ये आवश्यक माहिती न वाचता थेट निष्कर्ष लिहिणे.
2. Smart Work :
हे काम चांगल्या पद्धतीने आणि नियोजनबद्ध मार्गाने कमी वेळात पूर्ण करण्याचे तंत्र आहे.
स्मार्ट वर्कमध्ये तंत्रज्ञान आणि कौशल्य वापरून कामाचे नियोजन केले जाते.
दीर्घकालीन यश आणि गुणवत्तेला प्राधान्य दिले जाते.
Shortcut वापरल्याने फक्त तात्पुरते फायदे मिळतात, तर Smart Work दीर्घकालीन आणि शाश्वत यशाकडे नेते.
Smart Work म्हणजे काय?
Smart Work म्हणजे कमी वेळेत अधिक परिणाम साधणे. मेहनत कमी पण ती मेहनत योग्य दिशेने करणे महत्त्वाचे आहे. शॉर्टकट घेताना विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे.
Smart Work कसे करावे?
कामाचे प्राधान्य ठरवा: सर्वात महत्त्वाचे काम आधी पूर्ण करा, त्याला सुरुवातीला प्राधान्य द्या.
तंत्रज्ञानाचा वापर करा: तंत्रज्ञानाचा वापर करून कामे सोपी करा. उदा. ऑटोमेशन साधने.
वेळेचे नियोजन: कामाचे छोटे भाग करा आणि त्यासाठी वेळेची मर्यादा ठरवा.
काम सोपवा: आवश्यकतेनुसार इतरांना काम सोपवा.
नवीन कौशल्ये शिकत रहा: नवीन तंत्र आणि पद्धती शिकून स्वतःला कायम अपडेट ठेवा
यामुळे तुम्ही शॉर्टकट घेत असतानाही अधिक परिणामकारकपणे आणि हुशारीने काम करू शकाल.
यश मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी :
धैर्य आणि सातत्य: प्रत्येक टप्प्यावर मेहनत आणि सातत्य ठेवणे.
योग्य नियोजन: कोणतेही काम व्यवस्थित योजना बनवून करणे.
समर्पण: यशासाठी तुमच्याकडे ठाम ध्येय असणे आणि त्यासाठी निरंतर प्रयत्न करणे.
शिकण्याची तयारी: चुका झाल्यावर त्यातून शिकणे आणि स्वतःला सुधारण्याची तयारी ठेवणे.
यश मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही, परंतु शहाणपणाने काम केल्यास योग्य वेळी यश नक्कीच मिळेल. Smart Work हा यश मिळवण्याचा मार्ग असू शकतो; पण Short Cut नाही.
दरवर्षी १५ सप्टेंबर हा दिवस ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारतीय अभियांत्रिकी आणि विकासात अतुलनीय योगदान देणारे भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. पुण्याच्या खडकवासला धरणाच्या स्वयंचलित गेटच्या निर्मितीपासून ते मुंबईच्या प्रीमिअर ऑटोमोबाईल कंपनीच्या स्थापनेपर्यंत आपले योगदान देणारे भारताचे पहिले अभियंता सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे विश्वेश्वरय्या हे केवळ एक अभियंता नव्हते, तर त्यांनी भारताच्या औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात देखील भरीव योगदान दिले. त्यांची दूरदृष्टी आणि उत्तम तांत्रिक कौशल्य आजही अभियंते आणि तंत्रज्ञांसाठी आदर्श आहे.
विश्वेश्वरय्या यांचा जन्म कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील चिक्कबल्लापूर तालुक्यात १५ सप्टेंबर १८६१ रोजी झाला. त्यांचे पूर्वज आंध्र प्रदेशातील मोक्षगुंडम या गावचे रहिवासी होते, म्हणून त्यांचे आडनाव ‘मोक्षगुंडम’ असे पडले. त्यांचे वडील पंडित श्रीनिवास शास्त्री हे प्रकांड पंडित होते. त्यांना वेद, उपनिषद यांचा गाढा अभ्यास होता. विश्वेश्वरय्या लहानपणापासूनच अतिशय हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते.
सुरुवातीचे शिक्षण त्यांनी बंगळुरू येथील सेन्ट्रल कॉलेजमध्ये झाले. घरची आर्थिक परिस्थिती अस्थिर होती, त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं. मात्र, त्यांनी त्यांच्या अभ्यासातील सातत्य राखत बी. ए. च्या परीक्षेत संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यांच्या या यशाने प्रभावित होऊन तत्कालीन म्हैसूर सरकारने त्यांना पुढील अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर केली. त्या शिष्यवृत्तीच्या बळावर विश्वेश्वरय्या यांनी पुण्याच्या सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथे त्यांनी तीन वर्षांचा अभ्यासक्रम अवघ्या अडीच वर्षांत पूर्ण करून, नोव्हेंबर 1883 मध्ये एल. सी. ई. (लायसेन्सिएट सिव्हिल इंजिनिअरिंग) म्हणजेच आजची बी.ई. सिव्हिल पदवी वयाच्या बाविसाव्या वर्षी प्रथम श्रेणीत आणि प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली. शिक्षण पूर्ण होताच, 1884 मध्ये त्यांची तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या वतीने मुंबई राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात (पी.डब्ल्यू.डी.) असिस्टंट इंजिनिअर म्हणून पुण्यात सरळ नियुक्ती करण्यात आली.
पुढे मुंबई सरकारच्या नोकरीत असताना विश्वेश्वरय्या यांनी अनेक उल्लेखनीय कामगिरी केली. 1893 मध्ये त्यांनी सिंध प्रांतातील सक्कर शहराला भेडसावणारा पाण्याचा प्रश्न सोडवला. त्या काळात सिंधू नदीपासून पाणी पुरवण्याची कोणतीही ठोस व्यवस्था नव्हती, त्यामुळे शहरात पाण्याची टंचाई होती. विश्वेश्वरय्या यांनी एक अभिनव योजना आखली, ज्याद्वारे सिंधू नदीपासून सक्करला पाणी मिळू लागले आणि हा प्रश्न कायमचा सुटला. याशिवाय, त्यांनी ब्रिटिश सैन्याच्या एडनमधील छावणीसाठी मोठं काम केलं. एडन हा येमेन या देशातील एक वाळवंटी प्रदेश होता, जिथे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती. ब्रिटिश सरकारने या समस्येचे निराकरण करण्यासाठी एका कुशल अभियंत्याची मागणी केली होती आणि सरकारने विश्वेश्वरय्या यांची निवड केली. त्यांनी एडनपासून ६० मैलांवर असलेल्या ठिकाणाहून पावसाचे पाणी पुरवण्याची योजना तयार केली. या योजनेमुळे एडनमधील पाण्याची समस्या कायमची सुटली आणि ब्रिटिश सैन्याला दिलासा मिळाला.
त्यानंतर, त्यांनी शेतीसाठी एक क्रांतिकारक पद्धत विकसित केली. त्याकाळात शेतकरी कालव्याच्या पाण्याचा प्रमाणाच्या बाहेर मनमानी वापर करत होते, त्यावर कोणतेही नियंत्रण नव्हतं. तेव्हा विश्वेश्वरय्या यांनी या प्रश्नावर अभ्यास करून ब्लॉक सिस्टिम नावाची नवी पद्धत शोधली. सुरुवातीला शेतकऱ्यांनी या पद्धतीला विरोध केला, पण जसजशी त्यांना या योजनेची उपयुक्तता समजली, तसतसा विरोध मावळला. ब्लॉक सिस्टिममुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर अधिक नियोजनबद्ध पद्धतीने सुरू केला आणि शेती व्यवसायात त्यांच्यामुळे विश्वास निर्माण झाला.
विश्वेश्वरय्या यांचे पुण्यात सुमारे चौदा-पंधरा वर्षे वास्तव्य होतं . पुण्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासात त्यांचे योगदान महत्त्वाचे होतं. 1901-03 दरम्यान त्यांनी पुण्याजवळील खडकवासला धरणावर एक ऑटोमॅटिक गेट डिझाइन केलं. हे दरवाजे जलाशयातील पाणी विशिष्ट उंचीवर पोहोचले की, आपोआप उघडत आणि पाणी कमी झाले की बंद होत. त्याकाळात हे अत्याधुनिक तंत्रज्ञान एक आश्चर्य मानलं जात होतं. तसेच पुणे शहराच्या भूमिगत सांडपाण्याची योजना सुद्धा त्यांनीच तयार केली. या योजनेमुळे शहरात सांडपाण्याचे व्यवस्थापन अधिक सुलभ झाले. त्यांच्या या योजनेला त्याकाळी एक अद्भुत यश मानले गेले.
पुण्याच्या जवळपास असलेल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचे महत्त्व पटवून देण्याचे कामही विश्वेश्वरय्या यांनी केलं. त्यांनी ब्लॉक सिस्टिमचा प्रचार करून शेतकऱ्यांना या पद्धतीची महत्ता समजावली, ज्यामुळे पाणी वाचले आणि शेतीत अधिक उत्पादकता आली. त्यांनी पुण्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासात मोठे योगदान दिलं, ज्यामुळे शहराच्या विकासाची दिशा ठरवली गेली.
मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी सरकारी नोकरीत असताना असाधारण कामगिरी केली होती. त्यांच्या कर्तृत्वाचा दर्जा आणि त्यांनी दाखवलेली कार्यक्षमता या गोष्टी सर्वत्र चर्चेचा विषय होत्या. परंतु, त्या काळात भारतीयांना इंग्रज सरकारने ठराविक मोठ्या पदांवर जाण्याची परवानगी दिली नव्हती. जेव्हा विश्वेश्वरय्या यांनी चीफ इंजिनिअर पदासाठी पात्रता दाखवूनही त्यांना ते पद देण्यात आलं नाही, तेव्हा त्यांना एकप्रकारचा अपमान वाटला. कारण ते एकटे भारतीय होते आणि इंग्रज सरकारने हे पद केवळ गोऱ्या अधिकाऱ्यांसाठी राखून ठेवलेले होतं. त्याचं वेळी विश्वेश्वरय्या यांची पेन्शनसाठी आवश्यक असलेली नोकरीची सेवा मुदत पूर्ण होण्यासाठी काहीच महिने शिल्लक होते. मात्र, त्यांच्या स्वाभिमानी आणि तत्त्वनिष्ठ स्वभावाला हा अन्याय सहन होईना. त्यांना मुदत वाढवून मिळणार नाही याची कल्पना होती आणि पेन्शनसाठी आवश्यक कालावधी कमी राहिला होता, तरीही त्यांनी 1908 मध्ये सुपरिंटेंडेंट इंजिनिअर म्हणून नोकरीचा तातडीने राजीनामा दिला. हा निर्णय त्यांनी आपल्या मूल्यांवर ठाम राहून घेतला होता.
या निर्णयानंतर सर्वत्र मोठी चर्चा रंगली. त्यांच्या नोकरी सोडण्याच्या निर्णयाने अनेकांना धक्का बसला. ब्रिटिश सरकारलाही विश्वेश्वरय्या यांच्या या निर्णयामुळे स्वतःचीच लाज वाटली आणि त्यांनी इंग्लंडमधून खास परवानगी मिळवून पेन्शनचा नियम शिथिल केला, जेणेकरून विश्वेश्वरय्या यांना पेन्शन मिळू शकेल. विश्वेश्वरय्या यांचा राजीनामा आणि नोकरी सोडल्याची बातमी देशभरात पसरली होती. त्याचवेळी, हैदराबाद संस्थानकडून एक विशेष निमंत्रक विश्वेश्वरय्या यांना भेटण्यासाठी आला. त्या निमंत्रकाने त्यांना चीफ इंजिनिअर म्हणून त्याच पगारावर नोकरीसाठी नियुक्त करण्याचं पत्र दिलं. हे पत्र मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी, म्हैसूर संस्थानातूनही त्यांना एक पत्र मिळाले.
या पत्रात विश्वेश्वरय्या यांना चीफ इंजिनिअर म्हणून म्हैसूरमध्ये रुजू होण्याचं आमंत्रण देण्यात आलं होतं. या दोन मोठ्या संस्थानांमधून आलेल्या प्रतिष्ठित प्रस्तावांमुळे विश्वेश्वरय्या मोठ्या पेचात सापडले होते. त्यांना कोणालाही दुखवायचं नव्हतं, परंतु त्यांना त्यांच्या मूळ राज्यात परतण्याची इच्छा होती. त्यांच्या मनात म्हैसूरकडे परतण्याची ओढ होती. मात्र, त्याचवेळी हैदराबादमधील नद्यांच्या पूर समस्या गंभीर होत्या आणि त्या समस्येवर तातडीने उपाययोजना करणं आवश्यक होतं. म्हणूनच, विश्वेश्वरय्या यांनी एक समंजस निर्णय घेतला त्यांनी प्रथम हैदराबादमधील पूर समस्येवर उपाय काढण्याचं ठरवलं आणि त्यानंतर म्हैसूरला जाण्याचा विचार केला.
त्या काळात हैदराबाद शहरातील मूसी आणि ईसी या नद्यांना दरवर्षी येणाऱ्या महापुरांमुळे मोठी हानी होत होती. पुरामध्ये घरं, जनावरं वाहून जात होती. हा प्रश्न सोडवण्यासाठी एम. विश्वेश्वरय्या यांनी या नद्यांवर धरणे बांधण्याची योजना आखली, ज्यामुळे महापुरांवर नियंत्रण मिळवता आलं. या योजनेची यशस्वी अंमलबजावणी केल्यानंतर, 1909 साली त्यांनी म्हैसूर संस्थानात (आताचे कर्नाटक) मुख्य अभियंता म्हणून पदभार स्वीकारला.
म्हैसूरच्या महाराजांना विश्वेश्वरय्या यांची शिस्तबद्ध कामाची पद्धत खूप आवडली, म्हणून त्यांनी 1912 साली त्यांनी विश्वेश्वरय्या यांना म्हैसूर संस्थानाचे दिवाण म्हणून नेमले. आपल्या कार्यकाळात विश्वेश्वरय्यांनी उद्योगधंद्यांमध्ये आधुनिक साधनांचा वापर करून सुधारणा घडवून आणल्या. भद्रावती आयर्न अँड स्टील वर्क्स सारख्या मोठ्या कारखान्याची स्थापना केली, तसेच म्हैसूर राज्याच्या नियंत्रणाखाली रेल्वे व्यवस्थापन आणले. बँक ऑफ म्हैसूर सुरू केली आणि पर्यटन क्षेत्रात उत्तम दर्जाची हॉटेल्स उभारली.
त्यांनी कृष्णराजसागर धरणाचे बांधकाम पूर्ण केलं, ज्यामुळे म्हैसूर राज्याला पुरेशी वीज आणि पाणी उपलब्ध झालं. याशिवाय, त्यांनी वृंदावन उद्यानाची निर्मिती करून राज्याला एक आकर्षक पर्यटनस्थळ दिलं. शिक्षणाची महती ओळखून, त्यांनी अनेक शाळा आणि महाविद्यालयांची स्थापना केली. मुलींसाठी स्वतंत्र महाविद्यालये आणि वसतिगृहे उभारली. शेती, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रात महत्त्वपूर्ण शिक्षण संस्था सुरू केल्या आणि म्हैसूरसाठी स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना केली. त्यांच्या दूरदृष्टीने म्हैसूर संस्थानाची सर्वांगीण प्रगती घडून आली. विश्वेश्वरय्या यांनी आपल्या कष्ट, बुद्धिमत्ता आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे यशाचा कळस गाठला.
पंडित जवाहरलाल नेहरू डॉ. विश्वेश्वरय्यांबद्दल म्हणाले होते, “He is an engineer of integrity, character, and broad national outlook.” 1 सप्टेंबर 1961 रोजी त्यांच्या जन्मशताब्दी उत्सवाच्या वेळी, पंडित नेहरूंनी आपल्या अतिशय व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून दिल्लीहून बंगलोरला जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. विशेष म्हणजे, त्यांना आलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्रांवर त्यांच्या स्वतःची पोस्टाची तिकिटे चिकटवण्यात आली होती.
मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे भारताचे एक महान अभियंता, द्रष्टे आणि विकासाचे प्रणेते होते. त्यांच्या अतुलनीय कार्यामुळे आणि भारताच्या औद्योगिक क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानामुळे त्यांना भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले. वयाच्या १०१ व्या वर्षी १४ एप्रिल १९६२ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला, परंतु त्यांचं कार्य आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देतं. भारत सरकारने त्यांच्या जयंतीदिनी, म्हणजे १५ सप्टेंबरला अभियंता दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला, ज्याद्वारे प्रत्येक अभियंत्याला त्यांच्या कार्याची ओळख पटते. विश्वेश्वरय्या हे शतायुषी होऊन निरामय जीवन जगले. इंग्रज सरकारने त्यांना सर,कैसर-ए-हिंद, के.सी.आय.ई. इत्यादी बहुमानांनी सन्मानित केलं.
नवी अर्थक्रांती, भारत मातेच्या या सुपुत्रास विनम्र अभिवादन करते. त्यांच्या जिद्दीने आणि दूरदृष्टीने आपल्याला देशाच्या प्रगतीचा मार्ग दाखवला आहे. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपली मेहनत आणि समर्पण अधिक वृद्धिंगत होवो!
अलिकडच्या काळात शेती क्षेत्रात सातत्यानं बदल होत आहेत. अनेक तरुण करिअर म्हणून देखील शेतीकडे पाहू लागले आहेत. बरेचसे शिक्षित तरुण आधुनिक शेतीची माहिती घेऊन शेतीकडे वळत आहेत व पारंपरिक शेतीपेक्षा कित्येक पटींनी अधिक उत्पन्न घेत आहेत. राजस्थानच्या जयपूरमध्ये राहणाऱ्या ऋतुराज शर्मा या 33 वर्षाच्या तरुणाने देखील शेतीत नवनवीन प्रयोग केले आहेत. शेतीच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधत या तरुणाने करोडो रुपयांची Zettafarms नावाची कंपनी स्थापन केली आहे.
गुडगावमध्ये ही कंपनी असून कॉर्पोरेट शेतीमध्ये कार्यरत आहे. कंपनी भाडेतत्त्वावर जमीन घेते आणि त्यात धान्य, फळं आणि भाजीपाला पिकवते. या कंपनीचे संस्थापक ऋतुराज शर्मा यांनी B.Tech आणि MBA केल्यानंतर नोकरीऐवजी स्वत:चं Startup सुरू केलं. कंपनीचा उद्देश शेती अधिक फायदेशीर बनवणे आणि शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे आहे. शेतकऱ्यांच्या तांत्रिक आणि आर्थिक समस्या कमी करून आधुनिक शेती पद्धतीचा वापर करून शेतीचे उत्पादन अधिक वाढवणे हा कंपनीचा मुख्य उद्देश आहे
Zettafarms चे काम कसे चालते?
Zetta Farms शेतीला एका व्यावसायिक कंपनी प्रमाणे चालवते. एका कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे फायनान्स, ऑपरेशन्स, IT अशी सर्व खाती या कंपनीत देखील आहेत. मोठ्या प्रमाणावर शेतजमीन भाडेतत्वावर घेऊन सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्यावर शेती केली जाते. कुठले पीक किती प्रमाणात घ्यावे. कुठल्या पिकाला अधिक भाव मिळेल या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच पिके घेतली जातात. शेती करण्यासाठी कंपनीने शेतकऱ्यांनाच नोकरीवर ठेवले आहे, ज्याच्या बदल्यात त्यांना प्रत्येक महिन्याला ठराविक पगार मिळतो. कंपनी कायदेशीर असल्यामुळे शेतकऱ्यांचा PF देखील जमा होतो. याशिवाय कंपनी शेतकऱ्यांना मोफत इन्शुरन्स देखील देते. आज रोजी कंपनीमध्ये जवळपास २९०० कर्मचारी काम करतात.
Zettafarms ही कंपनी करारावर किंवा भाडेतत्त्वावर शेती करते. ज्यामध्ये ते किमान 50 एकर जमीन एका व्यक्तीकडून आणि 100 एकर जमीन एका गटाकडून भाडेतत्त्वावर घेतात. त्यानंतर त्या जमिनीवर ते शेती करतात. झेटाफार्म्स सध्या 15 राज्यांमध्ये 20 हजार एकर जमिनीवर शेती करत असून ६० पेक्षा जास्त पिकांचे उत्पादन घेते. पिकांमध्ये ते गहू, हरभरा, धान, कडधान्ये, भाजीपाला, फळे, चहा आणि कॉफीच्या मळ्यासह सर्व प्रकारची शेती केली जाते.
ऋतुराजने शेती हा यशस्वी व्यवसाय कसा बनवला?
ऋतुराज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतीमध्ये व्यवसाय, अर्थशास्त्र, गणित आणि विज्ञान यांचा समावेश केला, तर तो कोणत्याही परिस्थितीत फायदेशीर व्यवसाय आहे. या विचाराने ऋतुराजने शेतीमध्ये पाऊल टाकले. सुरुवातीला ऋतुराजने फक्त 2 एकर शेती करायला सुरूवात केली. हळूहळू भाडेतत्त्वावर आणि करारावर जमीन घेऊन व्यवसाय वाढवायला सुरुवात केली. ऋतुराजच्या कंपनीला पहिल्या वर्षी फक्त 1 लाख रुपयांचा नफा झाला, पण नंतर त्यांनी झपाट्याने काम वाढवले.
Zettafarms चे यशाचे रहस्य काय?
एका ठिकाणी केवळ एकाच पिकाची शेती हानीकारक असू शकते. या विचारसरणीवर काम करत Zettafarms हे पीक विविधतेवर काम करते. ते वेगवेगळ्या भागात विविध प्रकारची शेती करतात. शेतीसाठी ते नवीन तंत्रज्ञान वापरतात ज्यामध्ये ते माती परीक्षणापासून इतर गोष्टींपर्यंत आवश्यक माहिती गोळा करतात. तंत्रज्ञानामध्ये, ते हवामान apps आणि क्रॉप मॉनिटरिंगसह विविध प्रकारच्या माहितीचे विश्लेषण वापरतात. झेटाफार्म्स गरजेनुसार सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करतात, कुठे ठिबक सिंचनाची गरज भासल्यास तिथेही तेच काम केले जाते. याशिवाय कुठे पाणी कमी असल्यास कमी पाण्यात पिके घेण्याच्या नियोजनावर काम केलं जातं
ते संसाधनांचा योग्य वापर करतात. ज्यामुळं उत्पादन वाढते आणि नफाही वाढतो. पीक विविधीकरणाव्यतिरिक्त ते Risk Management वर देखील काम करतात.
औषधे, खते किंवा किटकनाशके वापरताना ते कीटक व्यवस्थापनाच्या पद्धती देखील अवलंबतात. ज्यामुळं खर्च कमी होतो आणि शेतीमध्ये कमी रसायने वापरली जातात.
भविष्यातील वाटचाल :
ऋतुराज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतीला ते एक यशस्वी व्यवसाय म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या व्यवसाय मॉडेलद्वारे ते लोकांना सांगू इच्छित आहेत की, शेतीतूनही करोडोंची कमाई केली जाऊ शकते. आयटी, फायनान्स आणि इतर क्षेत्रात काम करणे ज्याप्रमाणे लोक अभिमानाची गोष्ट मानतात, त्याचप्रमाणे लोकांना शेती आणि शेतकऱ्यांबद्दल आदराची भावना निर्माण झाली पाहिजे. 2030 पर्यंत 50 हजार एकरांवर शेती करण्याचे ऋतुराज शर्मा यांचे ध्येय आहे. शेतकरी, जमीनीचे मालक, स्टार्टअप्स, शेती पूरक व्यवसाय आणि शेती उपकरणे पुरवठादार यांना जोडणारे कृषी अर्थव्यवस्थेचे केंद्र बनून झेट्टा फार्म्स कृषी क्षेत्रात स्वतःच्या कार्याने बहुमूल्य योगदान देत आहेत.