Tag: उद्योजकता

  • Get Your First 10 Customers: पहिले 10 ग्राहक मिळवण्याचा फॉर्म्युला

    Get Your First 10 Customers: पहिले 10 ग्राहक मिळवण्याचा फॉर्म्युला

    Get Your First 10 Customers: नवा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपल्या डोळ्यासमोर पहिली गोष्ट येते ती म्हणजे ‘जाहिरात’. कारण कोणताही नवीन व्यवसाय सुरू करताना सर्वात मोठे आव्हान असते ते म्हणजे ग्राहकांना आपल्या व्यवसायाकडे आकर्षित करणे. बहुतांश उद्योजकांना असे वाटते की जाहिरातींवर मोठा खर्च केल्याशिवाय ग्राहक मिळणार नाहीत. मात्र व्यवसाय सुरु करण्याच्या पहिल्याच पायरीत अनेकजण फेल होतात. समजा तुम्ही खूप मेहनतीने एक जबरदस्त प्रॉडक्ट तयार केलंय. तुम्ही ऑफिस भाड्याने घेतलंय, स्टॉक भरलाय आणि आता तुम्ही ग्राहकांची वाट बघताय. तुमच्या दुकानावर ग्राहकांची गर्दी होत नसल्याने तुम्ही घाईघाईत फेसबुकवर १००० रुपयांची जाहिरात लावता, पण तरीही दिवसभरात एकही ऑर्डर येत नाही. शेवटी पदरी पडते ती फक्त निराशा. तुमच्याही पदरी अशी निराशा येऊ नये असं वाटत असेल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे नक्की वाचा!

    सर्कल ऑफ ट्रस्ट (स्वतःच्या नेटवर्कचा वापर करणे)

    कोणत्याही नवीन व्यवसायाचा पाया हा जाहिरातींवर नाही, तर लोकांच्या विश्वासावर आधारलेला असतो. व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात, जेव्हा आपल्याकडे जाहिरातींसाठी मोठे बजेट नसते, तेव्हा पहिले १० ग्राहक मिळवणे हे सर्वात मोठे चॅलेंज असते. जाहिरातींशिवाय ग्राहक मिळवण्याची पहिली पायरी म्हणजे तुमच्या स्वतःच्या संपर्कांचा वापर करणे. उदा. तुमचे मित्र, नातेवाईक, माजी सहकारी किंवा शेजारी हे तुमचे पहिले संभाव्य ग्राहक किंवा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असू शकतात. त्यांना तुमच्या उत्पादनाबद्दल किंवा सेवेबद्दल थेट सांगा. इथे महत्त्वाची गोष्ट अशी की, तुम्ही त्यांना तुमचे प्रॉडक्ट विकण्याचा प्रयत्न करू नका तर त्यांना तुमच्या व्यवसायाच्या कल्पनेबद्दल सांगून त्यांचा सल्ला किंवा फीडबॅक घ्या. कारण जेव्हा लोक सल्ला देतात, तेव्हा ते मानसिकदृष्ट्या तुमच्या व्यवसायाशी जोडले जातात आणि अनेकदा ते स्वतःहून ग्राहक बनतात किंवा इतरांना तुमच्या प्रॉडक्टची शिफारस करतात.

    समस्या सोडवणारे व्यवसायिक बना 

    Get Your First 10 Customers: दुसरा अत्यंत प्रभावी मार्ग म्हणजे ग्राहकांच्या समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करणे. सुरुवातीला तुमचे पहिले १० ग्राहक शोधतांना अशा लोकांकडे जा ज्यांना तुमच्या उत्पादनाची खरोखर गरज आहे. सोशल मीडियावरील विविध ग्रुप्स, व्हॉट्सअ‍ॅप कम्युनिटीज किंवा इंटरनेटवरील फोरम्सवर लोक त्यांच्या समस्या मांडत असतात. तिथे जाऊन तज्ज्ञ म्हणून उत्तरे द्या आणि हळूच तुमच्या उत्पादनाचा उल्लेख करा. उदाहरणार्थ, जर तुम्ही घरगुती मसाले विकत असाल, तर स्वयंपाकाच्या ग्रुपमध्ये मसाल्यांच्या गुणवत्तेबद्दल माहिती द्या. जेव्हा तुम्ही लोकांना मोफत व्हॅल्यू देता, तेव्हा त्यांच्या मनात तुमच्याबद्दल विश्वास निर्माण होतो. हा विश्वासच तुम्हाला तुमचे पहिले काही ग्राहक मिळवून देतो. पहिले १० ग्राहक मिळवण्यासाठी ‘कोल्ड आउटरीच’ करण्यापेक्षा ‘पर्सनलाइज्ड मेसेजिंग’ वर भर द्या. प्रत्येकाला एकच फॉरवर्ड मेसेज पाठवण्यापेक्षा, समोरच्या व्यक्तीची गरज ओळखून त्यांना वैयक्तिक मेसेज पाठवा. या स्ट्रॅटेजीमुळे ग्राहकांना आकर्षित करणे सोपे जाते. 

    सोशल मीडियाचा वापर करा 

    व्यवसायाचा सर्वात महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे मार्केटिंग. सोशल मीडिया म्हणजे फक्त पोस्ट टाकणे नाही, तर ग्राहकांशी संवाद साधण्याचा आणि ग्राहकांना तुमच्या प्रॉडक्टची माहिती देण्याचा योग्य प्लॅटफॉर्म आहे. तुमच्याकडे जाहिरातींसाठी बजेट नसले तरी तुमच्याकडे सोशल मीडियाची ताकद आहे. तुमच्या व्यवसायाचा प्रवास म्हणजेच Behind the scenes लोकांसोबत शेअर करा. तुम्ही उत्पादन कसे बनवता, तुमची विचारप्रक्रिया काय आहे, हे व्हिडिओ किंवा पोस्टच्या माध्यमातून मांडल्यास लोकांची उत्सुकता वाढते. यालाच व्यावसायिक भाषेत ‘बिल्ड इन पब्लिक’ असे म्हणतात. जेव्हा लोक तुम्हाला मेहनत करताना पाहतात, तेव्हा त्यांना तुमच्याकडून वस्तू खरेदी करण्याची इच्छा होते. सुरुवातीच्या काळात नफ्यापेक्षा ग्राहकांशी असलेल्या नातेसंबंधांना जास्त महत्त्व द्या. सुरुवातीच्या ग्राहकांना काही विशेष सवलत किंवा फ्री सॅम्पल द्या. जर त्या १० लोकांनी तुमच्या उत्पादनाचा आनंद घेतला, तर ते त्यांच्या ओळखीच्या १०० लोकांना त्याबद्दल सांगतील. यालाच ‘वर्ड ऑफ माउथ’ मार्केटिंग म्हणतात, जे जगातल्या कोणत्याही महागड्या जाहिरातीपेक्षा जास्त पॉवरफुल असते.

    Get Your First 10 Customers: समजा, तुम्ही घरगुती साजूक तूप विकण्याचा व्यवसाय सुरू केलाय. त्यासाठी तुम्ही पेपरमध्ये जाहिरात दिली तर लोक तुमच्या प्रॉडक्टचा विचार करतील किंवा दुर्लक्ष करतील. पण त्याऐवजी, जर तुम्ही तुमच्या बिल्डिंगमधील अशा काकूंना तुपाचा नमुना दिला, ज्यांच्या हातचं जेवण संपूर्ण बिल्डिंगमध्ये प्रसिद्ध आहे आणि त्यांनी जर चपातीला तुमचं तूप लावून इतर चार जणींना सांगितलं की, हे तूप अगदी माझ्या माहेरच्या तुपासारखं दाणेदार आहे, तर पुढच्या अर्ध्या तासात तुमच्याकडे ५ ऑर्डर्स नक्की येतील. यालाच म्हणतात विना जाहिरात मार्केटिंग!

    पहिले १० ग्राहक मिळवण्यासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरून थेट लोकांशी बोलून काम करावे लागेल. स्थानिक कार्यक्रमात सहभागी व्हा, प्रदर्शनांना भेटी द्या किंवा तुमच्या क्षेत्रातील इतर व्यावसायिकांशी भागीदारी करा. समजा तुम्ही केक बनवण्याचा व्यवसाय सुरू केला असेल, तर जवळच्या चहाच्या दुकानात किंवा कॅफेमध्ये जाऊन तुमचे सॅम्पल्स द्या. भागीदारी (Strategic Partnerships) हा जाहिरातींशिवाय वाढण्याचा एक उत्तम मार्ग आहे. लक्षात ठेवा, पहिले १० ग्राहक मिळवणे ही फक्त विक्री नसून ती तुमच्या उत्पादनाची चाचणी असते. या ग्राहकांकडून मिळणारा फीडबॅक तुमच्या व्यवसायाला भविष्यात हजारो ग्राहकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी मदत करतो. संयम, सातत्य आणि प्रामाणिक संवाद या जोरावर तुम्ही एकही रुपया जाहिरातीवर खर्च न करता यशस्वीरित्या पहिले १० ग्राहक मिळवू शकता.

    आणखी वाचा

  • Business Loan Guide Marathi – बिझनेस लोन कसे घ्यावे?

    Business Loan Guide Marathi – बिझनेस लोन कसे घ्यावे?

    Business Loan: व्यवसाय म्हटलं की भांडवल हे आलंच. कोणताही छोटा-मोठा व्यवसाय असेल, तरी तो सुरू करण्यासाठी किंवा सुरू केल्यावर, त्याचा विस्तार करण्यासाठी भांडवलाची गरज ही असतेच.

    अनेकदा व्यावसायिकांना मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते ; पण तितक्या भांडवलाची उपलब्धता त्यांच्याजवळ त्यावेळी नसते….

    पण मित्रांनो, तुमचा व्यवसाय आता भांडवल या समस्येवर अडखळून राहणार नाही. कारण आजच्या लेखात आपण एक अशी संकल्पना जाणून घेणार आहोत, जी तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी भांडवल उभं करण्यासाठी नक्की मदत करू शकेल. 

    ही संकल्पना म्हणजे  बिजनेस लोन अर्थात् व्यवसायिक कर्ज. बिजनेस लोनबद्दल अनेकांना माहीत असतं ; पण ते कसं घ्यायचं, त्याची प्रक्रिया काय असते या बद्दल त्यांना कल्पना नसते. 

    चला तर मग जाणून घेऊया बिजनेस लोन विषयी….

    बिजनेस लोन म्हणजे काय ? (What is a business loan?)

    Business Loan: बिजनेस लोन म्हणजे वित्तीय संस्थांकडून व्यवसायाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी घेतलेले कर्ज. हे कर्ज व्यवसायाच्या विविध गरजांसाठी वापरले जाते. ज्याचा उद्देश व्यवसायाची वाढ, विस्तार किंवा दैनंदिन खर्चासाठी भांडवल उपलब्ध करून देणे हा असतो.

    हे कर्ज बँक, नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या (NBFCs), मायक्रोफायनान्स संस्था किंवा सरकारी योजनांच्या माध्यमातून व्यवसायिकांना दिले जाते.

    बिजनेस लोन हे विविध कालावधींसाठी आणि विविध व्याजदरांवर उपलब्ध असते. कर्जाची रक्कम ही व्यवसायाची आर्थिक स्थिती आणि कर्ज परतफेडीच्या क्षमतेवर अवलंबून असते.

    बिजनेस लोनची  गरज का असते ?( Why is a business loan needed?)

    व्यवसायाच्या वाढीसाठी :

     कोणत्याही व्यवसायाला वाढीसाठी किंवा विस्तारासाठी भांडवलाची गरज असते. उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी, नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यासाठी किंवा व्यवसायाच्या नवीन शाखा उघडण्यासाठी लोन घेण्याची आवश्यकता भासते. 

    कार्यशील भांडवलासाठी : 

    अनेकदा व्यवसायिकांना ग्राहकांच्या मागणीला प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक असलेला माल किंवा कच्चा माल खरेदी करण्यासाठी मोठ्या भांडवलाची आवश्यकता भासते. काही व्यवसायांना दैनंदिन खर्च भागवण्यासाठी तात्पुरत्या आर्थिक मदतीची गरज भासते. 

    उदा. मालाचा साठा खरेदी करणे, कर्मचार्‍यांना पगार देणे किंवा अन्य नियमित खर्च. अशा वेळी लोन घेणे उपयुक्त ठरते. 

    तंत्रज्ञानातील गुंतवणूक :

    Business Loan: व्यवसायाचे तंत्रज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी नवनवीन उपकरणं, सॉफ्टवेअर, किंवा इतर साधनं घेण्यासाठी आर्थिक मदतीची व्यवसायिकांना गरज भासते. अनेकदा नवीन तंत्रज्ञानांची मशिनरिज ची किंमत तुलनेने जास्त असते, तेवढे भांडवल व्यवसायिकाकडे उपलब्ध नसते ; पण त्याची गरज असल्याने कर्ज घ्यावे लागते.

    बिझनेस लोनचे प्रकार : (Types of Business Loans)

    1. टर्म लोन : 

     या कर्जाचा कालावधी निश्चित असतो आणि व्याजदरही पूर्वनिर्धारित असतो. ही कर्जे विशिष्ट उद्दिष्टासाठी घेतली जातात. 

    उदा. मशीनरी खरेदी, इमारत बांधकाम, किंवा इतर मोठ्या गुंतवणुकीसाठी.

    2. ओव्हरड्राफ्ट :  

    हे एक प्रकारचे बँक कर्ज आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या खात्यातील ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्याची परवानगी दिली जाते. हा कर्ज प्रकार अल्पकालीन गरजांसाठी उपयुक्त ठरतो.

    3. वर्किंग कॅपिटल लोन :

     व्यवसायाच्या दैनंदिन गरजांसाठी म्हणजे  कच्चा माल खरेदी करणे, वेतन देणे, वाहतूक खर्च, वीज बिल, भाडे  इत्यादींसाठी हे कर्ज घेतले जाते. ज्या व्यवसायात विक्री हंगामानुसार होते, तेथे विक्रीच्या काळात जास्त मागणी पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त भांडवलाची आवश्यकता असते, अशा वेळीदेखील वर्किंग कॅपिटल लोनची आवश्यकता भासते.

    4. बिल डिस्काऊंटिंग : 

    ग्राहकांकडून येणारी थकबाकी लवकर मिळवण्यासाठी बिल डिस्काऊंटिंगचा उपयोग केला जातो. यामध्ये बँका किंवा वित्तीय संस्था तुमच्या थकबाकीवर तुम्हाला काही प्रमाणात पैसे उधार देतात.

    5. मुदत कर्ज ( Term Loan ) : 

    व्यवसायासाठी मोठ्या गुंतवणुकीसाठी हे कर्ज घेतले जाते. हे दीर्घकालीन कर्ज आहे. यामध्ये कर्जाचा कालावधी आणि व्याजदर ठरलेला असतो. मुदत कर्जाचा कालावधी सहसा 1-10 वर्षांपर्यंत असू शकतो. 

    6. एमएसएमई कर्ज : 

    सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी विशेष कर्ज योजना उपलब्ध असतात. या कर्जाचे व्याजदर तुलनेने कमी असतात आणि ते नवीन उद्योगांना चालना देण्यास मदत करतात.

     बिझनेस लोन घेण्यासाठी आवश्यक अटी (Requirements for obtaining a business loan)

    • 1. व्यवसायाचे नोंदणी प्रमाणपत्र : तुमच्या व्यवसायाची नोंदणी आवश्यक आहे.
    • 2. व्यवसायाचा आर्थिक अहवाल : कर्ज देणारी संस्था व्यवसायाची आर्थिक स्थिती तपासते, ज्यामध्ये वार्षिक उलाढाल, नफा-तोटा अहवाल, बँक स्टेटमेंट यांचा समावेश असतो.
    • 3. व्यक्तिगत आणि व्यवसायाचा क्रेडिट स्कोअर : तुमचा आणि तुमच्या व्यवसायाचा क्रेडिट स्कोअर चांगला असावा लागतो. क्रेडिट स्कोअरवर अवलंबून तुमच्या कर्जाची मंजूरी ठरते.
    • 4. कर्जाची गरज आणि वापर : कर्जाचा उद्देश स्पष्ट असावा लागतो. तुम्ही कर्ज कोणत्या कारणासाठी घेत आहात याची सविस्तर माहिती देणे आवश्यक असते.
    • 5. जामीनदार : काही कर्ज प्रकारांसाठी जामीनदाराची आवश्यकता असते.

     बिझनेस लोनसाठी अर्ज प्रक्रिया (Application process for a business loan)

    • 1. अर्ज भरणे : तुम्ही निवडलेल्या बँकेच्या किंवा वित्तीय संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष अर्ज करू शकता.
    • 2. आवश्यक कागदपत्रे : अर्ज करताना व्यवसाय नोंदणी, आर्थिक दस्तऐवज, बँक स्टेटमेंट, वैयक्तिक ओळखपत्र, पॅन कार्ड इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक असते.
    • 3. क्रेडिट स्कोअर तपासणी : बँक किंवा वित्तीय संस्था तुमचा क्रेडिट स्कोअर तपासते. यावरून कर्जाची मंजुरी ठरते.
    • 4. मंजुरी आणि वितरण : कागदपत्रांची आणि क्रेडिट तपासणी पूर्ण झाल्यानंतर कर्ज मंजूर होते आणि आवश्यक रक्‍कम तुमच्या खात्यात जमा केली जाते.

     व्याजदर आणि परतफेडीचे पर्याय :

    Business Loan: बँक किंवा वित्तीय संस्था बिझनेस लोनसाठी 8% ते 20% दरम्यान व्याजदर लागू करतात. परतफेडीसाठी साधारणत: 12 महिन्यांपासून 60 महिन्यांपर्यंतचा कालावधी मिळतो. वेळोवेळी EMI (Equated Monthly Installment) च्या माध्यमातून तुम्ही तुमचे कर्ज परत करू शकता.

    आणखी वाचा:

  • Mira Kulkarni: मीरा कुलकर्णी यांचा थक्क करणारा प्रवास!

    Mira Kulkarni: मीरा कुलकर्णी यांचा थक्क करणारा प्रवास!

    Mira Kulkarni: वयाच्या ४५ व्या वर्षी लोक आपल्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग करतात. पण एका महिलेने वयाच्या ४५ व्या वर्षी, एका छोट्याशा गॅरेजमध्ये फक्त २ लाख रुपयांची गुंतवणूक करून असा ब्रँड उभा केला… ज्याचं व्हॅल्युएशन आज १,२९० कोटी रुपये आहे!

    ही कथा कुठल्या कॉर्पोरेट घराण्यातील नाही, तर भारतातील सर्वात प्रसिद्ध लक्झरी आयुर्वेदिक ब्रँड ‘फॉरेस्ट एसेंशियल्स’ (Forest Essentials) च्या संस्थापिका मीरा कुलकर्णी यांची आहे.

    १. संघर्षाची काळी बाजू (The Dark Reality)

    ही कहाणी सुरू होते एका अत्यंत कठीण वळणावरून. वयाच्या २० व्या वर्षी मीरा यांचं लग्न झालं आणि शिक्षण अर्धवट सुटलं. लग्नानंतर पतीला दारूचं व्यसन लागल्याने घरची परिस्थिती बिघडत गेली. शेवटी मुलांच्या भविष्यासाठी त्यांनी पतीपासून विभक्त होण्याचा कठोर निर्णय घेतला.

    पण नियतीची परीक्षा इथेच संपली नव्हती. वयाच्या २८ व्या वर्षी आई-वडिलांचं एकापाठोपाठ एक निधन झालं. दोन लहान मुलं आणि आधार द्यायला पाठीशी कुणीही नाही. ही ती वेळ होती, जिथे कोणीही खचून गेलं असतं.

    २. एक ‘आयडिया’ आणि गॅरेजमधून सुरुवात

    ४५ व्या वर्षी अमेरिकेत शिकणाऱ्या मुलाला भेटण्यासाठी गेल्या असताना, तिथे त्यांनी हाताने नैसर्गिक साबण आणि मेणबत्त्या बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं. भारतात परतल्यावर त्यांनी ठरवलं, आपणही काहीतरी करूया.

    २००० साली, फक्त २ कर्मचारी आणि २ लाख रुपये घेऊन त्यांनी एका गॅरेजमधून ‘फॉरेस्ट एसेंशियल्स’ची सुरुवात केली. पण आता खरा प्रश्न हा आहे की… साबण तर अनेक जण बनवतात, मग मीरा कुलकर्णी १,२९० कोटींपर्यंत कशा पोहोचल्या?

    ३. ‘लक्झरी मार्केटिंगचा’ मास्टरस्ट्रोक! (The Real Business Strategy)

    इथेच मीरा यांनी खरी बिझनेस बुद्धी वापरली. भारतात तोपर्यंत ‘आयुर्वेद’ म्हणजे फक्त स्वस्त आणि आजारांवरची औषधं मानली जायची. मीरा यांनी आयुर्वेदाला ‘लक्झरी’ बनवलं. त्यांनी स्वस्त साबण विकण्यापेक्षा, अस्सल नैसर्गिक घटकांपासून बनवलेली ‘प्रीमियम प्रॉडक्ट्स’ तयार केली.

    B2B मास्टरस्ट्रोक:

    आपली प्रॉडक्ट्स सामान्य दुकानात विकण्याऐवजी, त्यांनी ताज (Taj) आणि हयात (Hyatt) सारख्या फाईव्ह-स्टार हॉटेल्सना ती सप्लाय करायला सुरुवात केली. जेव्हा श्रीमंत आणि परदेशी पाहुण्यांनी त्यांच्या हॉटेल्समध्ये ही उत्पादने वापरली, तेव्हा ‘फॉरेस्ट एसेंशियल्स’ रातोरात एक जागतिक दर्जाचा ‘प्रीमियम ब्रँड’ बनला!

    Mira Kulkarni: या दमदार स्ट्रॅटेजीमुळे २००८ मध्ये जागतिक कॉस्मेटिक जायंट ‘एस्टी लॉडर’ (Estée Lauder) ने त्यांच्या कंपनीसोबत करार केला. आज देशभरातील २८ शहरांमध्ये त्यांची ११० हून अधिक यशस्वी स्टोअर्स आहेत. फॉर्च्युन मॅगझिनने त्यांना ‘भारतातील सर्वात शक्तिशाली व्यावसायिक महिलांच्या’ यादीत स्थान दिले आहे.

    ४. ग्लोबल उड्डाण (The Big League)

    थोडक्यात सांगायचं तर…

    Mira Kulkarni: वयाच्या २८ व्या वर्षी पोरक्या झालेल्या आणि ४५ व्या वर्षापर्यंत स्वतःची कोणतीही व्यावसायिक ओळख नसलेल्या मीरा कुलकर्णी, जर आज १,२९० कोटींचं साम्राज्य उभं करू शकतात… तर “वेळ निघून गेलीये” किंवा “माझ्याकडे पुरेसं भांडवल नाही”, ही फक्त आपली कारणं आहेत.

    मित्रांनो, तुम्हाला ही ‘खऱ्या संघर्षाची आणि बिझनेसची’ स्टोरी कशी वाटली? “सक्सेससाठी वयाची कोणतीही अट नसते”, यावर तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा!

  • Bike Blazers Success Story: घराच्या गच्चीवरून सुरू झालेला व्यवसाय आज करोडोंमध्ये!

    Bike Blazers Success Story: घराच्या गच्चीवरून सुरू झालेला व्यवसाय आज करोडोंमध्ये!

    Bike Blazers: अडथळ्यांवर मात करून यशाच्या शिखरावर: केशव राय यांचा प्रेरणादायी प्रवास

    जीवनातील यशाचा मार्ग कधीही सोपा नसतो. तो मेहनत, ध्येय, आणि अपयशाला येणाऱ्या अडथळ्यांना पार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो. यशाच्या दिशेने वाटचाल करताना अनेक अडचणी येतात, पण त्या परिस्थितीचा सामना करून मार्ग काढणारा व्यक्तीच खरा यशस्वी ठरतो. याच मार्गावरून जाणाऱ्या व्यक्तींच्या कथा प्रेरणादायक असतात. माणसामध्ये जबरदस्त इच्छाशक्ती आणि मनात ठरवलेली गोष्ट पूर्ण करण्याचा ध्यास, तसेच त्यासाठी करावी लागणारी मेहनत करण्याची तयारी असेल तर ती व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होते.

    तसेच, यशप्राप्तीसाठी अनेक अपयशांचे डोंगर पार करावे लागतात. परिस्थितीशी दोन हात करत, परिस्थितीतून मार्ग काढत वाटचाल करावी लागते, तेव्हाच कुठे माणूस यशस्वी होतो. अशाच परिस्थितीतून मार्ग काढत यशाचं शिखर सर करणाऱ्या व्यक्तीचं उत्तम उदाहरण म्हणजे “बाईक ब्लेझर्स” चे सर्वेसर्वा केशव राय.

    कोण आहेत केशव राय?

    भारतामध्ये बहुतेक घरांमध्ये तुम्हाला बाईक मिळेल. आजच्या काळात हे परिवहनाचे सर्वात स्वस्त साधन आहे, असं म्हटलं तर गैर ठरणार नाही. जर तुमच्याकडे बाईक आहे, तर तिची योग्य काळजी घेणे तुमचे कर्तव्य आहे. बाईकचा विचार केला तर त्यासोबत बाईक कव्हरची देखील चर्चा होते. उन्हापासून आणि पावसापासून बचाव करण्यासाठी बाईक झाकून ठेवण्याची प्रथा आहे. आज आम्ही तुम्हाला एका अशा बाईक कव्हर स्टार्टअप ‘बाईक ब्लेझर’ विषयी सांगणार आहोत, ज्यांनी एक अनोखं बाईक कव्हर डिझाइन केलं आहे. केशव राय हे याच ‘बाईक ब्लेझर’ कंपनीचे संस्थापक आहेत.

    प्रारंभिक जीवन 

    मुळचे दिल्ली गाझियाबादचे असलेले केशव शाळेत अगदी सरासरी विद्यार्थी होते. त्यांचं अभ्यासात अजिबात मन लागत नव्हतं म्हणून कुठलातरी व्यवसाय करावा, हे सतत त्यांच्या डोक्यात असायचं. कॉलेजमध्ये असताना केशव त्यांच्या मित्रांबरोबर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायचे. विविध आणि नवनवीन कल्पना त्यांच्या डोक्यात घर करून असायच्या. तसेच वेगवेगळ्या वस्तू आणि उपकरणे दुरुस्त करण्याच्या त्यांच्या उत्सुकता आणि आवडीमुळे ते अभियांत्रिकी क्षेत्रात आले, आणि अशातच २०१५ साली त्यांनी एका ॲप्लिकेशनची निर्मिती करून त्यावर आधारित व्यवसाय करण्यास सुरुवात केली.

    Bike Blazers: व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांनी त्यांच्या वडिलांकडे निधी म्हणजेच फंडची मागणी केली. वडिलांनी निधी दिला सुद्धा, मात्र म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते. जे काही घडायचं असतं ते त्या वेळेवर बरोबर घडतं. केशवचा पहिला प्रयत्न सपशेल अपयशी ठरला. पण नवनवीन गोष्टी शिकण्याच्या त्यांच्या इच्छाशक्तीने त्यांना नंतर व्यवसायात प्रचंड यश मिळवून दिलं.

    घर सोडले 

    पहिल्या ॲप आधारित व्यवसायामध्ये अपयश आल्यानंतर आता घरी न बसता काहीतरी करावं, या उद्देशाने त्यांनी बॅग भरली व घरी चार दिवसांनी परत येतो, असं सांगून घर सोडायचं ठरवलं व घर सोडलं देखील. त्यानंतर ते सतत तीन दिवस दिल्लीच्या रस्त्यांवर फिरत राहिले, मात्र डोक्यात कुठलीही कल्पना नसताना देखील तीन दिवस रस्त्यांवर फिरून चौथ्या दिवशी परत घरी जावं, हा विचार सुरू असताना दिल्ली शहरातील कौशांबी मेट्रो स्टेशनच्या पार्किंगमध्ये केशव राय बसलेले होते.

    Bike Blazers: त्या ठिकाणी असलेल्या पार्किंगमध्ये एक माणूस त्याची बाईक साफ करण्यासाठी धुळीचे फॅब्रिक शोधत होता. परंतु त्याला ते मिळाले नाही व त्या माणसाने शेजारील बाईकचं डस्टर घेतलं व स्वतःची बाईक स्वच्छ करून तो निघून गेला. ही सगळी परिस्थिती केशव यांनी पाहिली, व तेव्हाच त्यांच्या डोक्यात एक बिझनेस आयडिया आली, आणि तीच आयडिया घरी येऊन त्यांनी वडिलांना सांगितली. केशव राय यांची ती व्यावसायिक कल्पना होती बाईकचे कव्हर बनवणं, असं कवर जे सेमीऑटोमॅटिक असेल आणि ते गाडीची धूळ आणि पावसाळ्यातील पाणी काढण्यास मदत करेल. वडिलांना देखील ही कल्पना आवडली व केशव यांना पाठिंबा दर्शवला आणि अशा पद्धतीने झाली बाईक ब्लेझरची सुरुवात.

    व्यवसायाच्या दुसऱ्या पर्वाची  सुरवात 

    २०१६ च्या सुरुवातीला, केशव यांनी त्यांच्या व्यवसायात दुसरा प्रयत्न करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि ‘बाईक ब्लेझर’ या ब्रँडची स्थापना केली. त्यांनी हा प्रवास अगदी साधेपणाने सुरुवातीला घराच्या गच्चीवरून सुरू केला. केशव यांनी बाईक कव्हरचं उत्पादन घरच्या गच्चीवर सुरू केलं, परंतु त्यांच्या कष्टाने आणि ध्येयाने ते थांबले नाहीत.

    सुरुवातीचं छोटं उत्पादन युनिट आज एका मोठ्या उद्योगात रूपांतरित झालं आहे. आज, बाईक ब्लेझर कंपनीकडे नवी दिल्ली आणि गाझियाबाद येथे दोन भव्य उत्पादन युनिट्स आहेत. केशव यांचा हा प्रवास त्यांच्या जिद्दीचा आणि प्रयत्नांचा साक्षीदार आहे, ज्यामुळे त्यांनी आपल्या कंपनीला उंचीवर नेलं.

    बाईक ब्लेझरचं कव्हर औद्योगिक दर्जाच्या नायलॉन फॅब्रिकचं बनवलेलं असतं, जे हवामानास प्रतिरोधक असतं. हे कव्हर पावसाळ्यानंतर साठलेलं पाणी काढून टाकण्याची व्यवस्था करतं आणि वाहनांना धुळीपासून वाचवतं. बाईक किंवा कारवर ३० सेकंदांपेक्षा कमी वेळात कव्हर घालता येतं.

    त्यांच्या या प्रवासातून हे स्पष्ट होतं की, छोटी सुरुवात असली तरी ती मोठ्या यशाची वाट दाखवू शकते. केशव यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अपार मेहनत घेतली आणि त्यांच्या या उद्योजकतेच्या प्रवासाने आज त्यांना यशाची उंची गाठायला लावली आहे.

    Bike Blazers: २०२१ पर्यंत बाईक ब्लेझरने १.३ कोटी रुपये उलाढाल केली होती आणि आज हा व्यवसाय कैक पटींनी वाढला आहे. केशव रायने अपयशातून शिकून नव्या कल्पनांच्या मदतीने यशाचा मार्ग तयार केला आहे. त्यांची ही कहाणी हे सिद्ध करते की, मनात ठरवलेलं ध्येय पूर्ण करण्यासाठी कष्ट आणि इच्छाशक्ती आवश्यक आहेत. आज बाईक ब्लेझर एक यशस्वी व्यवसाय म्हणून उभा आहे, ज्याची सुरुवात एका साध्या विचाराने झाली होती.

    मित्रांनो, केशव राय यांचा हा प्रवास निश्चितच लाखो तरुणांना उर्जा देणारा आहे. जेव्हा मनात काहीतरी करण्याची धमक असते आणि ध्येय साध्य करण्यासाठी आपण सर्वतोपरी कष्ट करण्याची तयारी ठेवतो, तेव्हा कोणतीही अडचण आपल्याला रोखू शकत नाही. अशा व्यक्तींच्या वाटेत कितीही अडथळे आले, तरी ते आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहतात आणि अखेर यशस्वी होतात. त्यामुळे, इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम हे यशाच्या मार्गावरचं सर्वात मोठं शस्त्र आहेत, हे आपल्याला वेळोवेळी अनुभवायला मिळतं.

  • Divya Deshmukh : दिव्यानं कसा जिंकला बुद्धिबळाचा वर्ल्ड कप?

    Divya Deshmukh : दिव्यानं कसा जिंकला बुद्धिबळाचा वर्ल्ड कप?

    Divya Deshmukh :असं म्हणतात, की चपळ बुद्धिमत्ता, कष्टाची तयारी आणि सातत्य असलं, तर कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. याचं जिवंत उदाहरण म्हणजे कु. दिव्या देशमुख .फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत विश्वविजेतेपद पटकावणारी भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर.

    वयाच्या सहाव्या वर्षीच तिच्या हातात बुद्धिबळाची पट होती, ज्या वयात इतर मुलं खेळण्यांत गुंग असतात, त्या वयात तिने डाव-प्याद्यांची शाळा सुरू केली. बुद्धिबळासारखा गुंतागुंतीचा खेळ सोबत ठेवत ती सातत्याने पुढे जात राहिली. या वाटचालीत तिला अनेक अडथळे आले, पण ती कधीही थांबली नाही, डगमगली नाही. तिच्या हाच संघर्षमय पण प्रेरणादायी प्रवास आपण आजच्या लेखात जाणून घेऊया. 

    प्रारंभिक आयुष्य 

    दिव्या देशमुख हिचा जन्म ९ डिसेंबर २००५ रोजी नागपूर येथे झाला. तिचे आई-वडील दोघेही वैद्यकीय क्षेत्रात काम करत असल्यामुळे घरात अभ्यासाचे चांगले वातावरण होते. दिव्या लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिच्या मोठ्या बहिणीला बॅडमिंटनची आवड होती, त्यामुळे दिव्यालाही सुरुवातीला त्या खेळात रस वाटू लागला. मात्र तिच्या पालकांना वाटत होते की, दिव्याने बुद्धिबळ खेळावे.

    त्यामुळे त्यांनी तिला लहान वयातच नागपूरमधील एका नामांकित बुद्धिबळ अकॅडमीत प्रवेश करवून दिला.  तिथूनच तिच्या बुद्धिबळ प्रवासाला सुरुवात झाली. लहान वयातच बुद्धिबळातील तिची चमक दिसू लागली आणि हळूहळू ती या खेळात पारंगत होत गेली.

    बुद्धिबळाकडे यशस्वी वाटचाल 

    २०१२ मध्ये पॉंडिचेरी येथे अंडर – ७ पहिले राष्ट्रीय सुवर्णपदक मिळवत दिव्याच्या प्रवासाची सुवर्ण सुरुवात झाली. पुढच्याच वर्षी इराणमध्ये आशियाई अंडर – ८ गटात स्पर्धेत विजेतेपद मिळवून तिने खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावर तिची ओळख निर्माण केली. पुढे ती सर्वात कमी वयाची वुमन फिडे मास्टर ठरली. २०१४ मध्ये डर्बन येथे अंडर – १० वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकताना ती भारतीय बुद्धिबळाच्या आशा – आकांक्षांचे प्रतीक बनली. आजवरच्या कारकिर्दीत तिने भारताचे तब्बल ४० वेळा प्रतिनिधित्व करत २३ सुवर्ण, ७ रौप्य व ५ कांस्य अशी ३५ पदकांची श्रीमंती मिळवली. २०२० मध्ये फिडेच्या ऑनलाईन ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या विजयी संघात सहभागी होऊन देशाची ताकद दाखवली. २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर पदवी प्राप्त करून आपले पाय आणखी मजबुत केले आणि अखेर २०२५ मध्ये वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी भारताची ८८ वी ग्रँडमास्टर म्हणून इतिहास रचला.

    कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावल्ली आणि वैशाली रमेशबाबू यांच्या पावलांवर पाऊल  ठेवत भारताची ग्रँडमास्टर म्हणून तिचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले. तिच्या या ऐतिहासिक विजयाने ती केवळ भारतीय नव्हे तर जागतिक बुद्धिबळातील एक उज्ज्वल भविष्य असल्याचे सिद्ध झाले. 

    ते म्हणतात ना, “मंजिले उन्हीं को मिलती हैं ,जिनके सपनों में जान होती हैं , पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती हैं।”  या उत्कीला दिव्याच्या या यशोगाथेने सिद्ध केले. दिव्याचा विजय केवळ एक स्पर्धा जिंकण्यापुरते मर्यादित नसून आपल्या पिढीला प्रेरणा देणारा आहे.तिचा हा प्रवास आपल्याला शिकवतो की , प्रचंड इच्छाशक्ती , कार्याप्रती समर्पण आणि चिकाटीच्या बळावर प्रत्येक गोष्ट साध्य करता येते. 

    क्षेत्र कोणतंही असो, भारतीय महिला रणांगण गाजवतेच !      

    आणखी वाचा

  • OYO Success Story in Marathi: रितेश अग्रवाल यांच्या यशाचा प्रवास

    OYO Success Story in Marathi: रितेश अग्रवाल यांच्या यशाचा प्रवास

    OYO Success Story in Marathi: दिल्लीच्या कडकडत्या थंडीत, खिशात फक्त तीस रुपये घेऊन रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरणाऱ्या एका अठरा वर्षांच्या मुलाने कधी विचार केला असेल का, की तो एक दिवस जगातील सर्वात तरुण अब्जाधीशांपैकी एक होईल? ही कहाणी आहे ओयो (OYO) चे संस्थापक आणि सीईओ रितेश अग्रवाल (Ritesh Agarwal) यांची. आज २०२६ (2026) मध्ये ओयोचा हा विस्तार केवळ एका स्टार्टअपची यशोगाथा नसून, भारतीय उद्योजकतेच्या जागतिक भरारीचे ते एक जिवंत प्रतीक ठरले आहे.

    सुरुवातीचा संघर्ष: सिम कार्ड ते स्वप्नांचा शोध

    १९९३ (1993) मध्ये ओडिसाच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रितेशचे मन कधीच पुस्तकी ज्ञानात रमले नाही. घरच्यांना वाटत होते की त्यांनी इंजिनिअर व्हावे, पण रितेशला स्वतःचे काहीतरी वेगळे करायचे होते. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांनी शाळा सोडली आणि नशीब आजमावण्यासाठी दिल्ली गाठली. दिल्लीत राहणे सोपे नव्हते; सुरुवातीला त्यांनी पोटापाण्यासाठी सिम कार्ड विकण्याचेही काम केले. पण त्यांचे लक्ष नेहमीच ‘काहीतरी मोठे’ करण्यावर होते. खिशात पैसे नसतानाही त्यांचा निश्चय इतका मजबूत होता की त्यांना परिस्थिती हरवू शकली नाही.

    ओयोची (OYO) मूळ कल्पना: प्रवासातील गैरसोय आणि संधी

    जेव्हा एकदा रितेश डेहराडून आणि मसुरीच्या सहलीवर गेले, तेव्हा त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली – भारतात हॉटेल मिळवणे सोपे आहे, पण ‘स्वस्त आणि खात्रीशीर’ हॉटेल मिळवणे कठीण आहे. कधी खोली अस्वच्छ असते, तर कधी वाय-फाय नसते. या समस्येतूनच त्यांनी ‘ओरवेल स्टेज’ (Oravel Stays) ची स्थापना केली. पुढे २०१३ (2013) मध्ये त्यांनी प्रसिद्ध ‘थिल फेलोशिप’ (Thiel Fellowship) जिंकली, ज्यामध्ये त्यांना सुमारे ७८ (78) लाख रुपयांची स्कॉलरशिप मिळाली. या भांडवलातून त्यांनी ओरवेलचे रूपांतर ‘OYO Rooms’ मध्ये केले.

    २०२६ मधील ओयो: तोट्यातून नफ्याकडे जाणारी ‘मनी मशीन’

    २०२४ (2024) पर्यंत ओयो ही तोट्यात चालणारी कंपनी मानली जात होती, परंतु २०२५-२६ (2025-26) हे वर्ष कंपनीसाठी ‘टर्नअराउंड’ वर्ष ठरले आहे.

    विक्रमी नफा: ताज्या आर्थिक आकडेवारीनुसार, ओयोने आर्थिक वर्ष २०२५ (FY25) मध्ये ६२३ (623) कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. मार्च २०२६ (March 2026) च्या अहवालानुसार हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

    जागतिक विस्तार: आज ओयोचा विस्तार ८० (80) देशांतील आठशेपेक्षा जास्त शहरांमध्ये झाला आहे. कंपनीकडे आता ४३,००० (43,000) हून अधिक मालमत्ता (Properties) आहेत.

    मोटेल ६ (Motel 6) चे अधिग्रहण: रितेश अग्रवाल यांनी नुकतेच अमेरिकेतील प्रसिद्ध ‘Motel 6’ साखळीचे ४,३०० (4,300) कोटी रुपयांना अधिग्रहण करून जागतिक स्तरावर आपली पकड अधिक घट्ट केली आहे.

    रितेश अग्रवाल: शार्क टँक आणि गुंतवणूकदार

    २०२६ (2026) मध्ये रितेश केवळ ओयोचे मालक राहिलेले नाहीत, तर ते एक प्रबळ गुंतवणूकदार म्हणून उदयास आले आहेत. ‘शार्क टँक इंडिया’ (Shark Tank India) च्या माध्यमातून त्यांनी अनेक एआय (AI) आणि पर्यावरणपूरक (Sustainability) स्टार्टअप्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. मार्च २०२६ (March 2026) पर्यंत त्यांची एकूण संपत्ती सुमारे १६,००० (16,000) कोटी रुपये इतकी अंदाजित आहे. वयाच्या अवघ्या २४ (24) व्या वर्षी ते भारतातील अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले होते.

    बहुप्रतीक्षित आयपीओ (IPO) ची प्रतीक्षा

    गुंतवणूकदारांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे ओयोचा आयपीओ. मार्च २०२६ (March 2026) च्या ताज्या अपडेट्सनुसार, ओयोच्या मूळ कंपनीने (Prism) सुमारे ६,६५० (6,650) कोटी रुपये उभारण्यासाठी सेबीकडे (SEBI) गोपनीय कागदपत्रे दाखल केली आहेत. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, या आयपीओमुळे ओयोचे बाजार मूल्य (Valuation) सात ते आठ अब्ज डॉलर्सच्या घरात जाऊ शकते.

    आव्हाने आणि भविष्यातील धोरण

    ओयोचा प्रवास फुलांच्या पायघड्यांचा नव्हता. मध्यंतरी हॉटेल मालकांचे वाद आणि कायदेशीर प्रकरणांमुळे कंपनीच्या प्रतिमेला धक्का बसला होता. मात्र, २०२६ (2026) मध्ये रितेश यांनी ‘प्रिझम’ (Prism) या नवीन ब्रँड ओळखीतून तंत्रज्ञान आणि ग्राहकांचा विश्वास पुन्हा मिळवण्यावर भर दिला आहे. आता ओयो केवळ हॉटेल बुकिंग ॲप राहिलेले नसून, ते एक ‘फुल-स्टॅक टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म’ बनले आहे.

    यशासाठी फक्त जिद्द हवी!

    रितेश अग्रवाल यांचा प्रवास आपल्याला सांगतो की, तुमची सुरुवात कितीही लहान असली तरी तुमचे विचार आणि निश्चय (संकल्प) मोठे असले पाहिजेत. सिम कार्ड विकणारा मुलगा ते १६,००० (16,000) कोटींच्या कंपनीचा मालक, हा प्रवास प्रत्येक भारतीय तरुणाला प्रेरणा देणारा आहे. जर तुमच्याकडे स्पष्ट व्हिजन आणि मेहनत करण्याची तयारी असेल, तर यशाची शिखरे गाठणे अशक्य नाही.

    तुम्हाला रितेश अग्रवाल यांचा कोणता गुण सर्वात जास्त आवडतो? ओयोचा आयपीओ आल्यावर तुम्ही त्यात गुंतवणूक करणार का? कमेंट्समध्ये तुमची मते नक्की कळवा! अशाच नवनवीन प्रेरणादायी यशोगाथा आणि बिझनेस अपडेट्ससाठी आमच्या वेबसाइटला पुन्हा भेट द्यायला विसरू नका!

  • Shortcut vs Smart Work: यशाचा खरा मार्ग कोणता?

    Shortcut vs Smart Work: यशाचा खरा मार्ग कोणता?

    आयुष्य हे एक न संपणारं युद्ध आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आज कोणत्याही क्षेत्रात जा तिथे स्पर्धा आहे, कष्ट आहे, मेहनत आहे. संघर्षाविना सहज मिळतील अशा खूप कमी गोष्टी राहिल्यात. आज कष्टाशिवाय पर्याय नाही. चिकाटी आणि संयम आत्ताच्या तरुण पिढीमध्ये कमी असल्याकारणाने उतावळेपणात झटपट श्रीमंत व्हावे असे त्यांना वाटत असते. लॉटरी, मटका, जुगार अशा सवयींमुळे अनेक तरुणांचं अक्षरशः संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं. घरबसल्या लाखो-करोडो कमवा, तुमचे पैसे दुप्पट करा, नेटवर्क मार्केटिंग मधून करोडपती व्हा अशा अनेक फसव्या जाहिराती दररोज वर्तमानपत्रांमध्ये झळकत असतात.

    अशा झटपट आणि क्षणात श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी तरुण वर्ग फसतो आणि बळी पडतो. शेवटी अपयश आणि निराशा वाट्याला येते. मला कोणीतरी गॉडफादर भेटेल, श्रीमंत बनण्याची एखादी मोठी संधी चालून येईल किंवा देवाचा साक्षात्कार होईल अशी आपण अपेक्षा धरुन बसतो. अचानक राजयोग येऊन माझ्या आयुष्याला एका दिवसात कलाटणी मिळेल, माझं आयुष्य बदलून जाईल असं बहुतेकांना वाटत असतं. प्रयत्न, चिकाटी, परिश्रम, कष्ट, संघर्ष करण्याऐवजी सगळं सहज व्हावं, सहज मिळावं असं वाटत असतं. मात्र यशाला शॉर्टकट नसतो आणि शॉर्टकटने मिळालेलं यश हे शाश्वत देखील नसतं. अचानक एखादी संधी चालून येईल किंवा कोणीतरी आपल्या मदतीला येईल अशी आशा वाटणे हे स्वतःच्याच नाकर्तेपणाचे सर्वात मोठे लक्षण आहे. 

    जेव्हा आपला स्वतःचा स्वतःच्याच सामर्थ्यावर विश्वास नसतो तेव्हा अशा प्रकारच्या निरर्थक अपेक्षा आपण धरून राहतो. मित्रांनो तुम्हाला आयुष्यात जे काही मिळवायचे आहे, जे कोणते ध्येय साध्य करायचे आहे ते मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःला रणांगणात उतरावं लागेल, स्वतः झगडावं लागेल. आपल्या प्रत्येकाच्या अस्तित्वाचं काही ना काही कारण आहे, ते कारण आपल्याला शोधायचंय आणि त्या कारणाच्या पूर्ततेसाठी काम करायचंय. यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो त्यासाठी मेहनतीचा यज्ञ प्रत्येकाला पेटवावाच लागतो. शॉर्टकटने मिळालेल्या यशानं तुम्ही जितके लवकर वर जाता, तितक्याच लवकर तुम्ही खाली देखील येता. थ्री इडीयट्स मध्ये आमिर खानने म्हटल्याप्रमाणे “सक्सेस के पीछे मत भागो, मेहनत इतनी करो की सक्सेस खुद आपके पीछे आयेगी.

    Shortcut आणि Smartwork मध्ये काय फरक आहे?

    1. Shortcut :

    • हे काम जलद पूर्ण करण्यासाठी वापरलेले छोटे मार्ग किंवा तात्काळ उपाय असतात.
    • शॉर्टकट कधी कधी गुणवत्ता किंवा दीर्घकालीन परिणामांवर परिणाम करू शकतो.
    • शॉर्टकटमध्ये फक्त काम पटकन संपवणे हे उद्दिष्ट असते, त्यामागे ठराविक उद्दिष्ट किंवा हेतू नसतो.

       – उदाहरण: प्रोजेक्टमध्ये आवश्यक माहिती न वाचता थेट निष्कर्ष लिहिणे.

    2. Smart Work :

    •    हे काम चांगल्या पद्धतीने आणि नियोजनबद्ध मार्गाने कमी वेळात पूर्ण करण्याचे तंत्र आहे.
    •    स्मार्ट वर्कमध्ये तंत्रज्ञान आणि कौशल्य वापरून कामाचे नियोजन केले जाते.
    •    दीर्घकालीन यश आणि गुणवत्तेला प्राधान्य दिले जाते.

    Shortcut वापरल्याने फक्त तात्पुरते फायदे मिळतात, तर Smart Work दीर्घकालीन आणि शाश्वत यशाकडे नेते.

    Smart Work म्हणजे काय?

    Smart Work म्हणजे कमी वेळेत अधिक परिणाम साधणे. मेहनत कमी पण ती मेहनत योग्य दिशेने करणे महत्त्वाचे आहे. शॉर्टकट घेताना विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. 

    Smart Work कसे करावे?

    • कामाचे प्राधान्य ठरवा: सर्वात महत्त्वाचे काम आधी पूर्ण करा, त्याला सुरुवातीला प्राधान्य द्या.
    • तंत्रज्ञानाचा वापर करा: तंत्रज्ञानाचा वापर करून कामे सोपी करा. उदा. ऑटोमेशन साधने.
    • वेळेचे नियोजन: कामाचे छोटे भाग करा आणि त्यासाठी वेळेची मर्यादा ठरवा.
    • काम सोपवा: आवश्यकतेनुसार इतरांना काम सोपवा.
    • नवीन कौशल्ये शिकत रहा: नवीन तंत्र आणि पद्धती शिकून स्वतःला कायम अपडेट ठेवा
    • यामुळे तुम्ही शॉर्टकट घेत असतानाही अधिक परिणामकारकपणे आणि हुशारीने काम करू शकाल.

    यश मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी :

    • धैर्य आणि सातत्य: प्रत्येक टप्प्यावर मेहनत आणि सातत्य ठेवणे.
    • योग्य नियोजन: कोणतेही काम व्यवस्थित योजना बनवून करणे.
    • समर्पण: यशासाठी तुमच्याकडे ठाम ध्येय असणे आणि त्यासाठी निरंतर प्रयत्न करणे.
    • शिकण्याची तयारी: चुका झाल्यावर त्यातून शिकणे आणि स्वतःला सुधारण्याची तयारी ठेवणे.

    यश मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही, परंतु शहाणपणाने काम केल्यास योग्य वेळी यश नक्कीच मिळेल. Smart Work हा यश मिळवण्याचा मार्ग असू शकतो; पण Short Cut नाही.

    आणखी वाचा

  • असा उभा राहिला KFC उद्योगसमूह

    असा उभा राहिला KFC उद्योगसमूह 

     प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात एकदा तरी चांगल्या आणि वाईट दोन्ही परिस्थितीचा सामना करावा लागतो. प्रत्येक जण आपापल्या परीने याचा सामना करत असतो, काही जण परिस्थितीसमोर हतबल होऊन हार मानतात तर तेच काहीजण त्यावर मात करून स्वतःला सिद्ध करतात. वयाची साठी आली की लोक आपण करत असलेल्या कामातून निवृत्ती घेतात आणि उर्वरित आयुष्य आरामात घालवतात, मित्रांनो अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं म्हटलं जातं ; पण आज आपण ज्या व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, त्या व्यक्तीने आयुष्यात अपयश हे एकदा नाही, दोनदा नाही तर तब्बल 1009 वेळा पाहिलं आहे, पण तरीसुद्धा आज ती व्यक्ती यशाचं परमोच्च शिखर गाठून आपल्या सर्वांसाठी आदर्श ठरली आहे. ज्यांनी इतर लोकांच्या निवृत्तीच्या वयात स्वतःची नवीन सुरुवात केली आणि ती सुरुवात यशस्वी करूनही दाखवली. त्या व्यक्तीचे नाव आहे, कर्नल हारलँड सॅंडर म्हणजेच KFC या सर्वात मोठ्या फास्टफूड उद्योगसमूहाचे निर्माते. त्यांचीच आज जयंती आणि त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाश. 

    अनेकवेळा नोकरी मध्ये त्यांची निराशा झाली. पत्नीदेखील सोडून गेली. आर्मीमधूनही त्यांची हकालपट्टी झाली. त्यांनी सुरू केलेल्या हॉटेललादेखील आग लागली. निवृत्तीनंतर त्यांना फक्त 105 डॉलर्स मिळाले. पण या सर्व अडचणी त्यांच्या कर्तुत्वाच्या आड कधीच आल्या नाहीत. 

     हारलँड सॅंडर यांचा जन्म 9 सप्टेंबर 1890 मध्ये अमेरिकेमध्ये झाला. भावंडांमध्ये हारलँड सर्वात मोठे. त्यांचे आईवडील शेतकरी होते. पाच वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला, त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही हारलँड यांच्या आईवर येऊन पडली. त्यावेळी त्यांच्या आईने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरी करायला सुरुवात केली. आई नोकरीला जात असल्यामुळे लहान भावंडांचा सांभाळ करण्याची जबाबदारी   हारलँड यांच्यावर असायची ते स्वतः त्यांच्यासाठी आणि त्यांच्या भावंडांसाठी जेवण बनवायचे,  तेव्हाच त्यांना कुकिंगची आवड लागली. ते कायम नवनवीन रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करायचे. 

     हारलँड बारा वर्षाचे असताना त्यांच्या आईने दुसरे लग्न केले परंतु दुसऱ्या वडिलांसोबत त्यांचे पटत नसल्याने ते शेतात येऊन राहू लागले आणि शेती करू लागले. सातवीला असताना हारलँड यांनी शिक्षण सोडून दिले व ते त्यांच्या काकांकडे राहायला गेले, त्यावेळी त्यांचे काका एका कारच्या कंपनीत नोकरीला होते. काकांनी  हारलँड यांना कंडक्टर म्हणून नोकरी मिळवून दिली. 

    आर्मी, इन्शुरन्स, कायदा, हॉटेल शेफ, टायरचे दुकान, बोट चालवणे  अशा विविध क्षेत्रात त्यांनी काम केले ; परंतु एकाही नोकरीमध्ये त्यांना स्थिरता लाभली नाही, या काळात एक मुलगी असताना त्यांची पत्नी देखील त्यांना त्यांच्या अस्थिर आयुष्यामुळे सोडून गेली. नंतर त्यांनी पेट्रोल पंपावर काम करायला सुरुवात केली, तेथे काम करत असताना लोकं जेव्हा त्यांना बसची वाट पाहताना दिसली तेव्हा ती संधी ओळखून हारलँड यांनी तेथे छोटे हॉटेल सुरू केले. केंटुकीच्या गव्हर्नरला हारलँड यांची Fried Chicken हा पदार्थ इतका आवडला की त्यांनी हारलँड यांच्यावर खुश होऊन त्यांना “कर्नल” पदवी दिली. रस्त्याच्या कामामुळे नंतर त्यांचं हे हॉटेल देखील बंद झालं.

    हॉटेल बंद झाल्यावर हारलॅंड यांना पुन्हा नोकरी करावी लागली. वयाच्या 60व्या वर्षी निवृत्त झाल्यावर त्यांना सरकारकडून फक्त 105 डॉलरचा चेक मिळाला. अशावेळी त्यांच्या मनात आत्महत्या करण्याचा देखील विचार आला. पण तेव्हा देखील अजूनही सगळं संपलं नाही आपण काहीतरी करू शकतो ही हिम्मत त्यांच्यामध्ये होती.

    निवृत्तीच्या वेळी मिळालेले 105 डॉलर आणि प्रेशर कुकर घेऊन हारलँड सॅंडर त्यांच्या Fried Chickenच्या रेसिपीसाठी Business Partnar शोधू लागले. तब्बल 1009 हॉटेल व्यवसायिकांनी त्यांच्यासोबत बिझनेस पार्टनरशिप नाकारली. अनेकदा पदरी फक्त अपयश पडलं.  अखेरीस केंटुकीच्या एका मोठ्या हॉटेल व्यवसायिकाने त्यांची फ्रेंचाईजी स्वीकारली. तेव्हापासून त्यांच्या दुकानाचे नाव Kentucky Fried Chicken म्हणजेच KFC असे ठेवण्यात आले. बघता बघता त्यांच्या या Unique रेसिपीला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अतिशय कमी कालावधीत KFC च्या 600 Franchise पूर्ण झाल्या. 1964 मध्ये वयाच्या 73व्या वर्षी हारलँड यांनी जॉन ब्राऊन यांना KFC 2 मिलियन डॉलर म्हणजेच 14 कोटी रुपयांना  विकली. त्यातील अर्धी संपत्ती त्यांनी दान करून टाकली. आज रोजी 200 हून अधिक देशात KFC चे 18000 हून अधिक रेस्टॉरंट्स आहेत. KFC ची आज वर्षाला अब्जावधींमध्ये उलाढाल होते. आज KFC ही जगातील सर्वात मोठी फास्ट फूड Chain आहे.

    KFC चे संस्थापक कर्नल हारलँड सॅंडर त्यांच्या यशाचं हेच रहस्य सांगतात की,

    मला संकटे जिंकून देत नाहीत आणि मीही हार म्हणायला तयार नाही

    तुम्ही आत्ता जे करत आहात त्यात आवड निर्माण करा

    अथवा तुम्हाला जे आवडते ते करा

  • Top 5 Business – गृहिणींसाठी टॉप 5 व्यवसाय

    Top 5 Business – गृहिणींसाठी टॉप 5 व्यवसाय

    पूर्वीच्या काळात फक्त चूल आणि मूल आणि वंश विस्तारासाठी वापरलं जाणारं साधन, एवढीच स्त्रियांची ओळख होती. कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत, अर्थार्जनात सहसा स्त्रियांचा वाटा नसायचा. त्यांचं काम फक्त घर आणि मुलं सांभाळणं इथपर्यंतच मर्यादित.

    पण काळ बदलला तसे लोकांचे विचारही बदलले. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या सारख्या काही स्त्रिया मुलींसाठी लढल्या आणि चित्र बदलत गेलं. समाज साक्षर होत गेला आणि मुलींनीही स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी सोडल्या नाहीत. 

    पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रियाही व्यवसायात उतरू लागल्या..आणि यशस्वी देखील झाल्या… 

    आजही अनेक गृहिणींना स्वतःचं काहीतरी करावं, व्यवसाय सुरू करावा, अशी इच्छा असते पण योग्य मार्गदर्शनाची कमतरता भासते..

    घरातील खर्चाला आपल्या परीने हातभार लावावा आणि स्वतःही आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावे, अशी अनेक गृहिणींची इच्छा असते. अश्यावेळी आपल्या छंदाचे, आवडीचे रुपांतर आपण घरगुती म्हणजेच घरबसल्या करता येणाऱ्या व्यवसायात करू शकतो. यामुळे आवड जपल्याचे, छंद पूर्ण करण्याचे समाधान मिळेल, शिवाय यातून अर्थार्जन सुद्धा होईल.

    आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण असे 5 व्यवसाय पाहणार आहोत ..जे कोणतीही गृहिणी अगदी कमी भांडवलात आणि घरबसल्या सुरू करू शकते.

    1. फूड डिलिव्हरी व्यवसाय : 

    आजच्या धावपळीच्या युगात घरगुती जेवणाचे महत्त्व वाढले आहे. तुम्ही स्थानिक ग्राहकांसाठी घरगुती जेवण तयार करून ते डिलिव्हरी करू शकता. बऱ्यापैकी मुलं – मुली शिक्षणासाठी, नोकरीसाठी आपलं घर सोडून बाहेर राहत असतात. अशा वेळी त्यांना रोजचं बाहेर खाणं खिशाला आणि आरोग्याच्या दृष्टीनेही परवडत नाही, ही गरज ओळखून तुम्ही घरगुती मेस किंवा टिफिन सर्विस सुरू करू शकता, यासाठी तुम्हाला तुमच्या पाककृतींचा एक मेन्यू तयार करावा लागेल आणि  सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून तसेच Mouth Publicity करून त्याची जाहिरात करावी लागेल.

    आवश्यकता :

    • स्वच्छता आणि सुरक्षिततेचा विचार
    • चविष्ट आणि रुचकर जेवण 
    • सर्वसामान्यांना परवडणारे दर 

    2. हँडमेड प्रोडक्ट्स : 

    घरगुती आणि हाताने बनवलेल्या वस्तूंकडे लोकांचा कल वाढत आहे. जर तुम्हाला हस्तकला आवडत असेल किंवा तुमच्यात ते कौशल्य असेल तर तुम्ही हँडमेड प्रोडक्ट्स तयार करून त्याची विक्री करू शकता. सोप्या दागिन्यांपासून ते सजावटीच्या वस्तूंपर्यंत, या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. तुम्ही विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्म उदा. Etsy, Instagram, Meesho  वर तुमच्या उत्पादनाची विक्री करू शकता.

    आवश्यकता :

    •  कलात्मकता
    • चांगल्या मार्केटिंग कौशल्यांचा वापर
    • वेळेवर सेवा

    3. टयूशन्स : 

    जर तुम्ही शिकलेले असाल आणि  तुम्हाला एखादी संकल्पना दुसऱ्याला सोप्या पद्धतीने आणि समजेल अश्या भाषेत समजावून सांगता येत असेल, तर तुम्ही तुमच्या ज्ञानाचा वापर करून ऑनलाइन ट्यूटर म्हणून काम करू शकता. विविध विषयांमध्ये तुम्हाला शिकवण्याची आवड असेल, तर तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरू शकता. तसेच घरगुती शिकवणी देखील घेऊ शकता. 

    आवश्यकता :

    • विषयाची योग्य माहिती
    • शिकवण्याची हातोटी 
    • ऑनलाईन टयूशन्स साठी मोबाईल किंवा लॅपटॉप, इंटरनेट कनेक्शन 

    4. डे केअर सेवा :

    शहरी भागात डे केअर सेंटर किंवा पाळणाघरे ही आजच्या काळाची गरज बनली आहे. ज्या महिलांना लहान मुलांची आवड आहे, त्यांच्यासाठी पाळणाघर किंवा डे केअर हा एक उत्तम  व्यवसाय ठरू शकतो. नोकरदार महिला आपल्या मुलांना घरासारखे वातावरण मिळावे आणि प्रेमाने तसेच आवश्यक ती  काळजी घेऊन त्यांची  मुले सांभाळली जातील अश्या पाळणाघरांना प्राधान्य देताना दिसतात. त्यामुळे घरच्या घरी करता येणारा हा व्यवसाय फायदेशीर आहे.

    घरातच थोडी रिकामी, मोकळी हवा येणारी जागा असेल तर तेथेच हा व्यवसाय सुरु करता येतो. महिलांमध्ये मुळातच वात्सल्य हा गुण असतो. त्यामुळे तुमच्याकडे येणाऱ्या मुलांचा तुम्ही प्रेमाने सांभाळ करता असे एकदा दिसून आले की तुमच्या डे केअर ची जाहिरात या मुलांच्या पालकांकडूनच मोठ्या प्रमाणावर केली जाते. 

    आवश्यकता : 

    • जास्त संख्येने मुले असतील तर कुटुंबियांची मदत लागेल किंवा मदतनीस ठेवावी लागते. 
    • तसेच जेथे मुले आहेत तेथील जागेची स्वच्छता, शांतता, मुलांच्या खाण्यापिण्याची चोख व्यवस्था ठेवणे आवश्यक असते. 
    • मुलांना खेळण्यासाठी पुरेशी खेळणी, त्यांना झोपाविण्यासाठी योग्य व्यवस्था हवी. थोडे भांडवल घालून अशी व्यवस्था करता येते.

    5. Freelance लिखाण :

    जर तुम्हाला लिखाणाची आवड असेल, तुमच्यात लेखन कौशल्य असेल आणि एखाद्या विषयाची मांडणी आकर्षकपणे करण्याची हातोटी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही Freelance लेखक म्हणून काम करू शकता. तुम्ही ब्लॉग पोस्ट, लेख किंवा कॉपीराइटिंगसारख्या विविध प्रकारचे लिखाण करू शकता. अनेक कंपन्या आणि वेबसाईट्स‌ त्यांच्यासाठी Freelance लेखक शोधत असतात. 

    आजकाल  ई कॉमर्स व्यवसाय प्रचंड वेगाने वाढतो आहे. त्यासाठी थोडक्यात, आकर्षक स्वरुपात, सहज सोपा, व्यवसायाची माहिती करून देणारा मजकूर लिहून देणे असे या कामाचे स्वरूप आहे. व्यवसायात स्पर्धा वाढल्याने स्पर्धकापेक्षा आपली उत्पादने अधिक चांगली कशी हे ग्राहकांवर ठसविण्यासाठी अश्या मजकुराची आवश्यकता असते.

    याशिवाय स्वतःची Blogging Website सुरू करून देखील तुम्ही त्यावर लिखाण करू शकता.

     आवश्यकता :

    • आवड 
    • उत्कृष्ट लिखाण कौशल्य
    • मार्केटिंगच्या साधनांची माहिती
    • वेळेचं व्यवस्थापन
    • असे अनेक व्यवसाय गृहिणींना करता येऊ शकतात. ठरवलं तर सर्व शक्य आहे. 
    • इच्छाशक्ती, योग्य व्यक्तींचे सल्ले आणि कुटुंबाला विश्वासात घेऊन  तुम्हीही तुमच्या पायावर खंबीरपणे उभे राहू शकता…..
    • आता वेळ आली आहे एका गृहिणीची ताकद समाजाला दाखवून देण्याची..

  • महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७: एक सखोल दृष्टीक्षेप

    महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७: एक सखोल दृष्टीक्षेप

    मोठ्या घोषणा, आर्थिक शिस्त आणि भविष्यातील विकासाचे नवे ‘ब्लूप्रिंट’. काय आहे स्वस्त आणि काय महाग? जाणून घ्या नवी अर्थक्रांतीसोबत.

    २०२६-२७ च्या महाराष्ट्र अर्थसंकल्पात ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ चे ध्येय केंद्रस्थानी ठेवून एक सर्वसमावेशक विकास आराखडा सादर करण्यात आला आहे, जो सामाजिक समरसतेचा संदेश देणाऱ्या प्रगतशील धोरणांवर आधारित आहे. या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रशासकीय शिस्तीचे स्मरण करत, त्यांच्या प्रतिमेला समर्पित भव्य स्मारक आणि नागरी पुरस्काराची विशेष घोषणा करण्यात आली आहे. यासह, आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांसाठी विशेष निधी आणि उपक्रम राबवून सामाजिक परिवर्तनाची पावले उचलण्यात आली आहेत.

    खिशाचा ताळमेळ – काय झाले स्वस्त?

    आरोग्य सुविधा: मधुमेहावरील उपचार आता सर्वसामान्यांना स्वस्त.
    औषधोपचार: कॅन्सरवरील जीवनरक्षक औषधांच्या किमती कमी.
    साधने: दर्जेदार वैद्यकीय उपकरणांवरील भार कमी.
    क्रीडा साहित्य: तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सवलत.
    सौर ऊर्जा: सौर पॅनेलच्या किमती कमी करून हरित ऊर्जेला चालना.

    खिशाचा ताळमेळ – काय झाले महाग?

    व्यसनमुक्तीचा प्रयत्न: दारू आणि सिगारेटवर करात वाढ.
    तंबाखूजन्य पदार्थ: आरोग्याला घातक अशा वस्तूंवर अतिरिक्त कर.
    महसूल धोरण: अनावश्यक खर्चावर नियंत्रण मिळवताना घेतलेले हे धोरणात्मक निर्णय.

    शेतकरी आणि ग्रामीण उन्नतीचा कणा

    कर्जमुक्ती: २ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा मोठा दिलासा.
    सुरक्षा कवच: गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत आता शेतमजूरांचाही समावेश.
    डिजिटल शेती: १.३१ कोटी ‘फार्मर आयडी’द्वारे ‘अ‍ॅग्रीस्टॅक’ची प्रभावी अंमलबजावणी.
    पाणंद रस्ते: शेतीमाल वाहतुकीसाठी ग्रामीण भागातील रस्त्यांना प्राधान्य.
    नैसर्गिक शेती: आगामी दोन वर्षांत शाश्वत शेती अभियानाची मोठी सुरुवात.

    पायाभूत सुविधा: कनेक्टिव्हिटीची नवी लाट

    ग्राम सडक योजना: ३०,००० गावांना पक्क्या रस्त्यांनी जोडण्याचा संकल्प.
    रेल्वे विस्तार: मुंबई-पुणे जलदगती ट्रेनसाठी विशेष तरतूद.
    मेट्रो जाळे: मुंबईमध्ये नवीन भुयारी मेट्रो मार्गांचे नियोजन.
    विमानतळ जोडणी: अटल सेतू आणि विमानतळ यांच्यातील कनेक्टिव्हिटीवर भर.
    कामगिरी: २३ हजार पुलांची कामे आणि रस्त्यांच्या विस्तारावर लक्ष.

    औद्योगिक प्रगती आणि ५० लाख रोजगाराचे लक्ष्य

    गुंतवणूक धोरण: नवीन धोरणाद्वारे उद्योगांना पोषक वातावरण.
    रोजगार: ५० लाख प्रत्यक्ष रोजगार निर्मितीचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य.
    स्टील हब: गडचिरोली आता औद्योगिक केंद्र म्हणून विकसित.
    जागतिक केंद्र: मुंबई आणि पुण्यात ५० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे हब.
    परकीय गुंतवणूक: महाराष्ट्र देशात अव्वल राहण्याचा निर्धार.

    तंत्रज्ञान आणि ‘फ्युचरिस्टिक’ महाराष्ट्र

    गेमिंग हब: जागतिक स्तरावर ठसा उमटवण्यासाठी २९५ हून अधिक गेमिंग स्टुडिओ.
    एआय (AI) क्रांती: चारही कृषी विद्यापीठांत एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर.
    क्रिएटिव्ह टेक: मुंबईत ‘इंडियन इन्स्टिट्यूट क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ची स्थापना.
    जीसीसी हब: पुणे हे देशातील पसंतीचे शहर म्हणून विकसित.
    स्टार्टअप इकोसिस्टम: नवोदित उद्योजकांसाठी अधिक सोयीसुविधा.

    पर्यटन आणि सांस्कृतिक वारसा

    रोप-वे: वासोटा किल्ल्यावर पर्यकांसाठी नवीन रोप-वे प्रकल्प.
    चित्रसृष्टी: नागपूरच्या रामटेकमध्ये तिसरी चित्रसृष्टी उभारण्याचे नियोजन.
    तीर्थक्षेत्र विकास: संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किटचा सर्वांगीण विकास.
    ऐतिहासिक स्मारके: महाडमधील चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त तेथील स्मारकासाठी पायाभूत सुविधा 

    अर्थसंकल्प आता केवळ आकडेवारी नसून, ते भविष्यातील महाराष्ट्राचे व्हिजन आहे.

    यातील कोणती घोषणा तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणादायी वाटते?

    (A) शेतकरी कर्जमाफी आणि सुरक्षा

    (B) औद्योगिक रोजगार आणि तंत्रज्ञान

    आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी ‘नवी अर्थक्रांती’ ला फॉलो करा!