२०२३ च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. शेतकरी सुखी, तर जग सुखी हे फक्त ऐकायला बरं वाटतं, पण ते प्रत्यक्षात कधी येणार काय माहीत. तर मंडळी आम्ही दर आठवड्याला तुमच्यासाठी शेतीबद्दल इंटरेस्टिंग माहिती घेऊन येत असतो. आज देखील मी तुम्हाला अशाच एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करुया.
मित्रांनो, शेतीला आपण वेळच्या वेळी जितकं पाणी देणार, तितकंच पीक ती आपल्याला देत असते. पण शेतावरची लाईटच गेली, तर पाणी कसं देणार? आणि म्हणूनच शेतकऱ्यांना सौर पंपाच्या माध्यमातून वीज उपलब्ध व्हावी तसेच जलसिंचन करता यावं, शेतीला पाणी देता यावं यासाठी केंद्र सरकारनं पंतप्रधान कुसुम सोलार योजना आणली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना सौर पंप दिले जातात. केंद्र आणि राज्य सरकार त्यासाठी अर्थसहाय्य करतं. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर 3, 5 आणि 7.5 HP क्षमतेचे सौर पंप दिले जातात. मात्र अनेकांना याबद्दल काहीच माहिती नाही. त्यामुळे खूप सारे शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत.
या योजनेचा एकूण खर्च तीन भागांमध्ये विभागला गेला आहे. ज्यामध्ये,
केंद्र सरकार शेतकर्यांना ६०% अनुदान देईल
३०% खर्च सरकार कर्ज स्वरूपात देईल.
शेतकऱ्यांना प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या केवळ १०% रक्कम द्यावी लागेल.
मात्र या पंपांचं वाटप शेतकऱ्यांना कोणत्या निकषांवर केलं जातं?
जर 2.5 एकर पर्यंत शेती असेल, तर 3 एचपीचा पंप मिळेल, अडीच ते पाच एकर जमिनीसाठी 5 एचपी आणि त्यापेक्षा जास्त जमीन असेल, तर 7.5 एचपीचा पंप मिळू शकतो.
3 एचपी पंपची एकूण किंमत – 1,93,803 रुपये आहे.
मात्र अनुदानानंतर सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना तो 19,380 रुपयांना तर एससी आणि एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना 9,690 रुपयांना मिळेल.
म्हणजे तुम्हाला जवळ जवळ दीड लाखापेक्षाही अधिक लाभ मिळणार आहे.
तसेच 5 एचपी पंपची एकूण किंमत आहे 2,69,746
सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना त्यासाठी भरावे लागतील 26,975 रुपये आणि एससी, एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना फक्त 13,488 रुपये.
आणि जर तुम्हाला 7.5 एचपीचा पंप हवा असेल, तर त्याची एकूण किंमत आहे 3,74,402
पण सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना तो 37,440 रुपयांमध्ये आणि एससी/एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 18,720 रुपयांमध्ये पंप मिळून जाईल.
या योजनेअंतर्गत सौर पॅनेलमधून तयार होणारी वीज शेतकरी विकूसुद्धा शकतो आणि या वीज विक्रीतून पैसेसुद्धा कमवू शकतो.
पण आत्ता तुम्ही हा लेख ज्या फोनमध्ये बघताय ना, त्यातच गूगलवर जाऊन mahaurja type करा. वेबसाईटची लिंकसुद्धा आम्ही खाली description box मध्ये दिलीच आहे. त्यावरसुद्धा क्लिक करून तुम्ही वेबसाईट ओपन करू शकता.
या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला महाकृषी ऊर्जा अभियान कुसुम सौर पंप अर्ज नोंदणी या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल, त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर फॉर्म open होईल. त्यावर विचारली गेलेली माहिती व्यवस्थित काळजीपूर्वक भरा. पण हा फॉर्म भरण्यासाठी काही डॉक्युमेंट्स देखील लागतात. त्यात 7/12 उतारा लागेल. त्यावर विहीर किंवा बोअरची नोंद असणे आवश्यक आहे. आधारकार्ड, जातीचा दाखला, बँक पासबूक पासपोर्ट साइज फोटो या गोष्टी लागतात. नोंदणीसाठी 100 रुपयांची फी आकारली जाते. ती फी भरल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल. त्यासोबतच तुम्हाला user ID आणि password दिला जातो. अर्थात तुमची नोंदणी successful झाली. पण फॉर्म भरला म्हणजे झालं, मला लगेच पंप मिळेल या धारणेत राहू नका. कारण ही प्राथमिक प्रक्रिया आहे. कोटा उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला मेसेजद्वारे कळवलं जातं आणि मग त्यानंतर लाभार्थ्याचे संपूर्ण details, कोटेशन, कंपनी निवडणं हे सारी प्रोसेस केली जाते आणि मग पंप हा तुमचा होतो.
तेव्हा लगेच फॉर्म भरा आणि पंप मिळवा. आता आम्ही तुमच्या फायद्याची एवढी माहिती दिली आहे, तेव्हा चॅनेलला Subscribe सुद्धा होऊन जाऊद्या. त्याला तर कसला अर्जपण करावा लागत नाही हो…
भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. कोणत्याची देशाची युवाशक्ती ही त्या देशाची सर्वांत मोठी शक्ती आणि संपत्ती मानली जाते. आज ट्विटरचे CEO पराग अग्रवाल असो किंवा मायक्रोसॉफ्टचे सत्य नाडेला किंवा गुगलचे सुंदर पिचाई असो… भारतीय तरुण जगात आपला डंका वाजवत आहेत. ही गोष्ट आहे, अशाच २ तरुणांची, ज्यांनी भारतीयांच्या खरेदी करण्याच्या पद्धतीची दिशाच बदलून टाकली. ते दोन तरुण म्हणजे, फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल…
सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल, आडनावावरून हे दोघे तुम्हाला भाऊ वाटतील, पण हा निव्वळ योगायोग आहे.IIT दिल्लीमधून बी-टेक करणारे हे दोघे मित्र फार मजेशीररित्या एकमेकांना भेटले. डिग्री पूर्ण करून संपूर्ण कॉलेज उन्हाळी सुट्टीसाठी घरी गेलं असताना, आपला अपूर्ण प्रकल्प पूर्ण करत हे दोघे बसले होते. तिथंच या दोघांची भेट झाली. पदवीनंतर दोघेही नोकरीसाठी बेंगलोरला गेले, तिथं त्यांची मैत्री अजून घट्ट झाली. पुढे सचिनने 2006 मध्ये ॲमेझॉनमध्ये काम करायला सुरुवात केली, तर बिन्नीसुद्धा 2007 मध्ये ॲमेझॉनमध्ये रुजू झाले.
व्यावसायिक दृष्टिकोन असणाऱ्या दोघांनाही लवकरच Amazon मधील नोकरीचा कंटाळा आला आणि नवनवीन आयडिया त्यांच्या डोक्यात येऊ लागल्या. ई-कॉमर्सची आवड असल्याने त्यांनी अनेक वेबसाईटची तुलना करणारी वेबसाईट बनवायची ठरवली. इतर वेबसाईट पाहत असताना त्याच्या लक्षात आले कि, या वेबसाईट्सची डिझाईन खूपच खराब आहे. त्यांना एक अशी ई-कॉमर्स वेबसाईट बनवायची होती जी ग्राहकांना चांगला अनुभव देईल.
महिन्याला दोघही आपल्या पगारातून थोडे पैसे बाजूला काढत होते. अखेरीस जराही वेळ न दवडता दोघांनी Amazon सोडले. प्रत्येकी २ लाख गुंतवत त्यांनी २००७मध्ये स्वतःच्या फ्लॅटमधूनच फ्लिपकार्ट ही कंपनी चालू केली. सुरुवातीच्या काळात फ्लिपकार्टने आपले लक्ष फक्त पुस्तकं विकण्यात केंद्रित केले होते. ऑर्डर आल्यानंतर पोस्टाने घरपोच डिलिव्हरी केली जायची. २ महिन्यांनी त्यांना पहिली ऑर्डर मिळाली. या पहिल्या ऑर्डरचा किस्सासुद्धा फार रंजक आहे.
आजच्या तेलंगणामधील मेहबूबनगरमध्ये राहणारे व्ही. व्ही. के. चंद्रा हे फ्रीलान्स वेब कन्सल्टन्ट होते. त्यांना पुस्तकं वाचायचं भारी वेड होतं. त्यामुळं ते प्रत्येक वेळी ९० किलोमीटरचा प्रवास करून हैद्राबादला जात आणि पुस्तकं खरेदी करत. त्यांना Leaving Microsoft to Change the World हे पुस्तक वाचायचं होतं, पण ते त्यांना कुठंच मिळेना. चंद्रा टेकनॉलॉजिशी संबंधित ब्लॉग इंटरनेटवर लिहित होते. त्यांच्या एका ब्लॉगच्या खाली एक कंमेंट होती. सचिन बंसल यांची. त्या कमेंटमध्ये एक लिंक होती www.flipkart.com. हे काहीतरी वेगळं दिसतंय म्हणून त्यांनी त्या लिंकवर क्लिक केलं, तर त्यांना ऑनलाइन पुस्तक विकणारी साईट दिसली जी संपूर्ण भारतात कुठेही पुस्तकांची डिलिव्हरी करत होती. वेबसाईट अगदी विश्वसार्ह वाटल्यामुळे चंद्रानी त्याच्यावर पुस्तक ऑर्डर केलं. ही ऑर्डर गेल्यावर बंगळुरूमधील २ खोल्यात राहणाऱ्या सचिन आणि बिन्नी बंसल याना खूप आनंद झाला. कारण त्यांच्या व्यवसायासाठी हे पाहिलंच पाऊल होत, पण थोड्याच वेळात त्यांच्या लक्ष्यात आलं की हे पुस्तक कोठेच उपलब्ध होईना. अनेक दुकानदारांशी संपर्क केल्यानंतर एका दुकानात त्यांना एक प्रत सापडली, पण ती खूप जुनी होती आणि तिची पानं पिवळी पडली होती. बिन्नी बन्सल यांनी चंद्राना फोन करून ही सगळी माहिती दिली. त्यावर चंद्रानी ते जसं आहे, तसं देण्यास सांगितल. नंतर २ दिवसांनी चंद्राना पुस्तक मिळालं, तर फ्लिपकार्टला पहिली ऑर्डर पूर्ण केल्याचं समाधान. त्यावर चंद्राना १०% डिस्काउंट मिळाला.
२००७ ची ती परिस्थिती अशी होती कि, भारतात फक्त ५ कोटी लोकंच इंटरनेट वापरत होती. त्यातही बार्गेनिंग म्हणजेच घासाघीस करणे हा जन्मसिद्ध हक्क समजणाऱ्या भारतीयांना ऑनलाईन शॉपिंग करणे कितपत रुचणार हे अनिश्चित होते. अशा परिस्थितीत फ्लिपकार्टचं हे पाऊल खरंच फक्त धाडसाचं नव्हतं तर क्रांतिकारी होतं.
सप्टेंबर २००९ मध्ये फ्लिपकार्टने गुंतवणूकदारांकडून १ अब्ज डॉलर्स उभे केले. याबरोबरच २ जणांनी सुरु केलेल्या फ्लिपकार्टमध्ये १५० कर्मचारी भरती झाले.
आता फ्लिपकार्ट हे भारतातील पुस्तकप्रेमींसाठी पसंतीचे व्यासपीठ बनत होत, स्टार्टअप त्याचे पुढचे पाऊल टाकण्यासाठी सज्ज होत होतं . नवीन भागीदार आणि अधिक गुंतवणुकीसह, फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स श्रेणीमध्ये प्रवेश करण्यास तयार होत. त्यामुळे त्यांनी 2010 मध्ये मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विकण्यास सुरुवात केली.
फ्लिपकार्टला अजून ग्राहकांच्या विश्वासाचा खूप मोठा पल्ला गाठायचा होता. भारतामध्ये सुरुवातीला ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी घाबरत होते कारण लोकांची अशी धारणा होती की पेमेंट केल्यानंतर जर प्रॉडक्ट्स मिळाले नाही तर? यावर उपाय काढत फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांसाठी कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय सुरू केला. हा पर्याय सादर करणारी पहिलीच ई-कॉमर्स कंपनी होती. घेतलेली वस्तू जर खराब लागली, तर रिटर्न पॉलिसीदेऊन फ्लिपकार्टने ग्राहकांचा विश्वास कमावला.
सप्टेंबर २०१३ मध्ये कंपनीने स्वतःचं अँड्रॉइड ऍप लाँच केलं. डिसेंबर २०१४ पर्यंत कंपनीची मार्केट व्हॅल्यू ११ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली. टाईम मासिकाच्या २०१६ च्या जगातील १०० प्रभावशाली लोकांच्या यादीत सचिन आणि बिन्नी दोघांचाही समावेश करण्यात आला. मार्च २०१७ मध्ये भारतीय ई-कॉमर्स बाजारपेठेतील ३९.५ टक्के हिस्सा एकट्या फ्लिपकार्टच्या होता.
मिंत्रा, जबॉंगसारख्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना विकत घेत फ्लिपकार्टने आपला प्रवास वेगाने चालू ठेवला होता. पण 2018 मध्ये, अमेरिकेची बलाढ्य ई-कॉमर्स कंपनी वॉलमार्टने फ्लिपकार्ट 16 अब्ज डॉलर्सला म्हणजेच एक लाख 7 हजार कोटी रुपयांना विकत घेतले आणि Flipkart मधील सचिन आणि बिन्नी यांचा दशकभराचा प्रवास संपला. दहा वर्षांपूर्वी दोन तरुण ॲमेझॉनच्या ऑफिसमध्ये नोकरी करत होती. पुढच्या दहा वर्षात ॲमेझॉनला याच दोन कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेल्या कंपनीशी टक्कर द्यावी लागेल, असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं.
सचिन बन्सल यांनी भारतातील वाढत्या फिनटेक स्पेसवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ‘नवी टेक्नॉलॉजीज’ ही कंपनी सुरू केली, तर बिन्नी बन्सल यांनी त्यांच्या xto10x टेक्नॉलॉजीज नावाच्या उपक्रमाद्वारे स्टार्टअप संस्थापकांना व्यवसाय वाढविण्यात मदत करणारी टेकनॉलॉजि विकसित केली.
खरेदीच्या बाबतीत चोखंदळ असणारा भारतीय ग्राहक जोपर्यंत वस्तू हाताळत नाही, पारखत नाही, तोपर्यंत खरेदी करत नाही; अशा आपल्या नागरिकांना इंटरनेटच्या माध्यमातून खरेदी करायची सवय लावणारे सचिन आणि बिन्नी बन्सल यांनी खऱ्या अर्थाने खरेदीचा नवा पायंडा पाडला.
असं म्हणतात कि, आपण ज्या लोकांच्या सहवासात असतो, त्याप्रमाणे आपलं करिअर, भविष्य घडत असतं. सचिन आणि बिन्नी या मित्रांची जोडी या असंच काहीसं आपल्याला शिकवून जाते. बिन्नी आणि सचिन यांनी सुरू केलेल्या एका ‘स्टार्टअप’ला मिळालेले हे यश केवळ पैशांच्या मोजमापातच नव्हे, तर सर्वार्थाने अभूतपूर्व आहे. फ्लिपकार्टमुळे भारतात स्टार्टअप संस्कृती वाढण्यास फायदा झाला.
तर ही होती फ्लिपकार्टच्या संस्थापकांची जीवन कहाणी. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि हो जाताना सबस्क्राईब करायला विसरू नका.
एखादा उद्योग जेव्हा उभा राहतो, तेव्हा तो फक्त एका माणसाला उभा करत नाही, तर तो एका समाजाला उभारी देतो. आणि त्यात जर तो उद्योग उभारण्यामागे हेतूच समाजाची प्रगती असेल मग तर, समाज प्रस्थापित सर्व जुनाट रूढी परंपरा मोडून एका नव्या पर्वाला सुरुवात करतो. असंच काहीसं कार्य केलं आहे, पहिले मराठी उद्योजक लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांनी.
लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांचा जन्म २० जून १८६९रोजी तेव्हा महाराष्ट्रात असणाऱ्या बेळगावमधील गुर्लहोसूर येथे झाला. पांडित्याचा व्यवसाय असणाऱ्या कुटुंबात जन्मलेल्या लक्ष्मणरावांचं मन काय त्यात लागायचं नाही. सतत कानावर पडणाऱ्या वेद आणि मंत्रांऐवजी त्यांचं मन यंत्रांत, चित्रात रमत होतं. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर पंडितांच्या मुलानं पांडित्यच करायचं या मानसिकतेच्या त्या काळात लक्ष्मणरावांनी बंडखोरी करत मुंबईच जे जे स्कूल ऑफ आर्टस् गाठलं. तिथं त्यांनी पेंटिंग आणि मेकॅनिकल ऑब्जेक्ट्स यासाठी प्रवेश घेतला. त्यांचं मन त्यांच्या आवडत्या विषयात म्हणजेच पेंटिंगमध्ये लागत होतं, तोच त्यांना सौम्य प्रकारचा रंगांधळेपणा जाणवू लागला. पण म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. या आजारामुळे त्यांनी पेंटिंगमधलं आपलं लक्ष पूर्णपणे मेकॅनिकल ऑब्जेक्ट डिझाईन म्हणजेच यंत्रांचं चित्र काढण्याकडे दिलं.
यामुळे मूलतः यंत्रांची आवड असणारे लक्ष्मणराव यंत्रांच्या अधिकच जवळ गेले. त्यांनी यांत्रिक चित्रकलेमध्ये इतकं प्राविण्य मिळवलं कि, त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबईच्या व्हिक्टोरिया ज्युबली टेक्निकल इन्स्टिट्यूट म्हणजेच VJTIमध्ये ते मेकॅनिकल ड्रॉईंगचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून महिना ४५ रुपये पगारावर तर रुजू झाले. ती वेळ अशी होती, जेव्हा ब्रिटिशांनी भारतात सायकल वापरायला सुरुवात केली होती. ते यंत्र बघून लक्ष्मणरावांनी सरळ त्याची डीलरशिप घेतली. मुंबईत सायकल खरेदी करून ते बेळगावला पाठवत. तिथं त्यांचा भाऊ रामूअण्णा ती सायकल ७०० ते हजार रुपयांना विकत होते, तर तिथल्या लोकांना सायकल शिकवायचे १५ रुपये घ्यायचे.
१८८८ मध्ये लक्ष्मणरावांनी आपली नोकरी सोडली आणि बेळगाव गाठलं. तिथं त्यांनी आणि रामूअण्णांनी मिळून एक छोटं सायकल रिपेअरचं दुकान चालू केलं आणि व्यावसायिक क्षेत्रात आपलं पहिलं पाऊल टाकलं. त्यांचा हा छोटासा व्यवसाय चांगला चालू होता. तोच महानगरपालिकेने अतिक्रमण म्हणून त्यांचं दुकान काढून टाकलं.
भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांच्या कामी येतील अशी यंत्रे बनवण्याची त्यांची इच्छा होती. १९०१ मध्ये त्यांनी त्याकाळच्या औरंगाबाद स्टेटमध्ये एक छोटं दुकान चालू केलं. जनावरे वैरणीतील बुडख्याकडील मोठा भाग खात नाहीत आणि तो वाया जातो हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यातून त्यांचे पहिले यंत्र तयार झाले ते कडबा कापण्याचे. त्याचबरोबर ते शेतीसाठी लागणारी रहाट, चरख आणि लोखंडाचा नांगर बनवत होते. पण त्यावेळच्या शेतकऱ्यांमध्ये अशी अंधश्रद्धा होती की लोखंडाचा नांगर वापरला, की माती विषारी बनते आणि तिची उत्पादनक्षमता कमी होते. शेतकऱ्यांच्या मनातला हा गैरसमज दूर करायला लक्ष्मणरावांना तब्ब्ल २ वर्ष लागली, नंतर मात्र शेतकऱ्यांनी तो नांगर स्वीकारला.
लक्ष्मणरावांना आपला व्यवसाय वाढवायचा होता, पण दिशा मिळत नव्हती. तेव्हा त्यांनी औंधचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचा दरबार गाठला. दूरदृष्टी असणाऱ्या राजांनी लक्ष्मणरावांच्या अंगची कला आणि त्यांचं यंत्रांप्रती असणारं प्रेम पाहून संस्थानाचा नकाशा मागवून हवी ती जागा निवडायला सांगितलं. लक्ष्मणरावांनी कुंडल रोडजवळील ३२ एकर ओसाड जमीन निवडली. राजांनी व्यवसाय उभारण्यासाठी १० हजार रुपयेसुद्धा दिले.
कुंडलजवळची ही जमीन म्हणजे निवडुंगांनी गच्च भरलेलं ओसाड माळरान. तिथं राहायचे ते भयानक विषारी असे साप आणि सरडे. या भकास माळरानावर औद्यगिक नगरीरुपी नंदनवन उभं करायचं स्वप्न उराशी घेऊन लक्ष्मणराव आणि रामूअण्णा कामाला लागले.
कुंडल रोड रेल्वे स्टेशन
किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशन
त्यावेळी देखील जास्त शिकलेली माणसं देखील गोऱ्यांच्या दरबारी नोकऱ्या करत. आपल्याला जास्त शिकलेल्या माणसांपेक्षा, ज्यांचा दृष्टिकोन आपल्यासारखा असेल अशी माणसं पाहिजेत या हेतूने घेऊन दोघे भाऊ माणसं एकवटण्याच्या कामाला लागले. रामूअण्णांनी स्वतः जातीने या नगरीचं नियोजन आणि प्रशासन पाहिलं. शंभूराव जांभेकर हे प्लॅनिंग इंजिनिअर म्हणून रुजू झाले, तर के.के. कुलकर्णी हे मॅनेजर म्हणून. मंगेशराव रेगे यांनी क्लार्क आणि अकाउंट विभाग पाहिला, तर इंजिनिअरिंग अर्धवट सोडलेल्या अनंतराव फाळणीकर यांनी इमॅजिनेटिव्ह इंजिनिअरिंग विभाग सांभाळला. लक्ष्मणरावांचा माणुसकीवर इतका विश्वास होता कि, तुरुंगातून सुटलेल्या तुकाराम रामोशी आणि पिऱ्या मांग यांना या नगरीच्या सुरक्षिततेची जबाबदारी दिली. अशा प्रकारे अनंत अडचणींवर उभी राहत होती ती ‘उद्यम नगरी’ म्हणजेच किर्लोस्करवाडी!
किर्लोस्करवाडी हे भारतातलं जमशेदपूर नंतरचं दुसरं औद्योगिक शहर आपल्या महाराष्ट्रात उभं राहत होतं. जमशेटजी टाटांप्रमाणेच लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी त्यांच्या स्वत:च्या उद्योगसमूहासाठी स्वतंत्र नगरी उभारण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यातून ‘किर्लोस्करवाडी’चा जन्म झाला. पहिल्यांदा आपल्या ३० कर्मचाऱ्यांची कुटुंबासहित राहायची सोय करत किर्लोस्करवाडी वाढत होती. लक्ष्मणरावांनी कारखान्याजवळच कामगारांची राहण्याची सोयही केली. कर्मचाऱ्यांना कामावर येण्या-जाण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागत नसल्याने त्यांच्या कामाची गुणवत्ताही वाढीस लागली. लक्ष्मणरावांनी परिसरात शाळा, क्रीडांगणे, पोस्ट ऑफिस अशा सुविधा निर्माण केल्या. मोठे रस्ते, प्रशस्त घरे, उद्याने, विद्यार्थ्यांसाठी शाळा-वाचनालय अशा सर्व सोयींनी सुसज्ज किर्लोस्करवाडी एक आदर्श नगर ठरले. लक्ष्मणराव स्वत:ही तेथे राहू लागले. प्रखर जातीवाद आणि स्पृश्य-अस्पृश्यता असणाऱ्या त्या वेळच्या समाजात किर्लोस्करवाडी हे असं ठिकाण होतं, जिथं कोणताही जातीभेद पळाला जात नव्हता. जिथं फक्त एकच जात होती माणुसकीची. एकमेकांच्या चुलीशेजारी चुली मांडून स्वंयपाक बनू लागला. आपोआपच मने जुळत गेली.
१५ जानेवारी १९२० मध्ये लक्ष्मणरावांची कंपनी कागदोपत्री रजिस्टर झाली आणि उदयाला आली ती किर्लोस्कर ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेड. पहिल्या महायुद्धानंतर किर्लोस्कर समूहाने ऊसाचा रस काढण्याचे यंत्र, छिद्र पाडण्याचे मशीन अशी साधने तयार केली. पहिल्या महायुद्धानंतर किर्लोस्कर समूहाने ऊसाचा रस काढण्याचे यंत्र, छिद्र पाडण्याचे मशीन अशी साधने तयार केली. हातपंपांची सुद्धा निर्मिती केली. एकूण वीस विविध प्रकारचे नांगर, दहा प्रकारचे हातपंप यांसह चाळीस उत्पादने कंपनीमार्फत बनू लागली.
लक्ष्मणरावांचं लग्न राधाबाई यांच्याशी झालं होतं. यंत्र हेच पाहिलं प्रेम असणाऱ्या लक्ष्मणरावांचा संसार राधाबाई यांनी नेटाने फुलवला. लक्ष्मणरावांना ५ मुलं. ४ पुत्र आणि एक कन्या. यातील मोठे शंतनुराव आणि पुतण्या यांना लक्ष्मणरावांनी शिकायला अमेरिकेतील Massachusetts Institute of Technology म्हणजेच MIT मध्ये पाठवलं. तिथून शिक्षण घेऊन आल्यानंतर शंतनुरावांनी किर्लोस्कर ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेडला जणू काही पंखच दिले.
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत लक्ष्मणराव स्वदेशीचे खंदे प्रचारक होते. लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतः किर्लोस्करवाडीला भेट देऊन त्यांच्या कार्याचा भरभरून गौरव केला. लक्ष्मणरावांची किर्लोस्करवाडी ही यंत्रांसोबतच क्रीडा कला यामध्ये सुद्धा संपन्न होत होती. क्रिकेट, फुटबॉल सारखे खेळ तिथं खेळले जायचे, किर्लोस्करवाडीचा रंगमंच हा बाबुराव पेंटर यांनी बनवलेला त्याकाळचा सर्वात सुबक आणि सुनियोजित रंगमंच होता. हा असा रंगमंच होता जिथं फक्त स्त्रिया आपल्या कला सादर करायच्या आणि ही त्याकाळची अत्यंत क्रांतिकारी गोष्ट होती. किर्लोस्करवाडीचा स्वतःचा प्रिंटिंग प्रेस होता, जिथं किर्लोस्कर खबर नावाने एक वृत्तपत्र चालत होतं, तर स्त्री नावाने निघणारं मासिक हे खास स्त्रियांसाठी चालवलं जात होतं. लक्ष्मणरावांनी किर्लोस्करवाडीत आधुनिक पद्धतीने शेती करायला देखील चालना दिली. तिथली जमीन पाहता त्यांनी द्राक्ष पिकाचं उत्पन्न घेऊन कित्येक शेतकऱ्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण केली.
लक्ष्मणरावांचं व्यापाराचं तंत्र अगदी साधं होतं. प्रॉफिट मार्जिन कमी ठेवायचं आणि व्यवसाय वाढवायचा. आपल्या कर्मचाऱ्यांसोबत बोलताना ते नेहमी तुमची कंपनी असा उल्लेख करत. किर्लोस्करवाडीत होणारे सण समारंभ, कर्मचाऱ्यांना मिळणारी वागणूक, प्रत्येक ठिकाणी केला जाणारा कर्मचाऱ्यांचा विचार यामुळं इथल्या प्रत्येक माणसाला ही कंपनी त्याची वाटायची. किर्लोस्कर ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेड हळू हळू पुणे, बंगलोर येथे देखील पसरू लागली.
सायकलच्या डिलरशिप पासून सुरु झालेला लक्ष्मणरावांचा प्रवास कुट्टी मशीन, ऊस तोडणी मशीन, लेथ मशीन, टेक्स्टाईल मशीन, भुईमूग सोलणी मशीन, हॅन्ड पंप, हॉस्पिटल फर्निचर करत वाढत गेला. लक्ष्मणरावांनी रचलेल्या किर्लोस्करवाडीच्या पायाला मुलगा शंतनुराव यांनी त्याला भक्कम आधार दिला, तर पुढच्या पिढ्यांनी त्याच्यावर कळस चढवला. भारतातील पहिला लोखंडी नांगर, पहिला पंप, पहिलं डिझेल इंजिन, पहिलं इलेक्ट्रिक इंजिन आणि पहिलं लेथ मशिनसुद्धा किर्लोस्करांनीच बनवलं. आज भारतात टोयोटा कंपनीच्या गाड्यासुद्धा किर्लोस्करांचीच कंपनी बनवते.
किर्लोस्करवाडीचा ४०वा वर्धापन दिन
लक्ष्मणरावांना औंध संस्थानचे दिवाण म्हणून 1935मध्ये नेमण्यात आले. किर्लोस्करवाडीच्या ४० व्या वर्धापन दिनी ८१ वर्षाचे लक्ष्मणराव आणि ९१ वर्षाचे रामूयाण्णा किर्लोस्करवाडीला भेट द्यायला आले. आजारी असणाऱ्या लक्ष्मणरावांना त्यांचा मुलगा पुण्यात औषधोपचारासाठी बोलवत होता, तेव्हा ८१ वर्षाच्या या तरुणाचे उद्गार होते कि, “जोपर्यंत पहिलं ऑइल इंजिन तयार होऊन बाहेर येत नाही, तोपर्यंत मी इथून कुठंही जाणार नाही.” अखेरीस डिसेंबर १९४८ ला पाहिलं इंजिन तयार झालं आणि लक्ष्मणराव पुण्याला गेले. बंगलोर वरून पुण्याला जाताना त्यांनी आपलं विमान किर्लोस्करवाडीवरून घ्यायला सांगितलं. एका ओसाड जमिनीला यंत्र, तंत्र आणि माणसांच्या साहाय्यानं जिवंत झालेलं पाहून ते भरून पावले. तिथल्या उंच इमारती, रस्ते, कंपन्या, माणसांची वर्दळ हे सारं डोळ्यात भरून अभिमानाने ते पुण्यात आले.
आज किर्लोस्कर ग्रुप ७० देशांत पसरलेला असून ग्रुपच्या २६ कंपन्यांमध्ये १८००० हून अधिक जण काम करत आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण जगातील अनेक मोठमोठ्या इमारतींमध्ये; मग ते दुबईतील बुर्ज खलिफा असो की अमेरिकेतील न्यू वर्ल्ड ट्रेड सेंटर… सिंगापूरचं मरीना बे असो की ऑस्ट्रेलियातील ओपेरा हाऊस… तिथे किर्लोस्करांचेच पंप तुम्हाला बघायला मिळतील…. एक भारतीय म्हणून आणि त्याठी एक मराठी माणूस म्हणून ही आपणा सर्वांसाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे.
‘काम करत राहा, प्रयत्न कधीही सोडू नका. यश स्वतःहून तुमच्याकडे चालत येईल’ हे सांगणाऱ्या भारताच्या या ‘हेन्री फोर्ड’ने अखेरीस २६ सप्टेंबर १९५६ रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन भारत सरकारने २० जून १९८९ मध्ये त्यांच्यावर पोस्टाचे तिकीट काढले. या महान उद्योजकाचा आदर्श घेऊन भविष्यात हजारो मराठी उद्योजक तयार होतील अशी खात्री आहे.
तर ही होती लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांची जीवनकहाणी. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.
तो काळ होता १८४०चा. भारत पूर्णपणे ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. इंग्रज भारतीयांची सर्वच बाबतींत पिळवणूक करत होते. समाज या अन्यायाविरुद्ध लढत होता, तर यातील एक भारतीय देशाच्या अर्थव्येवस्थेचा पाया रचत होता. ते द्रष्टे भारतीय म्हणजे टाटा ग्रुपचे संस्थापक आणि भारतीय उद्योगाचे जनक जमशेटजी टाटा.
गुजरातमधल्या नवसारी या छोट्या गावात नुसेरवान यांचा जन्म झाला. वयाच्या ५व्या वर्षी जीवनबाई या चिमुरडीसोबत त्यांचा विवाह झाला. वयाच्या १७ व्या वर्षी म्हणजे ३ मार्च १८३९ रोजी नुसेरवानजी वडील झाले आणि जन्माला आले ते भारताच्या उद्योगविश्वाचे भीष्म पितामह म्हणून नावलौकिक मिळवलेले जमशेटजी टाटा.
नवसारीतील पारशी परिवारासाठी आपल्या गावाची वेस ओलांडणं म्हणजे एक दिव्यच. हे दिव्य नुसेरवान यांनी पार केलं. सात पिढ्यांत व्यापार कशाशी खातात हेही कुणाला माहित नव्हतं. घरात पौरोहित्याची परंपरा असूनही व्यापाराचं खूळ त्यांच्या डोक्यात शिरलं आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते आपल्या परिवारासहित मुंबईला आले. तेव्हा जमशेटजी ८ वर्षांचे होते. हा तोच काळ होता जेव्हा इंग्रजीचं शिक्षण भारतीयांना द्यायला सुरुवात झाली होती. हेच वाघिणीचं दूध प्यायला जमशेटजी तयार होत होते. त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते वडिलांना उद्योगधंद्यात मदत करू लागले.
आपल्या मुलाच्या अंगचे व्यावसायिक गुण बघून नुसेरवान यांनी त्यांना थेट परदेशात व्यापारासाठी पाठवलं. अतिपूर्वेकडे असणाऱ्या हाँगकाँग या देशात गेलेले जमशेटजी पहिल्या परदेश दौऱ्यातच तिथं कंपनी स्थापन करुन आले, जमशेटजी आणि अर्देशीर या नावाने. औद्योगिक क्रांतीच्या दारात उभ्या असणाऱ्या जगामध्ये कापसाचं महत्व ओळखून त्यांची कंपनी कापसाचा व्यापार करत होती, तर चीनसाठी लागणाऱ्या अफूला देखील त्यांनी तितकंच महत्त्व दिलं. व्यवहार चातुर्य, संधी ओळखण्याचे कसब यामुळे जमशेटजींनी काही महिन्यांतच आपल्या पहिल्या कंपनीची शाखा शांघायमध्ये आणि दुसरी नंतर लगेच लंडनमध्ये उघडली. युरोपला कापड आणि चीनला अफू विकून तिथून चहा, वेलदोडे, सोनं, तयार कापड ते भारतात आणून विकत. यातून त्यांना भरपूर नफा मिळाला.
याच दरम्यान चालू होतं ते अमेरिकेचं यादवी युद्ध. भारतातील अनेक व्यापाऱ्यांचं दिवाळं निघालं. याची झळ टाटा परिवारालासुद्धा बसली, पण नुसेरवान आणि जमशेट पिता-पुत्राने यातून देखील मार्ग काढला. राहतं घर विकून सर्वांची देणी चुकती केली. यामुळे लोकांचा टाटा नावाशी विश्वास जोडला गेला.
१८६५ मध्ये यंत्रविद्येचे ज्ञान मिळविण्यासाठी जमशेटजी मँचेस्टरला गेले. इंग्लंडमध्ये ते चार वर्षे होते. स्वदेशी परतल्यावर कापडाची वाढती मागणी लक्षात घेता त्यांनी कापड गिरण्या सुरु करायचं ठरवलं. अंदाज घेण्यासाठी त्यांनी २१००० रुपयांत मुंबईच्या चिंचपोकळी भागातील दिवाळं निघालेली एक तेलगिरणी विकत घेऊन अलेक्झांड्रिया मिल असं तिचं नामकरण केलं. बऱ्यापैकी फायदा कमवून २ वर्षांनी ती विकून टाकली. त्यानंतर नागपूरला कापड मिल उभी करण्यासाठी जागा घेतली. त्याकाळी सगळ्या कापड गिरण्या मुंबईमध्ये होत्या. अशा वेळी नागपूरमध्ये मिल उभी करण्याला अनेकांचा विरोध असून देखील त्यांनी हीच जागा पक्की करत मोठ्या कष्टाने मिल उभी केली. कापसाचं मोठ्या प्रमाणावर उत्पन्न, वाहतुकीची सोय, पाण्याची उपलब्धता यामुळे जमशेटजी यांनी घेतलेला निर्णय अगदी योग्य ठरला. ब्रिटनची महाराणी व्हिक्टोरियाच्या गौरवार्थ आणि त्या काळाची गरज लक्षात घेता त्यांनी त्या मिलला एम्प्रेस मिल असं नाव दिलं. १८७७ मध्ये उभी राहिलेली ही गिरणी सप्टेंबर २००२मध्ये अखेर बंद पडली. या दोन गिरण्यांच्या अनुभवावरच कुर्ला येथील ‘धरमसी मिल’ ही जुनी गिरणी विकत घेऊन तिचे ‘स्वदेशी मिल’ असे नामकरण केले, तर अहमदाबादला ‘ॲडव्हान्स मिल’ सुरू केली गेली.
Empress Mill, Nagpur
Svadeshi Mill, Mumbai
आपल्या कारखान्यात काम करणारा प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे याची जमशेटजींना जाणीव होती. कर्मचाऱ्यांना अपघात विमा देणे, कामाचे तास कमी ठेवणे, त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे, कामाची जागा हवेशीर ठेवणे यांसारख्या गोष्टींमुळे त्यांच्या मिल या जगभरातील सर्वात सुनियोजित मिल म्हणून ओळखल्या जात होत्या. ज्या सुविधा पश्चिमी देशात देखील त्यांच्या कामगारांना मिळत नव्हत्या, त्या जमशेदजी त्याकाळी आपल्या कर्मचाऱ्यांना देत होते.
आर्थिक स्वतंत्रता हीच राजनीतिक स्वतंत्रतेचा आधार आहे हे जमशेटजी जाणत होते. दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता यांच्या विचारांचा प्रभाव जमशेटजींवर होता. जमशेटजींची ४ मोठी स्वप्नं होती. स्टील उद्योग उभा करणं, जागतिक दर्जाचं शैक्षणिक केंद्र उभं करणं, हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट उभा करणं आणि जागतिक कीर्तीचं हॉटेल उभं करणं. दुर्दैवाने यातील हॉटेल सोडल्यास इतर तीन स्वप्नं त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकली नाहीत, पण त्याची बीजं मात्र त्यांनी रोवली होती. आणि ‘शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी’ या म्हणीप्रमाणे त्यांच्या येणाऱ्या पिढीने ही सगळी स्वप्नं पूर्ण केली.
आपल्या अपमानाचा बदला म्हणून भारतीयांसाठी एक भलंमोठं हॉटेल बांधायचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. त्या काळातील ४ कोटी रुपये खर्च करुन ३ डिसेंबर १९०३ रोजी उद्घाटन झालेले ‘दि ताजमहल पॅलेस’ हे वीज वापरणारे देशातले पहिले हॉटेल होते! हे जगविख्यात हॉटेल कसं उभं राहिलं याची कहाणी आम्ही एका व्हिडीओमध्ये सांगितली आहे. त्याची लिंक खाली आहे. तो व्हिडीओ नक्की पहा.
मुंबईची वाढती विजेची गरज पूर्ण करण्यासाठी जमशेटजींनी २ कोटी रूपये भांडवल उभे करून फेब्रुवारी १९११ला खोपोली येथे जलविद्युत प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली. खंडाळा, लोणावळा येथे पडणारे पावसाचे पाणी १८०० फूट ऊंचीवरून खाली खोपोली येथे ७ पाइपलाइन टाकून आणायचे, तेथे जनित्राद्वारे वीज निर्माण करायाची व ती मुंबईला पोहोचवायची अशी ही योजना होती. त्याकरता वळवण येथे दोन धरणे बांधण्यात आली. १९११ साली केलेल्या या कामांत आजही कोठे गळती नाही, की कोणताही पाइप फुटला नाही. प्रचंड वेगाने कित्येक वर्षे या पाइपांतून पाणी येत आहे व ८००० मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. हे काम टाटांच्या ७ हजार लोकांनी ४ वर्षात पूर्ण केले. १९११ साली दळणवळणाची साधने, टेक्नॉलॉजी, परिस्थिती आणि इतर सोयींचा विचार केला, तर ह्या अफाट कामाची व दूरदृष्टीची टाटांची समज किती मोठी होती हे लक्षात येते.
Tata Power hydro plant, Khopoli
ब्रिटिश जहाजउद्योगाला टक्कर देण्याकरिता त्यांनी आपली ‘टाटा लाइन’ ही जहाजकंपनीही उभारली होती. तथापि ब्रिटिश सरकारच्या वाहतूकदरांच्या स्पर्धेत जमशेटजींना आपल्या स्वदेशी जलवाहतूक कंपनीची प्रगती साधणे शक्य झाले नाही व तो नाद त्यांना सोडावा लागला.
भारतात प्रगत विज्ञान संशोधन केंद्रासाठी जमशेटजींना ‘रॉयल सोसायटी ऑफ इंग्लंडसारखी’ एक संशोधन संस्था भारतात उभी करण्याची होती. यासाठी त्यांनी स्वामी विवेकानंदांचे मार्गदर्शन घेतले. या संस्थेसाठी जमशेटजींनी तेव्हा सव्वा लाख रु. दिले. अनेक दानशूर लोकांनी देणग्या दिल्या. पैसे कमी पडले म्हणून टाटांनी मुंबईतील आपल्या सतरा इमारती विकल्या. मंजुरीसाठी इंग्रज सरकारकडून उशीर झाला, तरी १९११ मध्ये बंगलोर येथे या संस्थेच्या इमारतीचा पाया घालण्यात आला आणि त्याच वर्षी २४ जुलैपासून संस्था कार्यान्वित झाली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अर्थात ‘भारतीय विज्ञान संस्था’ या नावाने ओळखली जाणारी ही ४४० एकरात पसरलेली संस्था आजही जगद्विख्यात आहे.
Indian Institute of Science (IISc), Bangalore
अर्थव्यवस्थेची प्रगती सातत्याने चालू राहण्यात लोखंड व पोलाद उद्योगाचा फार मोठा वाटा असल्याने जमशेटजींच्या ध्यानात आले होते. अनेक वर्ष शोधाशोध करून आणि संशोधन करून शेवटी बिहारच्या सिंगभूम जिल्ह्यातील साक्ची या छोट्याशा गावात कारखाना उभारण्याचे ठरले. १९११ साली ‘द टाटा आयर्न अँड स्टील कंपनी’ (टिस्को) हा कारखाना सुरू झाला. बघता बघता त्या गावाचं एका मोठ्या शहरात रुपांतर झालं आणि तेथील रेल्वेस्टेशनला ‘टाटानगर’ नाव देण्यात आलं. सध्या झारखंडमध्ये असलेल्या या शहराचं नाव जमशेटजींच्या गौरवार्थ ‘जमशेदपूर’ असं देण्यात आलं. आज टाटा स्टील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीत खनिज लोखंडापासून उत्कृष्ट पोलादापर्यंतच्या सर्व प्रक्रिया या पार पाडल्या जातात. टाटा स्टील आज भारतातील दुसरी मोठी कंपनी आहे.
प्रचंड अभ्यासू असणाऱ्या आणि जगभर फिरणाऱ्या जमशेटजींनी साताऱ्यातील पाचगणीचं महत्त्व त्या काळात ओळखलं होतं. तिथल्या हवामानात कॉफी आणि स्ट्रॉबेरी चांगली लागेल याची त्यांना खात्री होती. कॉफीत त्यांना यश मिळालं नाही, पण स्ट्रॉबेरी रुजली. फ्रान्समधून रेशमाचे किडे आणून बंगलोर, म्हैसूरमधील शेतकऱ्यांना त्यांनी रेशीम लागवडीचे धडे द्यायला सुरुवात केली. आज म्हैसूरच्या रेशमी साड्यांमुळे हा परिसर रेशीम उद्योगाचं केंद्र बनलाय, त्याच्या मुळाशी जमशेटजीच आहेत.
कर्मचार्यांच्या हक्क आणि अधिकारांसाठीही टाटा सदैव जागरूक राहिले. कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही ठीकठाक जगता यावं यासाठी भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ ही संकल्पना जमशेटजींनी जन्माला घातली. ही संकल्पना त्यावेळी पाश्चात्य देशांतसुद्धा सुरु झाली नव्हती. काम करताना काही अपघात झाल्यास त्यासाठी नुकसानभरपाईची सोय केली. जमशेटजी म्हणायचे, ‘आपण आपले भागधारक, कामगार यांच्या हिताचा विचार केला; तर प्रगतीचा मळा अधिक फुलतो.’
जमशेटजींनी आपला उद्योग अशा काळात चालू केला जेव्हा उद्योग क्षेत्र फक्त युरोपियनांचीच मक्तेदारी होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर खऱ्या अर्थाने तो औद्योगिकदृष्ट्या तारला गेला तो जमशेटजींच्या दूरदृष्टीने. टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा पॉवर, टाटा केमिकल्स, टाटा टी, टायटन इंडस्ट्रीज, टाटा कम्युनिकेशन्स, ताज हॉटेल्स आणि अशाच अजून १०० कंपन्या आणि त्यात काम करणारे ८ लाखांहून अधिक कर्मचारी ही आहे टाटांची देन.
जमशेटजींनी त्यांच्या दूरदृष्टीने टाटा सन्स लि. ची स्थापना करून तिच्याकडे आपल्या सर्व कंपन्यांचे व्यवस्थापन सोपविले. या संस्थेचे ८५ टक्के भांडवल टाटा कुटुंबातील मंडळींनी उभारलेल्या धर्मादाय न्यासांच्या मालकीचे असल्याने टाटा समूहातील विविध उद्योगांना होणारा फायदा या न्यासांकडे म्हणजे पर्यायाने जनतेकडे पोहोचविला जातो. एका प्रसिद्ध संस्थेच्या रिपोर्टमध्ये गेल्या १०० वर्षातील जगातील सर्वात दानशूर व्यक्ती म्हणून जमशेटजी टाटांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं.
१९ मे १९०४ रोजी जर्मनीतील न्यूहॅम येथे वयाच्या पासष्टाव्या वर्षी या महान उद्योगपतीचे निधन झाले. ‘भारतीय व्यापार व उद्योग यांच्या भरभराटीसाठी कोणत्याही तत्कालीन भारतीयाने जमशेटजींइतके प्रयत्न केले नाहीत’, हे लॉर्ड कर्झनचे उद्गार यथार्थाने जमशेटजींची थोरवी व्यक्त करतात. त्यांच्या पश्चात दोराबजी व रतनजी या त्यांच्या दोन मुलांनी वडिलांची परंपरा यशस्वीपणे पुढे चालविली.
शंभर सव्वाशे वर्षापूर्वी आपल्यातल्याच एका माणसाने एक स्वप्न पाहिलं. त्यासाठी त्याच्यासह पुढच्या कित्येक पिढ्यांनी जिवाचं रान केलं आणि आजचं हे नंदनवन उभं राहिलं. फक्त देशाची आर्थिक बाजू भक्कम करणारं हे स्वप्न मुळीच नव्हतं, तर देशाच्या सामान्य नागरिकाला सन्मानानं जगता यावं, त्याच्या सर्व गरजा त्याच्या आवाक्यातच पूर्ण व्हाव्यात असा त्यांचा दृष्टीकोन होता. संपत्ती निर्मिती हा टाटांचा उद्देश कधीच नव्हता, उलट समाजाकडून आलेले पैसे समाजालाच परत करावयाचे हे त्यांचे धोरण होते. कोणतीही पार्श्वभूमी नसताना उद्योग क्षेत्रातला ध्रुवतारा असणारे, भारतीय उद्योगाचे भीष्म पितामह म्हणजे जमशेदजी टाटा यांच्या चिरकाल टिकणाऱ्या कार्याला आणि प्रेरणेला आपल्यातही उतरवण्याचा प्रयत्न करूया.
तर ही होती जमशेदजी टाटा यांची जीवन कहाणी. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा.
असं म्हणतात की सुबत्ता असणाऱ्याच्या घरी जन्म घ्यायला नशीब लागतं, पण ती सुबत्ता टिकवून, ती कैकपटीने वाढवायला लागतात… ते कष्ट, प्रामाणिक प्रयत्न आणि सचोटी. अशीच गोष्ट आहे जेपी मॉर्गन यांची.
१७ एप्रिल १८३७मध्ये अमेरिकेतल्या एका श्रीमंत घरात जॉन पिअरपॉन्ट म्हणजेच जेपी मॉर्गन यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हे उद्योगपती आणि गुंतवणूकदार होते. लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि नेतृत्वगुण असणारे जेपी यांना, त्यांच्या वडिलांनी पहिल्यापासूनच व्यवहार ज्ञानाचे धडे द्यायला सुरुवात केली होती. स्वतःचा व्यवहार स्वतः करणे, एकट्याने प्रवास करणे यासारख्या अनेक गोष्टींमुळे मॉर्गन यांच्यामधील नेतृत्वगुण वाढत गेले.
नंतर त्यांनी आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि डंकन, शेअरमन अँड कंपनी या वडिलांच्या कंपनीमध्ये ते क्लार्क म्हणून रुजू झाले. व्यवसायात येणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करत मॉर्गन शिकत होते.
वडिलांच्या मृत्यूनंतर जेपी मॉर्गन यांनी संपूर्ण कंपनीचा ताबा आपल्या हाती घेतला. १८७१ मध्ये त्यांनी अँथनी ड्रेक्सेल यांच्यासोबत पार्टनरशिपमध्ये कंपनी सुरू केली. ही कंपनी वेगवेगळ्या कंपन्यांना भांडवल तसेच पैसे पुरवण्याचे काम करत होती. या कंपनीने अनेकदा अमेरिकन सरकारला सुद्धा पतपुरवठा केला होता. ड्रेक्सेल यांच्या मृत्यूनंतर मॉर्गन यांनी कंपनीचे नाव बदलून जेपी मॉर्गन अँड कंपनी असं ठेवलं. पुढं या कंपनीची घोडदौड इतक्या वेगात सुरु झाली की, १८९३ मध्ये जेव्हा अमेरिकेमध्ये मंदीची सुरुवात झाली, तेव्हा मॉर्गन यांच्या कंपनीने अमेरिकेतल्या जवळपास 20 ते 25 टक्के रेल रोड कंपन्या खरेदी केल्या.
लाईटचा शोध लावणाऱ्या एडिसनलासुद्धा, त्याची स्वतःची कंपनी उभी करण्यासाठी जेपी मॉर्गन त्यांनी मदत केली होती. १८९१ साली एडिसन जनरल इलेक्ट्रिक कंपनीचे होस्टेन इलेक्ट्रिक कंपनीमध्ये विलीनीकरण करून त्यांनी जनरल इलेक्ट्रिक कंपनी चालू केली. जी आजही अमेरिकेतली सर्वात मोठी कंपन्यांपैकी एक आहे.
मागील एका लेखामध्ये आपण अँड्र्यू कार्नेगी यांची माहिती पाहिली आहेच. याच कार्नेगी यांची सर्वात मोठी “कार्नेगी स्टील कंपनी” सुद्धा १९०१ मध्ये मॉर्गन यांनी खरेदी केली आणि “युनायटेड स्टील कार्पोरेशन” ही सर्वात मोठी स्टील कंपनी उभी केली.
तो काळ असा होता जेव्हा अमेरिकेत कोणतीच सेंट्रल बँक नव्हती. त्यामुळं लोन घेणं, पैसे पुरवणं या गोष्टी होत नव्हत्या. यावेळी जेपी मॉर्गन यांनी मंदीच्या काळात केवळ उद्योगधंद्यांनाच नाही, तर अगदी अमेरिकन सरकारला देखील पैसे पुरवले आणि अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचे काम केलेलं होतं. पुढे एक वेळ अशी आली, की अमेरिकेची संपूर्ण बँकिंग व्यवस्था ही मॉर्गन यांच्या हातात गेली होती. तेव्हा १९१३ मध्ये अमेरिकन सरकारने पहिली सेंट्रल बँक म्हणजेच फेडरल रिझर्व्ह सिस्टीम सुरू केली.
मॉर्गन यांच्या यशाची यादी केली लक्षात येईल की, अमेरिकेतील फायनान्स इंडस्ट्री, बँकिंग इंडस्ट्री, स्टील इंडस्ट्री, रेलरोड इंडस्ट्री, पॉवर इंडस्ट्री या सर्व मोठ्या उद्योगांवर फक्त मॉर्गन यांचच वर्चस्व होतं.
१९१३ मध्ये वयाच्या ७५व्या वर्षी, जेपी मॉर्गन यांनी जगाचा निरोप घेतला. सन 2000मध्ये मॉर्गन यांची कंपनी, चेज या कंपनीसोबत जोडली गेली आणि “जेपी मॉर्गन अँड चेज कंपनी” म्हणून नावारूपाला आली. मार्केट कॅपिटलायझेशनचा विचार करता ही जगातील सर्वात मोठी बँक आहे. तेल कंपन्यांना कर्ज देण्याच्या बाबतीत ही बँक जगात आघाडीवर आहे.
त्यांच्या कारकिर्दीमध्ये ते 48 मोठ्या कंपन्यांच्या संचालक मंडळावर होते. असे नाही की त्यांना कधीच कोणते अपयश आले नाही, पण येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये संधी शोधत ते पुढे जात राहिले. मॉर्गन आजच्या तरुणाईला हाच संदेश देतात की, तुम्ही कितीही श्रीमंतीत जन्माला आला तरी, तुमचं कर्तृत्व आणि स्वबळावर उभं केलेलं तुमचं विश्व, हेच तुम्हाला कीर्ती मिळवून देतं.
तर ही होती जेपी मॉर्गन यांची जीवन कहाणी. हा व लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा.
जगाच्या इतिहासात एकाहून एक श्रीमंत माणसं होऊन गेली आहेत, परंतु त्यांची श्रीमंती सार्थकी लागल्याची उदाहरणे मात्र बोटावर मोजण्याइतकीच. श्रीमंती आल्यानंतर माणसं अहंकारी, स्वार्थी आणि विलासी बनतात असे बहुतेक वेळा पाहायला मिळते. पैसा, प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊनही शालीनता जपणारी माणसं खूपच कमी असतात. परंतु या श्रीमंतीचा वापर सार्थक कार्यासाठी करणाऱ्या व्यक्तींची नावं इतिहासात अजरामर होतात. ते अनेकांचे प्रेरणास्रोत बनतात.
आज आपण अशाच एका दानशूर उद्योगपतीची जीवनकहाणी बघणार आहोत. ही गोष्ट आहे जगातील एकेकाळचे श्रीमंत, दानशूर आणि परोपकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि 100 वर्षे उलटूनसुद्धा आजही अनेकांचे प्रेरणास्थान असणाऱ्या उद्योगपती अँड्र्यू कार्नेगी यांची.
अँड्र्यू कार्नेगी यांचा जन्म २५ नोव्हेंबर १८३५ रोजी स्कॉटलंडमध्ये डनफर्मलाइन नावाच्या छोट्या शहरामध्ये एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील विल्यम कार्नेगी हातमाग कामगार होते, तर आई मार्गारेट शिवणकाम करून फाटक्या संसाराला ठिगळ लावायची. तो काळ होता औद्योगिक क्रांतीचा. या औद्योगिक क्रांतीमुळे हातमाग उद्योगावर परिणाम होऊन विल्यम कार्नेगी यांची नोकरी गेली. अशा परिस्थितीत कुटुंबाची उपजीविका भागवण्यासाठी घरदार विकून विल्यम कार्नेगी परिवारासहित अमेरिकेमधील पीटर्सबर्ग येथे येऊन स्थिरावले. तेव्हा अँड्र्यू बारा वर्षांचे होते.
त्यांना शिक्षणाची खूप आवड होती, पण इच्छा असून देखील त्याला शिक्षण घेता आलं नाही. त्याकाळी १०-१२ वर्षांची लहान मुलं सुद्धा काम करून कुटुंबाला हातभार लावायची. लहानग्या अँड्र्यूलाही कापड गिरणीत नोकरी मिळाली. काम भरपूर असायचं अन् पगार कमी. त्याच सुमारास अमेरिकेत टेलिग्राफ आणि रेल्वेच्या शोधामुळे अनेक नवीन संधी उपलब्ध झाल्या होत्या. पुढे अँड्र्यू टेलिग्राफ ऑफिसमध्ये मेसेंजर बॉय म्हणून कामाला लागले. हे काम करत असताना सवयीप्रमाणे प्रत्येक व्यक्ती सोबत ओळख करून ते बोलत असत. त्यामुळे पीटर्सबर्गसारख्या औद्योगिक शहरात अनेक व्यवसायिकांशी त्यांची चांगली ओळख झाली. कोणतीही गोष्ट लगेच आत्मसात करण्याच्या आपल्या कौशल्यामुळे अँड्रयू कार्नेगी टेलिग्राफ लिहिण्यात पारंगत झाले. त्यांच्या या कौशल्यावर थॉमस स्कॉट यांची नजर पडली.
थॉमस स्कॉट हे पेनसिल्व्हिनिया रेलरोड कंपनीचे रिजनल मॅनेजर, ती त्याकाळी जगातील सर्वात मोठी रेल्वेमार्ग बनवणारी कंपनी होती. अँड्र्यू कार्नेगी यांच्यासाठी ही सर्वात मोठी संधी होती. १२ वर्ष त्या कंपनीसाठी काम केल्यानंतर कार्नेगी यांनी नोकरीचा राजीनामा दिला. थॉमस स्कॉट यांनी त्यांच्यातील क्षमता ओळखून त्यांना आर्थिक गुंतवणुकीत मार्गदर्शन केले. नोकरी करत असतानाच कार्नेगींनी रेल्वे डब्यात झोपून प्रवास करता येईल अशा सीट्स बनवणाऱ्या कंपनीत गुंवतणूक केली होती. त्या सीट्सना भविष्यात चांगली मागणी येईल आणि आपल्याला त्यातून भरपूर पैसे मिळतील असा त्यांचा अंदाज होता. तो खरा ठरला.
यातून मिळालेला नफा त्यांनी इतर धंद्यात गुंतवायला सुरुवात केली. रेल्वेत नोकरीला असल्याने, रेल्वेचे लाकडी पूल आग लागल्यास जळून जातात किंवा पुराच्या पाण्यात वाहून जातात हे त्यांनी पाहिलं होतं. बाजारातली स्टीलची मागणी लक्षात घेता त्यांनी की-स्टोन ब्रिज ही कंपनी सुरु केली. की-स्टोन कंपनीने मिसिसिपी नदीवर जगातील पहिला स्टीलचा पूल बांधला. याआधी बांधले जाणारे सगळे पूल हे लाकडी होते, ज्याचं आयुष्य कमी असल्यामुळं, ते काही वर्षातच कोसळायचे. पण की-स्टोन कंपनीच्या स्टीलच्या पुलाने मात्र जादू केली. दीर्घकाळ टिकणारा हा पूल सर्वांच्या विश्वासास पात्र ठरला आणि अँड्र्यू कार्नेगी यांचा स्टील उद्योग जोमाने वाढू लागला.
हळूहळू कच्च्या तेलाच्या विहिरीपासून ते स्टील उत्पादन करणाऱ्या कंपन्यांपर्यंतचे सगळे उद्योग कार्नेगी यांनी खरेदी केले. त्यामुळे त्यांना “स्टील किंग” म्हणून ओळखले जावू लागले. १८८९ मध्ये अँड्र्यू कार्नेगी यांनी आपण खरेदी केलेल्या सर्व स्टील कंपन्यांना एकत्र करून कार्नेगी स्टील कंपनी सुरू केली. त्यावेळी ती जगातली सगळ्यात मोठी स्टील कंपनी होती. या कंपनीमुळे अमेरिका, इंग्लंडपेक्षा जास्त स्टील उत्पादन करू लागली.
याच दरम्यान एक घटना घडली; १८९२ मध्ये कार्नेगी स्टीलच्या कामगारांनी संप केला. पगारवाढ दिल्याशिवाय कामावर रुजू होणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली. कंपनी मॅनेजरने पोलिसांना पाचारण केलं. यावेळी झालेल्या चकमकीत १७ लोक मृत्युमुखी पडले. या घटनेनंतर मॅनेजरला कामावरून काढून टाकण्यात आले. पुढे संप मिटला, पण या घटनेमुळे कार्नेगींच्या नावलौकिकाला तडा गेला.
स्टीलची मागणी वाढत होती. अनेक मोठ्या विकासकामांसाठी स्टील वापरले जाऊ लागले. कार्नेगी स्टील गगन भरारी घेत होती; एक उद्योजक म्हणून कार्नेगी यशाच्या शिखरावर होते. पण त्याच वेळी १९०१ मध्ये अँड्रू कार्नेगी यांनी आपला व्यवसाय येथेच थांबवून, तो विकण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ते पासष्ट वर्षांचे होते.
अनेक कंपन्यांचे एकत्रीकरण करून युनायटेड स्टेट्स स्टील कॉर्पोरेशन या नावाने नवीन कंपनी बनवण्यात आली. १ अब्ज डॉलर्स उलाढाल असणारी ती जगातील पहिली कंपनी होती. याच वेळी जे. पी. मॉर्गन यांचा स्टील उद्योगाच्या पटलावर उदय झाला होता. आपले प्रतिस्पर्धी असणाऱ्या जेपी मॉर्गन यांनाच कार्नेगींनी आपली कंपनी विकली. हा व्यवहार ३० कोटी अमेरिकी डॉलर्सला झाला. या व्यवहारामुळे कार्नेगी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. अशा वेळी कार्नेगी यांनी काय करायला पाहिजे होतं? सगळी संपत्ती आपल्या परिवारासाठी ठेवून छान जगता आलं असत त्यांना!
पण श्रीमंत लोकांनी आपली कमाई स्वतःवर खर्च न करता चांगल्या कामांसाठी पैसे दान केले पाहिजेत असं त्यांचं मत होतं. त्यामुळे हा सगळा पैसा स्वतःजवळ किंवा परिवारासाठी न ठेवता, त्यांनी तो दान करायचं ठरवलं.
त्यांच्या मते अपुरं शिक्षण हे जगातील अनेक समस्यांचं मूळ होतं. आपल्याला कॉलेजला जात आलं नाही याचं त्यांना आयुष्यभर वाईट वाटायचं. त्यामुळे त्यांनी अमेरिकेतील अनेक शाळा कॉलेजेसना भरघोस देणग्या दिल्या. शांततेसाठी काम करणाऱ्या संस्थांना आर्थिक मदत केली. अनेक असाध्य आजारांवरील संशोधनाचा खर्च त्यांनी उचलला. मृत्यूनंतर आपला पैसा योग्य मार्गी लावण्यासाठी त्यांनी कार्नेगी फाउंडेशनची स्थापना केली. या फाउंडेशनच्या माध्यमातून आजही अनेक सामाजिक कार्यांसाठी मदत केली जाते.
एवढं सगळा दानधर्म करूनही कार्नेगी लोकांच्या जास्त लक्षात राहिले असतील, तर ते त्यांनी सुरु केलेल्या वाचनालयांमुळे. टेलिग्राफ कंपनीत नोकरीला असताना जेम्स अँडरसन नावाचे गृहस्थ लहान मुलांना त्यांच्याकडील पुस्तके मोफत वाचायला देत. त्यांच्यामुळे आपल्याला चांगले वाचायला आणि शिकायला मिळाले ही गोष्ट कार्नेगी कधीच विसरले नाहीत. त्यामुळे पैसे आल्यावर त्यांनी जगभरात जवळपास तीन हजारांपेक्षा जास्त लायब्ररी सुरु केल्या.
११ ऑगस्ट १९१९ रोजी अँड्र्यू कार्नेगी यांचं निधन झालं. पण “मरावे परी कीर्ती रुपी उरावे” या उक्तीप्रमाणे आजही कार्नेगी त्यांच्या अफाट कार्याच्या रूपाने अमर आहेत आणि सदैव राहतील. भरपूर पैसे मिळवणे ही मोठी गोष्ट आहे, पण मिळवलेला पैसा दान करण्यासाठी तेवढंच विशाल मनही लागतं हेच कार्नेगी यांनी दाखवून दिलं.
तर ही होती अँड्र्यू कार्नेगी यांची जीवन कहाणी. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि हो चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसल्यास लगेच सबस्क्राईबसुद्धा करा.
ही गोष्ट आहे एका अशा मुलाची जो चॉकलेट गोळ्या विकून जगातील सगळ्यात मोठा तेलाचा व्यापारी बनला. काळ्या सोन्याचा राजा असणाऱ्या, या माणसाचं नाव आहे जॉन डी. रॉकफेलर.
जॉन डेव्हिसन रॉकफेलर यांचा जन्म १८३९ मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे झाला. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या रॉकफेलर यांना लहानपणापासूनच घर चालवण्यासाठी काम करावं लागत होतं. त्यांच्या वडिलांचा औषधं विकण्याचा व्यवसाय होता; पण त्यात त्यांचा जम बसत नव्हता. त्यामुळं त्यांना अनेक शहरात फिरावं लागत होतं.
अखेरीस १८५४ मध्ये हे कुटुंब ओहिओ इथं येऊन स्थिरावले. जॉन यांना आपलं शालेय शिक्षण पूर्ण करायचं होत, पण परिस्थितीमुळं त्यांना ते करता आलं नाही. पोट भरण्यासाठी हाताला काम पाहिजे म्हणून त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी बुक किपिंगचा एक कोर्स केला आणि एका कंपनीमध्ये बुक किपर म्हणून रुजू झाले. लहानपानपासूनच त्यांना दानधर्म करायची भारी आवड होती. तेव्हाच त्यांनी ठरवलं होतं कि आपण जितक कमावू त्याच्यातील १०% उत्पन्न हे दान करायचं.
२६ सप्टेंबर या दिवशी त्यांना नोकरी मिळाली होती, म्हणून ते हा दिवस “जॉब डे” म्हणून साजरा करत. सुरुवातील प्रतिमहिना १६ डॉलर्स आणि नंतर ३१ डॉलर्स प्रतिमहिना पगारावर दोन वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करायच ठरवलं. त्यांनी बँकेतून लोन घेऊन, आपल्या सहकाऱ्यांसोबत स्वतःची कंपनी चालु केली. ही कंपनी धान्य खरेदी विक्री करायचं काम करत होती. अमेरिकेतील १८५७च्या मंदीच्या काळातसुद्धा रॉकफेलर यांचा व्यवसाय जोमात चालू होता.
त्याच दरम्यान, म्हणजे १८५० ते १८६० मध्ये चालू झालं ते “पेनसिल्वनिया ऑईल रश”. पेनसिल्वनियामध्ये तेलाच्या खाणी सापडल्या. त्यामुळे सगळे व्यापारी तेल खणण्याच्या व्यवसायाकडे वळले. पण तेल खाणकाम व्यवसाय बऱ्यापैकी नशिबावर अवलंबून असल्याने त्या मार्गाने न जाता रॉकफेलर यांनी तेल शुद्धीकरणाचे कारखाने चालू केले. आणि यातूनच जन्म झाला तो “स्टँडर्ड ऑइल”चा. चोवीस वर्षीय रॉकफेलर यांच्यासाठी हा खरा टर्निंग पॉइंट होता आणि अमेरिकेसाठीसुद्धा.
रॉकफेलर यांचा रिफायनरी व्यवसाय उत्तरोत्तर वाढत होता. यातून मिळणारा नफाही तितकाच मोठा होता, पण प्रश्न होता तो ट्रान्सपोर्टचा. या काळात रेल्वे इंडस्ट्री ही काही ठराविक लोकांच्या अधिपत्याखाली होती. त्यांच्या मर्जीशिवाय वाहतूक करणे शक्य नव्हते, यावेळी व्यवहार चातुर्य वापरून रॉकफेलर यांनी या लोकांसोबत बोलणी करून फक्त स्टॅंडर्ड ऑइल कंपनीसाठीच कमी दरात वाहतूक करण्याची परवानगी मिळवली. यामुळे स्टँडर्ड ऑइलचे केरोसीन हे सर्वात कमी किमतीला लोकांना उपलब्ध झालं.
त्यानंतर त्यांनी ऑइल हे पाईपलाईनद्वारे कसं ट्रान्सपोर्ट केलं जाऊ शकतं हे पाहिलं. पाइपमधून ऑईल ट्रान्सपोर्ट करण्याचा हा जगातील पहिलाच प्रयोग होता. तेलाचं शुद्धीकरण करताना खूप तेल वाया जात होतं. यावेळी रॉकफेलर यांनी एक कमिटी बसवून वाया गेलेल्या तेलापासून पासून काय बनवता येईल हे पाहिलं आणि तेव्हा जन्माला आलं ते tar म्हणजेच डांबर, पेट्रोलियम जेली आणि पॅराफीन वॅक्स.
Pipeline of Standard Oil, Img. Source : Britannica
Horizontal Integration पद्धतीचा वापर करून छोट्या आणि डबघाईला जाणाऱ्या सगळ्या कंपन्या takeover करत रॉकफेलर आपला व्यापार वाढवत होते. त्यांचा टेकओव्हरचा वेग इतका होता की दर महिन्याला ३-४ कंपन्या विकत घ्यायचे. आलेला सगळा नफा पुन्हा व्यवसाय वाढवण्यासाठी वापरत होते. याचा परिणाम असा झाला की, १८९०च्या दशकात अमेरिकेतील ९०% ऑइल रिफायनरी या फक्त स्टँडर्ड ऑईल कंपनीच्या होत्या; तर अमेरिकेत पुरवठा होणाऱ्या एकूण केरोसीनपैकी ९८ टक्के केरोसीन हे स्टँडर्ड ऑइल विकत होतं.
अशाप्रकारे स्टॅंडर्ड ऑइलची अमेरिकेत मक्तेदारी तयार होत होती. ती इतकी झाली की, स्टँडर्ड ऑइल अंतर्गत वीस हजार तेलाच्या विहिरी, ४००० ट्रान्सपोर्ट पाईपलाईन, तर जवळपास एक लाख कामगार काम करत होते.
१९०२साली इडा डारबेल या महिलेने स्टॅंडर्ड ऑइलवर काही लेख लिहिले. त्याच पुढे पुस्तक सुद्धा प्रकाशित झालं. यात तिने असा आरोप केला होता की, स्टँडर्ड ऑइलने अनेक कंपन्या जबदस्तीने विकत घेतल्या आहेत. यानंतर काही पत्रकारांनी सुद्धा रॉकफेलर यांच्यावर अनेक आरोप केले.
अखेरीस या मक्तेदारीला आळा घालण्यासाठी अमेरिका सरकारने “शेअरमन अँटी ट्रस्ट ऍक्ट” पारित केला. यामुळे स्टँडर्ड ऑइल ३४ वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विभागली गेली. विभाजनानंतरही या कंपन्या प्रगती करत होत्या. पुढे या कंपन्या एकमेकात विलीन होत एकत्र येत गेल्या. या कंपन्या आजही अमेरिकन तेल उद्योगाचा गाभा आहेत. अमेरिकेतील शेवरॉन, एक्सॉन मोबिल, ब्रिटिश पेट्रोलियम, मॅरेथॉन पेट्रोलियम या कंपन्या त्याचाच एक भाग आहेत.
१८९३ मध्ये त्यांची भेट स्वामी विवेकानंद यांच्यासोबत झाली. स्वामी विवेकानंदांकडून त्यांनी दानधर्म करण्याबाबत चर्चा केली. पुढे १८९५ नंतर रॉकफेलर यांनी रिटायरमेंट घेतली आणि आपले उर्वरित आयुष्य दानधर्म करण्यात घालवले. त्यांनी युनिवर्सिटी ऑफ शिकागो उभारण्यात मदत केली. १९०९ मध्ये चालू झालेल्या रॉकफेलर सॅनिटरी कमिशनने अमेरिकेतून हुकवर्म हा रोग समूळ नष्ट होण्यासाठी प्रयत्न केले आणि पुढच्या वीस वर्षात त्यांनी आपले लक्ष्य साध्य देखील केले. रॉकफेलर फाउंडेशनमार्फत त्यांनी रिसर्च अँड डेव्हलपमेंटला प्रोत्साहन दिलं. अशा अनेक सामाजिक कार्यांसाठी लक्षावधी डॉलर्स रॉकफेलर यांनी दान केले.
१९१६ साली ते आधुनिक जगातील पहिले अब्जाधीश बनले. अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या २ टक्के इतकी एकट्या रॉकफेलर यांची संपत्ती होती. आजच्या मूल्यानुसार हा आकडा ४८० अब्ज डॉलर्स म्हणजे ३५ लाख कोटींहून अधिक होतो. म्हणजे सध्या जगात सर्वात श्रीमंत असलेल्या एलोन मस्कहुन दुपटीने अधिक.
पुढे त्यांनी स्टील उद्योग क्षेत्रात सुद्धा शिरकाव केला. पण लवकरच स्टील उद्योग सम्राट अँड्र्यू कार्नेगी यांनी ती कंपनी विकत घेतली आणि यामुळे युनायटेड स्टील जगातील सर्वात मोठी कंपनी बनली. पुढील लेखात आपण याच युनायटेड स्टीलचे संस्थापक अँड्र्यू कार्नेगी यांचा जीवनप्रवास जाणून घेणार आहोत.
रॉकफेलर यांच्या दोन महत्त्वाच्या इच्छा होत्या, त्यापैकी एक म्हणजे १ लाख डॉलर्स कमावणे आणि दुसरे होते शंभर वर्षे जगणे. त्यातली पहिली इच्छा त्यांनी पूर्ण केली, पण दुसरी मात्र होता होता राहिली. वयाच्या ९७व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गरीब म्हणून जन्माला आलो तरी गरीब म्हणून मरणार नाही, हेच रॉकफेलर आपल्याला शिकवून जातात.
तर ही होती जॉन डी. रॉकफेलर यांची जीवन कहाणी. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा.
भारतीय रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याबद्दल नुकतेच SBI सह 3 मोठ्या बँकांना RBI ने दंड ठोठावला होता. त्यानंतर आता रिझर्व्ह बँकेने आता तीन सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये सारस्वत को ऑपरेटिव्ह या मुंबईतील बँकेचा देखील समावेश आहे.
तीन सहकारी बँकावर कारवाई
आरबीआयने मुंबई स्थित सारस्वत सहकारी बँक(Saraswat Co-operative Bank Limited), तसेच बेसिन कॅथोलिक सहकारी बँक (Bassein Catholic Co-operative Bank) आणि राजकोट नागरिक सहकारी बँक (Rajkot Nagarik Sahakari Bank) या तीन बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या तिन्ही बँकांकडून आरबीआयच्या बँकच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यासाठी आरबीआयने सारस्वत सहकारी बँकेला 23 लाख, बेसीन कॅथोलिक सहकारी बँकेला 25 लाख आणि राजकोट नागरी सहकारी बँक लिमिटेडला 13 लाख रुपयांचा दंड आकारला आहे.
संचालकाशी संबधित कंपन्यांना कर्ज
सारस्वत बँकेने आरबीआयच्या रेग्युलेशन कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केले आहे. तसेच सारस्वत बँकेच्या संचालकांनी त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांना नियमबाह्यपणे कर्जाचे वितरण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सारस्वत बँकेने ज्या कंपनीला कर्ज दिले होते त्याच कंपनीच्या संचालक पदावर सारस्वत बँकेचे संचालक देखील असल्याचे निदर्शनास आले. त्यासाठी आरबीयाने नियमांचे उल्लघन करण्याचे कारण देत सारस्वत बँकेवर 23 लाखांची दंडात्मक कारवाई केली.
त्याचप्रमाणे आरबीआयने वसई स्थित बेसिन कॅथोलिक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला ही दंड ठोठावला. कारण, बँकेने एका संचालकाच्या कंपनीसाठी अनियमितपणे कर्ज पुरवठा केल्याचे निष्पन्न झाले होते. तर राजकोट सहकारी बँकेला ठेवीवरील व्याज दरात अनियमितता आढळून आल्याने दंडात्मक कारवाई केली आहे..
मागच्या दोन महिन्यांपासून सामन्यांच्या किचनचे बजेट बिघडवणारा टोमॅटो आता कवडीमोल भावाने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. रबीचे पिक संपायला आले असताना आणि पावसाचा जोर वाढल्यामुळे दळणवळण समस्या निर्माण झाल्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये टोमॅटोचे भाव 200 च्याही वर पोहोचले होते. दिल्ली, एनसीआर आणि इतर काही राज्यांत टोमॅटो 250-270 रूपे किलो दराने विकले जात होते. आता मात्र हेच टोमॅटो 5-10 रूपये किलोने विकले जात आहेत.
शेतकरी हवालदिल
जुलै महिन्यात मान्सूनने देशभरात चांगलाच जोर धरला होता. पावसाने अनेक राज्यांना झोडपून काढले होते. अशातच टोमॅटोची सर्वात जास्त पुरवठा करणारे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आदी राज्यांमध्ये भूस्खलन, अतिवृष्टी अशा समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्र, राजस्थान आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये टोमॅटोची आवक मंदावली होती.
मात्र ऑगस्टमध्ये पावसाळा कोरडाच गेला आणि खरीपाचे पिक बाजारात यायला सुरुवात झाली. पिकाची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे टोमॅटोचे भाव देखील गडगडायला सुरुवात झाली. 200 रूपये पार गेलेले टोमॅटो आता 3 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपये किलोने शेतकऱ्यांना विकावे लागत आहेत. काही शेतकऱ्यांनी तर आता टोमॅटो गायगुरांना खाऊ घालायला सुरुवात केल्याचे देखील समोर आले आहे. सर्वाधिक फटका हा आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसला आहे.
सरकार घेणार निर्णय
शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेता सरकारी यंत्रणा देखील सज्ज झाल्याचे पाहायला मिळते आहे. स्थानिक बाजारपेठेत टोमॅटोची आवक वाढल्याने ज्या भागात टोमॅटोचे भाव पडले आहेत, तेथून सरकार थेट टोमॅटो खरेदी करू शकते.
केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या ग्राहक व्यवहार विभागाने याबाबत चाचपणी सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. सदर मंत्रालयाकडे किंमत स्थिरीकरण निधी (Price Stabilization Fund) असतो, जो निधी शेतीमालाच्या किमती स्थिर करण्यासाठी सरकार वापरू शकते. सदर निधीच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करू शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे.
अनेक दिवसांपासून फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलची वाट पाहणाऱ्या ग्राहकांची प्रतीक्षा आता संपली आहे. याचे कारण म्हणजे फ्लिपकार्टने या सेलची तारीख जाहीर केली आहे. येत्या 3 ऑक्टोबरपासून हा सेल सुरु होणार असून हा सेल 10 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. वर्षातील सर्वात मोठा सेल म्हणून कंपनीने या सेलची जाहिरात करायला सुरुवात केली आहे.
सध्या देशभरात सणासुदीचा माहोल आहे. सणासुदीला भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात. यात कपडे, इलेक्ट्रिक सामान, गृहपयोगी वस्तू, मोबाईल स्मार्टफोन आदींचा समावेश असतो. भारतीय ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन फ्लिपकार्टने हा सेल लाइव्ह करण्याची योजना आखली आहे.
काय ऑफर?
सध्या ‘बिग बिलियन डेज सेल’मध्ये किती सवलत दिली जाईल हे कंपनीने उघड केलेलं नाही. मात्र आतापर्यंतचे ट्रेंड लक्षात घेता मोबाईल स्मार्टफोन, फ्रीज, वाशिंग मशीन, कुकर, ओव्हन,टॅब्लेट, प्रिंटर,लॅपटॉप, मुला-मुलींचे कपडे तसेच गृहपयोगी वस्तूंवर 70 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
फ्लिपकार्ट अधिकृत विक्रेता असलेल्या Realme, Apple iPhone आणि Poco सारख्या कंपन्यांच्या स्मार्टफोनवर तगडा डिस्काऊंट मिळण्याची शक्यता आहे. सध्या अमेझॉनवर आयफोन 14 आणि 13 ससेरीजच्या काही स्मार्टफोन्सवर जवळपास 10 हजारांची सवलत दिली जात आहे. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी फ्लिपकार्ट देखील अशी योजना आणण्याच्या तयारीत आहे असे समजते आहे.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या सेलमध्ये स्मार्ट टीव्हीच्या वेगवेगळ्या ब्रांडवर वेगवेगळी सवलत दिली जाणार आहे. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये स्मार्ट टीव्हीची खरेदी जोरात होत असते, त्यामुळे प्रत्येक सेलमध्ये निरनिराळ्या कंपन्या धमाकेदार ऑफर्स देत असतात. यंदाच्या सेलमध्ये ग्राहकांना 80 टक्केपर्यंतच्या सवलतीच्या दरात स्मार्ट टीव्ही खरेदी करता येणार आहे.