स्पर्धा परीक्षा देणाऱ्याची संख्या वाढत चालली आहे. या परीक्षेत काहींना एक-दोन प्रयत्नातच यश मिळते. तर काही शेवटच्या संधीत पास होतात. खूप अभ्यास करुनही पेपर अवघड गेल्याचे विद्यार्थ्यांकडून ऐकायला मिळते. या सगळ्याचे गुपित तुमच्या अभ्यास करण्याच्या पद्धतीत दडले आहे. जर तुम्ही पुढील पद्धतीने अभ्यास केला तर नक्कीच स्पर्धा परीक्षेत पास व्हाल…
स्पर्धा परीक्षेची चांगली सुरुवात करणे म्हणजेच अर्धे काम फत्ते झाल्यासारखे असते. तुम्ही जशी सुरुवात करता तसाचा शेवट होतो. यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी शाळा-कॉलेज पासूनच करणे गरजेचे आहे. पुढे जाऊन एमपीएससी, यूपीएससी, बॅंकिंग आदी परीक्षा सोपी बनवायची असेल तर इंग्लीशकडे विशेष लक्ष द्यावे. शिक्षण घेत असतांना बातम्या पहाणे व वाचणे महत्त्वाचे आहे. देश-विदेशातील घडणाऱ्या घटनांचा होणारा परिणाम आणि प्रभाव अभ्यासणे आवश्यक आहे. विषयांमधून उमेदवारांचे सर्वंकष ज्ञान तपासले जाते, जे कुठल्याही शॉर्टकट किंवा फास्ट फॉरवर्ड अभ्यास पद्धतीने मिळत नाही. यामुळे लवकर तयारीला सुरुवात करणे योग्य आहे.
विविध पॅटर्न्सची आठवी ते बारावी पर्यंतची पुस्तके वाचणे फायद्याचे ठरेल. या पुस्तकांमधील मूलभूत माहिती खूप महत्त्वाची आहे ती एक प्रकारचा पायाच आहे. स्पर्धा परीक्षेत गणिताचा स्तर हा दहावीपर्यंतचा असतो. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविणे खूप महत्त्वाचे आहे. इंग्रजी लिहिण्याची व बोलण्याची सवय केलीच पाहिजे. यासाठी ग्रामरकडे लक्ष दयावे, इंग्लिश वर्तमानपत्र वाचा नंतर हळूहळू लहान-मोठ्या पुस्तकांकडे मोर्चा वळवावा. इंग्रजी चॅनेल्स वरील विविध विषयांवरील कार्यक्रम, परिसंवाद व चर्चा ऐकण्याने आपले शब्दोच्चार, बोलण्याची शैली इत्यादी सुधारण्यास मदत होईल.
प्रत्येक गोष्टींसाठी वेळेचे योग्य नियोजन हवे. कुठला विषय अधिक व कुठला कमी महत्त्वाचा, कुठला सोपा व कुठला कठीण इत्यादी बाबी डोळ्यांसमोर ठेवून वेळेचे नियोजन करता आले पाहिजे. प्रशासकीय सेवा परीक्षांमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर फेसबुक, ट्विट्टर इंटरनेटसारख्या वैज्ञानिक व इतर वेळखाऊ मोहांवर विजय मिळविता यायलाच हवा. बुद्धिमत्ता चाचणीवर भर शैक्षणिक वर्षांपासूनच द्यावा कारण कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील एक अविभाज्य घटक म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. यासाठी गतिमान आकडेमोड करणे, पाढे, वर्ग, घनसंख्या यांचे पाठांतर असावे. वाचनातूनच आजूबाजूच्या घटनांचा वेध घेता येतो, विचार प्रगल्भ होतात.
गणित हा कठीण वाटणारा विषय आहे. परंतु स्पर्धा परीक्षेत कलाटणी मिळवून देऊ शकतो. शाळेत असतानाच गणिताचा पाया मजबूत करायला हवा. यामधे काळ, काम, वेग, नाते संबंध, दिशा, तर्कशुद्ध युक्तिवाद आदी बाबींवर प्रश्न विचारले जातात.स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीकोनातून करिअर सापेक्ष विकास फार महत्त्वाचा आहे व तो केल्यास यश सहज साध्य आहे. करिअरशी निगडित अभ्यास आणि ज्ञान, करिअरसाठी आवश्यक गुणकौशल्ये, करिअरला पूरक अशा वृत्तीत बदल करणे उदा- पोलीस बनण्यासाठी तल्लख बुद्धिमत्ता, डिटेक्टिव्ह माइंड, तन्दरुस्त व चपळ शरीर असावे लागते. जर तुम्ही वरील पद्धतीने प्रामाणिपणे अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल.
वाचक मित्रांनो, तुम्हाला हा लेख कसा वाटला, हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच, तुमच्या जवळच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा. याव्यतिरिक्त तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवरील लेख वाचायला आवडेल, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
घरची प्रचंड गरिबी. बुद्धिमत्ता हेच भांडवल. पेड (ता. तासगाव, जि. सांगली) येथे प्राथमिक शिक्षण घेतलेल्या युवकाने मोठ्या भावाच्या मदतीने मुंबईची वाट धरली. “जमेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट’ हे ब्रीद घेऊन व्यवसायात शिरलेले अशोक खाडे यांच्या “फॅमिली’चा विस्तार आज साडेचार हजार कर्मचारी आणि सुमारे साडेपाचशे कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या “दास ऑफशोअर’ कंपनीत झालाय.
वडील चर्मकार. आई, बहीण दुसऱ्याच्या शेतात काम करीत…कधी-कधी आम्हा भांवडांनाही कामाला जावं लागायचं…..आयुष्यानं दिलेल्या चटक्यांच्या आठवणी अशोक खाडे सांगत होते…””सातवीपर्यंत पेडला शिक्षण झालं. पुढील शिक्षणासाठी तासगावला बोर्डिंगमध्ये राहायला लागलो. मी शिकावं म्हणून वडील व मोठ्या भावाचा जीव तुटायचा. माझ्या शिक्षणासाठी घरचे किती कष्ट घेतायेत, याची जाणीव असल्यानं रात्र-रात्र झोप लागायची नाही. बोर्डिंगला पोटभरीचं जेवण मिळायचं नाही. पण मोठं व्हायचं स्वप्न असल्यानं कोणतीही तक्रार नव्हती.
सन 1972 ला चांगल्या गुणांनी अकरावी झालो. त्या वर्षी मोठा दुष्काळ पडला. अंगात घालायला कपडेच नाही, तर पायताण कोठून येणार. आम्हाला शिकविणारे देसाई सर कळवळले. त्यांनी शर्ट व पायजमा घेऊन दिला. अकरावीच्या ऐन परीक्षेला पेनची निफ तुटली. जोशी सरांनी अडचण समजून घेत निफ आणून दिली. साठ टक्के गुण पडले. आज माझ्याकडे हजारो रुपयांचा पेन आहे; परंतु अकरावीतील “त्या’ पेनची किंमत कशालाही नाही. आजही माझ्याकडे तो पेन आहे. वडील बोर्डिंगवर आम्हाला भाकरी घेऊन यायचे आणि म्हणायचे, “राजांनो, गरिबी आणि दुष्काळ मी आणला नाही. तुम्ही धीर सोडू नका. माळावर जोपर्यंत पळस आहे तोपर्यंत आपल्याकडे गरिबी आहे, असे समजू नका. खूप शिका.’ वडिलांचे शब्द काळजाला भिडले,” खाडे म्हणाले.
खाडे कुटुंबीयांनी सन 1975 ला मुंबई गाठली. वैद्यकीय शिक्षण घ्यावे अशी माझी इच्छा होती, असे सांगून खाडे म्हणाले, “”रोजीरोटीसाठी आम्ही तिघेही भाऊ माझगाव डॉकमध्ये नोकरी करायला लागलो. मी डिझाइन विभागात होतो. मोठ्या भावाच्या आग्रहामुळे इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. नोकरी आणि शिक्षण दोन्ही सुरू झाले. सन 1983 मध्ये कंपनीच्याच कामासाठी जर्मनीला जाण्याची संधी मिळाली. नवीन उमेद निर्माण झाली होती. गरिबी तर टोचत होतीच, स्वतःचे काही तरी करायचा ध्यास घेतला. त्यातून सन 1992 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला. अन्य भावांनीसुद्धा राजीनामा दिला. तिघेही एकत्र राहत होतो आणि घरात एक प्रकारचे इंजिनिअरिंगचेच वातावरण होते. गरिबीत आयुष्यभर जगण्यापेक्षा थोडेच आयुष्य जगू; परंतु ते चांगले असेल असा ध्यास घेऊन “दास ऑफशोअर‘ची निर्मिती झाली. मराठी माणूस, त्यातही खाडे आडनाव म्हटल्यावर कोण काम देणार, हा प्रश्न होताच. त्यामुळे तिघा भावांच्या नावांची आद्याक्षरे घेऊन (दत्तात्रय, अशोक आणि सुरेश) कंपनीला “दास’ नाव दिले. नावसुद्धा “के. अशोक’ असे सांगायचो. पहिले काम माझगाव डॉकमध्येच मिळाले. मुंबईतील पहिला स्कायवॉक बांधला. मग मागे वळून पाहिले नाही.”
“दास’ कंपनीने ओएनजीसी, ब्रिटिश गॅस अशा नामवंत कंपन्यांसाठी भरसमुद्रात प्रकल्प बांधणीचे काम केलेय. या समूहाच्या इंजिनिअरिंग, डेअरी, ऍग्रो प्रॉडक्ट्स, रस्ते बांधणी, उड्डाणपूल अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत सात कंपन्या आहेत. अबुधाबीचे प्रिन्स शेख महमंद बिन खलिफा बिन झायर अल नयन यांच्याबरोबर व्यावसायिक भागीदारी केल्याचे खाडे अभिमानाने सांगतात.
वारकरी वृत्तीचे असलेले खाडे यांचा ज्ञानेश्वरीवर गाढा विश्वास. जमशेठजी टाटा, मदर तेरेसा हे त्यांचे आदर्श. एक रुपयातील एक भाग समाजासाठी, एक भाग देवासाठी, एक भाग कामगारांसाठी आणि उर्वरित भाग स्वतःसाठी अशी त्यांनी उत्पन्नाची वाटणी केलीय. वर्षभर बीएमडब्ल्यूमध्ये फिरणारे खाडे पंढरीची पायी वारी करतात. ज्या चित्रा टॉकीज जवळील झाडाला टेकून वडील गटई काम करत होते, त्या झाडाला समोरून जाताना न चुकता नमस्कार करतात. खाडे यांनी मास्टर इन फिलॉसॉफी पूर्ण केले असून, संत ज्ञानेश्वर महाराजांवर पीएचडी करण्याचा विचार आहे.
“दुसऱ्यांवर केलेले उपकार तळहातावर लिहिण्यापेक्षा तळपायावर लिही, की जे फक्त मातीच वाचू शकते’ हे समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचे शब्द खाडे यांनी मनात कोरले आहेत.
मराठी असल्याचा त्यांना प्रचंड अभिमान आहे. ‘माझ्या कंपनीत चेहऱ्यावर चिंता असलेला एक ही कर्मचारी दिसणार नाही. ज्या शेतात माझी आई शेतमजूर म्हणून काम करत होती, ती शेती मी विकत घेतली आहे. ज्या गावात दगडू चांभाराचा मुलगा अशी ओळख होती, ते गाव आता “आबा’ म्हणून ओळखत आहे. आजही आम्ही भाऊ एकत्र कुटुंब म्हणून राहतो. एकत्र कुटुंबात जी ताकद आहे, ती कशातच नाही. त्या भक्कम आधारामुळेच आम्ही आयुष्यात काही तरी करू शकलो.”
अशोक खाडेंचा “गुरुमंत्र’ “जमेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट’ हे ब्रीद लक्षात ठेवा. कष्ट करा. प्रामाणिक कष्टांचे फळ नक्की मिळेल. आईवडिलांना, समाजाला कधी विसरू नका.
वाचक मित्रांनो, तुम्हाला हा लेख कसा वाटला, हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच, तुमच्या जवळच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा. याव्यतिरिक्त तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवरील लेख वाचायला आवडेल, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
जर तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल, तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालतील, पण असावेतच. नसतील, तर ते सरावाने व माहिती घेऊन विकसित करावेत. मी असे अत्यंत महत्वाचे ३० गुण देत आहे :
१) डोमेन एक्सपर्ट :
उद्योजक हा आपल्या क्षेत्रातील डोमेन एक्सपर्ट असला पाहिजे. तो ज्या क्षेत्रात व्यवसाय करतो त्या क्षेत्राची माहिती त्याला हवी. त्या क्षेत्रातील ज्ञानी म्हणून त्याची मार्केटमध्ये ओळख हवी. तेव्हाच तो आपल्या क्षेत्रातला एक आघाडीचा व्यावसायिक मानला जाईल.
२) अस्वस्थ :
यशस्वी व्यावसायिक हा कधीही एका ठिकाणी स्वस्थ बसत नाही, काही ना काही व्यावसायिक कुरापती चालू असतातच. स्वस्थ बसेल तो उद्योजक कसला? यशस्वी उद्योजक वर्षाचे ३६५ दिवस, २४ तास सतत व्यस्त व अस्वस्थ असतो. तो सतत असमाधानी असतो, त्याला अजून पुढे जायचे असते.
३) रीचेबल :
हा आपले लोक व व्यवसायासंबधी जे कोणी आहेत, त्यांच्यासाठी नेहमी रीचेबल असतो, फोनद्वारे, इमेलद्वारे, व्हॉटसअपने व प्रत्यक्ष भेटण्यासाठी. हा कोणत्याही व्यवसायिकांचा अत्यंत महत्वाचा गुण आहे, व्यावसायिक अधिक मोठा असल्यास त्याचे पी. ए. व पी. आर. ओ. असतात.
४) प्रवासी :
यशस्वी व्यावसायिक हा प्रवासी असतो. तो जेव्हा संधी मिळेल, तेव्हा देश विदेशात प्रवास करत असतो. प्रवासामुळे आपणास अनेक संधी, कल्पना सुचतात. त्याचा आपल्या व्यवसाय वाढीसाठी खूप उपयोग होतो, तेव्हा प्रवासाची आवड असावी.
५) शिस्तशीर :
तो खूप शिस्तशीर असतो. त्याच्या जीवनात व व्यवसायात अस्ताव्यस्तपणा नसतो. सर्व काही जिथल्या तिथे असते, मग ते ऑफिस असो, घर असो, गाडी असो किंवा इतर कोणतीही गोष्टी. व्यवस्थितपणा हा खूप महत्वाचा गुण आहे.
६) व्यवहार कौशल्यता :
कोणत्या गोष्टीला किती पैसे द्यायचे? कोणामागे किती वेळ घालवायचा? पैसे कोठे वाचवायचे व कोठे खर्च करायचे? इत्यादी व्यवहारात चाणाक्षपणा असायला हवा.
७) निर्लज्जपणा व बिनधास्त :
व्यावसायिक आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी, तो लोकांना सांगण्यासाठी अत्यंत निर्लज्ज व बिनधास्त असावा. माझा एक व्यावसायिक मित्र त्याच्या नवीन उत्पादनाबद्दल स्मशानात माहिती देत होता. तेव्हा प्रसंग कोणताही असो, आपल्या व्यवसायाबद्दल निर्लज्जपणे काम करा.
८) अर्थिक साक्षरता :
पैसा, गुंतवणूक, अर्थसहाय्य, कर्ज, सबसिडी, कर, शेअर्स, खेळते भांडवल, अकाउंटिंग, फायनान्स इत्यादी सर्वांबद्दल चांगली माहिती ही उद्योगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे.
९) अत्यंत आवड :
व्यवसाय व उद्योग हा नोकरीसारखा नसतो. ती थोडावेळ लागली म्हणून करण्याची गोष्ट नव्हे, ती एक स्वत:हून स्वीकारलेली जीवनपद्धती असते. तुम्हाला उद्योगाच्या जीवनपद्धतीची अत्यंत आवड असावी.
१०) गंभीर :
यशस्वी व्यावसायिक आपले काम, उत्पादन, उद्योग इत्यादी सर्व गोष्टीबद्दल अत्यंत गंभीर असतो, त्याला थोडादेखील हलगर्जीपणा चालत नाही.
११) प्लॅनिंग :
तो अत्यंत चांगला प्लॅनर असतो, तो स्वतःच स्वतःच्या जीवनाचा आर्किटेक्ट असतो. प्लॅनिंग हे शास्त्र आहे, ते शिकून घेऊन आपण तसे गुण डेव्हलप केले पाहिजेत.
१२) विपणन तज्ञ :
त्याला मार्केटिंग व जाहिरात क्षेत्रातील चांगले ज्ञान असते. मार्केटिंग व जाहिरात हा त्याचा अंगभूत गुण झालेला असतो. मार्केटिंग हा कोणत्याही व्यावसायिकासाठी अत्यंत महत्वाचा गुण आहे.
१३) सकारात्मक :
त्याचा दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक असतो. नाही हा शब्द त्याच्या शब्दकोशात नसतोच. जसे ‘दुनिया उम्मीद से चलती है’, तसे उद्योग उद्योजकाच्या सकारात्मक गुणावर चालतो.
१४) तंत्रज्ञानी :
आजच्या युगात टेक्नॉलॉजीची माहिती असणे अनिवार्य झाले आहे, आपल्या व्यवसायासाठी व प्रगतीसाठी लागणाऱ्या टेक्नॉलॉजीची त्याला चांगली माहिती असते.
१५) विश्वासार्हता :
त्याची खूप मोठी विश्वासार्हता मार्केटमध्ये असते. त्याच्या शब्दाला खूप मोठा मान व भरोसा असतो. केवळ शब्दावर कोट्यावधीचा माल उधार मिळतो. तेव्हा स्वत:च्या शब्दाला मोठी किंमत निर्माण केली पाहिजे.
१६) सहभागी :
हा समाजातील, व्यवसायातील बऱ्याच संघटना, मित्र, कुटुंबे यांच्याशी संबंधित व सहभागी असतो. तो एकटा राहत नाही. तो जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कार्यक्रमांत आवर्जून सहभागी होतो.
१७) ग्राहक जाणकार :
हा व्यवसायाचा की-पॉईंट आहे. जो आपल्या ग्राहकांना, श्रोत्यांना चांगला जाणतो. त्यांना केव्हा काय हवं आहे, ते तो जाणतो व अत्यंत यशस्वी होतो. हा गुण अनुभवाने व अभ्यासाने डेव्हलप होतो.
१८) स्वतःमध्ये गुंतवणूक :
व्यायाम, अभ्यास, ट्रेंनिग, तंत्रज्ञान इत्यादी शिकण्यामुळे स्वतःचा वेळ व पैसा कारणी लागतो व स्वत:चे व्यक्तिमत्व सतत प्रगल्भ बनवत राहतो.
१९) हॉलीडे मॅन :
स्वत:चे जीवन व कुटुंबाला आनंदी ठेवण्यासाठी वर्षातून काही दिवस सुट्टी घेवून फिरायला जातो. कामाचा ताण कमी करून तो मन फ्रेश करून परत येतो. तेव्हा थोडा थोडा हॉलीडे ब्रेक हा गरजेचा गुण आहे.
२०) डेलीगेशन :
काम सोपवण्याचे कौशल्य त्याच्याकडे असते, कोणाला कोणते काम सांगायचे व कसे करून घ्यायचे हे त्याला माहीत असते. यालाच ‘आर्ट ऑफ डेलीगेशन’ म्हणतात.
२१) सातत्य :
कोणतेही काम, उत्पादन, व्यवसाय यात कमालीचे सातत्य असते. एखादे काम उत्साहाने कित्येक वर्षे, दशके तो चालवतो, वाढवतो. तेव्हा सातत्य हा मोठा गुण यशस्वी उद्योजकांत दिसून येतो.
२२) दूरदृष्टी :
त्याला पुढील ५, १०, २० वर्षांनंतरच्या गोष्टीचा सेन्स असतो. आज काय करावे, म्हणजे पुढील काही वर्षात आपल्याला फायदा होईल, याचा सेन्स त्याला असतो व तसे तो निर्णय आजच घेतो. यालाच दूरदृष्टी म्हणतात.
२३) मोटीव्हेटर :
तो खूप चांगला मोटीव्हेटर असतो. तो लोकांना, कर्मचाऱ्यांना, मित्रांना सतत प्रेरणा देत असतो. त्याला बघितल्यावर आजूबाजूच्या लोकांना उत्साह येतो. त्याच्या डोळ्यात एकप्रकारचे तेज असते.
२४) स्वप्नाळू :
तो सतत स्वप्नं पाहतो. स्वप्नं पाहणे व ती सत्यात उतरवणे हा जणू काही त्याचा छंद असतो. आज सायकलवरून फिरणारा उद्योजक कारची स्वप्नं बघतो व पुढील २-३ वर्षात तो कारने फिरतो. तेव्हा स्वप्नं पहा.
२५) खवय्या :
हा खूप चांगला खवय्या असतो. चांगले चांगले पदार्थ शोधणे, ते खाणे याचा तो शौकीन असतो. त्याला नेहमी आवडीचे व चटकदार खाण्याची सवय असते.
२६) रिस्क टेकर :
रिस्क घेण्याची तयारी नेहमी असावी लागते. खूप विचार करणारा, घाबरणारा व्यक्ती कधीही उद्योजक होऊ शकत नाही. तेव्हा रिस्क टेकिंग हा खूप महत्वाचा गुण असावा लागतो.
२७) दुर्दम्य आत्मविश्वास :
आपल्या कामावर, उत्पादनावर, व्यवसायात व स्वतःवर अत्यंत दुर्दम्य आत्मविश्वास असतो. कोणत्याही परिस्थितीत आपली योजना व उद्योग यशस्वी होणारच असा त्यांचा कमालीचा विश्वास असतो.
२८) स्वीकारणारा :
नवीन येणाऱ्या गरजेच्या गोष्टी तो परत शिकतो व स्वीकारतो. त्यासाठी स्वत:च्या विचारसरणीत पटकन बदल करतो. तो जगाबरोबर ताबडतोब स्वतःला बदलतो व अपडेट राहतो.
२८) संवादक :
याचे कम्युनिकेशन स्किल खूप चांगले असते. आपले म्हणणे दुसऱ्याला कसे पटवून सांगायचे, आपले काम कसे काढून घ्यायचे हे यांना चांगले माहित असते. तेव्हा चांगला संवादक असणे हा महत्वाचा गुण आवश्यक आहे. मग संवाद फोनद्वारे असो, इमेलद्वारे किंवा प्रत्यक्ष.
३०) सेल्फ आणि फास्ट स्टार्टर :
एखादी गोष्ट करायची ठरवल्यानंतर ती स्वतः व पटकन सुरुवात करतो. तो विचार करण्यात, ठरविण्यात फारसा वेळ घालवत नाही. फटाफट सुरुवात करणे हा त्याचा गुण आहे, त्याला फास्ट मुव्हर म्हणतात. बाकीचे लोक काय करायचे व कसे करायचे याचा विचार करतात, तेवढ्या वेळेत उद्योजक काम सुरू करून बराच पुढे निघून गेलेला असतो.
महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा, मराठी मुलं उच्चतम स्पर्धेत यशस्वी व्हावीत यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.
आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर आत्मविश्वास गरजेचा आहे. त्याशिवाय तुमचे कष्ट, बुद्धिमत्ता काही उपयोगाची नाही. कामाच्या ठिकाणी तर हा आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. हा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी काही खास टिप्स. या टिप्सच्या साहाय्याने तुमचा आत्मविश्वास वाढण्यास आणि यशस्वी होण्यास मदत होईल.
ड्रेसिंग
उत्तम ड्रेसिंग सेंस असल्यास तुम्ही आकर्षक दिसता. तुमचे व्यक्तिमत्त्व खुलून येते आणि त्यामुळे तुम्ही इतरांना प्रभावित करु शकता. त्याचबरोबर तुम्हाला स्वतःलाच आतून छान वाटते. परिणामी तुमचा आत्मविश्वास वाढतो.
स्वतःची उपेक्षा करु नका
कामाप्रती प्रामाणिक आणि समर्पणाची भावना असणे गरजेचे आहे. मात्र हे सर्व करत असताना स्वतःकडे दुर्लक्ष करु नका. तुमचे उत्तम आरोग्य तुम्हाला आत्मविश्वास देते. त्यामुळे स्वतःकडेही लक्ष द्या. स्वतःला कमी लेखू नका किंवा स्वतःची उपेक्षा करु नका.
लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करा
नवीन जागी किंवा नवीन ठिकाणी गेल्यावर थोडेसे संकोचल्यासारखे वाटते. पण यातून बाहेर पडत आजूबाजूच्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्ही थोडे कंफर्टेबल व्हाल आणि एकदा कंफर्ट आला की आत्मविश्वासही बळावेल.
चुका करण्यास घाबरु नका
तुमच्याकडून एखादी चूक झाली असल्यास त्याचा स्वीकरा करा. त्याचबरोबर चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. पण त्यामुळे तुमचा आत्मविश्वास गमावू नका. नवीन किंवा माहित नसलेल्या गोष्टी शिकून घ्या. कामाचे स्वरुप नीट समजल्यावर तुमचा आत्मविश्वास आपसुकच वाढेल.
नजरेला नजर देऊन बोला
डोळ्यात बघून बोलण्याने तुमचा आत्मविश्वास प्रतीत होतो. त्यामुळे नजर चुकवून बोलू नका. त्यामुळे इतरांना वाटेल की, तुम्हाला बोलण्यात काही इंटरेस्ट नाही.
यश हे प्रयत्नानेच मिळवावे लागते. गेलेली वेळ पुन्हा मिळवता येत नाही. साक्षर असलेल्या महाराष्ट्रातील लोकांजवळ आत्मविश्वासाचा अभाव आहे. फक्त थडग्यातील दफन केलेल्या व स्वर्गवासी झालेल्या माणसांनाच समस्या नसतात, बाकी प्रत्येकालाच समस्या असतात. आयुष्यात विविधता आणता येते ती यशस्वी माणसांनाच.
यशामागे परिश्रम आहेत, प्रचंड असा आत्मविश्वास आहे. बिल गेट्सच्या बाबतीत त्याच्या शिक्षकांनी सांगितले होते की, हा मुलगा यशस्वी होणार नाही; परंतु याच बिल गेट्सने संगणकामध्ये क्रांती घडवून आणून अब्जावधी रुपये कमावले.
कर्नल सँडर्स हा उत्कृष्ट स्वयंपाकी होता. आपल्या 65 व्या वाढदिवशी त्याने मित्रांसाठी कोंबडीचे जेवण केले. मित्राने खुश होऊन त्यास एखादे हॉटेल काढ असा सल्ला दिला. याच कर्नल सँडर्सने 299 ठिकाणी नकार पचवला. 300व्या ठिकाणी त्यास चिकन बनवण्याचे काम मिळाले. ते काम मिळताच अडीच वर्षात सँडर्सने 86 देशांत 13,000 हॉटेल्स काढली. त्याची रोजची कमाई 27 लाख डॉलर्स आहे.
सुनीता पंडेर नावाची युवती 30 वेगवेगळ्या प्रकारची विमाने चालवायला शिकली. पॅराशूटमधून जंपिंग केले. नासाच्या परीक्षेत नापास झाली; पण तिने जीव दिला नाही.
यशाच्या पाठी लागणाऱ्या माणसाच्या पाठी पैसा आपोआप येतो. ज्या माणसाला कष्टाची सवय लागलेली असते, अशी माणसे कधीच अयशस्वी होत नाहीत. यशस्वी होण्यासाठी तुमच्या आजूबाजूला जी सामान्य माणसे जे काही करतात ते करायचे टाळा, म्हणजे तुम्ही असामान्य व्हाल. ज्ञान हे कोणत्याही वयात घेता येते. कौशल्य आणणे हे तुमच्या हातात आहे. सवयी बदलल्या की तुम्ही कोणीतरी बनू शकाल. कृती करताना तुम्ही-आम्ही सबबी सांगतो, परमेश्वराने तुम्हाला मन, बुद्धी, आयुष्य दिलेले आहे, तेव्हा तुम्ही किडामुंगीसारखे का जगता? आपण यशस्वी होऊ शकत नाही, असे आपल्या मनावर बिंबवलेले असते. त्यामुळे मानसिकदृष्ट्या असलेले अपंगत्व फेकून द्या.
जेसिका कॉक्स नावाच्या मुलीला दोन्ही हात नव्हते; परंतु ती निराश झाली नाही. तिने आपल्या वडिलांजवळ विमान चालवण्याचा हट्ट धरला आणि विशेष म्हणजे ती पायाने विमान चालवते.
स्वप्न पाहणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. स्वप्न वास्तवात आणणे हे तुमचे कर्तव्य आहे. जबरदस्त आत्मविश्वासामुळे अपंग माणसेही जीवनात यशस्वी होतात. तुमचे आयुष्य तुम्हीच बदलू शकता.
प्रत्येकाच्या आयुष्यात एकवेळ तरी अशी येते, की तो प्रवासाला निघताना स्टॅंडवर किंवा स्टेशनवर पोचतो अन् एक किंवा दोन मिनिटांसाठी गाडी चुकते. चूक बसची किंवा ट्रेनची नसते. ती पकडण्यासाठी आपण एक-दोन मिनिटे उशिरा पोचतो. अशाच रीतीने एखादे वेळी आलेली संधीदेखील आपण गमावतो. दोष संधीचा नसतो. आपल्या नियोजनाचा, प्रयत्नांचा असतो. आयुष्य एखाद्या कादंबरीसारखं आहे. रोजचा एक दिवस म्हणजे कादंबरीचे एक पान. त्यातील प्रत्येक पान निराशा किंवा अपयश घेऊन येत नसतं. एखादं पान किंवा एखादा धडा तसा असला म्हणून संपूर्ण कादंबरी तशी नसते. तेव्हा आपण खचून न जाता, ती कादंबरी वाचत राहिलं पाहिजे.
फुलपाखरांना फक्त चौदा दिवसाचं आयुष्य मिळतं, पण तेवढंही आयुष्य ते आनंदानं बागडत वावरतं. म्हणून छोट्या अपयशानं खचून जाऊ नका. धीर सोडू नका. प्रयत्न सोडू नका. त्यासाठी अपयशाची भीती न बाळगता ध्येय निश्चित केलं पाहिजे आणि ते पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठलाग केला पाहिजे. तुमचं ध्येय कोणतंही असो, पण ते निश्चित हवं, स्पष्ट हवं. ठराविक कालावधीत पूर्ण होणारं हवं. आपण घरी भिंतीवर देवदेवतांचे अथवा आपल्या पूजनीय वडीलधाऱ्या मंडळींचे फोटो लावतो. कशासाठी? त्यातून आपल्याला काय मिळते? ज्या वेळी आपली नजर त्या फोटोकडे जाते, त्या वेळी काही क्षणात एक विशिष्ट सकारात्मक, श्रद्धायुक्त ऊर्जा आपल्या डोळ्यांवाटे आपल्या अंत-करणात उतरते आणि ती आपल्याला प्रेरणा देते. वाईट विचारापासून प्रवृत्त करते. चांगले विचार आपोआपच आपल्या मनात येतात आणि मग कृतीही तशीच होते. अगदी त्याचप्रमाणे, आपले ध्येय एका मोठ्या कागदावर लिहून ते भिंतीवर समोर दिसेल असे लावावे. म्हणजे ते तुम्हाला रोज आठवण करून देईल. मग तुमचे विचार व कृती आपोआपच त्याच दिशेने होईल.
कुटुंबीयांना सामील करून घ्या –
कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला आपले कुटुंबीय व हितचिंतकांची मन-पूर्वक साथ हवी, म्हणून तुमच्या ध्येयपूर्तीच्या प्रवासात तुमच्या कुटुंबीयांना व हितचिंतकांना सामील करून घ्या. त्या खडतर प्रवासाचे ते सुद्धा साथीदार व मालक असतात, यशाचे धनी असतात. ध्येयप्राप्तीचा प्रवास बैलगाडीच्या प्रवासासारखा असतो. शेतकरी “ढवळ्या आणि पवळ्या’ या बैलजोडीला गाडीला जुंपतो, हातात कासरे धरून आपण गाडीत बसतो. मागे कुटुंबीय बसतात. गाडी वाटेने खडखडाट करीत करीत जात असते. बैलांना गाडी ओढणे सुखकर होण्यासाठी, शेतकरी चाकात वंगण घालतो, उन्हाचा चटका कमी व्हावा म्हणून बैलांच्या पाठीवर रंगीत, नक्षीदार झूल घालतो, प्रवासाचा शिणवटा कमी व्हावा म्हणून बैलांच्या गळ्यात घुंगरांची माळ घालतो, कुटुंबीयांना सावली मिळावी म्हणून गाडीवर वक्राकार छत घालतो आणि सर्वांचाच प्रवास सुखकर होण्यासाठी एखादं गाणंही म्हणतो व मजल दरमजल करीत इच्छित गावी पोचतो.
अगदी त्याचप्रमाणे, यशाच्या प्रवासात जिद्द व कष्ट हे दोन बैल असतात. त्यांचे कासरे तुमच्या हातात असतात. या कासरांचा वापर करून दिशा ठरवायची असते. योग्य ठिकाणी वळण घ्यायचे असते. योग्य विचार व आचाराची झूल घालून कुटुंबीयांना प्रेमाचे छत करून चालत राहा, तुमचे इच्छित गाव तुम्हाला सहज भेटेल. गाडीचा रस्ता नेहमीच खडबडीत असतो. तो तसाच असायला हवा. या प्रवासात छोटे मोठे हादरे, धक्के बसतात ते बसायलाच हवेत. कारण गुळगुळीत रस्ता शेवटपर्यंत कधीच नसतो. तो आपल्या इच्छित स्थळापर्यंत नेईलच याची खात्री नसते. म्हणून इच्छित स्थळ जायचे असेल तर रस्ता कसा आहे हे पाहू नका. एकदा इच्छित स्थळी पोचला, की यश हाती येते. पैसा तुमच्या हातात आपोआप येईल व टिकूनही राहील.
अपयश हीच खरी यशाची पहिली पायरी
अडचणी, अडथळे सर्वांनाच येतात, पण ते पार करण्याची ताकद आपण स्वत-हून निर्माण केली पाहिजे. नाउमेद, निराश, हताश होऊन चालणार नाही. कारण यांच्याशी सामना करणारी माणसंच यशस्वी होतात. जगातील सर्वच यशस्वी, श्रीमंत माणसं कधी ना कधी, बऱ्याच वेळा अपयशाच्या मार्गातून गेलेली असतात. अपयशातूनच अनुभव मिळतो. अनुभवातून आत्मविश्वास निर्माण होतो. आत्मविश्वासातून जोम व ताकद मिळते. हाच जोम व ताकद आपल्याला पुढे घेऊन जाते, अपयशच आपल्याला जोमाने पुढे जाण्याची प्रेरणा देते. अंगात नवीन बळ देते, विश्वास देते, नम्र बनवते आणि परिस्थितीवर मात करण्याची कला व कौशल्य मिळवून देते. म्हणून अपयशाच्या भीतीने येणाऱ्या परिस्थितीचे बळी पडण्यापेक्षा तिच्यावर मात करून यश व समृद्धी मिळवा.
नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका महारथीबद्दल बोलणार आहोत की ज्याने इटलीतील सर्वात मोठी tractor company उभी केली, ज्याला स्वतःची चूक नसतानाही दोन देशात चाललेल्या युद्धामुळे आपला उमेदीचा काही काळ तुरुंगात घालावा लागला, ज्याने जगातल्या एका top car company च्या मालकाशी पंगा घेतला आणि त्यातून एक अशी Company उभारली जिने अख्ख्या जगाचं car market हादरवून सोडलं. मी बोलतोय Ferruccio (फेरुशिओ) Lamborghini या Business महारथीबद्दल. इटलीतल्या छोट्याशा खेड्यात राहणारा शेतकऱ्याचा मुलगा ते जगातल्या सर्वात luxurious car company चा मालक! कसा घडला हा प्रवास जाणून घेऊया आजच्या लेखामध्ये.
साल १९१६. इटली तेव्हा अनेक समस्यांमधून जात होती. आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक असे हरतऱ्हेचे बदल हा देश उघड्या डोळ्यांनी पाहत होता. काही लोक रोजच्या जेवणासाठी तडफडत होते तर काही जीवनासाठी. या दरीमध्ये आणखी एक वर्ग होता ज्याला ना या बदलांमुळं फरक पडायचा ना कोणाच्या मरणामुळं. रोज उठायचं, शेतात जाऊन कष्ट करायचे आणि आपलं पोट भरायचं असंच आयुष्य तो वर्षानुवर्ष जगत होता. अशी अनेक कुटुंब होती आणि यातल्याच एका कुटुंबात जन्म झाला फेरुशिओचा.
लहानपणापासून हा मुलगा आपल्या वडिलांना शेतामध्ये मदत करायचा. ‘जसं आपल्या बापानी आपल्याला शेतीचा वारसदार बनवलं, तसंच आपण पण याच्या नावावर अख्खी जमीन करायची असं त्याच्या वडिलांनी ठरवलं.’ पण शेती इकायची नसते राखायची असते हे काही छोट्या फेरुशिओला माहिती नव्हतं. त्याला नाद होता tractor चा. खराब झालेल्या tractor चे part दुरुस्त करण्यात हा पठ्ठ्या तासन् तास घालवायचा. शेवटी त्याच्या वडिलांना ज्याची भीती वाटत होती तेच झालं. फेरुशिओ मोठा झाला आणि त्याने शेती न करण्याचा निर्णय घेतला. या छोट्या गावात आता जास्त वेळ न अडकता आपण आपल्या आवडत्या क्षेत्रात काहीतरी शिक्षण घेतलं पाहिजे असं त्याला वाटलं आणि Bologna (बोलोन्या) च्या Technical college मध्ये तो दाखल झाला. Graduation झाल्यावर त्याला लगेच जॉब मिळाला, पण इटलीत चाललेल्या सततच्या युद्धामुळे तो काही फार काळ टिकू शकला नाही. त्यातच फेरुशिओला Royal Italian Air Force मध्ये जबरदस्तीने दाखल करण्यात आलं, पण पोराला गाड्यांबाबत बरंचसं ज्ञान आहे हे कळल्यानंतर त्याला तिथं जास्त वेळ न ठेवता Greek च्या Rhode Island ला पाठवण्यात आलं; कशासाठी, तर Army चे जे काही tractors, trucks होते त्यांच्या maintenance करायला. युद्ध संपल्यावर सैन्याच्या सगळ्या तुकड्या तिथून गेल्या, पण फेरुशिओ मात्र गेला नाही. त्यानं तिथली Citenzship घेतली आणि तिथंच छोटसं mechanical workshop उघडलं. दोन वर्षांनी म्हणजे १९४५ साली मित्र राष्ट्रांनी पुन्हा या Island वर कब्जा केला. अन दिसेल त्याला तुरुंगात टाकायला सुरुवात केली. यात फेरुशिओचा सुद्धा नंबर लागला. पण यावेळीसुद्धा त्याला तारलं ते त्याच्या mechanical skills नी. वर्षभर त्यानं तिथल्या गाड्या repair केल्या. 1946 मध्ये त्याला तुरुंगातून सोडून त्याच्या मायदेशी म्हणजेच इटलीला पाठवलं गेलं.
जॉब गेला होता आता पुढं काय करावं हा प्रश्न त्याच्यासमोर होता. मध्येमध्ये तो काही गाड्यांची कामं वगैरे करायचा पण fix असं काही ठरत नव्हतं. याच काळात त्यानं एक गोष्ट observe केली ती म्हणजे इटलीची एकूण आर्थिक परिस्थिती इतकी ढासळली होती की त्यामुळं शेतकऱ्यांना tractor घेण्यासाठीसुद्धा पैसे नव्हते. आपण या शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे असं त्याला वाटलं. दुसरीकडंक petrol, diesel च्या किंमती वाढत होत्या. त्यामुळे महागाई वाढली. देशाचा आर्थिक कारभार काही प्रमाणात का होईना सुरळीत होईल या आशेने इटालियन सरकारने एक निर्णय घेतला; Military ची काही वाहने विकण्याचा. झालं फेरुशिओला सोन्यासारखी संधी चालत आली होती. यातली बरीचशी वाहनं त्यानं विकत घेतली. या वाहनांपासून tractor बनवण्याचा त्याच्या डोक्यात होतं. यासाठी त्याने “British Morris Engine” विकत घेतलं. या इंजिनला modify करून त्यांना आपल्या tractor मध्ये use करायचं ठरवलं.
Engine ready होतं, design वर काम चालू होतं. दिवस जात होते तसा तसा फेरुशिओ आपल्या स्वप्नाकडं एक एक पाऊल टाकत होता. ३ फेब्रुवारी १९४८ शेवटी तो दिवस उजाडला, Lamborghini चा पहिला tractor साकार झाला होता. खिशाला परवडणाऱ्या किमतीमुळे म्हणा किंवा त्यासाठी लागणाऱ्या छोट्या जागेसाठी म्हणा हा tractor लोकांना चांगलाच आवडला. पहिल्या slot मधले सगळे tractors sold out झाले. फेरुशिओने परत British Morris Engine विकत घेतले, पण यावेळेस quantity होती एक हजार. दिवसेंदिवस फेरुशिओच्या यशाचा आलेख वरवरच जात होता. एवढं सगळं असूनही त्याला काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. Tractor चा sale होतोय, तो लोकांना आवडतोय हे चांगलंचय, पण यातलं engine आपलं नाही याची हुरहुर त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.
त्यानं ठरवलं आता tractor धावणार, तर आपल्याच engine ने. म्हणजे सलमान खान म्हणतो तसं, “एक बार जो मैंने कमिटमेंट करदी, तो फिर में अपने आप की भी नहीं सुनता!” असंच काहीतरी. आणि खरंच ठरवल्याप्रमाणे त्यानं स्वतःचं engine तयार केलं होतं. आता त्याला imported British Morris Engine वापरण्याची गरज नव्हती. दुधात साखर म्हणून कि काय त्याच सुमारास सरकारने सगळ्या शेतकऱ्यांसाठी एक घोषणा केलेली की, इथून पुढे प्रत्येक शेतकऱ्याला tractor खरेदीवर loan मिळेल. फक्त तो tractor “Made in Italy” असावा. या काळात Lamborghini चे इतके tractor sale झाले की फेरुशिओ इटलीतला सर्वात श्रीमंत माणूस बनला.
इटालियन Cars त्यावेळी जगभरातल्या रस्त्यांवर धावत होत्या. Fiat, Maserati, Ferrari एक से बढकर एक कंपन्या. Celebrities’ पासून मोठमोठ्या businessman पर्यंत सर्वांनाच या cars नी भुरळ घातली होती. फेरुशिओ सुद्धा याला अपवाद नव्हते. वेगवेगळ्या brands च्या cars त्यांच्या collection मध्ये होत्या. यातली सगळ्यात महागडी आणि luxurious car म्हणजे “Ferrari 250 GT”. Ferrari त्यावेळी सगळ्यात नावाजलेली कंपनी होती
सगळ्यांनी या Ferrari ला अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. Ferrari 250 GT ने तर विक्रीचे सगळे record break केले होते. फेरुशिओंनी सुद्धा ही car घेतली, पण त्यांना तिच्यात विशेष असं काही वाटलं नाही. या कारचा driving experience किमतीच्या मनाने खूपच वाईट आहे असं त्यांना वाटायला लागलं. दुसरा एक problem म्हणजे तिच्या clutch plate सारख्या खराब व्हायच्या. एकदा mechanic त्या plates बदलत असताना फेरुशिओंचं लक्ष त्या plates कडं गेलं आणि त्यांना धक्काच बसला. या so called luxurious, expensive, high performance कार मध्ये त्याच Clutch plates वापरल्या जात होत्या, ज्या Lamborghini च्या tractor मध्ये वापरल्या जायच्या. फेरुशिओंनी त्या गाडीत दुसऱ्या plates टाकल्या आणि तडक निघाले Ferrari चे मालक Enzo Ferrari यांना भेटायला. Enzo नी Ferrari ला शून्यातून उभं केलं होतं. प्रचंड यशामुळे थोडासा प्रकारचा अहंकार त्यांना झाला होता. आपण जर आपल्या problem विषयी Enzo ना सांगितलं, तर कदाचित ते आपल्या गाड्यांमध्ये सुधारणा करतील असं फेरुशिओना वाटत होतं. पण Enzoचे पाय जमिनीवर नव्हतेच. त्यामुळं उलट ते फेरुशिओंवर संतापले. “Clutch हा माझ्या गाडीचा problem नाहीये. तुलाच Ferrari drive करायला जमत नाही.” एवढंच नाही, ते पुढं म्हणाले, “तू tractor बनवतोय तर तेवढच कर, कार कशी बनवायची हे मला माहितीये, ते मी बरोबर करतो.”
झालं…! ठिणगी पडली, आता पेटणार होता वणवा!
Enzo ना अद्दल घडवण्यासाठी फेरुशिओ कामाला लागले. Ferrari च्या काही जुन्या कर्मचाऱ्यांना त्यांनी hire केलं. “TURIN AUTO SHOW” चार महिन्यांवर आला होता. या show मध्ये आपली पहिली Super Car लोकांसमोर आणायचं त्यांनी ठरवलं. चार महिन्यातच त्यांनी कारचं design केलं आणि पहिला prototype ready झाला. पण यात एक गोम होती. चार महिन्यात design करणं सोपं होतं, पण इंजिनाचं काय? ते कुठून आणता? फेरुशिओंनी डोकं लावलं आणि अशी idea काढली जी, कोणाच्या डोक्यातसुद्धा आली नसती. दिवस उजाडला, show मध्ये अनेक गर्दी होऊ लागली. त्याच त्याच brands च्या गाड्या पाहून लोकांनाही काही नवीन वाटत नव्हतं. पण त्याचवेळेस एका माणसाची नजर गेली एका हटके कार वर, “Lamborghini 350 GT”. आता तुम्ही म्हणाल engine नव्हतं, मग कार कशी तयार झाली? तुमचं बरोबर आहे कार मध्ये engine नव्हतंच, त्याजागी होत्या विटा! फेरुशिओंचं नशीब की, ही गोष्ट कोणाच्याही लक्षात आली नाही. म्हणजे कोणी बोनेट वगैरे उघडून check केलं नाही. या गाडीला लगेच १३ order मिळाल्या. Competitors ला टक्कर द्यायची असेल तर एवढ्यावर थांबणं शक्य नव्हतं. Lamborghini ने आपली नवी रेसिंग कार बाजारात आणली “Lamborghini Miura” या कारची खासियत म्हणजे तिचं engine मागच्या side ला होतं. लोकांना हा चेंज इतका आवडला की त्यांनी ही कार डोक्यावर घेतली. Lamborghini ला खरी प्रसिद्धी मिळवून दिली ती या “Miura” ने.
Lamborghini Miura
“माणूस जेव्हा यशाच्या शिखरावर असतो, तेव्हा अशा काही घटना घडतात की, निरंतर मिळणारं यश एकदम क्षणिक वाटू लागतं”. फेरुशिओंच्या आयुष्यातही असंच काहीसं झालं. Car सोबत tractor चा बिझनेसही एकदम जोरदार चालला होता, पण अचानक tractor ची एक मोठ्ठी order cancel झाली. त्यामुळं कित्येक ready tractors तसेच पडून राहिले. त्यांच्यासमोर पर्यायच नव्हता. नाईलाजाने पूर्ण कंपनीचं आपल्या competitor ला विकून टाकली. जी tractor ची गत झाली, तीच Cars ची झाली. त्यातलेही 51% त्यांना विकावे लागले. पुढं काही वर्षात Oil Crisis, तेलाचा तुटवडा झाला. कार manufacture करणं सुद्धा शक्य नव्हतं. त्यामुळं फेरुशिओंनी उरलेले 49% सुद्धा विकून टाकले. आता फेरुशिओंकडे काहीच नव्हतं. Automobile Industry तून पूर्णपणे बाहेर पडल्यावर त्यांनी एक wine making चा business सुद्धा केला.
झाली संपली गोष्ट! काय झालं गोष्ट चांगली नाही वाटली? पुढं Lamborghini चं काय झालं हे जाणून घ्यायचंय? Hmm ठीके… पाहूया पुढं काय झालं ते! १९७० मध्ये “SAME” या group ने Lamborghini Tractor कंपनी विकत घेतली. दहा वर्षांनी १९८० साली Lamborghini Automobiles म्हणजेच Car कंपनी मीम्रन बंधूंनी विकत घेतली. पण त्यांनासुद्धा कंपनीला तारता आलं नाही आणि पुढच्या सात वर्षात ही कंपनी “Chrysler” कडे गेली. तो काळच असा होता की car विक्रीचं प्रमाण खूप कमी झालं होतं. शेवटी Chrysler लाही loss झाला आणि त्यामुळं त्यांनी ही कंपनी विकली “Volkswagen” ला. Volkswagen कडे आधीच Audi, Bentley, Skoda अशा कंपन्या होत्या आणि आता त्यात भर पडली Lamborghini ची. Design मध्ये असणारे changes, performance मध्ये असणारे changes Volkswagen ने व्यवस्थितरित्या हेरले. आणि त्याचमुळे Lamborghini जगभरातले रस्ते काबीज करण्यासाठी सज्ज झाली. पुन्हा एकदा.
तर ही होती फेरुशिओ लॅम्बोर्गिनी यांची जीवन कहाणी. हा व लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा.
त्याला दोन्ही कानाने ऐकू येत नव्हतं. पण आता तो इतका श्रीमंत झाला होता की, त्याला आपल्या दोन्ही कानांचा उपचार करून ऐकता येणार होते. मित्रांनी आणि नातेवाईकांनी त्याला म्हटले, ‘‘दोन्ही कानांची शल्यचिकित्सा करून घेऊ या!’’ तो म्हणाला, ‘‘मुळीच नको. मला स्तुतीपण ऐकावयाची नाही आणि टीका सुद्धा. आजूबाजूचा कलकलाट ऐकीन तर माझ्या कामात व्यत्यय येईल.’’ शोध करत राहण्यासाठी ज्याने बहिरेपणा आयुष्यभर जपले त्याची ही कथा.
१८८९ साली पॅरिसमधे एका विशाल आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या दोनपैकी एका पूर्ण भागात फक्त एकाच माणसाच्या संशोधनाने मंडप व्यापून टाकला होता ती थोर व्यक्ती म्हणजे, ‘थॉमस अल्वा एडिसन’. या वैज्ञानिकाला पॅरिसला सादर आमंत्रित केले होते आणि त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. ११ फेब्रुवारी १८४७ हा जन्मदिवस आहे त्याचा….
वयाच्या १० व्या वर्षीच एडिसनने घरातील कोठारात एक प्रयोगशाळा थाटली. पैसे कमी पडू लागले म्हणून याने ग्रँड ट्रंक रेल्वेच्या धावणार्या आगगाडीत वर्तमानपत्र व चॉकलेट विकावयास सुरुवात केली. एके दिवशी धावपळीत आगगाडी सुटली. गाडी पकडण्याच्या प्रयत्न असलेल्या एडिसनच्या दोन्ही हातात वस्तू होत्या, म्हणून एका सहप्रवाशाने त्याचा एक कान धरून त्याला गाडीत ओढले. या धडपडीत त्याचा एक कान निकामी झाला. पण याच एका वर्षाच्या कालावधीत एडिसनने आपल्या प्रयोगशाळेत एक सर्वसाधारण टेलिग्राफ मशीन निर्माण करण्यात यश संपादन केलं होतं.
१८६२ मधे एडिसनला एक लहान मुलगा रुळावर खेळताना आढळला. आपला जीव धोक्यात घालून एडिसनने त्याला वाचवले. त्यामुळे स्टेशनमास्तर असलेले त्या मुलाचे वडील खुश झाले आणि बक्षीस म्हणून त्यांनी एडिसनला टेलिग्राफी शिकविली. १८६८ उजाडताच एडिसनने आपले पहिले टेलिग्राफ तयार करून आपले पहिले पेटेंट मिळविले. आपलं टेलिग्राफ उपकरण त्याने एक्सचेंजच्या अध्यक्षाला या अपेक्षेने विकले की, त्याला २,००० डॉलर तरी मिळतील. एक्सचेंजच्या अध्यक्षाला ते टेलिग्राफमशीन इतके भावले की, त्यांनी एडिसनला या टेलिग्राफ मशीनचे ४०,००० डॉलर दिले. ही घटना एडिसनला एका निर्णायक दिशेने घेऊन जाण्यात कारणीभूत ठरली.
एडिसन यांनी बल्बचा शोध लावला आणि सा-या घरांना व जगाला प्रकाशमान करून टाकलं. याचं सर्वसामान्यांना भारी कौतुक वाटतं. या एकाच शोधानं एडिसन यांचं नाव घराघरातून अजरामर झालेलं आहे. पण बल्बव्यतिरिक्त त्यांनी इतरही अनेक शोध लावलेले आहेत. आज आपण गाणी डिजिटल म्युझिक सिस्टमवर ऐकतो. पण आधीच्या काळी ज्या ग्रामोफोनवरून आपण गाणी ऐकायचो त्या ग्रामोफोनचा शोध एडिसन यांनी लावला होता. त्याचबरोबर चित्रपट बनवण्यासाठी लागणारा कॅमेरा, स्वयंचलित टेलिग्राफ प्रणाली, कार्बन -हिओस्टॅट (विद्युत उपकरणात काही घटक नियंत्रित करण्यासाठी याचा उपयोग होतो. जसं म्युझिक सिस्टममध्ये आवाज कमी-जास्त करण्यासाठी -हिओस्टॅटचा वापर केला जातो), पॅराफिन कागद, टेलिफोन ट्रान्समीटर इत्यादी. त्यांच्या नावावर एक हजार एकशेच्या आसपास पेटंट नोंदवलेली आहेत. हा एक प्रकारचा विश्वविक्रम आहे. कोणाही एका व्यक्तीच्या नावावर इतकी पेटंट्स(एडिसन यांच्याशिवाय) नावावर नाहीत.
बॅटरी तयार करण्याच्या प्रयत्नात त्याचे ८००० प्रयोग फसले. एकाने त्यांना म्हटले ‘‘विनाकारण वेळ गेला हे ८००० प्रयोग करण्यात!’’ एडिसनने उत्तर दिले, ‘‘अरे मला ८००० शोध लागलेत की या पदार्थांच्या संयोगाने चांगली बॅटरी बनू शकत नाही.’’ याला म्हणतात शोधकर्ता!
कधी कधी महान शास्त्रज्ञसुद्धा अगदी बालिशपणे वागतात. कोणे एकेकाळी दिलीपकुमार श्रेष्ठ की अभिताभ बच्चन श्रेष्ठ,असा वाद त्यांच्या चाहत्यांमध्ये होत असे. हा वाद तसा आजही सुरू आहे. पण त्यात आणखी दोन-चार अभिनेत्यांच्या नावांची भर पडलेली आहे. एडिसन व टेस्ला यांच्या चाहत्यांतसुद्धा हा अशा प्रकारचा वाद आजही सुरू आहे. कोण मोठा शास्त्रज्ञ आहे? एडिसन डायरेक्ट करंट (DC)चा खंदा समर्थक. परंतु टेस्ला अल्टर्नेट करंट (AC) तंत्रज्ञानावर दृढ विश्वास असणारा (आणि टेस्लाचच बरोबर होतं!).
एडिसन व टेस्ला यांच्यात फार मोठी कटुता निर्माण झाली होती. एडिसन हे ‘व्यावहारिक’ शास्त्रज्ञ होते. त्यांच्या संशोधनाचा सारा कल या एकाच गोष्टीवर अवलंबून होता. ज्या शोधाचा उपयोग सर्वसामान्यांच्या मदतीसाठी होत नसेल व त्यातून कोणतीही अर्थप्राप्ती होत नसेल तर त्या शोधाकडे ते ढुंकूनही पाहत नसत. याच कारणास्तव ते शास्त्रज्ञ-व्यापारी किंवा धंदेवाईक शास्त्रज्ञ म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहेत. आपल्या कार्याची व्याप्ती वाढण्यासाठी व नवनवीन संशोधनाचे पेटंट मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या पदरी शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ यांची फार मोठी फौज जमा केली होती. हे सारे वेगवेगळय़ा प्रश्नांवर काम करत राहायचे व एखादा शोध लागला की, त्याचं पेटंट एडिसन यांच्या नावावर जमा व्हायचं.
टेस्ला यांची ही विद्युत प्रणाली अधिक लोकप्रिय झाली तर त्यांना त्यांच्या एक दिशा विद्युत पद्धतीचा गाशा गुंडाळावा लागेल याची एडिसनना मनोमन खात्री पटली. त्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतले असल्याकारणानं टेस्ला यांची पद्धत कशी व किती धोकादायक आहे व या प्रणालीचा त्रास कशाप्रकारे होऊ शकेल हे दाखवून व पटवून देण्यासाठी त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी मुक्या जीवांना व प्राण्यांना ‘शॉक’ देऊन मारण्याचा उपद्व्याप सुरू केला. त्यांच्या या हीन कृत्यांतून अनेक कुत्रे, मांजरी, गाई, म्हशी, घोडे व एका हत्तिणीला हकनाक प्राण गमवावे लागले. ६ ऑगस्ट १८९० रोजी पहिल्यांदा एडिसनच्या आग्रहाखातर एका कैद्याला प्रत्यावर्ती करंटच्या साहाय्याने हाल हाल करून मारण्यात आले. एडिसनचा हा सारा खटाटोप स्वत:चे व्यापारी हित जोपासण्यासाठी होता. एवढे करूनही त्यांना हवा तो परिणाम साधता आला नाही. आज टेस्ला यांची प्रत्यावर्ती विद्युत प्रणाली सरस ठरलेली आहे. पुढे एडिसनला त्यांचे पूर्व सहयोगी टेस्ला सोबत नोबेल पारितोषिक मिळणार होतं, परंतु टेस्लाने एडिसनसोबत पारितोषिक घेण्यास नकार दिला आणि दोघेही नोबेलपासून वंचित राहिले.
आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शोध करण्याची मानसिकता ठेवणारा हा महान वैज्ञानिक अत्यंत मृदुभाषी होता. त्याचं खालील वाक्य त्याची नम्रता सांगून जाते.
‘‘माझ्या यशात विद्वत्तेची भूमिका १ टक्का आणि परिश्रमाची भूमिका ९९ टक्के आहे!’’ पण जर कोणी निकोला टेस्ला यांना हा प्रश्न विचारला असता तर त्यांनी जिनियस म्हणजे नव्याण्णव टक्के स्फूर्ती व एक टक्का मेहनत असं उत्तर बहुधा दिलं असतं. अशा प्रकारची परस्परविरोधी उत्तरं थॉमस अल्वा एडिसन आणि निकोला टेस्ला यांच्या अंगभूत गुणवैशिष्टय़ांना समर्पकपणे अधोरेखित करतात. ते दोघेही अतिशय महान वैज्ञानिक होते.
अमेरिकेतले १,०९३ पेटेंट घेणार्या या वैज्ञानिकाला इतर देशांच्या २००० च्या वर पेटेंट मिळविण्याचा मान मिळाला. एक हजारापेक्षा जास्त शोध लावणार्या एडिसनच्या सन्मानार्थ बोलणार्या एका वक्त्याने म्हटले की, ‘‘एडिसनने इतके शोध लावलेले आहेत की, आता जणू शोध करावयास जगात काहीही उरलेच नाही. मानवी इतिहासात इतके शोध आजतागायत कोणीही लावलेले नाहीत.’’
आपण उद्योग-धंदा किंवा व्यवसाय कोणता करतो ? यापेक्षा तो कसा करतो याला खूप महत्त्व आहे. चीनमध्ये अशी म्हण आहे, “चेहऱ्यावर जर हसू नसेल, तर त्या दिवशी दुकान उघडू नये.‘ प्रत्येकाच्या व्यवसाय-धंद्याच्या क्षेत्रामध्ये तोच धंदा-व्यवसाय उत्तम प्रकारे करणारे व भरपूर पैसे कमावणारे अगदी मोजकेच चार-पाच उद्योजक असतात.
बाकीचे लोक रडतखडत किंवा अगदी नुकसानीत देखील व्यवसाय करीत असतात. धंदा तोच असतो, प्रॉडक्ट तेच असते, मार्केट तेच असते, तितकाच वेळ सर्वांकडे असतो. काही वेळेला तर भांडवल देखील कमी असते, तरी पण मोजके लोक चांगला धंदा करतात व बाकीचे रडतखडत किंवा कसा तरी धंदा चालवत असतात. मग दोघांमध्ये फरक काय आहे ? फरक आहे तो ऍटिट्यूडचा म्हणजे वृत्तीचा. एकाचे धंद्यावर प्रेम असते, तर दुसरा करावा लागतो म्हणून किंवा आता दुसरे काय करू म्हणून धंदा करीत असतो.
याच वृत्तीवर – “ऍटिट्यूड‘वर एक तत्त्व लागू होते. त्याला “पॅरेटोज लॉ‘ म्हणतात किंवा “80/20‘ म्हणतात. एकाच मार्केटमध्ये 20 टक्के उद्योजक मिळून 80 टक्के धंदा करतात. उदा. शंभरातील वीस व्यापारी. एकूण धंदा समजा शंभर कोटींचा असेल, तर ऐंशी कोटींचा धंदा ते करतात. उरलेले ऐंशी, वीस कोटींच्या धंद्यात मारामारी करतात, हे तत्त्व सगळीकडे लागू होते, कारखानदारीत, व्यापारात, पेठेत, रोडवर, डॉक्टर, वकील व इतर व्यवसायात. त्याचे प्रमाण कमी-अधिक असू शकते. अगदी नोकऱ्या मिळण्यामध्ये देखील म्हणजे काहींना अजीर्ण होईल इतके मिळते व काहींना उपाशी राहावे लागते. असे का होते, तर त्याला वृत्तीच कारणीभूत असते.
तुमचे जर तुमच्या व्यवसायावर प्रेम असेल, तर निश्चितच तुम्ही चांगला धंदा करू शकता. प्रेम कशाला म्हणतात, तर ज्याला कधी एकदा सकाळ होते व मी माझ्या उद्योगात जाऊन रमतो असे वाटते. जो कधीही आपल्या धंद्याबद्दल रडत बसत नाही, आपला धंदा वाईट आहे असे म्हणत नाही. धंद्यावर प्रेम असले की त्याला उत्साह असतो, जोश असतो, नवे विचार मनात येतात. अडचणी जरूर येतात; पण त्याला न घाबरता तो तोंड देतो, खचून तर निश्चितच जात नाही. उलट जोमाने कामाला लागतो.
काळाप्रमाणे बदल करून नवीन व वेगळेपणा धंद्यात आणला जातो. अशा व्यक्तीच्या धंद्यावरील प्रेमाची प्रसन्नता त्याच्या वृत्तीत बदल करून जाते. चेहऱ्यावर हसू असते, त्यामुळे गिऱ्हाईकालाही आनंद वाटतो, अर्थात विक्री (सेल) वाढते. दुःखी किंवा निराश सेल्समनकडून किंवा मालकाकडून कोणाला काही घ्यायला आवडेल का? डॉक्टरचे व्यक्तिमत्व व त्याच्या चेहऱ्यावरील हसू बऱ्याच प्रमाणात आजार बरा करून जाते. त्यांना भेटल्यावरच आराम मिळतो, असे वाटते. मालकाला उत्साह असला, की आपोआप हे “कल्चर‘ खालच्या लोकांपर्यंत पसरते; तसेच लोकही उत्साहाने वागतात. त्यांनाही काम करायला आवडते.
ज्यांचे धंद्यावर प्रेम असते, ती संस्था-कंपनी अगदी नोकरापासून मालकापर्यंत उत्तम काम करते व अर्थातच भरपूर नफा कमविते. एकदा का आपल्याला आपला धंदा मनापासून आवडतो म्हटले, की आपोआपच त्याला लागणाऱ्या योग्य गोष्टी घडतात. तुमचा स्टाफ, कामगार, ग्राहक, बॅंका, शेअरहोल्डर, आजूबाजूचा समाज सर्व जण खूष राहतात. कित्येक वेळेला, धंद्यामध्ये मागून आलेले लोक पुढे जातात, मोठे होतात. कारण अगोदरपासून त्या व्यवसायात असलेले लोक गाफील राहतात. धंदा ज्याप्रमाणे करायला पाहिजे, त्याप्रमाणे ते करीत नाहीत, योग्य बदल करीत नाहीत. निश्चितच कोठे तरी धंद्यावरचे प्रेम कमी झालेले असते. अलीकडे तर हे फार पाहायला मिळते.
प्रत्येकाला दुसऱ्याचा धंदा चांगला वाटतो. तिथूनच गडबड सुरू होते. अनेक वेळेला मालकाचे वय झालेले असते, उत्साह कमी झालेला असतो, नवीन पिढी व्यवसायात येणार नसते; मग प्रेम कमी व्हायला लागते. धंदा तोच, पण आवड कमी झाल्यावर निश्चितच धंदा कमी व्हायला सुरू होतो. त्यामुळे जो उत्साही आहे, ज्याला आपला धंदा आवडतो, त्यालाच संधी दिसते. त्याच्या मनाची दारे कायम उघडी असतात व तेथेच लक्ष्मी येते.
“आज हवाच खराब आहे‘, “खूप कॉम्पिटीशन वाढली आहे‘, “पूर्वीसारखे मार्जिन राहिलेले नाही‘, “धंद्यात दम नाही‘, “सरकारची पॉलिसी बरोबर नाही‘, “जागतिक मंदी आहे‘, “पाऊसच पडलेला नाही‘.. अशी कारणे बऱ्याचदा ऐकू येतात. ते अगदी खरेही असेल; पण नुसती चर्चा करून काय होते, बोलून काय होते? अशी वाक्ये रोज पावलो-पावली ऐकायला मिळतात. एकतर आपल्याला आपला व्यवसाय चिकाटीने करायचा असेल, तर अशी वाक्ये बोलूच नाहीत व तसे बोलणाऱ्यांपासून चार हात लांब राहावे. कारण त्यांना फक्त रडायला खांदा हवा असतो.
असे रडण्याऐवजी “आपल्याला तर आपला धंदा आवडतो आहे, आपण खूष आहोत, मस्त आहोत, आपल्याला वेळच नाही असे रडायला‘, अशी वृत्ती ठेवून पुढे चालले पाहिजे. “आहे तोच व्यवसाय-धंदा उत्तम आहे, तो मी उत्तम प्रकारे करणार आहे, काळाबरोबर बदलणार आहे, मी “टॉप‘च्या बिझनेसमनमध्ये कायम असणार आहे,‘ असा विश्वास, प्रेम व वृत्ती हवी. हा “फॉर्म्युला‘ वापरून पाहा व मग सांगा काय जादू झाली ती.. !!!
माणूस कितीही गरीब का असेना, पण त्याने नेहमी मोठीच स्वप्नं पाहिली पाहिजे. तसेच, ही स्वप्नं पूर्ण करण्यासाठीही तितकेच परिश्रमही घेतले पाहिजे. कारण, जेव्हा शून्यातून हजारो कोटींचा व्यवसाय उभा राहतो, तेव्हा आपल्याकडे पाहून इतर लोकांनाही मोठी स्वप्नं पाहण्याचे बळ मिळतं. असे कुठलेच काम नसते, जे अशक्य असते.
शून्यातून भलंमोठं साम्राज्य निर्माण करण्याची धमक आपल्याकडे असायला पाहिजे. अशीच धमक टीएस कल्याणरमन यांच्यात होती. त्यामुळेच त्यांची आज फक्त भारतातच नाही, तर जगात ख्याती पसरली आहे. एक काळ होता, जेव्हा त्यांनी कर्ज काढून स्वतःचं ज्वेलरी शॉप सुरू केले होते. मात्र, आज तोच एक प्रचंड मोठा ब्रँड बनला आहे. आज त्यांचे ज्वेलरी दुकानं एका शहरापुरते मर्यादित न राहता, संपूर्ण देशात पाहायला मिळत आहेत.
आम्ही ज्या ज्वेलर्सबद्दल बोलत आहोत, ते इतर कोणी नसून कल्याण ज्वेलर्स (Kalyan Jewellers) आहे. कल्याण ज्वेलर्स हे नाव, गल्ली ते दिल्लीपर्यंत सर्वांनीच ऐकले असेल. कल्याण ज्वेलर्सचे संस्थापक टीएस कल्याणरमण (TS Kalyanraman) यांची एवढं मोठं साम्राज्य उभं करण्याची कहाणी वेगळी आणि प्रेरणा देणारी आहे. कल्याणरमण यांनी शून्यातून सुरुवात करून यशाचे शिखर गाठले आहे. चला तर, त्यांच्या रंजक प्रवासाविषयी जाणून घेऊयात.
व्यापारी कुटुंबात जन्म
अब्जपती लोकांच्या पंक्तीत विराजमान झालेल्या टीएस कल्याणरमण यांचा जन्म भारत देश स्वतंत्र होण्याच्या चार महिन्यांपूर्वी म्हणजेच २३ एप्रिल १९४७ रोजी केरळच्या त्रिशूर येथील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांना व्यवसायाचे बाळकडू बालपणीपासूनच मिळाले होते. त्यांचे वडील टीआर सीतारामय्या कपड्याचे व्यापारी होते. तसेच, कल्याणरमण यांचे आजोबा हे पुजारी होते. मात्र, नंतर त्यांनी व्यवसायात उडी घेतली होती. रंजक बाब अशी की, कल्याणरमण हे अवघ्या १२ वर्षांच्या वयातच आपल्या वडिलांसोबत त्यांच्या दुकानात मदतीसाठी जायचे. तिथेच त्यांनी व्यवसायाची बाराखडी शिकली होती. मात्र, शालेय शिक्षणही तितकेच गरजेचे होते. त्यासाठी त्यांनी केरळच्या श्री केरळ वर्मा कॉलेजात ऍडमिशन घेतले आणि याच कॉलेजमधून कॉमर्समध्ये पदवी घेतली.
कर्ज घेऊन सुरू केला व्यवसाय
हा व्यवसाय ५ भावांमध्ये विभागला होता. त्यांना ज्वेलरी शॉप्सने भरलेल्या त्रिशूरच्या मार्केटमध्ये कपड्यांचे दुकान मिळाले होते. मात्र, आजूबाजूच्या दुकानांपासून प्रेरित होऊन त्यांनी आपल्या पारंपारिक कौटुंबिक व्यवसायातून काढता पाय घेतला. गाठीशी २५ लाखांची बचत होती; मात्र, ज्वेलरी शॉप सुरू करण्यासाठी एवढे रुपये पुरेसे नव्हते. त्यासाठी त्यांनी बँकेकडून ५० लाख रुपयांचे कर्ज घेण्याचा निर्णय घेतला. आता त्यांच्याकडे ७५ लाख रुपये जमा झाले होते. याच रक्कमेतून त्यांनी त्रिशूरमध्ये १९९३साली एक ज्वेलरी शॉप सुरू केले. हीच ती कंपनी, जिला आज संपूर्ण जग कल्याण ज्वेलर्स म्हणून ओळखते.
एकदम सोपी होती आयडिया
आपल्या व्यवसायात पारदर्शकता ठेवण्यासाठी त्यांनी शक्कल लढवली. जुन्या पारंपरिक बुकलेट्सचा वापर न करता त्यांनी ग्राहकांसाठी जी ज्वेलरी दुकानात ठेवली होती, त्यासोबत त्यांची मूळ किंमतही लावली. कल्याणरमन यांनी व्यवसायात उतरण्यापूर्वी ज्वेलरीची जी दुकानं पाहिली होती, ती खूपच छोट्याशा जागेत असल्याचे त्यांनी हेरले होते. यामुळे आपले वेगळेपण सिद्ध करायचे तर आपण व्यवसायात उतरताना, आपले दुकानही तितकेच प्रशस्त असायला हवे, हे त्यांनी ठरवले. त्यांनी सुरुवातीला तब्बल ४००० स्क्वेअर फूट जागेवर मोठे दुकान सुरू केले. ज्यामुळे लोकांना ज्वेलरी खरेदी करताना रियल-टाईम अनुभव मिळेल. विशेष म्हणजे, त्यांनी लढवलेली ही शक्कल यशस्वी ठरली.
पहिल्या वर्षाच्या अखेरपर्यंत कल्याण ज्वेलर्सने ३० लाख रुपयांचा सेल केला होता. त्यांच्या दुकानात लोकांना प्रीमिअम अनुभव घेता येत होता. कारण, त्यांनी एसी, स्वच्छ टॉयलेट्स आणि पार्किंगच्या सुविधाही उपलब्ध केल्या होत्या. यानंतर त्यांनी पल्लकड येथे आणखी एक ४००० स्क्वेअर फूटाचे दुकान सुरू केले. मात्र, यावेळी त्यांना एक गोष्ट शिकायला मिळाली, जी त्यांना यापूर्वी माहितीदेखील नव्हती. खरं तर, त्रिशूर आणि पल्लकडमधील ५६ किमीच्या परिघातही दागिन्यांची वेगळी बाजारपेठ होती. म्हणून, त्यांनी हायपर-लोकल टचवर लक्ष केंद्रित केले आणि पल्लकडमधील आपले ज्वेलरी शॉप यशस्वी करून दाखवले.
दशकभरात सुरू केली ३२ दुकाने
सन १९९८मध्ये कोयम्बतूर बाँब ब्लास्ट झाला आणि त्यांना आपला व्यवसाय पल्लकडच्या सीमेजवळील शहरात शिफ्ट करावा लागला. कल्याणरमण यांना वाढती मागणी हाताळण्यासाठी राज्यात अनेक दुकाने सुरू करायची होती. २०१२ साल उजाडताच त्यांनी केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा येथे दागिण्यांची ३२ दुकाने सुरू केली. पाहता पाहता कल्याण ज्वेलर्स दक्षिण भारतातील स्टार ब्रँड तयार झाला.
दक्षिण भारताबाहेर विस्तारला व्यवसाय
बीआयएस प्रमाणपत्रासह १०० टक्के प्युअर सोने विकणारा पहिला ब्रँड असणाऱ्या कल्याण ज्वेलर्सने दक्षिण भारताबाहेरही आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. यासाठी त्यांनी २०१२मध्ये अहमदाबाद येथे आपले दागिण्यांचे दुकान सुरू केले. यावेळी त्यांनी मोठा डाव खेळला. त्यांनी ‘माझे सोने, माझा हक्क’ (My Gold, My Right) या कँपेनसह महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना आपला ब्रँड अँबेसेडर बनवले.
कँपेनमुळे बनला ५ हजार कोटींचा ब्रँड
अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या या कँपेनमुळे कल्याण ज्वेलर्स ५ हजार कोटी रुपयांचा ब्रँड बनला. एवढंच नाही, तर तब्बल ९० कोटी मार्केटिंग बजेटसह बॉलीवूड इंडस्ट्री गाजवणाऱ्या अभिनेत्री कॅटरिना कैफ, ऐश्वर्या राय बच्चन आणि इतर सेलिब्रिटींसोबत करार केला. यानंतर कल्याणरमणजींनी पहिल्यांदा देशाबाहेर झेप घेतली. त्यांनी २०१३ मध्ये यूएईमध्ये फक्त एकाच दिवसात आपली ६ दुकाने सुरू केली.
कल्याण ज्वेलर्सने हायपर लोकल दृष्टिकोन ठेवत आणि वेगवेगळ्या प्रसंगांसाठी वेगवेगळ्या ज्वेलरीही लाँच केल्या आहेत. त्यात मुहुरत या वेडिंग ज्वेलरी आणि अनोखी, झिया, तेजस्वी या डायमंड ज्वेलरींचा समावेश आहे. यामुळे त्यांच्या प्रगतीत वेगाने वाढ होत आहे. 2020पर्यंत कल्याण ज्वेलर्सने आपला व्यवसाय 140 दुकानांपर्यंत नेला आणि तब्बल १० हजार कोटी रुपयांची कंपनी बनण्याचा बहुमानही मिळवला.
शेअर मार्केटमध्ये प्रवेश
कल्याण ज्वेलर्स कंपनीचा IPO २६ मार्च, २०२१मध्ये NSE आणि BSE लिस्ट झाला. ही कंपनीची सर्वात मोठी भरारी ठरली. स्टॉक मार्केटला लिस्ट झाल्यानंतर कल्याण ज्वेलर्सने टाटासारख्या बलाढ्य पाठबळ असलेल्या टायटन आणि पीसी ज्वेलर्सलाही टक्कर दिली. सध्या कल्याण ज्वेलर्सच्या शेअरची किंमत 339 रुपयांपेक्षा जास्त आहे.
कल्याण ज्वेलर्सचे बाजारमूल्य
आज घडीला टीएस कल्याणरमण हे भारतातील सर्वात श्रीमंत ज्वेलर मानले जातात. कल्याण ज्वेलर्सने मागील वर्षी ४३२ कोटींच्या नफ्यासह १४०७१ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला होता. विशेष म्हणजे, कल्याण ज्वेलर्स हा ब्रँड किती मोठा आहे याचा अंदाज त्यांच्या एकूण दुकानांच्या संख्येवरूनच येतो. सध्या संपूर्ण भारत आणि यूएईत कल्याण ज्वेलर्सचे तब्बल २०० पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत.
या लेखाचा शेवट करताना टीएस कल्याणरमण यांच्याविषयी आणखी एक खास गोष्ट सांगावीशी वाटते. ती अशी की, वयाची सत्तरी (७३) पार करूनही कल्याणरमण आजही दर महिन्याला कोणत्याही १५ ग्राहकांना फोन करतात. तसेच, त्यांच्याकडून आपल्या दागिन्यांविषयी प्रतिक्रिया जाणून घेतात. यावरूनच समजते की, कल्याणरमण हे ग्राहकांशी आणि आपल्या व्यवसायाशी किती प्रामाणिक आहेत.
वाचक मित्रांनो, तुम्हाला हा लेख कसा वाटला, हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच, तुमच्या जवळच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा. याव्यतिरिक्त तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवरील लेख वाचायला आवडेल, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.