भारतातील सर्वात मोठ्या उद्योगसमूहांपैकी एक असलेल्या Tata Group मध्ये मोठी नेतृत्वबदलाची घडामोड समोर आली आहे.
Tata Sons चे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी त्यांचा सध्याचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा चेअरमनपदासाठी स्वतःला पुढे न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा विद्यमान कार्यकाळ 20 फेब्रुवारी 2027 रोजी संपणार आहे.
या बातमीनंतर Tata Group च्या अनेक लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्सवर दबाव दिसून आला आणि गुंतवणूकदारांमध्ये पुढील नेतृत्वाबाबत प्रश्न निर्माण झाले.
नेमकं काय घडलं?
मार्केट सुरू होताच शेअर बाजारात खळबळ उडाली.
टाटा समूहाची सूत्रं सांभाळणारे एन. चंद्रशेखरन यांनी Tata Sons च्या चेअरमनपदाचा पुढील कार्यकाळ स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट केलं.
सध्याचा कार्यकाळ: 20 फेब्रुवारी 2027 पर्यंत.
टाटांच्या शेअर्समध्ये एकाच वेळी घसरण
बातमी पसरताच गुंतवणूकदारांनी शेअर्सची विक्री सुरू केली.
TCS: सुमारे 5.3% घसरला
Tata Motors: सुमारे 3.3% खाली
Titan: 2% पेक्षा जास्त घसरण
Tata Steel: 2% पेक्षा जास्त घसरण
बाजाराला नक्की भीती कशाची?
शेअर बाजाराला सर्वात जास्त भीती एका गोष्टीची असते — अनिश्चितता.
चंद्रशेखरन हे फक्त चेअरमन नव्हते, तर Tata Group च्या भविष्यातील अनेक मोठ्या योजनांचे महत्त्वाचे शिल्पकार होते.
गुंतवणूकदारांसमोर आता तीन मोठे प्रश्न आहेत:
पुढचा चेअरमन कोण असणार?
ग्रुपची सध्याची स्ट्रॅटेजी बदलेल का?
Semiconductor, EV सारख्या मोठ्या प्रोजेक्ट्सवर काय परिणाम होईल?
TCS वर सर्वाधिक दबाव का?
TCS आधीच काही जागतिक आव्हानांचा सामना करत होती.
AI मुळे IT क्षेत्रात होणारे मोठे बदल
Clients कडून Pricing Pressure
जागतिक आर्थिक अनिश्चितता
या सर्व पार्श्वभूमीवर नेतृत्वबदलाची बातमी समोर आल्यामुळे TCS च्या शेअरवर अधिक दबाव दिसून आला.
कोण आहेत एन. चंद्रशेखरन?
TCS मधील कर्मचारी ते Tata Group चे चेअरमन
एन. चंद्रशेखरन यांचा Tata Group मधील प्रवास जवळपास चार दशकांचा आहे.
1987: TCS मध्ये करिअरची सुरुवात
2009: TCS चे CEO आणि MD
2017: Tata Sons चे Executive Chairman
2027: सध्याचा कार्यकाळ समाप्त होणार
जवळपास 40 वर्षे त्यांनी Tata Group मध्ये विविध महत्त्वाच्या भूमिका सांभाळल्या आहेत.
चंद्रशेखरन यांचं Tata Group मधील योगदान
EV & Battery
Tata Motors ने EV क्षेत्रात मोठी वाढ केली आणि electric mobility वर भर दिला.
Air India
Air India पुन्हा Tata Group मध्ये आली आणि aviation क्षेत्रातील समूहाची उपस्थिती मजबूत झाली.
Digital & Tech
Tata Neu आणि digital ecosystem च्या माध्यमातून समूहाने नवीन तंत्रज्ञानाधारित व्यवसायांमध्ये प्रवेश केला.
Semiconductor
Tata Group ने semiconductor आणि electronics manufacturing क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीचे पाऊल उचलले.
Business Restructuring
तोट्यात असलेल्या किंवा अडचणीत असलेल्या काही व्यवसायांची पुनर्रचना करण्यावर भर देण्यात आला.
पडद्यामागील गुंतागुंत
काही अहवालांनुसार Tata Trusts आणि Tata Sons यांच्यात corporate governance संदर्भात काही मतभेद असल्याचं म्हटलं जात आहे.
जेव्हा समूहाच्या मुख्य विश्वस्तांमध्ये आणि व्यवस्थापनात मतभेद दिसतात, तेव्हा गुंतवणूकदार सावध भूमिका घेतात.
मग आता पुढे काय?
एन. चंद्रशेखरन तात्काळ पद सोडणार नाहीत.
त्यांचा सध्याचा कार्यकाळ 20 फेब्रुवारी 2027 पर्यंत सुरू राहणार आहे.
त्यामुळे नवीन नेतृत्वाची निवड करण्यासाठी Tata Group कडे काही महिन्यांचा कालावधी आहे.
नवीन चेअरमन कोण होणार, ग्रुपची रणनीती बदलणार का आणि मोठ्या प्रोजेक्ट्सवर काय परिणाम होणार याकडे आता बाजाराचं लक्ष असेल.
तुमचं काय मत आहे?
एन. चंद्रशेखरन यांच्यानंतर Tata Group ची कमान कोणाच्या हातात जायला हवी?
EGR vs Gold ETF: तुम्ही आजही सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी पारंपरिक दागिने बनवून ते बँकेच्या लॉकरमध्ये ठेवत आहात? आणि दरवर्षी त्या लॉकरचे भाडे भरून सुरक्षेची चिंता करत आहात? जर तुमचे उत्तर…हो असेल, तर आता स्वतःला बदलण्याची वेळ आली आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात सोन्यात गुंतवणूक करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. आता सोन्यासाठी ना दुकानात रांग लावण्याची गरज आहे, ना चोरीची भीती बाळगण्याची गरज आहे.राष्ट्रीय शेअर मार्केटने (NSE) आणलेली ‘इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट’ म्हणजेच EGR प्रणाली सोन्यातील गुंतवणुकीचा एक नवा, सुरक्षित आणि सुपरफास्ट मार्ग म्हणून समोर आली आहे.
सोप्या भाषेत सांगायचे तर, जसे तुम्ही शेअर बाजारात कंपन्यांचे शेअर्स खरेदी करता आणि ते तुमच्या डी-मॅट (Demat) खात्यात जमा होतात, अगदी तसेच आता तुम्ही डिजिटल स्वरूपात सोन्याचे युनिट्स खरेदी करू शकता, ज्याला ‘इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट’ (EGR) म्हणतात. या प्रणालीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यात तुम्हाला प्रत्यक्ष सोनं हातात न घेता ते डिजिटल स्वरूपात तुमच्या खात्यात जमा राहते, ज्यामुळे ते चोरीला जाण्याची किंवा हरवण्याची भीती कायमची संपते.
ईजीआर (EGR) म्हणजे नक्की काय?
EGR गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे याची १००% पारदर्शकता. हे सोने थेट शेअर बाजारात ट्रेड होत असल्याने याचे भाव संपूर्ण भारतात एकसमान असतात आणि ज्वेलर्सप्रमाणे यात किमतीची कोणतीही लपवाछपवी किंवा छुपे चार्जेस नसतात. सुरक्षेच्या बाबतीतही हे अगदी नंबर वन आहे, कारण तुमचे सोने सेबी (SEBI) च्या कडक देखरेखीखाली असलेल्या अत्याधुनिक व्हॉल्ट्समध्ये (Vaults) सुरक्षित ठेवले जाते. इतकेच नाही तर ही खिश्याला परवडणारी गुंतवणूक आहे. सोनं खरेदी करायला आता हजारो रुपयांची गरज नाही, तुम्ही अगदी १ ग्रॅम किंवा त्याहून कमी प्रमाणातही गुंतवणूक सुरू करू शकता. तसेच, पैशांची आणीबाणी नडल्यास तुम्ही तुमचे EGR कधीही त्वरित विकून थेट खात्यात रोख पैसे मिळवू शकता, जे पारंपरिक दागिने मोडीत काढण्यापेक्षा कितीतरी पटीने वेगवान आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यात मिळणारे सोने २४ कॅरेट असल्यामुळे गुणवत्तेबद्दल मनात कोणताही डाऊट राहत नाही.
EGR, Gold ETF आणि Digital Gold मधील फरक
EGR vs Gold ETF: बरेच जण EGR, Gold ETF आणि Digital Gold या तिन्हींमध्ये गल्लत करतात, पण यातील फरक समजून घेणे गरजेचे आहे. ईजीआर (EGR) मध्ये गुंतवणूकदाराला प्रत्यक्ष सोन्यावर कायदेशीर हक्क मिळतो आणि याचा सर्वात मोठा प्लस पॉइंट म्हणजे तुम्ही या डिजिटल सोन्याचे प्रत्यक्ष सोन्याच्या नाण्यात किंवा बारमध्ये रूपांतर करू शकता. याउलट, ‘गोल्ड ईटीएफ’ (Gold ETF) हे शेअर बाजारातील म्युच्युअल फंडासारखे साधन आहे जे केवळ सोन्याच्या भावावर आधारित असते, यात प्रत्यक्ष सोने हातात मिळत नाही तर फक्त पैशांचा परतावा मिळतो. तर दुसरीकडे, ‘डिजिटल गोल्ड’ हे प्रायव्हेट पेमेंट्स ॲप्स किंवा ज्वेलर्समार्फत चालवले जाते, ज्याची सुरक्षा संबंधित प्लॅटफॉर्मच्या अटींवर अवलंबून असते आणि प्रत्यक्ष डिलिव्हरीसाठी अतिरिक्त चार्जेस द्यावे लागतात. म्हणूनच, सुरक्षितता आणि सुलभतेच्या बाबतीत ईजीआर हा या तिन्हींमध्ये सर्वात पॉवरफुल पर्याय मानला जातो.
गुंतवणूक कशी करावी?
EGR मध्ये गुंतवणूक करणे फेसबुक किंवा इन्स्टाग्राम वापरण्याइतकेच सोपे आणि अवघ्या ४ स्टेप्सचे काम आहे. यासाठी फक्त तुमचे डी-मॅट खाते (Demat Account) सक्रिय असणे आवश्यक आहे. तुम्ही झेरोधा, ग्रो किंवा एंजल वन सारख्या कोणत्याही ब्रोकरच्या ट्रेडिंग ॲपवर लॉग-इन करून, सर्च बारमध्ये ‘EGR’ टाईप करायचे असते. त्यानंतर चालू बाजारभावाप्रमाणे तुम्हाला हवे तितके युनिट्स निवडून ‘Buy’ वर क्लिक करताच, तुम्ही घरबसल्या काही मिनिटांत शुद्ध सोन्याचे मालक बनता.
EGR vs Gold ETF: एक स्मार्ट गुंतवणूकदार म्हणून आजच्या काळात ईजीआरमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे आधुनिक काळाशी जुळवून घेणे होय. जेव्हा तुम्ही पारंपरिक पद्धतीने दागिने विकत घेता, तेव्हा तुम्हाला मेकिंग चार्जेस (घडणावळ) आणि जीएसटी (GST) चा मोठा फटका बसतो, जो दागिने मोडताना पूर्णपणे वाया जातो. याउलट, EGR मध्ये एक रुपयाचाही मेकिंग चार्ज लागत नाही, म्हणजेच तुमचा संपूर्ण पैसा फक्त शुद्ध सोन्यामध्ये गुंतवला जातो. थोडक्यात सांगायचे तर, सोन्यात गुंतवणूक करणे हे शहाणपण आहे आणि ते ‘डिजिटल व आधुनिक’ पद्धतीने करणे हे स्मार्ट गुंतवणूकदाराचे खरे लक्षण आहे. म्हणूनच, आजच तुमच्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा आणि तुमच्या सोन्याच्या गुंतवणुकीला डिजिटल युगाची नवी झळाळी द्या!
Cryptocurrency Guide: बँक FD मध्ये पैसे डबल व्हायला तब्बल ७ ते १० वर्ष लागतात, तर शेअर मार्केटमध्ये (Stock Market) त्यासाठी काही महिने किंवा वर्ष वाट पाहावी लागते. मात्र या व्यतिरिक्त असं एक मार्केट आहे जिथे तुम्ही गुंतवलेले पैसे ५ तासांत २० टक्क्यांनी वाढू शकतात आणि एका रात्रीत थेट शून्यावर येऊ शकतात. आज आपण अशा एका डिजिटल चलनाची माहिती घेणार आहोत ज्याला तुम्ही हातात पकडू शकत नाही, पाकिटात ठेऊ शकत नाही, तरीही त्याने गेल्या काही वर्षांत हजारो लोकांना एका रात्रीत करोडपती बनवलंय, तर लाखो लोकांचे खिसे रिकामे केलेत. हे डिजिटल चलन म्हणजेच ‘क्रिप्टोकरन्सी’! (Cryptocurrency)
मित्रांनो, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण २०१० मध्ये एका व्यक्तीने फक्त २ पिझ्झा विकत घेण्यासाठी चक्क १० हजार बिटकॉईन्स दिले होते. आजच्या घडीला त्या १० हजार बिटकॉईन्सची किंमत हजारो कोटी रुपये आहे. या क्रिप्टोकरन्सीच्या जादूमुळे तो पिझ्झा आज जगातला सर्वात महागडा पिझ्झा ठरला आहे.
याच क्रिप्टोकरन्सीने आज संपूर्ण जगाची बँकिंग सिस्टम हलवून सोडली आहे. पण या क्रिप्टोकरन्सीची भानगड नक्की काय आहे? कोणत्याही देशाच्या सरकारच्या किंवा बँकेच्या नियंत्रणाशिवाय चालणारं हे इंटरनेटवरचं डिजिटल नाणं नक्की कसं काम करतं? सामान्यांनी या धोक्याच्या आणि फायद्याच्या बाजारापासून दूर राहावं की यात आपलं नशीब आजमवावं? चला तर मग या क्रिप्टोकरन्सीचे हे गणित अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया…
१.क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? (What is cryptocurrency?)
अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, Cryptocurrency हे इंटरनेटवर चालणारे एक ‘आभासी किंवा डिजिटल नाणे’ आहे. आपल्या खिशातील नोटा किंवा नाण्यांप्रमाणे याचे कोणतेही भौतिक अस्तित्व नसते. आपण जसे Google Pay किंवा PhonePe वापरून डिजिटल व्यवहार करतो, तसेच हे व्यवहार असतात. पण यामधील सर्वात मोठा फरक म्हणजे या चलनावर जगातील कोणत्याही देशाच्या सरकारचे, बँकेचे किंवा रिझर्व्ह बँकेचे (RBI) नियंत्रण नसते. हे संपूर्णपणे कॉम्प्युटर नेटवर्कद्वारे चालवले जाते, ज्याला विकेंद्रित (Decentralized) व्यवस्था म्हणतात. ‘बिटकॉईन’ ही जगातील पहिली क्रिप्टोकरन्सी आहे, ज्याच्या यशानंतर आज बाजारात हजारो इतर कॉईन्स उपलब्ध आहेत.
२. Cryptocurrency हे तंत्रज्ञान काम कसे करते?
Cryptocurrency Guide: क्रिप्टोकरन्सीच्या मागे ब्लॉकचेन (Blockchain) नावाचे एक अतिशय प्रगत आणि सुरक्षित तंत्रज्ञान काम करते. ब्लॉकचेन हे इंटरनेटवरील एक सार्वजनिक डिजिटल रजिस्टर आहे. जेव्हा जेव्हा क्रिप्टोमध्ये कोणताही व्यवहार होतो, तेव्हा त्याची नोंद या रजिस्टरमध्ये होते. विशेष म्हणजे, हे रजिस्टर कोणत्याही एका कॉम्प्युटरवर नसून जगभरातील लाखो कॉम्प्युटर्सवर एकाच वेळी अपडेट होते. यामुळे या रजिस्टरमधील डेटा हॅक करणे, त्यात बदल करणे किंवा पैशांची फसवणूक करणे कोणत्याही व्यक्ती किंवा सरकारसाठी अशक्य आहे. हीच पारदर्शकता क्रिप्टोची सर्वात मोठी ताकद आहे.
३. लोक यात गुंतवणूक का करत आहेत? (Why are people investing in this?)
)क्रिप्टो बाजार आज आकर्षणाचे केंद्र बनण्याचे मुख्य कारण म्हणजे यातून मिळणारा अवाढव्य परतावा (Returns). पारंपरिक गुंतवणूक पर्याय जसे की बँक एफडी (FD), सोने किंवा शेअर मार्केट यांच्या तुलनेत क्रिप्टोने गेल्या काही वर्षांत हजारो पटीने जास्त नफा दिला आहे. ज्या लोकांनी सुरुवातीच्या काळात बिटकॉईन किंवा इथेरियमसारख्या कॉईन्समध्ये (Ethereum Coins) अगदी काही हजार रुपये गुंतवले होते, ते आज करोडपती झाले आहेत. याशिवाय, हे व्यवहार थेट मध्यस्थांशिवाय आणि अतिशय जलद होत असल्यामुळे तरुण पिढी याकडे एक आधुनिक गुंतवणुकीचे साधन म्हणून मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे.
४. क्रिप्टोमधील सर्वात मोठे धोके?
कोणत्याही गुंतवणुकीच्या मार्केटमध्ये जिथे प्रचंड नफा असतो, तिथे तितकाच धोकाही असतो. क्रिप्टो मार्केटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आणि वीक पॉईंट म्हणजे याची अस्थिरता (Volatility). या बाजारात कधी काय होईल याचा नेम नसतो. आज गगनाला भिडलेली एखाद्या कॉईनची किंमत उद्या थेट जमिनीवर येऊन आदळू शकते. येथे एका दिवसात ३० ते ४० टक्क्यांची घसरण होणे सामान्य मानले जाते, जी सोसणे सामान्य गुंतवणूकदाराच्या मानसिकतेच्या पलीकडचे आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कायदेशीर अनिश्चितता. भारतात क्रिप्टोवर बंदी नसली तरी यातून होणाऱ्या नफ्यावर तब्बल ३०% कर (Tax) आणि १% TDS आकारला जातो, जो खूप जास्त आहे. भविष्यात सरकारने नियम अजून कडक केले, तर तुमचे पैसे अडकण्याची भीती नेहमीच असते.
५. सर्वसामान्यांनी यात गुंतवणूक करावी का?
Cryptocurrency Guide: आता अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की, सर्व सामान्य गुंतावणूकदारांनी क्रिप्टोमध्ये पैसे लावावे का? तर याचे प्रामाणिक उत्तर असे आहे की क्रिप्टोकरन्सी हा झटपट श्रीमंत होण्याचा मंत्र नाही, तर ती एक अत्यंत जोखमीची आधुनिक गुंतवणूक आहे. जर तुम्ही कष्टाने कमवलेला सगळा पैसा रातोरात डबल होईल या आशेने क्रिप्टोमध्ये टाकत असाल, तर तो निव्वळ जुगार ठरेल.
मित्रांनो, १ एप्रिल २०२६ पासून भारताच्या टॅक्स सिस्टिममध्ये मोठे बदल होत आहेत. विशेषतः नोकरदार वर्गासाठी सरकारने काही जबरदस्त ‘जॅकपॉट’ दिले आहेत, तर काही ठिकाणी नियम कडक केले आहेत. ९०% लोकांना हे नियम अजून माहित नाहीत, त्यामुळे हा ब्लॉग नीट समजून घ्या!
१. HRA मध्ये मोठा बदल: पुणे-मुंबई आता एकाच रांगेत!
आतापर्यंत फक्त मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या शहरांत राहणाऱ्यांना ५०% HRA वजावट मिळायची. पण आता पुणे, बंगळुरू, हैदराबाद आणि अहमदाबाद या शहरांचा समावेश ‘मेट्रो’ यादीत झाला आहे.
फायदा: या शहरांत राहणाऱ्यांना आता ४०% ऐवजी ५०% HRA वजावट मिळेल.
ट्विस्ट: आता Form 124 (जो जुन्या Form 12BB ची जागा घेईल) मध्ये घरमालकासोबतचे तुमचे नाते सांगावे लागेल. पालकांना भाडे देऊन टॅक्स वाचवायचा असेल, तर पक्का बँक ट्रान्सफर पुरावा अनिवार्य आहे!
२. मुलांच्या शिक्षणासाठी मोठा ‘रिलिफ’
गेल्या कित्येक वर्षांपासून मुलांच्या शिक्षणावर मिळणारी वजावट अत्यंत कमी होती. आता ती थेट ४ पटीने वाढली आहे:
Education Allowance: महिना १०० रुपयांवरून थेट ३,००० रुपये प्रति मूल (जास्तीत जास्त २ मुले).
Hostel Allowance: महिना ३०० रुपयावरून थेट ९,००० रुपये प्रति मूल.
फायदा: दोन मुले असतील, तर वर्षाला २.८८ लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त टॅक्स वाचवता येईल!
३. जेवणाचे कूपन (Food Coupons) आता ‘महा’फायद्याचे
ऑफिसकडून मिळणाऱ्या सोडेक्सो किंवा जेवणाच्या कूपनची मर्यादा वाढवण्यात आली आहे.
आधी एका जेवणावर फक्त ५० रुपये टॅक्स-फ्री होते, आता ती मर्यादा २०० रुपये प्रति जेवण झाली आहे.
दिवसाला दोन जेवणं धरली तर वर्षाला साधारण १.०५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न टॅक्स-फ्री होऊ शकते.
४. ऑफिस गिफ्ट्स आणि बिनव्याजी कर्ज
गिफ्ट्स: कंपनीकडून मिळणारे दिवाळी गिफ्ट्स किंवा रिवॉर्ड्स आता १५,००० रुपयांपर्यंत टॅक्स-फ्री आहेत (आधी ही मर्यादा ५,००० होती).
कर्ज: जर तुम्ही कंपनीकडून व्याजाशिवाय कर्ज घेतले, तर २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर कोणताही ‘Perquisite Tax’ लागणार नाही. आधी ही मर्यादा फक्त २०,००० रुपये होती.
५. इलेक्ट्रिक वेईकल (EV) वापरताय?
जर तुमची कंपनी तुम्हाला कार देत असेल, तर आता इलेक्ट्रिक गाड्यांसाठी विशेष सवलतींचे नियम आले आहेत, ज्यामुळे तुमचे टॅक्स व्हॅल्यूएशन कमी होईल.
⚠️ सर्वात महत्त्वाची गोष्ट!
हे सर्व फायदे प्रामुख्याने Old Tax Regime (जुनी कर रचना) निवडणाऱ्यांसाठी आहेत. तसेच, हे सर्व ‘Heads’ तुमच्या CTC (पगार रचनेचा) भाग असणे आवश्यक आहे. जर तुमच्या सॅलरी स्लिपमध्ये हे नाव नसतील, तर तुम्हाला फायदा मिळणार नाही.
काय कराल?
त्वरीत तुमच्या HR शी संपर्क साधा आणि नवीन नियमांनुसार तुमचे पगार स्ट्रक्चर अपडेट करून घ्या. १ एप्रिलच्या आधी हे काम झाले तरच संपूर्ण वर्षभर फायदा मिळेल!
हा व्हिडिओ/पोस्ट तुमच्या ऑफिसच्या ग्रुपवर नक्की शेअर करा आणि अशाच ‘मनी-सेव्हिंग’ टिप्ससाठी फॉलो करा!
२०२० सालातील तो काळ आठवतोय? रस्ते ओस पडले होते, कारखाने शांत होते आणि प्रत्येकाच्या मनात भविष्याबद्दल भीती होती. कोविड-19 महामारीने भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतिहासातील सर्वात मोठा धक्का दिला. उद्योग-व्यवसाय बंद पडले, लाखो लोकांनी नोकऱ्या गमावल्या, पुरवठा साखळी (Supply Chain) विस्कळीत झाली आणि जीडीपीमध्ये मोठी घट झाली.
2020 ते 2025 ही सहा वर्षे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी जिद्द, चिकाटी आणि पुनर्रचनेचा काळ ठरली आहेत. गेल्या सहा वर्षांत भारताने केवळ स्वतःला सावरलं नाही, तर जगाला थक्क करणारी प्रगती केली आहे. हा प्रवास नक्की कसा होता? आपण काय कमावलं आणि काय गमावलं? जाणून घेऊया…
2020–21 या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी जवळपास 7% नी घटला, जी ऐतिहासिक घसरण होती. देशव्यापी लॉकडाउनमुळे विविध वस्तुनिर्मिती आणि सेवा (Product based and Service Based Companies), शिक्षण, शेती या सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला. उत्पादन थांबले आणि ग्राहकांची मागणीदेखील कमी झाली. लघु व मध्यम उद्योग, स्थलांतरित कामगार आणि असंघटित क्षेत्रातील कामगार सर्वाधिक प्रभावित झाले. त्यानंतर सरकारच्या लसीकरण मोहिमेमुळे, प्रोत्साहन पॅकेजेस आणि रिझर्व्ह बँकेच्या अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा (Liquidity) नियंत्रित ठेवण्याच्या उपाययोजनांमुळे अर्थव्यवस्था हळूहळू स्थिर झाली.
शेती
संकटाच्या या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला शेती क्षेत्राने आधार दिला. शहरी नोकऱ्या गमावलेल्या कामगारांना ग्रामीण भागाने सामावून घेतले. कोविडनंतर अॅग्री-टेक (Agri-Tech), डिजिटल बाजारपेठ आणि झालेला लाभ थेट हातात मिळणे यामध्ये वाढ झाली. तरीही हवामान बदल, शेकऱ्यांकडील जमिनीचे लहान लहान तुकडे आणि उत्पन्नातील अस्थिरता ही शेतकऱ्यांसमोरील मोठी आव्हाने आहेत.
उद्योग
लघुउद्योगांना मिळणारा पैसा आणि मागणी घटल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेकांनी डिजिटल पेमेंट्स, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि ई-कॉमर्स (E-Commerce)चा अवलंब करून टिकून राहण्याचा प्रयत्न केला. GST मुळे व्यवहार अधिक औपचारिक झाले. महामारीमुळे MSMEs (Micro, Small & Medium Enterprises) मध्ये डिजिटल परिवर्तनाचा वेग वाढला. IT, औषधनिर्मिती, दूरसंचार आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांनी जलद गतीने पुनरागमन केले. 2022 नंतर कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारली. पायाभूत सुविधांवरील सरकारी खर्चामुळे खासगी गुंतवणुकीला चालना मिळाली. महामारीमुळे जागतिक पुरवठा साखळीतील कमकुवतपणा उघड झाला. त्यानंतर भारताने PLI (Production Linked Incentives) आणि मेक इन इंडिया (Make In India) योजनांद्वारे देशांतर्गत उत्पादन वाढवले. मोबाईल उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स आणि नवीकरणीय ऊर्जा (Renewable Energy) क्षेत्रात वाढ झाली. पायाभूत सुविधांवरील गुंतवणुकीमुळे औद्योगिक उत्पादनाला चालना मिळाली.
रोजगार आणि AI
महामारीदरम्यान तरुण आणि असंघटित कामगारांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याचे लक्षात आले. अनेक शहरी कामगार ग्रामीण भागात परतले. 2023 ते 2025 दरम्यान रोजगार परिस्थितीत हळूहळू सुधारणा झाली. औपचारिक नोकऱ्यांमध्ये वाढ झाली आणि गिग इकॉनॉमीचा (उदा. डिलिव्हरी, फ्रीलान्स काम) विस्तार झाला. तरीही नोकरीसाठी आवश्यक कौशल्ये उमेदवारांकडे नसणे आणि स्थिर आणि गुणवत्तापूर्ण नोकऱ्यांची कमतरता ही मोठी चिंता आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI – Artificial Intelligence) व्यवसायातील उत्पादकतेचा महत्त्वाचा घटक बनली आहे. कंपन्या ग्राहक सेवा, डेटा विश्लेषण, फसवणूक शोध आणि ऑटोमेशनसाठी AI चा वापर करतात. AI मुळे कार्यक्षमता वाढते, पण एकच काम वारंवार केले जाणाऱ्या आणि कमी कौशल्याच्या नोकऱ्यांना धोका निर्माण होतो. एकूणच भारताच्या कामगारवर्गाचे भवितव्य कौशल्य विकास आणि डिजिटल शिक्षणावर अवलंबून आहे, असे दिसून येते.
कोविडनंतरच्या भारतातील नवीन आर्थिक ट्रेंड
१. सार्वजनिक डिजीटलीकरण –
यूपीआय (UPI), आधार आणि डिजिटल प्लॅटफॉर्मने आर्थिक समावेशन आणि पेमेंट सिस्टममध्ये बदल घडवून आणले आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये virtual classrooms सारखे बदल पाहायला मिळाले.
२. स्टार्टअप आणि इनोव्हेशन (Startups and Innovations)
एआय(AI), ईव्ही (EV), फिनटेक(FinTech) आणि क्लायमेट टेक (Climate Tech) मध्ये वाढ झाल्याने भारत जागतिक स्तरावर अव्वल स्टार्टअप इकोसिस्टममध्ये स्थान मिळवत आहे.
३. हरित ऊर्जा क्रांती
नवीकरणीय ऊर्जा क्षमता वेगाने वाढली आहे. इलेक्ट्रिक वाहने (EV), सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यांचा वापर वाढला आहे.
४. ग्राहकांच्या वर्तनात बदल
शहरी ग्राहक डिजिटल सेवा, प्रवास आणि प्रीमियम उत्पादनांवर अधिक खर्च करत आहेत. ग्रामीण भागात फार वेगाने बदल होत नसले तरी ते बंद झालेले नाहीत.
कोविडनंतर भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत आणि डिजिटल झाली आहे. मात्र ही वाढ सर्व क्षेत्रांमध्ये समान नाही. पुढील टप्पा सर्वसमावेशक विकास, रोजगारनिर्मिती आणि कौशल्य विकासावर अवलंबून असेल. योग्य नियोजन केल्यास हे दशक भारताच्या पुढील मोठ्या आर्थिक झेपेची सुरुवात ठरू शकते.
तुमच्या मते, गेल्या सहा वर्षांत तुमच्या आयुष्यात झालेला सर्वात मोठा आर्थिक बदल कोणता? खाली कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि हा ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा!
अनेक लोकांच्या खात्यातून कधी ना कधी अचानक पैसे कापले गेलेले असतात. विशेषतः UPI Auto-Pay मुळे दर महिन्याला काही रक्कम आपोआप वजा होते आणि ती नेमकी कशासाठी आहे, हे अनेकांना लक्षातही येत नाही. Netflix, OTT प्लॅटफॉर्म, विविध मोबाईल अॅप्स, EMI, वीज-पाणी बिले किंवा इतर डिजिटल सेवा यासाठी Auto-Pay सुरू असतो. सुरुवातीला फक्त “हो” किंवा “Allow” क्लिक केल्यामुळे ही सेवा चालू होते, पण नंतर ती विसरली जाते. त्यामुळे खात्यातून पैसे गेले तरी “हे पैसे कुठे गेले?” असा प्रश्न निर्माण होतो. अनेक वेळा हे लक्षात यायला महिने जातात. या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये अस्वस्थता आणि अविश्वास निर्माण होतो. याच समस्येवर उपाय म्हणून NPCI कडून UPI Auto-Pay संदर्भात बदल करण्यात येत आहेत, जे ग्राहकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
Auto-Pay Portability म्हणजे काय?
NPCI कडून एक मोठा बदल जाहीर करण्यात आला आहे, तो म्हणजे Auto-Pay Portability. याचा अर्थ असा की आता UPI Auto-Pay एका UPI अॅपवरून दुसऱ्या UPI अॅपमध्ये shift करता येणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने Google Pay वरून Auto-Pay सुरू केला असेल आणि नंतर तो PhonePe किंवा दुसऱ्या UPI अॅपवर गेला, तरी subscription बंद होणार नाही. आधी अशी सुविधा नव्हती. अॅप बदलला की अनेक वेळा ग्राहक गोंधळात पडायचे. Auto-Pay चालू आहे की नाही, याची खात्री नसायची. आता या बदलामुळे अॅप बदलले तरी Auto-Pay सुरू राहणार आहे आणि ग्राहकाला वेगवेगळ्या अॅप्समध्ये जाऊन सेटिंग तपासण्याची गरज भासणार नाही. हा बदल UPI वापर अधिक सोपा आणि पारदर्शक बनवणारा आहे.
या बदलाचा फायदा कोणाला होणार?
या नव्या प्रणालीचा सर्वात मोठा फायदा थेट ग्राहकांना होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अचानक पैसे कापले जाण्याचे प्रमाण कमी होईल. कारण ग्राहकाला आपल्या सर्व subscriptions वर नियंत्रण ठेवता येईल. कोणत्या सेवेसाठी किती पैसे जात आहेत, हे स्पष्टपणे पाहता येणार आहे. त्यामुळे अनावश्यक किंवा विसरलेली subscriptions वेळेत बंद करता येतील. यामुळे ग्राहकाला पूर्ण power मिळणार आहे. यासोबतच, काही अॅप्स वापरकर्त्यांना न कळवता Auto-Pay चालू ठेवतात, अशा “dark patterns” ला आळा बसेल. ग्राहकांना फसवणूक किंवा गोंधळात टाकणाऱ्या पद्धती कमी होतील. एकूणच, हा बदल डिजिटल व्यवहार अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि ग्राहक-केंद्रित बनवणारा आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने काय बदल?
NPCI ने या बदलांसोबत सुरक्षेवरही विशेष भर दिला आहे. Auto-Pay मध्ये कोणताही बदल करताना प्रत्येक वेळी UPI PIN आवश्यक असणार आहे. त्यामुळे परवानगीशिवाय कोणताही बदल होणार नाही. याशिवाय, ९० दिवसांत फक्त एकदाच portability करता येणार आहे, ज्यामुळे वारंवार बदल करून गैरवापर होण्याची शक्यता कमी होते. ग्राहकांचा डेटा सुरक्षित ठेवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. कोणतीही माहिती परवानगीशिवाय वापरली जाणार नाही, अशी रचना करण्यात आली आहे. त्यामुळे Auto-Pay सुविधा वापरताना ग्राहक अधिक निश्चिंत राहू शकतील. डिजिटल व्यवहारांमध्ये सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची असते आणि हे नवे नियम त्याच दिशेने एक ठोस पाऊल आहेत.
आधी नेमकी समस्या काय होती?
याआधीची मोठी समस्या म्हणजे अनेक लोकांना त्यांच्या खात्यातून नेमके कशासाठी पैसे जात आहेत, हेच माहीत नसायचे. Netflix, OTT, विविध अॅप्स, EMI, बिले यासाठी UPI Auto-Pay सुरू असायचा, पण त्याची माहिती एका ठिकाणी सहज मिळत नव्हती. वेगवेगळ्या अॅप्समध्ये वेगवेगळ्या सेटिंग्ज असल्यामुळे ग्राहक गोंधळात पडायचे. काही subscriptions वर्षानुवर्षे चालू राहायच्या, पण वापर होत नसायचा. त्यामुळे अनावश्यक आर्थिक भार पडायचा. हीच समस्या लक्षात घेऊन NPCI ने Auto-Pay व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे ग्राहकांना अधिक स्पष्टता मिळणार आहे.
Central Portal ची सुविधा.
NPCI ने UPI Auto-Pay साठी एक Central Portal सुरू केले आहे. या पोर्टलवर ग्राहकांना त्यांच्या सर्व Active Auto-Pay एकाच ठिकाणी पाहता येणार आहेत. कुठे किती पैसे जात आहेत, कोणत्या तारखेला कपात होते, हे सर्व तपशील इथे उपलब्ध असणार आहेत. तसेच, गरज नसलेले Auto-Pay सहज cancel करण्याची सुविधा मिळणार आहे. यामुळे ग्राहकांना वेगवेगळ्या अॅप्समध्ये शोधाशोध करण्याची गरज भासणार नाही. सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळाल्यामुळे आर्थिक नियोजन करणे सोपे होईल आणि अनावश्यक खर्च टाळता येईल.
१ जानेवारी २०२६ पासून लागू होणारे नियम.
NPCI ने जाहीर केल्याप्रमाणे, १ जानेवारी २०२६ पासून UPI Auto-Pay साठी नवे नियम लागू होणार आहेत. या बदलांचा उद्देश एकच आहे — लपवलेली कपात थांबवणे आणि ग्राहकांना पूर्ण नियंत्रण देणे. डिजिटल व्यवहारांचा वापर वाढत असताना, अशा प्रकारचे नियम अत्यंत आवश्यक आहेत. यामुळे UPI प्रणाली अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह बनेल. ग्राहकांना आता दर महिन्याला “पैसे कुठे गेले?” असा प्रश्न पडणार नाही. एकूणच, हे बदल UPI वापरकर्त्यांसाठी सकारात्मक आणि उपयुक्त ठरणार आहेत.
आजच्या अस्थिर जागतिक परिस्थितीत जिथे मोठमोठे देश दबावाखाली निर्णय बदलत आहेत, तिथे भारताने एक धाडसी पाऊल उचलले आहे. भरताने रशियासोबत पुढील ५ वर्षांसाठी आर्थिक आणि ऊर्जा सहकार्याचा महत्त्वपूर्ण करार केला आहे. हा केवळ दोन देशांमधील कागदपत्रांवरचा करार नाही, तर भारताच्या ‘आत्मनिर्भरतेच्या‘ दिशेने टाकलेले एक खंबीर पाऊल आहे.
रशियाने भारताला अखंड तेल-इंधन पुरवठ्याचे आश्वासन दिले आहे, जे केवळ ऊर्जा सुरक्षेसाठीच नव्हे तर भारताच्या आर्थिक विकास, रोजगारनिर्मिती आणि नागरिकांच्या जीवनमानाच्या स्थैर्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हा करार दाखवतो की भारताने आपल्या गरजांना आणि स्वारस्यांना प्राधान्य देत जागतिक दबावाच्या परिस्थितीतही धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. पण, या कराराचा तुमच्या-आमच्या दैनंदिन आयुष्यावर नेमका काय परिणाम होणार? चला पाहूया.
१. पेट्रोल-डिझेल आणि तुमचा खिसा
तुम्ही पाहिलंच असेल की जगातील अनेक देशांमध्ये इंधनाचा तुटवडा आणि महागाईचा भडका उडाला आहे. अशा वेळी भारताने रशियाकडून अखंड तेल पुरवठ्याचे (Continuous Oil Supply) आश्वासन मिळवले आहे.
फायदा: यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्यास मदत होईल.
परिणाम: वाहतूक खर्च नियंत्रणात राहील, ज्यामुळे भाजीपाला आणि किराणा मालाची महागाई वाढणार नाही. सामान्य माणसासाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे.
२. ‘भारत प्रथम’ (India First) – जागतिक दबावाला उत्तर
पाश्चात्त्य राष्ट्रांच्या निर्बंधांमुळे अनेक देश रशियाशी व्यापार करण्यास घाबरत होते. पण भारताने जगाला स्पष्ट संदेश दिला आहे— “आमच्यासाठी राष्ट्रीय हित आणि आमचे नागरिक महत्त्वाचे आहेत, आंतरराष्ट्रीय दबाव नाही.” कोट्यवधी भारतीयांच्या ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी सरकारने घेतलेला हा निर्णय भारताच्या मुत्सद्दी नेतृत्वाचा पुरावा आहे.
३. फक्त तेल नाही, तर बरेच काही!
हा करार केवळ तेलापुरता मर्यादित नाही. याचा फायदा शेतकऱ्यांना आणि सैन्यालाही होणार आहे:
शेतकऱ्यांसाठी: रशियाकडून खतांचा (Fertilizers) वेळेवर आणि पुरेसा पुरवठा होणार आहे, ज्यामुळे शेती उत्पादनाला मोठा आधार मिळेल.
संरक्षण आणि मेक इन इंडिया: आधुनिक तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्रांचे उत्पादन आता भारतातच करण्यावर भर दिला जाईल. यामुळे भारताची सामरिक ताकद (Strategic Power) वाढेल आणि रोजगार निर्मिती होईल.
भारत–रशिया करार केवळ तेलपुरवठ्यापुरता मर्यादित नसून त्यात व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण, कृषी आणि औद्योगिक सहकार्याचा समावेश आहे. रशियाने दिलेले अखंड तेलपुरवठ्याचे आश्वासन भारताला दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षा देणारे आहे. जागतिक बाजारातील तेलाच्या दरातील चढ-उतार, इंधनाच्या कमतरतेमुळे निर्माण होणारी महागाई आणि विविध देशांमधील राजकीय तणाव लक्षात घेतल्यास, हा करार नागरिकांच्या दैनंदिन जीवनासाठी किती महत्त्वाचा आहे हे स्पष्ट होते. रशियासोबतची ही भागीदारी भारताला तंत्रज्ञान हस्तांतरण, संरक्षण क्षेत्रातील सहयोग, कृषी उत्पादन आणि उर्वरक उद्योगात नवे मार्ग उपलब्ध करून देईल. हा करार फक्त आजचा लाभ देत नाही, तर भविष्यातील पिढ्यांसाठी स्थिरता, विकास आणि स्वावलंबनाची हमी तयार करतो.
हा करार केवळ भारत–रशिया एवढाच मर्यादित नसून जागतिक भू-राजकारणात (Geopolitics) भारताच्या ‘स्व-हित प्रथम’ या भूमिकेचा ठळक पुरावा आहे. पाश्चात्त्य राष्ट्रांनी रशियावर लादलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवरही भारताने आपल्या राष्ट्रीय गरजा आणि ऊर्जा सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. हे दर्शवते की भारत आता कोणत्याही जागतिक गटाच्या दबावाखाली झुकणारा नाही; उलट आपल्या कोट्यवधी नागरिकांच्या भविष्यासाठी योग्य ते निर्णय घेण्याची क्षमता त्याने सिद्ध केली आहे. अखंड इंधन पुरवठा सुनिश्चित करून भारताने आर्थिक वाढीच्या गतीला ब्रेक लागू नये याची काळजी घेतली आहे.
याचा अर्थ, उच्च तंत्रज्ञानाचे उत्पादन आता अधिक प्रमाणात भारतातच होणार आहे. संरक्षण क्षेत्रातील दीर्घकालीन मैत्री आता आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधन-आधारित सहकार्यामध्ये रूपांतरित होत आहे, ज्यामुळे भारताची सामरिक क्षमता (Strategic Capability) वाढेल. ही भागीदारी केवळ व्यापार वाढवणार नाही, तर ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वानुसार विकासाच्या संधी इतर विकसनशील देशांपर्यंत पोहोचवण्यास हातभार लावेल.अखेरीस, हा ५ वर्षांचा करार केवळ सरकारी कागदपत्रांतील आकडेवारी नसून देशातील प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित आहे.
इंधनाचा पुरवठा स्थिर राहिल्यास वाहतुकीचा खर्च नियंत्रित राहील, ज्यामुळे महागाईवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल आणि सामान्य माणसाच्या खिशाला दिलासा मिळेल. उद्योगांना स्थिरता मिळाल्यास ते अधिक गुंतवणूक करतील आणि नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. घरापासून कारखान्यापर्यंत, शेतीपासून सेवा क्षेत्रापर्यंत — ऊर्जा क्षेत्रातील स्थिरता एक आर्थिक सुरक्षा कवच निर्माण करते. भारत आणि रशियाच्या या दीर्घकालीन सहकार्यामुळे तरुण पिढीला स्थिर आणि विकसित भारताची हमी मिळते. हा करार दाखवतो की धोरणात्मक मैत्री आणि दूरदृष्टीचे निर्णय भविष्यातील आर्थिक प्रगतीचा आणि नागरिकांच्या सुरक्षित व सुखकर जीवनाचा पाया रचतात.
भारत–रशिया दीर्घकालीन सहकार्याने जगाला स्पष्ट संदेश दिला आहे: राष्ट्रीय हित आणि ऊर्जा सुरक्षा कोणत्याही आंतरराष्ट्रीय दबावापेक्षा अधिक महत्त्वाची आहे. इंधनाचा पुरवठा अखंड राहिला की देशाची आर्थिक चक्रे सतत फिरत राहतात — कारखाने चालतात, शेतीत ट्रॅक्टर फिरतात आणि प्रत्येक घरात स्थिरतेची वीज पोहोचते. भारत-रशिया करार म्हणजे केवळ तेलाच्या टँकरचा सौदा नाही, तर ते भारताच्या स्वाभिमानाचे आणि स्वावलंबनाचे प्रतीक आहे. जागतिक अस्थिरतेच्या काळात आपल्या नागरिकांना सुरक्षित आणि स्थिर भविष्य देण्यासाठी उचललेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे.
सध्याच्या आर्थिक वातावरणात महागाई (Inflation) हा सामान्य नागरिकांपासून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत असल्याने, महिन्याचे बजेट सांभाळणे अनेकांसाठी जिकिरीचे झाले आहे. पण ही महागाई वाढते का, आणि यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कोणाची आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे—भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि त्यांचे महत्त्वाचे अस्त्र: रेपो रेट (Repo Rate).
रेपो रेट म्हणजे थोडक्यात, आरबीआय इतर बँकांना ज्या दराने कर्ज देते तो दर. अनेकदा आपण बातम्यांमध्ये वाचतो की ‘आरबीआयने रेपो रेट वाढवला’, आणि लगेच आपल्याला वाटते की याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होईल. महागाई आणि रेपो रेट यांचा थेट संबंध एखाद्या दोरीप्रमाणे बांधलेला आहे. जेव्हा बाजारात जास्त पैसा येतो आणि वस्तूंची मागणी वाढते, तेव्हा महागाई वाढते.
या वाढत्या महागाईला ब्रेक लावण्यासाठी, आरबीआय रेपो रेट वाढवते, ज्यामुळे बँकांचे कर्ज महाग होते आणि पर्यायाने बाजारातील पैशांचा ओघ कमी होतो. हा एक जादूचा उपाय आहे, जो बाजारातील संतुलन राखण्याचे काम करतो. या लेखात, आपण सध्याच्या महागाई वाढण्याची नेमकी कारणे कोणती आहेत, आरबीआय हे ‘रेपो रेट’ नावाचे हत्यार वापरून महागाईवर नियंत्रण कसे ठेवते आणि सामान्य माणसाच्या मासिक हप्त्यांपासून (EMI) ते बचतीपर्यंत या निर्णयांचा कसा परिणाम होतो, याचा सखोल आढावा घेणार आहोत.
महागाई आणि रेपो रेट संबंध
सध्या महागाई वाढण्यामागे अनेक गुंतागुंतीची कारणे दडलेली आहेत, जी केवळ देशांतर्गत नसून जागतिक स्तरावरही पसरलेली आहेत. सर्वात मोठे कारण म्हणजे पुरवठा साखळीतील अडथळे (Supply Chain Disruptions). कोविड-१९ महामारीनंतर जगभरात उत्पादनावर परिणाम झाला आणि वस्तूंचा पुरवठा मागणीनुसार होऊ शकला नाही. याशिवाय, इंधन आणि ऊर्जा दरातील वाढ हे देखील एक प्रमुख कारण आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल (Crude Oil) महागल्यामुळे मालवाहतूक खर्च वाढला, परिणामी भाजीपाला, धान्य आणि निर्मित वस्तूंसारख्या प्रत्येक गोष्टीची किंमत वाढली. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे लोकांच्या हातात खर्च करण्यासाठी वाढलेला पैसा (Liquidity). सरकारने महामारीच्या काळात दिलेले आर्थिक पॅकेजेस, तसेच व्यवसाय पुन्हा सुरू झाल्यामुळे लोकांना मिळालेले वेतन यामुळे बाजारात पैशाचा प्रवाह वाढला.
जेव्हा लोकांकडे जास्त पैसा असतो आणि वस्तू कमी असतात, तेव्हा स्वाभाविकपणे वस्तू महाग होतात. शेवटी, रशिया-युक्रेन युद्धामुळे अन्नधान्य (उदा. गहू) आणि खते यांच्या पुरवठ्यावर झालेला परिणाम देखील अनेक देशांमध्ये महागाई वाढण्यास हातभार लावत आहे. ही सर्व कारणे एकत्र येऊन महागाईला एक प्रचंड आव्हान बनवत आहेत, ज्याचा सामना करण्यासाठीच आरबीआयला रेपो रेटचा वापर करणे आवश्यक ठरते
महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ज्या साधनांचा वापर करते, त्यापैकी सर्वात प्रभावी आणि महत्त्वाचे साधन म्हणजे रेपो रेट (Repo Rate). रेपो रेट ही एक अशी किल्ली आहे, जी बाजारातील पैशाचा प्रवाह (Liquidity) नियंत्रित करते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, रेपो रेट म्हणजे ज्या दराने देशातील व्यावसायिक बँका (Commercial Banks), त्यांच्या तात्काळ गरजा पूर्ण करण्यासाठी आरबीआय कडून कर्ज घेतात.
जेव्हा आरबीआयला वाटते की बाजारात खूप जास्त पैसा फिरत आहे, ज्यामुळे मागणी वाढून महागाई वाढत आहे, तेव्हा आरबीआय रेपो रेट वाढवते. रेपो रेट वाढल्यामुळे, व्यावसायिक बँकांना आरबीआय कडून कर्ज घेणे महाग पडते. परिणामी, या बँका देखील पुढे सामान्य नागरिक आणि कंपन्यांना (उदा. गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा व्यवसाय कर्ज) देणाऱ्या कर्जाचे व्याजदर वाढवतात. कर्ज महाग झाल्यावर, लोक आणि कंपन्या कमी कर्ज घेतात आणि आपला खर्च कमी करतात.
मागणी (Demand) कमी झाल्यामुळे, वस्तूंच्या किमती (महागाई) हळूहळू खाली येऊ लागतात. अशाप्रकारे, रेपो रेटचा वापर करून आरबीआय अप्रत्यक्षपणे अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा कमी करून स्थिरता आणण्याचा प्रयत्न करते. पो रेटमध्ये होणारे बदल हे केवळ मोठमोठ्या बँका आणि अर्थव्यवस्थेपुरते मर्यादित नसतात; ते थेट सामान्य माणसाच्या खिशावर परिणाम करतात. जेव्हा आरबीआय रेपो रेट वाढवते, तेव्हा सर्वात आधी परिणाम दिसतो तो कर्जदारांवर. जर तुम्ही घर, गाडी किंवा वैयक्तिक कर्ज घेतले असेल, तर तुमच्या बँकेकडून आकारले जाणारे व्याजदर वाढतात.
याचा अर्थ तुमचे मासिक हप्ते (EMI) वाढू शकतात, किंवा कर्जाचा कालावधी (Tenure) वाढू शकतो. त्यामुळे दर महिन्याला तुमच्या हातात खर्च करण्यासाठी कमी पैसा उरतो. दुसऱ्या बाजूला, रेपो रेट वाढल्याने बचत करणाऱ्यांना थोडा फायदा होतो. बँका त्यांच्या मुदत ठेवींवरील (Fixed Deposits – FD) व्याजदर वाढवतात, ज्यामुळे बचत केलेल्या पैशांवर तुम्हाला जास्त परतावा मिळतो. थोडक्यात, आरबीआयचे हे निर्णय कर्जदारांना खर्च कमी करायला लावतात आणि बचतदारांना प्रोत्साहन देतात. हा समतोल साधण्याचा प्रयत्न असतो, जेणेकरून बाजारातील जास्त मागणी कमी होऊन वस्तूंच्या वाढलेल्या किमती (महागाई) खाली येतील आणि आपल्या दैनंदिन जीवनातील आर्थिक ताण कमी होईल.
शेवटी, हे स्पष्ट होते की महागाई आणि रेपो रेट या दोन संकल्पना भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. सध्याची महागाई जागतिक पुरवठा साखळीतील अडथळे, वाढलेले इंधन दर आणि बाजारात पैशाचा वाढलेला प्रवाह यांसारख्या अनेक घटकांचा परिणाम आहे. या आव्हानात्मक परिस्थितीत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एक जबाबदार पालक म्हणून काम करते, जी रेपो रेटचा वापर करून अर्थव्यवस्थेतील ‘पैशाचा वेग’ नियंत्रित ठेवते.
जरी रेपो रेट वाढल्याने सुरुवातीला कर्जदारांचे मासिक हप्ते (EMI) वाढत असले आणि थोडा आर्थिक ताण येत असला, तरी दीर्घकाळात हा उपाय महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक असतो. स्थिर आणि नियंत्रित महागाई सामान्य नागरिक आणि देशाच्या आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे, प्रत्येक नागरिकाने आरबीआयच्या या निर्णयांकडे केवळ व्याजदराचे बदल म्हणून न पाहता, देशाच्या आर्थिक आरोग्यासाठी उचललेले पाऊल म्हणून पाहिले पाहिजे. भविष्यात आर्थिक स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी आरबीआयचे हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.
भारतात सोनं ही केवळ धातूची वस्तू नाही ते आपल्या भावनांशी, परंपरांशी आणि सुरक्षिततेच्या भावनेशी जोडलेलं आहे. बालपणापासून आपण पाहत आलो आहोत की आईच्या कानात चमकणारे झुमके किंवा आजीच्या हातातलं बांगड्यांचं सोनं हे केवळ दागिने नसतात; ते घरातील कष्ट, बचत आणि भविष्याची खात्री यांचं प्रतीक असतं. पैसा कधी स्थिर राहत नाही आज आहे, उद्या नसतो. पण सोनं? ते आपल्या जीवनातील संकटात नेहमी ढाल बनून उभं राहतं. महागाई वाढली, नोकरीची चिंता वाढली, बाजार कोसळला तरी सोनं मात्र आपल्या किमतीत चमकतच राहतं.
म्हणूनच प्रत्येक साधा माणूसही मनात एक छोटासा विचार सांभाळून ठेवतो . “थोडं सोनं असलं, तर उद्या सुरक्षित असेल.” पण बदलत्या काळात सोन्याचे स्वरूप बदलले आहे. आता सोनं फक्त घरातल्या तिजोरीत नसून मोबाईलमध्ये, मार्केटमध्ये, आणि डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे. याच नवीन पर्यायांमुळे गोंधळ वाढतो नेमकं कुठे गुंतवणूक करावी? आपला मेहनतीने कमावलेला पैसा कुठे सुरक्षित आणि फायदेशीर ठरेल? या प्रश्नाचं उत्तर शोधणाऱ्या प्रत्येक माणसाची हीच खरी कथा आहे.
सोनं हे फक्त धातू नाही, तर आपल्या मेहनतीचा आणि सुरक्षिततेचा प्रतीक आहे. भारतात प्रत्येक घरात सोनं ही फक्त दागिन्यांच्या स्वरूपात नसून, भविष्याची आश्वासकता म्हणून साठवले जाते. पण बदलत्या काळात सोन्याचे स्वरूपही बदलले आहे. आता आपल्या आवडीच्या गुंतवणुकीसाठी तीन मुख्य पर्याय आहेत – Physical Gold, Digital Gold, आणि Gold ETFs. प्रत्यक्ष सोनं (Physical Gold) म्हणजे दागिने किंवा नाणी, ज्यात आपल्याला ताबा मिळतो आणि संकटात लगेच विकता येते, पण चोरीचा धोका आणि मेकींग चार्जेस हे मोठे तोटे आहेत. Digital Gold मोबाईल अॅप्सवर खरेदी केलेले ऑनलाईन सोनं आहे,
जे सुरक्षित, शुद्ध आणि कमी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, पण काही स्टोरेज चार्जेस लागू होऊ शकतात. Gold ETFs हे शेअर बाजारातील सोन्याशी निगडित फंड आहेत, जे पारदर्शक, सुरक्षित आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सर्वात फायदेशीर मानले जातात. आपल्या मेहनतीच्या पैशाचे रक्षण करणे आणि भविष्यातील आर्थिक सुरक्षितता साधणे हे प्रत्येक माणसाचे स्वप्न असते. आणि नेमकं कुठे गुंतवणूक करावी, हे समजणे हा सध्याच्या काळातील प्रत्येक गुंतवणूकदारासाठी मोठा प्रश्न बनला आहे.
सोन्यातील गुंतवणूक ही फक्त आर्थिक निर्णय नसून आपल्या भविष्यातील सुरक्षिततेशी थेट जोडलेली आहे. जर उद्देश दीर्घकालीन आर्थिक वाढ आणि सुरक्षितता असेल, तर Gold ETFs सर्वात योग्य पर्याय ठरतात, कारण ते पारदर्शक, सुरक्षित आणि कमी खर्चिक आहेत. लहान गुंतवणूकदार किंवा नवशिक्यासाठी Digital Gold उपयुक्त आहे, जेथे थोड्या रकमेपासून सहज सुरुवात करता येते आणि ताबडतोब विक्री करता येते. आणि जर तुमचा उद्देश परंपरा, लग्न किंवा सणासुदीमध्ये दागिने वापरण्याचा असेल,
तर Physical Gold योग्य आहे. महत्त्वाचे म्हणजे, कोणताही निर्णय घेण्याआधी तुमच्या आर्थिक उद्दिष्टांचा विचार करा, जोखीम समजून घ्या आणि गरजेनुसार योग्य प्रकार निवडा. शेवटी, मेहनतीने कमावलेला पैसा सुरक्षित ठेवणे आणि भावी काळात आर्थिक स्थैर्य मिळवणे हेच खरी मोलाची संपत्ती आहे. सोन्यातील योग्य गुंतवणूक केल्याने फक्त पैसाच नाही, तर मनाची शांती आणि आत्मविश्वासही वाढतो, कारण आपल्याला माहिती असते की आपल्या कष्टाचा योग्य उपयोग केला आहे.
मात्र काही अॅप्समध्ये लहान स्टोरेज चार्जेस लागू होऊ शकतात. तिसरा आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून सर्वात फायदेशीर पर्याय म्हणजे Gold ETFs. हे शेअर बाजारात ट्रेड होणारे फंड आहेत, जे पूर्णपणे पारदर्शक, सुरक्षित आणि SEBI-नियंत्रित आहेत. खर्च कमी असल्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आदर्श आहेत, मात्र Demat आणि ट्रेडिंग खाते आवश्यक आहे.
एकूणच, तुमचा उद्देश, गुंतवणुकीची रक्कम आणि जोखीम स्वीकारण्याची तयारी यावरून ठरवावे की कोणता पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे.सोन्यात गुंतवणूक करताना प्रत्येक पर्यायाचे फायदे आणि तोटे समजून घेणे महत्त्वाचे आहे. Physical Gold चे फायदे म्हणजे प्रत्यक्ष ताबा मिळणे आणि आपत्कालीन परिस्थितीत लगेच विकता येणे; परंतु तोटे म्हणजे जास्त मेकींग चार्जेस, चोरीचा धोका, आणि विकताना बाजारभावाप्रमाणे किंमत मिळत नसणे.
Digital Gold हे सुरक्षित, शुद्ध (99.9%) आणि लिक्विड आहे, म्हणजे छोटी रक्कम गुंतवून हवे तेव्हा खरेदी-विक्री करता येते; मात्र काही अॅप्समध्ये स्टोरेज चार्जेस लागू होऊ शकतात. Gold ETFs ही सर्वात पारदर्शक आणि सुरक्षित गुंतवणूक असून दीर्घकालीन फायदा देतात, खर्च कमी असतो आणि SEBI-नियंत्रित आहेत; पण Demat आणि ट्रेडिंग खाते आवश्यक असल्याने नवशिक्यांसाठी थोडे क्लिष्ट वाटू शकतात.
तुलनेत पाहता, जर तुम्ही दीर्घकालीन लाभ आणि सुरक्षितता शोधत असाल, तर Gold ETFs सर्वोत्तम; लहान गुंतवणूकदार किंवा नवशिक्यासाठी Digital Gold उपयुक्त; आणि पारंपरिक दागिने, परंपरा आणि सणासुदीसाठी Physical Gold सर्वोत्तम.सोन्यातील गुंतवणूक ही फक्त पैसा साठवण्याची क्रिया नाही, तर ती आपल्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेचा आधार आहे. प्रत्येक व्यक्तीची गरज आणि उद्दिष्ट वेगवेगळी असते, त्यामुळे योग्य पर्याय निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
जर तुमचा उद्देश दीर्घकालीन फायदे आणि सुरक्षितता असेल, तर Gold ETFs ही सर्वोत्तम निवड आहे. लहान गुंतवणूकदार किंवा नवशिक्यांसाठी Digital Gold योग्य पर्याय ठरतो कारण थोड्या रकमेपासून सुरुवात करता येते आणि ताबडतोब विक्री करता येते. परंपरा, दागिने, आणि सणासुदीमध्ये वापरासाठी Physical Gold उपयुक्त आहे.
शेवटी, महत्त्वाचे म्हणजे गुंतवणूक करताना पैशाचे व्यवस्थापन, जोखीम समजून घेणे आणि भविष्यातील गरजा ध्यानात ठेवणे. योग्य पर्याय निवडल्यास फक्त आर्थिक फायदा नाही, तर मनाची शांती आणि आत्मविश्वासही मिळतो. त्यामुळे, तुमच्या मेहनतीच्या पैशाचा योग्य उपयोग करून तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आजच योग्य गुंतवणूक करा आणि सोन्यातील तुमच्या निर्णयाने आर्थिक स्थैर्याचा पाया घाला.
आपला देश सध्या जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, आणि या अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा आधारस्तंभ म्हणजे आपला महाराष्ट्र. १ मे रोजी जेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात हे दोन स्वतंत्र राज्यं बनले, तेव्हा लोकांना प्रश्न पडला असावा — “आता महाराष्ट्राचं काय होणार?” सगळे गुजराती व्यापारी आता गुजरातला जाणार, मग महाराष्ट्राचं भविष्य काय असेल? पण या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्रातील लोकांनी केव्हाच दिलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या पुरोगामी विचारांचा वारसा आणि परंपरा जपत आलेला हा महाराष्ट्र आज भारत देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग बनला आहे.
महाराष्ट्राने — विशेषतः पुणे आणि मुंबईसारख्या शहरांनी आधीपासूनच सर्वांना सामावून घेतलं आहे. महाराष्ट्रातील लोकांची मनं जितकी मोठी, तितकीच हळवीसुद्धा. आरं, थोडी कुरबुर झाली तर लढायलाही तयार, पण कोणाचं दु:ख पाहून मनाने हळवं होणारे हेच लोक.गेल्या काही दशकांपासून महाराष्ट्राने अनेक क्षेत्रांत प्रगती केली आहे. आणि या प्रगतीच्या वाटचालीत सर्वांत पुढे आहे — स्वप्नांची नगरी, मुंबई.असं म्हणतात की इथे सगळी स्वप्नं पूर्ण होतात; जो मुंबईला येतो, तो कधीच रिकाम्या हाताने परत जात नाही.
मुंबईने सर्वांना सामावून घेतलं आणि महाराष्ट्राची राजधानी म्हणून आपली ओळख निर्माण केली. याच मुंबईने अनेक उद्योगपती, अभिनेते आणि कलाकार घडवले. मुंबई ही भारतीय चित्रपटसृष्टीची जननी आहे — दादासाहेब फाळकेपासून ते आजच्या रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणपर्यंत अनेक दिग्गज इथूनच उभे राहिले. केवळ अभिनेतेच नव्हे, तर दिग्दर्शक, संगीतकार, लेखक, आणि तंत्रज्ञ — या सगळ्यांच्या स्वप्नांना पंख याच मुंबईने दिले.
अनेक मोठ्या कंपन्याही मुंबईतच उभ्या राहिल्या. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) सुद्धा येथेच आहेत.महाराष्ट्रातील मराठी रंगभूमीचा जन्म झाला तो याच मुंबईत. प्रभात थिएटर, शिवाजी मंदिर, विविध नाट्यगृहं, कला महोत्सव — हे सर्व इथेच रंगतात. चित्रपटांपूर्वी नाटकांतूनच अनेक कलाकार घडले, आणि पटकथालेखनाच्या (स्क्रिप्ट रायटिंगच्या) दुनियेत अनेक अस्सल कलाकार मिळाले.जेव्हा ब्रिटिश भारतात आले, तेव्हापासून मुंबईचं व्यापारी बंदर लोकप्रिय होतं, आणि आजही तेवढंच महत्त्वाचं आहे.
एकीकडे इमारतींच्या गर्दीत बालपण हरवत असल्याचं वाटतं, पण हाच महाराष्ट्र देशाला सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, रोहित शर्मा यांसारखे महान खेळाडू देतो. याच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अनेक विजयाच्या गाथा लिहिल्या गेल्या आहेत.असं म्हणतात की, “मुंबई कभी किसी के लिए नहीं रुकती.” जो इथे येतो, त्यालाच इथल्या धावत्या वेगाशी जुळवून घ्यावं लागतं.
कित्येक वर्षांपूर्वी या मुंबईने एक वेग धरला होता, तोच वेग आजतागायत कायम आहे. तस, मुंबईकरांच्या दुपारच्या जेवणाचा बेत ठरलेला असतो, आणि तो बेत त्यांच्या जवळ सुरक्षितपणे पोहोचवते. ती म्हणजेच ‘मुंबईची रक्तवाहिनी’. तुम्हाला याचा अंदाज लागलाच असेल.मुंबईकरांच्या दररोजच्या आयुष्यातील आणि मुंबईच्या अर्थव्यवस्थेतील महत्वाचा भाग म्हणजेच मुंबईचे डब्बेवाले. मुंबईची शिस्त आणि वेळपालन याचं जिवंत उदाहरण. आर्थिक दृष्ट्या सुद्धा हे ‘रक्तवाहिनी’ तितकीच महत्वाची आहे.
मुंबईतील लाखो कर्मचारी दररोज या डब्बेवाऱ्यांवर अवलंबून असतात. या क्षेत्राची वार्षिक आर्थिक उलाढाल सुमारे ₹७०–८० कोटी आहे, ज्यामुळे घरकाम करणाऱ्या अनेक महिलांना रोजगार मिळतो. सुरक्षित आणि वेळेवर जेवण मिळाल्यामुळे सर्व कामे सुरळीत पार पडतात. मुंबईच्या आरोग्य आणि आर्थिक धावत्या वेगाचं संतुलन या डब्बेवाऱ्यांनी कायम ठेवलं आहे.
मुंबई— ज्याची निव्वळ संपत्ती अंदाजे US$1 ट्रिलियन आहे, ज्यामध्ये 46,000 करोडपती आणि 92 अब्जाधीश आहेत. मुंबईचे सर्वात मोठे आर्थिक बळ महणजेच मुंबईची वित्तीय सेवा आणि बँका . या मुंबई मध्ये अनेक वित्तीय संस्था आणि बँका आहेत जे लोकाना कर्ज देतात ज्यामुळे छोटे उद्योग आणि मोठे उद्योग सुरू होतात . त्यातून रोजगार मिळतो आणि आर्थिक पाठभर महाराष्ट्राला मिळत
. मुंबई हे भारताचे वित्तीय केंद्र आहे. येथे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE), नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आहेत. हे शहर बँकिंग, विमा, गुंतवणूक, आणि वित्तीय सेवा क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मुंबईचे बंदर भारतातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक आहे. हे शहर व्यापार, शिपिंग, उत्पादन आणि छोटे-मोठे उद्योग यांचा श्वास आहे . जर हा श्वास थंबला तर हे उद्योग ही थांबू शकतात. मुंबईचा gdp वाढण्याच एक महत्वच कारण म्हणजेच मुंबईमध्ये IT, सेवा, आणि व्यवसाय-सेवा क्षेत्रही प्रचंड विकसित झाले आहेत, जे शहराच्या GDP वाढवतात.मुंबई शहर देशाच्या GDP चा मोठा भाग तयार करते, अंदाजे 6–7% पेक्षा जास्त, जे एका शहरासाठी खूप मोठी संख्या आहे. मुंबई हे भारताचे मनोरंजनाचे केंद्र आहे आणि बॉलिवूड शहराच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावते. चित्रपट, टीव्ही, संगीत, रंगभूमी आणि डिजिटल मीडिया उद्योगातून मोठे उत्पन्न होते.
या उद्योगामुळे हजारो लोकांना रोजगार मिळतो – कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, तंत्रज्ञ आणि इतर कर्मचारी या उद्योगावर अवलंबून आहेत. शिवाय, लोकप्रिय चित्रपट आणि कलाकार मुंबईला पर्यटनासाठी आकर्षित करतात, ज्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि ट्रॅव्हल एजन्सींना फायदा होतो. चित्रपट उत्पादन कंपन्या आणि जाहिराती येथे गुंतवणूक करतात, ज्यामुळे आर्थिक क्रियाकलाप वाढतात. या सर्व कारणांमुळे बॉलिवूड मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे. आस म्हणतात की “मुंबई हर मेहनत करने वाले आदमी को सफ़लता जरूर देती है।” त्याच एक जीवंत उदाहरण म्हणजेच अभिनेता शहरुक खानने त्याच्या स्वप्नांची ‘’जन्नत’’ जी कमावली ती याच मुंबईतुन. मुंबईने शाहरुक खानसारख्या अनेक कलाकारांना त्यांच्या मेहनतीचे फळ दिले.
शाहरुख खान सुरुवातीला फारसे ओळखले जात नव्हते, पण त्यांनी आपल्या चिकाटीने, मेहनतीने आणि स्वप्नांवर विश्वास ठेवून स्वतःचे स्थान निर्माण केले. आज शाहरुख खान फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे, मुंबई अनेक उद्योगपती, कलाकार, लेखक आणि तंत्रज्ञांना त्यांच्या कष्टाचे फळ देते. या शहराची खासियत म्हणजे येथे कोणालाही संधी मिळते, फक्त मेहनत आणि चिकाटी आवश्यक आहे.
पण मुंबईची खरी शक्ती तिच्या उंच इमारती किंवा मोठ्या उद्योगांमध्ये नाही, तर ती आहे येथील सामान्य माणसाच्या अदम्य इच्छाशक्तीमध्ये. रोज सकाळी लोकलची गर्दी झेलून कामावर जाणारा तो चाकरमानी, किंवा पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातून मार्ग काढत घराचं स्वप्न पाहणारी ती आई. या शहराने अनेक संकटे पाहिली – मग ते बॉम्बस्फोट असोत, अतिवृष्टी असो किंवा जागतिक महामारी. पण प्रत्येक वेळी ही मुंबई अधिक मजबूत होऊन उभी राहिली. ‘मुंबई स्पिरिट’ हे फक्त एक वाक्य नाही, ती जगण्याची एक पद्धत आहे – हरलो तरी पुन्हा लढायचं, आणि जिंकलो तरी नम्र राहायचं. हाच महाराष्ट्राचा बाणा आहे, जो देशाला पुढे घेऊन जात आहे.
म्हणूनच, महाराष्ट्र केवळ एक भौगोलिक प्रदेश नाही; ते एक ध्येय आहे, एक आशा आहे आणि एक अविरत प्रेरणा आहे. १ मे रोजी जेव्हा या राज्याच्या निर्मितीचा निर्णय झाला, तेव्हा ‘आता महाराष्ट्राचं काय होणार?’ या प्रश्नाऐवजी, ‘आम्ही घडवून दाखवणार’ हा आत्मविश्वास प्रत्येक मराठी मनात होता. आपल्या पुरोगामी विचारांचा, संस्कृतीचा, प्रगतीचा आणि माणुसकीचा हा वारसा घेऊन, मुंबई आणि महाराष्ट्र भारताच्या विकासाच्या या धावत्या वेगात नेहमीच सर्वात पुढे राहतील यात शंकाच नाही. महाराष्ट्राची ही भूमी, जिथे कष्टकऱ्यांच्या घामाला सन्मान मिळतो आणि प्रत्येक स्वप्नाला पंख लागावेत यासाठी प्रयत्न केले जातात, तिथेच आपला खरा अभिमान आहे.