Tag: naviarthkrantiblogs

  • रेल्वे रुळांवर इतिहास घडवणारी मराठमोळी लेक | Surekha Yadav

    रेल्वे रुळांवर इतिहास घडवणारी मराठमोळी लेक | Surekha Yadav

    “महिलांना जगातली सर्व कठीण कामे जमतील, पण ड्रायव्हिंग हे त्यांचे काम नाही,” हे वाक्य आपण आजही अनेकदा ऐकतो. पण या पुरुषी मानसिकतेला खोटं ठरवत एका मराठमोळ्या लेकीने थेट रेल्वे इंजिनचं सारथ्य केलं. ती लेक म्हणजे साताऱ्याच्या कन्या, सौ.. सुरेखा यादव. भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक (लोको पायलट) होण्याचा मान मिळवून त्यांनी इतिहास घडवला. तब्बल ३६ वर्षांच्या शानदार सेवेनंतर त्या या नवरात्रोत्सवात  निवृत्त होत आहेत. चला, जाणून घेऊया रुळांवर आपलं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या या असामान्य व्यक्तिमत्त्वाची प्रेरणादायी गोष्ट.

    जन्म आणि शिक्षण: साताऱ्याच्या मातीतील अंकुर

    सुरेखा यादव (Surekha Yadav) यांचा जन्म २ सप्टेंबर १९६५ रोजी महाराष्ट्राच्या साताऱ्यात एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील रामचंद्र भोसले आणि आई सोनाबाई. पाच भावंडांमध्ये सर्वात मोठ्या असलेल्या सुरेखा लहानपणापासूनच हुशार आणि महत्त्वाकांक्षी होत्या. त्यांचे शालेय शिक्षण साताऱ्यातील सेंट पॉल कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये झाले. खरं तर, त्यांना शिक्षिका व्हायचे होते आणि त्यासाठी त्यांनी बी.एड. करण्याची योजनाही आखली होती. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.

    शालेय शिक्षणानंतर त्यांनी तांत्रिक शिक्षणाची वाट धरली आणि कराड येथील सरकारी पॉलिटेक्निकमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण केला. याच तांत्रिक ज्ञानाच्या जोरावर त्यांनी भविष्याची एक नवी दिशा निवडली.

    रेल्वे रुळांवरचा ऐतिहासिक प्रवास

    १९८६ साली रेल्वेमध्ये असिस्टंट ड्रायव्हर पदासाठी भरती निघाली. त्या काळात हे क्षेत्र पूर्णपणे पुरुषांची मक्तेदारी मानले जायचे. पण सुरेखा यांनी धाडसाने अर्ज केला. लेखी परीक्षा आणि मुलाखत यशस्वीपणे पार करत त्यांनी रेल्वेमध्ये प्रवेश निश्चित केला. कल्याणच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये सहा महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून १९८८  साली त्या भारतीय रेल्वेमध्ये सहाय्यक चालक म्हणून रुजू झाल्या आणि एका नव्या इतिहासाला सुरुवात झाली.

    त्यांचा प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीला त्यांनी मालगाडी चालवण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांची मेहनत, अचूकता आणि कौशल्य पाहून रेल्वे प्रशासनाचा विश्वास वाढत गेला.

    यशाचे एकेक शिखर

    • २०००: त्यांना ‘मोटरवुमन’ म्हणून बढती मिळाली.
    • २०१०: पश्चिम घाटासारख्या आव्हानात्मक आणि कठीण रेल्वे मार्गावर गाडी चालवण्याची जबाबदारी त्यांना मिळाली.
    • ८ मार्च २०११: ‘डेक्कन क्वीन’ अर्थात ‘दख्खनच्या राणी’ या प्रतिष्ठित गाडीचे पुणे ते मुंबई सारथ्य करण्याचा ऐतिहासिक मान त्यांना मिळाला. हा दिवस भारतीय रेल्वेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला.
    • २०११: त्यांची एक्सप्रेस मेल पायलट म्हणून नियुक्ती झाली, ज्यामुळे त्या आशियातील पहिल्या पूर्णवेळ महिला ड्रायव्हर ठरल्या.
    • १३ मार्च २०२३: त्यांनी सोलापूर ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) पर्यंत ‘वंदे भारत एक्सप्रेस’ चालवून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. वंदे भारत चालवणाऱ्या त्या पहिल्या महिला लोको पायलट ठरल्या.
    भारतीय रेल्वेची चालक शक्.ची प्रेरणादायी यशोगाथा

    कुटुंबाचा भक्कम पाठिंबा

    सुरेखा यादव यांच्या या यशस्वी प्रवासात त्यांच्या कुटुंबाचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे पती शंकर यादव हे महाराष्ट्र पोलिसात इन्स्पेक्टर पदावर कार्यरत आहेत. दोन मुलांची आई असलेल्या सुरेखा नेहमी सांगतात की, “कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय मी इथपर्यंत पोहोचू शकले नसते.” नोकरीची वेळ, जबाबदारी आणि ताण सांभाळून घराची जबाबदारी सांभाळण्यात त्यांच्या पतीने आणि कुटुंबाने दिलेली साथ मोलाची ठरली.

    सेवानिवृत्ती आणि प्रेरणादायी वारसा

    तब्बल ३६ वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर, सुरेखा यादव ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. आपल्या कारकिर्दीतील शेवटची फेरी त्यांनी हजरत निजामुद्दीन (दिल्ली) – CSMT राजधानी एक्सप्रेस चालवून पूर्ण केली.

    त्यांच्या सेवानिवृत्तीवर मध्य रेल्वेने अत्यंत भावनाप्रधान शब्दात म्हटले आहे, “श्रीमती सुरेखा यादव या एक खऱ्या अर्थाने पथप्रदर्शक (trailblazer) आहेत. त्यांनी अडथळ्यांना पार करून अगणित महिलांना प्रेरणा दिली आणि हे सिद्ध केले की परिश्रम घेण्याची तयार असेल तर कोणतेही स्वप्न अपूर्ण राहू शकत नाही. त्यांचा प्रवास भारतीय रेल्वेमध्ये महिला सक्षमीकरणाचे प्रतीक म्हणून सदैव स्मरणात राहील.”

    सुरेखा यादव यांची गोष्ट केवळ एका नोकरीची कहाणी नाही, तर ती स्वप्न पाहण्याचे आणि ते पूर्ण करण्यासाठी कोणत्याही मर्यादा न मानण्याची गाथा आहे. ‘चूल आणि मूल’ या चौकटीतून बाहेर पडून महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करू शकतात, हे त्यांनी सिद्ध केले. त्यांचा हा प्रवास येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत आणि दीपस्तंभ म्हणून कायम प्रकाश देत राहील.

    आणखीन वाचा

  • PORTER: तीन मित्रांनी प्रत्येकी २ लाखांच्या गुंवतणुकीत सुरु केलेला व्यवसाय आज ३००० कोटींवर पोहोचलाय

    PORTER: तीन मित्रांनी प्रत्येकी २ लाखांच्या गुंवतणुकीत सुरु केलेला व्यवसाय आज ३००० कोटींवर पोहोचलाय

    सामान्य वाटणाऱ्या एखाद्या अडचणीतून जर योग्य वेळी कल्पकता आणि धाडस दाखवलं, तर मोठ्यातली मोठी समस्या देखील संधीमध्ये बदलू शकते. Porter या स्टार्टअपच्या यशोगाथेतून हे स्पष्ट होतं. IIT मधून शिक्षण घेतलेला आणि JP Morgan सारख्या नावाजलेल्या कंपनीत काम करणारा एक तरुण, एक छोटी पण सतत जाणवणारी अडचण ओळखतो आणि त्यातून भारतातील एक आघाडीचं इंट्रासिटी लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म उभारतो. तो तरुण म्हणजे Porter या कंपनीचे सहसंस्थापक प्रणव गोयल.

    Porter ची संकल्पना प्रणव यांना एका वैयक्तिक अडचणीतून सुचली. शहरांत छोट्या मालवाहतुकीसाठी विश्वसनीय आणि सुलभ पर्याय नव्हता, ही अडचण अनेकांना भेडसावत होती. तंत्रज्ञानाच्या मदतीने या समस्येवर उपाय शोधता येईल, यावर विश्वास ठेवून त्याने Porter ची स्थापना केली. आज Porter लाखो लोकांना मालवाहतुकीसाठी मदत करत आहे. या लेखात आपण Porter कशी सुरू झाली, कोणते टप्पे पार करत ती यशाच्या शिखरावर पोहोचली, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

    एका लहानशा अडचणीतून सुचलेली कल्पना

    Porter या स्टार्टअपची कल्पना प्रणव गोयल यांना त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून सुचली. ते IIT खरगपूरचे पदवीधर असून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात JP Morgan या नामांकित कंपनीत विश्लेषक (ANALYST) म्हणून केली. कामानिमित्त त्यांना गुरगावहून मुंबईला स्थलांतर करावं लागलं. या वेळी घरातील फर्निचर हलवण्यासाठी मिनी ट्रक बुक करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्यात योग्य ड्रायव्हर मिळत नव्हता, भाडं ठरवणं कठीण जात होतं आणि संपूर्ण सेवा प्रक्रियेत पारदर्शकता नव्हती.

    याच अनुभवातून त्यांना जाणवलं की शहरांमधील वाहतूक व्यवस्था अजूनही पारंपरिक पद्धतीने चालते आणि त्यात ग्राहक, ड्रायव्हर आणि एजंट सगळेच त्रासलेले असतात. ही अडचण म्हणजेच एक मोठी संधी असू शकते, हे त्यांनी ओळखलं. तंत्रज्ञानाच्या मदतीने ही समस्या सोडवता येईल का, असा विचार त्यांच्या मनात आला आणि अशाच विचारातून Porter या नव्या युगाच्या लॉजिस्टिक स्टार्टअपची सुरुवात झाली.

    स्टार्टअपची सुरुवात – Porter चा जन्म

    porter delivery


    एप्रिल २०१४ मध्ये प्रणव गोयल यांनी JP Morgan मधील नोकरी सोडली आणि IIT मधील आपले दोन  मित्र उत्तम डिग्गा आणि विकास चौधरी यांच्यासोबत मिळून स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांच्या तयारीनंतर, ऑगस्ट २०१४ मध्ये त्यांनी ‘Porter’ हा मोबाईल अ‍ॅप आधारित लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म सुरू केलं. त्यांच्या या उपक्रमाचा उद्देश शहरांतर्गत मालवाहतूक अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करणे हा होता.

    Porter अ‍ॅपच्या मदतीने ग्राहक मिनी ट्रक, टू-व्हीलर किंवा थ्री-व्हीलर सहजपणे बुक करू शकतात. या प्लॅटफॉर्ममुळे वाहनचालक आणि ग्राहक एकाच ठिकाणी जोडले गेले. पारदर्शक आणि परडवणारे दर, GPS मार्गदर्शन आणि सहज ऑर्डर प्रक्रिया यामुळे सेवा अधिक विश्वासार्ह आणि वापरण्यास सुलभ बनली. पारंपरिक वाहतूक व्यवस्थेला तंत्रज्ञानाची जोड देत त्यांनी एक नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक लॉजिस्टिक सोल्यूशन तयार केलं.

    तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट बिझनेस मॉडेल

    Porterचं बिझनेस मॉडेल साधं पण अत्यंत परिणामकारक होतं. प्रत्येक बुकिंगवर कंपनी १० ते १५ टक्के कमिशन घेत होती. यासोबतच इन्शुरन्स, ड्रायव्हर क्रेडिट, प्रायोरिटी लिस्टिंग यांसारख्या अतिरिक्त सेवा देऊन उत्पन्नाचे नवे मार्ग खुले करण्यात आले. या मॉडेलनं ग्राहकांना त्यांच्या मालवाहतुकीच्या खर्चात जवळपास २०% पर्यंत बचत मिळवून दिली, तर चालकवर्गाला त्यांच्या उत्पन्नात सुमारे ३०% वाढ अनुभवायला मिळाली.

    Porter अ‍ॅप स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध केल्यामुळे चालकांसाठी ते वापरणं सोपं झालं. सहज नोंदणी प्रक्रिया आणि योग्य प्रोत्साहन यामुळे अवघ्या १८ महिन्यांत १ लाख बुकिंग्स पार करण्यात त्यांनी यश मिळवलं. मुंबई, बेंगळुरू, चेन्नईसारख्या मोठ्या शहरांमध्ये विस्तार करताना त्यांना Sequoia Capital आणि Kae Capital या गुंतवणूकदारांकडून ३५ कोटी रुपयांची  फंडिंगही मिळाली. हे यश त्यांच्या कल्पकतेचं आणि धाडसाचं प्रतीक ठरलं.

    पुढील वाटचाल आणि मोठ्या ब्रँडसोबत भागीदारी

    Porter ची सेवा गुणवत्ता, वेळेचं भान आणि पारदर्शक व्यवहार यांच्या जोरावर अल्पावधीतच लोकप्रिय झाली. २०१८ मध्ये त्यांनी महिंद्रा ग्रुपच्या Smartshift या लॉजिस्टिक प्लॅटफॉर्मसोबत विलीन होण्याचा निर्णय घेतला. याच टप्प्यावर त्यांना ५० कोटींची Series C फंडिंग मिळाली. याच वर्षी त्यांनी ‘Porter for Enterprise’ हा नवीन विभाग सुरू केला, ज्यामार्फत BigBasket, Urban Company, Flipkart यांसारख्या मोठ्या कंपन्यांना B2B लॉजिस्टिक सेवा पुरवायला सुरुवात केली.

    २०१९ पर्यंत Porter ने ३० लाख डिलिव्हरी पूर्ण करून जबरदस्त प्रगती केली. कंपनीचं वार्षिक उत्पन्न २२७ कोटींवर पोहोचलं. त्यांनी अशा छोट्या पण महत्त्वाच्या लॉजिस्टिक गरजांवर लक्ष केंद्रित केलं ज्या अनेक मोठ्या कंपन्यांनी दुर्लक्षित केल्या होत्या, जसं की संध्याकाळचं कुरिअर किंवा काही तासांसाठी टेम्पो बुकिंग. अशा गरजांना सेवा पुरवून त्यांनी बाजारात आपलं वेगळेपण सिद्ध केलं.

    युनिकॉर्न बनण्याचा प्रवास

    Porter च्या यशस्वी प्रवासात एप्रिल २०२० एक महत्त्वाचा टप्पा ठरला. Lightstone (आता Lightrock) या गुंतवणूकदार संस्थेने कंपनीमध्ये १४० कोटींची गुंतवणूक केली. त्यानंतर २०२२ मध्ये Tiger Global च्या नेतृत्वाखाली ७५० कोटींचं भांडवल उभं करण्यात आलं. याच काळात कंपनीने १७८९ कोटींचं वार्षिक उत्पन्न मिळवून आपली ताकद सिद्ध केली.

    १६ मे २०२४ रोजी Porter ने आपले काही शेअर्स (ऑप्शन पूल) विकले. त्यामुळे कंपनीचं एकूण मूल्य $१ बिलियनच्या पुढं गेलं आणि Porter ही Krutim आणि Perfios नंतर २०२४ मधली तिसरी युनिकॉर्न कंपनी बनली.

    porter delivery app

    यशाच्या शिखरावर 

    आज Porter देशातील १६ शहरांमध्ये सेवा देत आहे आणि त्यांचे ५० लाखांपेक्षा जास्त ग्राहक आहेत. रोज २.५ लाखांहून अधिक चालक त्यांच्या प्लॅटफॉर्मवर काम करत आहेत. दर महिन्याला सुमारे ५० लाख डिलिव्हरी पार पडतात. सध्या कंपनीचं उत्पन्न २७३३ कोटींवर पोहोचलं असून, कंपनीचं एकूण व्हॅल्युएशन ८३०० कोटींहून अधिक आहे.

    Porter हे फक्त एक ॲप नाही, तर एक आधुनिक आणि स्मार्ट लॉजिस्टिक सोल्यूशन आहे. यात AI तंत्रज्ञान वापरून ग्राहक आणि चालक यांना एकत्र जोडलं गेलं आहे. GPS ट्रॅकिंग, झटपट बुकिंग, परवडणारे दर आणि वापरण्यास सोपं इंटरफेस यामुळे सर्वांचा अनुभव चांगला होतो. Porter B2B आणि B2C (सर्वसामान्य ग्राहकांसाठी) दोघांसाठी उपयुक्त असून, मोठ्या मालवाहतुकीपासून ते घरगुती वस्तूंच्या डिलिव्हरीपर्यंत या प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो.

    मित्रांनो, प्रणव गोयल यांची कथा आपल्याला शिकवते की, अडचणींवर फक्त तक्रार न करता जर त्यावर उपाय शोधण्यास सुरुवात केली, तर त्यातून एक यशस्वी व्यवसाय उभा राहू शकतो आणि Porter हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.

    आणखी वाचा :

  • Racheal Kaur : लेकरांसाठी रोज ६०० किमी विमानाने प्रवास करणारी सुपरमॉम!

    Racheal Kaur : लेकरांसाठी रोज ६०० किमी विमानाने प्रवास करणारी सुपरमॉम!

    आई म्हणजे प्रेम, त्याग आणि जबाबदारीचं जिवंत रूप. आपल्या मुलांसाठी ती कोणत्याही अडचणींवर मात करू शकते. याचं जिवंत उदाहरण म्हणजे मलेशियातील रचेल कौर (Racheal Kaur), ज्या आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी दररोज तब्बल ६०० किलोमीटरचा विमान प्रवास करतात! त्यांच्या त्यागाची ही कहाणी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि लाखो लोकांना प्रेरणा देत आहे.

    राचेल कौर या भारतीय वंशाच्या असून आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून त्या मलेशियातील क्वालालंपूर ते सिंगापूर असा रोज विमान प्रवास करतात. चला, जाणून घेऊया त्यांच्या या अनोख्या आणि रंजक प्रवासाबद्दल!

    रोजचा प्रवास कसा असतो?

    राचेल कौर या मलेशियातील पेनांग शहरात राहतात, तर त्यांचं ऑफिस क्वालालंपूरमध्ये आहे. त्या एअर एशिया कंपनीत फायनान्स ऑपरेशन विभागात असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतात. आधी त्या ऑफिसजवळ राहत होत्या, पण तिथलं घरभाडं खूप महाग होतं. आणि त्या फक्त आठवड्यातून एकदाच आपल्या मुलांना भेटू शकत होत्या. आई म्हणून त्यांना हे सहन होईना. म्हणून त्यांनी अनोखा मार्ग निवडला  तो म्हणजे दररोज विमानाने प्रवास करण्याचा!

    राचेल रोज पहाटे ४ वाजता उठतात, तयारी करून ५:५५ च्या फ्लाइटने क्वालालंपूरला जातात आणि ७:४५ ला ऑफिसला पोहोचतात. संध्याकाळी ऑफिस संपल्यावर त्या पुन्हा विमानाने पेनांगला परततात आणि रात्री ८ वाजता आपल्या मुलांसोबत असतात. हा प्रवास ऐकायला अविश्वसनीय वाटतो, पण त्यांच्या मते यामुळे त्या मुलांसोबत अधिक वेळ घालवू शकतात आणि त्यांच्या संगोपनात कुठलीही तडजोड करावी लागत नाही.

    विमान प्रवास महाग नाही का?

    पहिल्यांदा ऐकून वाटतं की रोज विमानाने प्रवास करणं खूप महाग असेल. पण प्रत्यक्षात राचेल कौर यांचा खर्च आधीपेक्षा कमी झाला आहे. आधी त्या ऑफिसजवळ राहायच्या, तेव्हा त्यांना दरमहा २८,००० (३४० डॉलर) घरभाडं द्यावं लागायचं. त्यात मुलांपासून दूर राहण्याचं दुःख वेगळंच होतं.

    आता त्या रोज विमानाने प्रवास करतात, तरी त्यांचा खर्च कमी आहे. विमान तिकिटासाठी त्यांना रु. १८,५०० (२२६ डॉलर) आणि जेवणासाठी रु. ५,५०० (६८ डॉलर) इतकाच खर्च येतो. त्यामुळे त्यांची पैशांची बचतही होते आणि त्यांना कुटुंबासोबत राहण्याचा आनंदही मिळतो.

    आई असणं म्हणजे त्याग आणि कष्ट

    राचेल कौर यांची ही प्रेरणादायी कहाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. पण अशीच कहाणी लाखो भारतीय महिलांचीही आहे. भारतातही अनेक स्त्रिया रोज तासन्‌तास लोकल ट्रेन, बस किंवा ट्रॅफिकमध्ये अडकून ऑफिसला जातात. घरी परतल्यानंतरही त्या कुटुंबाची जबाबदारी  सांभाळतात. आईपण आणि करिअर एकत्र निभावणं सोपं नसतं, पण त्या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात.

    The story of Indian-origin supermom from Malaysia who flies 600 km daily to work and back

    राचेल यांची कहाणी प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, विशेषतः त्या महिलांसाठी ज्या आपल्या कुटुंब आणि करिअरमध्ये सुंदर समतोल साधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहतात. ही कहाणी त्या सर्व आईंना समर्पित आहे, ज्या आपल्या मुलांसाठी आणि कुटुंबासाठी अहोरात्र झटत असतात.

    नवी अर्थक्रांती राचेल आणि अशा सर्व “आयांना” सलाम करते , ज्या आपल्या कुटुंबासाठी आणि करिअरसाठी अखंड झटत असतात!

    आणखी वाचा:

  • Kisan Card: काय आहे किसान क्रेडिट कार्ड योजना? कसा कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण माहिती

    Kisan Card: काय आहे किसान क्रेडिट कार्ड योजना? कसा कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण माहिती

    सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड (KCC), जी शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक भांडवल उपलब्ध करून देते. या योजनेद्वारे शेतकरी कमी व्याजदरात कर्ज घेऊ शकतात आणि त्याचा उपयोग बियाणे, खते, कीडनाशके, शेती उपकरणे आणि इतर कृषी संबंधी गरजांसाठी करू शकतात. अलीकडेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ३ लाखांवरून ५ लाखांपर्यंत वाढवली, ज्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त २ लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे.

    या योजनेचे विविध फायदे असून, अल्प व्याजदर, परतफेडीवर सवलत आणि त्वरित निधी उपलब्ध होणे हे योजनेचे मुख्य आकर्षण आहेत. मात्र, अनेकांना या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, पात्रता निकष कोणते आहेत याची पुरेशी माहिती नसते. या लेखात किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष आणि योजनेचे संपूर्ण फायदे समजून घेऊया.

    काय आहे किसान क्रेडिट कार्ड योजना ?

    शेतीसाठी आवश्यक भांडवल मिळावे आणि पेरणीपूर्व अडचणींवर मात करता यावी, यासाठी भारत सरकारने १९९८ मध्ये किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बँकांकडून कमी व्याजदरात कर्ज मिळते, जे खते, बियाणे, कीटकनाशके तसेच शेतीच्या इतर गरजांसाठी वापरता येते. गरज पडल्यास शेतकरी या कार्डद्वारे रोख रक्कमही काढू शकतात, ज्यामुळे शेतीचा खर्च सहज भागवता येतो.

    ही योजना वेळोवेळी सुधारली गेली आहे. २००४ मध्ये यामध्ये गुंतवणूक कर्ज, दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन आणि पशुपालन यांसारख्या उपक्रमांचा समावेश करण्यात आला.२००६-०७ मध्ये व्याज अनुदान योजना (ISS) सुरू करण्यात आली, ज्यामुळे अल्पकालीन कृषी कर्ज शेतकऱ्यांना केवळ ७% व्याजदराने मिळू लागले आणि आर्थिक ओझे कमी झाले. २०१२ मध्ये डिजिटल युगाची कास धरत इलेक्ट्रॉनिक किसान क्रेडिट कार्ड (e-KCC) सुरू करण्यात आले, ज्यामुळे व्यवहार अधिक सोपे, वेगवान आणि पारदर्शक झाले. तसेच आता योजेनची मर्यादा वाढवली गेली, ज्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त २ लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे. 

    अर्ज करण्याची प्रक्रिया आणि फायदे 

    किसान क्रेडिट कार्ड योजना सरकारी आणि खासगी बँकांमार्फत राबवली जाते. राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs), सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे कार्ड मिळू शकते. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या अधिकृत बँकेत जाऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरावा लागतो. अर्ज मंजूर झाल्यानंतर किसान क्रेडिट कार्ड दिले जाते, ज्यामुळे शेतकरी आपल्या गरजेनुसार ठराविक मर्यादेत कर्ज घेऊ शकतात.

    किसान क्रेडिट कार्डमुळे शेतकऱ्यांना सहज आणि कमी व्याजदरात कर्ज मिळते. हे कर्ज खते, बियाणे, कीटकनाशके आणि शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी वापरता येते. गरज भासल्यास शेतकरी या कार्डद्वारे रोख रक्कम काढू शकतात, त्यामुळे तातडीच्या खर्चासाठी मदत होते. व्याज अनुदान योजनेमुळे कर्जाचा आर्थिक बोजा कमी होतो, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळते आणि शेतीची उत्पादकता वाढते.

    निकष आणि आवश्यक कागदपत्रे 

    या योजनेत अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे लागते , मात्र कमाल वयाची कोणतीही मर्यादा नाही. या योजनेत 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते, आणि हे कर्ज पाच वर्षांच्या आत परतफेड करता येते. किसान क्रेडिट कार्डाची वैधता देखील पाच वर्षे असते.

    किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडे काही आवश्यक कागदपत्रे असावी लागतात. ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, वीज बिल किंवा पाणी बिल यापैकी कोणतेही एक कागदपत्र लागते. तसेच, शेतकऱ्याने जमिनीचा मालकी हक्क किंवा भाडेकराराचे दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे. जर जमीन स्वतःच्या नावावर असेल, तर खतौनी, जमाबंदी किंवा पट्टा यासारखे कागदपत्र चालतात. जर शेतकरी भाडेकरू असेल, तर वैध भाडेकराराची कागदपत्रे द्यावी लागतात.

    मित्रांनो, किसान क्रेडिट कार्ड योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आर्थिक मदत योजना आहे. या जर तुम्ही सुद्धा शेतकरी असाल आणि या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर आपल्या जवळच्या बँकेत जाऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करा आणि कमी व्याजदरात कर्ज मिळवण्याची ही संधी गमावू नका. 


    आणखी वाचा:

  • Pulse Candy: कोणतीही जाहिरात न करता ३५० कोटींचा टप्पा गाठलेला यशस्वी ब्रँड!

    Pulse Candy: कोणतीही जाहिरात न करता ३५० कोटींचा टप्पा गाठलेला यशस्वी ब्रँड!

    आजच्या काळात कोणताही नवीन ब्रँड मोठा करण्यासाठी जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च होतात. मोठमोठे सेलिब्रिटी, आकर्षक टीव्ही ऍड्स आणि सोशल मीडियावर महागड्या मार्केटिंग मोहिमांचा वापर केला जातो. मात्र, Pulse कँडीने हे सर्व नियम मोडून एक नवा इतिहास रचला. कोणतीही जाहिरात न करता, केवळ आपल्या अनोख्या चवीच्या जोरावर या ब्रँडने ३५० कोटींचा टप्पा ओलांडला.

    ही कँडी २०१५ मध्ये बाजारात आली आणि काही महिन्यांतच ती सर्वाधिक विक्री होणाऱ्या कँडींपैकी एक बनली. तिच्या यशामागे प्रचंड मेहनत, एक अनोखी रणनीती होती, ज्यामुळे या साध्या वाटणाऱ्या कँडीला FMCG (Fast-moving consumer goods) क्षेत्रात सर्वात मोठा ब्रँड बनवलं. चला तर मग, या लेखात आपण Pulse च्या या अद्भुत यशामागची कारणे जाणून घेऊया!

    बाजारातील संधी ओळखून नवा प्रयोग

    २०१५ मध्ये भारताच्या ₹ ८,००० कोटींच्या कँडी मार्केटमध्ये प्रामुख्याने गोडसर कँडीजचा दबदबा होता. मात्र, भारतीय चविष्ट खाद्यसंस्कृती पाहता, आंबट-तिखट चव असलेल्या कँडीची मागणी असू शकते, हे DS ग्रुपने (Rajnigandha आणि Pass Pass फेम) अचूक ओळखलं. लोकांना लहानपणीची आठवण करून देणारी, कैरीवर मीठ-मिरची लावून खाल्ल्याचा स्वाद देणारी कँडी बाजारात नव्हती. याच संधीचा फायदा घेत त्यांनी Pulse कँडी तयार केली. ही कॅंडी चॉकलेट किंवा गोडसर मिठाईसारखी नव्हती, तर भारतीय चवीशी एकरूप झालेली होती. Pulse लाँच होताच ग्राहकांनी ती उचलून धरली. चटकदार चव आणि योग्य किंमत यामुळे लोक स्वतःच या कँडीची जाहिरात करू लागले.

    शून्य जाहिरात खर्च, तरीही अफाट लोकप्रियता!

    Pulse च्या चटपटीत आणि वेगळ्या चवीनं लोकांना लगेचच आकर्षित केलं. एकाने खाल्ल्यानंतर दुसऱ्यालाही खायला दिली, मित्रांनी एकमेकांना सांगितलं, कुटुंबात आणि नातेवाईकांमध्येही चर्चा सुरू झाली. हळूहळू “वर्ड ऑफ माऊथ” हेच Pulse चं सर्वात प्रभावी मार्केटिंग ठरलं. केवळ चवीच्या जोरावर ही कँडी घराघरात पोहोचली आणि भारतीय कँडी मार्केटमध्ये नवा ट्रेंड निर्माण केला.

    टीव्ही ऍड्स, सोशल मीडिया मार्केटिंग, सेलिब्रिटी प्रमोशन यांसारख्या विविध मार्गांचा वापर करून कंपन्या आपली उत्पादने लोकप्रिय करतात. मात्र, Pulse कँडीसाठी कंपनीने जाहिरातीवर एकही रुपया खर्च केला नाही. ना कोणतीही जाहिरात मोहीम राबवली, ना मोठ्या ब्रँड्सप्रमाणे सेलिब्रिटींच्या मदतीनं प्रमोशन केलं. तरीही ही कँडी तुफान गाजली आणि संपूर्ण भारतभर पोहोचली.

    DS ग्रुपची अनोखी मार्केटिंग युक्ती

    DS ग्रुपला मार्केटिंगचं तंत्र चांगलंच ठाऊक होतं. रजनीगंधा आणि पास पाससारख्या यशस्वी उत्पादनांचा अनुभव त्यांच्याकडे होता. त्यांनी ओळखलं की लोकांना Pulse कँडीची चव आवडतेय आणि तिची मागणी वाढतेय. ही उत्सुकता टिकून राहावी आणि कँडीला अधिक महत्त्व मिळावं, म्हणून त्यांनी सुरुवातीला Pulse मर्यादित प्रमाणातच बाजारात आणली.

    Pulse प्रथम केवळ गुजरात आणि राजस्थानमध्ये लाँच करण्यात आली. लोकांनी ही कँडी शोधायला सुरुवात केली. विक्रेत्यांनी स्टॉक मर्यादित ठेवल्यामुळे ती मिळवण्यासाठी स्पर्धा वाढली. त्यामुळे Pulse ही सामान्य कँडी न राहता, एक एक्सक्लुझिव्ह प्रॉडक्ट वाटू लागली. या रणनीतीमुळे कँडीची लोकप्रियता झपाट्याने वाढली आणि Pulse एक मोठा ब्रँड बनला.

    ८ महिन्यांत १०० कोटींची विक्रमी विक्री

    Pulse हा केवळ महिन्यांत १०० कोटींची विक्री करणारा भारतातील सर्वात वेगाने वाढणारा FMCG ब्रँड ठरला. यामागे काही महत्त्वाची कारणे होती. कँडीची किंमत फक्त रु. असल्यामुळे कोणालाही सहज खरेदी करता येत होती. हिरवट-पिवळ्या आकर्षक पॅकेजिंगमुळे ती लगेचच लक्ष वेधून घेत होती. 

    Pulse ची मागणी इतकी वाढली की दुकानांमध्ये ती मिळवण्यासाठी रांगा लागत होत्या. काही किरकोळ विक्रेत्यांनी तर Pulse मिळवण्यासाठी वेटलिस्ट तयार केली होती, तर काहींनी जास्त किमतीला विकायला सुरुवात केली. लोकांमध्ये निर्माण झालेल्या या क्रेझमुळे Pulse कँडीच्या लोकप्रियतेला अधिकच गती मिळाली आणि ती भारतभर गाजली.

    भारतातून परदेशापर्यंत पोहोचलेली Pulse!

    २०१८ पर्यंत Pulse भारतातील २० लाखांहून अधिक दुकानांमध्ये उपलब्ध झाली. प्रवासी भारतीय ही कँडी परदेशात घेऊन जाऊ लागले आणि हळूहळू ती अमेरिका आणि दुबईतही प्रसिद्ध झाली. या लोकप्रियतेला आणखी चालना देण्यासाठी DS ग्रुपने संत्री, अननस आणि पेरू असे नवीन फ्लेवर्स सादर केले. मात्र, कच्चा आंबा हा मूळ फ्लेवर सर्वाधिक विकला गेला.

    २०१९ मध्ये कंपनीने  बाजारात फॅमिली पॅक्स आणि गिफ्ट पॅक्स आणले, ज्यामुळे विक्रीत मोठी वाढ झाली आणि Pulse ने तब्बल ३५० कोटींचा टप्पा पार केला. इतकंच नाही तर, कँडी मार्केटमध्ये ४८% मार्केट शेअर मिळवत Pulse ने नवा विक्रम प्रस्थापित केला. हे यश केवळ उत्कृष्ट चवीमुळे नव्हतं, तर त्यामागे बाजारपेठेचा सखोल अभ्यास आणि योग्य व्यूहरचना होती. ग्राहकांच्या आवडी समजून DS ग्रुपने नेमकी त्याच चवीची कँडी बाजारात आणली आणि इतिहास घडवला. 

    मित्रांनो, Pulse कँडीचे यश हे उत्तम मार्केटिंग आणि ब्रँडिंगचं उदाहरण आहे. योग्य नियोजन, उत्कृष्ट चव आणि प्रभावी वितरण यांच्या जोरावर जाहिरात न करता देखील एखादं उत्पादन मोठं होऊ शकतं, हे Pulse ने सिद्ध केलं आहे. आजही ती बाजारात तितकीच लोकप्रिय असून, नव्या ब्रँड्सच्या स्पर्धेत टिकून आहे.

  • Referrush Success Story: लकवा झाला… पण आज कमवतो रोज दीड लाख रुपये!

    Referrush Success Story: लकवा झाला… पण आज कमवतो रोज दीड लाख रुपये!

    यशाचा मार्ग कधीच सोपा नसतो. त्यात मेहनत, संघर्ष आणि जिद्द असते. प्रत्येकजण या मार्गावर यशस्वी होतोच असं नाही, पण काही जण अपयशाला न जुमानता पुढे जातात आणि स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करतात. विक्रम पै हे या गोष्टीचं उत्तम उदाहरण आहे.

    बंगळुरूमधील हा तरुण उद्योजक आज ReferRush या प्रसिद्ध ई-कॉमर्स रेफरल सेल्स प्लॅटफॉर्मचा संस्थापक आणि सीईओ आहे. पण त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. गेल्या सहा वर्षांत त्याने पाच व्यवसाय सुरू केले, पण त्यातला एकही यशस्वी झाला नाही. त्यामुळे त्याला तब्बल दोन कोटी रुपयांचे नुकसान सहन करावं लागलं. तरीही त्याने हार मानली नाही. प्रत्येक अपयशातून शिकत, जिद्दीने पुढे जात अखेर ReferRush हा यशस्वी व्यवसाय उभारला. आज तो केवळ एक यशस्वी उद्योजक नाही, तर चिकाटी आणि मेहनतीचं उत्तम उदाहरण आहे. या लेखात आपण त्याच्या संघर्षमय प्रवासावर एक नजर टाकूया.  

    सुरुवातीचा संघर्ष आणि सलग अपयश

    बंगळुरूमध्ये जन्मलेल्या विक्रमने शिक्षण पूर्ण केल्यानंतर मोठ्या आत्मविश्वासाने आणि उत्साहाने उद्योजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्याची स्वप्नं मोठी होती, यशस्वी होण्याची जिद्दही होती. मात्र, व्यवसायाच्या वाटचालीत अनेक अडथळे आले. अनुभव आणि योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे त्याने सुरू केलेले एक-दोन नव्हे, तर तब्बल पाच व्यवसाय अपयशी ठरले. सततच्या अपयशामुळे मोठं आर्थिक संकट कोसळलं. त्याला जवळपास दोन कोटी रुपयांचं नुकसान झालं. परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत गेली. मित्रांनी दुरावा निर्माण केला, नातेवाईक टीका करू लागले आणि आईचाही त्याच्यावरचा विश्वास कमी झाला. एका क्षणाला परिस्थिती अशी आली की, खिशात फक्त ४,००० रुपये उरले. कर्मचाऱ्यांना पगार देणेही शक्य नव्हते. काही जणांनी त्याची थट्टा केली. “एलन मस्क बनायचा प्रयत्न करतोय का?” असे टोमणे मारले.

    सततच्या तणावाचा परिणाम त्याच्या प्रकृतीवर झाला. मानसिक तणावामुळे शरीर साथ सोडू लागलं. अखेर त्याला लकवा झाला आणि त्याचे चालणे, बोलणेही कठीण झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्यासारखी वाटू लागली. तो खचला, रडला, पण हार मानली नाही. डोळ्यांतले स्वप्न जिवंत ठेवत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. या कठीण काळात स्वतःशीच लढण्याचा निर्धार केला आणि नव्या उर्जेने पुन्हा उभं राहण्याचा निश्चय केला.

    ReferRush ची स्थापना आणि पहिलं यश

    अनेक अपयशांनंतरही विक्रमने हार मानली नाही. नव्या उमेदीनं त्याने ReferRush या रेफरल मार्केटिंग प्लॅटफॉर्मची सुरुवात केली. सुरुवातीला हा व्यवसायही अपयशी ठरेल, असं अनेकांना वाटत होतं. पण यावेळी विक्रम मागे हटणार नव्हता. ReferRush व्यवसायांना त्यांच्या ग्राहकांच्या माध्यमातून नवीन ग्राहक मिळवण्यासाठी मदत करतं. ग्राहक कंपनीच्या उत्पादनांची माहिती इतरांना सांगतात आणि त्याबदल्यात त्यांना कमिशन मिळतं. त्यामुळे कंपन्यांना विश्वासार्ह ग्राहक मिळतात, तर ग्राहकांनाही घरबसल्या कमाईचा पर्याय उपलब्ध होतो. हळूहळू हा व्यवसाय स्थिरावत गेला आणि ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला.

    सुरुवातीला पहिल्या एक लाख रुपयांसाठी तब्बल चार महिने लागले. पण विक्रमने मेहनत आणि जिद्द कायम ठेवली. त्याच्या प्रयत्नांचा परिणाम दिसू लागला आणि आज ReferRush दररोज १.५ लाख रुपये कमवतो. अपयशाच्या काळात खचून न जाता ज्या चिकाटीने विक्रमने प्रयत्न सुरू ठेवले, त्याच जिद्दीमुळे त्याला यशाचा हा टप्पा गाठता आला.

    निखील कामतकडून ReferRush ला फंडिंग – यशाच्या नव्या पर्वाची सुरुवात

    विक्रमच्या अथक मेहनतीला अखेर मोठं यश मिळालं. त्याच्या ReferRush या रेफरल मार्केटिंग स्टार्टअपने उद्योगविश्वात ठसा उमटवायला सुरुवात केली होती. याच प्रवासात, भारतातील नामवंत उद्योजक निखील कामत यांच्या कंपनीने ReferRush ला इनिशिएटिव्ह फंडिंगसाठी निवडलं. तब्बल २,४०० कंपन्यांमधून ReferRush ची निवड होणं हे विक्रमसाठी एका मोठ्या यशाचं प्रतीक होतं. यामुळे केवळ आर्थिक पाठबळच नाही, तर या प्लॅटफॉर्मच्या भविष्यासाठीही एक मजबूत दिशा मिळाली. आता त्याला ठाम विश्वास आहे की, लवकरच प्रत्येक ई-कॉमर्स ब्रँड आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी ReferRush चा वापर करेल.

    2

    विक्रमच्या मते, त्याचा संपूर्ण प्रवास हा शिकण्याचा होता. सुरुवातीची पाच वर्षं त्याने प्रयोग आणि चुका यातून शिकण्यात घालवली. अपयश आलं तरीही आत्मविश्वास कधीही गमावला नाही. व्यवसायात संकटं आली, आर्थिक तोटा सहन करावा लागला, शारीरिक आणि मानसिक त्रासही सोसावा लागला. पण तरीही तो जिद्दीने लढत राहिला. त्याच्या मते, “जर तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण होत असतील, तर तुम्ही तुमचं स्वप्न नक्कीच साकार करू शकता.”

    आज विक्रमच्या संघर्षाची कहाणी हजारो तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अपयशाला घाबरून थांबण्यापेक्षा त्यातून शिकून पुढे जाणं हेच यशाचं खरं रहस्य आहे. विक्रमने ते करून दाखवलं. 

    आणखी वाचा:

  • कधी टॉयलेट साफ केला, कधी वडापाव विकला: जाणून घ्या ‘छावा’ दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा संघर्षमय प्रवास

    कधी टॉयलेट साफ केला, कधी वडापाव विकला: जाणून घ्या ‘छावा’ दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा संघर्षमय प्रवास

    सध्या देशभरात “छावा” (Chhaava) या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या संघर्षमयी जीवन प्रवासावर आधारित आहे, ज्यात महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशल (vicky kaushal) यांनी साकारली आहे, तर महाराणी येसूबाईंची भूमिका अभिनेत्री रश्मीका मंदाना हिने साकारली आहे, तसेच अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता आणि संतोष जुवेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी सुद्धा आपली भूमिका चोख निभावली आहे. या सर्व कलाकारांच्या अभिनयाचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.

    मात्र, या चित्रपटाच्या यशामध्ये सर्वाधिक कौतुक कोणाचं होत असेल, तर ते म्हणजे चित्रपटाचे मराठमोळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांचं. कारण पहिल्यांदाच संभाजी महाराजांचा इतिहास मोठ्या पडद्यावर इतक्या ताकदीने साकारण्यात आला आहे. उतेकर यांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण दिग्दर्शन शैलीत हा चित्रपट वास्तवाशी जुळवून प्रभावीपणे सादर केला आहे, ज्यामुळे या चित्रपटाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

    लक्ष्मण उतेकर हे आज हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक आहेत, पण त्यांचा प्रवास अत्यंत कठीण आणि संघर्षमय होता. एक काळ असा होता की, त्यांना दोन वेळच्या जेवणासाठीही संघर्ष करावा लागला. उदरनिर्वाहासाठी त्यांनी टॉयलेट साफ करण्यापासून ते वडापाव विकण्यापर्यंत अनेक कामे केली. पण त्यांनी कधीही हार मानली नाही. कठोर मेहनत, चिकाटी आणि आपल्या कलेवरील निष्ठेमुळे ते आज यशस्वी दिग्दर्शक बनले आहेत. आजच्या लेखात आपण त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाची सविस्तर माहिती घेऊया.

    प्रारंभिक जीवन आणि संघर्ष

    लक्ष्मण उतेकर यांचा जन्म एका साधारण कुटुंबात झाला. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शिक्षणासाठी आवश्यक सुविधा मिळाल्या नाहीत, पण त्यांच्या मनात मोठी स्वप्नं होती. काहीतरी वेगळं करण्याची जिद्द घेऊन त्यांनी लहान वयातच मुंबई गाठली. तिथे ना कुणी ओळखीचं होतं, ना कुठे राहायची सोय. हातात काहीच नव्हतं, पण मेहनतीवर आणि जिद्दीवर त्यांचा पूर्ण विश्वास होता.

    पोट भरण्यासाठी त्यांनी एका वडापाव विक्रेत्याकडे लहानसं काम मिळवलं. दिवस-रात्र मेहनत करत असताना त्यांची नजर सतत मोठ्या संधीच्या शोधात होती. त्यांना सिनेसृष्टीत काम करायचं होतं, पण त्यासाठी कुठून सुरुवात करावी, हे माहीत नव्हतं. त्यांनी हार मानली नाही. ते मुंबईत स्टुडिओच्या बाहेर तासन्‌तास उभे राहत, लोकांशी ओळख वाढवायचा प्रयत्न करत आणि योग्य संधी मिळण्याची वाट पाहत होते.

    एके दिवशी अचानक महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांची वडापावची हातगाडी जप्त केली आणि त्यांचं उपजीविकेचे एकमेव साधन हिरावलं गेलं. हा त्यांच्या आयुष्यातला मोठा टर्निंग पॉइंट ठरला. त्या क्षणी त्यांनी ठरवलं की आता मागे फिरायचं नाही. परिस्थिती कितीही कठीण आली तरी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करायचं आणि आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवायचं. उपजीविकेसाठी त्यांनी वेळप्रसंगी सफाईचं काम केलं, पण हार मानली नाही. 

    सिनेमॅटोग्राफीची पहिली पायरी

    या कठीण परिस्थितीतून मार्ग काढत असताना, त्यांना एक दिवस एका वृत्तपत्रात पियूनच्या नोकरीची जाहिरात दिसली. स्टुडिओत काम करण्याची संधी पाहून त्यांनी अर्ज केला आणि त्यांना तिथे नोकरी मिळाली. हीच त्यांची सिनेसृष्टीत पहिली पायरी होती.

    स्टुडिओत काम करत असताना त्यांना चित्रपट निर्मितीविषयी अधिक जाणून घेण्याची संधी मिळाली. तिथेच क्रूची गरज असल्याने त्यांना कॅमेरा अटेंडंट म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी हळूहळू सिनेमॅटोग्राफी शिकण्यास सुरुवात केली. छोट्या जबाबदाऱ्या स्वीकारत, सातत्याने मेहनत घेत आणि शिकत ते पुढे जात राहिले.

    काळाच्या ओघात त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफी केली. इंग्लिश विंग्लिश, हिंदी मीडियम, डीअर जिंदगी आणि 102 नॉट आऊट यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांच्या उत्कृष्ट कार्याची झलक दिसली. त्यांच्या मेहनतीमुळे आणि कुशलतेमुळे त्यांना बॉलिवूडमध्ये ओळख मिळू लागली आणि सिनेमॅटोग्राफीच्या क्षेत्रात त्यांचं नाव लौकिकास आलं .

    दिग्दर्शनाची सुरुवात आणि ब्रेकथ्रू

    लक्ष्मण उतेकर यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून चांगलं नाव कमावलं होतं, पण त्यांना दिग्दर्शक होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. त्यांनी मराठीत पहिला चित्रपट दिग्दर्शित केला तो म्हणजे “टपाल”. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगला आवडला आणि त्यांना दिग्दर्शक म्हणून ओळख मिळाली.

    यानंतर त्यांनी “लालबागची राणी” हा दुसरा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटामुळे त्यांच्या दिग्दर्शन कौशल्यावर शिक्कामोर्तब झालं. त्यांच्या कथा सांगण्याच्या अनोख्या शैलीला आणि भावनिक दृश्यांवरील पकडीला प्रेक्षकांची दाद मिळाली.

    बॉलिवूडमध्ये संधी मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील होते आणि अखेर २०१९ मध्ये त्यांना मोठा ब्रेक मिळाला. त्यांनी “लुका छुपी” हा चित्रपट दिग्दर्शित केला. हा चित्रपट लिव्ह-इन रिलेशनशिप या विषयावर हलकाफुलका विनोदी सिनेमा होता. प्रेक्षकांनी तो उचलून धरला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर १२८ कोटींची कमाई केली.

    यानंतर, आता लक्ष्मण उतेकर यांनी “छावा” हा छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडणारा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. भव्य निर्मितीमूल्य, दमदार अभिनय, आणि सुंदर दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय ठरतो आहे.मित्रांनो, लक्ष्मण उतेकर यांचा जीवनप्रवास आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक अडचण, संघर्ष, आणि अपयशाला संधी म्हणून स्वीकारलं आणि त्या सर्वांचा योग्य उपयोग करत, आपली स्वप्नं सत्यात उतरवली. त्यांची मेहनत, चिकाटी आणि अथक परिश्रम यामुळेच ते आज एक प्रतिष्ठित दिग्दर्शक बनले आहेत. त्यांची ही यशोगाथा आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी, आपल्याला दिलेल्या संधीचा योग्य उपयोग आणि प्रयत्नांमुळे सर्व गोष्टी शक्य होतात.

    आणखी वाचा :

  • जाणून घ्या विमा क्षेत्रातील डिजिटल क्रांतीचे शिल्पकार वरुण दुआ यांचा प्रवास | Acko General Insurance

    जाणून घ्या विमा क्षेत्रातील डिजिटल क्रांतीचे शिल्पकार वरुण दुआ यांचा प्रवास | Acko General Insurance

    यश मिळवायचं असेल; तर जिद्द, मेहनत आणि योग्य दिशा असणं गरजेचं असतं. जिद्द मेहनतीला साथ देते, तेव्हा कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येतं. भारतीय विमा क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवणारे अग्रगण्य युवा उद्योजक वरुण दुआ हे या गोष्ट्टीचं उत्तम उदाहरण आहेत. पारंपरिक विमा क्षेत्रातील जटिल प्रक्रिया सोप्या आणि सुलभ करण्याचं त्यांनी स्वप्न पाहिलं. त्यांच्या दूरदृष्टीमुळे विमा घेण्याची संकल्पना आणि प्रक्रिया संपूर्ण बदलली.

    ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी Acko General Insurance या पूर्णतः डिजिटल विमा कंपनीची स्थापना केली. पारंपरिक विमा कंपन्यांमध्ये अनेक टप्पे, कागदपत्रांची आवश्यकता आणि वेळखाऊ प्रक्रिया असते. याउलट, Acko ने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विमा प्रक्रिया सुलभ केली. ग्राहकांना जलद आणि पारदर्शक सेवा मिळावी यासाठी कंपनीने डिजिटल माध्यमातून थेट विमा पॉलिसी देण्याचा निर्णय घेतला. 

    वरुण दुआ यांचा प्रवास संघर्ष, नाविन्य आणि चिकाटीने भरलेला आहे. त्यांनी कठोर परिश्रम, नवकल्पना आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विमा क्षेत्रात नवी क्रांती घडवली. चला, त्यांच्या जीवनप्रवासाचा आणि उद्योजकीय यशाचा आढावा या लेखातून घेऊया.

    प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

    वरुण दुआ यांचा जन्म १९८१ मध्ये दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील चंदर मोहन दुआ हे सरकारी कंपनीत अधिकारी होते, तर आई रश्मी दुआ या सरकारी शाळेच्या प्राचार्या होत्या. शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या या कुटुंबात वरुण यांना लहानपणापासूनच नवीन गोष्टी शिकण्याची आवड होती, ज्यामुळे त्यांचा अभ्यासात चांगला सहभाग असायचा.

    त्यांचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील वांद्रे-जुहू परिसरातील शाळेत झालं. पुढे त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली आणि त्यानंतर MICA (Mudra Institute of Communications, Ahmedabad) मधून मार्केटिंग आणि कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. या शिक्षणामुळे त्यांना मार्केटिंग आणि ब्रँडिंग यांचं सखोल ज्ञान मिळालं, जे त्यांना पुढे विमा क्षेत्रात नवे प्रयोग करण्यासाठी उपयोगी ठरलं.

    करिअरची सुरुवात

    MICA मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर वरुण दुआ यांनी आपल्या करिअरची सुरुवात Leo Burnett या जगप्रसिद्ध जाहिरात कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून केली. त्यांच्या कुटुंबाला नेहमीच त्यांच्यासाठी स्थिर आणि सुरक्षित नोकरी हवी होती, म्हणूनच त्यांनी सुरुवातीला नोकरी करण्याचा निर्णय घेतला. मार्केटिंग आणि ब्रँडिंग क्षेत्रातील आपल्या ज्ञानाचा उपयोग करत त्यांनी पुढे टाटा AIG लाइफ इन्शुरन्स आणि फ्रँकलिन टेम्पलटन इन्व्हेस्टमेंट्स यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम केलं. या कंपन्यांमध्ये काम करत असताना त्यांना विमा उद्योगातील कार्यपद्धती, ग्राहकांच्या गरजा आणि उद्योगाच्या मर्यादा यांची सखोल माहिती आणि समज मिळाली.

    httpswww.google.comurlsaiurlhttps3A2F2Fwww.indiamart.com2Fproddetail2Facko insurance software 2854200953088.htmlpsigAOvVaw02JTUsY7hzvsu SuP8ItcNust1739698632479000sourceimagescdvfe

    या अनुभवातून त्यांना लक्षात आलं की विमा खरेदी प्रक्रिया अत्यंत जटिल, वेळखाऊ आणि पारदर्शकतेच्या अभावामुळे ग्राहकांसाठी त्रासदायक आहे. अनेक ग्राहकांना विमा पॉलिसी समजण्यात अडचण येत होती, तर काहींना क्लेम प्रक्रिया खूप वेळ घेणारी आणि कठीण वाटत होती. ही समस्या सोडवण्यासाठी काहीतरी नवीन आणि ग्राहकांसाठी सुरळीत प्रक्रिया निर्माण करणं गरजेचं होतं. म्हणून त्यांनी परंपरागत विमा उद्योगाला डिजिटल युगाशी जोडण्याचा संकल्प केला आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा दृढ निश्चय केला.

    व्यवसायाची सुरुवात आणि सुरुवातीचा संघर्ष 

    २०१६ मध्ये वरुण दुआ यांनी ACKO General Insurance ची स्थापना केली. ही भारतातील पहिली पूर्णतः डिजिटल विमा कंपनी आहे. “शून्य कमिशन, शून्य कागदपत्रे” या संकल्पनेने सुरू झालेल्या ACKO ने “फुल पैसा वसूल” या मोहिमेच्या माध्यमातून लोकांचं लक्ष वेधून घेतलं.

    ACKO ने विमा क्षेत्रात एक नवा बदल घडवला. पारंपरिक विमा कंपन्यांच्या जटिल आणि वेळखाऊ प्रक्रियांमुळे ग्राहकांना अडचणी येत होत्या. मात्र, ACKO ने डिजिटल आणि सोपी विमा सेवा उपलब्ध करून हे आव्हान सोडवलं. मोठ्या खर्चाशिवाय, त्यांनी परवडणाऱ्या आणि सहज समजणाऱ्या विमा पॉलिसी ग्राहकांसाठी तयार केल्या. AI आणि डेटा-ड्रिव्हन तंत्रज्ञानाचा वापर करून, त्यांनी विमा मंजुरी आणि क्लेम प्रक्रिया जलद आणि पारदर्शक केली.

    ACKO ने ओला, अमेझॉन, रेडबस, बायजूस यांसारख्या मोठ्या ब्रँडसोबत भागीदारी करून विमा सेवा अधिक सोपी केली. त्यांच्या उत्तम ग्राहक सेवेमुळे, ACKO भारतातील युनिकॉर्न कंपन्यांपैकी एक बनली आहे. आज ACKO फक्त वाहन आणि आरोग्य विमाच नाही, तर जीवन विमाही प्रदान करते, त्यामुळे ग्राहकांचा विश्वास आणि कंपनीचा विस्तार सातत्याने वाढत आहे.

    ACKO चा यशस्वी प्रवास

    ACKO ने आपल्या अभिनव दृष्टिकोनामुळे कमी वेळात मोठं यश मिळवलं. २०१८ मध्ये IRDAI कडून अधिकृत परवानगी मिळवल्यानंतर, कंपनीने वेगाने विस्तार केला. २०२१ मध्ये $२५५ मिलियन गुंतवणूक फंड उभारून, त्यांनी डिजिटल विमा क्षेत्रात आपलं स्थान अधिक मजबूत केलं. या यशामुळे २०२४ मध्ये ACKOचे मूल्यांकन $१.१ अब्ज डॉलर्स (सुमारे ९,००० कोटी रुपये) ओलांडले आणि कंपनीने भारतातील टॉप युनिकॉर्न स्टार्टअप्समध्ये स्थान मिळवलं.

    ACKO चे संस्थापक वरुण दुआ यांनी २०२३ मध्ये शार्क टँक इंडिया या प्रसिद्ध रियॅलिटी शोच्या सीझन मध्ये परीक्षक म्हणून सहभाग घेतला. अनेक तरुण उद्योजकांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांना आर्थिक मदतही दिली. त्यांची व्यवसायवाढीतील दूरदृष्टी आणि ग्राहक-केंद्रितता ACKO च्या यशाचा मुख्य आधार आहे.

    आणखीन वाचा:

  • Gmail पैसे कसे कमावते? जाणून घ्या A to Z माहिती.

    Gmail पैसे कसे कमावते? जाणून घ्या A to Z माहिती.

    जीमेल (Gmail) ही गूगलची (Google) अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावी ई-मेल सेवा आहे. आज जगभरातील कोट्यवधी लोक जीमेलचा वापर करतात. जीमेलचा वापर आपण प्रत्येक दिवशी, कामाच्या गोष्टी, शालेय प्रोजेक्ट्स किंवा इतर बऱ्याच कारणासाठी करत असतो. आजकालचे मोठ्या प्रमाणात पत्रव्यवहार सुद्धा जीमेलच्या माध्यमातून होत असतात. गूगलचं व्यवसाय मॉडेल एवढं यशस्वी आहे की, फक्त जीमेलच्या माध्यमातून गूगलला अब्जावधी डॉलर्सचा महसूल मिळतो. मात्र, जीमेल पूर्णतः मोफत असल्यामुळे अनेक लोकांना प्रश्न पडतो की, गूगल जीमेलवरून पैसे कसे कमावते? जर तुम्हाला सुद्धा कधी ही शंका आली असेल आणि याचं उत्तर जाणून घ्यायचं असेल, तर हा लेख वाचा. 

    वापरकर्त्यांची माहिती आणि डेटा अ‍ॅनालिटिक्स

    गूगलचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणजे त्याचा डेटा-आधारित जाहिरात व्यवसाय. जेव्हा वापरकर्ते जीमेल वापरतात, तेव्हा गूगलला त्यांच्या ईमेलमधून काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती मिळते. उदाहरणार्थ, ईमेलचे विषय, ट्रेंडिंग कीवर्ड्स, खरेदी संदर्भ (shopping receipts) आणि उत्पादने किंवा सेवांबद्दल असलेले संवाद याबद्दल माहिती मिळते. ही माहिती गूगलच्या अल्गोरिदमद्वारे संकलित केली जाते आणि त्याचा वापर जाहिरातींचे टार्गेटिंग करण्यासाठी केला जातो.

    उदाहरणार्थ, जर एखादा युजर जीमेलवर फिटनेसबद्दल ईमेल्स मिळवत असेल, तर गूगल त्या युजरला फिटनेस उपकरणे किंवा आहारयुक्त जाहिराती दाखवते. यामुळे जाहिरातदारांना त्यांचे उत्पादन किंवा सेवा योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यास मदत होते आणि गूगलला या जाहिरातींच्या माध्यमातून मोठा महसूल मिळतो.

    जाहिरात उत्पन्न (Google Ads/AdSense) अ‍ॅड्स हे गूगलच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे आणि जीमेल त्यात महत्त्वाचा भाग आहे. जीमेलमध्ये वापरकर्त्यांच्या इनबॉक्समध्ये थेट जाहिराती दाखविल्या जातात. जीमेलमध्ये तीन विभाग असतात. ते म्हणजे  ‘इनबॉक्स, सोशल आणि प्रोमोशनल’. प्रोमोशनल टॅबमध्ये गूगल जाहिराती दाखवते. यामुळे, जीमेल वापरकर्त्यांना त्यांच्या इनबॉक्समध्ये आवश्यक असलेली माहिती मिळवता येते, त्याच वेळी गूगलच्या जाहिराती देखील दाखवल्या जातात. काही वेळा, इनबॉक्समध्ये देखील स्पॉन्सर्ड ईमेल्स येतात, जे विशिष्ट ब्रँडद्वारे पाठवले जातात. गूगल वापरकर्त्यांच्या ईमेलमधील शब्दांवर आधारित संबंधित कंटेक्स्चुअल अ‍ॅड्स (Contextual Ads) दाखवतो. गूगलला या जाहिरातींमधून उत्पन्न मिळते. जाहिरातदार गूगलला त्यांच्या जाहिरातींसाठी पैसे देतात आणि जर एखाद्या युजरने त्या जाहिरातीला क्लिक केले किंवा पाहिले, तर त्याचा महसूल थेट गूगलला मिळतो. यामुळे गूगलची जाहिरात प्रणाली अत्यंत यशस्वी ठरते, कारण ती वापरकर्त्यांच्या ईमेल अनुभवाशी संबंधित असते. जेव्हा जाहिराती वापरकर्त्यांच्या गरजांनुसार आणि आवडीनुसार असतात, तेव्हा त्या अधिक प्रभावी ठरतात आणि गूगलला त्याचबरोबर मोठा लाभ मिळवून देतात.

    गूगल वर्कस्पेस (Google Workspace)

    1

    गूगल वर्कस्पेस हे गूगलचे प्रीमियम सबस्क्रिप्शन मॉडेल आहे, जे व्यवसायांसाठी खास डिझाइन केले आहे. या सेवेमध्ये व्यवसायांना कस्टम डोमेनसह ईमेल वापरण्याची परवानगी दिली जाते. यामध्ये 30 GB किंवा त्यापेक्षा अधिक स्टोरेज, प्रगत सुरक्षा उपाय, आणि गूगल ड्राईव्ह, कॅलेंडर, मीट सारख्या गूगलच्या सेवांचा समावेश आहे. गूगल वर्कस्पेससाठी दर महिन्याला प्रति वापरकर्त्यापासून ६ ते १८ अमेरिकन डॉलर घेतले जातात. हजारो व्यवसाय गूगल वर्कस्पेस वापरतात, ज्यामुळे गूगलला प्रचंड उत्पन्न मिळते.

    स्टोरेज योजना (Google Drive Storage Plans)

    जीमेलसह गूगल वापरकर्त्यांना 15 GB मोफत स्टोरेज पुरवतो, ज्यामध्ये ईमेल, गूगल ड्राईव्ह आणि गूगल फोटोज यांचा समावेश असतो. ज्या वापरकर्त्यांना अधिक स्टोरेज आवश्यक असते, ते गुगलचा पेड स्टोरेज प्लॅन्स खरेदी करतात. गूगलचे स्टोरेज प्लॅन्स 100 GB साठी 130 रुपये प्रति महिना, 200 GB साठी २१० रुपये प्रति महिना आणि 2 TB साठी ६५० रुपये प्रति महिना असे आहेत . यातुन गूगलला दर महिन्याला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो, कारण लाखो वापरकर्ते हे प्लॅन्स वापरत असतात.

     AI आणि मशीन लर्निंगवर आधारित सेवा

    जीमेलमध्ये विविध एआय-आधारित फिचर्स आहेत, जे वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्यात मदत करतात. ‘स्मार्ट रिप्लाय’ फिचर ईमेलच्या संदर्भानुसार त्वरित उत्तरांचे सुचवलेले पर्याय देते, ज्यामुळे वेळ वाचतो. ‘ईमेल फिल्टरिंग’ फिचर वापरकर्त्यांना महत्त्वपूर्ण ईमेल्स ओळखण्यास मदत करते, ज्यामुळे इनबॉक्स व्यवस्थापन अधिक सुलभ होते. हे सर्व फिचर्स वापरकर्त्यांचा वेळ वाचवतात आणि कार्यक्षमता वाढवतात, तसेच गूगलला प्रीमियम फिचर्ससाठी ग्राहक आकर्षित करण्यास मदत करतात, ज्यामुळे  त्यांच्या उत्पन्नात सतत वाढ होत असते.

    2

    गूगलने जीमेलच्या माध्यमातून एक यशस्वी व्यावसायिक मॉडेल निर्माण केले आहे. वापरकर्त्यांना मोफत सेवा देऊन आणि त्यावर जाहिराती, डेटा अ‍ॅनालिटिक्स, प्रीमियम सबस्क्रिप्शन आणि स्टोरेज योजनांच्या माध्यमातून महसूल मिळवून गूगलने आपली जागतिक प्रतिष्ठा कायम ठेवली आहे. यामुळे गूगल जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांमध्ये आपले स्थान मजबूत करु शकले आहे. डेटा आधारित व्यवसाय मॉडेलने गूगलला वित्तीय आणि व्यवसायिक यश प्राप्त करण्यास मदत केली आहे, यामुळे गूगल जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांमध्ये आपले स्थान टिकवून आहे.

    आणखी वाचा :

  • पोस्ट ऑफिसच्या 5 सर्वोत्तम बचत योजना: सुरक्षित गुंतवणुकीसाठी उत्कृष्ट पर्याय

    पोस्ट ऑफिसच्या 5 सर्वोत्तम बचत योजना: सुरक्षित गुंतवणुकीसाठी उत्कृष्ट पर्याय

    मित्रांनो, पैशांची बचत आणि गुंतवणूक आपल्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. आपण कामातून कमावलेला पैसा फक्त आजच्याच गरजांसाठी उपयोगी पडत नाही, तर भविष्यातील गरजा आणि अडचणींना तोंड देण्यासाठी सुरक्षित गुंतवणूक करण्याची आवश्यकता असते. गुंतवणूक ही एक जबाबदारी असते ज्यामध्ये आपल्याला दीर्घकालीन स्थैर्य, चांगला परतावा आणि सुरक्षितता यांचा समतोल साधावा लागतो. बऱ्याच जणांना गुंतवणुकीच्या बाबतीत अनेक शंका असतात. पैसा कुठे गुंतवायचा, परतावा किती मिळणार आणि गुंतवणुकीचा धोका किती आहे.

    आपण बऱ्याचदा सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असतो. जिथे आपले पैसे दीर्घकाळ सुरक्षित राहतील आणि त्यावर चांगले व्याज मिळेल. अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिसच्या विविध बचत योजना सुरक्षित गुंतवणूक पर्याय ठरतात. पोस्ट ऑफिसच्या या योजना कमी जोखीम असलेल्या असतात आणि सरकारच्या नियंत्रणाखाली असल्यामुळे त्या पूर्णपणे सुरक्षित असतात. त्यामुळे तुमच्यासाठी या योजना एक उत्तम पर्याय ठरू शकतात.

    या लेखात आपण पोस्ट ऑफिसच्या पाच प्रमुख योजनांवर नजर टाकूया, ज्या तुमच्या गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय ठरू शकतात.

    1. किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra – KVP)

    किसान विकास पत्र ही एक सुरक्षित आणि आकर्षक गुंतवणूक योजना आहे. या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर तुम्हाला 7.5% वार्षिक व्याज मिळते आणि विशेष म्हणजे 115 महिन्यांनंतर म्हणजेच साधारणपणे 9 वर्षे 7 महिन्यांत तुमची रक्कम दुप्पट होते. ही योजना दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. 18 वर्षांवरील कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. तसेच, जर एखाद्या अल्पवयीन व्यक्तीला गुंतवणूक करायची असेल, तर त्याच्या पालकांच्या नावावर खाते उघडले जाऊ शकते. किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक केल्याने आपले पैसे दीर्घकाळ सुरक्षित राहतील आणि त्याच वेळी ठरलेला परतावा मिळेल.

    2. नॅशनल सेविंग्ज टाईम डिपॉजिट अकाउंट (National Savings Time Deposit – TD)

    नॅशनल सेविंग्स टाईम डिपॉजिट योजना ही अल्प आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना एक वर्षासाठी 6.9%, दोन वर्षासाठी 7%, तीन वर्षासाठी 7.1% आणि पाच वर्षासाठी 7.5% व्याज मिळते. गुंतवणुकीसाठी किमान रक्कम 1,000 रुपये आहे, जी सामान्य लोकांसाठी अगदी परवडणारी आहे. यामध्ये तुम्ही गुंतवलेले पैसे सहा महिन्यांपूर्वी काढता येणार नाहीत आणि एक वर्षाच्या आत काढल्यास फक्त साध्या बचत खात्याचे व्याज मिळेल. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आणि सुरक्षित परताव्यासाठी ही योजना खूपच फायदेशीर ठरू शकते.

    2

    3. वरिष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizens Savings Scheme – SCSS)

    वरिष्ठ नागरिकांसाठी SCSS योजना विशेषतः उपयुक्त आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी 8.2% व्याज दराने परतावा मिळतो, जो बाजारातील इतर योजनांच्या तुलनेत खूपच आकर्षक आहे. या योजनेत किमान 1,000 रुपये गुंतवून खाते उघडता येते आणि जास्तीत जास्त 30 लाख रुपये गुंतवता येतात. 60 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना सर्वात योग्य आहे, तसेच निवृत्ती घेतलेल्या आणि वयाच्या 55 ते 60 वर्षांदरम्यान असलेल्या व्यक्तींनाही ही योजना उपलब्ध आहे. या योजनेचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो, परंतु तो मुदतीनंतर वाढवता येतो. सुरक्षित गुंतवणूक आणि नियमित परताव्याच्या शोधात असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरते.

    4. नॅशनल सेविंग्ज सर्टिफिकेट (National Savings Certificate – NSC)

    नॅशनल सेविंग्ज सर्टिफिकेट योजना कमी जोखीम असलेल्या गुंतवणुकीसाठी उपयुक्त आहे. सध्या या योजनेत 7.7% व्याजदर देण्यात येतो. या योजनेत गुंतवलेली रक्कम 5 वर्षांपर्यंत ठेवली जाते, ज्यामुळे तुमच्या गुंतवणुकीसाठी दीर्घकालीन फायद्याचा पर्याय ठरतो. याशिवाय, आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर करसवलत मिळते. कमी जोखीम आणि दीर्घकालीन परतावा देणारी ही योजना सुरक्षित गुंतवणुकीसाठी आदर्श मानली जाते.

    5. पब्लिक प्रॉविडेंट फंड (Public Provident Fund – PPF)

    पब्लिक प्रॉविडेंट फंड ही एक सर्वात लोकप्रिय आणि दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. या योजनेत तुम्ही किमान 500 रुपये गुंतवू शकता, आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये दरवर्षी गुंतवले जाऊ शकतात. 15 वर्षांच्या मुदतीनंतर तुमच्या गुंतवणुकीला 5 वर्षांची वाढ मिळवण्यासाठी संधी दिली जाते. याशिवाय, PPF अंतर्गत तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत करसवलत देखील मिळते. आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही या योजनेतून पैसे काढू शकता किंवा शिल्लक रकमेवर कर्ज घेऊ शकता. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आणि करमुक्त परताव्यासाठी PPF योजना अत्यंत फायदेशीर आहे

    पोस्ट ऑफिसच्या या योजना गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित, लाभदायक आणि दीर्घकालीन परतावा देणाऱ्या आहेत. कमी जोखीम आणि ठरलेला परतावा हवे असल्यास, पोस्ट ऑफिसच्या योजना तुमच्यासाठी योग्य ठरतील. तुमच्या गरजांनुसार योग्य योजना निवडून सुरक्षित गुंतवणूक करा आणि तुमच्या भविष्याच्या आर्थिक स्थैर्यासाठी योग्य पाऊल उचला.

    हे पण वाचा: