आजकाल ऑनलाईन अर्निंग करण्यासाठी अनेकजण ब्लॉग किंवा वेबसाईट सुरू करतात, परंतु त्यातून पैसे कसे मिळवायचे हे अनेकांना माहित नसतं. ब्लॉग किंवा वेबसाईटद्वारे पैसे कमवण्याचे बरेच मार्ग आहेत, जसं की; गुगल ॲड्स, ॲफिलिएट मार्केटिंग, जाहिराती, स्पॉन्सरशिप, प्रॉडक्ट्सची विक्री इत्यादी. परंतु या सगळ्यांमध्ये Google AdSense हा एक अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाचा मार्ग. आज आपण या लेखात Google AdSense म्हणजे काय, ते कसं कार्य करतं, AdSense ची मान्यता कशी मिळवायची आणि त्यातून पैसे कसे कमवायचे हे सविस्तरपणे समजून घेऊया
Google AdSense म्हणजे काय?
Google AdSense ही एक Google द्वारे चालवली जाणारी जाहिरात सेवा आहे. हा एक Advertise प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये ब्लॉग किंवा वेबसाईटवर विविध स्वरूपाच्या जाहिराती, जसं की इमेज, व्हिडिओ, बॅनर जाहिराती दाखवण्यात येतात. जेव्हा तुमच्या ब्लॉगला Google AdSense चे अप्रूवल मिळतं, तेव्हा तुमच्या कंटेंटशी संबंधित जाहिराती Google तुमच्या वेबसाईटवर दाखवतं. वेबसाईटवर आलेले व्हिजिटर्स जेव्हा जाहिरातींवर क्लिक करतात, तेव्हा तुम्हाला पैसे मिळतात.
Google AdSense कशाप्रकारे कार्य करते?
Google AdSense च्या कार्यप्रणालीमध्ये काही महत्त्वाचे टप्पे आहेत. सर्वप्रथम, तुमच्या वेबसाईट किंवा ब्लॉगला पात्रतेसाठी Google द्वारे एक मूल्यांकन केलं जातं. जर तुमची वेबसाईट पात्र असेल, तर तुम्हाला एक अकाउंट अप्रूव्ह केलं जातं. एकदा अप्रूवल मिळाल्यानंतर, Google तुम्हाला एक कोड प्रदान करतं . हा कोड तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर टाकावा लागतो. या कोडच्या माध्यमातून जाहिराती तुमच्या ब्लॉगवर दिसायला लागतात, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्लिकवर CPC (Cost Per Click) प्रमाणे पैसे कमवू शकता. वेबसाईटवरील ट्रॅफिक जितके जास्त असेल, तितके अधिक पैसे कमवता येतील. त्यामुळे, जाहिरातींवर जेवढे अधिकाधिक व्हिजिटर क्लिक करतात आणि तुमची कमाई वाढते.
YouTube आणि AdSense
फक्त ब्लॉगच नाही, तर YouTube चॅनलद्वारे सुद्धा Google AdSense च्या मदतीने कमाई करता येते. तुम्ही जेव्हा तुमच्या YouTube चॅनलवरील व्हिडिओमध्ये जाहिराती दाखवता आणि त्यावर लोक क्लिक करतात, तेव्हा तुम्हाला CPC च्या आधारावर पैसे मिळतात.
AdSense ची मान्यता कशी मिळवायची?
AdSense चे अप्रूवल मिळवण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे . तुमच्या वेबसाईटवर जरा युनिक आणि माहितीपूर्ण कंटेंट असणं महत्वाचं आहे. तसेच, तुमच्या वेबसाईटवर Contact Us, About Us, Privacy Policy, Terms & Conditions सारखी पेजेस तयार करणं आवश्यक आहे. यानंतर Google AdSense च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला एक नवीन खातं तयार करावं लागेल. तुमची वेबसाईट Google च्या अटींनुसार योग्य असल्यास, तुम्हाला अप्रूवल मिळतं आणि जाहिराती वेबसाईटवर दिसायला लागतात. या प्रक्रियेत थोडा वेळ लागू शकतो, पण योग्य पद्धतीने काम केल्यास तुम्हाला यश निश्चित मिळेल.
Google AdSense ही ब्लॉग आणि वेबसाईटद्वारे पैसे कमवण्याची एक सोपी व प्रभावी पद्धत आहे. जर तुमच्याकडे ब्लॉग किंवा न्यूज वेबसाईट असेल किंवा तुम्ही जर उत्तम लिहणारे असाल, तर तुम्ही स्वतःची वेबसाईट सुरु करून योग्य पद्धतीने AdSense द्वारे पैसे कमवू शकता.
Google AdSense मधून किती पैसे कमावता येतात?
यावर कोणतीही मर्यादा नाही. तुमच्या वेबसाईटवरील ट्रॅफिक आणि जाहिरातींवर क्लिक होण्याच्या प्रमाणावर हे अवलंबून असतं. युनिक कंटेंट, योग्य पेजेस (About Us, Privacy Policy), आणि नियमित ट्रॅफिक मिळणारी वेबसाईट Google AdSense च्या मदतीने तुम्ही ऑनलाईन पैसे कमविण्याच्या प्रवासाची सुरुवात करू शकता.
मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावर लेख वाचायला आवडतील, हे सांगायलाही विसरू नका.
जगामध्ये प्रत्येक कालखंडात एकाचवेळी किमान ३-४ पिढ्या आढळून येतात. 21 व्या शतकात १९९५ आणि २०१० दरम्यान जन्माला आलेली पिढी म्हणजे Gen Z. इंटरनेटला ओळखून असणारी पहिली पिढी असे या पिढीला संबोधले तरी काही गैर नाही. या पिढीला ‘डिजिटल नेटिव्ह’ असेही म्हणतात.
आत्ताचा काळ वेगाने बदलत आहे व त्यानुसार तंत्रज्ञानही. या तंत्रज्ञानाशी मैत्रीपूर्ण नाते असलेली पिढी म्हणजे जनरेशन झेड. ही पिढी म्हणजे १९९५ नंतर जन्मलेली १२ ते १८ वयोगटातील मुले. त्यांची इंटरनेट, मोबाइल, सोशल मीडियाशी खूपच मैत्री आहे. दीर्घकाळ ऑनलाइन असणारी ही पिढी. इतरांच्या तुलनेत तंत्रज्ञान विश्वाच्या अधिक जवळ दिसून येते.
Gen z पिढीची वैशिष्ट्ये :
तंत्रज्ञानाचा अंगीकार :
Gen Z ची पिढी लहानपणापासूनच स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि इंटरनेटशी जोडलेली आहे. ते डिजिटल युगात वाढलेले असल्यामुळे तंत्रज्ञानाचा चांगला वापर करत आहेत.
सामाजिक जाणीव :
या पिढीतील लोक सामाजिक प्रश्नांबद्दलसुद्धा जागरूक असतात. पर्यावरण, समानता, मानसिक आरोग्य यांसारख्या मुद्द्यांबद्दल ही पिढी विचारशील दिसून येते. समाजाबद्दल असलेली आंतरिक ओढ या पिढीमध्ये दिसून येते.
मल्टी-टास्किंग कौशल्य :
या पिढीने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक गोष्टी एकाच वेळी करण्याची सवय लावून घेतली आहे. त्यामुळे ते अभ्यास, करिअर आणि वैयक्तिक जीवन यांचा समतोल साधण्यात यशस्वी झालेले दिसतात.
स्वतंत्र विचारसरणी :
Gen Z स्वतःच्या निर्णयांवर भर देणारी, स्वत:वर विश्वास असणारी, आत्मविश्वासाने भरलेली पिढी आहे. ते स्वतःच्या आवडीनुसार करिअर निवडण्याचे धाडस करत आहेत, ते धाडस यशस्वी करूनही दाखवत आहेत तसेच पारंपारिक नोकऱ्यांच्या ऐवजी फ्रीलान्सिंग आणि स्टार्टअपमध्ये त्यांचे स्वारस्य दाखवत आहेत.
वैश्विक दृष्टिकोन :
सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील विविध संस्कृतींशी जोडले गेल्यामुळे त्यांची विचारसरणी आणि दृष्टिकोन अधिक व्यापक आणि जागतिक झालेला दिसतो.
अर्थपूर्ण कामे :
या पिढीला केवळ पैशासाठी काम करणे आवडत नाही, तर त्यांना त्यांचे काम अर्थपूर्ण आणि सामाजिक बदल घडविणारे असावे असे वाटते.
निर्णयक्षमता :
तंत्रज्ञान आणि माहितीच्या प्रचंड उपलब्धतेमुळे, Gen Z जलद निर्णय घेण्यास सक्षम आहे. ते लवकर माहिती मिळवणे आणि त्यावर प्रक्रिया करून तितक्याच तात्काळ निर्णय घेण्यावर भर देतात.
व्यक्तिमत्त्व विकास :
सोशल मीडियाच्या युगात, स्वतःचे “व्यक्तिमत्त्व” कसे सादर करावे हे Gen Z चांगले जाणते. Instagram, Facebook, LinkedIn यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर स्वतःची ओळख आणि वैयक्तिक ब्रँड विकसित करण्यास ही पिढी अधिक महत्त्व देते.
विविधतेचा स्वीकार :
Gen Z पिढी विविधतेबद्दल अधिक संवेदनशील आहे. जात, लिंग, लैंगिकता आणि सामाजिक स्थिती याबद्दल त्यांची विचारसरणी अधिक समर्पक आणि आधुनिक आहे.
उद्योजकता :
ही पिढी पारंपारिक 9-5 च्या नोकरीपेक्षा उद्योजकतेवर भर देते. अनेक Gen Z युट्युबर, इन्फ्लुएन्सर, फ्रीलान्सर तसेच स्टार्टअप फाउंडर्स आहेत. त्यांना स्वतःचे काहीतरी निर्माण करण्याची आवड आहे.
मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता :
मानसिक आरोग्य हा विषय Gen Z साठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ते ताणतणाव, चिंता आणि मानसिक आजार यांबद्दल खुलेपणाने बोलतात आणि मदत घेण्यासही तत्पर असतात.
इको-फ्रेंडली दृष्टिकोन :
पर्यावरण आणि शाश्वत मूल्ये याबद्दल ही पिढी अधिक जागरूक आहे. ते पर्यावरण रक्षणासाठी शाश्वत उत्पादनांचा वापर, प्लास्टिकचा कमी वापर आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या वापराला प्राधान्य देताना दिसून येतात.
सतत शिकण्याची वृत्ती :
Gen Z पिढीला सतत नवनवीन गोष्टी शिकण्याची आणि स्वतःला अद्ययावत ठेवण्याची इच्छा दिसते. ऑनलाईन कोर्सेस, ट्यूटोरियल्स आणि व्हिडिओंच्या माध्यमातून ते नियमितपणे स्वतःला Improve करत आहेत.
या पिढीची नोकरी टिकत का नाही ?
Gen Z at Workplace ने नुकताच एक अहवाल सादर केला आहे. या अहवालात सांगितले गेले आहे कि Gen Z पिढीतील ४५% तरुण २ वर्षेही नोकरीच्या एका जागी टिकत नाहीत. याला विविध कारणेदेखील आहेत. मुळात, प्रत्येकाची वेगवेगळी कारणे आहेत. तर ५१ टक्के लोकांना नोकरी गमावण्याची भीती आहे. ही चिंता त्यांच्या करिअरच्या संभाव्यतेपर्यंत विस्तारित आहे. कारण 40 टक्के लोकांना नोकरी मिळाल्यानंतरही त्यांच्या पसंतीच्या क्षेत्रात पद कायम ठेवण्याची चिंता आहे.
या अहवालामध्ये आणखी काही बाबी मांडण्यात आल्या आहेत. अहवालामध्ये असणाऱ्या ७७% तरुणांनी कमर्शिअल ब्रँड तसेच त्यांच्या पदाला जास्त किंमत दिली आहे. तर या ७७% तरुणांमधील ४३% तरुण अनुभव तसेच Improvement आणि Growthच्या संधीला जास्त महत्व देत असतात. अहवालात सादर असलेल्या तरुणांपैकी ७२% तरुण वेतनाच्या रक्कमेपेक्षा Job Satisfaction ला जास्त महत्व देतात, तर ७८% तरुण नोकरी बदलत आहेत कारण त्यांना आणखी पुढे जायचे आहे. HR प्रोफेशन मधील ७१% तरुणांचे असे सांगणे आहे, कि नोकरी बदलण्याचे प्रमुख कारण वेतन हेच आहे. त्यामुळे तरुणाईतील २५% लोक नोकरी बदलताना विशेष लक्ष त्यांच्या पगारावर देतात. अशा लोकांना स्वतःमध्ये राहायला जास्त आवडते.
बहुतेक जणांना असे वाटते, की कमाई चांगली असेल तर आर्थिक नियोजनाची काही गरज नाही; पण पैसा कसा हाताळायचा किंवा गुंतवायचा हे कळत नसेल, तर उद्या हजारांत काय लाखांचे पॅकेज जरी मिळाले तरी ते पुरणार नाही हे वास्तव आहे. मित्रांनो, लक्षात घ्या पैशाचे स्मार्ट व्यवस्थापन जर तुम्ही करणार नसाल तर तुम्हाला तुमच्या भविष्यातील आर्थिक ध्येयांना गुंडाळण्याची वेळ येऊ शकते आणि कर्जाचा मोठा डोंगर तुमच्या पुढे उभा राहू शकतो. यासाठी उत्पन्न कितीही असलं तरी त्या पैशांचे योग्य व्यवस्थापन करता येणे गरजेचे ठरते.
आज आपण पैशांच्या स्मार्ट व्यवस्थापनाच्या 10 Master Tricks पाहूया:
महिन्याच्या आणि वार्षिक खर्चाचे अंदाजपत्रक बनवा. त्यामध्ये होणाऱ्या खर्चाची विभागणी वेगवेगळी करा. यातून तुम्हाला आवश्यक गोष्टीवर होणारा खर्च, हॉटेलिंगवर होणारा खर्च, मुलांच्या शिक्षणावर होणारा खर्च याचा अंदाज येईल.
तुमच्या गरजा आणि इच्छा यामधला फरक समजून घ्या. बहुतेक जण यामध्ये गल्लत करतात. गरजेनुसार खर्च करा, इच्छेनुसार नको.
तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करू नका. हा एक महत्वाचा नियम आहे. बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये असणारे बहुतेकजण यामध्ये अडकलेले असतात.
महिन्याची बिले, कर्जाचे हप्ते वेळेवर भरा. यामुळे तुमची पत सुधारायला मदत होते. ECS (Electronic Clearing Service) मुळे आज बिल भरणे, कर्जाचे हप्ते भरणे खूप सोपे झाले आहे.
क्रेडिट कार्डचा योग्य वापर करा. आज बाजारात क्रेडिट धारकांसाठी खूप योजना येतात आणि त्या सापळ्यात अडकणारेही बरेचजण आहेत. क्रेडिट कार्डचे स्मार्ट उपयोगही आहेत ते समजून घेणे गरजेचे आहे.
स्मार्ट कर्जं आणि वाईट कर्जं घ्या. स्मार्ट कर्ज म्हणजे अशी कर्ज ज्यामध्ये आपल्याला कर नियोजनास मदत होते आणि स्वस्त दरात उपलब्ध होतात. जसे की गृहकर्ज आणि शैक्षणिक कर्ज यावर कर सवलती असतात, याविरुद्ध वाईट कर्ज म्हणजे अशी कर्जं जी महाग दराने मिळतात उदा. वाहन कर्ज, क्रेडिट कार्ड.
तुमच्या अडचणीच्या काळासाठी ३-६ महिन्याच्या खर्चाची तरतूद करून ठेवा. आपल्याला उद्या कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल सांगता येत नाही. नोकरी-धंद्यामध्ये येणाऱ्या चढउताराला सामोरे जाण्यासाठी ही तरतूद खूप महत्त्वाची आहे.
तुमचे महिन्याचे बँक, कर्जाचे स्टेटमेंट चेक करत चला. खूपवेळा आपण याकडे न बघताच रद्दीमध्ये टाकतो. जेव्हा तुम्ही ती काळजीपूर्वक पाहता, तेव्हा तुम्हाला त्यातील बारकावे लक्षात येतात.
तुमच्या परिवाराला, घरातील मोठ्या मुलांना पैशाचे महत्व, तुम्ही केलेल्या गुंतवणूका समजून सांगा, जेणेकरून भविष्यात या गुंतवणूका त्यांना समजायला वेळ लागणार नाही.
आर्थिक नियोजन, विमा, गुंतवणूक यासाठी त्या त्या क्षेत्रातील व्यावसायिक लोकांचा सल्ला घ्या.
लक्षात घ्या; एक छोटेसे छिद्रही जहाजाला बुडवू शकते, त्यामुळे आपल्या आर्थिक जीवनाला शिस्त आणण्यासाठी पैशाचे स्मार्ट व्यवस्थापन गरजेचे आहे आणि त्याची सुरुवात कमाई सुरू झाल्यापासून करणे गरजेचे आहे. ज्याला पैसा कमावता येतो, त्याला तो सांभाळताही आला पाहिजे आणि वाढवताही आला पाहिजे.
स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे म्हणजेच स्वयंरोजगाराचे बरेच फायदे आहेत. स्वयंरोजगार ही स्वतःला विकसित करण्याची, नवीन ज्ञान संपादन करण्याची निरंतर प्रक्रिया असते. ही प्रक्रिया तुम्हाला नोकरी करून कधीच आत्मसात होणार नाही.
आपण जर सोशल मीडियाचे जाणकार आहात व आपणास काहीतरी नावीन्यपूर्ण असा व्यवसाय करायचा असेल, तर सोशल मीडिया कन्सलटंटहा व्यवसाय एक चांगला पर्याय आहे.
सोशल मीडिया कन्सलटंट म्हणजे काय ?
सोशल मीडिया कन्सलटंट म्हणजे असा एक व्यक्ती जो व्यवसायांना किंवा व्यक्तींना त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर योग्य प्रकारे त्यांचा Presence निर्माण करण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी मार्गदर्शन करतो.
यामध्ये –
सोशल मीडिया अकाउंट्स तयार करणे
पोस्ट्सचे नियोजन करणे
टार्गेट ऑडियन्सशी संवाद साधणे
ब्रँड प्रमोशन करणे, ट्रॅफिक वाढवणे
व्यवसायाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी रणनीती तयार करणे यांचा समावेश असतो.
सोशल मीडिया कन्सलटंटचे मुख्य काम व्यवसायाचे ब्रँडिंग व इमेज सुधारण्याचे असते, तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून विक्री किंवा लोकप्रियता वाढवण्याचे असते.
आज कोणताही व्यावसायिक किंवा कंपनी, मग ती मोठी असो वा लहान त्यांचे ऑनलाईन अस्तित्व वाढवण्यासाठी व टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. त्यामुळे एक सोशल मीडिया कन्सलटंट म्हणून पार्ट टाईम किंवा फुलटाईममध्ये पैसे कमवण्याची उत्तम संधी आहे, परंतु या व्यवसायात येण्याअगोदर काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.
सोशल मीडिया कन्सलटंट बनण्यासाठी आवश्यक बाबी :
सोशल मीडिया कन्सलटंटला प्रत्येक सोशल मीडिया टूलच्या साधक बाधक गोष्टींबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे. हे ज्ञान केवळ फेसबूक किंवा ट्विटरपुरते मर्यादित नसावे. त्यांनी नफा मिळवण्याच्या व व्यवसायाच्या गुंतवणुकीवर परतावा (ROI) देण्याच्या धोरणांमध्येदेखील सर्जनशील असावे.
एक सोशल मीडिया तज्ज्ञाने योग्य डावपेच आखण्याइतपत विश्लेषणात्मक असावे. तसेच चांगले परिणाम मिळवण्यासाठी त्यामध्ये वेळोवेळी योग्य बदल करण्याचे कौशल्यही आत्मसात करावे.
एक सोशल मीडिया तज्ज्ञाने योग्य डावपेच आखण्याइतपत विश्लेषणात्मक असावे. तसेच चांगले परिणाम मिळवण्यासाठी त्यामध्ये वेळोवेळी योग्य बदल करण्याचे कौशल्यही आत्मसात करावे.
एक सोशल मीडिया सल्लागार म्हणून आपल्या ग्राहकाचा व्यवसाय, त्यांचे संभाव्य ग्राहक, सोशल मीडिया प्रेझेन्स, सध्याची वर्तमान सोशल मीडिया धोरणे व संबंधित इतर माहिती असणे आवश्यक असते.
ग्राहकाची सोशल मीडिया रणनीती, त्यांच्या कमजोर बाबी व अन्य समस्या निवारणाबद्दल नि:पक्षपाती मत तयार करण्यासाठी सोशल मीडिया सल्लागाराकडे विशेष कौशल्य असावे लागते.
सोशल मीडियाद्वारे व्यवसायवृध्दीचे धोरण तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केले पाहिजे.
एक सल्लागार म्हणून सोशल मीडियावरील फॉलोअर्सच्या डेटाचे विश्लेषण करता आले पाहिजे.
सोशल मीडिया सल्लागार हे आपल्या ग्राहकाच्या सोशल मीडिया उपक्रमांमध्ये विविध डावपेच आखत व सतत नवीन प्रयोग करत असतात. त्यामध्ये सोशल मीडियामधील सध्याचे ट्रेंडस व बदलांचे परीक्षण करणे, प्रभावी ऑनलाईन मार्केटिंगचे धोरण बनवताना सोशल मीडिया माध्यमांचा व आपल्या मार्केटिंग ज्ञानाचा प्रभावी वापर करणे या गोष्टींचा समावेश असतो.
मार्केटिंग योजनांमध्ये विविध तंत्राचा कसा वापर करावा याचे व्यवस्थापन करणे शिकले पाहिजे.
ग्राहकाच्या फायद्यासाठी त्यांच्या व्यवसायातील सर्वोत्तम योजनांचे मूल्यांकन व त्यांची अंमलबजावणी करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सोशल मीडिया सल्लागाराचे असते.
ऑनसाईट कामकाजाच्या माध्यमातून ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा पुरवणे, त्यांच्या गरजा समजून घेणे हे कौशल्य विकसित करावे लागते.
एक परिपूर्ण सोशल मीडिया सल्लागार होण्यासाठी वरील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.
सध्याच्या काळात आपल्या व्यवसायास ऑनलाईन अस्तित्व प्रदान करण्यासाठी उद्योजक सोशल मीडियाचा चांगल्यापैकी उपयोग करतात. परिणामी आजच्या काळात अनेक उद्योजक कंपन्याचे ऑनलाईन किंवा सोशल मीडिया Presence प्रभावशाली करण्यासाठी त्यांना सोशल मीडिया सल्लागारांची गरज असते. त्यामुळे सोशल मीडिया सल्लागार म्हणून व्यवसाय करण्यासाठी एक उत्तम संधी आहे. संधीचा फायदा अवश्य घ्या आणि करिअरच्या दृष्टीकोनातून याचा नक्की विचार करा.
भारतात अनेक उद्योगपती आहेत, ज्यांनी आपल्या मेहनतीने एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. काहींच्या हातात वारसा संपत्ती नसली तरी, त्यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव कमावले आहे. अशाच एका यशस्वी उद्योगपतीची गोष्ट आज आम्ही सांगणार आहोत, जो मुंबईतील घाटकोपरच्या झोपडपट्टीत राहत होता आणि छोट्या-छोट्या नोकऱ्या करीत जीवनाची गाडी पुढे नेत होता. आज तो दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीयांमध्ये गणला जातो आणि त्यांचा व्यवसाय केवळ दुबईतच नाही, तर इतर अनेक देशांमध्येही पसरलेला आहे.
सुरुवातीचे दिवस आणि संघर्ष
रिझवान साजन यांचा जन्म मुंबईच्या घाटकोपरमधील एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यांचं कुटुंब झोपडपट्टीत राहायचे. आर्थिक अडचणींमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं फार कठीण होत होतं. त्यामुळे, साजन यांनी लहानपणापासूनच कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार लावण्याचं ठरवलं होतं. त्यांनी शाळेतील पुस्तकं विकणं, सणासुदीच्या वस्तू विकणं, घरोघरी जाऊन दूध विकणं अशी छोटी छोटी कामं लहानपणीच करण्यास सुरुवात केली.
वयाच्या अवघा १६व्या वर्षीच रिझवान साजन एक मोठा धक्का बसला,त्यांच्या वडिलांचं अचानक निधन झालं. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण आर्थिक जबाबदारी साजन यांच्यावर आली आणि याचा परिणाम म्हणून त्यांना शिक्षण मधूनच सोडावं लागलं. काही काळ त्यांनी एक छोटा व्यवसाय सुरू केला, ज्यात ते फाईल बॉक्सेस बनवायचे. सुरुवातीला या व्यवसायात थोडंफार यश मिळाले, पण पुरेसं नव्हतं.
कुवेतमध्ये मिळाली सुवर्णसंधी
रिझवान साजन यांचे काका तेव्हा कुवैतमध्ये नोकरी करत होते, कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी साजन यांनी आपल्या काकांकडे कुवेतमध्ये नोकरीसाठी विचारणा केली. त्यांच्या काकांनी त्यांना एका बांधकाम साहित्याच्या दुकानात नोकरी मिळवून दिली. ही संधी साजन यांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण वळण ठरली. त्यांनी या नोकरीत एक विक्रेता म्हणून काम सुरू केलं, आणि त्यांच्या मेहनतीने त्यांना त्या ठिकाणी लवकरच व्यवस्थापकाची पदवी मिळाली.
१९९० साली पुन्हा त्यांच्या जीवनाला एक जोरदार धक्का मिळाला . कुवेतमध्ये भीषण आखाती युद्ध सुरू झालं आणि त्यांना कुवेत सोडावं लागलं आणि पुन्हा भारतात परतावं लागलं. परत आल्यावर त्यांनी काही नोकऱ्या करून पहिल्या, पण यश मिळवण्यासाठी त्यांच्या मनात काहीतरी मोठं करण्याची इच्छा होती. काही काळ भारतात राहिल्यानंतर त्यांनी दुबईला जाण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांना दुबईत बांधकाम उद्योगात मोठी संधी दिसत होती.
दुबईत ‘डॅन्यूब ग्रुप’ची स्थापना
१९९३ मध्ये दुबईला गेल्यावर रिझवान साजन यांनी ‘डॅन्यूब’ नावाची ट्रेडिंग फर्म सुरू केली. हि कंपनी कुवेतमधून बांधकाम साहित्य खरेदी करायची आणि दुबईमध्ये त्याची विक्री करायची. दुबईमध्ये बांधकाम उद्योगाची प्रचंड वाढ होत होती, आणि त्यामुळे त्यांच्या व्यवसायाला जोरदार प्रतिसाद मिळाला. साजन यांच्या सर्जनशील स्वभावामुळे आणि मेहनतीमुळे ‘डॅन्यूब’ ने अवघ्या काही वर्षांतच मोठं यश मिळवलं.
१९९९ पर्यंत ‘डॅन्यूब’ चा वार्षिक महसूल १६ कोटी रुपये झाला होता, आणि ते १ कोटी रुपयांचा नफा मिळवत होते. पण साजन इथेच थांबले नाहीत. त्यांनी बांधकाम साहित्याबरोबरच गृहसजावट, सॅनिटरीवेअर, इलेक्ट्रिकल उपकरणे यांसारख्या विविध क्षेत्रांत विस्तार केला.
रिअल इस्टेटमध्ये पाऊल
२००८ मध्ये जागतिक आर्थिक संकट आलं , पण साजन यांच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही उलट त्यांनी आपला व्यवसाय वाढवण्याचं ठरवलं आणि २०१४ मध्ये ‘डॅन्यूब प्रॉपर्टीज’ नावाची रिअल इस्टेट कंपनी लाँच केली. त्यांचा उद्देश मध्यमवर्गीयांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचा होता. ‘डॅन्यूब प्रॉपर्टीज’ ने बाजारात एक क्रांतिकारी योजना आणली — “1% मासिक पेमेंट योजना” या योजनेत खरेदीदारांना घर खरेदीसाठी फक्त 1% रक्कम दरमहा भरण्याची मुभा होती आणि त्यांना घरमालकीचा हक्क मिळत होता.
या योजनेने घर खरेदीदारांसाठी घरमालकीचा मार्ग सोपा केला आणि अल्पावधीतच ‘डॅन्यूब प्रॉपर्टीजचं नाव बाजारात लोकप्रिय झालं. या योजनेमुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळाले आणि २०१६ पर्यंत ‘डॅन्यूब’चा वार्षिक महसूल ९००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. साजन यांनी रिअल इस्टेटमध्ये आपले स्थान मजबुत केलं आणि आज ‘डॅन्यूब ग्रुप’ १६,७०९ कोटी रुपयांचा वार्षिक महसूल मिळवणारी कंपनी आहे. रिझवान साजन यांनी आपल्या अपार मेहनत आणि हुशारीच्या जोरावर ‘डॅन्यूब’ला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं आणि त्यांची उपस्थिती जगभरातील ३० पेक्षा जास्त देशांत आहे.
रिझवान साजन यांची कहाणी ही एका सामान्य माणसाच्या असामान्य संघर्षाची आणि यशाची कहाणी आहे.
मुंबईच्या झोपडपट्टीतून सुरु झालेला हा प्रवास दुबईतील यशाच्या शिखरापर्यंत पोहोचला. त्यांनी कठीण परिस्थितीतही हार न मानता स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं. त्यांच्या जिद्दीने, मेहनतीने बुद्धिमत्तेमुळे ते आज जागतिक स्तरावर यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातात .
आयुष्य हे एक न संपणारं युद्ध आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आज कोणत्याही क्षेत्रात जा तिथे स्पर्धा आहे, कष्ट आहे, मेहनत आहे. संघर्षाविना सहज मिळतील अशा खूप कमी गोष्टी राहिल्यात. आज कष्टाशिवाय पर्याय नाही. चिकाटी आणि संयम आत्ताच्या तरुण पिढीमध्ये कमी असल्याकारणाने उतावळेपणात झटपट श्रीमंत व्हावे असे त्यांना वाटत असते. लॉटरी, मटका, जुगार अशा सवयींमुळे अनेक तरुणांचं अक्षरशः संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं.
घरबसल्या लाखो-करोडो कमवा, तुमचे पैसे दुप्पट करा, नेटवर्क मार्केटिंग मधून करोडपती व्हा अशा अनेक फसव्या जाहिराती दररोज वर्तमानपत्रांमध्ये झळकत असतात. अशा झटपट आणि क्षणात श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी तरुण वर्ग फसतो आणि बळी पडतो. शेवटी अपयश आणि निराशा वाट्याला येते. मला कोणीतरी गॉडफादर भेटेल, श्रीमंत बनण्याची एखादी मोठी संधी चालून येईल किंवा देवाचा साक्षात्कार होईल अशी आपण अपेक्षा धरुन बसतो. अचानक राजयोग येऊन माझ्या आयुष्याला एका दिवसात कलाटणी मिळेल, माझं आयुष्य बदलून जाईल असं बहुतेकांना वाटत असतं. प्रयत्न, चिकाटी, परिश्रम, कष्ट, संघर्ष करण्याऐवजी सगळं सहज व्हावं, सहज मिळावं असं वाटत असतं. मात्र यशाला शॉर्टकट नसतो आणि शॉर्टकटने मिळालेलं यश हे शाश्वत देखील नसतं. अचानक एखादी संधी चालून येईल किंवा कोणीतरी आपल्या मदतीला येईल अशी आशा वाटणे हे स्वतःच्याच नाकर्तेपणाचे सर्वात मोठे लक्षण आहे.
जेव्हा आपला स्वतःचा स्वतःच्याच सामर्थ्यावर विश्वास नसतो तेव्हा अशा प्रकारच्या निरर्थक अपेक्षा आपण धरून राहतो. मित्रांनो तुम्हाला आयुष्यात जे काही मिळवायचे आहे, जे कोणते ध्येय साध्य करायचे आहे ते मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःला रणांगणात उतरावं लागेल, स्वतः झगडावं लागेल. आपल्या प्रत्येकाच्या अस्तित्वाचं काही ना काही कारण आहे, ते कारण आपल्याला शोधायचंय आणि त्या कारणाच्या पूर्ततेसाठी काम करायचंय. यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो त्यासाठी मेहनतीचा यज्ञ प्रत्येकाला पेटवावाच लागतो. शॉर्टकटने मिळालेल्या यशानं तुम्ही जितके लवकर वर जाता, तितक्याच लवकर तुम्ही खाली देखील येता. थ्री इडीयट्स मध्ये आमिर खानने म्हटल्याप्रमाणे “सक्सेस के पीछे मत भागो, मेहनत इतनी करो की सक्सेस खुद आपके पीछे आयेगी.
Shortcut आणि Smartwork मध्ये काय फरक आहे?
1. Shortcut :
हे काम जलद पूर्ण करण्यासाठी वापरलेले छोटे मार्ग किंवा तात्काळ उपाय असतात.
शॉर्टकट कधी कधी गुणवत्ता किंवा दीर्घकालीन परिणामांवर परिणाम करू शकतो.
शॉर्टकटमध्ये फक्त काम पटकन संपवणे हे उद्दिष्ट असते, त्यामागे ठराविक उद्दिष्ट किंवा हेतू नसतो.
उदाहरण: प्रोजेक्टमध्ये आवश्यक माहिती न वाचता थेट निष्कर्ष लिहिणे.
2. Smart Work :
हे काम चांगल्या पद्धतीने आणि नियोजनबद्ध मार्गाने कमी वेळात पूर्ण करण्याचे तंत्र आहे.
स्मार्ट वर्कमध्ये तंत्रज्ञान आणि कौशल्य वापरून कामाचे नियोजन केले जाते.
दीर्घकालीन यश आणि गुणवत्तेला प्राधान्य दिले जाते.
Shortcut वापरल्याने फक्त तात्पुरते फायदे मिळतात, तर Smart Work दीर्घकालीन आणि शाश्वत यशाकडे नेते.
Smart Work म्हणजे काय?
Smart Work म्हणजे कमी वेळेत अधिक परिणाम साधणे. मेहनत कमी पण ती मेहनत योग्य दिशेने करणे महत्त्वाचे आहे. शॉर्टकट घेताना विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे.
Smart Work कसे करावे?
कामाचे प्राधान्य ठरवा: सर्वात महत्त्वाचे काम आधी पूर्ण करा, त्याला सुरुवातीला प्राधान्य द्या.
तंत्रज्ञानाचा वापर करा: तंत्रज्ञानाचा वापर करून कामे सोपी करा. उदा. ऑटोमेशन साधने.
वेळेचे नियोजन: कामाचे छोटे भाग करा आणि त्यासाठी वेळेची मर्यादा ठरवा.
काम सोपवा: आवश्यकतेनुसार इतरांना काम सोपवा.
नवीन कौशल्ये शिकत रहा: नवीन तंत्र आणि पद्धती शिकून स्वतःला कायम अपडेट ठेवा
यामुळे तुम्ही शॉर्टकट घेत असतानाही अधिक परिणामकारकपणे आणि हुशारीने काम करू शकाल.
यश मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी :
धैर्य आणि सातत्य: प्रत्येक टप्प्यावर मेहनत आणि सातत्य ठेवणे.
योग्य नियोजन: कोणतेही काम व्यवस्थित योजना बनवून करणे.
समर्पण: यशासाठी तुमच्याकडे ठाम ध्येय असणे आणि त्यासाठी निरंतर प्रयत्न करणे.
शिकण्याची तयारी: चुका झाल्यावर त्यातून शिकणे आणि स्वतःला सुधारण्याची तयारी ठेवणे.
यश मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही, परंतु शहाणपणाने काम केल्यास योग्य वेळी यश नक्कीच मिळेल. Smart Work हा यश मिळवण्याचा मार्ग असू शकतो; पण Short Cut नाही.
अलिकडच्या काळात शेती क्षेत्रात सातत्यानं बदल होत आहेत. अनेक तरुण करिअर म्हणून देखील शेतीकडे पाहू लागले आहेत. बरेचसे शिक्षित तरुण आधुनिक शेतीची माहिती घेऊन शेतीकडे वळत आहेत व पारंपरिक शेतीपेक्षा कित्येक पटींनी अधिक उत्पन्न घेत आहेत. राजस्थानच्या जयपूरमध्ये राहणाऱ्या ऋतुराज शर्मा या 33 वर्षाच्या तरुणाने देखील शेतीत नवनवीन प्रयोग केले आहेत. शेतीच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधत या तरुणाने करोडो रुपयांची Zettafarms नावाची कंपनी स्थापन केली आहे.
गुडगावमध्ये ही कंपनी असून कॉर्पोरेट शेतीमध्ये कार्यरत आहे. कंपनी भाडेतत्त्वावर जमीन घेते आणि त्यात धान्य, फळं आणि भाजीपाला पिकवते. या कंपनीचे संस्थापक ऋतुराज शर्मा यांनी B.Tech आणि MBA केल्यानंतर नोकरीऐवजी स्वत:चं Startup सुरू केलं. कंपनीचा उद्देश शेती अधिक फायदेशीर बनवणे आणि शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे आहे. शेतकऱ्यांच्या तांत्रिक आणि आर्थिक समस्या कमी करून आधुनिक शेती पद्धतीचा वापर करून शेतीचे उत्पादन अधिक वाढवणे हा कंपनीचा मुख्य उद्देश आहे
Zettafarms चे काम कसे चालते?
Zetta Farms शेतीला एका व्यावसायिक कंपनी प्रमाणे चालवते. एका कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे फायनान्स, ऑपरेशन्स, IT अशी सर्व खाती या कंपनीत देखील आहेत. मोठ्या प्रमाणावर शेतजमीन भाडेतत्वावर घेऊन सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्यावर शेती केली जाते. कुठले पीक किती प्रमाणात घ्यावे. कुठल्या पिकाला अधिक भाव मिळेल या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच पिके घेतली जातात. शेती करण्यासाठी कंपनीने शेतकऱ्यांनाच नोकरीवर ठेवले आहे, ज्याच्या बदल्यात त्यांना प्रत्येक महिन्याला ठराविक पगार मिळतो. कंपनी कायदेशीर असल्यामुळे शेतकऱ्यांचा PF देखील जमा होतो. याशिवाय कंपनी शेतकऱ्यांना मोफत इन्शुरन्स देखील देते. आज रोजी कंपनीमध्ये जवळपास २९०० कर्मचारी काम करतात.
Zettafarms ही कंपनी करारावर किंवा भाडेतत्त्वावर शेती करते. ज्यामध्ये ते किमान 50 एकर जमीन एका व्यक्तीकडून आणि 100 एकर जमीन एका गटाकडून भाडेतत्त्वावर घेतात. त्यानंतर त्या जमिनीवर ते शेती करतात. झेटाफार्म्स सध्या 15 राज्यांमध्ये 20 हजार एकर जमिनीवर शेती करत असून ६० पेक्षा जास्त पिकांचे उत्पादन घेते. पिकांमध्ये ते गहू, हरभरा, धान, कडधान्ये, भाजीपाला, फळे, चहा आणि कॉफीच्या मळ्यासह सर्व प्रकारची शेती केली जाते.
ऋतुराजने शेती हा यशस्वी व्यवसाय कसा बनवला?
ऋतुराज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतीमध्ये व्यवसाय, अर्थशास्त्र, गणित आणि विज्ञान यांचा समावेश केला, तर तो कोणत्याही परिस्थितीत फायदेशीर व्यवसाय आहे. या विचाराने ऋतुराजने शेतीमध्ये पाऊल टाकले. सुरुवातीला ऋतुराजने फक्त 2 एकर शेती करायला सुरूवात केली. हळूहळू भाडेतत्त्वावर आणि करारावर जमीन घेऊन व्यवसाय वाढवायला सुरुवात केली. ऋतुराजच्या कंपनीला पहिल्या वर्षी फक्त 1 लाख रुपयांचा नफा झाला, पण नंतर त्यांनी झपाट्याने काम वाढवले.
Zettafarms चे यशाचे रहस्य काय?
एका ठिकाणी केवळ एकाच पिकाची शेती हानीकारक असू शकते. या विचारसरणीवर काम करत Zettafarms हे पीक विविधतेवर काम करते. ते वेगवेगळ्या भागात विविध प्रकारची शेती करतात. शेतीसाठी ते नवीन तंत्रज्ञान वापरतात ज्यामध्ये ते माती परीक्षणापासून इतर गोष्टींपर्यंत आवश्यक माहिती गोळा करतात. तंत्रज्ञानामध्ये, ते हवामान apps आणि क्रॉप मॉनिटरिंगसह विविध प्रकारच्या माहितीचे विश्लेषण वापरतात. झेटाफार्म्स गरजेनुसार सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करतात, कुठे ठिबक सिंचनाची गरज भासल्यास तिथेही तेच काम केले जाते. याशिवाय कुठे पाणी कमी असल्यास कमी पाण्यात पिके घेण्याच्या नियोजनावर काम केलं जातं
ते संसाधनांचा योग्य वापर करतात. ज्यामुळं उत्पादन वाढते आणि नफाही वाढतो. पीक विविधीकरणाव्यतिरिक्त ते Risk Management वर देखील काम करतात.
औषधे, खते किंवा किटकनाशके वापरताना ते कीटक व्यवस्थापनाच्या पद्धती देखील अवलंबतात. ज्यामुळं खर्च कमी होतो आणि शेतीमध्ये कमी रसायने वापरली जातात.
भविष्यातील वाटचाल :
ऋतुराज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतीला ते एक यशस्वी व्यवसाय म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या व्यवसाय मॉडेलद्वारे ते लोकांना सांगू इच्छित आहेत की, शेतीतूनही करोडोंची कमाई केली जाऊ शकते. आयटी, फायनान्स आणि इतर क्षेत्रात काम करणे ज्याप्रमाणे लोक अभिमानाची गोष्ट मानतात, त्याचप्रमाणे लोकांना शेती आणि शेतकऱ्यांबद्दल आदराची भावना निर्माण झाली पाहिजे. 2030 पर्यंत 50 हजार एकरांवर शेती करण्याचे ऋतुराज शर्मा यांचे ध्येय आहे. शेतकरी, जमीनीचे मालक, स्टार्टअप्स, शेती पूरक व्यवसाय आणि शेती उपकरणे पुरवठादार यांना जोडणारे कृषी अर्थव्यवस्थेचे केंद्र बनून झेट्टा फार्म्स कृषी क्षेत्रात स्वतःच्या कार्याने बहुमूल्य योगदान देत आहेत.
मित्रांनो, दानशूर कर्ण आजही जगभरातील सर्वात महान परोपकारी म्हणून ओळखला जातो. असे म्हणतात की सकाळच्या आंघोळीनंतर कर्णाकडे जे काही मागितले जायचे, तो ते आनंदाने देत असे. त्याच्या या उदार स्वभावामुळे तो इतिहासात अजरामर झाला आहे. मात्र, आजही काही व्यक्ती अशा आहेत ज्या दानधर्म करताना कधीही मागेपुढे पाहत नाहीत. असाच एक दूरदर्शी भारतीय उद्योगपती, ज्यांचा प्रवास सामान्य परिस्थितीतून सुरू होऊन उत्तुंग यशापर्यंत पोहोचण्यापर्यंतचा आहे. ते केवळ कमवलेल्या संपत्तीमुळेच ओळखले जात नाहीत, तर समाजसेवा आणि मानवतेच्या बांधिलकीमुळेही त्यांची ख्याती आहे.
आम्ही बोलत आहोत श्रीराम फायनान्स ग्रुपचे संस्थापक आर. त्यागराजन यांच्याबद्दल. आपल्या जीवनाबद्दल अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या आर. त्यागराजन यांची ही कथा यासाठी विशेष आहे की, जगातील अनेक मोठे उद्योगपती आपल्या संपत्तीच्या जोरावर अब्जावधींचे इमले बांधत असताना, त्यागराजन यांनी जवळपास ६ हजार कोटींची संपत्ती आपल्या कर्मचाऱ्यांना दान करून जगाला एक नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या जीवनप्रवासावर एक नजर फिरवूया.
कोण आहेत आर. त्यागराजन?
त्यागराजन यांचा जन्म २५ ऑगस्ट १९३७ मध्ये चेन्नईमधील (तत्कालीन मद्रास) एका समृद्ध शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी कोलकत्ता येथून भारतीय सांख्यिकी संस्थेतून गणितात पदव्युत्तर पदवी आणि गणितीय सांख्यिकीमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. 1961 साली त्यांनी न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड या सामान्य विमा कंपनीत प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. आयुष्याची जवळ जवळ वीस वर्षं त्यांनी वेगवेगळ्या संस्थामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले.
1974 मध्ये,वयाच्या ३७ व्या वर्षी त्यांनी आपल्या काही मित्रांसह सुरुवातीला श्रीराम चिट्स या व्यावसायिक वित्तपुरवठा व्यवसायाची स्थापना केली, पण नंतर त्यांनी कर्ज आणि विम्याच्या दिशेने प्रवास सुरु केला. त्यागराजन यांनी कधीच धाडस आणि नवकल्पना यांची साथ सोडली नाही. त्यांच्या नेतृत्वाखालील श्रीराम ग्रुपने आर्थिक सेवा क्षेत्रात नवीन संधी ओळखून गुंतवणुकीचे नवीन मार्ग शोधले. यामुळे कंपनीच्या व्यवसायात सातत्याने वृद्धी होत राहिली. श्रीराम समूहात आजच्या घडीला 30 हून अधिक कंपन्या आहेत. त्यातील काहींनी शेअर बाजारात मोठा पल्ला गाठला. आजमितीला श्रीराम फायनान्स लिमिटेडचे बाजारातील भांडवल 8.5 अब्ज डॉलर आहे.
खराब क्रेडीट स्कोर असलेल्यांना दिले कर्ज
मुख्यतः बॅंका अशा लोकांना कर्ज देण्यास मनाई करतात ज्यांचा क्रेडिट इतिहास खराब असतो किंवा नियमित उत्पन्न नसतं. पण त्यागराजन यांनी कुठलाही CIBIL (Credit Information Bureau India Limited) चेक न करता या विशिष्ट लोकांना कर्ज प्रदान केलं, एका मुलाखतीत जेव्हा त्यांना त्यांच्या या धोरणावर प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी एक महत्वपूर्ण दृष्टिकोन व्यक्त केला. त्यांनी स्पष्ट केले की, खराब क्रेडिट इतिहास किंवा नियमित उत्पन्न नसलेल्या व्यक्तींना कर्ज देणे जितके धोक्याचे मानले जाते, तितके ते धोकादायक नाही. या मुद्द्याचा सखोल अभ्यास करून त्यांनी फायनान्स क्षेत्रात प्रवेश केला आणि अशा लोकांना कर्ज देणे सामान्य बाब आहे, असं त्यांनी सिद्ध करून दाखवलं.
त्यांच्या करिअरची सुरुवात एका सामान्य कर्मचाऱ्याच्या भूमिकेत झाली होती आणि फायनान्स क्षेत्रात त्यांच्या दीर्घकालीन अनुभवाने आणि शिक्षणाने त्यांना कर्ज देण्याच्या धोरणावर एक नवा दृष्टिकोन त्यांनी फायनान्स क्षेत्राला प्रदान केला, ज्यामुळे नंतर या व्यवसायातील धोरण अधिक सुसंगत व प्रभावी बनण्यास मदत झाली. त्यांचे नेतृत्व हे कर्मचार्यांसाठी प्रेरणादायी होते. त्यांनी आपल्या टीमला सदैव प्रोत्साहन दिले. ‘सामान्य माणूस असामान्य गोष्टी करू शकतो’ हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये ६ हजार कोटी रुपये केले दान
त्यागराजन यांनी आपली संपूर्ण संपत्ती कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये समान प्रमाणात वाटून दिली आहे. ६२१० कोटी रुपयांची एकूण संपत्ती कर्मचाऱ्यांमध्ये वाटून देत, त्यांनी फक्त स्वतःजवळ ५ हजार डॉलर्स, घर आणि कार ठेवली होती. त्यांच्या या निर्णयामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये अत्यंत आनंद आणि प्रेरणा निर्माण झाली.
आर त्यागराजन यांना २०१३ मध्ये भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मभूषण प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या कामामुळे, भारतातील गरिबांना ट्रॅक्टर आणि इतर वाहने खरेदी करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणारे श्रीराम फायनान्स एक प्रमुख नाव बनले आहे.
व्यक्तिगत जीवन
हजारो कोटींची संपत्ती असलेले आर. त्यागराजन हे अत्यंत साधे जीवन जगतात. ते स्वतःकडे मोबाईल फोन ही ठेवत नाहीत, कारण त्यांना लोकांशी प्रत्यक्ष कनेक्ट राहायला आवडते. मोबाईल हा अनावश्यक वेळ खातो असं ते म्हणत असतात. “या उद्योजकाचा साधेपणा आणि जमिनीशी असलेली नाळ त्यांच्याशी संवाद साधताच लक्षात येते. त्यांनी आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कंपनीच्या व्यवस्थापन किंवा नेतृत्वाच्या पदावर स्थान दिले नाही. त्यांचा मोठा मुलगा टी. शिवरामन हा एक यशस्वी इंजिनिअर आहे, तर धाकटा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट असून, श्रीराम ग्रुपमध्ये एक सामान्य कर्मचारी म्हणून काम करतो. कुटुंबाचा व्यवसायात हस्तक्षेप नको म्हणून त्यांनी आपली मुल्ये ठामपणे पाळली आहेत.
आर. त्यागराजन हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात जी विनम्रता आणि साधेपणा आहे, ती आपल्या सर्वांसाठी एक आदर्श आहे.
एका ठराविक वयानंतर प्रत्येकाला जीवनात आर्थिक स्थैर्य अपेक्षित असतं. मग आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक जण हे स्थैर्य प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या संधी शोधत असतो. कधीकधी या संधी आपल्या आवडीच्या क्षेत्रातल्या असतात, तर कधीकधी त्यातून कितपत उत्पन्न मिळतं यावर अवलंबून असतात. कुठेतरी समाधान हा भाग या प्रवासामध्ये दुय्यम स्थानी ठेवला जातो; परंतु स्वतःचं करिअर घडवणं याला प्राथमिकता देणं हे देखील काही चुकीचं नाही..
आपापल्या परीने प्रत्येक जण आपल्याला जमेल तसं परिस्थितीचा विचार करून, उपलब्ध संधींचा विचार करून, घरातून मिळणाऱ्या आर्थिक पाठबळाचा विचार करून स्वतःसाठी एखादं करिअर निवडतो आणि त्यामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी, घडविण्यासाठी प्रयत्न करत असतो. या सबंध करिअरच्या प्रवासात बऱ्यापैकी पिढी ही शिक्षण चालू असताना मला शिक्षण झाल्यावर व्यवसाय करायचा आहे, असे म्हणत नाही; तर एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी घ्यायची आणि आयुष्यात स्थिर व्हायचं असं बऱ्यापैकी जणांचं म्हणणं असतं.
प्रत्येक व्यक्तीची जडणघडण ही त्या व्यक्तीला लाभणारे सामाजिक वातावरण, सहवासात येणारी माणसे, घेतलेले शिक्षण, वाचलेली पुस्तके, ऐकलेली भाषणे व चर्चा, आयुष्यात आलेले प्रसंग व या सर्व घटनांना त्या व्यक्तीने दिलेला प्रतिसाद यांच्याद्वारे झालेली असते त्यामुळे प्रत्येकाचे वेगळे विचार, वेगळे व्यक्तिमत्व आणि प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा व्यक्तीपरत्वे बदललेला असतो.
मग या दृष्टिकोनामध्ये नोकरीच्या ऐवजी सुरुवातीपासूनच आपल्याला व्यवसायाच करायचा आहे आणि तो का करावा? ही मानसिकता मनाशी पक्की होणं गरजेचं असतं, याच विषयावर आज आपण बोलणार आहोत की व्यवसायच का ?..
आणि नोकरी का नको ?
खरंतर सर्वात आधी, मला कुठेतरी माझी फाईल हातात घेऊन कंपन्यांची दारं भटकत नोकरी मागायची नाही; तर चार लोकांना माझ्या माध्यमातून नोकरी देऊन त्या देणाऱ्यांच्या रांगेत मला यायचं आहे, ही भावना मनाशी पक्की होणं ही खूप प्राथमिक पायरी आहे. कोणताही व्यावसायिक हा आधी त्याच्या मनात उद्योजक म्हणून तयार झालेला असतो, मगच तो जगाच्या समोर त्याचा उद्योग, व्यवसाय आणू शकतो.
व्यवसायच का ?
अतीव समाधान:
खरंतर जेव्हा आपण कोणतातरी व्यवसाय करतो त्यावेळी तो व्यवसाय म्हणजे लोकांच्या कोणत्यातरी समस्येचं समाधान असतं. लोकांच्या एखाद्या प्रश्नावर आपण उत्तर शोधलेलं असतं. त्यामुळे कोणाचं तरी जगणं आपल्या काहीतरी करण्यातून सुखकर होणं हे समाधान कोणा दुसऱ्यासाठी आठ तासाची नोकरी करून आणि नऊ ते पाचच्या साच्यात स्वतःला बांधून ठेवून कधीच मिळणार नाही.
आर्थिक सुबत्ता:
असं म्हटलं जातं की पैसा हे सर्वस्व नाही, पण आजच्या काळात पैशाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही हेही तितकंच खरं आहे. पैसा हे नक्कीच अंतिम साध्य नाही; परंतु आपल्या जीवनाचं अंतिम साध्य साधण्यासाठी पैसा हे नक्कीच एक उत्तम आणि आवश्यक साधन आहे. कुठंतरी नोकरी करत असताना एका ठराविक Limit पर्यंत आपण कमावू शकतो, पगार घेऊ शकतो परंतु एक व्यावसायिक असताना आपल्या उत्पन्नाला कोणतीच मर्यादा राहत नाही. आपण जितकं काम करू, जितके कष्ट करू, जितका स्वतःच्या व्यवसायाला वेळ देऊ, तितकं आपलं उत्पन्न वाढणार यात शंका नाही. आपण आपल्या कुटुंबाच्या गरजा, आपली इतर अपूर्ण स्वप्नं या आर्थिक उत्पन्नातून नक्कीच पूर्ण करू शकतो.
स्वतःसाठी वेळ :
आपण जर नोकरी करत असू तर आपल्या नोकरीच्या वेळी आपल्याला त्या ठिकाणी पोहोचणं हे बंधनकारक असतं. आपली कामाची वेळ संपल्याच्यानंतरच आपण तिथून बाहेर पडू शकतो; परंतु व्यवसायात तुम्ही स्वतः मालक असता, तुमच्यासाठी लोक काम करत असतात, त्यामुळे व्यावसायिक कामांचं योग्य नियोजन करून आपल्याला स्वतःला व्यवसायात किती वेळ द्यायचा आहे, स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यासाठी कोणता वेळ राखीव ठेवायचा आहे हे आपण स्वतः ठरवू शकतो.
Risk Management:
जेव्हा तुम्ही एक व्यवसायिक असता तेव्हा रोज नवनवीन आव्हानांना, अडचणींना तुम्हाला तोंड द्यावं लागतं या सर्व समस्या व्यवसायाचे मालक म्हणून तुम्हाला स्वतः त्यात लक्ष घालून सोडवाव्या लागतात. अशावेळी कधी कोणता निर्णय घ्यायचा? काय करायचं? हे सगळं आपल्याला ठरवावं लागतं. तणावपूर्ण परिस्थिती आपल्याला आपल्या पद्धतीनेच हाताळावी लागते. अशावेळी वेगवेगळ्या अनुभवातून शिकत या अडचणींचा कसा सामना करायचा, अवघड परिस्थिती कशी हाताळायची यामुळे नकळत आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो आणि अप्रत्यक्षरित्या Risk Management चं महत्त्वाचं तंत्र आपल्याला अवगत होतं.
मग आता व्यवसायाच्या बाबतीत एवढ्या सगळ्या सकारात्मक बाबी असतील तर उशीर कशाला ? आजच आपल्या उद्योजकतेच्या प्रवासाला सुरुवात करा. डोक्यात असणाऱ्या कल्पनेला चांगल्या मार्गदर्शकासमोर मांडा, अनुभवी लोकांचे सल्ले घ्या आणि फक्त सुरुवात करा.. समोरची वाट पावलागणिक आपोआप दिसत जाईल.
कमी खर्चात व्यवसाय सुरू करणं हे अनेकांच्या मनात असतं, परंतु फक्त काहीच लोक अशी हिम्मत करून पुढे पाऊल टाकतात. यासाठी योग्य नियोजन, कौशल्य आणि मेहनत या तिन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. जेव्हा आपण कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करण्याचं ठरवतो, तेव्हा आपल्याला प्रत्येक पावलावर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कमी भांडवलात यशस्वी व्यवसाय उभारण्यासाठी कल्पकता आणि जिद्द या गुणांचा समतोल साधावा लागतो.
या लेखात आपण असे दहा व्यवसाय पाहणार आहोत, जे कमी गुंतवणुकीत सुरू करता येतात आणि योग्य व्यवस्थापन केल्यास उत्तम नफा मिळवून देऊ शकतात. या व्यवसाय कल्पना तुम्हाला तुमच्या उद्योजकीय प्रवासाला नवी दिशा देण्यास सहाय्यक ठरतील.
१) फ्रीलान्सिंग
फ्रीलान्सिंगव्यवसाय म्हणजे आपले कौशल्य आणि सेवांसाठी स्वतंत्रपणे काम करण्याचे तंत्र. यात आपल्याला एका निश्चित नोकरीची गरज नसते; आपण विविध कंपन्यांसाठी, क्लायंट्ससाठी किंवा व्यक्तींसाठी प्रोजेक्ट्स पूर्ण करतो. फ्रीलांसर म्हणून काम करताना, आपल्याला कामाचे वेळापत्रक आणि कामाचे प्रकार स्वतः ठरवता येतात, ज्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य मिळते.
तंत्रज्ञानाच्या युगात फ्रीलान्सिंग ही एक मोठी संधी आहे. लेखन, ग्राफिक डिझाईन, डिजिटल मार्केटिंग, वेब डेव्हलपमेंट यांसारखी कौशल्ये वापरून आपण फ्रीलान्सिंगद्वारे पैसे कमवू शकतो. यासाठी आपल्याला इंटरनेट कनेक्शन आणि संगणक एवढीच गुंतवणूक लागते.
२) घरगुती पदार्थ विक्री
जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल, तर घरगुती पदार्थ विकणे हा उत्तम व्यवसाय ठरू शकतो. घरच्या घरी पदार्थ तयार करून ते ऑनलाइन किंवा ऑफलाइन विकता येतात. यासाठी कमी खर्चात व्यवसाय सुरू करता येतो.
घरगुती पदार्थ विक्री व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रथम ठरवा की, कोणते पदार्थ विकायचे आहेत; जसे की, चटणी, लोणचं किंवा स्नॅक्स. नंतर FSSAI परवाना मिळवा आणि आवश्यक उपकरणे व कच्चे साहित्य तयार ठेवा. पॅकेजिंग आकर्षक ठेवा आणि उत्पादनांसाठी योग्य किंमत ठरवा. सोशल मीडियावर प्रमोशन करा आणि ऑनलाइन विक्री प्लॅटफॉर्मचा उपयोग करा. सतत गुणवत्ता राखा आणि ग्राहकांच्या फीडबॅकनुसार सुधारणा करा.
३) ऑनलाइन ट्यूशन किंवा क्लासेस
आजकाल ऑनलाइन शिक्षणाची मागणी खूप वाढली आहे. तुमच्या विषयातील कौशल्ये आणि ज्ञानाचा उपयोग करून तुम्ही ऑनलाइन ट्यूशन किंवा कोचिंग क्लासेस घेऊ शकता. यासाठी जास्त खर्च करण्याची गरज नाही.
या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कोणत्या विषयांसाठी ट्युशन द्यायची आहे हे ठरवावे लागेल. यासाठी Zoom, Google Meet सारख्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून डिजिटल मटेरियल तयार करणे आवश्यक आहे. उच्च गुणवत्ता शिक्षण पुरवण्यासाठी सखोल विषयज्ञान आणि नियमित वेळापत्रक तयार करावे. व्यवसाय वाढवण्यासाठी सोशल मीडियावर प्रमोशन करणे, फी स्ट्रक्चर फ्लेक्सिबल ठेवणे, जेणेकरून विद्यार्थ्यांना सोयीनुसार फी भरता येईल, शैक्षणिक क्षेत्रातील नवीन ट्रेंड्सवर आधारित शिक्षण पद्धतीत सुधारणा करणे आणि निरंतर अद्ययावत राहणे आवश्यक आहे. ग्रामीण आणि दुर्गमभागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याची क्षमता असलेल्या या व्यवसायात मोठ्या संधी आहेत.
४) ब्लॉगिंग आणि यूट्यूबिंग
ब्लॉगिंग किंवा यूट्यूबिंग हे व्यवसाय आजच्या काळात लोकप्रिय झाले आहेत, ज्यामुळे अनेक लोक आपल्या आवडीनुसार आणि कौशल्यानुसार कमाई करू शकतात. ब्लॉगिंगमध्ये आपल्याला लेखन, माहितीपूर्ण पोस्ट्स, आणि SEO चा वापर करून आपल्या ब्लॉगची लोकप्रियता वाढवावी लागते, तर यूट्यूबिंगमध्ये व्हिडिओ निर्मिती, संपादन आणि सोशल मीडिया प्रमोशन हे महत्त्वाचे घटक आहेत. दोन्ही व्यवसायांमध्ये सातत्य, दर्जेदार कंटेंट, आणि प्रेक्षकांसोबत उत्तम संवाद आवश्यक असतो. कमी गुंतवणूक आणि स्वातंत्र्यामुळे हे व्यवसाय अनेकांसाठी आकर्षक ठरले आहेत, पण यामध्ये वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी मेहनत आणि चिकाटी लागते.
5) हस्तकला उत्पादन विक्री
हस्तकला उत्पादन विक्री व्यवसाय हा एक कल्पकता, कौशल्य आणि परंपरेचा संगम असलेला व्यवसाय आहे. या व्यवसायात हाताने तयार केलेली विविध प्रकारची कला आणि हस्तकला उत्पादने विकली जातात, ज्यामध्ये काठ्यांवरील नक्षी, धातू, माती, लाकूड आणि वस्त्रांवरील कलाकुसर अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. स्थानिक कारागीरांच्या कौशल्याचा उपयोग करून तयार करण्यात आलेली ही उत्पादने विशिष्ट ग्राहक वर्गाला आकर्षित करतात. हस्तकला उत्पादने विक्री व्यवसायातून न केवळ आर्थिक फायदा होतो, तर स्थानिक हस्तकला आणि संस्कृतीचा वारसा जपण्याचेही काम होते.
६) ऑफलाइन किराणा दुकान
छोट्या स्तरावर घरगुती वस्तूंचे दुकान उघडून व्यवसाय सुरू करता येतो. आवश्यक वस्तूंची मागणी नेहमीच असते, त्यामुळे यामध्ये कमी गुंतवणुकीत चांगले उत्पन्न मिळू शकते.ऑफलाईन किराणा दुकान व्यवसाय हा एक पारंपारिक पण स्थिर व्यवसाय आहे, जो आपल्या स्थानिक समुदायातील आवश्यक वस्तूंचा पुरवठा करतो. ग्राहकांना दररोजच्या जीवनातील वस्तू सहज उपलब्ध होतात, त्यामुळे स्थानिक किराणा दुकानांना एक स्थिर ग्राहकवर्ग मिळतो. या व्यवसायात, विविध प्रकारच्या वस्तू जसे की अन्नपदार्थ, घरेलू आवश्यक वस्तूंचा समावेश असतो. दुकानातील मर्चेंडाईझिंग, ग्राहक सेवा आणि स्थानिक बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन व्यवसायाचा विकास करणे आवश्यक आहे. या व्यवसायातील यशासाठी, उच्च गुणवत्तेच्या उत्पादनांची निवडकता, योग्य स्टॉक व्यवस्थापन, आणि ग्राहकांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
७) फोटोग्राफी
जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड आणि कौशल्ये असतील, तर हाही एक चांगला व्यवसाय आहे. सुरुवातीला एका चांगल्या कॅमेरासोबत ही सेवा देऊ शकता. इव्हेंट फोटोग्राफी, प्रोडक्ट फोटोग्राफी किंवा पोर्ट्रेट फोटोग्राफीद्वारे तुम्ही उत्पन्न मिळवू शकता. फोटोग्राफी व्यवसाय आपल्या क्रिएटिव्ह आणि तांत्रिक कौशल्यांचा उपयोग करून सुंदर आणि संस्मरणीय चित्रे टिपण्यासाठी समर्पित आहे. या व्यवसायात विविध प्रकारच्या फोटोग्राफी सेवांचा समावेश होतो, जसे की; वेडिंग फोटोग्राफी, पोर्ट्रेट फोटोग्राफी, कमर्शियल फोटोग्राफी आणि इव्हेंट फोटोग्राफी. प्रत्येक ग्राहकाच्या आवश्यकता आणि अपेक्षांनुसार, फोटोग्राफर विविध शैली आणि तंत्रांचा वापर करून त्यांच्या दृश्यांना प्रभावशाली आणि अनोख्या स्वरूपात टिपण्याचा प्रयत्न करतो. फोटोग्राफीच्या व्यवसायात क्रिएटिव्हिटी, अचूकता, आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान महत्वाचे असते, जे क्लायंट्सना अत्यंत उत्कृष्ट परिणाम देण्यास मदत करते.
८) ड्रॉपशीपिंग
ई-कॉमर्समध्ये ड्रॉपशीपिंग हा कमी खर्चात केला जाणारा व्यवसाय आहे. यात तुम्ही कोणताही स्टॉक न ठेवता थेट सप्लायरकडून ग्राहकांपर्यंत उत्पादने पोचवता. यासाठी तुम्हाला ऑनलाइन स्टोअर आणि मार्केटिंगवर भर द्यावा लागतो. ड्रॉपशिपिंग व्यवसाय म्हणजे एक प्रकारची रिटेल पद्धत आहे, जिथे विक्रेते उत्पादनांचा स्टॉक ठेवत नाहीत. ग्राहक ऑर्डर दिल्यावर, विक्रेता थेट उत्पादक किंवा होलसेलरकडून उत्पादन खरेदी करतो आणि ते ग्राहकाच्या पत्त्यावर पाठवतो. यामुळे विक्रेत्याला मोठ्या प्रमाणावर स्टॉक खरेदीची आवश्यकता नसते. .
९) फ्लॉवर बुकिंग आणि डेकोरेशन
फुलांचे बुके तयार करणे, कार्यक्रमांसाठी डेकोरेशन करणे ही कामे कमी गुंतवणुकीत करता येतात. यासाठी सुरुवातीला काही मटेरियल आणि सजावटीच्या वस्तूंची आवश्यकता असते. हा व्यवसाय विशेषतः विवाह, समारंभ, आणि इतर खास प्रसंगांसाठी आकर्षक आणि कलेची भव्यता आणण्यासाठी प्रसिद्ध आहे. या व्यवसायात, विविध प्रकारच्या फुलांचे रंग आणि प्रकार निवडून ग्राहकांच्या अपेक्षांनुसार सुंदर आणि आकर्षक डेकोरेशन तयार केली जाते. या सेवेत फुलांच्या बुकिंगची प्रक्रिया, स्थानिक फुलांची उपलब्धता, कस्टमायझेशनसाठी विविध पर्याय, तसेच देखावे सजवण्यासाठी आवश्यक सामग्री आणि व्यावसायिक अनुभव यांचा समावेश असतो. ग्राहकांच्या खास इच्छांना अनुरूप असलेल्या डेकोरेशनच्या योजना तयार करून, या व्यवसायाने मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे.
१०) फूड स्टॉल व्यवसाय
फूड स्टॉल व्यवसाय म्हणजे कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारा एक उपयुक्त आणि फायदेशीर व्यवसाय. यामध्ये, स्ट्रीट फूड, फास्ट फूड आणि स्थानिक चव असलेले पदार्थ विक्रीसाठी ठेवता येतात. व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य ठिकाण, स्वादिष्ट पदार्थ आणि ग्राहकांसोबत उत्तम संवाद या गोष्टींवर भर देणे आवश्यक असते. तसेच, स्वच्छता आणि आकर्षक स्टॉल व्यवस्थापनामुळे ग्राहकांचा विश्वास मिळवता येतो. मार्केटिंगसाठी सोशल मीडियाचा वापर करून व्यवसायाला अधिक प्रसिद्धी देता येते, ज्यामुळे व्यवसायाची वाढ जलद होऊ शकते.
मित्रांनो, हे होते काही व्यवसाय जे अत्यंत कमी भांडवलात सुरू करता येऊ शकतात. मात्र, कमी खर्चात व्यवसाय सुरू करताना काळजीपूर्वक नियोजन, आपल्या कौशल्यांचा वापर आणि वेळेचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असते. सुरुवातीला लहान स्तरावर व्यवसाय सुरू करून हळूहळू त्याचा विस्तार करता येतो. जर तुम्ही सुद्धा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल, तर आता जास्त विचार न करता लवकर आपल्या व्यवसायाला सुरुवात करा. स्वत:वर विश्वास ठेवा, प्रचंड मेहनतीची तयारी ठेवा आणि यशस्वी उद्योजक बना!