न्यूयॉर्कचे एक छोटे उपनगर. बार्बरा अँकरमन आणि मायकेल कार्प हे एक साधं मध्यम वर्गीय जोडपं तिथे राही. छोटी अपार्टमेण्ट. बार्बरा अप्पर वेस्ट साइड मॅनहॅटनमधल्या कॉलहॉन स्कूलमध्ये सायन्स टीचर आणि मायकेल टीव्ही/फिल्म प्रॉडक्शनमध्ये गुंतलेला. या दोघांना दोन मुलं. त्यातला थोरला डेव्हिड लहानपणापासूनच एकलकोंडा. शाळा संपवून घरी आला की उरलेली अख्खी दुपार आणि संध्याकाळ घरात बसून काढी. खेळायला सोडा, मित्रांशी फोनवर बोलायला, टीव्ही पाहायलासुद्धा आपल्या छोट्या बेडरूम बाहेर म्हणून पडत नसे.
हळूहळू बार्बराला काळजी वाटायला लागली. कसं होणार आपल्या या मुलाचं? अमेरिकेत म्हणजे, मुलानं लोटून घेतलेलं त्याच्या बेडरूमचं दार (त्याला न विचारता) उघडून आत शिरणं खुद्द त्याच्या आई-वडिलांसाठीही निषिद्ध! शेवटी एके दिवशी बार्बराने लेकाला विचारलं, ‘हे असे तासनतास आत बसून तू काय करतोस?’ तो म्हणाला, ‘लॅपटॉप!’ तेव्हा तिला काय ते कळलं. डेव्हिड रात्रंदिवस त्याच्या लॅपटॉपमध्ये बुडूनच गेला होता जणू. खरंतर त्याला शाळेत जाणंसुद्धा नको वाटे. लहानपणी बर्थडे गिफ्ट म्हणून मिळालेल्या लॅपटॉपशी एकट्यानं झगडून त्यानं बर्याच गोष्टी स्वत:च आत्मसात केल्या होत्या. जे समजतं आहे, आवडतं आहे, त्याचा हात धरून पुढे जात राहावं असं त्याला वाटू लागलं होतं. शाळेतल्या भाषा, गणित आणि शास्त्राच्या अभ्यासात त्याचा जीव रमेनासा झाला होता. बार्बरा आपल्या लेकावर लक्ष ठेवून होती. टीनएजर झाल्यावर डेव्हिड जरा खुलला. त्याला मुली आवडायला लागल्या. तो त्यांच्याबरोबर बाहेर जाऊ लागला. पण घरी आला की खोलीचं दार बंद! आणि आतला दिवा रात्रभर जळत!
‘टोस्टीटोज’ नावाच्या प्रसिद्ध अमेरिकन बिस्किटांचे पुड्यावर पुडे संपवीत डेव्हिड पहाटेपर्यंत आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनला चिकटलेला असे. बार्बराला आपल्या लेकाची तडफड समजत होती. शेवटी एका सकाळी डेव्हिडनं बार्बराला सांगितलं, ‘मॉम, मला शाळेत जाऊन वेळ वाया नाही घालवायचा. मी उद्यापासून जाणार नाही.’ बार्बरानं विचारलं, ‘मग काय करशील?’ तो म्हणाला, ‘मला आवडतं ते काम करीन.’ आपण आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा निर्णय घेतो आहोत, हे तेव्हा बार्बराला ठाऊक असणं शक्य नव्हतं, पण तिनं आपल्या मुलावर विश्वास टाकायचं ठरवलं. ती म्हणाली, ‘नको जाऊस शाळेत. तू घरीच कर अभ्यास.’ वयाच्या पंधराव्या वर्षी डेव्हिड ड्रॉप-आऊट झाला, आणि त्यानंतर दोनच वर्षांनी बार्बरा आणि मायकेल यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. एकटीनं दोन टीनएजर मुलांच्या संगोपनाची कसरत बार्बरानं हिमतीनं सुरू केली. तोवर डेव्हिड आसपासच्या छोट्या कंपन्यांच्या वेबसाइट्स डिझाइन करून द्यायला लागला होता. तो एकटाच बाहेर जाई, काम मिळवी आणि एकट्यानंच ते पूर्ण करी. तो झपाटून गेल्यासारखा त्याचं स्वप्न जगू लागला होता. एवढंच फक्त की, त्या स्वप्नात ‘शाळा आणि इतर मुलांसारखा अभ्यास’ या गोष्टींना जागा नव्हती. काय चाललं आहे, हे बार्बराला कळत नव्हतं, पण आपला मुलगा इतर मुलांपेक्षा वेगळा आहे आणि इतरांचं अनुकरण करण्यापेक्षा आपण आपला नवा रस्ता शोधण्यात तो बुडालेला आहे, हे तिला ठाऊक होतं. डेव्हिडनं घरी अभ्यास करून शाळेच्या परीक्षा देणं (होम स्कूलिंग) नाकारलं आणि तो छोट्या (इंटरनेट) स्टार्ट अप कंपन्यांमध्ये कामाला जाऊ लागला.
एके दिवशी त्याला काय वाटलं कुणास ठाऊक, तो म्हणाला, ‘मी जपानला चाललो.’ ’ बार्बरा म्हणाली, ‘तुझ्या आवडीचं काम आहे ना, जरूर जा!’ साठवलेले सगळे पैसे खर्चून त्यानं टोकियोमध्ये एका खोलीचं आगाऊ भाडं भरून टाकलं आणि सॅक पाठीवर मारून निघाला. हा मुलगा घरूनच काम करत असे, त्यामुळे तो कॅलिफोर्नियात नसून जपानमध्ये आहे, हे तो ज्या कंपनीत काम करत होता, त्यांना तब्बल तीन महिन्यांनी कळलं. भरपूर अनुभव कमावून आणि साठवलेले सगळे पैसे खर्च करून डेव्हिड परत आला, तेव्हा त्याच्या खिशात एकूण पंधरा कंपन्यांच्या ऑफर्स होत्या. त्याचं काम सुरू झालं, बार्बरा सांगते, रोज रात्री घरी येताना हा आमच्या अपार्टमेण्टच्या गेटपासूनच जोरात ओरडायला सुरुवात करी, ‘मॉमऽऽऽ यू नो व्हॉट हॅपण्ड टूडे?????’..मग डिनर टेबलवर त्याची बडबड सुरू होई. तो काय म्हणतो, हे मला काहीही कळत नसे, पण तो त्याच्या आवडीचं काहीतरी करतो आहे, हे दिसत असे त्याच्या चेहर्यावर आणि तेवढं पुरेसं होतं माझ्यासाठी.’ पालकांसाठी इंटरनेटवर मेसेज बोर्ड लाँच करणार्या अर्बनबेबी नावाच्या स्टार्ट अपमध्ये डेव्हिडनं भलतीच चमक दाखवली. त्या बदल्यात पगारासोबत त्याला कंपनीचे काही शेअर्स मिळाले. ही कंपनी टेकओव्हर केली गेली तेव्हा जवळचे शेअर्स विकून डेव्हिडनं पैसा उभा केला आणि आपली स्वत:ची स्वतंत्र कंपनी सुरू केली. त्या कंपनीच्या अनेक प्रॉडक्टमधले नावारूपाला आलेले एक म्हणजे ‘टम्बलर’ ही ब्लॉग्ज होस्ट करणारी साइट! हे चालू होतं तोवर पंचविशी उलटली तरी ग्रॅज्युएशन सोडा, साधं हायस्कूलही पूर्ण न केलेल्या आपल्या मुलाचं बरं चाललं आहे, इतपत खात्री बार्बराला वाटत होती. अन पंधरा दिवसांपूर्वी डेव्हिड आनंदानं उड्या मारत घरी आला आणि ओरडून म्हणाला, ‘मॉमऽऽऽ यू नो, व्हॉट हॅपण्ड टूडे?????’ बातमी होतीच तशी! याहू या बलदंड कंपनीनं डेव्हिडचे टम्बलर हे अत्यंत लोकप्रिय पोर्टल विकत घेण्यासाठी तब्बल १.१ बिलियन अमेरिकन डॉलर्स मोजले होते आणि त्यातले २५0 मिलियन डॉलर्स व्यक्तिगत डेव्हिडच्या खिशात पडले होते !!!!!
ही बातमी जाहीर होताच डेव्हिड आणि त्याची मॉम एकदम प्रकाशात आले. ’आय अँम द प्राऊडेस्ट मॉम टूडे’ – न्यूयॉर्क टाईम्स या वर्तमानपत्राला मुलाखत देताना बार्बराला याहून वेगळं काही सुचतच नव्हतं,’’मी काही केलं नाही त्याच्यासाठी.. फक्त त्याला स्वत:ला जे करायचं होतं ते त्याला करू दिलं. त्याच्या वाटेत आले नाही, हेच काय ते माझे कर्तृत्व – बार्बरा पुन:पुन्हा हेच सांगते आहे सगळ्या प्रसारमाध्यमांना. तिचा डेव्हिड सव्वीसावे वर्ष ओलांडता ओलांडता केवळ मिलेनिअर बनला आहे एवढंच नव्हे, तर त्याच्या व्यावसायिक आयुष्यात त्यानं जगाला थक्क करून टाकणारं यशही मिळवलं आहे.
हे नेमकं कसं झालं, हे बार्बराला अजूनही उमगत नाही….!
स्टीव्ह जॉब्सनी २००५ साली स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभात केलेले भाषण प्रचंड गाजले. हे भाषण म्हणजे त्यांच्या प्रेरणादायी आयुष्याचा गोषवारा आहे… त्याचा केलेला मराठी अनुवाद…
जगातल्या सर्वोत्तम गणल्या जाणाऱ्या महाविद्यालयांपैकी एक अशा महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात तुमच्यासोबत बोलायची संधी मला मिळते आहे, हा मी माझा बहुमान समजतो. मी महाविद्यालयीन शिक्षण कधीच पूर्ण करू शकलो नाही. आता सत्य सांगायला हरकत नाही, पण महाविद्यालयीन दीक्षांत समारंभ इतक्या जवळून मी पहिल्यांदा पाहतो आहे.
आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील तीन गोष्टी सांगणार आहे, बस्स. काही प्रचंड कहाणी नाही. फक्त तीन छोट्या गोष्टी…
पहिली गोष्ट आहे ठिपके जुळवण्याच्या संदर्भातली… मी रीड कॉलेजमधून सहा महिन्यांतच बाहेर पडलो होतो, पण त्या आधी मी जवळपास १८ महिने कॉलेजमध्येच ड्रॉप इन म्हणून घुटमळत होतो. मग मी बाहेर पडलो तरी का?
याची सुरुवात खरं तर माझ्या जन्माच्या आधीपासूनची आहे. माझी आई ही एक तरुण, अविवाहित महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती. आणि तिने मला दत्तक द्यायचे ठरवले. तिची फार इच्छा की, मी पदवीधर पालकांकडे दत्तक म्हणून जावे, त्यामुळे अखेर एका वकील दाम्पत्याची त्याकरिता निवड झाली. सारे कसे सुरळीत चालू होते आणि अचानक माझ्या जन्माच्या वेळी त्या दोघांनी ठरवले की त्यांना मुलगी हवी आहे. त्यामुळे वेटिंग लिस्टवर असलेल्या माझ्या आई-बाबांना रात्री अचानक फोन गेला की, ‘‘मुलगा झालाय. तुमची अजूनही त्याला स्वीकारण्याची तयारी आहे का?’’ ते म्हणाले, ‘‘अर्थातच.’’ अर्थात, नंतर माझ्या आईला कळले की माझ्या दत्तक आईने पदवी पूर्ण केली नव्हती आणि वडिलांनी तर शाळेच्या पुढेही मजल मारली नव्हती. तिने मग दत्तक कागदपत्रे साईन करायला नकार दिला. मग मला ‘महाविद्यालयीन शिक्षणापासून दूर ठेवले जाणार नाही’ या आश्वासनावरच तिने कागदांवर सह्या केल्या.
१७ वर्षांनंतर मी खरंच कॉलेजला गेलो. मूर्खासारखे मी स्टॅन्फोर्डसारखे महागडे कॉलेज निवडले आणि माझ्या दत्तक पालकांची मध्यमवर्गीय कमाई माझ्या शिक्षणावरच खर्च होऊ लागली. सहा महिन्यांतच त्याची किंमत मला उमगेनाशी झाली. माझ्या आयुष्यात मला काय करायचे आहे याची सुतराम कल्पना नव्हती आणि कॉलेजचे शिक्षण मला याचे उत्तर शोधण्यात मदत करत नव्हते आणि मी इथे आईबाबांची आयुष्यभराची कमाई उडवण्यात गुंतलो होतो. म्हणून मी कॉलेजमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि सुस्कारा सोडला. अर्थात, त्या वेळी हा छातीत धडकी भरवणारा निर्णय होता. पण आता वाटते की कदाचित हा माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला निर्णय असेल. हा निर्णय पक्का झाल्याक्षणीच मी ज्या वर्गाबाबतीत उत्साही नव्हतो, तिथे जाणे बंद करून टाकले आणि ज्या वर्गामध्ये मला जाण्यात रस होता त्या वर्गाना नियमितपणे जाऊ लागलो.
हे सगळेच काही स्वप्नवत नव्हते. डोर्म मिळायची नाही, म्हणून मित्रांच्या रूम्सवर जमिनीवर झोपावे लागे. कोकच्या रिकाम्या बाटल्या देऊन मी ५ सेंट्स जमा करत असे आणि त्यातून जेवणाची तजवीज करत असे. दर रविवारी ७ मैल चालत जात असे, ‘हरे राम हरे कृष्ण’चे व्यवस्थित जेवण खायला मिळावे म्हणून. पण मला ते आवडत होते. माझी अंत:प्रेरणा आणि माझे कुतूहल यांनी मला जे काही सापडले, ते पुढे आयुष्यात अनमोल ठरले. आता हेच पाहा ना, रीड कॉलेजमध्ये त्यावेळेला बहुधा सर्वोत्तम असे कॅलिग्राफीचे (सुलेखन) वर्ग चालत. संपूर्ण परिसरात प्रत्येक भित्तीपत्रकावर, इतकेच काय अगदी खणांवरदेखील सुंदर कॅलिग्राफी केलेली आढळे. मी तसाही ड्रॉप आऊट होतो आणि मला हे कसे करतात हे जाणून घ्यायचे होते, त्यातच मला माझे नियमित वर्ग करणे जरूरीचे राहिले नव्हते. कॅलिग्राफीच्या वर्गात मी सेरिफ आणि सान्स सेरिफ फॉण्ट्सविषयी शिकलो. त्याच्याच बरोबर दोन अक्षरांमध्ये कीती जागा असावी, अक्षरे सुशोभित कशी करावी याचेही ज्ञान मिळत होते. ते सारेच फार सुंदर, ऐतिहासिक आणि कलात्मकरीत्या हळुवार होते. कदाचित शास्त्राच्या चिमटीत पकडण्यापलीकडले… मी त्याने भारावून गेलो…
या सगळ्याचा माझ्या आयुष्यात दुरान्वयानेही काही प्रत्यक्ष लाभ होईल असं मला स्वप्नातही वाटलं नसतं. पण दहा वर्षांनंतर जेव्हा आम्ही पहिला मॅकीन्टोश कम्प्युटर बनवत होतो, हा सगळा काळ माझ्या मदतीला आला. आम्ही त्या सगळ्याचा वापर मॅकीन्टोशमध्ये केला. सुंदर टायपोग्राफी असलेला तो पहिला कम्प्युटर होता. जर मी महाविद्यालयातून त्या विषयांच्या जंजाळातून बाहेर पडलो नसतो, तर मॅकीन्टोशमध्ये विविध टाईप फेसेस आणि प्रमाणबद्ध फॉन्ट्स दिसले नसते आणि विंडोजवाल्यांनी जर मॅकीन्टोश जसाच्या तसा कॉपी केला नसता, तर आज जगातल्या कुठल्याच पीसीवर ते दिसले नसते. मी महाविद्यालयातून बाहेर पडलो नसतो, तर या कॅलिग्राफीच्या वर्गात कसा पोहोचलो असतो; आणि अर्थात, आज पीसीवर जे सुंदर टाइप फॉन्ट्स दिसतात ते कसे दिसले असते… ‘कनेक्ट द डॉट्स’ अर्थात हे ठिपके जोडणे… आज १० वर्षांनंतर मागे वळून बघताना सोप्पे जाते. तेव्हा हे कळत नव्हते.
पुन्हा. हे ठिपके तुम्ही भविष्यात बघून नाही जोडू शकत. ते फक्त मागे वळून बघताना जोडलेले दिसतात. म्हणूनच ते पुढे जाऊन जोडले जातील, यावर विश्वास ठेवावा लागतो. तुम्हाला कशावर तरी विश्वास ठेवावाच लागतो. तुमचे मन, आतला आवाज, भाग्य, नशीब, कर्म. काहीतरी. या विचार पद्धतीने मला कधीच दगा दिलेला नाही आणि त्यामुळेच माझ्या आयुष्यात बराच बदल घडलेला आहे.
माझी दुसरी गोष्ट आहे प्रेम आणि तोट्याविषयी.
मी फार नशीबवान आहे. मला काय करायला आवडते हे मला फार आधीच उमगले होते. मी २० वर्षांचा असतानाच मी आणि वोझने (स्टीव्ह वॉझनियाक) मिळून घरच्या गॅरेजमध्ये ॲपल कम्प्युटर्सची सुरुवात केली. आम्ही खूप मेहनत केली. दहा वर्षांत गॅरेजमधल्या आम्हा दोघांपासून सुरू झालेली ॲपल २ बिलियन डॉलर्स आणि ४००० कामगारांची कंपनी झाली होती. आम्ही वर्षभरापूर्वीच आमचे सर्वोत्तम काम बाजारात आणले होते. मॅकीन्टोश कम्प्युटर! मी तेव्हा फक्त ३० वर्षांचा होतो. आणि अचानक मी माझ्या कंपनीतून हाकलला गेलो. तुम्ही स्वत: स्थापन केलेल्या कंपनीतून तुम्ही स्वत: हाकलले कसे जाऊ शकता? खरं सांगायचं झालं तर जसं ॲपल वाढत होतं, त्याच्याबरोबर मला गुणी वाटणाऱ्या काही मंडळींना मी नोकरीवर ठेवले. काही वर्षे ठीक गेली, पण नंतर आमच्या दृष्टिकोनात फरक पडू लागले. अखेर भांडणे झालीच… बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी पण त्यांचीच पाठराखण केली. साहिजकच वयाच्या तिसाव्या वर्षी मी अक्षरश: हाकलला गेलो… आणि तेही अतिशय सार्वजनिक पद्धतीने… माझ्या आयुष्याचा जो केंद्रबिंदू होता, तोच गायब झाला. मी उद्ध्वस्त झालो.
काही महिने नक्की काय करावे हेच सुचेना. मला जणू माझ्या आधीच्या कार्यकुशल उद्योजकांचा विश्वासघात केल्यासारखे वाटत राही. जणू आधी धावणाऱ्याने माझ्या हातात दिलेले निशाण मी पाडून बसलो होतो. मी डेव्हिड पेकार्ड, बोब नोईस यांना भेटलो. आणि अशा पद्धतीने घोळ घातल्याबद्दल त्यांची माफी मागितली. मी एक मोठे सार्वजनिक अपयश बनलो होतो आणि सिलिकॉन व्हॅलीतून पळून जाण्याचे विचार मनात घोळू लागले होते, पण हळूहळू एक गोष्ट जाणवायला लागली. माझे अजूनही माझ्या कामावर प्रेम होते… ॲपलमधल्या घटनांनी त्यात तीळभरही फरक पडला नव्हता. मला नाकारण्यात आले होते… पण माझे प्रेम संपले नव्हते.. म्हणूनच, मी पुन्हा सुरुवात करण्याचा निश्चय केला.
तेव्हा तसे वाटले नसेल कदाचित, पण ॲपलमधून हाकलले जाणे ही माझ्या आयुष्यातली सर्वाधिक चांगली घटना ठरली. यशस्वी असण्याचे सगळे दडपण गळून पडले. त्याची जागा एखाद्या नवोदिताच्या खांद्यावर असलेल्या हलकेपणाने घेतली. कशाचीही खात्री नव्हती. याच स्थितीमुळे मी माझ्या आयुष्यातल्या सर्वाधिक सृजनात्मक कालखंडात प्रवेश केला.
त्यानंतरच्या ५ वर्षांत मी ‘नेक्स्ट’ नावाची कंपनी स्थापन केली, ‘पिक्सार’ नावाची दुसरी कंपनीही उभारली आणि एका अशा भन्नाट स्त्रीच्या मी प्रेमात पडलो जिच्याशी मी लग्न केले. ‘पिक्सार’ने जगातली पहिली ॲनिमेटेड फिल्म ‘टॉय स्टोरी’ बनवली आणि आज ती जगातली पहिल्या क्रमांकाची ॲनिमेशन कंपनी आहे. गंमत म्हणजे, पुढे ‘नेक्स्ट’पण ‘ॲपल’ने विकत घेतली. आणि आम्ही ‘नेक्स्ट’मध्ये बनवलेले तंत्रज्ञान आज ‘ॲपल’च्या कामाला येते आहे. आणि ‘ॲपल’च्या यशाला ते कारणीभूत ठरते आहे.
मला खात्री आहे की मी जर ‘ॲपल’मधून हाकलला गेलो नसतो, तर हे कधीच घडले नसते. औषधाची चव घेणे कठीण असते, पण रुग्णाला त्याचीच गरज असते. कधी आयुष्याने डोक्यात दगड घातलाच, तर निराश होऊ नका. मला खात्री आहे की जर माझे माझ्या कामावर प्रेम नसते, तर मी अशा पद्धतीने काम करत राहू शकलो नसतो. आपले प्रेम कशावर आहे याचा शोध घेत राहा. हे केवळ तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात जितके महत्त्वाचे आहे तितकेच ते तुमच्या कार्यक्षेत्रातही. तुमच्या आयुष्यातला एक मोठा भाग तुम्ही काम करण्यात व्यतीत करणार आहात, आणि उत्तम काम करण्याकरिता तुम्ही जे करताय त्यावर तुमचे प्रेम असणे आवश्यक आहे. जर ते तुम्हाला अजून सापडले नसेल, तर मग शोधात राहा. स्वत:ची समजूत घालून नका घेऊ. हृदयाच्या इतर गोष्टीप्रमाणेच जेव्हा तुम्हाला ते सापडेल, तेव्हा ते तुम्हाला आपोआप जाणवेल आणि एखाद्या सुंदर नात्याप्रमाणे वर्षे जशी सरकत जातील, तसतसा तुमचा त्यातला रस वाढतच राहील. म्हणून म्हणतो. शोधत राहा. स्वत:ची समजूत घालून नका घेऊ.
माझी तिसरी गोष्ट मृत्यूविषयी आहे.
मी १७ वर्षांचा होतो तेव्हा एक वाक्य वाचले होते. ‘जर तुम्ही रोज आपले आयुष्य आजचा दिवस शेवटचा असं समजून घालवलात, तर कमीत कमी एक दिवस तुमची समजूत खरी ठरेल.’ या वाक्याने माझ्यावर खूप परिणाम केला होता. तेव्हापासून जवळपास ३३ वर्षे मी रोज सकाळी उठतो आणि आरशात पाहून स्वत:ला विचारतो- ‘‘जर आज मला मरण यायचे असेल, तर आज जे मी करतो आहे तेच मला करायला आवडेल का?’ जर माझे उत्तर बरेच दिवस ‘नाही’ असेल, तर मला कळते की काहीतरी बदल करायची गरज आहे.
मला लवकरात लवकर कधीही मृत्यू येऊ शकतो ही कल्पना मला माझ्या आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेताना खूप कामाला येते. कारण आपल्या बाह्य अपेक्षा, सारा अहंकार, लाज किंवा अपयशाची भीती हे सारं सारं मरणाच्या भीतीमध्ये नष्ट होतं. आणि जे महत्त्वाचं आहे, तेवढंच उरतं. तुम्ही मरणार आहात हे लक्षात ठेवणे म्हणजे तुम्ही काहीतरी गमावू शकता या भीतीपासून मुक्ती असं मी समजतो. तुम्ही आधीच इतके नागवे झालेले असता, की हृदयाचं सोडून दुसऱ्या कुणाचं ऐकण्याचं तुम्हाला कारणच राहत नाही.
साधारण वर्षांपूर्वी मला कॅन्सर असल्याचे निदान झाले. सकाळी ७.३० वाजता माझा स्कॅन झाला आणि स्वादुपिंडापाशी मला भला मोठा ट्युमर असल्याचे स्पष्ट झाले. मला स्वादुपिंड शरीरात कुठे असते हेही ठाऊक नव्हते. डॉक्टर म्हणाले हा जवळपास असाध्य अशा स्वरूपाचा कॅन्सर आहे आणि मी काही सहा महिन्यांपेक्षा जास्त जगणार नाही. डॉक्टरने मला घरी जाऊन साऱ्या गोष्टींची आवराआवर करायला सांगितले, म्हणजे दुसऱ्या शब्दात तो मला मृत्यूसाठी तयार राहायला फर्मावत होता. याचाच दुसरा अर्थ म्हणजे पुढच्या दहा वर्षांत तुम्ही आपल्या मुलांना ज्या चार युक्तीच्या गोष्टी सांगणार होता, त्या सांगायला आता तुमच्याकडे फक्त सहा महिने आहेत. याचाच दुसरा अर्थ म्हणजे सगळी बटणं लावून तयार राहा. निरोप घ्यायची वेळ आलेली आहे. त्या निदानासोबत मी एक दिवस घालवला. त्या दिवशी संध्याकाळी माझी बायोप्सी झाली. त्यांनी माझ्या घशावाटे आणि पोटातून आतड्यात एन्डोस्कोप घुसवला, माझ्या स्वादुपिंडात सुई खुपसून त्यांनी तिथल्या पेशी काढल्या. मला अर्थात भूल दिली होती, पण माझी पत्नी म्हणाली की, जेव्हा डॉक्टर्सनी त्या पेशी सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्या, तेव्हा ते आनंदाने रडू लागले. माझा कॅन्सर अतिशय दुर्मिळ असला, तरी शस्त्रक्रियेने तो बरा करता येण्यासारखा होता. माझ्यावर शस्त्रक्रिया झाली आणि मी आता ठणठणीत बरा आहे.
ही माझी मृत्यूशी झालेली सर्वात जवळची आणि बहुधा अजून दोन दशक तरी टिकेल अशी ओळख. आत्ता मी याविषयी एवढ्या अधिकारवाणीने बोलतो आहे, त्याचं कारण या एका उपयुक्त कल्पनेचं या अशा ओळखीत झालेलं रूपांतर.
मरण कुणालाच नको असतं. अगदी ज्यांना स्वर्ग हवा असतो त्यांचीही त्याकरिता मरण्याची तयारी नसते. तरीही मरण हे आपल्या सगळ्यांना एकत्र करणारच आहे. कोणालाही ते चुकलेले नाही. आणि हे खरंच अगदी बरोबर आहे, कारण मरण हा जीवनाचा सर्वात छान शोध आहे. तो जीवनातल्या बदलाचा शिल्पकार आहे. तोच जुन्याला दूर करून नव्याची वाट मोकळी करतो. आज, कदाचित तुम्ही चर्चेत आहात, पण उद्या तुम्ही हळूहळू म्हातारे व्हाल आणि दूर सारले जाल. नाट्यमय वाटले, तरी हेच सत्य आहे.
तुमच्याकडे अगदी मर्यादित वेळ आहे, म्हणूनच दुसऱ्या कोणाचं आयुष्य जगत तो फुकट घालवू नका. दुसऱ्यांच्या विचारावर आधारलेल्या निष्कर्षांचं जोखड आपल्या आयुष्यावर मिरवू नका. दुसऱ्यांच्या मतांच्या गलबल्यात आपला आतला आवाज दबून जाऊ नये याची काळजी घ्या. आणि सर्वात महत्त्वाचे, आपले हृदय आणि अंत:प्रेरणा यांचं ऐकायचं धाडस सदैव दाखवा. त्यांना जवळपास नेहमीच तुम्हाला काय बनायचे आहे, याची कल्पना असते. बाकी सगळे दुय्यम आहे.
जेव्हा मी तरुण होतो त्या वेळी होल अर्थ कॅटलॉग नावाचे मासिक प्रसिद्ध होत असे- जणू आमच्या पिढीचे बायबलच. इथून जवळच मेन्लो पार्क इथे राहणारा स्टेवर्ट ब्रांड नावाचा इसम ते काढत असे आणि त्याने आपल्या कवीप्रवृत्तीने ते मासिक सजवले होते. ही गोष्ट १९६० ची, पर्सनल कम्प्युटर किंवा डेस्कटॉप पब्लिशिंगच्या खूप आधीची. साहजिकच, हे मासिक पूर्णपणे टाईपरायटर, कात्री आणि पॉलोराईड कॅमऱ्याने बनवले जाई. जणू पेपरबॅक फॉर्ममधले गुगल. आणि तेही गुगल येण्याच्या ३५ वर्षे आधी. खूप आदर्शवादी, नेटके आणि नव्या कल्पनांनी भारलेले.
स्टेवर्ट आणि त्याचे सहकारी भरपूर वर्षे त्या मासिकाचे अंक काढत राहिले आणि जेव्हा त्याचा प्रवास संपला तेव्हा त्यांनी त्याचा शेवटचा अंक काढला. सत्तरीची मध्यान्ह चालू होती आणि मी तुमच्याच वयाचा होतो. त्या शेवटच्या अंकात शेवटच्या पृष्ठावर एक गर्द रानातल्या रस्त्याचे चित्र होते. त्याच्या खाली लिहिले होते.
हा त्यांचा शेवटचा संदेश होता… भुकेलेले राहा… वेडे राहा… मी सतत स्वत:साठी तेच मागतो आणि आत्ता जेव्हा तुम्ही पदवीधर होऊन बाहेर पडताय.. तेव्हा तुमच्यासाठी पण हीच इच्छा करतो आहे.
भुकेलेले राहा… वेडे राहा!!!
(मूळ भाषणाची तारीख- १२ जून २००५) (शब्दांकन – अमोल कडू) १६ एप्रिल २०१० – लोकप्रभा
यश हे प्रयत्नानेच मिळवावे लागते. गेलेली वेळ पुन्हा मिळवता येत नाही. साक्षर असलेल्या महाराष्ट्रातील लोकांजवळ आत्मविश्वासाचा अभाव आहे. फक्त थडग्यातील दफन केलेल्या व स्वर्गवासी झालेल्या माणसांनाच समस्या नसतात, बाकी प्रत्येकालाच समस्या असतात. आयुष्यात विविधता आणता येते ती यशस्वी माणसांनाच.
यशामागे परिश्रम आहेत, प्रचंड असा आत्मविश्वास आहे. बिल गेट्सच्या बाबतीत त्याच्या शिक्षकांनी सांगितले होते की, हा मुलगा यशस्वी होणार नाही; परंतु याच बिल गेट्सने संगणकामध्ये क्रांती घडवून आणून अब्जावधी रुपये कमावले.
कर्नल सँडर्स हा उत्कृष्ट स्वयंपाकी होता. आपल्या 65 व्या वाढदिवशी त्याने मित्रांसाठी कोंबडीचे जेवण केले. मित्राने खुश होऊन त्यास एखादे हॉटेल काढ असा सल्ला दिला. याच कर्नल सँडर्सने 299 ठिकाणी नकार पचवला. 300व्या ठिकाणी त्यास चिकन बनवण्याचे काम मिळाले. ते काम मिळताच अडीच वर्षात सँडर्सने 86 देशांत 13,000 हॉटेल्स काढली. त्याची रोजची कमाई 27 लाख डॉलर्स आहे.
सुनीता पंडेर नावाची युवती 30 वेगवेगळ्या प्रकारची विमाने चालवायला शिकली. पॅराशूटमधून जंपिंग केले. नासाच्या परीक्षेत नापास झाली; पण तिने जीव दिला नाही.
यशाच्या पाठी लागणाऱ्या माणसाच्या पाठी पैसा आपोआप येतो. ज्या माणसाला कष्टाची सवय लागलेली असते, अशी माणसे कधीच अयशस्वी होत नाहीत. यशस्वी होण्यासाठी तुमच्या आजूबाजूला जी सामान्य माणसे जे काही करतात ते करायचे टाळा, म्हणजे तुम्ही असामान्य व्हाल. ज्ञान हे कोणत्याही वयात घेता येते. कौशल्य आणणे हे तुमच्या हातात आहे. सवयी बदलल्या की तुम्ही कोणीतरी बनू शकाल. कृती करताना तुम्ही-आम्ही सबबी सांगतो, परमेश्वराने तुम्हाला मन, बुद्धी, आयुष्य दिलेले आहे, तेव्हा तुम्ही किडामुंगीसारखे का जगता? आपण यशस्वी होऊ शकत नाही, असे आपल्या मनावर बिंबवलेले असते. त्यामुळे मानसिकदृष्ट्या असलेले अपंगत्व फेकून द्या.
जेसिका कॉक्स नावाच्या मुलीला दोन्ही हात नव्हते; परंतु ती निराश झाली नाही. तिने आपल्या वडिलांजवळ विमान चालवण्याचा हट्ट धरला आणि विशेष म्हणजे ती पायाने विमान चालवते.
स्वप्न पाहणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. स्वप्न वास्तवात आणणे हे तुमचे कर्तव्य आहे. जबरदस्त आत्मविश्वासामुळे अपंग माणसेही जीवनात यशस्वी होतात. तुमचे आयुष्य तुम्हीच बदलू शकता.
जगात एकूण 800 कोटी लोक आहेत. यातील फक्त 1 कोटी 40 लाख लोक हे कोट्याधीश आहेत. एका सर्वेक्षणानुसार 90% कोट्याधीश असे आहेत जे स्वतःच्या बळावर यशस्वी झाले आहेत. ज्यांच्याकडे कुठलीही वडिलोपार्जित संपत्ती नाही. शून्यातून स्वतःचे साम्राज्य उभे करणे ही काही सोप्पी गोष्ट नाही, पण मग ही अवघड गोष्ट त्यांनी पूर्ण कशी केली. त्यांच्याकडे अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्यामुळे ही अशक्यप्राय गोष्ट शक्य झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे त्यांच्या सवयी…! काय आहेत त्या सवयी, ज्यामुळे आपणसुद्धा यशाच्या मार्गावरून मार्गक्रमण करू शकतो. चला तर पाहूया.
ध्येयनिश्चिती –
तुमच्या आयुष्याला योग्य दिशा मिळवून देण्यासाठी पाहिल्यांना लागते ती ध्येय-निश्चिती. जर ध्येय निश्चित असेल, तरच तुमची प्रगती वेगाने होऊ शकते; पण जर एखाद्याकडे ध्येयच नसेल, तर तो पुढे जाऊच शकत नाही. कारण त्याला जर आपले अंतिम ध्येचच माहीत नाही, तर तो पुढे जाईल तरी कसा…? म्हणून आत्ताच ठरवा की, तुम्हाला आजपासून पुढे 5 ते 10 वर्षात काय बनायचे आहे, तुम्हाला यशाचा कोणता टप्पा गाठायचा आहे. जगात अशा लोकांची कमी नाहीये, जे फक्त प्राण्यांप्रमाणे जीवन जगतात. प्राण्यांचे कोणतेच स्वप्न नसते की ध्येय नसते, पण जर तुम्हाला हटके आणि जगावेगळे काहीतरी करायचे असेल, तर आजच तुमचे ध्येय निश्चित करा.
शिस्त –
ध्येयनिश्चिती आणि ध्येयप्राप्ती यांच्यामधील पूल म्हणजे शिस्त. शिस्त ही एक अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत यशस्वी बनवू शकते. मग तुमच्यामध्ये टॅलेंट असो वा नसो. प्रत्येक यशस्वी व्यक्ती ही आपल्या दैनंदिन कामकाजाविषयी अतिशय शिस्तप्रिय असते. या व्यक्ती तिच्या आठवड्याचे, महिन्याचे आणि वर्षाचे योग्य नियोजन करतात. त्यामुळे त्यांचे आऊटपुट हे आपल्यासारख्या सर्वसाधारण व्यक्तीपेक्षा जास्तच असते, कारण त्यांना आज काय करायचे याचा विचार करण्यासाठी जास्त वेळ वाया घालवावा लागत नाही. त्यांचा प्लॅन हा आधीच ठरलेला असतो.
जोखीम –
आयुष्यात कोणतीच गोष्ट सहजतेने मिळत नाही आणि जर तुमच्या नावाचा उल्लेख यशस्वी लोकांच्या यादीत व्हावा असे तुम्हाला वाटत असेल, तर तुमच्यासमोर कष्टाशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. तुम्हाला स्वीमर व्हायचे असेल, पण पाण्यात उतरायची भीती वाटते म्हणून तुम्ही पाण्यात उडीच मारली नाही, तर तुम्ही स्विमर बनू शकता का? अर्थातच नाही. म्हणून तुम्ही जे ध्येय निवडले आहे ते पूर्ण करण्यासाठी मार्गात कितीही अडथळे आले तरी मागे हटू नका. जोखीम स्वीकारा आणि कार्य पूर्ण करून दाखवा.
शिकाऊ वृत्ती –
असं म्हणतात की, माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो. तो नेहमी कोणाकडून काही ना काही शिकत असतो. मग त्याचे वय 25 असो, 50 असो किंवा 70. तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं असेल, तर नेहमी अपडेटेड राहिलं पाहिजे आणि त्यासाठी शिकाऊ वृत्ती असणं खुप गरजेचं आहे. जग काळानुसार बदलत असतं आणि या बदलत्या जगानुसार तुम्ही आम्ही देखील बदलणं गरजेच आहे. जर आपण प्रवाहानुसार चाललो तर किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकतो, नाहीतर प्रवाहाबाहेर फेकले जाऊ. त्यामुळे या बदलत्या दुनियेनुसार इतरांकडून नेहमी चांगल्या गोष्टी शिकून स्वतःला जगावेगळे बनविण्यासाठी सज्ज व्हा.
वाचन:
प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊन यशप्राप्ती करण्यासाठी आपले आयुष्य खुप छोटे आहे, त्यामुळे यशस्वी व्यक्तींच्या जीवनाचे धडे घेऊन त्यांच्या अनुभवातून गोष्टी शिकल्या पाहिजे आणि यासाठी वाचन हा एकमेव पर्याय आहे. वॉरेन बफे दररोज न चुकता पुस्तकं वाचतात. कारण त्यांना माहीत आहे की; त्यांची संपत्ती हे त्यांचे सर्वस्व नाही, तर नॉलेज हेच सर्वस्व आहे. तुम्हाला जर त्यांच्यासारखे यशस्वी व्हायचे असेल, तर दिवसातून निदान 10 पानं तरी वाचलीच पाहिजे.
मंडळी, आयुष्यात इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं असेल तर या 5 सवयी तुमच्याकडे असल्याच पाहिजेत.