प्रिय गुरुजी, सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, नसतात सगळीच सत्यनिष्ठ, हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. मात्र त्याला हे देखील शिकवा, जगात प्रत्येक बदमाषागणिक असतो एक साधूचरित, पुरुषोत्तमही स्वार्थी राजकारणी असतात जगात, तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही. असतात टपलेले वैरी, तसे जपणारे मित्रही, मला माहित आहे ! सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत......... तरीही जमलं तर त्यांच्या मनावर ठसवा, घाम गाळून कमावलेला एकच छदाम, आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे. हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला, तुमच्यात शक्ती असती तर ......... त्याला द्वेष मत्सरापासून दूर रहायला शिकवा आणि शिकवा त्याला आपला हर्ष संयमाने व्यक्त करायला. गुंडांना भीत जावू नको म्हणावं, त्यांना नमविणे सर्वात सोपं असतं. जमेल तेवढं दाखवित चला त्याला, ग्रंथ भांडाराच अदभूत वैभव. मात्र त्याबरोबरच, मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा, सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला, पाहू दे त्याला, पक्षांची अस्मान भरारी ............ सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर .......... आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं...... शाळेत त्याला हा धडा मिळू दे, फसवून मिळालेल्या यशापेक्षा, सरळ आलेल अपयश श्रेयस्कर आहे . आपल्या कल्पना, आपले विचार, यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्याने, बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी, त्याला सांगा ................ भल्याशी भलाईनं वागावं, आणि टग्यांना अद्दल घडवावी . माझ्या मुलाला हे पटवता आल तर पहा ......... जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊगर्दीत, सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी, पुढे हेही सांगा त्याला, ऐकावं जनाच अगदी सर्वांच ........... पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून, आणि फोलपट टाकून निव्वळ सत्व तेवढं स्वीकाराव. जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा, हसत रहावं उरातल दुःख दाबून, आणि म्हणावं त्याला आसवांची लाज वाटू देऊ नको. त्याला शिकवा ......... तुच्छतावाद्यांना तुच्छ मानायला, अन चाटुगिरीपासून सावध रहायला. त्याला हे पुरेपूर समजवा की, करावी कमाल कमाई त्याने, ताकद आणि अक्कल विकून, पण कधीही विक्रय करू नये, हृदयाचा आणि आत्म्याचा. धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर, कानाडोळा करायला शिकवा त्याला. आणि ठसवा त्याच्या मनावर, जे सत्य आणि न्याय वाटते, त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा. त्याला ममतेनं वागवा, पण, लाडावून ठेवू नका. आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाच कणखर पोलाद होत नसतं, त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य, अन धरला पाहिजे धीर त्याने, जर गाजवायच असेल शौर्य . आणखीही एक सांगत रहा त्याला .......... आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर, तरच जडेल उदात्त श्रद्धा मानवजातीवर, माफ करा गुरुजी, मी फार बोलतो आहे खूप काही मागतो आहे......... पण पहा........ जमेल तेवढ अवश्य कराच, माझा मुलगा, भलताच गोड छोकरा आहे हो तो !!! - अब्राहम लिंकन
Tag: education
अब्राहम लिंकनचे हेडमास्तरास पत्र
१० वी आणि १२ वी नंतर काय?
बाळ मोठं झाल्यानंतर तू काय होणार? हा अगदीच गोड आणि महाभयंकर प्रश्न आपल्याला लहानपणी कितीतरी वेळा आपल्या अनेक नातेवाईकांनी विचारला असेल ना? जणू काही आपल्याला दिलेल्या खाऊच्या बदल्यात त्यांना याचं उत्तर हवंच असायचं. ध्येयासक्ती म्हणजे नक्की काय? हा साधा शब्दसुद्धा न ऐकलेल्या आपल्या कोवळ्या मनातून उत्तराचे किंबहुना भविष्यासाठीचे अनेक हुंकार बाहेर पडतात. पटकन म्हणतो आपण, ‘अहो, मी पोलीस होणार किंवा मी कलेक्टर होणार.’
करिअर म्हणजे नेमकं काय याच्याशी त्या वयात आपल्यला तसे देणेघेणे नसतेच, पण देणेघेणे असते ते आपल्या पालकांना. हो आपण तर मातीचा गोळा असतो, वाढत्या वयानुसार हा मातीचा गोळा घडत असतो, आपला इंटरेस्ट ठरवत असतो आणि या गोळ्याचे म्हणजेच आपले बारकाईने निरीक्षण करण्याची जबाबदारी आपल्या पालकांची असते, जेणेकरून ते आपल्या इंटरेस्टनुसार आपल्याला आकार द्यायला किंवा करिअरसाठी जास्त उपयोगी ठरेल. आयुष्याच्या एका टप्प्यावर करिअर निवडीची वेळ येते, पूर्णवेळ कोणत्या क्षेत्रात राहायचं हे समजण्यासाठी याची खूप मदत होते. याचे आणखी कारण असे आहे की, लहान वयात ग्रास्पिंग क्षमता उत्तम असते. अशा वेळी जे बिंबवले जातं, मुलं त्यानुसार घडत असतात.
अनेकवेळा अनेक कारणांनी अशा पद्धतीची जडघडण करणं प्रत्येक पालकांना शक्य होत नाही. प्रसंग आणि परिस्थिती वेगवेगळी असते, त्यामुळे सगळं जुळून येईलच असे नाही, पण अशात हे काम आपल्या शाळेतील आपले शिक्षक नक्की करू शकतात. किंबहुना त्यांना कोणत्या मुलामध्ये काय क्षमता आहे याबद्दल खूप चांगल्या पद्धतीने माहित असते. पालकांना शाळेनंतर करिअरच्या दृष्टीने त्यांची खूप मदत होऊ शकते.
पालक आणि शिक्षक यांची मते काही असली तरी मुलं ठामपणे त्यानुसार योग्य करिअर निवड करू शकत नाहीत. १०वी आणि १२वी नंतर नेमका भेडसावणारा प्रश्न म्हणजे करिअरचं पुढे काय? अशावेळी पहिल्या टप्प्यातील पालकांचा कलचाचणी म्हणजे IQ Test घेण्याकडे कल जास्त असतो. ज्यातून आपल्या पाल्याचा कल नेमका कुठे आहे? त्याची रुची कशात आहे? हे ठरवले जाते. दुसऱ्या टप्प्यातील पालकांनी आधीच आपल्या परंपरागत वर्षानुवर्षे चालत आलेल्या खानदानी व्यवसायासाठी आपल्या मुलाची तयारी करून घ्यायला सुरु केलेले असते. तिसऱ्या टप्प्यातील म्हणजे जास्तीत जास्त पालक तर लाटेवर स्वार होत असतात, म्हणजेच सध्या ट्रेंडिंग करिअर पर्याय काय आहेत, त्यातील एक आपल्या मुलाच्या गळ्यात घालतात आणि आपली जबाबदारी पूर्ण करतात.
पहिल्या टप्प्यातील पालक ठीक आहेत, दुसऱ्या टप्प्यातील पालक तरी बरे म्हणता येतील, पण तिसऱ्या टप्पातील पालकांचा निर्णय म्हणजे सगळ्यात मोठी रिस्क किंबहुना आयुष्याची जोखीम असू शकते. मुलांचं भविष्य एकतर उज्ज्वल होऊ शकतं, नाहीतर आयुष्यभर त्यांचा कोंडमारा होऊ शकतो. म्हणून करिअरची निवड करताना १०वी आणि १२वी च्या टप्प्यावर फार विचार करून निर्णय घेणे गरजेचे आहे.
मग निर्णय घ्यावा कसा? २१ व्या शतकात संपूर्ण जग एका क्लिकवर तुमच्या हातात आलेले असताना करिअरची अनेक दालनं तुमच्यासमोर आज खुली आहेत. काही वर्षांपूर्वी यासाठी खूप मर्यादा होत्या, पण तो काळ आता नाही राहिला. १०वी आणि १२वी नंतर आपल्या देशातील अलिखित नियमानुसार सर्वजण एकतर पदवीसाठी म्हणजे ग्रॅज्युएशनसाठी प्रवेश घेतात किंवा डिप्लोमा, सर्टिफिकेट कोर्ससाठी ॲडमिशन घेतात, पण ही मळलेली वाट सोडून काही वेगळं करू पाहणाऱ्यांची संख्या खूप आहे. फक्त गरज आहे त्यांना विश्वासात घेण्याची आणि बळ देण्याची.
आधीच सांगितल्याप्रमाणे कलचाचणी हा एक करिअर निवडीसाठी मदत करणारा पर्याय आहे. मग तुम्ही म्हणाल अहो सगळं समजलं, पण ही रिस्क घेण्याआधी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या? तर त्यासाठी काही मूलभूत गोष्टी आपण विचार घेतल्या पाहिजेत नक्कीच. त्या गोष्टीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा येते, ती त्या मुलाची मानसिक आणि शारीरिक क्षमता आणि इंटरेस्ट काय आहे. दुसरी मूलभूत गोष्ट म्हणजे त्याचा बॅकग्राऊंड म्हणजे त्याच्या परिवाराची स्थिती उदा. भविष्यात त्याच्यावर घराची जबाबदारी किती काळात येऊ शकते. तिसरी आणि सगळयात मूलभूत गोष्ट म्हणजे त्या मुलाच्या घरची आर्थिक परिस्थिती.
या तीन मुलभूत गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. याचा सारासार विचार करून आपण कोणत्याही क्षेत्रातील करिअरसाठी जोखीम उचलू शकतो. शेवटी आपण कितीही विचार केला तरी काही चमत्कार काळाच्या पटलावर कोणत्याही परिस्थितीत घडत असतातच. समोर कोणताच पर्याय नसताना प्रवाहासोबत जाऊन पुढे आपली वेगळी वाट तयार करून ध्रुवताऱ्यासारखे आपले स्थान निश्चित करतात हे मात्र तितकेच शाश्वत सत्य आहे.
आणखी वाचा
भाग १ – शिकण्याचे मुलभूत घटक – शिक्षणाचे महत्त्व
शिकेल तो टिकेल नावाची पुरातन म्हण मराठी भाषेत रुढ आहे. या म्हणीतून जीवनात आपल्याला हव्या त्या क्षेत्रात टिकून राहायचे असेल तर शिकण्याला पर्याय नाही. ‘शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध आहे आणि ते पिल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही’ अशा अर्थाचा एक विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला आहे. एकूणच काय? तर एखादा माणूस जितका जास्त शिकला त्यावर त्याच्या यशाची गणिते अवलंबून असतात.
एखाद्या माणसाकडे एकूण किती कौशल्ये आहेत त्यावर त्याचे जीवनशाळेतील शिक्षण ठरते. एकाच व्यक्तीला पोहायला येते, दुचाकी-चारचाकी चालवता येते, उत्तम स्वयंपाक बनवता येतो, चांगले भाषण देता येते, संगणक चालवता येतो, त्याचे आरोग्य उत्तम आहे अशी जेवढी जास्त कौशल्ये प्राप्त असतील तेवढा तो जास्त यशस्वी होण्याच्या शक्यता निर्माण होतात. त्याने मिळवलेली कौशल्ये सध्या काम करत असलेल्या क्षेत्राशी संबंधित असल्यास अत्युत्तम ठरते. आपल्याला ज्या गोष्टी येत नाहीत. त्या गोष्टी साध्य करुन घेण्याची कला हा सुध्दा शिक्षणाचाच एक भाग आहे.
माणसाला चारित्र्य घडवणारे, बुध्दीचा विकास करणारे, स्वतःच्या पायावर उभा करणारे शिक्षण आपल्याला हवे आहे. माणसाला माणूस बनवणारे शिक्षण आपल्याला हवे आहे. खऱ्या अर्थाने जीवन समृध्द बनवणारे शिक्षण आपल्याला हवे आहे. म्हणजे काय? तर जीवनातील आपल्याला आवश्यक त्या सर्व गोष्टी साध्य करण्याची गरज शिक्षणातून पूर्ण झाली पाहिजे. सामाजिक, आर्थिक, आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, समाधान, आनंद, भौतिक गरजा, मनःशांती व नातेसंबंध या सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात प्राप्त करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे.
समजा एखाद्याने खूप सारा पैसा कमावण्यात आयुष्य खर्च केले व त्या नादात आरोग्याची हानी करुन घेतली तसेच कुटुंबातील व्यक्तींसाठी सुध्दा वेळ दिला नाही. तर त्याच्या आयुष्यातील एक बाजू पूर्ण करण्याच्या नादात दुसरी बाजू अपूर्णच राहून गेली किंवा एखाद्याने खूप सगळी माहिती गोळा करण्यात आयुष्य व्यतीत केले त्यावर काम करुन ती माहिती अस्तित्वात आणण्यासाठी त्याच्याकडे वेळ शिल्लक राहिला नाही, तर त्या माणसाची सुध्दा आयुष्याची एक बाजू अपूर्णच राहून गेली. एखाद्या विद्वानाने आयुष्यात खूप काही विद्या प्राप्त केली. त्या नादात त्याने आयुष्यातील इतर गोष्टीकडे दुर्लक्ष केले. कमालीच्या आर्थिक दारिद्र्याचा सामना करत आयुष्य कंठित केले. एखाद्या पैलवानाने आयुष्यात खूपच चांगले आरोग्य कमावले मात्र व्यवहार चातुर्य आत्मसात करण्यात अपयशी ठरला त्याच्या सुध्दा आयुष्यात एक गोष्ट अपूर्णच राहिली. बराक ओबामांनी दोनवेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद भूषविले. राष्ट्राच्या जबाबदाऱ्या सांभाळून त्यांनी कुटुंबासाठी सुध्दा वेळ दिला.
आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टींची समृध्दी व योग्य मेळ साधण्याची कला म्हणजेच शिक्षण होय. आयुष्य ही एक अनेक कोन असणारी आकृती आहे. उदाहरणासाठी आपण ही आकृती षटकोनी आहे असे मानू या. षटकोनाला सहा बाजू, सहा कोन व सहा शिरोबिंदू असतात. आर्थिक समृध्दी प्राप्त करणे ही या आयुष्यरुपी षटकोनाची एक बाजू आहे. त्याचप्रमाणे आरोग्य, सामाजिक प्रतिष्ठा, आनंद, भौतिक गोष्टी व नातेसंबंध या इतर बाजू आहेत. या सर्व बाजू जोडल्या गेल्या तरच षटकोन पूर्ण होईल. यातील एकही बाजू राहिली तर षटकोन कधीही पूर्ण होणार नाही. आपल्या आयुष्याच्या आकृतीला आकार देऊन साकार करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे.
एका माणसाने आयुष्य भर फार पैसा कमावला व प्रचंड काटकसर करत त्या पैशाचा आनंद न घेताच मरुन गेला. तर दुसऱ्या एका माणसाने आयुष्यभर जेवढा पैसा कमावला तेवढा तो उधळला, नको तसा खर्च केला व म्हातारपणी कर्जबाजारी व आर्थिक हाल करत जगला. त्याउलट एका माणसाने पैसाही कमावला, आवश्यकतेनुसार त्याचा वापर केला, त्याचे नियोजन व बचत सुध्दा केली. त्याचे आयुष्य समाधानात पूर्ण झाले. आयुष्यात सर्व गोष्टीचा सुवर्ममध्य साधण्याचे तारतम्य शिक्षणातून प्राप्त होते.
कोणते शिक्षण घेतले पाहिजे? याचे महत्त्व खऱ्या अर्थाने अगदी सोप्या व कमी शब्दात सांगण्याचे काम अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी केले आहे. त्यांनी हेडमास्तरांना लिहलेल्या पत्रात शिक्षणाचे एकूण महत्त्व विषद केले आहे. हे पत्र प्रत्येक माणसाने आपल्या हृदयावर कोरुन ठेवले पाहिजे इतके महत्त्वाचे आहे. आपण हे पत्र वाचा. पुढील लेखात अब्राहम लिंकनने हेडमास्तरांना पाठवलेले पत्र प्रकाशित करत आहोत.