Tag: आर्थिक

  • जर खरोखरच आयकर रद्द झाला तर?

    जर खरोखरच आयकर रद्द झाला तर?

    आपल्याकडे सध्याचे आयकरचे दर मध्यम प्रमाणात आहेत. या करातून अनेक सरकारी खर्च भागावले जातात, शिक्षण, संरक्षण, पायाभूत सुविधांचा विकास केला जातो. त्यातूनच देशाचा आर्थिक विकास होण्यास मदत होते. सरकारच्या उत्पन्नाचे प्रत्यक्ष कर हे महत्वाचे साधन आहे. ज्याने उत्पन्न अत्यल्प आहे त्यांना सरकारची मदत मिळते तर अतिशय श्रीमंत लोक संघटितपणे त्यांच्या अनेक उत्पन्नावरील कर कमी करावेत यासाठी सरकारवर दबाव आणतात.

    याउलट मध्यमवर्गीय लोकांच्या उत्पन्नातूनच कर लगेच कापून घेत असल्याने त्यात अधिक सवलती मिळाव्यात अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे सरकारला उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण करून सर्वच घटकांना खुष ठेवावे लागते निदान जे काही आहे ते त्यांच्या फायद्यासाठी आहे असा दिलासा समाजातील प्रत्येक घटकांना द्यावा लागतो. अनेक आयकरदात्याना कराचे दर अधिक वाटतात. बरेचदा त्याची कर भरण्याची जबाबदारी मालकावर असल्याने कामाच्या ठिकाणी करकपात केली जाते.

    दरमहा वेतनातून काही कपात न केल्यास शेवटचे तीन चार महिने करदात्यांवर ताण येऊ शकतो त्यामुळेच कच्चा हिशोब करून दरमहा काहीतरी कपात केली जाते. आयकर मापन करण्याच्या जुन्या पद्धतीत विविध गुंतवणूका आणि खर्च यावर सूट मिळते. त्यामुळे निव्वळ उत्पन्नाचा विचार करता द्याव्या लागणाऱ्या आयकराचे प्रमाण अप्रत्यक्षपणे खूप कमी होते. अनेक सवलती रद्द करून काही प्रमाणात करदेयता कमी करणारी नवीन करयोजना सरकारने आणली असली तरी सरकारने आयकरच रद्द करावा अशी मागणी नियमित केली जाते. यात अनेकदा राजकारण असले तरी या मागणीस करदात्यांचे समर्थनही मिळते. आयकर रद्द केला तर विकासाची गती कशी वाढेल याचे अनेक दाखले दिले जातात.

    समर्थनार्थ पुढे येणारे ठळक मुद्दे-

    सध्याच्या पद्धतीत व्यक्ती आणि उद्योजक यांच्यावरील भार अधिक वाढतो. आयकर रद्द केल्यास अधिक खेळाता पैसा बाजारात उपलब्ध होईल त्यातून अधिक गुंतवणूक होईल आणि अधिक खर्चही केला जाईल त्यामुळे अर्थव्यवस्थेस चालना मिळेल. यासाठी युनायटेड अरब अमिरात, सौदी अरेबिया या देशाची उदाहरणे दिली जातात आयकर नसताना तेथील सकल राष्ट्रीय उत्पन्नात, गेल्या दहा वर्षांत जागतिक सरासरीहून 4.2% दराने वाढ झाली आणि तो दर 5% होऊ शकेल. विकासदरात वाढ झाल्यास नवीन नोकऱ्या निर्माण होतात, परदेशी गुंतवणूक वाढते त्यामुळे जनतेचे सर्वसाधारण राहणीमान उंचावते.

    भारतातील कररचना गुंतागुंतीची आहे. आयकर रद्द केल्याने त्यात सुलभता येईल त्यामुळे करदाते आणि व्यावसायिक यांना कर नियमांचे पालन करणे सुलभ होईल. त्याचप्रमाणे कर गोळा करण्यासाठी जो प्रशासकीय खर्च होतो तो कमी होईल. कर सल्लागाराची महागडी फी द्यावी लागणार नाही त्याचप्रमाणे हिशोबांचे लेखा परीक्षण सहसा आवश्यक नसल्याने परीक्षकांची गरज कमी होईल.

    आयकर रद्द केल्याने व्यक्ती आणि व्यवसायांना करचुकवेगिरी करण्यात किंवा त्यांचे उत्पन्न लपविण्याची गरजच पडणार नाही. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था विस्तारू शकते. अधिक पारदर्शक आणि जबाबदार आर्थिक शक्ती म्हणून पुढे येऊ शकते. पारदर्शक आणि आंतरराष्ट्रीय कर मानकांचे पालन करणारा देश म्हणून भारताची जागतिक पत देखील सुधारू शकते. जे विश्वासार्ह आणि अनुपालित वातावरण शोधत असलेल्या परदेशी गुंतवणूकदारांना आणि व्यवसायांना आकर्षित करू शकते

    भारताने प्राप्तिकर रद्द केल्यास विदेशी गुंतवणूकदार आणि उद्योजक यांच्यासाठी एक सशक्त आकर्षक पर्याय उपलब्ध झाल्याने जागतिक बाजारात स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊ शकते.
    आयकर रद्द केल्याचे असे अनेक फायदे असताना सरकार तो रद्द करीत नाही कारण-

    आयकर हा सरकारच्या उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत आहे. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि संरक्षण क्षेत्राच्या गरजा यातून भागवल्या जातात. त्यामुळे त्यास व्यवहार्य पर्याय उपलब्ध होयला हवा, नाहीतर यामुळे येणारी तूट भरून काढण्यास अधिक कर्ज घ्यावे लागेल त्यामुळे अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता वाटते.

    महसूल वाढवण्यासाठी विविध अन्य करपर्याय शोधावे लागतील. जसे की वस्तू आणि सेवाकर, संपत्तिकर, कंपनीकर यात वाढ करावी लागेल. व्यवहार कर आणावा लागेल या वाढीचे स्वतःचे वेगळे आर्थिक आणि सामाजिक परिणाम होऊ शकतात.

    व्यवहारकरासारख्या करात वाढ करताना त्याचे आंतरराष्ट्रीय करार , जबाबदाऱ्या, परकीय गुंतवणूक आणि व्यापार यावर होणारे संभाव्य परिमाण तपासून पाहावे लागतील.

    सध्याच्या व्यवस्थेने संपत्तीचे असमान वितरण होत आहे आयकर रद्द केल्यास त्याचा अधिक फायदा श्रीमंतांना होईल त्यामुळे विषमता अधिक वाढेल. अप्रत्यक्ष करवाढीचा थेट परिणाम कमी उत्पन्न असलेल्या लोकांवर अधिक होतो त्यामुळे अशी करप्रणाली विकसित करावी लागेल जी कमी उत्पन्न असलेल्या लोकांचे अप्रत्यक्ष कर समायोजित करू शकेल आणि त्यांच्यावरील कराचे ओझे हे संपत्ती वाढीच्या प्रमाणात किंचित वाढेल. त्यामुळे संपत्तीचे असमान ऐवजी पुनर्वितरण होऊ शकेल. या दिशेने जाणारा एकही मार्ग समोर नाही.

    आयकर रद्द करण्याची मागणी करणारे सर्व युक्तिवाद हे व्यवहारकराची आकारणी करण्याची मागणी करीत आहेत किंबहुना त्यांची सर्व मदार या करावर आहे. व्यवहार करांमध्ये सामान्यत: विशिष्ट आर्थिक व्यवहारांवर कर आकारणे समाविष्ट असते, जसे की स्टॉक ट्रेड, मालमत्ता विक्री किंवा बँकिंग व्यवहार.

    व्यवहार करांच्या बाजूने केले जाणारे युक्तिवाद:

    ★ साधेपणा: व्यवहार कर हे आयकराच्या तुलनेत सोपे मानले जाते व्यवस्थापन आणि गोळा करण्याची पद्धत सोपी आहे.

    ★ आर्थिक वाढ: याबाबत असा युक्तिवाद आहे की व्यवहार कर व्यक्ती आणि व्यवसायांवरील आयकराचा भार कमी करून त्यास चालना देऊ शकतात. कमी आयकर दर किंवा त्याचे निर्मूलन यामुळे संभाव्यपणे गुंतवणूक आणि वापर याला प्रोत्साहन मिळू शकते.

    ★ कमी करचोरी: व्यवहार कर चुकवणे अधिक आव्हानात्मक असू शकते कारण ते विशिष्ट व्यवहारांशी जोडलेले असतात आणि व्यवहाराच्या ठिकाणी गोळा केले जाऊ शकतात.

    निष्कर्ष

    ● भारतात आयकर रद्द करणे हा एक धाडसी प्रस्ताव आहे ज्याचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे.
    ● आर्थिक विकासाला चालना देण्याची, करप्रणाली सुलभ करणे, करचोरी टाळणे, कर कमी करण्याचे आश्वासन देताना संभाव्य महसुलाची हानी आणि वाढत्या संपत्ती असमानतेची चिंता त्यामुळे अशा बदलाच्या व्यवहार्यतेचे मूल्यमापन करण्यासाठी, धोरणकर्त्यांनी व्यापक संशोधन, तज्ञांशी सल्लामसलत करणे आणि त्याचे परिणाम याचा विचार करणे आवश्यक आहे.
    ● आयकर रद्द करण्याचा प्रस्ताव देशाच्या भविष्यासाठी व्यवहार्य आणि फायदेशीर प्रस्ताव आहे की नाही हे ठरवण्यासाठी आर्थिक वाढ आणि निष्पक्षता बाळगून यातील संभाव्य उणीवांकडे लक्ष देणारा संतुलित दृष्टीकोन बाळगणे महत्वाचे आहे.

    ©उदय पिंगळे
    अर्थ अभ्यासक

    (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे पदाधिकारी असून महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार आहेत, लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत)

    आणखी वाचा

  • शेअर डिलिस्टिंग : एक गुंतवणूकदार मार्गदर्शक

    शेअर डिलिस्टिंग : एक गुंतवणूकदार मार्गदर्शक

    शेअरबाजारात नोंदवण्यात आलेल्या शेअर्सची खरेदीविक्री गुंतवणूकदार करू शकतात हे आपल्याला माहिती आहे. सध्या देशभरात कुठेही व्यवहार होऊ शकणाऱ्या मुंबई शेअरबाजार आणि राष्ट्रीय शेअरबाजार यापैकी किमान एका बाजारात सार्वजनिक मर्यादित कंपनीस नोंदणी करावीच लागते. अनेक चांगल्या कंपन्या गुंतवणूक दारांच्या सोईसाठी दोन्हीही शेअरबाजारात नोंदणी करतात.

    अशी नोंदणी करण्यासाठी दरवर्षी नोंदणी फी द्यावी लागते त्याचप्रमाणे शेअरबाजाराच्या नियमावलीचे पालन करून कंपनी बाबतची सर्व माहिती पारदर्शकपणे विहित कालावधीत जाहीर करावी लागते जेव्हा एखादी कंपनी शेअर बाजारातील आपल्या शेअर्सची खरेदीविक्री पूर्णपणे थांबवते तेव्हा ती सार्वजनिक मर्यादित कंपनी म्हणून न राहता तिचे रूपांतर खाजगी कंपनीत होते. जोपर्यंत वरील दोनपैकी कोणत्याही एका शेअरबाजारात कंपनीच्या शेअर्समध्ये व्यवहार होत असतात तोपर्यंत ती कंपनी नोंदणीकृत कंपनी आहे असे म्हटले जाते. जेव्हा दोन्हीही राष्ट्रीयस्तरावर बाजारातील खरेदी विक्री कंपनी प्रवर्तकांकडून रीतसर नियमाचे पालन करून थांबवली जाते किंवा कंपनीवर कारवाई म्हणून बाजारातील व्यवहार थांबवले जातात तेव्हा सदर कंपनीचे शेअर्स डिलिस्ट झाले असे आपल्याला म्हणता येईल.

    शेअर डिलिस्ट करण्याची गरज कुणाला आणि का पडावी? याची कारणे शोधली असता शेअर्सचे डिलिस्टिंग दोन प्रमुख पद्धतीने होऊ शकते.

    ★ सन्मानपूर्वक पद्धतीने
    ★ सक्तीने

    ★ सन्मानपूर्वक पद्धतीने शेअर डिलिस्ट करण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनाकडून घेतला जातो तशी नियामकांकडे मागणी केली जाते. सर्व शेअरहोल्डरना त्याची पूर्वकल्पना देऊन त्यांच्याकडील शेअर्सचा उचित मोबदला दिला जातो आशा प्रकारे बाजारातील विक्रीयोग्य सर्वच लॉट काढून घेतले जातात असे करत असताना सर्व शेअरहोल्डरनी आपल्याकडील शेअर्स व्यवस्थापनास दिलेच पाहिजेतच अशी सक्ती नसते फक्त यापुढे शेअर्स खरेदीविक्री सहजासहजी होऊ शकणार नाही याची शेअरहोल्डरना जाणीव करून देऊन त्यावर तात्पुरता उपलब्ध पर्याय उपलब्ध करून दिलेला असतो.

    सन्मानपूर्वक डिलिस्टिंग हा कंपनीच्या विस्तार कार्यक्रमाचा आणि पुनर्रचनेचा एक भाग असतो किंवा एखादा मोठा गुंतवणूकदार ती कंपनी पूर्णपणे आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असतो तो मूळ प्रवर्तकाचे सर्व शेअर्स खरेदी करतो याशिवाय संस्थात्मक गुंतवणूकदारांचे जास्तीत जास्त शेअर्स आपल्याकडे येतील असा प्रयत्न करतो हाच नियम सर्वसाधारण भागधारकांना लागू पडतो सध्या एकूण भागभांडवलाच्या 25% शेअर्स हे जनतेकडे बाजारात खरेदी विक्रीसाठी उपलब्ध असावेत असा नियम आहे या नियमावलीतून फक्त सरकारी मालकीच्या कंपन्यांना वगळण्यात आले आहे. प्रवर्तक अथवा कंपनी खरेदी करणारा गुंतवणूकदार आपला कंपनीवर पूर्ण ताबा असावा या हेतूने 75% हून अधिक भागभांडवल आपल्या ताब्यात राहावे अशा प्रयत्नात असतात अशा प्रसंगी कंपनी डिलिस्ट करण्यास काही अटींवर नियमकांची परवानगी मिळू शकते.

    जी कंपनी डिलिस्ट होणार त्याचे प्रवर्तक किंवा नवे मालक यांना कंपनीचे शेअरबाजारातील व्यवहार पूर्णपणे बंद करण्यासाठी 90% शेअर्स मिळवावे लागतात ते मिळवण्यासाठी त्या शेअर्सचे स्वतंत्र मूल्यांकन करून घेऊन तसा देकार अन्य भागधारकांना द्यावा लागतो ही किंमत प्रवर्तक आणि संस्थात्मक गुंतवणूकदार यांना दिलेल्या किमतीहून कमी असू शकत नाही त्याचप्रमाणे बाजारभावाहून कमी असल्यास त्यास कोणीही प्रतिसाद देणार नाही.

    असे धरून चालू की हे शेअर्स सन्मानपूर्वक डिलिस्ट करण्याची प्रवर्तक किंवा नवे गुंतवणूकदार यांनी ठरवले आहे. हा निर्णय झाल्यावर भागधारकांना 10 आठवडे आधी पूर्वसूचना ठेवून त्यांची विशेष सर्वसाधारण सभा बोलावून मान्यता मिळवावी लागते ही मान्यता मिळवली की त्यानंतरची प्रक्रिया अशी-

    मर्चंट बँकर्सची नेमणूक– शेअर डिलिस्टिंग निर्णय झाल्यावर स्वतंत्र मर्चंट बँकरची नेमणूक करावी लागते तो रिव्हर्स बुक बिल्डिंग त्यामधून शेअर्स पुनर्खरेदी कोणत्या भावात करावी लागेल या प्रक्रियेवर लक्ष ठेवेल.

    रिव्हर्स बुक बिल्डिंग– यात कंपनी भागधारकांना एक विशिष्ट किंमत सांगेल जी शेअरहोल्डरना त्यांचे शेअर्स देण्यासाठी आकर्षक वाटेल. यासाठी ऑनलाइन देकार मागवण्यात येतील त्याची किमान किंमत (बेस प्राईज) ही मागील 2 आठवडे किंवा 26 आठवडे यांपैकी जी सर्वाधिक सरासरी किंमत असेल ती किमान किंमत धरली जाईल. भागधारक त्याहून अधिक अशा कोणत्या किंमतीत शेअर्स देण्यास तयार आहेत असे देकार घेतले जातील त्यातून कोणत्या भावांनी सर्वाधिक शेअर्स खरेदी केले जातील याचा शोध घेतला जाईल. ही खरेदी नेमकी कोणत्या भावाने करावी? याचा शोध घेण्याची ही आदर्श पद्धत आहे त्यामुळे गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण होते. जगभराचा विचार केला असता केवळ भारतातच रिव्हर्स बुक बिल्डिंग पद्दत अस्तित्वात आहे. ही पद्धत बदलून जगभरात मान्य अशी एका विशिष्ट किमतीनेच नियोजित डिलिस्टिंग कंपनीचे शेअर खरेदी करावेत अशी उद्योगांची मागणी असून यावरील संशोधन प्रबंध सेबीने प्रकाशीत केला आहे. त्यावर लोकांच्या सूचना प्रतिक्रिया मागवल्या असून सेबीच्या येत्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर विचार करण्यात येणार असल्याचे सेबी चेअरपर्सन “माधवी पुरी बुच” यांनी अलीकडेच जाहीर केले आहे. त्यामुळे लवकरच या पद्धतीत कोणते नवे बदल होतील ते समजेल.

    डिलिस्टिंगसाठी स्वतंत्र खात्याची निर्मिती– निश्चित केलेल्या भावाने शेअर्स खरेदी केले जातील याची खात्री करण्यासाठी स्वतंत्र खाते (एस्क्रू अकाउंट) उघडले जाते. त्यातील पैशांचा वापर केवळ मान्यवर भागधारकांचे शेअर्स खरेदी करण्यासाठीच वापरले जातील.
    बहुसंख्य शेअरहोल्डरची मान्यता– किंमत निश्चित झाल्यावर सर्वाना पत्रे पाठवून खरेदी ऑफर दिली जाईल जोपर्यंत 90% शेअरहोल्डर यास मान्यता देत नाहीत तोपर्यंत ही प्रक्रिया चालू राहील यात कधीही ऑफर केलेला भाव हा बाजारभावाहून कमी नसेल यास अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास संपूर्ण प्रक्रिया मागे घेण्याचा अधिकार कंपनीस आहे.

    सक्तीने करण्यात आलेले डिलिस्टिंग: यात शेअर्सचे व्यवहार बंद व्हावेत अशी मागणी कंपनी व्यवस्थापनाने केलेली नसते. या कंपन्या यथातथाच असल्याने लिस्टिंग नियमावलीचे पालन करू शकत नाहीत त्यांच्यावर शेअरबाजाराच्या नियामक मंडळाकडून अशी कारवाई केली जाते ही कारवाई तात्पुरती अथवा कायमस्वरूपी असू शकते. काही गंभीर गैरवर्तन आढळून आल्यास सेबीकडून सर्व व्यवहार थांबवले जाऊ शकतात झालेले व्यवहार रद्द केले जाऊ शकतात. गुंतवणूकदारांचे यात नुकसान होत असले तरी बाजारात व्यवहार करणाऱ्या सर्वाना ही जोखीम स्वीकारणे भाग आहे. हा एक शिक्षेचाच प्रकार आहे. अशी शिक्षा केल्याने अनेक गुंतवणूकदारांचे नुकसान होण्याचीच शक्यता असल्याने शक्यतो अशी कारवाई बाजार नियामक मंडळाकडून घाईघाईत केली जात नाही. त्या संबधी योग्य त्या पूर्वसूचना दिल्या जातात. मात्र मोठा गैरव्यवहार आढळल्यास सेबीकडून धडक कारवाई केली जाऊ शकते. यासर्वच प्रक्रियेवर अथवा सेबीने घेतलेल्या कोणत्याही निर्णयावर कंपनी अथवा भागधारक यांना सिक्युरिटीज अपिलेट ट्रिब्युनलकडे (सॅट) अपील करता येते त्यांनीही योग्य निर्णय दिला नाही तर उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागतात आणि निर्णय मान्य नसल्यास त्यावर अपील हे प्रकार सर्वोच्च न्यायालयातून न्याय मिळेपर्यंत चालू रहातात. सन 2005 मध्ये 90% भागधारकांच्या संमतीने कॅटबरी ने आपले शेअर्स ₹ 500/- मोबदला देऊन डिलिस्ट केले होते राहिलेल्या शेअरहोल्डर्सनी एकत्र येऊन मुंबई उच्च न्यायालयात या किमतीस आव्हान दिले त्यावर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने भागधारकांना ₹ 2014.50 प्रतिशेअर्स द्यावेत असा आदेश दिला होता.

    सक्तीने शेअर्स डिलिस्ट होण्याची काही प्रमूख कारणे-

    ● शेअरबाजाराच्या नियमावलीचे पालन न करणे
    ● शेअरबाजारात 6 महिन्याहून अधिक काळ खरेदीविक्री व्यवहार न होणे किंवा व्यवहारांचे प्रमाण तुरळक असणे
    ● दिवाळखोरी, सतत तीन वर्षाहून अधिक काळ नफा न मिळवणे, कंपनीच्या मालमत्तेचे मूल्यांकन उणे असणे.

    सन्मानाने डिलिस्ट होऊ घातलेल्या कंपनीची ऑफर मान्य करून शेअर्स देण्याची सक्ती कोणत्याही भागधारकावर नाही त्याची इच्छा असल्यास ते त्यापुढेही कंपनीचे भागधारक म्हणून राहू शकतात परंतू असे शेअर्स विकण्यासाठी त्यांच्यावर मर्यादा येतात हे लक्षात घ्यावे डिलिस्ट झालेल्या कंपनीचे शेअर्स त्यानंतर एक वर्षापर्यंत अंतिमतः मान्य केलेल्या भावाने खरेदी करण्याचे बंधन प्रवर्तकावर आहे. डिलिस्टिंग होणाऱ्या शेअर्सचा भाव सर्वसाधारणपणे वाढतो त्यापेक्षा अधिक खरेदी किंमत भागधारकांना मिळत असल्याने अशा शेअर्सवर बारकाईने लक्ष ठेवून त्यात गुंतवणूक करणे ही एक गुंतवणूक पद्धतही होऊ शकते. यात कंपनीने डिलिस्टिंग मागे घेतल्यास बाजारभाव मोठ्या प्रमाणात पडझड होऊ शकेल एवढीच जोखीम आहे.

    ©उदय पिंगळे
    अर्थ अभ्यासक
    (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य असून महारेरा सलोखा मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत, लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक असल्याची नोंद घ्यावी)

    आणखी वाचा

  • पैशाचे नियोजन (Financial Planning) : 7 महत्वाचे टप्पे

    पैशाचे नियोजन (Financial Planning) : 7 महत्वाचे टप्पे

    पैसा हा आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्या जीवनातील बऱ्याचशा गोष्टीवर पैशांचा प्रभाव पडतो, मग तो कमी असला तरी किंवा जास्त असला तरी. या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीचा विचार हा व्हायलाच हवा, म्हणून या लेखामध्ये आपण पैशाविषयी बोलूया…( Financial Planning )

    पैशाचं योग्य (Financial Planning) नियोजन करण्यासाठी आपण काही महत्वाचे मुद्दे पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला किचकट वाटणारं पैशाचं नियोजन जरा सोपं होऊन जाईल.

    १. उत्त्पन्न : पैशाचं नियोजन करताना पहिला मुद्दा आहे तुमचं उत्पन्न!  तुम्ही नोकरदार असा की व्यावसायिक, बेरोजगार असा किंवा गृहिणी, तुमचे उत्पन्नाचे स्रोत कोणते आहेत आणि ते तुम्ही कसे वाढवू शकता जेणेकरून तुमच्याकडे येणारा पैसा वाढेल याचा तुम्हाला सर्वात आधी विचार करावा लागेल.

    २. खर्च : दुसरा आणि महत्वाचा मुद्दा असा की तुमचा पैसा खर्च कुठे आणि कसा होतो याची नोंद तुम्ही रोजच्या रोज ठेवायला हवी. बचतीचा मार्ग न स्वीकारता जर तुम्ही वारेमाप पैसा खर्च करत असाल, तर त्याचा तुमच्या आर्थिक भविष्यावर नक्कीच परिणाम होऊ शकतो.

    ३. बचत : आपला तिसरा मुद्दा आहे बचत. आप कितना कमाते हो पेक्षा आप कितना बचाते हो हे सध्या जास्त महत्वाचं झालंय ! बचत करण्यासाठी अतिरिक्त खर्च टाळणे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे बचत करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधून काढा.

    ४. गुंतवणूक : पैसा वाढवल्याने वाढतो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे आपला चौथा मुद्दा आहे गुंतवणूक ! बचत केलेल्या पैशाची विभागणी करा आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. प्रसिद्ध गुंतवणूकदार Warren Buffett यांचा एक फेमस quote आहे  “If you don’t find a way to make money while you sleep, you will work until you die” म्हणजे जर तुम्हाला झोपेत पैसे कमवण्याचा मार्ग सापडला नाही, तर तुम्हाला मरेपर्यंत कामच करत राहावं लागेल.

    ५. कर्ज : आपला पुढचा मुद्दा आहे कर्ज! तुमची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे नेहमी पुरेसा पैसा असेलच असे नाही. त्यामुळे वेगवेगळ्या मार्गाने कर्ज घेणे आणि ते सुद्धा सोयीस्कर अटींसह हे खूप गरजेचं आहे.

    ६. अर्थसंकल्प : जसा देशाचा अर्थसंकल्प असतो तसा देशातील प्रत्येक नागरिकानेसुद्धा आपला स्वतःचा वैयक्तिक अर्थसंकल्प बनवला पाहिजे. अर्थसंकल्प बनवल्यामुळे आपल्या पैशांचे सुयोग्य नियोजन करण्यास मदत होते. यात तुमचे उत्पन्न, खर्च, कर्ज आणि गुंतवणूक अशा सर्व गोष्टींचा ताळेबंद असायला हवा.

    ७. सातत्य : शेवटचा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सातत्य! आपल्याकडे आर्थिक नियोजनात कधीच सातत्य आढळत नाही. त्यामुळे वरील सर्व गोष्टींमध्ये तुम्ही कितपत सातत्य राखता यावर तुमचे आर्थिक भविष्य अवलंबून असेल.

    आणखी वाचा