खेळण्याच्या वयात कोकच्या ६ बाटल्यांचा संच विकून ५ सेंट्सचा स्वकष्टाने नफा मिळवणाऱ्या वॉरन बफे यांनी पुढे गुंतवणूक क्षेत्राद्वारे अफाट संपत्ती कमावली. तुम्ही म्हणाल, प्रचंड संपत्ती तर जगातील अनेक लोकांनी कमावली आहे. मग बफेंनी यात जगावेगळं असं केलं तरी काय?
कुठलाही कायदा न मोडता, करचुकवेगिरी न करता, नैतिकतेच्या मार्गाने यशाचं शिखर सर करणाऱ्या फार कमी व्यक्ती असतात. त्यांपैकी एक व्यक्ती असणं आणि त्याच्याही पुढे जाऊन, मिळवलेल्या संपत्तीपैकी ९० टक्के संपत्ती फारसा गाजावाजा न करता समाजाला परत देणं, हेच बफेंच्या यशाचं वेगळेपण आहे.
‘समभागधारक हेच कंपनीचे मालक’ अशी सर्वस्वी वेगळी समीकरणं प्रमाण मानून, यशाच्या वाटेवरून एकटं चालत न जाता आपल्या सहकारी आणि कर्मचाऱ्यांनाही यशाचं क्षितिज दाखवणाऱ्या बफेंकडून आपल्याला शिकण्यासारख्या असंख्य बाबी आहेत.
जगभरात गुंतवणूक गुरू म्हणून प्रसिद्ध असलेले वॉरन बफे यांचा आज जन्मदिवस. जगातील कोट्यवधी लोक शेअर बाजारातून पैसे कमविण्यासाठी त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा अवलंब करतात. गुंतवणुकीबाबत त्यांनी केलेले मार्गदर्शन आजही अतिशय प्रभावी ठरते. वॉरन बफे हे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांपैकी एक मोठे नाव आहे. त्यांच्या गुंतवणुकीचा जगभरातील शेअर बाजारावर परिणाम होतो. जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत ते आजही सातव्या स्थानावर आहेत.
बफे यांना आपल्या युवा अवस्थेतच Business आणि Investing विषयी आवड निर्माण झाली आणि त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षापासूनच गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. कोलंबिया बिजनेस स्कूलमधून ते पदवीधर झाले जिथे ते बेंझामिन ग्रॅहम यांच्याकडून गुंतवणुकीचे तत्त्वज्ञान आणि व्हॅल्यू इन्वेस्टिंगच्या कन्सेप्टविषयी बरेच काही शिकले. ओरॅकल ऑफ ओमाहा म्हणून ओळखले जाणारे वॉरन बफे आत्तापर्यंतच्या सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक समजले जातात.
वॉरन बफे यांचे 5 गुंतवणूक मंत्र :
1. गुंतवणुकीकडे दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा :
शेअर्स विकत घेतल्यानंतर एका दिवसात किंवा फार कमी वेळात विकण्यापेक्षा चांगल्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करून त्यामध्ये तुमची गुंतवणूक दीर्घकाळ टिकवून ठेवणे चांगले. शेअर मार्केटमधील दीर्घकालीन गुंतवणूक शेवटी जास्त परतावा देते, परंतु त्यासाठी तुम्ही योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
2. रातोरात श्रीमंत होण्याचा विचार करू नका :
बाजारात लवकरात लवकर श्रीमंत होण्याची हाव तुम्हाला चुकीच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. चांगला Portfolio तयार करणे ही एक मोठी प्रक्रिया आहे. यासाठी खूप संयम लागतो. बाजारातून चांगल्या परताव्यासाठी तुम्ही अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी ज्यांचे Business Model तसेच त्यांचे व्यवस्थापन चांगले आहे.
3. ध्येय ठेवून गुंतवणूक करा :
ध्येयाशिवाय केलेली गुंतवणूक अनेकदा फायदेशीर नसते. तुम्ही तुमच्या कष्टाने कमावलेला पैसा हुशारीने गुंतवा. त्या गुंतवणुकीत पैसा कसा वाढणार आहे हे समजत नसेल, तर त्यापासून दूर राहणेच बरे.
4. वैविध्य समजून घ्या :
‘जवळची सर्व अंडी एका टोपलीत ठेवू नये’ हे सूत्र गुंतवणुकीलाही लागू केले पाहिजे. तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी असलेली रक्कम वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वितरित करावी. संपूर्ण पैसा एकाच ठिकाणी गुंतवू नका, सर्वांमध्ये समतोल ठेवा.
5. रास्त भावाने करा शेअर्सची खरेदी :
एखादी कंपनी उत्तम दर्जाची उत्पादने बनवत आहे किंवा ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देत आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही त्यात गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. वॉरन बफे असे सांगतात, एखाद्या मोठ्या कंपनीचे शेअर्स मोठ्या किंमतीला खरेदी करण्यापेक्षा चांगल्या कंपनीचे शेअर्स वाजवी किंमतीला विकत घेणे कधीही चांगले.
वॉरन बफे यांचा हा प्रसिद्ध विचार प्रत्येक गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीने कायम लक्षात ठेवला पाहिजे.
“खर्च केल्यानंतर जे वाचते, त्याची बचत करु नये,
तर बचत केल्यानंतर जे राहते, त्यातून खर्च केला पाहिजे.”
अमेरिकेतील प्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनी Apple Inc ने आपल्या व्यवस्थापनामध्ये मोठे बदल केले असून, भारतीय वंशाचे केवन पारेख यांची कंपनीचे नवीन मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) म्हणून नियुक्ती केली आहे. ते 1 जानेवारी 2025 पासून हा पदभार स्वीकारतील आणि लुका मेस्त्री यांची जागा घेतील. पारेख हे सध्या Apple मध्ये उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. ते मूळ भारतीय वंशाचे असून, त्यांनी कंपनीच्या आर्थिक धोरणांमध्ये आणि कामकाजात महत्वाचे योगदान दिले आहे. Apple मध्ये केविन पारेख गेल्या 11 वर्षांपासून कार्यरत आहेत, ज्यामुळे त्यांना कंपनीतील आर्थिक प्रणालीचे सखोल ज्ञान आहे.
52 वर्षीय केवन पारेख यांनी मिशिगन विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे आणि त्यानंतर शिकागो विद्यापीठातून एमबीए केले आहे. ते आता थेट CEO टीम कुक यांना रिपोर्ट करणार आहेत आणि त्यांचा Appleच्या टीममध्ये एक महत्त्वाचा सहभाग असेल.
Apple ने एका आठवड्यात दुसऱ्यांदा व्यवस्थापनात मोठा बदल केला आहे. iPhone 16 लवकरच बाजारात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीने आपल्या व्यवस्थापनामध्ये हे महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.
लुका मेस्त्री यांच्याकडे आता नवीन जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, केवन पारेख यांनी लुका मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे. लुका मेस्त्री गेले काही महिने केवन पारेख यांना ऍपलच्या मुख्य आर्थिक अधिकारी (सीएफओ) पदासाठी तयार करत होते.
पारेख यांनी यापूर्वी ऍपलमध्ये विक्री आणि विपणन विभाग हाताळले आहेत, त्यामुळे त्यांना ऍपलच्या व्यवसायाचा व्यापक अनुभव आहे. त्यांनी याआधी थॉमसन रॉयटर्स आणि जनरल मोटर्ससारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी देखील काम केले आहे. रॉयटर्समध्ये त्यांनी चार वर्षे उपाध्यक्ष पदावर काम केले, तर जनरल मोटर्समध्ये बिझनेस ग्रोथ डायरेक्टर म्हणून ते कार्यरत होते.
ऍपलचे सीईओ टीम कुक यांनी नवीन सीएफओ केवन पारेख यांच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. टीम कुक म्हणाले की, “केवन पारेख हे ऍपलच्या टीमचा महत्त्वाचा भाग आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल.” लुका मेस्त्री यांनी देखील त्यांच्या नवीन जबाबदारीबद्दल उत्साह व्यक्त केला आहे आणि पारेख यांच्या नेतृत्वाखाली कंपनीला यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
आजच्या तरुणाईला वारंवार शेती किंवा संबंधित व्यवसायांकडे वळण्याची गरज आहे, असं सांगितलं जातं. मात्र, प्रत्यक्षात या क्षेत्रात आधुनिक प्रयोग, नवं तंत्रज्ञान आणि नवनवीन संधी शोधणाऱ्या तरुणांची संख्या अतिशय अल्प आहे यातच, जेव्हा पुरुषी वर्चस्व असलेल्या व्यवसायात एखादी महिला उतरते, तेव्हा तिला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. बायकांनी फक्त बायकांची कामं करावी, असा पारंपरिक दृष्टिकोन आजही प्रचलित आहे. त्यामुळे, महिला अशा व्यवसायात उतरली की, तिला हिणवलं जातं, आणि कधी कधी तिला “तू नाही करू शकणार” असं म्हणून मानसिक खच्चीकरण केलं जातं.
मात्र त्यांना जर योग्य वेळी योग्य संधी मिळाल्या, तर त्या कोणतंही काम करु शकतात. मग ते खेळ असो, राजकारण असो, सैन्य असो किंवा व्यवसाय असो, महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली प्रतिभा आणि यश सिद्ध केलं आहे. आज आपण अशाच एका २४ वर्षीय कृषीकन्या बद्दल चर्चा करणार आहोत जिने आपल्या प्रचंड मेहनतीच्या बळावर वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी दुमजली गोठा उभारून यशस्वी दुग्धव्यवसाय उभारून तरुणाईसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.
ती तरुणी आहे अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील पारनेर तालक्यातील निघोज या गावाची रहिवासी श्रद्धा ढवण. श्रद्धाने आपले जीवन संघर्षाच्या बळावर यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेलं आहे. भौतिकशास्त्रात एम. एस. सी. शिक्षण घेतलेल्या श्रद्धा तायक्वांडो खेळाडू म्हणूनही प्रसिद्ध आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या श्रद्धाची लहानपणापासूनच म्हशींच्या व्यापारात घेतलेली मेहनत आणि त्याचा परिणाम तिच्या भविष्यावर झाला.
व्यवसायाची सुरुवात
शेतकरी कुटुंबातील श्रद्धाच्या वडिलांचा म्हशी खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्यामुळे घरी म्हशी आणल्या जायच्या. कधी चार-पाच म्हशी घरी असायच्या तर कधी एकही नसायची. घरची परिस्थितीही हलाखीची होती. वडील अपंग, भावंडं लहान म्हणून घरात जबाबदार व्यक्ती श्रद्धाच होती.
लहानपणापासूनच या वातावरणात वाढलेली श्रद्धा जसजशी मोठी होत गेली तसतसे आपल्या वडिलांकडून आता काम नाही, त्यांना आर्थिक हातभार लावला पाहिजे, या जाणिवेतून वयाच्या अकराव्या वर्षापासून तीही हे काम शिकू लागली. मुळातच अतिशय बुद्धिमान आणि मेहनती असलेल्या श्रद्धाने पुढे कॉलेज ला गेल्यापासून आपल्या भावाच्या मदतीने मोठ्या धडाडीने दोन म्हशी घेऊन पशुपालन आणि दुग्धव्यवसायाचा श्रीगणेशा केला.
प्रगती आणि विस्तार:
सुरुवातीला दोन म्हशींनी सुरूवात केली खरी, मात्र खरा प्रवास तर आता सुरु झाला होता. घर सांभाळण्यासाठी किंवा शिक्षणासाठी ती घर सोडून शहरात गेली नाही, तर गावातच बीएससी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. ती स्वतःच्या हाताने म्हशींचं दूध काढायची आणि मोटार सायकलवर बसून स्वतः दूध विकायला जायची. हा व्यवसाय श्रद्धाने नियोजनपूर्वक सांभाळला. व्यवसायात नफा मिळायला लागल्यावर तेच पैसे गुंतवून तिने व्यवसाय वाढण्यावर भर दिला. प्रसंगी कर्ज काढून तिनं उत्पादन कसं वाढेल, दुधाची गुणवत्ता कशी सुधारेल याकडे लक्ष दिलं. त्यासाठी म्हशींना कोणतं खाद्य दिलं गेलं पाहिजे याचा तिने नीट अभ्यास केला. शेण काढण्यापासून ते दूध काढणं, दूध घालणं, गोठा साफ करणं ही सगळी कामं तिने स्वतः केली. मात्र, जसजशी म्हशींची संख्या वाढत गेली, तसतसं कामगार ठेवण्याची गरज भासू लागली. आजच्या घडीला, श्रद्धाकडे तब्बल ८० म्हशी आणि तेवढी क्षमता असणारा दोन मजली गोठा आहे.
जोडव्यवसायाचा श्रीगणेशा
व्यवसाय करत असताना, काही वर्षांनंतर श्रद्धाने गोठ्यावर विविध प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली. गोठ्यातील मलमूत्र, शेण, आणि वाया जाणारे पाणी यांचा सखोल अभ्यास करून तिने शून्य कचरा व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केला. यासाठी तिने तज्ज्ञांच्या मदतीने बायोगॅस प्रकल्प उभारला, ज्यामध्ये शेण आणि मलमूत्राचा वापर केला गेला. या प्रकल्पातून पुढे बायोगॅसचे रूपांतरण करून वीज निर्मितीही केली गेली.
घरातील स्वयंपाकाचा गॅस, गोठ्यातील वीज आणि बोअरवेल, विहिरी, तसेच बायोगॅससाठी लागणाऱ्या दोन मोटारींसाठी लागणाऱ्या संपूर्ण वीजेचा खर्च, म्हणजेच जवळपास ८ ते १० हजार रुपये या प्रकल्पामुळे वाचले. याशिवाय, बायोगॅसच्या प्रक्रियेमुळे शेणातून निघणारा मिथेन गॅस जाळला जातो, जो पर्यावरणासाठी हानिकारक असतो. परिणामी, पर्यावरणावर होणारे दुष्परिणामही कमी झाले.
बायोगॅस प्रकल्पातून बाहेर पडणारी स्लरी शेतकऱ्यांनी वापरण्यास सुरुवात केली आहे. स्लरीमध्ये नायट्रोजनचे प्रमाण अधिक असल्यामुळे ती सेंद्रिय आणि विषमुक्त शेतीसाठी उपयुक्त आहे. ऑरगॅनिक कार्बन वाढविण्यासाठीही स्लरीचा वापर केला जातो. साधारणपणे ५ ते १० रुपये प्रति लिटरने ही स्लरी विकली जाते, ज्यामुळे या प्रकल्पातूनही उत्पन्न मिळू लागले आहे.
याशिवाय, श्रद्धाने ‘गांडूळ खत प्रकल्प’ आणि जिवाणू जैविक खत प्रकल्प’ही सुरू केले आहेत. बायोगॅस प्रकल्पासाठी वापरात येणाऱ्या शेणाव्यतिरिक्त उरलेले शेण या प्रकल्पांत कुजवले जाते आणि त्याचा योग्य वापर केला जातो. या उपक्रमांमुळे श्रद्धाने गोठ्यावर शाश्वत आणि पर्यावरणपूरक व्यवस्थापन पद्धती निर्माण केली आहे.
आपल्या अनुभवाच्या बळावर मिळवलेले ज्ञान श्रद्धाने स्वतःपर्यंत मर्यादित न ठेवता पशुपालन आणि दुग्धव्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी प्रशिक्षण केंद्राची उभारणी केली. खरंतर श्रद्धाचे व्यवसायातील यश पाहून अनेकांना प्रेरणा मिळू शकते. तिच्या यशाचा अनुभव पाहून एखाद्याला म्हशीपालन व्यवसाय, दुग्धव्यवसाय सुरू करण्याची इच्छा होऊ शकते किंवा ‘जर एक मुलगी हे करू शकते, तर मी का नाही?’ असा विचार करायला लावू शकतो. पण या यशामागील खडतर प्रवास, सुरुवातीच्या अडचणी आणि संघर्ष यांचे महत्व समजून घेणे आवश्यक आहे. म्हणूनच श्रद्धाच्या प्रशिक्षण केंद्रात तरुणांना अधिक प्राधान्य दिले जाते, ज्यामुळे त्यांना या प्रवासाची खरी जाणीव होऊ शकेल.
शून्य कचरा व्यवस्थापन पद्धतीसह, श्रद्धाच्या प्रशिक्षण केंद्रात बायोगॅसनिर्मिती, बायोवीजनिर्मिती, मुरघास, जीवाणू जैविक खत, गांडूळ खत, आणि गोमूत्रापासून बनविण्यात येणारी स्लरी यांसारख्या विविध प्रकल्पांचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षणार्थी ‘श्रद्धा फार्म’मधील कामकाजाची पद्धत समजून घेतात आणि त्यांना या प्रकल्पांद्वारे कशा प्रकारे शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने उत्पन्न मिळवू शकतो याची जाणीव होते. या विश्वासाने प्रशिक्षणार्थी केंद्रातून बाहेर पडतात आणि त्यांच्या यशाचा पाया घट्ट होत जातो.
एका म्ह्शीपासून सुरु झालेला हा व्यवसाय आता प्रचंड वाढला आहे. श्रद्धा त्या हजारो लाखो तरुणींसाठी प्रेरणास्त्रोत आहे. सोबतच कृषी क्षेत्रात “श्रद्धा फार्म” सध्याच्या घडीला खूप गाजलेलं नाव आहे. एक दोन म्हशींपासून सुरु झालेला हा व्यवसाय महिन्याला ७ ते ८ लाख श्रद्धाला मिळवून देतो.
शेती आणि पशुपालन हे क्षेत्र प्रचंड शारीरिक श्रम आणि कष्टांची मागणी करणारं क्षेत्र आहे, म्हणूनच अनेकजण या व्यवसायाकडे वळायला कचरतात. याचाच परिणाम म्हणून, शेतीला तरुणाईकडून कमी महत्त्व दिले जाते आणि काही लोकांना वाटते की, हा व्यवसाय फायदेशीर नाही. पण हा एक गैरसमज आहे. सध्याच्या काळात, तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती अधिक सुलभ आणि परिणामकारक होऊ शकते. मात्र, शेतीतून उत्पन्नाची शाश्वतता कमी असल्याने शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायांचाही विचार व्यावसायिक दृष्टिकोनातून करायला हवा.
पशुपालन हा एक दीर्घकालीन चालणारा व्यवसाय आहे. शेतकऱ्यांवर कितीही संकटे आली, तरी पशुपालन आणि शेतीपूरक इतर व्यवसाय शेतकऱ्यांना तारून नेऊ शकतात. त्यामुळे स्वतःचं करिअर घडवायचं असेल, स्वतःचा पैसा उभा करायचा असेल, तर केवळ मुलांनीच नव्हे, तर मुलींनीही या क्षेत्रात निसंकोचपणे येण्याची आवश्यकता आहे.
मित्रांनो, श्रद्धासाठी डेअरी फार्मचं काम करणं अगदीच सोपं नव्हतं, कारण तिला आपल्या मित्रमैत्रिणींच्या टोमण्यांना सामोरं जावं लागलं. गावातल्या लोकं श्रद्धाच्या कामावरून वेगवेगळे टोमणे मारत असत, पण श्रद्धाने त्यांच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. तिच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती, त्यामुळे श्रद्धाने डेअरी फार्मला यशस्वी व्यवसाय बनवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली.
तिच्या कार्याची दखल घेत तिला मागील वर्षी ‘एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट’ बारामती येथे जागतिक महिला दिनानिमित्त ‘शारदा सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
श्रद्धा त्या हजारो, लाखो तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत आहे जे स्वतःच्या परिस्थितीला दोष देत काहीतरी करण्याची उमेद हारून बसलेत आणि तिचं कार्य त्या हजारो लोकांना दिलेली चपराक सुद्धा; जे म्हणतात, मुलगी म्हणजे परक्याचं धन, मुलगी म्हणजे काळजाला घोर. पण या विचारांना तडा देत, घरच्या व्यवसायासाठी लहानपणापासूनच झटणारी श्रद्धा आज आपल्या वडिलांचा खंबीर आधार बनली आहे. मुलगी म्हणजे बापाचा अभिमान, मुलगी म्हणजे बापाचा खरा आधार, हे तिने आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवलं आहे.
तुम्ही प्रवासासाठी गाडी शोधत असता, पण गाड्यांची उपलब्धता कमी असते आणि तुम्हाला घाई सुद्धा असते,अशा वेळेला तुम्ही काय करता? तर तेव्हा तुम्ही मोबाईलवर ओला किंवा उबर सारख्या ट्रान्सपोर्ट कंपन्यांच्या ऍप्सचा उपयोग करून सहज गाडी बुक करता. पण तुम्ही कधी विचार केलाय का की हे एवढं आरामदायी समाधान कुणाच्या कल्पकतेमुळे शक्य झालं? आज आपण त्याच व्यक्तीचा प्रवास पाहणार आहोत, ज्यांनी ओला या कंपनीची स्थापना करून भारतीय कॅब ट्रान्सपोर्ट क्षेत्रात क्रांती घडवली आणि ज्यांना भारताचा इलोन मस्क म्हटलं गेलं. त्या व्यक्तीचे नाव म्हणजे ओला कंपनीचे संस्थापक ‘भाविश अग्रवाल’. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, त्यांनी अनेक अडचणींवर मात करून, सातत्य, कल्पकता आणि मेहनतीच्या जोरावर मिळवलेल्या यशावर एक नजर टाकूया.
प्रारंभिक जीवन, शिक्षण आणि नोकरी
भाविश अग्रवाल यांचा जन्म 28 ऑगस्ट 1985 रोजी पंजाबमधील लुधियाना येथे झाला. बालपणापासूनच ते अतिशय बुद्धिमान आणि मेहनती होते. त्यांचे आई वडील हे दोघेही पेशाने डॉक्टर आहेत. वडील हे ऑर्थोपेडिक सर्जन तर आई ह्या पॅथोलॉजिस्ट आहेत. आयआयटी मुंबई येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी. टेक. पूर्ण केल्यानंतर भाविश यांनी 2007 मध्ये मायक्रोसॉफ्ट रिसर्च इंडिया येथे रिसर्च इंटर्न म्हणून आपल्या कॉर्पोरेट प्रवासाची सुरुवात केली. येथे त्यांनी टेक्नॉलॉजीवर आधारित विविध प्रकल्पांमध्ये काम केले.
मायक्रोसॉफ्ट रिसर्चमध्ये ते विविध टेक्नॉलॉजीवर संशोधन करत होते आणि या शोधाच्या प्रक्रियेतच त्यांना दोन पेटंट्स मिळाले, परंतु 9 ते 5 च्या सुरक्षित नोकरीत त्यांना समाधान मिळत नव्हतं. त्यांच्या मनात स्वतःच्या व्यवसायाची तळमळ निर्माण झाली होती. उद्योजक होण्याची त्यांची तीव्र इच्छा होती, पण सुरक्षित नोकरीमुळे ते अडकले होते.
त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे 2008 मध्ये मायक्रोसॉफ्टने त्यांना सहाय्यक संशोधक म्हणून नियुक्त केले. दोन वर्षांहून अधिक काळ मायक्रोसॉफ्टमध्ये काम करताना भाविशला एक उद्योजक म्हणून काहीतरी नवीन करण्याची ओढ लागली होती.
मनात कसा आला ‘ओला’ सुरु करण्याचा विचार?
भाविश अग्रवाल सांगतात की ओला (Ola) ची सुरुवात त्यांच्या एका प्रवासाच्या वैयक्तिक वाईट अनुभवातून झाली. एकदा त्यांनी बेंगळुरूहून बंदीपूरला जाण्यासाठी एक कार बुक केली होती. मात्र, त्या प्रवासाचा अनुभव खूपच निराशाजनक होता. प्रवासाच्या दरम्यान अर्ध्या रस्त्यातच ड्रायव्हरने अतिरिक्त पैसे मागायला सुरुवात केली, शिवाय त्याचं वागणं आणि बोलणं अत्यंत उद्धट होतं. या गैरवर्तणुकीमुळे त्रासून भाविश यांना रस्त्यातच गाडी सोडावी लागली आणि उर्वरित प्रवास बसने करावा लागला.
बसमधून प्रवास करताना भाविश यांच्या मनात वारंवार विचार येत होता की, अशा वाईट सेवेमुळे प्रवाशांचे किती हाल होत असतील. त्यांना जाणवलं की त्यांच्या सारखे अनेक लोक असतील, ज्यांना दर्जेदार कॅब सेवा मिळत नाहीये. आणि त्याच वेळी त्यांच्या मनात एक कल्पना आली की, एक आपण अशी सेवा सुरू करावी जी लोकांना गुणवत्तापूर्ण, विश्वासार्ह आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा देईल.
ओलाची सुरुवात आणि सुरुवातीचा संघर्ष
कल्पकता आणि कौशल्य यांचा व्यवस्थित समन्वय साधला, तर नवनिर्मितीचा चमत्कार घडतोच! भाविश अग्रवाल यांनी हेच सिद्ध करून दाखवलं आहे. त्यांनी आपल्या दूरदृष्टी आणि धडपडीच्या जोरावर ओला कॅब्सची कल्पना प्रत्यक्षात आणली. व्यवसायात येणाऱ्या अडथळ्यांना त्यांनी संधीमध्ये बदललं आणि आपल्या जिद्दीने एक नवीन यशस्वी प्रवासाला सुरुवात केली.
कॅब सेवा क्षेत्रातील सर्व कमतरता समजून घेतल्यानंतर, भाविश यांनी उत्तम ग्राहकांना उत्तम अनुभव आणि परवडणाऱ्या किमतींसह एक कॅब एग्रीगेटर कंपनी सुरू करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी जोधपूरमधील आणखी एक आयआयटीयन मित्र अंकित भाटी यांना सोबत घेतले. 3 डिसेंबर 2010 रोजी मुंबईत त्यांनी एकत्रितपणे ‘ओलाट्रिप्स डॉट कॉम’ वेबसाइट लॉन्च केली, ज्यामध्ये ग्राहक बाह्य प्रवासासाठी कार बुक करू शकत होते.
सुरुवातीला, भाविश आणि अंकित यांच्याकडे या कल्पनेत गुंतवणूक करण्यासाठी फारशी आर्थिक क्षमता नव्हती आणि कोणत्याही गुंतवणूकदाराकडून आधारही मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी आपल्या बचतीमधूनच ऑनलाइन ऍप्लिकेशन विकसित करण्यास सुरुवात केली. जून 2012 मध्ये, Olacabs ने एक मोबाईल ॲप लाँच केले. ओला ऍप लाँच झाल्यानंतर त्यांना ‘टायगर ग्लोबल मॅनेजमेंट’ कडून 5 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक मिळाली, तसेच अनुपम मित्तल आणि स्नॅपडीलचे कुणाल बहल यांच्याकडूनही निधी उभारला. सुरुवातीच्या वर्षांत, कॅब बुकिंग फर्मचे वापरकर्ते फोन कॉलद्वारे कॅब बुक करत होते. नंतर ॲप आल्यानंतर त्याचा वापर वाढण्यास सुरुवात झाली.
पण प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता, भाविश अग्रवाल यांना भारतीय बाजारपेठेत ओला सादर करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एकदा नाही, तर प्रत्येक वेळी जेव्हा त्यांनी काहीतरी नवीन आणले किंवा नवीन बाजारपेठेकडे पाऊल टाकले, तेव्हा त्यांना संघर्ष करावा लागला.
प्रारंभीच्या काळात, रेडिओ ट्रॅफिक सर्व्हिसेस आणि फास्टट्रॅकसारख्या स्थानिक मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करणे ओलासाठी अवघड होते, परंतु यामुळे भाविश थांबले नाहीत. या अडचणींनी त्यांना वेगळ्या पद्धतीने विचार करण्यास आणि अनोख्या, पण समस्येचे निराकरण करणाऱ्या उपायांकडे पाहण्यास प्रवृत्त केले. याच वेळी ओलाने ऑल इंडिया परमिट असलेल्या ड्रायव्हर्सना कामावर घेण्यास सुरुवात केली आणि इंटरसिटी प्रवास सुविधा सुरू केली.
ओलाचा यशस्वी प्रवास
भाविश अग्रवाल यांच्या नेतृत्वात ओला आज भारतातील एक अग्रगण्य स्टार्टअप म्हणून उभी राहिली आहे. त्यांनी स्वतः नवीन कार विकत न घेता ड्रायव्हर्सना जोडण्यावर भर दिला, ज्यामुळे अनेक ड्रायव्हर्सना रोजगार मिळाला. त्यांनी ओला सेवेला एका अॅपद्वारे इंटरनेटशी जोडले, ज्यामुळे लोकांना राईड बुकिंगची सुविधा मिळाली. भाविश यांनी काही प्रसंगी स्वतः ओला ड्रायव्हर बनूनही सेवा दिली आहे.
ओला कॅब सर्व्हिसची खासियत म्हणजे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर. हे अॅप लोकांना त्यांच्या राईडसाठी सर्व आवश्यक माहिती देते, ज्यात रेटिंग्स, रिव्ह्यूज आणि क्वालिटी चेकिंगसाठी सुविधा आहेत. यामुळे ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवरूनच सर्व काही नियंत्रित करता येते.
भाविश यांची दूरदृष्टी आणि सेवा गुणवत्ता यामुळे ओलाचा व्यवसाय झपाट्याने वाढला. त्यांनी कमी दरात उत्कृष्ट सेवा देण्याचा विचार केला आणि 2013-14 मध्ये ओलाचा टर्नओव्हर सुमारे 418.25 कोटी रुपयांचा होता. आज, 75 हून अधिक शहरांमध्ये 1.75 लाखांपेक्षा अधिक लोक रोज ओला वापरतात. भाविश यांच्याकडे ओलामध्ये 6.7% हिस्सेदारी आहे, ज्यामुळे त्यांची नेट वर्थ महत्त्वाची ठरते. ओलाचे सध्याचे मूल्यांकन $4.8 बिलियन डॉलर्सपेक्षा (40000 कोटी रुपये) जास्त आहे, जे तिच्या यशाची साक्ष देते.
2017 मध्ये, भाविश यांनी ओला इलेक्ट्रिकची स्थापना केली, जी इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि बाईक्स तयार करते. या व्यवसायाची वाढही लक्षणीय आहे.
ऑक्टोबर 2023 मध्ये, ओला इलेक्ट्रिकने टेमासेक आणि भारतीय स्टेट बँकेकडून 3,200 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवली. यामुळे त्यांच्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील विस्ताराला गती मिळाली. भाविश अग्रवाल यांनी दोन कंपन्या उभारल्या, ज्यांचे मूल्यांकन 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे आणि यामुळे त्यांच्या दूरदृष्टीची आणि नेतृत्वाच्या कौशल्याची झलक दिसते.
भारतातील पहिले स्वदेशी AI-प्लॅटफॉर्म ‘कृत्रिम’ केलं लॉन्च
भाविश अग्रवाल यांनी 15 डिसेंबर 2023 रोजी भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) प्लॅटफॉर्म ‘कृत्रिम’ लाँच केले. हे प्लॅटफॉर्म सुमारे 22 भारतीय भाषा समजू शकते आणि सध्या ओपन एआयच्या चॅट जीपीटी तसेच गुगलच्या जेमिनीशी स्पर्धा करत आहे .
लाँचिंग कार्यक्रमादरम्यान, अग्रवाल यांनी AI चॅटबॉटचे प्रात्यक्षिक दाखवले, जो चॅट जीपीटी आणि जेमिनीसारखचं प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम आहे. हा चॅटबॉट कवितांपासून कथांपर्यंत विविध प्रकारची सामग्री तयार करू शकतो. ‘कृत्रिम’ हे प्लॅटफॉर्म 22 भारतीय भाषा समजू शकते आणि 10 भाषांमध्ये मजकूर तयार करण्याची क्षमता ठेवते. कंपनीच्या मते, हे भारताचे पहिले पूर्ण-स्टॅक AI आहे, जे स्थानिक भारतीय ज्ञान, भाषा आणि डेटावर आधारित आहे. अग्रवाल यांनी हे साधन सर्वांसाठी उपयुक्त असल्याचे म्हटले आहे.
मानसन्मान आणि पुरस्कार
भाविश हे भारतातील सर्वात तरुण आणि श्रीमंत उद्योजकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. कठोर कॉर्पोरेट जीवनशैलीच्या पलीकडे, त्यांना सायकलिंग, स्क्वॅश खेळणे, आणि फोटोग्राफीची आवड आहे. ते एक लोकप्रिय फोटोब्लॉग देखील चालवतात, जिथे ते त्यांच्या छायाचित्रांद्वारे स्वतःचे विचार मांडतात.
2013 मध्ये भाविश आणि Ola ला दक्षिण आशियाच्या mBillionth पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, हा पुरुस्कार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उत्कृष्टता दर्शवणाऱ्या स्टार्टअप्सना दिला जातो, त्याच वर्षी, Internet and Mobile Association of India (IAMAI) द्वारे Ola ला वर्षातील सर्वोत्कृष्ट स्टार्टअप म्हणून गौरवण्यात आले. 2017 मध्ये, द इकॉनॉमिक टाइम्सने भाविश अग्रवाल यांना त्यांच्या नेतृत्वाच्या कौशल्यासाठी ET सर्वोत्कृष्ट आणि तेजस्वी पुरस्काराने सन्मानित केले.
या व्यतिरिक्त भाविश उत्तम गुंतवणूकदार, व्याख्याते आणि उत्तम छायाचित्रकार सुद्धा आहेत. ते नवीन उद्योजकांना नेहमीच प्रोत्साहन देत असतात. त्यांनी बऱ्याच नवीन स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. ज्यात ओव्हा, कार्किनोस ऑफ बिझनेस, सुपरसूट, टॉर्क मोटर्स, हॅशलर्न अशी काही उदाहरणं देता येतील. उद्योगात आणि समाजसेवेतील त्यांच्या यशाव्यतिरिक्त, भाविश एक वक्ते आणि लेखक म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी अनेक मंचांवर आपल्या विचारांचे आदानप्रदान केले आहे आणि उद्योजकतेबद्दल अगणित लेख लिहिले आहेत.
आज, भाविश आपल्या नवीन उपक्रमाच्या दिशेने लक्ष केंद्रित करत आहेत. आपल्या साहसी मनासह, त्यांनी अक्षय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. हवामान बदल आणि वाढत्या ऊर्जेच्या गरजा या जगासमोरील सर्वांत महत्त्वाच्या आव्हानांपैकी आहेत आणि भाविश या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय विकसित करण्याबद्दल वचनबद्ध आहेत. भाविश म्हणतात, “मला विश्वास आहे की अक्षयऊर्जा ही भविष्याची गरज आहे आणि या क्षेत्रात भरीव योगदान देणे हे माझे ध्येय आहे.
तसेच ते तरुणांना यशाचा मूलमंत्र देताना म्हणतात की, ”वेगवेगळ्या प्रकारच्या घटना सगळ्यांच्या आयुष्यात घडत असतात. पण त्या घटनांमधून काहीतरी शिकून, त्यांना आपल्या प्रयत्नांच्या रूपात बदलायचे असेल, तर तुमची पूर्ण मेहनत आणि समर्पण लागेल. एक दिवस, यश नक्कीच तुमच्या पायाशी असेल.” भाविश अग्रवाल यांचा हा प्रवास कठोर मेहनत, समर्पण आणि नवनिर्मितीच्या शक्तीचा पुरावा आहे.
सध्या उद्योगजगतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, टेलिग्राम मेसेजिंग प्लॅटफॉर्मचे संस्थापक पावेल दुरोव यांना फ्रान्समध्ये अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेवर टेक जगतातील अनेक दिग्गजांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामध्ये इलोन मस्क आणि इथेरियमचे संस्थापक विटालीक बुटेरीन यांनी X (ट्विटर) वर ट्विट करत आपला विरोध नोंदवला आहे.
पोलिसांचा दावा आहे की टेलिग्रामवर क्रिमिनल अॅक्टिव्हिटीजला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना अटक करण्यात आली आहे. तथापि, टेलिग्रामकडून या प्रकरणावर अद्याप कोणतीही टिप्पणी आलेली नाही. याशिवाय, दुरोवच्या अटकेवर फ्रेंच मंत्रालय आणि पोलिसांकडून सध्या कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
या पार्श्वभूमीवर, रशियन सरकारच्या दडपशाहीला न जुमानता देश सोडून टेलिग्रामच्या माध्यमातून आपले स्वतंत्र तंत्रज्ञान विश्व निर्माण करणारे पावेल दुरोव यांच्याविषयी आपण अधिक जाणून घेऊया.
पावेल दुरोव कोण आहेत?
पावेल दुरोव हे ३९ वर्षीय रशियन उद्योजक असून त्यांनी २०१३ मध्ये टेलिग्राम अॅपची स्थापना केली. याआधी त्यांनी २००६ मध्ये ‘व्हीकोंटाक्टे’ नावाचं रशियन फेसबुकसारखं सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म सुरू केलं होतं. मात्र, रशियन सरकारसोबत मतभेद झाल्यानं त्यांनी २०१४ मध्ये रशिया सोडून VK (व्हीकोंटाक्टे) मधील आपला हिस्सा विकला आणि टेलिग्राम सुरू केलं. टेलिग्राम हे अॅप युजर्सच्या गोपनीयतेला प्राधान्य देतं. यातील संदेश एन्क्रिप्टेड असल्यानं ते सुरक्षित असतात. त्यामुळे अल्पावधीतच टेलिग्रामने मोठी लोकप्रियता मिळवली. आज जगभरात कोट्यवधी लोक हे अॅप वापरतात.
२०१३ मध्ये पावेल दुरोव यांनी टेलिग्राम हे मेसेजिंग अॅप लॉन्च केलं. एन्क्रिप्टेड मेसेजिंग फीचर्सच्या माध्यमातून युजर्सची प्रायव्हसी जपत, हे अॅप लवकरच लोकप्रिय झालं. काही काळातच व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम,फेसबुक, टिकटॉक आणि वीचॅट सारख्या प्लॅटफॉर्मसाठी टेलिग्राम एक प्रभावी स्पर्धक ठरलं. सध्या जगभरात कोट्यवधी लोक हे अॅप वापरत आहेत आणि पुढील वर्षभरात हे अॅप एक अब्ज सक्रिय मासिक युजर्सचा टप्पा पार करेल, असा अंदाज आहे.
टेलिग्राम रशिया, युक्रेन आणि सोव्हिएत रशियातील इतर राज्यांमध्ये विशेषतः प्रभावी आहे. या अॅपने त्या भागात महत्त्वपूर्ण माहिती स्त्रोत म्हणून स्थान मिळवलं आहे, विशेषत: युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या संदर्भात. युक्रेन आणि रशियन अधिकारी मोठ्या प्रमाणात या प्लॅटफॉर्मचा वापर करत असून भारतात सुद्धा लाखो युजर्स विशेषतः स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी टेलिग्रामचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.
आव्हानं आणि यश
रशिया सोडल्यानंतर दुरोव यांनी अनेक देशांत भ्रमंती केली आणि अखेर दुबईत स्थायिक झाले. सध्या तिथेच टेलिग्रामचं मुख्यालय आहे. २०२१ मध्ये त्यांनी फ्रान्सचं नागरिकत्व घेतलं, तसेच ते संयुक्त अरब अमिराती आणि सेंट किट्स अँड नेव्हिसचेही नागरिक आहेत.२०१८ मध्ये रशियाने टेलिग्रामवर बंदी आणण्याचा प्रयत्न केला, पण दुरोव यांनी युजर्सच्या प्रायव्हसीसाठी सरकारला संदेश देण्यास नकार दिला. यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं, पण युजर्सचा पाठिंबा कायम राहिला
पावेल दुरोव यांची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे – ते कोणत्याही दबावाला न झुकता युजर्सची प्रायव्हसी जपण्यावर भर देतात. त्यांच्या या तत्त्वावर टेलिग्रामची उभारणी झालेली आहे, ज्यामुळे आज जगभरात ते एक महत्त्वपूर्ण संवाद माध्यम बनलं आहे.
मार्केट रेग्युलेटर सेबीने उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांच्या सह 24 अन्य एंटिटीजवर सिक्योरिटीज मार्केटमधून 5 वर्षांसाठी बंदी घातली आहे. यात रिलायंस होम फायनान्सचे जुने अधिकारीही आहेत. अनिल अंबानीवर 25 कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला असून, ते पुढील 5 वर्षांपर्यंत कोणत्याही लिस्टेड कंपनीमध्ये मोठ्या भूमिकेत असू शकणार नाहीत. सेबीने रिलायंस होम फायनान्सवर 6 महिन्यांसाठी प्रतिबंध आणि 6 लाख रुपये दंडही ठोठावला आहे. या कंपन्यांवर रिलायंस होम फायनान्सच्या फंडचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.
अनिल अंबानीवर बॅन का?
सेबीच्या तपासात असं दिसून आले की, अनिल अंबानींनी रिलायंस होम फायनान्सच्या सीनियर अधिकाऱ्यांच्या मदतीने पैशांचा गैरवापर करण्यासाठी रचना आखली होती. कंपनीच्या बोर्डने कर्ज वितरणाच्या नियमांचे उल्लंघन करण्यास मनाई केली होती, मात्र रिलायंस होम फायनान्सच्या व्यवस्थापनाने नियमांची पायमल्ली करत फंडचा गैरवापर केला. सेबीने म्हटले आहे की, या मुळे लिस्टेड कंपन्यांमधून पैशांची हेराफेरी केली गेली आणि अनिल अंबानींशी संबंधित कंपन्यांच्या प्रमोटर्सना कर्ज देण्यात आले.
निवेशकांचं मोठं नुकसान
रिलायंस होम फायनान्सने नियमांचे उल्लंघन करून कर्ज वितरण केले. त्यामुळे अनेक उधारकर्ते कर्ज फेडण्यात अपयशी ठरले आणि कंपनीने आपली देयकं चुकवली. RBIच्या नियमांनुसार कंपनीला रिसॉल्यूशन प्रोसेसमधून जावे लागले आणि शेअरहोल्डरांना यात गंभीर समस्यांना सामोरे जावे लागले. मार्च 2018 मध्ये रिलायंस होम फायनान्सच्या शेअरचं मूल्य 60 रुपये होतं, तर मार्च 2020 पर्यंत धोखाधडीची माहिती समोर येताच कंपनीच्या शेअरचा मूल्य घटून 0.75 रुपये झाला. सध्या, नऊ लाखांपेक्षा जास्त लोकांनी रिलायंस होम फाइनेंसमध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
“सविताकाकू घरात खिन्नपणे बसल्या होत्या. सकाळी त्या घराबाहेर पडल्या आणि दुपारी उशिरा घरी परत आल्या. इमारतीच्या नोटीस फलकावर काहीतरी लिहिले होते. पण सविताकाकू ते वाचू शकत नव्हत्या आणि म्हणूनच दोन दिवस पाणी येणार नाही, हे फलकावर लिहूनही त्या वाचू शकल्या नाहीत. सर्वांनी पाणी भरून ठेवले होते. पण सविता काकू केवळ वाचता आले नाही म्हणून पाण्यावाचून राहिल्या.” तेव्हा पटले,
खरंच! वाचाल तर वाचाल
जगात मानवी वाटचालीचा विचार केला, तर प्रगतीच्या प्रत्येक टप्प्याचे मूल्यमापन करताना विविध ऐतिहासिक प्रसंगांचे स्मरण करून दिले जाते. त्यात औद्योगिक क्रांती आहे, विविध वैज्ञानिक शोधांचा समावेश असतो, तसेच वैचारिक उत्थानाचेही दाखले दिले जातात. पण मानवी विकासामध्ये किंवा प्रगतीमध्ये सर्वात मोठे योगदान कोणाचे असेल, तर ते छपाई तंत्रज्ञानाचे आहे, हे सत्य आजही नाकारता येणार नाही. जोपर्यंत कागद आणि छपाईचा शोध लागला नव्हता, तेव्हापर्यंतचे जग आणि त्यानंतरचे जग यात अगदी जमीन-अस्मानाचा फरक दिसून येईल. त्या एका शोधाने मानवी जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडवून आणलेले आहे. कारण छापलेली अक्षरे, शब्द वा वाक्यांसह पुस्तके, ग्रंथ सामान्य लोकांना उपलब्ध होत गेले. त्यातून आधी वाचनाला चालना मिळाली व आपोआप लिखाणाला प्रेरणा मिळत गेली. वाचनाने अनेकांचं जीवन समृद्ध झालं असे कित्येकजण आजही मान्य करतात. कितीतरी थोर व्यक्तींचा दिवस काहीतरी वाचल्याशिवाय सुरू होत नाही आणि वाचन केल्याशिवाय संपतदेखील नाही. ज्ञान मिळविण्याची किंवा करमणुकीची इतर साधने जेव्हा नव्हती तेव्हा वाचन हाच एकमेव आधार होता. सुशिक्षित वाचनप्रिय समाज वर्तमानपत्रे, कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णने, धार्मिक ग्रंथ इ. चा वाचक बनला. ह्या वाचनामुळेच लोकांची बुद्धी, विचार, मार्गदर्शन प्रसंन्न व प्रगल्भ होत गेले. वाचनाने माणूस ज्ञानी होतो आणि त्याला पुस्तकाच्या रूपाने एक नवीन मित्र मिळतो. वाचन ही एक कला आहे. वाचन माणसाला माणूस बनविते, जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकविते, अंतर्मुख करविते, त्याचप्रमाणे जीवनात योग्य-अयोग्य काय याची जाणीव करून देते.
नियमित वाचनाचे काही प्रमुख फायदे खालीलप्रमाणे सांगता येतील :
1. शब्दसंग्रह वाढतो
2. स्मरणशक्ती सुधारते
3. लेखन कौशल्य प्राप्त होते.
4. एकाग्रता
5. मेंदूला चालना मिळते
6. सामान्य ज्ञान वाढते
7. एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष न जाता तेथील परिस्थिती, संस्कृतीचा अभ्यास करता येतो.
‘मॅझिनी’चे चरित्र वाचून स्वातंत्र्यवीर सावरकर देशभक्तीच्या प्रेरणेने प्रेरित झाले. अनेक थोर व्यक्ती ग्रंथवाचनाच्या आवडीमुळे महान झाल्या. वाचनाचा नुसता छंद नव्हे तर वाचनाचे वेड असणारेही बरेच आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हैद्राबाद श्यामराव बहादूर यांचे ग्रंथप्रेम अतुलनीय आहे. नुसत्या अक्षरांनी, शब्दांनी व पुस्तकांनी जग किती आरपार बदलून टाकलेले आहे. असे असले तरी आजच्या काळात परिस्थिती बदलत चालली आहे.
“जिथे नाही पुस्तकांचे कपाट ते घर होईल भुई सपाट” असे म्हटले जाते, ही बाब सध्या खरी ठरू लागली आहे. सध्या सोशल मीडियाचा वापर अधिक वाढला असून लहान बालकांपासून ते थोरांपर्यंत पुस्तके वाचनाचे प्रमाण घटले असल्याचे चित्र दिसते, याला कारण म्हणजे सध्या इंटरनेट मोबाईलच्या या जमान्यात नव्या पिढीने पुस्तकांकडे जणू पाठच फिरवली आहे, त्यामुळे “वाचाल तर वाचाल” असे म्हणण्याची ही वेळ आहे असं म्हटलं, तर ते नक्कीच अतिशयोक्तीचे ठरणार नाही. आज इंटरनेट वर पाहिजे असणारी
कोणतीही माहिती अगदी क्षणात प्राप्त होते, त्यामुळे अनेकदा तरुण पिढीला पुस्तक वाचणे कंटाळवाणे, रटाळवाणे वाटते. इंटरनेटवर सगळी माहिती मिळते, मग पुस्तक का वाचायचे असा प्रश्न त्यांना पडतो. परंतु आजच्या या स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने उभे राहण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे याची जाणीव या पिढीला फारशी होत नाही.
जसवंतीबेन जमनादास पोपट, पार्वतीबेन रामदास थोडानी, उमजाबेन नरनदास कुंडालिया, भानूबेन एन.टण्णा, लागूबेन अमृतलाल गोकणी, जयाबेन व्ही. विथालानी आणि दिवालीबेन लुक्का या मुंबईतील ७ बायकांनी एकत्र येत ८० रुपये उसने घेतले आणि सुरू झाला एक ध्येयवेडा प्रवास. स्वत:ला सिद्ध करण्याचा. त्याच प्रवासाची ही यशोगाथा.
साल १९५९. मुंबईतल्या गिरगावमधील एक गुजराती कॉलनी. कॉलनीतल्या ७ गृहिणी दुपारच्या फावल्या वेळेत बसल्या होत्या. वेळेचा सदुपयोग करून काहीतरी गृह उद्योग सुरु करावा असा विचार त्यांच्या डोक्यात सुरु होता. यामागे विचार फक्त एवढाच की वेळही निघून जाईल आणि घरखर्चाला हातभार देखील लागेल. कल्पना सुचली आणि तीला मूर्त रूप देण्यासाठी त्यांनी ठरवलं की घरी बसल्या-बसल्या पापड लाटण्याचा उद्योग सुरु करता येईल. उद्योग तर सुरु करायचा पण, त्यात गुंतवायला काही त्यांच्याकडे पैसे नव्हते.
शेवटी त्या मदतीसाठी ‘सर्वंटस ऑफ इंडिया’ सोसायटीचे अध्यक्ष छगनलाल पारेख यांच्याकडे गेल्या. पारेख यांनी देखील त्यांना निराश केलं नाही आणि त्यांनी या महिलांना ८० रुपये उसने दिले. या पासून त्यांनी तोट्यात गेलेल्या कंपनीकडून जुनी पापड बनवायची मशीन व काही साहित्य खरीदी केले.
यापासूनच १५ मार्च १९५९ रोजी सुरु झाला पापड बेलण्याचा उद्योग, जो पुढे चालून ‘लिज्जत पापड’ म्हणून प्रसिद्धीस पावला. आपल्याला आश्चर्य वाटेल पण उद्योगाची सुरुवात या ७ महिलांच्या घराच्या छतावर करण्यात आली होती. सर्वप्रथम त्यांनी विक्रीसाठी पापड उपलब्ध करून दिले. ते फक्त ४ पॅकेट होते. हळूहळू त्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि मग आजूबाजूच्या अनेक महिला देखील त्यांच्या या गृहउद्योगात सामील होऊ लागल्या. तीन महिन्यातच ७ वरून कामगारांची संख्या २५ पर्यंत गेली. तुटलेले पापड या महिला शेजाऱ्यांना मोफत वाटप करत, त्यामुळे शेजारीही सहकार्य करत.
पाहता-पाहता वर्ष सरलं. पहिल्या वर्षांअंती त्यांची उलाढाल होती ६१९६ रुपये. या वर्षभराच्या काळात त्यांच्याशी अनेक महिला जोडल्या गेल्या होत्या. काम जोरात सुरु होतं.
पहिल्या वर्षभरात त्यांना एक महत्वाची अडचण समोर आली होती ती म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांत त्यांना काम बंद ठेवावं लागत असे, कारण पापड वाळतच नव्हते. दुसऱ्या वर्षी मात्र त्यांनी यावर उपाय शोधला. उपाय असा होता की एका पलंगावर त्या पापड वाळत घालत असत आणि खालून स्टोव्हच्या मदतीने उष्णता पुरवीत असत. त्यामुळे ही अडचण देखील दूर झाली होती.
दुसऱ्या वर्षी त्यांच्या सोबत १०० ते १५० महिला जुळाल्या आणि तिसऱ्या वर्षी हा आकडा ३०० पर्यंत पोहचला होता. जागा कमी पडू लागली. घरी बसायला देखील जागा नसे. त्यानंतर त्यांनी सहकारी महिलांना घरून काम करण्याचा सल्ला दिला आणि त्यांच्या पापडाचे वजन मोजून त्यांना पैसे देण्यात येत होते. आज आपण ज्याला ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणतो, म्हणजे घरी बसून काम करण्याच्या संस्कृतीची सुरुवात त्यांच्या उद्योगात झाली. एवढा मोठा महिलांचा गट तयार झाला होता. त्याची नोंदणी देखील करायची होती.
गटाला नेमकं नांव काय द्यावं हे सुचत नव्हतं. मग यावरही एक शक्कल लढविण्यात आली. महिला गटाचं नांव सुचविण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतूनच विजेत्या ठरलेल्या धीरजबेन रुपारेल यांनी सुचवलेलं ‘लिज्जत’ हे नाव गटाला देण्याचं ठरविण्यात आलं.
‘लिज्जत’ या गुजराती शब्दाचा अर्थ ‘चवदार किंवा स्वादिष्ट’ असा. विजेत्या धीरजबेन रुपारेल यांना ५ रुपयांचं बक्षिस देखील देण्यात आलं. जुलै १९६६ मध्ये ‘श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड’ हे नाव अधिकृतरीत्या नोंदविण्यात आलं. पापडाची गुणवत्ता उत्तम असल्याने मागणी मोठ्या प्रमाणात वाढत होती आणि प्रसिद्धी देखील मिळत होती. उद्योग भरभराटीस यायला लागला होता. यात भरीस भर म्हणजे खादी ग्रामोद्योग विभागाच्या अध्यक्षांनी या गृह उद्योगात ८ लाख रुपये गुंतविण्याचा निर्णय घेतला.
लिज्जतची गाडी वेगाने चालत होती, ती धावायला लागली. ८० च्या दशकात लिज्जतचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. भारतीय घरांमधल्या किचनमध्ये ‘लिज्जत’ हे न टाळता येण्यासारखं नाव झालं. लिज्जतने ९० च्या दशकात विदेशातही व्यवसाय विस्तारला आणि हि घोडदौड अजूनही सुरु आहे.
आज विदेशामध्ये देखील लिज्जतची वेगळी ओळख आहे. अनेक वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गटाच्या कामाचा गौरव करण्यात आलाय. सात मैत्रिणींनी एकत्र येत लावलेल्या रोपट्याचे रुपांतर आज लाखो महिलांना रोजगार देणाऱ्या वटवृक्षात झाले आहे. आज 45 हजार महिला कर्मचारी 4.8 अब्ज पापडाची निर्मिती करतात. लिज्जतच्या 17 राज्यात 82 शाखा आहेत. अमेरिका, जपान ते साऊथ आफ्रिका अशा 25 देशात लिज्जतची पापड आणि इतर उत्पादने निर्यात होतात. २००२ मध्ये लिज्जतचा निव्वळ फायदा वार्षिक १० करोड रुपये होता. २००२ साली त्यांना Economics Times तर्फे बिझनेस वूमन ऑफ द ईयर हा पुरस्कार मिळाला.
आज लिज्जतमध्ये काम करणाऱ्या अधिकतम महिला गरजू, निरक्षर आहेत. इथे सर्व महिला एकमेकांना बेहन (बेन) या नावाने संबोधतात. आता लिज्जत पापडा सोबतच अप्पालम, मसाला, गव्हाचे पीठ, चपाती, कपड्याची साबण, लिक्विड डिटर्जेंट इत्यादी उत्पादनेदेखील तयार करते.
आज कित्येक घरांत पापड म्हटलं कि लिज्जत सोडून दुसरीकडे पाहिलं देखील जात नाही. चव, दर्जा आणि गुणवत्तेसोबतच या महिलांनी केलेल्या मेहनतीलाही या यशाचं श्रेय द्यायला हवं. लिज्जतचा हा प्रवास कोणत्याही उद्योजकाला प्रेरणादायी असाच आहे.
सलग 17 वेळा अपयश 18 व्या वेळा यश! शेअरचॅट चे सीईओ अंकुश सचदेव यांची यशोगाथा…
लेहरो से डरकर नौका पार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती.
हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील या ओळी मनाला प्रेरणा देणाऱ्या आहेत. जीवनात यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करणं किती महत्वाचं आहे हे या ओळींमधून स्पष्ट होतं. अंकुश सचदेवा यांच्या यशाची कहाणी या ओळींचा उत्तम उदाहरण आहे. त्यांनी एक नाही, दोन नाही, तर तब्बल 17 वेळा अपयश पचवून त्यांच्या इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमाने सोशल मीडिया क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केलं आहे.
प्रारंभिक जीवन आणि शिक्षण
अंकुश सचदेवांचा जन्म आग्रा, उत्तर प्रदेश येथे झाला. त्याची आई सरकारी रुग्णालयात काम करत होती आणि वडील व्यापारी होते. त्यांनी आपली प्रारंभिक शिक्षण आग्रा येथील स्थानिक शाळेत घेतले. लहानपणीच त्यांना तंत्रज्ञान आणि नवउद्यमशीलतेची आवड होती. त्यांनी उच्च शिक्षणासाठी आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश घेतला आणि तेथून अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. आयआयटी कानपूरमधील शिक्षणाने त्यांना तंत्रज्ञान आणि नवउद्यमशीलतेची गोडी लावली. आयआयटीमधील शिक्षणानंतर अंकुशने त्यांच्या करियरची सुरुवात करण्यासाठी आपली कल्पकता आणि मेहनत एकत्र केली.
करियरची सुरुवात आणि अडथळे
आयआयटी कानपूरमधून संगणक विज्ञानात (computer science) बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीची पदवी घेतल्यानंतर, आणि तब्बल 17 वेळा वेगवेगळ्या स्टार्टअपमध्ये अपयशी झाल्यानंतर अंकुशने आपल्या दोन मित्रांसह, भानु प्रताप सिंह आणि फरिद अहसान यांच्या सहकार्याने 2015 साली ShareChat ची स्थापना केली. तत्पूर्वी त्यांनी मे ते जुलै 2014 पर्यंत मायक्रोसॉफ्टमध्ये इंटर्न म्हणून काम केले. Sharechat स्थापन तर झाले. मात्र हा प्रवास सोपा अजिबात नव्हता. समोर अनेक आव्हानं होती. अडचणी होत्या. ज्यात आर्थिक अडचणी, तांत्रिक समस्या आणि विविध इतर आव्हानं समाविष्ट होती. तसेच सुरवातीला वापरकर्त्यांचा प्रतिसाद मिळवणे हे सर्व खूप आव्हानात्मक होते. मात्र त्यांनी कधीच हार मानली नाही. त्यांच्या मेहनत, समर्पण आणि दृढ संकल्पामुळे त्यांनी शेअरचॅटच्या यशाचा मार्ग तयार केला.
ShareChat चा उद्देश भारतीय भाषांमध्ये वापरकर्त्यांना एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म प्रदान करणे होता, जो त्यांच्या भाषिक आणि सांस्कृतिक गरजा पूर्ण करतो. या प्लॅटफॉर्ममुळे भारतीय भाषांना एक नवा आयाम मिळाला आणि विविध भाषिक समुदायांना एकत्र येण्याचे साधन मिळाले. त्यांनी हे व्यासपीठ एकूण १५ भारतीय स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध करून दिले. ज्यात मराठी, गुजराथी, हिंदी, मल्याळम, पंजाबी, तेलगू, तामिळ, ओरिया, कन्नड, आसामी, हरियानवी, राजस्थानी, भोजपुरी आणि इंग्रजी यांचा समावेश आहे.
सुरुवातीच्या 4 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी कमाईपेक्षा अधिक युजर्स वाढीकडे लक्ष केंद्रित केले. जो मुलगा कधीकाळी त्याच्या कॉलेजमध्ये प्लेसमेंटसाठीही बसला नाही त्याने सहकाऱ्यांसोबत मिळून आपल्या दृढ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर बघता बघता 40 हजार कोटींची कंपनी उभी केली, हे खरंच “धडपडणार्यांच्या हाती यश येतेच” या उक्तीला सिद्ध करणारे कार्य ठरले.
सफलता आणि विस्तार
ShareChat यशस्वी झाल्यानंतर, अंकुशने Moj नावाचा एक शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म लाँच केला. TikTok बंद झाल्यानंतर, Moj ने भारतीय बाजारपेठेत जलद गतीने आपले स्थान निर्माण केले. या प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांना छोट्या व्हिडिओज तयार करणे आणि शेअर करणे शक्य झाले. Moj ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत गेली आणि ती आज एक अत्यंत लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म बनली आहे.
ShareChat आणि Moj ने भारतातील डिजिटल कंटेंट कंझम्पशन मध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. ShareChat चे 160 दशलक्ष पेक्षा जास्त मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत.
अंकुश सचदेवा आणि त्यांची टीम नेहमीच नवीन फिचर्स आणि तंत्रज्ञान वापरण्यावर जोर देतात, ज्यामुळे ShareChat आणि Moj वापरकर्त्यांचा अनुभव सतत सुधारत असतो.
व्हिजन आणि नेतृत्व
अंकुश सचदेवांचे व्हिजन भारताच्या लहान शहरांतील आणि ग्रामीण भागांतील लोकांना डिजिटल दुनियेचे दरवाजे उघडणे आहे. त्यांचे ध्येय आहे की, प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या भाषेतून आणि संस्कृतीतून ऑनलाईन सामग्रीचा उपभोग घेण्याची संधी मिळावी. त्यांनी त्यांच्या टीमसोबत मिळून सातत्याने नवविचार केले आहेत आणि भारतीय टेक्नोलॉजी उद्योगात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, ShareChat आणि Moj हे दोन्ही प्लॅटफॉर्म्स सतत सुधारत आहेत आणि वापरकर्त्यांच्या गरजा पूर्ण करत आहेत.
गुंतवणूक आणि जागतिक विस्तार
अंकुशला SAIF Partners, DCM श्रीराम, ट्विटर (एक्स), Lightspeed India Partners, Venture Highway, India Quotient आणि Hero MotoCorp सारख्या प्रमुख गुंतवणूकदारांकडून महत्त्वपूर्ण पाठिंबा मिळाला. शेअरचॅटने अखेरीस $40 दशलक्ष उभे केले. 2021 मध्ये, ShareChat ने गुंतवणूकदारांना आकर्षित करून $400 दशलक्ष जमा केले आणि 2022 मध्ये, टाइम्स ग्रुप, Google आणि Temasek Holdings कडून $300 दशलक्ष जमा केले.
ShareChatने अनेक जागतिक बाजारपेठांमध्ये विस्तार केला आहे, ज्यामध्ये अमेरिका, युरोप आणि इतर देशांचा समावेश आहे. कंपनीने महत्त्वपूर्ण गुंतवणूक मिळवली, या निधीचा उपयोग प्लॅटफॉर्मच्या वैशिष्ट्यांची सुधारणा आणि वापरकर्त्यांच्या अनुभवाला अधिक आकर्षक बनवण्यासाठी केला जात आहे.
व्यक्तिगत जीवन
अंकुश एक साधारण आणि विनम्र व्यक्तिमत्वाचे धनी आहेत. त्यांना नवीन तंत्रज्ञानात रस आहे आणि ते भारतीय भाषांच्या प्रचार-प्रसारासाठीही काम करीत आहेत. त्यांनी त्यांच्या यशाचं श्रेय त्यांच्या टीमला आणि भारतीय वापरकर्त्यांना दिलं आहे. ते त्यांच्या कौटुंबिक जीवनातही तितकेच समर्पित आहेत.
अंकुश सचदेवा यांचा ‘फोर्ब्स’ कडून देखील सन्मान झाला आहे. ‘फोर्ब्स इंडिया 30 अंडर 30’ च्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला होता. ही यादी अशा तरुण उद्योजकांची ओळख करून देते ज्यांनी आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
अंकुश सचदेवांची कथा भारतीय नवउद्योजकांना प्रेरणा देणारी आहे. त्यांनी केवळ आपल्या कल्पनांना साकारच केले नाही, तर जन-जनापर्यंत पोहोचवले आहे. त्यांच्या कठोर परिश्रम, निष्ठा आणि नवविचारामुळे ते आज भारतीय टेक्नोलॉजी क्षेत्रातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व बनले आहेत. त्यांची ही यशोगाथा निश्चितच प्रत्येक नवउद्यमीला मार्गदर्शन करेल आणि त्यांना त्यांच्या ध्येयाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देईल.
“अंतः अस्ति प्रारंभः” हा एक महत्वाचा आणि तात्त्विक विचार आहे जो आपल्याला जीवनातील विविध घटनांचा आणि स्थितींचा, वर्तमान परिस्थितीचा विचार करायला लावतो. या विचाराचा अर्थ असा आहे की, जिथे एक गोष्ट संपली आहे असे आपल्याला वाटते, तिथूनच दुसऱ्या गोष्टीची नवीन सुरुवात होते. जीवनात होणारा प्रत्येक अंत काहीतरी नवीन बदलाची सुरुवात घडवतो. संभाव्य परिवर्तनाची चाहूल देतो.
उदाहरणार्थ, जेव्हा एका व्यक्तीचे शालेय शिक्षण संपते, तेव्हा त्याच्या जीवनातील एक नवीन अध्याय म्हणजे महाविद्यालयीन जीवन सुरू होते. तसेच, एखाद्या नोकरीचा किंवा कामाचा समारोप होताना, एक नवीन संधी आपल्यासमोर येते.
या विचाराचा अर्थ असादेखील होतो की जीवनातील प्रत्येक घटनेचा एक प्रवास असतो – एक सुरूवात, एक मध्यवर्ती काळ आणि एक शेवट. परंतु हा शेवट म्हणजे अंतिम नाही, अंत नाही. तर तो एका नवीन प्रवासाचा प्रारंभ असतो. प्रत्येक संकट, आव्हान, किंवा पराभव यामध्येही नवीन काहीतरी शिकण्याची आणि अनुभवांची सुरुवात असू शकते.
आपण हे देखील लक्षात घेतले पाहिजे की जीवनातील अपयशाच्या क्षणांना “अंत” म्हणून पाहणे हा मर्यादित दृष्टिकोन असू शकतो. यामुळेच “अंतः अस्ति प्रारंभः” हा विचार आपल्याला नेहमीच पुढे पाहण्याची प्रेरणा देतो. आपण कोणत्याही स्थितीला अंत म्हणून पाहू नये, तर त्या क्षणाचे एक नवे पाऊल म्हणून स्वागत करावे.
या विचारामध्ये एक पारदर्शकता आहे. जी आपल्याला शिकवते की, प्रत्येक घटना, अनुभव आणि घडामोडी जीवनाच्या एका मोठ्या प्रवाहाचा भाग आहेत. आयुष्य म्हणजेच सतत चालणारी एक यात्रा आहे, ज्यात प्रत्येक अंत आणि प्रारंभ ह्या एका साखळीतील दोन वेगवेगळ्या कड्या आहेत. शेवट हीच सुरुवात या विचारधारेचं अजून एक महत्वाचं अंग म्हणजे परिवर्तन आणि पुनर्जन्म. जीवनातल्या एखाद्या घटनेचा शेवट म्हणजे संपणं नाही, तर त्यातून काहीतरी नवीन उगम पावण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, एखादी नोकरी, नातं किंवा जीवनातील एखादा टप्पा संपतो तेव्हा सुरुवातीला खूप दु:ख होतं, पण त्यातून नवीन संधी आणि अनुभव येतात.
या विचारधारेला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर, आपण आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक शेवटाला एक नवीन संधी म्हणून स्वीकारू शकतो. त्यामुळे, बदल घडवून आणण्याची आणि स्वतःला नव्याने घडवण्याची प्रेरणा मिळू शकते. यामुळे आपल्याला संकटं आणि आव्हानं यांच्याशी अधिक आत्मविश्वासाने सामना करता येतो.
शेवटी, अंतः अस्ति प्रारंभ: हाच विचार आपल्याला आत्मविश्वासाने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून जीवन जगायला शिकवतो. त्यामुळे, कोणत्याही घटनेच्या किंवा स्थितीच्या अंताचा विचार करताना, त्यातून काय नवीन सुरू होऊ शकते, याचा विचार करावा आणि नव्या अध्यायाचं शांत मनाने आणि जोमाने स्वागत करावे. पडणं हे कधीच अपयश नसतं, तर खरं अपयश हे पडून राहण्यात असतं.
शेवट हीच सुरुवात:
जेव्हा सगळं संपलंय असं आपल्याला वाटतं तेव्हा ती खरी सकारात्मक विचार करण्याची आणि नवीन सुरुवात करण्याची वेळ असते. या विचारधारेला अधिक सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर, आपण आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक शेवटाला एक नवीन संधी म्हणून स्वीकारलं पाहीजे. त्यामुळे, बदल घडवून आणण्याची आणि स्वतःला नव्याने घडविण्याची प्रेरणा मिळू शकते. यामुळे आपल्याला संकटं आणि आव्हानं यांचा अधिक आत्मविश्वासाने आणि निडरपणे सामना करता येईल.
नव्याने सुरुवात करा:
जीवनात कसेही प्रसंग आले, काहीही घडलं, सगळं संपलं असं वाटू लागलं की, स्वत:च्या मनाला सांगायचं की इथून होय इथूनच मला परत माझी नवीन सुरुवात करायची आहे. झालेल्या चुका लक्षात ठेऊन त्यात इष्ट बदल करून मला पुन्हा अचूकतेकडे नव्याने धावायचं आहे. उशिरा का होईना केलेली सुरुवात ही कधीच न केलेल्या सुरुवातीपेक्षा कधीही श्रेष्ठ आहे. त्यामुळं सुरुवात करायला कधीही घाबरू नका. सगळं संपलं तरी त्यात आशेचा नवा किरण शोधा. तोच किरण तुमच्या जीवनात यशाचा प्रकाश घेऊन येईल. पुन्हा सुरुवात केल्याने व्यक्तीला आशा आणि प्रेरणा मिळते.
1. स्वत:वर विश्वास
2. सकारात्मकता
3. ध्येय ठरविणे
4. आवश्यक तयारी
5. To Do List
6. कामाचं विश्लेषण
7. प्रत्यक्ष कृती
वरील बाबी आत्मसात करून जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नवीन ऊर्जा घेऊन पुढे जाणे सहज शक्य आहे.