Category: उद्योजकता

  • THE IKEA Effect – एकदा आत गेलेला माणूस इथून लवकर बाहेर पडत नाही

    THE IKEA Effect – एकदा आत गेलेला माणूस इथून लवकर बाहेर पडत नाही

    THE IKEA Effect – मित्रांनो Zudio मध्ये कपडे इतके स्वस्त का मिळतात किंवा डी-मार्टवाले इतक्या कमी किमतीत वस्तू विकून Profit कसा कमावतात या गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती आहेच. त्यामुळे त्या जरा बाजूला ठेऊया. मार्केटमध्ये सध्या IKEA हे नाव चांगलंच गाजतंय! कमी किमतीत मिळणारं Top Quality चं फर्निचर, कितीही मोठ्या फर्निचरला आपल्याच कारमध्ये टाकून घरी नेण्याची सोय, फर्निचरचे Simple आणि Unique Designs या सगळ्या गोष्टी IKEA ने कशा मॅनेज केल्या आणि लोकांना या सगळ्या गोष्टींची चटक कशी लावली; जाणून घेऊया आजच्या लेखामध्ये!

    IKEA बद्दल तुम्हीसुद्धा कधी ना कधी ऐकलं असेलच, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी… IKEA ही जगातली सर्वात मोठी Furniture Manufacturing Company आहे, जिचा जन्म १९४३ साली स्वीडनमध्ये झाला. या कंपनीच्या नावाची स्टोरी पण मजेदार आहे. IKEA च्या I आणि K मध्ये दडलंय कंपनीच्या फाऊंडरचं नाव, म्हणजे Ingvar Kamprad (इंगवार कॅम्परड). E for Elmtaryd हे त्या फार्मचं नाव आहे, जिथं ते लहानाचे मोठे झाले आणि A for Agunnaryd जे की या फार्म जवळचं एक गाव आहे. अशा पद्धतीने बनलं ते IKEA. IKEA सुरुवातीला एकदम छोट्या Scale वर सुरु झालं होतं; पेन्सिल, पोस्ट कार्ड्स सारख्या छोट्या छोट्या गोष्टी आधी ते विकायचे. कंपनी सुरु केल्यानंतर ५ वर्षानंतर त्यांनी सुरुवात केली फर्निचर विकण्यासाठी आणि आज ४६० पेक्षा जास्त स्टोअर्सचं हे जाळं पसरलंय ६३ देशांमध्ये. 

    the-ikea-effect-everything-you-need-to-know

    कुठल्याही फेमस स्टोअरमध्ये लोकं का गर्दी करतात? तिथल्या क्वालिटीमुळे? का त्याच्या प्राईम लोकेशनमुळे? नाही. तर तिथल्या Affordable Pricing मुळे. अर्थात क्वालिटी, लोकेशन या गोष्टी Matter करतातच, पण Pricing समोर कोणती गोष्ट टिकलीये का भाऊ? IKEA Effect च्या बाबतीत सुद्धा हीच गोष्ट लागू होते. इथं मिळणारं फर्निचर हे टॉप क्वालिटीचं तर आहेच, पण त्याचसोबत ते Affordable आहे. आणि Quality आणि Affordability एकत्र आली की होतो… धमाका!

    आता येऊया यांच्या फर्निचरकडे. IKEA मध्ये आपल्याला एका सध्या चमच्यापासून ते एका रूमच्या अख्ख्या सेटअपपर्यंत सगळ्या प्रकारचं फर्निचर पाहायला मिळतं. स्टडी टेबल, स्टूल्स, लॅम्प्स, कार्पेट, डिशेस, बाऊल्स, कपाटं, सोफा, बेड, खुर्च्या,आरसे, टी-पॉय असे नाही नाही ते सगळे Product इथं पाहायला मिळतात. या सगळ्याचे डिझाइन्स, व्हरायटी, क्वालिटी आणि  सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दर बघून तुम्ही यातलं एखादं तरी Product होनाही करता करता घेताच.

    फर्निचर तर घेतलं पण याची Delivery कधी मिळणार? कधी तो टेम्पो येणार? कधी त्याला आपल्या घराचा पत्ता सापडणार? बर परत फर्निचर आतमध्ये नेताना कशाला घासलं वगैरे तर? सोसायटीवाल्यांच्या नाहीतर घरात बायकोच्या शिव्या खायला लागणार! पण काळजी करू नका; असं काहीच होणार नाही. कारण हे फर्निचर तुम्ही तुमच्या कारमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता. काय? तुम्हाला सुद्धा शॉक बसला असेल नाही तो वाला शॉक नाही. तर तुम्ही जे पण फर्निचर चूझ करता त्या फर्निचरला IKEA हे Dissemble करून देतं आणि इथंच येतो तो सगळ्यात महत्त्वाचा IKEA Effect. IKEA चा हा USP आहे म्हणा हवं तर.

    the-ikea-effect-everything-you-need-to-know

    आता हा IKEA Effect आपण समजून घेऊया आपल्या घराघरातल्या उदाहरणाने. समजा तुमच्या आईने तुमच्यासाठी उद्या मस्त इडली सांबार बनवण्याचा प्लॅन केलाय. तर त्यासाठी त्या माऊलीनं रात्री पीठ भिजवून ठेवलं, मग सकाळी लवकर उठून कांदा, टोमॅटो चिरून, खोबरं, कोथिंबीर घालून मस्त सांबार बनवलं. मग इडली पात्रात त्या इडल्या उकडल्या. मग एक एक इडली काढून ती तुमच्यासमोर ठेवली आणि हे सगळं करून झाल्यावर ती म्हणाली, “हूssश दमले बाबा खूप!” एवढं सगळं करून झाल्यावर इडल्या खाऊन तुम्ही तिला काय म्हणाले तर, “काय आई कशाला एवढा कुटाणा केला. मी तुला इन्स्टंट पीठ आणि इन्स्टंट सांबार मसाला आणून दिला असता ना!” खाल्ला का इन्स्टंट मार??? तर एवढं सगळं करून आई शेवटी काय म्हणाली दमले बाबा खूप! पण मित्रांनो या दमले बाबामध्येच आईचा खरा आनंद आहे, कारण हे सगळं करून तिला एक Sense of Achievement मिळतो, जो या इन्स्टंट पिठातून मिळणं कधीच शक्य नसतं. IKEA ने सुद्धा या Human Psychology ला ओळखलं आणि आपलं Furniture Dessemble करून देण्यास सुरुवात केली. ज्यामुळे झालं काय. जेव्हा Customer घरी जाऊन स्वतःच हे Furniture Assemble करायला लागला, तेव्हा त्याला एक Sense of Achievement मिळाला आणि यातूनच सुरुवात झाली IKEA च्या यशस्वी वाटचालीला.

    तुम्हाला ही आजची IKEA स्टोरी कशी वाटली आम्हाला Comment मध्ये नक्की सांगा. जर लेख आवडला असेल तर लाईक करा Channel ला Subscribe करा जेणेकरून YouTube ला, पण कळेल Market मध्ये नवीन Brand आलाय ते. आणि हो तुम्हाला अजून अशा कोणकोणत्या ब्रॅण्डच्या केस स्टडीज जाणून घ्यायला आवडतील हेही नक्की सांगा. तो पर्यंत Bye Bye.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

  • जगातील पहिली गाडी बनवणारा कार्ल बेंझ – MERCEDES-BENZ

    जगातील पहिली गाडी बनवणारा कार्ल बेंझ – MERCEDES-BENZ

    आपला प्रवास अजून सोपा आणि सुखकर कसा करता येईल याचे अनेक पर्याय मानव शोधत राहिला. वेगवेगळ्या संशोधकांनी आपल्या कारकिर्दीत प्रवास सुखकर करण्याचे अनेक अविष्कार करून दाखविले. यातल्याच एका आविष्काराची सुरुवात केली ती १८४४ मध्ये जन्मलेल्या जर्मन इंजिनिअर, कार्ल बेंझ यांनी. चला तर मग जाणून घेऊया कार विश्वात ज्यांचं नाव आजही आदराने घेतलं जातं, अशा जगप्रसिद्ध कार्ल बेंझ यांच्या अभूतपूर्व कामगिरीबद्दल! 

    “बायको गेली माहेरी आणि झाला गाडीचा जन्म” हे वाक्य कार्ल बेंझ यांच्याविषयी गमतीशीरपणे वापरलं जातं. कार्ल बेंझ यांचा जन्म २५ नोव्हेंबर १८४४ मध्ये जर्मनीतील कार्लसुरहे या शहरात एका लोहार कुटुंबात झाला. वडील Johann George Benz लोहारकाम करायचे, आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती आणि अश्यातच काही वर्षांत न्यूमोनियामुळे वडिलांचा मृत्यू झाला. घरची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आईवर आली. काबाडकष्ट करून आईने त्यांना शिकवले. आपल्या मुलाला शिक्षणात काहीच कमी पडता कामा नये, इतकंच तिला वाटायचं. लहानपणापासून कार्ल यांना नवीन गोष्टींचं प्रचंड कुतूहल. त्यात काहीतरी नवीन गोष्टींचा शोध घेणे, संशोधन करणे हे आवडीचे काम. शालेय शिक्षणानंतर त्यांनी वयाच्या 19व्या वर्षी 1864 ला मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पदवी कार्लजरुह या यूनिवर्सिटीतून प्राप्त केली.

    शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एका स्केल फॅक्टरीत draftsman आणि designer म्हणून काम केले. सुरुवातीपासूनच आपल्याला ज्या गोष्टी येत नाहीत त्याच करण्यात त्यांना जास्त रस होता. 1868 ला त्यांनी स्केल फॅक्टरीतलं काम सोडलं आणि ते फॉरझाईमला गेले. तेथे एका ब्रिज बिल्डिंग कंपनीसाठी काही काळ काम केलं. काही वर्षांनी त्यालाही रामराम ठोकून ते vienna च्या लोखंडी बांधकाम कंपनीत काम करू लागले. जवळ जवळ ७-८ वर्ष  वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करून त्यांनी आपल्या अभ्यासात आणि अनुभवात भर टाकली. मात्र तरीही त्यांचे दुसरीकडे काम करण्यात मन काही लागेना.

    Bertha Benz & Karl Benz

    कार्ल यांची लहानपणापासूनची आणखी एक आवड म्हणजे सायकल repairing. ते मॅनहाइममधील मॅक्स रोझ आणि फ्रेडरिक एस्लिंगर यांच्या मालकीच्या सायकल दुरुस्तीच्या दुकानात काम करू लागले. तिघांनी industrial machines चे उत्पादन करणारी एक नवीन कंपनी स्थापन केली जिचं नाव होतं Benz & Cie.

    कंपनीचे यश पाहता कार्ल आणखी जोमाने काम करू लागले. त्यावेळी सगळीकडेच carriages म्हणजेच बग्गीचा वापर केला जायचा पण कार्ल यांच्या तल्लख मेंदूत घोडाविरहित गाडी बनविण्याची कल्पना आली. सायकल रिपेअरिंगच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी ऑटोमोबाइल तयार करण्यास सुरुवात केली. त्यात त्यांनी फोर स्ट्रोक इंजिन, advanced coil ignition अशा अनेक गोष्टी वापरल्या आणि 1885 साली पहिल्या ऑटोमोबाईलची निर्मिती केली ज्याचं नाव होतं “बेंझ पेटंट-मोटरवॅगन”. २९ जानेवारी १८८६ रोजी जर्मनीमध्ये जगातील पहिल्या गाडीचा जन्म झाला. मात्र प्रदर्शनादरम्यान “बेंझ पेटंट-मोटरवॅगन” ची भिंतीशी टक्कर झाली आणि त्याचे हे मॉडेल अयशस्वी ठरले. या मॉडेलमध्ये काही त्रुटी आढळल्या म्हणून कार्लने मोटरवॅगन मॉडेल २ तयार केले, त्यात पहिल्या मॉडेलपेक्षा अनेक चांगले बदल केले. १८८९ मध्ये, त्याने मॉडेल क्रमांक ३ सादर केले, ज्याचे प्रदर्शन पॅरिसमध्ये भरवण्यात आले.

    Benz Patent Motorwagen

    जरी हे मॉडेल चांगले असले तरीही गाडीतून येणाऱ्या आवाजामुळे सरकारी अधिकारी बेंझ यांच्या गाडीकडे शंकेने पाहू लागले. इतका मोठा शोध लावूनही कार्ल यांनी गाडी बाहेर काढलीच नाही. गाडी सुरक्षित असू शकेल का?  इतक्या लांब पल्ल्याचा रस्ता गाडी पार करू शकेल का? अशी भीती त्यांच्या मनात होती. गाडी तयार तर केली, मात्र ती अजून उजेडात आली नव्हती.

    आपल्याकडे एक म्हण आह, “प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक ‘स्त्री’ असतेच”, या प्रयोगातदेखील बर्था बेंझ यांनी स्वतःकडचा सगळा पैसा खर्च केला केला होता. गाडीचं पेटंट मिळूनही कार्ल यांनी गाडी बाहेर काढली नव्हती म्हणून बर्था यांची खुप चिडचिड व्हायची. कार्ल यांच्या प्रवासात बर्था बेंज यांचा सहभाग खूप महत्वाचा होता, बर्था यांनी मनाशी पक्के केले की, आता ही गाडी आपणच बाहेर काढायची.

    जेव्हा कार्ल बेंझ घरी नव्हते तेव्हा बर्था यांनी एक बेत आखला की, आपल्या मुलांसह गाडीतून प्रवास करायचा आणि ती आपल्या माहेरी निघाली. मॅनहाईम जिथे हे दाम्पत्य राहायचं तिथून फॉरझाईम म्हणजेच बर्था यांचं माहेर जवळपास ९७ किलोमीटर दूर होतं. आत्ता जरी आपल्याला हे अंतर जवळच वाटत असलं, तरी त्याकाळच्या ओबडधोबड रस्त्यावरुन एवढा प्रवास करणे सुद्धा कमी जिकरीचे काम नव्हते. मात्र त्यानी आपला प्रवास चालू ठेवला. बिना घोड्यांची ही गाडी बघून रस्त्यावरचे लोक घाबरू लागले. या आधी कधीच न पाहिलेलं काहीतरी ते पाहत होते. कोणी “चेटकीण आली, चेटकीण” म्हणून हिणवत होतं तर कोणी त्यांच्या अंगावर, त्यांच्या गाडीवर थुंकत होतं. इतकंच नाही तर काही अंतर कापल्यावर गाडीतील इंधन संपलं त्यावेळी मात्र पंचाईत निर्माण झाली. एका गावात जाऊन त्यांनी पेट्रोकेमिकल घेतलं ते वापरून त्यांनी आपला प्रवास सुरु केला, पण पुन्हा काही अंतर गेल्यावर त्या गाडीचा ब्रेक पूर्ण झिजून गेला. त्यावेळी जुगाड करून बर्था यांनी पहिले  ब्रेक लायनर तयार केले; असं करत करत त्यांनी अखेर आपलं माहेर गाठलं. काही वेळ विश्रांती घेऊन त्या पुन्हा आपल्या घरी परतल्या. तेव्हा कार्ल यांना बायकोने केलेल्या या धाडसाची माहिती मिळाली आणि त्यांना आपण केलेल्या कामावर विश्वास बसला. बायकोच्या धाडसामुळे बेंझ यांची गाडी प्रकाशात आली. सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे बायको गेली माहेरी आणि झाला गाडीचा जन्म या वाक्याचा जन्म हा असा झाला.

    Bertha Benz and the first road trip in history

    Benz & Cie आता 50 कर्मचाऱ्यांवरून थेट 430 कर्मचाऱ्यांपर्यंत जाऊन पोहचली आणि अश्या पद्धतीने एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या वर्षांत, बेंझ ही जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी बनली होती. Benz & cie च्या व्यापकतेमुळे 1899 मध्ये फ्रेडरिक फॉन फिशर आणि ज्युलियस गॅन हे कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य बनले आणि बेंज यांची कंपनी joint stock कंपनी बनली. नवीन संचालकांनी शिफारस केली की बेन्झने मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी योग्य असलेली कमी खर्चाची ऑटोमोबाईल तयार करावी. 1894 ते 1902 पर्यंत, बेंझने 1,200 पेक्षा जास्त गाड्यांचे उत्पादन केले, ज्यात वेलोसिपेडचा देखील समावेश होता. नंतरच्या काळात कार्ल बेंझ यांच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडत होत्या. अनेक नवनवीन शोध,संशोधनाचे कार्य ते अविरत करत होते. बेंझने इतिहासातील Internal combustion इंजिनसह पहिला ट्रक डिझाइन केला. इतकंच नाही, तर नेटफेनर बस कंपनीसाठी त्यांनी जगातील पहिली मोटार बसही तयार केली. या अभूतपूर्व कामाची पोचपावती म्हणजे 25 नोव्हेंबर 1914 रोजी त्यांच्या जन्मगावी कार्लजरुह येथे त्यांच्या सत्तराव्या वाढदिवसाच्या उत्सवादरम्यान, कार्ल बेंझ यांना कार्लजरुह विद्यापीठाने मानद डॉक्टरेट प्रदान केली.

    1923 मध्ये जर्मनीवर आर्थिक संकट ओढवलं. अनेक business डबघाईला आले. इतरांवर आलेली वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून 28 जून 1926 रोजी Benz & Cie. त्यावेळेस जर्मनीच्या automobile क्षेत्रात नाव कमावलेल्या डेमलर मोटरेन गेसेलशाफ्ट या कंपनीत merge झाली. पुढे या कंपनीने आपले product ‘मर्सिडीज-बेंझ’ या नावाने बाजारात आणले आणि पुढे ते किती प्रसिद्ध झाले हे  वेगळं सांगायलाच नको.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

    आणखी वाचा

  • सोलापूरच्या या माणसानं देशातील पहिली बोट,  पहिली कार आणि पहिलं विमान बनवणारी कंपनी उभी केली – वालचंद हिराचंद

    सोलापूरच्या या माणसानं देशातील पहिली बोट, पहिली कार आणि पहिलं विमान बनवणारी कंपनी उभी केली – वालचंद हिराचंद

    २३ नोव्हेंबर १८८२ रोजी हिराचंद दोशी व सौ. राजू दोशी यांच्या पोटी वालचंद यांचा जन्म सोलापूरमध्ये झाला. त्यांचे वडील सुती कपड्याचे व्यापारी होते. वालचंद यांचे वालचंदजी १८९९ मध्ये सोलापूरातून मॅट्रिक झाले आणि त्यांनी पुढील शिक्षण मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेज व पुणे येथील डेक्कन कॉलेज येथून इतिहास व अर्थशास्त्र या विषयातून पूर्ण केले. त्यानंतर ते वडिलांच्या व्यवसायात आले. वडिलांसोबत कपड्याचा व्यापार करणाऱ्या वालचंद यांच्या लक्षात आलं की, आपलं काय या व्यवसायात मन रमत नाही. त्यांनी स्वत: बांधकाम कंत्राटदार होण्याचा निर्णय घेतला

    Walchand Hirachand Doshi

    तो काळ होता जेव्हा भारत ब्रिटिशांच्या ताब्यात होता आणि या ब्रिटिश भारतात गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी नुकतीच रेल्वेची सुरुवात होती, तर दुसरीकडे उद्योगपटलावर जमशेदजी टाटांसारख्या दिग्गजांचा जन्म होत होता.

    या परिस्थितीत कौटुंबिक व्यवसायात न अडकता वालचंद यांनी रेल्वेमध्ये कारकून असलेले आपले सहकारी लक्ष्मण बळवंत पाठक यांच्यासोबत, पाठक वालचंद प्रायव्हेट लिमिटेड ही कन्स्ट्रक्शन कंपनी चालू केली. संपूर्ण भारतीय असणारी ही कंपनी त्यावेळची गरज होती. त्यामुळं खूप कमी वेळात कंपनीनं जोम धरला.

    कामाचे तसेच कर्मचाऱ्यांचे योग्य व्यवस्थापन, कामे वेळेत पूर्ण करण्याची सचोटी आणि आर्थिक रक्कम उभी करण्याचे सामर्थ्य यामुळं वालचंद यांच्या कंपनीने अल्पावधीतच गोऱ्या सरकारचा विश्वास कमावला. यामुळं झालं असं की, बांधकामाचे मोठमोठे प्रकल्प वालचंद यांच्या कंपनीला मिळू लागले. ‘बार्शी लाईट’ हा सात किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग बांधण्याचं काम त्यांनी अतिशय कुशलतेने आणि वेळेत पूर्ण करून दिले. या त्यांच्या कामाकडे पाहून त्यांना बोरीबंदर ते चिंचपोकळी व पुढे करी रोड ते ठाणे आणि मग ठाणे ते कल्याण या रेल्वेमार्गांच्या चौपदरीकरणाचेही काम मिळाले. ते सुद्धा त्यांनी चोख व वेळेत पूर्ण केले. या त्यांच्या उत्तम आणि वेळेत काम करण्याच्या लौकिकामुळे त्यांना रेल्वेची, सार्वजनिक बांधकाम खात्याची, धरणांची, पुलांची तसेच मुंबई महानगरपालिका इमारत बांधणीची व इतर कामेही मिळाली. अशा प्रकारच्या कार्यपद्धतीमुळे बांधकाम क्षेत्रात त्यांचा पूर्ण जम बसला.

    काही कालवधीनंतर पाठक यांनी कंपनीतून आपली भागीदारी काढून घेतली. मात्र व्यवसायाची वाढती मागणी आणि आपल्या कंपनीचा विस्तार करण्यासाठी १९२० मध्ये वालचंद यांनी आपली ही कंपनी टाटा समूहामध्ये विलीन केली.

    वालचंद यांच्या कंपनीने टाटा समूहासोबत अनेक मोठे प्रकल्प पूर्ण केले. जसे की मुंबई पुण्याला जोडणारा बोर घाटातील रेल्वे बोगदा, तानसापासून मुंबईला पाणी मिळण्यासाठी टाकलेल्या गेलेल्या मोठ्या पाईपलाईन, याशिवाय सिंधू नदीवरील कलबाग पुल, सध्याच्या म्यानमारमधील इरावती नदीवरील पूल हे सुद्धा वालचंद त्यांच्याच नेतृत्वाखाली पूर्ण झाले. १९३५ मध्ये टाटांनी आपला समभाग विकला, यानंतर या कंपनीचं नाव हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी असं ठेवलं गेलं. वालचंद यांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी चांगलीच नावारूपाला आली.

    वालचंद यांनी 1908 मध्ये ‘वालचंदनगर इंडस्ट्रीजची’ स्थापना केली. जिथे साखर, साखर कारखाना मशिनरी, प्लास्टिकच्या वस्तू, सिमेंट प्लांट, पेपर, बॉयलर, टर्बाइन अशा अनेक वस्तू बनवल्या जातात.

    SS Loyalty, 5 April 1919

    १९३०-४०च्या दशकात वाहननिर्मिती उद्योग आपला जम बसवत होता. वाहन क्षेत्रातली संधी ओळखत वालचंद यांनी क्रायस्लर कंपनीशी करार केला आणि ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये देखील ते उतरले. १९४५ मध्ये त्यांनी मुंबईजवळ ‘प्रिमिअर ऑटोमोबाईल्स’ ही कंपनी स्थापन केली. मोटारीचे सुटे भाग बनवण्यापासून सुरू झालेल्या या कंपनीने पुढे फियाट या परदेशी कंपनीच्या सहकार्याने देशामध्ये पुढे बरीच वर्षे मोटारींचा पुरवठा केला. आज अजूनही त्यातील काही मोटारी भारताच्या रस्त्यांवर धावत आहेत.

    Premier Padmini

    आपल्या सर्वांचं लहानपण ज्या रावळगाव चॉकलेटने गोड केलं, ते चॉकलेटसुद्धा वालचंद यांचीच देण. १९३३ मध्ये त्यांनी रावळगाव येथे शुगर फॉर्म चालू केलं, तिथंच हे चॉकलेट बनवलं जात होत. सातारा इथलं कूपर इंजिनिअरिंग, कळंब साखर कारखाना यांसारखे अनेक उद्योग वालचंद हिराचंद दोषी यांच्या उद्योगसमूहाने यशस्वी केले.

    ब्रिटिशांचा साम्राज्याखाली असणाऱ्या भारताची आर्थिक गुलामगिरीतून मुक्तता होण्यासाठी त्यांनी हरतऱ्हेने मदत केली. उद्योगासोबतच त्यांनी अनेक सामाजिक कामं देखील केली. भारत स्वतंत्र झाला तेव्हा वालचंद उद्योगसमूह हा देशातील पहिल्या दहा मोठ्या उद्योगांपैकी एक होता. १९४९ मध्ये, त्यांना पक्षाघाताचा झटका आला आणि १९५० मध्ये व्यवसायातून निवृत्त झाले. ८ एप्रिल १९५३ मध्ये उद्योग क्षेत्रातील या अवलियाने जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू लालचंद यांनी त्यांचा व्यवसाय सांभाळला.

    शेठजी अतिशय गुणग्राहक होते, कट्टर राष्ट्रनिष्ठ होते. सचोटी, दर्जा, प्रामाणिकपणा यांमध्ये तडजोड कधीही न केल्याने त्यांना नेहमीच लोकांचा पाठिंबा मिळाला. आपल्या गतिमान व सर्जनशील बुद्धिमत्तेच्या व कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी भारतात एका नव्या औद्योगिक युगाचा प्रारंभ केला. उद्योजकांच्या अडचणी सोडविण्याकरिता इंडियन मर्चंट्‌स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्री (फिक्की) आदी संस्थांची उभारणी केली.

    वालचंद शेठजींचं कार्य आणि त्यांचा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या औद्योगिक क्षेत्रातील सिंहाचा वाटा नेहमीच आपल्या स्मरणात राहील. खऱ्या अर्थाने वालचंद हिराचंद दोशी यांनी मेक इन इंडिया मॉडेल साकारले असे म्हणायला हरकत नाही.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • यांच्यामुळे सामान्य माणसाच्या दारात गाडी उभी राहिली – हेन्री फोर्ड

    यांच्यामुळे सामान्य माणसाच्या दारात गाडी उभी राहिली – हेन्री फोर्ड

    ३० जून १८६३ रोजी अमेरिकेतील मिशिगनमध्ये एका छोट्या शहरात हेन्री फोर्ड यांचा जन्म झाला. एका शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेल्या हेन्रीला ४ भावंडं. घरची परिस्थिती बेताची. शेतातून मिळेल तेवढंच उत्पन्न. अमेरिकेतला तो काळ असा होता जेव्हा शेती ही पूर्णपणे कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने केली जात होती. दिवसभर शेतात काम करणं लहानग्या हेन्रीला पसंत नव्हतं. भावंडांसोबत शाळेत जाणारा हेन्री ८ व्या ग्रेड पर्यंत शिकला. शालेय शिक्षणात जास्त रस नसणाऱ्या हेन्रीने माध्यमिक शिक्षण काय केलं नाही. बुक किपींगचा एक कोर्स करायला त्यानं ऍडमिशन घेतलं.

    portrait young henry ford
    Young Henry Ford

    १२ वर्षाच्या हेन्रीला त्याच्या वडिलांनी हातात घालायचं घड्याळ भेट दिलं… हेन्रीने ते घड्याळ खोललं आणि परत जोडलं. जगातली पहिली आधुनिक कार तयार करण्याची हीच होती पहिली पायरी… जिथं त्याच्या वयाची मुलं मैदानात खेळ खेळायची तिथं हेन्री आसपासच्या घरातली बिघडलेली घड्याळ दुरुस्त करायचा.

    त्या काळात वाहतुकीसाठी घोडागाडीच वापरली जायची. मग ती सामानाची असो किंवा माणसांची.  शेतात वडिलांना मदत करत असताना हेन्रीने पहिल्यांदा एक असं मशीन पाहिलं, जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चक्क घोड्याशिवाय जात होतं. पाण्याच्या वाफेवर चालणारं, शेतात वापरलं जाणारं हे मशीन म्हणजे हेन्रीसाठी आश्चर्य होतं. समोर दिसणारं हे मशीन म्हणजे हेन्रीचा हेन्री फोर्ड होण्यासाठी एक निमित्त आहे हे बहुतेक काळ ओळखून होता. मशीनवर प्रेम कणाऱ्या हेन्रीने तेव्हाच ठरवलं कि आपण देखील अशी गाडी बनवायची जी घोड्यांशिवाय चालेल.

    वयाच्या १६ व्या वर्षी हेन्री यांच्या आईच निधन झालं. आईवर अतिशय प्रेम करणारे हेन्री आतून तुटले होते. आईच्या निधनानंतर वडिलांनी त्यांना सांगितलं कि तू आता शेतात कामाला सुरवात कर, पण शेतीच्या कामात अजिबात रस नसणाऱ्या हेन्रीने सरळ घर सोडून पळून जाण्याचा मार्ग स्वीकारला.

    पुढं १८९६ मध्ये हेन्री फोर्ड यांची भेट थॉमस एडिसन यांच्या सोबत झाली. हेन्री यांनी केलेलं काम त्यांना खूप आवडलं. त्यांच्या या संशोधनावर एडिसन खुश झाले. यातुन प्रेरणा घेऊन हेन्री फोर्ड यांनी आपल्या नोकरीचा राजीमाना दिला आणि त्यांनी १८९९ मध्ये स्वतःची Detroit Automobile Company स्थापन केली. पण यातून तयार होणाऱ्या गाड्या कमी  दर्जाच्या आणि जास्त महाग होत्या. त्यामुळं १९०१ मध्ये हेन्रीनी ती कंपनी बंद केली.

    Thomas Edison & Henry Ford

    पुढे डेट्रॉईट ऑटोमोबाईल कंपनीतील त्याचे सहकारी मर्फी आणि इतर भागीदारांसोबत 30 नोव्हेंबर 1901 रोजी हेन्री फोर्ड कंपनीची स्थापना केली. पण तिथं देखील इतर सहकाऱ्यांसोबत मतभेद झाल्याने आपलं नाव असणारी ती कंपनी त्यांनी सोडून दिली.

    सलग २ वेळा आलेलं अपयश, जवळची संपत चालली बचत अशा परिस्थितीत हार न मानता फोर्ड यांनी गुंतवणूकदार असणारे माल्कन यांच्या सोबत १६ जून १९०३ रोजी फोर्ड मोटार कंपनी चालू केली.

    henry ford motor company highland park plant

    कंपनी तर चालू झाली पण ती लोकांपर्यंत पोहचणार कशी? यासाठी फोर्ड यांनी अमेरिकेत भरल्या जाणाऱ्या कार रेसिंग स्पर्धेत भाग घ्यायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी मॉडेल ९९९ हे कार रेसिंग मॉडेल तयार केलं. ही रेस जिंकून त्याचं हे मॉडेल तर हिट ठरलंच सोबत कंपनीचं नावसुद्धा झालं.

    त्या काळच्या चारचाकी गाड्या इतक्या महाग होत्या की श्रीमंत सुद्धा त्या घेताना विचार करत होते. अश्या या काळात हेन्री फोर्ड यांनी  सर्वसामान्यांना परवडेल अशी चारचाकी गाडी बनवण्याचे प्रयत्न काही त्रुटी असल्यामुळे फेल गेले. पण १९०८ मध्ये त्यांनी बनवलेल्या मॉडेल-T ने मात्र जगाला वेड लावलं. फक्त काळ्या आणि डार्क ब्लु रंगात येणारी गाडी हळू हळू फक्त काळ्या रंगात मिळू लागली. या गाडय़ांचे स्टिरिंग व्हील डावीकडे होते. गाडी चालवायला सोपी होती आणि दुरुस्त सुद्धा लवकर होत असे.

    Henry Ford Model-T

    पहिल्या वर्षी कंपनीने १७०८ गाड्या विकल्या. गाडीची किंमत होती ९०० डॉलर. १९१४ मध्ये या गाडीच्या सेलने २,५०,००० चा टप्पा ओलांडला. पुढे गाडीची किंमत ३६० डॉलर्स वर आल्यावर तर गाडीचा सेल ४,७०,००० पर्यंत गेला. खऱ्या अर्थानं हेन्री फोर्ड यांची ही मॉडेल T गाडी म्हणजे विसाव्या शतकातली सगळ्यात सेन्सेशनल गाडी ठरली. एक वेळ तर अशी आली कि जिथं नजर जाईल तिथं फक्त हीच काळी गाडी दिसायची.

    सर्वोत्तम ज्ञान असणारे कर्मचारी आपल्या कंपनीत असले पाहिजेत म्हणून त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी  दिवसाला ५ डॉलर पगार घोषित केला. जिथं दिवसाला २ डॉलर पगार मिळायचा तिथं इतका पगार म्हणजे कर्मचारांसाठी सोनंच होत. कामाचे दिवस आठवड्याचे ५ च करून त्यांनी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कशी वाढेल याकड लक्ष दिलं.

    सतत येणाऱ्या अपयशाला नमवत प्रत्येक समस्येतून नवीन संधी निर्माण करणारे हेन्री फोर्ड खऱ्या अर्थाने आधुनिक गाड्यांचे जनक आहेत. १०८ वर्षाची फोर्ड मोटार कंपनी ही अनेक चढ उतारानंतर आज ऑटोमोबाइल क्षेत्रातील एक नामवंत कंपनी आहे.

    आपल्या आईवर अतिशय प्रेम करणाऱ्या हेन्री फोर्ड याना तितकीच प्रेमळ आणि त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देणारी पत्नी त्यांना लाभली… तीच नाव होत क्लारा. आधुनिक युगातील चारचाकी गाड्यांमध्ये क्रांती करणाऱ्या या अवलियाने ७ एप्रिल १९४७ रोजी आपल्या पत्नीच्या खांद्यावर जीव सोडला.

    चारचाकी गाडी हा श्रीमंती थाट न राहता सामान्य माणसाच्या आवाक्यातील व्हावे यासाठी फोर्ड यांनी अथक प्रयत्न केले. तुम्ही कोणत्या परिस्थितीत जन्माला आलात हे महत्त्वाचे नाही तर तुम्ही तुमचं आयुष्य कसं जगता आणि परिस्थिती कशी बदलता हे महत्वाचं असतं. शेतकऱ्याच्या या मुलानं ऑटोमोबाईल क्षेत्रात क्रांती घडवून याच ज्वलंत उदाहरण आपल्यापुढं ठेवलं आहे.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी


    आणखी वाचा

  • सायकलच्या दुकानापासून १० हजार कोटींपर्यंत, पहिले मराठी उद्योगपती – लक्ष्मणराव किर्लोस्कर

    सायकलच्या दुकानापासून १० हजार कोटींपर्यंत, पहिले मराठी उद्योगपती – लक्ष्मणराव किर्लोस्कर

    लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांचा जन्म २० जून १८६९रोजी तेव्हा महाराष्ट्रात असणाऱ्या बेळगावमधील गुर्लहोसूर येथे झाला. पांडित्याचा व्यवसाय असणाऱ्या कुटुंबात जन्मलेल्या लक्ष्मणरावांचं मन काय त्यात लागायचं नाही. सतत कानावर पडणाऱ्या वेद आणि मंत्रांऐवजी त्यांचं मन यंत्रांत, चित्रात रमत होतं. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर पंडितांच्या मुलानं पांडित्यच करायचं या मानसिकतेच्या त्या काळात लक्ष्मणरावांनी बंडखोरी करत मुंबईच जे जे स्कूल ऑफ आर्टस् गाठलं. तिथं त्यांनी पेंटिंग आणि मेकॅनिकल ऑब्जेक्ट्स यासाठी प्रवेश घेतला. त्यांचं मन त्यांच्या आवडत्या विषयात म्हणजेच पेंटिंगमध्ये लागत होतं, तोच त्यांना सौम्य प्रकारचा रंगांधळेपणा जाणवू लागला. पण म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. या आजारामुळे त्यांनी पेंटिंगमधलं आपलं लक्ष पूर्णपणे मेकॅनिकल ऑब्जेक्ट डिझाईन म्हणजेच यंत्रांचं चित्र काढण्याकडे दिलं.

    यामुळे मूलतः यंत्रांची आवड असणारे लक्ष्मणराव यंत्रांच्या अधिकच जवळ गेले. त्यांनी यांत्रिक चित्रकलेमध्ये इतकं प्राविण्य मिळवलं कि, त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबईच्या व्हिक्टोरिया ज्युबली टेक्निकल इन्स्टिट्यूट म्हणजेच VJTIमध्ये ते मेकॅनिकल ड्रॉईंगचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून महिना ४५ रुपये पगारावर तर रुजू झाले. ती वेळ अशी होती, जेव्हा ब्रिटिशांनी भारतात सायकल वापरायला सुरुवात केली होती. ते यंत्र बघून लक्ष्मणरावांनी सरळ त्याची डीलरशिप घेतली. मुंबईत सायकल खरेदी करून ते बेळगावला पाठवत. तिथं त्यांचा भाऊ रामूअण्णा ती सायकल ७०० ते हजार रुपयांना विकत होते, तर तिथल्या लोकांना सायकल शिकवायचे १५ रुपये घ्यायचे.

    १८८८ मध्ये लक्ष्मणरावांनी आपली नोकरी सोडली आणि बेळगाव गाठलं. तिथं त्यांनी आणि रामूअण्णांनी मिळून एक छोटं सायकल रिपेअरचं दुकान चालू केलं आणि व्यावसायिक क्षेत्रात आपलं पहिलं पाऊल टाकलं. त्यांचा हा छोटासा व्यवसाय चांगला चालू होता. तोच महानगरपालिकेने अतिक्रमण म्हणून त्यांचं दुकान काढून टाकलं.

    भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांच्या कामी येतील अशी यंत्रे बनवण्याची त्यांची इच्छा होती. १९०१ मध्ये त्यांनी त्याकाळच्या औरंगाबाद स्टेटमध्ये एक छोटं दुकान चालू केलं. जनावरे वैरणीतील बुडख्याकडील मोठा भाग खात नाहीत आणि तो वाया जातो हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यातून त्यांचे पहिले यंत्र तयार झाले ते कडबा कापण्याचे. त्याचबरोबर ते शेतीसाठी लागणारी रहाट, चरख आणि लोखंडाचा नांगर बनवत होते. पण त्यावेळच्या शेतकऱ्यांमध्ये अशी अंधश्रद्धा होती की लोखंडाचा नांगर वापरला, की माती विषारी बनते आणि तिची उत्पादनक्षमता कमी होते. शेतकऱ्यांच्या मनातला हा गैरसमज दूर करायला लक्ष्मणरावांना तब्ब्ल २ वर्ष लागली, नंतर मात्र शेतकऱ्यांनी तो नांगर स्वीकारला.

    लक्ष्मणरावांना आपला व्यवसाय वाढवायचा होता, पण दिशा मिळत नव्हती. तेव्हा त्यांनी औंधचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचा दरबार गाठला. दूरदृष्टी असणाऱ्या राजांनी लक्ष्मणरावांच्या अंगची कला आणि त्यांचं यंत्रांप्रती असणारं प्रेम पाहून संस्थानाचा नकाशा मागवून हवी ती जागा निवडायला सांगितलं. लक्ष्मणरावांनी कुंडल रोडजवळील ३२ एकर ओसाड जमीन निवडली. राजांनी व्यवसाय उभारण्यासाठी १० हजार रुपयेसुद्धा दिले.

    कुंडलजवळची ही जमीन म्हणजे निवडुंगांनी गच्च भरलेलं ओसाड माळरान. तिथं राहायचे ते भयानक विषारी असे साप आणि सरडे. या भकास माळरानावर औद्यगिक नगरीरुपी नंदनवन उभं करायचं स्वप्न उराशी घेऊन लक्ष्मणराव आणि रामूअण्णा कामाला लागले.

    कुंडल रोड रेल्वे स्टेशन
    किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशन

    त्यावेळी देखील जास्त शिकलेली माणसं देखील गोऱ्यांच्या दरबारी नोकऱ्या करत. आपल्याला जास्त शिकलेल्या माणसांपेक्षा, ज्यांचा दृष्टिकोन आपल्यासारखा असेल अशी माणसं पाहिजेत या हेतूने घेऊन दोघे भाऊ माणसं एकवटण्याच्या कामाला लागले. रामूअण्णांनी स्वतः जातीने या नगरीचं नियोजन आणि प्रशासन पाहिलं. शंभूराव जांभेकर हे प्लॅनिंग इंजिनिअर म्हणून रुजू झाले, तर के.के. कुलकर्णी हे मॅनेजर म्हणून. मंगेशराव रेगे यांनी क्लार्क आणि अकाउंट विभाग पाहिला, तर इंजिनिअरिंग अर्धवट सोडलेल्या अनंतराव फाळणीकर यांनी इमॅजिनेटिव्ह इंजिनिअरिंग विभाग सांभाळला. लक्ष्मणरावांचा माणुसकीवर इतका विश्वास होता कि, तुरुंगातून सुटलेल्या तुकाराम रामोशी आणि पिऱ्या मांग यांना या नगरीच्या सुरक्षिततेची जबाबदारी दिली. अशा प्रकारे अनंत अडचणींवर उभी राहत होती ती ‘उद्यम नगरी’ म्हणजेच किर्लोस्करवाडी!

    लक्ष्मणरावांचं लग्न राधाबाई यांच्याशी झालं होतं. यंत्र हेच पाहिलं प्रेम असणाऱ्या लक्ष्मणरावांचा संसार राधाबाई यांनी नेटाने फुलवला. लक्ष्मणरावांना ५ मुलं. ४ पुत्र आणि एक कन्या. यातील मोठे शंतनुराव आणि पुतण्या यांना लक्ष्मणरावांनी शिकायला अमेरिकेतील Massachusetts Institute of Technology म्हणजेच MIT मध्ये पाठवलं. तिथून शिक्षण घेऊन आल्यानंतर शंतनुरावांनी किर्लोस्कर ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेडला जणू काही पंखच दिले.

    भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत लक्ष्मणराव स्वदेशीचे खंदे प्रचारक होते. लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतः किर्लोस्करवाडीला भेट देऊन त्यांच्या कार्याचा भरभरून गौरव केला. लक्ष्मणरावांची किर्लोस्करवाडी ही यंत्रांसोबतच क्रीडा कला यामध्ये सुद्धा संपन्न होत होती. क्रिकेट, फुटबॉल सारखे खेळ तिथं खेळले जायचे, किर्लोस्करवाडीचा रंगमंच हा बाबुराव पेंटर यांनी बनवलेला त्याकाळचा सर्वात सुबक आणि सुनियोजित रंगमंच होता. हा असा रंगमंच होता जिथं फक्त स्त्रिया आपल्या कला सादर करायच्या आणि ही त्याकाळची अत्यंत क्रांतिकारी गोष्ट होती. किर्लोस्करवाडीचा स्वतःचा प्रिंटिंग प्रेस होता, जिथं किर्लोस्कर खबर नावाने एक वृत्तपत्र चालत होतं, तर स्त्री नावाने निघणारं मासिक हे खास स्त्रियांसाठी चालवलं जात होतं. लक्ष्मणरावांनी किर्लोस्करवाडीत आधुनिक पद्धतीने शेती करायला देखील चालना दिली. तिथली जमीन पाहता त्यांनी द्राक्ष पिकाचं उत्पन्न घेऊन कित्येक शेतकऱ्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण केली. 

    लक्ष्मणरावांचं व्यापाराचं तंत्र अगदी साधं होतं. प्रॉफिट मार्जिन कमी ठेवायचं आणि व्यवसाय वाढवायचा. आपल्या कर्मचाऱ्यांसोबत बोलताना ते नेहमी तुमची कंपनी असा उल्लेख करत. किर्लोस्करवाडीत होणारे सण समारंभ, कर्मचाऱ्यांना मिळणारी वागणूक, प्रत्येक ठिकाणी केला जाणारा कर्मचाऱ्यांचा विचार यामुळं इथल्या प्रत्येक माणसाला ही कंपनी त्याची वाटायची. किर्लोस्कर ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेड हळू हळू पुणे, बंगलोर येथे देखील पसरू लागली.  

    सायकलच्या डिलरशिप पासून सुरु झालेला लक्ष्मणरावांचा प्रवास कुट्टी मशीन, ऊस तोडणी मशीन, लेथ मशीन, टेक्स्टाईल मशीन, भुईमूग सोलणी मशीन, हॅन्ड पंप, हॉस्पिटल फर्निचर करत वाढत गेला. लक्ष्मणरावांनी रचलेल्या किर्लोस्करवाडीच्या पायाला मुलगा शंतनुराव यांनी त्याला भक्कम आधार दिला, तर पुढच्या पिढ्यांनी त्याच्यावर कळस चढवला. भारतातील पहिला लोखंडी नांगर, पहिला पंप, पहिलं डिझेल इंजिन, पहिलं इलेक्ट्रिक इंजिन आणि पहिलं लेथ मशिनसुद्धा किर्लोस्करांनीच बनवलं. आज भारतात टोयोटा कंपनीच्या गाड्यासुद्धा किर्लोस्करांचीच कंपनी बनवते.

    किर्लोस्करवाडीचा ४०वा वर्धापन दिन

    लक्ष्मणरावांना औंध संस्थानचे दिवाण म्हणून 1935मध्ये नेमण्यात आले. किर्लोस्करवाडीच्या ४० व्या वर्धापन दिनी ८१ वर्षाचे लक्ष्मणराव आणि ९१ वर्षाचे रामूयाण्णा किर्लोस्करवाडीला भेट द्यायला आले. आजारी असणाऱ्या लक्ष्मणरावांना त्यांचा मुलगा पुण्यात औषधोपचारासाठी बोलवत होता, तेव्हा ८१ वर्षाच्या या तरुणाचे उद्गार होते कि, “जोपर्यंत पहिलं ऑइल इंजिन तयार होऊन बाहेर येत नाही, तोपर्यंत मी इथून कुठंही जाणार नाही.” अखेरीस डिसेंबर १९४८ ला पाहिलं इंजिन तयार झालं आणि लक्ष्मणराव पुण्याला गेले. बंगलोर वरून पुण्याला जाताना त्यांनी आपलं विमान किर्लोस्करवाडीवरून घ्यायला सांगितलं. एका ओसाड जमिनीला यंत्र, तंत्र आणि माणसांच्या साहाय्यानं जिवंत झालेलं पाहून ते भरून पावले. तिथल्या उंच इमारती, रस्ते, कंपन्या, माणसांची वर्दळ हे सारं डोळ्यात भरून अभिमानाने ते पुण्यात आले.

    ‘काम करत राहा, प्रयत्न कधीही सोडू नका. यश स्वतःहून तुमच्याकडे चालत येईल’ हे सांगणाऱ्या भारताच्या या ‘हेन्री फोर्ड’ने अखेरीस २६ सप्टेंबर १९५६ रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन भारत सरकारने २० जून १९८९ मध्ये त्यांच्यावर पोस्टाचे तिकीट काढले. या महान उद्योजकाचा आदर्श घेऊन भविष्यात हजारो मराठी उद्योजक तयार होतील अशी खात्री आहे.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

    आणखी वाचा

  • अवघ्या भारताचं भविष्य बदलणाऱ्या टाटा कंपनीची सुरुवात कशी झाली? जमशेदजी टाटा यांचा प्रवास…

    अवघ्या भारताचं भविष्य बदलणाऱ्या टाटा कंपनीची सुरुवात कशी झाली? जमशेदजी टाटा यांचा प्रवास…

    गुजरातमधल्या नवसारी या छोट्या गावात नुसेरवान यांचा जन्म झाला. वयाच्या ५व्या वर्षी जीवनबाई या चिमुरडीसोबत त्यांचा विवाह झाला. वयाच्या १७ व्या वर्षी म्हणजे ३ मार्च १८३९ रोजी नुसेरवानजी वडील झाले आणि जन्माला आले ते भारताच्या उद्योगविश्वाचे भीष्म पितामह म्हणून नावलौकिक मिळवलेले जमशेटजी टाटा.

    नवसारीतील पारशी परिवारासाठी आपल्या गावाची वेस ओलांडणं म्हणजे एक दिव्यच. हे दिव्य नुसेरवान यांनी पार केलं. सात पिढ्यांत व्यापार कशाशी खातात हेही कुणाला माहित नव्हतं. घरात पौरोहित्याची परंपरा असूनही व्यापाराचं खूळ त्यांच्या डोक्यात शिरलं आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते आपल्या परिवारासहित मुंबईला आले. तेव्हा जमशेटजी ८ वर्षांचे होते. हा तोच काळ होता जेव्हा इंग्रजीचं शिक्षण भारतीयांना द्यायला सुरुवात झाली होती. हेच वाघिणीचं दूध प्यायला जमशेटजी तयार होत होते. त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते वडिलांना उद्योगधंद्यात मदत करू लागले.

    आपल्या मुलाच्या अंगचे व्यावसायिक गुण बघून नुसेरवान यांनी त्यांना थेट परदेशात व्यापारासाठी पाठवलं. अतिपूर्वेकडे असणाऱ्या हाँगकाँग या देशात गेलेले जमशेटजी पहिल्या परदेश दौऱ्यातच तिथं कंपनी स्थापन करुन आले, जमशेटजी आणि अर्देशीर या नावाने. औद्योगिक क्रांतीच्या दारात उभ्या असणाऱ्या जगामध्ये कापसाचं महत्व ओळखून त्यांची कंपनी कापसाचा व्यापार करत होती, तर चीनसाठी लागणाऱ्या अफूला देखील त्यांनी तितकंच महत्त्व दिलं. व्यवहार चातुर्य, संधी ओळखण्याचे कसब यामुळे जमशेटजींनी काही महिन्यांतच आपल्या पहिल्या कंपनीची शाखा शांघायमध्ये आणि दुसरी नंतर लगेच लंडनमध्ये उघडली. युरोपला कापड आणि चीनला अफू विकून तिथून चहा, वेलदोडे, सोनं, तयार कापड ते भारतात आणून विकत. यातून त्यांना भरपूर नफा मिळाला.

    याच दरम्यान चालू होतं ते अमेरिकेचं यादवी युद्ध. भारतातील अनेक व्यापाऱ्यांचं दिवाळं निघालं. याची झळ टाटा परिवारालासुद्धा बसली, पण नुसेरवान आणि जमशेट पिता-पुत्राने यातून देखील मार्ग काढला. राहतं घर विकून सर्वांची देणी चुकती केली. यामुळे लोकांचा टाटा नावाशी विश्वास जोडला गेला.

    १८६५ मध्ये यंत्रविद्येचे ज्ञान मिळविण्यासाठी जमशेटजी मँचेस्टरला गेले. इंग्लंडमध्ये ते चार वर्षे होते. स्वदेशी परतल्यावर कापडाची वाढती मागणी लक्षात घेता त्यांनी कापड गिरण्या सुरु करायचं ठरवलं. अंदाज घेण्यासाठी त्यांनी २१००० रुपयांत मुंबईच्या चिंचपोकळी भागातील दिवाळं निघालेली एक तेलगिरणी विकत घेऊन अलेक्झांड्रिया मिल असं तिचं नामकरण केलं. बऱ्यापैकी फायदा कमवून २ वर्षांनी ती विकून टाकली. त्यानंतर नागपूरला कापड मिल उभी करण्यासाठी जागा घेतली. त्याकाळी सगळ्या कापड गिरण्या मुंबईमध्ये होत्या. अशा वेळी नागपूरमध्ये मिल उभी करण्याला अनेकांचा विरोध असून देखील त्यांनी हीच जागा पक्की करत मोठ्या कष्टाने मिल उभी केली. कापसाचं मोठ्या प्रमाणावर उत्पन्न, वाहतुकीची सोय, पाण्याची उपलब्धता यामुळे जमशेटजी यांनी घेतलेला निर्णय अगदी योग्य ठरला. ब्रिटनची महाराणी व्हिक्टोरियाच्या गौरवार्थ आणि त्या काळाची गरज लक्षात घेता त्यांनी त्या मिलला एम्प्रेस मिल असं नाव दिलं. १८७७ मध्ये उभी राहिलेली ही गिरणी सप्टेंबर २००२मध्ये अखेर बंद पडली. या दोन गिरण्यांच्या अनुभवावरच कुर्ला येथील ‘धरमसी मिल’ ही जुनी गिरणी विकत घेऊन तिचे ‘स्वदेशी मिल’ असे नामकरण केले, तर अहमदाबादला ‘ॲडव्हान्स मिल’ सुरू केली गेली.

    Empress Mill, Nagpur
    Svadeshi Mill, Mumbai

    आपल्या कारखान्यात काम करणारा प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे याची जमशेटजींना जाणीव होती. कर्मचाऱ्यांना अपघात विमा देणे, कामाचे तास कमी ठेवणे, त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे, कामाची जागा हवेशीर ठेवणे यांसारख्या गोष्टींमुळे त्यांच्या मिल या जगभरातील सर्वात सुनियोजित मिल म्हणून ओळखल्या जात होत्या. ज्या सुविधा पश्चिमी देशात देखील त्यांच्या कामगारांना मिळत नव्हत्या, त्या जमशेदजी त्याकाळी आपल्या कर्मचाऱ्यांना देत होते.

    आर्थिक स्वतंत्रता हीच राजनीतिक स्वतंत्रतेचा आधार आहे हे जमशेटजी जाणत होते. दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता यांच्या विचारांचा प्रभाव जमशेटजींवर होता. जमशेटजींची ४ मोठी स्वप्नं होती. स्टील उद्योग उभा करणं, जागतिक दर्जाचं शैक्षणिक केंद्र उभं करणं, हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट उभा करणं आणि जागतिक कीर्तीचं हॉटेल उभं करणं. दुर्दैवाने यातील हॉटेल सोडल्यास इतर तीन स्वप्नं त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकली नाहीत, पण त्याची बीजं मात्र त्यांनी रोवली होती. आणि ‘शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी’ या म्हणीप्रमाणे त्यांच्या येणाऱ्या पिढीने ही सगळी स्वप्नं पूर्ण केली.

    Tata Power hydro plant, Khopoli

    भारतात प्रगत विज्ञान संशोधन केंद्रासाठी जमशेटजींना ‘रॉयल सोसायटी ऑफ इंग्लंडसारखी’ एक संशोधन संस्था भारतात उभी करण्याची होती. यासाठी त्यांनी स्वामी विवेकानंदांचे मार्गदर्शन घेतले. या संस्थेसाठी जमशेटजींनी तेव्हा सव्वा लाख रु. दिले. अनेक दानशूर लोकांनी देणग्या दिल्या. पैसे कमी पडले म्हणून टाटांनी मुंबईतील आपल्या सतरा इमारती विकल्या. मंजुरीसाठी इंग्रज सरकारकडून उशीर झाला, तरी १९११ मध्ये बंगलोर येथे या संस्थेच्या इमारतीचा पाया घालण्यात आला आणि त्याच वर्षी २४ जुलैपासून संस्था कार्यान्वित झाली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अर्थात ‘भारतीय विज्ञान संस्था’ या नावाने ओळखली जाणारी ही ४४० एकरात पसरलेली संस्था आजही जगद्‌विख्यात आहे.

    Indian Institute of Science (IISc), Bangalore

    अर्थव्यवस्थेची प्रगती सातत्याने चालू राहण्यात लोखंड व पोलाद उद्योगाचा फार मोठा वाटा असल्याने जमशेटजींच्या ध्यानात आले होते. अनेक वर्ष शोधाशोध करून आणि संशोधन करून शेवटी बिहारच्या सिंगभूम जिल्ह्यातील साक्ची या छोट्याशा गावात कारखाना उभारण्याचे ठरले. १९११ साली ‘द टाटा आयर्न अ‍ँड स्टील कंपनी’ (टिस्को) हा कारखाना सुरू झाला. बघता बघता त्या गावाचं एका मोठ्या शहरात रुपांतर झालं आणि तेथील रेल्वेस्टेशनला ‘टाटानगर’ नाव देण्यात आलं. सध्या झारखंडमध्ये असलेल्या या शहराचं नाव जमशेटजींच्या गौरवार्थ ‘जमशेदपूर’ असं देण्यात आलं. आज टाटा स्टील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीत खनिज लोखंडापासून उत्कृष्ट पोलादापर्यंतच्या सर्व प्रक्रिया या पार पाडल्या जातात. टाटा स्टील आज भारतातील दुसरी मोठी कंपनी आहे.

    प्रचंड अभ्यासू असणाऱ्या आणि जगभर फिरणाऱ्या जमशेटजींनी साताऱ्यातील पाचगणीचं महत्त्व त्या काळात ओळखलं होतं. तिथल्या हवामानात कॉफी आणि स्ट्रॉबेरी चांगली लागेल याची त्यांना खात्री होती. कॉफीत त्यांना यश मिळालं नाही, पण स्ट्रॉबेरी रुजली. फ्रान्समधून रेशमाचे किडे आणून बंगलोर, म्हैसूरमधील शेतकऱ्यांना त्यांनी रेशीम लागवडीचे धडे द्यायला सुरुवात केली. आज म्हैसूरच्या रेशमी साड्यांमुळे हा परिसर रेशीम उद्योगाचं केंद्र बनलाय, त्याच्या मुळाशी जमशेटजीच आहेत.

    कर्मचार्‍यांच्या हक्क आणि अधिकारांसाठीही टाटा सदैव जागरूक राहिले. कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही ठीकठाक जगता यावं यासाठी भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ ही संकल्पना जमशेटजींनी जन्माला घातली. ही संकल्पना त्यावेळी पाश्चात्य देशांतसुद्धा सुरु झाली नव्हती. काम करताना काही अपघात झाल्यास त्यासाठी नुकसानभरपाईची सोय केली. जमशेटजी म्हणायचे, ‘आपण आपले भागधारक, कामगार यांच्या हिताचा विचार केला; तर प्रगतीचा मळा अधिक फुलतो.’

    जमशेटजींनी आपला उद्योग अशा काळात चालू केला जेव्हा उद्योग क्षेत्र फक्त युरोपियनांचीच मक्तेदारी होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर खऱ्या अर्थाने तो औद्योगिकदृष्ट्या तारला गेला तो जमशेटजींच्या दूरदृष्टीने. टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा पॉवर, टाटा केमिकल्स, टाटा टी, टायटन इंडस्ट्रीज, टाटा कम्युनिकेशन्स, ताज हॉटेल्स आणि अशाच अजून १०० कंपन्या आणि त्यात काम करणारे ८ लाखांहून अधिक कर्मचारी ही आहे टाटांची देन.

    जमशेटजींनी त्यांच्या दूरदृष्टीने टाटा सन्स लि. ची स्थापना करून तिच्याकडे आपल्या सर्व कंपन्यांचे व्यवस्थापन सोपविले. या संस्थेचे ८५ टक्के भांडवल टाटा कुटुंबातील मंडळींनी उभारलेल्या धर्मादाय न्यासांच्या मालकीचे असल्याने टाटा समूहातील विविध उद्योगांना होणारा फायदा या न्यासांकडे म्हणजे पर्यायाने जनतेकडे पोहोचविला जातो. एका प्रसिद्ध संस्थेच्या रिपोर्टमध्ये गेल्या १०० वर्षातील जगातील सर्वात दानशूर व्यक्ती म्हणून जमशेटजी टाटांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं.

    १९ मे १९०४ रोजी जर्मनीतील न्यूहॅम येथे वयाच्या पासष्टाव्या वर्षी या महान उद्योगपतीचे निधन झाले. ‘भारतीय व्यापार व उद्योग यांच्या भरभराटीसाठी कोणत्याही तत्कालीन भारतीयाने जमशेटजींइतके प्रयत्न केले नाहीत’, हे लॉर्ड कर्झनचे उद्‌गार यथार्थाने जमशेटजींची थोरवी व्यक्त करतात. त्यांच्या पश्चात दोराबजी व रतनजी या त्यांच्या दोन मुलांनी वडिलांची परंपरा यशस्वीपणे पुढे चालविली.

    शंभर सव्वाशे वर्षापूर्वी आपल्यातल्याच एका माणसाने एक स्वप्न पाहिलं. त्यासाठी त्याच्यासह पुढच्या कित्येक पिढ्यांनी जिवाचं रान केलं आणि आजचं हे नंदनवन उभं राहिलं. फक्त देशाची आर्थिक बाजू भक्कम करणारं हे स्वप्न मुळीच नव्हतं, तर देशाच्या सामान्य नागरिकाला सन्मानानं जगता यावं, त्याच्या सर्व गरजा त्याच्या आवाक्यातच पूर्ण व्हाव्यात असा त्यांचा दृष्टीकोन होता. संपत्ती निर्मिती हा टाटांचा उद्देश कधीच नव्हता, उलट समाजाकडून आलेले पैसे समाजालाच परत करावयाचे हे त्यांचे धोरण होते. कोणतीही पार्श्वभूमी नसताना उद्योग क्षेत्रातला ध्रुवतारा असणारे, भारतीय उद्योगाचे भीष्म पितामह म्हणजे जमशेदजी टाटा यांच्या चिरकाल टिकणाऱ्या कार्याला आणि प्रेरणेला आपल्यातही उतरवण्याचा प्रयत्न करूया.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • जगातील सर्वात मोठ्या बँकेचे संस्थापक जे. पी. मॉर्गन यांची कहाणी

    जगातील सर्वात मोठ्या बँकेचे संस्थापक जे. पी. मॉर्गन यांची कहाणी

    १७ एप्रिल १८३७मध्ये अमेरिकेतल्या एका श्रीमंत घरात जॉन पिअरपॉन्ट म्हणजेच जेपी मॉर्गन यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हे उद्योगपती आणि गुंतवणूकदार होते. लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि नेतृत्वगुण असणारे जेपी यांना, त्यांच्या वडिलांनी पहिल्यापासूनच व्यवहार ज्ञानाचे धडे द्यायला सुरुवात केली होती. स्वतःचा व्यवहार स्वतः करणे, एकट्याने प्रवास करणे यासारख्या अनेक गोष्टींमुळे मॉर्गन यांच्यामधील नेतृत्वगुण वाढत गेले.

    नंतर त्यांनी आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि डंकन, शेअरमन अँड कंपनी या वडिलांच्या कंपनीमध्ये ते क्लार्क म्हणून रुजू झाले. व्यवसायात येणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करत मॉर्गन शिकत होते.

    मागील एका लेखामध्ये आपण अँड्र्यू कार्नेगी यांची माहिती पाहिली आहेच. याच कार्नेगी यांची सर्वात मोठी “कार्नेगी स्टील कंपनी” सुद्धा १९०१ मध्ये मॉर्गन यांनी खरेदी केली आणि “युनायटेड स्टील कार्पोरेशन” ही सर्वात मोठी स्टील कंपनी उभी केली.

    तो काळ असा होता जेव्हा अमेरिकेत कोणतीच सेंट्रल बँक नव्हती. त्यामुळं लोन घेणं, पैसे पुरवणं या गोष्टी होत नव्हत्या. यावेळी जेपी मॉर्गन यांनी मंदीच्या काळात केवळ उद्योगधंद्यांनाच नाही, तर अगदी अमेरिकन सरकारला देखील पैसे पुरवले आणि अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचे काम केलेलं होतं. पुढे एक वेळ अशी आली, की अमेरिकेची संपूर्ण बँकिंग व्यवस्था ही मॉर्गन यांच्या हातात गेली होती. तेव्हा १९१३ मध्ये अमेरिकन सरकारने पहिली सेंट्रल बँक म्हणजेच फेडरल रिझर्व्ह सिस्टीम सुरू केली.

    मॉर्गन यांच्या यशाची यादी केली लक्षात येईल की, अमेरिकेतील फायनान्स इंडस्ट्री, बँकिंग इंडस्ट्री, स्टील इंडस्ट्री, रेलरोड इंडस्ट्री, पॉवर इंडस्ट्री या सर्व मोठ्या उद्योगांवर फक्त मॉर्गन यांचच वर्चस्व होतं.

    १९१३ मध्ये वयाच्या ७५व्या वर्षी, जेपी मॉर्गन यांनी जगाचा निरोप घेतला. सन 2000मध्ये मॉर्गन यांची कंपनी, चेज या कंपनीसोबत जोडली गेली आणि “जेपी मॉर्गन अँड चेज कंपनी” म्हणून नावारूपाला आली. मार्केट कॅपिटलायझेशनचा विचार करता ही जगातील सर्वात मोठी बँक आहे. तेल कंपन्यांना कर्ज देण्याच्या बाबतीत ही बँक जगात आघाडीवर आहे.

    Why JP Morgan Chase is eyeing the exits from NYC

    त्यांच्या कारकिर्दीमध्ये ते 48 मोठ्या कंपन्यांच्या संचालक मंडळावर होते. असे नाही की त्यांना कधीच कोणते अपयश आले नाही, पण येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये संधी शोधत ते पुढे जात राहिले. मॉर्गन आजच्या तरुणाईला हाच संदेश देतात की, तुम्ही कितीही श्रीमंतीत जन्माला आला तरी, तुमचं कर्तृत्व आणि स्वबळावर उभं केलेलं तुमचं विश्व, हेच तुम्हाला कीर्ती मिळवून देतं.

    हा लेख विडीयो मध्ये पहा

    आणखी वाचा

  • कापडाच्या मिलमधील मजूर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कसा बनला – अँड्र्यू कार्नेगी यांची कहाणी

    कापडाच्या मिलमधील मजूर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कसा बनला – अँड्र्यू कार्नेगी यांची कहाणी

    आज आपण अशाच एका दानशूर उद्योगपतीची जीवनकहाणी बघणार आहोत. ही गोष्ट आहे जगातील एकेकाळचे श्रीमंत, दानशूर आणि परोपकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि 100 वर्षे उलटूनसुद्धा आजही अनेकांचे प्रेरणास्थान असणाऱ्या उद्योगपती अँड्र्यू कार्नेगी यांची.

    अँड्र्यू कार्नेगी यांचा जन्म २५ नोव्हेंबर १८३५ रोजी स्कॉटलंडमध्ये डनफर्मलाइन नावाच्या छोट्या शहरामध्ये एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील विल्यम कार्नेगी हातमाग कामगार होते, तर आई मार्गारेट शिवणकाम करून फाटक्या संसाराला ठिगळ लावायची. तो काळ होता औद्योगिक क्रांतीचा. या औद्योगिक क्रांतीमुळे हातमाग उद्योगावर परिणाम होऊन विल्यम कार्नेगी यांची नोकरी गेली. अशा परिस्थितीत कुटुंबाची उपजीविका भागवण्यासाठी घरदार विकून विल्यम कार्नेगी परिवारासहित अमेरिकेमधील पीटर्सबर्ग येथे येऊन स्थिरावले. तेव्हा अँड्र्यू बारा वर्षांचे होते.

    त्यांना शिक्षणाची खूप आवड होती, पण इच्छा असून देखील त्याला शिक्षण घेता आलं नाही. त्याकाळी १०-१२ वर्षांची लहान मुलं सुद्धा काम करून कुटुंबाला हातभार लावायची. लहानग्या अँड्र्यूलाही कापड गिरणीत नोकरी मिळाली. काम भरपूर असायचं अन् पगार कमी. त्याच सुमारास अमेरिकेत टेलिग्राफ आणि रेल्वेच्या शोधामुळे अनेक नवीन संधी उपलब्ध झाल्या होत्या. पुढे अँड्र्यू टेलिग्राफ ऑफिसमध्ये मेसेंजर बॉय म्हणून कामाला लागले. हे काम करत असताना सवयीप्रमाणे प्रत्येक व्यक्ती सोबत ओळख करून ते बोलत असत. त्यामुळे पीटर्सबर्गसारख्या औद्योगिक शहरात अनेक व्यवसायिकांशी त्यांची चांगली ओळख झाली. कोणतीही गोष्ट लगेच आत्मसात करण्याच्या आपल्या कौशल्यामुळे अँड्रयू कार्नेगी टेलिग्राफ लिहिण्यात पारंगत झाले. त्यांच्या या कौशल्यावर थॉमस स्कॉट यांची नजर पडली.

    थॉमस स्कॉट हे पेनसिल्व्हिनिया रेलरोड कंपनीचे रिजनल मॅनेजर, ती त्याकाळी जगातील सर्वात मोठी रेल्वेमार्ग बनवणारी कंपनी होती. अँड्र्यू कार्नेगी यांच्यासाठी ही सर्वात मोठी संधी होती. १२ वर्ष त्या कंपनीसाठी काम केल्यानंतर कार्नेगी यांनी नोकरीचा राजीनामा दिला. थॉमस स्कॉट यांनी त्यांच्यातील क्षमता ओळखून त्यांना आर्थिक गुंतवणुकीत मार्गदर्शन केले. नोकरी करत असतानाच कार्नेगींनी रेल्वे डब्यात झोपून प्रवास करता येईल अशा सीट्स बनवणाऱ्या कंपनीत गुंवतणूक केली होती. त्या सीट्सना भविष्यात चांगली मागणी येईल आणि आपल्याला त्यातून भरपूर पैसे मिळतील असा त्यांचा अंदाज होता. तो खरा ठरला.

    यातून मिळालेला नफा त्यांनी इतर धंद्यात गुंतवायला सुरुवात केली. रेल्वेत नोकरीला असल्याने, रेल्वेचे लाकडी पूल आग लागल्यास जळून जातात किंवा पुराच्या पाण्यात वाहून जातात हे त्यांनी पाहिलं होतं. बाजारातली स्टीलची मागणी लक्षात घेता त्यांनी की-स्टोन ब्रिज ही कंपनी सुरु केली. की-स्टोन कंपनीने मिसिसिपी नदीवर जगातील पहिला स्टीलचा पूल बांधला. याआधी बांधले जाणारे सगळे पूल हे लाकडी होते, ज्याचं आयुष्य कमी असल्यामुळं, ते काही वर्षातच कोसळायचे. पण की-स्टोन कंपनीच्या स्टीलच्या पुलाने मात्र जादू केली. दीर्घकाळ टिकणारा हा पूल सर्वांच्या विश्वासास पात्र ठरला आणि अँड्र्यू कार्नेगी यांचा स्टील उद्योग जोमाने वाढू लागला.

    हळूहळू कच्च्या तेलाच्या विहिरीपासून ते स्टील उत्पादन करणाऱ्या कंपन्यांपर्यंतचे सगळे उद्योग कार्नेगी यांनी खरेदी केले. त्यामुळे त्यांना “स्टील किंग” म्हणून ओळखले जावू लागले. १८८९ मध्ये अँड्र्यू कार्नेगी यांनी आपण खरेदी केलेल्या सर्व स्टील कंपन्यांना एकत्र करून कार्नेगी स्टील कंपनी सुरू केली. त्यावेळी ती जगातली सगळ्यात मोठी स्टील कंपनी होती. या कंपनीमुळे अमेरिका, इंग्लंडपेक्षा जास्त स्टील उत्पादन करू लागली.

    पण श्रीमंत लोकांनी आपली कमाई स्वतःवर खर्च न करता चांगल्या कामांसाठी पैसे दान केले पाहिजेत असं त्यांचं मत होतं. त्यामुळे हा सगळा पैसा स्वतःजवळ किंवा परिवारासाठी न ठेवता, त्यांनी तो दान करायचं ठरवलं.

    त्यांच्या मते अपुरं शिक्षण हे जगातील अनेक समस्यांचं मूळ होतं. आपल्याला कॉलेजला जात आलं नाही याचं त्यांना आयुष्यभर वाईट वाटायचं. त्यामुळे त्यांनी अमेरिकेतील अनेक शाळा कॉलेजेसना भरघोस देणग्या दिल्या. शांततेसाठी काम करणाऱ्या संस्थांना आर्थिक मदत केली. अनेक असाध्य आजारांवरील संशोधनाचा खर्च त्यांनी उचलला. मृत्यूनंतर आपला पैसा योग्य मार्गी लावण्यासाठी त्यांनी कार्नेगी फाउंडेशनची स्थापना केली. या फाउंडेशनच्या माध्यमातून आजही अनेक सामाजिक कार्यांसाठी मदत केली जाते.

    एवढं सगळा दानधर्म करूनही कार्नेगी लोकांच्या जास्त लक्षात राहिले असतील, तर ते त्यांनी सुरु केलेल्या वाचनालयांमुळे. टेलिग्राफ कंपनीत नोकरीला असताना जेम्स अँडरसन नावाचे गृहस्थ लहान मुलांना त्यांच्याकडील पुस्तके मोफत वाचायला देत. त्यांच्यामुळे आपल्याला चांगले वाचायला आणि शिकायला मिळाले ही गोष्ट कार्नेगी कधीच विसरले नाहीत. त्यामुळे पैसे आल्यावर त्यांनी जगभरात जवळपास तीन हजारांपेक्षा जास्त लायब्ररी सुरु केल्या.

    ११ ऑगस्ट १९१९ रोजी अँड्र्यू कार्नेगी यांचं निधन झालं. पण “मरावे परी कीर्ती रुपी उरावे” या उक्तीप्रमाणे आजही कार्नेगी त्यांच्या अफाट कार्याच्या रूपाने अमर आहेत आणि सदैव राहतील. भरपूर पैसे मिळवणे ही मोठी गोष्ट आहे, पण मिळवलेला पैसा दान करण्यासाठी तेवढंच विशाल मनही लागतं हेच कार्नेगी यांनी दाखवून दिलं.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी


    आणखी वाचा

  • चॉकलेट गोळ्या विकून सगळ्यात मोठा तेलाचा व्यापारी बनलेल्या ‘जगातील पहिला अब्जाधीश माणूस’

    चॉकलेट गोळ्या विकून सगळ्यात मोठा तेलाचा व्यापारी बनलेल्या ‘जगातील पहिला अब्जाधीश माणूस’

    जॉन डेव्हिसन रॉकफेलर यांचा जन्म १८३९ मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे झाला. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या रॉकफेलर यांना लहानपणापासूनच घर चालवण्यासाठी काम करावं लागत होतं. त्यांच्या वडिलांचा औषधं विकण्याचा व्यवसाय होता; पण त्यात त्यांचा जम बसत नव्हता. त्यामुळं त्यांना अनेक शहरात फिरावं लागत होतं.

    अखेरीस १८५४ मध्ये हे कुटुंब ओहिओ इथं येऊन स्थिरावले. जॉन यांना आपलं शालेय शिक्षण पूर्ण करायचं होत, पण परिस्थितीमुळं त्यांना ते करता आलं नाही. पोट भरण्यासाठी हाताला काम पाहिजे म्हणून त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी बुक किपिंगचा एक कोर्स केला आणि एका कंपनीमध्ये बुक किपर म्हणून रुजू झाले. लहानपानपासूनच त्यांना दानधर्म करायची भारी आवड होती. तेव्हाच त्यांनी ठरवलं होतं कि आपण जितक कमावू त्याच्यातील १०% उत्पन्न हे दान करायचं.

    २६ सप्टेंबर या दिवशी त्यांना नोकरी मिळाली होती, म्हणून ते हा दिवस “जॉब डे” म्हणून साजरा करत. सुरुवातील प्रतिमहिना १६ डॉलर्स आणि नंतर ३१ डॉलर्स प्रतिमहिना पगारावर दोन वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करायच ठरवलं. त्यांनी बँकेतून लोन घेऊन, आपल्या सहकाऱ्यांसोबत स्वतःची कंपनी चालु केली. ही कंपनी धान्य खरेदी विक्री करायचं काम करत होती. अमेरिकेतील १८५७च्या मंदीच्या काळातसुद्धा रॉकफेलर यांचा व्यवसाय जोमात चालू होता.

    त्याच दरम्यान, म्हणजे १८५० ते १८६० मध्ये चालू झालं ते “पेनसिल्वनिया ऑईल रश”. पेनसिल्वनियामध्ये तेलाच्या खाणी सापडल्या. त्यामुळे सगळे व्यापारी तेल खणण्याच्या व्यवसायाकडे वळले. पण तेल खाणकाम व्यवसाय बऱ्यापैकी नशिबावर अवलंबून असल्याने त्या मार्गाने न जाता रॉकफेलर यांनी तेल शुद्धीकरणाचे कारखाने चालू केले. आणि यातूनच जन्म झाला तो “स्टँडर्ड ऑइल”चा. चोवीस वर्षीय रॉकफेलर यांच्यासाठी हा खरा टर्निंग पॉइंट होता आणि अमेरिकेसाठीसुद्धा.

    रॉकफेलर यांचा रिफायनरी व्यवसाय उत्तरोत्तर वाढत होता. यातून मिळणारा नफाही तितकाच मोठा होता, पण प्रश्न होता तो ट्रान्सपोर्टचा. या काळात रेल्वे इंडस्ट्री ही काही ठराविक लोकांच्या अधिपत्याखाली होती. त्यांच्या मर्जीशिवाय वाहतूक करणे शक्य नव्हते, यावेळी व्यवहार चातुर्य वापरून रॉकफेलर यांनी या लोकांसोबत बोलणी करून फक्त स्टॅंडर्ड ऑइल कंपनीसाठीच कमी दरात वाहतूक करण्याची परवानगी मिळवली. यामुळे स्टँडर्ड ऑइलचे केरोसीन हे सर्वात कमी किमतीला लोकांना उपलब्ध झालं.

    त्यानंतर त्यांनी ऑइल हे पाईपलाईनद्वारे कसं ट्रान्सपोर्ट केलं जाऊ शकतं हे पाहिलं. पाइपमधून ऑईल ट्रान्सपोर्ट करण्याचा हा जगातील पहिलाच प्रयोग होता. तेलाचं शुद्धीकरण करताना खूप तेल वाया जात होतं. यावेळी रॉकफेलर यांनी एक कमिटी बसवून वाया गेलेल्या तेलापासून पासून काय बनवता येईल हे पाहिलं आणि तेव्हा जन्माला आलं ते tar म्हणजेच डांबर, पेट्रोलियम जेली आणि पॅराफीन वॅक्स.

    Pipeline of Standard Oil, Img. Source : Britannica

    Horizontal Integration पद्धतीचा वापर करून छोट्या आणि डबघाईला जाणाऱ्या सगळ्या कंपन्या takeover करत रॉकफेलर आपला व्यापार वाढवत होते. त्यांचा टेकओव्हरचा वेग इतका होता की दर महिन्याला ३-४ कंपन्या विकत घ्यायचे. आलेला सगळा नफा पुन्हा व्यवसाय वाढवण्यासाठी वापरत होते. याचा परिणाम असा झाला की, १८९०च्या दशकात अमेरिकेतील ९०% ऑइल रिफायनरी या फक्त स्टँडर्ड ऑईल कंपनीच्या होत्या; तर अमेरिकेत पुरवठा होणाऱ्या एकूण केरोसीनपैकी ९८ टक्के केरोसीन हे स्टँडर्ड ऑइल विकत होतं.

    अशाप्रकारे स्टॅंडर्ड ऑइलची अमेरिकेत मक्तेदारी तयार होत होती. ती इतकी झाली की, स्टँडर्ड ऑइल अंतर्गत वीस हजार तेलाच्या विहिरी, ४००० ट्रान्सपोर्ट पाईपलाईन, तर जवळपास एक लाख कामगार काम करत होते.

    १९०२साली इडा डारबेल या महिलेने स्टॅंडर्ड ऑइलवर काही लेख लिहिले. त्याच पुढे पुस्तक सुद्धा प्रकाशित झालं. यात तिने असा आरोप केला होता की, स्टँडर्ड ऑइलने अनेक कंपन्या जबदस्तीने विकत घेतल्या आहेत. यानंतर काही पत्रकारांनी सुद्धा रॉकफेलर यांच्यावर अनेक आरोप केले.

    अखेरीस या मक्तेदारीला आळा घालण्यासाठी अमेरिका सरकारने “शेअरमन अँटी ट्रस्ट ऍक्ट” पारित केला. यामुळे स्टँडर्ड ऑइल ३४ वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विभागली गेली. विभाजनानंतरही या कंपन्या प्रगती करत होत्या. पुढे या कंपन्या एकमेकात विलीन होत एकत्र येत गेल्या. या कंपन्या आजही अमेरिकन तेल उद्योगाचा गाभा आहेत. अमेरिकेतील शेवरॉन, एक्सॉन मोबिल, ब्रिटिश पेट्रोलियम, मॅरेथॉन पेट्रोलियम या कंपन्या त्याचाच एक भाग आहेत.

    १८९३ मध्ये त्यांची भेट स्वामी विवेकानंद यांच्यासोबत झाली. स्वामी विवेकानंदांकडून त्यांनी दानधर्म करण्याबाबत चर्चा केली. पुढे १८९५ नंतर रॉकफेलर यांनी रिटायरमेंट घेतली आणि आपले उर्वरित आयुष्य दानधर्म करण्यात घालवले. त्यांनी युनिवर्सिटी ऑफ शिकागो उभारण्यात मदत केली. १९०९ मध्ये चालू झालेल्या रॉकफेलर सॅनिटरी कमिशनने अमेरिकेतून हुकवर्म हा रोग समूळ नष्ट होण्यासाठी प्रयत्न केले आणि पुढच्या वीस वर्षात त्यांनी आपले लक्ष्य साध्य देखील केले. रॉकफेलर फाउंडेशनमार्फत त्यांनी रिसर्च अँड डेव्हलपमेंटला प्रोत्साहन दिलं. अशा अनेक सामाजिक कार्यांसाठी लक्षावधी डॉलर्स रॉकफेलर यांनी दान केले.

    १९१६ साली ते आधुनिक जगातील पहिले अब्जाधीश बनले. अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या २ टक्के इतकी एकट्या रॉकफेलर यांची संपत्ती होती. आजच्या मूल्यानुसार हा आकडा ४८० अब्ज डॉलर्स म्हणजे ३५ लाख कोटींहून अधिक होतो. म्हणजे सध्या जगात सर्वात श्रीमंत असलेल्या एलोन मस्कहुन दुपटीने अधिक.

    पुढे त्यांनी स्टील उद्योग क्षेत्रात सुद्धा शिरकाव केला. पण लवकरच स्टील उद्योग सम्राट अँड्र्यू कार्नेगी यांनी ती कंपनी विकत घेतली आणि यामुळे युनायटेड स्टील जगातील सर्वात मोठी कंपनी बनली. पुढील लेखात आपण याच युनायटेड स्टीलचे संस्थापक अँड्र्यू कार्नेगी यांचा जीवनप्रवास जाणून घेणार आहोत.

    रॉकफेलर यांच्या दोन महत्त्वाच्या इच्छा होत्या, त्यापैकी एक म्हणजे १ लाख डॉलर्स कमावणे आणि दुसरे होते शंभर वर्षे जगणे. त्यातली पहिली इच्छा त्यांनी पूर्ण केली, पण दुसरी मात्र होता होता राहिली. वयाच्या ९७व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गरीब म्हणून जन्माला आलो तरी गरीब म्हणून मरणार नाही, हेच रॉकफेलर आपल्याला शिकवून जातात.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

    आणखी वाचा

  • Success Story: एका भांडणानं बनवली कोट्यावधींची संपत्ती, वाचा ‘ओला’ कॅब मालकाची प्रेरक कथा

    Success Story: एका भांडणानं बनवली कोट्यावधींची संपत्ती, वाचा ‘ओला’ कॅब मालकाची प्रेरक कथा

    कामानिमित्त प्रवास करायचा तर ऑटो किंवा टॅक्सीने फिरणं आलंच. त्यातच रिक्शा आणि टॅक्सीने प्रवास करायचा तर खासकरून रिक्शा टॅक्सी चालक आणि प्रवासी यांच्यातली भांडणं आपण दररोज ऐकत असतो किंवा वाचत असतो. कधी आपल्याही वाट्याला असे प्रसंग येतात. आपलंही त्यावेळेस डोकं फिरतं, मात्र काही काळ गेला की आपण शांत होतो आणि मग इतरांना त्याचा कसा त्रास होतोय हे वाचतो आणि सोडून देतो. मात्र एका व्यक्तीने त्याला आलेल्या वाईट अनुभवातून योग्य तो धडा घेतला आणि त्यापासून प्रेरणा घेत त्याने चक्क कोट्यावधी रुपयांचं साम्राज्य उभं केलं. ऐकून थोडं विचित्र वाटेल मात्र आयआयटी पदवीधर भावेश अग्रवाल यांचा हा अनुभव तुम्हालाही इंटरेस्टिंग वाटेल.


    अनेकदा टॅक्सीचालक आपल्याला मनमानी भाडं सांगतात. आपण नाईलाज म्हणून ते भाडं देण्यासाठी तयारही होतो. आयआयटी पदवीधर भावेश अग्रवाल आपल्या कामानिमित्त असाच एकदा प्रवास करत असताना टॅक्सीचालकाशी त्यांचं भांडण झालं. भांडणाचं  प्रमुख कारण म्हणजे तो टॅक्सीचालक त्यांच्याकडून जादा भाड्याची मागणी करत होता. 


    मात्र हे भांडण झाल्यावर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं नाही तर देशात लो बजेट फेअर कॅब सर्व्हीसची किती नितांत गरज आहे हे त्यांनी ओळखलं. घरी आल्यावर त्यांनी आपला प्लान कुटुंबाला सांगितला. मात्र ‘आयटीत भरघोस पगाराची नोकरी असताना हे काय मध्येच?’ अशी कुटुंबाची भूमिका होती. भावेश मात्र आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी आपली योजना पूर्णत्वास न्यायची असा चंग बांधला. त्यांना त्यांच्या या बिझनेस प्लानमध्ये त्यांचा मित्र अंकीत भाटी यांची साथ मिळाली आणि मग काय, या दोघांनी मिळून बंगळूरूत ‘ओला’ या टॅक्सी व्यवसायाची सुरूवात केली.


    त्यांनी कायम एक खूणगाठ मनाशी पक्की केली होती की काहीही झालं तरीही प्रवाशांना सर्वोच्च सेवा उपलब्ध करून द्यायची. लो फेअर कॅब सर्व्हिसची मुहूर्तमेढ तिथेच रोवली गेली आणि देशात प्रवाशांना आरामदायी आणि खिशाला परवडणारी अशी ‘ओला’ सेवा मिळाली. आज आपल्यापैकी प्रत्येकानं किमान एकदा तरी स्मार्टफोनवरून ही कॅब बुक करून त्याचा आनंद घेतला असेलच.

    किती आहे ओला कॅबचं नेटवर्थ?

    ओलैा कॅबच्या नेटवर्थबद्दल बोलायचं झाल्यास हा आकडा आजमितीला 4.8 अब्ज डॉलर्स म्हणजेच 39 हजार 832 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.याशिवाय आता कंपनीने ओला इलेक्ट्रिकल्सच्या नावाने सुरू केलेल्या इ टू व्हिलरलाही पसंती मिळतेय. आज याही कंपनीचं नेटवर्थ साधारणपणे 2 हजार 400 कोटी रुपयांच्या घरात पोहोचलं आहे.