आई म्हणजे प्रेम, त्याग आणि जबाबदारीचं जिवंत रूप. आपल्या मुलांसाठी ती कोणत्याही अडचणींवर मात करू शकते. याचं जिवंत उदाहरण म्हणजे मलेशियातील रचेल कौर (Racheal Kaur), ज्या आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी दररोज तब्बल ६०० किलोमीटरचा विमान प्रवास करतात! त्यांच्या त्यागाची ही कहाणी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि लाखो लोकांना प्रेरणा देत आहे.
राचेल कौर या भारतीय वंशाच्या असून आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून त्या मलेशियातील क्वालालंपूर ते सिंगापूर असा रोज विमान प्रवास करतात. चला, जाणून घेऊया त्यांच्या या अनोख्या आणि रंजक प्रवासाबद्दल!
रोजचा प्रवास कसा असतो?
राचेल कौर या मलेशियातील पेनांग शहरात राहतात, तर त्यांचं ऑफिस क्वालालंपूरमध्ये आहे. त्या एअर एशिया कंपनीत फायनान्स ऑपरेशन विभागात असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतात. आधी त्या ऑफिसजवळ राहत होत्या, पण तिथलं घरभाडं खूप महाग होतं. आणि त्या फक्त आठवड्यातून एकदाच आपल्या मुलांना भेटू शकत होत्या. आई म्हणून त्यांना हे सहन होईना. म्हणून त्यांनी अनोखा मार्ग निवडला तो म्हणजे दररोज विमानाने प्रवास करण्याचा!
राचेल रोज पहाटे ४ वाजता उठतात, तयारी करून ५:५५ च्या फ्लाइटने क्वालालंपूरला जातात आणि ७:४५ ला ऑफिसला पोहोचतात. संध्याकाळी ऑफिस संपल्यावर त्या पुन्हा विमानाने पेनांगला परततात आणि रात्री ८ वाजता आपल्या मुलांसोबत असतात. हा प्रवास ऐकायला अविश्वसनीय वाटतो, पण त्यांच्या मते यामुळे त्या मुलांसोबत अधिक वेळ घालवू शकतात आणि त्यांच्या संगोपनात कुठलीही तडजोड करावी लागत नाही.
विमान प्रवास महाग नाही का?
पहिल्यांदा ऐकून वाटतं की रोज विमानाने प्रवास करणं खूप महाग असेल. पण प्रत्यक्षात राचेल कौर यांचा खर्च आधीपेक्षा कमी झाला आहे. आधी त्या ऑफिसजवळ राहायच्या, तेव्हा त्यांना दरमहा २८,००० (३४० डॉलर) घरभाडं द्यावं लागायचं. त्यात मुलांपासून दूर राहण्याचं दुःख वेगळंच होतं.
आता त्या रोज विमानाने प्रवास करतात, तरी त्यांचा खर्च कमी आहे. विमान तिकिटासाठी त्यांना रु. १८,५०० (२२६ डॉलर) आणि जेवणासाठी रु. ५,५०० (६८ डॉलर) इतकाच खर्च येतो. त्यामुळे त्यांची पैशांची बचतही होते आणि त्यांना कुटुंबासोबत राहण्याचा आनंदही मिळतो.
आई असणं म्हणजे त्याग आणि कष्ट
राचेल कौर यांची ही प्रेरणादायी कहाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. पण अशीच कहाणी लाखो भारतीय महिलांचीही आहे. भारतातही अनेक स्त्रिया रोज तासन्तास लोकल ट्रेन, बस किंवा ट्रॅफिकमध्ये अडकून ऑफिसला जातात. घरी परतल्यानंतरही त्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळतात. आईपण आणि करिअर एकत्र निभावणं सोपं नसतं, पण त्या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात.
राचेल यांची कहाणी प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, विशेषतः त्या महिलांसाठी ज्या आपल्या कुटुंब आणि करिअरमध्ये सुंदर समतोल साधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहतात. ही कहाणी त्या सर्व आईंना समर्पित आहे, ज्या आपल्या मुलांसाठी आणि कुटुंबासाठी अहोरात्र झटत असतात.
नवी अर्थक्रांती राचेल आणि अशा सर्व “आयांना” सलाम करते , ज्या आपल्या कुटुंबासाठी आणि करिअरसाठी अखंड झटत असतात!
रेल्वे हा भारतीय जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. देशभरातील लाखो लोक रोज रेल्वेने प्रवास करतात, आणि या सर्व गाड्यांसाठी तिकीट घेणे आवश्यक असते. तिकीटाशिवाय प्रवास केल्यास दंडही भरावा लागतो. पण तुम्हाला माहिती आहे का, भारतात एक अशी ट्रेन आहे जिथे कोणतेही तिकीट लागत नाही?
होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलंत. भाक्रा-नांगल ट्रेन (The Bhakra-Nangal Train) ही भारताची एकमेव मोफत रेल्वे सेवा आहे, जी तब्बल ७५ वर्षांपासून विनाशुल्क प्रवासी सेवा पुरवत आहे. ही ट्रेन भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळ (BBMB) द्वारे चालवली जाते आणि केवळ वाहतुकीचे साधन नसून, भारताच्या औद्योगिक विकासाचा आणि ऐतिहासिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे.
या ट्रेनची सुरुवात कशी झाली? ही सेवा मोफत का आहे? आणि प्रवाशांना नेमका कसा अनुभव मिळतो? चला, आजच्या लेखात या ऐतिहासिक ट्रेनचा रंजक प्रवास जाणून घेऊया!
भाक्रा-नांगल (Bhakra-Nangal Train) ट्रेनची सुरुवात
भाक्रा-नांगल रेल्वे सेवा १९४८ मध्ये सुरू करण्यात आली. त्या काळात भारतात मोठमोठे विकास प्रकल्प हाती घेतले जात होते, त्यापैकी एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे भाक्रा-नांगल धरण. सतलज नदीवर उभारलेले हे धरण २२६ मीटर उंच आणि ५२० मीटर लांब असून, भारताच्या कृषी आणि जलविद्युत उत्पादनासाठी अत्यंत उपयुक्त ठरले. धरणाच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर कामगार, अभियंते आणि साहित्य यांची वाहतूक करण्यासाठी रेल्वेची गरज भासली.
याच कारणामुळे भाक्रा आणि नांगल या दोन ठिकाणांदरम्यान रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. सुरुवातीला ही ट्रेन केवळ धरणाच्या बांधकामासाठी वापरण्यात येत होती, मात्र नंतर स्थानिक रहिवासी आणि पर्यटक यांच्यासाठीही ती खुली करण्यात आली. प्रारंभी ही ट्रेन वाफेच्या इंजिनांवर चालवली जात होती, परंतु १९५३ मध्ये अमेरिकेतून डिझेल इंजिन आयात करून तिला अधिक आधुनिक बनवण्यात आले.
या ट्रेनच्या डब्यांचे देखील विशेष महत्व आहे, कारण ते कराचीमध्ये बनवलेले लाकडी डबे आहेत. आजही हे डबे वसाहतकालीन रेल्वे प्रवासाची आठवण करून देतात. भाक्रा-नांगल रेल्वे केवळ एक वाहतुकीचे साधन नव्हे, तर भारताच्या प्रगतीच्या वाटचालीतील एक ऐतिहासिक घटक म्हणून ओळखली जाते.
भाक्रा-नांगल ट्रेनचा प्रवास आणि अनुभव
भाक्रा-नांगल ट्रेन नांगल (पंजाब) ते भाक्रा (हिमाचल प्रदेश) दरम्यान अवघ्या १३ किलोमीटरचा प्रवास करते. शिवालिक पर्वतरांगेतून आणि सतलज नदीच्या काठाने जाणारा हा प्रवास निसर्गरम्य आणि मन मोहवणारा आहे. मार्गात तीन बोगदे आणि सहा लहान स्थानके येतात, ज्यामुळे प्रवाशांना भाक्रा-नांगल धरणाचे भव्य दृश्य, शांत वाहणारी सतलज नदी आणि हिरव्यागार टेकड्यांचे सौंदर्य अनुभवता येते.
ही ट्रेन दररोज सुमारे ८०० प्रवाशांनामोफत सेवा देते. पर्यटकांसाठी हा प्रवास इतिहास आणि निसर्गसौंदर्याचा अनोखा संगम आहे, तर स्थानिक रहिवाशांसाठी ती दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा भाग आहे. हा लहानसा प्रवास निसर्गप्रेमी आणि इतिहासप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरतो.
ही ट्रेन मोफत का आहे?
भाक्रा-नांगल ट्रेन (The Bhakra-Nangal Train) मोफत असण्याचे मुख्य कारण म्हणजे भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळ (BBMB), जे या ट्रेनचा संपूर्ण खर्च स्वतः उचलते. भारतातील इतर कोणतीही ट्रेन मोफत नाही, पण ही ट्रेन विनाशुल्क ठेवण्यात आली आहे, कारण ती भारताच्या औद्योगिक वारशाचा महत्त्वाचा भाग मानली जाते. ही ट्रेन दर तासाला सुमारे १८-२० लिटर डिझेल वापरते, त्यामुळे ती चालवणे स्वस्त नाही. तरीही, BBMB या ऐतिहासिक आणि औद्योगिक वारशाच्या जतनासाठी प्रवाशांकडून भाडे घेत नाही.
भाक्रा-नांगल ट्रेनचा प्रवास का करावा?
भाक्रा-नांगल ट्रेनचा प्रवास हा भारताच्या औद्योगिक इतिहासाची झलक पाहण्यासाठी आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. या मोफत प्रवासादरम्यान तुम्हाला भाक्रा-नांगल धरणाचे भव्य दृश्य, शांत वाहणारी सतलज नदी आणि शिवालिक टेकड्यांचे मनमोहक सौंदर्य अनुभवता येते. तसेच, या ट्रेनमध्ये जुन्या रेल्वे डब्यांचा ऐतिहासिक अनुभव घेण्याची संधी मिळते. त्यामुळे अनोख्या आणि संस्मरणीय प्रवासासाठी भाक्रा-नांगल ट्रेन नक्कीच एक उत्तम निवड ठरते. जर तुम्हाला इतिहास, निसर्ग आणि अभियांत्रिकी चमत्काराचा अनोखा संगम अनुभवायचा असेल, तर तुम्ही भाक्रा-नांगल ट्रेनचा प्रवास एकदा तरी नक्कीच केला पाहिजे!
आजच्या डिजिटल युगात प्रत्येक क्षेत्रात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. बँकिंग प्रणालीही याला अपवाद नाही. बँकेत जाण्याची गरज न पडता, मोबाईलद्वारे अगदी सहज बँकिंग करता येते. इंटरनेटच्या मदतीने आपण बिले भरू शकतो, ऑनलाइन शॉपिंग करू शकतो आणि एका क्लिकवर पैसे ट्रान्सफरही करू शकतो. पण, तुम्ही बाहेर असाल आणि अचानक रोख रकमेची गरज भासली, पण तुमच्याकडे ATM कार्ड नसेल, तर काय कराल?
काळजी करू नका! आता नवीन तंत्रज्ञानामुळे UPI-आधारित कार्डलेस कॅश विथड्रॉल ही सुविधा काही प्रमुख बँकांच्या ATM मध्ये सुरू करण्यात आली आहे. SBI, HDFC, आणि PNB यांसारख्या प्रमुख बँका ही सेवा पुरवत आहेत. या सुविधेच्या मदतीने तुम्ही BHIM, Google Pay, PhonePe, Amazon Pay, Paytm यांसारख्या UPI ॲप्सचा वापर करून सहज पैसे काढू शकता.
आजच्या लेखात आपण या सुविधेचा वापर कसा करायचा ते सविस्तर समजून घेऊया!
UPI द्वारे ATM मधून पैसे कसे काढायचे?
जर तुमच्याकडे ATM कार्ड नसेल आणि तुम्हाला अर्जंट पैसे काढायचे असतील, तर घाबरू नका! UPI-सक्षम ATM चा वापर करून तुम्ही सहज पैसे काढू शकता. फक्त खालील स्टेप्स फॉलो करा.
UPI वापरून ATM मधून पैसे काढण्याची प्रक्रिया
१. जवळच्या UPI सुविधा असलेल्या ATM मध्ये जा. २. ATM स्क्रीनवर “UPI Cash Withdrawal” हा पर्याय निवडा. ३. काढायची रक्कम टाका (कमाल ₹ ५००० पर्यंत). ४. स्क्रीनवर QR कोड दिसेल. ५. तुमच्या मोबाईलमधील UPI ॲप उघडा आणि QR कोड स्कॅन करा. ६. UPI पिन टाका आणि “Proceed” वर टॅप करा. ७. ATM मधून पैसे मिळतील!
ही प्रक्रिया पूर्णतः सुरक्षित आहे कारण यामध्ये कार्डशिवाय व्यवहार केला जातो, म्हणजेच कोणतेही ATM कार्ड वापरण्याची गरज नाही. तसेच, OTP शिवाय ट्रान्झॅक्शन होत असल्याने फसवणुकीचा धोका कमी होतो. ही पद्धत वेगवान आणि सोपी असल्यामुळे काही सेकंदांतच तुम्हाला हवी ती रक्कम मिळते. त्यामुळे ATM कार्ड हरवले तरी चिंता नाही, UPI ATM द्वारे पैसे काढणे सोपे, सुरक्षित आणि जलद झाले आहे.
UPI म्हणजे काय?
UPI (Unified Payments Interface) म्हणजे डिजिटल पेमेंट करण्याची एक सोपी आणि वेगवान प्रणाली आहे. याच्या मदतीने तुम्ही एका बँक खात्यातून दुसऱ्या बँकेत क्षणात पैसे ट्रान्सफर करू शकता. खास गोष्ट म्हणजे, UPI वापरून तुम्ही QR कोड, मोबाईल नंबर किंवा UPI ID द्वारे सहज व्यवहार करू शकता.
UPI मुळे पैसे पाठवणे, ऑनलाइन खरेदी करणे आणि कार्डशिवाय ATM मधून पैसे काढणे अगदी सोपे झाले आहे. तुम्ही कुठूनही आणि केव्हाही पेमेंट करू शकता, त्यामुळे रोख पैशांची गरज कमी होते आणि व्यवहार अधिक सुरक्षित आणि सोपे होतात.
UPI-आधारित कार्डलेस व्यवहाराचे फायदे
UPI-आधारित कार्डलेस कॅश विथड्रॉल ही डिजिटल बँकिंगमधील मोठी क्रांती आहे. ही सेवा सुरक्षित, सुलभ आणि वेगवान आहे. कार्ड चोरी किंवा फ्रॉडचा कोणताही धोका नाही, कारण यात कोणतेही ATM कार्ड वापरण्याची आवश्यकता नसते. तसेच, OTP शिवाय ट्रान्झॅक्शन पूर्ण करता येत असल्यामुळे प्रक्रिया अधिक सुरक्षित होते. काही सेकंदांत पैसे काढण्याची सुविधा मिळते आणि २४ तास केव्हाही व्यवहार करता येतो, त्यामुळे रोख पैशांची गरज भासली, तरी कोणतीही अडचण येत नाही.
ही सुविधा वापरून तुम्ही स्मार्ट आणि सुरक्षित बँकिंगचा अनुभव घेऊ शकता. त्यामुळे पुढच्या वेळी ATM कार्ड विसरले तरी काळजी करू नका, तुमच्या मोबाईलमधील UPI ॲप तुमच्या मदतीला येईल!
भारतीय रेल्वे कोट्यवधी प्रवाशांसाठी स्वस्त, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा उत्तम पर्याय आहे. आपण घरापासून लांब राहत असू किंवा अचानक कुठे प्रवास करण्याची गरज भासली, तर रेल्वेचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मात्र, काही वेळा तिकीट बुक करताना आपल्याकडे पुरेसे पैसे नसतात आणि त्यामुळे अडचण निर्माण होते.
पण आता काळजी करण्याची गरज नाही! भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी ‘बुक नाऊ, पे लेटर’ ही नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे आपण तिकीट त्वरित बुक करू शकतो आणि त्यासाठीचे पेमेंट प्रवासानंतर १४ दिवसांच्या आत करू शकतो. म्हणजेच, अचानक प्रवास करावा लागला आणि तिकीटासाठी पुरेसे पैसे हाताशी नसले, तरीही ही योजना मदतीला येते.
या लेखात जाणून घेऊया की ही योजना नेमकी कशी कार्य करते, कोणाला याचा लाभ मिळू शकतो आणि त्याचे फायदे काय आहेत.
‘बुक नाऊ, पे लेटर’ योजनेचा लाभ कसा घ्यावा?
भारतीय रेल्वेने ही योजना फक्त ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी लागू केली आहे. याचा फायदा घेण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा
1. रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी सर्वप्रथम IRCTC वेबसाइट किंवा मोबाईल अॅपवर लॉगिन करा.
2. आपल्या प्रवासासाठी योग्य ट्रेन, प्रवाशांची संख्या आणि प्रवासाची तारीख निवडा. त्यानंतर उपलब्ध तिकिटे तपासा आणि तुमच्या सोयीच्या गाडीसाठी तिकीट निवडा.
3. तिकीट बुक करताना पेमेंट करण्यासाठी वेगवेगळे पर्याय दिसतील. त्यापैकी ‘पे लेटर’ हा पर्याय निवडा, ज्यामुळे तुम्हाला तिकीट शुल्क त्वरित न भरता प्रवासानंतर १४ दिवसांच्या आत पैसे भरण्याची सुविधा मिळते.
4. जर तुम्ही पहिल्यांदाच या सुविधेचा वापर करत असाल, तर EpayLater या प्लॅटफॉर्मवर जाऊन तुमची नोंदणी करा. यासाठी तुमचा मोबाईल नंबर, ई-मेल आणि KYC संबंधित आवश्यक माहिती द्यावी लागेल.
5. EpayLater वर नोंदणी झाल्यानंतर, तुमच्या IRCTC खात्यातून तिकीट बुकिंग प्रक्रिया पूर्ण करा. तिकीट यशस्वीपणे बुक झाल्यावर तुम्हाला ई-मेल आणि SMS द्वारे त्याचा तपशील मिळेल.
6. तिकीट बुक केल्यानंतर तुमच्या प्रवासानंतर १४ दिवसांच्या आत EpayLater च्या माध्यमातून पेमेंट करणे आवश्यक आहे. जर दिलेल्या वेळेत पैसे भरले, तर कोणतेही अतिरिक्त शुल्क लागणार नाही. मात्र, उशीर झाल्यास व्याज किंवा दंड आकारला जातो.
‘बुक नाऊ, पे लेटर’ योजना का उपयुक्त आहे?
रेल्वे प्रवास करताना अनेकदा अचानक प्रवास करण्याची गरज भासते, पण तिकीट बुक करताना तत्काळ पैसे उपलब्ध नसतात. अशा वेळी ‘बुक नाऊ, पे लेटर’ ही योजना अत्यंत फायदेशीर ठरते. या सुविधेमुळे तिकीट त्वरित बुक करता येते, पण त्याचे पैसे नंतर भरता येतात. त्यामुळे अचानक प्रवासाची वेळ आली तरीही कोणतीही अडचण न येता तुम्ही सहज प्रवास करू शकता.
प्रवाशांना पैशांची व्यवस्था करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. शिवाय, ही प्रक्रिया अगदी सोपी असून जास्त कागदपत्र लागत नाहीत. फक्त IRCTC च्या EpayLater च्या मदतीने काही मिनिटांत तिकीट बुक करता येते.
ही योजना वारंवार रेल्वे प्रवास करणारे प्रवासी, विद्यार्थी, नोकरीसाठी प्रवास करणारे नोकरदार आणि व्यावसायिक यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तिकीट बुकिंगच्या वेळी पैशांची कमतरता जाणवत असेल, तर ही सुविधा नक्कीच दिलासा देणारी ठरेल.
योजनेचे फायदे
तिकीट बुक करताना लगेच पैसे द्यावे लागत नाहीत, त्यामुळे अचानक प्रवास करायचा असल्यास आर्थिक ताण येत नाही.
ही सुविधा फक्त ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी उपलब्ध असल्याने तिकीट सहज आणि झटपट मिळते.
ठरवलेल्या मुदतीत पैसे भरल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क लागत नाही.
मुदतीनंतर पैसे भरल्यास फक्त ३.५% सेवा शुल्क आकारले जाते, त्यामुळे मोठा आर्थिक बोजा पडत नाही.
जीमेल (Gmail) ही गूगलची (Google) अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावी ई-मेल सेवा आहे. आज जगभरातील कोट्यवधी लोक जीमेलचा वापर करतात. जीमेलचा वापर आपण प्रत्येक दिवशी, कामाच्या गोष्टी, शालेय प्रोजेक्ट्स किंवा इतर बऱ्याच कारणासाठी करत असतो. आजकालचे मोठ्या प्रमाणात पत्रव्यवहार सुद्धा जीमेलच्या माध्यमातून होत असतात. गूगलचं व्यवसाय मॉडेल एवढं यशस्वी आहे की, फक्त जीमेलच्या माध्यमातून गूगलला अब्जावधी डॉलर्सचा महसूल मिळतो. मात्र, जीमेल पूर्णतः मोफत असल्यामुळे अनेक लोकांना प्रश्न पडतो की, गूगल जीमेलवरून पैसे कसे कमावते? जर तुम्हाला सुद्धा कधी ही शंका आली असेल आणि याचं उत्तर जाणून घ्यायचं असेल, तर हा लेख वाचा.
वापरकर्त्यांची माहिती आणि डेटा अॅनालिटिक्स
गूगलचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणजे त्याचा डेटा-आधारित जाहिरात व्यवसाय. जेव्हा वापरकर्ते जीमेल वापरतात, तेव्हा गूगलला त्यांच्या ईमेलमधून काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती मिळते. उदाहरणार्थ, ईमेलचे विषय, ट्रेंडिंग कीवर्ड्स, खरेदी संदर्भ (shopping receipts) आणि उत्पादने किंवा सेवांबद्दल असलेले संवाद याबद्दल माहिती मिळते. ही माहिती गूगलच्या अल्गोरिदमद्वारे संकलित केली जाते आणि त्याचा वापर जाहिरातींचे टार्गेटिंग करण्यासाठी केला जातो.
उदाहरणार्थ, जर एखादा युजर जीमेलवर फिटनेसबद्दल ईमेल्स मिळवत असेल, तर गूगल त्या युजरला फिटनेस उपकरणे किंवा आहारयुक्त जाहिराती दाखवते. यामुळे जाहिरातदारांना त्यांचे उत्पादन किंवा सेवा योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यास मदत होते आणि गूगलला या जाहिरातींच्या माध्यमातून मोठा महसूल मिळतो.
जाहिरात उत्पन्न (Google Ads/AdSense) अॅड्स हे गूगलच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे आणि जीमेल त्यात महत्त्वाचा भाग आहे. जीमेलमध्ये वापरकर्त्यांच्या इनबॉक्समध्ये थेट जाहिराती दाखविल्या जातात. जीमेलमध्ये तीन विभाग असतात. ते म्हणजे ‘इनबॉक्स, सोशल आणि प्रोमोशनल’. प्रोमोशनल टॅबमध्ये गूगल जाहिराती दाखवते. यामुळे, जीमेल वापरकर्त्यांना त्यांच्या इनबॉक्समध्ये आवश्यक असलेली माहिती मिळवता येते, त्याच वेळी गूगलच्या जाहिराती देखील दाखवल्या जातात. काही वेळा, इनबॉक्समध्ये देखील स्पॉन्सर्ड ईमेल्स येतात, जे विशिष्ट ब्रँडद्वारे पाठवले जातात. गूगल वापरकर्त्यांच्या ईमेलमधील शब्दांवर आधारित संबंधित कंटेक्स्चुअल अॅड्स (Contextual Ads) दाखवतो. गूगलला या जाहिरातींमधून उत्पन्न मिळते. जाहिरातदार गूगलला त्यांच्या जाहिरातींसाठी पैसे देतात आणि जर एखाद्या युजरने त्या जाहिरातीला क्लिक केले किंवा पाहिले, तर त्याचा महसूल थेट गूगलला मिळतो. यामुळे गूगलची जाहिरात प्रणाली अत्यंत यशस्वी ठरते, कारण ती वापरकर्त्यांच्या ईमेल अनुभवाशी संबंधित असते. जेव्हा जाहिराती वापरकर्त्यांच्या गरजांनुसार आणि आवडीनुसार असतात, तेव्हा त्या अधिक प्रभावी ठरतात आणि गूगलला त्याचबरोबर मोठा लाभ मिळवून देतात.
गूगल वर्कस्पेस (Google Workspace)
गूगल वर्कस्पेस हे गूगलचे प्रीमियम सबस्क्रिप्शन मॉडेल आहे, जे व्यवसायांसाठी खास डिझाइन केले आहे. या सेवेमध्ये व्यवसायांना कस्टम डोमेनसह ईमेल वापरण्याची परवानगी दिली जाते. यामध्ये 30 GB किंवा त्यापेक्षा अधिक स्टोरेज, प्रगत सुरक्षा उपाय, आणि गूगल ड्राईव्ह, कॅलेंडर, मीट सारख्या गूगलच्या सेवांचा समावेश आहे. गूगल वर्कस्पेससाठी दर महिन्याला प्रति वापरकर्त्यापासून ६ ते १८ अमेरिकन डॉलर घेतले जातात. हजारो व्यवसाय गूगल वर्कस्पेस वापरतात, ज्यामुळे गूगलला प्रचंड उत्पन्न मिळते.
स्टोरेज योजना (Google Drive Storage Plans)
जीमेलसह गूगल वापरकर्त्यांना 15 GB मोफत स्टोरेज पुरवतो, ज्यामध्ये ईमेल, गूगल ड्राईव्ह आणि गूगल फोटोज यांचा समावेश असतो. ज्या वापरकर्त्यांना अधिक स्टोरेज आवश्यक असते, ते गुगलचा पेड स्टोरेज प्लॅन्स खरेदी करतात. गूगलचे स्टोरेज प्लॅन्स 100 GB साठी 130 रुपये प्रति महिना, 200 GB साठी २१० रुपये प्रति महिना आणि 2 TB साठी ६५० रुपये प्रति महिना असे आहेत . यातुन गूगलला दर महिन्याला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो, कारण लाखो वापरकर्ते हे प्लॅन्स वापरत असतात.
AI आणि मशीन लर्निंगवर आधारित सेवा
जीमेलमध्ये विविध एआय-आधारित फिचर्स आहेत, जे वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्यात मदत करतात. ‘स्मार्ट रिप्लाय’ फिचर ईमेलच्या संदर्भानुसार त्वरित उत्तरांचे सुचवलेले पर्याय देते, ज्यामुळे वेळ वाचतो. ‘ईमेल फिल्टरिंग’ फिचर वापरकर्त्यांना महत्त्वपूर्ण ईमेल्स ओळखण्यास मदत करते, ज्यामुळे इनबॉक्स व्यवस्थापन अधिक सुलभ होते. हे सर्व फिचर्स वापरकर्त्यांचा वेळ वाचवतात आणि कार्यक्षमता वाढवतात, तसेच गूगलला प्रीमियम फिचर्ससाठी ग्राहक आकर्षित करण्यास मदत करतात, ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात सतत वाढ होत असते.
गूगलने जीमेलच्या माध्यमातून एक यशस्वी व्यावसायिक मॉडेल निर्माण केले आहे. वापरकर्त्यांना मोफत सेवा देऊन आणि त्यावर जाहिराती, डेटा अॅनालिटिक्स, प्रीमियम सबस्क्रिप्शन आणि स्टोरेज योजनांच्या माध्यमातून महसूल मिळवून गूगलने आपली जागतिक प्रतिष्ठा कायम ठेवली आहे. यामुळे गूगल जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांमध्ये आपले स्थान मजबूत करु शकले आहे. डेटा आधारित व्यवसाय मॉडेलने गूगलला वित्तीय आणि व्यवसायिक यश प्राप्त करण्यास मदत केली आहे, यामुळे गूगल जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांमध्ये आपले स्थान टिकवून आहे.
आजकाल ऑनलाईन अर्निंग करण्यासाठी अनेकजण ब्लॉग किंवा वेबसाईट सुरू करतात, परंतु त्यातून पैसे कसे मिळवायचे हे अनेकांना माहित नसतं. ब्लॉग किंवा वेबसाईटद्वारे पैसे कमवण्याचे बरेच मार्ग आहेत, जसं की; गुगल ॲड्स, ॲफिलिएट मार्केटिंग, जाहिराती, स्पॉन्सरशिप, प्रॉडक्ट्सची विक्री इत्यादी. परंतु या सगळ्यांमध्ये Google AdSense हा एक अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाचा मार्ग. आज आपण या लेखात Google AdSense म्हणजे काय, ते कसं कार्य करतं, AdSense ची मान्यता कशी मिळवायची आणि त्यातून पैसे कसे कमवायचे हे सविस्तरपणे समजून घेऊया
Google AdSense म्हणजे काय?
Google AdSense ही एक Google द्वारे चालवली जाणारी जाहिरात सेवा आहे. हा एक Advertise प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये ब्लॉग किंवा वेबसाईटवर विविध स्वरूपाच्या जाहिराती, जसं की इमेज, व्हिडिओ, बॅनर जाहिराती दाखवण्यात येतात. जेव्हा तुमच्या ब्लॉगला Google AdSense चे अप्रूवल मिळतं, तेव्हा तुमच्या कंटेंटशी संबंधित जाहिराती Google तुमच्या वेबसाईटवर दाखवतं. वेबसाईटवर आलेले व्हिजिटर्स जेव्हा जाहिरातींवर क्लिक करतात, तेव्हा तुम्हाला पैसे मिळतात.
Google AdSense कशाप्रकारे कार्य करते?
Google AdSense च्या कार्यप्रणालीमध्ये काही महत्त्वाचे टप्पे आहेत. सर्वप्रथम, तुमच्या वेबसाईट किंवा ब्लॉगला पात्रतेसाठी Google द्वारे एक मूल्यांकन केलं जातं. जर तुमची वेबसाईट पात्र असेल, तर तुम्हाला एक अकाउंट अप्रूव्ह केलं जातं. एकदा अप्रूवल मिळाल्यानंतर, Google तुम्हाला एक कोड प्रदान करतं . हा कोड तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर टाकावा लागतो. या कोडच्या माध्यमातून जाहिराती तुमच्या ब्लॉगवर दिसायला लागतात, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्लिकवर CPC (Cost Per Click) प्रमाणे पैसे कमवू शकता. वेबसाईटवरील ट्रॅफिक जितके जास्त असेल, तितके अधिक पैसे कमवता येतील. त्यामुळे, जाहिरातींवर जेवढे अधिकाधिक व्हिजिटर क्लिक करतात आणि तुमची कमाई वाढते.
YouTube आणि AdSense
फक्त ब्लॉगच नाही, तर YouTube चॅनलद्वारे सुद्धा Google AdSense च्या मदतीने कमाई करता येते. तुम्ही जेव्हा तुमच्या YouTube चॅनलवरील व्हिडिओमध्ये जाहिराती दाखवता आणि त्यावर लोक क्लिक करतात, तेव्हा तुम्हाला CPC च्या आधारावर पैसे मिळतात.
AdSense ची मान्यता कशी मिळवायची?
AdSense चे अप्रूवल मिळवण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे . तुमच्या वेबसाईटवर जरा युनिक आणि माहितीपूर्ण कंटेंट असणं महत्वाचं आहे. तसेच, तुमच्या वेबसाईटवर Contact Us, About Us, Privacy Policy, Terms & Conditions सारखी पेजेस तयार करणं आवश्यक आहे. यानंतर Google AdSense च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला एक नवीन खातं तयार करावं लागेल. तुमची वेबसाईट Google च्या अटींनुसार योग्य असल्यास, तुम्हाला अप्रूवल मिळतं आणि जाहिराती वेबसाईटवर दिसायला लागतात. या प्रक्रियेत थोडा वेळ लागू शकतो, पण योग्य पद्धतीने काम केल्यास तुम्हाला यश निश्चित मिळेल.
Google AdSense ही ब्लॉग आणि वेबसाईटद्वारे पैसे कमवण्याची एक सोपी व प्रभावी पद्धत आहे. जर तुमच्याकडे ब्लॉग किंवा न्यूज वेबसाईट असेल किंवा तुम्ही जर उत्तम लिहणारे असाल, तर तुम्ही स्वतःची वेबसाईट सुरु करून योग्य पद्धतीने AdSense द्वारे पैसे कमवू शकता.
Google AdSense मधून किती पैसे कमावता येतात?
यावर कोणतीही मर्यादा नाही. तुमच्या वेबसाईटवरील ट्रॅफिक आणि जाहिरातींवर क्लिक होण्याच्या प्रमाणावर हे अवलंबून असतं. युनिक कंटेंट, योग्य पेजेस (About Us, Privacy Policy), आणि नियमित ट्रॅफिक मिळणारी वेबसाईट Google AdSense च्या मदतीने तुम्ही ऑनलाईन पैसे कमविण्याच्या प्रवासाची सुरुवात करू शकता.
मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावर लेख वाचायला आवडतील, हे सांगायलाही विसरू नका.
जगामध्ये प्रत्येक कालखंडात एकाचवेळी किमान ३-४ पिढ्या आढळून येतात. 21 व्या शतकात १९९५ आणि २०१० दरम्यान जन्माला आलेली पिढी म्हणजे Gen Z. इंटरनेटला ओळखून असणारी पहिली पिढी असे या पिढीला संबोधले तरी काही गैर नाही. या पिढीला ‘डिजिटल नेटिव्ह’ असेही म्हणतात.
आत्ताचा काळ वेगाने बदलत आहे व त्यानुसार तंत्रज्ञानही. या तंत्रज्ञानाशी मैत्रीपूर्ण नाते असलेली पिढी म्हणजे जनरेशन झेड. ही पिढी म्हणजे १९९५ नंतर जन्मलेली १२ ते १८ वयोगटातील मुले. त्यांची इंटरनेट, मोबाइल, सोशल मीडियाशी खूपच मैत्री आहे. दीर्घकाळ ऑनलाइन असणारी ही पिढी. इतरांच्या तुलनेत तंत्रज्ञान विश्वाच्या अधिक जवळ दिसून येते.
Gen z पिढीची वैशिष्ट्ये :
तंत्रज्ञानाचा अंगीकार :
Gen Z ची पिढी लहानपणापासूनच स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि इंटरनेटशी जोडलेली आहे. ते डिजिटल युगात वाढलेले असल्यामुळे तंत्रज्ञानाचा चांगला वापर करत आहेत.
सामाजिक जाणीव :
या पिढीतील लोक सामाजिक प्रश्नांबद्दलसुद्धा जागरूक असतात. पर्यावरण, समानता, मानसिक आरोग्य यांसारख्या मुद्द्यांबद्दल ही पिढी विचारशील दिसून येते. समाजाबद्दल असलेली आंतरिक ओढ या पिढीमध्ये दिसून येते.
मल्टी-टास्किंग कौशल्य :
या पिढीने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक गोष्टी एकाच वेळी करण्याची सवय लावून घेतली आहे. त्यामुळे ते अभ्यास, करिअर आणि वैयक्तिक जीवन यांचा समतोल साधण्यात यशस्वी झालेले दिसतात.
स्वतंत्र विचारसरणी :
Gen Z स्वतःच्या निर्णयांवर भर देणारी, स्वत:वर विश्वास असणारी, आत्मविश्वासाने भरलेली पिढी आहे. ते स्वतःच्या आवडीनुसार करिअर निवडण्याचे धाडस करत आहेत, ते धाडस यशस्वी करूनही दाखवत आहेत तसेच पारंपारिक नोकऱ्यांच्या ऐवजी फ्रीलान्सिंग आणि स्टार्टअपमध्ये त्यांचे स्वारस्य दाखवत आहेत.
वैश्विक दृष्टिकोन :
सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील विविध संस्कृतींशी जोडले गेल्यामुळे त्यांची विचारसरणी आणि दृष्टिकोन अधिक व्यापक आणि जागतिक झालेला दिसतो.
अर्थपूर्ण कामे :
या पिढीला केवळ पैशासाठी काम करणे आवडत नाही, तर त्यांना त्यांचे काम अर्थपूर्ण आणि सामाजिक बदल घडविणारे असावे असे वाटते.
निर्णयक्षमता :
तंत्रज्ञान आणि माहितीच्या प्रचंड उपलब्धतेमुळे, Gen Z जलद निर्णय घेण्यास सक्षम आहे. ते लवकर माहिती मिळवणे आणि त्यावर प्रक्रिया करून तितक्याच तात्काळ निर्णय घेण्यावर भर देतात.
व्यक्तिमत्त्व विकास :
सोशल मीडियाच्या युगात, स्वतःचे “व्यक्तिमत्त्व” कसे सादर करावे हे Gen Z चांगले जाणते. Instagram, Facebook, LinkedIn यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर स्वतःची ओळख आणि वैयक्तिक ब्रँड विकसित करण्यास ही पिढी अधिक महत्त्व देते.
विविधतेचा स्वीकार :
Gen Z पिढी विविधतेबद्दल अधिक संवेदनशील आहे. जात, लिंग, लैंगिकता आणि सामाजिक स्थिती याबद्दल त्यांची विचारसरणी अधिक समर्पक आणि आधुनिक आहे.
उद्योजकता :
ही पिढी पारंपारिक 9-5 च्या नोकरीपेक्षा उद्योजकतेवर भर देते. अनेक Gen Z युट्युबर, इन्फ्लुएन्सर, फ्रीलान्सर तसेच स्टार्टअप फाउंडर्स आहेत. त्यांना स्वतःचे काहीतरी निर्माण करण्याची आवड आहे.
मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता :
मानसिक आरोग्य हा विषय Gen Z साठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ते ताणतणाव, चिंता आणि मानसिक आजार यांबद्दल खुलेपणाने बोलतात आणि मदत घेण्यासही तत्पर असतात.
इको-फ्रेंडली दृष्टिकोन :
पर्यावरण आणि शाश्वत मूल्ये याबद्दल ही पिढी अधिक जागरूक आहे. ते पर्यावरण रक्षणासाठी शाश्वत उत्पादनांचा वापर, प्लास्टिकचा कमी वापर आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या वापराला प्राधान्य देताना दिसून येतात.
सतत शिकण्याची वृत्ती :
Gen Z पिढीला सतत नवनवीन गोष्टी शिकण्याची आणि स्वतःला अद्ययावत ठेवण्याची इच्छा दिसते. ऑनलाईन कोर्सेस, ट्यूटोरियल्स आणि व्हिडिओंच्या माध्यमातून ते नियमितपणे स्वतःला Improve करत आहेत.
या पिढीची नोकरी टिकत का नाही ?
Gen Z at Workplace ने नुकताच एक अहवाल सादर केला आहे. या अहवालात सांगितले गेले आहे कि Gen Z पिढीतील ४५% तरुण २ वर्षेही नोकरीच्या एका जागी टिकत नाहीत. याला विविध कारणेदेखील आहेत. मुळात, प्रत्येकाची वेगवेगळी कारणे आहेत. तर ५१ टक्के लोकांना नोकरी गमावण्याची भीती आहे. ही चिंता त्यांच्या करिअरच्या संभाव्यतेपर्यंत विस्तारित आहे. कारण 40 टक्के लोकांना नोकरी मिळाल्यानंतरही त्यांच्या पसंतीच्या क्षेत्रात पद कायम ठेवण्याची चिंता आहे.
या अहवालामध्ये आणखी काही बाबी मांडण्यात आल्या आहेत. अहवालामध्ये असणाऱ्या ७७% तरुणांनी कमर्शिअल ब्रँड तसेच त्यांच्या पदाला जास्त किंमत दिली आहे. तर या ७७% तरुणांमधील ४३% तरुण अनुभव तसेच Improvement आणि Growthच्या संधीला जास्त महत्व देत असतात. अहवालात सादर असलेल्या तरुणांपैकी ७२% तरुण वेतनाच्या रक्कमेपेक्षा Job Satisfaction ला जास्त महत्व देतात, तर ७८% तरुण नोकरी बदलत आहेत कारण त्यांना आणखी पुढे जायचे आहे. HR प्रोफेशन मधील ७१% तरुणांचे असे सांगणे आहे, कि नोकरी बदलण्याचे प्रमुख कारण वेतन हेच आहे. त्यामुळे तरुणाईतील २५% लोक नोकरी बदलताना विशेष लक्ष त्यांच्या पगारावर देतात. अशा लोकांना स्वतःमध्ये राहायला जास्त आवडते.
आजच्या युगात, सोशल मीडिया हे एक महत्त्वाचे साधन बनलं आहे, ज्याचा वापर लोक आपले विचार आणि क्रिएटिव्हिटी प्रदर्शित करण्यासाठी करतात. यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवर दररोज कोट्यवधी व्हिडिओ आणि रिल्स शेअर केल्या जातात. विशेषत: तरुण पिढीमध्ये रिल्स आणि व्हिडिओ बनवण्याची प्रचंड क्रेझ आहे, ज्याचं मुख्य कारण म्हणजे प्रसिद्धी आणि आर्थिक फायदा. जितके जास्त व्ह्यूज, तितकी जास्त कमाई हे या सोशल जगातील साधं गणित आहे. त्यात यूट्यूब सर्वांत प्रभावी प्लॅटफॉर्मपैकी एक आहे, जिथं लाखो लोक आपली प्रतिभा वापरून दररोज कमाई करत आहेत.
आज आपण या लेखात यूट्यूबवरून कमाई कशी केली जाते, यूट्यूब प्ले बटन म्हणजे काय, ते किती प्रकारचे असतात आणि यूट्यूबवर उत्पन्नाचे इतर स्रोत कोणते आहेत, या गोष्टींचा सविस्तर उहापोह करणार आहोत.
यूट्यूब प्ले बटन्स
यूट्यूबकडून कंटेंट क्रिएटर्सना त्यांच्या सब्स्क्रायबर्सच्या संख्येनुसार बक्षीस म्हणून विविध प्रकारचे प्ले बटन्स दिले जातात. या बटन्समुळे क्रिएटर्सना आणि त्यांच्या चॅनल्सना उत्साह मिळतो. यूट्यूबने 2010 पासून या रिवॉर्ड सिस्टमला सुरुवात केली. सुरुवातीला यूट्यूबमार्फत फक्त सिल्व्हर आणि गोल्डन प्ले बटन दिलं जात होतं. मात्र, यूट्यूबवर युजर्सच्या वाढत्या संख्येमुळे आता पाच वेगवेगळ्या पद्धतीचे प्ले बटन्सदिले जातात. हे बटन्स यूट्यूब क्रिएटर्सच्या यशाचे प्रतीक मानले जातात.
सिल्व्हर प्ले बटन
सिल्व्हर प्ले बटन हे यूट्यूबवरील पहिलं रिवॉर्ड आहे, जे एखाद्या चॅनलने १ लाख सब्स्क्राईबर्स पूर्ण केल्यावर दिलं जातं. यासाठी क्रिएटर्सला १ लाख सब्स्क्राईबर्स झाल्यानंतर यूट्यूबकडे अर्ज करावा लागतो, त्यानंतर हे सन्मानचिन्ह दिलं जातं.
गोल्डन प्ले बटन
गोल्डन प्ले बटन हे यूट्यूबवर १० लाख सब्स्क्राईबर्स पूर्ण झाल्यावर दिलं जातं. हा यूट्यूबवर एक महत्त्वाचा टप्पा आहे, १० लाख सब्स्क्राईबर्स साध्य करणं क्रिएटरच्या प्रतिभेचं आणि मेहनतीचं मोठं उदाहरण असतं.
डायमंड प्ले बटन
जेव्हा एखादं यूट्यूब चॅनल १ कोटी सब्स्क्राईबर्स टप्पा पूर्ण करतो, तेव्हा त्यांना डायमंड प्ले बटन दिलं जातं. हे एक मोठं लक्ष्य आहे, जे सहजासहजी कोणालाही गाठता येत नाही. ज्यामुळे डायमंड प्ले बटन यूट्यूबवर मोठ्या यशाचं प्रतीक मानलं जातं.
रूबी प्ले बटन
रूबी प्ले बटन हे 5 कोटी सब्स्क्राईबर्स पूर्ण केल्यानंतर दिलं जातं. यूट्यूबवर फार कमी क्रिएटर्स या टप्प्यापर्यंत पोहोचतात, त्यामुळे हे बटन एक अतिशय दुर्मिळ आहे.
रेड डायमंड प्ले बटन
यूट्यूबवर मिळणारं सर्वांत मोठा रिवॉर्ड म्हणजे रेड डायमंड प्ले बटन, जे 10 कोटी सब्स्क्राईबर्स पूर्ण झाल्यावर दिलं जातं. हा एक असामान्य टप्पा असून, आजवर जगातील फक्त १० चॅनेल्सनाच हे बटन मिळालं आहे.
प्ले बटन्स मिळवण्याची प्रक्रिया
प्ले बटन्स आपोआप मिळत नाहीत. तर जेव्हा एखाद्या यूट्यूब चॅनलने दिलेला सब्स्क्राईबर टप्पा पूर्ण केला, तेव्हा त्यांना प्ले बटन मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो. हा अर्ज चॅनलच्या सेटिंग्समधूनच केला जातो. यूट्यूबकडून दिल्या गेलेल्या अटी आणि शर्थींना पूर्ण केल्यावरच हे बटन्स मिळतात.
यूट्यूबवर कमाई कशी होते?
यूट्यूबवरील कमाई मुख्यतः व्हिडिओवर लागलेल्या जाहिरातींमधून होते. जेव्हा एखादा युजर एखादा व्हिडिओ पाहतो, तेव्हा त्याला जाहिराती दाखवल्या जातात, त्या जाहिरातींमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा एक हिस्सा यूट्यूब क्रिएटर्सला देत असतं. एकूण व्ह्यूज, व्हिडिओची लांबी, कोणकोणत्या देशात व्हिडीओ बघितला जातो आणि कन्टेंट कोणत्या विषयावरील आहे अशा गोष्टींवर यूट्यूबच्या जाहिरातीमधून मिळणारी रक्कम अवलंबून असते. ज्या क्रिएटर्सकडे सिल्व्हर बटन आहे, त्यांची कमाई महिन्याला जवळपास 1 ते 2 लाखांपर्यंत पोहोचू शकते, तर गोल्डन बटनधारकांची कमाई यापेक्षा अधिक असते.
यूट्यूब क्रिएटर्सना जाहिरातीशिवायही अनेक मार्गांनी कमाई करता येते. यामध्ये ब्रँड प्रमोशन, स्पॉन्सरशिप, एफिलिएट मार्केटिंग आणि प्रोडक्ट प्लेसमेंट यांचा समावेश होतो. काही वेळा मोठ्या कंपन्या आणि ब्रँड्स यूट्यूबर्सला त्यांच्या प्रोडक्ट्सचं प्रमोशन करण्यासाठी पैसे देतात.
यूट्यूब हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून, हे अनेकांसाठी एक प्रभावी करिअर बनलं आहे. यूट्यूबच्या माध्यमातून लाखो लोक त्यांच्या क्रिएटिव्हिटीच्या जोरावर मोठ्या प्रमाणावर कमाई करत आहेत.
मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावर लेख वाचायला आवडतील, हे सांगायला ही विसरू नका.
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आनंदाचे वातावरण आहे. मराठी भाषेला हा दर्जा मिळवण्यासाठी अनेक वर्षांपासून साहित्यिक, भाषाप्रेमी आणि अभ्यासकांनी खूप प्रयत्न केले होते. अखेर त्यांच्या या मेहनतीला यश मिळाले आहे. मराठी भाषेचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता हा निर्णय खूप महत्त्वाचा ठरतो. या निर्णयामुळे मराठी भाषेचा विकास, प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नवीन संधी निर्माण होतील.
या लेखात आपण अभिजात भाषा म्हणजे काय, ती कशी निवडली जाते आणि मराठी भाषेला याचा कसा फायदा होईल याची माहिती जाणून घेऊया…
अभिजात भाषा म्हणजे काय?
एखादी भाषा अभिजात म्हणून घोषित केली जाते तेव्हा ती भाषा केवळ प्राचीन आणि समृद्धच नाही, तर त्या भाषेचा साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रभाव देखील खूप मोठा असतो. भारतीय संविधानानुसार अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्या भाषेला विशेष मान्यता दिली जाते, ज्यामुळे त्या भाषेच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक आणि शैक्षणिक सहाय्य दिलं जातं.
अभिजात भाषा हा दर्जा मिळण्यासाठी निकष काय?
संबंधित भाषेचं अस्तित्व कमीत कमी दीड ते अडीच हजार वर्षांपूर्वीचं असावं.
भाषेत प्राचीन काळापासून समृद्ध साहित्य असावं, ज्यामुळे भाषेची सांस्कृतिक आणि साहित्यिक महानता दिसून येते.
भाषेचं स्वत:चं स्वायत्त अस्तित्व असावं, म्हणजेच ती भाषा इतर भाषांच्या प्रभावाखाली येऊन संपुष्टात आलेली नसावी.
भाषेच्या प्राचीन आणि आधुनिक रूपामध्ये एक गाभ्याचं एकसारखं स्वरूप टिकून असावं.
अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी मराठी भाषेच्या प्रवासाचा इतिहास
मराठी भाषेच्या अभिजात भाषेच्या दर्जासाठी गेल्या काही दशकांपासून जोरदार चळवळ सुरू होती. मराठी साहित्यिक आणि अभ्यासकांनी सतत या मागणीसाठी आवाज उठवला. महाराष्ट्र शासनाने २०१३ साली ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करायला सुरुवात केली आणि त्याच काळात अभिजात दर्जासाठी प्रयत्न अधिक जोर धरू लागले.
राज्य सरकारने या मागणीच्या पुढील टप्प्यात रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली होती. या समितीने मराठी भाषेच्या समृद्ध साहित्यिक परंपरेचा आणि तिच्या ऐतिहासिक महत्त्वाचा सखोल अभ्यास करून सादर केलेला ५०० पानांचा अहवाल केंद्र सरकारला सुपूर्द केला होता. या अहवालात मराठी भाषेच्या अभिजात भाषेच्या निकषांची पूर्तता होत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. अखेर, केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल करून महाराष्ट्रातील भाषाप्रेमींना आनंदाची मोठी बातमी दिली.
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे फायदे:
१) भाषेच्या संशोधनाला चालना
मराठी भाषेच्या अभिजात दर्जामुळे भाषातज्ज्ञ आणि साहित्यिकांना अधिक संशोधनासाठी प्रोत्साहन मिळेल. विशेषतः मराठी भाषेतील विविध बोली आणि त्यांच्या विविधतेचा अभ्यास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान मिळेल. प्राचीन मराठी ग्रंथ, साहित्य आणि काव्यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी संशोधन संस्थांना मदत मिळेल.
२) साहित्य आणि विद्वानांसाठी पुरस्कार
अभिजात भाषेतील विद्वानांसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. मराठी भाषेला हा दर्जा मिळाल्याने मराठी भाषेतील साहित्यिक, कवी, आणि भाषातज्ज्ञांना या पुरस्कारासाठी पात्रता मिळेल. यामुळे मराठी साहित्यिकांना अधिक प्रेरणा मिळेल आणि त्यांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळेल.
३) विद्यापीठांमध्ये विशेष अभ्यास केंद्रे
अभिजात भाषांना दिलेल्या दर्जामुळे विविध विद्यापीठांमध्ये त्या भाषेच्या अभ्यासासाठी विशेष केंद्र उभारली जातात. आता मराठी भाषेसाठीही देशभरातील विद्यापीठांमध्ये अभ्यास केंद्रे स्थापन केली जातील. या केंद्रांमध्ये मराठी भाषेचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना मराठी साहित्याची माहिती देण्यासाठी विशेष अभ्यासक्रम तयार केले जातील.
४) ग्रंथालयांचा विकास
राज्यातील १२ हजारांहून अधिक ग्रंथालयांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वा ठरला आहे. अभिजात भाषेच्या ग्रंथालयांसाठी केंद्र सरकारकडून अनुदान मिळत असतं, त्यामुळे मराठीतील प्राचीन ग्रंथांचे जतन, अनुवाद आणि पुनरुत्थान होणार आहे. मराठी भाषेतील साहित्यावर विशेष ग्रंथालये स्थापन केली जाऊ शकतात.
५) अनुवाद आणि जागतिक स्तरावर प्रसिद्धी
मराठी भाषेतील प्राचीन आणि महत्त्वपूर्ण साहित्य आता अन्य भारतीय तसेच जागतिक भाषांमध्ये अनुवाद करण्याची प्रक्रिया वेगवान होणार आहे. यामुळे मराठी साहित्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रसिद्धी मिळेल आणि त्याचे महत्त्व जागतिक स्तरावर पोहोचेल.
६) केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान
अभिजात भाषेला मिळणारे अनुदान हे भाषेच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. केंद्र सरकारकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो, जो भाषेच्या संवर्धनासाठी, साहित्य प्रकाशनासाठी आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी वापरला जातो. या निधीतून विविध मराठी साहित्यिक उपक्रम राबवले जाऊ शकतात, ज्यामुळे मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसाराला गती मिळेल.
७) प्राचीन आणि आधुनिक मराठीचा अभ्यास
मराठी भाषेच्या प्राचीन आणि आधुनिक रूपांचा सखोल अभ्यास करण्यासाठी आता अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. भाषातज्ज्ञांना भाषा विकासाचा आणि बदलाचा अभ्यास करता येईल, ज्यामुळे मराठी भाषेतील विविध पैलूंवर अधिक प्रकाश पडेल.
मराठीसह भारतात इतर काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. या भाषांमध्ये तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम या भाषांचा समावेश आहे. या भाषांना अभिजात दर्जा मिळाल्यानंतर त्यांचा विकास आणि संरक्षण अधिक गतीने झाला आहे. केंद्र सरकारकडून या भाषांच्या संवर्धनासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो, ज्यामुळे त्या भाषांचे प्राचीन साहित्य जतन होण्यास मदत झाली आहे. त्याचप्रमाणे, मराठी भाषेलाही आता या मार्गावर चालण्याची संधी मिळाली आहे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने तिच्या भविष्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे. मराठी भाषेच्या साहित्य, कला, आणि संस्कृतीचे संवर्धन होण्यासाठी आता अधिक साधनसंपत्ती उपलब्ध होणार आहे. मराठी भाषा ही फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशाच्या इतर भागांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली ओळख निर्माण करू शकते.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हि जगभरातील संपूर्ण मराठी भाषिकांसाठी अभिमानाची बाब आहे. या निर्णयामुळे मराठी भाषेचा सन्मान आणि तिच्या संवर्धनासाठी असलेली कटिबद्धता अधिक दृढ होणार आहे. शैक्षणिक, साहित्यिक, आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून मराठी भाषेच्या विकासाला आता मोठ्या प्रमाणात चालना मिळेल यात शंका नाही .
हा निर्णय मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीमध्ये मानसिक आरोग्य टिकवणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. व्यस्त वेळापत्रक, करिअरच्या स्पर्धा, सामाजिक अपेक्षा, व्यवसायातील अपयश आणि आर्थिक ताणतणाव यामुळे मानसिक शांती हरवते. या सर्वांमुळे चिंता, नैराश्य आणि मानसिक अस्वस्थता वाढत आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी विपश्यना ध्यान हा एक प्रभावी आणि शाश्वत उपाय म्हणून समोर आला आहे.
गौतम बुद्ध यांनी सुमारे २५०० वर्षांपूर्वी शोधून काढलेले हे आत्मनिरीक्षण आणि सजगतेचे तंत्र म्हणजेच विपश्यना. याच तंत्राचा प्रसार आचार्य सत्यनारायण गोयंका हे व्यापारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीने आधुनिक काळात प्रभावीपणे केला. त्यांनी विपश्यना ध्यानाचा प्रचार करताना आत्मशुद्धी आणि शांततेवर भर दिला. विपश्यना म्हणजे वास्तवाचं तटस्थ निरीक्षण, ज्यामुळे आपले विचार, भावना आणि अनुभव यांचे मूल्यांकन करता येते.
आचार्य गोयंका यांनी शिकवलेले विपश्यना तंत्र हे कोणत्याही धर्म, जाती किंवा सांप्रदायिक बंधनातून मुक्त आहे. त्याचा उद्देश व्यक्तीला मानसिक आरोग्य आणि आंतरिक शांती मिळवून देणे आहे. विपश्यना ध्यानाद्वारे मनाची शांतता, तणावाचे नियमन, चिंता आणि नैराश्यावर मात करता येते. नियमित सरावाने व्यक्तीला स्वतःच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतात, ज्यामुळे तणावपूर्ण परिस्थितीतही सकारात्मक दृष्टिकोन ठेवता येतो.
या लेखात आपण विपश्यना काय आहे आणि या ध्यानाच्या नियमित सरावामुळे तणावमुक्त जीवन जगण्याची आणि मानसिक स्थैर्य टिकवण्याची कला कशी आत्मसात करता येते, याबद्दल जाणून घेणार आहोत. विपश्यना ध्यान हे केवळ मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेच नव्हे, तर समग्र जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवण्यासाठी एक प्रभावी साधन आहे.
काय आहे विपश्यना?
विपस्सना (पाली) किंवा विपश्यना (संस्कृत) ही गौतम बुद्धांनी शोधून काढलेली आणि शिकवलेली एक प्राचीन ध्यान पद्धती आहे. आजच्या काळात, ही पद्धत जागतिक स्तरावर विपश्यना या नावाने प्रचलित आहे. ‘विपस्सना’ या पाली शब्दाचा अर्थ ‘स्वतःच्या आत खोलवर पाहणे’ असा होतो. बुद्धांनी या ध्यान पद्धतीच्या आचरणातून सत्य आणि अंतर्ज्ञान शोधले आणि याचा वापर करून त्यांनी आत्मबोध साधला असे म्हटले जाते.
विपश्यना ध्यानामुळे आपल्याला मनाच्या गाभ्यात डोकावण्याची आणि आपल्या विचारांचा सखोल अभ्यास करण्याची क्षमता मिळते. या पद्धतीतून मनाला शांती, संतुलन, आणि अंतर्गत समजूत मिळते. गौतम बुद्धांनी या ध्यान पद्धतीद्वारे दुःख, तणाव आणि अशांततेतून मुक्तीचा मार्ग दाखवला. विपश्यना केवळ ध्यान न राहता, ती एक जीवनशैली आहे ज्यातून आपण आत्म-शुद्धीकरण आणि सत्याच्या शोधाकडे प्रवास करतो.
आनापान ही विपश्यना ध्यानाच्या अभ्यासाची प्रारंभिक पायरी आहे. आनापान म्हणजे श्वासोच्छवासाचे निरीक्षण करणे, जसे ते आत येते आणि बाहेर जाते. यामुळे मनाची एकाग्रता वाढवण्यास मदत होते. श्वासोच्छवासाचे निरीक्षण हे ध्यानासाठी आवश्यक आहे कारण ते नेहमी उपलब्ध असते. याशिवाय, श्वसनाच्या लयीचा मनाशी घनिष्ठ संबंध असतो. जेव्हा मनात राग, भीती, वासना, मत्सर किंवा इतर नकारात्मकता येते, तेव्हा श्वासोच्छवासाची लय वेगवान आणि स्थूल होते. नकारात्मकता कमी होताच, श्वासोच्छवासाची लय सामान्य होते.
आनापान केल्यावर आपलं स्थूल मन नासिकांच्या द्वारावंर नैसर्गिकरित्या सुक्ष्म झालेलं असतं आणि याच सुक्ष्म मनाच्या आधारे अवयवांची संवेदना जाणवायला सुरुवात होते. सुरुवातीला संवेदना सुद्धा स्थूल स्वरूपाच्या असतात. उदा. हात पाय अवघडणं, कपड्यांचा किंवा वाऱ्याचा स्पर्श, घामाची जाणीव, खाज येणं, शरीरावर रोमांच येणं अशा वेगवेगळ्या संवेदना जाणवतात. या संवेदनांकडे केवळ पाहायचं, अनुभवायचं आणि मनात नोंद ठेऊन त्यांवर कुठल्याही प्रकारची शारीरिक अथवा मानसिक प्रतिक्रिया द्यायची नाही आणि बघता बघता संवेदना सुक्ष्म होतात. संपूर्ण शरीरभर या सुक्ष्म संवेदना जाणवायला सुरुवात होते. यांचेच साक्षी भावाने आणि तटस्थ भावाने निरीक्षण सुरु ठेवायचं म्हणजेच संवेदना वाईट आणि चांगली न मानता फक्त संवेदना आहे, उत्पाद होऊन पुन्हा नष्ट होईल असा भाव ठेवायचा आणि बघता बघता यातून मनस्थैर्य जाणवायला सुरुवात होते आणि ध्यान प्राप्त व्हायला लागते.
पुनरुज्जीवन आणि प्रसार
मुळची भारतीय असलेली ही साधना गौतम बुद्धांच्या महानिर्वाणानंतर काही वर्षांनी लोप पावली होती. मात्र गुरुशिष्य परंपरा असलेली ही साधना तिच्या मूळ स्वरुपात म्यानमारमधील काही अनुयायांनी आपल्या नियमित सरावाने जपून ठेवली होती. सत्यनारायण गोयंका हे मूळचे भारतीय व्यापारी त्या काळात म्यानमार मध्ये वास्तव्यास होते. त्यांच्या व्यापारातील अपयशामुळे त्यांना नैराश्य आले आणि विविध आजारांनी ते ग्रसित झाले. तेव्हा एका मित्राच्या सांगण्यावरून त्यांनी म्यानमारमधील “आचार्य सयाग्यी यू बा खिन” हे निवृत्त सेनेतील अधिकारी यांच्याकडे विपश्यना साधनेचे शिक्षण घेतले आणि जवळपास चौदा वर्ष साधनेचा नियमित सराव करून ते भारतात वास्तव्यास आले आणि भारतासोबत जगभरात या साधनेचा प्रसार केला. गोयंका यांच्या नेतृत्वाखाली लाखो लोकांनी विपश्यना ध्यान पद्धतीच्या माध्यमातून आत्मशांती आणि मानसिक समतोल साधला. १९६९ मध्ये आचार्यपद स्वीकारल्यानंतर त्यांनी बिहारच्या बुद्धगया येथे पहिले विपश्यना शिबिर आयोजित केले. याच वर्षी ३ ते १४ जुलै दरम्यान मुंबईतील एका धर्मशाळेत त्यांनी पहिल्या विपश्यना शिबिराचे आयोजन केले, ज्यामुळे विपश्यना ध्यानाची लोकप्रियता भारतभर वाढू लागली.
१९७६ साली गोयंका यांनी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे ‘विपश्यना विद्यापीठ’ स्थापन केले. हे केंद्र जगभरातील साधकांसाठी महत्त्वाचे ध्यानस्थळ बनले. पुढे १९८५ साली त्यांनी इगतपुरी येथेच ‘विपश्यना संशोधन केंद्र’ उभारले. ज्यामुळे विपश्यना ध्यानावर आधारित संशोधन व अध्यापनाला एक नवे व्यासपीठ मिळाले.
गोयंका यांच्या कार्याचा सन्मान म्हणून, भारत सरकारने त्यांना २०१२ साली सामाजिक सेवेसाठी ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले. गोयंका यांनी विपश्यना साधनेला समाजातील सर्व थरांपर्यंत पोहोचवून एक शांत, तणावरहित, आणि समतोल समाज निर्माण करण्यासाठी अमूल्य योगदान दिले. त्यांच्या या कार्यामुळे विपश्यना ध्यानाला जागतिक स्तरावर मान्यता व लोकप्रियता प्राप्त झाली.
विपश्यनेचे मानसिक आरोग्यासाठी फायदे
१) ताण-तणाव कमी करणे
विपश्यनेचा प्रमुख फायदा म्हणजे तणाव कमी होणे. शरीरातील संवेदनांबद्दलची जागरूकता वाढवल्याने व्यक्ती मानसिक तणावाची ओळख करून त्यावर सकारात्मक उपाय करू शकते. यामुळे मन:शांती आणि मानसिक स्थिरता मिळते, जी रोजच्या जीवनातील तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी उपयुक्त ठरते.
२) चिंता व्यवस्थापन
चिंता बहुतेकदा मनातील अनावश्यक विचारांमुळे, भूतकाळातील घटना पुन्हा पुन्हा आठवून किंवा भविष्याची सतत काळजी करून निर्माण होते. विपश्यना साधनेतून वर्तमान क्षणात तटस्थ राहण्याची कला शिकता येते, ज्यामुळे चिंता कमी होते आणि मनाला शांती अनुभवता येते.
३) आत्म-जागरूकता
विपश्यना साधना आत्म-शोधासाठी एक प्रभावी मार्ग आहे. या पद्धतीद्वारे व्यक्ती स्वतःला जसे आहे तसे स्वीकारण्याचे शिकतात, त्यांच्या विचारांचे, भावना आणि संवेदनांचे आकलन करून त्यावर कोणतीही निर्णयशुद्ध प्रतिक्रिया न देण्याची कला शिकतात. यामुळे आत्म-सन्मानात वृद्धी होते आणि एक सकारात्मक आत्म-प्रतिमा निर्माण होऊ शकते.
४) भावनिक नियमन
विपश्यनाद्वारे, व्यक्ती त्यांच्या भावनांचे निरीक्षण आसक्ती किंवा घृणेशिवाय करण्यास शिकतात. यामुळे भावनिक बुद्धिमत्ता सुधारते, ज्यामुळे व्यक्तींना त्यांच्या भावनांना अधिक संतुलित आणि सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद देता येतो.
5) सुधारित एकाग्रता
विपश्यना साधना एकाग्रतेला तीक्ष्ण करण्यावर जोर देते. अभ्यासक किंवा साधक जसजसे संवेदनांचे निरीक्षण करण्यात अधिक कुशल होतात, तसतसे त्यांची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता नैसर्गिकरित्या वाढते. याचा फायदा काम आणि नातेसंबंधांसह जीवनाच्या विविध पैलूंमध्ये होऊ शकतो.
विपश्यना कोण करू शकतो?
विपश्यना ही दुःख मुक्तीची साधना आहे, म्हणून यात जात, पात, धर्म, लिंग, देश, विदेश असा भेद राहत नाही. हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, यहूदी–सर्व धर्मांच्या लोकांना या साधनेचा लाभ घेता येतो. यात कुठल्याही धर्माची विशेषता नसून, ती फक्त एक साधना आहे जी आपल्या जीवनाला सुलभ बनवण्यास मदत करते.
महाराष्ट्रात, भारतात आणि भारताबाहेर विपश्यना केंद्र आहेत, ज्यात विविध शिबिरे घेतली जातात. १० दिवसीय शिबीर हे नवीन साधकांसाठी असते. यात साधकांना सर्व नियमानुसार पालन करणे बंधनकारक असते. आपल्याला गूगलवर विपश्यना सर्च करून फॉर्म भरावा लागतो. त्यानंतर शिबीर केंद्रातून फोन येतो आणि ते विचारपूस करतात. यानंतर आपण दहा दिवसांच्या शिबीरात प्रवेश घेऊन साधना शिकू शकतो.
या शिबीरासाठी कुठल्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाहीत. हे शिबीर पूर्णतः मोफत आहे. तथापि, साधक इच्छुक असल्यास, आपल्या सोयीनुसार दान देऊ शकतो.
मित्रांनो, आजच्या युगात ध्यानाचे महत्व अत्यंत वाढले आहे. जीवनाच्या गतीमुळे आणि ताण-तणावामुळे ध्यान एक महत्त्वाचं साधन ठरलं आहे. ध्यान आपल्याला मानसिक शांतता, आत्मसमर्पण आणि एकाग्रता साधायला मदत करते. यामुळे आपले मन शांत आणि केंद्रित राहते, ज्यामुळे दैनंदिन आव्हानांचा सामना करणे सोपे जाते.
आज, जगभरातील लाखो लोक विपश्यना ध्यानाचा सराव करत आहेत. ज्यात अभिनेते अमीर खान, ट्विटरचे फाउंडर जॅक डोर्सी, माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी, लिंक्डइनचे चेअरमन जेफ वायनर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल इत्यादी काही प्रसिद्ध नावे घेता येतील. विपश्यना कोर्ससाठी महाराष्ट्र शासनाने सर्व अधिकारी, कर्मचारी यांना १४ दिवसांची सुट्टी ३ वर्षातून एकदा व संपूर्ण सेवाकालावधीमध्ये एकूण ६ वेळा करणेसाठी सवलत दिली आहे. (शासन निर्णय क्र.: अरजा २४०२/२७/सेवा-८ दि. २७ जून २००३)