McDonald’s Success Story: एक असा देश जिथे नाक्या-नाक्यावर वडापाव, समोसा आणि भजीचा खमंग वास येतो. अशा खवय्यांच्या देशात एका परदेशी कंपनीने आपलं दुकान थाटलं. वर्ष होतं १९९६. कंपनीचं नाव – मॅकडोनाल्ड्स (McDonald’s).
पण सुरुवातीलाच या कंपनीला एक गोष्ट समजली – इथे आपला जागतिक ‘बीफ’ आणि ‘पोर्क’चा मेनू पूर्णपणे फ्लॉप होणार! कारण भारतात बीफ आणि पोर्क खाणं हे धार्मिक व सांस्कृतिक भावनांच्या विरोधात आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे शाकाहारी लोकांची संख्या खूप मोठी आहे.
मग या विदेशी ब्रँडने अशी काय जादू केली, की आज त्यांचेसगळे सगळे आउटलेट्स हाऊसफुल असतात? चला तर मग, या ‘ग्लोबल ब्रँडच्या लोकल तडक्याची’ रंजक कहाणी ऐकूया…
१. नियम लादले नाहीत, स्वतःला बदललं!
मॅकडोनाल्डने भारतीयांवर आपले नियम लादले नाहीत. त्यांनी चक्क स्वतःला बदलून घेतलं. जगात पहिल्यांदाच त्यांनी एकाच हॉटेलमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी ग्राहकांसाठी पूर्णपणे ‘स्वतंत्र किचन’ बनवले. हा निर्णय भारतीयांचा विश्वास जिंकण्यासाठी पहिला मास्टरस्ट्रोक ठरला.
२. ‘मॅकआलू टिक्की’चा जन्म
भारतीयांना काय आवडतं? बटाटा आणि मसाले! हे ओळखून त्यांनी अस्सल भारतीय चवीचा ‘मॅकआलू टिक्की’ बर्गर लाँच केला. परदेशी पावामध्ये दडलेला हा देशी बटाट्याचा तडका भारतीयांना एवढा आवडला की त्याने विक्रीचे रेकॉर्ड मोडले. आणि त्यांच्या जगप्रसिद्ध ‘बिग मॅक’ची जागा रॉयल ‘महाराजा मॅक’ने घेतली!
३. खिशाला परवडणारा रॉयल अनुभव
पण खरा गेम चेंजर ठरला तो त्यांचा सायकोलॉजिकल प्रायसिंग (Psychological Pricing) फॉर्म्युला. विचार करा, एसी हॉटेल, इंटरनॅशनल ब्रँड, आणि तिथे मिळतंय अवघ्या ७ रुपयांत सॉफ्ट सर्व्ह आईस्क्रीम आणि २५ रुपयांचा बर्गर! याने मध्यमवर्गीय भारतीयांना एका विदेशी ब्रँडचा फील अगदी स्वस्तात दिला.
४. ‘हॅपी मील’ची जादू
McDonald’s Success Story त्यांनी मार्केटिंगसाठी मुलांना टार्गेट केलं. ‘हॅपी मील’सोबत मिळणाऱ्या मोफत खेळण्यांमुळे, लहान मुलं हट्ट करून आपल्या आई-वडिलांना मॅकडोनाल्डमध्ये खेचून आणू लागली. एक मूल आलं की सोबत अख्खं कुटुंब येणार, हे फॅमिली मार्केटिंगचं गणित पक्कं होतं.
थोडक्यात सांगायचं तर… मॅकडोनाल्डने भारतात फक्त फास्ट फूड विकलं नाही, तर भारतीयांच्या खिशाला परवडणारा ‘इंटरनॅशनल अनुभव’ विकला. एका विदेशी ब्रँडने स्थानिक संस्कृती आणि चवीचा आदर करून कसा व्यवसाय मोठा करावा, याचं हे एक उत्तम उदाहरण आहे.
Fevicol Man: फेविकॉलची जाहिरात “फेविकॉल का मजबूत जोड, आसानी से टूटेगा नहीं” ही सर्वांनाच परिचयाची आहे. आजही “मजबूत जोड” म्हटलं की फेविकॉल आठवतं, कारण फेविकॉल असेल तर जोड खरोखरच टिकाऊ असतो. फेविकॉलच्या जाहिरातींनी आणि त्यांच्या Branding ने लोकांच्या मनात या नावाची छाप कायमची बसवली आहे. लहानपणापासून आपल्याला अनेक गोष्टी तुटल्या की फेविकॉल वापरायची सवय आहे, मग ती वस्तू कितीही लहान किंवा मोठी असो.
पण तुम्हाला कधी विचार आला आहे का की या यशस्वी Brand च्या मागे कोण आहे? हा ब्रँड उभा करणारी ती प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे बलवंत पारेख, ज्यांना “Fevicol Man” म्हणूनही ओळखलं जातं. गुजरातच्या भावनगरमधील एक साधा माणूस, ज्याने आपल्या मेहनतीने फेविकॉलला यशस्वी बनवलं आणि तो घराघरात पोहोचवला.
आजच्या या लेखात आपण बलवंत पारेख यांच्या प्रेरणादायी Life Journey वर एक नजर टाकूया, आणि पाहूया की त्यांनी कसं फेविकॉलसारख्या सामर्थ्यवान ब्रँडची निर्मिती केली.
प्रारंभिक जीवन (Early Life)
बलवंत पारेख यांचा जन्म १९२५ साली गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील महुवा या शहरात एका जैन कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा मॅजिस्ट्रेट होते, त्यामुळे कुटुंब सुशिक्षित आणि प्रतिष्ठित होते. लहानपणापासूनच बलवंत यांना शिक्षणाची आवड होती. त्यांच्या पालकांना वाटत होतं की त्यांनी कायद्याची पदवी घेऊन वकील व्हावे. त्यामुळे त्यांनी मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयात (Government Law College) कायद्याचं शिक्षण घेतलं.त्याकाळी देशात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. महात्मा गांधींच्या विचारांची देशात लाट पसरली होती. बलवंत यांनी देखील स्वातंत्र्याच्या या संग्राममध्ये सक्रिय सहभाग घेतला, Quit India Movement मध्येही ते पूर्ण तन मनाने सहभागी झाले होते मात्र त्यांनी आधी आपला अभ्यास पूर्ण करावा असा घरच्यांचा दबाव होता.
शिक्षण घेत असतानाच बलवंत यांचा विवाह कांताबेन यांच्यासोबत झाला. कायद्याची पदवी तर त्यांना मिळाली पण बलवंत यांना वकिलीपेक्षा व्यवसायात अधिक रस होता. त्यांनी वकिली न करता मुंबईतील एका रंगाई आणि मुद्रणालयात काम करायला सुरुवात केली. काही काळानंतर त्यांनी ही नोकरी सोडली आणि एका लाकूड व्यापाऱ्याच्या कार्यालयात शिपाई म्हणून नोकरी धरली, जिथे ते पत्नीसोबत गोदामात राहत होते. त्यांना स्वतःचा Business सुरु करायची तीव्र इच्छा होती म्हणून कठीण परिस्थितीतून मार्ग काढताना त्यांनी मोहन नावाच्या गुंतवणूकदाराच्या (Investor) मदतीने पाश्चात्य देशांतून सायकल, सुपारी, आणि कागदी रंग आयात करण्याचा व्यवसाय सुरू केला. पण दुर्दैवाने तो व्यवसाय फार काळ टिकू शकला नाही, त्या काळात त्यांनीं व्यवसायासाठी घेतलेल्या विविध कर्जांमुळे त्यांना खूप आर्थिक बोजादेखील सहन करावा लागला.
संघर्षांतून सुरु केला यशाचा प्रवास (Success Story)
त्यांनी नंतर अनेक छोटी मोठी कामं करून आपल्या मेहनतीच्या बळावर थेट जर्मनी गाठली आणि फेडको या कंपनीत ते रुजू झाले. फेडकोमधील नोकरी बलवंत यांना उद्योग आणि व्यवसायाचे तंत्र शिकवणारी ठरली. फेडको या जर्मन कंपनीसोबत काम करताना त्यांना उत्पादकता, गुणवत्ता नियंत्रण आणि उत्पादनांच्या साठवण व्यवस्थापनाबद्दलची माहिती मिळाली. फेडकोने काही काळानंतर व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यावेळी मात्र बलवंत यांनी परत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं. 1954 मध्ये त्यांनी आपल्या भावासह मुंबईच्या जेकब सर्कल येथे ‘Parekh Dyechem Industries‘ नावाने एक कंपनी स्थापन केली, जी औद्योगिक रसायने, रंगद्रव्य इमल्शन आणि रंगांचे उत्पादन आणि विक्री करत होती. ही त्यांची पहिली उद्योजकीय पायरी होती.
फेविकॉलचा शोध (Invention of Fevicol)
Pidilite Industries म्हणजेच पारेख डायकेम लाइट इंडस्ट्रीजने प्रथम औद्योगिक उत्पादनासाठी काम केलं , परंतु बलवंत यांना सुतारांच्या वापरासाठी एक नवीन उत्पादने तयार करण्याची संधी दिसली. सुतारांना कामासाठी लागणारे गोंद त्या काळात अनेकदा प्राण्यांच्या अवयवांपासून तयार होत असे, ज्यामुळे त्याच्या वापरात काही मर्यादा येत होत्या. यामुळे त्यांनी शाकाहारी म्हणजेच कोणत्याही प्राण्याची हत्त्या न करता गोंद तयार करण्याचा संकल्प केला. आपल्या जुन्या कंपनीच्या नावातला फेडको आणि कॉल म्हणजे गोंद हा जर्मन शब्द जोडून ‘Fevicol‘ नावाचा त्यांनी नवीन ब्रँड तयार केला. फेविकॉलची निर्मिती १९५९ सालापासून सुरु झाली. सुरुवातीला अपेक्षित असं यश त्यांना मिळालं नाही, मात्र फेविकॉलच्या उत्तम दर्जामुळे ते सुतारांच्या पसंतीस उतरू लागले.
Fevicol Man:फेविकॉलने सुतारांचा बाजार कसा काबीज करावा यासाठी एक अभिनव योजना आखली. बलवंत यांनी “Fevicol Champions Club” नावाचा एक समुदाय निर्माण केला. या क्लबने सुतारांना फेविकॉल उत्पादनांची माहिती देऊन त्यांच कौशल्य आणि व्यवसाय अधिक सुधारण्यासाठी मदत केली. या समुदायात फक्त उत्पादनाबद्दल शिकवलं गेलं नाही, तर सुतारांना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि शिकण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. या मोहिमेमुळे फेविकॉलने त्या काळात देशभरातील ८०% पेक्षा जास्त सुतारांचा विश्वास प्राप्त केला.
जाहिरात आणि व्यवसाय विस्ताराचे धोरण (Marketing Strategy)
१९८९ मध्ये बलवंत पारेख यांनी फेविकॉलला एक सार्वत्रिक ब्रँड बनवण्याचा संकल्प केला. या उद्देशासाठी त्यांनी एक Advertising Strategy अवलंबली. “दम लगाके हैशा” आणि “फेविकॉल का मजबुत जोड़ है, टूटेगा नहीं” या प्रभावशाली स्लोगनद्वारे (Slogan) त्यांनी फेविकॉलला सर्वसामान्यांच्या वापरात आणलं. फेविकॉल केवळ सुतारांसाठी नाही, तर घराघरातील लोकांसाठी एक उपयोगी साधन बनले. या अनोख्या जाहिरातींमुळे फेविकॉलने भारतीय बाजारपेठेत एक विशेष स्थान प्राप्त केले आणि 20 वर्षांच्या आत अविश्वसनीय 70% Market Share मिळवला. या यशात, देशातील प्रत्येक दोन सुतारांपैकी एकाने फेविकॉल वापरण्यास सुरुवात केली.
Fevicol Man: 1993 पर्यंत, Pidilite ने बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर (BSE) IPO मध्ये प्रवेश केला, आणि सर्व काही ठीकटाक आणि सुरळीत असूनही बलवंत पारेख पूर्णपणे समाधानी नव्हते, कारण त्यांची इच्छा होती की फेविकॉल सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनावं. ग्राहकांच्या मागणीनुसार, त्यांनी फेविकॉलचा Logo बदलून दोन जोडलेले हत्ती बनवले, जे एकता आणि शक्तीचे प्रतीक झाले. यामुळे फेविकॉल 30 ग्रॅमच्या ट्यूबमध्ये उपलब्ध झाला, त्याला प्रचंड लोकप्रियता मिळली.
आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवत बलवंत पारेख यांनी २००६ पर्यंत फेविकॉलचा विस्तार केला, फेविकॉल ७१ देशांमध्ये पोहोचले. त्याच वेळी, M-Seal आणि Dr. Fixit सारखे अन्य ब्रँड्स देखील यशस्वीपणे लाँच करण्यात आले. बलवंत यांच्या नेतृत्वाखाली Pidilite Industries जवळजवळ २००० कोटी रुपयांच्या मूल्याची कंपनी बनली, ज्यामुळे फेविकॉलने भारतीय बाजारपेठेत एक वर्चस्व प्रस्थापित केलं.
सामाजिक आणि शैक्षणिक कार्य (Philanthropy)
बलवंत पारेख हे केवळ उद्योगातच नाही तर समाजकार्यात देखील सक्रिय होते. त्यांनी त्यांच्या मूळ गावी म्हणजेच महुवा येथे दोन शाळा, एक महाविद्यालय, आणि एक रुग्णालयाची स्थापना केली. त्यांना आपल्या संस्कृती आणि इतिहासाची प्रचंड आवड होती म्हणून त्यांनी ‘दर्शक फाउंडेशन’ (Darshak Foundation) या संस्थेची स्थापना केली, ही संस्था भारतीय सांस्कृतिक इतिहासावर संशोधन करते. बलवंत यांचे स्वतःचे एक खाजगी ग्रंथालय होते ज्यामध्ये शास्त्र, साहित्य, कायदा, मानसशास्त्र, आणि सामान्य ज्ञानाचे विविध ग्रंथ होते. त्यांनी ‘Balwant Parekh Centre for General Semantics and Other Human Sciences‘ या संस्थेची स्थापना करून, लोकांच्या शिक्षणासाठी आणि विज्ञानविषयक संशोधनासाठी एक ठोस पाऊल उचलले.
मित्रांनो, बलवंत पारेख यांचा जीवनप्रवास आणि कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. एका सामान्य व्यक्तीने जिद्द, मेहनत आणि सततची शिकण्याची तयारी याच्या जोरावर उद्योगजगताला नवी दिशा दिली. फेविकॉलचे माध्यमातून त्यांनी भारतीयांना एक असा ब्रँड दिला जो एकता, विश्वास, आणि अतूट बंधनाचे प्रतीक आहे. आजही बलवंत पारेख यांच्या योगदानाचे स्मरण त्यांच्या उद्योजकीय विचारसरणीतून आणि समाजसेवेच्या कार्यातून होते.
OYO Success Story in Marathi: दिल्लीच्या कडकडत्या थंडीत, खिशात फक्त तीस रुपये घेऊन रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरणाऱ्या एका अठरा वर्षांच्या मुलाने कधी विचार केला असेल का, की तो एक दिवस जगातील सर्वात तरुण अब्जाधीशांपैकी एक होईल? ही कहाणी आहे ओयो (OYO) चे संस्थापक आणि सीईओ रितेश अग्रवाल (Ritesh Agarwal) यांची. आज २०२६ (2026) मध्ये ओयोचा हा विस्तार केवळ एका स्टार्टअपची यशोगाथा नसून, भारतीय उद्योजकतेच्या जागतिक भरारीचे ते एक जिवंत प्रतीक ठरले आहे.
सुरुवातीचा संघर्ष: सिम कार्ड ते स्वप्नांचा शोध
१९९३ (1993) मध्ये ओडिसाच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रितेशचे मन कधीच पुस्तकी ज्ञानात रमले नाही. घरच्यांना वाटत होते की त्यांनी इंजिनिअर व्हावे, पण रितेशला स्वतःचे काहीतरी वेगळे करायचे होते. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांनी शाळा सोडली आणि नशीब आजमावण्यासाठी दिल्ली गाठली. दिल्लीत राहणे सोपे नव्हते; सुरुवातीला त्यांनी पोटापाण्यासाठी सिम कार्ड विकण्याचेही काम केले. पण त्यांचे लक्ष नेहमीच ‘काहीतरी मोठे’ करण्यावर होते. खिशात पैसे नसतानाही त्यांचा निश्चय इतका मजबूत होता की त्यांना परिस्थिती हरवू शकली नाही.
ओयोची (OYO) मूळ कल्पना: प्रवासातील गैरसोय आणि संधी
जेव्हा एकदा रितेश डेहराडून आणि मसुरीच्या सहलीवर गेले, तेव्हा त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली – भारतात हॉटेल मिळवणे सोपे आहे, पण ‘स्वस्त आणि खात्रीशीर’ हॉटेल मिळवणे कठीण आहे. कधी खोली अस्वच्छ असते, तर कधी वाय-फाय नसते. या समस्येतूनच त्यांनी ‘ओरवेल स्टेज’ (Oravel Stays) ची स्थापना केली. पुढे २०१३ (2013) मध्ये त्यांनी प्रसिद्ध ‘थिल फेलोशिप’ (Thiel Fellowship) जिंकली, ज्यामध्ये त्यांना सुमारे ७८ (78) लाख रुपयांची स्कॉलरशिप मिळाली. या भांडवलातून त्यांनी ओरवेलचे रूपांतर ‘OYO Rooms’ मध्ये केले.
२०२६ मधील ओयो: तोट्यातून नफ्याकडे जाणारी ‘मनी मशीन’
२०२४ (2024) पर्यंत ओयो ही तोट्यात चालणारी कंपनी मानली जात होती, परंतु २०२५-२६ (2025-26) हे वर्ष कंपनीसाठी ‘टर्नअराउंड’ वर्ष ठरले आहे.
विक्रमी नफा: ताज्या आर्थिक आकडेवारीनुसार, ओयोने आर्थिक वर्ष २०२५ (FY25) मध्ये ६२३ (623) कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. मार्च २०२६ (March 2026) च्या अहवालानुसार हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
जागतिक विस्तार: आज ओयोचा विस्तार ८० (80) देशांतील आठशेपेक्षा जास्त शहरांमध्ये झाला आहे. कंपनीकडे आता ४३,००० (43,000) हून अधिक मालमत्ता (Properties) आहेत.
मोटेल ६ (Motel 6) चे अधिग्रहण: रितेश अग्रवाल यांनी नुकतेच अमेरिकेतील प्रसिद्ध ‘Motel 6’ साखळीचे ४,३०० (4,300) कोटी रुपयांना अधिग्रहण करून जागतिक स्तरावर आपली पकड अधिक घट्ट केली आहे.
रितेश अग्रवाल: शार्क टँक आणि गुंतवणूकदार
२०२६ (2026) मध्ये रितेश केवळ ओयोचे मालक राहिलेले नाहीत, तर ते एक प्रबळ गुंतवणूकदार म्हणून उदयास आले आहेत. ‘शार्क टँक इंडिया’ (Shark Tank India) च्या माध्यमातून त्यांनी अनेक एआय (AI) आणि पर्यावरणपूरक (Sustainability) स्टार्टअप्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. मार्च २०२६ (March 2026) पर्यंत त्यांची एकूण संपत्ती सुमारे १६,००० (16,000) कोटी रुपये इतकी अंदाजित आहे. वयाच्या अवघ्या २४ (24) व्या वर्षी ते भारतातील अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले होते.
बहुप्रतीक्षित आयपीओ (IPO) ची प्रतीक्षा
गुंतवणूकदारांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे ओयोचा आयपीओ. मार्च २०२६ (March 2026) च्या ताज्या अपडेट्सनुसार, ओयोच्या मूळ कंपनीने (Prism) सुमारे ६,६५० (6,650) कोटी रुपये उभारण्यासाठी सेबीकडे (SEBI) गोपनीय कागदपत्रे दाखल केली आहेत. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, या आयपीओमुळे ओयोचे बाजार मूल्य (Valuation) सात ते आठ अब्ज डॉलर्सच्या घरात जाऊ शकते.
आव्हाने आणि भविष्यातील धोरण
ओयोचा प्रवास फुलांच्या पायघड्यांचा नव्हता. मध्यंतरी हॉटेल मालकांचे वाद आणि कायदेशीर प्रकरणांमुळे कंपनीच्या प्रतिमेला धक्का बसला होता. मात्र, २०२६ (2026) मध्ये रितेश यांनी ‘प्रिझम’ (Prism) या नवीन ब्रँड ओळखीतून तंत्रज्ञान आणि ग्राहकांचा विश्वास पुन्हा मिळवण्यावर भर दिला आहे. आता ओयो केवळ हॉटेल बुकिंग ॲप राहिलेले नसून, ते एक ‘फुल-स्टॅक टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म’ बनले आहे.
यशासाठी फक्त जिद्द हवी!
रितेश अग्रवाल यांचा प्रवास आपल्याला सांगतो की, तुमची सुरुवात कितीही लहान असली तरी तुमचे विचार आणि निश्चय (संकल्प) मोठे असले पाहिजेत. सिम कार्ड विकणारा मुलगा ते १६,००० (16,000) कोटींच्या कंपनीचा मालक, हा प्रवास प्रत्येक भारतीय तरुणाला प्रेरणा देणारा आहे. जर तुमच्याकडे स्पष्ट व्हिजन आणि मेहनत करण्याची तयारी असेल, तर यशाची शिखरे गाठणे अशक्य नाही.
तुम्हाला रितेश अग्रवाल यांचा कोणता गुण सर्वात जास्त आवडतो? ओयोचा आयपीओ आल्यावर तुम्ही त्यात गुंतवणूक करणार का? कमेंट्समध्ये तुमची मते नक्की कळवा! अशाच नवनवीन प्रेरणादायी यशोगाथा आणि बिझनेस अपडेट्ससाठी आमच्या वेबसाइटला पुन्हा भेट द्यायला विसरू नका!
प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात एकदा तरी चांगल्या आणि वाईट दोन्ही परिस्थितीचा सामना करावा लागतो. प्रत्येक जण आपापल्या परीने याचा सामना करत असतो, काही जण परिस्थितीसमोर हतबल होऊन हार मानतात तर तेच काहीजण त्यावर मात करून स्वतःला सिद्ध करतात. वयाची साठी आली की लोक आपण करत असलेल्या कामातून निवृत्ती घेतात आणि उर्वरित आयुष्य आरामात घालवतात, मित्रांनो अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं म्हटलं जातं ; पण आज आपण ज्या व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, त्या व्यक्तीने आयुष्यात अपयश हे एकदा नाही, दोनदा नाही तर तब्बल 1009 वेळा पाहिलं आहे, पण तरीसुद्धा आज ती व्यक्ती यशाचं परमोच्च शिखर गाठून आपल्या सर्वांसाठी आदर्श ठरली आहे. ज्यांनी इतर लोकांच्या निवृत्तीच्या वयात स्वतःची नवीन सुरुवात केली आणि ती सुरुवात यशस्वी करूनही दाखवली. त्या व्यक्तीचे नाव आहे, कर्नल हारलँड सॅंडर म्हणजेच KFC या सर्वात मोठ्या फास्टफूड उद्योगसमूहाचे निर्माते. त्यांचीच आज जयंती आणि त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाश.
अनेकवेळा नोकरी मध्ये त्यांची निराशा झाली. पत्नीदेखील सोडून गेली. आर्मीमधूनही त्यांची हकालपट्टी झाली. त्यांनी सुरू केलेल्या हॉटेललादेखील आग लागली. निवृत्तीनंतर त्यांना फक्त 105 डॉलर्स मिळाले. पण या सर्व अडचणी त्यांच्या कर्तुत्वाच्या आड कधीच आल्या नाहीत.
हारलँड सॅंडर यांचा जन्म 9 सप्टेंबर 1890 मध्ये अमेरिकेमध्ये झाला. भावंडांमध्ये हारलँड सर्वात मोठे. त्यांचे आईवडील शेतकरी होते. पाच वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला, त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही हारलँड यांच्या आईवर येऊन पडली. त्यावेळी त्यांच्या आईने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरी करायला सुरुवात केली. आई नोकरीला जात असल्यामुळे लहान भावंडांचा सांभाळ करण्याची जबाबदारी हारलँड यांच्यावर असायची ते स्वतः त्यांच्यासाठी आणि त्यांच्या भावंडांसाठी जेवण बनवायचे, तेव्हाच त्यांना कुकिंगची आवड लागली. ते कायम नवनवीन रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करायचे.
हारलँड बारा वर्षाचे असताना त्यांच्या आईने दुसरे लग्न केले परंतु दुसऱ्या वडिलांसोबत त्यांचे पटत नसल्याने ते शेतात येऊन राहू लागले आणि शेती करू लागले. सातवीला असताना हारलँड यांनी शिक्षण सोडून दिले व ते त्यांच्या काकांकडे राहायला गेले, त्यावेळी त्यांचे काका एका कारच्या कंपनीत नोकरीला होते. काकांनी हारलँड यांना कंडक्टर म्हणून नोकरी मिळवून दिली.
आर्मी, इन्शुरन्स, कायदा, हॉटेल शेफ, टायरचे दुकान, बोट चालवणे अशा विविध क्षेत्रात त्यांनी काम केले ; परंतु एकाही नोकरीमध्ये त्यांना स्थिरता लाभली नाही, या काळात एक मुलगी असताना त्यांची पत्नी देखील त्यांना त्यांच्या अस्थिर आयुष्यामुळे सोडून गेली. नंतर त्यांनी पेट्रोल पंपावर काम करायला सुरुवात केली, तेथे काम करत असताना लोकं जेव्हा त्यांना बसची वाट पाहताना दिसली तेव्हा ती संधी ओळखून हारलँड यांनी तेथे छोटे हॉटेल सुरू केले. केंटुकीच्या गव्हर्नरला हारलँड यांची Fried Chicken हा पदार्थ इतका आवडला की त्यांनी हारलँड यांच्यावर खुश होऊन त्यांना “कर्नल” पदवी दिली. रस्त्याच्या कामामुळे नंतर त्यांचं हे हॉटेल देखील बंद झालं.
हॉटेल बंद झाल्यावर हारलॅंड यांना पुन्हा नोकरी करावी लागली. वयाच्या 60व्या वर्षी निवृत्त झाल्यावर त्यांना सरकारकडून फक्त 105 डॉलरचा चेक मिळाला. अशावेळी त्यांच्या मनात आत्महत्या करण्याचा देखील विचार आला. पण तेव्हा देखील अजूनही सगळं संपलं नाही आपण काहीतरी करू शकतो ही हिम्मत त्यांच्यामध्ये होती.
निवृत्तीच्या वेळी मिळालेले 105 डॉलर आणि प्रेशर कुकर घेऊन हारलँड सॅंडर त्यांच्या Fried Chickenच्या रेसिपीसाठी Business Partnar शोधू लागले. तब्बल 1009 हॉटेल व्यवसायिकांनी त्यांच्यासोबत बिझनेस पार्टनरशिप नाकारली. अनेकदा पदरी फक्त अपयश पडलं. अखेरीस केंटुकीच्या एका मोठ्या हॉटेल व्यवसायिकाने त्यांची फ्रेंचाईजी स्वीकारली. तेव्हापासून त्यांच्या दुकानाचे नाव Kentucky Fried Chicken म्हणजेच KFC असे ठेवण्यात आले. बघता बघता त्यांच्या या Unique रेसिपीला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अतिशय कमी कालावधीत KFC च्या 600 Franchise पूर्ण झाल्या. 1964 मध्ये वयाच्या 73व्या वर्षी हारलँड यांनी जॉन ब्राऊन यांना KFC 2 मिलियन डॉलर म्हणजेच 14 कोटी रुपयांना विकली. त्यातील अर्धी संपत्ती त्यांनी दान करून टाकली. आज रोजी 200 हून अधिक देशात KFC चे 18000 हून अधिक रेस्टॉरंट्स आहेत. KFC ची आज वर्षाला अब्जावधींमध्ये उलाढाल होते. आज KFC ही जगातील सर्वात मोठी फास्ट फूड Chain आहे.
KFC चे संस्थापक कर्नल हारलँड सॅंडर त्यांच्या यशाचं हेच रहस्य सांगतात की,
मला संकटे जिंकून देत नाहीत आणि मीही हार म्हणायला तयार नाही
किरण कुमार हे नाव आज सोन्याच्या दागिन्यांच्या क्षेत्रात आदराने घेतले जाते. त्यांच्या अथक परिश्रमाने आणि दूरदृष्टीने ‘ललिता ज्वेलरी’ हा ब्रँड भारतातील लाखो लोकांच्या विश्वासाला पात्र ठरला आहे. दर्जा, परवडणाऱ्या किमती, आणि उत्कृष्ट डिझाईन्स यामुळे हा ब्रँड आज घरोघरी पोहोचला आहे. मात्र, या यशस्वी प्रवासामागे किरण कुमार यांचा संघर्ष आणि कष्टांची महत्त्वाची भूमिका आहे. हे यश एका रात्रीत मिळालेलं नाही. अत्यंत गरिबीतून प्रवास सुरू करणाऱ्या किरण कुमार यांनी कष्ट, अपयशांचा सामना आणि सतत शिकण्याच्या वृत्तीने हे साम्राज्य उभं केलं आहे. त्यांचा संघर्षमय प्रवास हा आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
आज या लेखात आपण त्यांच्या जीवनप्रवासाचा आणि ‘ललिता ज्वेलरी’ च्या यशामागील प्रवासाचा आढावा घेणार आहोत.
प्रारंभिक जीवन आणि आव्हाने
किरण कुमार यांचा जन्म १९६० च्या दशकात आंध्र प्रदेशातील नेल्लोर शहरात एका सामान्य कुटुंबात झाला. ते आपल्या आईवडिलांचे आठवे अपत्य होते. त्यांचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या मजबूतीने स्थिर नव्हतं. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय सोनारांसाठी खाती लिहिण्याचा होता, पण त्या व्यवसायातून फारसा नफा मिळत नव्हता. त्यामुळे कुटुंबाला कायमच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. लहानपणीच त्यांनी गरिबीचं कठोर आणि दाहक सत्य अनुभवलं, आणि हाच अनुभव पुढे त्यांच्या आयुष्यात एक मोठं धाडस आणि प्रेरणा बनला.
शालेय शिक्षणात त्यांना विशेष रस नव्हता. अनेक वेळा त्यांना काय शिकवलं जात आहे, हेच कळत नव्हतं. आणि यामुळे प्रगती करण्यात अडचणी येत होत्या. एकदा त्यांचे शिक्षक चेष्टा करत म्हणाले होते, “तू जर तोंडपाठ अक्षर बोलू शकलास, तर आम्ही तुला पास करू.” ही गोष्ट त्यांच्या मनाला लागली आणि त्यातून त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ लागला. पण त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत, जीवनातील संघर्षांकडे आपलं लक्ष केंद्रित केलं आणि अखेर आपला मार्ग शोधला.
सुरुवातीचा संघर्ष आणि यशाचा पाया
किरण कुमार यांचा संघर्ष वयाच्या १५ व्या वर्षीच सुरू झाला, जेव्हा त्यांनी आपल्या आईच्या चार सोन्याच्या बांगड्या विकून ज्वेलरी व्यवसायात पाऊल ठेवलं. इतर मुलं शिक्षण घेत असताना, कुमार कुटुंबाच्या पालनहार बनण्यासाठी काम करत होते. त्यांनी कुशल कारागिरांकडून दागिन्यांची निर्मिती शिकली आणि ग्राहकांच्या आवडी-निवडी समजून घेतल्या. ते ज्वेलरीच्या दुकानात ३०-४० रुपयांच्या कमी पगारावर काम करू लागले. हळूहळू, व्यवसायाच्या गुपितांचा अभ्यास करून ते या क्षेत्रात उतरले.
१९८३ मध्ये त्यांनी चेन्नईत ‘ललिता ज्वेलरी’चे पहिले शोरूम उघडलं, जे त्यांच्या जीवनातील महत्त्वाचं पाऊल ठरलं. ‘ललिता ज्वेलरी’ने गुणवत्ता, परवडणारे दर आणि पारदर्शकतेचे तत्त्वं पालन करत ग्राहकांचं लक्ष वेधून घेतलं. कमी भांडवल असूनही, कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर व्यवसाय वाढवला.
मात्र,तत्कालीन गोल्ड कंट्रोल ऑर्डरच्या अंमलबजावणीमुळे आभूषण उद्योगावर मोठा परिणाम झाला आणि त्यांचे कुटुंब आर्थिक अडचणीत आलं. त्या कठीण काळातील आठवणी अजूनही त्यांच्या मनात आहेत. परंतु त्यांच्या कष्टांमुळे आणि धैर्यामुळे सगळं सुरळीत होऊन व्यवसायात वाढ झाली. सुरुवातीला दक्षिण भारतातील महिलांना लक्ष करून त्यांनी तिरुपती, चेन्नई आणि हैदराबादमध्ये शोरूम उघडलं. त्यांच्या ब्रँडचे मुख्य आकर्षण म्हणजे कमी मेकिंग चार्जेस आणि उच्च दर्जाचे दागिने आहेत.
कठीण प्रसंगातून उभा राहिलेला ब्रँड
१९९९ साली मोठ्या अडचणींना सामोरे जात असलेल्या ‘ललिता ज्वेलरी’च्या संपूर्ण जबाबदारीचा भार कुमार यांनी आपल्या खांद्यावर घेतला. त्यांनी ग्राहक-केंद्रित धोरणं राबवत कंपनीला नवीन दिशा दिली आणि विस्ताराला गती दिली. यामुळे ललिता ज्वेलरीने भारताबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली ओळख निर्माण केली. ग्राहकांचा विश्वास हा ब्रँडच्या यशाचा मुख्य आधार ठरला.
सध्या ललिता ज्वेलरीच्या भारतभर ५३ शाखा असून, ३२,००० हून अधिक कर्मचारी काम करतात. कंपनीची वार्षिक उलाढाल १३००० कोटींवर पोहोचली आहे. मुंबई, कोलकाता, केरल आणि कोईतुंबर मधील डिझायनर्स ग्राहकांच्या बजेटनुसार हलक्या वजनाचे, पारंपरिक आणि आधुनिक डिझाईन्स तयार करतात. गुणवत्ता आणि विश्वासाच्या जोरावर ललिता ज्वेलरी आज यशस्वीपणे पुढे वाटचाल करत आहे.
मित्रांनो,ललिता ज्वेलरीची यशोगाथा ग्राहकांच्या विश्वासाने आणि गुणवत्तेच्या वचनबद्धतेने लिहिली गेली आहे. कंपनीने नेहमीच ग्राहक-केंद्रित धोरणे राबवून त्यांच्या अपेक्षांना प्राधान्य दिले आहे. पारंपरिक आणि आधुनिक डिझाईन्सच्या माध्यमातून ग्राहकांचे स्वप्न साकार करताना त्यांनी सर्व स्तरांवर आपली ओळख मजबूत केली आहे.
ललिता ज्वेलरी आज केवळ दागिन्यांची कंपनी नसून, विश्वासाचा एक बुलंद ब्रँड बनला आहे. लाखो समाधानी ग्राहक आणि हजारो कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांमुळे कंपनीने यशाच्या उंच शिखरावर पोहोचण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे.
भारतीय बाजारपेठेत आपली ठसा उमटवल्यानंतर, ललिता ज्वेलरीने आंतरराष्ट्रीय स्तरावरही गुणवत्ता आणि विश्वासाच्या बळावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे.त्यांचा प्रवास असाच अविरतपणे सुरू राहो अशी सदिच्छा आणि उज्ज्वल भविष्यासाठी नवी अर्थक्रांतीकडून मनःपूर्वक शुभेच्छा!
आजच्या वेगवान जगात पाण्याची गरज ही अन्नाइतकीच महत्त्वाची आहे. बाहेर पडल्यावर तहान लागली की आपण सहजपणे जवळच्या दुकानात जातो आणि १०, १५ किंवा २० रुपयांना पाण्याची बाटली विकत घेतो. रेल्वे स्टेशन, बस स्टँड किंवा हायवेवर तर हे दर कधीकधी त्याहीपेक्षा जास्त असतात. पण विचार करा, जर तुम्हाला अर्धा लिटरची (५०० मिली) शुद्ध पाण्याची बाटली अवघ्या १ किंवा २ रुपयांत मिळाली तर? हे वाचायला एखादी जाहिरात किंवा स्वप्न वाटेल, पण गुरुग्राममधील एका कल्पक दाम्पत्याने हे प्रत्यक्षात उतरवून दाखवलं आहे. ‘WAHTER’ (वाहटर) नावाच्या या स्टार्टअप ने केवळ लोकांची तहान भागवण्याचं काम केलं नाही, तर जाहिरात क्षेत्रातील (Advertising Industry) अनेक दशकांची पारंपारिक गणितं मुळापासून बदलून टाकली आहेत.
२०२६ सालात पाय ठेवताना, जिथे जगभरात महागाईने उच्चांक गाठला आहे, तिथे हा ‘गुरुग्राम मॉडेल’ आता संपूर्ण देशभर चर्चेचा विषय ठरला आहे. हा केवळ एक छोटा व्यवसाय नाही, तर सामाजिक गरज, प्रगत तंत्रज्ञान आणि आधुनिक मार्केटिंगचा एक अजोड नमुना आहे.
‘WAHTER’ संकल्पना नक्की काय आहे?
सहसा आपण जेव्हा पाण्याची बाटली विकत घेतो, तेव्हा आपण केवळ पाण्याचे पैसे देत नाही. त्यामध्ये प्लास्टिकची बाटली, तिचे लेबल, पॅकेजिंग, वाहतुकीचा खर्च, वितरकांचे कमिशन आणि दुकानदाराचा नफा अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. यामुळे ५ रुपयांना तयार होणारी बाटली ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत २० रुपयांची होते. पण ‘WAHTER’ ने या साखळीचा विचारच बदलला. त्यांनी पाण्याची बाटली हे केवळ तहान भागवण्याचं साधन न ठेवता, त्याला एक ‘चालते-बोलते डिजिटल होर्डिंग’ (Mobile Ad-Platform) बनवलं आहे.
या मॉडेलमध्ये, बाटलीवरील ८०% जागा ही विविध ब्रँड्सच्या जाहिरातींसाठी वापरली जाते. सोप्या भाषेत सांगायचं तर, तुम्ही जी पाण्याची बाटली पिता, तिचा ९०% खर्च मोठ्या जाहिरातदार कंपन्या उचलतात. यामुळे ग्राहकाला अवघ्या १ ते २ रुपयांत शुद्ध पाणी मिळतं आणि कंपन्यांना थेट ग्राहकांच्या हातात आपली जाहिरात पोहोचवता येते. जाहिरातदारांकडून मिळणारा महसूल हा बाटलीचा उत्पादन आणि वितरण खर्च भरून काढतो, ज्यामुळे ग्राहकांवरील आर्थिक ओझं पूर्णपणे कमी होतं.
शिवा ग्रुपचा वारसा आणि आधुनिक दृष्टी
WAHTER हा प्रकल्प ‘शिवा ग्रुप’ (Shiva Group) या दिग्गज औद्योगिक समूहाचा एक महत्त्वाचा भाग आहे. १९८७ मध्ये शिव कुमार नेणवाणी यांनी स्थापन केलेला हा ग्रुप पेट्रोकेमिकल आणि विशेष रसायनांच्या उद्योगात एक जागतिक नाव आहे. आज या ग्रुपचा वार्षिक महसूल १०० दशलक्ष डॉलर्सहून (सुमारे ८०० कोटी रुपये) अधिक आहे. या मोठ्या साम्राज्याची पुढची धुरा शिव कुमार यांचे सुपुत्र अमित नेणवाणी आणि सून काशीश नेणवाणी यांनी सांभाळली असून, त्यांनीच आपल्या मार्केटिंग अनुभवातून ‘WAHTER’ ची मुहूर्तमेढ रोवली.
अमित आणि काशीश यांना जाणवलं की, जाहिरातीसाठी कंपन्या होर्डिंग्स किंवा टीव्हीवर कोट्यवधी रुपये उडवतात, ज्याकडे लोक अनेकदा दुर्लक्ष करतात. पण पाण्याची बाटली ही लोकांच्या गरजेची वस्तू आहे. या गरजेलाच त्यांनी व्यवसायाचे माध्यम बनवले. “एवढी साधी गोष्ट याआधी कोणाला का सुचली नाही?” हा विचार करून त्यांनी २०२४ मध्ये गुरुग्राममधून या प्रवासाला सुरुवात केली.
२०२६ मधील प्रगत अपडेट्स: प्रगतीचा नवा टप्पा
२०२४ मध्ये दिल्ली-एनसीआरमधून सुरू झालेला हा प्रवास २०२६ पर्यंत एका अवाढव्य टप्प्यावर पोहोचला आहे:
देशव्यापी विस्तार: सुरुवातीला केवळ दिल्लीपुरता मर्यादित असलेला हा उपक्रम आता मुंबई, पुणे, बेंगळुरू, कोलकाता आणि हैदराबाद सारख्या १५ हून अधिक मेट्रो शहरांमध्येही पोहोचला आहे.
स्मार्ट एआय व्हेंडिंग मशिन्स: २०२६ मध्ये WAHTER ने ठिकठिकाणी ‘AI-Integrated व्हेंडिंग मशिन्स’ लावली आहेत. जिथे यूपीआय (UPI) स्कॅन करून तुम्ही काही सेकंदात थंड पाण्याची बाटली घेऊ शकता. या मशिन्समध्ये जाहिरातींचे स्क्रीनही बसवण्यात आले आहेत.
मोठ्या ब्रँडची पसंती: आज २०२६ मध्ये टाटा, रिलायन्स, झोमॅटो आणि अनेक नवीन स्टार्टअप्सनी आपल्या उत्पादनांच्या लाँचिंगसाठी WAHTER सोबत करार केले आहेत. कारण ही बाटली थेट लोकांच्या वैयक्तिक जागेत (Personal Space) पोहोचते.
जाहिरातदारांसाठी हे ‘गेमचेंजर’ का ठरतंय?
मोठमोठे होर्डिंग्स किंवा वर्तमानपत्रातील जाहिरातींकडे लोक अनेकदा दुर्लक्ष करतात. पण पाण्याची बाटली किमान १५ ते २० मिनिटे ग्राहकाच्या हातात असते.
थेट संपर्क (Direct Engagement): माणूस जेव्हा पाणी पितो, तेव्हा तो शांत असतो. अशा वेळी बाटलीवरील मजकूर वाचण्याची शक्यता ८०% जास्त असते. यामुळे ब्रँडची ‘रिकॉल व्हॅल्यू’ (Recall Value) ५ पट वाढते.
अचूक टार्गेट मार्केटिंग: WAHTER डेटाचा वापर करून कोणत्या भागात कोणत्या प्रकारची जाहिरात करायची हे ठरवते. उदा. शाळा-कॉलेज परिसरात शैक्षणिक कोर्सेसच्या जाहिराती, तर आयटी पार्कमध्ये गॅजेट्स किंवा सॉफ्टवेअरच्या जाहिराती.
सामाजिक प्रतिमा: १-२ रुपयांत पाणी उपलब्ध करून दिल्याने जाहिरात करणाऱ्या ब्रँडची प्रतिमा एक ‘जबाबदार आणि लोकांची काळजी घेणारा ब्रँड’ म्हणून तयार होते, ज्याला सध्याच्या भाषेत ‘Purpose-driven Marketing’ म्हणतात.
सामाजिक संदेश: बाटलीवरील केवळ कमर्शियल जाहिराती नसतात, तर १०% जागा ‘पाणी वाचवा’, ‘मुलगी शिकवा’ किंवा ‘स्वच्छता राखा’ यांसारख्या सामाजिक संदेशांसाठी राखीव ठेवली जाते.
पर्यावरण आणि शाश्वत विकास (Sustainability in 2026)
२०२६ मध्ये प्लास्टिक प्रदूषणाचे सरकारी नियम अत्यंत कडक झाले आहेत. हे ओळखून WAHTER ने त्यांच्या कार्यपद्धतीत क्रांतिकारी बदल केले आहेत. त्यांच्या बाटल्या १००% रिसायकल करण्यायोग्य (Recyclable) rPET प्लास्टिकपासून बनवलेल्या आहेत.
गुणवत्ता आणि आव्हाने
सुरुवातीला ‘स्वस्त आहे म्हणजे पाण्याची गुणवत्ता खराब असेल’ असा लोकांचा समज होता. पण WAHTER ने यावर मात करण्यासाठी स्वतःचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘RO-UV फिल्ट्रेशन’ आणि ‘ओझोनायझेशन’ प्लँट्स उभारले आहेत. प्रत्येक बाटली ही ISO मानांकनानुसार शुद्ध असते. २०२६ मध्ये त्यांच्याकडे ४० हून अधिक मोठे बॉटलिंग युनिट्स आहेत, जे दिवसाला लाखो बाटल्यांचे उत्पादन करतात.
भविष्यातील बदलाचे प्रतीक गुरुग्रामच्या या जोडप्याने हे सिद्ध केलं आहे की, स्टार्टअप म्हणजे केवळ एखादं गुंतागुंतीचं ॲप बनवणं नव्हे, तर लोकांच्या मूलभूत समस्यांवर कल्पक उपाय शोधणं होय. ‘WAHTER‘ मॉडेल हे केवळ भारतासाठीच नाही, तर जगासाठी एक मोठी ‘बिझनेस केस स्टडी’ ठरत आहे. जाहिरात विश्वातील ही क्रांती येणाऱ्या काळात इतर अनेक जीवनावश्यक वस्तूंना (उदा. सार्वजनिक वाहतूक किंवा इंटरनेट) स्वस्त किंवा मोफत बनवू शकते.
तुम्हाला काय वाटतं? अशाच प्रकारचे उपक्रम तुमच्या शहरात सुरू व्हायला हवेत का? २ रुपयांच्या या बाटलीने तुमच्या दैनंदिन खर्चात किती बचत होईल? तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा! स्टार्टअप आणि व्यवसायातील अशाच नाविन्यपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉगला पुन्हा नक्की भेट द्या!
प्रत्येक मोठ्या स्वप्नामागे धैर्य, मेहनत आणि जिद्द दडलेली असते. अशीच सुरुवात आहे एका तरुणाच्या प्रवासाची. त्या तरुणाचं नाव आहे Lenskart चे संस्थापक पियुष बन्सल. जगभरात करिअरचे असंख्य दालने उघडी असताना आणि आरामदायी आयुष्याच्या अनंत शक्यता समोर असताना, पियुष यांनी मात्र अमेरिकेतील उच्च पगाराची, सुरक्षित नोकरी मागे सोडून भारतात परतण्याचं धाडस केलं. स्वतःच्या देशात काहीतरी अर्थपूर्ण उभारण्याच्या स्वप्नावर, जोखीम घेण्याच्या धैर्यावर आणि प्रबळ इच्छाशक्तीवर त्यांनी आपल्या स्वप्नांची बीजं पेरली आणि त्यातूनच जन्म झाला पुढे “Lenskart” या तब्बल ७२,000 कोटींच्या सामर्थ्यशाली कंपनीचा.
सामान्य माणसाला कमी किमतीत उत्तम दर्जाची दृष्टी सेवा मिळावी हा उद्देश घेऊन सुरू झालेला हा प्रवास भारतीय उद्योजकतेला नवी दिशा देणारा ठरला आहे. २०२५ हे वर्ष त्यांच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरलं असून Lenskart ने आपला IPO लाँच केला आहे. ‘शार्क टँक इंडिया’मधील शार्क म्हणून पियुष बन्सल यांचं व्यक्तिमत्त्व आज लाखो युवकांसाठी प्रेरणेचं प्रतीक बनलं आहे. संघर्ष, चिकाटी, अपयशांवर मात आणि पुन्हा उभं राहण्याची क्षमता,या सर्वांचा मिलाफ म्हणजे पियुष बन्सल यांचा आतापर्यंतचा जीवनप्रवास. या लेखातून त्यांच्या या प्रेरणादायी वाटचालीवर एक नजर टाकूया…
सुरुवातीचं आयुष्य
पियुष बन्सल यांचा जन्म २६ एप्रिल १९८५ रोजी बलकिशन आणि किरण बन्सल यांच्या कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांच्यात नवीन काहीतरी शिकण्याची आणि स्वतःला सतत घडवत राहण्याची वृत्ती होती. इतर मुलं खेळण्यात रमली असताना, पियुष कॉल सेंटरमध्ये काम करू लागले. तिथे ते ग्राहकांच्या तक्रारी ऐकत आणि त्यांच्या समस्या समजून घेत. या अनुभवातून त्यांना ग्राहकांचा स्वभाव आणि त्यांची गरज ओळखणं किती महत्त्वाचं आहे, हे समजलं.
त्यांच्या प्रामाणिकपणा आणि जिद्दीने प्रभावित होऊन एका वरिष्ठ व्यक्तीने त्यांना कोडिंग शिकण्याची संधी दिली. हीच ती वेळ होती ज्या क्षणापासून त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली. कोडिंगने त्यांच्यासमोर नव्या शक्यता उघडल्या आणि त्यांनी आपल्या पुढच्या प्रवासाची सुरुवात केली.
उच्च शिक्षण आणि Microsoft मधील भूमिका
पियुष बन्सल यांनी आपले उच्च शिक्षण कॅनडाच्या मॉन्ट्रियल येथील McGill University मधून इंजिनीअरिंगमध्ये पूर्ण केलं. शिक्षणानंतर त्यांना अमेरिकेत Microsoft मध्ये नोकरी मिळाली, जिथे २००७ मध्ये ते प्रोग्राम मॅनेजर झाले,असं पद, ज्याचं स्वप्न हजारो तरुण पाहतात. या पदामुळे त्यांना मोठ्या कंपनीत काम करण्याचा अनुभव, स्थिर भविष्य आणि परदेशातील आयुष्य जगण्याची संधी मिळाली. अनेक लोकांसाठी हे यशाचं प्रतीक असतं, पण पियुषच्या मनात काहीतरी कमी असल्याची जाणीव सतत होत होती.
मोठं पद, सुरक्षित भविष्य असूनही त्यांना जाणवत होतं की त्यांच्यात स्वतःचं काहीतरी निर्माण करण्याची ओढ आहे. हीच ओढ आणि आत्मविश्वास त्यांना परत भारताकडे घेऊन आले, इथे त्यांनी स्वतःचं मार्ग तयार करून नव्या संधी शोधायला सुरुवात केली.
पहिला प्रयत्न अपयशी
भारत परतल्यावर २००७ मध्ये पियुष बन्सल यांनी SearchMyCampus.com नावाचे स्टार्टअप सुरू केलं. हे प्लॅटफॉर्म मुख्यतः विद्यार्थ्यांच्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलं गेलं होतं. सुरुवातीला १५,००० विद्यार्थी जोडले गेले, टीम वाढली आणि अनेक संधी दिसू लागल्या. विद्यार्थ्यांना उपयुक्त असलेला हा उपक्रम त्यांना खूप उत्साही बनवत होता, पण व्यवसायाची वाढ अपेक्षेनुसार होत नव्हती.
दोन वर्षांच्या प्रयत्नांनंतर, या स्टार्टअपला बंद करावं लागलं. हे अपयश पियुषसाठी धक्का देणारं होतं, पण त्यांनी हार मानली नाही. उलट, या अनुभवाने त्यांना अधिक सजग आणि समजूतदार बनवले. अपयशातून शिकण्याची संधी त्याला मिळाली आणि पुढील प्रवासासाठी तो अधिक ठाम आणि तयार झाला.
Flyrr ते Lenskart पर्यंत
२००९ मध्ये पियुष बन्सल यांनी Flyrr नावाचा ऑनलाइन आयवेअर व्यवसाय सुरू केला. काही काळ हा उपक्रम चालला, पण नंतर तो बंद करावा लागला. या अनुभवात त्यांना एक महत्त्वाची गोष्ट जाणवली ती म्हणजे भारतामध्ये चष्म्याची विक्री अजूनही व्यवस्थितरित्या होत नव्हती. देशात ५ कोटींहून अधिक लोकांना चष्म्याची गरज होती, पण व्यवस्थापनाचा अभाव, महाग किंमती आणि कमी दर्जाची सेवा यामुळे त्यांची ही गरज पूर्ण होत नव्हती.
त्याचबरोबर जवळपास १८ कोटी लोक चष्मा न वापरता राहत होते. या समस्येवर बघताना पियुषने ही संधी म्हणून पाहण्यास सुरुवात केली. त्यांना जाणवले की ही फक्त समस्या नाही, तर भारतातील आयवेअर उद्योगात एक मोठी आणि भव्य संधी आहे, जिथे चांगली सेवा आणि दर्जेदार उत्पादन देऊन लाखो लोकांच्या गरजा पूर्ण करता येऊ शकतात.
Lenskart च्या क्रांतीचा उदय
डिसेंबर २०१० मध्ये पियुष बन्सल, अमित चौधरी आणि २०११ मध्ये सुमीत कापाही यांनी एकत्र येऊन Valyoo Technologies अंर्गत Lenskart ची स्थापना केली. सुरुवातीच्या काही महिन्यांत अनेक अडचणी आल्या, जवळपास २०% प्रोडक्ट्स परत येणे, ग्राहकांना योग्य नंबर न मिळणे, फिटिंगमध्ये त्रुटी, आणि डिलिव्हरी नुकसान होणे. या काळात पियुष एकाचवेळी WatchKart, JewelsKart, BagsKart हे तीन उपक्रमही सांभाळत होते, पण त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे ,सगळं थांबवून फक्त Lenskart वर लक्ष देण्यास सुरुवात केली. या निर्णयानंतरच Lenskart चा खरा प्रवास सुरू झाला.
२०१३ मध्ये Lenskart ने भारतीयांसाठी एक क्रांतिकारी सेवा सुरू केली, फ्री होम आय चेकअप. या सेवेत प्रशिक्षित तंत्रज्ञ थेट घरपोच येऊन काही मिनिटांतच नंबर तपासणी करायचे, ज्यामुळे लाखो लोकांपर्यंत सहज पद्धतीने सेवा पोहोचली. ही सेवा ग्राहकांसाठी नव्या अनुभवाची सुरुवात ठरली आणि त्यांना घरबसल्या चष्मे मिळण्याची सुविधा मिळाली.
फक्त एका वर्षातच Lenskart ने मोठ्या गतीने प्रगती केली. १०,००० हून अधिक घरभेटी, दररोज १,००० ऑर्डर्स, आणि व्यवसाय १०० कोटींच्या उंबरठ्यावर पोहोचला. या नव्या मॉडेलमुळे भारतीय eyewear बाजारात Lenskart ची ओळख क्रांतिकारी बनली आणि पियुष यांच्या धाडसी निर्णयाचे फळ दिसू लागले.
यशाच्या शिखरावर
Lenskart ने भारतात पहिल्यांदाच ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही मार्गांनी चष्मा खरेदीचा अनोखा फॉर्म्युला आणला. त्यांनी 3D Try-On तंत्रज्ञान, ४८ तासांत डिलिव्हरी, अत्याधुनिक उत्पादन सुविधा, तसेच ऑफलाइन स्टोअर्स आणि ऑनलाइन ऑर्डर या संकल्पनेतून ग्राहकांचा अनुभवच बदलला. २०१७ पर्यंत रोज ३०,००० पेक्षा जास्त लेन्सेस तयार होत होत्या आणि २०१८ मध्ये रेव्हेन्यू ४६० कोटींवर पोहोचला.
२०१९ मध्ये SoftBank Vision Fund ने Lenskart मध्ये $275 million अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केली आणि कंपनी एका झटक्यात युनिकॉर्न बनली. भारतभर २,२०० स्टोअर्स उघडल्या, त्यातील निम्मी स्टोअर्स फक्त ७ महिन्यांत प्रॉफिटेबल ठरल्या. २०२४ पर्यंत रेव्हेन्यू ५,४२८ कोटींवर पोहोचला. हे आकडे Lenskart च्या अद्भुत आणि प्रभावी वाढीचं स्पष्ट उदाहरण आहेत.
२०२५ वर्ष ऐतिहासिक
२०२५ वर्ष Lenskart साठी ऐतिहासिक ठरलं. ४ नोव्हेंबरला त्यांनी IPO लाँच केला, ज्याची रक्कम ७,२७८.०२ कोटी होती आणि त्याला २८.२६ पट ओव्हरसब्स्क्रिप्शन मिळालं, हे आकडे खरंच थक्क करणारे होते. त्यानंतर १० नोव्हेंबरला स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंग झाली आणि कंपनीचे मूल्यांकन थेट ७२,००० कोटी वर पोहोचले. १२ वर्षांच्या अथक संघर्षाचं हे Lenskart साठी सुवर्णफळ ठरलं.
मित्रांनो, स्वप्न जर मनापासून असेल आणि त्याला पूर्ण करण्याची इच्छाशक्ती आपल्यात असेल, तर वाट आपोआप उजळत जाते. Lenskart फक्त एक ब्रँड नाही, तर तो भारतीयांना त्यांच्या दृष्टिकोनाशी जोडणारा एक दुवा आहे, आणि पियुष बन्सल हे त्या दृष्टिकोनाला तेज देणारे दीपस्तंभ आहेत.
Elon Musk – आजचे जग वेगाने बदलत आहे. तंत्रज्ञान, विज्ञान आणि मानवाच्या कल्पनाशक्तीला नवे आयाम मिळत आहेत. अशा काळातElon Muskहे नाव फक्त एक उद्योगपती म्हणून नाही, तर भविष्यातील मानवजातीसाठी स्वप्न पाहणारा एक visionary म्हणून ओळखले जाते. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला हा मुलगा लहानपणापासूनच वेगळा विचार करणारा होता. त्याला पैसा कमवण्यापेक्षा समस्या सोडवण्यात जास्त रस होता. “मानवजातीचं भवितव्य अधिक सुरक्षित आणि प्रगत कसं होईल?” हा प्रश्न त्याला सतत पडायचा. Elon Musk याने कधीही सोपा मार्ग निवडला नाही. अपयश, टीका, आर्थिक अडचणी या सगळ्यांचा सामना करूनही तो मागे हटला नाही. त्याच्या मते, भविष्यासाठी मोठी स्वप्न पाहणं आणि ती सत्यात उतरवण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देणं, हाच खरा यशाचा मार्ग आहे. Tesla आणि SpaceX या कंपन्या फक्त व्यवसाय नाहीत, तर मानवजातीच्या भविष्यासाठी केलेले प्रयत्न आहेत. म्हणूनच Elon Musk ला जगातील सर्वात futuristic टेक्नॉलॉजीमध्ये क्रांती घडवणारा visionary उद्योजक म्हटलं जातं.
Tesla ही कंपनी सुरू करताना Elon Musk चा उद्देश फक्त इलेक्ट्रिक कार बनवणं नव्हता. त्याला पृथ्वीचं पर्यावरण वाचवायचं होतं. वाढतं प्रदूषण, पेट्रोल-डिझेलवरचं अवलंबित्व आणि हवामान बदल यामुळे मानवजातीला मोठा धोका निर्माण झाला आहे, हे त्याला लवकर समजलं. Tesla ने इलेक्ट्रिक वाहनांना फक्त पर्यावरणपूरक नाही, तर आकर्षक, शक्तिशाली आणि आधुनिक बनवलं. आज Tesla कार्स वेग, सेफ्टी आणि टेक्नॉलॉजीसाठी ओळखल्या जातात. Autopilot, AI-based driving, over-the-air software updates यामुळे गाड्या “स्मार्ट” झाल्या. Tesla मुळे जगभरातील मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांना इलेक्ट्रिक वाहनांकडे वळावं लागलं. ही एक मोठी क्रांती होती. Elon Musk ने दाखवून दिलं की पर्यावरणाचं रक्षण करतानाही प्रगती करता येते. Tesla हा केवळ एक ब्रँड नाही, तर स्वच्छ आणि शाश्वत भविष्याकडे नेणारा एक मार्ग आहे. ही दृष्टी म्हणजेच futuristic thinking.
SpaceX ही Elon Musk ची अजून एक धाडसी कल्पना आहे. “मानवाने पृथ्वीच्या पलीकडे जायला हवं” हा विचार त्याच्या मनात खोलवर रुजलेला आहे. पूर्वी अंतराळ प्रवास म्हणजे फक्त सरकारांचा आणि प्रचंड खर्चाचा विषय होता. पण SpaceX ने हे चित्र बदलून टाकलं. Reusable rockets ही कल्पना प्रत्यक्षात आणून Elon Musk ने अंतराळ प्रवासाचा खर्च खूप कमी केला. Falcon 9 आणि Falcon Heavy या रॉकेट्सने इतिहास घडवला. NASA सोबत काम करून SpaceX ने अंतराळवीरांना सुरक्षितपणे International Space Station वर पाठवलं. हे अमेरिका साठी मोठं यश होतं. याहूनही महत्त्वाचं म्हणजे, Mars वर मानव वसाहत बसवण्याचं स्वप्न Elon Musk आजही पाहतो आहे. अनेकांना हे अशक्य वाटतं, पण इतिहास सांगतो की जे लोक अशक्य गोष्टींची स्वप्न पाहतात, तेच जग बदलतात. SpaceX मानवजातीला “multi-planetary species” बनवण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.
Elon Musk च्या यशामागे केवळ बुद्धिमत्ता नाही, तर अपार मेहनत आणि अपयशातून शिकण्याची तयारी आहे. Tesla आणि SpaceX दोन्ही कंपन्या अनेक वेळा अपयशाच्या उंबरठ्यावर उभ्या होत्या. रॉकेट्स अपयशी ठरले, Tesla ला आर्थिक संकटांचा सामना करावा लागला, पण Elon Musk कधीही हार मानली नाही. तो स्वतः सांगतो की, अनेक वेळा त्याने स्वतःचं सगळं भांडवल या कंपन्यांमध्ये गुंतवलं होतं. झोप कमी, ताण जास्त, पण ध्येय स्पष्ट. त्याच्या मते, “जर तुम्हाला एखादी गोष्ट खरंच महत्त्वाची वाटत असेल, तर अपयश आलं तरी ती करायलाच हवी.” हीच वृत्ती त्याला इतरांपेक्षा वेगळं बनवते. तो फक्त CEO नाही, तर engineer, problem-solver आणि dreamer आहे. Elon Musk चं आयुष्य हे सांगतं की यश म्हणजे सोपं नसतं, पण प्रयत्न सोडणं हेच खरं अपयश असतं.
Elon Musk हा फक्त उद्योगपती नाही, तर भविष्यातील समाजाची दिशा ठरवणारा विचारवंत आहे. Artificial Intelligence, Renewable Energy, Space Exploration याबद्दल त्याची मतं स्पष्ट आहेत. AI चा योग्य वापर झाला तर मानवजातीसाठी तो वरदान ठरू शकतो, पण चुकीचा वापर धोकादायक ठरू शकतो, याची जाणीव तो सतत करून देतो. Solar energy आणि battery storage द्वारे ऊर्जा क्षेत्रात बदल घडवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. त्याला असं जग हवं आहे जिथे तंत्रज्ञान माणसाच्या फायद्यासाठी काम करेल. पैसा, प्रसिद्धी यापेक्षा मोठं ध्येय त्याच्यासाठी मानवजातीचं अस्तित्व आणि प्रगती आहे. म्हणूनच त्याचे निर्णय अनेक वेळा धाडसी आणि वेगळे असतात. तो लोकांच्या टीकेला घाबरत नाही, कारण त्याचं लक्ष वर्तमानापेक्षा भविष्यावर असतं.
Elon Musk च्या प्रवासातून तरुणांसाठी खूप मोठी प्रेरणा मिळते. सामान्य कुटुंबातून आलेला हा मुलगा आज जग बदलणाऱ्या कल्पनांचा नेता आहे. त्याने दाखवून दिलं की डिग्री, पैसा किंवा परिस्थितीपेक्षा विचारांची उंची महत्त्वाची असते. मोठं स्वप्न पाहणं आणि त्यासाठी कठोर परिश्रम करणं, हेच यशाचं गमक आहे. अपयश आलं तरी स्वतःवर विश्वास ठेवणं, सतत शिकत राहणं आणि बदल स्वीकारणं, हे गुण आजच्या पिढीने आत्मसात केले पाहिजेत. Elon Musk चं आयुष्य सांगतं की “Impossible” हा शब्द फक्त शब्दकोशात असतो, माणसाच्या इच्छाशक्तीत नाही. त्याची कहाणी लाखो तरुणांना स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला शिकवते.
एकूणच, Elon Musk हा आधुनिक काळातील एक अद्वितीय visionary उद्योजक आहे. Tesla आणि SpaceX या कंपन्यांद्वारे त्याने भविष्यातील तंत्रज्ञानाची दिशा बदलली आहे. पर्यावरण रक्षण, स्वच्छ ऊर्जा, सुरक्षित वाहतूक आणि अंतराळ संशोधन या क्षेत्रांत त्याने घडवलेली क्रांती जगासाठी मार्गदर्शक ठरत आहे. तो परिपूर्ण नाही, त्याच्यावर टीकाही होते, पण त्याचा प्रभाव नाकारता येत नाही. Elon Musk आपल्याला हे शिकवतो की जर तुमचं ध्येय मानवतेच्या भल्यासाठी असेल, तर अडचणी तुम्हाला थांबवू शकत नाहीत. भविष्य घडवणारे लोक तेच असतात जे आज वेगळा विचार करायला धजावतात. म्हणूनच Elon Musk हा खरंच जगातील सर्वात futuristic टेक्नॉलॉजीमध्ये क्रांती घडवणारा visionary उद्योजक आहे.
आज टेक्नॉलॉजी आणि इंटरनेट मुळे वेगाने बदलणाऱ्या जगात, सगळं काही ऑनलाइन होत चाललं आहे. मग गाड्यांची खरेदी-विक्री कशी मागे राहील? पूर्वी वापरलेली गाडी विकायची म्हणजे डीलरकडे चकरा माराव्या लागायच्या, योग्य किंमत मिळेल की नाही याची चिंता, कागदपत्रांचं ओझं… पण या सगळ्याला पूर्णविराम देणारं एक नाव म्हणजे ‘CARS24’. या कंपनीने वापरलेल्या गाड्यांची खरेदी-विक्री सहज, सोपी आणि विश्वासार्ह करून दिली आहे.
मात्र या यशामागे आहे एका छोट्या शहरातील तरुणाची मोठी स्वप्नं, अपयशातून शिकण्याची तयारी आणि अपार मेहनत. तो तरुण म्हणजे CARS24 चे संस्थापक आणि CEO विक्रम चोप्रा. छोट्याशा शहरातुन आलेल्या विक्रम यांचं स्वप्न होतं काहीतरी स्वतःचा व्यवसाय उभारायचं. हे स्वप्न पूर्ण करताना त्यांना अनेक अडथळे आले, अपयशं आली, पण त्यांनी हार न मानता पुन्हा नव्याने सुरुवात केली. आजच्या लेखात आपण या जिद्दी तरुणाचा प्रेरणादायक प्रवास पाहणार आहोत.
सुरुवातीचं आयुष्य
उत्तर प्रदेशातील रायबरेली या छोट्या शहरात विक्रम चोप्रा यांचा जन्म झाला. ते एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात मोठे झाले. लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार असलेल्या विक्रम यांनी IIT बॉम्बेमधून बी.टेक आणि एम.टेक पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून MBA केलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी McKinsey आणि Sequoia Capital सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलं आणि तिथे चांगला अनुभव मिळवला.
पण मोठ्या पगाराच्या नोकरी असूनही त्यांच्या मनात सतत एक विचार चालू होता तो म्हणजे “स्वतःचं काहीतरी वेगळं करायचं आहे.” हीच कल्पना मनात ठेऊन त्यांनी नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. याच निर्णयामुळे त्यांचा उद्योजकतेचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला.
पहिला प्रयत्न अपयशी
विक्रम चोप्रा यांनी FabFurnish नावाचं ऑनलाईन फर्निचर विक्रीचं स्टार्टअप सुरू करून व्यवसाय क्षेत्रात पहिले पाऊल टाकलं. तीन वर्षं मेहनत करूनही हा व्यवसाय अपेक्षेप्रमाणे चालला नाही. त्यांच्या वाट्याला अपयश आलं .पण विक्रम खचले नाहीत. त्यांनी या अपयशातून शिकण्याचा मार्ग स्वीकारला आणि नव्याने विचार करायला सुरुवात केली.
एकदा स्वतःची गाडी विकताना विक्रम चोप्रा यांना जाणवलं की भारतात सेकंड हॅन्ड गाडी विकणं खूपच कठीण आणि गुंतागुंतीचं आहे. एजंट्स, पेपरवर्क, योग्य किंमत मिळवणं आणि वेळेची अडचण. या अनुभवातूनच त्यांच्या मनात एक कल्पना उमटली ती म्हणजे अशी एक सुविधा तयार करावी जी गाडी खरेदी-विक्रीची प्रक्रिया सोपी, पारदर्शक आणि टेकनॉलॉजीवर आधारित करेल. आणि याच विचारातून जन्म झाला CARS24 या डिजिटल प्लॅटफॉर्मचा ,ज्याने भारतात वापरलेल्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीला एक विश्वासार्ह नाव दिलं.
CARS24 या स्टार्टअपची सुरुवात
२०१५ साली विक्रम चोप्रा यांनी मेहुल अग्रवाल, गजेंद्र जांगिड आणि रुचित अग्रवाल या आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून Chttps://www.cars24.com/new-cars/ARS24 या स्टार्टअपची स्थापना केली. वापरलेल्या गाड्या विकणं ही भारतात एक कठीण आणि वेळखाऊ प्रक्रिया होती. हे लक्षात घेऊन त्यांनी C2B (Customer to Business) मॉडेलवर आधारित एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार केलं, जिथे सामान्य ग्राहक आपल्या गाड्या थेट कंपनीकडे विकू शकतो आणि कंपनी त्या गाड्या तपासून विश्वासार्ह डीलर्सना पुढे विकते. यामुळे ग्राहकांना योग्य किंमत, आणि डीलर्सना खात्रीशीर गाड्या मिळतात यामुळे दोघांचाही वेळ, पैसा आणि त्रास वाचतो.
सुरुवातीला लोकांचा विश्वास मिळवणं हे मोठं आव्हान होतं. पण CARS24ने या आपल्या खरेदी विकीरच्या प्रक्रियेला पारदर्शक आणि सहज करण्यासाठी डिजिटल पेमेंट, मोफत RC ट्रान्सफर, एआय आधारित किंमत मूल्यांकन आणि ऑनलाइन डीलिंगसारख्या सुविधा दिल्या. पहिल्याच भेटीत गाडी विकण्याचं आश्वासन आणि कागदपत्रांचं सुलभ व्यवस्थापन यामुळे ग्राहकांचा हळूहळू विश्वास बसू लागला आणि तिथूनच CARS24 ने यशाच्या दिशेने वाटचाल सुरू केली.
फंडिंग आणि झपाट्याने झालेली वाढ
CARS24 ने सुरुवातीपासूनच गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेतलं. २०१५ मध्ये SAIF Partners आणि Accel कडून तब्बल ३२ कोटींचं फंडिंग मिळालं. त्यानंतर २०१८ मध्ये Sequoia Capital ने मोठी उडी घेत ३४० कोटींची गुंतवणूक केली. यामुळे कंपनीचं व्हॅल्यूएशन थेट १७४० कोटींवर पोहोचलं. या फंडिंगमुळे CARS24 ला तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्यास, सेवा सुधारण्यास आणि अधिक शहरांमध्ये विस्तार करण्यास मदत झाली.
विक्रम चोप्रा आणि त्यांच्या टीमने एक महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे महेंद्रसिंग धोनीला त्यांनी कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर बनवलं. त्याच्या विश्वासार्ह प्रतिमेमुळे ब्रँडची ओळख घराघरात पोहोचली. “एक भेटीत गाडी विकण्याची प्रक्रिया” ही CARS24 ची खासियत बनली. त्यामुळे OLX, Droom, Mahindra First Choice यांसारख्या मोठ्या स्पर्धकांमध्येही CARS24 ने स्वतःचं वेगळं आणि विश्वासार्ह स्थान निर्माण केलं.
युनिकॉर्न स्टार्टअप
CARS24 ने २०२० मध्ये मोठा टप्पा गाठला. डीएसटी ग्लोबल कडून १५१० कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाल्यानंतर कंपनीचं पोस्ट-मनी व्हॅल्यूएशन १ अब्ज डॉलरवर पोहोचलं आणि CARS24 ही भारतातील युज्ड कार क्षेत्रातील पहिली युनिकॉर्न कंपनी ठरली. सुरुवातीला फक्त ३२ कोटी रुपयांची गुंतवणूक मिळालेल्या या स्टार्टअपने सिकोइया कॅपिटल, एक्झॉर सिड्स, डीएसटी ग्लोबल यांसारख्या मोठ्या गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करत हजारो कोटींची गुंतवणूक मिळवली.
समोर आलेल्या यशाने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या सेवा फक्त कारपुरती मर्यादित न ठेवता, बाईक्स, कमर्शियल व्हेइकल्स, फायनान्सिंग, विमा यामध्येही विस्तार केला.२०२४ मध्ये कंपनीचं मूल्यांकन वाढून ३.२३ अब्ज डॉलर (सुमारे २५,००० कोटी रुपये) इतकं झालं आणि आज CARS24 हे नाव भारतातील युज्ड गाड्यांच्या क्षेत्रात एक भक्कम ओळख बनून उभं आहे.
यशाच्या शिखरावर
CARS24 ही आज भारतातील सर्वात मोठी युज्ड कार खरेदी-विक्रीची ऑनलाईन कंपनी बनली आहे. २०० हून अधिक शहरांमध्ये ही सेवा सुरू असून, दर महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त गाड्यांचे व्यवहार येथे होतात. १.५ कोटींहून अधिक लोकांनी त्यांचं अॅप डाउनलोड केलं आहे. वापरलेल्या गाड्यांच्या बाजारात ६५% पेक्षा जास्त मार्केट शेअर CARS24 च्या नावावर असून, हा त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेचा आणि यशाचा दाखला आहे.
या यशामागे आहे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर. कंपनीने AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाद्वारे गाडीच्या किमतीचं अचूक मूल्यांकन शक्य केलं आहे, ज्यामुळे व्यवहार अधिक पारदर्शक झाले. ग्राहकांना केवळ गाडी विकणे किंवा खरेदी करणेच नव्हे, तर फायनान्स आणि विमा या सेवा देखील एका क्लिकवर मिळतात. कारण CARS24 आता स्वतःची NBFC म्हणजेच बँकेशिवाय आर्थिक सेवा देणारी संस्था आहे. ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन, सहज प्रक्रिया आणि विश्वासार्ह सेवा हाच त्यांच्या यशाचा खरा मंत्र आहे.
मित्रांनो, विक्रम चोप्रा यांची प्रेरणादायी कहाणी आपल्याला हे शिकवते की अपयश ही यशाकडे नेणारी पहिली पायरी असते. योग्य कल्पना, सातत्याने केलेली मेहनत आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे कोणतीही गोष्ट शक्य होऊ शकते. मोठं स्वप्न आणि ठाम निर्धार असेल, तर CARS24 सारखी युनिकॉर्न कंपनी उभी राहू शकते आणि त्या वाटचालीत तुमचंही नाव असू शकतं!
सामान्य वाटणाऱ्या एखाद्या अडचणीतून जर योग्य वेळी कल्पकता आणि धाडस दाखवलं, तर मोठ्यातली मोठी समस्या देखील संधीमध्ये बदलू शकते. Porter या स्टार्टअपच्या यशोगाथेतून हे स्पष्ट होतं. IIT मधून शिक्षण घेतलेला आणि JP Morgan सारख्या नावाजलेल्या कंपनीत काम करणारा एक तरुण, एक छोटी पण सतत जाणवणारी अडचण ओळखतो आणि त्यातून भारतातील एक आघाडीचं इंट्रासिटी लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म उभारतो. तो तरुण म्हणजे Porter या कंपनीचे सहसंस्थापक प्रणव गोयल.
Porter ची संकल्पना प्रणव यांना एका वैयक्तिक अडचणीतून सुचली. शहरांत छोट्या मालवाहतुकीसाठी विश्वसनीय आणि सुलभ पर्याय नव्हता, ही अडचण अनेकांना भेडसावत होती. तंत्रज्ञानाच्या मदतीने या समस्येवर उपाय शोधता येईल, यावर विश्वास ठेवून त्याने Porter ची स्थापना केली. आज Porter लाखो लोकांना मालवाहतुकीसाठी मदत करत आहे. या लेखात आपण Porter कशी सुरू झाली, कोणते टप्पे पार करत ती यशाच्या शिखरावर पोहोचली, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
एका लहानशा अडचणीतून सुचलेली कल्पना
Porter या स्टार्टअपची कल्पना प्रणव गोयल यांना त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून सुचली. ते IIT खरगपूरचे पदवीधर असून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात JP Morgan या नामांकित कंपनीत विश्लेषक (ANALYST) म्हणून केली. कामानिमित्त त्यांना गुरगावहून मुंबईला स्थलांतर करावं लागलं. या वेळी घरातील फर्निचर हलवण्यासाठी मिनी ट्रक बुक करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्यात योग्य ड्रायव्हर मिळत नव्हता, भाडं ठरवणं कठीण जात होतं आणि संपूर्ण सेवा प्रक्रियेत पारदर्शकता नव्हती.
याच अनुभवातून त्यांना जाणवलं की शहरांमधील वाहतूक व्यवस्था अजूनही पारंपरिक पद्धतीने चालते आणि त्यात ग्राहक, ड्रायव्हर आणि एजंट सगळेच त्रासलेले असतात. ही अडचण म्हणजेच एक मोठी संधी असू शकते, हे त्यांनी ओळखलं. तंत्रज्ञानाच्या मदतीने ही समस्या सोडवता येईल का, असा विचार त्यांच्या मनात आला आणि अशाच विचारातून Porter या नव्या युगाच्या लॉजिस्टिक स्टार्टअपची सुरुवात झाली.
स्टार्टअपची सुरुवात – Porter चा जन्म
एप्रिल २०१४ मध्ये प्रणव गोयल यांनी JP Morgan मधील नोकरी सोडली आणि IIT मधील आपले दोन मित्र उत्तम डिग्गा आणि विकास चौधरी यांच्यासोबत मिळून स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांच्या तयारीनंतर, ऑगस्ट २०१४ मध्ये त्यांनी ‘Porter’ हा मोबाईल अॅप आधारित लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म सुरू केलं. त्यांच्या या उपक्रमाचा उद्देश शहरांतर्गत मालवाहतूक अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करणे हा होता.
Porter अॅपच्या मदतीने ग्राहक मिनी ट्रक, टू-व्हीलर किंवा थ्री-व्हीलर सहजपणे बुक करू शकतात. या प्लॅटफॉर्ममुळे वाहनचालक आणि ग्राहक एकाच ठिकाणी जोडले गेले. पारदर्शक आणि परडवणारे दर, GPS मार्गदर्शन आणि सहज ऑर्डर प्रक्रिया यामुळे सेवा अधिक विश्वासार्ह आणि वापरण्यास सुलभ बनली. पारंपरिक वाहतूक व्यवस्थेला तंत्रज्ञानाची जोड देत त्यांनी एक नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक लॉजिस्टिक सोल्यूशन तयार केलं.
तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट बिझनेस मॉडेल
Porterचं बिझनेस मॉडेल साधं पण अत्यंत परिणामकारक होतं. प्रत्येक बुकिंगवर कंपनी १० ते १५ टक्के कमिशन घेत होती. यासोबतच इन्शुरन्स, ड्रायव्हर क्रेडिट, प्रायोरिटी लिस्टिंग यांसारख्या अतिरिक्त सेवा देऊन उत्पन्नाचे नवे मार्ग खुले करण्यात आले. या मॉडेलनं ग्राहकांना त्यांच्या मालवाहतुकीच्या खर्चात जवळपास २०% पर्यंत बचत मिळवून दिली, तर चालकवर्गाला त्यांच्या उत्पन्नात सुमारे ३०% वाढ अनुभवायला मिळाली.
Porter अॅप स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध केल्यामुळे चालकांसाठी ते वापरणं सोपं झालं. सहज नोंदणी प्रक्रिया आणि योग्य प्रोत्साहन यामुळे अवघ्या १८ महिन्यांत १ लाख बुकिंग्स पार करण्यात त्यांनी यश मिळवलं. मुंबई, बेंगळुरू, चेन्नईसारख्या मोठ्या शहरांमध्ये विस्तार करताना त्यांना Sequoia Capital आणि Kae Capital या गुंतवणूकदारांकडून ३५ कोटी रुपयांची फंडिंगही मिळाली. हे यश त्यांच्या कल्पकतेचं आणि धाडसाचं प्रतीक ठरलं.
पुढील वाटचाल आणि मोठ्या ब्रँडसोबत भागीदारी
Porter ची सेवा गुणवत्ता, वेळेचं भान आणि पारदर्शक व्यवहार यांच्या जोरावर अल्पावधीतच लोकप्रिय झाली. २०१८ मध्ये त्यांनी महिंद्रा ग्रुपच्या Smartshift या लॉजिस्टिक प्लॅटफॉर्मसोबत विलीन होण्याचा निर्णय घेतला. याच टप्प्यावर त्यांना ५० कोटींची Series C फंडिंग मिळाली. याच वर्षी त्यांनी ‘Porter for Enterprise’ हा नवीन विभाग सुरू केला, ज्यामार्फत BigBasket, Urban Company, Flipkart यांसारख्या मोठ्या कंपन्यांना B2B लॉजिस्टिक सेवा पुरवायला सुरुवात केली.
२०१९ पर्यंत Porter ने ३० लाख डिलिव्हरी पूर्ण करून जबरदस्त प्रगती केली. कंपनीचं वार्षिक उत्पन्न २२७ कोटींवर पोहोचलं. त्यांनी अशा छोट्या पण महत्त्वाच्या लॉजिस्टिक गरजांवर लक्ष केंद्रित केलं ज्या अनेक मोठ्या कंपन्यांनी दुर्लक्षित केल्या होत्या, जसं की संध्याकाळचं कुरिअर किंवा काही तासांसाठी टेम्पो बुकिंग. अशा गरजांना सेवा पुरवून त्यांनी बाजारात आपलं वेगळेपण सिद्ध केलं.
युनिकॉर्न बनण्याचा प्रवास
Porter च्या यशस्वी प्रवासात एप्रिल २०२० एक महत्त्वाचा टप्पा ठरला. Lightstone (आता Lightrock) या गुंतवणूकदार संस्थेने कंपनीमध्ये १४० कोटींची गुंतवणूक केली. त्यानंतर २०२२ मध्ये Tiger Global च्या नेतृत्वाखाली ७५० कोटींचं भांडवल उभं करण्यात आलं. याच काळात कंपनीने १७८९ कोटींचं वार्षिक उत्पन्न मिळवून आपली ताकद सिद्ध केली.
१६ मे २०२४ रोजी Porter ने आपले काही शेअर्स (ऑप्शन पूल) विकले. त्यामुळे कंपनीचं एकूण मूल्य $१ बिलियनच्या पुढं गेलं आणि Porter ही Krutim आणि Perfios नंतर २०२४ मधली तिसरी युनिकॉर्न कंपनी बनली.
यशाच्या शिखरावर
आज Porter देशातील १६ शहरांमध्ये सेवा देत आहे आणि त्यांचे ५० लाखांपेक्षा जास्त ग्राहक आहेत. रोज २.५ लाखांहून अधिक चालक त्यांच्या प्लॅटफॉर्मवर काम करत आहेत. दर महिन्याला सुमारे ५० लाख डिलिव्हरी पार पडतात. सध्या कंपनीचं उत्पन्न २७३३ कोटींवर पोहोचलं असून, कंपनीचं एकूण व्हॅल्युएशन ८३०० कोटींहून अधिक आहे.
Porter हे फक्त एक ॲप नाही, तर एक आधुनिक आणि स्मार्ट लॉजिस्टिक सोल्यूशन आहे. यात AI तंत्रज्ञान वापरून ग्राहक आणि चालक यांना एकत्र जोडलं गेलं आहे. GPS ट्रॅकिंग, झटपट बुकिंग, परवडणारे दर आणि वापरण्यास सोपं इंटरफेस यामुळे सर्वांचा अनुभव चांगला होतो. Porter B2B आणि B2C (सर्वसामान्य ग्राहकांसाठी) दोघांसाठी उपयुक्त असून, मोठ्या मालवाहतुकीपासून ते घरगुती वस्तूंच्या डिलिव्हरीपर्यंत या प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो.
मित्रांनो, प्रणव गोयल यांची कथा आपल्याला शिकवते की, अडचणींवर फक्त तक्रार न करता जर त्यावर उपाय शोधण्यास सुरुवात केली, तर त्यातून एक यशस्वी व्यवसाय उभा राहू शकतो आणि Porter हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.