या विधेयकाद्वारे Payment and Settlement Systems Act, 2007 मध्ये बदल सुचवण्यात आला आहे.
या बदलामुळे सरकारला भविष्यात UPI वर MDR शुल्क लागू करण्याचा कायदेशीर अधिकार मिळू शकतो.
पण याचा अर्थ आजपासून चार्ज लागणार असा अजिबात नाही!
MDR म्हणजे नेमकं काय?
UPI Charges: जेव्हा एखादा व्यापारी UPI पेमेंट स्वीकारतो, तेव्हा त्यासाठी बँक आणि पेमेंट नेटवर्कला दिले जाणारे शुल्क म्हणजे MDR (Merchant Discount Rate).
2020 पासून सरकारने UPI आणि RuPay वर Zero-MDR लागू केला.
त्यामुळे UPI व्यवहार मोफत झाले. आता याच नियमात बदल करण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे.
मग तुमच्यावर परिणाम होणार का? नाही!
अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की—
✅ मित्रांना पैसे पाठवणे ✅ दुकानात UPI ने पेमेंट करणे ✅ दैनंदिन व्यवहार
UPI Charges: हे सर्व ग्राहकांसाठी पूर्वीप्रमाणेच मोफत राहणार आहेत.
प्रस्ताव मुख्यतः व्यापाऱ्यांशी संबंधित आहे.
सरकार हा विचार का करत आहे?
UPI मोफत असला तरी त्यामागची व्यवस्था चालवण्यासाठी मोठा खर्च होतो.
🔹 सर्व्हर क्षमता वाढवणे 🔹 सायबर सुरक्षा मजबूत करणे 🔹 नवीन तंत्रज्ञानात गुंतवणूक करणे
UPI Charges: या खर्चाचा भार बँका आणि फिनटेक कंपन्यांवर पडत असल्याने हा प्रस्ताव समोर आला आहे.
मग शुल्क कोणाला लागू शकते?
सध्या चर्चेत असलेल्या प्रस्तावानुसार—
लहान दुकानदार आणि भाजी विक्रेत्यांवर परिणाम होणार नाही.
UPI Charges: ₹2,000 पेक्षा जास्त डिजिटल व्यवहारांवर आणि मोठ्या व्यापाऱ्यांसाठी 0.25% ते 0.5% MDR लागू होऊ शकतो.
म्हणजे उद्यापासून UPI महाग होणार?
तर अजिबात नाही.
हे विधेयक मंजूर झाले तरी लगेच कोणतेही शुल्क लागू होणार नाही.
हा फक्त सरकारला भविष्यात निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार देणारा बदल आहे.
UPI Charges: प्रत्यक्ष शुल्क लागू करण्यासाठी पुढे सरकार आणि NPCI ला स्वतंत्र अधिसूचना जारी करावी लागेल.
सामान्य UPI वापरकर्त्यांनी घाबरण्याची गरज नाही.
सध्या तुमचे UPI व्यवहार मोफतच आहेत.
हा प्रस्ताव भविष्यातील डिजिटल पेमेंट व्यवस्था अधिक मजबूत आणि टिकाऊ करण्याच्या दृष्टीने पाहिला जात आहे.
UPI Charges: ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर पोस्ट Saveकरा आणि मित्रांसोबत Share करायला विसरू नका!
SIP 8-4-3 Formula Marathi: पहिला १ रुपया कमवायला जितका वेळ लागतो, तितकाच वेळ पुढचे १० रुपये कमवायला लागत नाही! हाच आहे चक्रवाढ व्याजाचा जादूई ‘८-४-३’ फॉर्म्युला…
म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू केल्यानंतर मार्केटच्या चढ-उतारांमुळे मनात धाकधूक होणे स्वाभाविक आहे. जेव्हा शेअर बाजार खाली येतो, तेव्हा अनेक जण घाबरून आपली गुंतवणूक थांबवण्याचा विचार करतात. मात्र, गुंतवणुकीत सातत्य नसेल तर संपत्ती निर्मितीचा मूळ उद्देशच हरवून जातो. त्यामुळे बाजारातील अस्थिरतेकडे लक्ष देण्यापेक्षा, आपली गुंतवणूक किती काळ टिकवून ठेवायची आणि ती कशी वाढवायची हे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.
दीर्घकाळात करोडोंचा निधी उभा करण्यासाठी तज्ज्ञ सध्या ‘८-४-३ चा फॉर्म्युला’ (8-4-3 Rule) वापरण्याचा सल्ला देतात. हा केवळ एक आकडा नसून चक्रवाढ व्याजाची ताकद दाखवणारा एक प्रभावी मंत्र आहे. गेल्या काही वर्षांत अनेक यशस्वी गुंतवणूकदारांनी याच सूत्राचा वापर करून मोठी संपत्ती निर्माण केली आहे. आजच्या लेखात आपण हाच फॉर्म्युला सविस्तरपणे समजून घेणार आहोत.
SIP म्हणजे नक्की काय? (What is SIP?)
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग म्हणजे SIP (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन). याचा अर्थ असा की, तुम्हाला एकदम मोठी रक्कम गुंतवण्याची गरज नाही; तुम्ही दर महिन्याला तुमच्या बजेटनुसार एक ठराविक रक्कम (उदा. ५०० किंवा १००० रुपये) नियमितपणे गुंतवू शकता. ही शिस्तबद्ध पद्धत मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांसाठी संपत्ती निर्माण करण्याचे एक उत्तम साधन ठरते.
SIP चा सर्वात मोठा फायदा म्हणजे ‘रुपी कॉस्ट एव्हरेजिंग’. जेव्हा शेअर बाजार तेजीत असतो, तेव्हा तुम्हाला तुमच्या पैशात कमी ‘युनिट्स’ मिळतात, पण जेव्हा बाजार घसरतो, तेव्हा त्याच रकमेत जास्त ‘युनिट्स’ खरेदी केले जातात. उदाहरण घ्यायचे झाले तर, तुमची ५०० रुपयांची SIP असेल आणि युनिटचा भाव २५० रुपये असेल, तर तुम्हाला २ युनिट्स मिळतील. पण जर बाजार पडला आणि भाव १०० रुपये झाला, तर तुम्हाला ५ युनिट्स मिळतील. यामुळे बाजारातील चढ-उताराचा धोका कमी होतो आणि दीर्घकाळात तुमच्या गुंतवणुकीची सरासरी किंमत संतुलित राहते.
काय आहे हा ‘८-४-३’ फॉर्म्युला? (8-4-3 Formula Explained)
शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते, संपत्ती निर्मितीसाठी ‘८-४-३ चा फॉर्म्युला’ हा एक अत्यंत यशस्वी आणि ऐतिहासिक मंत्र मानला जातो. यातील पहिले ८ वर्षे हे ‘संयमाचा काळ’ असतात. सुरुवातीला तुमच्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा हा संथ किंवा अगदी सामान्य वाटू शकतो. खरं तर हा टप्पा तुमच्या संयमाची परीक्षा घेणारा असतो, कारण याच काळात अनेक गुंतवणूकदार कंटाळून किंवा घाबरून आपली SIP बंद करतात; मात्र खरी जादू पाहण्यासाठी हा पाया मजबूत करणे आवश्यक असते.
एकदा का तुम्ही पहिली ८ वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केली की, चक्रवाढ व्याजाचा (Compounding) वेग वाढायला लागतो. पुढच्या अवघ्या ४ वर्षांत तुमची एकूण जमा झालेली रक्कम जवळपास दुप्पट होते. आणि त्यापुढील ३ वर्षांत तर गुंतवणुकीची अशी काही ‘विस्फोटक वाढ’ होते की, तुमचा एकूण फंड वेगाने कोटींच्या घरात पोहोचू शकतो. म्हणजेच, १५ वर्षांच्या या प्रवासात शेवटची ३ वर्षे तुमच्या संपत्तीमध्ये सर्वात मोठी भर घालतात.
उदाहरणातून समजून घेऊया
समजा तुम्ही दरमहा २५,००० रुपयांची SIP सुरू केली आणि तुम्हाला त्यावर वार्षिक सरासरी १२% परतावा मिळाला, तर या फॉर्म्युल्यानुसार तुमची संपत्ती कशी वाढते ते पाहूया. सुरुवातीच्या ८ वर्षांत तुमची अंदाजित रक्कम ३९.२५ लाख रुपयांपर्यंत पोहोचते. हा काळ गुंतवणुकीचा पाया रचण्याचा असतो, जिथे वाढ संथ वाटली तरी शिस्त महत्त्वाची ठरते.
खरा चमत्कार यानंतरच्या टप्प्यात पाहायला मिळतो. पुढच्या केवळ ४ वर्षांत (म्हणजेच १२ व्या वर्षी) ही रक्कम जवळपास दुप्पट होऊन ७७.०२ लाख रुपये होते. आणि त्यानंतरच्या अवघ्या ३ वर्षांत (१५ व्या वर्षी) हीच रक्कम तब्बल १ कोटी १८ लाख रुपयांचा टप्पा ओलांडते. विशेष म्हणजे, जे पहिले ३९ लाख जमवण्यासाठी तुम्हाला ८ वर्षे लागली, तेवढीच संपत्ती पुढच्या फक्त ३-४ वर्षांत चक्रवाढ व्याजामुळे (Compounding) आपोआप तयार होते.
काय सांगतो ऐतिहासिक डेटा?
भारतीय शेअर बाजाराचा इतिहास एक अतिशय महत्त्वाची गोष्ट अधोरेखित करतो, ती म्हणजे गुंतवणुकीतील सुरक्षितता. आकडेवारीनुसार, ज्या गुंतवणूकदारांनी आपली SIP किमान ८ वर्षांपेक्षा जास्त काळ सातत्याने सुरू ठेवली आहे, त्यांना कधीही ‘नकारात्मक परतावा’ (Negative Returns) मिळालेला नाही. याचाच अर्थ असा की, दीर्घकाळ मार्केटमध्ये टिकून राहिल्यामुळे मुद्दल गमावण्याची भीती उरत नाही आणि गुंतवणुकीवर चांगला नफा मिळण्याची शक्यता वाढते.
SIP 8-4-3 Formula Marathi: शेअर बाजारात रोजच्या स्तरावर कितीही चढ-उतार आले, तरी दीर्घकालीन गुंतवणूक तुम्हाला केवळ आर्थिक सुरक्षितता देत नाही, तर संपत्ती निर्मितीची खात्रीशीर संधीही उपलब्ध करून देते. त्यामुळे बाजाराच्या तात्पुरत्या घसरणीला न घाबरता, संयम ठेवून आपली SIP चालू ठेवणे हाच खऱ्या अर्थाने श्रीमंत होण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.
मित्रांनो, म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही बाजार जोखमीवर आधारित असते. ऐतिहासिक आकडेवारीनुसार दीर्घकाळात फायदा होत असला, तरी प्रत्यक्षात गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवर्जून घ्यावा.
CIBIL Score: तुम्हालाही तुमच्या स्वप्नातलं घर किंवा गाडी घ्यायची आहे पण कमी क्रेडिट स्कोरमुळे तुमची फाईल रिजेक्ट होतेय? तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे. आज मी तुम्हाला क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी भन्नाट टिप्स सांगणार आहे त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.
घर, गाडी किंवा साधा मोबाईल खरेदी करताना सिबिल स्कोर विचारला जातो. तुझा सिबील स्कोर (CIBIL Score) किती आहे? चांगलं आहे कि खराब झालंय असे संवाद आपण अनेकदा ऐकतो पण तुम्हाला माहिते का हा सिबिल स्कोर नक्की वाढवायचा कसा? चला सांगते…
१. पेमेंटमध्ये कधीही उशीर करू नका
क्रेडिट स्कोर (CIBIL Score) वाढवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या कर्जाचे हप्ते (EMI) आणि क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरा. अगदी एका दिवसाचा उशीर सुद्धा तुमचा स्कोर खाली आणू शकतो.
२. क्रेडिट युटिलायझेशन रेशो तपासा (Credit Utilization Ratio)
तुमच्या क्रेडिट कार्डची जेवढी मर्यादा आहे, त्यापैकी फक्त ३०% पर्यंतच वापर करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही सतत पूर्ण लिमिट वापरत असाल, तर बँकांना तुम्ही ‘क्रेडिट हंग्री’ आहात असे वाटते.
३. एकाच वेळी अनेक कर्जांसाठी अर्ज करू नका
जेव्हा तुम्ही वारंवार कर्जासाठी चौकशी करता, तेव्हा बँका तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासतात, ज्याला Hard Inquiry म्हणतात. यामुळे तुमचा स्कोर काही पॉइंट्सने कमी होऊ शकतो.
४. जुन्या क्रेडिट अकाउंटचे महत्त्व
तुमचे जुने क्रेडिट कार्ड किंवा जुनी कर्जे बंद करण्यापूर्वी विचार करा. कारण तुमच्या क्रेडिट इतिहासाचा कालावधी जेवढा जास्त, तेवढा तुमचा स्कोर चांगला राहण्यास मदत होते.
५. क्रेडिट रिपोर्टमधील चुका सुधारा
वर्षातून किमान एकदा तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासा. कधीकधी बँकांच्या चुकीमुळे तुमच्या नावावर चुकीची माहिती दिसते. अशा चुका दुरुस्त करून घेतल्यास क्रेडिट स्कोर लगेच सुधारतो.
तुम्हीही या टिप्स फॉलो केल्या तर तुमच्या खराब झालेला सिबिल स्कोर नक्कीच वाढेल. लक्षात ठेवा सिबिल स्कोर (CIBIL Score) वाढवण्याची प्रक्रिया एका दिवसात पूर्ण होत नाही त्यासाठी तुमची आर्थिक शिस्त महत्वाची आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.
सध्या एल अँड टी कंपनीचे अध्यक्ष एस. एन. सुब्रमण्यन यांच्या कामाच्या तासांबाबत केलेल्या विधानाने सध्या खूप चर्चा रंगली आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून ९० तास काम करावं,असं म्हटलं आहे. तसेच, “रविवारीही कामावर या. तुम्ही घरी बसून काय करता? तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहू शकता? तुमची पत्नी तुमच्याकडे किती वेळ पाहू शकते? ऑफिसला जा आणि कामाला लागा,” असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं . या वक्तव्यानंतर विविध क्षेत्रांतून, बॉलिवूडपासून राजकारण आणि खेळ जगतातील दिग्गजांनी, तसेच सोशल मीडियावर लोकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
याआधी इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनीही तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम केलं पाहिजे, असं विधान केलं होतं. आता सुब्रमण्यन यांच्या विधानाने पुन्हा एकदा कामाच्या तासांवर चर्चा सुरु झाली आहे.
या पार्श्वभूमीवर, आजच्या लेखात आपण प्रगत देशांतील वर्क कल्चरचा आढावा घेणार आहोत. जगभरात विविध देशांमध्ये कामाचे किती तास बंधनकारक असतात, वर्क-लाईफ बॅलन्स कसा सांभाळला जातो, किती तास अराम दिला जातो आणि तेथील कामगारांच्या हक्कांना कशी वागणूक दिली जाते, याचा सविस्तर आढावा घेणार आहोत.
वर्क-लाइफ बॅलन्स आणि जागतिक वर्क कल्चर
अर्जेंटिना
अर्जेंटिनामध्ये कामाचे तास कायदेशीररित्या ठरवले गेले आहेत. आठवड्याला कमीतकमी ४८ तास काम करण्याची परवानगी आहे. ओव्हरटाईम दररोज जास्तीत जास्त तीन तास आणि आठवड्यात ठराविक मर्यादेपर्यंत करता येतो. ओव्हरटाईमसाठी नियमित वेतनाच्या ५० % जास्त वेतन दिले जाते, तर सुट्टीच्या दिवशी काम करणाऱ्यांना १०० % अतिरिक्त वेतन मिळते.
दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया हा देश वर्क-लाइफ बॅलन्सकडे खूप लक्ष देतो. इथे सरकारने ठरवले आहे की एक व्यक्ती आठवड्यात फक्त ४० तास काम करेल. त्याचबरोबर ओव्हरटाईम काम करण्याचे काही नियम आहेत. ओव्हरटाईम कामाचे तास आठवड्यात जास्तीत जास्त ५२ तास असू शकतात. जर एखादी कंपनी कर्मचाऱ्याला यापेक्षा जास्त काम करायला सांगत असेल, तर त्या कंपनीवर कायदेशीर कारवाई केली जाते. ओव्हरटाईमसाठी कर्मचाऱ्यांना २००% अधिक वेतन दिले जाते. यामुळे कर्मचाऱ्यांना आपले वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य उत्तम प्रकारे समतोल राखता येते.
मेक्सिको
मेक्सिको या देशात सुद्धा कामाचे कायदेशीर तास निश्चित केले आहेत. प्रत्येक आठवड्यात एक व्यक्ती जास्तीत जास्त ४८ तास काम करू शकतो. या 48 तासांमध्ये आठवड्यातील कामाचे वेळेचे विभाजन केले जाते, म्हणजे दररोज किती तास काम करावे हे ठरवले जाते.
जर एक कर्मचारी त्याच्या नियमित कामाच्या वेळेपेक्षा अधिक वेळ काम करत असेल, तर त्याला ओव्हरटाईम मिळतो . मेक्सिकोमध्ये ओव्हरटाईमची मर्यादा आठवड्यात जास्तीत जास्त नऊ तास आहे. म्हणजे, नियमित 48 तासांनंतर एक कर्मचारी 9 तास अधिक काम करू शकतो.
आणि या ओव्हरटाईमसाठी त्याला त्याच्या नियमित वेतनाच्या तीन पट वेतन दिले जाते. उदा , कार्मचाऱ्याला प्रत्येक तासाला 100 रुपये मिळत असतील, तर ओव्हरटाईमच्या तासांसाठी त्याला 300 रुपये प्रति तास मिळतील.
जपान
जपान हा देश त्याच्या जलद प्रगतीसाठी प्रसिद्ध असला तरी, इथे कामगारांच्या हक्कांना विशेष प्राधान्य दिलं जातं. जपानमध्ये कामाचे तास वाढवण्याऐवजी कामाचा दर्जा सुधारण्यावर अधिक लक्ष केंद्रित केलं जातं. कामाच्या वेळा कर्मचाऱ्यांच्या सोयीनुसार असतात, आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याला देखील तितकंच महत्त्व दिलं जातं. हे देश कामाच्या बाबतीत अत्यंत लवचिक असतो आणि कामकाजाची वेळ यथासंभव कर्मचाऱ्यांच्या गरजेनुसार निश्चित केली जाते.
जपानमध्ये आठवड्यात ४० तास काम करण्याची मर्यादा आहे, ज्यामुळे कामाचा ताण आणि कामाच्या वेळेतील असमानता कमी केली जाते. ओव्हरटाईम कामासाठी काही अतिरिक्त फायदे देखील दिले जातात. सोमवारी ते शुक्रवार दरम्यान ओव्हरटाईम काम केल्यास २५ % अधिक वेतन मिळते. शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी ओव्हरटाईम काम केल्यास ३५ % अधिक वेतन दिलं जातं. यामुळे कर्मचारी नेहमी उत्साही आणि समाधानी असतात.
स्पेन
स्पेनमध्ये कामाचे नियम खूप स्पष्ट आणि ठरलेले आहेत. येथे एका आठवड्यात ४८ तासांपर्यंत काम करण्याची परवानगी आहे, ज्याचा अर्थ एक व्यक्ती आठवड्यात जास्तीत जास्त ६ दिवस काम करू शकते, प्रत्येक दिवशी ८ तास. परंतु, एका दिवसात जास्तीत जास्त ९ तास काम करण्याची मर्यादा आहे. यामुळे कामाच्या वेळांची योग्य अशी आखणी केली जाते, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे आणि कल्याणाचे संरक्षण होते.
अमेरिका आणि इंग्लंड
अमेरिका आणि इंग्लंड हे दोन्ही अत्यंत प्रगत देश आहेत, जिथे काम आणि जीवन यामध्ये समतोल साधण्याला खूप महत्त्व दिलं जातं. या देशांमध्ये वर्क-लाइफ बॅलन्ससाठी अनेक नियम आणि धोरणे तयार केलेली आहेत. एक अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे, एका आठवड्यात ४० तासांपेक्षा जास्त काम करण्याची मर्यादा नाही. यामुळे, कर्मचारी आपल्या कामाशी संबंधित वेळेचा योग्य वापर करु शकतात, तसेच त्यांना वैयक्तिक जीवनासाठी पुरेसा वेळ मिळतो.
याशिवाय, ओव्हरटाईमसाठी विशेष धोरण आहे. जर कोणत्याही कर्मचार्याला त्यांच्या नियमित कामाच्या वेळापेक्षा अधिक काम करावं लागलं, तर त्यांना त्याच्या नियमित वेतनाच्या १.५ पट वेतन दिलं जातं. यामुळे कामाचा ताण कमी होतो आणि कर्मचारी अधिक उत्पन्न मिळवू शकतात. याचे मुख्य कारण म्हणजे कर्मचाऱ्यांच्या जीवनाच्या गुणवत्तेला प्राथमिकता देणे आणि त्यांच्या कष्टाची योग्य फेड करणे.
ब्राझीलमध्ये कामाचे तास कायदेशीरदृष्ट्या ठरवले गेले आहेत. प्रत्येक कामगारासाठी आठवड्यातील कामाची जास्तीत जास्त मर्यादा ४४ तास असते. याचा अर्थ असा की, आठवड्यात कामाच्या ६ दिवसांत, दिवसाला अधिकतम ८ तास काम करता येईल.
त्याचबरोबर, जर कामगाराला ओव्हरटाईम (अतिरिक्त तास) काम करावयाचे असतील, तर त्याची मर्यादा प्रतिदिन दोन तास असते. यामध्ये, जर एखाद्या व्यक्तीने नियमित वेळेपेक्षा जास्त तास काम केले, तर त्यासाठी त्याला अतिरिक्त पैसे दिले जातात.
भारत
भारतामध्ये वर्क-लाइफ बॅलन्स प्रगत देशांच्या तुलनेत अजूनही मागे आहे.सामान्यपणे, कामाची वेळ सकाळी ९ वाजता सुरू होऊन संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालते, ज्यामुळे आठवड्यात साधारणपणे अंदाजे ४६.७ तास काम होते . काही नोकऱ्यांमध्ये या तासांची मर्यादा अधिक असू शकते, विशेषत: ज्या नोकऱ्यांमध्ये उच्च कार्यदबाव आहे.
सुटीची संख्या देखील कमी आहे. भारतातील बहुतेक कंपन्यांमध्ये शनिवार आणि रविवार सुटी असते , पण काही ठिकाणी कामाच्या आवश्यकतेनुसार सुट्टीत बदल होत असतात. साधारणपणे, भारतीय कर्मचार्यांना १२ ते १६ सार्वजनिक सुट्ट्या मिळतात, आणि ही संख्या राज्यानुसार बदलते. काही राज्यांमध्ये सुट्ट्यांची संख्या अधिक किंवा कमी असू शकते.
थोडक्यात सांगायचं तर, कामाचे जास्त तास म्हणजे यश मिळवण्याचे कारण नाही, तर कामाची गुणवत्ता महत्त्वाची आहे. कर्मचारी तणावमुक्त आणि समाधानी असतील, तरच उत्पादकता वाढते.
मित्रांनो तुम्ही EMI वेळेवर भरला नाही तर बँक थेट तुमचा मोबाईल लॉक करणार? तुमचे व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम सगळं बंद होणार का? जर तुम्हीही नवीन स्मार्टफोन किंवा टॅबलेट EMI वर घेतला असेल, हि बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चांमागची सत्यता जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा!
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) डिजिटल कर्ज देणाऱ्या कंपन्या आणि बँकांसाठी एक नवा मसुदा तयार केला आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून हा नियम लागू करण्याचा प्रस्ताव आहे. विशेष म्हणजे, स्मार्टफोन फायनान्सच्या क्षेत्रात काही फिनटेक कंपन्या आधीपासूनच तंत्रज्ञानाचा वापर करून फोन लॉक करत होत्या, पण आता आरबीआयने यावर अधिकृत शिक्कामोर्तब करत ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी अतिशय कडक नियमावली आणली आहे.
अनेकांना गैरसमज असेल कि एक EMI मिस झाला की फोन बंद पडेल, पण असं अजिबात नाही. आरबीआयच्या नियमांनुसार, कर्ज थकून जोपर्यंत ९० दिवस म्हणजेच ३ महिने पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत बँक कोणतेही ठोस पाउल उचलू शकत नाहीत. ६० दिवस उलटल्यावर बँक पहिली नोटीस देईल ज्यासाठी २१ दिवसांचा वेळ मिळेल. त्यानंतर ७ दिवसांची लास्ट वॉर्निंग नोटीस दिली जाईल. मात्र बँक तुमचा फोन पूर्णपणे लॉक करू शकत नाही. इनकमिंग कॉल्स, इंटरनेट, इमर्जन्सी SOS आणि सरकारी अलर्ट्स चालूच राहतील. फक्त काही अॅप्स किंवा फीचर्स ब्लॉक केले जाऊ शकतात. तसेच बँक तुमच्या फोनमधील गॅलरी, फोटो किंवा कॉन्टॅक्ट्स अजिबात पाहू किंवा स्टोअर करू शकत नाही.
एवढंच नाही तर, जर ग्राहकाने थकीत रक्कम भरली, तर बँकांना अवघ्या १ तासाच्या आत मोबाईल अनलॉक करावा लागेल. जर बँकेने चुकीच्या पद्धतीने फोन लॉक केला किंवा पैसे भरूनही अनलॉक करण्यास उशीर केला, तर बँकेला ग्राहकाला दर तासाला २५० रुपये या दराने भरपाई द्यावी लागेल. थोडक्यात काय तर हा नियम ग्राहकांना त्रास देण्यासाठी नाही, तर रात्री-अपरात्री येणारे रिकव्हरी एजंट्सचे फोन आणि त्यांची अरेरावी थांबवण्यासाठी आहे. त्यामुळे वेळेवर EMI भरा आणि सुरक्षित राहा. तुम्हाला RBI चा हा नियम कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा!
आजचे जग हे केवळ इंटरनेटनेच नाही, तर ‘ग्लोबल सप्लाय चेन’ म्हणजेच जागतिक पुरवठा साखळीमुळे एकमेकांशी जोडलेले आहे. तुम्ही वापरत असलेला स्मार्टफोन असो, घरातील औषधे असोत वा रस्त्यावरून धावणारी कार, या सर्व वस्तूंचे सुट्टे भाग जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांतून प्रवास करत तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. मात्र, जागतिक स्तरावर सातत्यााने बदलणारे भू-राजकीय तणाव आणि वाढत्या संघर्षांमुळे सध्या जागतिक बाजारपेठेची गणिते पूर्णपणे बदलली आहेत. पुरवठा साखळीतील किरकोळ बिघाडही कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेला खिळखिळा करू शकतो. अशा परिस्थितीत कॉर्पोरेट जगतात एक नवी क्रांती घडत आहे ती म्हणजे ‘सप्लाय चेन रिझिलियन्स’ (Supply Chain Resilience) म्हणजेच लवचिक पुरवठा साखळी.
जेव्हा आपण आधुनिक काळातील या बिझनेस मॉडेलला भारताच्या प्राचीन चाणक्य नीतीशी जोडतो, तेव्हा व्यवसायाला केवळ स्थिरता मिळत नाही, तर संकटाचे रूपांतर मोठ्या संधीत करण्याचा मार्ग सापडतो. गेल्या काही दशकांत जगाने स्वस्त उत्पादनाच्या मोहात पडून ‘जागतिक मॅन्युफॅक्चरिंग हब’ (Global manufacturing hub) म्हणून केवळ चीनवर आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केले. परंतु, कोरोना महामारीच्या काळातील लॉकडाऊन, रशिया-युक्रेन युद्ध, समुद्रातील जहाजांवर होणारे हल्ले यामुळे संपूर्ण जगाचे डोळे उघडले आहेत.
चीनमधील एका शहरात लॉकडाऊन लागला की अमेरिकेतील कारखान्यांना कुलूप लागते, हे जगाने अनुभवले आहे. या धोक्याची जाणीव झाल्यामुळे आता जागतिक कंपन्या ‘चायना प्लस वन रणनीती’ (China+1 Strategy) वापरत आहेत. म्हणजेच पुरवठा खंडित होऊ नये म्हणून चीनमधील आपले कारखाने पूर्णपणे बंद न करता भारत, व्हिएतनाम किंवा मेक्सिको सारख्या दुसऱ्या देशात पर्याय शोधण्याला महत्त्व दिले जात आहे.
१) पुरवठा साखळी विस्कळीत होणे आणि महागाईचा भडका (The Economic Shockwave)
जेव्हा आंतरराष्ट्रीय सीमांवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, तेव्हा त्याचा सर्वात पहिला आणि थेट फटका जागतिक पुरवठा साखळीला बसतो. आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेत कोणतीही वस्तू एकाच ठिकाणी पूर्णपणे तयार होत नाही. कच्चा माल एका देशातून येतो, त्याचे सुट्टे भाग दुसऱ्या देशात बनतात आणि त्याचे Assembling
तिसऱ्याच देशात होते. जेव्हा या साखळीतील एखादा दुवा कमकुवत होतो किंवा तुटतो, तेव्हा उत्पादन प्रक्रिया जागीच ठप्प होते. वस्तूंचा पुरवठा कमी झाल्यामुळे बाजारात तुटवडा निर्माण होतो आणि मागणी तशीच राहिल्याने किमती गगनाला भिडतात. याला अर्थशास्त्राच्या भाषेत ‘सप्लाय-साईड इन्फ्लेशन’ (Supply-side Inflation) म्हणजेच पुरवठा-आधारित महागाई म्हणतात.
मालवाहतूक करणाऱ्या जहाजांचे मार्ग बदलल्यामुळे समुद्रातील भाडे (Ocean Freight) कित्येक पटीने वाढते. हा वाढलेला लॉजिस्टिक्स खर्च कंपन्या शेवटी ग्राहकांच्या खिशातून वसूल करतात, ज्यामुळे अन्नधान्यापासून ते इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपर्यंत प्रत्येक गोष्ट महाग होते. कच्चा माल वेळेवर न मिळाल्यामुळे कंपन्यांची औद्योगिक मंदी सुरू होते आणि याचा थेट फटका देशाच्या जीडीपीवर (GDP) बसतो.
२) चाणक्य नीती: कोणत्याही एका स्रोतावर अति-अवलंबून न राहणे
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात राज्याची सुरक्षा आणि व्यापार याविषयी अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे. व्यवसायातील चाणक्य नीतीनुसार, कोणत्याही राजाने किंवा व्यापाऱ्याने आपल्या संरक्षणासाठी किंवा गरजांसाठी केवळ एकाच परकीय शक्तीवर पूर्णपणे अवलंबून राहू नये. एकाच स्रोतावर अति-अवलंबून राहणे म्हणजे स्वतःहून संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे. जागतिक कंपन्यांनी नेमकी हीच चूक केली. स्वस्त मजूर आणि कमी उत्पादन खर्च या मोहापायी जगाने चीनवर अवलंबित्व वाढवले. औषधांचा कच्चा माल असो की सेमीकंडक्टर चिप्स, सर्वांसाठी चीनला निवडले गेले. परंतु, जेव्हा कोरोना संकट आले, तेव्हा जगाला चाणक्य नीतीच्या इशाऱ्याची जाणीव झाली. एकाच देशातील लॉकडाऊनमुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडू शकते हे लक्षात येताच कंपन्यांनी आपल्या रणनीतीत बदल केला.
३) जागतिक बाजाराचा ‘चायना प्लस वन’चा सर्व्हायव्हल मंत्र
पूर्णपणे चीनवर अवलंबून राहणे कमी करण्यासाठी जागतिक कंपन्यांनी ‘China+1’ हे नवीन धोरण अमलात आणले आहे. या रणनीतीचा मूळ उद्देश असा आहे की, कंपन्या चीनमधील आपले उत्पादन पूर्णपणे बंद करणार नाहीत, परंतु कोणत्याही एका संकटामुळे व्यवसाय बुडू नये म्हणून चीनला पर्याय म्हणून आणखी एका सक्षम देशात आपले उत्पादन केंद्र विकसित करतील. यामुळे कंपन्यांना जोखीम व्यवस्थापन (Risk Management) करणे सोपे जात असून आंतरराष्ट्रीय व्यापारात एक नवी स्पर्धात्मकता निर्माण होत आहे.
४) भारताला ‘China+1’ चा कसा फायदा होणार? (The Indian Advantage)
जागतिक कंपन्या जेव्हा चीनला पर्याय म्हणून ‘प्लस वन’ देशाचा शोध घेतात, तेव्हा त्यांच्यासमोर भारताचे नाव सर्वात आघाडीवर येते आणि इथेच भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक सुवर्णकाळ सुरू होतो. भारताकडे असलेले अथांग मनुष्यबळ, वेगाने विकसित होणारे पायाभूत तंत्रज्ञान आणि स्थिर लोकशाही यांमुळे जगभरातील दिग्गजांचे लक्ष भारताकडे वेधले गेले आहे. ॲपल (Apple) कंपनीने भारतात आयफोनचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू करणे, हे याचे जिवंत उदाहरण आहे.
५) भारत सरकारने या संधीचे सोने करण्यासाठी खालील प्रमुख पावले उचलली आहेत:
मेक इन इंडिया (Make in India): स्थानिक उत्पादनाला गती देण्यासाठी आणि जागतिक कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी सुरू केलेली मोहीम.
पीएलआय योजना (PLI Scheme): परदेशी कंपन्यांना भारतात कारखाने उभारणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर वाटावे म्हणून दिलेले प्रोत्साहन (Production Linked Incentive). या योजनांमुळे इलेक्ट्रॉनिक्स, औषधनिर्माण (Pharmaceuticals), ऑटोमोबाईल आणि रासायनिक उद्योगात भारत आता जागतिक पुरवठा साखळीचा एक मुख्य कणा बनत चालला आहे. चीनमधील मजुरीचा वाढता खर्च आणि तिथली हुकूमशाही वृत्ती या पार्श्वभूमीवर भारत हा एक विश्वासू, लोकशाहीवादी व्यावसायिक मित्र वाटत आहे.
६) भविष्यातील आव्हाने आणि भारताची सज्जता
‘China+1’ रणनीतीमुळे भारताच्या दारात आर्थिक प्रगतीची आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीची गुंतवणूक संधी चालून आली आहे. तथापि, हा फायदा दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी भारताला आपल्या देशांतर्गत लॉजिस्टिक्स क्षेत्रातील त्रुटी दूर कराव्या लागतील, लालफितीचा कारभार कमी करावा लागेल आणि दळणवळणाचा खर्च अधिक कमी करावा लागेल. चाणक्य सांगून गेले आहेत की, संधी ही केवळ योग्य पूर्वतयारी असलेल्यांनाच लाभ देते. त्यामुळे भारताने जर आपल्या पायाभूत सुविधा अधिक बळकट केल्या, तर येणाऱ्या काळात भारत केवळ चीनला पर्याय ठरणार नाही, तर जागतिक उत्पादनाचा नवा केंद्रबिंदू बनेल यात शंका नाही.
उन्हाचा पारा थेट ४० च्या वर गेलाय. या वाढत्या उष्णतेमुळे सर्वसामान्यांच्या अंगाची लाहीलाही होतेय. उन्हाळा आता नको-नकोसा झालाय. पण कधी त्या गोठ्यात बांधलेल्या मुक्या जनावरांचा विचार केलाय का? त्यांना बिचाऱ्यांना तर सांगताही येत नाही की, बाबांनो, जरा फॅन चालू करा किंवा फ्रीजमधलं थंड पाणी द्या! आपल्याबरोबरच पशु-पक्षांनाही उष्णेतेच्या लाटेचा फटका बसला आहे.
कडक उन्हामुळे गाई-म्हशींचे दूध कमी होते, त्यांना उष्माघात (Heat Stroke) होतो आणि आपली जनावरं आजारी पडतात, काही तर दगावतात सुद्धा. यावर उपाय म्हणून मग डॉक्टर आणि महागडी औषधं आलीच. पण थांबा! खिशातले पैसे घालवण्यापूर्वी आपल्या स्वयंपाकघरात डोकावून बघा. तिथं उन्हाळ्यावर मात करण्यासाठी आणि उष्माघातापासून जनावरांना वाचवण्यासाठी रामबाण उपाय दडलाय.
उन्हाळ्यात माणसाला जशी चक्कर येते, तसेच जनावरांच्या शरीरातील पाणी कमी होऊन ती गळपटून जातात. यावर पहिला रामबाण उपाय आहे पिण्याच्या पाण्यात थोडा गुळ, चिमूटभर काळं मीठ आणि लिंबाचा रस मिक्स करा आणि जनावरांना पाजा. हे पाणी म्हणजे जनावरांसाठी ‘इन्स्टंट एनर्जी ड्रिंक’ आहे. याने शरीरातील पाण्याची पातळी एकदम ओक्के राहते. तुम्हाला तर माहिते..कोरफड आपल्या त्वचेसाठी भारी असते पण ती जनावरांसाठीही अमृत आहे. कोरफडीचा ताजा गर काढा आणि तो ताकात मिक्स करून जनावरांना द्या. यामुळे जनावरांच्या शरीरातील उष्णता कमी होईल आणि त्यांची पचनक्रियाही सुधारेल. तसेच, उन्हाळ्यात जनावरांची भूक मंदावते, अशा वेळी त्यांना वडीशेप आणि खडीसाखर एकत्र करून खाऊ घातल्याने त्यांचे पोट थंड राहते आणि दुधाचे प्रमाणही टिकून राहते.
पण याउलट उन्हाळ्यात कोणत्या चुका करू नये हे माहिती असायलाच पाहिजे. दुपारी कडक उन्हात जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडू नका. त्यांना झाडाच्या किंवा गोठ्याच्या थंड सावलीतच बांधा. गोठ्यामध्ये हवा खेळती राहील अशी व्यवस्था करा. जमल्यास दिवसातून दोन ते तीन वेळा जनावरांना थंड पाण्याने अंघोळ घाला. उन्हाळ्यात कोरड्या चाऱ्याला जरा सुट्टी द्या आणि हिरवा चारा जास्त वापरा. कारण हिरव्या चाऱ्यात पाण्याचे प्रमाण भरपूर असते, जे जनावरांना हायड्रेटेड ठेवतं.
आपल्या पशुधनाला उन्हाच्या त्रासापासून वाचवण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य जपण्यासाठी हे निसर्गोपचार अत्यंत फायदेशीर आणि बजेट-फ्रेंडली ठरतात.
२०२६ हे वर्ष केवळ तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेच नव्हे, तर आर्थिक दृष्ट्याही मोठे बदल घेऊन येत आहे. वाढती महागाई, डिजिटल व्यवहारांची वाढ, नोकरीतील अस्थिरता आणि बदलते जीवनमान यामुळे आज प्रत्येक व्यक्तीसाठी पैशाचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
पूर्वी फक्त बचत करणे पुरेसे मानले जात होते; मात्र आज नियोजनाशिवाय केलेली बचतही अपुरी ठरू शकते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती दरमहा थोडे पैसे बाजूला ठेवते, पण त्याचे योग्य व्यवस्थापन नसेल तर अचानक आजारपण किंवा नोकरी जाण्याच्या प्रसंगी ती अडचणीत सापडू शकते. आर्थिक नियोजन म्हणजे केवळ पैसे वाचवणे नव्हे, तर आपल्या आयुष्याला दिशा देणे होय. जे लोक वेळेवर नियोजन करतात, ते भविष्यातील संकटांना आत्मविश्वासाने सामोरे जातात. त्यामुळे २०२६ मध्ये आर्थिक यश हवे असेल, तर नियोजन ही गरज नसून ती एक सवय बनली पाहिजे.
उत्पन्न–खर्चाचा ताळमेळ आणि बजेटचे महत्त्व.
पैशाचे योग्य नियोजन करण्याची सुरुवात नेहमी उत्पन्न आणि खर्चाचा स्पष्ट आढावा घेण्यापासून होते. आपल्याला दरमहा किती उत्पन्न मिळते आणि ते नेमके कुठे खर्च होते, याची नोंद ठेवणे फार महत्त्वाचे आहे. अनेक लोक महिन्याच्या शेवटी “पैसे कुठे गेले?” असा प्रश्न विचारतात, कारण त्यांनी कधीच बजेट तयार केलेले नसते. उदाहरणार्थ, एखादा तरुण दरमहा ₹३०,००० कमावतो, पण लहानसहान खर्च, ऑनलाइन खरेदी आणि बाहेर खाणे यामुळे त्याच्या हातात काहीच उरत नाही. अशावेळी ५०-३०-२० नियम उपयोगी ठरतो ५०% गरजांसाठी, ३०% इच्छांसाठी आणि २०% बचतीसाठी. बजेट हे बंधन नसून स्वातंत्र्याचे साधन आहे. जेव्हा खर्च नियंत्रणात येतो, तेव्हा मनःशांती मिळते आणि भविष्यासाठी आत्मविश्वास वाढतो. २०२६ मध्ये आर्थिक शिस्त हीच खरी श्रीमंती आहे.
बचत आणि आपत्कालीन निधी – सुरक्षिततेचा पाया.
२०२६ मध्ये जग अधिक वेगवान असले तरी अनिश्चितताही तितकीच वाढलेली आहे. त्यामुळे बचत आणि आपत्कालीन निधी हा आर्थिक नियोजनाचा मजबूत पाया ठरतो. बचत म्हणजे उरलेले पैसे बाजूला ठेवणे नव्हे, तर पगार मिळताच आधी स्वतःसाठी पैसे राखून ठेवणे. उदाहरणार्थ, एखादी कुटुंबप्रमुख महिला दरमहा थोडी रक्कम बाजूला ठेवते आणि काही वर्षांतच ती रक्कम कुटुंबासाठी मोठ्या आधाराची ठरते. आपत्कालीन निधी म्हणजे किमान ६ महिन्यांच्या खर्चाइतकी रक्कम सुरक्षित आणि सहज उपलब्ध ठिकाणी ठेवणे. अचानक आजार, अपघात किंवा नोकरी जाणे यांसारख्या परिस्थितीत हा निधी संकटातून बाहेर पडण्याची ताकद देतो. ज्यांच्याकडे आपत्कालीन निधी असतो, ते कठीण काळातही घाबरत नाहीत. त्यामुळे बचत ही केवळ सवय नसून स्वाभिमानाची आणि सुरक्षिततेची निशाणी आहे.
योग्य गुंतवणूक – भविष्यासाठी संपत्ती निर्माण.
फक्त बचत करून संपत्ती वाढत नाही; त्यासाठी योग्य गुंतवणूक आवश्यक असते. २०२६ मध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत . म्युच्युअल फंड, SIP, शेअर्स, PPF, सोने इत्यादी. मात्र सर्वांसाठी एकच पर्याय योग्य असेलच असे नाही. उदाहरणार्थ, तरुण वयात नियमित SIP सुरू केल्यास चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो आणि दीर्घकाळात मोठी रक्कम जमा होते. तर निवृत्तीच्या जवळ असलेल्या व्यक्तीसाठी सुरक्षित गुंतवणूक अधिक महत्त्वाची ठरते. गुंतवणूक करताना ध्येय ठरवणे आवश्यक आहे. घर, शिक्षण, व्यवसाय किंवा निवृत्ती. योग्य नियोजनाने केलेली गुंतवणूक ही भविष्यातील स्वप्नांना वास्तवात आणते. त्यामुळे २०२६ मध्ये “आज थोडे कष्ट, उद्या मोठा लाभ” हे तत्त्व लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
कर्ज आणि खर्चाचे शहाणपणाचे व्यवस्थापन.
आजच्या काळात कर्ज घेणे सोपे झाले आहे, पण तेच कर्ज चुकीच्या पद्धतीने घेतले तर आयुष्यभराचे ओझे बनू शकते. २०२६ मध्ये कर्जाचे शहाणपणाने व्यवस्थापन करणे फार महत्त्वाचे आहे. गरज आणि हौस यातील फरक ओळखणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, शिक्षण किंवा घरासाठी घेतलेले कर्ज भविष्यासाठी उपयुक्त ठरू शकते; मात्र केवळ दिखाव्यासाठी घेतलेले कर्ज आर्थिक तणाव वाढवते. क्रेडिट कार्डचा अति वापर अनेकांना कर्जाच्या विळख्यात अडकवतो. खर्च उत्पन्नाच्या मर्यादेत ठेवणे आणि वेळेवर परतफेड करणे ही आर्थिक शिस्त आहे. जो व्यक्ती आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवतो, तोच खरा श्रीमंत असतो. २०२६ मध्ये कर्ज हे साधन असावे, गुलामगिरी नव्हे ही जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे.
विमा आणि आर्थिक संरक्षणाचे महत्त्व.
आर्थिक नियोजन करताना अनेकदा विम्याकडे दुर्लक्ष केले जाते, पण प्रत्यक्षात विमा हा संरक्षणाचा मजबूत कवच आहे. २०२६ मध्ये आरोग्य खर्च वाढलेला असताना आरोग्य विमा अत्यावश्यक ठरतो. उदाहरणार्थ, अचानक मोठा वैद्यकीय खर्च आला तरी विम्यामुळे कुटुंबाची बचत सुरक्षित राहते. तसेच जीवन विमा हा कुटुंबाच्या भविष्यासाठी आधारस्तंभ आहे. विमा म्हणजे मृत्यूची भीती नव्हे, तर जीवनाची जबाबदारी स्वीकारणे होय. जे लोक वेळेवर विमा घेतात, ते आपल्या प्रियजनांसाठी सुरक्षित भविष्य निर्माण करतात. आर्थिक नियोजनात विमा समाविष्ट केल्यास मनःशांती मिळते आणि ध्येयांवर लक्ष केंद्रित करता येते. त्यामुळे २०२६ मध्ये विमा हा खर्च नसून एक गुंतवणूक आहे, असे समजणे गरजेचे आहे.
आर्थिक साक्षरता आणि प्रेरणादायी निष्कर्ष.
२०२६ मध्ये पैशाचे योग्य नियोजन करण्यासाठी आर्थिक साक्षरता अत्यंत महत्त्वाची आहे. चुकीच्या सल्ल्याला बळी न पडणे, फसवणुकीपासून सावध राहणे आणि सतत शिकत राहणे ही काळाची गरज आहे. आर्थिक यश हे एका रात्रीत मिळत नाही; ते शिस्त, संयम आणि सातत्याने केलेल्या नियोजनातूनच मिळते. उदाहरणार्थ, सामान्य उत्पन्न असलेले अनेक लोक योग्य नियोजनामुळे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाले आहेत. पैसा हा उद्दिष्ट नसून तो उद्दिष्ट साध्य करण्याचे साधन आहे. आज घेतलेले छोटे निर्णय उद्याचे मोठे परिणाम ठरवतात. म्हणूनच २०२६ मध्ये पैशाचे योग्य नियोजन करून प्रत्येकाने आपल्या स्वप्नांना दिशा द्यावी. आज नियोजन करा, उद्या निर्धास्त जगा हीच खरी प्रेरणा आहे.
आज अनेक तरुण-तरुणी नवीन कल्पनांवर आधारित स्टार्टअप सुरू करत आहेत. स्वतः काहीतरी वेगळं करण्याची जिद्द, नवे प्रयोग आणि मोठ्या संधी शोधण्याची धडपड यामुळे उद्योजकतेकडे ओढा वाढला आहे. मात्र, केवळ चांगली कल्पना असून चालत नाही, ती योग्य प्रकारे अंमलात आणणंही तितकंच महत्त्वाचं आहे. अनेकदा नवीन उद्योजक काही मूलभूत चुका करतात, ज्या व्यवसायाच्या वाढीला अडथळा ठरू शकतात. योग्य नियोजन आणि योग्य धोरणांशिवाय फक्त उत्साहाच्या जोरावर व्यवसाय यशस्वी होणं कठीण असतं.
व्यवसाय सुरू करताना आर्थिक व्यवस्थापन, बाजारपेठेचा अभ्यास, ग्राहकांच्या गरजा आणि योग्य मार्गदर्शन यावर भर देणं आवश्यक आहे. सुरुवातीला काही महत्त्वाच्या चुका टाळल्या नाहीत, तर सुरुवातीचा उत्साह लवकरच निराशेत बदलू शकतो. म्हणूनच, या लेखात आपण अशा ७ चुका पाहणार आहोत, ज्या कळत-नकळत व्यवसायिकांकडून होऊ शकतात. मात्र, नव्याने स्टार्टअप सुरू करताना त्या टाळणं अत्यंत गरजेचं आहे.
१. कल्पनेची पडताळणी न करणे
फक्त कल्पना चांगली आहे म्हणून उत्पादन तयार केलं, पण लोकांना त्याची गरजच नसेल, तर तो व्यवसाय अपयशी ठरू शकतो. म्हणूनच कोणतीही कल्पना प्रत्यक्षात आणण्याआधी बाजारपेठेचा नीट अभ्यास करणं गरजेचं आहे. तुमच्या उत्पादनाची किंवा सेवेची लोकांना खरंच गरज आहे का, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.
यासाठी ग्राहकांशी थेट संवाद साधा, त्यांचे मत जाणून घ्या आणि आवश्यकतेनुसार बदल करा. ग्राहक सर्वेक्षण करा, त्यांच्यासोबत चर्चा करा आणि सर्वात कमी खर्चात ‘MVP’ म्हणजेच किमान व्यवहार्य उत्पादन तयार करून त्याची चाचणी करा. यामुळे बाजारातील मागणी आणि उत्पादनाच्या यशाची शक्यता तपासता येईल.
२. आर्थिक व्यवस्थापनात निष्काळजीपणा
स्टार्टअप सुरू झाल्यावर पैशांची ये-जा इतकी वेगाने होते की कधी खर्च जास्त झाला आणि भांडवल कमी पडलं, हे लक्षातही येत नाही. त्यामुळे आर्थिक व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचं आहे. खर्चावर काटेकोर नियंत्रण ठेवा आणि प्रत्येक महिन्याला तुम्ही किती खर्च करत आहात, हे तपासा. व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या भांडवलाचा अंदाज घ्या आणि त्याचा योग्य वापर करा.
यालाच ‘बर्न रेट‘ म्हणतात, म्हणजे तुमचं स्टार्टअप किती वेगाने पैसे खर्च करत आहे. भविष्यात जर जास्त भांडवलाची गरज भासली, तर ते कुठून मिळवायचं, याची आधीच योजना तयार ठेवा. अनावश्यक खर्च टाळा आणि नफ्याच्या दिशेने योग्य आर्थिक नियोजन करा, म्हणजे तुमच्या स्टार्टअपचा प्रवास अधिक स्थिर आणि यशस्वी होईल.
३. ग्राहकांचा अभिप्राय दुर्लक्षित करणे
ग्राहक हे तुमच्या व्यवसायाचा आरसा असतात. त्यांचा अभिप्राय लक्षात घेतला नाही, तर तुमचं उत्पादन किंवा सेवा हळूहळू अप्रासंगिक ठरू शकते. ग्राहकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला उत्पादनातील सुधारणा आणि बाजारातील मागणी समजून घेण्यास मदत करतात. त्यामुळे ग्राहक काय म्हणत आहेत, ते लक्षपूर्वक ऐका आणि त्यांच्या गरजांनुसार बदल करण्याची मानसिकता ठेवा.
सतत सुधारणा करत राहिल्यास, तुमचं उत्पादन अधिक उपयुक्त आणि ग्राहकांसाठी आकर्षक होत जातं. ग्राहकांच्या फीडबॅकवर त्वरित कृती करा, त्यांच्यासोबत संवाद साधा आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या ब्रँडवर विश्वास निर्माण होईल आणि व्यवसाय अधिक वेगाने वाढेल.
४.हायरिंग करताना अति घाई किंवा अति विलंब
योग्य टीमशिवाय कोणताही व्यवसाय यशस्वी होऊ शकत नाही. काही वेळा स्टार्टअपमध्ये गरज नसताना लवकर भरती केली जाते, ज्यामुळे अनावश्यक खर्च वाढतो. तर काही वेळा आवश्यक वेळेत भरती न केल्यामुळे कामाचा ताण वाढतो आणि व्यवसायाची वाढ मंदावते. त्यामुळे हायरिंग करताना गरज आणि वेळ यांचा समतोल राखणं महत्त्वाचं आहे.
योग्य कर्मचारी निवडताना केवळ कौशल्य पाहू नका, तर त्यांच्या विचारसरणी, काम करण्याची पद्धत आणि कंपनीच्या मूल्यांशी त्यांची जुळवणूक होते का, हेही तपासा. चांगली टीम म्हणजे फक्त अनुभवी लोकांचा गट नव्हे, तर तुमच्या उद्दिष्टांसोबत जुळणारी लोकं असणंही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे भरती करण्याआधी स्पष्ट योजना तयार करा आणि योग्य वेळी, योग्य लोकांना संधी द्या.
५. स्पष्ट व्यवसाय मॉडेल नसणे
पैसे कुठून येणार? हा प्रश्न तुम्ही सुरुवातीलाच स्वतःला विचारला पाहिजे. अनेक स्टार्टअप केवळ चांगल्या कल्पनेच्या जोरावर पुढे जातात, पण त्यांना उत्पन्नाचा स्पष्ट स्रोत नसतो. त्यामुळे काही काळानंतर पैशांची अडचण येते आणि व्यवसाय टिकून राहणं कठीण होतं.
यावर उपाय म्हणजे सुरुवातीलाच तुमचं बिझनेस मॉडेल स्पष्ट करणं. तुम्ही कुठल्या सेवांसाठी पैसे घेणार? ग्राहकांना कोणत्या सुविधांसाठी शुल्क द्यावं लागेल? आणि उत्पन्न वाढवण्यासाठी कोणते पर्याय आहेत? हे सर्व ठरवा. वेळोवेळी व्यवसाय मॉडेल सुधारत राहा आणि वेगवेगळ्या मार्गांनी पैसे कमावण्याच्या शक्यता तपासा.
६. खराब मार्केटिंग रणनीती
फक्त चांगलं उत्पादन तयार केलं की ग्राहक आपोआप येतील, असा समज अनेक नव्या उद्योजकांचा असतो. पण वास्तवात, लोकांना तुमच्या ब्रँडबद्दल माहितीच नसेल, तर ते ते विकत घेणार कसं ? त्यामुळे उत्तम उत्पादनासोबत प्रभावी मार्केटिंगही गरजेचं आहे.
मार्केटिंगसाठी योग्य रणनीती ठरवा. सोशल मीडिया, डिजिटल जाहिराती, प्रभावशाली लोकांचे (influencers) सहकार्य, आणि ग्राहकांशी थेट संवाद यासारख्या पद्धती वापरा. कोणत्या मार्गाने तुमचं उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवायचं, यासाठी ठोस योजना तयार ठेवा आणि सतत नवीन प्रयोग करत राहा.
७. बाजारातील बदलांना न जुळवून घेणे
आजचा बाजार सतत बदलत आहे. तंत्रज्ञान, ट्रेंड्स आणि ग्राहकांच्या गरजा झपाट्यानं बदलतात. अशा वेळी, जुन्या कल्पनांवर अडून न राहता परिस्थितीनुसार लवचिक राहणं महत्त्वाचं आहे. काही वेळा तुमच्या उत्पादनाची दिशा बदलावी लागू शकते, तर कधी नवीन संधी स्वीकाराव्या लागू शकतात.
बदल ही वाढीची संधी असते. त्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद आणि बाजारातील बदल लक्षात घेऊन आवश्यक त्या सुधारणा करा. वेळेप्रमाणे स्वतःला अपडेट ठेवा आणि नव्या गोष्टी शिकण्यास तयार राहा. यामुळे तुमचं स्टार्टअप टिकून राहण्याची आणि यशस्वी होण्याची शक्यता वाढेल.
मित्रांनो,स्टार्टअप म्हणजे एक रोमांचक प्रवास असतो, पण तो यशस्वी करायचा असेल तर काही महत्त्वाच्या चुका टाळणं गरजेचं आहे. सुरुवातीपासून योग्य नियोजन करा, स्पष्ट व्यवसाय मॉडेल ठरवा आणि मार्केटिंगकडे दुर्लक्ष करू नका. ग्राहकांचा अभिप्राय ऐकून सुधारणा करण्याची तयारी ठेवा.
सतत शिकण्याची वृत्ती ठेवल्यास आणि बदल स्वीकारल्यास तुमचं स्टार्टअप यशाच्या दिशेने पुढे जाईल. योग्य टीम, आर्थिक शिस्त आणि बाजारातील ट्रेंड लक्षात घेऊन जर तुम्ही पुढे गेलात, तर तुमचा व्यवसाय निश्चितच उंच भरारी घेईल!
आर्थिक स्थिरतेच्या दिशेने वाटचाल करत असताना, गुंतवणुकीच्या योजनांचे प्रभावी नियोजन अत्यंत आवश्यक आहे. यासाठी एक लोकप्रिय आणि प्रभावी पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड म्हणजेच एक प्रकाराची गुंतवणूक योजना आहे जी विविध प्रकारच्या संपत्तीत गुंतवणूक करून आपल्याला विविध फायदे देऊ शकते.
अनेक नवशिक्या तरुणांना म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असते, पण माहितीच्या अभावी ते याकडे दुर्लक्ष करतात. हे लक्षात घेता, नवीन गुंतवणूकदारांसाठी, जे या क्षेत्रात नवे आहेत किंवा योग्य माहितीच्या अभावामुळे गुंतवणूक सुरू करत नाहीत, त्यांना म्युच्युअल फंड म्हणजे काय, ते कसे काम करते, म्युच्युअल फंडच्या कार्यपद्धती, विविध प्रकार आणि गुंतवणूक करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी याची सविस्तर माहिती देणारा आजचा हा लेख आहे.
आता, आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय, ते कसे काम करते आणि आपल्या गुंतवणूक धोरणात ते कसे समाविष्ट करावे याबद्दल सखोल चर्चा करूया.
म्युच्युअल फंड्स म्हणजे काय ?
परस्पर निधी म्हणजेचं म्युच्युअल फंड गुंतवणुकीचं असं साधन आहे, जिथे अनेक लोक आपली थोडीथोडी रक्कम एकत्र करतात. ही एकत्रित रक्कम तज्ञ फंड व्यवस्थापक विविध ठिकाणी, जसं की शेअर्स, बॉण्ड्स किंवा इतर गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवतात. प्रत्येक गुंतवणूकदाराला या फंडाच्या युनिट्स मिळतात, म्हणजे त्या गुंतवणुकीत त्यांचा हिस्सा असतो, म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणं म्हणजे थोड्या पैशात अनेक ठिकाणी गुंतवणूक करता येणे , ज्यामुळे जोखीम कमी होते आणि आपल्याला विविध प्रकारच्या गुंतवणुकीचा फायदा मिळतो.
उदाहरणार्थ, एक व्यक्ती मोठ्या कंपनीचे शेअर्स थेट खरेदी करू शकत नसेल, तरी म्युच्युअल फंडाद्वारे त्याच कंपनीचे शेअर्स किंवा इतर मालमत्ता अप्रत्यक्षरित्या खरेदी करू शकतो. अशा प्रकारे, म्युच्युअल फंडांमुळे छोट्या गुंतवणूकदारांनाही मोठ्या आणि विविध गुंतवणुकीत सहभाग घेता येतो.
म्युच्युअल फंड्सचे प्रकार
म्युच्युअल फंड्सचे अनेक प्रकार आहेत, जे गुंतवणूकदारांच्या गरजा, जोखमीची तयारी, आणि गुंतवणुकीच्या उद्दिष्टांनुसार निवडले जाऊ शकतात.
१) इक्विटी (समभाग) फंड्स:
हे फंड्स पूर्णपणे शेअर बाजारात गुंतवणूक केले जातात. इक्विटी फंड्सचा उद्देश जास्त परतावा मिळवणे असतो, पण त्यासाठी जोखीम देखील अधिक असते. शेअर बाजारातील चढउतारामुळे इक्विटी फंड्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी दीर्घकालीन विचार गरजेचा असतो. जे गुंतवणूकदार जोखीम पत्करू शकतात, त्यांच्यासाठी इक्विटी फंड्स फायदेशीर ठरतात.
२) डेट (कर्जरोखे) फंड्स:
डेट फंड्समध्ये मुख्यत्वे बॉण्ड्स, सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. या फंड्समधून स्थिर आणि कमी जोखीम असलेला परतावा मिळतो. जे गुंतवणूकदार कमी जोखीम आणि स्थिर उत्पन्नाची अपेक्षा करतात, ते डेट फंड्सची निवड करतात.
३) हायब्रिड फंड्स:
हे फंड्स इक्विटी आणि डेट अशा दोन्ही प्रकारांच्या गुंतवणुकीत गुंतवलेले असतात. यामध्ये जोखीम आणि परतावा यांचा संतुलन साधण्याचा प्रयत्न केला जातो. गुंतवणूकदारांना विविधतेचा फायदा आणि स्थिर उत्पन्नाची शक्यता असते.
४) इंडेक्स फंड्स:
इंडेक्स फंड्स हे बाजारातील विशिष्ट निर्देशांकाचे (जसे की निफ्टी ५०, सेंसेक्स) अनुसरण करतात. त्यामुळे, हे फंड्स कमी खर्चात आणि कमी जोखीमेत गुंतवणूक करण्यासाठी योग्य असतात. या फंड्समधील परतावा बाजाराच्या सरासरीच्या जवळपास असतो
५) लिक्विड फंड:
लिक्विड फंड म्हणजे अत्यंत कमी जोखीम असलेला म्युच्युअल फंड, जो मुख्यतः अल्पकालीन कर्जाच्या साधनांमध्ये गुंतवणूक करतो, जसे की शॉर्ट-टर्म सरकारी सिक्युरिटीज, कॉर्पोरेट पेपर्स इत्यादी. याचा मुख्य लाभ म्हणजे पैशांची जलद उपलब्धता. म्हणजेच, तुम्ही या फंडात गुंतवणूक केल्यावर, तुम्हाला आपले पैसे तात्काळ आणि सहजपणे मिळवता येतात. लिक्विड फंडांचा व्याजदर साधारणतः कमी असतो, परंतु त्यांच्या स्थिरतेमुळे आणि लवचिकतेमुळे हे एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानले जातात.
म्युच्युअल फंड्स कसे काम करतात?
म्युच्युअल फंड्सचे व्यवस्थापन तज्ज्ञ फंड व्यवस्थापकांकडून केले जाते. गुंतवणूकदारांची रक्कम विविध प्रकारच्या गुंतवणुकांमध्ये गुंतवली जाते, जसे की शेअर्स, बॉण्ड्स, सरकारी रोख्यांमध्ये. फंड व्यवस्थापक बाजाराचे संशोधन करून योग्य मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतात. म्युच्युअल फंड्सचा मुख्य उद्देश म्हणजे गुंतवणूकदारांना उच्च परतावा मिळवून देणे, जो बाजाराच्या वाढत्या परिस्थितीवर अवलंबून असतो.
प्रत्येक गुंतवणूकदाराच्या हिशोबाने फंड युनिट्स दिल्या जातात. युनिट्सची किंमत रोजच्या बाजार किमतींवर आधारित बदलत असते, ज्याला NAV ( Net Asset Value) म्हणतात. फंड व्यवस्थापकांनी केलेल्या गुंतवणुकीतून जे उत्पन्न होते, ते सर्व गुंतवणूकदारांमध्ये वाटले जाते.
म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणुकीसाठी दोन मुख्य पर्याय आहेत: SIP आणि लंप सम
१) SIP (Systematic Investment Plan): SIP म्हणजे दर महिन्याला किंवा ठराविक काळानुसार एकच रक्कम गुंतवणे. SIP चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बाजाराच्या चढउतारांपासून बचाव होतो. SIP ने दीर्घकाळात चांगले परतावा मिळण्याची शक्यता असते.
SIP कधी करावी?
जेव्हा तुमच्याकडे दर महिन्याला थोडी थोडी रक्कम गुंतवण्यासाठी उपलब्ध असेल.
बाजारातील जोखमीचे व्यवस्थापन करत दीर्घकालीन गुंतवणूक करायची असल्यास.
बाजारातील तात्पुरत्या चढउतारांमुळे चिंताग्रस्त न होता, दीर्घकाळात जास्त परतावा मिळवण्यासाठी.
२) लंप सम (Lump Sum Investment):
म्हणजे एकाच वेळी मोठ्या रकमेची गुंतवणूक करणे. यामध्ये, गुंतवणूकदार संपूर्ण निधीला एकाच टप्यात गुंतवून टाकतो. यात एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवण्याची सुविधा मिळते, ज्यामुळे त्या निधीवर नंतर मोठा लाभ मिळवता येऊ शकतो.
लंप सम कधी करावे?
जेव्हा आपल्याकडे मोठी रक्कम उपलब्ध असते, जसे की आपला वारसाहक्क, एखादा मिळालेला बोनस इ. तेव्हा लंप समएक योग्य पर्याय असू शकतो. यात बाजारपेठ स्थिर किंवा वरती जात असताना गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी, जसे की निवृत्तीवेतन, उच्च शिक्षण, किंवा मोठ्या कामासाठी एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवणे उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे, लंप समगुंतवणूक करताना आपली आर्थिक स्थिती, बाजाराची परिस्थिती आणि गुंतवणुकीच्या उद्दिष्टांचा विचार करणे आवश्यक आहे.
योग्य म्युच्युअल फंड कसा निवडावा?
म्युच्युअल फंड निवडताना काही महत्त्वाचे घटक लक्षात घेतले पाहिजेत
गुंतवणुकीचा उद्देश ठरवा:
तुम्ही गुंतवणूक का करत आहात हे ठरवणे महत्त्वाचे आहे. निवृत्ती योजना, मुलांच्या शिक्षणाचा खर्च किंवा घर खरेदी अशा दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी इक्विटी फंड्स योग्य ठरतात
जोखीम पचवण्याची तयारी :
तुमची जोखीम पचवण्याची कितपत तयारी आहे यावर तुमचा फंड निवडला जाऊ शकतो. जर तुमची जोखीम घ्यायची तय्यारी असेल आणि दीर्घकालीन परताव्याची अपेक्षा असेल, तर इक्विटी फंड्स चांगले ठरू शकतात. परंतु कमी जोखीम सहन करू शकणारे गुंतवणूकदार डेट फंड्स किंवा हायब्रिड फंड्स निवडू शकतात.
फंडची मागील कामगिरी पहा:
फंड निवडताना त्याची मागील काही वर्षांतील कामगिरी तपासा. फंडने कसा परतावा दिला आहे, बाजाराच्या चढउतारांना कसा प्रतिसाद दिला आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. मात्र, फक्त मागील कामगिरीच नाही, तर त्याचे सध्याचे व्यवस्थापन, त्याचे धोरण, आणि फंड व्यवस्थापकांचा अनुभव देखील विचारात घ्या.
खर्च अनुपात (Expense Ratio):
म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करताना, फंडाच्या खर्च अनुपातावर (Expense Ratio) लक्ष द्या. हा फंड व्यवस्थापनासाठी घेतलेला खर्च असतो. कमी खर्च अनुपात असलेले फंड्स गुंतवणूकदारांसाठी जास्त फायद्याचे ठरतात, कारण कमी खर्चामुळे जास्त परतावा मिळू शकतो.
थोडक्यात, तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांनुसार अल्पकालीन किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य म्युच्युअल फंड निवडणे महत्त्वाचे आहे. अल्पकालीन ध्येयांसाठी लिक्विड फंड्स किंवा डेट फंड्स उपयुक्त ठरू शकतात, तर दीर्घकालीन ध्येयांसाठी इक्विटी फंड्स उत्तम असतात.