Category: व्यवसायाच्या वाटेवर चालताना

  • व्यवसाय कोणता ?- व्यवसाय करायचा म्हणजे स्वतःची फॅक्टरी पाहिजे, दुकान पाहिजे या कल्पना आता मागे पडत चालल्या आहेत.

    व्यवसाय कोणता ?- व्यवसाय करायचा म्हणजे स्वतःची फॅक्टरी पाहिजे, दुकान पाहिजे या कल्पना आता मागे पडत चालल्या आहेत.

    आपला अनुभव, आपल्या आवडी, आपले ज्ञान व कसब, उपलब्ध असणारी मानवी संसाधने, कच्चा माल व आपली काम करण्याची क्षमता व इतर बाबींचा विचार करुन कोणता व्यवसाय करावा? यासाठी पुढे दिलेल्या माहितीचा उपयोग आपल्याला होईल.

    तर सेवा पुरवण्यासाठी त्या त्या सेवेनुसार अनेक घटकांची गरज असते. समजा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात वेबसाईट तयार करण्याचा व्यवसाय करायचा असेल, तर फार घटकांची आवश्यकता नाही. याउलट एखादा पर्यटनविषयक व्यवसाय करायचा असेल तर गाड्या, मार्गदर्शक, राहण्याची व्यवस्था अशा सर्व सोयींची गरज पडेल. त्यासाठी त्या सर्व गोष्टी स्वतःच्या असणे आवश्यक नाही, त्या तुम्ही आउटसोर्स करु शकता. तसे तुमचे नेटवर्क असणे अत्यावश्यक आहे. वेगवेगळ्या सेवानुंसार लागणाऱ्या गोष्टींची माहिती घेणे उपयुक्त ठरते.

    उबर या जगातील सर्वात मोठ्या टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपनीकडे स्वतःची एकही टॅक्सी नाही. फेसबुक या जगातील सर्वात मोठ्या व लोकप्रिय सोशल मिडीया कंपनीकडे स्वतःचे एक अक्षरही लेखन नाही. अलिबाबा या जगातील सर्वात मोठ्या ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपनीकडे एक खिळासुध्दा स्टॉकमध्ये नाही. एअरबीएनबी (Airbnb) या जगातल्या सगळ्यात मोठ्या भाड्याची घरे पुरवणाऱ्या कंपनीकडे स्वतःचे एकही घर नाही.

    ॲपल या जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन व टॅबलेट बनवणाऱ्या कंपनीची स्वतःची फॅक्टरी नाही. व्हॉट्सॲप या दिवसातून कोट्यावधी संदेशांची देवाणघेवाण करणाऱ्या कंपनीकडे स्वतःचा सर्व्हर सुध्दा नाही. नाइकी या जगातील आघाडीच्या पादत्राणे बनवणाऱ्या कंपनीचा स्वतःची कोणताही कारखाना नाही.

    वरील सर्व उदाहरणांवरून असे लक्षात येते की, एकदा कोणता व्यवसाय करायचा हे ठरवल्यानंतर सर्व गोष्टी स्वतःच्या असणे गरजेचे नाही. त्या स्वतःच्या असतील तर उत्तमच पण नसतील तर काळजी नसावी. उद्योजक हा नेहमी सर्व उपलब्ध वस्तूंचा योग्य ताळमेळ घालून उत्तम वस्तू व सेवा निर्माण करणारा एक तरबेज माणूस असतो. कारण व्यवसाय करायचा म्हणजे स्वतःची फॅक्टरी पाहिजे, दुकान पाहिजे, भांडवल या कल्पना आता मागे पडत चालल्या आहेत.

    लोकांची गरज ओळखा, ती पुरवणारी संकल्पना किंवा वस्तू शोधून काढा. Outsourcing व Out sharing सारख्या तंत्राचा उपयोग करुन, निरनिराळ्या एजन्सींना आपल्यासोबत घ्या. मार्केटिंगवर जास्तीत जास्त भर देणे. ग्राहकांना उत्तम सेवा देणे. प्रामाणिक व पारदर्शी व्यवहार ठेवणे, आपल्याबरोबरच, आपल्याबरोबर काम करणाऱ्या संस्थांचा विकास करणे, आंतरराष्ट्रीय बाजारात शिरकाव करणे हे नवीन व्यवसायाचे मंत्र आहेत. कल्पना तुमची, पैसा दुसऱ्याचा हे तत्त्व चालते.

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती
  • व्यवसाय विषयक सल्ला उठसुठ कोणालाही विचारू नका अशाच लोकांचा सल्ला घ्या, जे त्याची योग्य उत्तरे देतील

    व्यवसाय विषयक सल्ला उठसुठ कोणालाही विचारू नका अशाच लोकांचा सल्ला घ्या, जे त्याची योग्य उत्तरे देतील

    व्यवसाय हा स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळला, जपला व वाढवला पाहिजे. म्हणजे त्याला लागेल ते सर्व काही पुरवायची तयारी ठेवली पाहिजे. वेळप्रसंगी काही कठोर निर्णय घेता आले पाहिजेत. मात्र व्यवसाय हा त्याच्या System प्रमाणे आपोआप चालत नाही तोपर्यंत त्याची काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर तो वेगाने वाढत जातो.

    आपल्या आवडीचे काम करावे किंवा जे काही करतो आहे त्यामध्ये आवड निर्माण करावी, अन्यथा आपले आयुष्य हे केवळ इतरांची स्वप्ने पूर्ण करण्याच्या कामाचे बनून जाते. हेच तत्त्व व्यवसाय करताना लागू होते. आपल्या आवडीच्या क्षेत्रात व्यवसाय करावा किंवा आपण जो व्यवसाय करतो त्यात आवड निर्माण करावी म्हणजे व्यवसाय हा आनंद देईल. त्यात तोचतोचपणा किंवा रटाळपणा जाणवणार नाही, त्यामुळे कायम झोकून देऊन काम करण्याची आपली तयारी होते. इतरांना अवघड वाटणारी अनेक काम आपण सहजपणे कधी करुन जातो, ते आपल्या लक्षातसुध्दा येत नाही.

    मानसिकता निर्माण करण्याचा व टिकवण्याचा अजून एक उपाय म्हणजे व्यवसायविषयक सल्ला ऊठसूट कोणालाही विचारु नका. फक्त तज्ज्ञ व जाणकार मंडळीकडून हा सल्ला व मार्गदर्शन घ्यावे. नकारात्मक लोकांपासून दूर रहावे. याचे कारण कित्येक लोकांना काहीही माहित नसताना तू व्यवसाय करु नको तुला जमणार नाही असे फुकटचे सल्ले देण्याची सवय असते किंवा काही लोक तुम्हाला नोकरीचे महत्त्व पटवून देण्यासाठीच केवळ बोलत असतात.

    एका इंजिनियर मुलाने नुकताच फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला होता. त्याच्या आईने तिच्या मैत्रिणीला त्या मुलाची ओळख करुन देताना त्याने फोटोग्राफीचा व्यवसाय सुरु केला असल्याचे सांगितले. तेव्हा त्या मैत्रिणीने त्या मुलाला तू हा व्यवसाय करु नको ह्यात काही भविष्य नाही असा फुकटचा सल्ला दिला. त्या मुलाने विचारले की “याचे कारण काय? तुम्ही हे कशावरुन सांगत आहात?” त्या मुलाला मिळालेले उत्तर असे होते की, “माझ्या भाच्याने हा व्यवसाय सुरु केला व काही फायदा नाही म्हणून बंदही करुन टाकला व तू तर इंजिनियर असून हा व्यवसाय का करतोस? तुला एखादी चांगली नोकरी मिळू शकेल.” या प्रसंगामध्ये सल्ला देणाऱ्या व्यक्तीचा व व्यवसायाचा दूरदूरपर्यंत काही संबंध नव्हता. शिवाय अमुक एक व्यक्ती अपयशी झाला म्हणजे जगात कोणीच यशस्वी होणार नाही हा समज चुकीचा आहे. जगात जेवढ्या यशोगाथा आहेत त्याहून अधिक अपयशाच्या कथासुध्दा आहेत. आपण यशस्वी माणसांकडून योग्य दिशा घेऊन तसेच अपयशी लोकांकडून संभाव्य धोके लक्षात घेऊन प्रगती करणे गरजेचे असते. आपण स्वतःच्या व्यवसायाबद्दल जेवढे जाणतो तेवढे जगातला कोणताही तज्ज्ञ जाणत नाही. म्हणून व्यवसायविषयक सल्ला घेताना अशा लोकांचा सल्ला घ्यावा की जे तुम्हाला त्याची योग्य उत्तरे देतील. पुढे जाण्याचे चांगले मार्ग सांगतील किंवा त्यांच्याकडे उत्तर नसले तर तुम्हाला हतोत्साहित करणार नाहीत. तुमच्या मार्गातील अडथळे व धोके समाजावून सांगतील व त्यावरचे उपायही सांगतील अशाच लोकांचा सल्ला घ्यावा.

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती
  • व्यवसायाच्या वाटेवर चालताना – सुरुवात करण्यापूर्वी काय?

    व्यवसायाच्या वाटेवर चालताना – सुरुवात करण्यापूर्वी काय?

    असे प्रश्न दररोज विचारले जातात. ह्या प्रश्नाचे सहज सोपे उत्तर असते, पण विचार करण्याची कला अवगत नसल्याने किंवा तिची ओळख नसल्याने हे प्रश्न अवघड वाटतात. शिवाय ह्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. त्यामुळे सुरूवातीच्या टप्प्यावर निराशा येते. काय करावे ते सुचत नाही, कुणाकडे उत्तर मागावे ते कळत नाही. आता ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची कला आपण जाणून घेऊ या.

    प्रत्येक व्यक्तीची जडणघडण ही त्या व्यक्तीला लाभणारे सामाजिक वातावरण, सहवासात येणारी माणसे, घेतलेले शिक्षण, वाचलेली पुस्तके, ऐकलेली भाषणे व चर्चा, आयुष्यात आलेले प्रसंग व वरील सर्व घटनांना त्या व्यक्तीने दिलेला प्रतिसाद याद्वारे झालेली असते. त्यामुळे प्रत्येकाचे एक वेगळे व्यक्तिमत्व, एक वेगळी विचारसरणी तयार झालेली असते. अशा वेळी कोणत्या व्यक्तीने कोणता व्यवसाय करावा हे प्रत्येक व्यक्तीप्रमाणे बदलत जाणारे समीकरण आहे. आता सगळ्यांना समर्पक असे एक उत्तर शोधण्याची प्रक्रिया चालू होते.

    पहिल्यांदा एक गोष्ट मनावर कोरुन ठेवली पाहिजे की, प्रत्येक प्रकारचा व्यवसाय हा अतिशय उत्कृष्ट पध्दतीने करता येतो. त्यातून हवा तेवढा नफा मिळवता येतो. त्याचा ब्रँडही बनवता येतो. वडापावचे दुकान (मॅकडोनाल्ड, जंबोकिंग), चहाकॉफीचा ठेला (कॅफे कॉफी डे, बरिस्ता, स्टारबक्स), शिकवण्या घेणे (बायजूज, स्टडी सर्कल, चाटे कोचिंग) अशी काही उदाहरणे देता येतील. अगदी एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही, तर आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रापुरता व्यवसाय वाढवता येतो. ‘व्यवसाय कोणता करावा?’ हे अनुभव, आवडी, तुमची जोखीम घेण्याची क्षमता यावरुन ठरवावे लागेल. एखाद्याला शेत कसले असते हे माहित नसताना जाऊन नांगरणीपासून ते माल बाजारात विकेपर्यंतची प्रक्रिया समजून घेण्यात व अंमलात आणण्यात किती वेळ लागेल हे तुमच्या लक्षात येईल. त्याऐवजी ज्याचे बालपण शेतीत गेले आहे, ज्याने ह्या सर्व प्रक्रिया बघितल्या आहेत, त्याला थोडासा वेगळा विचार करुन, आधुनिक पध्दती वापरुन शेती करणे व मोठ्या प्रमाणात नफा मिळवणे सोपे आहे. शेकडो तरुण शेतकऱ्यांच्या यशोगाथा पाहिल्यावर हे सहज समजून येते.

    डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रज्वलित मने या पुस्तकातील एक उतारा – “आपण कसे आहोत याचा विचार माणूस करतो आणि नेमका तसाच घडतो. मी काहीही करु शकत नाही असा विचार केला, तर माझी काही करायची कार्यक्षमताच लोप पावते. तेच जर मी काहीही करु शकतो असा विचार मी मनाशी केला, तर माझी सुरवातीला ते करायची कार्यक्षमता नसली तरी ते मी करु शकतो.”

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती

    आणखी वाचा

  • व्यवसायाच्या वाटेवर चालताना – प्रस्तावना

    व्यवसायाच्या वाटेवर चालताना – प्रस्तावना

    या प्रश्नात मुख्य प्रवाहाबाहेरच्या इतर काही प्रश्नांचीदेखील भर पडत असते. ते प्रश्न म्हणजे, शिक्षणासाठी आयुष्याची २०-२२ वर्षे घालवल्यानंतर ऐन उमेदीच्या काळात पैसा कमावण्यासाठी घरुन येणारा दबाव किंवा मजबूरी, पाठीमागच्या पिढीने करुन ठेवलेले कर्ज (मग ते आपल्या शिक्षणासाठी असो की अजून कोणत्या कारणाने) कसे फेडायचे? त्यानंतर समाजातील काही लोक विचारतात लग्न कधी करणार? लग्न केले तर वाढणाऱ्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन लग्नाआधीच व्यवसाय स्थिरस्थावर करण्यासाठीची धावपळ व कमीअधिक महत्त्वाचे अजून काही प्रश्न सोडवता सोडवता कोणता प्रश्न कधी सोडवायचा? हाही एक नवीन प्रश्न.

    उत्तर देणारे कुणी नसते. आपल्या वाट्याला येते मग गळचेपी. पाठीमागची पिढी नव्या वाटेवरुन चालायला विरोध करते, तर आपल्या सोबत असणारी नवी पिढी अनुभवाअभावी व थोड्याशा अधीरपणामुळे काही ठिकाणी चुकते. ह्या चुका टाळता याव्यात म्हणून करता येणाऱ्या उपाययोजना या लेखमालिकेच्या माध्यमातून प्रकशित करू ज्या व्यवसायाच्या वाटेवर चालताना मार्गदर्शक ठरतील.

    👇 अनुक्रमणिका

    👉 भाग १ – मानसिकता व पूर्वतयारी

    १. व्यवसाय की नोकरी?
    २. व्यवसायच का?
    ३. सुरुवात करण्यापूर्वी काय?
    ४. मानसिकता
    ५. व्यवसाय कोणता?
    ६. कार्यक्षेत्र कसे ठरवावे?
    ७. बिझनेस प्लॅन जरुरी आहे का?
    ८. कुटूंबातील व्यक्तींचा पाठिंबा की विरोध? व उपाय
    ९. अनुभवाची गरज आहे का?

    👉 भाग २ – प्रत्यक्ष सुरुवात, भांडवली उभारणी व सरकारी परवानग्या

    १०. कशी करावी सुरवात?
    ११. व्यवसायासाठी किती भांडवल लागेल? व्यवसाय प्रकारानुसार
    १२. भांडवल कसे उभे करावे?
    १३. भांडवल उभे करताना तारण नसल्यास काय?
    १४. भांडवलासाठी घेतलेले पैसे कसे परत करणार?
    १५. कोणत्या परवानग्या लागतील? व्यवसाय प्रकारानुसार
    १६. सरकारी परवानग्यांचा होणारा फायदा काय?
    १७. कशा मिळवाव्यात परवानग्या?

    👉 भाग ३ – उत्पादने, मार्केटिंग व प्रत्यक्ष नफा

    १८. उत्पादन करण्यापूर्वी काय तयारी करावी?
    १९. प्रत्यक्ष उत्पादन कसे करावे?
    २०. आकर्षक मांडणी व लागल्यास पॅकेजिंग कसे करावे?
    २१. मार्केटिंगसाठी लागणारे सोपे उपाय
    २२. सेल्स करताना घ्यावयाची काळजी
    २३. अडचणीच्या काळात व्यवसायात टिकून कसे रहावे?
    २४. नेहमी उत्साहात काम करण्याची कला
    २५. प्रत्यक्ष नफा मिळवण्याची प्रक्रिया

    👉 भाग ४ – करप्रणाली, व्यवसाय वृध्दी व ब्रँड बनवणे

    २६. भरावे लागणारे कर व त्याचे फायदे तोटे
    २७. व्यवसाय वृध्दीची गरज
    २८. व्यवसाय वृध्दीसाठी उचलावी लागणारी पावले
    २९. ब्रँडचे महत्त्व व गरज
    ३०. ब्रँड निर्मितीचे मार्ग व यशस्वी उद्योग चिरकाल टिकवताना
    ३१. व्यवसायातील स्पर्धा व त्यातून निर्माण होणारे अडथळे
    ३२. व्यवसायातील स्पर्धा व त्यात टिकून राहण्याची कला

  • व्यवसाय की नोकरी ? – शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करावी कि व्यवसाय

    व्यवसाय की नोकरी ? – शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करावी कि व्यवसाय

    महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरुन एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर पुढे काय करणार, नोकरी की व्यवसाय? ह्या प्रश्नाला मिळालेली काही उत्तरे.

    आता वरील तीनही प्रकारच्या तरुणांच्या मताचे विश्लेषण करु या. पहिल्या प्रकारात एकतर त्या तरुणाला नोकरीच करायची असते, मात्र व्यवसाय न करण्याची काही कारणे तो पुढे करत असतो. नोकरीची सुरुवातसुध्दा अगदी तुटपुंज्या उत्त्पन्नावर होते. मग पुढे त्या उत्त्पन्नात फार वेगाने वाढ होते असेही काही नाही. असे तरुण जीवनभर Rat Race मध्ये अडकून पडतात. नोकरी, पगार, घर, घराचे हप्ते, मुलांचे शिक्षण, आरोग्य असे नेहमीचे प्रश्न सोडवतच आयुष्य पुढे सरकत असते. त्यात फार उल्लेखनीय असे काही घडत नाही. पण ह्या चक्रात अडकलेला माणूस सहजी बाहेर पडत नाही. हा निर्णय घेण्याची काही कारणे आहेत त्यामध्ये जोखीम घेण्याचे धाडस नसणे, इच्छाशक्तीचा अभाव व न्यूनगंड ही काही महत्त्वाची कारणे आहेत. ह्यावर थोड्याफार प्रयत्नांनी मात करता येते.

    दुसऱ्या प्रकारच्या व्यक्तींना काही काळ नोकरी करुन भांडवल उभे करायचे असते. काही प्रमाणात उपजीविकेचा प्रश्न मार्गी लावायचा असतो. ह्या व्यक्तींना कमी प्रमाणात जोखीम घ्यायची असते. हेही थोड्याफार फरकाने पहिल्या प्रकारच्या व्यक्तीसारखी सुरुवात करतात. मग पगार, संसाराचे प्रश्न व कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे Rat Race मध्ये अडकतात व बाहेर पडायची इच्छा असूनही बाहेर पडत नाहीत व पहिल्या प्रकारच्या व्यक्तीप्रमाणे ह्यांचे पण आयुष्य फिरत राहते. स्वतः पैसे कमावणे हा भांडवल उभे करण्याचा केवळ एकमेव मार्ग नाही. इतर अनेक मार्गांनी भांडवल उभे करता येते. भांडवल निर्मितीचे इतर मार्ग पुढे आपण पाहणार आहोत. भांडवला उभारणीच्या इतर पर्यायांनी जीवनात वेगाने पुढे जाण्याचा मार्ग सापडेल.

    तिसऱ्या प्रकारचे तरुण हे काहीसे ठाम पण द्विधा मनस्थितीत असतात. ह्या तरुणांना अधिक खोलात जाऊन प्रश्न विचारले तेव्हा समजले की काहीतरी व्यवसाय करायचा म्हणजे कोणता व्यवसाय करावा? याचा पुसटसा अंदाजही यांनी बाधलेला नसतो. इच्छाशक्ती असते मात्र दिशा घ्यायला वेळ लागतो. सांगणारेही कुणी नसतात. मग स्वतःच्या अंदाजावर पुढे जाण्याचा प्रयत्न चालू होतो. हे तरुण खूप काही करण्याची उमेद ठेवतात. पुढे जाऊन त्यांना हवे ते करुनही दाखवतात.

    मी काही जणांना “पाहिजे तेवढे भांडवल देतो, तुम्ही कोणता व्यवसाय करणार आहात?” असा प्रश्न विचारला की मग त्यांच्याकडे काही उत्तर नसते. भांडवल, मनुष्यबळ, प्रशिक्षण याचा पुरवठा बाहेरुन करता येतो. त्याचे असंख्य मार्गसुध्दा आहेत. मात्र व्यवसाय करण्यासाठी लागणारी वृत्ती स्वतःतच असायला हवी किंवा तिची जोपासना स्वतःहून करायला हवी. मग व्यवसाय यशाच्या शिखरावर नेता येईल.

    नोकरी करताना उत्पन्नाच्या, खर्चाच्या मर्यादा पडतात. याउलट व्यवसायामध्ये २४ तास झोकून देऊन काम करता येते. शेकडो माणसांना काम देता येते. ती माणसे तुमच्यासाठी काम करत असतात. सुरुवातीची काही वर्षे संघर्ष केला, की मनाप्रमाणे उत्पन्न व पाहिजे तेवढा वेळ व्यवसायातून प्राप्त करता येतो. उत्पन्नात होणारी वाढ ही बांबूच्या रोपट्याप्रमाणे वेगाने होत असते. मनसोक्त जगण्याचा, स्वतःच्या स्वप्नांसाठी काम करण्याचा आनंद घेत व्यवसाय करणे हे नोकरीपेक्षा सरसच.

    • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती


    आणखी वाचा