Tag: Skills

  • ४. शिक्षण – समज व गैरसमज

    ४. शिक्षण – समज व गैरसमज

    * इंग्रजी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा 

    तीन चार वर्षाच्या मुलांना असं काय शिक्षण देत असतील? ज्याची किंमत पन्नास हजार ते एक लाखाच्या घरात जाते. हा एक न उघडलेला प्रश्न आहे. मला एक मराठी माध्यमात शिकवणारे शिक्षक सांगत होते. की त्यांच्या मुलाची पाचवीच्या वर्षाची फी ६० हजार रुपये आहे. पुढे त्यांनी सांगितलेली माहिती त्यांना आश्चर्याचा धक्का देणारी होतीच त्याचबरोबर मी विस्मयचकित झालो. ते म्हणाले की त्यांच्या शेजाऱ्याच्या मुलाचे इंजिनियरींग केवळ ४२ हजारात पूर्ण झाले आहे. (चार वर्षाची शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची एकूण फी ४२००० रुपये होती.) हे एक उदाहरण आहे. 

    भरमसाठ फी घेण्याला माझा विरोध नाहीच. इंग्रजी माध्यमांच्या शाळांनाही विरोध नाही. जे काही घेतलं जातं त्याची किंमत ठरवण्याची एकके काय आहेत? त्याचा विचार कधी होणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रम अतिशय तन्मयतेने शिकवणारे शिक्षक असणाऱ्या अशा हजारो शाळा महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात आहेत. त्यात मिळणाऱ्या इंग्रजी भाषेचा शिक्षणाचा दर्जा म्हणावा तितका चांगला नाही हे मान्य केले पाहिजे.

    मराठी शाळेत अथवा मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळांमधून शिक्षण घेत असतानाच इंग्रजी शिकणे उत्तम ठरते. कारण ऑक्सफर्ड, केंम्ब्रिज व हारवर्ड विद्यापीठाने सुध्दा मान्य केले आहे की, मातृभाषेतून शिकणे विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासासाठी अतिशय उपयुक्त ठरते. मोठमोठे उद्योजक, सिनेअभिनेत, क्रिकेटपटू, राजकारणी, नेते, कलाकारांमधील बरेचजण आपल्या शालेय जीवनात जिथे मिळेल तिथून शिक्षण घेऊन मोठे झाले आहेत. यशस्वी होणे हा वेगळा घटक आहे. सर्व ठिकाणाचे विद्यार्थी यशस्वी होतात. धीरुभाई अंबानी कोणत्याच मॅनेजमेंट च्या शाळेत गेले नव्हते. अण्णाभाऊ साठे तीन दिवसापेक्षा जास्त शाळेत गेले नव्हते. तरीही त्यांनी यश मिळवलेच. जीवनातील यश व प्रसिध्दी या गोष्टी प्रत्येकाला मिळवता येतात. त्यासाठी लागणारे परिश्रम, चिकाटी, जिद्द, आत्मविश्वास, यशस्वी होण्याची तळमळ या घटकांचा ध्यास घेतलेली माणसे कुठूनही यशस्वी होतात.

    यशस्वी होणे ही कोणत्या एका ठराविक गटाची मक्तेदारी नाहीच. श्रीमंताची मुले यशस्वी होतात तशी गरिबीतून आलेली मुले सुध्दा यशस्वी होतात. शहरातील होतात त्याचप्रमाणे खेड्यातील मुलेसुध्दा यशस्वी होतात. इंग्रजी उत्तम येणारे यशस्वी होतात त्याच प्रमाणे इंग्रजीचा गंध नसणारे सुध्दा यशस्वी होतात. गरिबी-श्रीमंती, वातावरण, ठिकाण, भाषा याचा जेवढा वाटा आपल्या यशात असतो. त्याच्यापेक्षा कितीतरी पट अधिक वाटा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा व अनुकुलन क्षमतेचा असतो. तुम्ही कुठेही शिकला असला तरी प्रयत्न केला तर यश नक्कीच मिळणार आहे.

    तुमची मुले कुठेही शिकत असली तर त्यांना सुध्दा यश मिळवणे शक्य आहेच. हे लक्षात घ्या. आज महाराष्ट्रात एक करोडहून अधिक विद्यार्थी खेड्यात शिक्षण घेत आहेत. यातूनच उद्याचे नेते, खेळाडू, कलाकार, शिक्षणतज्ञ, शास्त्रज्ञ, उद्योजक, वक्ते निर्माण होणार आहेत. शहरी भागात शिकणारे विद्यार्थी सुध्दा यशस्वी होतील.

    जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या घटकांमध्ये शालेय शिक्षणाचा वाटा किती? या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर पुढील प्रश्नाचे उत्तर द्या.

    तुम्ही दहावी, बारावी व पदवी (Graduation) ला असताना केलेल्या अभ्यासात तुम्हाला कितीही मार्क पडलेले असोत. (नापास होण्यापासून १०० टक्क्यांपर्यंत) आज तुम्हाला त्याच प्रश्नपत्रिकेतील किती प्रश्न परत सोडवता येतील? आजच्या जगण्यात त्या प्रश्नांच्या उत्तरांचा सहभाग किती? या दोन प्रश्नांची उत्तरे म्हणजे आपल्या जीवनात यशस्वी होण्यात असणारा शिक्षणाचा वाटा होय.

  • ३.१ शिकण्याच्या पध्दती

    ३.१ शिकण्याच्या पध्दती

    सगळ्यांनी एकत्रित येऊन आपल्या शिक्षकांना प्रत्येक विषयाची सक्ती नको असे सांगितले. आम्ही आम्हाला ज्या विषयात गती आहे त्या विषयात चांगला अभ्यास करु अशी विनवणी केली. मात्र शिक्षकांनी त्यांना तुम्ही नापास व्हाल असे सांगितले. तेव्हा सर्वांचा नाईलाज झाला. त्यांनी इतर विषयाचा अभ्यास चालू ठेवला. 

    त्याचा परिणाम असा झाला की, त्यांना ज्या विषयात चांगली गती होती. तो विषय सोडून इतर विषयांचा अभ्यास करताना त्यांच्या पहिल्या विषयाची सुध्दा हालत बेकार झाली. बदकाला उत्तम पोहता येत होते. मात्र वर्षाअखेरीस जेव्हा निकाल लागला तेव्हा बदक ना चालू शकत होते, ना पोहू शकत होते. जमिनीवर धावण्याच्या विषयात पास होण्यासाठी त्याने पोहण्याची क्षमता पण कमी करुन टाकली. कोकिळा पाण्यात पोहू शकली नाही. वर्षाअखेरीस सगळेजण नापास झाले. गरुडाला कावळा आणि कावळ्याला पोपट करण्याच्या या परिक्षा पध्दतीचे आपल्याला नक्कीच हसू आले असेल. ही गोष्ट आपल्या बाबतीत सुध्दा फारशी वेगळी नाही. आपल्या क्षमता आपल्या पालकांना व शिक्षकांना माहिती नसल्याने त्यांनी आपल्याला सरसकट सर्व विषयांचा अभ्यास करायला लावला. परिणामी आपण आपल्या विषयावरची पकड सुध्दा हरवून बसलो. 

    मी शाळेत असताना मला लिहायला व पाठांतर करायला कधीच आवडले नाही. मी कोणत्याही शिक्षकाचे लिहण्याच्या व पाठांतराच्या बाबतीत कधीही ऐकले नाही. प्रसंगी कित्येक वेळा मार खाल्ला. लिहण्याचा सराव नसल्याने परिक्षेत माझे कितीतरी गुणांचे प्रश्न उत्तरे माहित असूनही लिहायचे राहून जायचे. मला परिक्षेत मार्क कमी पडले असतील. मात्र त्या गोष्टी मला येतच नव्हत्या असे नाही. त्याउलट मला वाचनाची, गणिते व शब्दकोडी सोडवण्याची, भाषणे करण्याची प्रचंड आवड होती. त्यात मी रोखूनही कुणाला थांबत नव्हतो. आता मला माझ्या शाळेतील शिक्षक भेटले की, माझे कौतुक करतात. ज्या विद्यार्थ्याचा कल ज्या क्षेत्रात आहे त्याला त्यातच अभ्यास करु दिला पाहिजे. इंग्रजी ही महत्त्वाची भाषा असली तरी मातृभाषेतून लवकर व चांगले शिकता येते. या गोष्टींचा विचार करुन शिकत गेल्यास माणूस लवकर यशस्वी होण्याच्या शक्यता कैकपटीने वाढतात. या सगळ्या गोष्टी मान्य केल्या तर एक प्रश्न आपल्या समोर ‘आ’ वासून उभा राहतो. तो म्हणजे, आपल्याला कोणत्या गोष्टीत गती आहे? ते ओळखायचे कसे? हे एकदा ओळखता आले की, मग त्याच तंत्राचा वापर आपल्या प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी करुन घेता येईल. 

  • जितके जास्त स्किल्स, तितकी जास्त कमाई

    जितके जास्त स्किल्स, तितकी जास्त कमाई

    सध्याच्या जगात फक्त शिक्षण आणि डिग्री याचे जास्त महत्व न राहता, किती स्किल्स आहेत याला जास्त किंमत आहे. एक काळ होता जेव्हा आपण विचार करायचो, एकदा डिग्री मिळाली की नोकरी पक्की. पण मित्रांनो आता काळ बदलला आहे. आता कुठल्याही क्षेत्रामध्ये नोकरी करायची असेल, तर तुमच्याकडे स्किल्स असणे महत्वाचे आहे. किमान स्किल्स असतील तर एखाद्या क्षेत्रात त्याआधारे इंटर्नशिप करून तुम्ही तुमचा जॉब पक्का करू शकता. तुम्ही जर आधीपासूनच नोकरी करत असाल तर काही एक्स्ट्रा स्किल्समुळे तुम्ही एक्स्ट्रा इन्कम मिळवू शकता. तुम्ही शिक्षण घेत असाल तर अशा स्किल्सच्या माध्यमातून तुम्ही पार्ट टाईम काम करून किंवा फ्रीलान्स काम करून पैसे कमवू शकता. 

    मित्रांनो काय करू शकतो हे तर आपण पाहिलं. आता आपण हे पाहणार आहोत यासाठी नेमके मार्ग कोणते कोणते आहेत आणि या सर्व मार्गांचा अवलंब आपण कसा करू शकतो. 

    इंटरनेटच्या या युगात सध्या रिसोर्स मिळवणे काही अवघड नाही आहे. इंटरनेटचा योग्य आणि पुरेपूर वापर करता आला, तर आपण नुसती कमाई नाही तर एक व्यवसाय उभा करू शकतो. एका सामान्य माणसाच्या दैनंदिन लागणाऱ्या गोष्टींची एक सर्वसामान्य यादी आपण तयार केली, तर त्यात सकाळी उठल्यापासून हेल्थ केअर, मॉर्निंग रुटीन, ब्रेकफास्ट, व्यायाम, जॉब, इव्हिनिंग रुटीन, रात्रीचे जेवण आणि झोपणे यासोबतच सुट्टीच्या दिवशी पर्यटन आणी मनोरंजन या साऱ्या गोष्टी येतात. या गोष्टींचा विचार केला तर फूड, आरोग्य, पैसा, मनोरंजन, पर्यटन, ई-कॉमर्स या सेक्टरमध्ये काम करून, त्याच्याशी संबंधित स्किल्स डेव्हलप करून आपण कमाई करू शकतो.

    आता या सर्वसामान्य सेक्टरचा विचार करता नेमके कोणते किमान स्किल्स आपण आत्मसात करणे गरजेचे आहे ते पाहूया. सध्याच्या काळात माणसाचे आयुष्य प्रचंड धकाधकीचे आणि व्यस्त होत चालले आहे. माणूस जगतो कमी आणि ट्रॅफिकमध्ये अडकतो जास्त. अशावेळी सर्व प्रकारचे सण समारंभ यासाठी लागणारी सजावट आणि डेकोरेशन, तसेच भेटवस्तू या सर्व गोष्टींचा आपण घरबसल्या व्यवसाय सुरु करू शकतो.

    मित्रांनो तरुण वय हे मोठमोठ्या रिस्क घेण्यासाठीच असते. याच वयात आपण मानसिकरित्या अनेक कौशल्ये विकसित करण्याची आणि आत्मसात करण्याची क्षमता ठेवत असतो. फक्त कमाईसाठी नाही तर व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासासाठी स्किल्स आजमावणे अत्यंत गरजेचे आहे. आपण नेहमी ऐकतो की माणूस आपल्या आयुष्याच्या शेवटर्यंत कायम विद्यार्थी असतो. म्हणूनच सतत शिकत राहणे आणि बदलत्या काळानुसार स्वतःला नेहमी अपडेट ठेवणे ही भविष्याची गरज आहे.

    आणखी वाचा

  • भाग १ – शिकण्याचे मुलभूत घटक – शिक्षणाचे महत्त्व

    भाग १ – शिकण्याचे मुलभूत घटक – शिक्षणाचे महत्त्व

    एखाद्या माणसाकडे एकूण किती कौशल्ये आहेत त्यावर त्याचे जीवनशाळेतील शिक्षण ठरते. एकाच व्यक्तीला पोहायला येते, दुचाकी-चारचाकी चालवता येते, उत्तम स्वयंपाक बनवता येतो, चांगले भाषण देता येते, संगणक चालवता येतो, त्याचे आरोग्य उत्तम आहे अशी जेवढी जास्त कौशल्ये प्राप्त असतील तेवढा तो जास्त यशस्वी होण्याच्या शक्यता निर्माण होतात. त्याने मिळवलेली कौशल्ये सध्या काम करत असलेल्या क्षेत्राशी संबंधित असल्यास अत्युत्तम ठरते. आपल्याला ज्या गोष्टी येत नाहीत. त्या गोष्टी साध्य करुन घेण्याची कला हा सुध्दा शिक्षणाचाच एक भाग आहे. 

    The Importance of Education

    माणसाला चारित्र्य घडवणारे, बुध्दीचा विकास करणारे, स्वतःच्या पायावर उभा करणारे शिक्षण आपल्याला हवे आहे. माणसाला माणूस बनवणारे शिक्षण आपल्याला हवे आहे. खऱ्या अर्थाने जीवन समृध्द बनवणारे शिक्षण आपल्याला हवे आहे. म्हणजे काय? तर जीवनातील आपल्याला आवश्यक त्या सर्व गोष्टी साध्य करण्याची गरज शिक्षणातून पूर्ण झाली पाहिजे. सामाजिक, आर्थिक, आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, समाधान, आनंद, भौतिक गरजा, मनःशांती व नातेसंबंध या सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात प्राप्त करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. 

    समजा एखाद्याने खूप सारा पैसा कमावण्यात आयुष्य खर्च केले व त्या नादात आरोग्याची हानी करुन घेतली तसेच कुटुंबातील व्यक्तींसाठी सुध्दा वेळ दिला नाही. तर त्याच्या आयुष्यातील एक बाजू पूर्ण करण्याच्या नादात दुसरी बाजू अपूर्णच राहून गेली किंवा एखाद्याने खूप सगळी माहिती गोळा करण्यात आयुष्य व्यतीत केले त्यावर काम करुन ती माहिती अस्तित्वात आणण्यासाठी त्याच्याकडे वेळ शिल्लक राहिला नाही, तर त्या माणसाची सुध्दा आयुष्याची एक बाजू अपूर्णच राहून गेली. एखाद्या विद्वानाने आयुष्यात खूप काही विद्या प्राप्त केली. त्या नादात त्याने आयुष्यातील इतर गोष्टीकडे दुर्लक्ष केले. कमालीच्या आर्थिक दारिद्र्याचा सामना करत आयुष्य कंठित केले. एखाद्या पैलवानाने आयुष्यात खूपच चांगले आरोग्य कमावले मात्र व्यवहार चातुर्य आत्मसात करण्यात अपयशी ठरला त्याच्या सुध्दा आयुष्यात एक गोष्ट अपूर्णच राहिली. बराक ओबामांनी दोनवेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद भूषविले. राष्ट्राच्या जबाबदाऱ्या सांभाळून त्यांनी कुटुंबासाठी सुध्दा वेळ दिला. 

    एका माणसाने आयुष्य भर फार पैसा कमावला व प्रचंड काटकसर करत त्या पैशाचा आनंद न घेताच मरुन गेला. तर दुसऱ्या एका माणसाने आयुष्यभर जेवढा पैसा कमावला तेवढा तो उधळला, नको तसा खर्च केला व म्हातारपणी कर्जबाजारी व आर्थिक हाल करत जगला. त्याउलट एका माणसाने पैसाही कमावला, आवश्यकतेनुसार त्याचा वापर केला, त्याचे नियोजन व बचत सुध्दा केली. त्याचे आयुष्य समाधानात पूर्ण झाले. आयुष्यात सर्व गोष्टीचा सुवर्ममध्य साधण्याचे तारतम्य शिक्षणातून प्राप्त होते.

    The Importance of Education