खेळण्याच्या वयात कोकच्या ६ बाटल्यांचा संच विकून ५ सेंट्सचा स्वकष्टाने नफा मिळवणाऱ्या वॉरन बफे यांनी पुढे गुंतवणूक क्षेत्राद्वारे अफाट संपत्ती कमावली. तुम्ही म्हणाल, प्रचंड संपत्ती तर जगातील अनेक लोकांनी कमावली आहे. मग बफेंनी यात जगावेगळं असं केलं तरी काय?
कुठलाही कायदा न मोडता, करचुकवेगिरी न करता, नैतिकतेच्या मार्गाने यशाचं शिखर सर करणाऱ्या फार कमी व्यक्ती असतात. त्यांपैकी एक व्यक्ती असणं आणि त्याच्याही पुढे जाऊन, मिळवलेल्या संपत्तीपैकी ९० टक्के संपत्ती फारसा गाजावाजा न करता समाजाला परत देणं, हेच बफेंच्या यशाचं वेगळेपण आहे.
‘समभागधारक हेच कंपनीचे मालक’ अशी सर्वस्वी वेगळी समीकरणं प्रमाण मानून, यशाच्या वाटेवरून एकटं चालत न जाता आपल्या सहकारी आणि कर्मचाऱ्यांनाही यशाचं क्षितिज दाखवणाऱ्या बफेंकडून आपल्याला शिकण्यासारख्या असंख्य बाबी आहेत.
जगभरात गुंतवणूक गुरू म्हणून प्रसिद्ध असलेले वॉरन बफे यांचा आज जन्मदिवस. जगातील कोट्यवधी लोक शेअर बाजारातून पैसे कमविण्यासाठी त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा अवलंब करतात. गुंतवणुकीबाबत त्यांनी केलेले मार्गदर्शन आजही अतिशय प्रभावी ठरते. वॉरन बफे हे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांपैकी एक मोठे नाव आहे. त्यांच्या गुंतवणुकीचा जगभरातील शेअर बाजारावर परिणाम होतो. जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत ते आजही सातव्या स्थानावर आहेत.
बफे यांना आपल्या युवा अवस्थेतच Business आणि Investing विषयी आवड निर्माण झाली आणि त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षापासूनच गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. कोलंबिया बिजनेस स्कूलमधून ते पदवीधर झाले जिथे ते बेंझामिन ग्रॅहम यांच्याकडून गुंतवणुकीचे तत्त्वज्ञान आणि व्हॅल्यू इन्वेस्टिंगच्या कन्सेप्टविषयी बरेच काही शिकले. ओरॅकल ऑफ ओमाहा म्हणून ओळखले जाणारे वॉरन बफे आत्तापर्यंतच्या सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक समजले जातात.
वॉरन बफे यांचे 5 गुंतवणूक मंत्र :
1. गुंतवणुकीकडे दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा :
शेअर्स विकत घेतल्यानंतर एका दिवसात किंवा फार कमी वेळात विकण्यापेक्षा चांगल्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करून त्यामध्ये तुमची गुंतवणूक दीर्घकाळ टिकवून ठेवणे चांगले. शेअर मार्केटमधील दीर्घकालीन गुंतवणूक शेवटी जास्त परतावा देते, परंतु त्यासाठी तुम्ही योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
2. रातोरात श्रीमंत होण्याचा विचार करू नका :
बाजारात लवकरात लवकर श्रीमंत होण्याची हाव तुम्हाला चुकीच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. चांगला Portfolio तयार करणे ही एक मोठी प्रक्रिया आहे. यासाठी खूप संयम लागतो. बाजारातून चांगल्या परताव्यासाठी तुम्ही अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी ज्यांचे Business Model तसेच त्यांचे व्यवस्थापन चांगले आहे.
3. ध्येय ठेवून गुंतवणूक करा :
ध्येयाशिवाय केलेली गुंतवणूक अनेकदा फायदेशीर नसते. तुम्ही तुमच्या कष्टाने कमावलेला पैसा हुशारीने गुंतवा. त्या गुंतवणुकीत पैसा कसा वाढणार आहे हे समजत नसेल, तर त्यापासून दूर राहणेच बरे.
4. वैविध्य समजून घ्या :
‘जवळची सर्व अंडी एका टोपलीत ठेवू नये’ हे सूत्र गुंतवणुकीलाही लागू केले पाहिजे. तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी असलेली रक्कम वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वितरित करावी. संपूर्ण पैसा एकाच ठिकाणी गुंतवू नका, सर्वांमध्ये समतोल ठेवा.
5. रास्त भावाने करा शेअर्सची खरेदी :
एखादी कंपनी उत्तम दर्जाची उत्पादने बनवत आहे किंवा ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देत आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही त्यात गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. वॉरन बफे असे सांगतात, एखाद्या मोठ्या कंपनीचे शेअर्स मोठ्या किंमतीला खरेदी करण्यापेक्षा चांगल्या कंपनीचे शेअर्स वाजवी किंमतीला विकत घेणे कधीही चांगले.
वॉरन बफे यांचा हा प्रसिद्ध विचार प्रत्येक गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीने कायम लक्षात ठेवला पाहिजे.
“खर्च केल्यानंतर जे वाचते, त्याची बचत करु नये,
तर बचत केल्यानंतर जे राहते, त्यातून खर्च केला पाहिजे.”
भारतीय शेअरबाजारातील व्यवहाराची सौदापूर्ती आता T+1 या पद्धतीने जानेवारी 2023 पासून होत आहे म्हणजेच खरेदी केले असल्यास शेअर्स किंवा विक्री केली असल्यास पैसे यांची देवाणघेवाण ब्रोकरच्या खात्यात दुसऱ्या कामकाज दिवशी होईल आणि त्याच दिवशी ग्राहकाला शेअर्स किंवा पैसे मिळतील. यापूर्वी हे व्यवहार T+2 असे म्हणजे व्यवहार झाल्यावर कामकाजाच्या दोन दिवसानंतर होत असत. यात टप्याटप्याने सुधारणा होऊन आज चीन नंतर भारत हा जगातील दुसरा असा देश आहे तेथे शेअरबाजारातील व्यवहाराची सौदापूर्ती T+1 पद्धतीने होत आहे. जगभरात अन्य देशात अजूनही सौदापूर्ती T+2 किंवा T+3 या पद्धतीने होत आहेत.
अमेरिका आणि जपान हे देश आता याबाबत विचार करीत असून काही देश या वर्षी टप्याटप्याने या चळवळीत सामील होतील. सौदापूर्तीचा कालावधी जितका कमी तेवढी त्यातील जोखीम कमी होते त्यामुळे गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण होते. आपण याबाबत T+0 (म्हणजेत्याच दिवशी) अशी सौदापूर्ती करू शकू आणि भविष्यात तात्काळ(स्पॉट) सौदापूर्ती करू शकू का? याबाबत विचार करीत आहोत. अस झालं तर तात्काळ सौदापूर्ती करणारा भारत हा जगातील पहिला आणि एकमेव देश असेल.
शेअरबाजारामुळे उद्योगांना कमीतकमी खर्चात भांडबल उपलब्ध झाले. गुंतवणूकदारांना भागधारक या नात्याने उद्योगाची मालकी मिळाली. भागधारकाचे उत्तरदायित्व हे त्यानी गुंतवलेल्या रकमेइतकेच मर्यादित असून दुय्यम बाजारात त्यांच्या भांडवल खरेदी विक्रीची संधी प्राप्त झाली आहे. थोडी जोखम स्वीकारून गुंतवणुकीवर कदाचित डिव्हिडंड आणि भाववाढ असे दोन्हीही फायदे मिळू शकल्याने गुंतवणूक करण्याचे नवीन साधन मिळाले. 31 ऑगस्ट 1957 रोजी सिक्युरिटीज काँट्रॅक्ट ऍक्ट या कायद्याने अधिकृतता प्राप्त खाली. यापूर्वी असे व्यवहार केवळ विश्वासाने केले जाऊन पूर्ण केले जात असत. त्यास कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाल्याने एक्सचेंजच्या नियामक मंडळाची जबाबदारी वाढली. भारतात मुंबईसह अनेक प्रादेशिक बाजार अस्तीत्वात आले. या सर्व बाजारांतील नियामक मंडळात दलालांचे वर्चस्व होते, कार्यकारी संचालकांवर दलालांचा दबाव होता बाजाराच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता नव्हती. दलालांची एकाधिकारशाही निर्माण खाली होती. सौदापूर्ती वेळेवर होत नसे त्यामुळे खरेदी केलेले शेअर्स मिळण्यासाठी महिन्याहून अधिक कालावधी लागे. व्यवहारात पारदर्शकता नव्हती अनेक व्यवहार जाहीर केले जात नसत, त्यामुळे योग्य किमतीचा अंदाज बांधणे कठीण जात असे. विक्री करताना कमीतकमी भाव आणि खरेदी करताना सर्वाधिक भाव अशी परिस्थिती जवळपास सन 1990 होती.
देशी आणि विदेशी गुंतवणूकदार भारतीय भांडवल बाजारातकडे आकर्षित होण्यासाठी या सर्व व्यवहारात पारदर्शकता यावी यासाठी सरकारने पुढाकार घेतला. त्यांनी मुंबई शेअरबाजाराचे कंपनीकरण करून त्याचे विश्वस्त मंडळ आणि संचालक मंडळ वेगळे असावे, विश्वस्त मंडळात दलाल असले तरी चालतील परंतु संचालक मंडळात व्यावसायिक व्यवस्थापन अस्तित्वात असले पाहिजे असे सुचवले. त्यास अनुकूल प्रतिसाद न मिळाल्याने राष्ट्रीय शेअरबाजार निर्माण करण्यास सरकारने पुढाकार घेतला.
राष्ट्रीय शेअरबाजाराच्या रूपाने देशातील पहिला आधुनिक इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअरबाजार अस्तित्वात आला. त्याचे व्यवहार चक्र सुरवातीला आठवड्याचे मग तीन दिवसाने नंतर दोन दिवसाने ठराविक कालावधीत अस्तीत्वात आले. असा बाजार अस्तीत्वात येताना भविष्यात एक दिवसात सौदापूर्ती आणि शेवटी तात्काळ सौदापूर्ती असे उद्दिष्ट ठेवले होते. हा बाजार अस्तीत्वात आल्यावर मुंबई शेअरबाजाराने धडा घेऊन आवश्यक ते बदल करून चूक दुरुस्ती केली आणि व्यवसायाचे नवनवे मार्ग शोधत राहिला म्हणून तो टिकून आहे अन्य प्रादेशिक बाजार एकामागोमाग एक बंद पडले कोलकाता स्टॉक एक्सचेंज कागदोपत्री अस्तित्वात आहे पण तेथे कोणतेही व्यवहार होत नाहीत. दरम्यान राष्ट्रीय शेअरबाजाराने उलढालीच्या दृष्टीने सध्या प्रथम क्रमांकावर आणि जगात चौथ्या क्रमांकावर झेप घेतली असून डिरिव्हेटिव्ह व्यवहाराच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर गेला. मुंबई शेअरबाजार आणि राष्ट्रीय शेअरबाजार राष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहेत त्यांनीं आता गांधीनगर येथे दिवसभरात 16 ते 22 तास चालू असणारे आंतराष्ट्रीय शेअरबाजारही चालू केले आहेत.
वर म्हटल्याप्रमाणे लवकरच T+0 म्हणजे व्यवहार ज्या दिवशी होईल त्याच दिवशी त्याची सौदापूर्ती होईल आणि भविष्यात तात्काळ सौदापूर्ती होईल या दिशेने बाजार नियामक सेबी काम करीत आहे. त्यांनी यासंबंधीची मार्गदर्शक तत्त्व जाहीर करून जनतेकडून त्यांवरील सूचना 12 जानेवारी 2024 पर्यंत मागवल्या होत्या. याबाबत कोणत्या सूचना आल्या आणि त्यावर काय निर्णय झाला हे अद्याप जमजले नसले सध्या ज्या सुलभतेने आपण यूपीआयचा वापर करून आता कुणालाही तात्काळ पैसे पाठवू शकत आहोत त्याचप्रमाणे शेअर्समधील खरेदी विक्रीचे व्यवहार सहज आणि तात्काळ करू शकू असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
सेबीने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार टप्याटप्याने ही पद्धत अस्तीत्वात येईल, सुरुवातीस-
●पहिल्या टप्यात S&P 500 मध्ये असलेल्या शेअर्ससाठी T+0 ही पद्धत वैकल्पिक स्वरूपात उपलब्ध होईल. सुरुवातीस 200 नंतर 200 आणि मग 100 कंपन्यासाठी ही पद्धत उपलब्ध होईल.
●एकाच शेसर्सचे T+1 आणि T+0 असे दोन्ही सेगमेंटचे भाव स्क्रीनवर वेगवेगळे दिसतील.
●या दिवशी दुपारी 1 वाजून 30 मिनिटांपर्यत केलेले T+0 चे सर्व व्यवहार त्याच दिवशी दुपारी 4 वाजून 30 मिनिटांपर्यत पूर्ण केले जातील.
●दुपारी दीड नंतर केलेले सर्व व्यवहार T+1 या यासाठी सध्या अस्तीत्वात असलेल्या पद्धतीने होतील.
●सौदापूर्तीचा विचार करता या दोन्ही प्रकारच्या पद्धतीसाठी सध्याच्या जोखीम व्यवस्थापन धोरणात कोणताही बदल केला जाणार नाही.
थोडक्यात,
सुरुवातीला काही शेअर्सच्यासाठी T+0 चे व्यवहार मर्यादित काळासाठी असतील.
यानंतरच्या टप्यात,
●दिवसाचे वेगवेगळे विभाग करून दर भागाचे वेगवेगळे सेटलमेंट होईल त्याची रचना सध्याच्या T2T पद्धती प्रमाणे असेल असे प्रस्तावित आहे.
●यासाठी T+1 मधील सेटलमेंट पद्धतीप्रमाणेच फक्त दुसऱ्या दिवसाऐवजी त्या दिवसाच्या विशिष्ट काळाच्या व्यवहारांची सौदापूर्ती होईल.
●त्याचे दिवसाच्या वेगवेगळ्या भागाचे भाव स्वतंत्र दिसतील.
●यासाठी खरेदीची ऑर्डर देण्यापूर्वी पैसे दिलेले असल्याची त्याचप्रमाणे विक्री ऑर्डर देणाऱ्याच्या खात्यातून ऑर्डर देण्यापूर्वीच शेअर्सची डिलिव्हरी घेतली जाईल.
●क्लिअरिंग कॉर्पोरेशनद्वारे त्याची खात्री करून घेतल्यावरच ऑर्डर पुढे जाईल.
●केवळ लिमिट ऑर्डरच घेतल्या जातील.
●क्लायंट कोड बदलांना परवानगी दिली जाणार नाही.
●ऑर्डर मधील बदल अथवा ऑर्डर पूर्णपणे रद्द करणे एक्सचेंजद्वारे क्लिअरिंग कॉर्पोरेशनला कळवून केले जाईल.
●ही पद्धत सुरळीत झाल्यावर आधी चालू केलेली दीड वाजेपर्यंत केलेले व्यवहार त्याच दिवशी पूर्ण करणाऱ्या कंपन्यांची संख्या कमीकमी करून ती पद्धती बंद केली जाईल.
●त्यानंतर दिवसाचे वेगवेगळे भाग करून त्यातील सौद्यांची पूर्तता पुढील तासाभरात केली जाईल.
आलेल्या दोन्ही प्रकारच्या अनुभवातून आवश्यक सुधारणा करीत यानंतरच्या टप्यात सर्व शेअर्ससाठी-
●असा अँप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) उपलब्ध करून दिला जाईल जो खरेदी करणाऱ्यास पैशाच्या बदल्यात शेअर्स अथवा विक्री करणाऱ्यास शेअर्सच्या बदल्यात पैसे, तात्काळ देऊ शकेल.
यामुळे
●रोख बाजारातील तरलता वाढेल, यामुळे सकारात्मक वाढीची शक्यता आहे.
●सध्या अस्तित्वात असलेले नियमित ब्रोकर्स अत्यंत कमी दलालीवर काम करतात, त्यांच्या व्यवसायाचा काही भाग ग्राहकांच्या निधीवरील व्याजातून येतो त्याच्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने त्यांना आपली व्यवसाय नीती ( bissiness model) तपासावी लागेल.
याचबरोबर
●सध्या अस्तित्वात असलेली T+1 ही पद्धती बंद करण्याचा प्रस्ताव नाही त्यामुळे डे ट्रेडर्स त्याचे व्यवहार त्याच दिवशी करू शकतील.
●यातून काही वाद निर्माण झाल्यास लवादामार्फत सोडवता येतील.
या सर्व भानगडीत काही तांत्रिक प्रश्न उद्भवू शकतात जसे –
●खरेदीदारास तात्काळ व्यवहार करायचा असेल आणि विक्रेत्यास तो दुसऱ्या दिवशी चालणार असेल तर असे व्यवहार होऊ शकणार नाहीत.
●ज्यांना डे ट्रेडिंग करायचं आहे ते T+0 किंवा तात्काळ व्यवहाराकडे जाणारच नाहीत कारण त्यामुळे त्यांच्या खर्चात वाढ होईल.
बाजारात एकाच वेळी एका कंपनीच्या शेअर्सचे T+1, T+0 दीड वाजेपर्यंत आणि / किंवा T+0 दिवसातील वेगवेगळ्या भागाचे आणि स्पॉट सेटलमेंटचे असे अनेक वेगवेगळे भाव दिसतील. हे भाव ओळखून त्यातील फरक समजून घेण्यासाठी गुंतवणूकदार अधिक शिक्षित आणि जागृत असणे जरुरीचे आहे. सेबीच्या म्हणण्यानुसार एकाच शेअर्सच्या वेगवेगळ्या व्यवहार प्रकारातील (segment) भावातील फरकामुळे त्या शेअर्सची प्रत्येक प्रकारातील खरीखुरी किंमत निश्चित होण्यास मदतच होईल. भावातील या फरकामुळे निर्माण होणाऱ्या नव्या गुंतवणूक संधी शोधणाऱ्या बाजारातील साधकांना विविध सेगमेंटमधील भावाच्या फरकाचा लाभ घेता येईल.
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत, लेखात व्यक्त केलेली मते ही वैयक्तिक मते आहेत)
भारतामध्ये शेअर बाजार ही संकल्पना युरोपमधून आयात केलेली आहे. इ.स. १८७५ मध्ये याची मुहूर्तमेढ भारताची आर्थिक राजधानी ‘मुंबई’ने रोवली. मुंबई शेअर बाजाराची भव्य इमारत पाहून विश्वास बसणार नाही की, या बाजाराची सुरुवात याच ठिकाणी एका झाडाखाली झाली. जणू एका छोटय़ा रोपाचा हा फोफावलेला वटवृक्ष आहे. झाडाजवळ एक सभागृह बांधण्यात आले. तेथे ‘नेटिव्ह शेअर अॅण्ड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन’ या नावाने ही संस्था नावारूपाला आली. त्यानंतर तब्बल एकशेतीस वर्षांनी मुंबई शेअर बाजाराचे ‘मुंबई शेअर बाजार लिमिटेड’मध्ये रूपांतर झाले. सुरुवातीच्या काळात हे काम फक्त दुपारी बारा ते दोन या वेळात चालत असे. सकाळच्या वेळात खरेदी-विक्रीच्या नोंदी होत असत.
भारत सरकारने १९८९ मध्ये सेबीची स्थापना केली. शेअर बाजाराच्या कार्यपद्धतीवर अंकुश ठेवण्यासाठी १९९२च्या कायद्यान्वये सेबीला अधिकार प्राप्त झाले. भांडवल बाजारात हर्षद मेहतासारखे जे घोटाळे होत होते ते होऊ नयेत म्हणून केंद्रीय अर्थ मंत्रालयाने १९९४ मध्ये राष्ट्रीय शेअर बाजाराच्या कामकाजास प्रारंभ केला. यामुळे मुंबई शेअर बाजाराची मक्तेदारी संपुष्टात आली.
१९९५ पासून संगणक या माध्यमातून बोल्ट (बी. एस. ई. ऑन लाईन ट्रेडिंग) या पद्धतीद्वारे सौदे होण्यास सुरुवात झाली. राष्ट्रीय शेअर बाजारातील सौदे नीट (एन. ई. ए. टी.) या पद्धतीद्वारे करण्यास सुरुवात झाली. ४ जानेवारी १९९९ पासून एन. एस. डी. एल. व १५ जुलै १९९९ पासून सी. डी. एस. एल.मध्ये सर्टिफिकेटच्या स्वरूपातील शेअर्सचे डीमॅटमध्ये रूपांतर होण्यास सुरुवात झाली. पूर्वी समभागांची खरेदी-विक्री झाल्यानंतर सर्टिफिकेट रूपात ताबा मिळायला सुमारे तीन महिने लागत असत. याउलट आजच्या संगणक युगात व्यवहार झाल्यावर तिसऱ्या दिवशी समभागांचा ताबा मिळतो. यामुळे घोटाळे होण्यास पायबंद बसलेला आहे. शेअर बाजाराच्या पारंपरिक कार्यपद्धतीला छेद देऊन आजची नवीन कार्यपद्धती अस्तित्वात आलेली आहे. यामध्ये संगणकाचे स्थान लक्षवेधी आहे. कार्यालयात बसून सौदे होऊ लागले. आता तर जणू काही गुंतवणूकदाराने शेअर बाजाराला घरातील पडद्यावर आणले आहे. तंत्रज्ञानातील या क्रांतीमुळे शेअर बाजारातील उलाढालींचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले.
पूर्वी शेअर्स सर्टिफिकेट रूपात असत; परंतु आता इलेक्ट्रॉनिक रूपात केवळ नोंद केली जाते. त्यामुळे याला आता पेपरलेस ट्रेडिंग म्हटले जाते. या पद्धतीला डीमॅट पद्धती असे म्हणतात. नव्या उद्योगाची उभारणी करताना किंवा जुन्या उद्योगाचा विस्तार करताना मोठय़ा भांडवलाची आवश्यकता असते. हे भांडवल प्रायमरी मार्केटद्वारे उभारले जाते. शेअर बाजार म्हणजे सेकंडरी मार्केट. सेकंडरी मार्केट प्रायमरी मार्केटवर अलंबून असते.
शेअर बाजाराचे कामकाज सकाळी ९.५५ ते दुपारी ३.४५ पर्यंत चालू असते. कार्यालयीन कामकाजाची पूर्वतयारी सामान्यत: सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू होते. सर्वप्रथम बोल्टला पासवर्डच्या सहाय्याने शेअर बाजाराच्या केंद्रस्थानाला जोडून घेतले जाते. शासनाच्या उद्योगधंदेविषयक बदलणाऱ्या धोरणांचा शेअर बाजाराच्या वधघटीवर परिणाम होतो. याशिवाय विशिष्ट कंपनीच्या व्यवस्थापनातील बदल, त्यांचे कंपनीसंबंधीचे विविध निर्णय शेअरच्या भावांवर परिणाम करतात. शेअर बाजाराची दृष्टी नेहमी पुढे गेलेली असते. सतत भविष्याचा वेध घेताना मागे वळून पाहायला कुणालाही फुरसत नसते. समभागांचा हा बाजार अत्यंत संवेदनाक्षम असतो. येथील व्यावसायिकाला चोवीस तास जागे राहावे लागते. नजर चौफेर ठेवावी लागते. राजकारण, उद्योगधंदे यावर त्याचे बारीक लक्ष असते.
निर्देशांक हा शब्द आपण नेहमीच ऐकतो. शेअर बाजारात जास्तीत जास्त उलाढाल करणाऱ्या प्रमुख कंपन्यांवर शेअर बाजाराचा निर्देशांक आधारित असतो. निर्देशांक हे राष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीचे मोजमाप आहे. प्रसारमाध्यमांद्वारे नेहमी शेअर बाजाराचे माहितीपूर्ण चित्र रंगविलेले असते. अशा वेळी व्यक्ती व संस्थांना तज्ज्ञांची मदत घेणे उचित ठरते. या परिस्थितीने शेअर बाजारातील अनेक करिअरना जन्म दिलेला आहे.
अविकसित भारत आता विकसनशील देश आहे. त्यामुळे अनेक विदेशी गुंतवणूकदार विविध भारतीय उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक करण्यात रस घेत आहेत. हे प्रमाण सतत वाढते आहे. आता त्यांना आठ टक्क्यांपासून साठ टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करण्यास मुभा मिळालेली आहे. या अत्याधुनिक उद्योग जगतात उगवती पिढी काम करण्यास अधिक योग्य ठरते. उगवत्या पिढीला ही उत्तम संधी आहे. शेअर बाजाराच्या उद्योगांना उज्ज्वल भवितव्याची खात्री आहे.
आता आपण शेअर बाजारामध्ये येणाऱ्या घटकांची थोडक्यात ओळख करून घेऊया.
१) दलाल : शेअर बाजारात दलाल म्हणून काम करणे हा एक स्वतंत्र व्यवसाय आहे. मुंबई शेअर बाजार लिमिटेडमध्ये दलाल होण्यासाठी किमान बारावी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आहे. त्यासाठी वय एकवीस वर्षे पूर्ण असणे जरुरीचे आहे. राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये दलाल होण्यासाठी किमान पदवीधर असणे ही शैक्षणिक पात्रता आहे.
२) उपदलाल : कोणतीही गुंतवणूक न करता उपदलाल हा व्यवसाय सुरू करता येतो. यासाठी बारावीची परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. यासाठी किमान वय २१ असावे लागते. मुंबई शेअर बाजारात सबब्रोकरशिप न स्वीकारता रेमिशनरी म्हणूनदेखील काम करता येते. त्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता बारावी असून स्वतंत्र व्यावसायिक असण्यास उपदलाल व रेमिशनरी यांना मनाई आहे.
३) पोर्टफोलिओ मॅनेजर : Port- Folio चा अर्थ खाते विभाग आहे. गुंतवणुकीत खूप विभाग असून प्रत्येक विभागाचे उपविभाग आहेत. गुंतवणूक कुठे, कशी, कितपत व केव्हा करावी, असे बरेच प्रश्न गुंतवणूकदारांना भेडसावत असतात. प्रत्येक गुंतवणूकदार हा गुंतवणूक बाजाराचा एक्सपर्ट असतो, असे नाही. त्यामुळे त्याला एक्सपर्टीजची जरुरी असते. पोर्टफोलिओ मॅनेजर होण्यासाठी सेबीकडे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असते. हा स्वतंत्र व्यवसाय असून काही आर्थिक संस्थांमध्ये नोकरीचे पददेखील आहे. यातून मिळणारे कमिशन हे आकर्षक असते. वार्षिक वेतन किमान आठ लाख रुपये असते.
४) गुंतवणूक सल्लागार : इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट होण्यासाठी रजिस्ट्रेशनची आवश्यकता नसते. इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटला करविषयक ज्ञान असल्यास त्याचे काम दर्जेदार होते. थोडक्यात, इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट गुंतवणूकदाराला माहिती पुरविण्याचे काम करतो.
५) अकाऊंटंट : अकाऊंटंटला अकाऊंट्स रिलेटेड सॉफ्टवेअरचे ज्ञान असणे अगत्याचे असते. कॉमर्समधील पदवीधर व सी.ए.ना इथे प्राधान्य असते. अकाऊंटंटला एक लाख ते पाच लाख रुपयांपर्यंत वार्षिक वेतन मिळते.
६) मुख्य कारकून : मुख्य कारकुनाला बाजाराची परिभाषा, बाजाराविषयी ज्ञान, किमान एक वर्षांचा अनुभव असल्यास सोयीचे होते. याला परीक्षा किंवा वयाचे बंधन नसते. अनुभव व बाजाराचे ज्ञान हे महत्त्वाचे आहे. दलालाच्या कामाच्या पसाऱ्याप्रमाणे त्याचे वार्षिक वेतन शहाण्णव हजार ते चार लाख रुपयांपर्यंत असते.
७) फंडामेंटल अॅनालिस्ट : रिसर्च कंपनीत म्युच्युअल फंड कंपनीज, प्रायव्हेट बँकिंग फंड मॅनेजमेंट कंपनीज या सर्व ठिकाणी सिक्युरिटी अॅनालिस्टला काम करण्याची संधी असते. एम.बी.ए. (फायनान्स), एम.बी.ए. (अकाऊंटसी) सी.ए. यांना प्राधान्य असते. शिवाय बी.टी.आय.चा फंडामेंटल अॅनालिसिसचा कोर्स करणे उपयुक्त ठरते.
८) टेक्निकल अॅनालिस्ट : दलाल डे ट्रेडर्स, ऑपरेटर्स, हाय नेटवर्दी इंडिव्हिजवल्स टेक्निकल अॅनालिसिसचा उपयोग करतात. यासाठी पदवीधर असणे पुरेसे आहे. शिवाय बी.टी.आय.चा टेक्निकल अॅनालिस्टचा स्पेशल कोर्स आहे. ९) फंड मॅनेजर : सुरुवातीला तीन वर्षे अनुभव घेण्यासाठी फंड मॅनेजरचा सहाय्यक म्हणून काम करावे लागते. त्यानंतर फंड मॅनेजर म्हणून काम मिळते. एम.बी.ए. (फायनान्स), सी.ए. अर्थतज्ज्ञ यांना प्राधान्य दिले आहे. फंड मॅनेजरला किमान वार्षिक वेतन दहा लाख रुपये असते.
१०) अॅसेट मॅनेजर : एम.बी.ए. (फायनान्स), अर्थतज्ज्ञ, सी.ए., शेअर बाजारातील अनुभवसंपन्न व्यक्ती, शेअर तज्ज्ञ यांची अॅसेट मॅनेजरच्या पदासाठी निवड केली जाते. शिवाय या कामासाठी बी.टी.आय.मधील विविध कोर्स उपयुक्त ठरतात.
११) आर्थिक गुन्हे अन्वेषक : या करिअरसाठी प्राधान्याने सी.ए., आय.एस.ए. यांना संधी असते. आयकर हिशेबाची साधने व तंत्रे माहीत असणाऱ्यास संगणकाच्या जाळ्याविषयी ज्ञान असणाऱ्यांना देखील संधी असते. कायद्याच्या चौकटीच्या आधारे योग्य मार्ग सुचविण्याएवढी क्षमता असणे आवश्यक आहे. नोकरीच्या पदांना वार्षिक वेतन किमान बारा लाख रुपये असते.
शेअर बाजाराच्या प्रशिक्षण देणाऱ्या संस्था :
अ) बी.एस.ई. ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज लि. मुंबई, १८ व १९ वा मजला, पी. जे. टॉवर्स, दलाल पथ, फोर्ट, मुंबई- ४००००१, दूरध्वनी- २२७२१२३३/३४, २२७२११२६/२७. web site:http://www.bseindia.com
ब) नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लि. बांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स बांद्रे (पूर्व), मुंबई- ४०००५१. दूरध्वनी- २६५९८१००, २६५९८२५२/१६ web site:www.nseindia.com
क) इंडियन इन्स्टिय़ूट ऑफ कॅपिटल मार्केट, प्लॉट क्र. ८२, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई- ४००७०५ इंडिया,web site:www.utiicm.com दूरध्वनी- ९१-२२-२७८९२८१५/१६.
ड) सेंटर फॉर फायनान्शियस मॅनेजमेंट बंगलोर, १ ला ए क्रॉस, १७ वा ए मेन, जे. पी. नगर, फेज क्र. २, बंगलोर- ५६००७८.
इ) दी इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट ऑफ इंडिया, खोली क्र. ३, बंजारा हिल, हैदराबाद- ५०००३४.
ई) इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फायनान्स, अशोक विहार, २, दिल्ली- ११००५२, इंडिया.
जगभरातील प्रत्येक माणसाचे आकर्षण व कुणालाही (अगदी तुरळक लोक वगळून) न समजणारे क्षेत्र म्हणजे शेअर बाजार. गुंतवणूकीतून भरपूर पैसा कमावता येतो. खरेदी विक्रीतून सुध्दा प्रचंड कमाई होते, मात्र या आर्थिक साधनाकडे बघण्याचे दृष्टीकोन प्रत्येक व्यक्तीनुरुप बदलतात. काहीजणांचे समज, काहीजणांचे गैरसमज, काहीजणांची भीती, काहीजणांची हाव, काहीजणांचा अतिउतावळेपणा इत्यादी घटकांवर हे शेअर मार्केट हलत असते.
जगभरातील आर्थिक गणिते कोणत्याही क्षणाला बदलायची ताकद ठेऊन असणारे हे क्षेत्र आहे. हे प्रत्येकाला जाणून घेण्याची इच्छा आहेच, त्यातून पैसे सुध्दा मोठ्या प्रमाणात कमावयचे आहेत; काहीजण कमावत सुध्दा आहेत, मात्र हे शिकावे कुठे? शिकवणारे भेटत नाहीत. यावरचा कोणताही कोर्स (प्रशिक्षण अभ्यासक्रम) नाही. स्वतः शिकायचे तर कोणती पुस्तके वाचायची? डिमॅट अकाउंट काय असते? त्याची गरज काय? ते कसे प्राप्त करावे?
कोणत्या दिवशी शेअरबाजार उसळी मारणार? कोणत्या दिवशी शेअर बाजार ढासळणार? उसळीतच पैसे कमावता येतात की ढासळीत सुध्दा पैसे कमावता येताता? रुपया-डॉलर यांच्या पडझडीवर वरती शेअर बाजार कितपत अवलंबून आहे? सोने-चांदीच्या तेजी-मंदीचा शेअर बाजारावर काही परिणाम होतो का? जागतिक मंदी कशाने उद्भवते? म्युचुअल फंड म्हणजे काय? SIP (एसआयपी) म्हणजे काय? त्यात गुंतवणूक कशी करायची? कोणत्या कंपन्यांचे शेअर घ्यायचे? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे शोधायची कुठे? हा प्रश्न सुध्दा अनुत्तरीत राहतो व सगळेच प्रश्न जागच्या जागी तसेच सगळीच माणसे जागच्या जागी राहतात. सुरुवातीलाच बऱ्याच जणांना आलेल्या अपयशयाच्या अनुभवामुळे बाकीचे लोक सुध्दा या क्षेत्राची धास्ती बाळगून असतात. ‘दुधाने तोंड पोळलं की ताक सुध्दा फुंकून पिण्याची सवय’ या माणसाच्या नैसर्गिक स्वभावातून न्यूनगंड व भीती निर्माण होत असतात, त्यामुळे परत त्या गोष्टीच्या वाटेलाच माणूस जात नाही.
शेअर बाजारात गुंतवणूकीला सुरुवात करण्याआधी एक समान गोष्ट सगळ्यांना माहिती असावी आणि शेअर बाजार शिकवणारे बरेच प्रशिक्षक ही गोष्ट प्रत्येकाला सुरवातीला सांगतात. एका गावात दोन माणसे येतात. एक गुरु व दुसरा त्याचा शिष्य. गुरु त्या गावकऱ्यांना सांगतो की, या गावात जेवढी माकडे आहेत, ती माकडे पकडून मला आणून दिली की मी प्रत्येक माकड १०० रुपयांना खरेदी करणार आहे. गावातील लोकांना वाटते चला गावात भरपूर माकडे आहेत. पकडायची आणि गुरुला नेऊन द्यायची. गावातील सगळे लोक माकडे पकडतात व गुरुकडून १०० रुपये प्रतिमाकड अशी रक्कम घेऊन जातात. गुरु ती सगळी माकडे एका मोठ्या पिंजऱ्यात ठेवत असतो. त्यांना खायला घालत असतो. गावातील माकडांची संख्या कमी झाल्यामुळे कमी लोक माकडे पकडतात, मग गुरु माकडांची किंमत वाढवून २०० रुपये प्रतिमाकड अशी करतो. गावातील लोकांचा उत्साह परत वाढीस लागतो. उरलेली जवळजवळ सगळी माकडे पकडली जातात. मग गुरु एके दिवशी दुसऱ्या गावाला निघून जातो. तेव्हा शिष्य गावकऱ्यांना बोलावतो व सांगतो की माकडांची किंमत अजून वाढणार आहे. तेव्हा मी तुम्हाला या पिंजऱ्यातली माकडे ५०० रुपयांना एक याप्रमाणे देतो आणि गुरु गावावरुन परत आल्यावर त्यांना ही माकडे १००० रुपयांना एक याप्रमाणे खरेदी करतील; म्हणजे तुमचा फायदाच फायदा होईल. शिष्य सगळ्या गावकऱ्यांकडून ५०० रुपये प्रतिमाकड अशी रक्कम वसूल करतो व एके रात्री गावातून निघून जातो. गावकरी गावात वाट बघत राहतात. गुरु व शिष्य दोघे परत कधीही दिसले नाहीत. आता माकडे परत गावात मोकळेपणाने फिरतात. गावकरी गावातच आहेत. पैसा गुरु व शिष्य यांना मिळाला आहे व दोघेही गाव सोडून गेले आहेत.
या गोष्टीत शेअर बाजारात प्रवेश हा १०० रुपयांनी होऊ शकतो. त्याचे २०० रुपये, ५०० रुपये सुध्दा होऊ शकतात आणि १००० रुपयांच्या नादात बरेच नुकसान सुध्दा होऊ शकते. म्हणजेच कोणता शेअर कधी खरेदी करावा? तो कधी विकावा? त्यातून बाहेर कधी पडावे? याचा अंदाज आला की माणूस शेअर बाजारात चांगला खेळू शकतो. पैसे कमावू शकतो. हा खेळ चांगल्या रितीने खेळण्यासाठी या खेळाचे नियम चांगल्या पध्दतीने माहिती असल्यास तो जिंकण्याची जास्त शक्यता निर्माण होते. हा खेळ योग्य रितीने खेळण्याचे कानमंत्र या पुस्तकात आहेत.
आपल्याकडे सध्याचे आयकरचे दर मध्यम प्रमाणात आहेत. या करातून अनेक सरकारी खर्च भागावले जातात, शिक्षण, संरक्षण, पायाभूत सुविधांचा विकास केला जातो. त्यातूनच देशाचा आर्थिक विकास होण्यास मदत होते. सरकारच्या उत्पन्नाचे प्रत्यक्ष कर हे महत्वाचे साधन आहे. ज्याने उत्पन्न अत्यल्प आहे त्यांना सरकारची मदत मिळते तर अतिशय श्रीमंत लोक संघटितपणे त्यांच्या अनेक उत्पन्नावरील कर कमी करावेत यासाठी सरकारवर दबाव आणतात.
याउलट मध्यमवर्गीय लोकांच्या उत्पन्नातूनच कर लगेच कापून घेत असल्याने त्यात अधिक सवलती मिळाव्यात अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे सरकारला उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण करून सर्वच घटकांना खुष ठेवावे लागते निदान जे काही आहे ते त्यांच्या फायद्यासाठी आहे असा दिलासा समाजातील प्रत्येक घटकांना द्यावा लागतो. अनेक आयकरदात्याना कराचे दर अधिक वाटतात. बरेचदा त्याची कर भरण्याची जबाबदारी मालकावर असल्याने कामाच्या ठिकाणी करकपात केली जाते.
दरमहा वेतनातून काही कपात न केल्यास शेवटचे तीन चार महिने करदात्यांवर ताण येऊ शकतो त्यामुळेच कच्चा हिशोब करून दरमहा काहीतरी कपात केली जाते. आयकर मापन करण्याच्या जुन्या पद्धतीत विविध गुंतवणूका आणि खर्च यावर सूट मिळते. त्यामुळे निव्वळ उत्पन्नाचा विचार करता द्याव्या लागणाऱ्या आयकराचे प्रमाण अप्रत्यक्षपणे खूप कमी होते. अनेक सवलती रद्द करून काही प्रमाणात करदेयता कमी करणारी नवीन करयोजना सरकारने आणली असली तरी सरकारने आयकरच रद्द करावा अशी मागणी नियमित केली जाते. यात अनेकदा राजकारण असले तरी या मागणीस करदात्यांचे समर्थनही मिळते. आयकर रद्द केला तर विकासाची गती कशी वाढेल याचे अनेक दाखले दिले जातात.
जर खरोखरच आयकर रद्द झाला तर?
समर्थनार्थ पुढे येणारे ठळक मुद्दे-
★ आर्थिक विकासास चालना मिळेल
सध्याच्या पद्धतीत व्यक्ती आणि उद्योजक यांच्यावरील भार अधिक वाढतो. आयकर रद्द केल्यास अधिक खेळाता पैसा बाजारात उपलब्ध होईल त्यातून अधिक गुंतवणूक होईल आणि अधिक खर्चही केला जाईल त्यामुळे अर्थव्यवस्थेस चालना मिळेल. यासाठी युनायटेड अरब अमिरात, सौदी अरेबिया या देशाची उदाहरणे दिली जातात आयकर नसताना तेथील सकल राष्ट्रीय उत्पन्नात, गेल्या दहा वर्षांत जागतिक सरासरीहून 4.2% दराने वाढ झाली आणि तो दर 5% होऊ शकेल. विकासदरात वाढ झाल्यास नवीन नोकऱ्या निर्माण होतात, परदेशी गुंतवणूक वाढते त्यामुळे जनतेचे सर्वसाधारण राहणीमान उंचावते.
★ कररचनेत सुलभता येईल
भारतातील कररचना गुंतागुंतीची आहे. आयकर रद्द केल्याने त्यात सुलभता येईल त्यामुळे करदाते आणि व्यावसायिक यांना कर नियमांचे पालन करणे सुलभ होईल. त्याचप्रमाणे कर गोळा करण्यासाठी जो प्रशासकीय खर्च होतो तो कमी होईल. कर सल्लागाराची महागडी फी द्यावी लागणार नाही त्याचप्रमाणे हिशोबांचे लेखा परीक्षण सहसा आवश्यक नसल्याने परीक्षकांची गरज कमी होईल.
★ करचोरीस आणि काळ्या पैशास आळा बसेल
आयकर रद्द केल्याने व्यक्ती आणि व्यवसायांना करचुकवेगिरी करण्यात किंवा त्यांचे उत्पन्न लपविण्याची गरजच पडणार नाही. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था विस्तारू शकते. अधिक पारदर्शक आणि जबाबदार आर्थिक शक्ती म्हणून पुढे येऊ शकते. पारदर्शक आणि आंतरराष्ट्रीय कर मानकांचे पालन करणारा देश म्हणून भारताची जागतिक पत देखील सुधारू शकते. जे विश्वासार्ह आणि अनुपालित वातावरण शोधत असलेल्या परदेशी गुंतवणूकदारांना आणि व्यवसायांना आकर्षित करू शकते
★ परकीय गुंतवणूकीत वाढ होईल
भारताने प्राप्तिकर रद्द केल्यास विदेशी गुंतवणूकदार आणि उद्योजक यांच्यासाठी एक सशक्त आकर्षक पर्याय उपलब्ध झाल्याने जागतिक बाजारात स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊ शकते. आयकर रद्द केल्याचे असे अनेक फायदे असताना सरकार तो रद्द करीत नाही कारण-
★ महसुलात तूट
आयकर हा सरकारच्या उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत आहे. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि संरक्षण क्षेत्राच्या गरजा यातून भागवल्या जातात. त्यामुळे त्यास व्यवहार्य पर्याय उपलब्ध होयला हवा, नाहीतर यामुळे येणारी तूट भरून काढण्यास अधिक कर्ज घ्यावे लागेल त्यामुळे अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता वाटते.
★ पर्यायी करांची निर्मिती
महसूल वाढवण्यासाठी विविध अन्य करपर्याय शोधावे लागतील. जसे की वस्तू आणि सेवाकर, संपत्तिकर, कंपनीकर यात वाढ करावी लागेल. व्यवहार कर आणावा लागेल या वाढीचे स्वतःचे वेगळे आर्थिक आणि सामाजिक परिणाम होऊ शकतात.
★ आंतरराष्ट्रीय परिणाम
व्यवहारकरासारख्या करात वाढ करताना त्याचे आंतरराष्ट्रीय करार , जबाबदाऱ्या, परकीय गुंतवणूक आणि व्यापार यावर होणारे संभाव्य परिमाण तपासून पाहावे लागतील.
★ संपत्तीच्या असमान वितरणात वाढ होण्याची शक्यता
सध्याच्या व्यवस्थेने संपत्तीचे असमान वितरण होत आहे आयकर रद्द केल्यास त्याचा अधिक फायदा श्रीमंतांना होईल त्यामुळे विषमता अधिक वाढेल. अप्रत्यक्ष करवाढीचा थेट परिणाम कमी उत्पन्न असलेल्या लोकांवर अधिक होतो त्यामुळे अशी करप्रणाली विकसित करावी लागेल जी कमी उत्पन्न असलेल्या लोकांचे अप्रत्यक्ष कर समायोजित करू शकेल आणि त्यांच्यावरील कराचे ओझे हे संपत्ती वाढीच्या प्रमाणात किंचित वाढेल. त्यामुळे संपत्तीचे असमान ऐवजी पुनर्वितरण होऊ शकेल. या दिशेने जाणारा एकही मार्ग समोर नाही.
आयकर रद्द करण्याची मागणी करणारे सर्व युक्तिवाद हे व्यवहारकराची आकारणी करण्याची मागणी करीत आहेत किंबहुना त्यांची सर्व मदार या करावर आहे. व्यवहार करांमध्ये सामान्यत: विशिष्ट आर्थिक व्यवहारांवर कर आकारणे समाविष्ट असते, जसे की स्टॉक ट्रेड, मालमत्ता विक्री किंवा बँकिंग व्यवहार.
व्यवहार करांच्या बाजूने केले जाणारे युक्तिवाद:
★ साधेपणा: व्यवहार कर हे आयकराच्या तुलनेत सोपे मानले जाते व्यवस्थापन आणि गोळा करण्याची पद्धत सोपी आहे.
★ आर्थिक वाढ: याबाबत असा युक्तिवाद आहे की व्यवहार कर व्यक्ती आणि व्यवसायांवरील आयकराचा भार कमी करून त्यास चालना देऊ शकतात. कमी आयकर दर किंवा त्याचे निर्मूलन यामुळे संभाव्यपणे गुंतवणूक आणि वापर याला प्रोत्साहन मिळू शकते.
★ कमी करचोरी: व्यवहार कर चुकवणे अधिक आव्हानात्मक असू शकते कारण ते विशिष्ट व्यवहारांशी जोडलेले असतात आणि व्यवहाराच्या ठिकाणी गोळा केले जाऊ शकतात.
निष्कर्ष
● भारतात आयकर रद्द करणे हा एक धाडसी प्रस्ताव आहे ज्याचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. ● आर्थिक विकासाला चालना देण्याची, करप्रणाली सुलभ करणे, करचोरी टाळणे, कर कमी करण्याचे आश्वासन देताना संभाव्य महसुलाची हानी आणि वाढत्या संपत्ती असमानतेची चिंता त्यामुळे अशा बदलाच्या व्यवहार्यतेचे मूल्यमापन करण्यासाठी, धोरणकर्त्यांनी व्यापक संशोधन, तज्ञांशी सल्लामसलत करणे आणि त्याचे परिणाम याचा विचार करणे आवश्यक आहे. ● आयकर रद्द करण्याचा प्रस्ताव देशाच्या भविष्यासाठी व्यवहार्य आणि फायदेशीर प्रस्ताव आहे की नाही हे ठरवण्यासाठी आर्थिक वाढ आणि निष्पक्षता बाळगून यातील संभाव्य उणीवांकडे लक्ष देणारा संतुलित दृष्टीकोन बाळगणे महत्वाचे आहे.
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे पदाधिकारी असून महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार आहेत, लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत)