भारतात अनेक उद्योगपती आहेत, ज्यांनी आपल्या मेहनतीने एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. काहींच्या हातात वारसा संपत्ती नसली तरी, त्यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव कमावले आहे. अशाच एका यशस्वी उद्योगपतीची गोष्ट आज आम्ही सांगणार आहोत, जो मुंबईतील घाटकोपरच्या झोपडपट्टीत राहत होता आणि छोट्या-छोट्या नोकऱ्या करीत जीवनाची गाडी पुढे नेत होता. आज तो दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीयांमध्ये गणला जातो आणि त्यांचा व्यवसाय केवळ दुबईतच नाही, तर इतर अनेक देशांमध्येही पसरलेला आहे.
सुरुवातीचे दिवस आणि संघर्ष
रिझवान साजन यांचा जन्म मुंबईच्या घाटकोपरमधील एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यांचं कुटुंब झोपडपट्टीत राहायचे. आर्थिक अडचणींमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं फार कठीण होत होतं. त्यामुळे, साजन यांनी लहानपणापासूनच कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार लावण्याचं ठरवलं होतं. त्यांनी शाळेतील पुस्तकं विकणं, सणासुदीच्या वस्तू विकणं, घरोघरी जाऊन दूध विकणं अशी छोटी छोटी कामं लहानपणीच करण्यास सुरुवात केली.
वयाच्या अवघा १६व्या वर्षीच रिझवान साजन एक मोठा धक्का बसला,त्यांच्या वडिलांचं अचानक निधन झालं. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण आर्थिक जबाबदारी साजन यांच्यावर आली आणि याचा परिणाम म्हणून त्यांना शिक्षण मधूनच सोडावं लागलं. काही काळ त्यांनी एक छोटा व्यवसाय सुरू केला, ज्यात ते फाईल बॉक्सेस बनवायचे. सुरुवातीला या व्यवसायात थोडंफार यश मिळाले, पण पुरेसं नव्हतं.
कुवेतमध्ये मिळाली सुवर्णसंधी
रिझवान साजन यांचे काका तेव्हा कुवैतमध्ये नोकरी करत होते, कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी साजन यांनी आपल्या काकांकडे कुवेतमध्ये नोकरीसाठी विचारणा केली. त्यांच्या काकांनी त्यांना एका बांधकाम साहित्याच्या दुकानात नोकरी मिळवून दिली. ही संधी साजन यांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण वळण ठरली. त्यांनी या नोकरीत एक विक्रेता म्हणून काम सुरू केलं, आणि त्यांच्या मेहनतीने त्यांना त्या ठिकाणी लवकरच व्यवस्थापकाची पदवी मिळाली.
१९९० साली पुन्हा त्यांच्या जीवनाला एक जोरदार धक्का मिळाला . कुवेतमध्ये भीषण आखाती युद्ध सुरू झालं आणि त्यांना कुवेत सोडावं लागलं आणि पुन्हा भारतात परतावं लागलं. परत आल्यावर त्यांनी काही नोकऱ्या करून पहिल्या, पण यश मिळवण्यासाठी त्यांच्या मनात काहीतरी मोठं करण्याची इच्छा होती. काही काळ भारतात राहिल्यानंतर त्यांनी दुबईला जाण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांना दुबईत बांधकाम उद्योगात मोठी संधी दिसत होती.
दुबईत ‘डॅन्यूब ग्रुप’ची स्थापना
१९९३ मध्ये दुबईला गेल्यावर रिझवान साजन यांनी ‘डॅन्यूब’ नावाची ट्रेडिंग फर्म सुरू केली. हि कंपनी कुवेतमधून बांधकाम साहित्य खरेदी करायची आणि दुबईमध्ये त्याची विक्री करायची. दुबईमध्ये बांधकाम उद्योगाची प्रचंड वाढ होत होती, आणि त्यामुळे त्यांच्या व्यवसायाला जोरदार प्रतिसाद मिळाला. साजन यांच्या सर्जनशील स्वभावामुळे आणि मेहनतीमुळे ‘डॅन्यूब’ ने अवघ्या काही वर्षांतच मोठं यश मिळवलं.
१९९९ पर्यंत ‘डॅन्यूब’ चा वार्षिक महसूल १६ कोटी रुपये झाला होता, आणि ते १ कोटी रुपयांचा नफा मिळवत होते. पण साजन इथेच थांबले नाहीत. त्यांनी बांधकाम साहित्याबरोबरच गृहसजावट, सॅनिटरीवेअर, इलेक्ट्रिकल उपकरणे यांसारख्या विविध क्षेत्रांत विस्तार केला.
रिअल इस्टेटमध्ये पाऊल
२००८ मध्ये जागतिक आर्थिक संकट आलं , पण साजन यांच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही उलट त्यांनी आपला व्यवसाय वाढवण्याचं ठरवलं आणि २०१४ मध्ये ‘डॅन्यूब प्रॉपर्टीज’ नावाची रिअल इस्टेट कंपनी लाँच केली. त्यांचा उद्देश मध्यमवर्गीयांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचा होता. ‘डॅन्यूब प्रॉपर्टीज’ ने बाजारात एक क्रांतिकारी योजना आणली — “1% मासिक पेमेंट योजना” या योजनेत खरेदीदारांना घर खरेदीसाठी फक्त 1% रक्कम दरमहा भरण्याची मुभा होती आणि त्यांना घरमालकीचा हक्क मिळत होता.
या योजनेने घर खरेदीदारांसाठी घरमालकीचा मार्ग सोपा केला आणि अल्पावधीतच ‘डॅन्यूब प्रॉपर्टीजचं नाव बाजारात लोकप्रिय झालं. या योजनेमुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळाले आणि २०१६ पर्यंत ‘डॅन्यूब’चा वार्षिक महसूल ९००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. साजन यांनी रिअल इस्टेटमध्ये आपले स्थान मजबुत केलं आणि आज ‘डॅन्यूब ग्रुप’ १६,७०९ कोटी रुपयांचा वार्षिक महसूल मिळवणारी कंपनी आहे. रिझवान साजन यांनी आपल्या अपार मेहनत आणि हुशारीच्या जोरावर ‘डॅन्यूब’ला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं आणि त्यांची उपस्थिती जगभरातील ३० पेक्षा जास्त देशांत आहे.
रिझवान साजन यांची कहाणी ही एका सामान्य माणसाच्या असामान्य संघर्षाची आणि यशाची कहाणी आहे.
मुंबईच्या झोपडपट्टीतून सुरु झालेला हा प्रवास दुबईतील यशाच्या शिखरापर्यंत पोहोचला. त्यांनी कठीण परिस्थितीतही हार न मानता स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं. त्यांच्या जिद्दीने, मेहनतीने बुद्धिमत्तेमुळे ते आज जागतिक स्तरावर यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातात .
मित्रांनो, दानशूर कर्ण आजही जगभरातील सर्वात महान परोपकारी म्हणून ओळखला जातो. असे म्हणतात की सकाळच्या आंघोळीनंतर कर्णाकडे जे काही मागितले जायचे, तो ते आनंदाने देत असे. त्याच्या या उदार स्वभावामुळे तो इतिहासात अजरामर झाला आहे. मात्र, आजही काही व्यक्ती अशा आहेत ज्या दानधर्म करताना कधीही मागेपुढे पाहत नाहीत. असाच एक दूरदर्शी भारतीय उद्योगपती, ज्यांचा प्रवास सामान्य परिस्थितीतून सुरू होऊन उत्तुंग यशापर्यंत पोहोचण्यापर्यंतचा आहे. ते केवळ कमवलेल्या संपत्तीमुळेच ओळखले जात नाहीत, तर समाजसेवा आणि मानवतेच्या बांधिलकीमुळेही त्यांची ख्याती आहे.
आम्ही बोलत आहोत श्रीराम फायनान्स ग्रुपचे संस्थापक आर. त्यागराजन यांच्याबद्दल. आपल्या जीवनाबद्दल अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या आर. त्यागराजन यांची ही कथा यासाठी विशेष आहे की, जगातील अनेक मोठे उद्योगपती आपल्या संपत्तीच्या जोरावर अब्जावधींचे इमले बांधत असताना, त्यागराजन यांनी जवळपास ६ हजार कोटींची संपत्ती आपल्या कर्मचाऱ्यांना दान करून जगाला एक नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या जीवनप्रवासावर एक नजर फिरवूया.
कोण आहेत आर. त्यागराजन?
त्यागराजन यांचा जन्म २५ ऑगस्ट १९३७ मध्ये चेन्नईमधील (तत्कालीन मद्रास) एका समृद्ध शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी कोलकत्ता येथून भारतीय सांख्यिकी संस्थेतून गणितात पदव्युत्तर पदवी आणि गणितीय सांख्यिकीमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. 1961 साली त्यांनी न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड या सामान्य विमा कंपनीत प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. आयुष्याची जवळ जवळ वीस वर्षं त्यांनी वेगवेगळ्या संस्थामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले.
1974 मध्ये,वयाच्या ३७ व्या वर्षी त्यांनी आपल्या काही मित्रांसह सुरुवातीला श्रीराम चिट्स या व्यावसायिक वित्तपुरवठा व्यवसायाची स्थापना केली, पण नंतर त्यांनी कर्ज आणि विम्याच्या दिशेने प्रवास सुरु केला. त्यागराजन यांनी कधीच धाडस आणि नवकल्पना यांची साथ सोडली नाही. त्यांच्या नेतृत्वाखालील श्रीराम ग्रुपने आर्थिक सेवा क्षेत्रात नवीन संधी ओळखून गुंतवणुकीचे नवीन मार्ग शोधले. यामुळे कंपनीच्या व्यवसायात सातत्याने वृद्धी होत राहिली. श्रीराम समूहात आजच्या घडीला 30 हून अधिक कंपन्या आहेत. त्यातील काहींनी शेअर बाजारात मोठा पल्ला गाठला. आजमितीला श्रीराम फायनान्स लिमिटेडचे बाजारातील भांडवल 8.5 अब्ज डॉलर आहे.
खराब क्रेडीट स्कोर असलेल्यांना दिले कर्ज
मुख्यतः बॅंका अशा लोकांना कर्ज देण्यास मनाई करतात ज्यांचा क्रेडिट इतिहास खराब असतो किंवा नियमित उत्पन्न नसतं. पण त्यागराजन यांनी कुठलाही CIBIL (Credit Information Bureau India Limited) चेक न करता या विशिष्ट लोकांना कर्ज प्रदान केलं, एका मुलाखतीत जेव्हा त्यांना त्यांच्या या धोरणावर प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी एक महत्वपूर्ण दृष्टिकोन व्यक्त केला. त्यांनी स्पष्ट केले की, खराब क्रेडिट इतिहास किंवा नियमित उत्पन्न नसलेल्या व्यक्तींना कर्ज देणे जितके धोक्याचे मानले जाते, तितके ते धोकादायक नाही. या मुद्द्याचा सखोल अभ्यास करून त्यांनी फायनान्स क्षेत्रात प्रवेश केला आणि अशा लोकांना कर्ज देणे सामान्य बाब आहे, असं त्यांनी सिद्ध करून दाखवलं.
त्यांच्या करिअरची सुरुवात एका सामान्य कर्मचाऱ्याच्या भूमिकेत झाली होती आणि फायनान्स क्षेत्रात त्यांच्या दीर्घकालीन अनुभवाने आणि शिक्षणाने त्यांना कर्ज देण्याच्या धोरणावर एक नवा दृष्टिकोन त्यांनी फायनान्स क्षेत्राला प्रदान केला, ज्यामुळे नंतर या व्यवसायातील धोरण अधिक सुसंगत व प्रभावी बनण्यास मदत झाली. त्यांचे नेतृत्व हे कर्मचार्यांसाठी प्रेरणादायी होते. त्यांनी आपल्या टीमला सदैव प्रोत्साहन दिले. ‘सामान्य माणूस असामान्य गोष्टी करू शकतो’ हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये ६ हजार कोटी रुपये केले दान
त्यागराजन यांनी आपली संपूर्ण संपत्ती कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये समान प्रमाणात वाटून दिली आहे. ६२१० कोटी रुपयांची एकूण संपत्ती कर्मचाऱ्यांमध्ये वाटून देत, त्यांनी फक्त स्वतःजवळ ५ हजार डॉलर्स, घर आणि कार ठेवली होती. त्यांच्या या निर्णयामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये अत्यंत आनंद आणि प्रेरणा निर्माण झाली.
आर त्यागराजन यांना २०१३ मध्ये भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मभूषण प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या कामामुळे, भारतातील गरिबांना ट्रॅक्टर आणि इतर वाहने खरेदी करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणारे श्रीराम फायनान्स एक प्रमुख नाव बनले आहे.
व्यक्तिगत जीवन
हजारो कोटींची संपत्ती असलेले आर. त्यागराजन हे अत्यंत साधे जीवन जगतात. ते स्वतःकडे मोबाईल फोन ही ठेवत नाहीत, कारण त्यांना लोकांशी प्रत्यक्ष कनेक्ट राहायला आवडते. मोबाईल हा अनावश्यक वेळ खातो असं ते म्हणत असतात. “या उद्योजकाचा साधेपणा आणि जमिनीशी असलेली नाळ त्यांच्याशी संवाद साधताच लक्षात येते. त्यांनी आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कंपनीच्या व्यवस्थापन किंवा नेतृत्वाच्या पदावर स्थान दिले नाही. त्यांचा मोठा मुलगा टी. शिवरामन हा एक यशस्वी इंजिनिअर आहे, तर धाकटा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट असून, श्रीराम ग्रुपमध्ये एक सामान्य कर्मचारी म्हणून काम करतो. कुटुंबाचा व्यवसायात हस्तक्षेप नको म्हणून त्यांनी आपली मुल्ये ठामपणे पाळली आहेत.
आर. त्यागराजन हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात जी विनम्रता आणि साधेपणा आहे, ती आपल्या सर्वांसाठी एक आदर्श आहे.
तुम्ही प्रवासासाठी गाडी शोधत असता, पण गाड्यांची उपलब्धता कमी असते आणि तुम्हाला घाई सुद्धा असते,अशा वेळेला तुम्ही काय करता? तर तेव्हा तुम्ही मोबाईलवर ओला किंवा उबर सारख्या ट्रान्सपोर्ट कंपन्यांच्या ऍप्सचा उपयोग करून सहज गाडी बुक करता. पण तुम्ही कधी विचार केलाय का की हे एवढं आरामदायी समाधान कुणाच्या कल्पकतेमुळे शक्य झालं? आज आपण त्याच व्यक्तीचा प्रवास पाहणार आहोत, ज्यांनी ओला या कंपनीची स्थापना करून भारतीय कॅब ट्रान्सपोर्ट क्षेत्रात क्रांती घडवली आणि ज्यांना भारताचा इलोन मस्क म्हटलं गेलं. त्या व्यक्तीचे नाव म्हणजे ओला कंपनीचे संस्थापक ‘भाविश अग्रवाल’. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, त्यांनी अनेक अडचणींवर मात करून, सातत्य, कल्पकता आणि मेहनतीच्या जोरावर मिळवलेल्या यशावर एक नजर टाकूया.
प्रारंभिक जीवन, शिक्षण आणि नोकरी
भाविश अग्रवाल यांचा जन्म 28 ऑगस्ट 1985 रोजी पंजाबमधील लुधियाना येथे झाला. बालपणापासूनच ते अतिशय बुद्धिमान आणि मेहनती होते. त्यांचे आई वडील हे दोघेही पेशाने डॉक्टर आहेत. वडील हे ऑर्थोपेडिक सर्जन तर आई ह्या पॅथोलॉजिस्ट आहेत. आयआयटी मुंबई येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी. टेक. पूर्ण केल्यानंतर भाविश यांनी 2007 मध्ये मायक्रोसॉफ्ट रिसर्च इंडिया येथे रिसर्च इंटर्न म्हणून आपल्या कॉर्पोरेट प्रवासाची सुरुवात केली. येथे त्यांनी टेक्नॉलॉजीवर आधारित विविध प्रकल्पांमध्ये काम केले.
मायक्रोसॉफ्ट रिसर्चमध्ये ते विविध टेक्नॉलॉजीवर संशोधन करत होते आणि या शोधाच्या प्रक्रियेतच त्यांना दोन पेटंट्स मिळाले, परंतु 9 ते 5 च्या सुरक्षित नोकरीत त्यांना समाधान मिळत नव्हतं. त्यांच्या मनात स्वतःच्या व्यवसायाची तळमळ निर्माण झाली होती. उद्योजक होण्याची त्यांची तीव्र इच्छा होती, पण सुरक्षित नोकरीमुळे ते अडकले होते.
त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे 2008 मध्ये मायक्रोसॉफ्टने त्यांना सहाय्यक संशोधक म्हणून नियुक्त केले. दोन वर्षांहून अधिक काळ मायक्रोसॉफ्टमध्ये काम करताना भाविशला एक उद्योजक म्हणून काहीतरी नवीन करण्याची ओढ लागली होती.
मनात कसा आला ‘ओला’ सुरु करण्याचा विचार?
भाविश अग्रवाल सांगतात की ओला (Ola) ची सुरुवात त्यांच्या एका प्रवासाच्या वैयक्तिक वाईट अनुभवातून झाली. एकदा त्यांनी बेंगळुरूहून बंदीपूरला जाण्यासाठी एक कार बुक केली होती. मात्र, त्या प्रवासाचा अनुभव खूपच निराशाजनक होता. प्रवासाच्या दरम्यान अर्ध्या रस्त्यातच ड्रायव्हरने अतिरिक्त पैसे मागायला सुरुवात केली, शिवाय त्याचं वागणं आणि बोलणं अत्यंत उद्धट होतं. या गैरवर्तणुकीमुळे त्रासून भाविश यांना रस्त्यातच गाडी सोडावी लागली आणि उर्वरित प्रवास बसने करावा लागला.
बसमधून प्रवास करताना भाविश यांच्या मनात वारंवार विचार येत होता की, अशा वाईट सेवेमुळे प्रवाशांचे किती हाल होत असतील. त्यांना जाणवलं की त्यांच्या सारखे अनेक लोक असतील, ज्यांना दर्जेदार कॅब सेवा मिळत नाहीये. आणि त्याच वेळी त्यांच्या मनात एक कल्पना आली की, एक आपण अशी सेवा सुरू करावी जी लोकांना गुणवत्तापूर्ण, विश्वासार्ह आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा देईल.
ओलाची सुरुवात आणि सुरुवातीचा संघर्ष
कल्पकता आणि कौशल्य यांचा व्यवस्थित समन्वय साधला, तर नवनिर्मितीचा चमत्कार घडतोच! भाविश अग्रवाल यांनी हेच सिद्ध करून दाखवलं आहे. त्यांनी आपल्या दूरदृष्टी आणि धडपडीच्या जोरावर ओला कॅब्सची कल्पना प्रत्यक्षात आणली. व्यवसायात येणाऱ्या अडथळ्यांना त्यांनी संधीमध्ये बदललं आणि आपल्या जिद्दीने एक नवीन यशस्वी प्रवासाला सुरुवात केली.
कॅब सेवा क्षेत्रातील सर्व कमतरता समजून घेतल्यानंतर, भाविश यांनी उत्तम ग्राहकांना उत्तम अनुभव आणि परवडणाऱ्या किमतींसह एक कॅब एग्रीगेटर कंपनी सुरू करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी जोधपूरमधील आणखी एक आयआयटीयन मित्र अंकित भाटी यांना सोबत घेतले. 3 डिसेंबर 2010 रोजी मुंबईत त्यांनी एकत्रितपणे ‘ओलाट्रिप्स डॉट कॉम’ वेबसाइट लॉन्च केली, ज्यामध्ये ग्राहक बाह्य प्रवासासाठी कार बुक करू शकत होते.
सुरुवातीला, भाविश आणि अंकित यांच्याकडे या कल्पनेत गुंतवणूक करण्यासाठी फारशी आर्थिक क्षमता नव्हती आणि कोणत्याही गुंतवणूकदाराकडून आधारही मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी आपल्या बचतीमधूनच ऑनलाइन ऍप्लिकेशन विकसित करण्यास सुरुवात केली. जून 2012 मध्ये, Olacabs ने एक मोबाईल ॲप लाँच केले. ओला ऍप लाँच झाल्यानंतर त्यांना ‘टायगर ग्लोबल मॅनेजमेंट’ कडून 5 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक मिळाली, तसेच अनुपम मित्तल आणि स्नॅपडीलचे कुणाल बहल यांच्याकडूनही निधी उभारला. सुरुवातीच्या वर्षांत, कॅब बुकिंग फर्मचे वापरकर्ते फोन कॉलद्वारे कॅब बुक करत होते. नंतर ॲप आल्यानंतर त्याचा वापर वाढण्यास सुरुवात झाली.
पण प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता, भाविश अग्रवाल यांना भारतीय बाजारपेठेत ओला सादर करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एकदा नाही, तर प्रत्येक वेळी जेव्हा त्यांनी काहीतरी नवीन आणले किंवा नवीन बाजारपेठेकडे पाऊल टाकले, तेव्हा त्यांना संघर्ष करावा लागला.
प्रारंभीच्या काळात, रेडिओ ट्रॅफिक सर्व्हिसेस आणि फास्टट्रॅकसारख्या स्थानिक मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करणे ओलासाठी अवघड होते, परंतु यामुळे भाविश थांबले नाहीत. या अडचणींनी त्यांना वेगळ्या पद्धतीने विचार करण्यास आणि अनोख्या, पण समस्येचे निराकरण करणाऱ्या उपायांकडे पाहण्यास प्रवृत्त केले. याच वेळी ओलाने ऑल इंडिया परमिट असलेल्या ड्रायव्हर्सना कामावर घेण्यास सुरुवात केली आणि इंटरसिटी प्रवास सुविधा सुरू केली.
ओलाचा यशस्वी प्रवास
भाविश अग्रवाल यांच्या नेतृत्वात ओला आज भारतातील एक अग्रगण्य स्टार्टअप म्हणून उभी राहिली आहे. त्यांनी स्वतः नवीन कार विकत न घेता ड्रायव्हर्सना जोडण्यावर भर दिला, ज्यामुळे अनेक ड्रायव्हर्सना रोजगार मिळाला. त्यांनी ओला सेवेला एका अॅपद्वारे इंटरनेटशी जोडले, ज्यामुळे लोकांना राईड बुकिंगची सुविधा मिळाली. भाविश यांनी काही प्रसंगी स्वतः ओला ड्रायव्हर बनूनही सेवा दिली आहे.
ओला कॅब सर्व्हिसची खासियत म्हणजे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर. हे अॅप लोकांना त्यांच्या राईडसाठी सर्व आवश्यक माहिती देते, ज्यात रेटिंग्स, रिव्ह्यूज आणि क्वालिटी चेकिंगसाठी सुविधा आहेत. यामुळे ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवरूनच सर्व काही नियंत्रित करता येते.
भाविश यांची दूरदृष्टी आणि सेवा गुणवत्ता यामुळे ओलाचा व्यवसाय झपाट्याने वाढला. त्यांनी कमी दरात उत्कृष्ट सेवा देण्याचा विचार केला आणि 2013-14 मध्ये ओलाचा टर्नओव्हर सुमारे 418.25 कोटी रुपयांचा होता. आज, 75 हून अधिक शहरांमध्ये 1.75 लाखांपेक्षा अधिक लोक रोज ओला वापरतात. भाविश यांच्याकडे ओलामध्ये 6.7% हिस्सेदारी आहे, ज्यामुळे त्यांची नेट वर्थ महत्त्वाची ठरते. ओलाचे सध्याचे मूल्यांकन $4.8 बिलियन डॉलर्सपेक्षा (40000 कोटी रुपये) जास्त आहे, जे तिच्या यशाची साक्ष देते.
2017 मध्ये, भाविश यांनी ओला इलेक्ट्रिकची स्थापना केली, जी इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि बाईक्स तयार करते. या व्यवसायाची वाढही लक्षणीय आहे.
ऑक्टोबर 2023 मध्ये, ओला इलेक्ट्रिकने टेमासेक आणि भारतीय स्टेट बँकेकडून 3,200 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवली. यामुळे त्यांच्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील विस्ताराला गती मिळाली. भाविश अग्रवाल यांनी दोन कंपन्या उभारल्या, ज्यांचे मूल्यांकन 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे आणि यामुळे त्यांच्या दूरदृष्टीची आणि नेतृत्वाच्या कौशल्याची झलक दिसते.
भारतातील पहिले स्वदेशी AI-प्लॅटफॉर्म ‘कृत्रिम’ केलं लॉन्च
भाविश अग्रवाल यांनी 15 डिसेंबर 2023 रोजी भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) प्लॅटफॉर्म ‘कृत्रिम’ लाँच केले. हे प्लॅटफॉर्म सुमारे 22 भारतीय भाषा समजू शकते आणि सध्या ओपन एआयच्या चॅट जीपीटी तसेच गुगलच्या जेमिनीशी स्पर्धा करत आहे .
लाँचिंग कार्यक्रमादरम्यान, अग्रवाल यांनी AI चॅटबॉटचे प्रात्यक्षिक दाखवले, जो चॅट जीपीटी आणि जेमिनीसारखचं प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम आहे. हा चॅटबॉट कवितांपासून कथांपर्यंत विविध प्रकारची सामग्री तयार करू शकतो. ‘कृत्रिम’ हे प्लॅटफॉर्म 22 भारतीय भाषा समजू शकते आणि 10 भाषांमध्ये मजकूर तयार करण्याची क्षमता ठेवते. कंपनीच्या मते, हे भारताचे पहिले पूर्ण-स्टॅक AI आहे, जे स्थानिक भारतीय ज्ञान, भाषा आणि डेटावर आधारित आहे. अग्रवाल यांनी हे साधन सर्वांसाठी उपयुक्त असल्याचे म्हटले आहे.
मानसन्मान आणि पुरस्कार
भाविश हे भारतातील सर्वात तरुण आणि श्रीमंत उद्योजकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. कठोर कॉर्पोरेट जीवनशैलीच्या पलीकडे, त्यांना सायकलिंग, स्क्वॅश खेळणे, आणि फोटोग्राफीची आवड आहे. ते एक लोकप्रिय फोटोब्लॉग देखील चालवतात, जिथे ते त्यांच्या छायाचित्रांद्वारे स्वतःचे विचार मांडतात.
2013 मध्ये भाविश आणि Ola ला दक्षिण आशियाच्या mBillionth पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, हा पुरुस्कार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उत्कृष्टता दर्शवणाऱ्या स्टार्टअप्सना दिला जातो, त्याच वर्षी, Internet and Mobile Association of India (IAMAI) द्वारे Ola ला वर्षातील सर्वोत्कृष्ट स्टार्टअप म्हणून गौरवण्यात आले. 2017 मध्ये, द इकॉनॉमिक टाइम्सने भाविश अग्रवाल यांना त्यांच्या नेतृत्वाच्या कौशल्यासाठी ET सर्वोत्कृष्ट आणि तेजस्वी पुरस्काराने सन्मानित केले.
या व्यतिरिक्त भाविश उत्तम गुंतवणूकदार, व्याख्याते आणि उत्तम छायाचित्रकार सुद्धा आहेत. ते नवीन उद्योजकांना नेहमीच प्रोत्साहन देत असतात. त्यांनी बऱ्याच नवीन स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. ज्यात ओव्हा, कार्किनोस ऑफ बिझनेस, सुपरसूट, टॉर्क मोटर्स, हॅशलर्न अशी काही उदाहरणं देता येतील. उद्योगात आणि समाजसेवेतील त्यांच्या यशाव्यतिरिक्त, भाविश एक वक्ते आणि लेखक म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी अनेक मंचांवर आपल्या विचारांचे आदानप्रदान केले आहे आणि उद्योजकतेबद्दल अगणित लेख लिहिले आहेत.
आज, भाविश आपल्या नवीन उपक्रमाच्या दिशेने लक्ष केंद्रित करत आहेत. आपल्या साहसी मनासह, त्यांनी अक्षय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. हवामान बदल आणि वाढत्या ऊर्जेच्या गरजा या जगासमोरील सर्वांत महत्त्वाच्या आव्हानांपैकी आहेत आणि भाविश या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय विकसित करण्याबद्दल वचनबद्ध आहेत. भाविश म्हणतात, “मला विश्वास आहे की अक्षयऊर्जा ही भविष्याची गरज आहे आणि या क्षेत्रात भरीव योगदान देणे हे माझे ध्येय आहे.
तसेच ते तरुणांना यशाचा मूलमंत्र देताना म्हणतात की, ”वेगवेगळ्या प्रकारच्या घटना सगळ्यांच्या आयुष्यात घडत असतात. पण त्या घटनांमधून काहीतरी शिकून, त्यांना आपल्या प्रयत्नांच्या रूपात बदलायचे असेल, तर तुमची पूर्ण मेहनत आणि समर्पण लागेल. एक दिवस, यश नक्कीच तुमच्या पायाशी असेल.” भाविश अग्रवाल यांचा हा प्रवास कठोर मेहनत, समर्पण आणि नवनिर्मितीच्या शक्तीचा पुरावा आहे.
एका महाविद्यालयात व्यावसायिक मार्गदर्शनाच्या चर्चासत्रात भाग घेण्यासाठी गेलो असता मुलांनी काही प्रश्न विचारले. उद्याची स्वप्ने पाहणारी ही तरुण पिढी. “उद्योजक कसे होता येईल?” असा एक प्रश्न होता. त्यावेळी त्यांच्याशी झालेल्या संवादाचे हे संकलन.
आपण जेव्हा एखादे काम स्वीकारतो किंवा एखादी नोकरी स्वीकारतो तेव्हा आपणास त्या कामाचे जे पैसे मिळतात ते हवे असतात म्हणून आपण ते काम किंवा नोकरी स्वीकारतो. पण त्यामुळे आनंदी होतोच असे नाही. केवळ जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पैशासाठी आपण ती नोकरी स्वीकारतो. आणि आपले त्या कामात लक्ष लागत नसल्यामुळे दु:खी कष्टी होतो. तसेच एखादा व्यवसाय किंवा उद्योग करावयाचा असेल तर आपल्याला तो व्यवसाय/उद्योग आवडतो का? ह्या प्रश्नाचा विचार सुरुवातीला करणे आवश्यक आहे. “I am the Boss of Myself” असे ज्याला वाटते तोच उद्योजक होऊ शकतो. ९ ते ५ काम करणारी मंडळी, त्यांची मानसिकता अगदी वेगळी असते. ते धाडसी निर्णय घेऊ शकत नाहीत. ते उद्योगात यशस्वी होऊ शकत नाहीत.
व्यवसाय करण्यासाठी सिद्ध असलेल्या व्यावसायिकाने हे लक्षात घ्यावयास हवे की त्याला मार्केटिंग येणे आवश्यक आहे. मार्केटिंग हे शास्त्र नव्हे. त्यासाठी उपजत शहाणपण आणि अनुभव गाठीशी असावा लागतो. आपल्याबाबत लोकांना माहिती हवी. आपण विकणाऱ्या वस्तूची चांगली माहिती हवी. तुम्ही स्वतःचे व्यक्तिमत्त्व विकले पाहिजे. तुम्हाला लोकांनी सहज ओळखले पाहिजे. इतरांच्या तुलनेत तुम्ही तुमची चमक दाखवली पाहिजे. अगदी तुम्हाला एस्कीमोलाही फ्रीज विकता आले पाहिजे किंवा केस नसणाऱ्याला कंगवा विकता आला पाहिजे. आपण जी वस्तू विकणार आहोत त्यात नाविन्य हवे. शक्यतो त्यासारखी दुसरी वस्तू बाजारात नसावी. नाविन्य आणि वेगळेपणा फार महत्वाचा आहे. तोच खरा व्यावसायिक/उद्योजक जो नाविन्यपूर्ण वस्तूंची निर्मिती करून त्यासाठी बाजार निर्माण करतो. उदा. स्टीव्ह जॉब्स. I-POD बाजारात आणला. लोकांना त्याची आवश्यकता होती का? तर नाही. तरीही लोकांना ती वस्तू हवी हवीशी वाटते आणि त्यातून पैसा कमविता येतो. नवीन ग्राहक निर्माण करणे व त्यासाठी बाजारपेठ निर्माण करणे हे फार महत्वाचे असते.
स्टीव्ह जॉब्स यशस्वी झाले त्याचे कारण त्यांनी नव्या वस्तू बाजारात आणल्या. लोकांना त्या हव्या हव्याशा वाटल्या. तुमची सेवा, ह्याबद्दल लोकांना विश्वास वाटायला हवा. जो हे करतो तो खरा व्यावसायिक/ निर्माता. त्या वस्तूची नुसती विक्रीच झाली पाहिजे असे नाही तर त्यामुळे समाज जीवनावर त्याचा प्रभाव पडला पाहिजे. त्यामुळे सामान्य माणसाचे आयुष्य बदलले पाहिजे. तुम्ही तुमची बाजारपेठ तयार केली पाहिजे. टिकवून ठेवली पाहिजे. तुमच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा तुम्ही उठून दिसणे आवश्यक आहे बिल गेट्स हे उत्तम विक्रेते आहेत. स्पर्धा ही महत्वाची असतेच. पण स्पर्धेत तुमचे लक्षणीय असणे महत्वाचे असते. स्पर्धा ही असणारच. स्पर्धेला टक्कर देत पुढे गेले पाहिजे. जे खूप लढाऊ असतात त्यांच्या मागेच यश धावत येते.
कोणतीही पार्श्वभूमी नसणाऱ्या नव्या पिढीच्या व्यावसायिकाकडे पाहिले असता हे सहज लक्षात येते की त्यांच्याकडे योग्य ते भांडवल नसते. त्यांच्याकडे नव्या नव्या कल्पना असतात, इच्छाशक्ती असते ,उत्साह असतो. ह्या नव्या कल्पनाशक्तीमुळेच ते वेगळे दिसून येतात. आपल्या डोक्यात एकाच वेळी अनेक कल्पना असतात. अनेक कल्पनांची गिरणी चालू असते. जेव्हा वेळ योग्य असते, जमीन सुपीक असते तेव्हा कल्पनेला उगवण्याची म्हणजे फुलण्याची संधी मिळते. आपले मन स्वप्नाळू हवे. विचारक्षमता तीव्र हवी आणि कामाचे योग्य नियोजन हवे. तरच कल्पना प्रत्यक्षात उतरू शकते. आर गोपीनाथ ह्यांनी सर्वात स्वस्त हवाई प्रवास ही कल्पना पुढे आणली व एक नवा प्रयोग यशस्वी करून दाखविला. आज सामान्य माणसांना हवाई प्रवास शक्य झाला आहे .
बहुतेक व्यवसाय अयशस्वी होतात त्याचे प्रमुख कारण म्हणजे व्यावसायिकांचा अहंगंड. दोन सहकारी व्यावसायिकांचा अहंगंड त्यांना अयशस्वी करतो. आयुष्यातील जगण्याचा अनुभव महत्वाचा असतो.
सर्वच माणसं स्वप्नं बघतात. सगळ्यांची स्वप्नं सारखी नसतात. काही व्यक्ती फक्त रात्री झोपेत असतानाच स्वप्नं बघतात व सकाळी त्या स्वप्नांना आठवून त्यांचा विचार करतात किंवा विसरून जातात. पण ज्या व्यक्ती फक्त दिवसाच स्वप्नं बघतात त्या खूप वेगळ्या असतात. त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीचा पाठलाग करावयाचा असतो. ते त्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करतात. मेहनत घेतात. ही ध्यास असलेली माणसेच खऱ्या अर्थाने यशस्वी होताना दिसतात. अशी स्वप्नं बघणे आणि प्रयत्नशील राहणे हे खऱ्या व्यावसायिकालाच जमते. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या माणसाचे काम करणारा धीरुभाई अंबानीसारखा साधा माणूस पुढे जगातील एका मोठ्या पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीचा मालक कसा झाला हे समजून घेतले पाहिजे. महाविद्यालयीन शिक्षण सोडून स्वतःचे छोटे उद्योग उभे करणारे बिल गेट्स किंवा स्टीव्ह जॉब्स स्वतःचे औद्योगिक साम्राज्य कसे उभे करू शकले हे शिकले पाहिजे, समजून घेतले पाहिजे. THINK BIG AND START SMALL, हे सूत्र महत्वाचे.
तुम्ही तुमच्यापेक्षा हुशार व्यक्तींना तुमच्या व्यवसायात सहकारी म्हणून घेतले पाहिजे. तुमच्यापेक्षा कमी हुशार व्यक्तींना घ्याल, तर तुम्ही ज्यांचे नेतृत्व करणार आहात ते खुजे असल्यामुळे तुमचे नेतृत्व खुजेच असेल. तुमच्या कंपनीत जर जास्त कर्तृत्ववान माणसे असतील तर तुमची कंपनी उंचावर जाईल. नारायण मूर्तींना हे सहज जमले म्हणून त्यांचे नेतृत्व वादातीत आहे. तुमचे नेतृत्व निगर्वी हवे. त्यामुळेच रतन टाटा यशस्वी झाले. त्यांनी Nano कारचे स्वप्न पाहिले. ते प्रत्यक्षात उतरवून दाखविले. त्यामुळे सगळ्या कंपन्यांनी छोट्या कार बाजारात आणल्या. हा बदल घडून आणला तो Nano कारने. वेगळी अशी नवी वस्तू बाजारात आणणे हे महत्वाचे असते. नवी वस्तू पण सर्वात स्वस्त असा विचार त्यांनी दिला आणि सारे कार उद्योजक त्याच्या मागे धावत गेले कारण त्यांना नव्या बाजाराची जाणीव झाली.
तुमची इच्छाशक्ती, तुमची आत्यंतिक आवड, तुमची निर्मिती क्षमता, तुमची ध्येयपूर्ती किंवा स्वप्नपूर्ती यासाठी चाललेली धडपड, त्यासाठी तुमचे झोकून देणे, हेच तुमच्या यशस्वी होण्याचे खरे भांडवल आहे. तुमची विचार क्षमता व कल्पनाशक्ती हे महत्वाचे भांडवल आहे. निवडलेला व्यवसाय हे माध्यम आणि तुमचे कर्म हाच खरा मार्ग आहे. ज्या व्यक्ती ह्याचा सतत पाठलाग करतात त्यांच्यासाठी परमेश्वरही त्यांच्या पाठीशी उभा राहतो. जे नैसर्गिकदृष्ट्या अनुचित व पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे ते आर्थिक दृष्ट्या फार नुकसानीचे असते हे ही त्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
तुम्ही उडप्याचे हॉटेल पाहिले आहे काय? ते चालविणे महाकठीण काम आहे, हे माहित आहे का? ते हॉटेल चालविणे म्हणजे रोज तुमच्या मुलीचा लग्न समारंभ घडवून आणण्याइतके कठीण आहे. उद्योजक होणे असेच कठीण आहे असे गोपीनाथ ह्यांचे मत पटण्यासारखे आहे.
नुसते ध्येय समोर ठेऊन जगणे किंवा मार्ग क्रमणे महत्वाचे नाही. त्यासाठी आपणास दूरदृष्टी असावयास हवी. खरी दूरदृष्टी असते तीच माणसे व्यवसायात यशस्वी होतात. हेन्री फोर्ड , वॉल्ट डिस्ने, स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स यांनी उद्योगाला सुरुवात केली पण अनेकदा ते अयशस्वी झाले, पण त्यांना दूरदृष्टी होती. काय करावयाचे की ज्यामुळे बदल घडून येतील ह्याची त्यांना स्पष्ट जाणीव होती. अशीच मंडळी काहीतरी भव्य दिव्य करून दाखवितात. उद्योजकाला उद्योग उभारण्यासाठी दूरदृष्टी असावी लागते, नजीकच्या काळापेक्षा भावी काळात उद्योग कसा वाढेल ह्याचा विचार महत्वाचा असतो. नजीकच्या काळातील समस्या सोडवताना दूरच्या काळातील विचार तेवढाच महत्वाचा असतो.हे ज्यांना जमते तेच यशस्वी होतात.
व्यावसायिक म्हणजे तो माणूस, जो संपत्तीची निर्मिती करतो. नवी वस्तू, नवा गिऱ्हाईक, नवी सेवा, नवा ग्राहक. नवे असणे, उपयुक्त असणे व ग्राहकाला हवेहवेसे वाटणे, हे ज्याला सहज जमते तो खरा व्यावसायिक. नवी कल्पना, नवी वस्तू पण कमी पैशात निर्मिती, नवी सहज उपलब्ध होणारी सेवा ह्या त्रि-सूत्रीवर व्यवसाय अवलंबून असतो. स्टीव्ह जॉब्सने I-POD ची निर्मिती करून क्रांतीकारक बदल घडवून आणला. बिल गेट्सनी नवी क्रांती घडवून आणली अर्थात त्यासाठीचे आवश्यक असलेले मनुष्यबळ त्यांनी उभे केले.
थॉमस एडिसनने विद्युत दिव्याचा नुसता शोधच लावला नाही, तर निर्मिती करून जगाला विद्युतमय केले. सॅम वॉल्टनचे उदाहरण घ्या. “प्रत्येक दिवशी कमी किमतीत” ह्या संकल्पनेवर त्यांनी नवी बाजारपेठ उभी केली आणि खूप संपत्ती उभी केली. अंबानींनी “सारी दुनिया मुठ्ठीमे” अशी घोषणा देऊन सामान्य माणसाना मोबाईल विकला. ही सर्व उदाहरणे हे दर्शवितात की उद्योजक हा महाविद्यालयात व्यवस्थापकीय शिक्षण घेऊन तयार होत नाही. त्यासाठी त्याला तशी आतून उर्मी असावी लागते. त्यासाठी आपण खूप बुद्धिमान असले पाहिजे असे नाही, परंतु आजूबाजूचे सर्व जाणून घेण्यासाठी उत्सुक असले पाहिजे. तेच महत्वाचे ज्ञान आत्मसात करता आले पाहिजे .
बहुतेक धंदे किंवा व्यवसाय अगदी सुरुवातीच्या काळातच बंद पडतात. जेव्हा सहकारी एकमेकाला पूरक नसतात किंवा त्यांची विचार करण्याची पद्धती सारखी नसते व काम करण्याचे मार्ग भिन्न असतात तेव्हा व्यवसाय बंद पडतात. पूरक सहकारी निवडणे फार महत्वाचे असते . तरच तणाव मुक्त व्यवसाय करता येतो. दोन किंवा दोन पेक्षा अधिक पार्टनर असतील तर कोणातरी एकाचे नेतृत्व मान्य करून व्यवसाय करता आला पाहिजे. दोन दोन नेतृत्व असतील तर व्यवसाय चालू शकत नाही. एका जहाजाला दोन कप्तान असू शकत नाहीत.
बरेच जण व्यवसाय/उद्योग सुरु करतांना म्हणतात, “मला नवा व्यवसाय सुरु करावयाचा आहे. माझ्या वरिष्ठांना त्याची काहीच कल्पना नाही. जर व्यवसाय यशस्वी होण्याची चिन्हे दिसली तरच मी नोकरीचा राजीनामा देईल.” असा विचार करणारे लोक उद्योजक होऊ शकत नाहीत. तुम्हाला जर खरे उद्योजक व्हायचे असेल, तर हे लक्षात ठेवा की तुम्हाला स्वतःला झोकून देता आले पाहिजे. अर्थात त्यासाठी हालअपेष्टा सहन करण्याची तयारी हवी.
तुम्ही तुमच्या जागेचे भाडे वेळेवर देऊ शकणार नाहीत. कर्मचार्यांना पगार देताना तुमची तारांबळ होईल. बायकोला साडी घेण्यासाठी तुमच्याजवळ पैसे नसतील. मुलांची महागडी शिक्षण फी भरण्यासाठी त्रास होईल. अशा असंख्य अडचणीना तोंड द्यावे लागेल. ह्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी नवे मार्ग शोधावे लागतील. ते सहज जमते, प्रयत्न करावे लागतात . पण त्यासाठी तुमची झोप उडालेली असेल, असे जेव्हा घडेल तेव्हाच तुम्ही तावूनसुलाखून निघाल. निसर्ग जसा अडचणी निर्माण करतो तसाच अडचणीवर मात करण्यासाठी मेंदूला चालनाशक्ती देतो. त्या शक्तीचा उपयोग करता आला पाहिजे.
नवा उद्योग किंवा व्यवसाय उभा करतांना अडचणीचा डोंगर उभा राहणारच. त्या अडचणीवर मात करतानाच तुम्ही घडत जाल. नदीचा गुणधर्म वाहणे आणि समुद्राकडे धावणे. तुम्ही नदीसारखे असाल तर दगड धोंड्यावर मात करून वाहत राहणार व शेवटी समुद्राला मिळणार म्हणजेच यशस्वी होणार. यशाचा समुद्र तुमची वाट पाहत असेल हे लक्षात ठेवा. तुमच्यामध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती हवी. प्रचंड उत्साह हवा. मग यशाची शिखरे तुमचीच.
सगळ्या लढाया ह्या प्रथम मनाच्या अवकाशात लढल्या जातात. हे लक्षात असू देणे महत्वाचे आहे. आपल्याला आजूबाजूच्या सिमीत अवकाशाची कल्पना असलेली बरी. जेव्हा आपण निर्णय घेत नाही, तेव्हाच आपण अपयशाच्या दिशेने वाटचाल करतो. हे ही लक्षात असू द्यावे.
धंदा करावयाचा असतो तो “नफा ” मिळवण्यासाठी. “नफा” हा धंदा करणाऱ्यासाठी पवित्र मंत्र आहे. ते मान्य नसेल तर ह्यात पडू नका. नफा असेल तरच धंदा जगेल. तोटा कमी करणे ही धंद्याची पहिली पायरी. सतत तोटाच होत असेल, तर धंदा बंद करणे ही महत्वाची दुसरी पायरी. आपल्याला यश मिळू लागले की लोक आपल्याला जेवायला या असे आमंत्रण देतात. तेव्हा हे लक्षात असू द्यावे की कोणीही, कधीही फुकट जेवायला बोलवीत नसते. लोकांना ओळखता आले पाहिजे.
कोणतीही गोष्ट पूर्ण करावयाची असेल, तर सर्वात प्रथम त्यासाठी कोणत्या दिवसापर्यंत पूर्ण करावयाची हे निश्चित करा. मनामध्ये तो दिवस पक्का करा. हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे. डेडलाईन महत्वाची असते . तरच गोष्टी साध्य होतील. व्यवस्थापकीय शिक्षण ठीक. पण जे शिकवले जाते ते सारेच उपयोगी पडते असे नाही. प्रत्यक्ष व्यावसायिक जीवनात वेगळेच मार्ग निवडावे लागतो. नुसत्या पुस्तकी शिक्षणाचा फारसा उपयोग होत नाही.
अंटार्टिका मोहिमेसाठी एक जाहिरात देण्यात आली होती. ती अशी …. “अतिशय धोकादायक मोहिमेसाठी माणसे हवीत. अर्ज करा. खूप कमी पगार, मरणाची थंडी असलेला प्रदेश, सहा सहा महिने रात्रीचे काम, सतत अडचणीशी सामना, निसर्गाशी युद्ध, जिवंत परत येण्याची कमी शक्यता परंतु यशस्वी झालात तर जागतिक सन्मान नक्कीच .” HAZARDOUS JOURNEY : ANTARCTICA
अशी जोखीम घेणारी माणसे किती असतात? उद्योगात किंवा व्यवसायात अशीच जोखीम असते. तशी जोखीम घेणार असाल तरच उद्योजक होता येईल. बघा जमते का?