स्टीफन हॉकिंग यांचा जन्म इंग्लंड येथील ऑक्सफर्ड येथे ८ जानेवारी १९४२ रोजी झाला. त्यांचे वडील डॉ. फ्रँक हॉकिंग हे जीवशास्त्राचे संशोधक होते. तर त्यांची आई वैद्यकीय संशोधन सचिव होती. त्यामुळे संशोधनाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. ऑक्सफर्ड विद्यापीठातून भौतिकशास्त्रात अव्वल क्रमांक पटकावल्यानंतर ते केंब्रिजमध्ये पीएचडीसाठी गेले. विश्वाची निर्मिती कशी झाली, आकाशातील कृष्णविवरे नेमकी कशी तयार होतात, अशा अनेक गूढ न उकललेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता.
‘मोटार न्यूरॉनडिसीज’ने त्यांना ग्रासले होते. गेली अनेक वर्ष त्या आजाराशी झगडत होते. त्यांची ही जिद्द आणि प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असाच होता. भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्र सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल, यासाठी त्यांनी लिखाण केले. हॉकिंग यांना आधुनिक काळातील न्यूटन असे म्हटले जायचे. वयाच्या ३५ व्या वर्षी हॉकिंग केंब्रिज विद्यापीठात ल्यूकॅशियन प्रोफेसर झाले. केंब्रिज विद्यापीठात हे पद महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेच मानले जाते. न्यूटन देखील ल्यूकॅशियन प्रोफेसरच होते.
स्टीफन हॉकिंग आपल्या ग्रॅजुएशनच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत होते. त्यावेळी आइस स्केटिंग करताना ते अचानक पडले. गंभीर जखमी झालेल्या हॉकिंग यांना Amyotrophic Lateral Sclerosis (ALS) न्युरॉन कमी करणारा आजार झाला होता. हा कधीच बरा नाही होणारा आजार असून येत्या 1 ते 1.5 वर्षांत स्टीफन यांचा मृत्यू होणार अशी भविष्यवाणी डॉक्टरांनी केली होती. पण, या भविष्यावाणीनंतर त्यांनी मृत्यूला पछाडले आणि पुढचे 42 वर्षे जगले.
स्टीफन हॉकिंग यांनी आपल्या हयातीत अनेक संशोधन आणि सिद्धांत मांडले. व्हीलचेअरवर बांधले गेले तेव्हा त्यांचे हात पाय आणि शरीराने काम करणे बंद केले. शरीराने काम करणे बंद केले पण जीनियस डोक्यातील विचार कधीच थांबले नाहीत. शरीर निष्क्रीय झाल्यानंतर आपले डोके आणखी सक्रीय झाले असे ते म्हणाले होते. हात, पाय आणि शरीराने जी ऊर्जा वाचवली ती समस्त ऊर्जा बुद्धीने वापरली आणि एकानंतर एक सिद्धांत त्यांनी जगासमोर मांडले.
हॉकिंग्ज एनर्जी, हॉकिंग्ज रेडिएशन यांसह अनेक शोधांसाठी ते प्रसिद्ध आहेत. हॉकिंग्ज यांची ब्रिफ हिस्टरी ऑफ टाइम, ब्लॅक होल अॅन्ड बेबी युनिवर्सेस अन्ड इदर एसेज, द युनिवर्स इन नटशेल, ऑन द शोल्डर्स ऑफ जायंटस यांसारखी अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. भौतिकशास्त्रातले जगातील अत्यंत मानाचे व मोठे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.
तुम्हाला आजचा हा लेख कसा वाटला हे कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा. लेख आवडला असेल तर लाइक आणि subscribe जरूर करा आणि हो अजून कोणत्या विषयाची माहिती ऐकायला तुम्हाला आवडेल कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.
अनेक वर्ष प्रयत्न करूनही जेव्हा यश मिळत नाही तेव्हा “माझं नशिबच खोटं” म्हणून आयुष्यात निराश होणाऱ्या माझ्या शेकडो मित्रांना आजची पोस्ट समर्पित…
किंग कँप जिलेट हा काही कोणी शास्त्रज्ञ नव्हता. तो होता एका कंपनीत काम करणारा २१ वर्षाचा एक तरुण सेल्समन. घरोघरी फिरून तो विविध प्रकारच्या वस्तू विकायचा. पण त्याच्या डोळ्यात मात्र भव्य स्वप्नं असायची. एक दिवस आपण असा एखादा शोध लावायचा कि संपूर्ण जगात आपलं नाव होईल आणि आपल्याला चिक्कार पैसेही मिळतील. परंतु एका सामान्य माणसासाठी ते एक अशक्य कोटीतलच स्वप्नं होतं. तरीही जिलेट आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करीतच राहिला.
तब्बल २८ वर्षांनी त्याला यश मिळालं तेव्हा जिलेट हे नाव तब्बल दोनशे देशातील लाखो करोडो लोकांना ठाऊक झालं होतं. वयाच्या ७७ व्या वर्षी १९३२ मध्ये त्याचे निधन झाले तरीही आज ८० वर्षानंतर जिलेट हे नाव जिलेट ब्लेड, जिलेट सेफ्टी रेझर, जिलेट ट्वीन ब्लेड, जिलेट ट्रिपल ब्लेड, जिलेट शेविंग क्रीम, जिलेट ब्रश म्हणून जगातील अब्जावधी लोकांच्या ओठावर रोजच असते. २००५ मध्ये प्रोक्टर एंड ग्याम्बलने जिलेट कंपनी ५७ बिलिअन डॉलरला म्हणजे तब्बल ३ लाख ४२ हजार कोटी रुपयांना खरेदी केली तरी जिलेट हे नाव कायम ठेवले. किंग कँप जिलेटच्या त्या अफाट स्वप्नाला, त्याच्या त्या अविश्वसनीय चिकाटीला माझा त्रिवार सलाम !
दिवसभर सेल्समन म्हणून पायपिट केल्यानंतर फावल्या वेळात जिलेट काहीतरी संशोधन करत असे. (तुम्ही फावल्या वेळात क्रिकेट बघता ) त्याने तसे बारीक सारीक अनेक शोध लावले. पण त्यापासून त्याला चार पैसे काही गाठीला बांधता आले नाहीत. त्याचं संशोधनाचं ते वेड पाहून एक दिवस त्याच्या मालकाने त्याला एक असा सल्ला दिला कि तू असं काही शोधून काढ कि ज्याची गरज लोकांना रोजच पडेल आणि ते ती वस्तू वापरून फेकून देतील अन त्याला चांगला व्यवसाय करता येईल. त्या कल्पनेने जिलेटला झपाटून टाकलं. रात्रंदिवस तो अशी कोणती वस्तू असेल हाच विचार करू लागला. त्यासाठी त्याने असंख्य वेळा डिक्शनरी चाळून काढली.
एकदा नेहमी प्रमाणे हातात वस्तरा घेऊन तो दाढी करत होता. अचानक त्याला एक सुंदर कल्पना सुचली. रोज घासून घासून वस्तऱ्याला धार लावत बसण्यापेक्षा आठवडाभर वापरून फेकून देता येईल असे ब्लेड तयार करता येईल का ? त्याला पकडता येईल असे रेझर बनवता येईल का ? त्या कल्पनेने जिलेटला झपाटून टाकलं. रात्रंदिवस तो अशी कोणती वस्तू असेल हाच विचार करू लागला. त्यासाठी त्याने असंख्य वेळा डिक्शनरी चाळून काढली. एकदा नेहमी प्रमाणे हातात वस्तरा घेऊन तो दाढी करत होता. अचानक त्याला एक सुंदर कल्पना सुचली. रोज घासून घासून वस्तऱ्याला धार लावत बसण्यापेक्षा आठवडाभर वापरून फेकून देता येईल असे ब्लेड तयार करता येईल का ? त्याला पकडता येईल असे रेझर बनवता येईल का ? त्या कल्पनेने जिलेटला झपाटून टाकलं. त्या दिवसांपासून त्याने अनेक तज्ञ व्यक्तींना भेटायला सुरुवात केली. प्रत्येकाने त्याच्या कल्पनेला वाटण्याच्या अक्षता लावल्या. तरीही जिलेट खचला नाही. आपली कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा त्याचा विश्वास थोडाही डगमगला नाही. त्याने आणखी पाच वर्ष अनेक तज्ञांच्या गाठी भेटी घेतल्या. शेवटी वयाच्या ४६ व्या वर्षी एकाने त्याला हवे तसे ब्लेड बनवून दिलेच. तेव्हा जिलेटला आकाशाला गवसणी घातल्याचा आनंद झाला.
पण त्याचा तो आनंद फार काळ टिकला नाही. कारण मोठ्या प्रमाणावर अशी ब्लेड बनविण्यासाठी त्याच्याकडे भांडवलच नव्हतं. कर्ज काढून त्याने एक मशीन बनवलं तेव्हा इतका खर्च झाला कि तो अक्षरशः कर्जबाजरी झाला. देणेकरी त्याच्या मागे लागले. मित्र त्याच्या रेझरवरून त्याची टिंगल करू लागले. शेवटी एका गुंतवणूकदाराने त्याला कर्ज रोखे काढायचा सल्ला दिला आणि कमी किमतीत स्वतः कर्जरोखे खरेदी करून त्याला भांडवल दिले. जिलेटने मोठ्या प्रमाणावर ब्लेड आणि रेझरची निर्मिती केली. पण त्याची ही कल्पना लोकांना आवडली नाही. फक्त ५० ब्लेड आणि रेझर विकली गेली. तेव्हा त्याने आपल्या प्रोडक्टचे पेटंट रजिस्टर केले आणि बाजारात तुफान जाहिरात करून हजारो दुकानात आपले प्रोडक्ट विकायला ठेवले.
बघता बघता लाखामध्ये विक्री होऊ लागली. एका देशातून दुसऱ्या देशात करता करता जगातील दोनशे देशातील अब्जावधी लोकांना त्याच्या त्या सुंदर कल्पनेने भुरळ घातली आणि त्याने एका मागून एक अशी ब्रश, क्रीम, सोप अशी प्रोडक्ट बाजारात आणली. त्याच्या प्रत्येक प्रोडक्टचा दर्जा इतका उच्चा होता कि त्यानंतर अनेक कंपन्यांनी आपली प्रोडक्ट बाजारात आणून त्याला शह द्यायचा प्रयत्न केला, पण जिलेट म्हणजे जिलेटच हवं अशी मागणी करणाऱ्या ग्राहकांमुळे जिलेटने आभाळालाच गवसणी घातली. वयाच्या ४९ व्या वर्षी आपलं स्वप्न साकार करणाऱ्या जिलेटची कहाणी आयुष्यात लवकर निराश होणाऱ्या लाखो तरुणांना दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करणारी ठरावी.
तर ही होती ब्लेडचा शोध लावणारे जिलेट कंपनीचे संस्थापक किंग कॅम्प जिलेट यांची जीवनकहाणी. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि अशाच प्रकारच्या उद्योजकांच्या गोष्टी ऐकून प्रेरणा घेण्यासाठी चॅनेल आताच सबस्क्राईब करा.
‘इंटेल’चे उत्पादन कोट्यवधी लोक दररोज वापरत असतात; पण ते नेमके कसे दिसते, ते मात्र कुणालाच माहीत नाही; हे अजबच नाही का? इंटेल नक्की काय बनवते? कॉम्प्युटर नेमका चालतो कसा? एकविसाव्या शतकात जगताना कॉम्प्युटर, मोबाईल फोन यांच्याशिवाय आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. याआधी असलेली रेडिओ किंवा टीव्हीसारखी उपकरणे आणि कॉम्प्युटर यामध्ये असा काय फरक आहे, ज्यामुळे कॉम्प्युटर सगळ्यांचा ‘दादा’ झाला?
जॅक किल्बीशिवाय इंटिग्रेटेड सर्किट (आयसी) च्या शोधात महत्त्वाचं काम बजावणारा माणूस म्हणजे रॉबर्ट नॉइस (१९२७-१९९०). रॉबर्ट नॉइस फेयरचाईल्ड कंपनीत बऱ्यापैकी रुळला होता. तो कंपनी सोडेल हे कोणाच्याही डोक्यात आले नसते पण १९६८ ला त्याने गॉर्डन मूर सोबत एक अनपेक्षित खेळी खेळली. १९४७ च्या साली बेल लॅब्स मध्ये ट्रान्झिस्टर नावाच्या इलेक्ट्रॉनिक स्विचचा शोध लागला होता. या शोधाने इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात प्रचंड क्रांती घडवून आणली होती. यामुळे संगणकाच्या आकारात आणि किंमतीत प्रचंड मोठा फरक पडणार होता.
हे ‘भवितव्य’ ओळखल्याने हे ट्रान्झिस्टर्स वापरावेत म्हणून मूर आणि नॉइस यांनी ओरडून ओरडून फेयरचाईल्ड कंपनीला सांगितले होते पण कंपनीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्या दोघांनी वैतागून ती कंपनीच सोडून दिली. स्वतःच्या खिशातून अडीच लाख डॉलर्स गुंतवून ऑर्थर रॉक नावाच्या प्रसिद्ध वित्तसहाय्यकाकडून ३ लाख डॉलर्स घेतले आणि नवी कंपनी सुरु केली.
गॉर्डन मूर आणि रॉबर्ट नॉइस यांच्या नावावरून सुरुवातीला ‘मूर नॉइस’ ठेवण्याचा विचार होता.पण त्याचा उच्चार ‘मोअर नॉईज’ असा वाटेल अशी त्यांना भीती वाटली! मग त्यांनी वर्षभर ‘एनएम इलेक्ट्रॉनिक्स’ या नावानं त्यांची कंपनी चालवली. त्यानंतर त्यांनी तिचं नामकरण ‘इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स’ असं करायचं ठरवलं. पण दुसऱ्या एका हॉटेलची साखळी चालवणाऱ्या कंपनीनं ते नाव आधीच घेतलं असल्यानं त्यांनी ते त्यांच्याकडून ‘विकत’ घेतलं आणि या लांब नावाचं छोटं स्वरूप (म्हणजे ‘इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स’ ऐवजी ‘इंटेल’) घेऊन ते आपल्या कंपनीला द्यायचं ठरवलं. हीच आजची ‘इंटेल’ होय. ‘इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स’ चे लघुरूप म्हणजे इंटेल. आपल्या आधीच्या फेअरचाइल्ड कंपनीशी स्पर्धा करून आयसी बनवण्याऐवजी त्यांनी संगणकात माहिती साठवण्यासाठी लागत असलेल्या मेमरी चिप्स बनवायचा घाट घातला. लवकरच त्यांनी यात छान यश संपादन केलं. अँडी ग्रोव्हही या दोघांना येऊन सामील झाला.
खरं तर ज्या कंपनीत आधी हे दोघे काम करत होते त्या फेयर चाईल्ड कंपनीने ‘इंटिग्रेटेड सर्किट’वर बऱ्यापैकी संशोधन केले होते. त्यामुळे याची माहिती नव्याने कंपनी स्थापणाऱ्या मूर आणि नॉइस या दोघांनाही माहित होते. त्यामुळे त्या दोघांनी फेयरचाईल्ड कंपनीचे संशोधन चक्क ढापले आणि आयसीज वापरून कॉम्पुटरची मेमरी बनवण्यास सुरुवात केली. यावर फेयर चाईल्डचा चांगलाच जळफळाट झाला पण काहीच करू शकली नाही. त्याकाळी इंटेलने काढलेल्या ११०३ मॉडेलच्या मेमरी चिपमध्ये १०२४ बिट्स (म्हणजे १ केबी) इतकी माहिती साठवू शकता येई. इतकी माहितीही त्याकाळी ‘प्रचंड’ मानली जाई. इंटेलच्या इंजिनियर्सच्या मते त्या चिपची किंमत १० डॉलर्स इतकी योग्य होती,म्हणजे थोडक्यात १ बिटला एक सेंट अशी किंमत होती. पुढे मुरने आपला एक महत्वाचा सिद्धांत १९६५ सालच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स’ मासिकात मांडला.
कॉम्प्युटरच्या वेगाच्या संर्दभात गॉर्डन मूरचा एक नियम सांगणे आवश्यक आहे. ‘दर अठरा महिन्यांनी आयसीजची आणि परिणामी कॉम्पुटर्सची क्षमता दुप्पट होत जाईल’ हे त्याचे भाकीत होते. एका स्क्वेअर इंचातील ट्रांझिस्टर्सची संख्या दर अठरा महिन्यांनी दुप्पट होते. मूरने १९६५ साली केलेले हे निरिक्षण मूर लॉ (Moore law) या नावाने प्रसिध्द आहे. याचा दुसरा अर्थ असा की, साधारणपणे दीड वर्षाने प्रोसेसरचा वेग दुप्पट होईल.आश्चर्य म्हणजे मूरचे सुमारे चाळीसवर्षांपूर्वी केलेले भाकीत खरे ठरले आहे. आज आपण २.४ गिगाहर्ट्झचे मायक्रोप्रोसेसर वापरतो. काही वर्षांपूर्वी आपण एक गिगाहर्ट्झ या वेगाचा मायक्रोप्रोसेसर वापरत होतो. तर त्याही आधी आपण पाचशे मेगाहर्ट्झचे प्रोसेसर वापरत होतो. आज हेच भाकीत प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे.
सुरवातीला ही कंपनी कॅल्क्युलेटर्सना लागणाऱ्या मेमरी चिप्स बनवत असे. १९७१ साली इंटेलच्या टेड हॉफनं ‘मायक्रोप्रोसेसर’चा शोध लावला. ठराविक कामे करण्यापेक्षा नवनवीन ‘प्रोग्रॅम लिहून’ या चीपकडून वेगवेगळी कामे करून घेता येतील अशी सोय यात होती. या निर्मितीमुळे इंटेलचा कॉम्प्युटर जगतात प्रवेश झाला. मग इंटेलनं त्या कामात लक्ष घातलं. तरीही पुढची अनेक वर्षे इंटेलचा प्रमुख व्यवसाय मेमरीच्या चिप्स बनवणं हाच होता. पण १९८० च्या दशकात जपानी कंपन्यांनी अतिशय स्वस्त दरात मेमरीच्या चिप्स विकायला सुरुवात केल्यावर इंटेलला काहीतरी वेगळं करणं भाग होतं. त्याच सुमाराला आयबीएमचा ‘पर्सनल कॉम्प्युटर (पीसी)’ जोर धरायला लागला होता. ऐंशीच्या दशकांत “पर्सनल कॉम्प्युटर” तयार झाल्यानंतर मायक्रोप्रोसेसरचा वापर वाढतच गेला. त्यामुळे आता मेमरीच्या चिप्सऐवजी मायक्रोप्रोसेसर वापरून संगणकाचा ‘सेंट्रल प्रॉसेसिंग युनिट (सीपीयू)’ नावाचा भाग बनवण्याकडे इंटेलनं मोहरा वळवला. यालाच आपण संगणकाचा मेंदू असंही म्हणतो. इंटेलची ही चाल कमालीची यशस्वी ठरली, आणि पुढची अनेक वर्षं इंटेलनं अक्षरश: दणाणून सोडली.
इंटेलने त्यांचं सर्वात पहिलं मॉडेल काढलं ‘४००४’. अंतराळात सोडलेल्या ‘पायोनियर-१०’ मध्ये हीच चिप वापरली होती. त्यानंतर इंटेलने ‘८००८’ ही चिप बनवली. मायक्रोसॉफ्टचा सर्वेसर्वा बिल गेट्सने हीच चिप वापरून ट्रॅफिक नियंत्रण करण्यासाठी प्रोग्रॅम्स लिहिले होते. या चिप्स लोकप्रिय होतात न होतात तोच त्यांचा प्रतिस्पर्धी मोटोरोलाने ‘६८००’ नावाची नवी चिप बाजारात आणली. त्यावर इंटेलने ८०८६ आणि ८०८८ या चिप्स मार्केटमध्ये आणल्या. आयबीएमने बनवलेला पीसी याच चिप्सवर आधारित होता. मात्र त्यानंतर मोटोरोलाने ‘६८०००’ नावाची शक्तिशाली चिप काढून इंटेलला जबरदस्त दणका दिला होता. त्याकाळी इंटेलची एक ओळख होती, ‘इंटेल स्पर्धकांना फक्त हरवत नाही तर नेस्तनाबूत करते.’ याच ब्रीदवाक्यातून इंटेलने पुढे ‘८०२८६’ ही जबरदस्त ताकदवान, स्वस्त आणि वापरायला सोपी अशी मायक्रोप्रोसेसर चिप बनवली.
नव्वदच्या दशकांत ऍन्ड्य्रू ग्रोव्ह हा धडाडीचा ‘सीईओ’ कंपनीत जॉईन झाला. तेव्हापासून इंटेलची कॉम्प्युटरविश्वात जवळजवळ मक्तेदारीच तयार झाली. २८६, ३८६, ४८६ या चीप फारशा कुणाला माहीत नाहीत, कारण चिप्सच्या नंबरांमुळे होणाऱ्या कायद्याच्या कटकटी नकोत म्हणून इंटेलने त्यांचं नाव “पेंटियम” ठेवलं. हाच तो जगप्रसिद्ध पेंटियम मायक्रोप्रोसेसर. यामागची गंमतशीर कहाणी अशी की चिप्सना आकड्यांची (४००४, ८०८०, ८०२८६ वगैरे) नावं दिल्याने इंटेलला त्यावर पेटंट्स मिळेनात. कारण आकड्यांवर पेटंट्स मिळत नसतात. म्हणून ‘पेंटियम’ हे नाव निघालं. या चिप्सची ताकद बघा! १९९७ साली बाजारात आलेल्या ‘पेंटियम २’ मध्ये ७५००० ट्रान्झिस्टर्स एका चिपवर होते, आणि ही चिप दर सेकंदाला ४० कोटी आकडेमोडी करू शकत असे! हीच क्षमता आताच्या चिप्समध्ये कैकपटीनं वाढली आहे!
‘इंटेल इनसाइड’ या जाहिरात मोहिमेमुळे ‘पेंटियम’ हे नाव कोट्यवधी लोकांना माहीत झाले. त्यानंतर ‘पेंटियम ४’ श्रेणीवर आधारलेले कॉम्प्युटर्सही खूपच लोकप्रिय झाले. कॉम्प्युटरवर आधारित कामे जसजशी वाढत गेली. तसतशी त्याचा वेग वाढण्याची गरजही वाढतच गेलेली दिसते; पण एका कॉम्प्युटरमध्ये एकापेक्षा जास्त मायक्रोप्रोसेसर लावणे किचकट आहे. आज आपण कम्प्युटर विकत घेतो तेव्हा ‘पी-फोर’वाला कम्प्युटर विकत घ्यायचा की पी-फाइव्ह की पी-सिक्स या प्रश्नांनी गांगरून जातो. ही सारी नावं या पेंटियम सीपीयूचीच असतात. पी-४ यातील पी म्हणजे पेंटियम. पण यातल्या ‘पी सिक्स’ सीपीयूची मूळ युक्ती ‘डिजिटल इक्विपमेंट कापोर्रेशन (डेक)’ नावाच्या कंपनीकडून इंटेलनं चोरली असल्याच्या आरोपांनी मोठं वादळचं उभं राहिलं. त्या भानगडीत ‘डिजिटल’नं इंटेलला न्यायालयात खेचून ६०,००,००,००० डॉलर्सची वसुलीही केली !
पण पुढे एक आणखी गडबड झाली. व्हर्जिनियातील एका प्राध्यापकाने इंटेलला त्यांचा प्रोसेसर एक ठराविक आकडेमोड करताना चुकतोय हे दाखवून दिले, पण ही चूक २७००० वर्षांतून एकदाच होते असं इंटेलचे इंजिनियर पटवून देत होते तरी या प्रसंगाला वेगळेच वळण लागले. पेंटियमवर अनेक जोक्स येऊ लागले, लोक थट्टा करू लागले. त्यामुळे आयबीएमने पेंटियमवर आधारित पीसी बनवणे बंद केले. तेव्हा मात्र इंटेलने सपशेल शरणागती पत्करली. चिपमधील दोष काढून त्याजागी नव्या चिप्स बसवण्यात आल्या यात इंटेलला ४७.५ कोटी डॉलरचा फटका बसला.
वाढत्या वेगाची गरज भागविण्यासाठी आता इंटेलने नवे ‘कोअर’ तंत्रज्ञान बाजारात आणले आहे. कोअर तंत्रज्ञानामध्ये एक चीपच्या आतच माहितीवर प्रक्रिया करणारे दोन किंवा चार भाग असतात. यामुळे कॉम्प्युटरवर एकाच वेळी अनेक कामे वेगाने करणे शक्य होते. ऍपलच्या संगणकात इंटेलचे प्रोसेसर आधी वापरले जात नव्हते. हा इंटेलसाठी एक धब्बाच होता, पण २००५ साली स्टीव्ह जॉब्जने इंटेलच्या चिप्स बसवणे मान्य केल्याने आधीच दबदबा असलेल्या इंटेलचा मार्केटमधील धाक अजूनच वाढला. कॉम्प्युटर डेलचा असो, वा ऍपलचा… इंटेलच्या चिपशिवाय त्याचे पान हलत नाही.
हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि अशाच प्रकारच्या उद्योजकांच्या गोष्टी ऐकून प्रेरणा घेण्यासाठी चॅनेल आताच सबस्क्राईब करा.
भारतीय अर्थव्यवस्था आणि उद्योगक्षेत्राला नवी झळाळी प्राप्त करून देणारे दोन उद्योगपती कै. धीरूभाई अंबानी यांचा आज जन्मदिन, तर श्री. रतन टाटा यांचे आज वाढदिवस. रतन टाटा आज ८६ वर्षांचे झाले. धीरूभाईंचे 6 जुलै 2002 रोजी निधन झाले. ते हयात असते, तर आज ते ९१ वर्षांचे झाले असते.
भारतातील पहिले नामांकित उद्योगपती सर जमशेटजी टाटा यांच्या कुटुंबात दत्तक गेलेले कै. नवल टाटा यांचे ते पुत्र. जे. आर. डी. टाटा यांच्या निधनानंतर रतन टाटा त्यांच्या समुहाचे प्रमुख बनले. 2002 पर्यंत त्यांनी टाटा सन्स या उद्योगसमुहाचे प्रमुखपद सांभाळताना समुहाच्या कक्षा विस्तारून त्या देशाबाहेरही पसरवल्या.
‘टेटली’, जग्वार लँड क्रूझर',कोरस’ यासारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कंपन्या त्यांच्याच पुढाकारामुळे भारतीय मालकीच्या बनल्या. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी टाटा समुहाच्या सर्व कंपन्यांच्या प्रमुखपदावरून निवृत्ती स्वीकारली व सायरस मिस्त्री या 41 वर्षांच्या भाच्याकडे सूत्रं सोपवली.
पण २०१६ मध्ये त्यांनी टाटा समूहात क्रांती घडवून आणली व मिस्त्रींना बाजूला करून ते पुन्हा समुहाचे अध्यक्ष बनले. त्यामुळे उद्योग जगतात निर्माण झालेली खळबळ अद्याप शमलेली नाही.
धीरूभाई मात्र केवळ स्वकष्टाने राखेतून निर्माण झालेले उत्तुंग व्यक्तिमत्व होते. गरीब कुटुंबात जन्मलेले धीरूभाई एकेकाळी साड्या विकण्याचे काम करत. त्यातूनच ‘विमल’ हा घराघरात पोहोचलेला साड्यांचा ब्रँड तयार झाला.
दूर एडनमध्ये एका पेट्रोल पंपावर गाड्यांमध्ये पेट्रोल भरण्याचे काम करणाऱ्या धीरूभाईंनी तेव्हा जगातील सर्वात मोठी पेट्रोकेमिकल कंपनी स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले आणि स्वकष्टाने ते प्रत्यक्षात उतरवण्याचे कर्तृत्व दाखवले. बँका वा अन्य कंपन्यांकडून कर्जें घेऊन उद्योग उभारण्याऐवजी आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या सामान्य गुंतवणूकदारांकडून छोट्या-मोठ्या ठेवी भाग भांडवल म्हणून गोळा करून त्यावर उद्योगांची मांडणी करण्याची अभूतपूर्व कल्पना धीरूभाईंनी राबवली व यशस्वीही केली.
धीरूभाई व रतन टाटा हे जवळपास एकाच कालंखंडातील यशस्वी उद्योगपती असले, तरी त्यांची पार्श्वभूमी व स्वभाव वैशिष्ट्ये आणि कार्यपद्धत पूर्णपणे भिन्न. पण दोघेही यशस्वी ठरले, हे महत्वाचे.
धीरूभाई व टाटा या दोघांच्याही भोवती वादाची वादळे घोंघावत राहिली. पण दोघानीही त्याची पर्वा न करता आपली वाटचाल चालूच ठेवली. भारतीय अर्थव्यवस्थेवर त्यांनी उमटवलेला ठसा बराच काळ कायम राहील हे नक्की !
हि होती धीरूभाई अंबानी आणि रतन टाटा यांची कहाणी.तुम्हाला आजचा हा लेख कसा वाटला हे कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा. लेख आवडला असेल तर लाइक आणि Subscribe जरूर करा आणि हो अजून कोणत्या विषयाची माहिती ऐकायला तुम्हाला आवडेल कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.
तुमच्या उत्पादनाची प्रतिष्ठा तुमच्या व्यवसायाच्या यशाला चालना देते, मग तुम्ही कोणत्याही उद्योगात असलात तरीही. सध्या, दर महिन्याला अंदाजे 543,000 स्टार्टअप्स सुरु होतात. यापैकी 70% स्टार्टअप दोन वर्षांपेक्षा जास्त चालत नाहीत, 50% स्टार्टअप पाच वर्षांपेक्षा जास्त काळ टिकत नाहीत आणि एक तृतीयांश स्टार्टअप दहा वर्षांचा टप्पा ओलांडण्यात सुद्धा अपयशी ठरतात. यापैकी फक्त एक चतुर्थांश व्यवसाय 15 वर्षांच्या पुढे टिकू शकतात.
तुम्ही नुकतीच सुरुवात करत असता, तेव्हा तुमची ब्रँड प्रतिष्ठा एक कोरी स्लेट असते. त्यामुळं तुम्ही त्याला योग्य दिशा देऊ शकता.
एक स्टार्टअप म्हणून, तुम्हाला कदाचित मोठ्या प्रमाणावर संकटांची काळजी करण्याची गरज नाही. पण आपले प्राथमिक लक्ष्य ब्रँड प्रतिष्ठा आणि सकारात्मक संघटना निर्माण करणे हे असले पाहिजे. त्यासाठी पुढे 12 गोष्टी आहेत ज्यांचा आपण विचार करणे आवश्यक आहे.
1. तुम्हाला कशासाठी प्रसिद्ध व्हायचे आहे?
तुम्ही तुमचा व्यवसाय कशासाठी उभा केला आहे? तुम्हाला कोणत्या प्रकारचा ब्रँड तयार करायचा आहे? तुम्हाला आणि तुमच्या ब्रँड ची समाजामध्ये कशी ओळख निर्माण करायची आहे? याचा विचार करण्यासाठी स्वतःला वेळ द्या. जेव्हा तुम्ही स्पष्ट असाल की लोकांनी तुम्हाला कसे पाहिले पाहिजे, तोच तुमच्या व्यवसायाचा चेहरा असेल.
2. तुमची स्वतःची वेबसाइट तयार करा
तुमच्या ग्राहकांना तुमची माहिती पाहिजे असल्यास तुमची वेबसाईट सर्वोत्तम मार्ग आहे. तुमची वेबसाईट सर्च इंजिनवर सर्वात पुढे असणे गरजेचे आहे. खराब ऑनलाइन रँकिंग तुमच्या ब्रँडला घातक ठरू शकते. नियमित पणे तुमची वेबसाईट अपडेट ठेवा. सर्च इंजिनच्या विविध टूल्स चा उपयोग करा.
3. सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करा
तुम्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरू शकत नाही, परंतु तुमच्या कंपनीचे नाव सर्व प्लॅटफॉर्मवर असले पाहिजे आणि आवश्यक असल्यास संबंधित डोमेन खरेदी करणे ही नेहमीच चांगले ठरते. तुमचे पेज नेहमी अपडेट ठेवा आणि ब्रँड ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासोबतच ग्राहकांशी संवाद देखील साधा. यामुळे तुमची प्रतिष्ठा लगेच वाढेल असे नाही, तर तुमचे ग्राहक तुमच्या ब्रँडला कसा प्रतिसाद देतात यावर लक्ष ठेवण्यास हे खूप मदत करेल.
4. ब्लॉगिंग
ब्लॉगिंग हे तुमच्यासाठी तुमच्या व्यवसायाची माहिती ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी आणखी एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे. तुमच्या व्यवसायाबद्दल नवीन माहिती आणि अपडेट शेअर करण्यासाठी तुमचा ब्लॉग वापरा. तुमच्या वाचकांना कमेंट विभागाचा वापर करण्यास आणि त्यांच्याशी सक्रियपणे संवाद साधण्यासाठी प्रोत्साहित करा.
5. प्रतिसाद देत रहा
सोशल मीडियावर असो, ईमेलवर असो किंवा तुमच्या ब्लॉगवरील कमेंट विभाग असो, योग्य वेळी आणि आवर्जून प्रतिसाद द्या. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे किंवा वेबवर ग्राहकांशी संवाद साधणे हा ग्राहक सेवेचा आणखी एक उत्तम प्रकार आहे, वैयक्तिक स्तरावर तुमच्या ग्राहकांशी कनेक्ट होण्यासाठी हे माध्यम वापरा.
6. रिव्ह्यू खरेदी करण्याचा मोह झाला?
खरे सांगायचे तर, अगदी डोनाल्ड ट्रम्पचे ट्विटरवर लाखो बनावट फॉलोअर्स होते. परंतु फक्त प्रसिद्ध होण्याच्या हेतूने असे बनावट फॉलोअर्स बनवणे घटक ठरू शकते. याचा सकारत्मक पेक्षा नकारात्मक परिणाम जास्त पाहायला मिळतो.
7. ब्रँडची प्रतिष्ठा नियंत्रित ठेवा
तुम्हाला सकारात्मक रित्या सोशल मीडिया चालवू शकता, पण त्यामध्ये तुमच्या ब्रँडची प्रतिष्ठा लवकरात लवकर नियंत्रित करणे महत्त्वाचे आहे. नवीन व्यवसाय म्हणून, तुम्ही कोर्या स्लेटने सुरुवात करता. त्याचा फायदा घ्या आणि ब्रँड प्रतिष्ठा व्यवस्थापनासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याकडे लक्ष केंद्रित करा, जे तुम्हाला काही मोठ्या यशासाठी उपयोगी ठरेल.
8. विश्वास निर्माण करा
उत्कृष्ट ब्रँड यशस्वी होतात कारण ते गुणवत्ता देतात आणि ग्राहक त्यांच्यावर विश्वास ठेवतात . तुम्ही वितरित करत असलेली गुणवत्ता, तुम्ही पाठवलेले संदेश आणि तुमची ग्राहक सेवा या सर्वांचा परिणाम तुमच्या ग्राहकांचा तुमच्यावर असलेल्या विश्वासावर होतो. तुमच्या ग्राहकांचा विश्वास जिंकण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे पारदर्शकता. तुम्ही चूक केली असेल तरीही तुमचे ग्राहक तुमच्या प्रामाणिकपणा मुळे नेहमी तुमचा आदर करतील.
9. प्रोएक्टिव्ह पीआरवर लक्ष केंद्रित करा
जेव्हा तुम्हाला एखादी मोठी घोषणा करायची असेल तेव्हा फक्त प्रेस रिलीझ पाठवणे तितकेसे संयुक्तिक नाही. तुमच्याकडे शेअर करण्यासाठी कंपनीच्या बातम्या नसतील तरीही मोठ्या उद्योग संभाषणांमध्ये सामील व्हा आणि तुम्ही PR वाढवा. तुमच्या व्यवसायाला, तुमच्या कंपनीला सतत प्रकाशझोतात ठेवण्यासाठी PR हि सर्वोत्तम संधी आहे.
10. तुमची SEO धोरण आणि SERP
तुमच्या व्यवसायासाठी मजबूत ब्रँड प्रतिष्ठा निर्माण करण्यात आणि कोणत्याही नकारात्मक परिणामांना दूर करण्यात SEO महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. पण ते तिथेच थांबत नाही. तुम्हाला तुमच्या SERP वर सतत काम करावे लागेल जेणेकरुन जेव्हा कोणी तुमच्या कंपनीचा शोध घेते तेव्हा त्यांना तुमची माहिती प्रथम सापडते.
11. टीका कशी हाताळायची ते जाणून घ्या
नकारात्मक टिप्पण्या किंवा ऑनलाइन टीकेपासून दूर जाऊ नका. नकारात्मक अभिप्राय तुमचा व्यवसाय मजबूत करायला मदत करून तुम्हाला अधिक यशस्वी बनवेल. लोक तुमची ऑनलाइन निंदा करत असल्यास, त्यांना योग्य आणि त्वरीत तुमची बाजू सांगा. त्याकडे लक्ष न देणे हा चुकीचा संकेत आहे. जेव्हा तुम्ही व्यावहारिक आणि तत्परतेने प्रतिसाद देता, तेव्हा तुम्ही समस्या सोडवत आहात आणि तुमच्या कंपनीला संभाव्य गोंधळापासून वाचवत आहातहे लक्षात ठेवा.
12. हे कधीही संपणार नाही हे स्वीकारा
तुमच्या ब्रॅण्डला मिळालेली प्रतिष्ठा सांभाळणे हे केवळ स्टार्टअपसाठी नाही तर कायम स्वरूपी आहे. तुमची आज एक उत्कृष्ट प्रतिष्ठा असेल, सर्च इंजिन परिणाम आणि अल्गोरिदम, ग्राहकांच्या अपेक्षा, त्यांची मते सतत बदलत असतात. तुम्हाला तुमची सकारात्मक ब्रँड प्रतिष्ठा कायम ठेवायची असेल, तर तुम्हाला त्यासाठी नेहमी काम करत राहावे लागेल.
तुम्हाला आजचा हा लेख कसा वाटला हे कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा. लेख आवडला असेल तर लाइक आणि subscribe जरूर करा आणि हो अजून कोणत्या विषयाची माहिती ऐकायला तुम्हाला आवडेल कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.
भारतातली पहिली शिपयार्ड कंपनी, पहिली विमान कंपनी सोलापुरात जन्मलेल्या एका महाराष्ट्रीयन माणसाने चालू केली असं सांगितलं तर ते अनेकांना विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. त्या माणसाचं नाव आहे वालचंद हिराचंद दोशी.
२३ नोव्हेंबर १८८२ रोजी हिराचंद दोशी व सौ. राजू दोशी यांच्या पोटी वालचंद यांचा जन्म सोलापूरमध्ये झाला. त्यांचे वडील सुती कपड्याचे व्यापारी होते. वालचंद यांचे वालचंदजी १८९९ मध्ये सोलापूरातून मॅट्रिक झाले आणि त्यांनी पुढील शिक्षण मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेज व पुणे येथील डेक्कन कॉलेज येथून इतिहास व अर्थशास्त्र या विषयातून पूर्ण केले. त्यानंतर ते वडिलांच्या व्यवसायात आले. वडिलांसोबत कपड्याचा व्यापार करणाऱ्या वालचंद यांच्या लक्षात आलं की, आपलं काय या व्यवसायात मन रमत नाही. त्यांनी स्वत: बांधकाम कंत्राटदार होण्याचा निर्णय घेतला
Walchand Hirachand Doshi
तो काळ होता जेव्हा भारत ब्रिटिशांच्या ताब्यात होता आणि या ब्रिटिश भारतात गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी नुकतीच रेल्वेची सुरुवात होती, तर दुसरीकडे उद्योगपटलावर जमशेदजी टाटांसारख्या दिग्गजांचा जन्म होत होता.
या परिस्थितीत कौटुंबिक व्यवसायात न अडकता वालचंद यांनी रेल्वेमध्ये कारकून असलेले आपले सहकारी लक्ष्मण बळवंत पाठक यांच्यासोबत, पाठक वालचंद प्रायव्हेट लिमिटेड ही कन्स्ट्रक्शन कंपनी चालू केली. संपूर्ण भारतीय असणारी ही कंपनी त्यावेळची गरज होती. त्यामुळं खूप कमी वेळात कंपनीनं जोम धरला.
कामाचे तसेच कर्मचाऱ्यांचे योग्य व्यवस्थापन, कामे वेळेत पूर्ण करण्याची सचोटी आणि आर्थिक रक्कम उभी करण्याचे सामर्थ्य यामुळं वालचंद यांच्या कंपनीने अल्पावधीतच गोऱ्या सरकारचा विश्वास कमावला. यामुळं झालं असं की, बांधकामाचे मोठमोठे प्रकल्प वालचंद यांच्या कंपनीला मिळू लागले. ‘बार्शी लाईट’ हा सात किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग बांधण्याचं काम त्यांनी अतिशय कुशलतेने आणि वेळेत पूर्ण करून दिले. या त्यांच्या कामाकडे पाहून त्यांना बोरीबंदर ते चिंचपोकळी व पुढे करी रोड ते ठाणे आणि मग ठाणे ते कल्याण या रेल्वेमार्गांच्या चौपदरीकरणाचेही काम मिळाले. ते सुद्धा त्यांनी चोख व वेळेत पूर्ण केले. या त्यांच्या उत्तम आणि वेळेत काम करण्याच्या लौकिकामुळे त्यांना रेल्वेची, सार्वजनिक बांधकाम खात्याची, धरणांची, पुलांची तसेच मुंबई महानगरपालिका इमारत बांधणीची व इतर कामेही मिळाली. अशा प्रकारच्या कार्यपद्धतीमुळे बांधकाम क्षेत्रात त्यांचा पूर्ण जम बसला.
काही कालवधीनंतर पाठक यांनी कंपनीतून आपली भागीदारी काढून घेतली. मात्र व्यवसायाची वाढती मागणी आणि आपल्या कंपनीचा विस्तार करण्यासाठी १९२० मध्ये वालचंद यांनी आपली ही कंपनी टाटा समूहामध्ये विलीन केली.
वालचंद यांच्या कंपनीने टाटा समूहासोबत अनेक मोठे प्रकल्प पूर्ण केले. जसे की मुंबई पुण्याला जोडणारा बोर घाटातील रेल्वे बोगदा, तानसापासून मुंबईला पाणी मिळण्यासाठी टाकलेल्या गेलेल्या मोठ्या पाईपलाईन, याशिवाय सिंधू नदीवरील कलबाग पुल, सध्याच्या म्यानमारमधील इरावती नदीवरील पूल हे सुद्धा वालचंद त्यांच्याच नेतृत्वाखाली पूर्ण झाले. १९३५ मध्ये टाटांनी आपला समभाग विकला, यानंतर या कंपनीचं नाव हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी असं ठेवलं गेलं. वालचंद यांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी चांगलीच नावारूपाला आली.
वालचंद यांनी 1908 मध्ये ‘वालचंदनगर इंडस्ट्रीजची’ स्थापना केली. जिथे साखर, साखर कारखाना मशिनरी, प्लास्टिकच्या वस्तू, सिमेंट प्लांट, पेपर, बॉयलर, टर्बाइन अशा अनेक वस्तू बनवल्या जातात.
1919 मध्ये पहिल्या महायुद्धानंतर जलवाहतुकीचं महत्त्व वाढू लागलं. ही संधी लक्षात घेऊन ग्वाल्हेरचे राज्यकर्ते शिंदे यांच्याकडून वालचंद यांनी एस एस लॉयल्टी ही बोट विकत घेतली आणि मालवाहतूक चालू केली. ब्रिटिशांच्या मक्तेदारीलाच आव्हान दिल्यामुळे त्यांच्यापुढे समस्यांचे अनेक डोंगर ब्रिटिश कंपन्यांनी उभे केले. त्यामुळे त्यांना खूप तोटा व त्रास सहन करावा लागला. वालचंद यांची ही कंपनी परदेशी कंपन्यांनासोबत दराबाबत चांगलीच स्पर्धा करत होती. सिंधिया स्टीम नॅव्हिगेशन या नावाने चालू केलेली ही भारतातली पहिली जलवाहतूक कंपनी.
SS Loyalty, 5 April 1919
5 एप्रिल 1919 रोजी एस एस रॉयल्टी या बोटीने मुंबई ते लंडन हा पहिला प्रवास पूर्ण केला आणि म्हणूनच पाच एप्रिल हा दिवस नॅशनल मेरीटाईम डे म्हणजेच समुद्री दिन म्हणून साजरा केला जातो. १९५० पर्यंत वालचंद या कंपनीचे प्रमुख होते. तोपर्यंत किनारी भागात केल्या जाणाऱ्या वाहतुकीचा २१ टक्क्यांहून अधिक भाग वालचंद यांच्या कंपनीने काबीज केला होता. महात्मा गांधीनी स्वतः हरिजन आणि बहिष्कार या वृत्तपत्रांमधून पहिली स्वदेशी कंपनी असा या कंपनीचा उल्लेख केला होता.
पुढे 1940 मध्ये विशाखापट्टणम येथे त्यांनी सिंधिया शिपयार्ड ही जहाजबांधणी कंपनी सुरु केली. ही देखील पहिली स्वदेशी शिपयार्ड कंपनी ठरली. या कंपनीने जलसा ही पहिली स्वदेशी बोट बांधली. पुढे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर १९६१ साली याचे राष्ट्रीयीकरण होऊन ती हिंदुस्तान शिपयार्ड कंपनी म्हणून नावारूपाला आली.
1939 साली वालचंद यांची भेट अमेरिकेतील विमान उत्पादकांशी झाली. त्यांच्याकडून विमान निर्मितीचे कौशल्य शिकल्यानंतर म्हैसूर संस्थानच्या मदतीने त्यांनी बंगळूरु येथे पहिली विमान निर्माण करणारी कंपनी बनवली. १९४१ मध्ये सरकाराने त्याचा एक तृतीयांश भाग विकत घेतला. पुढे 1942 मध्ये दुसऱ्या महायुद्धाची लढाऊ विमानांची गरज पूर्ण करण्यासाठी सरकारने संपूर्ण कंपनी विकत घेतली आणि हिंदुस्थान एअरक्राफ्ट हे नाव बदलून त्याला हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड असं नाव दिलं. आजही तिथे जागतिक दर्जाची विमाने बनतात.
१९३०-४०च्या दशकात वाहननिर्मिती उद्योग आपला जम बसवत होता. वाहन क्षेत्रातली संधी ओळखत वालचंद यांनी क्रायस्लर कंपनीशी करार केला आणि ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये देखील ते उतरले. १९४५ मध्ये त्यांनी मुंबईजवळ ‘प्रिमिअर ऑटोमोबाईल्स’ ही कंपनी स्थापन केली. मोटारीचे सुटे भाग बनवण्यापासून सुरू झालेल्या या कंपनीने पुढे फियाट या परदेशी कंपनीच्या सहकार्याने देशामध्ये पुढे बरीच वर्षे मोटारींचा पुरवठा केला. आज अजूनही त्यातील काही मोटारी भारताच्या रस्त्यांवर धावत आहेत.
Premier Padmini
आपल्या सर्वांचं लहानपण ज्या रावळगाव चॉकलेटने गोड केलं, ते चॉकलेटसुद्धा वालचंद यांचीच देण. १९३३ मध्ये त्यांनी रावळगाव येथे शुगर फॉर्म चालू केलं, तिथंच हे चॉकलेट बनवलं जात होत. सातारा इथलं कूपर इंजिनिअरिंग, कळंब साखर कारखाना यांसारखे अनेक उद्योग वालचंद हिराचंद दोषी यांच्या उद्योगसमूहाने यशस्वी केले.
ब्रिटिशांचा साम्राज्याखाली असणाऱ्या भारताची आर्थिक गुलामगिरीतून मुक्तता होण्यासाठी त्यांनी हरतऱ्हेने मदत केली. उद्योगासोबतच त्यांनी अनेक सामाजिक कामं देखील केली. भारत स्वतंत्र झाला तेव्हा वालचंद उद्योगसमूह हा देशातील पहिल्या दहा मोठ्या उद्योगांपैकी एक होता. १९४९ मध्ये, त्यांना पक्षाघाताचा झटका आला आणि १९५० मध्ये व्यवसायातून निवृत्त झाले. ८ एप्रिल १९५३ मध्ये उद्योग क्षेत्रातील या अवलियाने जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू लालचंद यांनी त्यांचा व्यवसाय सांभाळला.
शेठजी अतिशय गुणग्राहक होते, कट्टर राष्ट्रनिष्ठ होते. सचोटी, दर्जा, प्रामाणिकपणा यांमध्ये तडजोड कधीही न केल्याने त्यांना नेहमीच लोकांचा पाठिंबा मिळाला. आपल्या गतिमान व सर्जनशील बुद्धिमत्तेच्या व कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी भारतात एका नव्या औद्योगिक युगाचा प्रारंभ केला. उद्योजकांच्या अडचणी सोडविण्याकरिता इंडियन मर्चंट्स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्री (फिक्की) आदी संस्थांची उभारणी केली.
वालचंद शेठजींचं कार्य आणि त्यांचा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या औद्योगिक क्षेत्रातील सिंहाचा वाटा नेहमीच आपल्या स्मरणात राहील. खऱ्या अर्थाने वालचंद हिराचंद दोशी यांनी मेक इन इंडिया मॉडेल साकारले असे म्हणायला हरकत नाही.
तर ही होती आधुनिक भारताच्या औद्योगिकीकरणाचे शिल्पकार वालचंद हिराचंद दोशी यांची जीवन कहाणी. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा.
एखादा उद्योग जेव्हा उभा राहतो, तेव्हा तो फक्त एका माणसाला उभा करत नाही, तर तो एका समाजाला उभारी देतो. आणि त्यात जर तो उद्योग उभारण्यामागे हेतूच समाजाची प्रगती असेल मग तर, समाज प्रस्थापित सर्व जुनाट रूढी परंपरा मोडून एका नव्या पर्वाला सुरुवात करतो. असंच काहीसं कार्य केलं आहे, पहिले मराठी उद्योजक लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांनी.
लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांचा जन्म २० जून १८६९रोजी तेव्हा महाराष्ट्रात असणाऱ्या बेळगावमधील गुर्लहोसूर येथे झाला. पांडित्याचा व्यवसाय असणाऱ्या कुटुंबात जन्मलेल्या लक्ष्मणरावांचं मन काय त्यात लागायचं नाही. सतत कानावर पडणाऱ्या वेद आणि मंत्रांऐवजी त्यांचं मन यंत्रांत, चित्रात रमत होतं. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर पंडितांच्या मुलानं पांडित्यच करायचं या मानसिकतेच्या त्या काळात लक्ष्मणरावांनी बंडखोरी करत मुंबईच जे जे स्कूल ऑफ आर्टस् गाठलं. तिथं त्यांनी पेंटिंग आणि मेकॅनिकल ऑब्जेक्ट्स यासाठी प्रवेश घेतला. त्यांचं मन त्यांच्या आवडत्या विषयात म्हणजेच पेंटिंगमध्ये लागत होतं, तोच त्यांना सौम्य प्रकारचा रंगांधळेपणा जाणवू लागला. पण म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. या आजारामुळे त्यांनी पेंटिंगमधलं आपलं लक्ष पूर्णपणे मेकॅनिकल ऑब्जेक्ट डिझाईन म्हणजेच यंत्रांचं चित्र काढण्याकडे दिलं.
यामुळे मूलतः यंत्रांची आवड असणारे लक्ष्मणराव यंत्रांच्या अधिकच जवळ गेले. त्यांनी यांत्रिक चित्रकलेमध्ये इतकं प्राविण्य मिळवलं कि, त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबईच्या व्हिक्टोरिया ज्युबली टेक्निकल इन्स्टिट्यूट म्हणजेच VJTIमध्ये ते मेकॅनिकल ड्रॉईंगचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून महिना ४५ रुपये पगारावर तर रुजू झाले. ती वेळ अशी होती, जेव्हा ब्रिटिशांनी भारतात सायकल वापरायला सुरुवात केली होती. ते यंत्र बघून लक्ष्मणरावांनी सरळ त्याची डीलरशिप घेतली. मुंबईत सायकल खरेदी करून ते बेळगावला पाठवत. तिथं त्यांचा भाऊ रामूअण्णा ती सायकल ७०० ते हजार रुपयांना विकत होते, तर तिथल्या लोकांना सायकल शिकवायचे १५ रुपये घ्यायचे.
१८८८ मध्ये लक्ष्मणरावांनी आपली नोकरी सोडली आणि बेळगाव गाठलं. तिथं त्यांनी आणि रामूअण्णांनी मिळून एक छोटं सायकल रिपेअरचं दुकान चालू केलं आणि व्यावसायिक क्षेत्रात आपलं पहिलं पाऊल टाकलं. त्यांचा हा छोटासा व्यवसाय चांगला चालू होता. तोच महानगरपालिकेने अतिक्रमण म्हणून त्यांचं दुकान काढून टाकलं.
भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांच्या कामी येतील अशी यंत्रे बनवण्याची त्यांची इच्छा होती. १९०१ मध्ये त्यांनी त्याकाळच्या औरंगाबाद स्टेटमध्ये एक छोटं दुकान चालू केलं. जनावरे वैरणीतील बुडख्याकडील मोठा भाग खात नाहीत आणि तो वाया जातो हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यातून त्यांचे पहिले यंत्र तयार झाले ते कडबा कापण्याचे. त्याचबरोबर ते शेतीसाठी लागणारी रहाट, चरख आणि लोखंडाचा नांगर बनवत होते. पण त्यावेळच्या शेतकऱ्यांमध्ये अशी अंधश्रद्धा होती की लोखंडाचा नांगर वापरला, की माती विषारी बनते आणि तिची उत्पादनक्षमता कमी होते. शेतकऱ्यांच्या मनातला हा गैरसमज दूर करायला लक्ष्मणरावांना तब्ब्ल २ वर्ष लागली, नंतर मात्र शेतकऱ्यांनी तो नांगर स्वीकारला.
लक्ष्मणरावांना आपला व्यवसाय वाढवायचा होता, पण दिशा मिळत नव्हती. तेव्हा त्यांनी औंधचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचा दरबार गाठला. दूरदृष्टी असणाऱ्या राजांनी लक्ष्मणरावांच्या अंगची कला आणि त्यांचं यंत्रांप्रती असणारं प्रेम पाहून संस्थानाचा नकाशा मागवून हवी ती जागा निवडायला सांगितलं. लक्ष्मणरावांनी कुंडल रोडजवळील ३२ एकर ओसाड जमीन निवडली. राजांनी व्यवसाय उभारण्यासाठी १० हजार रुपयेसुद्धा दिले.
कुंडलजवळची ही जमीन म्हणजे निवडुंगांनी गच्च भरलेलं ओसाड माळरान. तिथं राहायचे ते भयानक विषारी असे साप आणि सरडे. या भकास माळरानावर औद्यगिक नगरीरुपी नंदनवन उभं करायचं स्वप्न उराशी घेऊन लक्ष्मणराव आणि रामूअण्णा कामाला लागले.
कुंडल रोड रेल्वे स्टेशन
किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशन
त्यावेळी देखील जास्त शिकलेली माणसं देखील गोऱ्यांच्या दरबारी नोकऱ्या करत. आपल्याला जास्त शिकलेल्या माणसांपेक्षा, ज्यांचा दृष्टिकोन आपल्यासारखा असेल अशी माणसं पाहिजेत या हेतूने घेऊन दोघे भाऊ माणसं एकवटण्याच्या कामाला लागले. रामूअण्णांनी स्वतः जातीने या नगरीचं नियोजन आणि प्रशासन पाहिलं. शंभूराव जांभेकर हे प्लॅनिंग इंजिनिअर म्हणून रुजू झाले, तर के.के. कुलकर्णी हे मॅनेजर म्हणून. मंगेशराव रेगे यांनी क्लार्क आणि अकाउंट विभाग पाहिला, तर इंजिनिअरिंग अर्धवट सोडलेल्या अनंतराव फाळणीकर यांनी इमॅजिनेटिव्ह इंजिनिअरिंग विभाग सांभाळला. लक्ष्मणरावांचा माणुसकीवर इतका विश्वास होता कि, तुरुंगातून सुटलेल्या तुकाराम रामोशी आणि पिऱ्या मांग यांना या नगरीच्या सुरक्षिततेची जबाबदारी दिली. अशा प्रकारे अनंत अडचणींवर उभी राहत होती ती ‘उद्यम नगरी’ म्हणजेच किर्लोस्करवाडी!
किर्लोस्करवाडी हे भारतातलं जमशेदपूर नंतरचं दुसरं औद्योगिक शहर आपल्या महाराष्ट्रात उभं राहत होतं. जमशेटजी टाटांप्रमाणेच लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी त्यांच्या स्वत:च्या उद्योगसमूहासाठी स्वतंत्र नगरी उभारण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यातून ‘किर्लोस्करवाडी’चा जन्म झाला. पहिल्यांदा आपल्या ३० कर्मचाऱ्यांची कुटुंबासहित राहायची सोय करत किर्लोस्करवाडी वाढत होती. लक्ष्मणरावांनी कारखान्याजवळच कामगारांची राहण्याची सोयही केली. कर्मचाऱ्यांना कामावर येण्या-जाण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागत नसल्याने त्यांच्या कामाची गुणवत्ताही वाढीस लागली. लक्ष्मणरावांनी परिसरात शाळा, क्रीडांगणे, पोस्ट ऑफिस अशा सुविधा निर्माण केल्या. मोठे रस्ते, प्रशस्त घरे, उद्याने, विद्यार्थ्यांसाठी शाळा-वाचनालय अशा सर्व सोयींनी सुसज्ज किर्लोस्करवाडी एक आदर्श नगर ठरले. लक्ष्मणराव स्वत:ही तेथे राहू लागले. प्रखर जातीवाद आणि स्पृश्य-अस्पृश्यता असणाऱ्या त्या वेळच्या समाजात किर्लोस्करवाडी हे असं ठिकाण होतं, जिथं कोणताही जातीभेद पळाला जात नव्हता. जिथं फक्त एकच जात होती माणुसकीची. एकमेकांच्या चुलीशेजारी चुली मांडून स्वंयपाक बनू लागला. आपोआपच मने जुळत गेली.
१५ जानेवारी १९२० मध्ये लक्ष्मणरावांची कंपनी कागदोपत्री रजिस्टर झाली आणि उदयाला आली ती किर्लोस्कर ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेड. पहिल्या महायुद्धानंतर किर्लोस्कर समूहाने ऊसाचा रस काढण्याचे यंत्र, छिद्र पाडण्याचे मशीन अशी साधने तयार केली. पहिल्या महायुद्धानंतर किर्लोस्कर समूहाने ऊसाचा रस काढण्याचे यंत्र, छिद्र पाडण्याचे मशीन अशी साधने तयार केली. हातपंपांची सुद्धा निर्मिती केली. एकूण वीस विविध प्रकारचे नांगर, दहा प्रकारचे हातपंप यांसह चाळीस उत्पादने कंपनीमार्फत बनू लागली.
लक्ष्मणरावांचं लग्न राधाबाई यांच्याशी झालं होतं. यंत्र हेच पाहिलं प्रेम असणाऱ्या लक्ष्मणरावांचा संसार राधाबाई यांनी नेटाने फुलवला. लक्ष्मणरावांना ५ मुलं. ४ पुत्र आणि एक कन्या. यातील मोठे शंतनुराव आणि पुतण्या यांना लक्ष्मणरावांनी शिकायला अमेरिकेतील Massachusetts Institute of Technology म्हणजेच MIT मध्ये पाठवलं. तिथून शिक्षण घेऊन आल्यानंतर शंतनुरावांनी किर्लोस्कर ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेडला जणू काही पंखच दिले.
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत लक्ष्मणराव स्वदेशीचे खंदे प्रचारक होते. लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतः किर्लोस्करवाडीला भेट देऊन त्यांच्या कार्याचा भरभरून गौरव केला. लक्ष्मणरावांची किर्लोस्करवाडी ही यंत्रांसोबतच क्रीडा कला यामध्ये सुद्धा संपन्न होत होती. क्रिकेट, फुटबॉल सारखे खेळ तिथं खेळले जायचे, किर्लोस्करवाडीचा रंगमंच हा बाबुराव पेंटर यांनी बनवलेला त्याकाळचा सर्वात सुबक आणि सुनियोजित रंगमंच होता. हा असा रंगमंच होता जिथं फक्त स्त्रिया आपल्या कला सादर करायच्या आणि ही त्याकाळची अत्यंत क्रांतिकारी गोष्ट होती. किर्लोस्करवाडीचा स्वतःचा प्रिंटिंग प्रेस होता, जिथं किर्लोस्कर खबर नावाने एक वृत्तपत्र चालत होतं, तर स्त्री नावाने निघणारं मासिक हे खास स्त्रियांसाठी चालवलं जात होतं. लक्ष्मणरावांनी किर्लोस्करवाडीत आधुनिक पद्धतीने शेती करायला देखील चालना दिली. तिथली जमीन पाहता त्यांनी द्राक्ष पिकाचं उत्पन्न घेऊन कित्येक शेतकऱ्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण केली.
लक्ष्मणरावांचं व्यापाराचं तंत्र अगदी साधं होतं. प्रॉफिट मार्जिन कमी ठेवायचं आणि व्यवसाय वाढवायचा. आपल्या कर्मचाऱ्यांसोबत बोलताना ते नेहमी तुमची कंपनी असा उल्लेख करत. किर्लोस्करवाडीत होणारे सण समारंभ, कर्मचाऱ्यांना मिळणारी वागणूक, प्रत्येक ठिकाणी केला जाणारा कर्मचाऱ्यांचा विचार यामुळं इथल्या प्रत्येक माणसाला ही कंपनी त्याची वाटायची. किर्लोस्कर ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेड हळू हळू पुणे, बंगलोर येथे देखील पसरू लागली.
सायकलच्या डिलरशिप पासून सुरु झालेला लक्ष्मणरावांचा प्रवास कुट्टी मशीन, ऊस तोडणी मशीन, लेथ मशीन, टेक्स्टाईल मशीन, भुईमूग सोलणी मशीन, हॅन्ड पंप, हॉस्पिटल फर्निचर करत वाढत गेला. लक्ष्मणरावांनी रचलेल्या किर्लोस्करवाडीच्या पायाला मुलगा शंतनुराव यांनी त्याला भक्कम आधार दिला, तर पुढच्या पिढ्यांनी त्याच्यावर कळस चढवला. भारतातील पहिला लोखंडी नांगर, पहिला पंप, पहिलं डिझेल इंजिन, पहिलं इलेक्ट्रिक इंजिन आणि पहिलं लेथ मशिनसुद्धा किर्लोस्करांनीच बनवलं. आज भारतात टोयोटा कंपनीच्या गाड्यासुद्धा किर्लोस्करांचीच कंपनी बनवते.
किर्लोस्करवाडीचा ४०वा वर्धापन दिन
लक्ष्मणरावांना औंध संस्थानचे दिवाण म्हणून 1935मध्ये नेमण्यात आले. किर्लोस्करवाडीच्या ४० व्या वर्धापन दिनी ८१ वर्षाचे लक्ष्मणराव आणि ९१ वर्षाचे रामूयाण्णा किर्लोस्करवाडीला भेट द्यायला आले. आजारी असणाऱ्या लक्ष्मणरावांना त्यांचा मुलगा पुण्यात औषधोपचारासाठी बोलवत होता, तेव्हा ८१ वर्षाच्या या तरुणाचे उद्गार होते कि, “जोपर्यंत पहिलं ऑइल इंजिन तयार होऊन बाहेर येत नाही, तोपर्यंत मी इथून कुठंही जाणार नाही.” अखेरीस डिसेंबर १९४८ ला पाहिलं इंजिन तयार झालं आणि लक्ष्मणराव पुण्याला गेले. बंगलोर वरून पुण्याला जाताना त्यांनी आपलं विमान किर्लोस्करवाडीवरून घ्यायला सांगितलं. एका ओसाड जमिनीला यंत्र, तंत्र आणि माणसांच्या साहाय्यानं जिवंत झालेलं पाहून ते भरून पावले. तिथल्या उंच इमारती, रस्ते, कंपन्या, माणसांची वर्दळ हे सारं डोळ्यात भरून अभिमानाने ते पुण्यात आले.
आज किर्लोस्कर ग्रुप ७० देशांत पसरलेला असून ग्रुपच्या २६ कंपन्यांमध्ये १८००० हून अधिक जण काम करत आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण जगातील अनेक मोठमोठ्या इमारतींमध्ये; मग ते दुबईतील बुर्ज खलिफा असो की अमेरिकेतील न्यू वर्ल्ड ट्रेड सेंटर… सिंगापूरचं मरीना बे असो की ऑस्ट्रेलियातील ओपेरा हाऊस… तिथे किर्लोस्करांचेच पंप तुम्हाला बघायला मिळतील…. एक भारतीय म्हणून आणि त्याठी एक मराठी माणूस म्हणून ही आपणा सर्वांसाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे.
‘काम करत राहा, प्रयत्न कधीही सोडू नका. यश स्वतःहून तुमच्याकडे चालत येईल’ हे सांगणाऱ्या भारताच्या या ‘हेन्री फोर्ड’ने अखेरीस २६ सप्टेंबर १९५६ रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन भारत सरकारने २० जून १९८९ मध्ये त्यांच्यावर पोस्टाचे तिकीट काढले. या महान उद्योजकाचा आदर्श घेऊन भविष्यात हजारो मराठी उद्योजक तयार होतील अशी खात्री आहे.
तर ही होती लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांची जीवनकहाणी. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.
तो काळ होता १८४०चा. भारत पूर्णपणे ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. इंग्रज भारतीयांची सर्वच बाबतींत पिळवणूक करत होते. समाज या अन्यायाविरुद्ध लढत होता, तर यातील एक भारतीय देशाच्या अर्थव्येवस्थेचा पाया रचत होता. ते द्रष्टे भारतीय म्हणजे टाटा ग्रुपचे संस्थापक आणि भारतीय उद्योगाचे जनक जमशेटजी टाटा.
गुजरातमधल्या नवसारी या छोट्या गावात नुसेरवान यांचा जन्म झाला. वयाच्या ५व्या वर्षी जीवनबाई या चिमुरडीसोबत त्यांचा विवाह झाला. वयाच्या १७ व्या वर्षी म्हणजे ३ मार्च १८३९ रोजी नुसेरवानजी वडील झाले आणि जन्माला आले ते भारताच्या उद्योगविश्वाचे भीष्म पितामह म्हणून नावलौकिक मिळवलेले जमशेटजी टाटा.
नवसारीतील पारशी परिवारासाठी आपल्या गावाची वेस ओलांडणं म्हणजे एक दिव्यच. हे दिव्य नुसेरवान यांनी पार केलं. सात पिढ्यांत व्यापार कशाशी खातात हेही कुणाला माहित नव्हतं. घरात पौरोहित्याची परंपरा असूनही व्यापाराचं खूळ त्यांच्या डोक्यात शिरलं आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते आपल्या परिवारासहित मुंबईला आले. तेव्हा जमशेटजी ८ वर्षांचे होते. हा तोच काळ होता जेव्हा इंग्रजीचं शिक्षण भारतीयांना द्यायला सुरुवात झाली होती. हेच वाघिणीचं दूध प्यायला जमशेटजी तयार होत होते. त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते वडिलांना उद्योगधंद्यात मदत करू लागले.
आपल्या मुलाच्या अंगचे व्यावसायिक गुण बघून नुसेरवान यांनी त्यांना थेट परदेशात व्यापारासाठी पाठवलं. अतिपूर्वेकडे असणाऱ्या हाँगकाँग या देशात गेलेले जमशेटजी पहिल्या परदेश दौऱ्यातच तिथं कंपनी स्थापन करुन आले, जमशेटजी आणि अर्देशीर या नावाने. औद्योगिक क्रांतीच्या दारात उभ्या असणाऱ्या जगामध्ये कापसाचं महत्व ओळखून त्यांची कंपनी कापसाचा व्यापार करत होती, तर चीनसाठी लागणाऱ्या अफूला देखील त्यांनी तितकंच महत्त्व दिलं. व्यवहार चातुर्य, संधी ओळखण्याचे कसब यामुळे जमशेटजींनी काही महिन्यांतच आपल्या पहिल्या कंपनीची शाखा शांघायमध्ये आणि दुसरी नंतर लगेच लंडनमध्ये उघडली. युरोपला कापड आणि चीनला अफू विकून तिथून चहा, वेलदोडे, सोनं, तयार कापड ते भारतात आणून विकत. यातून त्यांना भरपूर नफा मिळाला.
याच दरम्यान चालू होतं ते अमेरिकेचं यादवी युद्ध. भारतातील अनेक व्यापाऱ्यांचं दिवाळं निघालं. याची झळ टाटा परिवारालासुद्धा बसली, पण नुसेरवान आणि जमशेट पिता-पुत्राने यातून देखील मार्ग काढला. राहतं घर विकून सर्वांची देणी चुकती केली. यामुळे लोकांचा टाटा नावाशी विश्वास जोडला गेला.
१८६५ मध्ये यंत्रविद्येचे ज्ञान मिळविण्यासाठी जमशेटजी मँचेस्टरला गेले. इंग्लंडमध्ये ते चार वर्षे होते. स्वदेशी परतल्यावर कापडाची वाढती मागणी लक्षात घेता त्यांनी कापड गिरण्या सुरु करायचं ठरवलं. अंदाज घेण्यासाठी त्यांनी २१००० रुपयांत मुंबईच्या चिंचपोकळी भागातील दिवाळं निघालेली एक तेलगिरणी विकत घेऊन अलेक्झांड्रिया मिल असं तिचं नामकरण केलं. बऱ्यापैकी फायदा कमवून २ वर्षांनी ती विकून टाकली. त्यानंतर नागपूरला कापड मिल उभी करण्यासाठी जागा घेतली. त्याकाळी सगळ्या कापड गिरण्या मुंबईमध्ये होत्या. अशा वेळी नागपूरमध्ये मिल उभी करण्याला अनेकांचा विरोध असून देखील त्यांनी हीच जागा पक्की करत मोठ्या कष्टाने मिल उभी केली. कापसाचं मोठ्या प्रमाणावर उत्पन्न, वाहतुकीची सोय, पाण्याची उपलब्धता यामुळे जमशेटजी यांनी घेतलेला निर्णय अगदी योग्य ठरला. ब्रिटनची महाराणी व्हिक्टोरियाच्या गौरवार्थ आणि त्या काळाची गरज लक्षात घेता त्यांनी त्या मिलला एम्प्रेस मिल असं नाव दिलं. १८७७ मध्ये उभी राहिलेली ही गिरणी सप्टेंबर २००२मध्ये अखेर बंद पडली. या दोन गिरण्यांच्या अनुभवावरच कुर्ला येथील ‘धरमसी मिल’ ही जुनी गिरणी विकत घेऊन तिचे ‘स्वदेशी मिल’ असे नामकरण केले, तर अहमदाबादला ‘ॲडव्हान्स मिल’ सुरू केली गेली.
Empress Mill, Nagpur
Svadeshi Mill, Mumbai
आपल्या कारखान्यात काम करणारा प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे याची जमशेटजींना जाणीव होती. कर्मचाऱ्यांना अपघात विमा देणे, कामाचे तास कमी ठेवणे, त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे, कामाची जागा हवेशीर ठेवणे यांसारख्या गोष्टींमुळे त्यांच्या मिल या जगभरातील सर्वात सुनियोजित मिल म्हणून ओळखल्या जात होत्या. ज्या सुविधा पश्चिमी देशात देखील त्यांच्या कामगारांना मिळत नव्हत्या, त्या जमशेदजी त्याकाळी आपल्या कर्मचाऱ्यांना देत होते.
आर्थिक स्वतंत्रता हीच राजनीतिक स्वतंत्रतेचा आधार आहे हे जमशेटजी जाणत होते. दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता यांच्या विचारांचा प्रभाव जमशेटजींवर होता. जमशेटजींची ४ मोठी स्वप्नं होती. स्टील उद्योग उभा करणं, जागतिक दर्जाचं शैक्षणिक केंद्र उभं करणं, हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट उभा करणं आणि जागतिक कीर्तीचं हॉटेल उभं करणं. दुर्दैवाने यातील हॉटेल सोडल्यास इतर तीन स्वप्नं त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकली नाहीत, पण त्याची बीजं मात्र त्यांनी रोवली होती. आणि ‘शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी’ या म्हणीप्रमाणे त्यांच्या येणाऱ्या पिढीने ही सगळी स्वप्नं पूर्ण केली.
आपल्या अपमानाचा बदला म्हणून भारतीयांसाठी एक भलंमोठं हॉटेल बांधायचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. त्या काळातील ४ कोटी रुपये खर्च करुन ३ डिसेंबर १९०३ रोजी उद्घाटन झालेले ‘दि ताजमहल पॅलेस’ हे वीज वापरणारे देशातले पहिले हॉटेल होते! हे जगविख्यात हॉटेल कसं उभं राहिलं याची कहाणी आम्ही एका व्हिडीओमध्ये सांगितली आहे. त्याची लिंक खाली आहे. तो व्हिडीओ नक्की पहा.
मुंबईची वाढती विजेची गरज पूर्ण करण्यासाठी जमशेटजींनी २ कोटी रूपये भांडवल उभे करून फेब्रुवारी १९११ला खोपोली येथे जलविद्युत प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली. खंडाळा, लोणावळा येथे पडणारे पावसाचे पाणी १८०० फूट ऊंचीवरून खाली खोपोली येथे ७ पाइपलाइन टाकून आणायचे, तेथे जनित्राद्वारे वीज निर्माण करायाची व ती मुंबईला पोहोचवायची अशी ही योजना होती. त्याकरता वळवण येथे दोन धरणे बांधण्यात आली. १९११ साली केलेल्या या कामांत आजही कोठे गळती नाही, की कोणताही पाइप फुटला नाही. प्रचंड वेगाने कित्येक वर्षे या पाइपांतून पाणी येत आहे व ८००० मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. हे काम टाटांच्या ७ हजार लोकांनी ४ वर्षात पूर्ण केले. १९११ साली दळणवळणाची साधने, टेक्नॉलॉजी, परिस्थिती आणि इतर सोयींचा विचार केला, तर ह्या अफाट कामाची व दूरदृष्टीची टाटांची समज किती मोठी होती हे लक्षात येते.
Tata Power hydro plant, Khopoli
ब्रिटिश जहाजउद्योगाला टक्कर देण्याकरिता त्यांनी आपली ‘टाटा लाइन’ ही जहाजकंपनीही उभारली होती. तथापि ब्रिटिश सरकारच्या वाहतूकदरांच्या स्पर्धेत जमशेटजींना आपल्या स्वदेशी जलवाहतूक कंपनीची प्रगती साधणे शक्य झाले नाही व तो नाद त्यांना सोडावा लागला.
भारतात प्रगत विज्ञान संशोधन केंद्रासाठी जमशेटजींना ‘रॉयल सोसायटी ऑफ इंग्लंडसारखी’ एक संशोधन संस्था भारतात उभी करण्याची होती. यासाठी त्यांनी स्वामी विवेकानंदांचे मार्गदर्शन घेतले. या संस्थेसाठी जमशेटजींनी तेव्हा सव्वा लाख रु. दिले. अनेक दानशूर लोकांनी देणग्या दिल्या. पैसे कमी पडले म्हणून टाटांनी मुंबईतील आपल्या सतरा इमारती विकल्या. मंजुरीसाठी इंग्रज सरकारकडून उशीर झाला, तरी १९११ मध्ये बंगलोर येथे या संस्थेच्या इमारतीचा पाया घालण्यात आला आणि त्याच वर्षी २४ जुलैपासून संस्था कार्यान्वित झाली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अर्थात ‘भारतीय विज्ञान संस्था’ या नावाने ओळखली जाणारी ही ४४० एकरात पसरलेली संस्था आजही जगद्विख्यात आहे.
Indian Institute of Science (IISc), Bangalore
अर्थव्यवस्थेची प्रगती सातत्याने चालू राहण्यात लोखंड व पोलाद उद्योगाचा फार मोठा वाटा असल्याने जमशेटजींच्या ध्यानात आले होते. अनेक वर्ष शोधाशोध करून आणि संशोधन करून शेवटी बिहारच्या सिंगभूम जिल्ह्यातील साक्ची या छोट्याशा गावात कारखाना उभारण्याचे ठरले. १९११ साली ‘द टाटा आयर्न अँड स्टील कंपनी’ (टिस्को) हा कारखाना सुरू झाला. बघता बघता त्या गावाचं एका मोठ्या शहरात रुपांतर झालं आणि तेथील रेल्वेस्टेशनला ‘टाटानगर’ नाव देण्यात आलं. सध्या झारखंडमध्ये असलेल्या या शहराचं नाव जमशेटजींच्या गौरवार्थ ‘जमशेदपूर’ असं देण्यात आलं. आज टाटा स्टील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीत खनिज लोखंडापासून उत्कृष्ट पोलादापर्यंतच्या सर्व प्रक्रिया या पार पाडल्या जातात. टाटा स्टील आज भारतातील दुसरी मोठी कंपनी आहे.
प्रचंड अभ्यासू असणाऱ्या आणि जगभर फिरणाऱ्या जमशेटजींनी साताऱ्यातील पाचगणीचं महत्त्व त्या काळात ओळखलं होतं. तिथल्या हवामानात कॉफी आणि स्ट्रॉबेरी चांगली लागेल याची त्यांना खात्री होती. कॉफीत त्यांना यश मिळालं नाही, पण स्ट्रॉबेरी रुजली. फ्रान्समधून रेशमाचे किडे आणून बंगलोर, म्हैसूरमधील शेतकऱ्यांना त्यांनी रेशीम लागवडीचे धडे द्यायला सुरुवात केली. आज म्हैसूरच्या रेशमी साड्यांमुळे हा परिसर रेशीम उद्योगाचं केंद्र बनलाय, त्याच्या मुळाशी जमशेटजीच आहेत.
कर्मचार्यांच्या हक्क आणि अधिकारांसाठीही टाटा सदैव जागरूक राहिले. कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही ठीकठाक जगता यावं यासाठी भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ ही संकल्पना जमशेटजींनी जन्माला घातली. ही संकल्पना त्यावेळी पाश्चात्य देशांतसुद्धा सुरु झाली नव्हती. काम करताना काही अपघात झाल्यास त्यासाठी नुकसानभरपाईची सोय केली. जमशेटजी म्हणायचे, ‘आपण आपले भागधारक, कामगार यांच्या हिताचा विचार केला; तर प्रगतीचा मळा अधिक फुलतो.’
जमशेटजींनी आपला उद्योग अशा काळात चालू केला जेव्हा उद्योग क्षेत्र फक्त युरोपियनांचीच मक्तेदारी होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर खऱ्या अर्थाने तो औद्योगिकदृष्ट्या तारला गेला तो जमशेटजींच्या दूरदृष्टीने. टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा पॉवर, टाटा केमिकल्स, टाटा टी, टायटन इंडस्ट्रीज, टाटा कम्युनिकेशन्स, ताज हॉटेल्स आणि अशाच अजून १०० कंपन्या आणि त्यात काम करणारे ८ लाखांहून अधिक कर्मचारी ही आहे टाटांची देन.
जमशेटजींनी त्यांच्या दूरदृष्टीने टाटा सन्स लि. ची स्थापना करून तिच्याकडे आपल्या सर्व कंपन्यांचे व्यवस्थापन सोपविले. या संस्थेचे ८५ टक्के भांडवल टाटा कुटुंबातील मंडळींनी उभारलेल्या धर्मादाय न्यासांच्या मालकीचे असल्याने टाटा समूहातील विविध उद्योगांना होणारा फायदा या न्यासांकडे म्हणजे पर्यायाने जनतेकडे पोहोचविला जातो. एका प्रसिद्ध संस्थेच्या रिपोर्टमध्ये गेल्या १०० वर्षातील जगातील सर्वात दानशूर व्यक्ती म्हणून जमशेटजी टाटांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं.
१९ मे १९०४ रोजी जर्मनीतील न्यूहॅम येथे वयाच्या पासष्टाव्या वर्षी या महान उद्योगपतीचे निधन झाले. ‘भारतीय व्यापार व उद्योग यांच्या भरभराटीसाठी कोणत्याही तत्कालीन भारतीयाने जमशेटजींइतके प्रयत्न केले नाहीत’, हे लॉर्ड कर्झनचे उद्गार यथार्थाने जमशेटजींची थोरवी व्यक्त करतात. त्यांच्या पश्चात दोराबजी व रतनजी या त्यांच्या दोन मुलांनी वडिलांची परंपरा यशस्वीपणे पुढे चालविली.
शंभर सव्वाशे वर्षापूर्वी आपल्यातल्याच एका माणसाने एक स्वप्न पाहिलं. त्यासाठी त्याच्यासह पुढच्या कित्येक पिढ्यांनी जिवाचं रान केलं आणि आजचं हे नंदनवन उभं राहिलं. फक्त देशाची आर्थिक बाजू भक्कम करणारं हे स्वप्न मुळीच नव्हतं, तर देशाच्या सामान्य नागरिकाला सन्मानानं जगता यावं, त्याच्या सर्व गरजा त्याच्या आवाक्यातच पूर्ण व्हाव्यात असा त्यांचा दृष्टीकोन होता. संपत्ती निर्मिती हा टाटांचा उद्देश कधीच नव्हता, उलट समाजाकडून आलेले पैसे समाजालाच परत करावयाचे हे त्यांचे धोरण होते. कोणतीही पार्श्वभूमी नसताना उद्योग क्षेत्रातला ध्रुवतारा असणारे, भारतीय उद्योगाचे भीष्म पितामह म्हणजे जमशेदजी टाटा यांच्या चिरकाल टिकणाऱ्या कार्याला आणि प्रेरणेला आपल्यातही उतरवण्याचा प्रयत्न करूया.
तर ही होती जमशेदजी टाटा यांची जीवन कहाणी. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा.
ही गोष्ट आहे एका अशा मुलाची जो चॉकलेट गोळ्या विकून जगातील सगळ्यात मोठा तेलाचा व्यापारी बनला. काळ्या सोन्याचा राजा असणाऱ्या, या माणसाचं नाव आहे जॉन डी. रॉकफेलर.
जॉन डेव्हिसन रॉकफेलर यांचा जन्म १८३९ मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे झाला. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या रॉकफेलर यांना लहानपणापासूनच घर चालवण्यासाठी काम करावं लागत होतं. त्यांच्या वडिलांचा औषधं विकण्याचा व्यवसाय होता; पण त्यात त्यांचा जम बसत नव्हता. त्यामुळं त्यांना अनेक शहरात फिरावं लागत होतं.
अखेरीस १८५४ मध्ये हे कुटुंब ओहिओ इथं येऊन स्थिरावले. जॉन यांना आपलं शालेय शिक्षण पूर्ण करायचं होत, पण परिस्थितीमुळं त्यांना ते करता आलं नाही. पोट भरण्यासाठी हाताला काम पाहिजे म्हणून त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी बुक किपिंगचा एक कोर्स केला आणि एका कंपनीमध्ये बुक किपर म्हणून रुजू झाले. लहानपानपासूनच त्यांना दानधर्म करायची भारी आवड होती. तेव्हाच त्यांनी ठरवलं होतं कि आपण जितक कमावू त्याच्यातील १०% उत्पन्न हे दान करायचं.
२६ सप्टेंबर या दिवशी त्यांना नोकरी मिळाली होती, म्हणून ते हा दिवस “जॉब डे” म्हणून साजरा करत. सुरुवातील प्रतिमहिना १६ डॉलर्स आणि नंतर ३१ डॉलर्स प्रतिमहिना पगारावर दोन वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करायच ठरवलं. त्यांनी बँकेतून लोन घेऊन, आपल्या सहकाऱ्यांसोबत स्वतःची कंपनी चालु केली. ही कंपनी धान्य खरेदी विक्री करायचं काम करत होती. अमेरिकेतील १८५७च्या मंदीच्या काळातसुद्धा रॉकफेलर यांचा व्यवसाय जोमात चालू होता.
त्याच दरम्यान, म्हणजे १८५० ते १८६० मध्ये चालू झालं ते “पेनसिल्वनिया ऑईल रश”. पेनसिल्वनियामध्ये तेलाच्या खाणी सापडल्या. त्यामुळे सगळे व्यापारी तेल खणण्याच्या व्यवसायाकडे वळले. पण तेल खाणकाम व्यवसाय बऱ्यापैकी नशिबावर अवलंबून असल्याने त्या मार्गाने न जाता रॉकफेलर यांनी तेल शुद्धीकरणाचे कारखाने चालू केले. आणि यातूनच जन्म झाला तो “स्टँडर्ड ऑइल”चा. चोवीस वर्षीय रॉकफेलर यांच्यासाठी हा खरा टर्निंग पॉइंट होता आणि अमेरिकेसाठीसुद्धा.
रॉकफेलर यांचा रिफायनरी व्यवसाय उत्तरोत्तर वाढत होता. यातून मिळणारा नफाही तितकाच मोठा होता, पण प्रश्न होता तो ट्रान्सपोर्टचा. या काळात रेल्वे इंडस्ट्री ही काही ठराविक लोकांच्या अधिपत्याखाली होती. त्यांच्या मर्जीशिवाय वाहतूक करणे शक्य नव्हते, यावेळी व्यवहार चातुर्य वापरून रॉकफेलर यांनी या लोकांसोबत बोलणी करून फक्त स्टॅंडर्ड ऑइल कंपनीसाठीच कमी दरात वाहतूक करण्याची परवानगी मिळवली. यामुळे स्टँडर्ड ऑइलचे केरोसीन हे सर्वात कमी किमतीला लोकांना उपलब्ध झालं.
त्यानंतर त्यांनी ऑइल हे पाईपलाईनद्वारे कसं ट्रान्सपोर्ट केलं जाऊ शकतं हे पाहिलं. पाइपमधून ऑईल ट्रान्सपोर्ट करण्याचा हा जगातील पहिलाच प्रयोग होता. तेलाचं शुद्धीकरण करताना खूप तेल वाया जात होतं. यावेळी रॉकफेलर यांनी एक कमिटी बसवून वाया गेलेल्या तेलापासून पासून काय बनवता येईल हे पाहिलं आणि तेव्हा जन्माला आलं ते tar म्हणजेच डांबर, पेट्रोलियम जेली आणि पॅराफीन वॅक्स.
Pipeline of Standard Oil, Img. Source : Britannica
Horizontal Integration पद्धतीचा वापर करून छोट्या आणि डबघाईला जाणाऱ्या सगळ्या कंपन्या takeover करत रॉकफेलर आपला व्यापार वाढवत होते. त्यांचा टेकओव्हरचा वेग इतका होता की दर महिन्याला ३-४ कंपन्या विकत घ्यायचे. आलेला सगळा नफा पुन्हा व्यवसाय वाढवण्यासाठी वापरत होते. याचा परिणाम असा झाला की, १८९०च्या दशकात अमेरिकेतील ९०% ऑइल रिफायनरी या फक्त स्टँडर्ड ऑईल कंपनीच्या होत्या; तर अमेरिकेत पुरवठा होणाऱ्या एकूण केरोसीनपैकी ९८ टक्के केरोसीन हे स्टँडर्ड ऑइल विकत होतं.
अशाप्रकारे स्टॅंडर्ड ऑइलची अमेरिकेत मक्तेदारी तयार होत होती. ती इतकी झाली की, स्टँडर्ड ऑइल अंतर्गत वीस हजार तेलाच्या विहिरी, ४००० ट्रान्सपोर्ट पाईपलाईन, तर जवळपास एक लाख कामगार काम करत होते.
१९०२साली इडा डारबेल या महिलेने स्टॅंडर्ड ऑइलवर काही लेख लिहिले. त्याच पुढे पुस्तक सुद्धा प्रकाशित झालं. यात तिने असा आरोप केला होता की, स्टँडर्ड ऑइलने अनेक कंपन्या जबदस्तीने विकत घेतल्या आहेत. यानंतर काही पत्रकारांनी सुद्धा रॉकफेलर यांच्यावर अनेक आरोप केले.
अखेरीस या मक्तेदारीला आळा घालण्यासाठी अमेरिका सरकारने “शेअरमन अँटी ट्रस्ट ऍक्ट” पारित केला. यामुळे स्टँडर्ड ऑइल ३४ वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विभागली गेली. विभाजनानंतरही या कंपन्या प्रगती करत होत्या. पुढे या कंपन्या एकमेकात विलीन होत एकत्र येत गेल्या. या कंपन्या आजही अमेरिकन तेल उद्योगाचा गाभा आहेत. अमेरिकेतील शेवरॉन, एक्सॉन मोबिल, ब्रिटिश पेट्रोलियम, मॅरेथॉन पेट्रोलियम या कंपन्या त्याचाच एक भाग आहेत.
१८९३ मध्ये त्यांची भेट स्वामी विवेकानंद यांच्यासोबत झाली. स्वामी विवेकानंदांकडून त्यांनी दानधर्म करण्याबाबत चर्चा केली. पुढे १८९५ नंतर रॉकफेलर यांनी रिटायरमेंट घेतली आणि आपले उर्वरित आयुष्य दानधर्म करण्यात घालवले. त्यांनी युनिवर्सिटी ऑफ शिकागो उभारण्यात मदत केली. १९०९ मध्ये चालू झालेल्या रॉकफेलर सॅनिटरी कमिशनने अमेरिकेतून हुकवर्म हा रोग समूळ नष्ट होण्यासाठी प्रयत्न केले आणि पुढच्या वीस वर्षात त्यांनी आपले लक्ष्य साध्य देखील केले. रॉकफेलर फाउंडेशनमार्फत त्यांनी रिसर्च अँड डेव्हलपमेंटला प्रोत्साहन दिलं. अशा अनेक सामाजिक कार्यांसाठी लक्षावधी डॉलर्स रॉकफेलर यांनी दान केले.
१९१६ साली ते आधुनिक जगातील पहिले अब्जाधीश बनले. अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या २ टक्के इतकी एकट्या रॉकफेलर यांची संपत्ती होती. आजच्या मूल्यानुसार हा आकडा ४८० अब्ज डॉलर्स म्हणजे ३५ लाख कोटींहून अधिक होतो. म्हणजे सध्या जगात सर्वात श्रीमंत असलेल्या एलोन मस्कहुन दुपटीने अधिक.
पुढे त्यांनी स्टील उद्योग क्षेत्रात सुद्धा शिरकाव केला. पण लवकरच स्टील उद्योग सम्राट अँड्र्यू कार्नेगी यांनी ती कंपनी विकत घेतली आणि यामुळे युनायटेड स्टील जगातील सर्वात मोठी कंपनी बनली. पुढील लेखात आपण याच युनायटेड स्टीलचे संस्थापक अँड्र्यू कार्नेगी यांचा जीवनप्रवास जाणून घेणार आहोत.
रॉकफेलर यांच्या दोन महत्त्वाच्या इच्छा होत्या, त्यापैकी एक म्हणजे १ लाख डॉलर्स कमावणे आणि दुसरे होते शंभर वर्षे जगणे. त्यातली पहिली इच्छा त्यांनी पूर्ण केली, पण दुसरी मात्र होता होता राहिली. वयाच्या ९७व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गरीब म्हणून जन्माला आलो तरी गरीब म्हणून मरणार नाही, हेच रॉकफेलर आपल्याला शिकवून जातात.
तर ही होती जॉन डी. रॉकफेलर यांची जीवन कहाणी. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा.