Tag: दिनविशेष

  • National Science Day 2026 : पर्यावरणपूरक व्यवसाय, Sustainable Packaging आणि Green Supply Chain ची सुवर्णसंधी

    National Science Day 2026 : पर्यावरणपूरक व्यवसाय, Sustainable Packaging आणि Green Supply Chain ची सुवर्णसंधी

    राष्ट्रीय विज्ञान दिन विशेष: पर्यावरणपूरक व्यवसाय, शाश्वत पॅकेजिंग (Sustainable Packaging)आणि ग्रीन सप्लाय चेन (Green Supply Chain)

    विज्ञानाशिवाय जग चालत नाही. माणसाने घेतलेला श्वास, माळरानावर उगवलेले झाड ते अवकाशात फिरणारे कृत्रिम उपग्रह – सगळंच विज्ञानाच्या भोवती चालत असतं तसेच अर्थकारण, नोकरी, उद्योग आणि व्यवसायही.

    आज जगभरात पर्यावरणपूरक व्यवसाय (Eco-friendly Business) हा केवळ ट्रेंड नसून, एक गरज बनली आहे. प्लास्टिक प्रदूषण, हवामान बदल, संसाधनांची कमतरता यामुळे कंपन्या आणि उद्योजकांना शाश्वत उपाय स्वीकारावे लागत आहेत. वैज्ञानिक क्षेत्रामधील Material science, biotechnology, AI, आणि nanotechnology यातील नवनवीन शोधांमुळे Biodegradable plastics, Smart recycling systems, Green energy logistics यासारख्या नवकल्पना निर्माण करणे शक्य झाले आहे.

    पर्यावरणपूरक व्यवसाय म्हणजे काय?

    पर्यावरणपूरक व्यवसाय म्हणजे असा उद्योग जो उत्पादन, पॅकेजिंग, वाहतूक आणि वापरात नैसर्गिक संसाधनांचा कमी वापर करतो, प्रदूषण कमी करतो आणि पुनर्वापराला प्रोत्साहन देतो.

    आजचे ग्राहक केवळ किंमत नाही तर ब्रँडचे पर्यावरणीय मूल्य (Eco Value) पाहून खरेदी करतात. त्यामुळे Green Business ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी नसून व्यवसायाची गरज बनली आहे.

    Reduce, Reuse, Recycle – व्यवसायासाठी Golden Formula

    Reduce (कमी वापर)
    – हलके पॅकेजिंग
    – कमी प्लास्टिक
    – डिजिटल बिलिंग
    म्हणजे खर्च कमी आणि पर्यावरण संरक्षणसुद्धा!

    Reuse (पुन्हा वापर)
    Glass bottles
    – Cloth bags
    – Returnable packaging
    यातून ग्राहकांची loyalty वाढते.

    Recycle (पुनर्निर्मिती)
    Recycled paper
    – Recycled plastic
    – Upcycled products
    त्यातून Circular Economy तयार होते. 

    Sustainable Packaging: 2026 चा एक मोठा ट्रेंड

    Sustainable Packaging म्हणजे काय?

    शाश्वत पॅकेजिंग (Sustainable Packaging) म्हणजे पुनर्वापर करता येणाऱ्या, जैवविघटनशील किंवा पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून पर्यावरणावर होणारी हानी कमी करणारी पॅकेजिंग प्रणाली.
    यामध्ये Recyclable साहित्य, Biodegradable साहित्य, Plant-based साहित्य यांचा वापर केला जातो.

    Sustainable Packaging Trend 2026

    1. Single-Use Plastic ला पूर्ण पर्याय
      जगभरातील अनेक देश Single-use plastic वर पूर्ण बंदी आणण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे कागद, बांबू, बायोप्लास्टिक, मशरूम पॅकेजिंग यांची मागणी वाढत आहे.
    2. Plant-Based Packaging
      कॉर्न स्टार्च, गव्हाचा कोंडा, ऊसाच्या बॅगॅसपासून पॅकेजिंग तयार केली जात आहे. हे fully biodegradable आणि compostable असते. त्यामुळे कचरा व्यवस्थापनाला मदत होते. 
    3. Smart Packaging
      QR code, RFID tag, recyclable ink वापरून digital traceability देणारी पॅकेजिंग हा मोठी ट्रेंड आहे. विशेषतः ई-कॉमर्स क्षेत्रात याचा वापर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. 
    4. Minimal Packaging
      Less is More – कमी साहित्य वापरून पॅकेजिंग करणे म्हणजे खर्च आणि कचरा दोन्ही कमी करणे. 

    Green Supply Chain


    Green Supply Chain म्हणजे उत्पादन तयार करण्यापासून ग्राहकापर्यंत पोहोचण्याची संपूर्ण प्रक्रिया पर्यावरणपूरक बनवणे आणि म्हणजे पर्यावरणाला हानी न पोहोचवता व्यवसाय नफा मिळवणे.

    यामध्ये पर्यावरणपूरक कच्चा माल (Eco-friendly raw material), ऊर्जा कार्यक्षम उत्पादन (Energy Efficient Products), Green logistics (EV वाहतूक), Recyclable packaging यांचा समावेश होतो.

    Green Supply Chain चे फायदे

    1. खर्चात बचत
      ऊर्जा, पाणी आणि कच्चा माल कमी वापरल्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो.
    2. ब्रँड व्हॅल्यूमध्ये वाढ
      आज ग्राहक पर्यावरणपूरक ब्रँडला, त्यांच्या उत्पादनांना जास्त पसंती देत आहेत.
    3. सरकारी नियमांचे पालन
      भारत सरकार EPR (Extended Producer Responsibility) आणि प्लास्टिक बॅनसारखे नियम लागू करत आहे.
    4. जागतिक बाजारात प्रवेश
      पर्यावरणपूरक उत्पादनांना जागतिक बाजारातही महत्त्वाचे स्थान आहे. Green Supply Chain च्या माध्यमातून तयार झालेल्या उत्पादनांची वेगळी ओळख निर्माण होऊ शकते. 

    Recycled Products: वेगाने वाढणारी Green Businessची नवी सुवर्णसंधी

    Recycled Products इंडस्ट्री आज मल्टी-बिलियन डॉलर मार्केट झाली असून भारतात Startup आणि MSME साठी मोठी व्यवसाय संधी आहे. कचऱ्यातून उपयोगी उत्पादने तयार करून पर्यावरण संरक्षणासोबत नफा कमावणे ही Circular Economy ची मुख्य ताकद आहे.

    लोकप्रिय Recycled Business Categories:

    • Plastic Recycling: बाटल्या, पिशव्या, पाईप्स, फर्निचर
    • Paper Recycling: पॅकेजिंग बॉक्स, कार्डबोर्ड, स्टेशनरी
    • E-waste Recycling: मोबाईल व संगणकातील मौल्यवान धातू
    • Upcycled Fashion: जुन्या कपड्यांपासून बॅगा व फॅशन वस्तू
    • Tyre Recycling: रबर मॅट्स, फर्निचर, बांधकाम साहित्य

    Recycled Products व्यवसाय कमी भांडवलात सुरू करता येतो आणि कच्चा माल सहज उपलब्ध असल्यामुळे नव्या उद्योजकांसाठी ही उत्तम संधी आहे. योग्य मशिनरी आणि आवश्यक परवाने घेतल्यास व्यवसाय सुरळीत चालवता येतो. डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर ग्राहक मिळवता येतात आणि ब्रँड ओळख तयार करता येते. सरकारी प्रोत्साहन योजना आणि वाढती पर्यावरण जागरूकता यामुळे या उद्योगाची मागणी वेगाने वाढत आहे आणि भविष्यात मोठी कमाई व रोजगाराची संधी निर्माण होऊ शकते.

    भारतीय उद्योजकांसाठी सुवर्णसंधी

    भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा कन्झ्युमर मार्केट आहे, परंतु कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक प्रदूषण ही भारतातील एक मोठी समस्या आहे. त्यामुळे Green Businesses हे केवळ CSR (Corporate Social Responsibility) नाही तर Profit Opportunity आहे.

    काही उदाहरणे:
    Zero-waste grocery stores
    Eco-friendly packaging startups
    Sustainable fashion brands
    Organic product brands

    तुम्ही पर्यावरणपूरक व्यवसाय का सुरू करावा?

    1.  ग्राहकांचा विश्वास वाढवण्यासाठी
    2.  दीर्घकालीन खर्च कमी करण्यासाठी
    3.  भविष्यातील कायद्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी
    4.  पर्यावरणासाठी योगदान देण्यासाठी

    उत्तर: वरीलपैकी सर्व कारणांसाठी!

    2026 मध्ये Sustainable Business, Eco friendly businesses का ट्रेंडिंग आहे?

    • Gen Z आणि Millennials Eco-conscious आहेत. 
    • ESG (Environmental, Social, and Governance) investing वाढत आहे.
    • सरकार Green regulations आणत आहे. 
    • सोशल मीडिया वर Sustainable Brands Viral होत आहेत. 

    म्हणजेच, Green Business = Growing Business

    भविष्यातील यशस्वी व्यवसायासाठी नवा विचार

    3P = People + Planet + Profit = Sustainable Success

    केवळ नफ्याचा विचार न करता, लोकांसाठी व पर्यावरणासाठी योग्य उद्योग – व्यवसाय करणे! जो उद्योजक आज पर्यावरणपूरक धोरण स्वीकारेल, तो उद्या बाजारात आघाडीवर असेल.

    अशाच नवनवीन माहितीपर लेखांसाठी ‘नवी अर्थक्रांती’च्या वेबसाईटला नियमित भेट द्या!!

  • शिक्षक दिन 5 सप्टेंबरला का साजरा करतात? | Why Teachers Day Celebrated On 5th September

    शिक्षक दिन 5 सप्टेंबरला का साजरा करतात? | Why Teachers Day Celebrated On 5th September

    प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाची भूमिका ही अनन्यसाधारण महत्त्वाची असते. एखादी व्यक्ती जेव्हा यशस्वी होते, तेव्हा तिच्या मागे नेहमी कोणत्या-न-कोणत्या मार्गदर्शकाचा हात असतो, भूमिका असते. हा मार्गदर्शक म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्याला वळण देणारा, चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखायला शिकवणारा शिक्षक.

     भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. हा स्मरणोत्सव आपल्या देशाचे पहिले उपराष्ट्रपती (दुसरे राष्ट्रपती), भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी झाला. शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावा यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले. देशाच्या शिक्षणाला आकार देण्यात त्यांनी कायम मोलाचा वाटा उचलला. त्यांच्या योगदानामुळे अनेकांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली आणि म्हणूनच ५ सप्टेंबर रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन सबंध देशभरात उत्साहाने साजरा केला जातो. 

    खरंतर चांगल्या शिक्षकाचा सन्मान हा त्या संस्कृतीचा आणि त्यांच्याकडे असलेल्या अगाध ज्ञानाचा सन्मान असतो. कोणत्याही समाजाचा विकास होण्यासाठी शिक्षकाची भूमिका देवदूतासारखी असते. एक चांगला शिक्षक हजारो चांगले विद्यार्थी घडवू शकतो. हेच चांगले विद्यार्थी पुढे देशाचे सुजान नागरिक बनतात आणि प्रतिनिधित्व करतात. एक चांगला माणूस घडण्यासाठी त्यामागे एक चांगला शिक्षक कायम उभा असतो. 

    image 20

    शिक्षकांचा सन्मान करण्याची शिक्षक दिनाची ही परंपरा तशी जुनीच. 

    शिक्षक म्हणजे काय? 

    शि म्हणजे शील 
    क्ष म्हणजे क्षमा
    क म्हणजे कला

    ज्याच्याकडे शील, क्षमा आणि कला यांचा त्रिवेणी संगम आहे तो म्हणजे शिक्षक. शिक्षक हे एका अर्थाने भावी पिढीला घडविणारे शिल्पकारच आहेत. आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने जीवनातील अंधार दूर करणारे मार्गदर्शकच. चुकल्यावर रागावणारेही शिक्षकच आणि पाठीवर कौतुकाची थाप मारणारेदेखील तेच. आपल्यापेक्षाही जास्त आपल्याला ओळखणारे आपले शिक्षक. आपल्यातील चांगल्या गुणांची पारख करून आपल्याला योग्य दिशा दाखविणारे आणि आपल्या जीवनाला ज्ञानाच्या प्रकाशाने तेजोमय करणारे हे आपले शिक्षक. 

    तुम्हाला अजून कोणत्या विषयाची माहिती वाचायला आवडेल कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

  • अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता याबद्दल जागरूकता निर्माण करणारे संत गाडगे महाराज यांची आज जयंती. विनम्र अभिवादन!

    अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता याबद्दल जागरूकता निर्माण करणारे संत गाडगे महाराज यांची आज जयंती. विनम्र अभिवादन!

    त्यांचे खरे सामर्थ्य कीर्तनात होते. वास्तविक संत गाडगेबाबा अडाणी होते, शिकलेले नव्हते. त्यांना आपली स्वाक्षरीसुद्धा करता येत नव्हती. पण त्यांच्या जिभेवर मात्र तुकोबांचे अभंग नाचत असत. त्यांचा वेशही साधाच होता. अंगावर फाटक्या चिंध्या, एका हातात खराटा आणि दुसर्‍या हातात मडक्याचे फुटके खापर घेऊन संत गाडगेबाबा गावोगावी कीर्तन करत फिरत असत.

    250px Maharaj Baba

    ते ज्या गावात जात त्या गावातले रस्ते पहिल्यांदा खराट्याने साफ करत आणि रात्रीच्या वेळेला कीर्तनातून लोकांच्या डोक्यातील घाण साफ करत. एरवी कोणाशी न बोलणारे बाबा कीर्तनासाठी उभे राहिले की; शब्दांचा, साहित्याचा सद्विचारांचा असा काही मारा करत की; ऐकणारा मंत्रमुग्ध होत असे. मुखाने देवाचे नाव घेत गावोगाव बाबा फिरत, दिसेल त्या गावातील रस्ते, गटारे, देवालये, नद्यांचे घाट कोणाशीही न बोलताच ते स्वच्छ करू लागत. तसे करताना त्यांना पाहिल की , गावातील इतर माणसे आपापली कुदळ, फावडी, टोपल्या, खराटे घेऊन बाबांच्या मदतीला येत असत.

    संत गाडगेबाबांनी जाणले होते की, समाजातील लोक अज्ञानी, अंधश्रद्धाळू आहेत. त्यांना दगडात परमेश्वर दिसतो, परंतु माणसातला देव दिसत नाही. भूत, भानामती, करणी, जादूटोणा यावर लोकांचा दाट विश्वास आहे. समाजात अनेक अंधश्रद्धा आहेत. भयाण दारिद्र्याची कारणे केवळ व्यसन व रोगराई नसून निरक्षरता, अंधश्रद्धा हीच आहेत. म्हणून रोग, गरिबी, अंधश्रद्धा यांच्याविरुद्ध गाडगेबाबा जन्मभर लढले. व्यसन संपले की गरिबी संपणार, व्यसन संपले की रोगराई संपणार म्हणून प्राण्यांची हत्या करू नका, कर्ज काढू नका, भोंदू गुरूकडून मंत्र घेऊ नका, हाच मंत्र गाडगेबाबांनी दिला.

    संत गाडगेबाबांनी आपले सारे आयुष्य समाजासाठी खर्ची घातले. त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धर्मशाळा, गोरक्षण संस्था व शाळा- कॉलेजेस काधली. त्यांच्याजवळ पोथी नव्ह्ती. पूजा-अर्चा करा, असा उपदेश नव्हता. त्यांचे कीर्तन दु:खितांसाठी व अज्ञानासाठी होते. परखड कीर्तनातून सार्‍या महाराष्ट्राला उपदेश केला. अनेक धर्मशाळा बांधून यात्रेकरूंसाठी सोय त्यांनी केली. दु:ख , दारिद्र्य व अज्ञान दिसताच तिथे ते धावून जात. त्यांनी देशाला व समाजाला स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. ‘ गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाने ते लोकांना मंत्रमुग्ध करत.

    संत गाडगेबाबा म्हणजे एक क्रांतिसूर्य होय. माणसाने माणसाला कमी लेखावे यासारखा अधर्म नाही. ब्राम्हणापासून महारापर्यंत सगळी माणसे एकच आहेत. ‘ कोंबडे- बकर्‍या खाणारा देव नसून सैतानच आहे’ हे बाबांचे मत. गाडगेबाबा म्हणजे मानवतावादी स्वाभिमान शिकवणारे अदभूत संत! भोळ्याभाबड्या लोकांच्या मनातून अंधश्रद्धा दूर करण्याचे महत्त्वाचे कार्यही त्यांनी केले ते म्हणतात,’ देव देवळात नाही, दगडात नाही. माणसात आहे.’ पन्नास वर्षे गाडगेबाबांनी लोकांना आवर्जून सांगितले की, बाबांनो, दगडधोंड्यांची पूजा करून काहीही मिळणार नाही. माणसांची पूजा करा. मानवतेची पूजा करा.

    640px Gadge Maharaj and Tukdoji Maharaj

    बाबांचे कीर्तन अशिक्षितांसाठी होते. तसेच तथाकथित सुशिक्षितांसाठीही होते, दु:खितांसाठी होते. त्यात योग नव्हता, अध्यात्मवाद नव्हता, पोथी नव्हती, पुराण नव्हते, देवांची वर्णने नव्हती, त्यात पूजा-अर्चा यांचा उपदेश नव्हता. त्यात शुद्ध जीवन होते. हजारो वर्षे समाजाच्या आर्थिक सत्तेखाली आणि धार्मिक रुढीखाली भरडून निघालेल्या दूधखुळ्या, भोळ्या आणि हीन-दीन समाजांच्या उद्धाराचा धगधगीत प्रकाशझोत म्हणजेच गाडगेबाबांचे कीर्तन.

    माणसामधल्या परमेश्वराची पूजा करणार्‍या या संताने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात एक प्रचंड सामर्थ्य निर्माण केले. अविश्रांत कीर्तने , धावपळ यामुळे त्यांच्या मजबूत देहावर दगदगीचा परिणाम होऊ लागला. काही अनुयायांच्या काही विचित्र वर्तनांची त्यांच्या मनावर तीव्र परिणाम झाला. मधुमेहाच्या आजारानेही त्यांना जर्जर केले. बाबांनी शेवटी शेवटी अन्नही वर्ज्य करून आमटीचे पाणी व भाजी यावरच आपला निर्वाह चालवू लागले.

    collage 1450763080 148238

    बाबा म्हणजे माणसात देव पाहणारा मानवतापूजक संतश्रेष्ठ. अमरावती येथे गाडगेबाबांच्या जन्मशताब्दी समारोहात मदर तेरेसा म्हणाल्या, ‘ परमेश्वराने संत गाडगेबाबांसारख्या व्यक्ती निर्माण करून मानवतेवर अनंत उपकार केले आहेत.’ मात्र मानवतावादी गाडगेबाबांकडे आणि त्यांच्या परखड तत्त्वज्ञानाकडे म्हणावे तसे देशाने, त्यांच्या अनुयायांनी , लोकांनी आणि इतिहासानेही लक्ष दिल्याचे दिसत नाही. अशा या मानवतावादी युगप्रवर्तक संताबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,’ ते खरे संत आहेत. इतर बुवांपेक्षा गाडगेबाबांसारखे संत आपल्या देशात अधिक झाले पाहिजेत. त्यांना तुमच्या धनाची, मानाची पर्वा नाही. त्यांना समाजपरिवर्तनाचा विचार श्रेष्ठ वाटतो, तेच खरे मानवतादी संत आहेत.’

    रंजल्या-गांजल्यांना ‘आपुले’ म्हणणारा आणि अनाथ -अपंगांना हृदयाशी धरणारा तो खरा साधू ही तुकोबांची व्याख्या गाडगेबाबांना तंतोतंत लागू पडते. बाबांनी आपल्या उपदेशात म्हटले की, ‘ बाबांनो, दया हा जगातल सर्वात मोठा धर्म आहे.’

    कबीर कहे कमालकू सबसे बडी दया |

    तीर्थ जावो, काशी जावो, चाहे जावो गया ||

    अशा या महामानव युगप्रवर्तकाची प्राणज्योत २० डिसेंबर १९५६ रोजीच्या रात्री मावळली.

    — मच्छिंद्र ऐनापुरे

    आणखी वाचा

  • युध्दात जमीनदोस्त झालेल्या दुकानाच्या एका कोपऱ्यात कंपनी सुरु करणारे ‘सोनी’चे संस्थापक अकिओ मोरीता

    युध्दात जमीनदोस्त झालेल्या दुकानाच्या एका कोपऱ्यात कंपनी सुरु करणारे ‘सोनी’चे संस्थापक अकिओ मोरीता

    वाचा सोनी या जगप्रसिद्ध कंपनीची प्रेरणादायी कहाणी

    Sony Co-Founder Akio Morita's Birthday

    अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकला तेव्हा अकिओ मोरीता फक्त २४ वर्षांचा होता. १९४६ रोजी त्याने मसारू ईबुकासोबत अणुबॉम्ब स्फोटात बेचिराख झालेल्या एका दुकानाच्या कोपऱ्यात एक कंपनी सुरु केली. हीच भविष्यातील ‘सोनी कॉर्पोरेशन’ची सुरुवात होती. २००० साली या कंपनीची उलाढाल ६३०८ कोटी डॉलर्सची होती तर त्यात १८९७०० माणसे काम करत होती. पण या सर्वांहून गाजला तो म्हणजे अकिओ मोरीताचा वॉकमन. गंमत म्हणजे जेव्हा अकिओ मोरीता आणि ईबुका यांनी तरुण पिढीला आवडेल असा वॉकमन बनवायला घेतला तेव्हा मोरीता साठीला तर ईबुका सत्तरीला टेकला होता. जेव्हा वॉकमन ची कल्पना त्यांनी त्यांच्या कंपनीसमोर मांडली तेव्हा कंपनीतील सर्वांनी विरोध केला होता, चक्क वेड्यात काढले होते.

    Sony Co-Founder Akio Morita's Birthday
    Sony Co-Founder Akio Morita's Birthday

    या दोघांतील ईबुका हा तंत्रज्ञानात बाप माणूस होता तर मोरीता ग्रेट सेल्समन होता. IBM च्या सेल्समनबद्दल असं म्हटलं जायचं की हे लोक एस्कीमो लोकांनाही फ्रिज विकून दाखवतील. अकिओ तितकाच सामर्थ्यवान विक्रेता होता. सुरुवातीला त्यांनी सुरु केलेल्या कंपनीचं नाव होतं ‘टोकियो त्सुशीन कोग्यो काबुशिकी काईशा‘ म्हणजे ‘टोकियो टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग कंपनी’. पुढे याचीच ‘सोनी कॉर्पोरेशन’ बनली. जेव्हा कंपनी सुरु केली तेव्हा फक्त एका छोट्याशा खोलीत अनेक लोक काम करत असत. सामान ठेवायलाही जागा नसे. सगळी मंडळी रात्री कंपनीचा मुख्य दरवाजा बंद केल्यावर फायर एक्झिटच्या दरवाजाने ये-जा करत, त्यामुळे त्यांना कित्येक वेळा पोलीस चोर समजून पकडत.

    Akio Morita, Sony Legend, Birthday Celebration

    सुरुवातीला त्यांना कामाच्या मोबदल्यात तांदूळ मिळे, कारण त्यावेळी दुसर्‍या महायुध्दातील पराभवामुळे जपान संपुर्णपणे उध्वस्त झालेल्या अवस्थेत होता. युद्धानंतर तांदूळ खूपच दुर्मिळ आणि महाग झाला होता. पुढे कंपनी वाढल्यावर तिचं वेगळं नाव ठेवायचं ठरवलं, तेव्हा आख्खी डिक्शनरी चाळून त्यांच्या लक्षात आलं की लॅटिनमध्ये सोनस म्हणजे ध्वनी,आणि अमेरिकेत ‘सॉनी’ हा शब्द तरुण हुशार मुलांसाठी वापरला जाई. मग या दोन्हीचा वापर करून ‘सोनी’ या शब्दाचा उगम झाला आणि ‘सोनी कॉर्पोरेशन’चा जन्म झाला. फक्त टोकीयो पुरते त्यांचे अस्तित्व जरी असले तरी त्यांची स्वप्नं फार मोठी होती.त्यांच्या महत्त्वाकांक्षा सात समुद्रापलीकडच्या होत्या. आता सोनीने टेप, रेडिओ अगदी लहान आकाराचे म्हणजे खिशात मावतील असे रेडिओ बनवण्यास सुरुवात केली, पण गंमत म्हणजे त्यांची उपकरणे खिशात बसेनात म्हणून चक्क मोठे खिसे असलेले शर्टही बनवून विकायला सुरु केले होते.

    Akio Morita, Sony Legend, Birthday Celebration

    सोनीचे मालाच्या दर्जावर खूपच बारीक लक्ष असे. पण त्याकाळी जपानी मालाच्या दर्जाची चेष्टा सुरु असल्याने मोरीता त्यांच्या मालावर ‘मेड इन जपान’ असं बारीक अक्षरात लिहित. कारण त्यादरम्यान ‘Made in Japan’ चा अर्थ असा होता की ‘स्वस्त व तकलादू उत्पादने’ परंतु अकियो मोरिता आणि मसुरु इबुकाचे ‘भव्य ध्येय’ होते की ‘जगातील जपानची प्रतिमा बदलणे.’ सोनीला जापनीज उत्पादनं निकृष्ट दर्जाची असतात ही जगातील प्रतिमा बदलुन ‘जापनीज उत्पादने म्हणजे उत्कृष्ट दर्जा’ अशी करायची होती. एकदा अमेरिकेतील बोलावा नावाच्या कंपनीने सोनीकडून १ लाख ट्रांझीस्टर बनवण्याची ऑर्डर दिली. ही ऑर्डर म्हणजे त्याकाळच्या दहा वर्षांच्या ऑर्डरइतकी मोठी होती. त्यांची एकच अट होती की सोनीने त्यावर सोनीचे नाव न टाकता बोलावाचे टाकावे. अकिओला इतका प्रचंड पैसा दिसत असूनही त्या मिटिंगमधून चक्क निघून गेला. पण नंतर ‘सोनी’ ही कंपनी बोलावाच्या ३० पटीने मोठी कंपनी झाली. आज कॅसेट्स, सीडीज, टीव्ही,टेप, डिस्कमन, वॉकमन, फ्लॉपी डिस्क, व्हिडिओ कॅमेरा,हँडीकॅम, सोनी एंटरटेनमेन्ट असा वाढलेला पसारा म्हणजे अकिओ मोरीता आणि ईबुकाचे प्रयत्न होय. त्यांचं भव्य ध्येय त्यांना जागतीक पातळीवर आपली विशेष छाप पाडण्यासाठी कारणीभूत ठरलं. प्रचंड शिस्त, सतत नाविन्यपुर्ण नवनिर्मिती, आणि बिनधास्तपणे जोखिम घेत ‘सोनी’ने प्रगती केली आहे.

    साभार :- अच्युत गोडबोले

  • १५ जानेवारी, भारतीय लष्कर दिन (आर्मी डे) निमित्त देश सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या जवानांना सलाम !!!

    १५ जानेवारी, भारतीय लष्कर दिन (आर्मी डे) निमित्त देश सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या जवानांना सलाम !!!

    आजच्याच दिवशी १९४९ साली पहिले भारतीय लष्करप्रमुख म्हणून जनरल के. एम. करिअप्पा यांनी सूत्रं हाती घेतली होती.

    km-cariappa - Army Day

    एक ऐतिहासिक दिवस म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ – स्वातंत्र्यलढय़ात यशस्वी होऊन भारत स्वतंत्र झाला. भारत सरकारच्या विनंतीवरून ब्रिटिश लष्करातील काही उच्च अधिकारी आपल्या लष्करात काही वर्षे आणखी राहण्यास तयार झाले. फिल्डमार्शल क्लोड औकीनलेक यांची सर्वोच्च सेनापती म्हणून नियुक्ती झाली; तर जनरल सर रोब लोकहार्ट कमांडर इन चीफ बनले. १ जानेवारी १९४८ रोजी जनरल सर रॉबर्ट रॉय बुचर यांनी कमांडर इन चीफ म्हणून कार्यभार सांभाळला. त्यांचा कार्यकाल एका वर्षानंतर समाप्त व्हायची वेळ जेव्हा आली, तेव्हा भारत सरकारने हा निर्णय घेतला, की आता भारतीय सेनेचा मुख्य – कमांडर इन चीफ भारतीयच असेल..

    लष्कर दिन म्हणजे आपला देश आणि त्यातील लोकांच्या रक्षणार्थ आपले जीवन सर्मपित करणार्या वीर सैनिकांना एक खर्या अर्थाने वाहिलेली श्रद्धांजली आहे. नवी दिल्ली येथील इंडिया गेटवरील अमर जवान ज्योतीजवळ शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहून समारंभास सुरुवात होते. लष्कराची तांत्रिक प्रगती आणि भारतीय लष्कराकडे उपलब्ध असलेली शस्त्रसामग्री, वाहने – हत्यारे, हेलिकॉप्टरची कर्तबगारी आणि शत्रूवर हल्ल्याची प्रात्यक्षिक दृश्ये, तसेच सैनिकी कवायत दर वर्षी दिल्ली छावणी येथील आर्मी परेड मैदानावर आयोजित केली जाते. प्रजासत्ताक दिनी होत असलेल्या सैन्याच्या कवायतीची ही रंगीत तालीमच मानली जाते..

    Amar Jawan Jyoti - Army Day

    फौजी बँडच्या तालावर सैनिकांच्या तुकड्या शिस्तशीरपणे आगेकूच करीत जातात, ते दृश्य पाहण्यासारखे असते. जमीन आणि आकाशात आपल्या दुर्दम्य साहसाचा परिचय करून देणारा भारतीय लष्कराचा शो प्रत्यक्ष पाहणे हासुद्धा एक रोमांचकारी अनुभव असतो. जय हिंदच्या जयघोषाने आसमंत निनादून टाकत कार्यक्रमाची सांगता होते. देशात अन्यत्रही लष्कराच्या प्रमुख ठिकाणी १५ जानेवारीला लष्करी कवायतीचे आयोजन केले जाते. आपल्या देशातील जनतेला सेनेची तयारी आणि उत्साह पाहण्याची चांगली संधी यामुळे मिळते. तसेच युवकांना यामुळे देशाकरिता काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते..

    Army Day

    भारतीय लष्कर जगातील सशक्त आणि मजबूत सैन्यापैकी एक आहे. भारतीय लष्कर आपल्या निडर आणि साहसी वृत्तीसाठी प्रसिद्ध आहे. इतिहासात भारतीय सेना म्हणजे एक गौरवास्पद शौर्यगाथाच आहे. सेना राजकारणापासून दूर असते आणि फक्त अंतर्गत व बाह्य धोक्यांपासून आपले रक्षण करते. भारतीय सेनेचा प्रत्येक भारतीयाला गर्व वाटतो. जेव्हा जेव्हा भारतीय सीमेवर आक्रमणे झाली, तेव्हा तेव्हा भारतीय सेनेने अतिशय उत्साही प्रतिकार करून देशाला यशस्वी केले आहे. खरं तर या प्रकारच्या सर्मपित आणि शिस्तशीर सैनिकांचा आम्हाला अभिमान वाटला पाहिजे आणि अशा लष्कराचा एक भाग बनून देशाची सेवा करायला मिळाली, तर तो आमचा सर्वोच्च सन्मान ठरला पाहिजे.

  • हिंदवी स्वराजाच्या राजमाता जिजाबाई यांचा आज जन्मदिन

    हिंदवी स्वराजाच्या राजमाता जिजाबाई यांचा आज जन्मदिन

    राजमाता जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेडराजा (जि. बु लढाणा) येथे इतिहास प्रसिद्ध यादव घराण्यातील लखूजीराजे जाधव म्हाळसाराणी या राजघराण्यात झाला. लखुजीराजेंनी आपल्या मुलांबरोबरच मुलीला म्हणजेच जिजाऊला देखील राजनीती, युद्धकलेचे शिक्षण दिले. जिजाऊंनी राजघराण्याचा वृथा अभिमान न बाळगता युद्धकला राजनीती यामध्ये प्राविण्य मिळवले. आजच्या मुलींमध्ये प्रचंड नैराश्य, न्युनगंड किंवा असुरक्षतेची भावना प्रामुख्याने जाणवते. जिजाऊंनी आत्मविश्वासाने युद्धकलेत नैपुण्य मिळवले याचा उपयोग पुढे शिवरायांना युद्धकला आणि राजनीतीचे शिक्षण देण्यासाठी झाला.

    आजची स्त्री चुल आणि मुल या परिघाबाहेर पडायला तयार नाही किंबहुना तिने त्यातच सौख्य मानावे अशी समाज व्यवस्था आजदेखील आहे. पण जिजाऊंनी विवाहानंतर स्वराज्यसंकल्पनेला अखंड स्वरूप प्राप्त करून देण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे. शहाजीराजे-जिजाऊमाता यांनी मोठ्या उदात्त आणि व्यापकपणे रयतेच्या स्थैर्यासाठी स्वराज्य स्थापण्याचा निर्णय घेतला.केवळ आपली जहागिरी किंवा वतन याचा विचार न करता प्रजेला न्याय मिळाला पाहिजे ही भुमिका शहाजीराजे-जिजाऊंची होती.

    शहाजीराजांच्या कार्यात जिजाऊमाता अत्यंत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या. अदिलशहा, निजाम, मुघल असे बलाढ्य विरोधात असताना मोठ्या निर्भिडपणे जिजाऊमाता शहाजीमहाराजांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आल्या. आजची स्त्री माझी मुले, माझे घर, माझे सगेसोयरे आणि कौटुंबिक कार्यक्रम या पलीकडे विचार करताना दिसत नाही. जिजाऊमातेनं स्वत:च्या जाधव-भोसले कुटूंबाच्या पलीकडे जाऊन रयतेचा विचार केला. त्यामुळे तानाजी, येसाजी, कान्होजी, शिवाजी, बाजी पालसकर, मुरारबाजी, बहिर्जी, कावजी, नेताजी इ.सर्व जाती धर्मातील सरदार व मावळे स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करण्यासाठी पुढे आले. म्हणजे जिजाऊमातेनं आपले मातृप्रेम शिवरायांप्रमाणेच सर्व मावळ्यांवर केले.त्यामुळे जिजाऊ स्वराज्यमाता आहेत.

    पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला. एकदा एक हत्ती पिसळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली पहिले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाईचा भाऊ. दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व संभाजी भोसले शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले. हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्‍यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला. या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले. नात्यांना, भावनांना बाजूला सारुन आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीर पणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपुर उतरला होता.

    राजमाता जिजाऊ संकटसमयी डगमगल्या नाहीत, शिवरायांना यश मिळावे यासाठी यज्ञ, तप, शांती, उपवास करीत बसल्या नाहीत. यश मिळवण्यासाठी हाती तलवार घ्यावी लागते, चातुर्य पणाला लावावे लागते, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. यावर जिजाऊंचा दृढ विश्वास होता. जिजाऊ प्रयत्नवादी होत्या. शिवरायांवर चालून आलेल्या शत्रूचा नायनाट करण्यासाठी जिजाऊंनी मार्गदर्शन केले. अशा प्रसंगी जिजाऊ जपमाळ ओढत नामस्मरण करत बसल्या नाहीत. जिजाऊ दैववादी नव्हे तर प्रयत्नवादी होत्या. त्यामुळे संकटसमयी त्या हताश-निराश झाल्या नाहीत. आजची स्त्री मुलाचा गुणवत्ता यादीत क्रमांक यावा, नोकरी मिळावी, पदोन्नती मिळावी, निवडणूक जिंकावी यासाठी यज्ञ, होमहवन, तीर्थयात्रा, उपवास, नामस्मरण करताना दिसते. जिजाऊंचा प्रयत्नवाद स्रियांनी आत्मसात केला पाहिजे.

    जिजाऊमाता पन्हाळ्याच्या दिशेने निघाल्या त्यावेळेस नेताजी पालकरांनी जिजाऊंना साकडे घातले. आम्ही जिवंत असेपर्यंत आपण तसदी न घ्यावी, म्हणजे जिजाऊ वेळप्रसंगी हाती तलवार घेऊन लढणाऱ्या होत्या. आज स्त्रियांवर अनेक ठिकाणी अत्याचार होतात त्याप्रसंगी स्त्री स्वत:चे संरक्षण करू शकत नाही. जिजाऊंमध्ये असणाऱ्या धैर्याचे-शौर्याचे अनुकरण स्त्रियांनी करावे.

    जिजाऊमातांनी संभाजीराजेंना राजनीती, युद्धकलेचे शिक्षण दिले. पुत्राप्रमाणे नातवावर उत्तम संस्कार करणारी जिजाऊमाता म्हणजे स्वराज्याचे खरे विद्यापीठ आहे. शिवाजीराजे – संभाजीराजे मावळे यांच्या मध्ये असणारी उच्चकोटीची नैतिकता जिजाऊंच्या संस्कारातून आलेली आहे. विखुरलेला मराठा समाज एक करावा म्हणून शहाजी राजे-जिजाऊंनी शिवरायांचे आठ विवाह केले.त्या आठही महाराण्यांचा जिजाऊंनी सन्मान केला. सासू-सुन हे नातं संघर्षाचे नव्हे तर अत्यंत जिव्हाळ्याचं, विकासाचं, प्रेमाचं नातं आहे हे जिजाऊंनी दाखवून दिले.जिजाऊंचा हा आदर्श आजच्या महिलांनी अंगिकारावा.

    शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्राकैदेत होते, तेव्हा महाराष्ट्रातील इंचभर भूमी देखील मिर्झाराजा जयसिंगला जिंकता आली नाही. कारण त्यावेळेस स्वराज्याची सुत्रे जिजाऊमातांच्या हाती होती. म्हणजे जिजाऊंची जरब कशाप्रकारे होती हे यावरून स्पष्ट होते. शहाजीराजांचा म्रुत्यू झाला त्याप्रसंगी जिजाऊ सती गेल्या नाहीत,म्हणजे जाधव – भोसले घराण्यात सतीप्रथा तर नव्हतीच पण जिजाऊमाता देखील सतीप्रथेच्या विरोधात होत्या. आज २१ व्या शतकात जिजाऊमातेच्या पुरोगामी विचारांची गरज आहे. शिवरायांना न्यायनिवाडा करण्याचे धडे जिजाऊमातेने दिले. गावागावांतील तंटे-बखेडे जिजाऊंनी मिटवले.

    शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचा निर्णय घेतला तेव्हा ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला. या प्रसंगी जिजाऊंची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. जिजाऊ – शिवराय जर ग्रंथप्रामाण्य मानणारे असते तर त्यांनी राज्याभिषेकाचा निर्णय घेतला नसता. जिजाऊमाता बुद्धिप्रामाण्यवादी होत्या त्यामुळेच त्यांनी वैदिकांचा विरोध झुगारून राज्याभिषेक करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला. आज अनेक कठीण प्रसंग येतात त्याप्रसंगी स्त्री-पुरुष हतबल होतात. असे प्रसंग जिजाऊंच्या जीवनात देखील आले होते पण जिजाऊ हतबल, निराश झाल्या नाहीत त्यांनी मोठ्या हिंमतीने संकटावर मात करून स्वराज्य निर्माण केले. जिजाऊंची हिम्मत आजच्या महिलांमध्ये यावी, हीच जिजाऊ चरणी प्रार्थना…

    – श्रीमंत कोकाटे, इतिहासतज्ञ

    Source : http://vishvamarathi.blogspot.in/2013/09/blog-post_24.html

  • वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… द वॉल राहुल द्रविड

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… द वॉल राहुल द्रविड

    Rahul Dravid Birthday

    साधेपणा चोरीला गेल्याचे किंवा हरवल्याचे आजकालचे दिवस आहेत. एखाद्या सामान्य व्यक्तीने साधेपणाने वागण्यात कुणालाच फारसं नवल वाटत नसतं. पण सर्व सुखं ज्यांच्या पायाशी लोळण घेत असतात आणि समाज ज्यांना आदर्श मानतो अशा एखाद्या व्यक्तीचा साधेपणा समोर आला तर मात्र त्याची चांगलीच चर्चा होते.

    बॉलीवूड आणि क्रिकेटवर तर भारतीयांचं विशेष प्रेम. अमाप प्रसिद्धी आणि पैसा यामुळे या दोन क्षेत्रांत वावरणारी मंडळी कायम ढगातच असतात. असं असलं तरी त्याला काही अपवाद जरूर आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे राहुल द्रविड. भारत सरकारद्वारे दिले जाणारे ‘पद्मश्री’ आणि ‘पद्मभूषण’ या सर्वोच्च नागरी सन्मानांनी त्याला गौरवण्यात आलंय. आपल्या सोळा वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत तंत्रशुद्ध आणि संयमी खेळीने आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या द्रविडच्या नावावर कसोटीत तेरा हजारांहून जास्त तर एकदिवसीय सामन्यांमध्ये दहा हजारांहून जास्त धावा जमा आहेत.

    Rahul Dravid

    भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार, उपकर्णधारपद त्याने सांभाळलेलं आहे. पण भारतीय क्रिकेट संघात असतानाही सामन्याची स्थिती, निकाल काहीही असो त्याने आपला संयम केव्हाही सुटू दिला नाही. टीव्हीच्या पडद्यावर जसा साधासरळ तो सर्वाना दिसला तसाच तो आपल्या खासगी आयुष्यातही वागत आलाय. असा हा जंटलमन काही दिवसांपूर्वी आपल्या मुलांसमवेत विज्ञान प्रदर्शनात रांगेत उभा असलेला पाहायला मिळाला. चेहऱ्यावर कुठलाही आविर्भाव नाही किंवा आजूबाजूला सुरक्षारक्षकांचा गोतावळा नाही. एखाद्या सामान्य पालकांप्रमाणे तो रांगेत उभा असल्याचा फोटो एका खासगी ट्विटर हॅण्डलवरून शेअर करण्यात आला आणि वाऱ्यासारखा पसरला. पुन्हा एकदा द्रविडच्या साधेपणाच्या किश्शांनी इंटरनेटच्या वॉल भरल्या. अनेकांनी केवळ हात जोडले तर काहींनी खासगी अनुभव, त्यांच्याकडे असलेले फोटो शेअर करत द्रविडच्या साधेपणाला सलाम ठोकला.

    वडिलांच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशी दूरवरून आलेल्या आपल्या चाहत्यांना भेटणारा, विमानाच्या इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करणारा, समोरच्या व्यक्तीशी हस्तांदोलन करताना आपलं नाव सांगणारा, बंगळूरु विश्वविद्यालयातर्फे दिली जाणारी मानद डॉक्टरेट प्रांजळपणे नाकारून माझ्या मेहनतीवर ती मिळवीन असं म्हणणारा, अंथरुणाला खिळलेल्या आपल्या चाहत्याला व्यग्र कार्यक्रमामुळे भेटू न शकलेला पण नंतर स्काइपद्वारे संवाद साधणारा, अंध क्रिकेटपटूंकडून मलाच अनेक गोष्टी शिकायला हव्यात अशी कबुली देणारा, पॅराऑलिम्पियन खेळाडूंचा मार्गदर्शक म्हणून काम करणाऱ्या द्रविडचे असे अनेक किस्से यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चिले गेले.

    Rahul Dravid, the Wall of Indian Cricket

    प्रतिमा तयार करणे आणि ती विकून पैसा कमवणे हादेखील आज एक व्यवसाय झाला आहे. आपण जे नाही ते नाटय़मय प्रसंगामधून सतत लोकांसमोर मांडून सहानुभूती मिळविणारे अनेक लोक आपल्या आजूबाजूला आहेत. एखाद्या क्षेत्रात प्रसिद्धीच्या शिखरावर असताना आणि तिथून पायउतार झाल्यावरही चर्चेत राहण्याचा अनेकांचा आटापिटा सुरू असतो. पण या सगळ्या गोष्टींना अपवाद ठरणाऱ्यांमध्ये राहुल द्रविड हे नाव कायमच आदराने घेतलं जात होतं आणि यापुढेही घेतलं जाईल. संयम आणि साधेपणाचं हे मूर्तिमंत उदाहरण कायम असेच सुखद धक्के देत राहो हीच आशा.

    viva@expressindia.com

    (हा मूळ लेख १ डिसेंबर २०१७ रोजी लोकसत्ताच्या व्हिवा पुरवणीमध्ये प्रकाशित झाला होता)

  • ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेले पहिले मराठी साहित्यिक, अग्रगण्य कादंबरीकार वि. स. खांडेकर

    ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेले पहिले मराठी साहित्यिक, अग्रगण्य कादंबरीकार वि. स. खांडेकर

    V.S. Khandekar

    वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला. त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. वि.स.खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे. अंत:करणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे. ललित भाषा रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. कल्पनाशक्ती अतिशय तल्लख आणि तेजस्वी. लेखनातून मनोरंजन करण्याबरोबर समाजजीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते. खांडेकरांच्या लेखनातून माणुसकीचा गहिवर दिसून येतो. त्यांचा लेखनातून माणसावरील अपार श्रद्धा व्यक्त होते. रूपक कथा हा नवा प्रकार त्यांनी रुढ केला. कथालेखनातून व्यक्त होणारे जीवनदर्शन आणि धेयनिष्ठा वाचकांना प्रभावित करतात, म्हणूनच तर वि.स.खांडेकर हे जीवनवादी लेखक म्हणून ओळखले जातात.

    कुमार वयापासूनच त्यांच्यावर उत्तम साहित्याचे संस्कार होत होते, ते त्यांच्या मराठीच्या शिक्षकांमुळे आणि बालकवी, राम गणेश गडकरी, अच्युतराव कोल्हटकर यांसारख्या साहित्यिकांशी झालेल्या परिचयामुळे. गडकरींमुळे पाश्र्चात्त्य साहित्य वाचण्याचा छंदही त्यांना तेव्हा लागला होता. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी खांडेकरांना विनोद चांगला साधतो व काव्यात्म प्रकृतीचे लेखनही ते करू शकतात, तेव्हा या दोहोंचे मिश्रण असलेल्या गोष्टी त्यांनी लिहाव्यात असे सुचवले; तेव्हा खांडेकर यांना स्वत:त लपून बसलेला कथाकार सापडला. ते उत्कृष्ट वक्ते म्हणूनही महाराष्ट्रात प्रसिद्ध होते.

    एक कादंबरीकार म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच त्यांना महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही अफाट लोकप्रियता मिळाली. १९३० मध्ये ‘हृदयाची हाक’ ही पहिली कादंबरी त्यांनी लिहिली. त्यानंतर एकापाठोपाठ एक कांचनमृग, दोन ध्रुव, हिरवा चाफा, दोन मने, रिकामा देव्हारा, पहिले प्रेम अशा त्यांच्या अनेक कादंबर्‍या प्रकाशित झाल्या. सुमारे ३५ कथासंग्रह, १० लघुनिबंध संग्रह, गोफ आणि गोफण यांसारखे समीक्षालेख संग्रह असे झंझावाती लेखन त्यांनी केले. छाया, ज्वाला, अमृत, देवता, माझं बाळ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांच्या कथाही त्यांनी लिहिल्या. शब्दप्रभुत्व, कोटीबाजपणा, कल्पनावैभव यांचा वारसा त्यांनी कोल्हटकर-गडकरी यांच्याकडून घेतला. मध्यमवर्गीय माणसांच्या आशा-आकांक्षा, सर्वसामान्यांची सुख दु:खे, त्यांचा आदर्शवाद त्यांनी मुख्यत्वे आपल्या कथा-कादंबर्‍यांतून मांडला. त्यांचा नायक हा सामाजिकतेचे भान असलेला, आदर्शाची ओढ असलेला असे.

    Untitled design

    हळूहळू बदलत चाललेल्या सामाजिक परिस्थितीत या प्रकारचा आदर्शवाद ही मध्यमवर्गीय तरुण पिढीची मानसिक गरज होती. त्यामुळे खांडेकर त्या काळातले सर्वांत लोकप्रिय लेखक ठरले. त्यांची क्रौंचवध ही कादंबरीही लोकप्रिय ठरली. ययाती, अमृतवेल या स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वांत जास्त गाजलेल्या त्यांच्या कादंबर्‍या होत. ‘ययाती’ला १९६० चा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला.

    भारत सरकारने १९६८ मध्ये पद्मभूषण सन्मान देऊन त्यांना गौरवले. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) बहला केली. तर भारतीय ज्ञानपीठातर्फे १९७४ मध्ये त्यांना ‘ज्ञानपीठ’ या अत्युच्च मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या कथा-कादंबर्‍यांवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दुरदर्शन मालिकाही निर्माण झाल्या. त्यांच्या साहित्याचे अन्य भारतीय भाषांत व विदेशी भाषांतही अनुवाद झाले.

    ‘रूपककथा’ ही खांडेकरांनी मराठी कथेला दिलेली देणगी होय. आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि आदर्श मूल्ये यांची मांडणी त्यांनी या कथांतून केली. वेचलेली फुले या संग्रहात या रूपककथा आहेत. अक्षरश: चकित व्हायला व्हावे एवढे विविध प्रकारचे, विपुल आणि तरीही दर्जेदार असे लेखन करून खांडेकरांनी मातृभाषेची सेवा केली आहे, आणि त्यायोगे मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून त्यांनी मराठी रसिकांत व साहित्यिकांमध्ये चैतन्य आणि आत्मविश्र्वास निर्माण केला.

    Source : http://mh-marathi.com/v-s-khandekar/

    #VSKhandekar #मराठी #ज्ञानपीठ #ययाती #वि._स._खांडेकर

  • जगप्रसिद्ध अंतराळ संशोधक स्टीफन हॉकिंग यांचा आज जन्मदिन.

    जगप्रसिद्ध अंतराळ संशोधक स्टीफन हॉकिंग यांचा आज जन्मदिन.

    eddie redmayne as a young stephen hawking

    ‘मोटार न्यूरॉन डिसीज’ने त्यांना ग्रासले होते. गेली अनेक वर्ष त्या आजाराशी झगडत होते. त्यांची ही जिद्द आणि प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असाच होता. भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्र सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल, यासाठी त्यांनी लिखाण केले. हॉकिंग यांना आधुनिक काळातील न्यूटन असे म्हटले जायचे. वयाच्या ३५ व्या वर्षी हॉकिंग केंब्रिज विद्यापीठात ल्यूकॅशियन प्रोफेसर झाले. केंब्रिज विद्यापीठात हे पद महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेच मानले जाते. न्यूटन देखील ल्यूकॅशियन प्रोफेसरच होते.

    स्टीफन हॉकिंग आपल्या ग्रॅजुएशनच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत होते. त्यावेळी आइस स्केटिंग करताना ते अचानक पडले. गंभीर जखमी झालेल्या हॉकिंग यांना Amyotrophic Lateral Sclerosis (ALS) न्युरॉन कमी करणारा आजार झाला होता. हा कधीच बरा नाही होणारा आजार असून येत्या 1 ते 1.5 वर्षांत स्टीफन यांचा मृत्यू होणार अशी भविष्यवाणी डॉक्टरांनी केली होती. पण, या भविष्यावाणीनंतर त्यांनी मृत्यूला पछाडले आणि पुढचे 42 वर्षे जगले.

    5d952dd4 e4a7 46a9 a5a0 04b9d301055e 1329x841 1

    स्टीफन हॉकिंग यांनी आपल्या हयातीत अनेक संशोधन आणि सिद्धांत मांडले. व्हीलचेअरवर बांधले गेले तेव्हा त्यांचे हात पाय आणि शरीराने काम करणे बंद केले. शरीराने काम करणे बंद केले पण जीनियस डोक्यातील विचार कधीच थांबले नाहीत. शरीर निष्क्रीय झाल्यानंतर आपले डोके आणखी सक्रीय झाले असे ते म्हणाले होते. हात, पाय आणि शरीराने जी ऊर्जा वाचवली ती समस्त ऊर्जा बुद्धीने वापरली आणि एकानंतर एक सिद्धांत त्यांनी जगासमोर मांडले.

    हॉकिंग्ज एनर्जी, हॉकिंग्ज रेडिएशन यांसह अनेक शोधांसाठी ते प्रसिद्ध आहेत. हॉकिंग्ज यांची ब्रिफ हिस्टरी ऑफ टाइम, ब्लॅक होल अॅन्ड बेबी युनिवर्सेस अन्ड इदर एसेज, द युनिवर्स इन नटशेल, ऑन द शोल्डर्स ऑफ जायंटस यांसारखी अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. भौतिकशास्त्रातले जगातील अत्यंत मानाचे व मोठे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

  • यंत्रांनाच देव मानणारा भक्त – बाबा कल्याणी

    यंत्रांनाच देव मानणारा भक्त – बाबा कल्याणी

    Baba Kalyani

    नवनिर्मितीचा ध्यास आणि नवनव्या आव्हानांना सामोरे जाण्याची चिकाटी याच्या जोरावर “भारत फोर्ज‘ या वाहनांच्या सुट्या भागाचे उत्पादन घेणाऱ्या कंपनीने जागतिक स्तरावर वर्चस्व निर्माण केले. त्याचे प्रणेते आहेत अर्थातच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष बाबा कल्याणी. कारखाना म्हणजे देवालय, मशिन म्हणजे देव आणि उत्पादन म्हणजे देवाची भक्ती अशी त्यांची श्रद्धा आहे. या श्रद्धेच्या जोरावरच त्यांनी भारत फोर्जला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन पोचविले. त्यांच्या नेतृत्वाखालील कल्याणी उद्योगसमूहाने आज ऑटोमोबाइलबरोबरच तेल व नैसर्गिक वायू,ऊर्जा, बांधकाम, खाण, रेल्वे इंजिन, जहाज व विमान, युद्धसामग्री अशा विविध क्षेत्रांत डौलाने आपला झेंडा फडकाविला आहे. 1972 मध्ये सेल्स इंजिनिअर या पदापासून त्यांची भारत फोर्जमधील कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. सरव्यवस्थापक ते व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष अशी त्यांची कारकीर्द बहरत गेली आणि कंपनीही. आज त्यांच्या कुशल नेतृत्वामुळेच कंपनीची आर्थिक उलाढाल 2.5 अब्जच्या घरात जाऊन पोचली आहे.

    >> संस्कारांचे बाळकडू

    वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षीच बाबांना बेळगावच्या बोर्डिंग स्कूलमध्ये पाठविण्यात आले. वास्तविक हे वय खेळण्या-बागडण्याचे; पण याच वयात त्यांना सर्व बालसुलभ गोष्टी बाजूला ठेवून लष्कराच्या कडक शिस्तीत वावरावे लागले. बेळगावचे हे सैनिक स्कूल देशातील नामांकित शाळांपैकी एक. आर. एस. मणी हे त्यावेळी या शाळेचे प्राचार्य होते. ऑक्‍सफर्डमध्ये शिक्षण झालेले प्राचार्य मणी कडक शिस्तीचे. त्यांचा हात पाठीवरून फिरला आणि बाबांचे आयुष्यच बदलून गेले. बाबांनी शिस्त, वेळेचे महत्त्व आणि व्यक्तिमत्त्व विकास ही त्रिसूत्री आयुष्यभर जपली.

    गुजरातमधील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी अँड सायन्सेस या महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. येथे त्यांनी चमक दाखवताना सातत्याने पहिला-दुसरा क्रमांक राखला. येथील शिक्षण संपवून त्यांनी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील बोस्टन येथील एमआयटी महाविद्यालयात प्रवेश घेतला. अगदी त्या काळातही तेथील प्रवेशासाठी अत्यंत कठीण असणारी प्रवेश परीक्षा द्यावी लागायची. बाबांनी ही कठीण परीक्षा अगदी सहज दिली. एमआयटीमधील पदवी पाच सेमिस्टरची होती; पण बाबांनी कठोर मेहनत, नावीन्याचा ध्यास आणि शिस्तीचे संस्कार याच्या जोरावर तीन सेमिस्टरमध्येच पदवी पूर्ण केली. त्याच काळात तेथील “सिप्को‘ या कंपनीचे अध्यक्ष चार्ल्स स्मिथ यांनी “इलेक्‍ट्रो केमिकल‘ मशिनचे नवे तंत्र विकसित केले होते. बाबांचा पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा शोधनिबंधही याच विषयावर होता. त्यामुळे चार्ल्स स्मिथ हे त्यांचे प्रेरणास्थान बनले. अमेरिकेत त्यांनी त्यांच्याकडे पाच ते सहा महिन्यांचा अनुभव घेतला. याच अनुभवाच्या शिदोरीवर त्यांनी “भारत फोर्ज‘ कंपनीला यशोशिखरावर पोचविले.

    Bharat Forge

    बाबांचे अमेरिकेत शिक्षण सुरू असतानाच इकडे पुण्यात “भारत फोर्ज‘च्या उभारणीचे काम वेगाने सुरू झाले होते. 1964-65चा तो काळ होता. बाबा सुटीला पुण्यात आले, की त्यांचा पूर्ण वेळ या प्लॅंटवरच जात असे. तेथे सुरू असलेल्या यंत्रजोडणीच्या कामात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या या जिद्दी वृत्तीमुळेच भारत फोर्जमधील यंत्रांना आकार मिळाला आणि त्यांच्या आयुष्यालाही!

    अमेरिकेतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते थेट भारत फोर्जमध्येच दाखल झाले. त्यावेळी त्यांचे वय होते अवघे एकवीस वर्षे. अवजड उद्योगात आधुनिक तंत्राचा वापर कसा करता येईल, याचे बाळकडू त्यांना अमेरिकेतील शिक्षणात मिळाले होते. त्यामुळेच ‘भारत फोर्ज‘ला अत्याधुनिक बनविण्याचा ध्यासच त्यांनी घेतला. 1971 मध्ये सेल्स इंजिनिअर पदापासून त्यांच्या कारकीर्दीला प्रारंभ झाला. गतिमान आयुष्य आणि झपाटून काम करण्याची जीवनशैली त्यांना अमेरिकेतील शिक्षणात मिळाली होती. याच गुणांच्या आधारावर त्यांनी भारत फोर्जमधील कामाला प्रारंभ केला. वेळेचे महत्त्व, कमालीची शिस्त आणि गुणवत्तेत तडजोड न करण्याची भूमिका या त्रिसूत्रीचा त्यांनी स्वतः तर अवलंब केलाच; पण कंपनीतील प्रत्येकाला त्याचा अवलंब करण्यास भाग पाडले.

    bharat-forge-dispatches-16-kalyani-m4-armoured-vehicles-to-indian-army-

    बाबांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या वर्षभरातच ते कंपनीचे सरव्यवस्थापक बनले. नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून घेण्यासाठी, त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्यांनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी परदेशात पाठविले. बाबांच्या नेतृत्वाखाली कंपनीने जेवढ्या ऑर्डरी होत्या त्या तर वेळेत पूर्ण केल्याच; पण त्यापेक्षाही अधिक उत्पादन घेतले. त्यामुळे त्यांनी हे जादाचे उत्पादन निर्यात करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या सरव्यवस्थापक पदाच्या काळातच भारत फोर्जने आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करण्यास सुरुवात केली.

    भारत फोर्जला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवतानाच त्यांनी दोन विदेशी कंपन्या खरेदी केल्या व त्या यशस्वीपणे चालवूनही दाखविल्या. त्यापैकी एक कंपनी होती जर्मनीतील सीडीपी फोर्जिंग नावाची. त्यानंतर तेथेच आणखी एक कंपनीही त्यांनी खरेदी केली. या कंपनीत वाहनांसाठी लागणारे सुटे भाग ऍल्युमिनिअमपासून तयार करण्यात येत होते. अत्यंत प्रगत तंत्रज्ञान वापरून त्यांनी या कंपनीतही व्यावसायिक यश मिळवून दाखविले. भारत फोर्जचा आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी दबदबा निर्माण केला.

    कल्याणी उद्योगसमूहाच्या माध्यमातून इतर अनेक औद्योगिक क्षेत्रांत धवल यश संपादन केले. हे सर्व करतानाच त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली. त्यामुळेच त्यांनी पुण्यात “प्रथम ट्रस्ट‘ नावाची बिगरशासकीय संस्था (एनजीओ) स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी झोपडपट्ट्यांतील मुलांसाठी शाळा सुरू केल्या. नांदेडला अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले. कामालाच देव मानून त्यांनी झपाटून केलेल्या कामामुळेच कल्याणी उद्योगसमूह देशातीलच नव्हे तर जगातील एक नामांकित उद्योगसमूह बनला. याचे सर्व श्रेय जाते ते बाबा कल्याणी यांच्या कल्पकतेला, धडाडीला, कामालाच ईश्‍वर मानण्याच्या त्यांच्या श्रद्धेला.

    – अनिल सराफ, दै. सकाळ