‘वॉरेन बफे’ म्हणतात की, ‘खर्च करून उरलेल्या रकमेत बचत करण्यापेक्षा, बचत करून उरलेल्या रकमेत खर्च करा.’ अमेरिकन बँकेचे डीन जे. पी. मोर्गन एका दलालास सल्ला देताना म्हणाले, “तुमचा रोजचा वायफळ खर्च बचतीच्या रुपात साठवला, तर आयुष्यात पुढे होणारी धावपळ टाळली जाऊ शकते.” विल रॉजर म्हणतात, “कर्ज काढून उद्याच्या पगारावर जगणाऱ्या अभिनेत्याच्या संगती पेक्षा, कालच्या बचतीवर भागवणाऱ्या द्वारपालची संगत मी पसंत करेन.”
बचत ही सर्वश्रेष्ठ सवय आहे, ज्याला ही सवय लागेल त्याची प्रगती होते. अडचणीच्या काळात आपण केलेल्या बचतीचा आपल्याला खूप फायदा होतो. बचत करणे हे प्रत्येकाच्या नियोजनात असायलाच हवे. वाढती महागाई आणि भविष्यातील अगणित आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बचत ही काळाची गरज बनली आहे. घरखर्चाचे आर्थिक नियोजन असो किंवा एखाद्या देशाची अर्थव्यवस्था प्रत्येक ठिकाणी बचतीची गरज पडतेच. जर बचत केली नाही, तर उत्पन्न ढासळू शकते आणि आर्थिक अडचणी निर्माण होऊन नुकसान होऊ शकते. बचत करण्याची गरज आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ओळखली गेली आणि तिथूनच ‘जागतिक बचत दिवसा’ची सुरुवात झाली. वर्षभर कसले ना कसले दिवस साजरे करून आपण आपला खर्च वाढवतच असतो. या जागतिक बचत दिवसाला आपण ही काही उपाय करून बचत करण्याचा प्रयत्न करणं जमतंय का ते पाहूयात.
कधी आणि कुणी केली ‘जागतिक बचत दिवसा’ ची सुरुवात ?
या दिवसाची सुरुवात 31 ऑक्टोबर 1942 रोजी झाली. इटली मधील मिलान इथे प्रा. फिलिपो फिलिपो रविझा यांनी पहिल्या आंतरराष्ट्रीय कॉंग्रेस बचत बँकेच्या परिषदेत या दिवसाची सुरुवात केली. तेव्हापासून हा दिवस जगभर साजरा केला जाऊ लागला. 1925 मध्ये पहिला जागतिक बचत दिवस साजरा केला गेला. त्यानंतर 1929 मध्ये स्पेन आणि अमेरिकेत प्रथम राष्ट्रीय बचत दिन साजरा केला गेला.
भारतात जागतिक बचत दिवस एक दिवस आधी साजरा का केला जातो ?
जागतिक बचत आणि रिटेल बँकिंग संस्था WSBI नुसार, जागतिक बचत दिवस 31 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. 31 ऑक्टोबर 1984 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली. तेव्हापासून भारतात ३० ऑक्टोबर रोजी जागतिक बचत दिवस साजरा केला जातो.
या जागतिक बचत दिवसाला पुढील उपाय वापरून करू शकता स्वत:ची बचत
प्रत्येक महिन्याला खर्चाचे नियोजन करावे
दर महिन्याला खर्चाचे नियोजन करून त्यानुसार पैसे खर्च करणे आवश्यक आहे. खर्चाचे नियोजन करून त्यानुसार आपला खर्च नियंत्रित ठेवावा .
गरज पहावी आवड नाही
खर्च करताना नेहमी गरजेला प्राधान्य द्यावे. वायफळ खर्च टाळता आला, तरच बचत करणे शक्य होईल. ज्या वस्तू गरजेच्या आहेत त्याच खरेदी कराव्यात.
पैसा घरी ठेवू नये
आवश्यक तो पैसा घरी ठेवून बाकीची रक्कम बँकेत ठेवणे कधीही फायदेशीर आहे. आपला पैसा शेअर बाजार, म्युच्युअल फंड, जीवन विमा किंवा आरोग्य विम्यामध्ये गुंतवल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.
जर तुम्हाला बँकांमध्ये पैसा गुंतवायचा नसेल, त्यांच्या धोरणानुसार खाते उघडणे तुम्हाला शक्य होत नसेल, तर भारतीय पोस्ट खाते आणि सेव्हिंग्स हा तुमच्यासाठी उत्तम आणि फायदेशीर पर्याय आहे.
तुम्हाला आजचा लेख कसा वाटला हे कंमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा
सध्या महागाई झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत पैसा कमवणे, हा सर्वांसाठी कळीचा मुद्दा बनला आहे. त्यामुळे अनेकदा असे पसरवले जात आहे की, श्रीमंत बनायचे असेल, तर तुमचं स्वतःचं काहीतरी करा. बिझनेस करा, रिस्क घ्या. मात्र, सर्वांसाठी रिस्क घेणे शक्य होत नाही. जॉब करणाऱ्यांची काहीतरी मजबुरी असते. मग जेव्हा तुम्ही जॉब करत असाल, तर तुम्ही श्रीमंत बनू शकत नाही का? तर हे चुकीचं आहे. तुम्ही जॉब करूनही श्रीमंत बनू शकता. चला तर, आपण जाणून घेऊयात की, तुमचा एका ठराविक पगार असेल, तर तुम्ही चांगल्या आर्थिक नियोजनाद्वारे खरोखरच श्रीमंत बनू शकता. यासोबतच आपण तुमचा पगार जर कमी असेल, तर तो वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता, याविषयीही जाणून घेऊयात…
आर्थिक नियोजन
आपण या लेखातून जॉब करणारा व्यक्ती कशाप्रकारे योग्य आर्थिक नियोजनाद्वारे श्रीमंत कसा बनू शकतो, हे पाहूयात. आज तुमचा पगार कमी जरी असला, तरीही तुम्ही स्वत:ला धन्यवाद द्या की, तुम्ही या काळात जन्माला आलात. कारण, आज तुम्ही कुठल्या कॉलेजमधून आलात, त्याचे महत्त्व कमी झाले आहे. तुमची पदवी काय आहे, त्याचे महत्त्व कमी झाले आहे. एवढंच काय, तर तुमचे मार्क्स किती आहेत, याचेही महत्त्व कमी झाले आहे. आजपासून १०-१५ वर्षांपूर्वी या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरत होत्या. मात्र, आता त्यांचा एवढा फरक पडत नाही. आता फक्त एकच गोष्ट गरजेची आहे, ते म्हणजे तुम्ही कोणत्या एका गोष्टीमध्ये चांगले आहात. तसेच, जर तुम्ही एखाद्या गोष्टीत चांगले नसलात, पण तुम्हाला त्यात रस असेल; तर तुम्ही मोफत इंटरनेटच्या वापराने त्यात चांगले होऊ शकता. मग ते काहीही असू शकते. ग्राफिक्स डिझायनिंग असू शकते, वेब डेव्हलपमेंट असू शकते किंवा कंटेंट रायटिंगदेखील असू शकते.
तुम्ही कोणत्यातरी एका गोष्टीत स्वतःला एक चांगली व्यक्ती बनवू शकला, तर कोणतीही कंपनी तुम्हाला जॉब देईल, जिथे तुमचा पगार २० हजार किंवा त्याहून अधिक असेल. तर अशा परिस्थितीत आम्ही जे आर्थिक नियोजन तुम्हाला सांगत आहोत, ते तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.
जर तुमचा पगार २० हजार रुपये किंवा त्याहून अधिक असेल, तर तुम्ही कोट्याधीश कसे बनू शकता? यासाठी काही नियम आहेत. एक असा की, ५०, ३० आणि २० नियम. या नियमानुसार, तुमचा जो काही पगार आहे, त्यातील ५० टक्के पगार तुम्ही गरजांवर खर्च करू शकता. जसे की, वीज बिल, पेट्रोल, फोन बिल, खान-पान आणि घराचे भाडे. त्यानंतर ३० टक्के पगार तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींवर खर्च करू शकता. जसे की, चांगले कपडे घ्यायचे आहेत, पार्टी करायची आहे, कुठे फिरायला जायचे आहे, मूव्हीला जायचं आहे. यानंतर पुढचा भाग येतो २० टक्के पगार, जी आहे बचत. तुम्हाला तुमच्या पगारातील कमीत कमी २० टक्के पैशांची बचत करायची आहे. त्यानंतर याच पैशांची गुंतवणूक करायची आहे. चला तर, आपण याची आकडेमोड करून पाहूयात.
तुमचा पगार फक्त २० हजार असला, तरीही हा हिशोब वैध आहे. आपण २० हजार रुपयांविषयी बोलत आहोत, तर तुम्हाला यापैकी किती रुपयांची बचत करायची आहे, तर २० टक्के. तुम्ही जर यापेक्षा जास्तीची बचत करू शकला, तर अति उत्तम. २० टक्के रक्कम तुम्ही बचत करत आहात, तर ती रक्कम होते ४ हजार रुपये. आता ४ हजार रुपयांची तुम्ही बचत करत आहात किंवा तुमचं ते ध्येय आहे. आता आपण पाहूयात की, तुम्ही जे ४ हजार रुपये बचत करत आहात, त्यातून तुम्ही काय कराल. पहिला नियम होता ५०-३०-२० आता आपण दुसरा नियम पाहूयात, जो गुंतवणुकीचा आहे. त्यानुसार तुम्हाला त्या ४ हजार रुपयांची गुंतवणूक करायची आहे.
यासाठी तुम्ही जीवन विमा घेऊ शकता. तुम्ही जर तरुण असाल, २७ ते ३० पेक्षा कमी वयाचे, तर तुम्हाला १ कोटी रुपयांचा विमा मिळेल. हा तुम्हाला साधारण ५०० रुपये प्रति महिना हिशोबाने मिळेल. आता ४ हजारातील ५०० रुपये गेले, तेव्हा तुम्ही साधारण विमा नाही, तर टर्म प्लॅन घ्याल आणि काही गोष्टींची काळजी घ्या. जसे की, कुटुंबातील सर्वांचा जीवन विमा घ्यायचा नाहीये. जे कमावते लोक आहेत किंवा तुम्ही कमावते आहात, तर तुमचा विमा घ्या. कोणत्याही स्कीममध्ये अडकून स्वतःची फसवणूक करून घेऊ नका.
दुसरी पायरी म्हणजे, आरोग्य विमा. हा विमा सर्वांचा घ्यायचा आहे. कारण, आजारी कुणीही पडू शकतो. त्यामुळे यासाठी जवळपास ५०० रुपयात तुमचा आरोग्य विमाही मिळेल. आता ४ हजारांपैकी १ हजार रुपये तुमच्या जीवन आणि आरोग्य विम्यासाठी खर्च झाले. सर्वप्रथम ही दोन कामे केली पाहिजेत.
आपत्कालीन निधी
आता पुढची पायरी म्हणजे आपत्कालीन निधी. आजकाल फ्रीलान्सिंग सुरू आहे. मात्र, त्याचाही काही भरोसा नाहीये. कधी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाते. कधी व्यवसाय ठप्प पडतो, किंवा लॉकडाऊनची स्थिती उद्भवते. कोणतीही आपत्कालीन स्थिती उभी राहते. मात्र, खर्च हा सुरूच असतो. त्यामुळे त्याची आधी तयारी करायची. त्यानंतर गुंतवणुकीचा विचार करायचा.
जर तुमच्या घरात एकटे कमावते असाल, तर तुमच्याकडे सहा महिन्यांचा आपत्कालीन निधी असावा. तसेच, जर तुमच्या घरात दोन कमावते लोक असतील, तर तुमच्याकडे तीन महिन्याचा आपत्कालीन निधी असावा. आता तीन महिन्यांचा आपत्कालीन निधी समजून घेऊयात. तुमचा पगार २० हजार आहे, तर आपण ५०-३०-२० नियमानुसार ५० टक्के रुपये तुमच्या गरजांसाठी आहेत, त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. तुमची नोकरी जरी गेली, तरीही तुम्ही तो खर्च दुर्लक्षित करू शकणार नाहीत. म्हणजेच महिन्याचा १० हजार रुपये हा असा खर्च आहे, जो तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजेच. त्यामुळे तुम्ही जर घरातील दुसरे कमावते व्यक्ती असाल, तर तुमचा आपत्कालीन निधी कमीत कमी तुमच्या गरजांपेक्षा तीन पट असला पाहिजे. तसेच, घरातील प्रथम कमावते व्यक्ती असाल, तर आपत्कालीन निधी तुमच्या गरजांपेक्षा सहा पट असला पाहिजे. म्हणजेच तुमच्या महिन्याच्या गरजांवरील खर्च १० हजार रुपये आहे, तर तुमचा आपत्कालीन निधी हा कमीत कमी ३० हजार रुपयांचा असावा. जास्त असेल, तर उत्तमच.
आता हे ३० हजार रुपये कसे येणार हे पाहूयात. तुमच्या बचतीतील ४ हजार रुपये जे होते, त्यातील १ हजार महिना तर विम्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील. उरलेल्या ३ हजार रुपयांतून तुम्ही आताच गुंतवणुकीला सुरुवात करू नका. तुम्हाला १० महिन्यांसाठी ते ३-३ हजार रुपये जोडून बचत खात्यात आधी ३० हजार रुपये जमा केले पाहिजेत. तसेच, तुम्ही पे ऑटो स्विच ऑन करा. जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही पैसे खर्च कराल, तर एफडी करा, जी रक्कम काढता येऊ शकेल. अशाप्रकारे तुम्ही १० महिन्यांपर्यंत ३-३ हजार रुपये जमा करून आपत्कालीन निधी तयार करू शकता. हे तुम्ही कामाला लागल्यानंतर पहिल्या १० महिन्यात करावे लागणार आहे.
जीवन विमा तुम्हाला सर्वप्रथम घ्यायचा आहे. कारण, जितक्या तरुण वयात तुम्ही हा विमा घ्याल, तेवढा तुम्हाला प्रीमियम (हप्ता) कमी भरावा लागेल. तर या झाल्या तीन महत्त्वाच्या पायऱ्या. तुम्ही तुमचा जीवन आणि आरोग्य विमा घेतला. तुमचा आपत्कालीन निधी बनवला. आता ११ महिन्यानंतर तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकता.
गुंतवणूक
अनेकजण काय करतात की, पहिल्या महिन्यापासूनच गुंतवणूक सुरू करतात. तसे करायचे नाही. जेव्हा ११ महिने होतील, तेव्हा गुंतवणूक सुरू करा. तुमच्याकडे आता ३ हजार रुपये आहेत, तुम्हाला स्टॉक्समध्ये, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवायचे आहेत, तर आता तुम्ही गुंतवू शकता. म्युच्युअल फंड्समध्ये अभ्यासपूर्ण गुंतवणूक केल्यास १२-१५ टक्के परतावा सहज मिळवू शकता. यासाठी एखाद्या अनुभवी आर्थिक सल्लागाराची मदत घेऊ शकता.
आपण अद्याप एक गोष्टीचा हिशोब केलाच नाही, तो म्हणजे तुमचा पगार कायम २० हजार असणार नाहीये. कधी ना कधी तुमचा पगार वाढणार आहे. तुम्ही नेहमी एवढीच गुंतवणूक करणार नाहीयेत. नक्कीच त्यात वाढ कराल. त्यामुळे जेव्हा तुम्ही जास्त गुंतवणूक कराल, तेव्हा तुम्हाला जास्त पैसे लागतील आणि त्यावर जास्त परतावा मिळेल. जसे तुम्ही सध्या ३००० रुपयांची गुंतवणूक करत आहात, पण पुढच्या वर्षी त्यात १५ टक्के वाढवाल. म्हणजेच पुढच्या वर्षी तुम्ही ३ हजार नाही, तर जवळपास ३५०० हजार रुपये गुंतवाल. त्यानंतर पुन्हा तुम्ही १५ टक्के वाढवाल. आता एक प्रश्न असाही आहे की, कुणाचा पगार दरवर्षी १५ टक्के वाढतो. जर महागाईचा दर ६.७ टक्के वाढला आणि तुमचा पगार १० टक्क्यांनी वाढला, तर तुमच्या पगाराच्या २० टक्के रक्कम गुंतवत आहात आणि त्यात तुम्ही १० टक्क्यांच्या वाढ केली, पण इतर ८० टक्के खर्च तुमचा गरजा आणि इतर गोष्टींसाठी ६ टक्क्यांनीच वाढला, तरी ४ टक्के तुम्ही गुंतवू शकाल.
आपण हे एका उदाहरणाद्वारे समजूया. समजा तुमचा पगार २० हजार आहे. आपण ५/६ टक्क्यांची महागाई पकडली, तर हिशोब सोपा होईल. आता ५ टक्के मानूया आणि तुमचा पगार १० टक्क्यांनी वाढला, तर पगार झाला २२ हजार. आधी तुमचा पगार २० हजार होता, तेव्हा तुमच्या गरजा आणि इतर गोष्टींसाठी ५०+३० म्हणजेच ८० टक्के म्हणजेच २० हजार पगाराच्या ८० टक्के रक्कम होते १६ हजार. आता तुमच्या मागील वर्षीच्या गरजा आणि इतर गोष्टींवरील खर्च १६ हजार होता. आता महागाई ५ टक्के वाढली आहे असे समजू. जे काम तुमचे आधी १६ हजारात व्हायचे, त्यावर आता ५ टक्के आणखी खर्च होत आहे, तेव्हा तुमचे ८०० रुपये आणखी खर्च होत आहेत, तेव्हा मागील वर्षी जे काम १६ हजारात व्हायचे, त्यासाठी आता १६८०० रुपये मोजावे लागत आहेत. तुमचा पगार २ हजारांनी वाढला आहे, ज्यातील ८०० रुपये महागाईमुळे खर्च झाले, तरीही तुमच्याकडे १२०० रुपये आहेत.
आता हे समजून घेऊयात की, २० टक्के नियम हा आहे की, २० टक्के तुम्हाला आणखी गुंतवायचे आहेत. जेव्हा तुम्ही २० हजार कमवत होता, तेव्हा त्यातून ४ हजार रुपये बचत करायचा. आता तुम्ही २२ हजार कमवत आहात, तर त्याचे २० टक्के होतात ४४००.
तुम्ही ४ हजार रुपये बचत करण्यापासून सुरुवात केली होती. त्यातील १ हजार रुपये विम्यासाठी गेले आणि ३ हजार रुपये उरले आणि तुम्ही प्रत्येक महिन्यात गुंतवणूक करू लागला. जर तुम्ही आता २०-२५ वर्षांचे असाल, तर ४०-४५ वर्षांचे होईपर्यंत २० वर्षांत तुम्ही दर वर्षी ३ हजारांपासून सुरू केलेली गुंतवणूक १५ टक्क्यांनी वाढवत असाल, तर तुम्हाला १२ किंवा १३ टक्क्यांच्या हिशोबाने ४० वयापर्यंत १ कोटी रुपये जमा होतील. म्हणजेच तुम्ही चाळिशीपर्यंत कोट्याधीश बनाल. २० वर्षांनंतर तुमच्याकडे १ कोटी असतील आणि तुम्ही आणखी ५-६ वर्षे थांबलात, तर तुमच्याकडे ५० वयापर्यंत २ कोटी रुपये येतील. यात दोन प्रश्न उद्भवू शकतात, त्यातील एक असा की, दोन कोटी जरी असले, तरीही तेव्हा यांचे मूल्य किती असेल.
हेही आपण पाहूयात. आजपासून २५-३० वर्षांनंतरही २ कोटी रुपयांचे मूल्य जर ५-६ टक्के महागाई पकडली, तरीही तुमच्याकडे त्यावेळी आजच्या हिशोबाने ६५-७० लाख रुपये असतील. एवढ्या पैशात तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता. आणखी एक गोष्ट अशी की, तुमचे लग्न झालेले असेल. त्यामुळे तुमचा पार्टनरही कमावता असेल. त्यामुळे दोघेही कमावते असल्यामुळे खर्च वाढणार नाही. अनेक खर्च सामान्य असतात. घरखर्च तेवढा वाढणार नाही. तुमची बचत जास्त होऊ शकते. कधी पगारात १० टक्क्यांची वाढ मिळेल, कधी २० टक्क्यांची, तर कधी ३० टक्क्यांची. या गोष्टींचा हिशोबही आपण अद्याप केला नाही. त्यानंतर एक शेवटचा प्रश्न असा की, ५० वर्षांच्या वयात श्रीमंतीचा काय फायदा.
तर हे आपण एकदम वर्स्ट केसमध्ये पाहिलं आहे. मात्र, जर तुमच्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळाला. जर तुम्ही जास्त गुंतवणूक केली, तर होऊ शकतं की, तुम्ही ३५-४० वयात श्रीमंत होऊ शकाल. त्यामुळे तेव्हा तुम्ही या पैशांचा मनासारखा वापर करू शकाल.
तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच, तुमच्या जॉब करणाऱ्या मित्रमंडळींनाही हे आर्टिकल नक्की शेअर करा.
प्रत्येकालाच आपल्या भविष्याची चिंता असते. पण, ही चिंता तुम्ही दूर करू शकता. यासाठी आर्थिक सुरक्षा म्हणजे काय हे लक्षात घ्यावे लागेल. याचा अर्थ असा की, तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या स्थिर आहे याची खात्री करण्यासाठी तुमच्या पैशांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करणे होय. चला तर, आर्थिक सुरक्षा मिळवण्याच्या पुढील ५ सवयी पाहूयात…
१. काटकसरीने जगा
कर्ज काढून दिवाळी साजरी केल्यासारखे जीवन जगण्याऐवजी काटकसर करा. एका महिन्यात खर्च केलेली प्रत्येक गोष्ट लिहून ठेवल्यास, तुम्हाला अनेक मार्ग सापडतील, ज्यामध्ये तुम्ही बचत करू शकता.
२. बजेट
बजेटिंग हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे. तुमची कमाई आणि खर्च यावर आधारित बजेट कसे तयार करायचे ते शिका. तुमच्या प्लॅनला चिकटून राहण्यासाठी आवश्यक असलेल्या स्वयं-शिस्तीचा सराव करा. वर्षभराच्या खर्चाची यादी तयार करा.
३. अनावश्यक कर्ज टाळा
कर्ज ही अशी गोष्ट आहे ज्याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. तुम्हाला परवडत नसलेल्या जीवनशैलीसाठी उधार घेतलेले पैसे वापरणे मूर्खपणाचे आहे. त्यावरच खर्च करा, ज्याने तुमची स्वतःची प्रगती होईल.
४. स्वत:मध्ये गुंतवणूक करा
तुमची मिळकत ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. तुमचे मूल्य वाढवण्यासाठी तुम्ही जे काही करू शकता, त्यासाठी ते पैसे खर्च करा. अभ्यासक्रमांना जा, तुमच्या उद्योगाशी संबंधित विषयांवरील पुस्तके खरेदी करा, वाचा आणि सेमिनार तसेच कार्यशाळांमध्ये सहभागी व्हा.
५. भविष्यासाठी बचत करा
तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी बचतीला आजपासूनच सुरुवात करा. परंतु मुलांच्या शिक्षणाच्या बचतीचा परिणाम तुमच्या निवृत्तीनंतरच्या बचतीवर होणार नाही याचीही तुम्हाला खात्री करावी लागेल. मुलांचे भविष्य प्राधान्य असले तरी, निवृत्तीनंतर तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्थिर असल्याची खात्री करणेही अधिक महत्त्वाचे आहे.
तुम्हाला आजचा लेख कसा वाटला हे कंमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा लेख आवडला असेल तर लाईक कराआणि शेअर करा
शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यामागे संपत्ती निर्माण करणे तसेच आपली आर्थिक ध्येयं पूर्ण करणे हा उद्देश असू शकतो. जसे की,
मुलांच्या शिक्षणासाठी
नवीन / मोठे घर घेण्यासाठी
मुलीच्या लग्नासाठी
स्वतःच्या निवृत्ती नियोजनासाठी
अशा प्रकारे आर्थिक ध्येय आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर खुणावत असतात. एका बाजूला वाढणारी महागाई, सुधारत चाललेला राहणीमानाचा दर्जा आणि प्रत्येक वस्तू ब्रँडेड हवी अशी मानसिकता; हे सर्व मिळवण्यासाठी आपली धडपड चालू असते. आज शेअर बाजार गुंतवणुकीतील वेगवेगळे पर्याय समोर दिसत असले, तरी या पर्यायाकडे वळण्याआधी स्वतःचे आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. कारण जोपर्यंत किती पैसा आणि कोणत्या आर्थिक ध्येयासाठी, कधी लागणार हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मला किती पैसा गुंतवावा, किती जोखीम घ्यावी हेही कळणार नाही. चला तर मग आज आपण आर्थिक नियोजनाचे महत्व समजून घेऊ.
आर्थिक नियोजन म्हणजे नक्की काय?
आज प्रत्येक व्यक्तीची मग तो तुमच्या माझ्यासारखा सामान्य व्यक्ती असो किंवा मुकेश अंबानी प्रत्येकाला काही ना काही आर्थिक ध्येयं आहेत. आज एखादा व्यक्ती महिन्याला १ लाख रुपये कमवत असेल आणि ४०-५० हजार जर त्याला दर महिन्याला घरखर्चाला लागत असतील तर उरलेली रक्कम बचत आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून पुढील भविष्यातील गरजांसाठी, अडचणीच्या काळातील खर्चासाठी बाजूला ठेवणे अनिवार्य आहे, हो ना? आर्थिक नियोजन म्हणजेच आपल्या भविष्यातील खर्चाचा मागोवा घेणे आणि त्याची तरतूद करणे. आज वाढलेली महागाई, शिक्षण आणि औषधपाण्याचा वाढलेला खर्च त्यामुळे भविष्याबद्दल कमालीची भीती निर्माण झालेली दिसते. या सर्वांतून मार्ग काढण्यासाठी ‘आर्थिक नियोजन’ करून घेणे हाच पर्याय उभा राहतो.
आर्थिक नियोजन करताना पुढील मुख्य घटक पहिले जातात
सध्याची आर्थिक परिस्थिती
भविष्यातील आर्थिक ध्येय
गुंतवणुकीत जोखीम घेण्याची क्षमता
वरील ३ मुख्य घटकांवर बहुतेक गोष्टी अवलंबून आहेत. आर्थिक नियोजनाचे खालील मुख्य भाग आहेत.
पैशाचे व्यवस्थापन
विमा नियोजन
गुंतवणूक नियोजन
निवृत्ती नियोजन
मालमत्ता हस्तांतरणाचे नियोजन
आपण सविस्तरपणे प्रत्येक बाजू समजावून घेऊ, जेणेकरून तुम्हाला स्वतःचे आर्थिक नियोजन करणे सोपे जाईल.
पैशाचे व्यवस्थापन – आर्थिक नियोजन करण्याआधी आपल्या पैशाचे व्यवस्थापन आपण कसे करतो हे आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. महिन्याला आपण किती कमावतो, किती खर्च करतो, महिन्याच्या खर्चाचे बजेट, वर्षाच्या खर्चाचे बजेट हे सर्व पैशाच्या व्यस्थापनामध्ये केले जाते. जोपर्यंत तुम्ही पैशाच्या व्यवस्थापनाला महत्व देत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमचा आर्थिक स्तर उंचावू शकत नाही.
विमा नियोजन – आज जीवन अनिश्चिततेने भरलेले आहे, त्यामुळे कधी कोणते संकट समोर उभे राहील सांगता येत नाही. विमा नियोजनाच्या माध्यमातून आपण आपल्या आर्थिक जबाबदाऱ्या विमा कंपन्यांवर सोपवू शकतो. जीवन विमा, आरोग्य विमा, वाहन विमा, घराचा विमा अशा अनेक पद्धतीने आपण आपल्या भोवती एक संरक्षक कवच उभा करू शकतो. भारतीय मानसिकतेत अजूनही विम्यावर होणार खर्च म्हणजे वाया गेलेला खर्च समजला जातो.
गुंतवणूक नियोजन – आर्थिक नियोजनातील महत्वाचा टप्पा म्हणजे गुंतवणूक नियोजन. वेगवेगळ्या आर्थिक ध्येयासाठी वेगवेगळे आर्थिक नियोजन करणे म्हणजे गुंतवणूक नियोजन होय. मुलांच्या शिक्षणासाठी, नवीन/मोठे घर घेण्यासाठी, मुलीच्या लग्नासाठी अशा एक ना अनेक ध्येयासाठी योग्य नियोजन गरजेचे आहे.
निवृत्ती नियोजन – आपण २५ वर्ष शिकत असतो आणि २५-३० वर्ष नोकरी किंवा धंदा करतो आणि या काळात जी काही शिल्लक बाजूला ठेवली असते त्यातून आपल्याला आपल्या निवृत्ती नंतरच्या काळासाठी नियोजन करायचं असते. निवृत्ती नियोजन ही काळाची गरज आहे; कारण वाढलेली महागाई, कमी होणारे व्याजदर यामुळे आपल्या भविष्यासाठीच्या नियोजनाची सुरुवात आजपासूनच करा.
मालमत्ता हस्तांतरणाचे नियोजन – बॉलीवूड सिनेमा असो किंवा आपला मराठी सिनेमा, मालमत्तेसाठी होणारे कौटुंबिक वाद आपण त्यामध्ये पहिले आहेत. आज तसे वाद कदाचित आपल्या घरात होणार नाहीत कारण ते बहुधा काल्पनिक असतात, पण आपण हयात नसताना आपल्या मालमत्ता आपल्या कुटुंबियांच्या नावावर हस्तांतरित होताना त्यांना त्रास होऊ द्यायचा नसेल तर काही तरतुदी आजच कराव्या लागतील; जसे की इच्छापत्र किंवा मृत्यपत्र बनविणे. लक्षात घ्या आज या गोष्टी खूप सहजरित्या करू शकतो, पण पैसा कमावण्यातच आपण इतके अडकलो आहोत की ह्या सर्व गोष्टींकडे पाहायला आपल्याला वेळच नाही.
पैशाचे व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजनाचे महत्व ज्याला पटले आणि त्यानुसार स्वतःच्या आर्थिक जीवनाला ज्यांनी योग्य आकार दिला त्यांची आर्थिक ध्येयं दृष्टीक्षेपात येतात कारण एक राजमार्ग त्यांच्यासाठी तयार झालेला असतो. आर्थिक नियोजन नसलेले लोक एक तर बचत करत मन मारून जगत असतात किंवा आलेले पैसे खर्च करून आजचा आनंद घेतात आणि भविष्य भगवान भरोसे सोडतात. या दोघांचा सुवर्णमध्य म्हणजे आपल्या कमाईनुसार खर्च करणे आणि भविष्यासाठी गुंतवणूक करणे आणि त्याचबरोबर स्वतःच्या कमाईचे पर्याय वाढविणे होय.
आर्थिक नियोजनामध्ये शेअर बाजारातील गुंतवणुकीला एक वेगळे महत्व आहे ते पुढे पाहूया. जसा प्रत्येक परिवारासाठी एक डॉक्टर असतो तसचं आज आर्थिक नियोजनकारांना महत्व प्राप्त झाले आहे तेव्हा योग्य आर्थिक नियोजनकार गाठून स्वतःचंही आर्थिक नियोजन करून घ्या..
श्रीमंत होणे आणि करोडपती बनणे ही तशी अनेकांना न रुचणारी गोष्ट आहे. त्यातच मी जर म्हणालो की वयाच्या ३०व्या वर्षी तुम्ही करोडपती बनू शकता तर अनेकांना हा कल्पनाविलास वाटेल.
यात न रुचण्यासारखे किंवा वाईट असे काहीच नाही. मी वयाच्या २१व्या वर्षी कॉलेजमधून बाहेर पडलो. जवळचे सर्व पैसे संपले, कर्जबाजारी झालो. तरीही तिसाव्या वर्षी मी करोडपती होतो.
खाली मी दहा अशा गोष्टी सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही तिसाव्या वर्षी नक्कीच करोडपती बनू शकता.
१. पैसे वाढवायला शिका
आजच्या आर्थिक जगात जिथे पैसा ही गरजेची गोष्ट बनली आहे. धनसंचय करणे आणि तो वाढवणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, त्यामुळे तुमच्याकडे येणारा पैसा सातत्याने वाढत राहायला हवा. सुरुवातीला माझी मिळकत महिना ३००० डॉलर इतकी होती, नऊ वर्षांनी ती महिना २०,००० डॉलर इतकी झाली, त्यामुळे पैशाने पैसे वाढवायला शिका. त्यातून नवीन संधी निर्माण करा.
२. नुसता दिखावा नको, काम दिसू द्या!
माझ्या विविध व्यवसायातून आणि गुंतवणुकीतून जेव्हा मला निश्चित पैसे मिळू लागले, तेव्हा मी माझी पहिली लक्झरी कार विकत घेतली. मी करोडपती झालो तरी टोयोटाची साधी गाडीच चालवत होतो. तुमची ओळख तुमच्या नितीमुल्यांवरून, कामावरून व्हायला हवी, तुमच्याकडे असलेल्या भौतिक गोष्टींवरून नाही.
३. गुंतवण्यासाठी बचत करा…
पैशांची बचत करा, पण फक्त गुंतवण्यासाठी. वाचवलेले पैसे एखाद्या सुरक्षित आणि अशा ठिकाणी गुंतवा जिथून सहजासहजी काढता येणार नाहीत. या पैशांचा वापर कधीही करू नका, अगदी निकडीच्या प्रसंगी सुद्धा. यामुळे वर सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडील पैसा वाढत जाईल.
४. तुम्हाला पैसे मिळवून न देणारे कर्ज काढू नका.
एक नियम बनवा, आपल्याकडे येणारा पैसा वाढवण्यासाठीच कर्ज काढायचे, नाहीतर काहीही उपयोग नाही. मी कारसाठी कर्ज घेतले, कारण मला खात्री होती की त्यामुळे माझी मिळकत वाढेल. श्रीमंत लोक घेतलेल्या कर्जाचा वापर गुंतवणूक आणि कॅशफ्लो वाढवण्यासाठी करतात. गरीब लोक कर्जाचा वापर वस्तू विकत घेण्यासाठी आणि श्रीमंतांना अजून श्रीमंत करण्यासाठी करतात.
५. पैशांवर प्रेम करायला शिका.
आर्थिक स्वातंत्र्य कुणाला नको असते. आपल्याकडे भरपूर पैसे असावेत अशी सगळ्या लोकांची इच्छा असते, पण पूर्ण त्यांचीच होते, जे तिला प्राधान्य देतात. श्रीमंत होण्यासाठी आणि श्रीमंती टिकण्यासाठी पैशाला अग्रक्रम द्या. तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केले, तर तो तुमच्याकडे दुर्लक्ष करेल किंवा तुम्हाला सोडून त्याच्याकडे जाईल, जो त्याचे महत्त्व जाणतो.
६. पैसा कधीही झोपत नाही.
पैशाला घड्याळ कळत नाही, वेळापत्रक, सुट्ट्या याचा विचार तो करत नाही, आणि तुम्हीसुद्धा नाही केला पाहिजे. पैसा त्यांच्यावर प्रेम करतो, ज्यांची मेहनतीची तयारी असते. जेव्हा मी २६ वर्षांचा होतो, मी रिटेल स्टोअरमध्ये काम करायचो. आमचं स्टोअर संध्याकाळी ७ ला बंद व्हायचं, पण मी बरेचदा रात्री ११ वाजेपर्यंत तिथे थांबायचो आणि सामान विकायचो. नशीबवान किंवा हुशार माणूस बनण्याचा प्रयत्न कधीही करू नका, तर नेहमी इतरांपेक्षा जास्त मेहनत घ्या.
७. गरीब राहण्यात काहीही अर्थ नाही…
मी सुद्धा गरीबच होतो आणि ते जीवन खूप निराशाजनक असतं. माझ्याजवळ थोडेफारच पैसे असायचे आणि ते म्हणजे असून नसल्यासारखे होते. त्यामुळे आपण गरीब आहोत ‘ठीक आहे’ असे विचार मनात असतील, तर लगेच काढून टाका. बिल गेट्स म्हणतात, ‘तुम्ही गरीब म्हणून जन्मलात, तर तो तुमचा दोष नाही; पण गरीब म्हणून मराल, तर मात्र तुमचाच दोष आहे.”
८. श्रीमंत माणसांचा आदर्श ठेवा.
आपल्यापैकी बहुतेकजण गरीब किंवा मध्यमवर्गीय असल्यामुळे आपले विचार, आपली स्वप्नं ही जवळच्या इतर लोकांसारखीच मर्यादित असतात. मी नेहमी श्रीमंत लोकांचा अभ्यास करायचो आणि त्यांच्यासारखं वागायचा प्रयत्न करायचो. तुम्ही सुद्धा एखादी आदर्श व्यक्ती निवडा आणि त्यांचे अनुसरण करा. बहुतांश श्रीमंत लोकं ही त्यांच्याजवळील ज्ञान आणि संसाधनं वाटण्याच्या बाबतीत अत्यंत उदार असतात.
९. पैशाला तुमच्यासाठी काम करायला लावा.
श्रीमंत होण्यासाठी गुंतवणूक ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या कामातून तुम्हाला जितके पैसे मिळतात, त्यापेक्षा जास्त पैसे गुंतवणूकीतून मिळायला पाहिजेत. जर तुमच्याकडे अतिरिक्त पैसा नसेल, तर तुम्ही कधीही गुंतवणूक करू शकणार नाही. माझी दुसरी कंपनी सुरु करताना मी ५० हजार डॉलर्स गुंतवले. तीच कंपनी मला मागील दहा वर्षांपासून दरमहा ५० हजार डॉलर्स मिळवून देत आहे. मी तिसरी गुंतवणूक रिअल इस्टेटमध्ये केली होती आणि त्यातून मला अजून पैसे मिळतात. गुंतवणूक केल्यामुळे तुम्हाला अनेक नवीन संधी शोधता येतात. लक्षात ठेवा, ‘पैशाने तुमच्यासाठी काम केले पाहिजे, तुम्ही पैशासाठी नव्हे.’
१०. नेहमी मोठा विचार करा…
मी आजवर केलेली सगळ्यात मोठी चूक कुठली असेल, तर मोठा विचार न करणे. माझं तुम्हाला हेच सांगणं आहे की, फक्त करोडपती नाही, तर अब्जाधीश बनण्याचा प्रयत्न करा. या जगात पैशांची कमतरता नाही, तर मोठा विचार करणाऱ्या लोकांची आहे.
या दहा मार्गांचा अवलंब करा, तुम्ही नक्की श्रीमंत व्हाल. तुमची स्वप्नं खूप मोठी आहेत असं सांगणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा. झटपट श्रीमंत होण्याच्या स्कीम्सच्या नदी लागून नका, नैतिकता ठेवा, प्रयत्न कधीही सोडू नका आणि एकदा का तुम्ही हे ध्येय साध्य केलं की इतरांनाही मदत करा.
1 जानेवारी 2024 ला नवे कॅलेंडर वर्ष सुरू होईल. सध्या चालू असलेल्या वर्षात कदाचित काही आर्थिक चुका अनवधानाने आपण केल्या असतील. आर्थिक चूक म्हणजे पर्यायाने आपले आर्थिक नुकसानच. मागे केलेल्या चुका हा इतिहास झाला. त्यांची पुनरावृत्ती आपण या वर्षात करणार नाही असा संकल्प करूया. या वर्षातील काही लक्ष ठेवण्यासारख्या तारखा किंवा कालावधी खालीलप्रमाणे-
आपल्याला सहज हाताशी येईल अशा ठिकाणी ही माहिती जपून ठेवा. यात एखादी अंतिम तारीख दिली असली तरी त्यासंबंधित गोष्टीची पूर्तता मुदतीपूर्वीच करावी म्हणजे गोंधळ उडणार नाही, दंड पडणार नाही, आपले आर्थिक नुकसान होणार नाही.
31 जानेवारी 2024 /15 फेब्रुवारी 2024/29 फेब्रुवारी 2024
★ आर्थिक वर्ष 2023-2024 येत्या काही दिवसात संपेल. हीच वेळ आहे आपल्या अंदाजित उत्पन्नचा आढावा घेऊन पुरेशी गुंतवणूक करण्याची. आपण कर मोजण्याची जुनी पद्धत स्वीकारली असेल तर काही गुंतवणूक /खर्च याची वजावट घेतल्याने आपला आयकर कमी होऊ शकतो पगार पत्रकाव्यतिरिक्त आपण काही गुंतवणूक/ खर्च केले असल्यास त्याची विहित नमुन्यात सूचना द्यावी लागते. आपल्या अस्थापनेकडून अशा सूचना देण्यासाठी वरील तीन पैकी कोणतीही अथवा एक वेगळीच अंतिम तारीख असू शकते. ती माहीती करून घेऊन आपली पगाराव्यतिरिक्त वैयक्तिक गुंतवणूक /खर्च केले असल्यास पुराव्यासह सदर तारखेच्या आत केल्यास सादर केल्यास त्याचा विचार करून अंतिम आयकर आकारणी होईल. हा फॉर्म आणि त्याचे पुरावे देण्यापूर्वी जर आपला कर अतिरिक्त कापला असल्यास समायोजित केला जाईल तरीही अतिरिक्त कर कापला असल्यास तो आपणास मालकाकडून परत मिळणार नाही तर विहित मुदतीत विवरणपत्र सादर करून आयकर खात्याकडून परत मिळवावा लागेल.
1 फेब्रुवारी 2024
★ खरंतर सन 2023-2024 चा अर्थसंकल्प सादर करण्याचा दिवस. येत्या वर्षात विद्यमान सरकारची मुदत संपते त्यामुळे कदाचित पूर्ण अर्थसंकल्प सादर न करता तात्पुरत्या खर्चासाठी लेखानुदान घेतले जाऊ शकते. अशा परिस्थितीत अर्थसंकल्प सादर करण्याचे, न करण्याचे कोणतेही कायदेशीर बंधन सरकारवर नसल्याने पूर्ण अर्थसंकल्प सुद्धा सादर केला जाऊ शकतो. त्यात कर संदर्भात काय बदल होतात ते पाहून आपल्या गुंतवणूक धोरणात बदल करावा लागेल.
15 मार्च 2024/ 31 मार्च 2024
★ ज्या लोकांना अग्रीम कर (Advance Tax) भरावा लागतो त्यांनी 15 मार्च पर्यंत 100% आणि त्यानंतरच्या व्यवहारांवरील पूर्ण आयकर 31 मार्चपर्यंत भरणे आवश्यक असून याप्रमाणे अग्रीम कर न भरल्यास 1% प्रतिमाह दंड होऊ शकतो. त्यामुळे अग्रीम कर भरणाऱ्या करदात्यांनी या तारखा लक्षात ठेवाव्यात.
31 मार्च 2024
★ चालू आर्थिक वर्षात आयकर सूट मिळावी म्हणून गुंतवणूक/खर्च करण्याचा हा शेवटचा दिवस. (80 C, 80 D, 80TTA यानुसार मिळणाऱ्या सवलती) या दिवशी गुंतवणूक किंवा खर्च करून तो आयकर विवरणपत्रात दाखवून कर सवलत मिळवता येईल जुन्या पद्धतीने कर आकारणी मान्य असलेल्या लोकांना याचा अधिक फायदा होऊ शकतो.
★ अनिवासी भारतीयांना विविध देशाशी असलेल्या करारानुसार ते रहात असलेल्या देशात कर बसत असल्यास त्या देशांशी असलेल्या दुहेरी कर आकारणी धोरणानुसार तेवढ्या कराची सूट भारतात मिळते अशी सूट मिळवण्यासाठी 10 F फॉर्म आयकर विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन भरावा लागतो, यासाठी पॅन आवश्यक आहे त्याशिवाय ऑनलाइन फॉर्म प्रोसेस होऊ शकत नाही. ज्या अनिवासी भारतीयांकडे पॅन नाही अशा व्यक्ती करात सूट मिळवण्यासाठी फॉर्म ऑफलाईन पद्धतीने या तारखेपूर्वी भरू शकतील.
01 एप्रिल 2024
★ नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात (सन 2024- 2025) नवीन वर्षात आपले उत्पन्न किती होईल, आयकर किती भरावा लागेल, आयकर वाचवण्यासाठी काय करता येईल. आयकर मोजणीसाठी कोणती पद्धत स्वीकारावी याबाबत प्राथमिक विचार करू शकता. त्याप्रमाणे आपण मागील वर्षाचे सन 2023-2024 चे आयकर विवरणपत्र भरू शकता त्यासाठी आवश्यक माहितीची जमावजमाव करायला सुरूवात करा म्हणजे शेवटच्या क्षणी होणारी दमछाक थांबेल. जिथे जिथे आपली मुळातून कर कपात होऊ नये असे वाटत असल्यास आवश्यक तेथे 15 G/H फॉर्म भरून द्यावेत म्हणजे कर कापला जाणार नाही.
15 जून 2024
★ सन 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाचा अंदाज करून 30% अग्रीम कराचा पहिला हप्ता भरण्याची अंतिम तारीख.
★ मालकाकडून कर्मचाऱ्यांना त्यांचे मागील आर्थिक वर्षातील उत्पन्न आणि करकपात यांची सविस्तर माहिती देणारे फॉर्म 16 प्रकारातील प्रमाणपत्र देण्याची अंतिम तारीख. या मुदतीत प्रमाणपत्र मिळाल्यास योग्य मुदतीत विवरणपत्र आपणास भरता येईल.
30 जून 2024
★ डी मॅट खाते आणि म्युच्युअल फंड योजनांसाठी नामनिर्देशन करण्याची सक्ती भांडवलबाजार नियंत्रक सेबीने केली आहे. ज्यांच्या पूर्वीच्या खात्यांना/ योजनांना नामनिर्देशन केलेले नाही त्यांना ते करण्याची मुदत वारंवार वाढवून दिली, ही वाढलेली मुदत 30 जून 2024 ला संपेल. ज्यांनी नामनिर्देशन केले नसेल त्यांचे खाते गोठवल्याने कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत.
31 जुलै 2024
★ ज्या करदात्यांना आर्थिक व्यवहारांचे लेखापरीक्षण करावे लागत नाही त्यांना मागील आर्थिक वर्षाचे म्हणजेच सन 2023- 2024 चे आयकर विवरणपत्र दंडाशिवाय दाखल करण्याची अंतिम तारीख. ही तारीख मागील दोन वर्षांत बदलली नसल्याने योग्य मुदतीत विवरणपत्र दाखल करावे.
15 सप्टेंबर 2024
★ सन 2024-2025 या आर्थिक वर्षासाठी अग्रीम कर भरण्याचा दुसरा हप्ता भरण्याची शेवटची तारीख. यात अंदाजित कराच्या पहिल्या हप्त्यासह 45% एकूण आयकर भरला जावा अशी अपेक्षा आहे.
30 सप्टेंबर 2024
★ ज्या करदात्यांना आपल्या व्यवहारांचे लेखापरीक्षण करून घ्यावे लागते त्याच्यासाठी आयकर विवरणपत्र दंडाशिवाय दाखल करण्याची शेवटची तारीख. ही तारीख अनेकांचे लेखापरीक्षण पूर्ण होत नसल्याने वाढवली जाते पण भविष्यात ती वाढवली जाईलच याची खात्री देता येत नाही तेव्हा अशा सर्वच करदात्यांनी याच मुदतीत विवरणपत्र दाखल करावे.
30 नोव्हेंबर 2024
★ पेन्शन अँथोरिटीस हयात असल्याचा दाखला देण्याची अंतिम तारीख. आता हा दाखला आपल्या जन्म ज्या महिन्यात झाला त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी दिला तरी चालतो. विहित मुदतीत हयातीचा दाखला न दिल्यास निवृत्तीवेतन स्थगित केले जाते.
15 डिसेंबर 2024
★ सन 2024-2025 या आर्थिक वर्षासाठी अग्रीम कर तिसरा हप्ता भरण्याची अंतिम तारीख. या आर्थिक वर्षाच्या अपेक्षित कराच्या पहिल्या दुसऱ्या हप्त्यासह एकूण 60% कर भरावा अशी अपेक्षा आहे.
31 डिसेंबर 2024
★ आर्थिक वर्ष 2023-2024 चे आयकर विवरणपत्र दंडासाहित भरण्याची शेवटची तारीख.
★ 31 जुलै 2024 अथवा 30 सप्टेंबर 2924 किंवा आयकर खात्याने दंडाशिवाय विवरणपत्र भरण्याच्या जाहीर केलेल्या तारखेपूर्वी किंवा तारखेनंतर विवरणपत्र दाखल केले असल्यास सुधारीत विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख. या मधील काळात विभागाकडून विवरणपत्र मंजूर झाले असले तरीही सुधारित विवरणपत्र दाखल करता येईल.
वरील तारखांबाबत काही शंका असल्यास जाणकार व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. याशिवाय अर्थसंकल्पातील तरतुदींनुसार किंवा आयकर खात्याने घेतलेल्या निर्णयांमुळे किरकोळ बदल होऊ शकतात, त्यांची पूर्वसूचना देण्यात येते.
सन 2023 कसं आणि कधी संपत आलं ते कळलेच नाही. या वर्षात आपण काही चुका केल्यात का? यातून आपण काही शिकलो का? जर त्याच त्याच चुका आपण पुन्हा पुन्हा करणार असलो तर आपली प्रगती होणार नाही आणि त्या जर आर्थिक चुका असतील तर होणारे नुकसान आर्थिक असणार! या वर्षाला निरोप देताना आपण अशा आर्थिक चुकांचा आढावा घेऊ, ज्या कदाचित टाळता आल्या असत्या.
त्याचप्रमाणे नव्या वर्षी आपल्याकडील रोखता प्रवाह असा ठेवू ज्यामुळे आयकर कमी लागेल. आपण अधिक गुंतवणूक करू शकू असा संकल्प करूया, ज्या योगे येणारे वर्ष भरभराटीचे जाईल. बाजाराचा कल सातत्याने बदलत असतो. आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नात प्रतिवर्षी वाढ होत असते.
हातात खेळत असणाऱ्या पैशांनुसार आपल्या इच्छा, गरजा आणि अपेक्षाही बदलत असतात. करविषयक नियमही थोडेफार बदलत दरवर्षी असतात, त्याचप्रमाणे गुंतवणूकीच्या नव्या संधी उपलब्ध होत असतात. डिसेंबर हा महिना असा आहे जेथे शांतपणे थोडं थांबून निरोप देत असलेल्या वर्षाचा आपण आढावा घेऊ शकतो. केलेल्या आर्थिक चुकांचे विश्लेषण करू शकतो. नवीन वर्ष किंवा त्या पुढील काळासाठीचे घेय्य निश्चित करू शकतो.
पूर्वी केलेले संकल्प ठरवलेली उद्दिष्ट योग्य आहेत की त्यात बदल करावा, याकडे त्रयस्थ नजरेने पाहू शकतो. सर्वसाधारणपणे बाजाराची दिशा कशी आहे, ती आपल्या मानसिकतेस अनुकूल आहे की प्रतिकूल, यात जोखीम कशी आणि किती याचा विचार करून पुढील वर्षातील गुंतवणूक संधी कोणत्या असतील याचा अंदाज बांधता येईल. त्या क्षेत्रात आपली गुंतवणूक वाढवता येईल का, ते ठरवता येईल. जिथे काहीतरी अभ्यास करून अंदाज बांधावा लागतो तेथे चुका होणं अगदी साहजिकच आहे पण त्या कमीत कमी कशा होतील, एकाच प्रकारच्या चुका वारंवार होत असतील तर त्या टाळता कशा येतील, यावर आपली प्रगती होऊ शकते. यादृष्टीने गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या सर्वसाधारण चुकांचा आणि त्यावरील उपाययोजनांचा एक धावता आढावा घेऊयात-
★ कोणत्याही उद्दिष्टाशिवाय केलेली गुंतवणूक:
अनेकदा कोणतेही धेय्य न ठेवता गुंतवणूक केली जाते, यात आपलेच नुकसान होण्याची शक्यता जास्त असते कारण अशी गुंतवणूक ही त्या वेळेची बाजारातील स्थिती लक्षात घेऊन म्हणजेच अल्पकालीन स्थितीचा लक्ष्यात घेऊन केलेली असते. ती गरजेला आपल्याला उपयोगी पडेलच याची खात्री देता येत नाही कारण उद्दिष्टचं नसल्याने नेमकी किती गुंतवणूक किती काळासाठी आणि कुठे करायची याचा विचारच केलेला नसतो. गुंतवणूक ही जाणीवपूर्वक त्यातील धोका स्वीकारून त्यातून मिळणारा परतावा हा इतर धोकारहित योजनांत मिळत असलेल्या परताव्याहून अधिक असावा या हेतूनेच केलेली असते, हेच त्यामागील प्राथमिक तत्व आपण विसरून जातो. आपलं उद्दिष्ट हे,
S M A R T म्हणजेच-
Specific निश्चित,
Measurable मोजता येणारे,
Achievable शक्य असणारे,
Relevant संबंधित,
Time-bound विशिष्ट कालमर्यादेत
असावं असं गुंतवणूक तज्ञांचं मत आहे. म्हणजे नेमकं काय आहे समजून घेऊनच मागील गुंतवणूकीचा आढावा घ्यावा आणि नवीन वर्षात गुंतवणूक करण्याचा विचार करावा. याच दृष्टिकोनातून गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या सर्वसाधारण चुका आणि त्यावरील उपाययोजनांचा विचार करूयात-
★ आपत्कालीन खर्चाची तरतूद नसणे:
प्रत्येकाच्या जीवनात काहींना काही संकटे येत असतात यावर मात करण्यासाठी काहीतरी योजना असावी लागते. या वर्षात अशी काही संकटं आपल्यावर आली का, तेव्हा आपण काय केलंत, तेव्हा आपल्याकडे पुरेशी तरतूद होती का,आठवून पहा कोणती संकटं आली ती? नोकरी गेली, कुणीतरी गंभीर आजारी पडलं, गाडी बिघडली ती दुरुस्त करण्यासाठी मोठा खर्च करावा लागला. घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू एकापाठोपाठ एक बिघडल्याने नवीन घ्याव्या लागल्या. हे आपण टाळू शकत नाही यासाठी पुरेशी तरतूद नसेल तर उधार उसनवार करावी लागते, कर्ज घ्यावं लागतं, मालमत्ता विकावी लागते. यामुळे आपल्या आर्थिक परिस्थितीत प्रगती होण्याऐवजी आपण दोन पावलं मागे जातो कदाचित क्रेडिट कार्डसारख्या महाग कर्जाच्या सापळ्यात अडकतो. असा काही प्रसंग आपल्यावर आला का? यासाठी आपला किमान घरखर्च 12 महिने चालेल असा आपत्कालीन फंड आपल्याकडे हवा. तो नसल्यास असा फंड कसा निर्माण करता येईल या दृष्टीने नववर्षाचा विचार करावा.
★ निवृत्ती नियोजनासाठी लवकरात लवकर तरतूद करण्याची आवश्यकता न वाटणं:
आपण जसे आयुष्य आज जगत आहोत तसेच आयुष्य आपल्या निवृत्तीनंतर याच जीवनशैलीच्या जवळपास असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यासाठी लवकरात लवकर गुंतवणूक करावी लागते ही गुंतवणूक आपण जितक्या लवकर (शक्यतो उत्पन्न मिळवायला लागल्यावर दोन महिन्यात आणि उत्पन्नाच्या दहा टक्के) करू तेवढी कमीतकमी करावी लागते आणि त्याच्या चक्रवाढीचा फायदा आपल्याला मिळतो. हे करण्यासाठी जेवढा विलंब तेवढी गुंतवणूक रक्कम वाढवावी लागते.
★ आयकर कायद्याच्या संबंधित चुका:
अनेकदा आयकर, अग्रीमकर आयकर विवरणपत्र वेळेवर न भरणं यामुळे आपल्याला दंड भरावा लागतो काही सवलती सोडून द्याव्या लागतात. कर वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणी धावपळ केल्यास त्याचा आर्थिक ताण पडू शकतो. तेव्हा यासाठीची निश्चित योजना बनवून ठेवावी.
★ आपल्या गुंतवणूक संचाचा आढावा न घेणे:
गुंतवणूक संचाचा वेळोवेळी आढावा घेऊन तो आपल्या घोरणानुसार अपेक्षित परतावा देत आहे की नाही ते पाहून त्यात योग्य ते बदल करणं हे उत्तम गुंतवणूकदाराचं लक्षण आहे. जर एखादी गुंतवणूक अपेक्षित परतावा देत नसेल तर थोडाफार तोटा सहन करून त्यातून वेळीच बाहेर पडणे आवश्यक असतं. असा आढावा वर्षातून किमान दोनदा तरी घ्यावा.
★ महाग कर्जाचा बोजा कमी न करणे:
गृहकर्जाचा अपवाद सोडल्यास कोणतेही कर्ज लवकरात लवकर फेडणे कधीही चांगले. अनेकदा गुंतवणूक करण्याच्या नादात महाग कर्ज फेडलं जात नाही. कर्ज काढून गुंतवणूक करणं हे आर्थिक मागासलेपणाचं लक्षण आहे यामुळे व्याजाचा बोजा तर वाढतोच पण गुंतवणूकीतून अपेक्षित परतावा न मिळाल्यास दुहेरी नुकसान होतं. जेव्हा गुंतवणूकीतून व्याज देऊन अधिक परतावा मिळवण्याची हमखास खात्री असल्यास असे धाडस करावे, शक्यतो अशी नसती उठाठेव करू नये.
★ जीवनविमा, मेडिक्लेमकडे दुर्लक्ष करणं:
आयुष्य अशाश्वत असल्याने कुटुंबातील कमावती व्यक्ती मरण पावल्यास पूर्ण आर्थिक घडी विस्कटते त्यासाठी जीवनविमा असतो. सातत्याने वाढणाऱ्या वैद्यकीय खर्चामुळे घरातील एखाद्या सदस्यास एखाद्या गंभीर आजाराशी सामना करायला लागल्यास मोठा आर्थिक फटका बसतो. जीवनविमा आणि आरोग्यविमा यासाठी करावा लागणारा खर्च त्यात असलेल्या जोखमीची किंमत समजावी. पुरेशा रकमेचा विमा घेऊन त्याचे वेळेवर नूतनीकरण करावे.
सर्वसाधारणपणे होत असलेल्या या आणि अशा चुका आपण टाळाव्यात. येणाऱ्या नवीन वर्षात आपण आणि आपले कुटुंबीय यांचे आरोग्य उत्तम राहून आर्थिक भरभराट व्हावी, या सदिच्छा
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते आणि मध्यवर्ती कार्यकारी मंडळाचे सदस्य असून महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत, लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक समजावी)
पैसा हा आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्या जीवनातील बऱ्याचशा गोष्टीवर पैशांचा प्रभाव पडतो, मग तो कमी असला तरी किंवा जास्त असला तरी. या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीचा विचार हा व्हायलाच हवा, म्हणून या लेखामध्ये आपण पैशाविषयी बोलूया…( Financial Planning )
पैशाचं योग्य (Financial Planning) नियोजन करण्यासाठी आपण काही महत्वाचे मुद्दे पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला किचकट वाटणारं पैशाचं नियोजन जरा सोपं होऊन जाईल.
१. उत्त्पन्न : पैशाचं नियोजन करताना पहिला मुद्दा आहे तुमचं उत्पन्न! तुम्ही नोकरदार असा की व्यावसायिक, बेरोजगार असा किंवा गृहिणी, तुमचे उत्पन्नाचे स्रोत कोणते आहेत आणि ते तुम्ही कसे वाढवू शकता जेणेकरून तुमच्याकडे येणारा पैसा वाढेल याचा तुम्हाला सर्वात आधी विचार करावा लागेल.
२. खर्च : दुसरा आणि महत्वाचा मुद्दा असा की तुमचा पैसा खर्च कुठे आणि कसा होतो याची नोंद तुम्ही रोजच्या रोज ठेवायला हवी. बचतीचा मार्ग न स्वीकारता जर तुम्ही वारेमाप पैसा खर्च करत असाल, तर त्याचा तुमच्या आर्थिक भविष्यावर नक्कीच परिणाम होऊ शकतो.
३. बचत : आपला तिसरा मुद्दा आहे बचत. आप कितना कमाते हो पेक्षा आप कितना बचाते हो हे सध्या जास्त महत्वाचं झालंय ! बचत करण्यासाठी अतिरिक्त खर्च टाळणे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे बचत करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधून काढा.
४. गुंतवणूक : पैसा वाढवल्याने वाढतो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे आपला चौथा मुद्दा आहे गुंतवणूक ! बचत केलेल्या पैशाची विभागणी करा आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. प्रसिद्ध गुंतवणूकदार Warren Buffett यांचा एक फेमस quote आहे “If you don’t find a way to make money while you sleep, you will work until you die” म्हणजे जर तुम्हाला झोपेत पैसे कमवण्याचा मार्ग सापडला नाही, तर तुम्हाला मरेपर्यंत कामच करत राहावं लागेल.
५. कर्ज : आपला पुढचा मुद्दा आहे कर्ज! तुमची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे नेहमी पुरेसा पैसा असेलच असे नाही. त्यामुळे वेगवेगळ्या मार्गाने कर्ज घेणे आणि ते सुद्धा सोयीस्कर अटींसह हे खूप गरजेचं आहे.
६. अर्थसंकल्प : जसा देशाचा अर्थसंकल्प असतो तसा देशातील प्रत्येक नागरिकानेसुद्धा आपला स्वतःचा वैयक्तिक अर्थसंकल्प बनवला पाहिजे. अर्थसंकल्प बनवल्यामुळे आपल्या पैशांचे सुयोग्य नियोजन करण्यास मदत होते. यात तुमचे उत्पन्न, खर्च, कर्ज आणि गुंतवणूक अशा सर्व गोष्टींचा ताळेबंद असायला हवा.
७. सातत्य : शेवटचा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सातत्य! आपल्याकडे आर्थिक नियोजनात कधीच सातत्य आढळत नाही. त्यामुळे वरील सर्व गोष्टींमध्ये तुम्ही कितपत सातत्य राखता यावर तुमचे आर्थिक भविष्य अवलंबून असेल.
आपल्या सर्वांना Financial Planning यातून नक्कीच काहीतरी शिकण्यासारखे आहे. तुम्हाला या गोष्टीतून काय शिकायला मिळालं हे आम्हाला comment करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लेख ला like आणि share जरूर करा.