Tag: अर्थसाक्षर व्हा

  • नव्या कॅलेंडर वर्षातील महत्वाच्या तारखा(सन 2024)

    नव्या कॅलेंडर वर्षातील महत्वाच्या तारखा(सन 2024)

    आपल्याला सहज हाताशी येईल अशा ठिकाणी ही माहिती जपून ठेवा. यात एखादी अंतिम तारीख दिली असली तरी त्यासंबंधित गोष्टीची पूर्तता मुदतीपूर्वीच करावी म्हणजे गोंधळ उडणार नाही, दंड पडणार नाही, आपले आर्थिक नुकसान होणार नाही.

    31 जानेवारी 2024 /15 फेब्रुवारी 2024/29 फेब्रुवारी 2024

    ★ आर्थिक वर्ष 2023-2024 येत्या काही दिवसात संपेल. हीच वेळ आहे आपल्या अंदाजित उत्पन्नचा आढावा घेऊन पुरेशी गुंतवणूक करण्याची. आपण कर मोजण्याची जुनी पद्धत स्वीकारली असेल तर काही गुंतवणूक /खर्च याची वजावट घेतल्याने आपला आयकर कमी होऊ शकतो पगार पत्रकाव्यतिरिक्त आपण काही गुंतवणूक/ खर्च केले असल्यास त्याची विहित नमुन्यात सूचना द्यावी लागते. आपल्या अस्थापनेकडून अशा सूचना देण्यासाठी वरील तीन पैकी कोणतीही अथवा एक वेगळीच अंतिम तारीख असू शकते. ती माहीती करून घेऊन आपली पगाराव्यतिरिक्त वैयक्तिक गुंतवणूक /खर्च केले असल्यास पुराव्यासह सदर तारखेच्या आत केल्यास सादर केल्यास त्याचा विचार करून अंतिम आयकर आकारणी होईल. हा फॉर्म आणि त्याचे पुरावे देण्यापूर्वी जर आपला कर अतिरिक्त कापला असल्यास समायोजित केला जाईल तरीही अतिरिक्त कर कापला असल्यास तो आपणास मालकाकडून परत मिळणार नाही तर विहित मुदतीत विवरणपत्र सादर करून आयकर खात्याकडून परत मिळवावा लागेल.

    1 फेब्रुवारी 2024

    ★ खरंतर सन 2023-2024 चा अर्थसंकल्प सादर करण्याचा दिवस. येत्या वर्षात विद्यमान सरकारची मुदत संपते त्यामुळे कदाचित पूर्ण अर्थसंकल्प सादर न करता तात्पुरत्या खर्चासाठी लेखानुदान घेतले जाऊ शकते. अशा परिस्थितीत अर्थसंकल्प सादर करण्याचे, न करण्याचे कोणतेही कायदेशीर बंधन सरकारवर नसल्याने पूर्ण अर्थसंकल्प सुद्धा सादर केला जाऊ शकतो. त्यात कर संदर्भात काय बदल होतात ते पाहून आपल्या गुंतवणूक धोरणात बदल करावा लागेल.

    15 मार्च 2024/ 31 मार्च 2024

    ★ ज्या लोकांना अग्रीम कर (Advance Tax) भरावा लागतो त्यांनी 15 मार्च पर्यंत 100% आणि त्यानंतरच्या व्यवहारांवरील पूर्ण आयकर 31 मार्चपर्यंत भरणे आवश्यक असून याप्रमाणे अग्रीम कर न भरल्यास 1% प्रतिमाह दंड होऊ शकतो. त्यामुळे अग्रीम कर भरणाऱ्या करदात्यांनी या तारखा लक्षात ठेवाव्यात.

    31 मार्च 2024

    ★ चालू आर्थिक वर्षात आयकर सूट मिळावी म्हणून गुंतवणूक/खर्च करण्याचा हा शेवटचा दिवस. (80 C, 80 D, 80TTA यानुसार मिळणाऱ्या सवलती) या दिवशी गुंतवणूक किंवा खर्च करून तो आयकर विवरणपत्रात दाखवून कर सवलत मिळवता येईल जुन्या पद्धतीने कर आकारणी मान्य असलेल्या लोकांना याचा अधिक फायदा होऊ शकतो.

    ★ अनिवासी भारतीयांना विविध देशाशी असलेल्या करारानुसार ते रहात असलेल्या देशात कर बसत असल्यास त्या देशांशी असलेल्या दुहेरी कर आकारणी धोरणानुसार तेवढ्या कराची सूट भारतात मिळते अशी सूट मिळवण्यासाठी 10 F फॉर्म आयकर विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन भरावा लागतो, यासाठी पॅन आवश्यक आहे त्याशिवाय ऑनलाइन फॉर्म प्रोसेस होऊ शकत नाही. ज्या अनिवासी भारतीयांकडे पॅन नाही अशा व्यक्ती करात सूट मिळवण्यासाठी फॉर्म ऑफलाईन पद्धतीने या तारखेपूर्वी भरू शकतील.

    01 एप्रिल 2024

    ★ नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात (सन 2024- 2025) नवीन वर्षात आपले उत्पन्न किती होईल, आयकर किती भरावा लागेल, आयकर वाचवण्यासाठी काय करता येईल. आयकर मोजणीसाठी कोणती पद्धत स्वीकारावी याबाबत प्राथमिक विचार करू शकता. त्याप्रमाणे आपण मागील वर्षाचे सन 2023-2024 चे आयकर विवरणपत्र भरू शकता त्यासाठी आवश्यक माहितीची जमावजमाव करायला सुरूवात करा म्हणजे शेवटच्या क्षणी होणारी दमछाक थांबेल. जिथे जिथे आपली मुळातून कर कपात होऊ नये असे वाटत असल्यास आवश्यक तेथे 15 G/H फॉर्म भरून द्यावेत म्हणजे कर कापला जाणार नाही.

    15 जून 2024

    ★ सन 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाचा अंदाज करून 30% अग्रीम कराचा पहिला हप्ता भरण्याची अंतिम तारीख.

    ★ मालकाकडून कर्मचाऱ्यांना त्यांचे मागील आर्थिक वर्षातील उत्पन्न आणि करकपात यांची सविस्तर माहिती देणारे फॉर्म 16 प्रकारातील प्रमाणपत्र देण्याची अंतिम तारीख. या मुदतीत प्रमाणपत्र मिळाल्यास योग्य मुदतीत विवरणपत्र आपणास भरता येईल.

    30 जून 2024

    ★ डी मॅट खाते आणि म्युच्युअल फंड योजनांसाठी नामनिर्देशन करण्याची सक्ती भांडवलबाजार नियंत्रक सेबीने केली आहे. ज्यांच्या पूर्वीच्या खात्यांना/ योजनांना नामनिर्देशन केलेले नाही त्यांना ते करण्याची मुदत वारंवार वाढवून दिली, ही वाढलेली मुदत 30 जून 2024 ला संपेल. ज्यांनी नामनिर्देशन केले नसेल त्यांचे खाते गोठवल्याने कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत.

    31 जुलै 2024

    ★ ज्या करदात्यांना आर्थिक व्यवहारांचे लेखापरीक्षण करावे लागत नाही त्यांना मागील आर्थिक वर्षाचे म्हणजेच सन 2023- 2024 चे आयकर विवरणपत्र दंडाशिवाय दाखल करण्याची अंतिम तारीख. ही तारीख मागील दोन वर्षांत बदलली नसल्याने योग्य मुदतीत विवरणपत्र दाखल करावे.

    15 सप्टेंबर 2024

    ★ सन 2024-2025 या आर्थिक वर्षासाठी अग्रीम कर भरण्याचा दुसरा हप्ता भरण्याची शेवटची तारीख. यात अंदाजित कराच्या पहिल्या हप्त्यासह 45% एकूण आयकर भरला जावा अशी अपेक्षा आहे.

    30 सप्टेंबर 2024

    ★ ज्या करदात्यांना आपल्या व्यवहारांचे लेखापरीक्षण करून घ्यावे लागते त्याच्यासाठी आयकर विवरणपत्र दंडाशिवाय दाखल करण्याची शेवटची तारीख. ही तारीख अनेकांचे लेखापरीक्षण पूर्ण होत नसल्याने वाढवली जाते पण भविष्यात ती वाढवली जाईलच याची खात्री देता येत नाही तेव्हा अशा सर्वच करदात्यांनी याच मुदतीत विवरणपत्र दाखल करावे.

    30 नोव्हेंबर 2024

    ★ पेन्शन अँथोरिटीस हयात असल्याचा दाखला देण्याची अंतिम तारीख. आता हा दाखला आपल्या जन्म ज्या महिन्यात झाला त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी दिला तरी चालतो. विहित मुदतीत हयातीचा दाखला न दिल्यास निवृत्तीवेतन स्थगित केले जाते.

    15 डिसेंबर 2024

    ★ सन 2024-2025 या आर्थिक वर्षासाठी अग्रीम कर तिसरा हप्ता भरण्याची अंतिम तारीख. या आर्थिक वर्षाच्या अपेक्षित कराच्या पहिल्या दुसऱ्या हप्त्यासह एकूण 60% कर भरावा अशी अपेक्षा आहे.

    31 डिसेंबर 2024

    ★ आर्थिक वर्ष 2023-2024 चे आयकर विवरणपत्र दंडासाहित भरण्याची शेवटची तारीख.

    ★ 31 जुलै 2024 अथवा 30 सप्टेंबर 2924 किंवा आयकर खात्याने दंडाशिवाय विवरणपत्र भरण्याच्या जाहीर केलेल्या तारखेपूर्वी किंवा तारखेनंतर विवरणपत्र दाखल केले असल्यास सुधारीत विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख. या मधील काळात विभागाकडून विवरणपत्र मंजूर झाले असले तरीही सुधारित विवरणपत्र दाखल करता येईल.

    ©उदय पिंगळे

    अर्थ अभ्यासक

    आणखी वाचा

  • सरते आर्थिक वर्ष आणि कर नियोजन (सन 2023-2024)

    सरते आर्थिक वर्ष आणि कर नियोजन (सन 2023-2024)

    या वर्षीही पगारदार व्यक्तींना आयकर मोजणीचे दोन पर्याय आहेत यातील नवीन पर्यायात अनेक सवलती वगळून 5% ते 30% अशी 6 टप्यात कर आकारणी होईल. या पर्यायात ₹ 50 हजार प्रमाणित वजावट आणि व्यवसाय कर अधिकतम रुपये दोन हजार पाचशेची सवलत मिळते. याशिवाय या दोन्ही करमोजणी पद्धतीत एनपीएसमध्ये कर्मचाऱ्यांची मालकाने भरलेल्या वर्गणी, जी पगार आणि महागाई भत्याच्या प्रमाणात सरकारी कर्मचाऱ्यांना 14% तर खाजगी कर्मचाऱ्याना 10% वर्षभरात जास्तीतजास्त सात लाख पन्नास हजार या मर्यादेत वेगळी वजावट (80/ CCD2) मिळेल. याशिवाय कर्तव्याचा भाग म्हणून मिळणाऱ्या काही भत्त्यांवर सूट आहे.

    जसे की प्रवास खर्च, टेलिफोन बिल, सवलतीत मिळणारे जेवण इ. याचा लाभ घेऊन या नवीन पर्यायात ज्यांचे करपात्र सात लाख रुपयांच्या आत आहे त्यांना जास्तीतजास्त 25 हजार रुपयांची करसवलत (87/ A) मिळते. त्यामुळे फारशी कोणतीही गुंतवणूक न करता हा पर्याय स्वीकारून फायदा होणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण काही प्रमाणात वाढेल. यात निव्वळ पगार हेच ज्यांचे उत्पन्नाचे साधन आहे त्यांना सध्या दोन्ही पद्धतीपैकी कोणतीही पद्धत निवडण्याचा पर्याय आहे पण ज्यांना व्यवसायचेही उत्पन्न आहे अशा व्यक्तीनी नव्या पद्धतीने करमोजणी केल्यास कायम त्याच पद्धतीने करमोजणी करावी लागेल.

    भविष्यात सर्वांचा कर कायम नवीन पद्धतीने मोजला जाईल असा अंदाज आहे. सध्या अशी सक्ती नसल्याने पगारदारांनी दोन्ही पद्धतीने कर मोजणी करावी आणि कोणती पद्धत किफायतशीर राहील ती स्वीकारावी ते विवरणपत्र भरण्यापूर्वी ठरवावे. यासाठी आवश्यकता असल्यास तज्ञांची मदत घ्यावी.

    जुन्या पद्धतीने कर मोजणी करून आपणास कर किती लागू शकतो याचा अंदाज घ्या. करपात्र असो अथवा नसो आपले सर्व मार्गांनी होणारे या कालखंडातील उत्पन्न यासाठी विचारात घ्यावे उदा पगार, घरभाडे, ठेवींवरील व्याज, पी पी एफ वरील व्याज, अल्प दीर्घ मुदतीचा नफा, लाभांश, शेअर पुनर्खरेदीची रक्कम, व्यवसाय असल्यास त्यातून मिळालेले उत्पन्नइ., अन्य कोणत्याही मार्गाने मिळालेले उत्पन्न याची बेरीज करून त्यातून करमुक्त उत्पन्न, कायदेशीर वजावटी इ. वजा करून सन 2023-2024 या आर्थिक वर्षासाठी सर्व मार्गाने मिळणारे एकूण करपात्र उत्पन्न ₹ 2 लाख 50 ते 5 लाख रुपयांच्या आत असेल, तर आपणास कोणताही आयकर द्यावा लागत नाही.

    जर आपले वय 60 हून अधिक असेल, तर करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ₹ 3 लाख ते 5 लाखचे आत व आपण अतिवरिष्ठ नागरिक असाल म्हणजेच आपले वय 80 पेक्षा जास्त असेल, तर ही मर्यादा ₹ 5 लाख एवढी आहे. लक्षात घ्या उत्पन्नावर कर आहे खर्चावर नाही (त्यासाठी GST आहे.) हे उत्पन्न ₹ 5 लाख रुपयांच्या आत असेल तर कलम 87 /A नुसार जास्तीत जास्त ₹ 12500/- ची करसवलत मिळते त्यामुळेच 5 लाख रुपयांच्या पर्यंत करपात्र उत्पन्नावर कोणताही कर द्यावा लागणार नाही त्याहून अधिक उत्पन्न असेल तर यातील ₹ 2.5 लाख ते 5 लाखापर्यंतच्या करपात्र उत्पन्नावर 5% त्यावरील ₹10 लाख रुपयापर्यंतच्या करपात्र उत्पन्नावर ₹ 12500 + 20% आणि त्यावरील करपात्र उत्पन्नावर ₹ 112500+ 30% या दराने आयकर लागतो. या एकूण करावर सरचार्ज म्हणून 4% दराने शिक्षण व उच्चशिक्षण कर द्यावा लागतो.

    ज्यांचे वार्षिक उत्पन्न ₹ 50 लाखांच्यावर परंतु 1कोटींच्या आत आहे, त्यांना करावर 10% आणि 1 कोटींहून अधिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींना 15% अतिरिक्त सरचार्ज द्यावा लागतो. हा एकूण करदायित्वांवरील कर आहे (Tax on tax) 60 वर्षांखालील करदात्यांना ₹ 5 लाखावर उत्पन्न असेल 2.5 ते 5 लाख आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या जेष्ठ नागरिकांना ₹ 5 लाखावर उत्पन्न असल्यास 3 लाखावर असलेल्या उत्पन्नावर वरील दराने कर द्यावा लागून त्यांना 87/A नुसार मिळणारी सूट मिळणार नाही. याशिवाय पगारदार लोकांना सेक्शन 4/A नुसार ₹ 50000 ची प्रमाणित वजावट (Standard deduction) मिळेल. तसेच त्यांचा कापलेला अधिकतम व्यवसाय कर (₹2500) एकूण उत्पन्नातून वजा होईल.

    आयकरासाठी ज्याप्रमाणे सर्व मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार केला जातो त्याचप्रमाणे विविध बचत, गुंतवणूक आणि खर्च यांना विहित मर्यादेत सूट दिली जाते.

    यातील प्रमुख तरतुदी खालीलप्रमाणे –

    1) विविध बचत गुंतवणूक योजना व खर्चांना मिळणाऱ्या सवलती :

    यामध्ये विहित मर्यादेत जमा केलेली रक्कम एकत्रित उत्पन्नातून कमी होत असल्याने एकूण करदायित्व कमी होते. आयकर अधिनियम 80/C, 80/CCC, 80/CCD एकत्रित मिळून जास्तीत जास्त दीड लाख रुपये सूट मिळू शकते.

    *80/C ची सवलत मिळणाऱ्या अनेक योजना व खर्च आहेत. कंसात योजनेवरील 1 जानेवारी 2024 ला मिळू शकणारे व्याजदर दिले आहेत. ते दर तिमाहीस बदलत असून 31 मार्च 2024 पर्यंत हेच व्याजदर राहतील. यामध्ये पी एफ वर्गणी 8.15 %,वी पी एफ 8.15,%,पी पी एफ (7.1%) मधील जमा केलेली रक्कम,एन एस सी (7.6%), एन एस सी व्याज, ५ वर्ष मुदतीच्या करबचत मुदत ठेवी (जास्तीत जास्त 7.5 ते 9.25%), वरिष्ठ नागरिक बचत योजना (8.2%),सुकन्या समृद्धी योजना (8.2%), विमा हप्ते, राहत्या घराचे गृहकर्ज मूद्दल, रजिस्ट्रेशन खर्च, दोन मुलांचा शैक्षणिक खर्च, करबचतीच्या समभाग संलग्न योजना यांमध्ये जमा/खर्च केलेली रक्कम यांचा समावेश होतो.

    *80/CCC मध्ये विमा कंपन्या व म्युच्युअल फंडाच्या पेन्शन योजनांचा समावेश होतो.

    *80/CCD मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्याच्या नवीन पेन्शन योजनेच्या वर्गणीचा समावेश होतो. यापैकी एक अथवा अनेक ठिकाणी जमा केलेली रक्कम जास्त होत असली, तरी एकूण सूट दीड लाख एवढीच मिळते.

    *सन 2015 पासून 80/*CCD(1B) नुसार एन पी एस मध्ये जमा केलेल्या ₹50000 रुपयांवर अतिरिक्त सूट मिळते.

    अशाप्रकारे एकूण जास्तीत जास्त दोन लाख रुपये एवढी वजावट मिळू शकते.

    2) आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि पुनर्वसन योजनांवर मिळणाऱ्या सवलती :

    यामध्ये आयकर कलम 80/D, 80/DD, 80/DDE, 80/DU यांचा सामावेश होतो.

    *80/D नुसार स्वतःच्या, जोडीदाराच्या आणि दोन मुलांच्या आरोग्य विम्याच्या हप्त्यापोटी भरलेल्या रकमेवर ₹25000 जमाकर्ता जेष्ठ नागरिक असेल तर ₹ 50000 पर्यंत सूट मिळते. त्याचप्रमाणे जमाकर्त्यावर अवलंबित पालकांसाठी भरलेल्या हप्त्यावर त्यांच्या वयानुसार अतिरिक्त 25 ते 50 हजार रुपयांची सूट मिळते. ₹ 5000/- पर्यंत वर्षभरात केलेल्या वैद्यकीय तपासण्या या सुद्धा विमा हप्त्यासह त्या मर्यादेत धरल्या जातात. त्याची बिले आपल्याकडे असणे आवश्यक आहे. तेव्हा या कलमानुसार किमान ₹ 25 हजार ते कमाल 1 लाख रुपयांची सूट मिळू शकते.

    *80/DD नुसार अवलंबित अपंग जोडीदार, मूल, पालक, भाऊ, बहीण यांचे वैद्यकीय उपचार, कल्याणकारी विमा योजनेचा भरलेला हप्ता यावर केलेला खर्च हा अपंगत्वाचे प्रमाणानुसार ₹ 75 हजार ते ₹ 1 लाख 25 हजार पर्यंत आहे असे गृहित धरून सूट घेता येते यासाठी खर्चाच्या पुराव्याची कोणतीही गरज नाही.

    *80/DDB या कलमानुसार स्वतःसाठी, जोडीदारासाठी, मूल, अवलंबित भाऊ, बहीण, आई, वडील यांच्यावर काही विशिष्ट आजारावर केलेल्या खर्चाबद्द्ल वयानुसार ₹ 40 हजार ते 1 लाख रुपयांची सूट घेता येते.

    *80/DU या कलमानुसार अपंग करदात्यास त्याच्या अपंगत्वाच्या प्रमाणानुसार त्याच्या उत्पन्नातून ₹ 75 हजार ते 1 लाख 25 हजारांची सूट मिळू शकते. त्याचप्रमाणे अनेक राज्यात अपंग करदात्यांना आणि त्यांच्या पालकांना व्यवसाय कर (Profesitional Tax) माफ करण्यात आला आहे.

    3) विविध कर्जावरील व्याजावर मिळणारी सूट :

    यामध्ये आयकर कलम 80/E, Section 24, 80 EEE यांचा समावेश होतो.

    *80/E नुसार स्वतःसाठी, जोडीदारासाठी अथवा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज कर्ज घेतल्यापासून ८ वर्षांपर्यंत कोणत्याही मर्यादेशिवाय सूट मिळण्यासाठी पात्र आहे.

    *Section 24 नुसार गृहकर्जावरील व्याजाला जास्तीत जास्त 2 लाख रुपयांची व घरदुरुस्ती कर्जावर 30 हजार रुपयांची सूट मिळते.

    4) विविध दान आणि मदतनिधीस मिळणारी सूट :

    यामध्ये कलम 80/G व 80/GGC यांचा समावेश होतो.

    *80/G नुसार मान्यताप्राप्त संस्था, न्यास यांना दिलेल्या एकूण उत्पन्नाच्या 10% मर्यादेत 50 ते 100%सूट मिळते.

    *80/GGC नुसार मान्यताप्राप्त राजकीय पक्षास दिलेल्या देणगीतून एकूण उत्पन्नाच्या मर्यादेत 50% पर्यंत सूट मिळते.

    5) इतर काही कलमानुसार मिळणाऱ्या सवलती : यामध्ये 80/GG, 80/TTA यांचा समावेश होतो.

    *80/GG मध्ये काही अटींची पूर्तता केल्यास दरमहा 5 हजार रुपये एवढी घरभाड्याची वजावट मिळू शकते. मोठ्या शहरात घरभाडे अधिक असल्याने त्यासाठी वेगळी नियमावली आहे.

    *80/TTA या कलमानुसार बचत खात्यातील रकमेवर मिळालेले 10 हजार रुपयावरील व्याज 60 वर्षाच्या आतील करदात्यांना करमुक्त आहे एकूण ₹40000 चे आत व्याज असेल तर मुळातून करकपात केली जाणार नाही.

    *80/TTB नुसार वरिष्ठ व अतिवरिष्ठ नागरिकांस ₹ 50 हजार पर्यत बचत खाते आणि मुदत ठेव यावरील व्याज करमुक्त आहे. या मर्यादेत एकूण व्याज असल्यास मुळातून करकपात होत नाही. त्यांना 80/TTA ची सवलत मिळणार नाही.

    या ठळक तरतुदीं शिवाय –

    ★शेअर खरेदीविक्रीतून काही अटींसह अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर मुळातून एस टी टी कापला असेल सवलतीच्या दराने 15%कर द्यावा लागेल.

    ★ ₹ 1 लाखांहून अधिक दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर काही अटींसह 10% कर द्यावा लागेल. 31 जानेवारी 2018 पर्यंत शेअरवरील दीर्घ मुदतीचा भांडवली नफा करमुक्त असल्याने हा नफा या दिवसाची सर्वाधिक किंमत किंवा खरेदी किंमत यातील सर्वाधिक, ती सुयोग्य खरेदी किंमत म्हणून गृहीत घराण्याचा पर्याय करदात्यास आहे.

    ★भांडवल बाजारातील कंपन्यांनी आणि 65% हून अधिक समभाग असणाऱ्या म्युच्युअल फंडाच्या योजनांनी दिलेला लाभांश आपल्या उत्पन्नात मिळवून त्यावर आपली करपात्रता निश्चित होईल.

    ★राहते घर अधिक एक घर भाड्याने दिले नसल्यास त्यावर कर काही उत्पन्न गृहीत धरून कर आकारणी होणार नाही याहून अधिक असलेले घर भाड्याने दिलेले असो अथवा नसो त्याचे अंदाजित अथवा वास्तविक भाड्यातून स्थानिक स्वराज्य संस्थेचा कर वगळून मिळालेल्या भाड्यातून 30% प्रमाणित वजावट मिळेल (सेक्शन 24)

    ★ पेन्शन योजना चालवणारे म्युच्युअल फंड व विमा कंपन्या यांनी देऊ केलेल्या निवृत्ती वेतनावर अन्य मार्गाने मिळालेले उत्पन्न समजून प्रमाणित वाजवट मिळणार नाही.

    ★EPFO कडून मृत सदस्यांच्या जोडीदास मिळणाऱ्या निवृत्ती वेतनातून 33.33% अधिकम ₹15 हजार प्रमाणित वजावट मिळेल.

    ★वेगवेगळ्या पायाभूत सुविधा पुरवणारे करमुक्त कर्जरोख्यावरील (Tax free infrastructure bonds) व्याज करमुक्त आहे.

    ★कंपनीने पुनर्खरेदी केलेल्या शेअरवरील भांडवली नफा करदात्यांच्या हातात करमुक्त आहे (10/34A)

    या तरतुदींशिवाय इतर अनेक तरतुदींमुळे आपली करदेयता लक्षणीयरित्या कमी होऊ शकते. वर फक्त सर्वसमावेशक तरतुदींचा विचार केला आहे. यातील प्रत्येक तरतुदीवर स्वतंत्रपणे तपशीलवार लेख लिहिता येऊ शकेल.

    ©उदय पिंगळे

    (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत असून लेखातील मते वैयक्तीक असल्याची नोंद घ्यावी. कर विषयक कायद्यात सातत्याने सुधारणा होत असून त्यातील बदल लक्षात घेऊन सदर लेख लिहिला असून गुंतवणूकी संबंधात कोणतेही महत्वाचे निर्णय घेण्यापूर्वी त्याची खात्री करून घ्यावी)

  • जाणून घेऊयात डिफ्लेशन म्हणजे नक्की काय?

    जाणून घेऊयात डिफ्लेशन म्हणजे नक्की काय?

    1 डिफ्लेशन खालील कारणांमुळे होऊ शकते

    (I) पुरवठा वाढणे: जेव्हा वस्तूंच्या पुरवठ्यात वाढ होते आणि मागणी स्थिर राहते, तेव्हा डिफ्लेशन होऊ शकते. हे उत्पादन तंत्रज्ञानात सुधारणा, नवीन बाजारपेठ उपलब्ध होणे किंवा इतर देशांकडून आयात वाढल्यामुळे होऊ शकते.

    (II) मागणी कमी होणे: जेव्हा लोक कमी खरेदी करतात, तेव्हा मागणी कमी होते आणि डिफ्लेशन होऊ शकते. हे बेरोजगारी वाढणे, वेतन कमी होणे किंवा लोकसंख्या घटल्यामुळे  होऊ शकते.

    (III) पैसे कमी होणे: जेव्हा अर्थव्यवस्थेत खेळणारा पैसा कमी होतो तेव्हा डिफ्लेशन होऊ शकते. हे बँकांचे वाढलेले कर्जदर किंवा सरकारच्या कर वाढवण्यामुळे होऊ शकते.

    2. डिफ्लेशन कसे मोजले जाते

    डिफ्लेशन अनेक आर्थिक मापदंड जसे की Consumer Price Index म्हणजेच CPI च्या आधारे मोजले जाते. CPI दर एका महिन्यांनी प्रकाशित केला जातो. यावरून ठरवले जाते की अर्थव्यवस्थेची अवस्था कशी आहे. 

    3. डिफ्लेशनचे खालील परिणाम होऊ शकतात:

    (I) खरेदीची क्षमता वाढणे: जेव्हा वस्तूंच्या किंमती कमी होतात, तेव्हा लोकांची खरेदीची क्षमता वाढते. त्यामुळे त्यांना अधिक वस्तू खरेदी करता येतात.

    (II) नफा आणि उत्पादन कमी होणे: डिफ्लेशनमुळे उत्पादकांचा नफा कमी होतो आणि त्यामुळे ते उत्पादन कमी करू शकतात. यामुळे बेरोजगारी वाढू शकते.

    (III) कर्जदारांना फायदा: डिफ्लेशनमुळे कर्जदारांना फायदा होतो, कारण त्यांना व्याजाची रक्कम कमी द्यावी लागते.

    (IV) उपभोक्ता खर्चात वाढ: डिफ्लेशनमुळे लोकांना वाटते की भविष्यात वस्तूंच्या किंमती कमी होणार आहेत. त्यामुळे ते उपभोग खर्च वाढवतात. 

    4. डिफ्लेशन कसे रोखायचे?

    सरकार डिफ्लेशन रोखण्यासाठी खालील उपाययोजना करू शकते:

    (I) पैशाचा पुरवठा वाढवणे: सरकार अर्थव्यवस्थेत पैशाची रक्कम वाढवू शकते. हे करण्यासाठी ते बँकाना कर्ज देणे वाढवू शकतात किंवा कर कमी करू शकतात.

    (II) सरकारी खर्च वाढवणे: सरकारी खर्च वाढवून अर्थव्यवस्थेत मागणी वाढवू शकते. हे करण्यासाठी ते infrastructure प्रकल्पांवर खर्च करू शकतात किंवा सामाजिक सुरक्षा कार्यक्रम वाढवू शकतात.

    (III) व्याजदर कमी करणे: सरकार मध्यवर्ती बँकेला व्याजदर कमी करण्यास सांगू शकते. 

  • आर्थिक निरक्षरता खूप महागात पडते…

    आर्थिक निरक्षरता खूप महागात पडते…

    आत्महत्या, कर्जाचा बोजा सहन न होणे, खाजगी सावकाराला संपत्ती जाणे, जप्ती, पैशाअभावी उपचार न मिळाल्याने मरण, आर्थिक नियोजन नसल्याने उतारवयात वृध्दाश्रमाची वाट धरायला लागणे अशा अनेक घटना आपण समाजात नेहमी पाहतो. तसेच पैशांअभावी मुलांची करिअर थांबणे, मुलींचं लग्न न होता कुठल्यातरी मुलाबरोबर पळून जाणे अशा नामुष्कीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. ज्यांनी आपल्या जमिनी विकल्या, त्या आर्थिक नियोजन नसल्यामुळेच. आज प्रत्येक महिन्याला १ हजाराची बचत व गुंतवणूक भविष्यात खूप मोठ्या कामाला हातभार लावू शकते. देव, उपासतापास, नवस, राजकारण, साड्या, आहेर, रुसवेफुगवे, मोर्चे, आंदोलने, पक्ष ह्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीने आर्थिक साक्षरतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आर्थिक निरक्षरता ही समाजाला किती महागात पडली आहे, गेल्या ५-६ दशकात समाज कसा गरीब होत चालला आहे हे आपण पाहतच आहोत. त्यामुळे ‘पैशाला पैसा लावावा, पैशाने पैसा वाढवावा.’

  • तुम्ही पैशाला जपा, पैसा तुम्हाला जपेल

    तुम्ही पैशाला जपा, पैसा तुम्हाला जपेल

    सध्याच्या सुशिक्षित समाजात मर्यादित उत्पन्न विचारात घेता कुटुंबसुद्धा मर्यादित ठेवण्याकडे मोठ्या प्रमाणावर कल दिसून येतो. त्यामुळं कुटुंबात एक किंवा दोनच मुलं असल्याचं दिसून येतं आणि या मुलांची जास्तीत जास्त काळजी घेऊन त्यांना शक्य तेवढ्या सुविधा देण्याकडं पालकांचा प्रयत्न असतो. पण पोटच्या मुलामुलींप्रमाणे आपल्याला आणखी एका गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणीव असणारे पालक अभावानेच दिसून येतात. हा गोष्ट म्हणजे पैसा.

    पैशाचीसुद्धा मुलांप्रमाणेच जास्तीत जास्त काळजी घेऊन त्याचे योग्य संगोपन करून त्यात वाढ घडवून आणणे गरजेचे असते. विशेष म्हणजे मुले मोठी झाल्यावर नोकरी-व्यवसायामुळे तुमच्यासोबत राहतीलच असे नाही आणि पालक म्हणून त्यांच्या प्रगतीच्या आड न येता त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ देणे योग्य असते, पण पैशाची वेळोवेळी आवश्यक ती काळजी घेणं गरजेचं असतं. ती कशी घेता येईल हे आजच्या video मध्ये आपण पाहू ज्यामुळे त्याचे संगोपन केले, तर त्यात वृद्धी तर होईलच आणि आपल्या retirement नंतर तो आपली निश्चितच काळजी घेईल.

    १. Retired Life साठी नियोजन हवं

    समजा, आज तुमचे वय ३० वर्षे आहे. वयाच्या ६०व्या वर्षी नोकरी व्यवसायातून तुम्ही Retire होणार आहात असे गृहीत धरल्यास retirement नंतर आर्थिक स्वातंत्र्य हवे असेल; तर आजपासूनच आपल्या पैशाची जपणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यादृष्टीने आपल्याकडे किती पैसे असणे आवश्यक आहे याचा अभ्यास करून त्यानुसार आवश्यक ती गुंतवणूक नियमित करण्यास शक्य तितक्या लवकर सुरुवात करावी. उदाहरणार्थ, सध्या कुटुंबाच्या दरमहा खर्चासाठी ५०,००० रुपये लागत असतील, तर रिटायरमेंटनंतर जरी मुलांसाठीचे काही खर्च कमी झाले तरी वैद्यकीय खर्च या वयात वाढणार आहे. म्हणजेच ३० वर्षांनी आजच्या ५०,००० रुपयांची गरज भागविण्यासाठी आत्ताचा वाढता महागाई दर बघता त्या वेळचे सुमारे अडीच लाख रुपये दर महिन्याला मिळणे आवश्यक ठरेल.

    २. गुंतवणुकीला लवकर सुरुवात व सातत्य आवश्यक

    कमी वयात गुंतवणूक सुरू करणे आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्या गरजांचा आढावा घेऊन त्या नियोजनात सतत सुधारणा करत राहणे गरजेचे असते. आर्थिक नियोजन जितक्या लवकर करू, तितका गुंतवणुकीसाठी जास्त कालावधी मिळत असल्याने कमी गुंतवणूक करून, उद्दिष्टपूर्तीसाठीची तरतूद करणे सोपे होते. नियोजनास उशीर झाल्याने बऱ्याचदा कमी वेळेमुळे पुरेशी तरतूद करणे शक्य होत नाही.

    ३. विम्याचे कवच गरजेचेच :

    या नियोजनात काही कारणाने व्यत्यय आला, तर व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक असते. यासाठी शक्य तितक्या लवकर मुदतीचा जीवन विमा अर्थात टर्म इन्शुरन्स पॉलिसी घ्यावी. आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या १५ पट भरेल इतके कवच असलेली टर्म पॉलिसी घ्यावी. सोबतच सुरुवातीस किमान तीन लाखांचे कवच असणारी आरोग्य विमा (मेडिक्लेम) पॉलिसी घ्यावी. पुढे दर पाच वर्षांनी साधारण एक लाखाने तिचे कवच वाढवत न्यावे किंवा टॉप-अप पॉलिसी घ्यावी.

    ४. इच्छापत्र :

    आपले आर्थिक स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने ही रक्कम पूर्णपणे आपल्या नियंत्रणात असणे आवश्यक आहे. मात्र आपल्या पश्चात आपल्या मर्जीनुसार वाटप व्हावे यासाठी वेळीच ‘विल’ म्हणजेच इच्छापत्र तयार करून घ्यावे. अशा रीतीने पैशाचे योग्य ते नियोजन केल्यास सेवानिवृत्तीनंतर आर्थिक स्वातंत्र्य अबाधित राहून आपल्याला सेवानिवृत्तीचा आनंद स्वेच्छेने उपभोगता येईल.

    हा लेख विडीयो मध्ये पहा