नवी अर्थक्रांती

Blog

  • D Mart : जाणून घ्या डी-मार्टच्या यशाचं सिक्रेट!

    D Mart : जाणून घ्या डी-मार्टच्या यशाचं सिक्रेट!

    D Mart : आजच्या स्पर्धेच्या दुनियेत जिथे मोठ्या कंपन्या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करतात, तिथे एक अशी कंपनी आहे जिने जाहिरातींशिवाय प्रत्येक भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबाच्या मनात घर केलंय ती म्हणजे डी-मार्ट. भारतातातील श्रीमंत आणि मोठ्या उद्योगपतींच्या यादीत नेहमीच मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या नावाचा उल्लेख दिसतोच. कारण भारतीय कॉर्पोरेट जगतात त्यांनी वीज, तेल, डेटा ते बंदरांपर्यंत अर्थव्यवस्थेवर पकड मिळवली आहे. मात्र, आज रिटेल मार्केटमध्ये रिलायन्स रिटेलसारखे बलाढ्य स्पर्धक असतानाही डी-मार्टने आपली वेगळी ओळख कशी जपली? कमी नफा, जास्त विक्री हे मॉडेल कसे यशस्वी ठरले? याचे सविस्तर उत्तर या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया…

    २००२ मध्ये पवईत सुरू झालेलं एक छोटं दुकान आज ३०० हून अधिक स्टोअर्सपर्यंत पोहोचलं आहे. आज प्रत्येक शहरात तुम्हाला डी-मार्ट असल्याचे पाहायला मिळेल आणि या डी-मार्टचे शिल्पकार आहेत राधाकिशन दमाणी. शेअर बाजारात ज्यांना गुरु मानलं जातं, अशा एका साध्या, पांढऱ्या कपड्यांतील माणसाने वयाच्या ४५ व्या वर्षी जेव्हा रिटेल क्षेत्रात पाऊल ठेवले तेव्हा अनेकांना वाटले की हे शक्य होणार नाही. पण राधाकिशन दमाणी यांनी केवळ स्वप्न पाहिलं नाही, तर ते सत्यात उतरवलं आणि घराघरात पोहोचवलं. 

    १) स्वतःच्या मालकीची जागा 

    डी- मार्टच्या यशाचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं सिक्रेट म्हणजे मालकीची जागा. डी-मार्टची बहुतांश स्टोअर्स ज्या जमिनीवर आहेत, ती जागा कंपनीच्या मालकीची आहे. अंबानींची रिलायन्स असो वा इतर रिटेल साखळ्या, बहुतांश कंपन्या मॉल्समध्ये किंवा शहरांच्या मोक्याच्या ठिकाणी भाड्याने जागा घेतात. पण दमाणींनी सुरुवातीपासूनच ओनरशिप मॉडेलकडे लक्ष केंद्रित केले. कारण मालकीची जागा असल्यामुळे दरमहा वाचणारे कोट्यवधींचे भाडे डी-मार्टला ग्राहकांना डिस्काउंटच्या स्वरूपात देता येते. दमाणी यांची ही रिअल इस्टेटची खेळीच डी-मार्टचा खरा पाया ठरली.

     २) लो-कॉस्ट मॉडेल स्ट्रॅटेजी 

    D Mart : दुसरी महत्वाची स्ट्रॅटेजी म्हणजे सप्लायर इज किंग. कोणत्याही व्यवसायात माल खरेदी केल्यावर पैसे द्यायला महिना-दोन महिने लागतात. पण डी-मार्ट आपल्या पुरवठादारांना (Suppliers) १० ते १५ दिवसांत पैसे देतात. यामुळे काय होतं? पुरवठादार आनंदाने डी-मार्टला इतर कंपन्यांपेक्षा २-३% जास्त सूट देतात. तुम्ही आम्हाला लवकर पैसे द्या, आम्ही तुम्हाला माल स्वस्त देऊ, हा साधा व्यवहार डी-मार्टला इतरांपेक्षा वेगळं ठरवतो. जेव्हा कंपनीला माल स्वस्त मिळतो, तेव्हाच ते ग्राहकांना स्वस्तात विकू शकतात. हे लो-कॉस्ट मॉडेल डी-मार्टने इतक्या शिस्तीने पाळले, की आज राधाकिशन दमाणी यांना टक्कर देण्यासाठी मोठ्या कॉर्पोरेट कंपन्याही स्पर्धेत संघर्ष करत आहेत. 

    ३) जाहिरातीवर शून्य खर्च

    जिथे मोठं-मोठ्या कंपन्या मार्केटमध्ये टिकण्यासाठी जाहिरातीवर लाखो रुपये खर्च करतात तिथेच डी- मार्टने आपले वेगळेपण सिद्ध केले. तुम्ही टीव्हीवर डी-मार्टच्या मोठ्या जाहिराती क्वचितच पाहिल्या असतील. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांचा ग्राहकच त्यांची जाहिरात करतो. डी-मार्टच्या स्टोअरमध्ये कधी गेलात तर तुम्हाला तिथे रोबोट्स किंवा खूप महागडे इंटिरिअर दिसणार नाही. कारण त्यांनी स्टोअर्सच्या चकाकीवर नाही तर कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित केले. डी-मार्टमध्ये सर्व गरजेच्या वस्तू स्वस्तात मिळतात, नेहमीच काही ना काही ऑफर्स असतात ही माउथ पब्लिसिटीच त्यांची सर्वात मोठी जाहिरात आहे. 

    अंबानी-अदानींच्या स्पर्धेत दमाणी सरस कसे ठरले? 

    D Mart : मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेलकडे अफाट पैसा आणि तंत्रज्ञान आहे. त्यांनी ऑनलाइन (JioMart) आणि ऑफलाईन (Reliance SMART BAZAAR) अशा दोन्ही आघाड्यांवर आव्हान दिलं आहे. तर दुसरीकडे, अदानी समूह प्रामुख्याने लॉजिस्टिक आणि बॅकएंडमध्ये मजबूत आहे. पण दमाणी यांनी या दोघांशी थेट स्पर्धा न करता आपली एक वेगळी जागा निर्माण केली. त्यांनी कधीही हाय-फाय ग्राहकांना लक्ष्य केलं नाही. त्यांनी उच्च मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय कुटुंबाला केंद्रस्थानी ठेवलं. जिथे रिलायन्स झपाट्याने विस्तार करत आहे, तिथे डी-मार्ट हळू पण अत्यंत विचारपूर्वक पावलं टाकत आहे. दमाणी आजही फक्त नफा देणाऱ्या लोकेशन्सवरच स्टोअर सुरू करतात. डी-मार्टच्या यशाचं आणखी एक गुपित म्हणजे त्यांनी कधीही एका रात्रीत शेकडो स्टोअर्स उघडले नाहीत. आधी एक स्टोअर नफ्यात आले की मगच दुसरे उघडायचे हे त्यांचे मुख्य धोरण होते. क्लस्टर बेस्ड अप्रोच वापरून त्यांनी एकाच शहरात किंवा जवळच्या भागात स्टोअर्स वाढवली, जेणेकरून मालाची ने-आण करण्याचा खर्च कमी होईल. आज रिलायन्ससारख्या दिग्गज कंपन्यांशी स्पर्धा करतानाही डी-मार्टचा फोकस स्टेबल राहिलेला दिसतोय. 

    या संपूर्ण माहितीनंतर राधाकिशन दमाणी यांचा हा प्रवास आपल्याला शिकवतो की व्यवसायात टिकण्यासाठी फक्त भांडवल असून चालत नाही, तर कामाची एक शिस्त लागते. जाहिरातींच्या आवाजापेक्षा कामाचा दर्जा आणि ग्राहकाचा फायदा मोठा असतो, हे डी-मार्टने सिद्ध केलंय. जर तुम्ही कोणताही छोटा व्यवसाय करत असाल, तर दमाणी यांच्या या तत्त्वांचा वापर करून तुम्हीही तुमच्या क्षेत्रातील किंग बनू शकता. डी-मार्टची ही कहाणी केवळ एका व्यवसायाची प्रगती नाही, तर ती प्रत्येक भारतीयाला स्मार्ट ग्राहक बनवण्याची एक चळवळ आहे. म्हणूनच आज डी-मार्ट हे केवळ दुकान राहिलं नसून ते भारतीय मध्यमवर्गीयांच्या विश्वासाचं प्रतीक बनलं आहे.

    आणखी वाचा:

  • Get Your First 10 Customers: पहिले 10 ग्राहक मिळवण्याचा फॉर्म्युला

    Get Your First 10 Customers: पहिले 10 ग्राहक मिळवण्याचा फॉर्म्युला

    Get Your First 10 Customers: नवा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपल्या डोळ्यासमोर पहिली गोष्ट येते ती म्हणजे ‘जाहिरात’. कारण कोणताही नवीन व्यवसाय सुरू करताना सर्वात मोठे आव्हान असते ते म्हणजे ग्राहकांना आपल्या व्यवसायाकडे आकर्षित करणे. बहुतांश उद्योजकांना असे वाटते की जाहिरातींवर मोठा खर्च केल्याशिवाय ग्राहक मिळणार नाहीत. मात्र व्यवसाय सुरु करण्याच्या पहिल्याच पायरीत अनेकजण फेल होतात. समजा तुम्ही खूप मेहनतीने एक जबरदस्त प्रॉडक्ट तयार केलंय. तुम्ही ऑफिस भाड्याने घेतलंय, स्टॉक भरलाय आणि आता तुम्ही ग्राहकांची वाट बघताय. तुमच्या दुकानावर ग्राहकांची गर्दी होत नसल्याने तुम्ही घाईघाईत फेसबुकवर १००० रुपयांची जाहिरात लावता, पण तरीही दिवसभरात एकही ऑर्डर येत नाही. शेवटी पदरी पडते ती फक्त निराशा. तुमच्याही पदरी अशी निराशा येऊ नये असं वाटत असेल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे नक्की वाचा!

    सर्कल ऑफ ट्रस्ट (स्वतःच्या नेटवर्कचा वापर करणे)

    कोणत्याही नवीन व्यवसायाचा पाया हा जाहिरातींवर नाही, तर लोकांच्या विश्वासावर आधारलेला असतो. व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात, जेव्हा आपल्याकडे जाहिरातींसाठी मोठे बजेट नसते, तेव्हा पहिले १० ग्राहक मिळवणे हे सर्वात मोठे चॅलेंज असते. जाहिरातींशिवाय ग्राहक मिळवण्याची पहिली पायरी म्हणजे तुमच्या स्वतःच्या संपर्कांचा वापर करणे. उदा. तुमचे मित्र, नातेवाईक, माजी सहकारी किंवा शेजारी हे तुमचे पहिले संभाव्य ग्राहक किंवा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असू शकतात. त्यांना तुमच्या उत्पादनाबद्दल किंवा सेवेबद्दल थेट सांगा. इथे महत्त्वाची गोष्ट अशी की, तुम्ही त्यांना तुमचे प्रॉडक्ट विकण्याचा प्रयत्न करू नका तर त्यांना तुमच्या व्यवसायाच्या कल्पनेबद्दल सांगून त्यांचा सल्ला किंवा फीडबॅक घ्या. कारण जेव्हा लोक सल्ला देतात, तेव्हा ते मानसिकदृष्ट्या तुमच्या व्यवसायाशी जोडले जातात आणि अनेकदा ते स्वतःहून ग्राहक बनतात किंवा इतरांना तुमच्या प्रॉडक्टची शिफारस करतात.

    समस्या सोडवणारे व्यवसायिक बना 

    Get Your First 10 Customers: दुसरा अत्यंत प्रभावी मार्ग म्हणजे ग्राहकांच्या समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करणे. सुरुवातीला तुमचे पहिले १० ग्राहक शोधतांना अशा लोकांकडे जा ज्यांना तुमच्या उत्पादनाची खरोखर गरज आहे. सोशल मीडियावरील विविध ग्रुप्स, व्हॉट्सअ‍ॅप कम्युनिटीज किंवा इंटरनेटवरील फोरम्सवर लोक त्यांच्या समस्या मांडत असतात. तिथे जाऊन तज्ज्ञ म्हणून उत्तरे द्या आणि हळूच तुमच्या उत्पादनाचा उल्लेख करा. उदाहरणार्थ, जर तुम्ही घरगुती मसाले विकत असाल, तर स्वयंपाकाच्या ग्रुपमध्ये मसाल्यांच्या गुणवत्तेबद्दल माहिती द्या. जेव्हा तुम्ही लोकांना मोफत व्हॅल्यू देता, तेव्हा त्यांच्या मनात तुमच्याबद्दल विश्वास निर्माण होतो. हा विश्वासच तुम्हाला तुमचे पहिले काही ग्राहक मिळवून देतो. पहिले १० ग्राहक मिळवण्यासाठी ‘कोल्ड आउटरीच’ करण्यापेक्षा ‘पर्सनलाइज्ड मेसेजिंग’ वर भर द्या. प्रत्येकाला एकच फॉरवर्ड मेसेज पाठवण्यापेक्षा, समोरच्या व्यक्तीची गरज ओळखून त्यांना वैयक्तिक मेसेज पाठवा. या स्ट्रॅटेजीमुळे ग्राहकांना आकर्षित करणे सोपे जाते. 

    सोशल मीडियाचा वापर करा 

    व्यवसायाचा सर्वात महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे मार्केटिंग. सोशल मीडिया म्हणजे फक्त पोस्ट टाकणे नाही, तर ग्राहकांशी संवाद साधण्याचा आणि ग्राहकांना तुमच्या प्रॉडक्टची माहिती देण्याचा योग्य प्लॅटफॉर्म आहे. तुमच्याकडे जाहिरातींसाठी बजेट नसले तरी तुमच्याकडे सोशल मीडियाची ताकद आहे. तुमच्या व्यवसायाचा प्रवास म्हणजेच Behind the scenes लोकांसोबत शेअर करा. तुम्ही उत्पादन कसे बनवता, तुमची विचारप्रक्रिया काय आहे, हे व्हिडिओ किंवा पोस्टच्या माध्यमातून मांडल्यास लोकांची उत्सुकता वाढते. यालाच व्यावसायिक भाषेत ‘बिल्ड इन पब्लिक’ असे म्हणतात. जेव्हा लोक तुम्हाला मेहनत करताना पाहतात, तेव्हा त्यांना तुमच्याकडून वस्तू खरेदी करण्याची इच्छा होते. सुरुवातीच्या काळात नफ्यापेक्षा ग्राहकांशी असलेल्या नातेसंबंधांना जास्त महत्त्व द्या. सुरुवातीच्या ग्राहकांना काही विशेष सवलत किंवा फ्री सॅम्पल द्या. जर त्या १० लोकांनी तुमच्या उत्पादनाचा आनंद घेतला, तर ते त्यांच्या ओळखीच्या १०० लोकांना त्याबद्दल सांगतील. यालाच ‘वर्ड ऑफ माउथ’ मार्केटिंग म्हणतात, जे जगातल्या कोणत्याही महागड्या जाहिरातीपेक्षा जास्त पॉवरफुल असते.

    Get Your First 10 Customers: समजा, तुम्ही घरगुती साजूक तूप विकण्याचा व्यवसाय सुरू केलाय. त्यासाठी तुम्ही पेपरमध्ये जाहिरात दिली तर लोक तुमच्या प्रॉडक्टचा विचार करतील किंवा दुर्लक्ष करतील. पण त्याऐवजी, जर तुम्ही तुमच्या बिल्डिंगमधील अशा काकूंना तुपाचा नमुना दिला, ज्यांच्या हातचं जेवण संपूर्ण बिल्डिंगमध्ये प्रसिद्ध आहे आणि त्यांनी जर चपातीला तुमचं तूप लावून इतर चार जणींना सांगितलं की, हे तूप अगदी माझ्या माहेरच्या तुपासारखं दाणेदार आहे, तर पुढच्या अर्ध्या तासात तुमच्याकडे ५ ऑर्डर्स नक्की येतील. यालाच म्हणतात विना जाहिरात मार्केटिंग!

    पहिले १० ग्राहक मिळवण्यासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरून थेट लोकांशी बोलून काम करावे लागेल. स्थानिक कार्यक्रमात सहभागी व्हा, प्रदर्शनांना भेटी द्या किंवा तुमच्या क्षेत्रातील इतर व्यावसायिकांशी भागीदारी करा. समजा तुम्ही केक बनवण्याचा व्यवसाय सुरू केला असेल, तर जवळच्या चहाच्या दुकानात किंवा कॅफेमध्ये जाऊन तुमचे सॅम्पल्स द्या. भागीदारी (Strategic Partnerships) हा जाहिरातींशिवाय वाढण्याचा एक उत्तम मार्ग आहे. लक्षात ठेवा, पहिले १० ग्राहक मिळवणे ही फक्त विक्री नसून ती तुमच्या उत्पादनाची चाचणी असते. या ग्राहकांकडून मिळणारा फीडबॅक तुमच्या व्यवसायाला भविष्यात हजारो ग्राहकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी मदत करतो. संयम, सातत्य आणि प्रामाणिक संवाद या जोरावर तुम्ही एकही रुपया जाहिरातीवर खर्च न करता यशस्वीरित्या पहिले १० ग्राहक मिळवू शकता.

    आणखी वाचा

  • AI मुळं चिंता वाढली! ‘या’ लोकांसाठी धोक्याची घंटा

    AI मुळं चिंता वाढली! ‘या’ लोकांसाठी धोक्याची घंटा

    AI: घरातल्या वडिलांना किंवा काकांना विचारा, १९९० च्या दशकात जेव्हा भारतात ‘कंप्युटर’ आला, तेव्हा बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. भीती होती की कंप्युटर सगळ्यांच्या नोकऱ्या खाणार! पण काय झालं? कंप्युटरने करोडो नवीन नोकऱ्या दिल्या… आज २०२६ मध्ये आपण पुन्हा त्याच वळणावर उभे आहोत, फक्त नाव बदललंय… AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स! ‘AI माझी नोकरी खाणार का?’ या भीतीने आज जग घाबरलंय. आता सामान्य माणसाने करायचं काय? घाबरून घरी बसायचं? की या बदलाचा फायदा घ्यायचा? चला, आज आपण या भीतीचा फुगा फोडणार आहोत!

    २०२६ मध्ये AI आता फक्त डेटा गोळा करत नाही, तर ते स्वतः गाणी लिहितंय, भारी डिझाईन्स बनवतंय, डॉक्टरसारखं आजार ओळखतंय आणि कोडर्ससारखं कोडिंगही करतंय! हे पाहून भीती वाटणं साहजिक आहे. डेटा एंट्री, बेसिक अकाऊंटिंग किंवा कस्टमर सपोर्टसारखी साचेबद्ध कामं आता एआय माणसांपेक्षा वेगाने आणि बिनचूक करतंय.

    पण! यात एक मेख आहे. एआय काम संपवत नाहीये, तर ते कामाची पद्धत बदलत आहे. २०२६ मधलं सर्वात मोठं सत्य काय माहित आहे? ‘AI तुमची नोकरी घालवणार नाही, तर जो माणूस AI चा वापर करतो, तो तुमची नोकरी नक्की घालवेल!

    मशीन कितीही शहाणी झाली तरी ती मानवाची जागा कधीच घेऊ शकत नाही. का? कारण तिच्याकडे ३ गोष्टी नाहीयेत:

    1. सहानुभूती (Empathy): डॉक्टरने कॉम्प्युटरवर रिपोर्ट बघून औषध देणं वेगळं, आणि रुग्णाचा हात हातात घेऊन ‘काळजी करू नका, तुम्ही बरे व्हाल’ हा दिलेला धीर वेगळा! ती ‘सहानुभूती’ (Empathy) कोणताही रोबोट कधीच कॉपी करू शकत नाही. 
    2. शून्यातून विश्व (Creativity): AI फक्त जुन्या डेटाची भेळपूरी करून नवीन डिश बनवतं. पण एकदम नवीन, आउट ऑफ द बॉक्स विचार करण्याची ताकद फक्त मानवी मेंदूत आहे.
    3. नितीमत्ता (Ethics): गुंतागुंतीच्या परिस्थितीत ‘काय कायदेशीर आहे’ यापेक्षा ‘काय योग्य आहे’ हा निर्णय फक्त माणूसच घेऊ शकतो.

    स्वतःला ‘फ्युचर-प्रूफ’ कसं करायचं? 

    तर मग या AI च्या लाटेत टिकून कसं राहायचं? ३ महत्त्वाच्या गोष्टी आहेत. 

    • पहिलं – AI साक्षर व्हा: एआयला शत्रू मानण्यापेक्षा त्याला आपला नोकर बनवा. ‘प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग’ शिका, म्हणजेच AI कडून अचूक काम कसं करून घ्यायचं हे शिका.  
    • दुसरं – सॉफ्ट स्किल्स वाढवा: टीमवर्क, लीडरशिप, कम्युनिकेशन स्किल आणि लोकांची मनं जिंकण्याची कला… या गोष्टींना कोणतंही सॉफ्टवेअर रिप्लेस करू शकत नाही.
    • तिसरं – सतत शिकत राहा: ‘माझं ग्रॅज्युएशन झालं, आता शिकणं संपलं’ हा विचार डोक्यातून काढून टाका. बदलत्या काळानुसार रोज काहीतरी नवीन शिका .

    AI: वाफेचं इंजिन आलं तेव्हा घोडागाड्या बंद झाल्या, पण त्याऐवजी रेल्वे आणि गाड्यांचं नवीन जग निर्माण झालं! आज २०२६ मध्ये AI एथिक्स ऑफिसर, डेटा सायंटिस्ट, मेंटल हेल्थ कोच अशा हजारो नव्या नोकऱ्या तयार होत आहेत. त्यामुळे भीती सोडा आणि तयारीला लागा!

    तुम्हाला काय वाटते? AI मुळे तुमच्या कामात काय बदल झाला आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा लेख आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करून त्यांनाही भविष्यासाठी सज्ज करा! अशाच माहितीपूर्ण लेखांसाठी आमच्या पेजला नक्की भेट द्या.

    आणखी वाचा

  • FSSAI License ऑनलाईन काढण्याची सर्वात सोपी स्टेप-बाय-स्टेप पद्धत एकदा बघाच

    FSSAI License ऑनलाईन काढण्याची सर्वात सोपी स्टेप-बाय-स्टेप पद्धत एकदा बघाच

    FSSAI License: भारतात खाद्यपदार्थांचा कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल, तर सर्वात महत्त्वाची आणि पहिली कायदेशीर पायरी म्हणजे FSSAI लायसन्स. तुम्ही एखादे छोटे हॉटेल सुरू करत असाल, घरगुती मेस चालवत असाल किंवा खाद्यपदार्थांची मोठी कंपनी काढत असाल तेव्हा FSSAI लायसन्स हे केवळ कायदेशीर बंधन नसून तुमच्या व्यवसायाची विश्वासार्हता वाढवणारे एक महत्त्वाचे माध्यम आहे. या लेखात आपण FSSAI लायसन्स म्हणजे काय, त्याचे फायदे आणि महत्व काय आहेत? ते कोणासाठी गरजेचे आहे, यासाठी लागणारी कागदपत्रे, फी आणि ऑनलाईन अर्ज करण्याची सोपी पद्धत सविस्तर जाणून घेणार आहोत. 

    FSSAI License म्हणजे काय?

    FSSAI म्हणजेच Food Safety and Standards Authority of India (भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरण). ही भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत काम करणारी एक सर्वोच्च संस्था आहे. भारतात उत्पादित केले जाणारे आणि विकले जाणारे सर्व खाद्यपदार्थ शुद्ध, सुरक्षित आणि मानवी वापरासाठी खाण्यायोग्य आहेत की नाही, हे तपासण्याचे मुख्य काम ही संस्था करते. जेव्हा तुम्हाला FSSAI कडून मान्यता किंवा लायसन्स मिळते, तेव्हा तुमच्या व्यवसायाला एक १४ अंकी नोंदणी क्रमांक (Registration Number) दिला जातो. हा नंबर सर्व खाद्यपदार्थांच्या पॅकिंगवर किंवा दुकानाच्या बोर्डवर छापणे अनिवार्य असते. हे लायसन्स म्हणजे ग्राहकांसाठी तुमच्या उत्पादनाच्या शुद्धतेची आणि गुणवत्तेची अधिकृत माहिती असते.

    FSSAI लायसन्स कोणासाठी आवश्यक आहे?

    अन्नाशी संबंधित किंवा कोणत्याही प्रकारचा खाद्य व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या व्यावसायिकाला हे लायसन्स घेणे कायद्याने बंधनकारक आहे. यामध्ये सर्व प्रकारची हॉटेल्स, ढाबे, कॅफे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सचा समावेश होतो. तसेच रस्त्यावरील फेरीवाले, टपरीवाले, घरगुती मेस चालवणाऱ्या महिला आणि भाजीपाला किंवा फळ विक्रेत्यांनाही याची आवश्यकता असते. याशिवाय खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या बेकरी,Dairy Products आणि मोठ्या कंपन्या तसेच किराणा दुकाने, सुपरमार्केट, अन्नधान्य गोडाऊन आणि अन्न वाहतूक करणारे ट्रान्सपोर्टर्स यांनाही हे लायसन्स घ्यावे लागते. आजकालच्या डिजिटल युगात झोमॅटो, स्विगी किंवा स्वतःच्या वेबसाईटवरून ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या व्यवसायांसाठी तर FSSAI नंबर असणे अत्यंत सक्तीचे आहे.

    FSSAI लायसन्सचे प्रकार आणि फी

    व्यवसायाची व्याप्ती, स्वरूप आणि वार्षिक उलाढाल (Turnover) या गोष्टी लक्षात घेऊन FSSAI चे प्रामुख्याने तीन प्रकार पाडण्यात आले आहेत. पहिला प्रकार म्हणजे ‘FSSAI नोंदणी’ (Basic Registration) जो वार्षिक उलाढाल १२ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या अत्यंत छोट्या व्यवसायांसाठी असतो आणि यासाठी प्रति वर्ष केवळ १०० रुपये सरकारी फी आकारली जाते. दुसरा प्रकार ‘राज्यस्तरीय परवाना’ (State License) हा वार्षिक उलाढाल १२ लाख ते २० कोटी रुपयांपर्यंत असलेल्या मध्यम स्वरूपाच्या व्यवसायांसाठी असतो, ज्याची सरकारी फी व्यवसायाच्या स्वरूपानुसार प्रति वर्ष २,००० ते ५,००० रुपयांपर्यंत असू शकते. तिसरा आणि अंतिम प्रकार म्हणजे ‘केंद्रीय परवाना’ (Central License) जो वार्षिक उलाढाल २० कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या किंवा थेट आयात-निर्यात (Import-Export) करणाऱ्या मोठ्या कंपन्यांसाठी अनिवार्य असतो, ज्याची वार्षिक सरकारी फी ७,५०० रुपये इतकी असते. या सरकारी फी व्यतिरिक्त ऑनलाइन प्रक्रिया शुल्क किंवा एजन्सी चार्जेस वेगळे असू शकतात.

    FSSAI साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

    FSSAI License: तुम्ही कोणत्या प्रकारच्या लायसन्ससाठी अर्ज करत आहात, यावर लागणारी कागदपत्रे अवलंबून असतात, पण सर्वसाधारणपणे काही मूलभूत कागदपत्रे तयार ठेवावी लागतात. यामध्ये अर्जदाराचा पासपोर्ट साईझ फोटो, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यांसारखा वैयक्तिक ओळखीचा पुरावा आवश्यक असतो. व्यवसायाच्या जागेचा पुरावा म्हणून जागा स्वतःची असल्यास लाईट बिल किंवा खरेदीखत आणि जागा भाड्याची असल्यास कायदेशीर Rent Agreement व जागा मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र म्हणजेच (NOC) जोडावे लागते. यासोबतच व्यवसायाचा अधिकृत पत्ता सिद्ध करण्यासाठी शॉप ॲक्ट लायसन्स किंवा भागीदारी व्यवसाय असल्यास Partnership Deed आवश्यक असते. जर तुम्ही स्वतः अन्न उत्पादक (Manufacturer) असाल, तर तुम्हाला वॉटर टेस्ट रिपोर्ट (पाण्याच्या तपासणीचा अहवाल), वापरल्या जाणाऱ्या मशिन्सची यादी आणि उत्पादित केल्या जाणाऱ्या फूड कॅटेगरीची माहिती देणे गरजेचे ठरते.

    FSSAI लायसन्स काढण्याचे फायदे

    FSSAI लायसन्स केवळ सरकारी दंड किंवा कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी नाही, तर याचे तुमच्या व्यवसायाला अनेक व्यावसायिक फायदे होतात. सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे ग्राहकांचा तुमच्या ब्रँडवर आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर विश्वास वाढतो, कारण त्यांना खात्री असते की हे अन्न सरकारी मानकांनुसार तपासलेले आहे. तुमच्या पॅकिंगवर किंवा बिलावर FSSAI चा लोगो आणि नंबर असल्यामुळे तुमच्या ब्रँडला मार्केटमध्ये एक वेगळी प्रतिष्ठा आणि कायदेशीर मान्यता मिळते. जर तुम्हाला भविष्यात व्यवसायाचा विस्तार करायचा असेल, तर झोमॅटो, स्विगी किंवा मोठ्या मॉलमध्ये तुमची उत्पादने लिस्ट करण्यासाठी हे लायसन्स अनिवार्य ठरते. कायदेशीर सुरक्षितता लाभल्यामुळे कोणत्याही अन्न निरीक्षकाच्या (Food Inspector) कारवाईची भीती राहत नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यवसायाच्या वाढीसाठी बँकेकडून कर्ज (Business Loan) हवे असल्यास FSSAI लायसन्स एक वैध व्यावसायिक पुरावा म्हणून उपयुक्त ठरते.

    महत्त्वाचे नियम आणि दंड

    FSSAI License: अन्न सुरक्षेबाबत आणि लोकांच्या आरोग्याशी तडजोड न करण्याबाबत भारत सरकार अत्यंत कडक पावले उचलत असून नियमांचे उल्लंघन केल्यास भारी दंडाची तरतूद आहे. जर एखादा व्यावसायिक FSSAI लायसन्स किंवा नोंदणीशिवाय अन्न व्यवसाय चालवताना आढळला, तर त्याला कायद्यानुसार ६ महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि ५ लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. व्यवसाय सुरू असताना ग्राहकांना कमी दर्जाचे किंवा भेसळयुक्त अन्न विकल्याचे सिद्ध झाल्यास ५ लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. लायसन्स मिळवण्यासाठी किंवा अन्नपदार्थांच्या पॅकेटवर चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती छापल्यास २ लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. याव्यतिरिक्त, अन्न बनवण्याच्या किंवा साठवण्याच्या ठिकाणी कमालीची अस्वच्छता आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडून लायसन्स तात्काळ रद्द केले जाऊ शकते आणि मोठी दंडात्मक कारवाई देखील केली जाते.

    FSSAI लायसन्स ऑनलाईन कसे काढायचे?

    FSSAI License: आता FSSAI लायसन्स काढण्याची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि अत्यंत सोपी झाली असून व्यावसायिकांना सरकारी कार्यालयात जाण्याची गरज पडत नाही. तुम्ही FSSAI च्या अधिकृत FoSCoS (Food Safety Compliance System) या ऑनलाईन पोर्टलवर (foscos.fssai.gov.in) जाऊन स्वतः अर्ज करू शकता. या वेबसाईटला भेट दिल्यानंतर सर्वप्रथम Sign Up वर क्लिक करून तुमचा युझर आयडी आणि पासवर्ड तयार करावा

    आणखी वाचा:

  • Performance Marketing: तुम्ही अजूनही जुन्या पद्धतीने जाहिरात करताय?

    Performance Marketing: तुम्ही अजूनही जुन्या पद्धतीने जाहिरात करताय?

    Performance Marketing: तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या जाहिरातींवर, सोशल मीडिया पोस्टवर किंवा बॅनर्सवर प्रत्येक महिन्याला लाखो रुपये खर्च करत असाल, तर स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारा…..या खर्च केलेल्या पैशांमधून नेमका किती रुपयांचा थेट नफा तुमच्या गल्ल्यात जमा होते, याचा अचूक हिशोब तुमच्याकडे आहे का?

    जर तुमच्याकडे याचे स्पष्ट उत्तर नसेल, तर थांबा! तुम्ही अजूनही त्याच जुन्या, पारंपरिक पद्धतीने मार्केटिंग करत आहात, जिथे पैसा पाण्यात जाण्याची आणि बजेट लवकर संपण्याची भीती सर्वात जास्त असते. आजच्या अत्यंत स्पर्धात्मक युगात ग्राहकांचे लक्ष वेधणे कठीण झाले आहे. अशा वेळी प्रत्येक सुज्ञ व्यावसायिकाला आपल्या मार्केटिंग बजेटचा एक-एक रुपया कुठे खर्च होतोय आणि त्यातून किती आउटपुट मिळतोय, याचा लाईव्ह हिशोब हवा असतो.

    जर तुम्ही पण अशाच एका मार्केटिंग स्ट्रॅटेजीच्या शोधात असाल, जी तुम्हाला आधी रिझल्ट आणि मगच पैसे अशी १००% खात्री देते, तर ‘परफॉर्मन्स मार्केटिंग’ (Performance Marketing) हा तुमच्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे. हे आजच्या डिजिटल युगातील सर्वात प्रभावी शस्त्र मानले जाते. पण हे परफॉर्मन्स मार्केटिंग नक्की काय आहे? चला सविस्तर समजून घेऊया.

    १. परफॉर्मन्स मार्केटिंग म्हणजे काय? (What is performance marketing?)

    पारंपरिक जाहिरातींमध्ये उदा. TV, वर्तमानपत्र किंवा होर्डिंग्ज, तुम्हाला ग्राहक मिळण्याआधीच लाखो रुपयांची मोठी रक्कम मोजावी लागते. त्यानंतर तुमच्या दुकानात ग्राहक येओ अथवा न येओ, तुमचे पैसे खर्च झालेले असतात. परंतु, परफॉर्मन्स मार्केटिंगचे गणित पूर्णपणे याच्या उलटे आणि जाहिरातदाराच्या फायद्याचे असते. हे पूर्णपणे निकालावर आधारित (Result-oriented) मार्केटिंग आहे, जिथे तुम्ही पैसे तेव्हाच देता जेव्हा तुमची एखादी निश्चित अट पूर्ण होते. जसे की थेट विक्री होणे (Sale), ग्राहकाची माहिती मिळणे (Lead), किंवा जाहिरातीवर क्लिक होणे (Click). थोडक्यात सांगायचे तर, नो रिझल्ट, नो पेमेंट याच स्ट्रॅटेजीमुळे आज लहान स्टार्टअप्सपासून ते जगातील मोठ्या ब्रँड्सपर्यंत सर्वजण या मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा वेगाने वापर करत आहेत.

    २. हे कसे काम करते? (Data and Payment Models)

    परफॉर्मन्स मार्केटिंग कोणत्याही अंदाजावर किंवा नशिबावर चालत नाही, तर याचे गणित पूर्णपणे डेटा, ट्रॅकिंग आणि विशिष्ट मॉडेल्सवर अवलंबून असते. यामध्ये प्रामुख्याने CPC (Cost Per Click) मॉडेल वापरले जाते, जिथे युझरने जाहिरातीवर क्लिक करून तुमच्या वेबसाईटला भेट दिली तरच पैसे द्यावे लागतात. तसेच, जर तुमचा रिअल इस्टेट किंवा कोचिंग क्लाससारखा व्यवसाय असेल, तर CPL (Cost Per Lead) द्वारे ग्राहकाने त्याचा फोन नंबर किंवा ईमेल आयडी फॉर्ममध्ये भरल्यावरच पैसे मोजावे लागतात. ई-कॉमर्स व्यवसायासाठी CPA (Cost Per Acquisition) हे मॉडेल वरदान ठरले आहे, कारण यात थेट प्रॉडक्ट खरेदी झाल्यावरच पैसे कापले जातात. याशिवाय, ब्रँडची ओळख निर्माण करण्यासाठी CPM (Cost Per Mille) मॉडेल वापरले जाते, ज्यामध्ये जाहिरात १,००० वेळा लोकांच्या स्क्रीनवर दिसली की ठराविक चार्ज लागतो.

    ३. परफॉर्मन्स मार्केटिंगचे मुख्य प्रभावी मार्ग

    हे मार्केटिंग यशस्वी करण्यासाठी डिजिटल विश्वात अनेक शक्तिशाली माध्यमे उपलब्ध आहेत, ज्यांचा योग्य वापर करून आपण अचूक ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो. यामध्ये सोशल मीडिया जाहिराती जसे की Facebook, Instagram, LinkedIn Ads या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, कारण इथे तुम्ही वयोगट, शहर आणि लोकांच्या आवडीनिवडीनुसार अगदी टार्गेटेड ग्राहकाला जाहिरात दाखवू शकता. दुसरे माध्यम म्हणजे गुगल सर्च जाहिराती (Google Ads), जिथे ग्राहक स्वतःहून एखादी गोष्ट शोधत असताना तुमची जाहिरात सर्वात वर दिसते आणि थेट खरेदीच्या उद्देशाने आलेल्या ग्राहकाला आकर्षित करते. याव्यतिरिक्त, एफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing) द्वारे इतर ब्लॉगर्स किंवा इन्फ्लुएन्सर्स तुमच्या प्रॉडक्टची जाहिरात करतात आणि विक्री झाल्यावर त्यांना कमिशन दिले जाते. तर नेटिव्ह जाहिराती न्यूज वेबसाईट्सवर कंटेंटचाच एक भाग बनून ग्राहकांचे लक्ष सहज वेधून घेतात.

    ४. १००% अचूक ट्रॅकिंग आणि पारदर्शकता

    या मार्केटिंगचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही तुमच्या प्रत्येक रुपयाचा मागोवा (Track) घेऊ शकता. तुमच्या जाहिरातीवर किती लोकांनी क्लिक केले, किती जणांनी खरेदी केली आणि तुमचा ROI (Return on Investment) किती मिळाला, हा सर्व डेटा तुमच्या डॅशबोर्डवर लाईव्ह दिसतो. यामुळे फसवणुकीची शक्यता पूर्णपणे संपते.

    ५. कमी आर्थिक रिस्क आणि हाय कन्व्हर्जन रेट

    पारंपरिक मार्केटिंगमध्ये मोठे बजेट वाया जाण्याची भीती असते, पण इथे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता कमी असते. तुम्ही अगदी ५०० रुपयांपासून जाहिरात सुरू करून त्याची चाचणी (Testing) घेऊ शकता. जाहिराती सरसकट सर्वांना न दाखवता, ज्यांना खरोखर रस आहे त्यांनाच दाखवल्या जात असल्याने खूप कमी खर्चात जास्तीत जास्त ग्राहक मिळतात (High Conversion Rate).

    ६. रिअल-टाइम ऑप्टिमायझेशन (Live Control)

    Performance Marketing: समजा तुम्ही एखादी जाहिरात सुरू केली आणि दोन दिवसांत तुमच्या लक्षात आले की ती चांगला परफॉर्म करत नाहीये, तर तुम्ही ती जाहिरात एका क्लिकवर लगेच थांबवू शकता किंवा त्यात बदल करू शकता. तुमचे पैसे वाया जाण्यापूर्वीच तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता, जी सोय पारंपरिक पद्धतींमध्ये कधीच नसते.

    आजच्या डिजिटल युगात परफॉर्मन्स मार्केटिंग हा तुमच्या व्यवसायाच्या विक्रीचे इंजिन वेगाने पळवण्याचा आणि पैशांचा अपव्यय थांबवण्याचा सर्वात स्मार्ट मार्ग आहे. हे तुम्हाला केवळ तात्पुरती प्रसिद्धी देत नाही, तर थेट तुमच्या बँक खात्यात नफा मिळवून देते. त्यामुळे, जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा सेल्स आलेख उंचवायचा असेल, तर आजच पारंपरिक पद्धतींना बाय-बाय करा आणि परफॉर्मन्स मार्केटिंगचा अवलंब करून आपल्या व्यवसायाला एका नव्या उंचीवर घेऊन जा!

  • EGR vs Gold ETF: सोन्यात गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय सर्वात सुरक्षित?

    EGR vs Gold ETF: सोन्यात गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय सर्वात सुरक्षित?

    EGR vs Gold ETF: तुम्ही आजही सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी पारंपरिक दागिने बनवून ते बँकेच्या लॉकरमध्ये ठेवत आहात? आणि दरवर्षी त्या लॉकरचे भाडे भरून सुरक्षेची चिंता करत आहात? जर तुमचे उत्तर…हो असेल, तर आता स्वतःला बदलण्याची वेळ आली आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात सोन्यात गुंतवणूक करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. आता सोन्यासाठी ना दुकानात रांग लावण्याची गरज आहे, ना चोरीची भीती बाळगण्याची गरज आहे.राष्ट्रीय शेअर मार्केटने (NSE) आणलेली ‘इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट’ म्हणजेच EGR प्रणाली सोन्यातील गुंतवणुकीचा एक नवा, सुरक्षित आणि सुपरफास्ट मार्ग म्हणून समोर आली आहे.

    सोप्या भाषेत सांगायचे तर, जसे तुम्ही शेअर बाजारात कंपन्यांचे शेअर्स खरेदी करता आणि ते तुमच्या डी-मॅट (Demat) खात्यात जमा होतात, अगदी तसेच आता तुम्ही डिजिटल स्वरूपात सोन्याचे युनिट्स खरेदी करू शकता, ज्याला ‘इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट’ (EGR) म्हणतात. या प्रणालीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यात तुम्हाला प्रत्यक्ष सोनं हातात न घेता ते डिजिटल स्वरूपात तुमच्या खात्यात जमा राहते, ज्यामुळे ते चोरीला जाण्याची किंवा हरवण्याची भीती कायमची संपते.

    ईजीआर (EGR) म्हणजे नक्की काय?

    EGR गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे याची १००% पारदर्शकता. हे सोने थेट शेअर बाजारात ट्रेड होत असल्याने याचे भाव संपूर्ण भारतात एकसमान असतात आणि ज्वेलर्सप्रमाणे यात किमतीची कोणतीही लपवाछपवी किंवा छुपे चार्जेस नसतात. सुरक्षेच्या बाबतीतही हे अगदी नंबर वन आहे, कारण तुमचे सोने सेबी (SEBI) च्या कडक देखरेखीखाली असलेल्या अत्याधुनिक व्हॉल्ट्समध्ये (Vaults) सुरक्षित ठेवले जाते. इतकेच नाही तर ही खिश्याला परवडणारी गुंतवणूक आहे. सोनं खरेदी करायला आता हजारो रुपयांची गरज नाही, तुम्ही अगदी १ ग्रॅम किंवा त्याहून कमी प्रमाणातही गुंतवणूक सुरू करू शकता. तसेच, पैशांची आणीबाणी नडल्यास तुम्ही तुमचे EGR कधीही त्वरित विकून थेट खात्यात रोख पैसे मिळवू शकता, जे पारंपरिक दागिने मोडीत काढण्यापेक्षा कितीतरी पटीने वेगवान आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यात मिळणारे सोने २४ कॅरेट असल्यामुळे गुणवत्तेबद्दल मनात कोणताही डाऊट राहत नाही.

    EGR, Gold ETF आणि Digital Gold मधील फरक

    EGR vs Gold ETF: बरेच जण EGR, Gold ETF आणि Digital Gold या तिन्हींमध्ये गल्लत करतात, पण यातील फरक समजून घेणे गरजेचे आहे. ईजीआर (EGR) मध्ये गुंतवणूकदाराला प्रत्यक्ष सोन्यावर कायदेशीर हक्क मिळतो आणि याचा सर्वात मोठा प्लस पॉइंट म्हणजे तुम्ही या डिजिटल सोन्याचे प्रत्यक्ष सोन्याच्या नाण्यात किंवा बारमध्ये रूपांतर करू शकता.  याउलट, ‘गोल्ड ईटीएफ’ (Gold ETF) हे शेअर बाजारातील म्युच्युअल फंडासारखे साधन आहे जे केवळ सोन्याच्या भावावर आधारित असते, यात प्रत्यक्ष सोने हातात मिळत नाही तर फक्त पैशांचा परतावा मिळतो. तर दुसरीकडे, ‘डिजिटल गोल्ड’ हे प्रायव्हेट पेमेंट्स ॲप्स किंवा ज्वेलर्समार्फत चालवले जाते, ज्याची सुरक्षा संबंधित प्लॅटफॉर्मच्या अटींवर अवलंबून असते आणि प्रत्यक्ष डिलिव्हरीसाठी अतिरिक्त चार्जेस द्यावे लागतात. म्हणूनच, सुरक्षितता आणि सुलभतेच्या बाबतीत ईजीआर हा या तिन्हींमध्ये सर्वात पॉवरफुल पर्याय मानला जातो.

    गुंतवणूक कशी करावी?

    EGR मध्ये गुंतवणूक करणे फेसबुक किंवा इन्स्टाग्राम वापरण्याइतकेच सोपे आणि अवघ्या ४ स्टेप्सचे काम आहे. यासाठी फक्त तुमचे डी-मॅट खाते (Demat Account) सक्रिय असणे आवश्यक आहे. तुम्ही झेरोधा, ग्रो किंवा एंजल वन सारख्या कोणत्याही ब्रोकरच्या ट्रेडिंग ॲपवर लॉग-इन करून, सर्च बारमध्ये ‘EGR’ टाईप करायचे असते. त्यानंतर चालू बाजारभावाप्रमाणे तुम्हाला हवे तितके युनिट्स निवडून ‘Buy’ वर क्लिक करताच, तुम्ही घरबसल्या काही मिनिटांत शुद्ध सोन्याचे मालक बनता.

    EGR vs Gold ETF: एक स्मार्ट गुंतवणूकदार म्हणून आजच्या काळात ईजीआरमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे आधुनिक काळाशी जुळवून घेणे होय. जेव्हा तुम्ही पारंपरिक पद्धतीने दागिने विकत घेता, तेव्हा तुम्हाला मेकिंग चार्जेस (घडणावळ) आणि जीएसटी (GST) चा मोठा फटका बसतो, जो दागिने मोडताना पूर्णपणे वाया जातो. याउलट, EGR मध्ये एक रुपयाचाही मेकिंग चार्ज लागत नाही, म्हणजेच तुमचा संपूर्ण पैसा फक्त शुद्ध सोन्यामध्ये गुंतवला जातो. थोडक्यात सांगायचे तर, सोन्यात गुंतवणूक करणे हे शहाणपण आहे आणि ते ‘डिजिटल व आधुनिक’ पद्धतीने करणे हे स्मार्ट गुंतवणूकदाराचे खरे लक्षण आहे. म्हणूनच, आजच तुमच्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा आणि तुमच्या सोन्याच्या गुंतवणुकीला डिजिटल युगाची नवी झळाळी द्या!

    हे पण वाचा:

  • Dubai Gold: भारतापेक्षा दुबईमध्ये सोने स्वस्त का मिळते?

    Dubai Gold: भारतापेक्षा दुबईमध्ये सोने स्वस्त का मिळते?

    Dubai Gold: दुबईला चाललाय? येताना सोन्याची चेन घेऊन या…

    दुबईला राहणाऱ्या किंवा तिथे ट्रिपला जाणाऱ्या नातेवाईकाला किंवा मित्राला आपण हे वाक्य आयुष्यात कधी ना कधी नक्कीच बोललो असतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की दुबईत सोनं एवढं स्वस्त का मिळतं? जे सोनं दुबईत अगदी सहज परवडतं, तेच आपल्या भारतात येईपर्यंत एवढं महाग का होतं? दुबईला जगाची ‘सिटी ऑफ गोल्ड’ (City of Gold) का म्हणतात?

    तिथल्या आणि भारतातल्या सोन्याच्या किमतीत नेमका काय फरक आहे? चला, यामागचं रंजक अर्थकारण अतिशय सोप्या आणि रंजक भाषेत समजून घेऊया!

    १. करांमधील फरक (Taxation): सर्वात मोठे कारण!

    भारत आणि दुबईतील सोन्याच्या दरात फरक असण्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे दोन्ही देशांची कर प्रणाली (Tax Structure).

    भारतात सोन्याच्या खाणी खूप कमी आहेत, त्यामुळे आपल्याला बहुतांश सोनं बाहेरून आयात (Import) करावे लागते. जेव्हा हे सोनं भारतात येते, तेव्हा भारत सरकार त्यावर कस्टम ड्युटी (आयात शुल्क), ३% जीएसटी (GST) आणि शेती पायाभूत सुविधा उपकर लावते. हे सगळे टॅक्स एकत्र होऊन भारतात सोन्याची किंमत खूप वाढते.

    याउलट, दुबईमध्ये सोन्याच्या आयातीवर अतिशय नगण्य किंवा शून्य आयात शुल्क आहे. तिथे २०१७ मध्ये ५% व्हॅट (VAT) लागू करण्यात आला असला, तरी पर्यटकांसाठी एक मोठी ऑफर आहे— तुम्ही भारतात परतताना विमानतळावर हा ५% व्हॅट रिफंड (Refund) मिळवू शकता. म्हणजेच, पर्यटकांसाठी दुबईतील सोनं जवळजवळ टॅक्स-फ्री ठरतं!

    २. मेकिंग चार्जेस आणि बाजारातील स्पर्धा (Bargaining)

    सोन्याचे दागिने बनवण्यासाठी जे मेकिंग चार्जेस (घडणावळ) लावले जातात, त्यातही दोन्ही ठिकाणी मोठी तफावत आहे.

    Dubai Gold: दुबईच्या प्रसिद्ध सोन्याच्या बाजारात (Gold Souk) शेकडो दुकानं एकाच ठिकाणी आहेत. या प्रचंड स्पर्धेमुळे व्यापारी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मेकिंग चार्जेसवर भरघोस सूट देतात आणि विशेष म्हणजे तिथे तुम्ही मेकिंग चार्जेसवर घासाघीस (Bargaining) सुद्धा करू शकता! याउलट भारतात ब्रँडेड ज्वेलर्सचे मेकिंग चार्जेस आधीच फिक्स आणि तुलनेने जास्त असतात.

    शुद्धतेची १००% हमी: दुबईत फसवणुकीची भीती नसते. तिथले सरकार सोन्याच्या शुद्धतेबाबत अत्यंत कडक कायदे पाळते. फसवणूक केल्यास कडक शिक्षेची तरतूद असल्याने ग्राहकांना २४ किंवा २२ कॅरेट शुद्ध सोन्याची पूर्ण खात्री मिळते.

    ३. रुपया विरुद्ध डॉलरचा खेळ (Currency Value)

    आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे सर्व व्यवहार अमेरिकन डॉलरमध्ये होतात, हे आपल्याला माहितच आहे.

    दुबईचे चलन ‘दिरहाम’ हे थेट डॉलरशी जोडलेले (Pegged) आहे, त्यामुळे डॉलरचे मूल्य बदलले तरी दिरहामचा दर स्थिर राहतो. दुसरीकडे, आपला भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत वारंवार कमी-जास्त होत असतो. जेव्हा जेव्हा रुपया कमजोर होतो, तेव्हा भारताला सोनं आयात करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात, ज्यामुळे आपल्या देशात सोन्याचे भाव अचानक वाढतात.

    पण थांबा… हवं तेवढं सोनं आणता येत नाही! (Custom Rules)

    दुबईत सोनं स्वस्त मिळतंय म्हणून आपण बॅग भरून सोनं भारतात आणू शकत नाही. भारत सरकारच्या २०२६ च्या नवीन नियमांनुसार, कस्टम ड्युटी न भरता केवळ ठराविक वजनाचेच सोन्याचे दागिने (फक्त दागिन्यांच्या स्वरूपात) आणण्याची मर्यादा आहे. सरकारने आता मूल्याची (पैशांची) मर्यादा काढून केवळ वजनाचा नियम ठेवला आहे:

    • महिला प्रवासी: ४० ग्रॅम पर्यंत सोन्याचे दागिने विनाशुल्क (Duty-Free) आणू शकतात.
    • पुरुष प्रवासी: २० ग्रॅम पर्यंत सोन्याचे दागिने विनाशुल्क (Duty-Free) आणू शकतात.

    महत्त्वाची टीप: हा नियम केवळ अशा लोकांसाठी आहे ज्यांनी किमान १ वर्ष परदेशात घालवले आहे. जर तुम्ही फक्त ४-५ दिवसांच्या शॉर्ट ट्रिपला गेला असाल, तर पहिल्या ग्रामपासूनच तुम्हाला भारतीय विमानतळावर कस्टम टॅक्स भरावा लागेल. तसेच, ही सूट फक्त पर्सनल दागिन्यांवर आहे, सोन्याची नाणी (Coins) किंवा विटांवर (Bars) कोणताही टॅक्स फ्री नियम लागू होत नाही!

    थोडक्यात सांगायचं तर, जर तुम्ही फिरण्यासाठी दुबईला गेला असाल आणि तिथून स्वतःसाठी मर्यादेत सोनं आणत असाल तरच ते फायद्याचं आहे. फक्त सोन्याची खरेदी करण्यासाठी विशेष विमानाचे तिकीट काढून दुबईला जाणे, राहण्याचा खर्च पाहता तोट्याचं ठरू शकतं. त्यामुळे नियमांचे पालन करा आणि स्मार्ट खरेदी करा!

    तुम्ही कधी दुबईच्या ‘गोल्ड सुक’ (Gold Souk) ला भेट दिली आहे का? किंवा सोन्याच्या या नियमांबद्दल तुम्हाला आधी माहिती होती का? तुमचे अनुभव खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा!

    Dubai Gold: ट्रॅव्हल, बिझनेस आणि चालू घडामोडींची अशीच रंजक माहिती सोप्या भाषेत वाचण्यासाठी आमच्या ब्लॉगला फॉलो करा आणि हा लेख दुबईला जाणाऱ्या तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा!

    आणखी वाचा:

  • Cryptocurrency Guide: Bitcoin मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी हे जाणून घ्या

    Cryptocurrency Guide: Bitcoin मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी हे जाणून घ्या

    Cryptocurrency Guide: बँक FD मध्ये पैसे डबल व्हायला तब्बल ७ ते १० वर्ष लागतात, तर शेअर मार्केटमध्ये (Stock Market) त्यासाठी काही महिने किंवा वर्ष वाट पाहावी लागते. मात्र या व्यतिरिक्त असं एक मार्केट आहे जिथे तुम्ही गुंतवलेले पैसे ५ तासांत २० टक्क्यांनी वाढू शकतात आणि एका रात्रीत थेट शून्यावर येऊ शकतात. आज आपण अशा एका डिजिटल चलनाची माहिती घेणार आहोत ज्याला तुम्ही हातात पकडू शकत नाही, पाकिटात ठेऊ शकत नाही, तरीही त्याने गेल्या काही वर्षांत हजारो लोकांना एका रात्रीत करोडपती बनवलंय, तर लाखो लोकांचे खिसे रिकामे केलेत. हे डिजिटल चलन म्हणजेच ‘क्रिप्टोकरन्सी’! (Cryptocurrency)

    मित्रांनो, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण २०१० मध्ये एका व्यक्तीने फक्त २ पिझ्झा विकत घेण्यासाठी चक्क १० हजार बिटकॉईन्स दिले होते. आजच्या घडीला त्या १० हजार बिटकॉईन्सची किंमत हजारो कोटी रुपये आहे. या क्रिप्टोकरन्सीच्या जादूमुळे तो पिझ्झा आज जगातला सर्वात महागडा पिझ्झा ठरला आहे.

    याच क्रिप्टोकरन्सीने आज संपूर्ण जगाची बँकिंग सिस्टम हलवून सोडली आहे. पण या क्रिप्टोकरन्सीची भानगड नक्की काय आहे? कोणत्याही देशाच्या सरकारच्या किंवा बँकेच्या नियंत्रणाशिवाय चालणारं हे इंटरनेटवरचं डिजिटल नाणं नक्की कसं काम करतं? सामान्यांनी या धोक्याच्या आणि फायद्याच्या बाजारापासून दूर राहावं की यात आपलं नशीब आजमवावं? चला तर मग या क्रिप्टोकरन्सीचे हे गणित अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया…

    १.क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? (What is cryptocurrency?)

    अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, Cryptocurrency हे इंटरनेटवर चालणारे एक ‘आभासी किंवा डिजिटल नाणे’ आहे. आपल्या खिशातील नोटा किंवा नाण्यांप्रमाणे याचे कोणतेही भौतिक अस्तित्व नसते. आपण जसे Google Pay किंवा PhonePe वापरून डिजिटल व्यवहार करतो, तसेच हे व्यवहार असतात. पण यामधील सर्वात मोठा फरक म्हणजे या चलनावर जगातील कोणत्याही देशाच्या सरकारचे, बँकेचे किंवा रिझर्व्ह बँकेचे (RBI) नियंत्रण नसते. हे संपूर्णपणे कॉम्प्युटर नेटवर्कद्वारे चालवले जाते, ज्याला विकेंद्रित (Decentralized) व्यवस्था म्हणतात. ‘बिटकॉईन’ ही जगातील पहिली क्रिप्टोकरन्सी आहे, ज्याच्या यशानंतर आज बाजारात हजारो इतर कॉईन्स उपलब्ध आहेत.

    २. Cryptocurrency हे तंत्रज्ञान काम कसे करते? 

    Cryptocurrency Guide: क्रिप्टोकरन्सीच्या मागे ब्लॉकचेन (Blockchain) नावाचे एक अतिशय प्रगत आणि सुरक्षित तंत्रज्ञान काम करते. ब्लॉकचेन हे इंटरनेटवरील एक सार्वजनिक डिजिटल रजिस्टर आहे. जेव्हा जेव्हा क्रिप्टोमध्ये कोणताही व्यवहार होतो, तेव्हा त्याची नोंद या रजिस्टरमध्ये होते. विशेष म्हणजे, हे रजिस्टर कोणत्याही एका कॉम्प्युटरवर नसून जगभरातील लाखो कॉम्प्युटर्सवर एकाच वेळी अपडेट होते. यामुळे या रजिस्टरमधील डेटा हॅक करणे, त्यात बदल करणे किंवा पैशांची फसवणूक करणे कोणत्याही व्यक्ती किंवा सरकारसाठी अशक्य आहे. हीच पारदर्शकता क्रिप्टोची सर्वात मोठी ताकद आहे.

    ३. लोक यात गुंतवणूक का करत आहेत? (Why are people investing in this?)

    )क्रिप्टो बाजार आज आकर्षणाचे केंद्र बनण्याचे मुख्य कारण म्हणजे यातून मिळणारा अवाढव्य परतावा (Returns). पारंपरिक गुंतवणूक पर्याय जसे की बँक एफडी (FD), सोने किंवा शेअर मार्केट यांच्या तुलनेत क्रिप्टोने गेल्या काही वर्षांत हजारो पटीने जास्त नफा दिला आहे. ज्या लोकांनी सुरुवातीच्या काळात बिटकॉईन किंवा इथेरियमसारख्या कॉईन्समध्ये (Ethereum Coins) अगदी काही हजार रुपये गुंतवले होते, ते आज करोडपती झाले आहेत. याशिवाय, हे व्यवहार थेट मध्यस्थांशिवाय आणि अतिशय जलद होत असल्यामुळे तरुण पिढी याकडे एक आधुनिक गुंतवणुकीचे साधन म्हणून मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे.

    ४. क्रिप्टोमधील सर्वात मोठे धोके?

    कोणत्याही गुंतवणुकीच्या मार्केटमध्ये जिथे प्रचंड नफा असतो, तिथे तितकाच धोकाही असतो. क्रिप्टो मार्केटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आणि वीक पॉईंट म्हणजे याची अस्थिरता (Volatility). या बाजारात कधी काय होईल याचा नेम नसतो. आज गगनाला भिडलेली एखाद्या कॉईनची किंमत उद्या थेट जमिनीवर येऊन आदळू शकते. येथे एका दिवसात ३० ते ४० टक्क्यांची घसरण होणे सामान्य मानले जाते, जी सोसणे सामान्य गुंतवणूकदाराच्या मानसिकतेच्या पलीकडचे आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कायदेशीर अनिश्चितता. भारतात क्रिप्टोवर बंदी नसली तरी यातून होणाऱ्या नफ्यावर तब्बल ३०% कर (Tax) आणि १% TDS आकारला जातो, जो खूप जास्त आहे. भविष्यात सरकारने नियम अजून कडक केले, तर तुमचे पैसे अडकण्याची भीती नेहमीच असते.

    ५. सर्वसामान्यांनी यात गुंतवणूक करावी का?

    Cryptocurrency Guide: आता अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की, सर्व सामान्य गुंतावणूकदारांनी क्रिप्टोमध्ये पैसे लावावे का? तर याचे प्रामाणिक उत्तर असे आहे की क्रिप्टोकरन्सी हा झटपट श्रीमंत होण्याचा मंत्र नाही, तर ती एक अत्यंत जोखमीची आधुनिक गुंतवणूक आहे. जर तुम्ही कष्टाने कमवलेला सगळा पैसा रातोरात डबल होईल या आशेने क्रिप्टोमध्ये टाकत असाल, तर तो निव्वळ जुगार ठरेल.

    हे पण वाचा:

  • SIP की Step-up SIP गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय योग्य?

    SIP की Step-up SIP गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय योग्य?

    Step-up SIP: आजच्या महागाईच्या काळात फक्त घाम गाळून पैसे कमवणे पुरेसे नाही. तर त्या पैशांची योग्य ठिकाणी योग्य गुंतवणूक करणे काळाची गरज बनली आहे. तुम्ही पैशांची गुंतवणूक करण्याचा विचार करता तेव्हा अनेकजण तुम्हाला SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला माहिती आहे का? मार्केटमध्ये SIP सोबतच आणखी एक बाहुबली पर्याय आहे तो म्हणजे Step-up SIP. आता तुम्ही म्हणाल SIP आणि Step-up SIP यामध्ये नक्की काय फरक आहे? याबद्दलची सविस्तर माहिती सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा!

    १. एसआयपी (SIP) म्हणजे गुंतवणुकीचा पाया 

    नियमित एसआयपी (Systematic Investment Plan) हा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा एक अत्यंत सोपा आणि शिस्तबद्ध पर्याय आहे. दरमहा ठराविक रक्कम बँक खात्यातून आपोआप गुंतवली जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांना बचतीची उत्तम सवय लागते. शेअर बाजारातील चढ-उतारांची चिंता न करता रुपी कॉस्ट एव्हरेजिंगच्या (Rupee Cost Averaging) मदतीने हा पर्याय कमीत कमी जोखमीत सरासरी चांगला परतावा मिळवून देतो. ज्यांचे उत्पन्न मर्यादित किंवा स्थिर आहे, अशा व्यक्तींसाठी कोणत्याही अतिरिक्त आर्थिक ताणाशिवाय संपत्ती निर्माण करण्याचा हा एक उत्तम गुंतवणुकीचा पाया मानला जातो.

    २. Step-up SIP म्हणजे काय? 

    Step-up SIP किंवा Top-up SIP म्हणजे दरवर्षी आपल्या SIP गुंतवणुकीची रक्कम वाढवणे. Step-up SIP हा नियमित SIP चा प्रकार असून, तो थेट व्यक्तीच्या वाढत्या उत्पन्नाशी जोडलेला असतो. दरवर्षी नोकरदारांचा पगार किंवा व्यावसायिकांचा नफा ज्या प्रमाणात वाढतो, त्याच प्रमाणात SIP ची रक्कम ठराविक टक्क्याने उदा. १०%, २०%, ३०% वाढवण्याचा हा ऑटोमॅटिक पर्याय आहे. वाढलेल्या पैशांमुळे अनेकदा लोकांचे अनावश्यक खर्च वाढतात, परंतु Step-up पर्याय निवडल्यामुळे वाढीव रक्कम थेट गुंतवणुकीत वळवली जाते. हा पर्याय विशेषतः महागाईवर मात करण्यासाठी आणि आपले आर्थिक नियोजन अधिक मजबूत करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही ₹५,००० ची SIP सुरू केली आणि १०% चा Step-up पर्याय निवडला, तर पहिल्या वर्षी तुम्ही दरमहा ₹५,००० गुंतवाल. दुसऱ्या वर्षी ही रक्कम आपोआप ₹५,५०० होईल, आणि तिसऱ्या वर्षी ₹६,०५० होईल.

    ३. Step-up SIP चे फायदे!

    Step-up SIP: नियमित SIP च्या तुलनेत Step-up SIP तुमच्या आर्थिक उद्दिष्टांचा वेग प्रचंड वाढवते. स्वतःचे घर घेणे, मुलांचे उच्चशिक्षण किंवा रिटायरमेंट फंड यांसारखी मोठी स्वप्ने सामान्य SIP ने पूर्ण होण्यास जेवढा काळ लागतो, त्यापेक्षा ५ ते ७ वर्षे आधीच ती स्टेप-अपमुळे पूर्ण होऊ शकतात. कारण, यात तुम्ही दरवर्षी गुंतवणुकीचा टप्पा वाढवत नेता, ज्यामुळे तुमची उद्दिष्टे वेळेपूर्वीच तुमच्या आवाक्यात येतात. याउलट जर एखाद्या वर्षी तुमचा पगार वाढला नाही किंवा व्यवसायात मंदी आली, तरीही SIP ची रक्कम वाढणारच. अशा वेळी बँक खात्यात पुरेशी रक्कम नसली तर ‘बाऊन्स चार्जेस’ लागू शकतात. अर्थात, तुम्ही हा पर्याय कधीही थांबवू किंवा बदलू शकता.

    ४. चक्रवाढ व्याजाची जादू (Power of Compounding)

    दीर्घकालीन गुंतवणुकीत चक्रवाढ व्याज (Compounding) हाच पैशांचा डोंगर उभा करणारा खरा घटक असतो. जेव्हा तुम्ही दरवर्षी SIP च्या रकमेत थोडी तरी वाढ करता (Step-up), तेव्हा चक्रवाढ व्याजाचा वेग दुप्पट होतो. 

    Step-up SIP: थोडक्यात सांगायचे तर, दोन्हीपैकी कोणता पर्याय सर्वोत्तम आहे हे तुमच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असते. जर तुमचे करिअर सुरुवातीच्या टप्प्यात असेल आणि दरवर्षी उत्पन्न वाढण्याची खात्री असेल, तर लवकरात लवकर मोठी संपत्ती निर्माण करण्यासाठी Step-up SIP हाच तुमच्यासाठी सर्वोत्तम फॉर्म्युला आहे. याउलट, जर तुमचे बजेट निश्चित असेल आणि उत्पन्नात मोठ्या वाढीची शक्यता नसेल, तर नियमित SIP चा पर्याय निवडणे अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर ठरते. 

    महत्वाची टीप: (म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारपेठेतील जोखमींच्या अधीन असते. या लेखात देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)

    आणखी वाचा :

  • Startup Fail होण्याची ५ मोठी कारणे आणि त्यावरील उपाय

    Startup Fail होण्याची ५ मोठी कारणे आणि त्यावरील उपाय

    Startup: आजकालच्या तरुणाईमध्ये स्टार्टअप्स सुरु करायचा विचार खूप कॉमन झालाय. सध्या भारतात आणि जगभरात स्टार्टअप्सची (Startups) एक मोठी लाट आली आहे. पण तुम्हाला माहित आहे का? एका आकडेवारीनुसार, सुरू होणाऱ्या एकूण स्टार्टअप्सपैकी तब्बल ९०% स्टार्टअप्स पहिल्या ५ वर्षांतच बंद पडतात.

    ऐकून धक्का बसला असेल पण सध्याच्या परिस्थितीत स्टार्टअप्सचे हेच भयाण वास्तव आहे. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाले असतील की, कोट्यवधी रुपयांचं फंडिंग मिळवूनही किंवा अत्यंत हुशार डोकी एकत्र येऊनही बिझनेस अपयशी का ठरतात? जर तुम्ही स्वतःचा स्टार्टअप्स सुरू करण्याचा विचार करत असाल, किंवा तुमचा बिझनेस वाढवू इच्छित असाल, तर हा लेख तुमच्यासाठी गेम-चेंजर ठरू शकतो. आज आपण स्टार्टअप्स अपयशी होण्याची प्रमुख कारणे आणि त्यावर कशी मात करावी, हे अत्यंत सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.

    स्टार्टअप अपयशी होण्याची प्रमुख कारणे

    बिझनेस अपयशी होण्यामागे केवळ नशीब कारणीभूत नसते, तर त्यामागे काही ठराविक चुकाही असतात ज्याकडे आपण सर्रासपणे दुर्लक्ष करतो. 

    १. मार्केटमध्ये मागणी नसणे (No Market Need)

    अनेकजण मार्केटचा सर्व्हे न करता आयडिया चांगली आहे म्हणून स्टार्टअप्स सुरु करण्याचा विचार करतात आणि हेच स्टार्टअप बुडण्याचं सर्वात मोठं कारण आहे. अनेकदा संस्थापकाला (Founder) स्वतःची आयडिया खूप भारी वाटते. पण मला ही गोष्ट आवडते आणि मार्केटला या गोष्टीची गरज आहे यात खूप मोठा फरक असतो. जर तुम्ही बनवत असलेल्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसची ग्राहकांना गरजच नसेल, तर ते खरेदी कोण करणार? त्यामुळे सुरुवातीला मार्केटमध्ये ग्राहकांची डिमांड कोणत्या गोष्टीला आहे याचा अभ्यास करा. 

    २.पैशांचे चुकीचे नियोजन (Running Out of Cash)

    बिझनेसमध्ये ‘कॅश फ्लो’ (Cash Flow) हा रक्त्तासारखा असतो. जोपर्यंत पैसा खेळता आहे, तोपर्यंत बिझनेस जिवंत राहतो. अनेक स्टार्टअप्स सुरुवातीला मिळालेला पैसा ऑफिसच्या सजावटीवर, गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरती करण्यावर आणि नको तिथे मार्केटिंगवर उडवतात. परिणामी, जेव्हा खरोखर पैशांची गरज असते, तेव्हा खिसा रिकामा होतो आणि स्टार्टअप्स डबघाईला येतात. 

    ३. अयोग्य टीम (The Wrong Team)

    कोणत्याही बिझनेसचे साम्राज्य फक्त एका व्यक्तीवर टिकून राहू शकत नाही. त्यामुळे स्टार्टअपसाठी योग्य मानसिकतेची टीम लागते. जर टीममधील लोकांचे विचार जुळत नसतील, प्रत्येकाची दिशा वेगळी असेल किंवा त्यांच्यात आवश्यक कौशल्यांची (Skills) कमतरता असेल, तर तो स्टार्टअप पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळतो.

    ४. ग्राहकांकडे दुर्लक्ष आणि मार्केटिंगचा अभाव 

    तुमचे प्रॉडक्ट जगातील सर्वोत्तम असेल, पण जर ते ग्राहकांपर्यंत पोहोचवताच आले नाही, तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. अनेक स्टार्टअप्स मार्केटिंगला हलक्यात घेतात. तसेच, सुरुवातीच्या काळात ग्राहकांचा फीडबॅक न घेणे ही देखील मोठी चूक ठरते. यामुळे तुमचा बिझनेस लिमिटेड ग्राहकांपुरता मर्यादित राहतो. 

    ५.वेळेचे चुकीचे गणित (Bad Timing)

    तुम्ही मार्केटमध्ये कधी उतरताय याला खूप महत्त्व आहे. जर तुम्ही खूप आधी किंवा खूप उशिरा प्रॉडक्ट लाँच केले, तर अपयश नक्की असते. उदा. कोरोना काळाच्या आधी ऑनलाईन मिटिंग ॲप्सना इतकी मागणी नव्हती, पण योग्य वेळी म्हणजेच लॉकडाऊनमध्ये झूम Zoom ॲप अत्यंत यशस्वी ठरले. 

    स्टार्टअप्स अपयशी ठरू नये म्हणून काय करावं? 

    सुरुवातीला आपण स्टार्टअप्स अपयशी होतात याची थोडक्यात माहिती घेतली. मात्र आता स्टार्टअप्स फेल होऊ नये म्हणून कोणत्या उपाय योजना राबविल्या पाहिजेत यावर प्रकाश टाकूयात. कोणत्याही बिझनेसमध्ये आव्हाने तर येणारच, पण योग्य रणनीती आखली तर या आव्हानांवर सहज मात करता येते. खालील उपाय तुम्हाला नक्कीच मदत करतील.

    १. MVP मॉडेलचा वापर करा (Minimum Viable Product)

    सुरुवातीला अतिउत्साहात थेट मोठे प्रॉडक्ट बनवून मार्केटमध्ये उतरवण्याऐवजी आधी त्याचे एक छोटे किंवा कमी खर्चातील मॉडेल (MVP) बनवा. ते काही ठराविक ग्राहकांना वापरायाला द्या. त्यांचा फीडबॅक घ्या. ग्राहकांना ते आवडले किंवा त्याची मार्केटमध्ये डिमांड असेल तरच त्यावर मोठा खर्च करा. यामुळे तुमचे पैसे आणि वेळ दोन्ही वाचेल.

    २.आर्थिक शिस्त पाळा (Financial Discipline)

    बिझनेसमधून येणारा प्रत्येक रुपया आणि जाणारा प्रत्येक रुपया याचा चोख हिशोब ठेवा. अनावश्यक खर्च पूर्णपणे टाळा. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त काम कसे होईल (Bootstrapping) यावर लक्ष द्या. निदान पुढील ६ ते १२ महिने बिझनेस विनाअडथळा चालेल इतका बॅकअप फंड तुमच्याकडे असायलाच हवा.

    ३. अष्टपैलू आणि एकनिष्ठ टीम बनवा

    कोणताही स्टार्टअप्स सुरु करताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे योग्य टीम असणे. कारण सुरुवातीला तुम्हाला अशा लोकांची गरज असते जे एकाच वेळी अनेक कामे सांभाळू शकतात. टीम निवडताना केवळ त्यांची पदवी न बघता, त्यांची काम करण्याची जिद्द आणि मानसिकता (Mindset) पहा. आणि हो टीममधील संवाद हा नेहमी पारदर्शक असला पाहिजे. जेणेकरून टीम बॉन्डींग वाढेल आणि संवाद स्पष्ट राहील. 

    ४. ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवा (Customer-Centric Approach)

    एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुमचा बिझनेस ग्राहकांमुळे चालतो, तुमच्या आयडियामुळे नाही. ग्राहकांच्या गरजा काय आहेत, त्यांच्या अडचणी कोणत्या आहेत, हे समजून घ्या. त्यांच्या तक्रारींचे निवारण लवकरात लवकर करा. कारण ग्राहक खूश असेल तरच तो स्वतःहून तुमच्या बिझनेसची ‘माऊथ पब्लिसिटी’ करेल.

    ५. बदल स्वीकारण्याची तयारी ठेवा (Pivot)

    Startup: बिझनेसमध्ये परिस्थितीनुसार बदल करावे लागतात. जर तुमची मूळ आयडिया काम करत नसेल, तर त्यात बदल करायला घाबरू नका. इन्स्टाग्राम हे सुरुवातीला केवळ एक चेक-इन ॲप होते, पण फोटो शेअरिंगची क्रेझ पाहून त्यांनी आपला ट्रॅक बदलला आणि आज ते कुठे आहे हे आपण पाहतोच आहोत. त्यामुळे स्वतःच्या बिझनेसमध्येही वेळोवेळी अपडेट करणे गरजेचे आहे. 

    मित्रांनो, स्टार्टअप सुरू करणे म्हणजे ‘रोलर कोस्टर राईड’ सारखे आहे. यात चढ-उतार येणारच. अपयश येणे म्हणजे सर्वकाही संपणे नव्हे, तर कोणती गोष्ट काम करत नाहीये हे शिकण्याची ती एक संधी असते. थोडक्यात सांगायचे तर जर तुमची आयडिया मजबूत असेल, टीम प्रामाणिक असेल, आर्थिक नियोजन चोख असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्राहकांच्या समस्येचे तुम्ही निवारण करत असाल, तर जगातील कोणतीही ताकद तुमचा स्टार्टअप यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. 

    तर मग, तुमची आयडिया घेऊन मार्केटमध्ये उतरायला तुम्ही तयार आहात का? लक्षात ठेवा, रिस्क घेतल्याशिवाय इतिहास घडत नाही! हा लेख तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा!

    आणखी वाचा