Category: लेख

  • भारतातील ‘हे’ राज्य आहे पूर्णपणे Tax Free! कारण माहितीय का?

    भारतातील ‘हे’ राज्य आहे पूर्णपणे Tax Free! कारण माहितीय का?

    मार्च महिना आला की सगळ्यांची एकच धाकधूक असते ITR (Income Tax Return) कसा भरायचा? आणि टॅक्स कसा वाचवायचा? पण मित्रांनो तुम्हाला माहिते का? आपल्या भारतातच एक असं राज्य आहे, जिथे लोकांना इन्कम टॅक्स काय असतो हेच माहीत नाही… होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत. तुम्ही वर्षाला ५ लाख कमवा किंवा ५० लाख, सरकारला एक रुपयाही टॅक्स द्यावा लागत नाही. हे राज्य आहे सिक्कीम!

    आता तुम्ही म्हणाल, असं कसं काय शक्य आहे? आपण तर चहाच्या कपापासून पेट्रोलपर्यंत सगळीकडे टॅक्स (Tax) भरतोय. मग सिक्कीममध्ये टॅक्स का नाही? तर यामागे एक ऐतिहासिक कारण आहे. १९७५ मध्ये जेव्हा सिक्कीम भारताचा २२ वा भाग बनला, तेव्हा एका करारा अंतर्गत भारतीय संविधानात कलम ३७१ (F) जोडण्यात आले. या विशेष कायद्यानुसार, सिक्कीमच्या मूळ रहिवाशांना भारताचा ‘इन्कम टॅक्स ॲक्ट १९६१’ लागू होत नाही. म्हणजेच, त्यांची १००% कमाई थेट त्यांच्याच बँक खात्यात राहते.

    पण इथे एक ट्विस्ट आहे, ही करसवलत फक्त आणि फक्त सिक्कीमच्या मूळ रहिवाशांनाच लागू होते. म्हणजेच जे १९७५ पूर्वीपासून सिक्कीममध्ये स्थायिक आहेत आणि ज्यांच्याकडे सिक्कीम सब्जेक्ट सर्टिफिकेट आहे अशांनाच या करसवलतीचा फायदा घेता येतो. जर तुम्ही महाराष्ट्रातून किंवा इतर राज्यातून तिथे जाऊन व्यापार किंवा नोकरी करत असाल, तर तुम्हाला मात्र नियमानुसार टॅक्स भरावाच लागेल.

    तसेच, ही सवलत फक्त तिथल्या स्थानिक उत्पन्नावर आणि शेअर्स किंवा सुरक्षित गुंतवणुकीवर मिळणाऱ्या नफ्यावर मिळते. निसर्गाचा अनमोल ठेवा, प्रदूषणमुक्त वातावरण, १००% सेंद्रिय शेती आणि वरून पैशांची होणारी ही मोठी बचत… यामुळेच सिक्कीम हे खऱ्या अर्थाने भारताचे ‘टॅक्स फ्री हेवन’ मानले जाते.

  • EPF म्हणजे काय? नोकरदार वर्गातील ५ मोठे गैरसमज आणि त्याचे सत्य!

    EPF म्हणजे काय? नोकरदार वर्गातील ५ मोठे गैरसमज आणि त्याचे सत्य!

    नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पगारातून दरमहा एक ठराविक रक्कम कट होते आणि ती एका विशिष्ट खात्यात जमा होते, त्याला आपण EPF (Employees Provident Fund) म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणतो. अनेक जण या कपातीकडे पगार कमी करणारी गोष्ट म्हणून पाहतात, तर काही जण याला फक्त एक सरकारी नियम समजून दुर्लक्ष करतात. पण तुम्हाला माहित आहे का? EPF हा केवळ तुमच्या पगारातून कापला जाणारा एक आकडा नाही, तर ते तुमच्या सुरक्षित भविष्याचं आणि सेवानिवृत्तीचं (retirement) सर्वात मोठं हत्यार आहे. पण आजही नोकरदार वर्गामध्ये EPF बद्दल अर्धवट माहिती आणि अनेक गैरसमज आहेत. आज आपण या लेखात EPF म्हणजे काय? आणि नोकरदार वर्गामध्ये याबद्दल असणारे ५ मोठे गैरसमज कोणते आहेत? अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.

    EPF विषयी थोडक्यात माहिती

    EPF ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी एक अत्यंत सुरक्षित आणि खात्रीशीर बचत योजना आहे. ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना’ (EPFO) याद्वारे या संपूर्ण निधीचे नियंत्रण केले जाते. नियम असा आहे की, ज्या कंपनीत २० पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात, तिथे EPF कायदा लागू होतो. याचाच अर्थ तुमच्या मूळ पगाराच्या (Basic Salary + Dearness Allowance) १२% रक्कम दरमहा या फंडात जमा होते. त्याचबरोबर १२% रक्कम तुमची कंपनी (Employer) सुद्धा तुमच्या EPF खात्यात जमा करते. विशेष म्हणजे कंपनीच्या १२% पैकी ८.३३% रक्कम तुमच्या पेन्शन योजनेत (EPS) जाते आणि उर्वरित ३.६७% रक्कम EPF खात्यात जमा होते. सोप्या भाषेत सांगायचं तर, तुम्ही जेवढी बचत करता, तेवढीच बचत तुमची कंपनी तुमच्यासाठी करून देते आणि त्यावर सरकार दरवर्षी व्याज (Interest) सुद्धा देते. रिटायरमेंटच्या वेळी ही जमा झालेली मोठी रक्कम तुमच्या हातात मिळते. EPF बद्दल माहिती तर सर्वांना असते, पण अपुऱ्या माहितीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये अनेक गैरसमज पसरलेले असतात. चला तर मग, या ५ मुख्य गैरसमजांमागचं सत्य जाणून घेऊया…

    EPF बद्दलचे ५ मोठे गैरसमज!

    १) ईपीएफ (EPF) आणि पीपीएफ (PPF) दोन्ही एकच आहेत?

    कर्मचाऱ्यांमध्ये असलेला सर्वात मोठा गैरसमज म्हणजे EPF आणि PPF या दोन्ही एकच संज्ञा आहेत. अनेक जण या दोन्ही नावांमध्ये गल्लत करतात. पण या दोन्ही पूर्णपणे वेगवेगळ्या योजना आहेत. 

    EPF (Employees Provident Fund): कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हा फक्त नोकरदार व्यक्तींसाठीच असतो. यामध्ये कंपनीचा वाटा असतो आणि पगारामधूनच रक्कम कापली जाते.

    PPF (Public Provident Fund): पब्लिक प्रोव्हिडंट फंड ही एक स्वतःच्या इच्छेने केलेली बचत योजना आहे. यामध्ये कोणताही सामान्य नागरिक, व्यावसायिक किंवा शेतकरी स्वतःचे खाते उघडून पैसे गुंतवू शकतो. यात कोणत्याही कंपनीचे योगदान नसते.

    २) EPF साठी निवृत्तीचे वय ६० वर्षे आहे?

    अनेक कर्मचाऱ्यांना वाटते की EPF मध्ये निवृत्तीचे वय ६० वर्षे आहे. पण हा एक गैरसमज आहे कारण नियमानुसार, अधिकृत निवृत्तीचे वय ५८ वर्षे आहे. ५८ वर्षांनंतर तुमची EPF मधील नवीन गुंतवणूक बंद होते, तुम्ही त्यानंतरही नोकरी सुरू ठेवली तरी ५८ हेच ‘कट-ऑफ’ वय मानले जाते. सर्वात महत्वाचे म्हणजे EPF मधील व्याजाचा कालावधी तुम्ही कोणत्या वयात नोकरी सोडता यावर अवलंबून असतो. जर तुम्ही वयाच्या ४५ व्या वर्षी नोकरी सोडली, तर तुम्हाला वयाच्या ५८ व्या वर्षापर्यंत व्याज मिळू शकते. जर ५७ व्या वर्षी नोकरी सोडली, तर ६० व्या वर्षापर्यंत व्याज मिळेल. थोडक्यात, तुम्ही जितक्या लवकर निवृत्त व्हाल, तितक्या जास्त काळासाठी (५८ वर्षांपर्यंत) तुम्हाला व्याज मिळू शकते. 

    ३) Retirement आधी EPF मधून पैसे काढता येत नाहीत?

    EPF हा प्रामुख्याने रिटायरमेंटसाठी फंड गोळा करण्याचा मार्ग आहे, परंतु कठीण काळात किंवा महत्त्वाच्या गरजांसाठी तुम्ही रिटायरमेंट पूर्वीही पैसे काढू शकता. याला ‘पीएफ ॲडव्हान्स’ (PF Advance) किंवा अंशतः पैसे काढणे म्हणतात. उदा. स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या लग्नासाठी, घराच्या खरेदीसाठी किंवा बांधकामासाठी, गंभीर आजारपणाच्या उपचारासाठी, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, अचानक नोकरी गेल्यास (१ महिना बेरोजगार राहिल्यास ७५% पर्यंत रक्कम काढता येते). या सर्व कारणांच्या आधारे तुम्ही नोकरीत असतानाही पैसे काढू शकता. 

    ४) नोकरी बदलली की जुना EPF Fund बुडतो किंवा नवीन खाते काढावे लागते?

    पूर्वी नोकरी बदलल्यावर PF चे पैसे ट्रान्सफर करणे खूप कठीण असायचे आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बराच वेळ जायचा. पण आता सरकारने UAN (Universal Account Number) ची सोय केली आहे. तुम्ही आयुष्यात जितक्या कंपन्या बदलाल, तितक्या कंपन्यांसाठी तुमचा UAN नंबर एकच राहतो. नोकरी बदलली की फक्त नवीन कंपनीला तुमचा UAN नंबर द्यावा लागतो. तुमचा जुना PF नव्या खात्यात अगदी सहज ऑनलाईन ट्रान्सफर होतो. तुमचे पैसे कधीही बुडत नाहीत. 

    ५) EPF च्या पैशांच्या व्याजावर कोणताही TAX लागत नाही किंवा विमा, पेन्शन मिळत नाही?

    हा गैरसमज आधी खरा होता, पण आता सरकारने नियमात बदल केला आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याचे EPF खात्यातील वार्षिक योगदान २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्या २.५ लाखांच्या वर जमा होणाऱ्या रकमेवरील व्याजावर टॅक्स आकारला जातो. सर्वसामान्य कर्मचाऱ्यांसाठी ज्यांचा पगार मर्यादित आहे, त्यांना काळजी करण्याची गरज नाही. पण ज्यांचा पगार खूप जास्त आहे, त्यांनी या नियमाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

    तसेच ईपीएफ खात्यासोबत तुम्हाला दोन अत्यंत महत्त्वाचे फायदे मोफत मिळतात, ज्याबद्दल अनेकांना माहितीच नसते ते म्हणजे :

    १. EDLI (कर्मचारी ठेव लिंक विमा योजना): पीएफ खाते असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा ७ लाख रुपयांपर्यंतचा विमा (Life Insurance) मोफत उतरवला जातो. नोकरीत असताना कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला ही रक्कम मिळते.

    २. EPS (कर्मचारी पेन्शन योजना): आधी सांगितल्याप्रमाणे, कंपनीच्या योगदानाचा एक भाग पेन्शन फंडात जातो. जर तुम्ही सलग १० वर्षे नोकरी पूर्ण केली, तर वयाच्या ५८ वर्षांनंतर तुम्हाला सरकारकडून दरमहा पेन्शन मिळण्यास सुरुवात होते.

    EPF ही केवळ तुमच्या पगारातून होणारी कपात नाही, तर तो एका सुरक्षित भविष्याचा पाया आहे. चक्रवाढ व्याजाच्या (Compound Interest) ताकदीमुळे, नोकरीच्या सुरुवातीच्या काळापासून जमा झालेली छोटी छोटी रक्कम रिटायरमेंटपर्यंत करोडो रुपयांचा फंड बनू शकते.

    त्यामुळे तुमच्या सॅलरी स्लिपमधील PF कपातीकडे पाहून नाराज होऊ नका. तुमचा UAN नंबर नेहमी ॲक्टिव्ह ठेवा, वेळोवेळी तुमचे PF पासबुक ऑनलाईन तपासा आणि विनाकारण किंवा छोट्या-मोठ्या खर्चासाठी पीएफ खात्यातून पैसे काढणे टाळा. जेणेकरून भविष्यात जेव्हा तुम्ही काम करणे थांबवाल, तेव्हा तुमचे पैशांचे झाड तुम्हाला सावली देण्यास तयार असेल. या लेखाच्या माध्यमातून तुमच्या मनातील शंका किंवा गैरसमज दूर झाले असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा!

  • तुम्हीही चुकीच Credit Card वापरत असाल तर लवकरच कर्जबाजारी व्हाल?

    तुम्हीही चुकीच Credit Card वापरत असाल तर लवकरच कर्जबाजारी व्हाल?

    मित्रांनो तुम्हीही Credit Card वापरत असाल तर लवकरच कर्जबाजारी व्हाल? असे सल्ले तुम्हालाही तुमच्या मित्र-मैत्रिणींकडून मिळाले असतीलच. पण थांबा..! आजच्या काळात Credit Card हे केवळ पैसे खर्च करण्याचे साधन राहिले नसून, हुशारीने वापरल्यास पैशांची बचत आणि कमाई करून देणारे एक उत्तम Financial Tool बनले आहे.

    मार्केटमध्ये शेकडो प्रकारची Credit Cards उपलब्ध आहेत, काही Shopping साठी, काही Travelling साठी, तर काही Credit Card अगदी Fuel भरण्यासाठी सुद्धा उपलब्ध आहेत. पण तुमच्या पाकिटात नेमकं कोणतं Card आहे? जर तुम्हीही चुकीचं Card निवडलं असेल तर फक्त Annual Fee भरण्यात पैसे जातील, आणि योग्य Card निवडलं तर प्रत्येक खर्चावर कमाई होईल. पण कसं? चला सांगते…

    प्रामुख्याने Credit Cards चे वर्गीकरण त्यांच्या Benefits नुसार केले जाते. जर तुम्ही वारंवार प्रवास करत असाल, तर Travel Credit Card तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल, ज्यामध्ये Flight Ticket Booking वर Discount आणि Free Airport Lounge Access मिळतो. जर तुम्हाला Online Shopping ची आवड असेल, तर Shopping किंवा Cashback Credit Card निवडावे, जे Amazon, Flipkart सारख्या Platforms वर थेट ५% ते १०% पर्यंतची Saving करून देते. याशिवाय, दरमहा किराणा सामान आणि Fuel वर जास्त खर्च करणाऱ्यांसाठी Fuel आणि Grocery Cards फायदेशीर ठरतात, ज्यामुळे जास्तीत जास्त Reward Points मिळतात.

    Credit Card ची अचूक निवड करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या Bank Statement ची तपासणी करा आणि तुमचा सर्वाधिक खर्च कुठे होतोय हे समजून घ्या. त्यानंतर, Card निवडताना त्याचा Annual Fee आणि त्या बदल्यात मिळणारे Welcome Benefits यांची तुलना करा. अनेक Cards Lifetime Free असतात, तर काहींसाठी शुल्क द्यावे लागते. पण जर त्याचे फायदे शुल्कापेक्षा जास्त असतील, तर Paid Card घेणेही फायद्याचे ठरते.

    नेहमी लक्षात ठेवा, Credit Card चा वापर शिस्तीत आणि वेळेवर Bill Payment करून केल्यास तुमचा CIBIL Score सुधारतो. त्यामुळे कर्जाच्या चक्रव्यूहात न अडकता, आपल्या गरजा ओळखा, Offers ची तुलना करा आणि तुमच्या Lifestyle ला अगदी Perfect बसेल असेच Credit Card निवडा!

    आणखी वाचा :

  • सावधान! मोबाईलचा EMI नाही भरला तर फोन बंद होणार? जाणून घ्या काय आहे RBI चा नवा नियम…

    सावधान! मोबाईलचा EMI नाही भरला तर फोन बंद होणार? जाणून घ्या काय आहे RBI चा नवा नियम…

    मित्रांनो तुम्ही EMI वेळेवर भरला नाही तर बँक थेट तुमचा मोबाईल लॉक करणार? तुमचे व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम सगळं बंद होणार का? जर तुम्हीही नवीन स्मार्टफोन किंवा टॅबलेट EMI वर घेतला असेल, हि बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चांमागची सत्यता जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा!

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) डिजिटल कर्ज देणाऱ्या कंपन्या आणि बँकांसाठी एक नवा मसुदा तयार केला आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून हा नियम लागू करण्याचा प्रस्ताव आहे. विशेष म्हणजे, स्मार्टफोन फायनान्सच्या क्षेत्रात काही फिनटेक कंपन्या आधीपासूनच तंत्रज्ञानाचा वापर करून फोन लॉक करत होत्या, पण आता आरबीआयने यावर अधिकृत शिक्कामोर्तब करत ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी अतिशय कडक नियमावली आणली आहे.

    अनेकांना गैरसमज असेल कि एक EMI मिस झाला की फोन बंद पडेल, पण असं अजिबात नाही. आरबीआयच्या नियमांनुसार, कर्ज थकून जोपर्यंत ९० दिवस म्हणजेच ३ महिने पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत बँक कोणतेही ठोस पाउल उचलू शकत नाहीत. ६० दिवस उलटल्यावर बँक पहिली नोटीस देईल ज्यासाठी २१ दिवसांचा वेळ मिळेल. त्यानंतर ७ दिवसांची लास्ट वॉर्निंग नोटीस दिली जाईल. मात्र बँक तुमचा फोन पूर्णपणे लॉक करू शकत नाही. इनकमिंग कॉल्स, इंटरनेट, इमर्जन्सी SOS आणि सरकारी अलर्ट्स चालूच राहतील. फक्त काही अ‍ॅप्स किंवा फीचर्स ब्लॉक केले जाऊ शकतात. तसेच बँक तुमच्या फोनमधील गॅलरी, फोटो किंवा कॉन्टॅक्ट्स अजिबात पाहू किंवा स्टोअर करू शकत नाही.

    एवढंच नाही तर, जर ग्राहकाने थकीत रक्कम भरली, तर बँकांना अवघ्या १ तासाच्या आत मोबाईल अनलॉक करावा लागेल. जर बँकेने चुकीच्या पद्धतीने फोन लॉक केला किंवा पैसे भरूनही अनलॉक करण्यास उशीर केला, तर बँकेला ग्राहकाला दर तासाला २५० रुपये या दराने भरपाई द्यावी लागेल. थोडक्यात काय तर हा नियम ग्राहकांना त्रास देण्यासाठी नाही, तर रात्री-अपरात्री येणारे रिकव्हरी एजंट्सचे फोन आणि त्यांची अरेरावी थांबवण्यासाठी आहे. त्यामुळे वेळेवर EMI भरा आणि सुरक्षित राहा. तुम्हाला RBI चा हा नियम कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा!

  • स्मार्ट वुमनचा सिक्रेट फॉर्म्युला! जो तुम्हाला कधीच पैशांची चणचण भासू देणार नाही!

    स्मार्ट वुमनचा सिक्रेट फॉर्म्युला! जो तुम्हाला कधीच पैशांची चणचण भासू देणार नाही!

    स्मार्ट वुमन ती नाही जी फक्त पैसे खर्च करते, तर ती आहे जी पैशाने पैसा बनवायला शिकते! महिला मंडळींनो जर तुम्हालाही भविष्यात पैशांची चिंता न करता जगायचं असेल, तर आजच या फायनान्शियल टिप्स फॉलो करा.

    सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम म्हणजे आधी बचत, मग खर्च. अनेकदा आपण महिनाभरातून उरलेले पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण नियम उलटा करायला हवा. पगार झाला किंवा हातात घर खर्चाचे पैसे आले की, आधी किमान २० ते ३० टक्के रक्कम बचतीसाठी बाजूला काढून उरलेल्या पैशातच महिन्याचे बजेट चालवायला शिकले पाहिजे. यासाठी ५०:३०:२० चा सुवर्ण नियम खूप फायदेशीर ठरतो. ज्यामध्ये ५०% रक्कम गरजांसाठी, ३०% इच्छांसाठी आणि २०% रक्कम भविष्यातील गुंतवणुकीसाठी वापरली जाते.

    पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे फक्त कपाटात किंवा बँकेच्या साध्या खात्यात ठेवून वाढत नाहीत, कारण महागाईमुळे त्यांची किंमत कमी होत जाते. म्हणूनच त्या पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. तुम्ही दरमहा अगदी लहान रकमेपासून म्युच्युअल फंडामध्ये एसआयपी (SIP) सुरू करू शकता किंवा बँकेत आरडी (RD) चालू करू शकता. याशिवाय महिलांसाठी असलेल्या विशेष सरकारी योजना, जसे की ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ किंवा पीपीएफ (PPF) चा नक्की फायदा घ्या. महिलांनी शॉपिंग करतानाही थोडे स्मार्ट बनले पाहिजे. अनेकदा सेल लागलाय म्हणून आपण नको असलेल्या गोष्टी खरेदी करतो, ज्याला ‘इम्पल्स बाइंग’ म्हणतात. कोणतीही मोठी खरेदी करताना स्वतःला २४ तास द्या आणि विचार करा की ती वस्तू खरंच गरजेची आहे का? तसेच ऑनलाईन शॉपिंग करताना कूपन कोड्स आणि कॅशबॅकचा आवर्जून वापर करा.

    शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची टीप म्हणजे स्वतःचा Emergency Fund तयार ठेवा. संकट कधीही सांगून येत नाही, त्यामुळे किमान ६ महिन्यांच्या घर खर्चाइतकी रक्कम अशा ठिकाणी सुरक्षित ठेवा, ज्याला अत्यंत गरजेच्या वेळीच हात लावला जाईल. थोडक्यात सांगायचे तर, पैशाची बचत करणे म्हणजे कंजूषपणा नसून ते तुमच्या सुरक्षित भविष्याचे भांडवल आहे. आज केलेली हीच छोटीशी बचत आणि योग्य गुंतवणूक उद्या तुम्हाला खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवू शकते. काय मग महिला मंडळी यापैकी तुम्ही कोणती टिप्स फॉलो करणार आहात? कमेंट करून नक्की सांगा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा!

    आणखी वाचा:

  • ‘बालाजी वेफर्स’ ची झणझणीत यशोगाथा!

    ‘बालाजी वेफर्स’ ची झणझणीत यशोगाथा!

    चिप्स खाणे म्हणजे एक आनंददायी अनुभव. बाजारात विविध कंपन्यांचे चिप्स उपलब्ध असले तरी, बालाजी वेफर्सने आपले एक खास स्थान बनवले आहे. या कंपनीच्या वेफर्सची चव आणि विविध फ्लेवर्स अनेकांच्या आवडत्या आहेत. फक्त पाच रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीमुळे बालाजी हा एक लोकप्रिय ब्रँड बनला आहे.

    परंतु या प्रसिद्ध ब्रँडच्या मागे कोणती व्यक्ती आहे? ती आहे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व चंदूभाई विराणी. एक साधा गुजराती व्यापारी, आपल्या जीवनात अनेक आव्हानांना सामोरे जात त्यांनी प्रचंड मेहनतीने व्यवसाय सुरु केला. त्यांच्या संघर्षाची, मेहनतीची आणि आत्मविश्वासाची कहाणी आपल्याला शिकवते की, कठोर परिश्रम आणि निश्चय असला की, कोणतीही गोष्ट साधता येऊ शकते,आजच्या या लेखात आपण चंदूभाई विराणींच्या जीवनावर एक नजर टाकूया.

    संघर्षातून व्यवसायाची सुरुवात

    चंदूभाई विराणी यांचा जन्म ३१ जानेवारी १९५७ रोजी गुजरातच्या जामनगरमधील एका शेतकरी कुटुंबात झाला. शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना लहानपणापासूनच कष्ट करण्याची सवय होती, मात्र शिक्षणाच्या संधी कमी मिळाल्या. फक्त दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या चंदूभाईंच्या जीवनात अनेक अडचणी आल्या. घरची शेती असली तरी, १९७२ साली आलेल्या प्रचंड दुष्काळामुळे त्यांचे कुटुंब आर्थिक संकटात सापडले.

    या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी १९७४ साली चंदूभाईंनी जामनगर सोडले आणि राजकोटमध्ये नवीन जीवनाची सुरुवात केली. तिथे त्यांनी शेतमाल विक्रीचा व्यवसाय सुरू केला, मात्र त्यात त्यांना यश मिळाले नाही. संघर्ष सुरूच राहिला, पण त्यांनी हार मानली नाही. काही काळ कामाच्या शोधात धडपड केल्यानंतर त्यांना अखेर आपल्या भावासोबत ॲस्ट्रॉन सिनेमा कॅन्टीनमध्ये काम मिळाले, जिथे त्यांचा पगार फक्त ९० रुपये महिना होता.

    सुरुवातीचा संघर्ष: सिनेमाच्या कॅन्टीनमध्ये केलं काम

    चंदूभाई विरानी यांची कहाणी त्यांच्या मेघजीभाई आणि भिखूभाई या दोन भावांसोबत, नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी वडिलांकडून मिळालेल्या २० हजार रुपयांपासून सुरू होते. त्यांनी राजकोटमध्ये कृषी उत्पादनं आणि उपकरणांचा व्यवसाय सुरू केला, मात्र यश मिळालं नाही आणि त्यांनी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.

    या कठीण काळात, चंदूभाईंनी उदरनिववाहासाठी सिनेमाच्या कॅन्टीनमध्ये काम केलं, पोस्टर चिकटवण्यापासून तुटलेल्या सिट्स दुरुस्त करण्यापर्यंत छोटी-मोठी कामं केली. मात्र एवढ्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नव्हता,भाडं न भरल्यामुळे त्यांना घर सोडावं लागलं, परंतु त्यांची मेहनत कामी आली आणि त्यांच्या प्रामाणिक कामाची दखल घेऊन त्यांना कॅन्टीनमध्ये १ हजार रुपयांचं कंत्राट मिळालं.

    थिएटरमध्ये वेफर्सची मागणी पाहून, चंदूभाईंनी या संधीचा फायदा घेतला. त्यांनी १०,००० रुपयांच्या तुटपुंज्या भांडवलात त्यांच्या अंगणात एक तात्पुरती शेड उभारून चिप्स तयार करण्याचे प्रयोग सुरू केले. त्यांच्या घरगुती वेफर्सना थिएटरमधील प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला, आणि हळूहळू बाहेरही मागणी वाढली. या यशामुळे प्रेरित होऊन, त्यांनी व्यवसाय वाढवण्यासाठी बँकेकडून दीड लाख रुपयांचं कर्ज घेतलं आणि १९८२ मध्ये पहिला बटाटा वेफर्स कारखाना उभारला.

    बालाजी वेफर्स: यशस्वी ब्रॅण्डची निर्मिती

    १९९२ मध्ये चंदूभाई विरानी यांनी ‘बालाजी वेफर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीची स्थापना केली, जी त्यावेळी एक छोटी व्यवसायिक कल्पना होती. सुरुवातीला त्यांचं उद्दिष्ट फक्त स्थानिक पातळीवर वेफर्स तयार करून विकण्याचं होतं, परंतु उत्तम दर्जा आणि परवडणाऱ्या किंमतीमुळे कंपनीचं उत्पादन हळूहळू वाढू लागलं. चव, गुणवत्ता आणि विविधता या गोष्टींमुळे ‘बालाजी वेफर्स’ लवकरच गुजरातमध्ये लोकप्रिय झाला. या चवीने आणि दर्जाने कंपनीला प्रचंड यश मिळालं, आणि बाजारात तिची मागणी सतत वाढत राहिली.

    २००६ पर्यंत बालाजी वेफर्सने गुजरातच्या वेफर्स मार्केटमध्ये ९०% हिस्सेदारी मिळवली. हा आकडा फक्त एकट्या गुजरातपुरता मर्यादित नसून, इतर राज्यांमध्येही या ब्रँडची लोकप्रियता प्रचंड होती. बालाजी वेफर्सने आपल्या उत्पादनात सातत्य राखून उत्कृष्ट दर्जा आणि लोकांच्या खिशाला परवडणारी किंमत ठेवली. पाच रुपयांना मिळणाऱ्या या वेफर्सने सर्वसामान्यांच्या रोजच्या आहारात स्थान मिळवलं.

    हेच कारण आहे की, कंपनीच्या उत्पादनाचा विस्तार झाला आणि अलीकडच्या काळात तर दररोज जवळपास ६.५ दशलक्ष किलोग्रॅम बटाटा वेफर्स आणि १० दशलक्ष किलोग्रॅम नमकीन तयार केलं जातं असा दावा कंपनीने केला आहे.

    बालाजी वेफर्सचा हा यशस्वी प्रवास केवळ उत्पादन क्षमतेमुळे नव्हे, तर गुणवत्तेमुळेही घडला आहे. आज ही कंपनी भारतातील प्रमुख स्नॅक्स उत्पादकांपैकी एक बनली आहे. चंदूभाई विरानी यांच्या मेहनतीने आणि त्यांच्यातील दूरदृष्टीने त्यांनी हे सिद्ध केलं आहे की कोणतीही अडचण यशाच्या मार्गात अडथळा बनू शकत नाही. त्यांच्या व्यवसायाने हे दाखवून दिलं की योग्य वेळेत घेतलेले निर्णय आणि जिद्दीने केलेलं काम कधीच वाया जात नाही.

    सामाजिक योगदान आणि महिला सक्षमीकरण

    कंपनीची एक खास गोष्ट म्हणजे तिथे काम करणारे सुमारे पाच हजार कर्मचारी, ज्यांपैकी ५०% महिला आहेत. यामुळे कंपनीने फक्त आपलं आर्थिक विस्तार साधला नाही, तर महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांच्या सशक्तीकरणातही मोठं योगदान दिलं आहे. महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने हे एक आदर्श उदाहरण आहे. शिवाय, बालाजी वेफर्सने समाजाच्या दुर्बल घटकांसाठी विविध सामाजिक प्रकल्प राबवले आहेत. शिक्षण, आरोग्य आणि महिला सशक्तीकरण या प्रकल्पांवर विशेष लक्ष दिलं जातं, ज्यामुळे कंपनीचा सामाजिक दृष्टिकोनही अडोरेखित होतो.

    संघर्ष, मेहनत आणि जिद्दीने उभारलेलं साम्राज्य

    चंदूभाईंनी घेतलेली मेहनत आणि त्यांनी केलेल्या संघर्षाचं यश आज आपण बालाजी वेफर्सच्या रूपाने पाहत आहोत. प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एक संघर्षाची गोष्ट असते. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी, त्यांच्यावर मात करून पुढे जाणं हेच यशाचं खरं रहस्य आहे. परिस्थिती आपल्यावर अवलंबून नसते, पण आपण त्या परिस्थितीशी कसं लढतो, हेच महत्त्वाचं असतं.

    चंदूभाई विराणी यांच्या आयुष्यातील संघर्ष अनेकांना प्रेरणा देणारा आहे. शून्यातून सुरुवात करून त्यांनी पाच हजार कोटी रुपयांचं साम्राज्य उभारलं. व्यवसायात येणाऱ्या अडचणींना त्यांनी कधीच हार मानली नाही, तर त्या अडचणींवर मात करत आपला व्यवसाय उभा केला. त्यांची जिद्द आणि मेहनत यामुळेच बालाजी वेफर्स हा आज भारतातील आघाडीचा फूड ब्रॅण्ड आहे.एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेले चंदूभाई, ज्यांच्याकडे फारसं शिक्षण नव्हतं, तरी त्यांनी स्वप्न पाहिलं आणि त्याचा पाठलाग करत ‘बालाजी वेफर्स’ सारखा मोठा ब्रॅण्ड उभा केला. त्यांची मेहनत, जिद्द, आणि अपयशाला सामोरं जाण्याची तयारी हेच त्यांच्या यशाचं कारण ठरलं.

  • सप्लाय चेन विस्कळीत, महागाईचा भडका! जगाला वाचवण्यासाठी भारताचा ‘प्लस वन’ फॉर्म्युला?

    सप्लाय चेन विस्कळीत, महागाईचा भडका! जगाला वाचवण्यासाठी भारताचा ‘प्लस वन’ फॉर्म्युला?

    आजचे जग हे केवळ इंटरनेटनेच नाही, तर ‘ग्लोबल सप्लाय चेन’ म्हणजेच जागतिक पुरवठा साखळीमुळे एकमेकांशी जोडलेले आहे. तुम्ही वापरत असलेला स्मार्टफोन असो, घरातील औषधे असोत वा रस्त्यावरून धावणारी कार, या सर्व वस्तूंचे सुट्टे भाग जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांतून प्रवास करत तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. मात्र, जागतिक स्तरावर सातत्यााने बदलणारे भू-राजकीय तणाव आणि वाढत्या संघर्षांमुळे सध्या जागतिक बाजारपेठेची गणिते पूर्णपणे बदलली आहेत. पुरवठा साखळीतील किरकोळ बिघाडही कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेला खिळखिळा करू शकतो. अशा परिस्थितीत कॉर्पोरेट जगतात एक नवी क्रांती घडत आहे ती म्हणजे ‘सप्लाय चेन रिझिलियन्स’ (Supply Chain Resilience) म्हणजेच लवचिक पुरवठा साखळी.

    जेव्हा आपण आधुनिक काळातील या बिझनेस मॉडेलला भारताच्या प्राचीन चाणक्य नीतीशी जोडतो, तेव्हा व्यवसायाला केवळ स्थिरता मिळत नाही, तर संकटाचे रूपांतर मोठ्या संधीत करण्याचा मार्ग सापडतो. गेल्या काही दशकांत जगाने स्वस्त उत्पादनाच्या मोहात पडून ‘जागतिक मॅन्युफॅक्चरिंग हब’ (Global manufacturing hub) म्हणून केवळ चीनवर आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केले. परंतु, कोरोना महामारीच्या काळातील लॉकडाऊन, रशिया-युक्रेन युद्ध, समुद्रातील जहाजांवर होणारे हल्ले यामुळे संपूर्ण जगाचे डोळे उघडले आहेत.

    चीनमधील एका शहरात लॉकडाऊन लागला की अमेरिकेतील कारखान्यांना कुलूप लागते, हे जगाने अनुभवले आहे. या धोक्याची जाणीव झाल्यामुळे आता जागतिक कंपन्या ‘चायना प्लस वन रणनीती’ (China+1 Strategy) वापरत आहेत. म्हणजेच पुरवठा खंडित होऊ नये म्हणून चीनमधील आपले कारखाने पूर्णपणे बंद न करता भारत, व्हिएतनाम किंवा मेक्सिको सारख्या दुसऱ्या देशात पर्याय शोधण्याला महत्त्व दिले जात आहे.

    १) पुरवठा साखळी विस्कळीत होणे आणि महागाईचा भडका (The Economic Shockwave)

    जेव्हा आंतरराष्ट्रीय सीमांवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, तेव्हा त्याचा सर्वात पहिला आणि थेट फटका जागतिक पुरवठा साखळीला बसतो. आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेत कोणतीही वस्तू एकाच ठिकाणी पूर्णपणे तयार होत नाही. कच्चा माल एका देशातून येतो, त्याचे सुट्टे भाग दुसऱ्या देशात बनतात आणि त्याचे  Assembling

    तिसऱ्याच देशात होते. जेव्हा या साखळीतील एखादा दुवा कमकुवत होतो किंवा तुटतो, तेव्हा उत्पादन प्रक्रिया जागीच ठप्प होते. वस्तूंचा पुरवठा कमी झाल्यामुळे बाजारात तुटवडा निर्माण होतो आणि मागणी तशीच राहिल्याने किमती गगनाला भिडतात. याला अर्थशास्त्राच्या भाषेत ‘सप्लाय-साईड इन्फ्लेशन’ (Supply-side Inflation) म्हणजेच पुरवठा-आधारित महागाई म्हणतात.

    मालवाहतूक करणाऱ्या जहाजांचे मार्ग बदलल्यामुळे समुद्रातील भाडे (Ocean Freight) कित्येक पटीने वाढते. हा वाढलेला लॉजिस्टिक्स खर्च कंपन्या शेवटी ग्राहकांच्या खिशातून वसूल करतात, ज्यामुळे अन्नधान्यापासून ते इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपर्यंत प्रत्येक गोष्ट महाग होते. कच्चा माल वेळेवर न मिळाल्यामुळे कंपन्यांची औद्योगिक मंदी सुरू होते आणि याचा थेट फटका देशाच्या जीडीपीवर (GDP) बसतो.

    २) चाणक्य नीती: कोणत्याही एका स्रोतावर अति-अवलंबून न राहणे

    आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात राज्याची सुरक्षा आणि व्यापार याविषयी अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे. व्यवसायातील चाणक्य नीतीनुसार, कोणत्याही राजाने किंवा व्यापाऱ्याने आपल्या संरक्षणासाठी किंवा गरजांसाठी केवळ एकाच परकीय शक्तीवर पूर्णपणे अवलंबून राहू नये. एकाच स्रोतावर अति-अवलंबून राहणे म्हणजे स्वतःहून संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे. जागतिक कंपन्यांनी नेमकी हीच चूक केली. स्वस्त मजूर आणि कमी उत्पादन खर्च या मोहापायी जगाने चीनवर अवलंबित्व वाढवले. औषधांचा कच्चा माल असो की सेमीकंडक्टर चिप्स, सर्वांसाठी चीनला निवडले गेले. परंतु, जेव्हा कोरोना संकट आले, तेव्हा जगाला चाणक्य नीतीच्या इशाऱ्याची जाणीव झाली. एकाच देशातील लॉकडाऊनमुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडू शकते हे लक्षात येताच कंपन्यांनी आपल्या रणनीतीत बदल केला.

    ३) जागतिक बाजाराचा ‘चायना प्लस वन’चा सर्व्हायव्हल मंत्र

    पूर्णपणे चीनवर अवलंबून राहणे कमी करण्यासाठी जागतिक कंपन्यांनी ‘China+1’ हे नवीन धोरण अमलात आणले आहे. या रणनीतीचा मूळ उद्देश असा आहे की, कंपन्या चीनमधील आपले उत्पादन पूर्णपणे बंद करणार नाहीत, परंतु कोणत्याही एका संकटामुळे व्यवसाय बुडू नये म्हणून चीनला पर्याय म्हणून आणखी एका सक्षम देशात आपले उत्पादन केंद्र विकसित करतील. यामुळे कंपन्यांना जोखीम व्यवस्थापन (Risk Management) करणे सोपे जात असून आंतरराष्ट्रीय व्यापारात एक नवी स्पर्धात्मकता निर्माण होत आहे.

    ४) भारताला ‘China+1’ चा कसा फायदा होणार? (The Indian Advantage)

    जागतिक कंपन्या जेव्हा चीनला पर्याय म्हणून ‘प्लस वन’ देशाचा शोध घेतात, तेव्हा त्यांच्यासमोर भारताचे नाव सर्वात आघाडीवर येते आणि इथेच भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक सुवर्णकाळ सुरू होतो. भारताकडे असलेले अथांग मनुष्यबळ, वेगाने विकसित होणारे पायाभूत तंत्रज्ञान आणि स्थिर लोकशाही यांमुळे जगभरातील दिग्गजांचे लक्ष भारताकडे वेधले गेले आहे. ॲपल (Apple) कंपनीने भारतात आयफोनचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू करणे, हे याचे जिवंत उदाहरण आहे.

    ५) भारत सरकारने या संधीचे सोने करण्यासाठी खालील प्रमुख पावले उचलली आहेत:

    मेक इन इंडिया (Make in India): स्थानिक उत्पादनाला गती देण्यासाठी आणि जागतिक कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी सुरू केलेली मोहीम.

    पीएलआय योजना (PLI Scheme): परदेशी कंपन्यांना भारतात कारखाने उभारणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर वाटावे म्हणून दिलेले प्रोत्साहन (Production Linked Incentive). या योजनांमुळे इलेक्ट्रॉनिक्स, औषधनिर्माण (Pharmaceuticals), ऑटोमोबाईल आणि रासायनिक उद्योगात भारत आता जागतिक पुरवठा साखळीचा एक मुख्य कणा बनत चालला आहे. चीनमधील मजुरीचा वाढता खर्च आणि तिथली हुकूमशाही वृत्ती या पार्श्वभूमीवर भारत हा एक विश्वासू, लोकशाहीवादी व्यावसायिक मित्र वाटत आहे.

    ६) भविष्यातील आव्हाने आणि भारताची सज्जता

    ‘China+1’ रणनीतीमुळे भारताच्या दारात आर्थिक प्रगतीची आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीची गुंतवणूक संधी चालून आली आहे. तथापि, हा फायदा दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी भारताला आपल्या देशांतर्गत लॉजिस्टिक्स क्षेत्रातील त्रुटी दूर कराव्या लागतील, लालफितीचा कारभार कमी करावा लागेल आणि दळणवळणाचा खर्च अधिक कमी करावा लागेल. चाणक्य सांगून गेले आहेत की, संधी ही केवळ योग्य पूर्वतयारी असलेल्यांनाच लाभ देते. त्यामुळे भारताने जर आपल्या पायाभूत सुविधा अधिक बळकट केल्या, तर येणाऱ्या काळात भारत केवळ चीनला पर्याय ठरणार नाही, तर जागतिक उत्पादनाचा नवा केंद्रबिंदू बनेल यात शंका नाही.

    आणखी वाचा :

  • Digital Marketing: सध्याच्या डिजिटल युगात या क्षेत्राला प्रचंड मागणी आहे.

    Digital Marketing: सध्याच्या डिजिटल युगात या क्षेत्राला प्रचंड मागणी आहे.

    “बोलणाऱ्याचे हुलगेही विकले जातात आणि न बोलणाऱ्याचे गहूही विकले जात नाही.” ही जुनी म्हण आजच्या स्पर्धेच्या युगात अधिकच प्रकर्षाने जाणवते. पूर्वीच्या काळी व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी वर्तमानपत्रे, रेडिओ किंवा टेलिव्हिजन हेच मर्यादित पर्याय होते. परंतु, गेल्या दशकात इंटरनेटने जगाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. आज प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्टफोन आहे आणि जगातील प्रत्येक व्यवहार आता डिजिटल स्क्रीनवर येऊन थांबला आहे. या बदलत्या जीवनशैलीतूनच जन्माला आली एक प्रभावी संकल्पना – डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing).

    डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय? (What is Digital Marketing?)

    डिजिटल मार्केटिंग, ज्याला आपण ऑनलाइन मार्केटिंग (Online Marketing) म्हणूनही ओळखतो, ही इंटरनेटच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची एक प्रगत कला आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, इंटरनेट आणि डिजिटल साधनांचा (स्मार्टफोन, लॅपटॉप, सोशल मीडिया) वापर करून आपल्या उत्पादनांची किंवा सेवांची जाहिरात करणे म्हणजे डिजिटल मार्केटिंग.

    पारंपारिक मार्केटिंग (Traditional Marketing) मध्ये व्यावसायिक ग्राहकांकडे जात असे, पण डिजिटल मार्केटिंगमध्ये ग्राहक स्वतः आपल्या गरजांनुसार इंटरनेटवर शोध घेत व्यावसायिकांपर्यंत पोहोचतात. यात वेबसाईट (Website), सर्च इंजिन (Search Engine), सोशल मीडिया (Social Media), ईमेल (Email) आणि मोबाईल ॲप्स (Mobile Apps) यांसारख्या विविध चॅनेलचा वापर केला जातो.

    डिजिटल मार्केटिंगची मुख्य अंगे (Core Elements of Digital Marketing)

    डिजिटल मार्केटिंग हे केवळ फेसबुकवर पोस्ट टाकण्यापुरते मर्यादित नाही. यात अनेक तांत्रिक बाबींचा समावेश होतो:

    • सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (Search Engine Optimization – SEO): गुगलवर जेव्हा कोणी काही शोधते, तेव्हा तुमची वेबसाईट पहिल्या पानावर दिसण्यासाठी केलेले तांत्रिक बदल म्हणजे SEO.
    • सोशल मीडिया मार्केटिंग (Social Media Marketing – SMM): फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन आणि यूट्यूबच्या माध्यमातून ब्रँडची जागरूकता (Brand Awareness) निर्माण करणे.
    • पे-पर-क्लिक (Pay-Per-Click – PPC): गुगल किंवा इतर प्लॅटफॉर्मवर जाहिराती दाखवून त्वरित रिझल्ट (Results) मिळवणे.
    • कंटेंट मार्केटिंग (Content Marketing): ब्लॉग, व्हिडिओ आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून ग्राहकांना माहिती देऊन त्यांचा विश्वास संपादन करणे.

    आजच्या युगात डिजिटल मार्केटिंगचे महत्त्व (Importance of Digital Marketing)

    कोणत्याही व्यवसायाला आजच्या काळात डिजिटल मार्केटिंगकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. त्याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:

    १. जागतिक विस्तार (Global Reach):

    पूर्वी एखादा छोटा व्यावसायिक फक्त आपल्या परिसरातील ग्राहकांना सेवा देऊ शकत होता. परंतु, डिजिटल मार्केटिंगमुळे आता कोल्हापुरातील उद्योजक अमेरिकेतील ग्राहकाला आपली उत्पादने सहज विकू शकतो. इंटरनेटने भौगोलिक मर्यादा पूर्णपणे नष्ट केल्या आहेत.

    २. खर्च-प्रभावीता (Cost-Effective):

    टीव्हीवर ३० सेकंदाची जाहिरात देण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. त्या तुलनेत सोशल मीडिया किंवा ईमेल मार्केटिंग अत्यंत कमी खर्चात सुरू करता येते. लहान स्टार्टअप्ससाठी (Startups) हे एक वरदान आहे.

    ३. टार्गेटेड मार्केटिंग (Targeted Marketing / Audience Targeting):

    डिजिटल मार्केटिंगचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही तुमची जाहिरात नेमकी कोणाला दाखवायची हे ठरवू शकता. उदाहरणार्थ, जर तुमचा केकचा व्यवसाय असेल, तर तुम्ही तुमची जाहिरात फक्त तुमच्या शहरातील १८ ते ३५ वयोगटातील आणि ‘Foodies’ असलेल्या लोकांनाच दाखवू शकता. यामुळे पैशांचा अपव्यय टाळता येतो.

    ४. रिअल-टाइम रिझल्ट्स (Real-Time Results / Analytics):

    पारंपारिक जाहिरात किती लोकांनी पाहिली हे मोजणे कठीण असते. पण डिजिटल मार्केटिंगमध्ये तुम्हाला डॅशबोर्डवर लगेच कळते की तुमची जाहिरात किती लोकांनी पाहिली, त्यावर किती जणांनी क्लिक केले आणि किती लोकांनी खरेदी केली. या डेटाच्या (Data Analysis) आधारे तुम्ही तुमची रणनीती बदलू शकता.

    डिजिटल मार्केटिंगचे दूरगामी फायदे (Benefits of Digital Marketing)

    डिजिटल मार्केटिंग केवळ विक्री वाढवण्यासाठी नाही, तर एक ‘ब्रँड’ (Brand) तयार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.

    रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट (Return on Investment – ROI): इतर कोणत्याही मार्केटिंग माध्यमाच्या तुलनेत डिजिटल मार्केटिंगमध्ये गुंतवलेल्या पैशांवर मिळणारा परतावा जास्त असतो. कारण येथे आपण केवळ संभाव्य ग्राहकांवरच (Potential Customers) लक्ष केंद्रित करतो.

    ब्रँड जागरूकता (Brand Awareness): सातत्याने सोशल मीडिया वर दिसल्यामुळे लोकांच्या मनात तुमच्या ब्रँडबद्दल विश्वास निर्माण होतो. लोक जेव्हा गुगलवर तुमच्या ब्रँडचे नाव शोधतात, तेव्हा तुमची विश्वासार्हता वाढते.

    ऑटोमेशन आणि कार्यक्षमता (Marketing Automation & Efficiency): चॅटबॉट्स (Chatbots) आणि ईमेल ऑटोमेशन (Email Automation) मुळे तुम्ही झोपलेले असतानाही तुमचा व्यवसाय ग्राहकांशी संवाद साधू शकतो आणि ऑर्डर घेऊ शकतो. यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि कार्यक्षमता वाढते.

    थेट संवाद आणि फीडबॅक (Direct Engagement & Feedback): सोशल मीडियाद्वारे ग्राहक थेट आपल्या उत्पादनावर कमेंट किंवा रिव्ह्यू (Reviews) देऊ शकतात. हा फीडबॅक आपल्याला आपली सेवा सुधारण्यास मदत करतो, ज्यामुळे ग्राहक संबंध अधिक दृढ होतात.

    Digital Marketing आणि Artificial Intelligence (AI) (AI in Digital Marketing)

    आजच्या काळात Digital Marketing आणि Artificial Intelligence (AI) यांचे नाते अतूट झाले आहे. AI मुळे मार्केटिंग आता केवळ जाहिरात न राहता ती वैयक्तिक (Personalized) सेवा बनली आहे. चॅटबॉट्स (Chatbots) ग्राहकांच्या शंकांचे २४/७ निरसन करतात, तर ‘Predictive Analysis’ द्वारे ग्राहकाला भविष्यात काय हवे आहे, याचा अंदाज व्यावसायिक आधीच लावू शकतात. AI मुळे मजकूर लिहिणे (Content Creation), ग्राफिक्स बनवणे आणि मोठ्या डेटाचे विश्लेषण (Data Analysis) करणे सेकंदात शक्य झाले आहे. गुगल आणि फेसबुकचे अल्गोरिदम AI वापरून तुमची जाहिरात योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवतात, ज्यामुळे जाहिरातीचा खर्च (Ad Spend) कमी होतो आणि ‘Return on Investment’ (ROI) वाढतो. थोडक्यात, डिजिटल मार्केटिंगमध्ये AI चा वापर करणे ही आता काळाची गरज असून, यामुळे व्यवसायाची अचूकता आणि वेग प्रचंड वाढला आहे.

    भविष्यातील व्यवसायाचा आधार (Future of Business)

    डिजिटल मार्केटिंग ही आता एक चैन नसून ती काळाची गरज बनली आहे. लहान असो वा मोठा, प्रत्येक व्यवसायाला टिकून राहण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा स्वीकार करावाच लागेल. तंत्रज्ञानाच्या या प्रवाहात जो व्यावसायिक स्वतःला अपडेट (Update) ठेवेल, तोच या स्पर्धेच्या युगात टिकेल. डिजिटल मार्केटिंग म्हणजे केवळ तंत्रज्ञान नाही, तर ती ग्राहकांशी नाते जोडण्याची एक नवी डिजिटल पद्धत आहे.

    तुम्हाला तुमचा व्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्मवर (Digital Platforms) न्यायचा आहे का? डिजिटल मार्केटिंगच्या या महासागरात स्वतःची नौका कशी वल्हवायची आणि प्रगती कशी साधायची, याबद्दल अधिक सखोल माहिती आणि स्ट्रॅटेजीज (Strategies) मिळवण्यासाठी, व्यवसायातील अशाच तांत्रिक आणि वास्तववादी अपडेट्ससाठी आमच्या वेबसाईटला बुकमार्क (Bookmark) करा आणि पुन्हा नक्की भेट द्या!

  • Natu Caterers Success Story: नोकरदार ते उद्योजक असा अरुण नातू यांचा प्रवास

    Natu Caterers Success Story: नोकरदार ते उद्योजक असा अरुण नातू यांचा प्रवास

    Natu Caterers Success Story: एक लहान मुलगा ! लहानपणापासून अभ्यासापेक्षा इतर उचापती करण्यात पटाईत, बोलका स्वभाव, सदैव मित्रांच्या घोळक्यात रममाण असणारा पण रक्तात व्यवसाय भिनलेला. म्हणजेच एक रुपयाचे-दोन रुपये-५ रुपये कसे करायचे? ह्याचे अचूक आकलन असणारा एक मुलगा! अभ्यासाची आवड नाही. त्यामुळे शिक्षणात रस नाही. मॅट्रिक झाल्यानंतर कॉलेजात न जाता व्यवसायाची आवड असल्याने त्याने टॅक्सी व टूरिस्ट कारचा व्यवसाय सुरु केला. व्यवसायात फायदा होत होता..

    पण त्याच्या वडिलांनी एकदा सहजच म्हटले, “तुझी व्यवसायाची आवड मी समजू शकतो पण ही टूरिस्ट लाईन, ड्रायव्हरची लाईन मला पसंत नाही, मला आवडत नाही. माझ्या मुलाने हा व्यवसाय करावा हे माझ्या मनाला पटत नाही.” त्या मुलाने वडिलांचे म्हणणे ऐकले. वडिलांच्या ओळखीने त्या तरुणाला क्रॉम्पटन ग्रीव्हज कंपनीमध्ये नोकरी लागली. त्यानंतर कंपनीतर्फेच त्याला नाशिकला पाठवण्यात आले. त्या तरुणाला नाशिक मनापासून आवडले. ज्याचा ‘व्यवसाय’ हाच आत्मा होता त्या तरुणाने चक्क २२ वर्षे नोकरी केली. पत्नीने सुरु केलेल्या छोटेखानी व्यवसायामध्ये विद्यार्थ्यांची जेवणाच्या डब्याची सोय त्याने नोकरी सांभाळून १० वर्षे केली. त्यात प्रचंड मेहनत केली. श्रमांना हार न मानणाऱ्या ह्या गृहस्थाने पत्नीच्या संपूर्ण सहकायनि व्यवसायाचा वेलू दरवर्षी वाढवत उंचीवर नेला. सन २००० मध्ये अशी स्थिती आली की नोकरीमध्ये ३६५ दिवसांमध्ये १२० ते १३० दिवस बिनपगारी रजा होऊ लागली. ह्या गृहस्थाचे भाग्य जोरावर ! खरेपणाने वागणाऱ्याला परमेश्वराकडून नेहमीच बक्षीस मिळत असते फक्त ते बक्षीस कधी व किती मिळणार हे पृथ्वीतलावरील प्राणीमात्राला कळत नाही.

    ह्या गृहस्थाच्या मनात आले, आता बस.. नोकरी सोडावी.. ज्या कंपनीने २०-२२ वर्षे सांभाळले तिथे आता कामाला न्याय देणे शक्य होत नाही. अन् नेमकी तेव्हाच कंपनीची व्ही.आर.एस. स्कीम म्हणजेच स्वेच्छा निवृत्तीची योजना आली. व्ही.आर.एस.साठी पहिला फॉर्म ह्या गृहस्थाचा ! काहीही आर्थिक नुकसान न होता नोकरीमध्ये निवृत्ती.. अन् पुढील १५ वर्षांत व्यवसायाच्या वृक्षाचा अक्षरशः वटवृक्षासारखा विस्तार झाला. ते गृहस्थ म्हणजे नाशिकमधील प्रसिद्ध नातू कॅटरर्सचे श्री. अरुण नातू. ज्यांच्याकडे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ३ लहान मोठ्या हॉल्स्मधील कॅटरिंगची पूर्ण मोनोपॉली आहे. तसेच प्रसाद मंगल कार्यालय, इंद्रप्रस्थ हॉल, सोमेश्वर लॉन्स येथील कॅटरिंग पॅनेलवर नातू आहेत. तेथे ‘नातू कॅटरर्स’ला लोकांची सर्वाधिक पसंती ! हीच आहे, नातू कॅटरर्सची ओळख.. ग्राहकांच्या चवीची तृप्ती । 

    प्रारंभिक जीवन :  

    ठाणे येथे वास्तव्यास असलेले श्री. महादेव नातू व सौ. शैलजा नातू या दांपत्याला दोन मुलगे – मोठा अनिल व धाकटा अरुण ! अरुणचे लहानपणापासून शालेय अभ्यासापेक्षा इतर उचापतींकडे अधिक लक्ष, तसाच त्याचा स्वभाव त्याच्या आईसारखाच बोलका ! जनसंपर्काची प्रचंड आवड ! १९७० च्या दरम्यान अरुणच्या वडिलांनी मुलुंड पूर्वेला एक ब्लॉक घेतला व नातू कुटुंब मुलुंड येथे राहावयास गेले. मुलुंडला नातू कुटुंब ज्या सोसायटीमध्ये राहत होते तेथील ४० ब्लॉक्सपैकी ३८ कुटुंब गुजराती तर फक्त २ कुटुंब मराठी त्यातील एक म्हणजे नातू कुटुंब !  अरुणचे अनेक मित्र गुजराती होते. अन् गुजराती  समाजामध्ये ९८% मंडळी व्यावसायिक तर २% मंडळी नोकरी पेशातील ! त्यांच्यामध्ये व्यवसाय पिढ्यानपिढ्या परंपरागत आलेला. मुलांना लहानपणापासूनच व्यवसायाचे बाळकडू मिळालेले असते.

    ह्या गुजराती  मित्रांकडून अरुण व्यवसाय म्हणजेच एक रुपयाचे दोन रुपये, एक रुपयाचे पाच रुपये कसे करायचे हे गणित शिकला. त्याला स्वतःला शिक्षणात अजिबात रस नसल्याने इयत्ता आठवी, नववीपासूनच अरुण अनेक वस्तूंची खरेदी विक्री करु लागला. अरुण नफ्याचे प्रमाण कमी ठेवत असल्याने त्याच्या सर्व वस्तूंची विनासायास विक्री होत असे.  आठवी-नववीतला विद्यार्थी असलेला अरुण कुठल्या जबाबदारीने है काम करीत नव्हता. एकतर व्यवसायाची उपजत आवड आणि मुख्य म्हणजे मिळालेल्या पैशांतून मौजमजा करणे, त्यामध्ये सिनेमा पाहणे, हॉटेलमध्ये जाणे, जनसंपर्काची आवड असल्याने मित्रांना स्वपैशाने खाऊ घालणे हेच उद्योग ! २-३ वर्ष अरुणने नवीन रिक्षा भाड्याने आणून चालवणे हा व्यवसाय केला. त्यामध्ये रोजचा १० रु. फायदा होऊ लागला. 

    व्यवसायाची सुरुवात :

    अरुणने मॅट्रिकनंतर टॅक्सी व टूरिस्ट कारचा व्यवसाय करण्याचे ठरवले. लायसन्स नसतानाही अरुण गाडी चालवत असत ह्याचा पुरावा पर्मनंट लायसन्सच्या परीक्षेच्या वेळेस तेथील अधिकाऱ्यांना आला. त्याचे असे झाले. अधिकारी परीक्षा घेत असताना त्यांनी अरुणला वरळी येथील एका चढावरती अचानक गाडी थांबवून. मग पुढे जाण्यास सांगितले तेव्हा अरुणने सराईत ड्रायव्हरप्रमाणे गाडी एक इंचही मागे न येऊ देता गाडी पुढे नेली. तेव्हा त्या अधिकाऱ्याच्या तात्काळ लक्षात आले की कायमस्वरुपी लायसन्स नसताना हा पठ्ठया सर्वत्र गाडी चालवत असावा. तसे विचारल्यानंतर अरुणने सुद्धा खरे खरे उत्तर दिले. माझा टॅक्सी- टूरिस्टचा व्यवसाय २ वर्षांपासून आहे. मी अनेकवेळा गाडी चालवली आहे. त्या अधिकाऱ्याने मंद स्मित करीत अरुणला कायमस्वरुपी लायसन्स दिले. असा हा अरुण खरे बोलणारा, मन निर्णय देईल त्याप्रमाणे वागणारा, स्वच्छतेचा पुरस्कर्ता, मित्रांसाठी जिवाला जीव देणारा पण तितकाच कठोर व स्पष्ट बोलणारा !

    एकदा अरुणच्या वडिलांनी त्याला सांगितले, “अरुण, तुझ्या आतापर्यंतच्या उचापतींना मी कधी आडकाठी घेतली नाही किंवा तुझ्या कुठल्याही गोष्टींना मी कधी विरोध केला नाही. पण तू तुझा हा टूरिस्ट व टॅक्सी ड्रायव्हरचा व्यवसाय बंद करावास. ही टूरिस्ट लाईन मला पसंत नाही. ह्या व्यवसायात दारु, जुगार अशी व्यसने लागण्याची शक्यता जास्त असते.  मी माझ्या ओळखीने तुला चांगली नोकरी मिळवून देतो.” वडिलांचे हे कळकळीचे सांगणे ऐकून अरुणच्या मनात ठसले की एक भल्यासाठीच सांगतो आहे. यामध्ये कुठेही नाही, आग्रहाचा बाऊ नाही. अरुणने टूरिस्ट टॅक्सीचा व्यवसाय बंद केला.

    वडिलांनी शब्द दिल्याप्रमाणे आपल्या मित्राच्या साहाय्याने अरुणला क्रॉम्प्टन ग्रीव्हज्सारख्या प्रसिद्ध कंपनीत नोकरी मिळवून दिली. १९७८मध्ये अरुण क्रॉम्पटनच्या फॅक्टरीमध्ये जाऊ लागला. १९८० च्या दरम्यान क्रॉम्प्टनने फॅक्टरीमधील स्टाफला नाशिक १४ मे १९८० मध्ये अरुण नाशिकला रवाना झाले. 

    वैवाहिक जीवन : 

    ७ जून १९८४ रोजी अरुणचे कल्पना खरे हिच्याशी लग्न झाले व १९८५ मध्ये अरुण व कल्पना यांना मुलगा झाला.. एक मध्यमवर्गीय समाधानी कुटुंब । आर्थिक संपन्नतेची स्वप्ने अरुण पाहत असला तरी त्यासाठी विशेष प्रयत्न असे नव्हते. मुलगा झाल्यानंतर मात्र अरुण व त्यांच्या पत्नीला वाटले की मुलाच्या वाढीच्या दृष्टीने, संस्कारांच्या दृष्टीने सिडको वसाहतीमधील वास्तव्य योग्य नव्हे. सिडकोच्या ब्लॉकचे पैसे अरुणच्या पगारातून वजा होत असत. १९९० पर्यंत सिडकोचा ब्लॉक अरुणच्या नावावर जणू झाला होता. १९९० मध्ये अरुण यांनी नाशिकच्या महात्मा नगर भागामध्ये ६१० चौ. फुटांचा २ बेडरुम हॉल किचनचा ब्लॉक घेतला. त्यासाठी त्यांनी H.D.F.C. बँकेकडून कर्ज घेतले. ब्लॉकमध्ये राहावयास आल्यानंतर अरुण समाधानाने म्हणतात, “स्वतःचा ब्लॉक होणे.. म्हणजेच ‘ही माझी वास्तू आहे’ असे सांगण्यात एक वेगळाच आनंद असतो. तसेच १९८७ पर्यंत मी सायकलने प्रवास करीत असे. १९८७ मध्ये मी पहिली बजाज सुपर स्कूटर घेतली. त्याहीवेळेस माझ्या स्कूटरला पहिली किक मारली तेव्हा वेगळाच आनंद झाला. १९८७ मध्ये अरुण यांच्या सौभाग्यवतीला अंबड येथील ग्लॅक्सो कंपनीमधील पॅकिंग डिपार्टमेंटमध्ये नोकरी लागली. कुटुंबाच्या डबल इन्कममुळे अरुण यांची आर्थिक परिस्थिती खूप सुधारली.

    १९९० मध्ये अरुण यांनी ब्लॉक घेतल्यानंतर त्यांच्या वडिलांना— महादेवपंतांना खरा आनंद झाला.. मुलगा मार्गी लागला.. चांगला कुटुंबवत्सल झाला. त्याने टूरिस्ट लाईन सोडली म्हणून हे दिवस मी पाहू शकलो ह्याचे त्यांनी समाधान मानले. पण त्या कर्तव्यदक्ष पित्याला हे माहीत नव्हते की हाच माझा मुलगा अरुण उद्योजक होणार आहे. करोडोंचे व्यवहार करणार आहे व नाशिकमध्ये एक ‘सन्माननीय व्यक्ती’ म्हणून वावरणार आहे.

    सौ. कल्पना यांना नोकरी लागल्यानंतर आर्थिक विवंचना मिटली असली तरी ‘बालसंगोपन’ हा मोठा प्रश्न आ वासून उभा राहिला. त्यावेळेस अरुण कायम सेकंड शिफ्ट घेऊ लागले. म्हणजेच दुपारी ३.३० ते रात्री ११.३०! दुपारी ३ ते रात्री ७ वाजेपर्यंत मुलाला पाळणाघरात ठेवावे लागले. ह्या अशा दिनचर्येमुळे पती पत्नींचे ओट्यावरती ठेवलेल्या चिठ्यांद्वारे संभाषण.. त्यामध्ये अनेक वेळा गैरसमज होत. मग शाब्दिक वादावादी व्हायची. मुलावर संस्कार करण्यास, त्याचा अभ्यास घेण्यास कोणालाच वेळ नाही. परत महादेवपंतांनी स्पष्ट सांगितले की ही तुमची जीवनशैली मला मान्य नाही. सूनबाईंनी नोकरी सोडावी. मुलांना आईचेच संस्कार हवेत. मनाच्या दोलायमान स्थितीत नातू दांपत्य असताना ७ जुलै १९९० रोजी कल्पना यांना कन्यारत्न झाले. काही महिने ह्या छोट्या बाळाला ग्लॅक्सोच्या फ्रेशमध्ये ठेवून पाहिले पण तरीही दोघांना वाटू लागले की कल्पनाच्या नोकरीबाबत ठाम निर्णय घेणे गरजेचे आहे. डिसेंबर १९९० मध्ये सौ. कल्पना यांनी नोकरी सोडली. 

    केटरिंग व्यवसायात पाऊल : 

    १९९४ मध्ये मुलगी ४ वर्षांची झाली. बालवाडीत जाऊ लागली तेव्हा सौ कल्पनाच्या मनात आले. “काहीतरी करु या का? पण ‘काहीतरी’ या प्रश्नाला उत्तर सुचत will power म्हणजेच आंतरिक इच्छा प्रबळ असली की समोरून येणाऱ्या संधी त्या व्यक्तीला खुणावतात. भोसला मिलिटरी स्कूलमधील आमटे मॅडम नातू परिवाराच्या परिचित होत्या. त्या तिथे मोठ्या पदावर होत्या, एकदा सहज त्या सौ. कल्पनाला म्हणाल्या, “भोसला मिलिटरी स्कूलच्या आवारात विद्यार्थ्यांसाठी खाद्यपदार्थांचे काऊंटर लावता येतील का? ज्या विद्यार्थ्यांना घरून डबे आणणे जमत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी पोळीभाजी, दही भात किंवा नाश्ता म्हणून इडली, सँडविच, बटाटावडा असे प्रकार ठेवावेत. सौ. कल्पनाताईंना हा प्रस्ताव आवडला. कारण महात्मानगर पासून भोसला मिलिटरी स्कूल हे अंतर फक्त १० मिनिटे ! सौ. कल्पनाताईंनी अरुण यांच्याशी चर्चा करून हे काम स्वीकारले, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला मिळू लागला. अरुण स्वतःची नोकरी सांभाळून पत्नीला व्यवसायात मदत करीत. अगदी भाज्या खरेदीपासून भाज्या चिरण्यापर्यंत अरुण पत्नीला मदत करु लागले. एकदा शाळेतील २५ शिक्षकांची ट्रीप जाणार होती.

    शिक्षकांनी २५ जेवणाच्या डब्यांची फर्माइश केली. खरं म्हणजे ही फर्माईश हाच व्यवसायाचा श्रीगणेशा ठरला ! ह्या २५ शिक्षकांना जेवणाचे डबे म्हणजेच खाद्यपदार्थांची चव इतकी आवडली की त्यांच्याकडून त्यांच्या घरच्या समारंभाच्या ऑर्डर्स सौ. कल्पनाताईंना मिळू लागल्या. जेवणाची पार्सल्स, हळदीकुंकू, बारसे, केळवण, डोहाळ जेवण, वाढदिवस अनेक छोटे छोटे कार्यक्रम.. भरपूर ऑर्डर्स वाढल्या. ५ वर्षात व्यवसाय इतका वाढला की मदतीला ४ बायका येऊ लागल्या. अर्थातच महात्मानगर येथील राहत्या घरातून सर्व कामे करणे कठीण झाले. अरुण व सौ. कल्पना यांनी एकत्रितपणे निर्णय घेतला व जवळच असलेल्या डिसोझा कॉलनीमध्ये एक २ रुम किचन ब्लॉक विकत घेतला व तिथे केटरिंगचे काम सुरु झाले. पदार्थांची चव ग्राहकांची संख्या वाढवत होती. ग्राहकांना हसतमुखाने सामोरे जाण्याचे काम अरुण नातू यांचे ! ग्राहकांच्या प्रत्येक प्रश्नासाठी त्यांचे सकारात्मक उत्तर तयार असे.

    ज्यांना यश मिळत नाही ते नेहमी नशिबाला दोष देऊन मोकळे होतात व स्वतःवर ‘अपयशी’ हा शिक्का मारतात, पण खरे म्हणजे त्यांच्या प्रयत्नांची दिशा चुकलेली असते. कुणाचेही नशीब खरे किंवा खोटे नसते. डोक्यावर बर्फ व जिभेवर खडीसाखर ठेवून वागले तर ग्राहकांच्या सर्व आक्षेपांना, प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देता येतात. श्री. अरुण नातू यांना हे सूत्र चांगलेच अवगत असल्याने त्यांना ग्राहकांची कमतरता कधीच जाणवली नाही.

    सन २००० पर्यंत ‘नातू कॅटरर्स’च्या छोट्या-मोठ्या अशा भरपूर ऑर्डर्स वाढल्या. नातू कॅटरर्सच्या पदार्थांची, भोजनाची चव खवय्ये मंडळींच्या जिभेवर इतकी रेंगाळू लागली की नाशिकमध्ये मंगल कार्यालयांमध्ये पॅनेलमध्ये ‘नातू केटरर्स’ आहेत का ? अशी लोकांची विचारणा होऊ लागली. आणि नातू केटरर्स ग्राहकांच्या हक्काचा केटरिंग ब्रॅंड बनला. 

    आणखीन वाचा:

  • NEFT, RTGS की UPI? जाणून घ्या तुमच्यासाठी कोणता पर्याय बेस्ट!

    NEFT, RTGS की UPI? जाणून घ्या तुमच्यासाठी कोणता पर्याय बेस्ट!

    बँक व्यवहारांच्या चार प्रमुख पद्धती आणि त्यांचे नियम!

    काळ बदलतोय आणि त्यासोबतच आपल्या चलनाचे स्वरूपही बदलत आहे. पूर्वी पोस्टाद्वारे आई-वडिलांना पैसे पाठवण्यासाठी मनीऑर्डरचा आधार घ्यावा लागायचा, ज्यामध्ये वेळ आणि कष्ट दोन्ही मोठ्या प्रमाणावर खर्च व्हायचे. मात्र, आजच्या डिजिटल युगात पैसे पाठवणे म्हणजे केवळ काही सेकंदांचा खेळ झाला आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज परदेशात राहणारा मुलगाही आपल्या घरी काही क्षणात ‘कॅशलेस’ व्यवहार करून पैसे पाठवू शकतो. भारतातील प्रगत पेमेंट आणि सेटलमेंट प्रणालींमुळे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित करणे अत्यंत सोपे, सुरक्षित आणि जलद झाले आहे. या क्रांतीमुळे बँकिंग संस्था आणि ग्राहक यांच्यातील अंतर पूर्णपणे पुसले गेले आहे.

    तरीही, व्यवहार करताना अनेकदा संभ्रम निर्माण होतो. कधी आपल्याला तात्काळ पैसे पाठवायचे असतात, तर कधी मोठी रक्कम सुरक्षितपणे ट्रान्सफर करायची असते. अशा वेळी नेमका कोणता पर्याय निवडावा? भारतामध्ये प्रामुख्याने NEFT, RTGS, IMPS आणि UPI हे चार पर्याय उपलब्ध आहेत. या लेखात आपण या सर्वांची वैशिष्ट्ये, मर्यादा आणि उपयोग सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत.

    आरटीजीएस (RTGS – Real Time Gross Settlement)

    साधारणतः आपण सर्वजण दैनंदिन व्यवहारांसाठी UPI चा वापर करतो. मात्र, जेव्हा विषय लाखो रुपयांच्या व्यवहाराचा येतो, तेव्हा UPI च्या मर्यादा आड येतात. अशा वेळी आरटीजीएस हा सर्वात खात्रीशीर पर्याय ठरतो. आरटीजीएसद्वारे तुम्ही किमान २ लाख रुपयांपासून पुढे कितीही मोठी रक्कम पाठवू शकता. या प्रक्रियेत रिअल टाइम आधारावर पैसे हस्तांतरित केले जातात, म्हणजेच पैसे पाठवल्याबरोबर समोरच्या व्यक्तीच्या खात्यात जमा होतात. यात कोणताही विलंब नसतो. आरटीजीएस सेवा आता २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध आहे. जर तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊन हा व्यवहार केला, तर बँक त्यावर नाममात्र शुल्क आकारू शकते. परंतु, नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगद्वारे ऑनलाइन व्यवहार केल्यास हा व्यवहार पूर्णपणे विनामूल्य असतो. मोठ्या व्यावसायिक व्यवहारांसाठी किंवा मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी आरटीजीएस हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो.

    एनईएफटी (NEFT – National Electronic Funds Transfer)

    NEFT ही भारतातील सर्वात लोकप्रिय आणि जुनी ऑनलाइन फंड ट्रान्सफर पद्धत आहे. याचा वापर केवळ देशांतर्गतच नव्हे, तर विशिष्ट नियमांनुसार काही आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठीही केला जातो. आरटीजीएस आणि एनईएफटीमध्ये मुख्य फरक असा की, एनईएफटीमध्ये पैसे बॅचेसमध्ये पाठवले जातात. दर अर्ध्या तासाला एक बॅच सेटल केली जाते. त्यामुळे यात पैसे जमा होण्यासाठी ३० मिनिटे ते २ तासांचा वेळ लागू शकतो. दरम्यान पगार वाटप, घराचे भाडे, वीज बिले, ऑनलाइन खरेदी, क्रेडिट कार्ड बिले किंवा कर्जाचे हप्ते भरण्यासाठी एनईएफटीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. या प्रणालीमुळे दुर्गम भागातील नागरिकही मुख्य प्रवाहातील बँकिंगशी जोडले गेले आहेत. ही सुविधा वर्षातील ३६५ दिवस, २४ तास कार्यरत असते. बँकेच्या सुट्ट्यांचा यावर आता कोणताही परिणाम होत नाही. ऑनलाइन पद्धतीने हा व्यवहार केल्यास ग्राहकाला कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागत नाही.

    आयएमपीएस (IMPS) आणि युपीआय (UPI) मधील फरक

    हे दोन्ही पर्याय त्वरित पैसे पाठवण्यासाठी वापरले जातात, परंतु त्यांच्या कार्यपद्धतीत आणि उद्देशात मोठा फरक आहे. युपीआय (Unified Payments Interface) हे आजच्या काळातील सर्वात सोपे माध्यम आहे. यात तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा खाते क्रमांक किंवा IFSC कोड विचारण्याची गरज नसते. फक्त मोबाईल नंबर, युपीआय आयडी किंवा क्यूआर कोड (QR Code) स्कॅन करून तुम्ही पैसे पाठवू शकता. ही सेवा पिन आधारित असून मुख्यत्वे किरकोळ आणि दैनंदिन व्यवहारांसाठी म्हणजेच किराणा दुकान, भाजीपाला, चहाची टपरी इथे वापरली जाते. याची मर्यादा साधारणपणे दिवसाला १ लाख रुपयांपर्यंत असते. मात्र आयएमपीएस (Immediate Payment Service) ही एक पारंपरिक बँकिंग पद्धत आहे. यात पैसे पाठवण्यासाठी लाभार्थीचा पूर्ण खाते क्रमांक आणि बँकेचा IFSC कोड टाकणे अनिवार्य असते. हे नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग ॲपद्वारे वापरले जाते. आयएमपीएसची मर्यादा युपीआयपेक्षा जास्त असते. तुम्ही यातून एका वेळी ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम त्वरित पाठवू शकता. थोडक्यात काय तर लहान आणि जलद व्यवहारांसाठी UPI उत्तम आहे, तर मोठ्या रकमेच्या सुरक्षित आणि व्यावसायिक व्यवहारांसाठी IMPS अधिक उपयुक्त ठरते.

    व्यवहारात तांत्रिक त्रुटी आल्यास काय करावे?

    डिजिटल युगात जेवढी सोय आहे, तेवढीच तांत्रिक सावधगिरी बाळगणेही गरजेचे आहे. कधीकधी सर्व्हर डाऊन असल्यामुळे किंवा तांत्रिक बिघाडामुळे पैसे खात्यातून कट होतात पण समोरच्याला मिळत नाहीत. अशा वेळी घाबरून न जाता UPI (Google Pay, PhonePe, Paytm) व्यवहारांसाठी, सर्वप्रथम संबंधित ॲपमधील Help किंवा Raise Complaint विभागात जाऊन तक्रार नोंदवा. तिथून प्रतिसाद न मिळाल्यास, तुम्ही NPCI (National Payments Corporation of India) तसेच आरबीआयची २४x७ हेल्पलाईन ‘डिजीसाथी’ (DigiSaathi) किंवा ‘CMS’ (Complaint Management System) च्या अधिकृत पोर्टलवर तक्रार करू शकता. NEFT किंवा RTGS मध्ये बिघाड झाल्यास २४ तासांनंतरही रक्कम जमा न झाल्यास त्वरित आपल्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा किंवा कस्टमर केअरला फोन करावा. कोणत्याही डिजिटल व्यवहाराचा सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे UTR (Unique Transaction Reference) किंवा Transaction ID. या क्रमांकाशिवाय बँक तुमचा व्यवहार शोधू शकत नाही. त्यामुळे तक्रार निवारण होईपर्यंत व्यवहाराचा मेसेज किंवा स्क्रीनशॉट जपून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

    महत्वाची टीप: आरटीजीएस, एनईएफटी, आयएमपीएस आणि युपीआय यांपैकी कोणता पर्याय निवडावा, हे पूर्णपणे तुमच्या गरजेवर आणि रकमेच्या मर्यादेवर अवलंबून असते. हे व्यवहार करताना सायबर सुरक्षेचे नियम पाळणे, आपला पिन कोणालाही न सांगणे आणि अधिकृत बँकिंग ॲप्सचाच वापर करणे ही आपली जबाबदारी आहे. पैसे मिळवण्यासाठी (Receive) कधीही पिन टाकण्याची गरज नसते, पिन फक्त पैसे पाठवण्यासाठीच लागतो. भविष्यात हे तंत्रज्ञान अधिक विकसित होईल, ज्यामुळे आपला कॅशलेस भारताचा प्रवास अधिक सुखकर होईल.

    आणखी वाचा: