Category: आधुनिक शेती

  • शाश्वत शेतीचा मूलमंत्र : सेंद्रिय शेती

    शाश्वत शेतीचा मूलमंत्र : सेंद्रिय शेती

    सेंद्रिय शेती हा शेतीचा असा प्रकार आहे जिथे कृत्रिम रसायने, अजैविक खते व इतर हानिकारक पदार्थ. कीटकनाशके इत्यादींचा वापर न करता पिकांचे उत्पादन केले जाते.

     सेंद्रिय शेती म्हणजे थोडक्यात – रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने शेती करणे होय.

     सेंद्रिय शेतीत खालील प्रमुख घटकांचा समावेश होतो :

    • सेंद्रिय खतांचा वापर: कंपोस्ट, गोठ्याचे खत, हरीत खत (ग्रीन मॅन्युअर) यांचा वापर करून जमिनीची सुपीकता वाढविणे.
    • जैविक कीटक नियंत्रण: नैसर्गिक कीटकनाशकांचा वापर करून कीटक आणि रोगांवर नियंत्रण ठेवणे.
    • शेती व्यवस्थापन: पीक बदलणे, मिश्र पीक पद्धती, आंतरपीक पद्धती आणि बहुपीक पद्धतीचा वापर करून जमिनीचे पोषण राखणे.
    • जैवविविधता वाढवणे: विविध प्रकारच्या पिकांची लागवड करून शेतीत जैवविविधता वाढवणे.
    • पाण्याचे संवर्धन: कमी पाण्यात अधिक उत्पादन

     सेंद्रिय शेतीचे मुख्य प्रकार :

    1. बायोडायनामिक शेती (Biodynamic Farming):

    – बायोडायनामिक शेती ही सेंद्रिय शेतीची अशी पद्धत आहे, ज्यात सजीव तत्त्वांचा वापर केला जातो. या शेतीत पृथ्वी, प्राणी आणि वनस्पती यांच्यातील परस्पर सहकार्यावर विशेष भर दिला जातो.

    2. वर्मीकल्चर (Vermiculture):

    – वर्मीकल्चर या शेतीच्या प्रकारात गांडुळ खताचा वापर करून शेती केली जाते.  यामध्ये गांडुळांचा वापर करून जमिनीची सुपिकता वाढवली जाते.

    3. नैसर्गिक शेती  (Natural Farming):

    – नैसर्गिक शेतीमध्ये रासायनिक खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर केला जात नाही. या पद्धतीमध्ये नैसर्गिक घटकांचा वापर करून शेती केली जाते. या शेतीचे वर्णन कीटकनाशक मुक्त शेती असे केले जाते. 

    4. पर्माकल्चर (Permaculture):

    पर्माकल्चर ही सेंद्रिय शेतीची अशी पद्धत आहे ज्यात शाश्वत शेती पद्धतींचा वापर करून शेती केली जाते. या शेती प्रकारात पर्यावरणाचे संतुलन राखून शेती केली जाते.

    5. एक्वापोनिक्स (Aquaponics):

    एक्वापोनिक्स ही पद्धत जलकृषी (Aquaculture) आणि हायड्रोपोनिक्स (Hydroponics) या दोन पद्धतींचे संयोग आहे. यामध्ये माशांचे पालन आणि पाण्यावर आधारित शेती केली जाते. पारंपरिक शेतीपेक्षा 6 पट जास्त नफा या शेतीतून मिळतो. 

    6. इंटिग्रेटेड फार्मिंग (Integrated Farming):

    इंटिग्रेटेड फार्मिंगमध्ये विविध प्रकारच्या शेती पद्धतींचा संयोग केला जातो, ज्यात पशुपालन, फळबाग, पिकांचे उत्पादन इत्यादींचा समावेश असतो.

    7. झिरो बजेट नैसर्गिक शेती (Zero Budget Natural Farming):

    ही पद्धत भारतातील कृषी वैज्ञानिक सुभाष पालेकर यांनी विकसित केली आहे. या पद्धतीमध्ये खर्च कमी करून शेती केली जाते आणि प्रामुख्याने नैसर्गिक साधनांचा वापर केला जातो.

    हा प्रकार शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि पर्यावरण पूरक शेती करण्यासाठी मदत करतात.

    सेंद्रिय शेतीचे फायदे खालीलप्रमाणे :  

    1. मृदास्वास्थ सुधारणा:

    – सेंद्रिय शेतीत रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर टाळल्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते. जैविक घटकांचा वापर करून मातीची सुपिकता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.

    2. पर्यावरण पूरक:

    – सेंद्रिय शेतीत नैसर्गिक साधनांचा वापर केल्यामुळे पर्यावरणाला हानी पोहचत  नाही. जल, मृदा, आणि हवेची गुणवत्ता राखली जाते.

    3. आरोग्यदायी अन्न:

    – सेंद्रिय शेतीत उत्पादन केलेले अन्न रसायनमुक्त असते. त्यामुळे या अन्नाचे सेवन केल्याने आपले आरोग्य चांगले राहते.

    5. कमी खर्च:

    – सेंद्रिय शेतीत रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर टाळल्यामुळे खर्च कमी होतो. शेतकऱ्यांना स्थानिक साधनांचा वापर करून शेती करणे सोपे होते.

    6. शाश्वत शेती:

    – सेद्रिय शेती शाश्वत शेतीची एक पद्धत आहे. यामुळे शेतीची उत्पादकता आणि टिकाऊपणा वाढतो.

    7. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना:

    – सेंद्रिय शेतीत स्थानिक संसाधनांचा वापर केल्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते. शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठांमध्ये आपले उत्पादन विकता येते.

    8. सामाजिक फायदे:

    – सेंद्रिय शेतीत शेतकरी आणि उपभोक्त्यांमध्ये अधिक विश्वास आणि जवळीक निर्माण होते. हे उत्पादन थेट शेतकऱ्यांकडून उपभोक्त्यांपर्यंत पोहोचवणे सहज शक्य होते. 

    सेंद्रिय शेतीच का ?

    सेंद्रिय शेती निवडण्याची अनेक कारणे आहेत. जी विशेषत: पर्यावरण, आरोग्य, आणि आर्थिक फायद्यांशी संबंधित आहेत. 

    1. लवचिकता :

    – सेंद्रिय शेतीमुळे मातीची गुणवत्ता सुधारली जाते, ज्यामुळे ती अधिक लवचिक आणि ताण सहनशील बनते. त्यामुळे दुष्काळ, पूर, किंवा हवामानातील अनपेक्षित बदलांचा परिणाम जमिनीवर त्या मानाने कमी होतो.

    2. दीर्घकालीन आर्थिक लाभ:

    – सेंद्रिय शेतीत सुरुवातीला खर्च थोडा जास्त वाटू शकतो, परंतु दीर्घकाळात जमीन सुपिक राहते, उत्पादनाची गुणवत्ता सुधारते, आणि शेतकऱ्यांना अधिक चांगला बाजारभाव मिळतो.

    3. कमी ऊर्जा वापर:

    – सेंद्रिय शेतीत यांत्रिक साधनांचा कमी वापर केला जातो आणि नैसर्गिक साधनांचा वापर केला जातो. यामुळे ऊर्जा वापर कमी होतो, जो पर्यावरणासाठी फायद्याचा असतो.

    5. समुदायाची एकता:

     – सेंद्रिय शेतीत शेतकरी, ग्राहक, आणि स्थानिक समुदाय एकत्र येतात. यामुळे सामाजिक एकता वाढते आणि समाजातील लोकांमध्ये एकमेकांबद्दल विश्वास निर्माण होतो.

    6. जमिनीचा दीर्घकालीन टिकाव:

    – सेंद्रिय शेतीत मातीची गुणवत्ता कायम राखली जाते, ज्यामुळे जमिनीचा दीर्घकालीन टिकाव राहतो. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा अधिक काळ फायदा मिळतो.

    7. जलचक्राचे पुनरुज्जीवन:

    – सेंद्रिय शेतीत पाण्याचा योग्य वापर आणि नैसर्गिक पद्धतींचा अवलंब केल्यामुळे जलचक्राचे पुनरुज्जीवन होते. यामुळे भूजल पुनर्भरण होते.

    8. कमी प्रदूषण :

    – सेंद्रिय शेतीत कीटकनाशकांच्या अवशेषांचा वापर टाळल्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी होते. यामुळे पर्यावरणातील अपायकारक प्रभाव कमी होतात.

    9. शेतकरी आत्मनिर्भरता:

    – सेंद्रिय शेतीत शेतकरी रासायनिक कंपन्यांवर अवलंबून राहत नाहीत. त्याऐवजी, ते स्थानिक साधनांचा वापर करून आत्मनिर्भर बनतात.

    10. सेंद्रिय उत्पादने निर्यात:

    – सेंद्रिय उत्पादनांची जागतिक बाजारपेठेत मागणी वाढत आहे. सेंद्रिय शेतीत उत्पादने तयार करून शेतकरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात करू शकतात, ज्यामुळे त्यांना अधिक लाभ मिळतो.

    हे मुद्दे सेंद्रिय शेतीचे महत्त्व अधिक स्पष्ट करतात आणि सेंद्रिय पद्धती निवडण्याचे विविध पैलू दाखवतात.


  • पांढऱ्या कोटातून मातीच्या सेवेपर्यंत: ७५,००० ची नोकरी सोडून काव्या ढोबळेने उभा केला ‘लाखोंचा’ कृषी ब्रँड! कोण आहे काव्या ढोबळे? जाणून घ्या.

    पांढऱ्या कोटातून मातीच्या सेवेपर्यंत: ७५,००० ची नोकरी सोडून काव्या ढोबळेने उभा केला ‘लाखोंचा’ कृषी ब्रँड! कोण आहे काव्या ढोबळे? जाणून घ्या.

    अनेकांच्या मनात चांगल्या सरकारी किंवा स्थिर नोकरीबद्दल आकर्षण असते. “जिथे चांगल्या पगाराची आणि सुरक्षित भविष्यातील हमी आहे, ती नोकरी सोडून दुसऱ्या अनिश्चित क्षेत्रात का जावं?” असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, जुन्नर येथील काव्या ढोबळेने हा विचार बाजूला ठेवत, महिन्याला ७५,००० रुपये पगाराची चांगली नोकरी सोडून कृषीपूरक व्यवसायाचा मार्ग स्वीकारला. आज ती केवळ यशस्वीच नाही, तर दर महिन्याला लाखो रुपये कमवत आहे, आणि तिची कहाणी अनेकांसाठी आदर्श ठरली आहे.

    काव्याच्या यशात एक महत्त्वाचा संदेश आहे. तो म्हणजे जर स्वतःवर विश्वास ठेवला आणि कठोर मेहनत केली, तर कोणतीही अडचण पार करता येते. मात्र, स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गावर अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कधी कधी, “आपलं स्वप्न पूर्ण होईल का?” या शंकेतूनही काही जण जातात. पण हेही सत्य आहे की, अनेक व्यक्ती अपयशांवर मात करून उशिरा का होईना, यश मिळवतात. काव्यानेही हे सिद्ध करून दाखवलं आहे.

    या लेखात आपण काव्याच्या जीवनातील संघर्ष, तिचं यश आणि त्यामागील मेहनतीचा प्रवास याविषयी जाणून घेणार आहोत.

    शेतीची आवड आणि प्रेरणा

    काव्याला लहानपणापासून शेतीची आवड होती. मात्र, त्या वेळी शेतीत करिअर करण्याची शक्यता धूसर वाटत होती. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. तिने जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरीमध्ये पदविका पूर्ण केली आणि मुंबईतील सायन हॉस्पिटल येथे काम करण्यास सुरुवात केली.

    सायन हॉस्पिटलमध्ये काम करत असताना तिला जाणवलं की रासायनिक शेती व त्यातून मिळणारे खाद्यपदार्थ मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम करतात. तिच्या या जाणिवेला कोरोनाच्या महामारीने अधिक धार दिली. कोरोना काळात रुग्णांची सेवा करताना आणि स्वतः कोरोना पॉझिटिव्ह होऊन गंभीर आरोग्य संकटातून जात असताना तिचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. महामारीमुळे झालेली हानी आणि मृत्यू पाहून तिला प्रकर्षाने जाणवलं की, मानवाच्या आरोग्यासाठी शुद्ध खाद्य हाच योग्य मार्ग आहे.आणि त्यासाठी सेंद्रिय शेती महत्वाची आहे. 

     तिने ठरवलं की नोकरी सोडून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीकडे वळायचं. शेतीत उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिने सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास केला.

    कृषी क्षेत्रातील नवा प्रयोग आणि व्यवसायाला सुरुवात 

    २०२२ हे वर्ष काव्याच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा ठरलं. तिने नोकरी सोडून शेती क्षेत्रात काम करण्याचा धाडसी निर्णय घेतला, जो अनेकांसाठी अचंबित करणारा होता. मात्र, तिचा निर्धार पक्का होता आणि पतीची साथ मजबूत होती.दोघांनी त्यांच्या पुण्यातील जुन्नर येथे असलेल्या पाच गुंठे शेतीतून गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्याचं ठरवलं. शेतकऱ्यांशी संवाद साधत रासायनिक खतांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर त्यांनी जागरूकता निर्माण केली आणि स्वतः गांडूळ खत निर्मितीचा प्रयोग सुरू केला.

    ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांनी एका शेतकऱ्याकडून एक किलो गांडुळे खरेदी करून छोट्या खोलीत खत निर्मितीला सुरुवात केली. ऑक्टोबरमध्ये तयार झालेलं पहिलं खत पाहून काव्याचा आत्मविश्वास वाढला. मार्च २०२३ मध्ये त्यांनी “कृषी काव्या” या ब्रँडच्या अंतर्गत व्यावसायिक विक्री सुरू केली. त्यांच्या उच्च गुणवत्तेमुळे मोठ्या प्रमाणात खताला मागणी वाढली. एका शेतकऱ्याने ५० हजार रुपयांचं खत खरेदी केलं, तर एका संस्थेनं २००० किलो गांडुळे खरेदी केली, ज्यामुळे तिला मोठं आर्थिक यशही मिळालं. 

    पांढऱ्या कोटातून मातीच्या सेवेपर्यंत ७५,००० ची नोकरी सोडून काव्या ढोबळेने उभा केला 'लाखोंचा' कृषी ब्रँड! कोण आहे काव्या ढोबळे जाणून घ्या.

    या यशाच्या जोरावर काव्या ने जैविक शेती आणि गांडूळ खत निर्मितीचा प्रसार अधिक व्यापक करण्यासाठी एक यूट्यूब चॅनल सुरू केलं. त्यात तिने शेतकऱ्यांना प्रगत शेती पद्धतींची माहिती देणारे व्हिडिओ तयार केले आणि इतर शेतकऱ्यांचे यशोगाथाही शेअर केल्या.अल्पावधीत तिच्या “कृषी काव्या” ब्रँडने जैविक शेतीसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केलं.

    वर्षाला 24 लाख रुपये कमाई

    काव्या चा गांडूळ खत तयार करण्याचा व्यवसाय २०२३-२४  या आर्थिक वर्षात प्रचंड यशस्वी ठरला. तिने या वर्षात  जवळपास २४ लाख रुपयांची उलाढाल केली आहे आणि पुढील वर्षासाठी ५० लाख रुपयांचे ध्येय ठरवले आहे. तिच्या यशाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे शेतकऱ्यांना खत निर्मितीचे प्रशिक्षण देणे. काव्याने शेतकऱ्यांना गांडूळ खत तयार करण्याची तंत्रे शिकवण्यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन केले, ज्यामुळे २०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना या प्रक्रियेची माहिती मिळाली.

    त्याचबरोबर, काव्या रासायनिक मुक्त शेतीच्या तत्त्वज्ञानावर जनजागृती करत आहे. तिच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना जैविक शेतीची महत्त्वाची माहिती मिळत आहे आणि ते आपल्या पारंपरिक पद्धतींमध्ये सुधारणा करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. काव्याचे हे काम शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविणारे ठरले आहे, कारण ती त्यांना अधिक शाश्वत आणि आरोग्यदायी शेती करण्यासाठी प्रेरित करत आहे.

    मित्रांनो, काव्या ची कहाणी खरोखरच अत्यंत प्रेरणादायक आहे.सरकारी नोकरी सोडून कृषी क्षेत्रात पाऊल ठेवणे आणि यशस्वी होऊन दाखवणे हि साधी गोष्ट मुळीच नाही त्यासाठी प्रचंड जिद्द आणि इछशक्ती लागते .तिचा हा प्रवास संघर्ष आणि समर्पणाचा आहे. तिने आपला ठाम निर्णय घेतला आणि अनेक अडचणींवर मात करत शेती व्यवसायात मोठे यश मिळवले. तिच्या या यशात  फक्त आर्थिक लाभ नाही, तर शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याचा महत्त्वाचा भाग आहे. काव्याची कथा आपणास शिकवते की, कठोर निर्णय आणि मेहनतीचा परिणाम लवकरच मोठ्या यशात बदलू शकतो.

    आणखी वाचा

  • ‘ब्लॅक राईस’ उत्पादनाचा राज्यातील पहिलाच प्रयोग यशस्वी.

    ‘ब्लॅक राईस’ उत्पादनाचा राज्यातील पहिलाच प्रयोग यशस्वी.

    सर्वसाधारण पारंपरिक भात पिकापासून 12 ते 15 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन होते. त्यामुळे अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन वाणांना कृषी विभागाच्या ‘आत्मा’ अंतर्गत ‘ब्लॅक राईस’ लागवडीचा प्रयोग नागपूर जिल्ह्यातील रामटेक, मौदा, उमरेड, कुही, पारशिवनी व कामठी या तालुक्यातील निवडक शेतकरी गटाच्या माध्यमातून पहिल्यांदा 70 एकरामध्ये हा प्रयोग राबविण्यात आला. ‘ब्लॅक राईस’चे बियाणे छत्तीसगड राज्यातून मागविण्यात आले असून सेंद्रीय पद्धतीने भात उत्पादनाचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. या उपक्रमासाठी 10 बचत गटांना बियाण्यासह जैविक खते तसेच सेंद्रीय धानासाठी आवश्यक असणारे निंबोळी अर्कासह इतर सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे या वाणावर किडीचा प्रादुर्भाव नसल्याचे सिद्ध झाले आहे. ‘ब्लॅक राईस’चे उत्पादन 110 दिवसात घेतल्या जात असल्याने दुसऱ्या पिकांसाठी जमीन उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पीक घेणेसुद्धा सहज शक्य झाले आहे. शेतातील धानाचे लोंबी बघता पारंपरिक धानापेक्षा निश्चितच जास्त उत्पादन होईल, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

    Black Rice

    शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून कृषी उत्पादन वाढीसाठी आत्मांतर्गत विविध उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना उत्पादनानंतर चांगला भाव मिळावा, यासाठी विक्री व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. ‘ब्लॅक राईस’च्या भरडणीसाठी सवलतीच्या दरावर राईस मिलसुद्धा देण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी दिली.

    दैनंदिन भोजनात पांढरा, ब्राऊन तांदळाचा वापर नेहमीच करतो. परंतु ‘ब्लॅक राईस’(काळे तांदूळ) विषयीची माहिती नवीन आहे. फार वर्षापूर्वी राजघराण्यातील लोकांसाठी चीनमध्ये ब्लॅक राईस’ची लागवड केली जात होती. त्यामुळे या तांदळाचे नाव Forbidden Rice असे ठेवण्यात आले. या तांदळातील वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे युरोप व अमेरिकेपर्यंत याचा प्रसार झाला आणि त्यावर संशोधन होऊन औषधी गुणधर्म असल्याचे सिद्ध झाले.

    भारतामध्ये ‘ब्लॅक राईस’ उत्तर-पूर्व राज्यामध्ये पिकविला जातो. स्वास्थ्यवर्धक अनेक गुणधर्म असल्यामुळे याला चांगली मागणी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी 10 बचत गटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच उत्पादनाला सुरुवात केली आहे. यामध्ये फायबर, मिनरल्स (आयर्न व कॉपर) आणि उत्कृष्ट गुणवत्ता असलेले वनस्पतीयुक्त प्रोटीन आहे. या तांदळाच्या बाहेरील आवरणामध्ये सर्वात जास्त Anthocyanin Antioxidant गुणधर्म आहेत. त्यामुळे कॅन्सरसह विविध आजारासाठी हा तांदूळ निश्चितच गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे. ‘ब्लॅक राईस’ खाणे आरोग्यवर्धक असल्यामुळे वॉलमार्टसह इतर सुपर बाजारामध्ये सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या काळ्या तांदळाला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे ‘ब्लॅक राईस’ हा पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी निश्चितच वरदान ठरणार असल्याची माहिती ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी सांगितले.

    सेलूच्या बचत गटामार्फत उत्पादन

    कामठी तालुक्यातील सेलू येथील निसर्गराजा सेंद्रीय शेतमाल उत्पादक स्वयंसहाय्यता गटामार्फत दिनकर ठाकरे व अशोक कोकाटे यांनी प्रत्येकी एका एकरात ‘ब्लॅक राईस’ची रोवणी केली होती. पारंपरिक धानाऐवजी काळा तांदूळ कमी दिवसात व कमी खर्चात उत्पादन घेऊन आज चांगले आणि मोठ्या प्रमाणात लोंब्या आल्या आहेत.आता भातपीक कापणीवर आल्यामुळे संपूर्ण शेतात काळ्या लोंब्यांनी बहरले आहे. सेंद्रीय पद्धतीने धानाची लागवड केल्यामुळे रासायनिक खतांवर होणारा खर्चही कमी झाला आहे. कमी दिवसात चांगले उत्पादन होणार असल्याची ग्वाही शेतकऱ्यांनी यावेळी दिली. ‘ब्लॅक राईस’साठी जैविक औषधी खते, निंबोळी अर्क व गांडूळ प्रकल्पसुद्धा कृषी विभागातर्फे उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ‘ब्लॅक राईस’ची बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्याचा संकल्पही बचत गटाच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

    – मराठी कृषी जागरण

  • आधुनिक शेती – Modern Agriculture

    आधुनिक शेती – Modern Agriculture

    Modern Agriculture – मित्रांनो, आपल्या रोजच्या जगण्यात सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत जवळपास सगळ्याच पदार्थांमध्ये कांदा असतो. भारतीयांच्या आहारात कांद्याचा वापर सर्रास केला जातो. संपूर्ण भारतात कांदा पिकविणाऱ्या राज्‍यात, क्षेत्र व उत्‍पादनाच्‍या बाबतीत, महाराष्‍ट्र अग्रस्‍थानी आहे. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे एक लाख हेक्‍टरवर कांद्याची लागवड केली जाते. यामध्‍ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहमदनगर, सातारा हे जिल्‍हे हेक्‍टरी कांदा पिकविण्‍याबाबत प्रसिध्‍द आहेत. तसेच मराठवाडा, विदर्भ व कोकणात सुध्‍दा काही जिल्‍हयांमध्‍ये कांद्याची लागवड केली जाते.

    नाशिक जिल्‍हा हा महाराष्‍ट्रात नव्‍हे तर सबंध भारतात कांदा पिकविण्‍यात प्रसिध्‍द आहे. एकूण उत्‍पादनापैकी महाराष्‍ट्रातील 37 टक्‍के तर भारतातील 10 टक्‍के कांद्याचे उत्‍पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात घेतले जाते. साहजिकच येथे कांद्याचे उत्पादन घेताना पेरणी, काढणी आणि कापणी अशा प्रक्रियांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज भासते. सध्याच्या काळात मजुरांची वाढती मजुरी बघता नक्की त्यांना काम द्यावं का? अशी समस्या सर्व शेतकरी बांधवांसमोर उभी राहिली आहे. शेतकऱ्यांच्या याच समस्येला दूर करण्यसाठी म्हणून की काय नाशिक जिल्हाच्या चांदवड तालुक्यातील तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या मुलांनी कांदा काढणी व पात कापणी यंत्राचा यशस्वी प्रयोग केला आहे. श्रम, वेळ आणि खर्च या तीनही गोष्टी कमी करण्यासाठी या यंत्राचा चांगलाच वापर होणार आहे. 

    कांदा काढणीच्या वेळेस अनेकदा विळा लागून इजा होण्याचा धोका असतो. या गोष्टींचा विचार करून या विद्यार्थ्यांनी उन्हाळी कांद्यासाठी उपयोगी ठरेल असे नावीन्यपूर्ण व स्वयंचलित कांदा काढणी व पात कापणी यंत्र विकसित केले आहे. सागर ऐशी, पंकज पवार, दुर्गेश भामरे व लोकेश देवरे हे चौघे विद्यार्थी कळवण, सटाणा व देवळा तालुक्यांतील आहेत. जन्मच शेतकरी कुटुंबातला असल्याने लहानपणापासूनच त्यांना शेतीतील समस्या जवळून माहित होत्या. यंत्रनिर्मितीसाठी हा महत्त्वाचा घटक होता. तांत्रिक ज्ञानासह त्यांनी विविध शोधनिबंधांचा अभ्यास केला. कांदा पात यंत्र तयार झाले, पण त्यात काही त्रुटी होत्या. मग योग्य अंतरावर कापणी, पात व कांदा विलगीकरण यात काही बदल करून शेवटी बुद्धी कौशल्य, संशोधकवृत्ती अथक प्रयत्नांतून स्वयंचलित पद्धतीचे कांदा पात कापणी (ओनियन लीफ कटर) यंत्र विकसित करण्यात त्यांना यश आले.

    यंत्राची रचना आणि काढणी-कापणी प्रक्रिया

    – दोन मिलिमीटर जाडी व ३ X १.५ इंच आकाराच्या एमएस पाइपवर आधारित आर्क वेल्डिंगच्या साह्याने सांगाडा निर्मिती केली गेली.

    – सांगाडा वाहतुकीसाठी मागील बाजूस १४ इंच आकार परिघाच्या दोन चाकांना जोडून पुढील भागात आधारासाठी बोल्टच्या आधारे स्टँड लावण्यात आलं.

    – शेतातून पातीसहित काढणी केलेले कांदे यंत्राच्या मागील भागात वरील बाजूस हॉपरमध्ये टाकले जातात. हे हॉपर एक मिमी शीट मेटलद्वारे तयार करण्यात आलंय. तसेच यात एकावेळी क्रेटभर पातीसहित कांदे टाकता येतात.

    – हे कांदे यंत्राद्वारे पुढे जाण्यासाठी कन्व्हेअर सिस्टीम आहे. त्यासाठी जीआय शीटचा वापर केला गेलाय.

    – या यंत्रणेतून पुढे आलेले कांदे, कापणीसाठी पातीसहित जाण्यासाठी वर्तुळाकार स्लॉटेड रोटर रचना केली आहे. त्यात एकूण २८ ओळी आणि प्रत्येक ओळीत ९ स्लॉट्‍स आहेत. असे एकूण २५२ चौकोनी स्लॉट्‍स यात आहेत.

    – या यंत्रणेद्वारे कांदा स्लॉटमध्ये तर पात वर उभी असते. रोटर फिरल्यानंतर पात कटरच्या संपर्कात येऊन योग्य अंतरावर कांद्याच्या मानेजवळ कापली जाते. व्यवस्थित कापणी व्हावी म्हणून हार्ड मेटल स्टीलचा कटर वापरला आहे.

    – एकदा कांद्यापासून पात बाजूला झाली तर कापला गेलेला कांदा एका भांड्यात जाऊन पडतो.

    – कन्व्हेअर आणि रोटरच्या गतीवर नियंत्रण व सुसंगतता ठेवण्यासाठी गिअर बॉक्स व वेगवेगळ्या आकाराच्या पुलीचा वापरसुद्धा यात केला गेला आहे.

    – या यंत्राच्या वापरासाठी सिंगल फेज वीजपुरवठा आवश्यक आहे.

    – हे यंत्र तसं ६२ हजार रुपयांत तयार झालंय, पण त्याचा एकूण निर्मिती खर्च धरल्यास ही किंमत ९० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते.

    यंत्राचे फायदे

    – तासाला १० क्विंटल कांदा प्रक्रिया करण्याची यंत्राची क्षमता असल्याने वेळ, मजुरी आणि खर्चात बचत होते.

    – या यंत्राला चाके असल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणंसुद्धा शक्य आहे.

    –  या यंत्राची हाताळणी ही प्रत्येक शेतकऱ्याच्या दृष्टीने सुलभ व सुरक्षित करण्यात आलेली आहे.

    – तसेच हे यंत्र पर्यावरणपूरक व प्रदूषण विरहित आहे.

    आता हे यंत्र बाजारात कधी येतंय आणि ते सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहचतंय हे पाहणं औस्तुक्याचं ठरेल.

    अशा या आधुनिक शेती – Modern Agriculture ची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. हा लेख जास्तीतजास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि नवी अर्थक्रांतीच्या यू ट्यूब चॅनलला आत्ताच subscribe करा.


    आणखी वाचा

  • काय आहे एसआरटी तंत्रज्ञान?

    काय आहे एसआरटी तंत्रज्ञान?

    शेतकऱ्याने उदरनिर्वाहासाठी किंवा जोड-धंदा म्हणून स्वतःच्या सुपीक जागेत बी-बियाणे पेरून केलेला व्यवसाय म्हणजे शेती होय. कोणतही पीक पिकवायचं म्हटलं की, पहिले शेतीची मशागत, नांगरणी, कोळपणी असे बरेच टप्पे पार करावे लागतात. आज आपण ऐषोरामात जीवन जगतो, चांगलं-चुंगलं खातो. त्यामागे शेतकरी राजाचे बरेच कष्ट, त्यांची मेहनत असते. मात्र हल्ली एसआरटी तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्याच्या मेहनतीला थोडा आराम मिळाला आहे. पण नेमकं हे एसआरटी तंत्र काय आहे? याबद्दल अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही, त्यामुळे बरेचजण पारंपरिक शेतीतच अडकले आहेत. चला तर जाणून घेऊ एसआरटी टेक्नॉलॉजीबद्दल.

    एसआरटी म्हणजेच सगुणा राईस तंत्र. या तंत्रज्ञानालाच विनामशागतीची किंवा शून्य मशागतीची शेती असं देखील म्हणतात. विनामशागतीची शेती हे शेती करण्याचं असं तंत्र आहे ज्यात नांगरणी, निंदणी, वखरणी, कोळपणी असं काहीही यात करावं लागत नाही. याउलट पारंपरिक शेती पद्धतीत जमिनीची नांगरणी किंवा पूर्वमशागतीची कामे केली जातात. कोकण आणि विदर्भातील भात शेतीत हे नवे तंत्र वापरले जाते.

    या पद्धतीने शेती करण्यासाठी पाहिल्यांदा गादीवाफे तयार करावे लागतात. गादिवाफे म्हणजे २० सेमी उंची, १ मीटर रुंद व उताराप्रमाणे लांबी ठेऊन वाफे बनवावले जातात. दोन्ही गादी वाफ्यांत ६० सेमी ते ७५ सेमी. रुंदीच्या सऱ्या पाडून त्यात पाणी सोडले जाते. गादीवाफे तयार करण्यासाठी सुरवातीला एकदाच नांगरणी करावी लागते. वाफे तयार केल्यावर त्यावर पीक टोकन पद्धतीने पेरले जाते. पाऊस जास्त झाला तर मारलेल्या चरांवाटे पाण्याचा निचरा करता येतो आणि जर पाऊस कमी झाला तर वाफ्यांमध्ये पाणी साठवलं जातं आणि किमान 8 ते 10 दिवस ते पाणी तग धरून राहतं. आता प्रश्न उभा राहतो तो मशागतीचा. शेतीतील मशागत करण्यासाठी गडी लोक दिवसाला 350 ते 400 रुपये घेतात.

    पीक म्हटलं की तण हे आलंच. शेतातील तणांचा नायनाट करण्यासाठी तणनाशकांचा वापर करावा लागतो. कृषी विद्यापीठानं शिफारस केलेल्या तणनाशकांचा उपयोग करून तणाचा बिमोड करता येतो. त्याबरोबरच पिकांच्या काढणीचीही एक विशेष पद्धत आहे. पारंपरिक शेतीत आपण बऱ्याच वेळी पीक उपटून काढतो, मात्र यामध्ये कोणतही पीक हे कापावच लागतं.

    पिकाचे मूळ जिथे आहे तिथे कुजले तर आपल्या जमिनीतला कर्ब वाढतो. सेंद्रिय कर्बामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव कार्यरत होऊन माती जिवंत होण्यास मदत होते. होणारं बाष्पीभवन ते थांबवून ठेवतं. म्हणून एसआरटी तंत्रज्ञानात पीक मुळासकट काढले जात नाही. सेंद्रिय खत, कर्ब जमिनीत तयार होण्यास मदत होते आणि मुळाच्या शोषणाद्वारे हवा जमिनीत जाते आणि गादीवाफा भूसभुशीत राहतो. एकदा तयार केलेला गादीवाफा किमान १५ ते २० वर्ष टिकतो. गादीवाफा निर्मितीवेळी एकदाच शेणखताचा वापर करतात. या पद्धतीत खर्चात आणि कष्टात दोन्हीत बचत होते. ही पद्धत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वापरतात, कारण त्यावेळी मोठ्या प्रमाणात वाफ्यांमध्ये पाणी साठवता येते.

    विनामशागतीच्या शेतीचे फायदे काय आहेत?

    तर…..

    मातीची धूप कमी होण्यास मदत होते. तसेच जमिनीचा पोत कडक होण्यापासून बचाव होतो. गेल्या तीन वर्षाच्या अभ्यासाच्या निकषानुसार विनामशागत शेतीमुळे 80% जमिनीची धूप थांबली आहे. कापलेले पीक आणि तणांची मुळं जमिनीत कुजल्याने निर्माण होणाऱ्या पोकळीत हवा खेळती राहते.

    गादीवाफ्यात जसजसे सेंद्रिय घटक वाढतील, त्या प्रमाणात गांडुळांची संख्या वाढते आणि त्याचा शेतीला फायदाच होतो. आपण विना-मशगतीच्या शेती कशी करतात त्याचे फायदे काय आहेत? हे सगळं आपण पाहिलं, पण तुम्हाला माहिती आहे का याची सुरुवात कशी झाली?  नव्वदच्या दशकात शेतीतज्ञ प्रताप चिपळूणकर यांनी नांगरणीविणा शेती होऊ शकते हा विचार मांडला.

    त्यानंतर कोकणातील कृषीभूषण शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांनी भात शेतीत विनानांगरणीच्या शेतीचं तंत्र अंमलात आणलं. त्यांनी आपल्या शेतात हा प्रयोग चालू केला. त्यावेळी चिखलणी न करता त्यांनी गादीवाफे तयार केले, भाताचे टोकन तयार केले, टोकन केलेल्या भाताचं पीक चांगलं येतं असं त्यांच्या लक्षात आलं. 2014 ते 15 च्या दरम्यान या तंत्रज्ञानात चांगले रिजल्ट्स आल्यावर कृषी विभागानं हे तंत्र राज्यभर विस्तारण्यासाठी सुरुवात केली.

    अशा या एसआरटी टेक्नॉलॉजीची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. हा लेख जास्तीतजास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि नवी अर्थक्रांतीच्या यू ट्यूब चॅनलला आत्ताच subscribe करा.

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

    आणखी वाचा

  • तुमच्या शेतात मोती फुलवा आणि लाखो रुपये कमवा

    तुमच्या शेतात मोती फुलवा आणि लाखो रुपये कमवा

    आपल्या शेतात सुंदर सुंदर मोती, त्या मोत्यांना असलेली वाढती मागणी आणि त्यातून मिळणारे भरमसाठ पैसे, वा..! तुम्ही थोड्याच दिवसात लखपती होऊ शकता. हो हो पण जरा थांबा. कसंय स्वप्न बघायला काहीच लागत नाही ओ, मात्र ती स्वप्नं पूर्ण करायला खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यात तुम्ही मोत्यांची शेती करणार म्हटल्यावर मेहनतीशिवाय पर्यायच नाही.

    पहिल्यांदा आपण पाहूया ही शेती कशी केली जाते? त्यातून कसा फायदा मिळतो? याचं मार्केटिंग कसं केलं जातं?

    मोत्यांची शेती हा मत्स्यपालन प्रकाराचाच भाग आहे. यामध्ये ऑयस्टर पाळले जातात. ऑयस्टर म्हणजेच कालवे. हा शिंपल्यांचाच एक प्रकार असतो. कोकण्यात या कालव्यांची मस्त झणझणीत चटणी किंवा कालवं मसाला बनवलं जातं, त्याची चव आहा अप्रतिम. त्यात ते मस्त चुलीवर बनवलं असेल, तर मग काही विषयच नाही. स्वर्ग सुख! एकदा तुम्ही हे कालवं मसाला खाऊनच बघा. sorry sorry मी चुकून जरा मेजवानी परिपूर्ण किचन मध्ये घुसतिये… तर आपला मुद्दा आहे शेतीचा. हा तर, हे जे ऑयस्टर असतात म्हणजेच काल. ते गोळा करून त्यावर शस्त्रक्रिया करून, रोपन करून मग मोती गोळा केले जातात.  

    ही शेती करण्यासाठी 20*30 आकाराचा तलाव लागू शकतो. त्याची खोली 5-6 फुट खोल असावी लागते. तलाव उभा करण्यास जर पुरेशी जागा किंवा आर्थिक सोय नसेल, तर तुम्ही घरच्या घरी एक टाकी बनवून मोत्यांची शेती करू शकता. टॅंकच्या किंवा तलावाच्या अवतीभवती हिरवळ कायम राखण्यासाठी तुम्ही झाडं किंवा वेली लावू शकता. टॅंकमध्ये काही दिवस ऑयस्टर ठेवल्यानंतर त्याची शस्त्रक्रिया केली जाते.  ऑयस्टर शस्त्रक्रिया 15 दिवसांनी केली जाते.

    शस्त्रक्रियेअंतर्गत, देवाच्या किंवा फुलांच्या पानांच्या साध्या किंवा डिझाइनर मण्यासारख्या आकृत्या प्रत्येक ऑयस्टरमध्ये घातल्या जातात, 4 ते 6 मिली व्यासाचा. त्याची दोन्ही आवरणे हळुवार पद्धतीने उघडून त्यात त्यात बिया सोडल्या जातात आणि शिंपले बंद केले जातात. या ज्या बिया असतात, त्या जंगली वनस्पती पासून बनवल्या जातात. यासाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता किंवा जवळच्या कृषी-केंद्रातून देखील माहिती मिळवू शकता.

     हे ऑयस्टर नंतर नायलॉनच्या पिशव्यांमध्ये ठेवले जातात आणि बांबू किंवा पीव्हीसी पाईपमध्ये टांगल्या जातात आणि एक मीटर खोलीवर तलावामध्ये सोडल्या जातात. या ऑयस्टरचे खाद्य म्हणजे शेवाळ आणि जनावरांची विष्ठा. दीड, दोन वर्षं तलावात शेवाळ आणि जनावरांची विष्ठा टाकली, तर दोन वर्षानंतर शिंपल्यातील मोती परिपक्व झालेले असतात. यामध्ये सर्वात कठीण आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे. बीज तयार करून त्याचे रोपण करणे. त्यामुळे हे करताना योग्य मार्गदर्शन घेवूनच करावे. 

    एका शिंपल्यात दोन मोती तयार होतात हे, दोन मोती तयार करण्यासाठी तुम्हाला तुमच्या खिशातील साधारण 70 रुपये खर्च करावे लागतात आणि त्या 70 रुपयांचे 2 वर्षानंतर तुम्हाला 3 ते 4 हजार रुपये मिळू शकतात. एका हंगामात तुम्हाला एका टॅंक मध्ये कमीत कमी 5000 मोती मिळू शकतात. त्या 5000 पैकी समजा 4000 मोती वाचले, तर तुम्हाला त्याचे साधारण ६० लाख रुपये मिळू शकतात. मात्र ही सगळी प्रक्रिया काळजीपूर्वक केली पाहिजे.

    कुठेही चूक झाल्यास शिंपल्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊन नुकसान होऊ शकते. त्यामुळे या व्यवसायात मोठी जोखीम देखील असते. मात्र एकदा का तुम्हाला या शेतीची संपूर्ण टेक्निक समजली की मग तुम्ही मालामालच!

    मोती तयार झाले की. दूसरा मुद्दा येतो तो विक्रीचा. सुरत, अहमदाबाद, हैदराबाद, मुंबई या शहरांमध्ये मोत्यांची मोठी बाजारपेठ आहे. मोत्यांची गुणवत्ता उच्चप्रतीची असल्यास त्याला बाराशे रुपये कॅरेट इतकी किंमत मिळते.   

    तुम्हाला वाटत असेल हे खूप रिस्की काम आहे, पण घाबरू नका, अशा बऱ्याच संस्था आहेत, ज्या या शेतीचं प्रशिक्षण देतात तसेच प्रत्येक जिल्ह्यात कृषी केंद्रं असतात, तिथे तुम्हाला उपयुक्त माहिती मिळू शकते आणि कसंय ना जो पर्यंत आयुष्यात risk नाही, तोपर्यंत मजा नाही. काय म्हणता? पटतंय ना!

    हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी